Skip to main content

9-7-2108

सेवाव्रती बापट
भारतीय कुष्ठ निवारक संघाचे पूर्व सचिव श्री.दामोदर गणेश बापट यांना `पद्मश्री' जाहीर करून सरकारने सन्मानित केले. 
श्री.सदाशिव गोविंद कात्रे हे रेल्वेकर्मचारी १९६२ साली निवृत्त झाल्यावर, स्वत:ला कुष्ठरोगाची बाधा झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावेळच्या मध्यप्रदेशातील चांपा या ठिकाणी िख्र्चाश्न मिशनरी इस्पितळात ते उपचारार्थ दाखल झाले. मिशनरींच्या सेवाभावी वृत्तीच्या मागे असलेला धर्मांतराचा कुटील डाव लक्षात घेऊन, दाद मागण्यासाठी कात्रे हे त्यावेळचे म.प्र.चे राज्यपाल हरिभाऊ पाटसकर यांना भेटले. राज्यपालांनी त्यांना सांगितले की, `हजारो मैलांवरून येऊन मिशनरी इथे सेवा देत आहेत. तुमचा उद्देश साध्य होण्यासाठी तुम्हीच का नाही `आपली' संस्था करत?' श्री. कात्रे या सल्ल्याने अस्वस्थ झाले व त्यांनी अशी संस्था उभी करण्याचा निर्णय त्यावेळचे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या पाठिंब्याने घेतला. कात्रे आपल्याबरोबर आणखी ४-५ कुष्ठरोगी घेऊन एका झोपडीवजा घरात राहू लागले व त्यांची सेवा करू लागले.
कात्रे आता थकत चालले होते, एवढ्यात एके दिवशी बापट त्यांच्याकडे आले, संस्थेकरता मी काही योगदान देऊ शकतो का, असे विचारले असता कात्रेंनी बापटना या कार्यात येण्यास सांगितले. समोरच श्री.गुरुजींचा फोटो लावलेला होता, त्याखाली एक वाक्य होते-
जीवनका फासा बेधडक फेक दो, चाहे गिरे वैसा ।
आत्मसमर्पण की इस श्रेष्ठ भावना का यह भगवा ध्वज आव्हान करता है ।।
बापट यांच्या शब्दात सांगायचे तर, `क्षणभर गुरुजी प्रत्यक्ष मला हे सांगताहेत असे भासले'. बापट त्या क्षणापासून संस्थेचे झाले व संस्था त्यांची झाली. बापट हे जशपूर येथील वनवासी कल्याण आश्रमाचे प्रचारक. त्यावेळचे बीए. बीकॉम. कात्रेंच्या निधनानंतर बापटनी संस्थेची सूत्रे घेतली.
कुष्ठरोग संसर्गजन्य नाही, तो औषधोपचारांनी पूर्ण बरा होऊ शकतो. तरीही कुष्ठरोग्याबद्दलची घृणा व अनास्था याही भागात भरपूर होती. संस्थेत कुष्ठरुग्णांच्या राहण्याजेवण्याची सोय होऊ लागली, त्यांना करता येईल असा रोजगार -सतरंज्या विणणे, खडू बनविणे, चपला तयार करणे, शेती, गोशाळा, इतर कामात मदत होऊ लागली. त्यांच्या सन्माननीय जीवनास सुरुवात झाली.
संस्थेचे कार्य वाढू लागल्यावर तेथील दानशूर लोकांनी जमीन दिली. आज सत्तर एकर जागेवर संस्थेचे निरनिराळे उपक्रम चालू आहेत. अगदी सुरुवातीच्या काळात संस्थेतील एखादा कुष्ठरोगी वार्धक्याने मरण पावला की, नातेवाईकांना कळवले जाई. त्यांनी नकार दिल्यास त्याचा अंत्यविधी तेथील जवळच्याच हसदो नदीच्या तीरावर पूर्ण सन्मानाने केला जाई. ज्यांनी जीवनभर उपेक्षा, हेटाळणी, अवहेलना सोसली, त्यांचा अंत्यविधी सर्वांनी मिळून करावा ही भावना असे.
बापटांच्या दूरदृष्टीने हे जाणले की, कुष्ठरोगी आश्रमात आला की त्याची मुलेबाळे उघड्यावर पडणार. म्हणून त्यांनी या मुलांसाठी वसतीगृह व शाळा यांची व्यवस्था केली. `सुशील बालकगृह' या नावाने ही शाळा निवासी व बाहेरून येणाऱ्या शेकडो मुलांना शिक्षणाची सुविधा देत आहे.
बापटनी यामागील पार्श्वभूमी सांगितली की, भारतात काम करणाऱ्या मिशनरींपैकी दोन तृतीयांश मिशनरी हे कुष्ठरुग्णांची मुळातील अनाथ व निराधार मुले आहेेत. भारतीय कुष्ठनिवारक संघाच्या या कार्यामुळे त्या भागात सेवामाध्यमातून होणाऱ्या धर्मांतरास आळा बसला आहे.
पाण्याच्या स्वयंपूर्णतेसाठी संस्थेने `माधव सागर' हा तलाव बांधून काढला व मत्स्यशेतीही सुरू केली. त्यामुळे संस्था स्वयंपूर्ण तर झालीच पण इतर गावांनाही या पाण्याचा लाभ होऊ लागला. बापटांच्या कारकिर्दीतील २ महत्वाच्या संकल्पसिद्धी-
१)  कुष्ठरोग्यांसाठी व इतर ठिकाणांहून येणाऱ्या गरजू, गरीब रुग्णांसाठी अद्ययावत असे हॉस्पिटल संस्थेच्या आवारातच उभारले आहे; त्याचा लाभ सुमारे दोन लाख लोकसंख्येला होतो.
२) भव्य असे गणेशमंदिर संस्थेने उभारले आहे; आसपासच्या गावांमधील सर्वांचे ते एक श्रद्धास्थान व एकत्रीकरणाचे साधन झाले आहे.
एकास जोडून दुसरे, अशी कार्यांची साखळी निर्माण करणे ही बापटांची खासीयत होती. उदाहरणार्थ महाराष्ट्नतील बदलापूर येथे श्री गणेशमूर्ती तयार करण्यास सांगितली होती व तिचे काम पूर्ण होऊन ती चांपा येथे नेण्याआधी टेंपोची व्यवस्था केली. पण रिकामा टेंपो बदलापूरला नेण्यापेक्षा संस्थेत तयार झालेला काही पोती तांदूळ ते डोंबिवली येथील नागालँडच्या मुलांच्या वसतीगृहासाठी घेऊन आले. यामागची योजना व सम्यक हितासाठीचे समर्पण या बाबी खरोखरच स्तिमित करणाऱ्या आहेत.
संस्थेच्या चांपा आश्रमापाशी स्थानिक बससेवेचा थांबा आहे. बापट काही कामासाठी तेथे थांबले की, बस चालक पूर्वी त्यांना पाहिल्यावर बस न थांबवता पुढे जात असे. बापट कुष्ठरुग्ण आहेत या गैरसमजुतीने `नको ती ब्याद' असे त्याला वाटत असेल.  पुढे एकेदिवशी बापट बस थांब्यावर बसमध्ये चढले, २कि.मी. गेल्यावर त्यांना महत्वाची काही कागदपत्रे घ्यायला हवीत, ती संस्थेतच राहिल्याचे लक्षात आले. त्यांनी चालकास बस थांबविण्याची विनंती  केली. चालकाला कारण कळल्यावर तो म्हणाला, `इतनी सी तो बात है ना, हम बस वापस संस्था के पास लेते है, आप अपने कागज लेके आईये, हम इतना भी नही कर सकते है आपके लिए?'
बापटनी या अशा प्रदेशात संस्थारूपी नंदनवन उभे केले आहे. बसार भागातील अतीदुर्गम व नक्षलग्रस्त भागात कुपोषणाचे बळी ठरणाऱ्या लहान बालकांसाठी एक उपक्रम सुरू केला आहे. ीळलरश्र लशश्रश्र या रोगाने ग्रस्त अशा या भागातील अनेकांच्या उपचारासाठी एक केंद्र देनेवाडा जिल्ह्यातील नकुलनार/हल्वारास येथे सुरू केले आहे. तेथे बापटजींचे जीवाभावाचे सहकारी व जछऋउ चे निवृत्त महाप्रबंधक जयंत कोठे व त्यांच्या सौ. कार्य करीत आहेत.
बापटांना  अनेक सन्मान मिळाले आहेत. बापटजींना आता ८३वे वर्ष सुरू आहे. प्रकृती वयाच्या मानाने साथ देत नाही. प्रवासही आता कमी झाला आहे पण संस्थेबद्दलच्या विचारांचा चालणारा अखंड नंदादीप मात्र अजूनही तेजाळत आहे.
पत्ता- दामोदर गणेश बापट, भारतीय कुष्ठनिवारक संघ, पोेस्ट चांपा(कात्रेनगर), 
जांजगीर तहसील, छत्तीसगढ-४९५६७१ मो.-७९७०२२५८७२ फोन-(०७८१९) २०१२५६, २०१७४०
परिचय लेखन-  जयवंत नागेश फडके, पुणे-५२ 
फोन-९८८१५५७८२१ 

 संपादकीय
प्लॅस्टिक बंदीची चर्चा अेकंदरीत खूपच होत आहे, कारण प्लॅस्टिकचा वापर आपल्या अंगवळणी पडला आहे. ज्या गोष्टी सरसहा घातक आहेत, पुढच्या काळासाठी सार्वत्रिक  त्रासदायक आहेेत, त्यांना बंदी असली पाहिजे ही गोष्ट खरीच आहे; परंतु त्या गोष्टी जेव्हाकेव्हा सुरू झाल्या तेव्हाच त्या घातक असल्याचे स्पष्ट होते. त्यांचा वापर आणि प्रसार अनिर्बंध झाल्यावर परिणाम हाताबाहेर जातात आणि मग सरकार जागे होते. वास्तविक सरकार आणि सामाजिक संस्था कधीच्याच जाग्या होतात तरीही बराच काळ त्यांची अनिर्बंधता दडपून चालू राहते. मग कुणीतरी पुढारी बाह्या सरसावत राणा भीमदेवी गर्जना करतो आणि प्राप्त संकटातून सोडविण्यासाठीच आपला राजकीय जन्म झालेला आहे अशा थाटात निर्णय घेतो. आज प्लॅस्टिक सापडले; परवापर्यंत वृक्षतोड बंदी होती. तंबाखू गुटका यांच्यावर बंदी (जाहीर) झाली, थुंकण्यावर बंदी झाली, बाहेर शौचाला बसण्यावर बंदी झाली, वाळू अुपसा बंदी आहे, पाणी अुपसा बंदी आहे, सिग्नल तोडण्यास बंदी आहे.....दारूबंदी तर आहेच!

या प्रकाराने केवळ दंगा गर्गशा होतो. लोक पुन्हा त्या बंदीला टांगून ठेवतात. दारू पिणारे पितात, गुटका खाणारे खातात, थुंकणारे थुंकतात. किती जणांस शिक्षा झाली? कुणालाही नाही. मग म्हणायचे, कायद्याने हा प्रश्ण सुटणार नाही,  त्यासाठी समाजात जागृती करायला हवी. कायद्याने बहुधा बंदी घालणाऱ्यांच्या आर्थिक कडकीचा प्रश्ण सुटतो, बाकी काही नाही.  समाजात जागृती करणाऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे अुभे आहे, असेही नाही. दारूबंदीसाठी कुण्या गावच्या बायांनी धडाक्याने आंदोलन केले तर त्यांनाच दमदाटी होत असते. कुण्या तहसीलदाराने वाळूचा ट्न्क अडविला तर त्याच्या अंगावर गाडी घालण्याचे धाडस कुठून येते?

त्यात पुन्हा वाळूसाठी  कनवाळू होणारे  मानवाधिकारी असतात. कोणत्याही धंद्यावर बंदी घातली की त्यामुळे बेकार होणाऱ्यांसाठी त्यांना पान्हा फुटतो.

प्लॅस्टिकबंदीमुळे त्या पिशव्या तयार करणाऱ्या लोकांचा धंदा जाणार हे तर खरेच आहे, पण त्यांच्यावर लगेच बेकारीची कुऱ्हाडच कोसळल्याचा कांगावा होतो. जे मुळातच गैर होते ते सरसकट चालू राहण्यापासून त्या लोकांस रोखण्यासाठी मानवाधिकारी कधी अुंबऱ्याबाहेर येत नाहीत. काहीतरी बंद केले की काहीजणांचे काम जाणारच. शिवाय ज्या नव्या गोष्टी माणसे `विकास' म्हणून आणतात, त्यांच्यामुळे आधीच्या गोष्टी कालबाह्य होणारच. त्यांत गुंतलेल्यांस बेकारी येणारच. पण त्याच्याबदली जे नवे येते त्यात रोजगार मिळतोच की! त्यासाठी तर शिक्षण, आणि रोजगार कालानुरूप ठेवायचा असतो. ते भान ज्यांनी ठेवलेले असते त्यांनाच द्रष्टे म्हणून गौरविले जाते. बंद पडणाऱ्या कामांत गुंतलेल्यांसाठी कुणी रडत राहिल्याने त्या गोष्टी बंद पडण्याचे राहात नाही. पूर्वी अन्नपूर्णेची खाणावळ असायची, आज वडापावची चलती आहे, पण कुणा अन्नपूर्णेने तक्रार केल्याचे अैकण्यात नाही.

तीच गोष्ट बंदीची आहे. मुळात प्लॅस्टिक पिशव्या वापरण्याने जी काही हानी वा तोटे होत होते, ते चालू ठेवता येणारे नव्हतेच. पूर्वी प्लॅस्टिक नव्हते तेव्हाचे दाखले काहीजण त्यासाठी देतात. प्लॅस्टिक नसताना जे काही वापरात होेते, ते सारे गैरसोयीचे होते -म्हणून तर प्लॅस्टिक फैलावले. आता प्लॅस्टिकहून सोयीचे असे काही तरी  आले पाहिजे तरच प्लॅस्टिक थांबेल. त्यावेळी  मानवाधिकाराच्या नावाखाली कोणी बेकारीचे गळे काढले तरी त्यांच्याकडे कोण पाहणार? प्लॅस्टिक प्रदूषणावर दुसरे अुत्तर म्हणजे, त्याच्या टाकाअूचा अुपयोग कुठे ना कुठे व्हायला हवा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात रस्ते तयार करण्यासाठी या प्लॅस्टिकचा यशस्वी वापर करण्याचे प्रयोग झाल्याचे जाहीर झाले, त्याचा प्रसार कुठे थांबला? तो सुरू राहिला तर प्लॅस्टिक बंदीचे काय होणार? अुलट प्लॅस्टिक वाढविण्याची मोहीम काढावी लागेल. मग पर्यावरणाच्या नाशाचा ओरडा केला त्यात सत्य कसे टिकणार?
अेकूणात हा बंदीचा बभ्रा जास्त. त्यात खरेखोटेपणा किती हे कुणाला कळत नाही. ज्या गोष्टी समाजाला हव्या असतात, त्या जरी घातक असल्या तरी त्या सहजी चालूच राहतात, यास आपले प्रशासन जबाबदार असते. सिग्नल तोडणाऱ्यांची वाहने रस्त्यावर चालू  शकतात, कारण तिथले पोलिस मिळेल ते `खात' कोपरा धरून अुभे असतात. तिथे बंदी असून तरी काय अुपयोग?

प्लॅस्टिक बंदीचे तेच होणार हे अुघड आहे. ज्या कोणा मंत्र्याने बंदी घातली त्याने भले पर्यावरण रक्षणाचा आव आणला असला तरी तो आवच  आहे. त्यांच्या मोटारींच्या ताफ्याने कमी प्रदूषण होते काय? त्यासाठी ते मंत्री पाअूलभर तरी चालत जातात काय? त्यांनी तसे चालत जाअूही नये. सुधारणा आणि पर्यावरण हे परस्पर विरोधीच आहे. माणूस आितर प्राण्यांसारखा आदिम अवस्थेत राहिला असता तर हे आधुनिकतेचे प्रश्ण अुभेच राहिेले नसते. पण ते प्रश्ण सोडविण्याचे काही मार्गही शोधले जात असतात, यथाकाल त्याचे आिष्ट परिणामही दिसू लागतील. संकट डोकावू लागले की त्याचे अुत्तर शोधण्यास सुरुवात होत असते. त्या सोयीसुविधांवर बंदी हा काही अुपाय -निदान आपल्या देशात तरी यशस्वी ठरणार नाही. अेखाद्या रस्त्यावर राहणे मुष्किल झाले की तिथे बंदी घालण्यापेक्षा तो रस्ता टाळून वेगळा रस्ता शेाधणे आवश्यक असते. रस्ता आपोआप बंद झाला की सोपे असते. मुद्दाम जिथे तारेचे कुंपण घातले जाते, तिथे तारा वाकवून लोक ये जा करू लागतात, काही काळाने त्या तारा काढून दूर ठेवतात. तिथे अडवायला कोणी राहात नाही. बंदी टिकत नाही. तरीही सरकारला आपण जनहितासाठी काहीतरी करत असल्याचे दाखविण्याकरिता असले स्टंट करायचे असतात. जे प्लॅस्टिकवरती अवलंबून आहेत, त्यांनी फारशी ओरड करू नये. आपल्याकडे बंदी मोडली तर त्या अपराधातून सुटण्यासाठी काय करावे लागते हेही माहीत आहे. तेच लोकांनी करावे यासाठी तर ही आणखी अेक बंदी असावी काय?

मत-मतांतरेे
रियासतकारांंबद्दल काही
जूनमधल्या अंकात रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाआी यांच्याबद्दलचा लेख अुद्बोधक आहे. आमच्या मावळंकर कुलोत्पन्न सरदेसाआी घराण्याचा आितिहासही त्यांनी अभ्यासपूर्ण लिहिला आहे. १९३२च्या दशकात त्याचे तीन खंड प्रसिद्ध झाले. नंतरच्या पिढ्यांनीही त्यात दोन खंडांची भर घालून ते अद्ययावत् केले आहेत. अशा वेगवेगळया घरराण्यांच्या आितिहासातून त्या त्या काळच्या समाजाचे प्रतिबिंब दिसते. आितिहासाबद्दल फारशी आस्था नसेल तर अशांकडून त्याकडे विचक्षण बुद्धीने पाहिले जात नाही. सध्याच्या काळात तर आितिहासाचे विद्रूपीकरण वाढते आहे. रियासतकारांचे लिखाण संशेाधन व अभ्यासावर आधारित असे, हेच त्याचे वैशिष्ट्य.  अतिशय नेमस्त जीवनशैली असलेल्या सरदेसाआी यांनी शेवटची वर्षे कामशेत येथे आिंद्रायणी काठी व्यतीत केली.... हा सारा परिचय आपण करून दिलात.
  -वैकुंठ सरदेसाआी, पुणे ०४ फोन : ८५५४ ९९२ ०५९

बुध्दीबळ रंजक वाटले
जूनमधल्या अंकात बुद्धीबळ खेळाची माहिती व त्यावरील भाष्य वाचले. असे वाटले की आपण जगाला ज्या अनेकविध देणग्या दिलेल्या आहेत, त्यात बुध्दीबळाचा खेळ ही अेक देणगीच आहे. खेळातील महत्वाच्या तपशीलांची व्यवहाराशी घातलेली सांगड छान वाटली. भाग घेणाऱ्या खेळाडूचे मन आणि शरीर तयार पाहिजे, हेच प्रत्येकाच्या जीवनाचे सार आहे. हाती असणाऱ्या साधनसामग्रीतून करावयाच्या चाली आणि त्यांचा संबंध जगाच्या व्यवहारांशी जोडलेला आहे. त्या खेळाच्या वैशिष्ट्यांसह त्याचा अुपयोग जीवनात कसा करून घेता येतो ते कळले. खेळाचे नियम पाळून युध्द जिंकता येते, हे ध्येय अधोरेखित केले आहे. प्रत्येकाच्या जीवनात असे कठीण प्रसंग येेतात, त्यातून सुटण्यासाठी मनाशी चाली बांधाव्या लागतात, आणि नियमही पाळावे लागतात हा मोठाच बोध या खेळातून आणि या लेखातून घेण्याजोगा आहे. प्रबोधन आणि अुद्बोधन करणाऱ्या या लेखाच्या प्रसिध्दीबद्दल आभार.
-नारायण खरे, पुणे ५१    फोन : ९९७५ ३४४ ३०१

थोरली एकादशी 
आषाढाच्या पर्जन्यधारा बरसू लागल्या की, आषाढी एकादशीची चाहूल लागते. (यंदा २३ जुलै)ग्रामीण भागात थोरली एकादशी म्हणून नामकरण आपसूकच झाले आहे, कार्तिकी एकादशीला धाकली एकादशी म्हणतात. वैष्णव संप्रदायात हरिप्रिया म्हणजे विष्णूला प्रिय असणारी ही एकादशी हरिदिनी म्हणून परिचित आहे. एकादशीत स्मार्त आणि भागवत असे दोन भेद असून `निर्णय सिंधू' आणि `धर्मसिंधू' या ग्रंथांत याचा विस्तार आढळतो. शूलपाणी लिखित `एकादशी विवेक' आणि रघुनंदनाचा `एकादशीत्व' हे ग्रंथ मध्ययुगात रचले आहेत. व्रतराज, व्रतशिरोमणी या ग्रंथांत एकादशीचे माहात्म्य विवेचनात्मक आढळते. एकादशीच्या काम्य व्रताचरणाविषयी `कात्यायन' या धर्मपंडितांनी भाष्य केले आहे. पद्मपुराणात एकादशी व्रताच्या पुण्यकर्माशी तुलना अश्वमेध व राजसूय यज्ञाशी केली आहे.
हेमाद्री व यादवकालीन धर्मपंडितांची `चतुर्वर्ग चिंतामणी' या ग्रंथात शुक्ल व कृष्ण एकादशीचे मृगारूढ व कमलारूढ सिंहमुखी पुष्ट व कृश असे या एकादशीचे ध्यानरूप वर्णन केले आहे.
महाराष्ट्नतील भागवत सांप्रदायिकांनी आषाढी एकादशी (देवशयनी एकदशी), कार्तिक शुक्ल एकादशी (प्रबोधिनी एकादशी) यांना महाएकादशी असे संबोधले. लाखो वारकरी तीर्थक्षेत्र पंढरपुरात रंगून गेलेले दिसतात. दशमी, एकादशी, द्वादशी हे तीन दिवस हरिचिंतनात व्यतीत करणारे एकादशी व्रत संत एकनाथांनी वर्णियले आहे.
नामदेव गाथा, संत तुकाराम गाथा यामध्ये एकादशी उपवासाची संहिता सांगितली आहे. भीमा माहात्म्य ग्रंथातील भक्ती संकेतानुसार गेली सात शतकांहून अधिक काळ तीर्थक्षेत्र पंढरपुरात वारकरी रममाण होत आहे. धर्मशास्त्रात आठ वर्षांपासून एेंशी वर्षापर्यंतच्या प्रत्येक व्यक्तीस हे व्रत करता येईल, असे संकेत दिले आहेत.
प्राचीन काळी नैमिष्यारण्यात शौनक ऋषी आणि सूत यांच्या संवादातून एकादशी व्रताची कथा संपन्न झाल्याचे आढळून येते. कृतयुगात महाबली नाडीजंग नावाच्या असुराने हजारो वर्षे वायुभक्षण करून अंगठ्यावर उभे राहून केलेली तपश्चर्या; त्यास भगवान शंकराने दिलेले वरदान; त्यातून घडलेले प्रसंग व त्याचा चतुर्भुज कन्येने केलेला वध या प्रसंगातून एकादशी उत्पत्ती असे वर्णन पुराणात आढळते.
प्रत्येक चांद्रमासाच्या शुक्ल व कृष्ण पक्षातील एकादशीला एकेक नाव दिले आहे. मोक्षदा, सुफला, षट्तिला, विजया.... अशी चोवीस नावे; आणि अधिक मासात पद्मिनी व कमला अशी एकादशींना नावे आहेत.
-नंदकुमार मराठे,  कोल्हापूर     फोन.-९९७५४२९४९४

विवेक समूहाच्या वतीने `सामाजिक अभिसरण आणि आपण' या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. 
उदारीकरणानंतर समाजात घुसळण चालू आहे, या स्थित्यंतराचे काही पैलू निरखणे आणि त्याबाबत विमर्श करणे हा त्याचा हेतू होता.
 `ग्रंथाली'चे प्रवर्तक दिनकर गांगल व (डिक्की) त्या संस्थेचे अध्वर्यू मिलिंद कांबळे यांनी त्या चर्चेत मांडलेले विचार-
जातविचाराला भांडवलाचा शह
आर्थिक बदलांना प्रारंभ झाल्यानंतर उदारीकरणाद्वारे परकीय संस्कृती, तंत्रज्ञान, मूल्यसंचय, जीवनरीती यांच्याशी आदानप्रदान अधिक घनिष्टपणे आपण अनुभवतो आहोत. अपूर्व वेगाने तंत्रशास्त्रीय प्रगतीपायी आपल्या जगण्याला वेग आलेला आहे. आपल्या जगण्याचा, जगण्याच्या मुळाशी असलेल्या जाणिवांचा पोतही बदलतो आहे. आर्थिक आणि भौतिक समृद्धीपायी आताशा सुबत्तेचा अनुभव येऊ लागलेला आहे. परस्परांच्या नात्यांमधील वीणही पालटते आहे. या आधीच्या पिढ्यांमध्ये अनुभवास येणारे एकमेकांवरील अवलंबन उताराला लागते आहे. व्यक्ती आणि समाज यांच्या दरम्यानच्या नात्याचीही पुनर्मांडणी चालू आहेे. एकंदरीने सर्वत्रच व्यक्तिवादाला बहर दिसतो. भन्नाट कल्पनांनी झपाटून गेलेली सर्जनशील माणसे ठिकठिकाणी कार्यरत दिसतात. या ऊर्मींचे `चॅनेलायझेशन' घडवून आणणे हे मोठे आव्हान आहे.
संस्कृतीच्या प्रदीर्घ प्रवासादरम्यानचे दोन कालखंड दिसतात. `वैदिक काळ' आणि `प्रबोधन काळ' हे दोन्ही कालखंड ज्ञानाच्या उत्कर्षाचे कालखंड होत. प्रबोधन कालखंड आजच्या काळाला नजिकचा ठरतो. प्रबोधनयुग हे ज्ञानाच्या, नवतंत्रशास्त्राच्या उपयोजनाचे पर्व होते. भारतीय समाज परकीय अमलाखाली होता. जीवनाच्या नानाविध क्षेत्रांत कार्यरत कर्तृत्ववानांची मालिकाच आपल्या नजरेसमोर उभी ठाकते. परकीय अंमल असल्यामुळे त्या काळातील सर्जनशील प्रेरणांची उपेक्षाच झाली.
आजच्या शतकात तरी वेगळे चित्र दिसते का? एकाकी प्रज्ञावंतांना एकत्र आणणारी, सर्जशीलतेचा समन्वय घडवून आदानप्रदान आणि संवादाची प्रक्रिया पुढे नेणारी व्यासपीठे आज दिसतात का? -असे निर्मितीक्षम आदानप्रदान घडायला हवे. ही सर्जनशील प्रेरणा आणि कल्पक प्रकल्प कार्यान्वित करणारे कुठे कोणी दुग्गोचर होतात, परंतु सैद्धांतिक अधिष्ठान पुरवणारी वैचारिक व्यासपीठे दिसत नाहीत. अशा आदानप्रदानाला निकडीचा असणारा अवकाश भावनिक हवा. प्रगत तंत्रशास्त्राने मानवी स्तर उंचावलेला आहे, परंतु तंत्रशास्त्राचा झंझावात चहूंकडून अंगावर येतो आहे. तंत्रज्ञानाचा जनक असलेला माणूस त्याचा नियंत्रक आहे, की हे तंत्रज्ञानच मनुष्याचे चालक बनते आहे? तंत्रज्ञान माणसाच्या अधीन आहे की मनुष्यप्राण्यावर तंत्रज्ञान स्वार आहे? स्वत:चा स्वत:शी असलेला संवाद विकल बनत आहे. जागतिक प्रवाहांच्या रेट्यात आपले स्वत्व कसे जपायचे? आपला स्थायी मूल्यसंचय अबाधित राखत असतानाच नवीन जीवनदृष्टीचा अंगीकार कसा करायचा? `ग्लोबल' आणि `लोकल' यांचा समन्वय साधत `ग्लोकल' कसे बनायचे?
-दिनकर गांगल

स्वत्व जपणे ही कसोटी
ग्रामीण अर्थव्यवस्था गतिमान राखण्यात तथाकथित `दलित' जनसमूहांचा वाटा मोठा आहे. जातसमूहांतील नानाविध घटक ग्रामीण सेवा पुरविण्यात आघाडीवर राहिले. श्रेणीबद्ध समाजरचनेपायी आणि त्या त्या जातीने तिचाच वंशपरंपरागत व्यवसाय करण्याच्या सक्तीपायी उद्यमशीलता फुलायला अवकाशच मिळाला नव्हता. १९९०च्या प्रारंभी आर्थिक पुनर्रचनेचे पर्व अवतरले. अनंत वाटा दलित समाजातील होतकरू उद्यमशीलांसाठी खुल्या झाल्या. अनेक जातसमूहांवर जातीनिष्ठ व्यवसायच करण्याची सक्ती विरळ होऊ लागली. उदंड संधीचे दरवाजे उघडले गेले. लखनौजवळच्या एका गावात आम्ही अलीकडे गेलो होतो. त्या गावातील बड्या जमीनदार असामीला भेटलो. तो जमीनदार सतत कुरकुरत होता की, त्याच्या बारदान्यातील गायीगुरे राखायला हाताशी माणसे मिळत नाहीत. जमीनदारांची गायीगुरे चारायला नेणे हाच ज्यांचा पारंपरिक व्यवसाय होता अशा `चरवाह' या समाजातील अनेक तरुण आता रोजीरोटीच्या शोधार्थ मोठ्या शहरांकडे निघून गेले. गोधनामागे हिंडायला मनुष्यबळच मिळेना. सर्व स्तरांवरील सामाजिक अभिसरणालाही गती आलेली आहे. क्रयशक्तीमध्ये वाढ घडून येते आहे. एके काळी खाण्यापिण्याच्या सवयीदेखील जातसंबद्ध होत्या. मोठ्या शहरांमधील दलित वस्त्यांमध्ये काही वर्षांपूर्वी केवळ दैनंदिन गरजेच्या जिनसांचीही  हजेरी दिसते.
पुण्याच्या ताडीवाला रस्त्याच्या परिसरात एक झोपडवस्ती आहे. ठिकठिकाणाहून पुण्यात स्थलांतरित झालेल्या मागास, दलित जातसमूहातील घटकांची तिथे पूर्वापारची वस्ती. मटण-चिकन विक्रीचे त्या वस्तीमध्ये केवळ एकच दुकान होते. आज त्याच वस्तीमधील दुकानांची संख्या आणि त्यांतील वैविध्य नजरेत भरते. आज त्याच वस्तीमध्ये चांगल्यापैकी सुविहित मंडई स्थापन झालेली दिसते. दलित नवपिढ्यांची मानसिकताही बदलते आहे, हे समजावून घ्यावयास हवे. `दलित' गणल्या गेलेल्या समाजसमूहांमध्ये देशभरात १९ ते २० कोटि तरुण पस्तिशीच्या आतील आहेत. या तरुणांमध्ये सर्जनशील ऊर्जा दडलेली आहे. उदारीकरणाचे पर्व अवतरेपर्यंत दलित समाजातील तरुण पिढी एकतर राजकारणामध्ये सक्रिय  असे अथवा सरकारी नोकरीसाठी धडपडत असे. आता उद्योजकतेचा उद्यमशीलतेचा तिसरा पर्याय होतकरू तरुण रक्ताला उपलब्ध आहे. उत्तर प्रदेशात माननीय काशीराम यांचा उदय झाला, त्यावेळी दलित समाजसमूहांमध्ये नवीन राजकीय जाणिवेचा उगम आपण पाहिला.
आजचे वास्तव पूर्णत: निराळे आहे. काळ बदलला की चळवळींचे लढ्याचे स्वरूपही बदलते. आज जातसंबद्ध विचारप्रणालीशी झगडण्यासाठी नवीन हत्यार शोधावे लागणार आहे आणि ते हत्यार आहे `भांडवल'. इथून पुढच्या काळात जातिनिष्ठ विचारविश्वाला भांडवलाचा शह बसणार आहे.
-मिलिंद कांबळे
-(भारतीय अर्थविज्ञानवर्धिनीच्या `अर्थबोधपत्रिके'वरून)

क्षेत्र पंढरी
पंढरपूर १७०९ ते १७३९ पर्यंत बहिर्जी पांढरे या सरदाराच्या ताब्यात होते. पांढरे प्रथम आदिलशहा व नंतर मराठा दरबारात सेवक होते. १७७४ मध्ये पेशव्यांच्या कारकिर्दीत पंढरपूर देवस्थान तासगाव-सांगलीच्या पटवर्धनांकडे होते. त्यांच्या वतीने कमाविसदार म्हणून रामचंद्र कृष्णाजी लिमये यांना नेमले होते. पानिपतच्या लढाईनंतर १७६२-६३ मध्ये नारो महादेव ओझे यांची नेमणूक झाली. १७७५ साली रामचंद्र लिमये यांचे सुपुत्र चिंतामणी लिमये यांची कमाविसदार म्हणून नेमणूक झाल्याचा संदर्भ पेशव्यांच्या दप्तरात आढळतो.
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहूंची सुटका झाली. पेशवाईत पंढरपूरचा खूप विकास झाला. पेशवेकाळात विठ्ठलाच्या मंदिरात ओवऱ्या बांधल्या. गोपाळपुराचे गोपाळ मंदिर बांधले, चंद्रभागेच्या तीरावर जागोजागी दगडी घाट बांधले. होळकर, शिंदे, सांगलीकर, जमखिंडीकर आदी संंस्थानिकांचे मोठे वाडे व परिवार-देवतांची मंदिरे बांधली. १८१८ नंतर १८४८ पर्यंत पंढरपूर साताऱ्याच्या छत्रपतींच्या अंमलाखाली होते. १८४९ ला पंढरपूर इंग्रजांच्या अंमलाखाली आल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.

सांगलीत ऋग्वेद पारायण
सांगलीचे श्री अशोक पाटणकर यांचे वडील (कै)वि ना पाटणकर हे वेदज्ञ होते. त्यांनी शांती, स्वाहाकार, आणि पंचायतन याग असे कार्यक्रम केलेले होते; तथापि ऋग्वेद संहितेचे घनपारायण  करावे अशी त्यांची खूप आिच्छा होती, ती राहून गेली. त्यांच्या आिच्छापूर्तीसाठी हा दुर्मीळ सोहळा सांगलीत करावा असा संकल्प अशोकरावांनी करून त्याचे आयोजन केले. संजय गणेश, आेंकार रमेश, व सुहास चिंतामणी या पाटणकर बंधूंनी साहाय्य केले, व हा संकल्प पुरा होत आहे.
चार प्राचीन वेदांपैकी ऋग्वेद संहितेत १०हजार५८० ऋचा आहेत, त्यांची  १लाख ५३हजार ८२६  अेवढी पदे होतात. सातत्याने केलेल्या अभ्यासातून ही सारी पदे तोंडपाठ होतात. घनपारायण सेाहळयात सहभागी होणाऱ्या वेदमूर्तींना ती तोंडपाठ असतात. त्यांचे पठण ते करीत असतात. वेदचूडामणी दत्तात्रय नवाथे, वेदचूडामणी गोपाळ जोशी,  वेदचूडामणी विद्याधर देव (सर्वजण पुण्याचे);  तसेच गोव्याचे वेदचूडामणी योगेश्वर बोरकर हे सांगलीच्या यागात ऋग्वेद पारायण करत आहेत. त्याचा प्रारंभ केळकरमहाराज व कोटणीस महाराजांच्या अुपस्थितीत झाला. २१ जूनपासून दररोज सकाळी पाच तास, असे ३१ दिवस पारायण चालेल. सांगलीच्या प्रसिध्द गणेश मंदिराचे पुजारी म्हणून काम करणाऱ्या पाटणकर कुटुंबियांनी सोहळयाचे संयोजन केले आहे. ह भ प झेंडेमहाराज, श्री विष्णू महाराज यांनी सोहळयास भेट दिली. २२ जुलै रोजी साऱ्या वेदमूर्तींचा सत्कार समारंभ गणपती मंदिरात होआील, तेव्हा विजयसिंहराजे पटवर्धन, सौ. राजलक्ष्मी, आणि करवीर पीठाचे शंकराचार्य अुपस्थित राहतील.

साने गुरुजी
पूज्य सानेगुरुजी यांनी वयाच्या ५२व्या वर्षी आपली जीवनयात्रा संपवली. साहित्यिक, कवी, देशभक्त, समाजसुधारक म्हणून कार्य केले. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे म्हणून उपोषण केले, साधना साप्ताहिक सुरू केले. १९४९च्या साहित्य संमेलनात आंतर भारतीचा ठराव मांडला. विनोबा भावे यांचा लेखनिक बनून तुरुंगात गीता प्रवचने लिहून काढली. १९४२च्या चळवळीत भूमिगत राहून कार्य केले. सुरुवातीला १० वर्षे शिक्षकाची नोकरी केली. `शामची आई' हे अजरामर पुस्तक लिहिले.
सानेगुरुजींचे बहुतेक लेखन तुरुंगात झाले. सानेगुरुजी श्रद्धेने  लिहायचे, मनापासून लिहायचे, समरसून लिहायचे. आपण सामान्य लोकांसाठी लिहितोय म्हणून ते सोपेच असले पाहिजे याची त्यांना जाणीव होती. त्यांच्या गोष्टीत काहीना काहीतरी उपदेश असायचे. ध्येयवादी, त्यागी, कर्तव्यतत्पर व्यक्तींची चरित्रे ते रंगवत. शामची आई आजच्या अर्थाने सुशिक्षित नव्हती पण सुसंस्कृत होती.
`पाप करावयास लाजावे, खोटे बोलावयास लाजावे, श्रम करावयास लाजू नये, श्रम करणाऱ्यालाच जगायचा अधिकार आहे. उपयोगाच्या दृष्टीने झाडूवाले, भंगी जास्त महत्वाचे आहेत. शरीर हे श्रमासाठी आहे, चैनीसाठी नाही, संकटाच्या वेळी धैर्याची परीक्षा होते, ज्या मुलांना प्रेम मिळत नाही ती मोठेपणी कठोर बनतात. धर्म प्रत्येक गोष्टीत असतो; काय खातो, काय पितो यामध्येही धर्म आहे. मोह सोडणे म्हणजे धर्म. खऱ्या धर्माची प्रेमधर्माची शिकवण आपण विसरलो आहोत. धर्म तोडायला शिकवत नाही जोडायला शिकवतो. बुद्धीला स्वार्थाचे कोंदण मिळाल्याने ती बुद्धी नाश करते. बुद्धी आणि मूल्य एक झाली पाहिजेत. जगाचा इतिहास शहाणे लोक वाचतात, पण तो घडवितात भावनेने उद्वीपित झालेले लोक. पैसे हरवले म्हणून, मुलगा नापास झाला म्हणून रडणारे पालक आपले मन निर्मळ नाही म्हणून रडतात का, हा प्रश्न आहे. मनुुष्य अन्नावाचून जगू शकेल पण प्रेमावाचून जगू शकणार नाही.' असे त्यांचे विचारधन.
तथाकथित बुद्धिमान माणसे भावनेची नेहमीच टवाळी करतात.  सानेगुरुजी, म.गांधी, विनोबा सर्वांच्याच वाट्याला अशी टवाळी आली पण ते आपले कार्य थांबवत नाहीत. काही लोकांना भारतीय संस्कृतीची बेहोशी चढल्याने त्यांना समाजातील उघडे-नागडे वास्तव दिसत नाही; ते भूतकाळातील घटनांत संस्कृतीचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांना समोरचे दारिद्य्र दिसत नाही. शिवाजी महाराज, ज्ञानेश्वर, रामदास यांच्या पुण्याईवर ते जगण्याचा प्रयत्न करतात. परंतु यामुळे ते विद्यमान समाजापासून दूर फेकले जातात. स्वातंत्र्यात गरीबांना, दलितांना जाच असता कामा नये; प्रत्येक झोपडीत आनंद दिसला पाहिजे. स्वातंत्र्य म्हणजे निर्मळ जीवनाची निर्मिती, स्वातंत्र्यात मन आणि बुद्धी स्वतंत्र झाली पाहिजेत.
आज स्वातंत्र्य मिळाल्यावर माणूस हिंसाचारी, स्वार्थी बनला आहे. कुसंस्काराचा जो चिखल भरला आहे त्यातून आपल्याला दूर कसे ठेवायचे ही चिंता आहे. समाजातील मूठभर लोक असंख्य गरीब अर्धशिक्षित लोकांचा जाणूनबुजून बुद्धिभेद करतात; खरी लोकशाही अहिंसक आणि अजातीय असली पाहिजे. समाजातील सज्जनांची संख्या वाढली तरच काही बदल होऊ शकेल. साने गुरुजी हे त्याबाबतीत दीपस्तंभ होते.
-मधुकर खरे, सांगली   फोन-९४०३७२५४४८

शब्दकळा
`ढ' हे अक्षर असलेली जगातली एकमेव भाषा म्हणजे मराठी असावी.
`ढ' चे महत्व ढ माणसाला काय कळणार?
`ढ' अक्षर नसेल तर.... हे शब्द कसे होणार?
ढाळणे, ढमढेरेे, ढब्ब्या, ढेरी, ढेकूण, ढासळणे, ढाण्या, ढापण्या, ढापणे, ढवळणे, ढकला-ढकली, ढकलणे, ढग, ढगळ, ढवळाढवळ, ढळढळीत, ढिगारा, ढील, ढेरपोट्या, ढुंकून, ढेकर, ढेप, ढोंगी, ढोर, ढोल, ढोलकी, ढोबळ
-सुहास खानवलकर, पुणे फोन- ९४०३९२८५२०

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन