Skip to main content

sept.2015

सामान्यांची घुसमट
भाजपने सत्तेवर आल्यानंतर केलेल्या पुष्कळ निवडनियुक्त्या त्रयस्थ व सुजाण विचार करणाऱ्या कित्येकांस खटकणाऱ्या असतील; परंतु राज्यकर्त्यांचा तो अधिकार मानायला नको काय? पूर्वकाळची ढोबळ उदाहरणे कुणालाही आठवतील. काँग्रेसचे बाबासाहेब भोसले, जनता दलाचे देवेगौडा, समाजवादी राजनारायण किंवा आजचे लालूप्रसाद; फारच भीषण म्हणजे राबडीदेवी वगैरे वगैरे! असल्या `नियुक्त्यां'वर या पराभूत परिवारा'ने फारसे तोंड टाकले नव्हते, जेवढे ते आज मोदी किंवा सुषमा स्वराजवर बडबड करत आहेत! बाबासाहेब पुरंदरे यांना `महाराष्ट्न् भूषण' द्यायचा निर्णय या तोंडपाटील मंडळींनी अकारण वादग्रस्त केला. आजवर कुणाकुणाला `भारतरत्न' ते `पद्मश्री'वाटल्या गेल्या ती यादी त्यांनी एकदा डोळयापुढे आणली असती तर त्यांना रडण्यासाठी, किंवा पत्रके काढून माध्यमबाजीने सत्यशोधक विरोध करण्यासाठी किती संधी होती ते त्यांच्याही लक्षात येईल. सध्याच्या सत्ताधारी भा.ज.प.चा कारभार, नियुक्त्या, निर्णय हे सर्वकाही छानछान होईल असे कोणी मानत नाही. किंबहुना गेल्या वर्षभराचे मूल्यांकन कुणी हल्लीच्या शालान्त परीक्षेप्रमाणे काठावरच्या मुलांना नव्वद-शंभरीच्या घरात नेऊन ठेवणारे करत नाही. परंतु सत्ता मिळवण्याचा पूर्वार्ध संपल्यावर ती प्रत्यक्ष राबविण्याचा उत्तरार्ध पाहिला, तपासला तरी पाहिजे. सत्ता राबविण्यासाठी कोणतीही नियुक्ती, कोणतेही पद जाहीर झाले की `पराभूत परिवार' छातीच बडवायला सुरुवात करतो हे अजब तंत्र आहे.
ज्यांनी आजवर आपापल्या क्षेत्रात काही कामगिरी खरोखरीच केली आहे, त्यांनासुद्धा या अश्लाघ्य विरोधामुळे असे एखादे लहानमोठे पद, एखादा सन्मान नकोसे वाटू लागल्यास नवल नाही. ते पद किंवा सन्मान नको वाटून या भुंका, हे छाती पिटणे, ती पत्रके, वैचारिक दंभातून आलेले ते रोष आणि पराभूत वास्तवातून आलेली भडकभाषी आंदोलने यांबद्दल भीती वाटणारी कितीतरी मोठी माणसे या समाजात आहेत. त्यांच्याही मनांत या मंडळींनी निराशा दाटून आणली आहे. त्यांचा त्या रडक्या काँग्रेसशी किंवा उन्मादी भाजपशी संबंध नाही; अस्मितावादी शिवसेनेशी किंवा फुटीर बनलेल्या रिपब्लिकनांशी संबंध नाही, स्वत:च बुर्झ्वा बनलेल्या साम्यवाद्यांशी किंवा स्वयंमन्य अल्पसंख्य समाजवाद्यांशी संबंध नाही... पण त्या सर्व विचारधारांच्या मुळाशी असू शकणाऱ्या समन्वय-सहिष्णुता-वैचारिकता-कृतिशा%मण्ॅिद्ग-%ीींर्$ॅणुर्र्डी-िेर्र्ज्ञ्ीद्धींकर्डी-कूर्र्डींिंी यांच्याशी त्यांचा संबंध आहे. माणसाला काही कृती करूच द्यायची नाही इतका विखार, योजून पेरला जात असेल तर कोणती शांत-समंजस-स्वनामधन्य व्यक्ती असली पदे व सन्मान स्वीकारेल? अब्दुल कलामांच्या निर्वाणानंतर कोणी एका पाकिस्तानी पदाधिकाऱ्याने म्हटले की, `कलाम एक सामान्य श्रेणीचे वैज्ञानिक होते; केवळ ते मुसलमान म्हणून त्यांना दिखाऊ राष्ट्न्पती केले'... हे पाकिस्तान्याने म्हटले म्हणून कोणी जगात खरे मानले नाही. कदाचित जगभरात पाकिस्तानच्या बाजूची धर्मनिरपेक्षता कमी पडली असेल. पण या देशातल्या कुणी `थोर विचारवंता'ने त्या आशयाची पत्रकबाजी केली नाही हे नशीब; कलामांचे व आपलेही!
तात्पर्य असे की या पराभूत वाचाळांनी व दिशाहीन नरवीरांनी आपल्या वैचारिकतेला जरा आवर घालावा. परवाच्या स्वातंत्र्यदिनास सार्वजनिक ध्वज वंदनासाठी एका गावातील सच्च्या-शुद्ध-ज्येष्ठ व्यक्तीला प्रमुख पाहुणा म्हणून बोलावल्यावर त्या व्यक्तीने `मला कुणाच्या तरी अयोग्य विरोधाची भीती वाटते' असे म्हणून नकार दिला. हे असले परिणाम खचितच फार वाईट आहेत. प्रत्येकाजवळ मोदी, सुषमा, पुरंदरे किंवा झगडे, परदेशी, टी चंद्रशेखर इत्यादी अधिकारी यांच्याइतके धैर्य व ठामपणा असणार नाही. पण सामान्य समाजातील पात्रतेच्या निवड-नियुक्त्यांना या `पराभूत परिवाराची' दृष्ट लागणार असेल तर इथे चांगले काही घडण्याची आशा नाहीच; पण हे उपद्रवी मुखंड जे काही घडवतील तेच चांगलं, म्हणून असे सन्मान्य त्रयस्थ विचारी लोक चार पावले लांब निघून जातील. रशियातून एके काळी विद्वान-लेखक-शास्त्रज्ञ-विचारवंत यांनी देशत्याग करण्याची रीत होती. तसले काही इथे घडायला नको!!

गेले ते दिवस
योगिराजाचा स्पर्श
प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे वक्तृत्व म्हणजे गंगेचा प्रवाह. स्वामी विवेकानंद हा प्राचार्यांच्या परमश्रद्धेचा विषय. एकदा सांगलीत प्राचार्यांचे, विवेकानंदांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल व्याख्यान झाले. प्रतिष्ठित माणसे दाटीवाटीने बसली होती. परिव्राजक अवस्थेत स्वामीजींनी संपूर्ण भारत पायी हिंडून पाहिला; छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा जिथे उमटल्या त्या महाबळेश्वर, प्रतापगड परिसरात स्वामीजी हिंडले; तिथे त्यांना काय दर्शन घडले हे, प्राचार्य तल्लीन होऊन सांगत होते.
महाबळेश्वर परिसरात दोनतीन दिवस स्वामीजी हिंडले. मुक्कामाला महाबळेश्वरात दीक्षित नावाचे गृहस्थ होते, त्यांनी आदराने अगत्याने आपल्या घरातील एक खोली स्वामीजींना दिली होती. स्वामीजींच्या या वास्तव्यासंबंधी दीक्षित यांच्या डायरीत काही नोंदी सापडल्या.
श्री.दीक्षित म्हणतात, ``हा संन्यासी खातो काय आणि कुठे, हे गूढ आहे. त्यांना सेवन करण्यासाठी कुणी फळे, मिठाई दिली तर तत्काळ तो उपाहार आसपासच्या सर्व लोकांना वाटून टाकतो आणि एखादा तुकडा स्वत: खातो.'' हा गृहस्थ झोपतो काय आणि कसा याबद्दल दीक्षितांना कुतुहल होते. त्यानी गवाक्षातून पाहिले तर दीक्षितांना स्पष्ट दिसले, हा संन्यासी झोपलेला नाही; उभी रात्र तो दगडी पुतळयासारखा ध्यानस्थ होता.
श्री.दीक्षितांनी आणखी एक आठवण आपल्या डायरीत नोंदवली आहे. ते म्हणतात,``शेजारच्या एका बंगल्यात, वय वर्षे एकाहून कमी असलेली एक छकुली मुलगी अखण्ड रडत होती. रात्रभर तिचे रडणे चालू होते. दिवसा डॉक्टरी, दैवी उपाय झाले. काही उपयोग झाला नाही. मुलीचे आईवडील, नातलग बेचैन झाले. सकाळची वेळ होती. स्वामीजी ध्यान संपवून अंगणात आले व येरझारा घालू लागले. स्वामीजींना कळले की, एक बाळ कळवळून रडत आहे. पालक हैराण झाले आहेत. आसपास माणसे जमली आहेत.
स्वामीजींनी आतुरतेने हिंदीमध्ये विचारले, `काय गडबड आहे?' तेव्हा लोकांनी सांगितले, बाळ अखण्ड रडत आहे. आई-वडील चिंतेत आहेत. स्वामीजींनी पाहिले, बाळ कळवळून रडते आहे. ती रडणारी छोटी मुलगी काळीनिळी पडत चालली होती. तेव्हा स्वामीजी म्हणाले, ``आणा इकडे; मी घेतो तिला.''
मुलीच्या आईवडिलांनी बाळाला स्वामीजींच्या हाती दिले. स्वामीजींनी मुलीला शांतपणे घेतले. ज्या चौरंगावर स्वामीजी ध्यानाला बसत त्या चौरंगावर ते मांडी घालून बसले. त्यांनी मुलीला मांडीवर घेतले. तिला अगदी हळुवार हाताने थोपटले. चमत्कार झाला! मुलीचे रडणे थांबले. आईच्या कुशीत मूल झोपावे तशी अगदी शांतपणे ती झोपी गेली. मुलीच्या आईने झोपलेल्या मुलीला उचलून नेले. मुलगी पाचसात तास गाढ झोपून गेली आणि नंतर फूल उमलावे तशा तिने पापण्या उचलल्या; गोड शांत हसू तिच्या चेहऱ्यावर उमटले. ती मुलगी स्वत:च्या मुठी चोखू लागली.''
शिवाजीरावांनी ही हकीकत सांगितली तेव्हा पुढल्या रांगेत बसलेली एक खानदानी महिला उठली. ती महिला म्हणजे सांगलीच्या राणीसाहेब सरस्वतीबाई पटवर्धन होत्या. राणीसाहेब स्टेजवर आल्या आणि म्हणाल्या, ``ते अखण्ड रडणारे मूल म्हणजे मीच होते.'' लोक चकीत आणि रोमांचित झाले!
- म. वि. कोल्हटकर, सातारा
फोन : (०२१६२)२३२५०४

आईचं नाव
परदेश प्रवास करावा असं मनात येऊ लागलं. पासपोर्टची कागदपत्रं पाठवली. पण गाडं अडलं. मुंबईला गेल्यावर कळलं की, फॉर्ममध्ये आईचं नाव लिहायला मी चुकले होते. स्वत:चाच राग आला. वाईटही वाटलं. आईचं नाव `आई'च असतं असं वाटायचं. सर्वत्र नाव लिहिताना बाबांचे नाव-आडनाव. माझी शिकायची आवड तीव्र होती. हायस्कूल दूर. आईची जिद्द जबर होती. तिने आम्हाला खोली घेऊन बिऱ्हाड थाटून दिलं. तिच्यामुळेच शिक्षण झालं. पण प्रगतीपुस्तकावर आईचं नाव, तिची सही कुठेच नव्हती. आई अत्यंत स्वच्छ, सुबक कामं करायची. तिचा पिंडच कामसू.
पंधराव्या वर्षी लग्न होऊन ती सासरी आली. सासर शेतकऱ्याचं, गुरावासरांचं, देवधर्माचं.... सोवळया ओवळयाचं! खायला प्यायला होतं पण कष्टही अपार होते. पुरुषांनी तापट असण्याचाच तो जमाना. दहा बाळंतपणं. कसं निभावलं असेल आईनं? बैलाने मारून आईचा एक पाय अधू झाला. अपंगत्वावर मात करून तिने बाबांच्या बरोबरीने गाडा ओढला. त्रागा केला नाही. परिस्थितीने अनेकदा कसोटी पाहिली. ती बुद्धिमान होती. उत्तम शिवण हाती करायची. कलाकौशल्याची, कवड्या- सोंगट्या खेळायचीही आवड. पंचावन्नाव्या वर्षानंतर पाटीपेन्सिल घेऊन अक्षरं गिरवली आणि पोस्टकार्डावर पट्टीने ओळी काढून मला पहिलं पत्र पाठवलं! त्यांचं साहित्यिक मूल्य अमोल आहे.
आयुष्यभर घरातली ढीगभर भांडी तिनं घासली; त्या भांड्यांवर आईचं नाव कुठेच नव्हतं! आईला सर्वांनी गृहितच धरलं होतं. सौभाग्य म्हणजे कपाळीचं कुंकू... पायातली वेढणी.. काचेची काकणं आणि वाखाच्या दोऱ्यात ओवलेले काळे मणी! बाबांच्या निधनानंतर तीन मुलांनी शेतीवाडी आपल्या तिघांच्या नावे करून घेतली. कष्टपूर्वक ती सांभाळलेल्या आईचं नाव वारस म्हणूनसुद्धा नव्हतं. आपण काही त्याग केला हे तिच्या गावीही नव्हतं.
८२व्या वर्षी आई गेली. अखेरचा श्वास शांतपणे घेताना लहान मुलीसारखी निष्पाप दिसत होती. नातवंडाना तिने स्वत:च्या हाताने गोधड्या शिवून दिल्या. मोडक्या काडीच्या जागी सुतळ बांधलेला चष्मा लावून तुकडेतुकडे कौशल्याने सांधणारी, पुस्तकं वाचणारी, व्यंकटेशस्तोत्र म्हणणारी आई.
माझ्या आईसारख्याच त्या काळातल्या अनेक कर्मयोगिनी! हक्काची भाषा त्यांना ठाऊकच नव्हती. स्वत:वरच प्रेम करणाऱ्या, हक्कांसाठी, सुखांसाठी भांडणाऱ्या, हिशेबी वृत्तीच्या आमच्या पुढच्या पिढ्या आणि अविरत कष्ट करून कशावरही स्वत:चं नाव नसलेली माझी आई!
- मंदाकिनी गोडसे, देवगड ४१६६१३ मोबा.९४२१२६४००८

सव्वादोन शतकांपूर्वी गोहत्त्याबंदी
मराठी साम्राज्याचा विस्तार प्रामुख्याने संस्कृतिरक्षण व शत्रूकडून भ्रष्ट होणाऱ्या धर्माचे रक्षण यासाठी होता. पेशवाईत उत्तर विजय मिळत गेल्यावर तेथील व्यवस्थेसाठी मराठी सरदारांची नियुक्ती करण्यात आली. काशी-प्रयाग-मथुरा-अयोध्या ही स्थाने स्वत:च्या ताब्यात असण्यासाठी, शत्रूंचा तेथे उपद्रव टाळण्यासाठी मराठी दक्षता घेत.
महादजी शिंदे हे पेशवाईतले एक बलवत्तर सरदार मथुरा शहरी सुमारे ६ वर्षे राहिल्यामुळे ते त्यांचे आवडते शहर बनले. ते धार्मिक वृत्तीचे होते. मथुरा-वृंदावन ही दोन्ही स्थळे पातशाहीकडून छत्रपती सरकारकडे घ्यावीत असा आग्रह नाना फडणीसानी दक्षिणेतून धरला होता. महादजींनी दबाव आणि प्रयत्न यांचा अवलंब करून दिल्लीकर बादशहाकडून या शहराच्या सनदा मिळवल्या तत्पूर्वीच सन १७९०च्या ४ सप्टेंबरला (बरोबर २२५ वर्षांपूवी) त्यांनी गोवध-बंदीचे फर्मान बादशहाकडून काढविले. त्यात भावनांपेक्षा कृषीजीवनाच्या दृष्टीने स्पष्ट उल्लेख आहे. बादशहाच्या हुकुमाचा सारांश असा -
``पशूसुद्धा विधात्याच्या सृष्टीतील जीव असून ते निरुपयोगी होत असे समजू नये. त्यातही विशेषत: बैल व गाय हे प्राणी अगणित लाभ देणारे आहेत.... जनतेचा संसार व निर्वाह चालण्यास गाईची अत्यंत जरुरी आहे, आणि गाईवरच मनुष्यांचे व पशूंचे जीवन अवलंबून आहे... म्हणून आम्ही आपल्या उदार अंत:करणाने व हर्षपूर्ण दृष्टीने आमच्या समस्त राज्यभूमीमध्ये गोकुशाचा म्हणजे गोहत्त्येचा परिपाठ सर्वथैव मना करीत आहोत.''

.......... देशभक्तीची व्याप्ती ..........
पाँडेचरीचे योगी अरविंद यांचे गुरू श्री.लेले. अरविंद आय.सी.एस. होऊन बडोद्याच्या महाराजांकडे नोकरीला होते. तेव्हा श्री.लेले यांची ओळख झाली. श्री.लेले महान योगी व सत्पुरुष होते. त्यांना आलेला एक अनुभव आठवण-
लेले यांना असे खात्रीलायक कळले होते की, पेशवाईच्या अखेरच्या धामधुमीत जुन्या सरदार घराण्यात कुठे तरी चाळीस लाख सोन्याच्या मोहरा पुरलेल्या आहेत; ती जागा फक्त एका आजीला ठाऊक होती, पण मरताना तिची दातखिळी बसली होती. या द्रव्याचा शोध लावला पाहिजे असं श्री.विष्णुपंतांच्या(लेले) मनाने घेतले. त्याकरिता त्यांनी फार धडपड केली. भरतपूरच्या बाजूस एक गढी होती, तिथे ते गेले. तिच्या दाराशी एक वृद्ध गोसावी राहात होता, त्याच्या झोपडीत त्यांनी मुक्काम केला. तो गोसावी एकाएकी खूप आजारी झाला. दहा-बारा दिवस लेले यांनी त्याची सेवा केली. त्यांच्या ध्यानात आले की, हा गोसावीबुवा साधा माणूस नाही. १८५७च्या युद्धात बचावलेले आणि नंतर परमार्थमार्गात लागलेले जे अनेक थोर पुरुष होते, त्यापैकी हे गोसावीबुवा. लेल्यांनी खरा वृत्तांत सांगितल्यावर गोसावीबुवा हसून म्हणाला, ``तू वेडा आहेस. हिंदुस्थानची उन्नती पैशाकरिता अडलेली नाही, ती माणसांकरिता अडली आहे. वेळ येईल तेव्हा वाटेल तितका पैसा मिळेल. फार कशाला; आपण बसलो आहोत इथंच इतका पैसा आहे की, एखादी मोठी फौज बारा वर्षे पोसता येईल. मी त्या द्रव्याचे रक्षण करण्याकरिता बसलो आहे. मृत्यूची वेळ येईल तेव्हा अशाच एका अधिकारी माणसाला बसवीन आणि जाईन. योग्य वेळ आली की हे द्रव्य बाहेर पडेल!'' `आजच ती वेळ आली आहे' असा लेले व बुवाचा वाद झाला. `हे स्थान गुप्त ठेवीन' या शपथेवर गोसाव्याने ते द्रव्य लेल्यांना दाखवले. डोळे बांधून नेल्यामुळे त्यांनाही तिथे कसा पोचलो, हे समजलं नाही. डोळे उघडून पाहताच अपरंपार द्रव्य दिसले. लेले यांचे डोळे दिपले. त्यातील थोडा तरी भाग द्यावा, म्हणून ते बुवाची विनवणी करू लागले. बुवा हसून म्हणाला, ``हाच तुझा वेडेपणा. पैशाने माणूस तयार होत नसतो, उलट माणसाचा अध:पात होतो. भारतापुढे जे भवितव्य आहे त्या दृष्टीने माणसाची तयारी पैशाने होणार नाही.'' यावर भारताच्या भवितव्यासंबंधी उभयतांचं बोलणं झालं. ज्याप्रमाणे शरीर एकच असलं तरी त्याच्या एकेका अवयवावर एकेक काम नेमून दिलेले असते, तशीच व्यवस्था या विराट पुरुषाची. या भारत देशावर, येथील रहिवाशांवर अत्यंत महत्त्वाचे काम म्हणजे धर्म सांभाळून ठेवणे. लवकरच असा काळ येईल की, भौतिक सुखाच्या, चंगळवादाच्या मागं लागलेलं जग नास्तिकवादात बुडून जाईल, भांबावून जाईल. त्यावेळी जगाला धर्माचं यथार्थ ज्ञान देण्याचं, जगाचं गुरुत्व करण्याचं काम भारताला करावं लागेल. पाश्चात्य बुद्धीने हे काम होणार नाही. अध:पाताची पराकाष्ठा होऊन प्रत्यक्ष अप्रत्यक्ष छळ असह्य होईल, अंत:करणं तापून निघतील, तेव्हाच खरं तप सुरू होईल.
गोसावी बुवांनी ही दृष्टी दिल्यावर श्री.लेले यांचे जीवनच बदलले. पूर्व आयुष्यात ते बॉम्ब बनवणे इ. देशभक्त व क्रांतिकारक उद्योग करीत असत. त्यापूर्वी प.पू.वासुदेवानंद सरस्वतींनी त्यांना हेच सांगितलं होतं, `तुझ्याकडे हे काम नाही.'
पुस्तकाचे नाव - मी पाहिलेले अप्रबुध,    लेखक - ब.स.येरकुंटवार (परिशिष्ट पृ.४)
- वा.मो. बर्वे, दापोली (मो.९९७५०९६४१६)

निवृत्तीनंतर कार्यरत
शिक्षकी पेशातून निवृत्त झालेल्या दुसऱ्या दिवसांपासून पुन्हा त्याच शाळेत अध्यापनासाठी जाणे, कोणतेही मानधन न घेता सेवावृत्तीने कार्य करणे हे सोपे काम नाही. असे काम करणारे माजी मुख्याध्यापक श्री.पटवर्धन यांच्या सेवावृत्तीचा गौरव करण्यात आला.
विजयपुरातील मराठी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक एस.जी.पटवर्धन यांनी म्हटले की, `मी १९८६मध्ये बी.एड.केले त्यानंतर माझ्या मातृशाळेत शिक्षक झालो आणि मुख्याध्यापक झालो. याचे श्रेय शिक्षण महाविद्यालयास आहे. मी वेळेचे भान आणि अध्यापनाचे नियम कसाशीने पाळले. हे संस्कार मला शिक्षण महाविद्यालयाकडून मिळाले. मी निवृत्तीनंतरही शाळेत अध्यापनासाठी जातो. हे फार मोठे कार्य नव्हे. मला भरभरून संस्कार दिले ते विद्यार्थ्यांना पोहोचविण्याचे कार्य अजून अपूर्ण आहे. ते पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करीत आहे.
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
- श्रीपाद पटवर्धन, विजयपूर(विजापूर)

जात सुटत नाही, पण नुकसान किती!
अलीकडे जातीधर्माच्या राजकारणाला जोर लागला आहे. `सर्वधर्म समभाव' ही आपल्या देशाची संकल्पना आहे, तसेच त्यात `सर्व जाती समभाव' याचाही अंतर्भाव आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये जसे काही चांगले-वाईट गुण असतात, त्याचप्रमाणे प्रत्येक जातीधर्मात चांगली-वाईट माणसे असतात.
एकाच कुटुंबात जन्मलेली, एकाच आईची लेकरे, तरी कौटुंबिक कलहांना ऊत येतो. त्यात स्पर्धेपेक्षा ईर्ष्या जास्त असते. त्यातून अहं भावनेने भांडणे व वैर निर्माण होते. जे कुटुंबांचे तेच जातींचे! कुठली जात वरचढ यातच एकमेकांची डोकी फुटतात. समाजाचे नुकसान होते. आपल्या देशात असे का घडते? या समस्या कशा उद्भवल्या? आगरकर, फुले वगैरे समाजसुधारकांनी यापूर्वीच याचा सखोल अभ्यास केला आहे. संक्रमणातून जात असताना प्रगत समाजावर अन्याय होत असतो. राखीव जागांमुळे इतर समाजाला अवास्तव फायदा मिळत राहिल्यास प्रगत समाजाला फटका बसतो. ह्यांच्या संधी हुकतात आणि दिवसेंदिवस प्रश्न उग्र बनत जातो.
आपली राज्यघटना लिहिली त्यावेळची परिस्थिती, व अपेक्षित बदल आज घडून आलेला दिसत आहे. पूर्व प्रगत समाजाला त्याचा अडथळा निर्माण होऊ नये या अपेक्षा साठत जातात. बदललेल्या व पुढे बदलणाऱ्या परिस्थितीचा आढावा घेणे व त्यानुसार उपाययोजना होणे ही निकड असते.
सरकारी नोकऱ्यांची अवस्था गंभीर आहे. याला नुसतीच भ्रष्टाचाराची कीड आहे असे नाही तर नियमित पगार, पेन्शन-नोकरीची शाश्वती यांमुळे येथे आकर्षण असते. त्यामुळे नोकरभरतीतच भ्रष्टाचाराला सुरुवात होते आणि जनतेची कामे मार्गी लावण्यापेक्षा त्यांची अडवणूक करून  पैसा काढतात. कायद्यातील पळवाटांमुळे अशा लोकांना संरक्षण मिळून काळ सोकावतो.
अशा कमाईत राखीव जागा अडचणीच्या ठरतात. उच्चभ्रू जाती-जमाती आपणास मागास जातीत समाविष्ट करण्यासाठी व त्या त्या समाजाला राखीव जागा मिळाव्यात म्हणून आता आंदोलनात उतरत आहेत. खरे म्हणजे ज्यांचे पारंपरिक व्यवसाय आहेत त्यांनी आधुनिकीकरणाची कास धरून आपले व्यवसाय चालवावेत व उत्पन्न मिळवावे. जेवढी उद्यमशीलता असेल तेवढे उत्पन्न वाढतेच. जपानसारख्या देशांत लोक घरोघर व्यवसाय करतात. हे लोक पूर्वी लहान लहान बाहुल्या बनवत, त्यांची निर्यात होत असे. आता त्यांची प्रगती रोबो बनवण्यापर्यंत झाली आहे. बदलत्या कालमानाप्रमाणे नवनवीन समस्यांचा आढावा घेऊन त्याची उकल व उपाययोजना झाल्या पाहिजेत हे सरकारपुढचे मोठे आव्हान आहे. रोज उठून एकेक नवीन जात आरक्षणाची मागणी करत सरकराला वेठीला धरते हे योग्य नाही. राजकीय पक्षांनीही याचे भांडवल करून मतांची खेळी करू नये व नव्या समस्या उभ्या करू नयेत.
वरील समस्यांना ब्राह्मण समाजही अपवाद नाही. गांधी हत्येच्या निमित्ताने ब्राह्मणेतर समाजाने ब्राह्मणाला लक्ष्य करून त्यांना देशोधडीला लावले. याचे साक्षीदार आजही त्या आठवणींनी अस्वस्थ होतात. असे असले तरी, हा समाज आपल्या वृत्तीने परत जोमाने उभा राहून ताठ मानेने जगतो आहे. या लोकांना नुकसान भरपाई, कधीही कोणत्याही प्रकारे मदत मिळालेली नव्हती किंवा कोणी सरकारकडे हातही पसरले नाहीत. ज्यांनी त्यावेळी घरे जाळली होती तेच लोक आता `आम्ही त्यावेळी तसे वागायला नको होते' म्हणून कबूल करतात. आम्ही आहोत तिथेच राहिलोत, म्हणून दिलगिरी व्यक्त करतात.
कोकणाचा क्रॅलिफोर्निया करू, मुंबईचे शांघाय करू वगैरे घोषणा हवेत विरल्या.आज बहुतेक शिक्षित वर्गाने उच्चविद्याविभूषित होऊन परदेशांत आपला ठसा उमटवला आहे. सुरुवातीला हा वर्र्ग सरकार दरबारी नोकरीला होता. तसे म्हटले तर ब्राह्मण समाजही अल्पसंख्यच आहे. पण एकेकाळी इंग्रजसुद्धा या समाजापासून सावधतेने वागत होते. प्रत्येक जातीधर्मांत बरीवाईट माणसे असतातच. नारायणराव पेशव्यांचा खून त्यांच्या काकानेच घडवून आणला, इंग्रजांच्या हातात पुण्याचे राज्य सुपूर्द करणारे फितुर ब्राह्मणच होते. फार काय क्रांतिवीरांना पकडून देणाऱ्यांमध्येही त्यांचा समावेश होताच. पण त्यामुळे सर्व समाज कदापि वाईट ठरवता येत नाही. तसेच इतर जातीधर्मांचे आहे.
अलीकडे काहीजण म्हणतात की, टिळक, सावरकर, गांधी वगैरे अनेक क्रांतिवीरांनी स्वराज्य मिळवले हे सगळे ठीक आहे, पण आता काय त्याचे? किंवा असेही म्हणणारे लोक आहेत की, `इंग्रज आणखी काही काळ भारतात असते तर भारत आणखी सुधारला असता.' हे लोक किती उथळपणे विचार करतात! स्वराज्य मिळाले, सर्व सुखसुविधा आपल्या पायाशी हात जोडून उभ्या राहिल्या. परंतु मुळात आपण पाच-सहाशे वर्षे आक्रमणांत का भरडले गेलो? आपली जातीव्यवस्था, आपली फंदफितुरी आपल्या देशाच्या मुळावर येते. `आपला देश' ही संकल्पनाच अद्यापि आमच्यात रुजलेली नसल्यामुळे प्रथम आम्ही स्वत:चे, जातीचे हित जपत असतो, त्यातच रमतो! आपला देश कुठे गहाण पडतो याचा विचारही अद्यापि आपल्या जनतेच्या मनाला शिवत नाही. जातीची लेबले लावून आपले श्रेष्ठत्व कुठपर्यंत जपायचे याच्या मर्यादा ओळखल्या पाहिजेत.
ज्यांच्यामुळे आपण परकीयांच्या ताब्यात गेलो ते भारतीयच नव्हते का? ज्यांच्या क्षुद्र स्वार्थामुळे अगणित लोकांना त्यातून मुक्ती मिळवण्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावावी लागली. स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणाऱ्यांचा सन्मान व्हायलाच हवा पण परत अशा हकनाक आहुती दिल्या जाऊ नयेत याची जाणीव प्रत्येक भारतीयाला होऊन तो देशासाठी जगू लागेल, तेव्हा खरे स्वातंत्र्य मिळाले असे म्हणता येईल व देश एकसंघ राष्ट्न् बनेल.
- विद्या दिवेकर, वाटेगाव (वाळवे)
मोबा.९९६०४५२८४१

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन