Skip to main content

14 Jan 2019

जन्मशताब्दीच्या निमित्ताने
आठवणी बाबूजींच्या
आयुष्यात काही भाग्ययोग जुळून येतात, मी भाग्यवान खरंच, पुणे आकाशवाणी कार्यक्रम अधिकारी म्हणून काम करताना पंडित भीमसेन, जितेंद्र अभिषेकी, गजाननराव वाटवे, मणिक वर्मा, मालती पांडे, ज्योत्स्ना भोळे अशा नामवंतांच्या मुलाखती, निर्मितीची संधी मिळाली. परंतु सुवर्णसंधी म्हणावी अशी घटना म्हणजे बाबूजी सुधीर फडके यांच्या कार्यक्रमाची निर्मिती आणि त्या निमित्ताने त्यांच्या मयूरपंखी सहवासाची. २००२सालच्या फेब्रुवारी महिन्यात आकाशवाणीच्या सभागृहात हा योग जुळून आला. बाबूजी १५ मिनिटे आठवणी सांगणार होते. प्रत्यक्ष त्यांनी ९० मिनिटे आठवणींना उजाळा दिला
माझे वडील पुण्यातील `ललकार' ध्वनिक्षेपण संस्थेचे नानासाहेब आपटे. बाबूजींशी त्यांचा स्नेह माझ्या जन्मापासून (साधारणपणे १९४२ नंतरचा). सदाशिव पेठेतील आमच्या घरासमोर गजाननराव वाटवे राहत असत, बाबूजी त्यांच्या घरी येत. त्यांच्यामुळे बाबूजी व नानांची मैत्री झाली, तिघांचे सूर जमले. ध्वनिमुद्रिकांची लायब्ररी हा अभिनव उपक्रम नानांनी `ललकार' नावाने सुरू केला. उद्घाटनाच्या दिवशी गजानन वाटवे, बबनराव नावडीकर, कुमुदिनी पेडणेकर आणि नंतर बाबूजी पहिल्यांदाच रस्त्यावरील स्टेजवर `झाला महार पंढरीनाथ' गायले.
१९५५-५६ मध्ये प्रसारित झालेली गदिमा व बाबूजी यांची अपूर्व सांगीतिक निर्मिती म्हणजे `गीतरामायण'. पुण्याच्या इतिहासातील मानाचा शिरपेच! गीतरामायणातील अखेरचे ५६ वे गीत प्रसारित झाले आणि रसिकांसाठी गीतरामायण गायनाचा जाहीर सार्वजनिक कार्यक्रम करावा अशी कल्पना बाबूजींना सुचली. आधी शिवाजी मंदिरात काही निवडक गीते बाबुजींनी सावरकर यांच्यासमोर सादर केली होती. बाबूजी यांनी नाना आपटे यांच्यावर संयोजन आणि ध्वनिव्यवस्था सोपवली. पुण्यातील नूमविच्या प्रांगणात बाबूजींच्या गीतरामायणाची मुहूर्तमेढ झाली आणि कीर्ती वाढतच गेली. नानांच्या उत्कृष्ट, निर्दोष ध्वनिव्यवस्थेमुळे प्रत्येक कार्यक्रमाची ध्वनिव्यवस्था नानांकडेच आली. गीतरामायणाचा रौप्यमहोत्सव १९८० मध्ये पुण्यात झाला. त्यावेळीही ध्वनिव्यवस्था ललकारची होती. १९८६ साली `सावरकर प्रतिष्ठान'चा सुगम संगीताचा कार्यक्रम न्यू इंग्लिश स्कूल टिळक मैदानात होता. कार्यक्रमात ते एक लावणी गाणार होते. त्यांना बारीकसा घुंगरांचा आवाज स्पष्टपणे ऐकू यायला हवा होता. तालवादक श्याम पोरे यांना माइकसमोर त्यांनी वाजवायला सांगितले आणि श्रोत्यांना अगदी शेवटपर्यंत तो स्पष्ट ऐकू येतो का, असे विचारून खात्री करूनच लावणी रंगवली. परिपूर्णतेचा ध्यास तो हाच!
बाबूजींचे आमच्या घरी येणे जाणे सुरू झाले. हळूहळू बाबूजींच्या विविध पैलूंची ओळख झाली. बाबूजी अतिशय नीटनेटके. टापटीप, प्रेम, स्वच्छता, तत्वनिष्ठा, कामातील परिपूर्णता, या सर्वांचे सात्विक मिश्रण! बाबूजी मुंबईहून आले की, कार्यक्रमस्थळी प्रत्यक्ष जाऊन सर्व व्यवस्था बघत. स्टेजची उंची, दिव्यांची व्यवस्था आणि विशेषत: ध्वनिव्यवस्था. माइक व्यवस्थित सेट होण्यासाठी ते ५ मिनिटांचा अवधी घेऊन समाधान झाल्यावर कार्यक्रम सुरू करत. त्यांच्या हार्मोनियमवर डायरीसाठी लाकडी स्टँड असे, त्याच्यावर वरच्या दिव्यांची सावली येणार नाही अशी प्रकाश योजना असावी याची काळजी घ्यावी लागे.
बाबूजी एक जिंदादिल, प्रेमळ, सोज्वळ माणूस म्हणून आम्हाला जवळचे वाटत. कामानिमित्त कधी मुंबईला त्यांच्या घरी (१२ शंकर निवासमध्ये) गेलो की बाबूजींना कोणी आप्त आल्याचा आनंद होई. ललिता वहिनींना ते सांगत, `नाना आपट्यांचा बाळ आलाय पुण्याहून. आता तो जेवूनच जाईल.' त्याही प्रेमाने, आग्रहाने जेवू घालत. आकाशवाणीच्या संग्रहासाठी पुणे केंद्रातर्फे दिग्गज कलाकारांची माहिती व फोटो असे संकलन करत असताना बाबूजींना अधिकृत पत्र पाठवून माहिती व फोटो मागवले, त्यांच्याकडून उत्तर न आल्याने मी आठवणीसाठी फोन केला. काही दिवसांतच मला वैयक्तिक पत्राद्वारे माहिती फोटो पाठवून पत्राच्या शेवटी `आपल्याला त्रास देत आहे त्यासाठी क्षमा करावी'! असे वाक्य लिहिले होते. मीच ओशाळलो, त्यांच्या विनम्रतेमुळे मी भारावून गेलो.
आमच्या घरच्या लग्न, मुंज वगैरे समारंभात त्यांची सहकुटुंब आवर्जून हजेरी असायची. कार्यक्रम किंवा कामानिमित्त ते आले की आमच्या घरी येत असत; सगळयांची चौकशी, गप्पा झाल्यावर जेवूनच जात. आईच्या हातची, `भरल्या वांग्याची भाजी' त्यांना अतिशय आवडत असे. नानासाहेबांच्या आत्मचरित्र-प्रकाशनाच्या भाषणात त्यांनी `त्यातील एखाद्या प्रकरणाला भरली वांगी असे नाव द्यायला पाहिजे' असे उद्गार काढले होते. बाबूजी नेहमी म्हणत `ललकार म्हणजे लाऊडस्पीकर! नाना आपट्यांची साऊंड सिस्टिम म्हणजे पुण्याची चिकागो आहे,' चिकागो हे साउंड सिस्टिम क्षेत्रातील भारतातले सर्वांत मोठे नाव होते. एकदा बाबूजींचा इंग्लंडमध्ये कार्यक्रम असताना स्पीकर बंद पडले. बाबूजींचे नानांना पत्र आले, `इंग्लंडमध्ये माझा कार्यक्रम सुरू असताना एकदम स्पीकर बंद झाले, त्यावेळी तुमची आठवण मला झाली. तुमच्या स्पीकरच्या बाबतीत मला कधी असा अनुभव आला नाही.' ते विधान एखाद्या सन्मानपत्राइतके महत्वपूर्ण वाटले.
सावरकर चित्रपट पूर्ण झाल्यावर हिंदुमहासभेने त्यांचा आणि कलाकारांचा सत्कार आयोजित केला होता, त्यावेळी ते बरेच थकलेले होते. समारंभ सुरू होण्यापूर्वी त्यांना वॉशरूमला जायचे होते. मी आणि माझा भाऊ शेखर त्यांच्या बरोबर गेलो. तिथे त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले, आम्ही दोघेही अतिशय घाबरलो. त्यावेळी त्यांनी आपल्या खिशातील चार गोळया तोंडात ठेवल्या, `मला कोणालाही भेटू देऊ नका, तुम्ही दोघे इथून हलू नका' हे खुणेनेच सांगून, १५-२०मिनिटं बसून त्यांना बरे वाटल्यावर सभेच्या ठिकाणी हळू चालत ते गेले आणि सभेत ३०-३५ मिनिटे जोरदार भाषण केले. इतकेच नाही तर सावरकर चित्रपटाचा दुसरा भाग काढायची तयारी दाखविली. इतके जिगरबाज, आणि सावरकर यांच्यावर नितांत प्रेम!
२००२च्या फेब्रुवारीमध्ये बाबूजी पुण्यात आल्यावर ते आकाशवाणीसाठी मुलाखत देणार होते. ते डॉ.मांडके यांच्याकडे कान तपासणीसाठी गेले होते. तिथूनच बाबूजींना गाडीतून आकाशवाणी केंद्रात घेऊन गेलो. मोजकेच प्रश्न विचारून त्यांना बोलते केले. दीड तास ते ओघवत्या वाणीने दिलखुलास आठवणी सांगत होते. मुलाखत संपली त्याक्षणी मला आकाशवााणीच्या सेवेत धन्य झाल्यासारखे वाटले. `सृजनरंग' या मालेत ती मुलाखत प्रसारित झाली. हिमालयाच्या उंचीचे बाबूजी मला नेहमी घरी बाळ म्हणत, पण ऑफिसमध्ये मात्र आपटे किंवा आपटेसाहेब म्हणून संबोधत. ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचा सहवास आमच्या आपटे कुटुंबियांना लाभला, हे खरे तर आमचे भाग्यच. `लाखाची गोष्ट' या चित्रपटाच्या ध्वनिमुद्रिका त्यांनी नानासाहेबांना आणून दिल्या आणि गाणी ऐकून कशी झालीत हे सांगून तुमच्या लायब्ररीत ठेवा..' तसेच `सुवासिनी' या चित्रपटाची स्पुल(टेप) प्रभाकर जोग यांनी आणून दिली होती व `ऐकून मत कळवा' असा बाबूजींचा निरोप होता. आमच्या घरी जेवायला ते नेहमी येत असत. जेवणाच्या शेवटी `आमटीच्या वाटीमध्ये ताक वाढा म्हणजे आमटेकची मजा घेता येईल' असे म्हणायचे.
`गीतरामायणा'च्या पुण्यातील सुरुवातीच्या एका कार्यक्रमात बाबूजी `सेतु बांधा रे सागरी' हे गीत गाताना शेवटी `सीयावर रामचंद्रकी जय्' असे म्हणत, २ कडवी झाल्यावर रसिकांच्या समूहांनी `जय' असा घोष केल्यावर बाबूजी थोडे नाराज झालेले दिसले, पण नंतरच्या कडव्याच्या शेवटी बाबूजींनी स्वत:च `जयजयकार करा' असा हाताने इशारा केला व श्रोत्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. गाण्यात आणखीनच रंग भरल्यावर बाबूजींच्या चेहेऱ्यावरचे भाव बघण्यासारखे होते. नंतरच्या ६व्या कडव्यात `गर्जा गर्जा हे वानरगण रघुपति राघव पतीतपावन' असे रसिकांच्याकडे बघून गायले, तेव्हा हास्याची लाट उसळली. त्या प्रसंगापासून रसिक या ओळी बाबूजी यांच्या बरोबर गाऊ लागल्याने वन्समोअर मिळू लागला.
                                 -रवींद्र आपटे, पुणे     फोन-७७०९०११८३६

 संपादकीय
रडक्या मुलांना खाऊवाटप
मराठ्यांना आरक्षण देण्याची टूम महाराष्ट्नत निघाली, त्याच वेळी शंकेची पाल अनेकांच्या मनांत चुकचुकली असेल की, यांतून आणखी आणखी आरक्षणाच्या मागण्या सुरू होणार आणि त्याचे टोक गाठण्यासाठी देशातल्या लोकांची जातीनिहाय गणना करून त्यांना त्या त्या प्रमाणात आरक्षण द्यावे अशी मागणी होणार. आर्थिक मागासलेल्या लोकांसाठी आरक्षण जाहीर करता यावे म्हणून संसदेत घटनादुरुस्तीचे विधेयक चर्चेला होते, त्यावेळी अनेक खासदारांनी तशी मागणी जोरजोरात केली. त्याचे परिणाम, त्याची शक्यता, यांबद्दल त्यांना जराही कल्पना नसावी... किंवा कदाचित त्यातून जे सामाजिक विघटन व फाटाफूट सुरू होआील, ती व्हावी हाच त्यांचा हेतू असेल!

कल्पना करून पाहावी की, त्यंाचे म्हणणे मान्य झाले आणि जाती-पोटजातीनुसार आरक्षण द्यायचेच म्हटले तर काय काय होआील? प्रस्थापित (गैर)समजुतीनुसार ब्राह्मण समाज साडेतीन टक्के आहे, तर त्यांना साडेतीन टक्के आरक्षण मिळेल. पण तेवढ्याने कसे चालेल? त्यात पोटजातींचा पोटशाखांचा विचार सुरू होणार. ब्राह्मणांत चांद्रसेनी कायस्थांचा प्रभूंचा शेणवींचा दैवज्ञांचा समावेश करायचा कसा? कुठे? किती टक्के? शिवाय देशस्थ कोकणस्थ कऱ्हाडे हे तर ढोबळ भेद आहेतच. त्यांची विभागणी  आजपर्यंत चेष्टा टवाळीच्या पातळीवरच होती, ती यापुढे प्रत्यक्ष अंमलात येआील, कारण तिथे फायद्यातोट्यांचे गणित मांडले जाणार. केवळ कोकणस्थांना समजा त्यांपैकी अेक टक्का द्यायचे तर तेही समान कसे देणार? पुण्याच्या मॉडेल कॉलनीतला  किंवा मुंबआीच्या पेडर रोडचा चित्पावन आणि कोकणातल्या आडवळणी खेड्यातला आपट्या-बापट्या-गोगट्या, यांना समान आरक्षण देअून कसे चालेल?

धनगर आणि धनगड अेवढ्याच फरकाने काही  मतलबी राष्ट्न्वाद्यांनी त्यांच्या टक्केवारीची पिल्ले खेळवायला सुरुवात केली आहे. तसेच प्रत्येक जातीतल्या पोटभेदांचा पत्ता लागणे कोणत्याही सांख्यिकी शास्त्राला महाकर्म कठीण आहे. त्यांची आरक्षणासाठी विभागणी करायची हे काम कसे शक्य होणार? अेका कुटुंबातही तसे कर्तबगारीचे, अस्मितंाचे, लाभा-लोभाचे भेद असतात, तसेच ते परिस्थितीनुसार निर्माण होतात. त्यांच्यात पुढारपण-मागासपण तयार होते. तिथे जातींवर बेतलेले आरक्षण कसे द्यायचे? संधी मिळाली तर आजचा मागास पुढे जातो, पण त्याच वेळी कालचा पुढारलेला आज मागे पडतो; ही घुसळण चालूच राहते. `अत्युच्चीपदी थोरही बिघडतो' मग त्यावेळी त्यास आरक्षण ठेवायचेच काय? कृष्ण यादववंशी राजा होता, आणि यादवांचे राज्यही प्रगत होते. त्यांच्यात यादवी झाली.... कालंातराने मुलायम लालूजींसारखे यादव आता आरक्षणासाठी जातींचीच मोजणी करा म्हणतात. सारेच अजब!!

मराठ्यांना आरक्षण जाहीर करणाऱ्या मुख्यमंत्र्यानीच सूतोवाच केले की, आरक्षण हे केवळ मानसिक समाधान देअू शकेल, प्रत्यक्षात नोकऱ्यांची संख्याच कमी आहे. हे सांगायला तर मुख्यमंत्री कशाला हवेत? ते अुघडच दिसते आहे. नोकऱ्या कमी असल्या तरी आज रोजगाराच्या अनेकानेक संधी पुढ्यात आहेत. तिथे आरक्षण नाही पण कौशल्य, चिकाटी, प्रामाणिकपणा, शहाणपणा आवश्यक आहे. तो जातीवर प्रदेशावर किंवा आर्थिक स्तरावर अवलंबून नाही. अशा स्थितीत प्रत्येक धर्मातल्या आर्थिक दुर्बळांना आरक्षण देण्याचे धोरण ही स्पष्ट राजकीय चाल आहे. गंमत अशी की, सत्ताधाऱ्यांनी मांडलेल्या  या घटना दुरुस्ती विधेयकाला कुणीच पक्ष विरोध करू शकला नाही, कारण सारेचजण मतांच्या राजकीय चिमट्यात पकडले गेलेले होते. शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि आरक्षण हे दोन विषय सध्या असे झालेत की, त्याच्या विरोधात कोण बोलेल तो पापी!!

याला अपवाद अेका खासदाराचा होता, त्याचे नाव ओवैसी. ठरावाच्या मागे दबत दबत घुटमळणाऱ्या साऱ्या विरोधी पक्षीयांच्या चऱ्हाटांना धडाकेबाज विचारगर्भ अुत्तर देणारे त्यांचे भाषण चमकदार होते. अुपलब्ध झालेल्या अत्यल्प वेळेत त्यांनी असे मत मांडले की, आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण हा आपल्या संविधानाशी विसंगत मुद्दा आहे. मुळात आरक्षणाची तरतूद ही सामाजिक समानतेसाठी आहे. काही मागासवर्गीयांना आरक्षण देणे हा सामाजिक न्यायासाठी अेक अुपाय होता, तो अेकमेव नव्हता. आज आरक्षणामुळे काहींना फायदा होअून त्यांचा आर्थिक स्तर अुंचावला असला तरी त्यांची जातीवरून होणारी हेटाळणी संपलेली नाही. भारतीयत्वाची समानता आणि सामाजिक सहअस्तित्व सर्व  समाजात यावे, हा आरक्षणाचा मूळ हेतू संविधानाने अपेक्षित केला आहे. आजच्या राजकारणी चापलुसीने संख्येच्या बळावर जरी ही घटनादुरुस्ती प्रत्यक्षात आली  तरी त्यात घटनेच्या  मूलतत्वाचा भंग होणार आहे.

याशिवाय एक अजब म्हणजे आर्थिक मागासलेपणाचा निकष म्हणून आठ लाखाची उत्पन्न मर्यादा ठेवली आहे. दरमहा ६५ हजाराचे उत्पन्न असणाऱ्यांना सवलत; याचा उघड अर्थ असा की, खुल्या प्रवर्गातील सर्वांना आरक्षणाचा फायदा मिळेल. -म्हणजेच सध्याच्या स्थितीत काहीही फरक पडणार नाही! मराठा किंवा इतर अनेकांस ज्या सवलती म्हणून जाहीर झाल्या आहेत किंवा होत आहेत त्यांचा प्रत्यक्ष स्थितीत फारसा उपयोग होणारच नाही; मात्र आजकाल जे गट राजकारणी आकांततांडवी भोकाड पसरतात त्यांना तितक्याच राजकारणी चलाखीची समजूत घालून `उगीउगी' करण्याचा हा प्रयत्न आहे. मूळ मागण्या व आकांतच फसवा असल्यामुळे हे समजुतींचे आर्जवही फसवे करण्यास हरकत नाही.

या प्रकारे सामाजिक फाटाफुटींच्या आधारावर सारी लोकसभा भर देअून चालणार असेल तर फार मोठी तत्वे अुच्चरवाने सांगण्यातही अर्थ नाही. सारी मानव जात समान, हे तत्व म्हणून ठीक असते; प्रत्यक्षात समानता असत नाही, येअू शकत नाहीच. समानतेसाठी सातत्याने प्रयत्न करीत राहणे हा समाजधुरीणांचा आणि राज्यकर्त्यांचा प्रयत्न असला  पाहिजे. त्याअैवजी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सामाजिक दुहीचे प्रयत्न होत राहणे अुचित तर नाहीच, पण ते भयावह आहे. यात जातिधर्मांना स्थान देणे दांभिक ठरेल. त्यात धर्म नाही. धर्माचरण नाही, धर्मनिरपेक्षता तर मुळीच नाही!

मत-मतांतरेे
हेल्मेट योग्य, सक्ती नको!
दुचाकीस्वाराने हेल्मेट वापरलेच पाहिजे, अशी सक्ती केली आणि त्यास जनतेतून प्रखर विरोध पुण्यात झाला. अपघात झाल्यास हेल्मेटमुळे डोक्याला इजा होत नाही व जीव वाचतो, त्यामुळे हेल्मेट वापरावे, असे माझेही मत आहे, पण सक्ती नको. हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू होतो, म्हणून सक्ती! इमारतीवरून पडून विषबाधा होऊन मृत्यू होतातच. अन्य काही आत्महत्या होतात तशीच दुचाकीस्वाराची आत्महत्या समजावी. हेल्मेट न वापरणारा दुचाकीस्वार स्वत: मरेल, पण इतरांना मारणार नाही. ज्यांत इतरांना त्रास होईल. अपघात घडेल, अशा वागण्यांवर बंधन, सक्ती हवी. पण हेल्मेट न वापरण्याने तसे होत नाही. हेल्मेट वापरलेच पाहिजे. अशी सक्ती नको.
                                     -प्रा.एच.यू. कुलकर्णी, सांगली    फोन- ९८६०७६२३००

आठवडी बाजार
मुंबईत आठवडे बाजार चालू केला, तो बंद आहे. तो मोठ्या प्रमाणात चालू करावा. मी कोपरगावला गेलो होतो. आठवडे बाजार भरतो. बाजारात १०रुपयांस मेथीची जुडी मिळत होती, तीच मेथीची भाजी कुर्डवाडीस १० रुपयाला तीन जुड्या असा भाव होता, तर जालन्यात भाजीस भाव नाही म्हणून शेतकऱ्यांनी माल रस्त्यावर ओतून दिला होता. तीच मेथीची जुडी मुंबईत २०रुपये होती, कोपरगावच्या जुडीमध्ये जवळजवळ चार भाग करून मुंबईत २०रुपये प्रमाणे मेथी विकली जात आहे. मुंबईतील भैय्ये ८०रुपये प्रमाणे एका जुडीमागे मिळवतात. आपल्या गावाकडील भाजी मुंबईत आणा. त्यासाठी शेतकऱ्यांना मदत करा, आठवडे बाजार ठिकठिकाणी मुंबईत उघडा.
पांडुरंग फुंडकर शेतीमंत्री असताना `आम्ही  क्रॉपींग प्रोग्रॅम तयार करीत आहोत' असे एका सभेत जाहीर केले होते. आपले कृषी खाते काहीही मार्गदर्शन शेतकऱ्यांना करत नाही. महाराष्ट्नत चार कृषी विद्यापीठे आहेत व शासनाचे स्वतंत्र असे कृषी खाते आहे. शासनाचे जवळजवळ अर्धे बजेट यासाठी खर्च आहे. कृषी खात्यांतील तसेच कृषी विद्यापीठाच्या सर्व विस्तार अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांची भाजी मुंबईत सर्व उपनगरांच्या आठवडे बाजारात आणण्यासाठी विस्तार खात्याची सेवा कामास लावावी. शेतकरी जिवंत आहे त्याचवेळी आपण त्यांना मदत केली तर तिचा चांगला उपयोग होईल. मरणानंतर मदत करणे म्हणजे वरातीमागून घोडे असा प्रकार चालला आहे. अल्प भूधारक शेतकऱ्यांना गटशेती करण्यास भाग पाडावे. गटशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी.
सोलापूर जिल्ह्यात ऊस लावण्यास कायद्याने बंदी आणावी. ज्वारी, भुईमूग, बाजरी  गहू व इतर कडधान्य लावण्यासाठी शेतकऱ्यांना उत्तेजित करा. आयएएस अधिकाऱ्याची नेमणूक कृषीखाते, पशुसंवर्धन खाते व दुग्धविकास खाते व वनखाते यांचे आयुक्त म्हणून करू नका. माहितगार, तज्ज्ञ व कृतीशील अधिकारी आयुक्त नेमल्यास फार फरक पडेल.
                       -राम नेने, गोरेगाव(प.), मुंबई    फोन- ९७६९६३२६३०


प्रबोधनातून संस्कार घडविणारी शतायुषी संस्था
मिरज विद्यार्थी संघ
शाश्वत वाङ्मयाचे महत्व ओळखून काही चळवळया विद्यार्थ्यांनी स्टुडंट्स युनियन, स्टुडंट्स असोसिअेशन व सरस्वती वाचनालय यांचे अेकत्रीकरण करून ९ नोव्हेबर १९१९ला मिरज विद्यार्थी संघाची स्थापना केली. ज्ञानप्रसार करून लोकांच्या बौद्धिक, मानसिक व सांस्कृतिक विकासाला साहाय्य करणे  हा संस्थेचा तेव्हापासूनच प्रमुख अुद्देश आहे. विद्यार्थ्यांच्या चळवळीतून आणि प्रयत्नांतून संस्था स्थापन झाली, त्यामुळे मिरज विद्यार्थी संघ हे नावही सार्थ ठरले. संस्थेच्या कार्याचा विकास होत गेला, व्यापक स्वरूप येत गेले. जो जोे ज्ञानाचा, विद्येचा अुपासक, तो तो विद्यार्थी  -अशी भूमिका संस्थेने घेतली आहे. `वासुदेवशास्त्री खरे स्मारक कमीटी'ने पीरश्रमपूर्वक निधी जमवून `खरे मंदिर' बांधले, त्याचे अुद्घाटन १९२५साली झाले; व त्याची पुढील व्यवस्था मिरज विद्यार्थी संघाकडेच सोपविण्यात आली.
थोड्याच दिवसांत संस्थेच्या वाचनालयाबरोबर अन्य अुपक्रमांसही प्रारंभ झाला. मुक्तद्वार वाचनालय, ग्रंथसंग्रहालय, वसंत व्याख्यानमाला, वक्तृत्व स्पर्धा, व्याख्याने प्रवचने, संगीत मैफल, ललित कलांची प्रदर्शने आयोजित केली जाअू लागली. या साऱ्यांच्या केंद्रस्थानी विद्यार्थी होता. त्याच्यासाठी स्वतंत्र अभ्यासिका सुरू करण्यात आली. गुणवान विद्यार्थ्यांना पारितोषिके सुरू झाली. महिलांसाठी स्वतंत्र वाचनकक्ष झाला. चिल्ड्न्न्स कॉर्नर मध्ये खेळणी, नकाशे यांशिवाय आिंटरनेट, टीव्ही यांची सोय झाली. स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक पुस्तके अुपलब्ध झाली, त्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अभ्यासिकेची सोय करण्यात आली.
संस्थेकडे सुमारे ४०हजार ग्रंथसंपदा असून त्यात मराठीशिवाय हिंदी संस्कृत आिंग्रजीही ग्रंथ आहेत. ५०-६० दुर्मीळ पोथ्या आहेत. सुरेख अक्षरांतील हस्तलिखिते, मोडी लिपीतल्या पोथ्या, विश्वकोश, संदर्भग्रंथ यांचा स्वतंत्र विभाग आहे.
वसंत व्याख्यानमालेच्या निमित्ताने आिथे अनेकानेक दिग्गज येअून गेले. १९१९ पासून लोकमान्य टिळक, म.गांधी, महर्षी कर्वे, शि म परांजपे, सावरकर, विनोबा आित्यादी सन्माननीय वक्त्यांचे हस्ताक्षर, छायाचित्रे व परिचय जतन केले आहेत. १९८२ पासूनच्या वक्त्यांची भाषणे सीडी मध्ये जपून ठेवलेली आहेत, ती रसिकांना अुपलब्ध करून दिली जातात. संस्थेचे मुक्तांगण व्यासपीठ व सभागृह हे मिरजेचे सांस्कृतिक क्षेत्र बनले आहे.
संस्थेचे नियोजित  अुपक्रम-
* बालोद्यान, ज्येष्ठ नागरिकांसाठी तळमजल्यावर ग्रंथालय
* ई-बुक सेवा, ग्रंथालय बार-कोडींग सिस्टीम
* सन्माननीय वक्त्यांची भाषणे अभ्यासू व्यक्तींना उपलब्ध करून देणे
* स्पर्धा परीक्षा विभागाचा विस्तार करणे
* मुक्तांगण सभागृहात आधुनिक ध्वनियंत्रणा बसविणे
* ऐतिहासिक कागदपत्रे, फोटो, वस्तूंचे जतन करणे
* इलेक्ट्नॅनिक माध्यमांतून संस्थेचा परिचय (यू ट्यूब इ.)
* संस्थेचा इतिहास व स्मरणिका
विनम्र आवाहन- शताब्दी महोत्सवातील उपक्रमांसाठी १० ते १५ लाख रुपये खर्च येणार आहे. विनम्र आवाहन आहे की, संस्थेच्या सर्व कार्यक्रमांस अगत्यपूर्वक यावे. तसेच शक्य ते साहाय्य करावे.
सर्व देणग्या प्राप्तीकरात ८०जी अन्वये करमुक्त- संस्थेचा पॅन नंबर- अअअढच ८७२५अ
देणगीसाठी- सांगली अर्बन को-ऑप.बँक, मिरज मेन शाखा.
सेव्हींग खाते क्रमांक - ०१४० ०४२० १००० ०८८९
खऋड उेवश - कऊऋउ ० उडणउइङ
चेक अथवा डी.डी. `मिरज विद्यार्थी संघ' या नावाने काढावा.
संस्थेचा ईमेल- ज्ञमारपवळी%ीशवळषषारळश्र.लेा
संस्थेचा फोन नं. ०२३३- २२२९०५५

भारतीय सर्कसचे जनक 
कै.विष्णुपंत छत्रे
`ग्रेट इंडियन सर्कस' हा नावाप्रमाणेच `ग्रेट' व्यवसाय होता. या भारतीय सर्कसचे जनक होते कै.विष्णुपंत छत्रे. एका सामान्य ब्राह्मण व्यवसायिकाने त्या काळी घेतलेली ही झेप!

सांगली जिल्ह्यातील अंकलखोप या छोट्याशा गावात १८४० साली विष्णुपंतांचा जन्म झाला. विष्णुपंत पट्टीचे शास्त्रीय गायक होते. एक असा उल्लेख सापडतो, की उस्ताद अब्दुल करीम खाँ यांच्याशी `घराणेशाही'वर विष्णुपंतांची चर्चा झाली होती. बाळासाहेब पटवर्धन यांच्या कुरुंदवाड संस्थानात पागनीस म्हणून ते नोकरी करत होते. ते एक उत्कृष्ट घोडेस्वार होते.
सन १८७९ मध्ये रॉयल इटालियन सर्कस पाहण्यासाठी छत्रे पटवर्धनांबरोबर मुंबईला गेले. सर्कस पाहून विष्णुपंत अतिशय प्रभावित झाले आणि सर्कसचे मालक विल्यम यांना भेटायला गेले. त्या विल्यमने `भारतीय लोक येत्या १० वर्षांत सर्कसचा विचारसुद्धा करू शकणार नाहीत,' असं म्हणून त्यांना घालवून दिले. विष्णुपंतांनी हे आव्हान स्वीकारले, आणि १८८० साली ग्रेट इंडियन सर्कसचा जन्म झाला. सर्कसचा पहिला खेळ १८८० मध्ये संस्थानिक पटवर्धन आणि काही निवडक निमंत्रित यांच्यासाठी मिरजेजवळ तासगाव येथे आयोजित करण्यात आला होता. जंगली जनावरांना माणसाळविण्यात आणि त्यांना प्रशिक्षण देण्यात छत्रे यांच्या पत्नी तरबेज होत्या; शिवाय त्या ट्न्ॅिपझच्या कसरती करण्यातही कुशल होत्या.
विष्णुपंतांच्या सर्कशीने उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत हिंदुस्थानमध्ये दौरे करायला सुरुवात केली. नंतर `ग्रँड इंडियन सर्कस' या नावाने त्यांनी सिलोन, दक्षिण आणि पूर्व आशिया यांमधल्या देशांसह अमेरिकेतसुद्धा सर्कस नेली. तिथे सगळयांनी सर्कशीतल्या खेळांचे कौतुक केले, तरी विदेशी सर्कशींच्या तुलनेत हा खेळ आर्थिक दृष्ट्या फायदेशीर होत नसल्याने विष्णुपंत हिंदुस्थानात परत आले. मग ते पोहोचले केरळमध्ये. तेथे त्यांना प्रचंड लोकप्रियता लाभली. तेथील एक प्रख्यात जिम्नॅस्ट कुन्नीहरन हे छत्रे यांना भेटायला आले. त्यांच्याशी छत्रे यांनी एक करार केला की, कुन्नीहरनने कसरतपटू तयार करायचे आणि यांनी कसरतपटूंना आपल्या सर्कसमध्ये नोकरी द्यायची. अनेक चेले कुन्नीहरन यांनी तयार केले. छत्रे यांनीही त्यांना स्थैर्य दिले. त्यांची उत्तम काळजी घेतली.
सर्कसमधल्या कसरतपटूंना उत्तम दिवस यायला लागले, त्यावेळी केरळमधल्या चित्रकुनी या गावात सर्कस अॅक्रॅडमीसुद्धा सुरू झाली होती. इथले सर्कसपटू अनेक देशांतील अनेक सर्कशींमध्ये दाखल झाले होते. छत्रे यांच्याकडून प्रेरणा घेऊन राजकमल सर्कस, ग्रेट रॉयल सर्कस, जम्बो सर्कस, रॅम्बो सर्कस इत्यादी सर्कसकंपन्या उदयाला आल्या. इथे सगळीकडे कुन्नीहरन यांचे विद्यार्थी प्रेक्षकांचे मनोरंजन करीत असत.
सर्कसचा प्रचंड व्याप असतो. अनेक जनावरे, कलाकार यांच्यासह प्रशिक्षक, जनावरांची देखभाल करणारे, आचारी, बँडवाले असे अनेक पडद्यामागचे कलाकार, तंबूसह प्रचंड सामान या सर्वांची ने-आण करणे आर्थिक दृष्ट्या परवडेनासे झाले. त्यामुळे अनेक सर्कशी बंद पडल्या. काही बंद होण्याच्या मार्गावर आहेत.
२१व्या शतकाच्या सुरुवातीला भारतात २०-२५ सर्कस कंपन्या होत्या. ५-१० वर्षांपूर्वी जनावरांनी सर्कसमध्ये काम करायला बंदी आली. कसरती करायच्या असतील, तर अगदी लहानपणापासून मुलामुलींना प्रशिक्षण द्यायची गरज असते. अशा लहान मुलांवर `बाल कामगार' म्हणून बंदी घालण्यात आली. सध्या काही सर्कस कंपन्या अस्तित्वात आहेत, त्या अतिशय कठीण परिस्थितीत तग धरून आहेत.
सर्कसचा पहिला खेळ १८८० साली झाला, तरी मुंबईतला पहिला खेळ २६ नोव्हेंबर १८८२ रोजी झाला. २६ नोव्हेंबर हा दिवस भारतीय सर्कसचा जन्मदिवस म्हणून साजरा होतो. तसा तो २०१८ सालीदेखील रॅम्बो सर्कसमध्ये पुण्यात साजरा केला. त्या निमित्ताने कै.विष्णुपंत छत्रे यांचे स्मरण सर्व सर्कस जगतातील लोक करत असतात.
   -(ब्राह्मण व्यवसायिक पत्रिका' यातील लेखाच्या आधारे)

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन