Skip to main content

16 July 2018

मध्ययुगीन हिंदुस्थानातील  पथिक-गृहे
आपण कुठेही बाहेरगावी निघालो की प्रथम त्या गावात राहण्या-खाण्याचा काय बंदोबस्त आहे ते पाहतो. सध्याच्या इंटरनेट युगात हे काम एका `क्लिक'सरशी होते. संगणकाशी चार-पाच मिनिटं खेळून आपण जिथे निघालो आहोत तिथलं एखादं हॉटेल बुक करून निश्चिंत होतो. मध्ययुगीन हिंदुस्थानात अशी हॉटेलं होती का? हिंदुस्थानाबाहेरून जे लोक (परदेशी प्रवासी) येथे यायचे, ते आपल्या राहण्या-खाण्याची काय सोय करायचे?
मध्ययुगीन हिंदुस्थानातील हॉटेलांविषयी आपल्या परदेशी प्रवाशांच्या वृत्तांतांतून माहिती मिळते. १७व्या शतकामध्ये बरेच युरोपियन प्रवासी हिंदुस्थानात येत. व्यापारासाठी, डॉक्टर म्हणून, सैनिक म्हणून, आपल्या राजाचे प्रतिनिधी म्हणून, साहस करण्याच्या ओढीपायी, -तर काही केवळ उत्सुकता म्हणून येथे येत. यांपैकी बहुतेक प्रवाशांनी आपण हिंदुस्थानात काय पाहिले, कसे राहिलो, कसा प्रवास केला, येथील लोक कसे आहेत याबाबत तपशीलवार लिहून ठेवले आहे. त्यांचे प्रवासवृत्तांत मनोरंजक आणि माहितीपूर्ण तर आहेतच, शिवाय या प्रवासवृत्तांतामधून आपल्याला आधुनिक काळातील काही गोष्टी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात त्या काळातही अस्तित्वात होत्या; हे वाचून आश्चर्य वाटते. या पैकीच एक गोष्ट म्हणजे हॉटेलं!
त्या काळात युरोपमध्ये प्रवाशांची उत्तम बडदास्त ठेवणारी हॉटेलं होती; त्यांना ळपप असे म्हणत असत. या हॉटेलांमध्ये उतरलेल्या प्रवाशाला झोपण्यासाठी उत्तम बिछाना, थंडीपासून बचाव करण्यासाठी ऊबदार शेकोटी, बीयरसारखे एखादे पेय आणि (बहुतांश युरोपियन मांसाहारी असल्यामुळे) भाजलेले मांस अशा सर्व सोयी पुरविल्या जात असत. हिंदुस्थानात मात्र इतक्या सुखसोयी असलेली हॉटेलं नव्हती, त्यामुळे येथे येणाऱ्या प्रवाशांचा भ्रमनिरास होत असे.
कारवान-सराया -अर्थात हिंदुस्थानातील लॉजिंगची (आणि काही वेळा बोर्डिंगची)सोय:-
मँडेलस्लो, निकोलस विदिंग्टन, पीटर मंडी, ताव्हेर्निये, बर्निए, सर थॉमस रो ही प्रवासी मंडळी त्या काळातील हिंदुस्थानी हॉटेलांचे वर्णन करतात. या हॉटेलांना कारवान-सराई असे म्हणत असत. फ्रेंच प्रवासी ताव्हेर्निये म्हणतो, सराई म्हणजे पन्नास-साठ झोपड्यांभोवती भिंती व कुंपणासहित वस्ती. या ठिकाणी पीठ, भात, लोणी आणि भाज्या विकणारे स्त्री-पुरुष आहेत. उपजीविकेसाठी हे लोक भात, रोठ इत्यादी जिन्नस शिजवूनही देतात. कधी एखादा मुसलमान प्रवासी गावात आला तर तो बकरीच्या किंवा कोंबड्याच्या मांसासाठी गावात शोध घेतो; दरम्यानच्या काळात ही जेवण शिजवणारी माणसे, त्याला हवी असलेली खोली साफसूफ करून त्यामध्ये एक खाट टाकून देतात. मग या खाटेवर हा प्रवासी आपली गादी घालतो.
सर्वच सरांयामधून राहण्याची व खाण्याची सोय होतच असे, असे नव्हे; काही सराया केवळ राहण्यापुरते केलेले आडोसे असत. मँडेलस्लो नावाचा प्रवासी या सरांयाबद्दल म्हणतो, -गुजराथच्या राज्यात व एकंदरीतच मुघल साम्राज्यात आपल्याकडील `इन' सारखी हॉटेलं आढळत नाहीत. मात्र शहरांमध्ये आणि काही खेड्यांमध्ये, `सराई' नावाच्या सार्वजनिक इमारती असतात. या सराया धनिक लोक एक धर्मादाय कार्य म्हणून, येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांना आसरा मिळावा, आणि त्यांना उघड्या आकाशाखाली झोपावे लागू नये या उद्देशाने बांधतात. या कारवान-सराया म्हणजे चार भिंती व डोक्यावर एक छप्पर एवढेच असते; त्यामुळे इथे उतरणाऱ्या प्रवाशाला खाण्या-पिण्याचा व त्याला लागणाऱ्या इतर गोष्टींचा बंदोबस्त स्वत:लाच करावा लागतो.
परंतु काही कारवान-सरायांमधून थोड्या अधिक सोयी असत. निकोलस विदिंग्टन हा प्रवासी आपल्याला सांगतो, अजमेर आणि आग्रा या दोन गावांमध्ये, दर दहा कोसांवर प्रवासी व त्यांच्यासोबत असलेली जनावरे यांना राहण्यासाठी सराया बांधलेल्या आहेत. या सरायांमध्ये असणाऱ्या सेविका प्रवाशांच्या व त्यांच्यासोबत असलेल्या जनावरांच्या खाण्या-पिण्याची काळजी घेतात. त्यासाठी त्या ३ डेनियर(एक नाणे) एवढे शुल्क आकारतात. पीटर मंडी हा इंग्लिश प्रवासी देखील, सरायांमध्ये अशा सेविका असल्याचे सांगतो. तो म्हणतो, सरायांमधून `मेत्राणी' नावाच्या सेविका असतात. या सेविका सराईमधील छोट्या खोल्यांची देखभाल करणे, प्रवाशांना जेवण तयार करून देणे; त्यांना झोपण्यासाठी खाटा लावून देणे अशी कामे करतात. काही खोल्यांमध्ये दोन, काहींमध्ये तीन, तर काहींमध्ये चार खाटा असतात; व दररोज सकाळी प्रत्येक खाटेसाठी १ किंवा २ पैसे एवढे शुल्क आकारले जाते.
युरोपमधील सुखसोयींनी युक्त असणारी `इन' आणि हिंदुस्थानातील कारवान-सराया, या त्या-त्या देशातील रूढी परंपरेनुसार आलेल्या संस्था होत्या. हिंदुस्थानातील माणसांना उघड्या आकाशाखाली झोपण्याची सवय असल्याने त्यांना आडोशाला चार भिंती असल्या तरी पुरेसे होत असे. हिंदूंना स्वत:चे अन्न स्वत: शिजवून खाण्याची सवय असल्यामुळे ते सरायांमध्ये देखील स्वत:चे जेवण स्वत: तयार करीत. समाज आणि जाती व्यवस्थेमुळे त्यांना इतरांसोबत एकाच टेबलावर किंवा पंगतीत जेवायला बसता येत नसे व एका आचाऱ्याने तयार केलेलं जेवणदेखील चालत नसे, त्यामुळे युरोपातील `इन'सारख्या सुखसोयी येथे नसणे स्वाभाविकच होते.
प्रत्येक गावात कारवान-सराई असायची असे नाही. उदाहरणार्थ पीटर मंडी सांगतो की, आग्रा आणि अहमदाबाद मध्ये एकही कारवान-सराई नाही. अशा वेळी हे प्रवासी एखाद्या देवळात, मशिदीत किंवा एखाद्या पडक्या इमारतीत आसरा घेत. सर थॉमस रो या प्रवाशाला कारवान-सराईच्या अभावी मांडू (मध्यप्रदेश) येथे एका पडक्या थडग्याच्या जवळ आसरा घ्यायला लागला होता. तो सांगतो की, त्या रात्री सिंहाच्या आणि लांडग्याच्या ओरडण्यामुळे मला झोप मिळाली नाही. दक्षिण हिंदुस्थानमध्ये मात्र देवळं आणि मशिदींमधून प्रवाशांची राहण्याची सोय होत असे.
एकंदरीतच हिंदुस्थानातील कारवान-सराया कोंदट आणि अस्वच्छ असत. मुघल बादशहाचा राजवैद्य आणि फ्रेंच प्रवासी बर्निए म्हणतो, या सरायांमध्ये शेकडो लोक आणि त्यांचे घोडे, खेचरं, उंट एकत्र राहतात. उन्हाळयामध्ये या कारवान-सरायांमध्ये प्रचंड उकडते व श्वास घेणे मुश्किल होऊन जाते आणि थंडीच्या दिवसांत आजूबाजूला असलेल्या जनावरांच्या श्वासामुळेच काय ती ऊब मिळते व त्यामुळे येथे असलेली लोकं थंडीमुळे मरत नाही इतकंच!
काही वेळा योग्य जेवण न मिळाल्यामुळे किंवा येथील पाणी बाधल्यामुळे युरोपियन प्रवाशांचे अतोनात हाल होत असत. असाच एक प्रसंग `करेरी' नावाच्या प्रवाशावर आला होता. करेरी एकदा गलगला येथून गोव्याकडे निघाला होता. त्याला वाटेत तीन दिवस काहीही खायला मिळाले नव्हते व स्थानिक लोकांची भाषाही त्याला येत नव्हती. भूक असह्य झाल्याने त्याने एके ठिकाणी काही लोकांना खाणाखुणा करून, मला काहीतरी खायला द्या असे सांगण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने एका माणसाला तो काय बोलतोय ते समजले व त्याने करेरीला नाचणीची एक भाकरी करून दिली. करेरी म्हणतो, `मला ही भाकरी अजिबात आवडली नाही. परंतु मी तीन दिवस काही खाल्ले नव्हते, त्यामुळे अत्यंत दु:खी होऊन मी ती भाकरी कशीबशी गिळली.'
कारवान-सरायांखेरीज काही परदेशी माणसांनीदेखील या काळात हिंदुस्थानात हॉटेलं चालू केली होती. मुंबई येथे `सायमन दे माही' नावाच्या  एका फ्रेंच माणसाचे हॉटेल होते असे आबे कारे नावाचा प्रवासी सांगतो.
                                               (`भारत इतिहास संशोधन मंडळ' पत्रिकेवरून)

 संपादकीय
शिक्षण कुठेही मिळते.
अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत; शिवाय सभ्य प्रतिष्ठेने समाजात राहण्यासाठी माणसाला चरितार्थाचे साधन म्हणून प्रशिक्षणाची गरज असते. त्यालाच हल्ली शिक्षण म्हटले जाते. वास्तविक शिक्षण वेगळे असते. चरितार्थासाठी शिक्षण लागतेच असे नाही. आजकाल शिक्षणाचा प्रसार झाला असे आपण म्हणतो, ते प्रसार प्रशिक्षणाचा आहे. पदव्या आणि आिंग्रजी शाळांचे कारखाने चालू आहेत तिथे शिक्षण दिले जात नाही हे तर आता सगळेच मान्य करतात. माणसाला संगीताची किंवा केाणत्याही कलेची आवड असते आणि त्यावरती तो प्रभुत्व मिळवितो. आपल्या जीवनानंदासाठी त्या क्षेत्रातील ज्ञानाची आराधना करण्याचा अेक भाग म्हणून तो त्याचे शिक्षण घेतो. त्यात नाआिलाज नसतो, व्यासंग असतो. चांगल्या नोकरी धंद्यात प्रपंचात रमलेली माणसे वाचन का करतात? ती त्यांच्या जगण्याची गरज नसते. पण तसा वाचनाचा व्यासंग करण्यालाच शिक्षण मानले जाते.

शिक्षण मिळविण्याची धडपड माणसाकडे अुपजत असते,  -किंवा काहींना अुपजतच नसते! पण म्हणून त्याला जगणे कठीण होते असे नाही. जगायला जे लागते ते कौशल्य. ते मिळवावेच लागते; पण ते सरावातूनही मिळते. त्यात पारंगतता मिळण्यासाठी त्यातली अधिकाधिक माहिती घ्यावी लागते, ती मिळण्यासाठी अनेक पर्याय आज तरी अुपलब्ध आहेत. शालाबाह्य शिक्षण ज्याला म्हणतात, ते असेच सराव -अनुभवातून मिळू शकते. परंतु आजकालच्या जगात शिक्षण हा मोठाच प्रश्न भासविला जात असतो. शिकल्याशिवाय जगात चालणार नाही, याचा अर्थ फार मर्यादित आहे. लिहायला वाचायला आले की शिक्षण झाले असे मानता येत नसते. म्हणूनच आजची दहावी बारावी परीक्षा अुत्तम गुणांनी अुत्तीर्ण होणारी मुले पुढच्या काळात गुणवंत ठरतात असे नाही, हे तर आपल्यास दिसतेच आहे.

स्वातंत्र्य मिळाले त्या काळात भारताची साक्षरतेचे प्रमाण तीस पस्तीस टक्के होते, ते आज सत्तरच्या जवळ आहे. खेडोपाडी शिक्षण पोचले असा समज आपण करून घेतला तर जातीय दंगे, भिन्नता, विखार, भ्रष्टाचार, सामाजिक अत्याचार यांत वाढ झाली आहे त्याची संमती कशी लावणार? केरळमध्ये साक्षरता शंभरच्या जवळ आहे; पण तेथील सर्वाधिक तरुण आखाती देशांत मजुरी करायला जातात, तिथे दारूचा खप अधिक आहे, आणि महिला अत्याचारांचे प्रमाणही जास्त आहे -याचा मेळ कसा काय घालणार? शिक्षणाने साधले काय? आगरकर कर्वे फुले भाअूराव यांची नावे महर्षी म्हणून घेतली तरी, आजच्यासारखे शिक्षणसम्राट होअून त्यांना धंदा जमला नाहीच. यांतून आपण शिक्षण फार दूर घालविले.

त्या पार्श्वभूमीवर आजच्या बाजारात शिक्षणाचे पेव फुटले असल्याचे वाटते त्याची चिकित्सा कोणीही शांत डोक्याने करू शकतो. पूर्वीच्या खेड्यांत पंतोजींच्या शाळा होत्या त्यात कामचलाअू शिकता येत होते. त्या काळी घोकंपट्टी करून घेतली जाआी, त्यावर टीका होत गेली, पण त्या काळातली पाढे-कवितांची घोकंपट्टी आयुष्यभरात ध्यानात राहात असे. आजही शिक्षण समजून मुलांच्या स्मरणशक्तीचीच परीक्षा घेतली जाते. गणितेही पाठ करून जाणारी मुले चांगले मार्क मिळवतात, आणि त्यांना हुशार समजण्याची चूक होतच असते. हे पाठांतर परीक्षेच्या दोन तासांपुरतेच असते. पुढे त्याचा तरी कुठे अुपयोग होतो? जी मुले ९० टक्के मार्क पडून बोर्डाच्या दोन तीन महिन्यांपूर्वीच्या परीक्षेत अुत्तीर्ण झालीत, त्यांना तीच प्रश्णपत्रिका देअून आजच पुन्हा परीक्षेला बसविले तर तितके मार्क पडतील काय?  -आितकेच कशाला त्यांचे जे पालक पदवीधर झालेले आहेत त्यांना त्यांच्याच पाल्यांच्या सातवी आठवीच्या प्रश्णपत्रिका दिल्या तरी त्यांचा `निकाल'च  लागेल! शिक्षकांविषयी तर बोलायला नको म्हणजे गेल्या काही वर्षांत जे काही मिळाले ते शिक्षण नव्हते तर तात्पुरत्या तयारीने केलेली स्वत:चीच प्रतारणा होती.

शिक्षणातून समज वाढली पाहिजे हे जर मान्य असेल तर आजच्या नागरिकांत ती आहे का, हे तपासून पाहायला हवे. नागरिकांचे राहूदे पण नागरिकांच्या प्रतिनिधींना तरी ती आहे का, असा प्रश्ण पडतो. विधानमंडळांचे कामकाज पाहून पुढच्या पिढीने काय शिकावे? प्रगल्भता? सहिष्णुता? समन्वय? सामंजस्य? वादपटुत्व?..... की अर्वाच्च धुडगूस करून वरती नेतेगिरीचा टेंभा मिरविण्याची कला? हेच लोक शिक्षणासंबंधी धोरणे ठरविणार हे क्लेशदायकच आहे. त्यांनी तालुका खेड्यांतून काढलेली आिंग्रजीची दुकाने आणि त्यांच्या धंद्याच्या पिवळया गाड्या यांचे गांभीर्य लोकांना कळलेले नाही. त्यात होणारी फसवणूक जेव्हा लक्षात येआील तेव्हा अेक पिढी कुढत बसलेली दिसेल अशी शक्यता आहे. आता आिंग्रजी माध्यमातून शिक्षणाचे फोलपण काहीजणांच्या लक्षात येअू लागले आहे, ते पालक सावध होअून मार्ग बदलतील, तोवर या दुकानदारांचा धंदा होअून गेलेला असेल; आणि ते दुसऱ्या कुठल्यातरी विकाअू गोष्टीचा बाजार मांडू लागतील.

आपल्या पुढच्या पिढीला शिक्षण देणे म्हणजे त्यांना स्वतंत्र विचार करायला शिकविणे. त्यासाठी त्यांना स्वातंत्र्य मिळावे लागते. मुले दहाबारा वर्षांची झाल्यावर त्यांचा कल पाहायचा असतो, तो त्यांच्या आयुष्याला अुपयोगी ठरणाऱ्या साधनाचा. बुद्धीचा नैसर्गिक कल असेल त्याप्रमाणे, अंगभूत कौशल्याप्रमाणे त्यांना अद्ययावत् माहिती व सराव दिला तर चरितार्थ चांगला होआील आितकाच त्यास मर्यादित अर्थ आहे. चांगले मनुष्यत्व येण्यासाठी शिक्षण घ्यायचे, ती प्रक्रिया आयुष्यभर चालते. प्रशिक्षण संपते, पदवी मिळते; शिक्षण संपत नाही.  ते तर जगाच्या पाठीवर केव्हाही कुठेही मिळते. ते शिकत राहण्याची चिरंतन प्रवृत्ती जोपासणे बालवयात आवश्यक ठरते. तेच आज दूर राहते. आितर कशाला तरी आपण शिक्षण समजून त्यापाठी धावत सुटलेलो आहोत. म्हणूनच त्याचा बाजार होतो. आजच्या व्यवहारी व्यावसायिक जगात मनुष्याच्या कोणत्याही प्रवृत्तींचा बाजारच असतो  - भावनांचा, नात्यांचा, संस्कारांचा आणि शिक्षणाचाही!!

`आमच्या' मोत्याचा अनुभव
`प्राण्यांच्या सोबतीने' हा लेख खूप आवडला. सध्या अपार्टमेंटमध्ये राहावयास आलो. या जागेचे वैशिष्ट्य असे की एक-दोन भटकी कुत्री हक्काने कायमची वस्तीला असत. एक मादी, दरवर्षी नवीन पिलावळ. डोकेदुखी बनली होती. शेवटी सर्वांनी मिळून त्यांना थारा न देण्याचे अवलंबिले. अपार्टमेंटपासून जवळ एक मोकळा प्लॉट होता. तेथे एक वॉचमन नेमलेला होता त्याच्यासोबत कुत्र्याचे पिल्लू. दिवसभर पिल्लू बांधलेले पण एक-दोन वेळा त्याला बंधनमुक्त केले की तडक ते आमचे अपार्टमेंट गाठे. दरवाजात शांतपणे बसून राही. आमच्यासह काहीजण त्याला दूध पोळी घालत.
काही महिने गेले, कुत्र्याने आपला मुक्काम आमच्या अपार्टमेंटमध्ये कायम केला होता. सर्वांशी ते प्रेमळपणाने वागे;  बाहेरून येणाऱ्या व्यक्तींवर मात्र धावून जाई. पुढे अंगावर जाऊन चावा घेण्यापर्यंत त्याची मजल जाऊ लागली. साहजिकच त्याला बांधून ठेवणे आले.
मोत्याला सांभाळणे अवघड बनले. शेवटी दोघांनी त्याला गाडीत घालून नदीच्या पल्याड एका शेतात कमकुवत दोरीने बांधून ठेवले आणि मंडळी परत आली. आठ दिवस उलटले. मोत्या परत येत नाही अशी खात्री झाली; नवव्या दिवशी मोत्या हजर! बराच हडकला होता, अंगावर जखमाही झाल्या होत्या. त्याच्या डोळयातील कारुण्य पाहून आमचंही मन द्रवलं. त्याला खायला दिलं आणि बांधून घातलं.
त्याला घेऊन जाण्यासाठी अनेकांना सुचवलं, नगरपालिकेतही तक्रार दिली पण कोणी फिरकले नाहीत. दरम्यान एक-दोघांना ते चावलं त्यामुळे त्याला संपविण्याचा एकमात्र उपाय राहिला! तो दिवस निश्चित होताच माझा त्रास वाढला. मी बहिणीकडे मुक्काम हलविला आणि इकडे मोत्याने जगाचाच निरोप घेतला!
-गोविंद करमरकर, सांगली
फोन-८८०५९५९८२४

मॅगीचा फसवा जमाना
जून अंकातील संपादकीय फार परखड आहे. समाजाला, प्रशासनाला, शासनाला पोच नाही. मॅगी जमाना आहे. आपण कितीही सुधारणा व नियत मांडा त्याचा उपयोग नाही. हे नकारात्मक वाटेल पण वस्तुस्थिती आहे. कोट्यवधी रुपये निवडणुकीत घालवतील पण ड्न्ेनेजवर झाकण बसणार नाही, कोणी पडलाच तर फक्त शेवटचा कामगार बडतर्फ! हे चालणारच आहे. आपला प्रयत्न स्तुत्य.
-वामन कुलकर्णी, मिरज
फोन-९४२०३६०९९४

अशी माध्यमे हवीत
मे च्या अंकात `ग्रंथाचिये नगरी' शीर्षकाखाली रविप्रकाश कुलकर्णी यांचा अनुभव वाचला. मी एका वाचनालयात अलेक्झांडर ड्युमा यांची `काऊंट ऑफ मॉरेक्रिस्टो' ही कादंबरी व पु.ल.देशपांडे यांचे `असा मी असामी'ही पुस्तके चरित्र विभागात ठेवलेली बघितले. चूक दुरुस्त करण्याची संबंधितांची तयारी नव्हती.
मागील महिना कंत्राटी पोस्टमन संपावर होते. या संपाची दखल शासनाने घेतली नाही, ना समाजाने! आपली मने मुर्दाड झाली आहेत. हंगामी कर्मचाऱ्यांना सामावून घेतले जात नाही. नक्षलवाद नको, हिंसाचार नको म्हणायला ठीक आहे, आज विनोबांप्रमाणे भूदान चळवळ सुरू करायला कोणी येणार आहे का? आला तर टिंगलटवाळकी शिवाय त्यांचे पदरी काय येणार आहे? निवडून येणारे सर्वपक्षीय नेते स्वत:चे चोचले पूर्ण करण्यापुरते एक असतात आणि आम्हाला मूर्ख बनवतात. या व्यवस्थेवर प्रहार करण्यासाठी माध्यमांचा उपयोग करणे अपेक्षित नाही का?
-विलास फडके, जांभूळगाव(पुणे)
फोन-९४२११७०११२

पर्यावरण मंत्र्यांना आवाहन
मा. श्री.रामदासजी कदम, पर्यावरण मंत्री
सादर प्रणाम
गणेश उत्सव जवळ आला. गणेश मूर्ती बनविण्याचा व्यवसाय धडाक्यात चालू झाला. दरवर्षीप्रमाणे शाडू विरुद्ध प्लास्टर ऑफ पॅरीस वादंग सुरू झाला. प्लास्टर ऑफ पॅरीसने पर्यावरणाची प्रचंड हानी होते, हे आता सर्वमान्य आहे. तेव्हा त्यावर बंदी आणणे हा एकमेव उपाय आहे. अनेक पर्यावरणवादी संस्था गेली कित्येक वर्ष समाजप्रबोधन करीत आहेत; पण त्याला कायद्याचे पाठबळ मिळाल्याशिवाय त्यांचे प्रबोधन निष्फळ आहे.
आपण ज्या धडाक्याने प्लास्टिक बंदीचे पाऊल उचलले, ते निश्चितच स्पृहणीय होते. त्यालाही अनेकांनी विरोध केला पण त्याला न जुमानता तुम्ही तो निर्णय घेतला. त्याच धर्तीवर हाही निर्णय घेणे अत्यावश्यक आहे. त्यामागे अनेक पर्यावरण रक्षक उभे राहतील. बाराही महिने कोणत्या ना कोणत्या मूर्ती बनवत असतातच. तेव्हा गणेशोत्सव झाला की लगेच आपण अध्यादेश काढून त्याचे कायद्यात रूपांतर करावे ही विनंती. तसेच मूर्ती तयार करण्यासाठी पुरेशा प्रमाणात माती उपलब्ध करून द्यावी अशीही विनंती.
एक पर्यावरणप्रेमी,
अशोक तेलंग, सांगली
फोन-९८६०६७५५७५

शिक्षा होतच नाहीत.
हल्ली टी.व्ही., वर्तमानपत्रात नराधमांच्या दुष्कर्मांच्या बातम्यांनी क्रोध होतो. याशिवाय काही चांगल्या बातम्या नाहीत का? घटना झाल्यावर नेहमी मोर्चे, मेणबत्त्यांचे प्रदर्शन, गुन्हेगारांना फाशी देण्याचे आश्वासन होते. तिकडे कोर्ट खटले मात्र तब्बल दहा पंधरा वर्षे चालत राहतात. प्रत्यक्षात शिक्षेची अंमलबजावणी होत नाही, कोर्टात स्थगिती मिळवतात. अपराध्यांना कायद्याचे जराही भय राहात नाही. सरकारने वेळकाढू प्रक्रिया, पळवाटा रद्द करून, निर्णय आणि अंमलबजावणी यांमधील अंतर कमी केले तरच फायदा होईल; अन्यथा हे गुन्हे चालू राहतील.
-सुरेश आपटे, इंदौर
फोन-९८९३९९६७५६

चांगले घडण्यासाठी
                -विनया श्रीकांत जोशी
तरुण पिढीला आपले शिक्षण संपले की लगेच अेखादा व्यवसाय हाताशी यावा किंवा नोकरी पट्कन मिळावी असे वाटत असते. नोकरीसाठी अथवा व्यवसायाचे कर्ज काढण्यासाठी, मोठ्या कंपनीची अेजन्सी वगैरे घेण्यासाठी मुलाखत देण्याचा प्रसंग आला की चांगल्या होतकरू मंडळींची छाती धडधडायला लागते. नोकरीच्या ठिकाणी आधीचा अनुभव हमखास पाहिला जातो. काम केल्याशिवाय अनुभव मिळणार नाही, आणि अनुभव असल्याशिवाय काम मिळत नाही याचा तरुण पिढीला राग येतो. पात्रता असूनही चांगले संवादकौशल्य आणि आत्मविश्वास यांच्या अभावी बहुतेकांची संधी निघून जाते. आिंग्रजी चांगले बोलता आले तर  आजच्या काळात अुत्तमच, पण ते नाही आले म्हणून बिघडत नाही.  मराठीत किंवा कुठल्यातरी भाषेत चांगले, स्पष्ट आणि ठाम (अर्थातच खरेही) बोलता आले पाहिजे. अनुभव नाही म्हणून खाली मान घालण्यापेक्षा `माझ्यावर काही जबाबदारी देअून पहा, मी करून दाखवेन...' असे म्हणता आले पाहिजे. आपण ज्या कामासाठी आलेलो आहोत, त्याची समोरच्यालाही तितकीच गरज असते, पण ती त्याची गरज आपण पुरी करू शकू की नाही हे तोही अजमावत असतोच ना!!
यासाठी आपल्या विचारांमध्ये थोडा बदल करायला हवा. मानसशास्त्रज्ञ अेरन टी बेक यांची बोधनप्रधान अुपचारपध्दती (कॉग्नेटिव्ह थेरपी) चांगली अुपयोगी पडते. बेकने विचारांच्या सहा विरूपता सांगितल्या आहेत -
१. अेक-दोन घटनांवरून मोठा निष्कर्ष काढणे (ओव्हर जनरायझेशन) : दोन तीन ठिकाणी मुलाखती झाल्या किंवा व्यवसाय म्हणून ऑर्डर मिळाली नाही की वैताग येतो. कंटाळा येतो. पुन्हा त्या वाटेला जायलाच नको असे वाटू लागते. त्या लोकांना काय हवे आहे आणि आपल्याला त्यांच्याकडून काय हवे आहे याचा मेळ झाला तर काम होआील. दोघांच्या समान मुद्द्यावर येण्यासाठी आणखी काही प्रयत्न हवेत.
२. समस्या फुगवणे ( अेक्झॅगरेशन ऑफ प्रॉब्लेम) : समस्या लहान असते, थोड्याफार प्रयत्नांनी बदल घडू शकतो, पण आधीच त्या प्रश्णाचा बाअू केला जातो.
३. आपल्यातील चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष (निगलेक्ट द पॉझिटिव्ह्ज) : स्वत:चे योग्य शिक्षण झालेले आहे, व्यवहारज्ञान अुत्तम आहे, सामान्य व्यवहार अुत्तम कळतो या बाजू आपल्यासाठी चांगल्या असतात, त्यांचा अुपयोग होणारच असतो. ज्या ठिकाणी मुलाखती होतात, त्या प्रत्येक ठिकाणी काही अनुभव मिळतात, त्यांतून सुधारणा करता येते. म्हणजे अशा भेटी-मुलाखती हे शिक्षणच असते. त्या कारणासाठी प्रवास होतो, तो डोळसपणे करायला हवा. त्यायोगे आत्मविश्वास वाढतो, माहिती होत जाते.
४. हे किंवा ते (आयदर ऑर थिंकिंग) अेवढ्याच टोकाचा विचार :  जिथे गेलो तिथे आपले काम झालेले नाही ना, मग मी आता कुठं जायलाच नको, असे वाटत राहते. या विचारामुळे आपलेच नुकसान होणार असते.
५. स्वत:ला अकारण दोष देणे (पर्सनलायजिंग) : मीच नालायक, माझंच नशीब बेकार, मला नोकरी मिळणारच नाही... असे म्हणत राहण्याने इतर कुणाचा खोळंबा होत नसतो. आपण दूर फेकले जातो. दोष ओढवून घेण्याने ते अधिकच मोठे होतील.
६. सबळ कारणाशिवाय अेकदम निष्कर्षाला येणे (जंपिंग टू कंन्क्लूजन) : चारदोन ठिकाणी काम झालं नाही तर जगण्यालाही नालायक - असं होत नाही. थोडक्या कारणांनी अेकदम मोठा निष्कर्ष काढून मोकळं होअू नये.
पुढच्या प्रयत्नांसाठी अधिक सावध व्हायला हवं. आपल्या सकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करून किरकोळ गोष्टींना अुगीच घाबरण्याने सगळं गाडं अडलेलं असतं. आपण काय करू शकतो, आणि काय करू शकत नाही याबद्दल स्वत:शी अभ्यास केला तर नवा विश्वास तयार होआील. कुणाहीपुढं जाताना छाती काढून ताठ मानेनं पण नम्र प्रवृत्तीनं जाता येआील.
पत्ता-अरविंद सोसा,आनंदनगर, सिंहगड रोड, पुणे-५१
फोन-(०२०) २४३५५३१५

शोधिला पाहिजे विचार । यथातथ्य ।।
चतुर्मासाचा संदेश
आषाढ शुद्ध एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. परमेश्वर चार महिने झोपी जातो. या दिवसापासून चतुर्मास व्रताचा प्रारंभ होतो. हे चार महिने तर पृथ्वीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहेत. वर्षभरातील पुढच्या आठ महिन्यांची, पाणी आणि अन्नाची व्यवस्था या चार महिन्यात होत असते. अशा वेळी परमेश्वर झोपला आहे, तेव्हा आता केवळ त्याच्यावर भार टाकून स्वस्थ राहू नकोस. तूच परमेश्वर आहेस. ईश्वर तुझ्यातच आहे. तू जागा हो, ऊठ आणि भगवंताची ही सृष्टी सांभाळून दाखव. `तूच आहेस तुझ्या भाग्याचा शिल्पकार' अशी समाजाला पुरुषार्थ आणि परिश्रमाची दिशा देण्यासाठी कुणी प्राचीन समाजशास्त्री ऋषीने या देवशयनी एकादशीची रचना केली असावी.
केवळ देवभोळा आळशी समाज उपयोगी नाही. स्वयंप्रेरित आत्मविश्वासपूर्ण परिश्रमी समाज तर उभा राहिला पाहिजे. पण त्याच वेळी `मीच या सृष्टी वैभवाचा करविता' असा अहंकारही त्याच्या मनात जागा होऊ नये. म्हणून देवशयनी एकादशी आणि चतुर्मास हे व्रत. या चार महिन्यात, आता भगवान नाही. मीच भगवान बनून त्याचे कार्य केले पाहिजे हा विचार मनात आल्यानंतर माझे जीवन शुद्ध बनले पाहिजे. व्रतनिष्ठ जीवन जगून माझ्या व्यक्तीगत जीवनाला आणि समाज जीवनाला आकार दिला पाहिजे. मी सतत जागृत राहिले पाहिजे. सृष्टीचे सौंदर्य आणि सुगंध वाढवीत राहिले पाहिजे. असा विचार करून चतुर्मासात व्यक्तीगत आणि सामाजिक व्रते घेऊन ती पार पाडणे हेच देवकार्य आहे.
देवशयनी एकादशीला विश्रांतीसाठी झोपलेल्या भगवंताला जागे करून, चार महिन्यांत मी व्रत घेऊन जागृतीचे काय काम केले याचे निवेदन करण्याचा जो दिवस आहे, त्याला कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी म्हटले आहे. यादिवशी चतुर्मासाच्या व्रताची सांगता होते.
झोपवलेल्या उठवणारी, बसलेल्याला उभा करणारी, उभा असेल त्याला चालायला लावणारी आणि चालत असेल त्याला धावायला लावणारी ही जिवंत प्रेरणादायी संकल्पना आहे. आपल्या जीवनातील सर्व प्रश्न स्वत: सोडविण्याऐवजी प्रश्न सोडविण्याचे कंत्राट कुणाला तरी देऊन माणूस गृहस्थाश्रमाचे मानेवरील जू ओढत आहे. थिजल्या डोळयाने आपले दु:ख मुकाटपणे पाहात आहे.
खऱ्या जागृतीच्या अभावामुळे आपल्या जीवनाचे सर्वच व्यवहार दिशाहीन झाले आहेत. आपण चालतो खूप, पण इष्टस्थळी पोहोचत नाही. आपण पाहातो खूप, पण प्राप्त काहीच करीत नाही. आपण ऐकतो खूप, पण त्यातून समाजशक्ती उभी रहात नाही. अशा परिस्थितीत चार महिन्यांच्या व्रतस्थ वाटचालीतून आपण आपल्या व्यक्तीगत जीवनाला आणि समाजजीवनाला निश्चित दिशा देऊ शकतो. प्रबोधिनी एकादशी हा आपण देवकार्य किती  केले, त्याचे फलित काय मिळाले याचा आढावा घेण्याचा दिवस आहे. हा आढावा भगवंताच्या बरोबर बसून घ्यायचा आहे. कारण आता पुन्हा तो आपल्याबरोबर साथ देण्यासाठी येणार आहे.
असा हा चतुमार्स! व्यक्ती आणि समाज याच्या उत्थानाचे व्रत शिकवणारा. गृहस्थीधर्माचे पुन:रुत्थान करणारा आणि व्यक्तीमध्ये `स्वयमेव मृगेंद्रता' असा आत्मविश्वास फुलवणारा.

मना सज्जना
भावना आणि व्यवहार यांची सांगड
अफजलखानाची कथा मााहीत नाही असा माणूस महाराष्ट्नत तरी सापडणार नाही. शक्ती आणि बुद्धीचा संगम असणारे छत्रपती शिवराय यांनी अफजलखानाला ठार मारले.  अफजलखान पंढरपूर आणि तुळजापूर चालून गेला. त्याला वाटत होते की, शिवाजी महाराज चिडून उघड्या मैदानावर येऊन युद्ध करतील. पण अफजलखान अत्याचार करत असताना आलेला राग त्याक्षणी न दर्शवता महाराजांनी स्वत:ला शांत ठेवून योग्य संधीची वाट पाहिली, किंबहुना संधी तयार केली आणि योग्य वेळ येताच अफजलखानाचा वध केला. आधी युद्ध मनातल्या रागाशी! भावनेच्या भरात घेतलेले निर्णय चुकण्याचीच शक्यता. निर्णय घेण्याच्या कलेचं हेच तर महत्व आहे. निर्णय कला ही भावनांकाचे महत्वाचे अंग आहे.
एखादे काम करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असतात. पण त्या क्षणी कोणत्या पर्यायाची निवड करायची हे लक्षात येत नाही. अशावेळी नाणेफेक, नशीब इ.गोष्टींचा आधार घेतला जातो. परिस्थितीचा सारासार विचार करून, केवळ भावनेला किंवा व्यवहाराला महत्व न देता त्या दोघांचा समतोल साधून, दोन किंवा अधिक पर्यायांमधून निवड करण्याचे कौशल्य म्हणजेच निर्णय कौशल्य. पर्याय का सापडत नाहीत? पर्याय तितके सक्षम का नसतात? प्रमुख कारण म्हणजे परिस्थितीला सामोरे जाणारा माणूस जास्त भावनिक आणि संवेदनशील असणे किंवा अजिबात भावनिक आणि संवेदनशील नसणे. `मी कायम माझ्या मनाचे ऐकतो, बुद्धीचे नाही' किंवा `मी अजिबातच माझ्या मनाचे ऐकत नाही केवळ बुद्धीचे ऐकतो' ही दोन्ही वाक्ये अर्धसत्य आहेत, अती राग आणि भीक माग' ही म्हण आहेच. अर्जुन अंतिम युद्धासाठी उभा होता. मी माझ्या नातलगांशी युद्ध करणार नाही असा भावनिक निर्णय त्याने घेतला होता. या उलट केवळ व्यवहार्य, तात्विक विचार करून घेतलेले निर्णय कुणाचाही कसलाही विचार न करता घेतलेले असतात. त्यात भावनेचा अजिबात विचार नसतो. त्यामुळे सुद्धा तोटा होण्याची शक्यताच असते.  अतिव्यवहारी लोकांचे जीवन बऱ्याचदा कोरडेच जाते. जीवनाचा खरा आनंद असे लोक घेऊ शकत नाहीत. खरी गरज आहे ती भावना आणि व्यवहार, किंवा मन आणि बुद्धी यांचा समतोल साधण्याची.
-अजिंक्य नि.गोडसे, इचलकरंजी    फोन-९६३७७४१८६५

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन