Skip to main content

21 Jan 2019

वंशावळीचे जतन करणारा हेळवी समाज
आपण कोण, कुठून आलो याबद्दलची अुत्सुकता प्रत्येकाला असते. लग्नाकार्यात किंवा वाडवडिलांच्या पुण्यकर्मावेळी पुरोहित, आधीच्या दोन तीन पिढ्यांची, पितामह-मातामहांची नावे विचारतात, त्यावेळी प्रत्येक कुटुंबात जराशी पळापळच अुठते. तेवढ्यापुरती कोणीतरी ज्येष्ठ व्यक्ती ती माहिती पुरविते परंतु नंतर मात्र आपली आपल्यालाच खंत वाटू लागते, `काय हे? आपल्या आधीच्या अेकदोन पिढ्यांतले नावही आपण सांगू शकत नाही!! पूर्वजांची कीर्ती कसली सांगावी?....' मग शोधाशोेध सुरू होते. आपले मूळ कुठले, मूळ स्थान कुठले, स्थलांतर कसे झाले, कशासाठी झाले,  आपण कुठून आिथे येअून पडलो... वगैरे. कुलदैवत खुणावू लागते, तिथे अेकदा जाअून यायला हवे असे वाटू लागते. धर्मक्षेत्री कुलोपाध्यायाकडे विचारले जाते, तिथल्या नोंदी पाहून कुलवृत्तांत घरी येतो, आपल्या आधीची नावे पाहून शेवटी अेकदाचे आपले नाव तिथे नोंदल्याचे समजले की तेच कुलावृत्तांताचे पुस्तक - बाड आपल्याला फारच पवित्र वाटू लागते.
ब्राह्मण समाज लिहिता वाचता असला तरी, -`पोटासाठी भटकत जरी दूरदेशी फिरेन...' अशाच वृत्तीचा असतो. त्यामुळे अशी वंशावळ सतत अद्ययावत् ठेवणे कठीणच असते. लढाया आणि राज्यकारण यांसाठी स्थलान्तर केलेला क्षत्रिय किंवा व्यवसायासाठी फिरत ते राहिलेले आितर समाज तर अशा कौटुंबिक नोंदी ठेवण्यात अनभिज्ञ किंवा असमर्थ ठरत आले आहेत; परन्तु त्याही  लोकांना आपले मूळ आणि वंशवेल समजण्याचे अप्रूप असतेेच असते! हे काम करणारे तज्ज्ञ, सेवाभावी लोक होते, आजही आहेत. तेही सतत गावोगावी फिरत राहतात आणि साऱ्या समाजांतील वंशवेलींच्या नोंदी करत राहतात. हे अैतिहासिक मोलाचे काम करणाऱ्यांना हेळवी म्हणतात.
ग्रामीण भागात आणि शहरांत `हेळवी' हा जिव्हाळयाचा तितकाच आपुलकीचा कुतुहलाचा विषय आहे. मोकळे आकाश व विस्तीर्ण क्षितिज हे या हेळव्यांचे घर आणि नंदीबैल हे त्यांचे प्रवासाचे साधन. बैलावर संसाराचे ओझे घेऊन फिरणारे हेळवी. मोडी लिपी लिहिता वाचता येणारी ही एकमेव भटकी जमात. गावागावातील लोकांची वंशावळी सांभाळणे, त्यात नवीन नावे घालणे, कुळांचा इतिहास नोंदवणे हा हेळव्यांचा परंपरागत व्यवसाय आहे. भारताच्या ग्रामीण व्यवस्थेत गावगाडा चालवणारे आलुतेदार-बलुतेदार तयार झाले. तसे गावातील लोकांची वंशावळ जतन करण्याचे काम हेळव्यांना खुद्द भगवान शंकरांनी दिले, असे ते म्हणतात. हेळव्यांचा नंदीबैल म्हणजे भलेथोरले जनावर. अंगापिंडाने मजबूत पांढराशुभ्र नंदी लक्ष वेधून घेतो. हेळव्यांचा पोषाखही तसाच लक्षवेधी, डोक्याचा लाल-गुलाबी धनगरी फेटा, अंगात मांडचोळणा आणि धोतर, खांद्यावर उपरणे, पाय झाकण्यासाठी गुलाबी उपरणे. वंशावळ सांगताना हेळवी पाय झाकून घेतात. कारण त्यांच्या मतानुसार हेळव्यांचा मूळ पुरुष लंगडा होता. हातात चांदीचे कडे, कानात कुंडले, पायात जोडव्या व चांदीचे तोडे असे हेळवी त्यांच्या बैलांनाही सजवतात. नंदीबैलावर रंगीत चित्रांची कशिदाकारी केलेली झूल, शिंगांना रंगरंगोटी करून त्यांच्या टोकांना पितळी टोपडी, त्यांना रंगीबेरंगी गोंडे असतात. गळयात मोठ्या घंटेबरोबर लहान लहान घंटांच्या माळा. हेळवी बैलावर बसून गावात आले की गावात बातमी पसरते आणि त्यांना भेटायला गर्दी उसळते. गावकरी प्रेमाने त्यांचे स्वागत करून त्यांच्या राहण्याची व नंदीबैलाच्या चाऱ्याची सोय करतात. हेळवी गावातील सर्वांना नावानिशी ओळखतात.
हेळवी साधारणपणे एखाद्या गावी यात्रेदरम्यान येतात. त्यामुळे शहरात गेलेली माणसेदेखील भेटतात. प्रत्येक हेळव्याकडे साधारणपणे दहा ते पंधरा गावे असतात. त्यातील काही त्यांची मुले परंपरेने सांभाळतात. प्रत्येक गावातील मूळ कुळांच्या वंशावळी व त्यांचा इतिहास हेळव्यांकडे असतो. गावात हेळव्यांची मुक्कामाची जागा ठरलेली असते. गावात ते एक महिनाभर तरी राहतात. त्यांच्या कुटुंबाची सोय लावून बैलावरून घरोघरी फिरतात. प्रत्येक वाड्यावाड्यावर, वस्तीवर जाऊन प्रत्येक घरातील लोकांच्यासमोर त्यांची वंशावळ चोपड्यांमधून हेळवी त्यांच्या खास आवाजाच्या ठेक्यात वाचून दाखवतात. पूजा करणाऱ्या ब्राह्मणांच्या ठेक्यासारखा तो जलद असतो. नीट लक्ष देऊन ऐकल्याखेरीज बोलणे कळत नाही.
एका कुळातील पंचवीस ते तीस पिढ्यांची नावे व त्यांचा इतिहास वाचून दाखवणे म्हणजे मोठी अवघड गोष्ट. प्रत्येक कुळाची माहिती सांगताना ते प्रथम त्या मुळाचा मूळपुरुष, मूळ गाव सांगतात. दिलेल्या तारखा शक कालगणनेनुसार असतात. वंशावळीतील पूर्वजांची जुन्या वळणाची नावे ऐकताना मोठें रंजक वाटते. पुढे हेळवी त्या कुळाचे गोत्र, प्रवर, ऋषिगोत्र, व्यवसाय, कुलदेवी इत्यादी रंजक माहिती सांगतात. वंशावळीतील नावे मूळपुरुषापासून ती आजच्या पिढीपर्यंत आणून सोडतात. दक्षिणा म्हणून हेळवी धान्य घेतात. घरात कोणाचे लग्न, कोणाला मूल झाले आहे का? नवीन सून आली असेल तर तिचेही नाव वंशावळीत घालावे लागते. स्त्रियांची नावे पूर्वीच्या वंशावळ यादीत घालत नव्हते. परंतु हेळवी वंशावळयादीत मुलींची नावे घालू लागले आहेत. जुन्या वंशावळ यादीत एखादी स्त्री जर वारस असेल तर तिचे नाव पडते. एखाद्याचे नाव घालण्यासाठी हेळवी तांब्याची कळशी घेतात. लग्न, मुलाचा जन्म या नोंदीमुळे हेळव्यांचे उत्पन्न वाढते. लोक हेळव्यांच्या मागण्या आनंदाने पूर्ण करतात.
पूर्वी, हेळवी वंशावळींची नोंद असलेले ताम्रपट घेऊन फिरत असत. लोकसंख्या वाढली आणि ताम्रपटांचे ओेझे घेऊन फिरणे अडचणीचे ठरू लागले. त्यामुळे हेळवी वंशावळीतील नोंद कापडी शिवणीच्या कागदांच्या चोपड्यांमध्ये ठेवू लागले. कागद जीर्ण होऊ लागताच त्यांच्या नकला नव्या चोपड्यावर करून ठेवतात. दक्षिण महाराष्ट्नतील हेळव्यांनी त्यांचे ताम्रपट एकत्रितपणे बेळगावला ठेवले आहेत. त्या ताम्रपटांची देखरेख करणाऱ्यांना गुरु म्हणतात.
मध्य महाराष्ट्नतील हेळवी व्यवस्था काही ठिकाणी चालू आहे. पूर्वी त्यांचे केंद्र कासेगांव जि.सांगली हे होते. हेळव्यांचे मूळस्थान चिंचणी हे बेळगाव जिल्ह्यातील गाव आहे. त्या गावी काही हेळव्यांना थोड्या फार जमिनी आहेत. हेळवी लोकांची मातृभाषा कन्नड आहे. हेळवी लोकांची मूळची जात धनगर, परंतु सर्वांनी नंतर लिंगायत पंथ स्वीकारला आहे. त्यामुळे त्यांना मांसाहार वर्ज्य आहे. महाराष्ट्नीय लोकांच्या संगतीमुळे मांसाहार करू लागले आहेत, त्यामुळे त्यांना लिंगायत समाजात लग्नाकरता मुली मिळणे अडचणीचे ठरू लागले आहे. हेळव्यांना सोमवार हा त्यांचा पवित्र वार असतो. त्या दिवशी हेळवी कडक उपवास करतात व बैलाची पूजा करतात. ते सोमवारी बैलावर बसत नाहीत. त्यांचे आडनाव `हेळवी' असेच लावतात. ग्रामीण भागात ज्या केसेसमध्ये वंशावळीची गरज लागते, तेथे हेळव्यांची साक्ष कोर्टात ग्राह्य धरली जाते.
त्यांच्यात शालेय शिक्षणाचे प्रमाण सततच्या भटकंतीमुळे नगण्य आहे. त्यांना सरकारी सवलती व योजना यांची माहिती नाही. हेळवी समाज कर्नाटकात संघटित आहे, परंतु महाराष्ट्नत तो संघटित नाही. हेळवी परंपरा सांभाळण्यासाठी मुलगा हवा, या धारणेमुळे त्यांच्यात अपत्यांचा जन्मदर अधिक आहे. महाराष्ट्नत काही भागात दर पाच वर्षांनी राजस्थानातून भाट येतात आणि वंशावळीची नोंद ठेवतात. हेळव्यांना कामात नवीन तंत्रज्ञानाची माहिती देऊन उपकरणे पुरवणे गरजेचे आहे. हेळवी परंपरा भक्कम लोकाश्रयामुळे सुरळीत चालू आहे. ती इतरत्र तशीच चालू राहावी. याकरता प्रयत्न करणे गरजेचे आहे.
-प्रणव पाटील (मूळ लेख- त्रैमासिक इतिहास शिक्षक)

मानवता वाचविण्यासाठी
मुंबईत महाराष्ट्न् तत्त्वज्ञान परिषदेचे ३५ वे अधिवेशन झाले प्रा.डॉ.ज.रा.दाभोळे हे अधिवेशनाचे अध्यक्ष. त्यांच्या अध्यक्षीय भाषणाचा हा संपादित भाग..
जागतिकीकरण व तंत्रज्ञानाचा सुसाट वेग या दोन घटनांमुळे आजच्या जगासमोर अनेक प्रश्न उभे आहेत. नव्या तंत्रज्ञानामुळे आज उत्पादनासाठी मानवी श्रमाची गरज कमी झाली आहे. भविष्यात येऊ घातलेल्या `कृत्रिम बुद्धिमत्ते'सारख्या शोधांनी ही गरज आणखी कमी होईल. कामगारच नव्हे तर पांढरपेशे व्यवसायिकदेखील `अतिरिक्त' ठरतील. त्यामुळे समस्या अधिकच तीव्र होणार आहे. मुठभर अतिविशेष तज्ज्ञ व वित्त व्यावसायिक गडगंज पैसा कमावतील आणि बाकीच्या व्यक्तींचा जीवनस्तर मात्र घसरत जाईल. यातून आर्थिक विषमता वाढेल.
आज दक्षिण आफ्रिकेत पिण्याच्या पाण्यापेक्षा मोबाईल फोन अधिक सहजतेने उपलब्ध आहेत. समाजमाध्यमे आणि इलेक्ट्नॅनिक माध्यमे यामुळे आता हे वास्तव सर्वांसमोर येत राहील. बेरोजगारी टाळण्यासाठी खेड्यांतून शहरांकडे, त्यातून महानगरांकडे आणि अखेरीस परदेशांत स्थलांतर होणे अटळ आहे. त्यातून गावांचे भकासपण, शहरांची बकाली आणि सांस्कृतिक अस्मितांची टक्कर होणेही अपरिहार्य आहे.
आजच्या जगासमोरील महत्वाचे आव्हान पर्यावरणाचा ऱ्हास हे आहे. मानवाच्या आत्यंतिक हस्तक्षेपामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. त्यातून तापमान बदल, नापिकी, समुद्राच्या पाण्याचे आम्लीकरण होऊन त्यातील जीवसृष्टीला धोका निर्माण होणे, लोकसंख्येचा विस्फोट, अनेक प्रजाती अस्तंगत होणे, आम्लवर्षा अशा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. विज्ञानामुळे आपण आज या समस्यांचा वेध घेऊ शकतो आणि त्यावर उपायही शोधू शकतो; पण ट्न्म्पसारखे राजकारणी जेव्हा क्षुद्र स्वार्थाच्या रक्षणासाठी तापमानवाढीचे वैज्ञानिक निष्कर्षच केराच्या टोपलीत टाकतात, तेव्हा त्यांच्याविरुद्ध नि:संदिग्ध भूमिका घेण्यास वैज्ञानिक कचरत नाहीत. दिवंगत स्टीफन हॉकिंग यांनी ट्न्म्पविरोधात भूमिका घेतली होती. अनेक देशांतील राजकारणी ट्न्म्पविरोधात भूमिका घेण्यास कचरतात, हे वास्तव आहे. पॅरिस करारातून अमेरिकेने माघार घेतल्या तापमानवाढीचे संकट अधिकच गडद होईल. आपल्याला त्यामुळे परतीची वाट सापडणार नाही. ही प्रक्रिया अशीच सुरू राहिली तर पृथ्वी हा शुक्रासारखा उष्ण ग्रह होऊन येथील तापमान २५० अंशांवर जाईल. सल्फ्युरिक आम्लाचा पाऊस पडेल आणि येथील जीवसृष्टी कायमची नष्ट होईल, असा इशारा स्टीफन हॉकिंग यांनी दिला आहे.
मानवी इतिहासाच्या सर्वात धोकादायक टप्प्यावर आपण उभे आहोत. हा ग्रह नष्ट करण्याचे तंत्रज्ञान आपल्याजवळ आहे; पण तो धोका टाळण्याचे तंत्रज्ञान आपल्याकडे नाही अथवा हा ग्रह सोडून सर्वांना दुसऱ्या एका ग्रहावर नेऊन वसविण्याचे तंत्रज्ञान आज आपल्याकडे नाही. याचा अर्थ असा की, माणसाला राहण्यास योग्य असा एकमेव छोटासा ग्रह आपल्याजवळ आहे आणि तो म्हणजे पृथ्वी. म्हणून पृथ्वी वाचविणे हा एकच उपाय आपल्याजवळ आहे. त्यासाठी `आपण सर्वांनी मिळून' या संकटावर मात करणे जरूरीचे आहे.
आपल्याला बंधुभावाने एकत्र यावे लागेल; गरिबीच्या झळा सोसणाऱ्या सर्वांना मदत करावी लागेल, निसर्गाचे संतुलन टिकवावे लागेल; वैज्ञानिकांच्या सल्ल्याची दखल घ्यावी लागेल. सर्वसामान्य माणसांना वैज्ञानिकांचे म्हणणे लगेच पटू शकेल. पण राजकारण्यांना पटवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. आज जगभरात `विकास' हा परवलीचा शब्द बनला आहे. आफ्रिकेतील जंगलापासून कायमच्या दुष्काळग्रस्त मराठवाड्यापर्यंत सर्वांना विकास हवा आहे.
विकासाची कल्पना तरी कशी? विकास म्हणजे चकचकीत गाड्या, आठपदरी रस्ते आणि ओसंडून वाहणारे सुपरमॉल. असा विकास  सर्वांना उपलब्ध होऊ शकेल का? तिचा भार पृथ्वीला पेलणार आहे का? यांसारखे प्रश्न निर्माण होतात. त्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. मात्र ती दिल्यानंतरही एखादा असेही विचारेल की, हे असले प्रश्न आम्हालाच का विचारले जात आहेत? अमेरिकेतील लोकांना का विचारले जात नाहीत? विचार करण्याची गरज गरीबांनाच आहे का? श्रीमंतांनी विचार नाही केला तरी ते चालते काय? विकासाची फळे आधी आम्हालाा चाखू द्या, पर्यावरणाचा विचार करण्याची श्रीमंती गरीब देशांना परवडणारी नाही, जरा चीनकडे बघा, असे म्हटले जाते. पर्यावरण हा प्रश्न खरोखर गंभीर आहे का? मुळात पर्यावरणशास्त्र हे विज्ञान आहे की मूठभर कार्यकर्त्यांनी उभे केलेले खूळ आहे? हे आणि यांसारखे प्रश्न विचारले जातील, याबद्दल खात्री बाळगावी.
तथापि कितीही प्रश्न विचारले, कोणी कितीही संशय व्यक्त केला तरी वास्तवात जे आहे ते बदलणार नाही आणि वास्तव हे आहे की, जर आम्ही गांभीर्याने काही पावले तातडीने उचलली नाहीत, तर सर्वनाश अटळ आहे.
ही पृथ्वी नष्ट करू शकतील इतकी भयानक अण्वस्त्रे आज काही देशांकडे आहेत. एक छुपी अण्वस्त्रस्पर्धा गेली काही दशके सुरू असल्याचे आपण पाहतो आहोत. अंतिमत: आपण सर्वच सर्वनाशाकडे वाटचाल करीत आहोत. दु:खाची गोष्ट ही आहे की, येऊ घातलेला हा सर्वनाश थोपविणारे तंत्रज्ञान मात्र माणसाजवळ आज उपलब्ध नाही. जे तंत्रज्ञान आहे ते सर्वनाशाकडे नेणारे आहे. म्हणून सर्वप्रथम सर्वच माणसांनी, विशेषत: विचारी माणसांनी जे तंत्रज्ञान माणसाला बेरोजगार करणारे आहे त्यास सरळ नकार द्यायला शिकले पाहिजे. मानवी कल्याणास उपयोगी पडेल तेवढेच तंत्रज्ञान स्वीकारावे लागेल. हे काम एकट्यादुकट्याने होणारे नाही. त्यासाठी माणसांनी संघटित होणे अत्यंत आवश्यक आहे. संघटित होऊन अशा मानवी हितविरोधी तंत्रज्ञानास विरोध करावा लागेल. अर्थात,  आम्ही माणसांनी आपापसातील सर्व भेदाभेद दूर ठेवून एकत्र येणे आवश्यक आहे. धर्मभेद, पंथभेद आदी अमंगळ गोष्टींना थारा असता कामा नये. हे सारे भेदाभेद नष्ट होण्यासाठी आपल्याला बुद्ध आणि डॉ. आंबेडकर यांच्या समतेच्या विचारांनीच चालणे आवश्यक आहे. संपूर्ण मानवजात एक होऊन आपले उद्दिष्ट साध्य होण्यासाठी सर्वांची मिळून एकच एक भूमिका तयार करावी लागेल. `सेव्ह अर्थ, सेव्ह ह्युमॅनिटी' ही आम्हा सर्वांची भूमिका असली पाहिजे. या मार्गानेच आपण सर्वनाश थोपवू शकू, अन्यथा तो अटळ आहे. ***

एक सत्यकथा
जिवावरच बेतलेले
प्रत्येकाच्याच जीवनात `असले' प्रसंग येत असावेत. प्रसंगाचे भयावह स्वरूप आणि आता आश्चर्य वाटावे अशा तऱ्हेने त्यातून सुटका; हे एक अगम्य कोडे आहे. अंधश्रद्धा नव्हे, पण कुठलीतरी अनामिक शक्ती रक्षण करीत असावी, या विचाराला पुष्टी मिळते. जीवनातील अशा प्रसंगांच्या आठवणीने अंगावर काटा उभारतो.
नवीन स्कूटर घेतली होती. तरुण वय होते. दूर कोठेतरी भ्रमंती करून यावे म्हणून नव्या स्कूटरवरून मी व माझी पत्नी बाहेर पडलो. वस्तुसंग्रहालय व यमाईदेवीचे दर्शन घ्यावे म्हणून आैंधला पोचलो. उंच डोंगरावर निसर्गरम्य ठिकाण. गाडी वर चढू लागली, रमणीय परिसर दिसू लागला. यमाईदेवी मंदिराचा डोंगरावरील अरुंद रस्ता आम्ही स्कूटरने चढलो. सुखद पश्चिमवारा अंगावर घेत निसर्गचित्र डोळयांत साठवून घेतले. अंधार पडण्यापूर्वी गावात पोचायला हवे होते, म्हणून अनिच्छेनेच उठलो. चढताना फारशी न जाणवलेली उंची परतीच्या वाटेवर भयकारी वाटली. उतार, चिंचोळा रस्ता, खडतर वळण. ब्रेकवर करकचून पाय ठेवला तरी गाडी गतीने धावू लागली. वळणावर गाडीचे नियंत्रण अवघड वाटू लागले. सावधपणे मी उतरत होतो आणि अचानक ब्रेक लागेना. शक्ती एकवटून ब्रेक पॅडवर पाय दाबून धरायचा प्रयत्न केला पण गाडी वेगाने खाली धावू लागली. काळजाचा ठोका चुकला. कपाळावर घाम साठला. गाडी खाली धावते आहे. एका वळणावर सिंमेंटचा बाक व मोठे झाड होते. थोडीशी जागा होती. मी धाडसाने गाडी वळविली व बाकाला धडक देऊन गाडी थांबली. दोघेही धडपडत उठलो. छाती धडधडत होती गाडी तेथेच ठेवली. चालत खाली उतरलो. नंतर मिस्त्रीला पाठवून गाडी खाली आणवली.
मी राहतो तेथे जवळच बुर्ली नावाचे गाव आहे. परवा-परवापर्यंत चांगला रस्ता नव्हता. दोन-तीन फूट खडी पसरून रस्ता केला गेला. रस्ता उंच व बाजूला खोलगट. रस्त्याची रुंदी जेमतेम. समोरून वाहन आले तर ओलांडणे अवघड. पावसाळयाचे दिवस होते; मित्राचे वडील वारले असा निरोप आला, शिष्टाचार म्हणून जायलाच हवे, बाहेर अंधारून आलेले. आम्ही दोघांनी रेनकोट चढविले. स्कूटरला किक मारली. कसरत करीत वस्तीवरच्या घरी पोचलो. सुख-दु:खाच्या चर्चा झाल्या. वेळ गेला कडुस पडले, मिट्ट काळोख, मिणमिणते रॉकेलचे दिवे. रामनामाचा जप करीत रस्त्याला लागलो. पाठीमागून बस धडधडत आली. स्कूटर किती बाजूला घेणार? शक्य तेवढ्या बाजूला मी स्कूटर घेतली. एस.टी. ड्नयव्हरने गाडी थोडी बाजूला घेतली व आम्हाला ओलांडून फर्र्%कन अरुंद रस्त्यावर वळविली. बसच्या मागच्या टायरच्या वर गोल कापलेला पत्रा. बसगाडीला झोला बसला तसे माझ्या स्कूटरचे हँडल त्या पत्र्यात अडकले. सुमारे फर्लांगभर फरफटत आम्हाला एस.टी.ने नेले. कुठल्याही क्षणी चाकाखाली अडकून जाणार ही भीती. एस.टी.च्या ड्नयव्हरला याचा थांगपत्ता नव्हता. कसे कोण जाणे- स्कूटरचे हँडल बसच्या पत्र्यामधून सुटले. एस.टी. पुढे निघून गेली. मी स्कूटरचा हात सोडून चिखलाच्या रस्त्यावर खाली कोसळलो. रस्त्याकडेच्या छपरातून कंदिलाचा उजेड दाखवीला कोणीतरी आले. आम्हाला घरी नेले. पाणी प्यायला दिले. तासभर आम्ही दोघे डोळे मिटून बसून राहिलो व मग घरी आलो.
सांगलीला एसटी स्टँडच्या रस्त्यावर तरुण भारत स्टेडीयमसमोर त्या काळचे जलसा मंदिर -शहरातल्या बोळातून रस्ता येतो व मुख्य रस्त्याला लागतो. हा रस्ता सतत गजबजलेला; आम्ही रिक्षाने एसटी स्टँडकडे निघालो होतो. समोरून सुसाट वेगाने एक पिवळी काळी वडाप जीप आली. आम्ही डोळे गच्च मिटले. जीप थेट रिक्षावर धाड्कन कोसळली. आम्ही रस्त्यावर फेकले गेलो. नवल म्हणजे खरचटण्यापेक्षा जास्त इजा झाली नव्हती, आम्ही उभे राहिलो. वेळ तिन्हीसांजेची बाजूला जलसा मंदिरात तोंड रंगवलेल्या बायका धावत आमच्या जवळ येऊन आम्हाला आधार देऊन उठवू लागल्या. भर रस्त्यात मध्यभागी मोडतोड झालेली रिक्षा, गर्दी जमा झाली. कुणीतरी पाणी प्यायला दिले. डोळयाखाली रक्ताची धार, पँट फाटलेली. आम्ही घाबरून गोंधळून गेलो होतो.
डाव्या बाजूला रिक्षा स्टँड होते. ३-४ ड्नयव्हर जवळ आले.
``साहेब, तुमची काय तक्रार आहे का?''
मी म्हटले, `` तक्रार कसली?''
``मग साहेब येथे थांबू नका. येथून पळा. आता पोलीस येतील. विनाकारण अडकून पडाल! बसा आमच्या रिक्षात. सोडतो.''
आमच्या बॅगा उचलून त्याच्या रिक्षात बसलो. आमच्या बसमध्ये चढवून बसवेपर्यंत ते बिचारे थांबले. घरी पोचलो. एवढा जबरदस्त धक्का बसला होता की भूक-झोप उडाली होती.
सकाळी ऑफीसात आलो. अमोल म्हणाला, ``साहेब -काल सांगलीला गेलो होतो. तरुण भारत स्टेडीयम समोर अपघात पाहिला. रिक्षावर जीप आदळली. रिक्षाचा चेंदामेंदा झालाय! वाहतूक बाजूने वळविली. रिक्षातील कोणीही वाचले नसणार. पेपरात येईलच म्हणा!''
मी खिन्नपणे हसलो. शांत राहिलो.
-मोहन जी.आळतेकर, किर्लोस्करवाडी
फोन-९४२११८४९९६      

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन