Skip to main content

Oct.2015

वानप्रस्थी कर्तव्य
गतकाळातील काळा कालखंडसुद्धा काळाच्या पडद्याआड गेल्यावर, कालांतराने रम्य भासू लागतो. माणसाला भविष्याची चिंता सतावते, वर्तमान खडतर भासते; पण भूतपूर्व स्मृती मात्र सुखावतात. साध्यासुध्या व्यक्तीलाही आयुष्याच्या संध्याकाळी संध्यारंगांसमवेत स्मरणरंजन करायला खूप आवडते; मग ज्यांचा सगळा जीवनप्रवास वाटावळणांनी, चढउतारांनी भरून गेलेला असतो, त्याच्या बाबतीत सांगण्याजोगे,-आणि पुढच्या पिढ्यांनी ऐकण्याजोगे किती किती असेल! परंतु अशा अनुभवसंपन्न व्यक्तीसुद्धा स्वत:च्या आठवणी लिहून ठेवत नाहीत, हा प्रवाद नसून सार्वत्रिक वास्तव आहे.
चरित्र किंवा आत्मचरित्र या साहित्यप्रकाराने कोणत्याही भाषेचे दालन समृद्ध असते. तथापि ते लिहिले जाण्याकरिता चरित्रनायक महान असला पाहिजे असा गैरसमजही असतो. माणूस अगदी सामान्य, मोरू किंवा बाळू या वर्गातला असला तरी त्याच्या चरित्रकथनात त्या त्या काळातील समाजस्थिती उमटत असते. लक्ष्मीबाई टिळक यांनी लिहिलेली स्मृतिचित्रे, त्यातील साहित्यगुणामुळे श्रेष्ठ ठरली असे नाही, पण त्या काळची समाजस्थिती त्यांतून समजली, आणि एका साध्या घरच्या महिलेने टिपलेले त्या काळातील क्षण हे आज इतक्या वर्षांनंतर महत्त्वाचे व रंजक ठरले. पु.लं.चे `असा मी असामी' हे अख्खे पुस्तक धोंडो भिकाजी ह्या कारकूनश्रेष्ठाचे बहारदार कथन असून त्याच्याही म्हणण्याप्रमाणे `राजहंसाचे चालणे । जगी जालिया शहाणे' तरी चिमणीने उडूच नये की काय? शे-दोनशे वर्षांपूर्वीच्या एखाद्या आलतूफालतू पत्रातूनही त्यावेळची स्थिती पुढे येते. इतिहासकारांच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा दस्तावेज असतो, पण घरच्या कोणा पूर्वजाचे साधेसुधे चिटोरपत्रसुद्धा आज कित्येक घरांतील पुढच्या कितीतरी पिढ्या जपून ठेवत असल्याचे आपण पाहतो. या विशेष कारणासाठी तरी सर्वसाधारण व्यक्तीनेसुद्धा आपल्या वानप्रस्थातील एक स्वयंस्वीकृत कार्य म्हणून, आपले समग्र चरित्र जास्तीत जास्त तपशीलाने लिहायला हवे. अलीकडच्या काळात पुष्कळ घराण्यांचे कुलवृत्तांत प्रसिद्ध होत असतात. त्या प्रकल्पाच्या प्रत्येक संयोजकाचे एकच एक मत असे असते की, आपापल्या घरच्या मंडळींबद्दल आणि स्वत:बद्दलसुद्धा माणसे माहितीच देत नाहीत. असे करण्यात त्यांची विनम्रता असू शकेल, कार्यबाहुल्य असू शकेल, किंवा दुर्लक्षही असू शकेल. कदाचित अक्षरशत्रू म्हणण्याएवढे लेखनदुर्भिक्ष्य असू शकेल; पण अशी माहिती नोंद न करण्यामुळे भविष्यकाळाच्या दृष्टीने फार मोठा अन्याय घडत असतो हे ध्यानात घेतले पाहिजे.
***

पलूसच्या पं.वि.दि.पलूसकर शिक्षणसंस्थेच्या वतीने `शिक्षणविचार' हे पुस्तक प्रकाशित झाले, त्यात महाराष्ट्नतील नामवंत मंडळींचे विचार संकलित केलेले आहेत. वसंत आपटे यांनी मुलाखती घेऊन व इतर संकलन करून हे पुस्तक संपादित केलेले आहेे. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत शिक्षणमंत्री ना.विनोद तावडे म्हणतात.....
एकविसाव्या शतकाच्या प्रारंभापासून भारतात नव्या युगाचे नवे वारे खेळू लागले आहेत. भारताकडे पाहण्याचा जगाचा आजवरचा दृष्टिकोण बदलत असल्याचा प्रत्यय येत असून विज्ञान-तंत्रज्ञान, संरक्षण, संशोधन, कला-क्रीडा वगैरे क्षेत्रांत भारतीय क्षमतेचा प्रभाव वाढत चालला आहे. गेल्या एक-दीड वर्षांत केंद्र व राज्यस्तरावर सत्तांतर झाल्यानंतर एकूणच आपल्या सांस्कृतिक संपन्नतेलाही सन्मान्य आदराचे स्थान मिळत असल्याचा आनंद जनतेला लाभत आहे. भारताची लोकसंख्या जगात वरच्या क्रमांकावर असल्याने त्याचे `मनुष्यबळा'त रूपांतर होणे जगालाही आता अपेक्षित आहे. अर्थातच त्यासाठी उगवत्या पिढीचे शिक्षण, ही बाब फार महत्त्वाची ठरणार आहे.
महाराष्ट्नच्या शिक्षणक्षेत्रात त्या दृष्टीने जे बदल होणे आवश्यक आहेत त्यांविषयी सर्वत्र चर्चा होत असते. शाळा-महाविद्यालयांशी संबंधित असणारे सर्वच घटक ती चर्चा उत्सुकतेने ऐकत-वाचत असतात. तथापि या क्षेत्रातून निवृत्त झालेला, अनुभवांतून काही चिंतन केलेला, व त्याआधारे येत्या काळाचा वेध घेऊ शकणारा असा एक मोठा विचार-गट, आपली मत-मतान्तरे एकत्रित मांडू शकला तर ते उचित दिशादर्शन ठरेल यात वाद नाही. म्हणूनच पंडित विष्णू दिगंबर पलूसकर बहुउद्देशीय शिक्षणसंस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षातील, `शिक्षणविचार' या पुस्तकाचा उपक्रम मला स्वागतार्ह वाटतो. शिक्षणसंस्था जर या प्रकारे शिक्षण-विचारांचे प्रकटन करू शकल्या तर तो अभिनव व उपयुक्त प्रयोग ठरेल. शिक्षणविश्वातील सर्व घटकांना या पुस्तकांतून खूप काही मिळेल व त्यातून शासनाच्या शैक्षणिक धोरणांस बळकटीच मिळेल, असा विश्वास वाटतो.

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्...

Thoughts of Shivajirao Bhosale

२९ जून : २ रा स्मृतिदिन शिक्षण हे जीवनाचे संस्करण       पुणे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी व्यक्त केलेले विचार. या चिंतनाचे, त्यावेळचे दै.तरुण भारतचे मुख्य उपसंपादक विद्याधर ताठे यांनी केलेले संकलन - (संक्षिप्त) आजचा बुद्धिमान विद्यार्थी पूर्वीच्या बुद्धिमान विद्यार्थ्यापेक्षा अधिक जाणता झाला आहे. त्याला जाता-जाता आणि पाहता-पाहता बरेच काही कळू शकते एवढी अनुकूलता निर्माण झाली आहे.  हा सगळा या पिढीच्या भाग्याचा भाग आहे. पण एक भयावह गोष्ट या पिढीच्या वाट्याला आली आहे - भविष्याची अनिश्चिती. ही नको त्या वयात विद्यार्थ्यांच्या वाट्याला आली आहे. एक प्रकारची अस्वस्थता मनात घर करून राहिली आहे. कितीही शिकले तरी पुढे काय या प्रश्नाला नेमके उत्तर नाही. नोकरी मिळेल याची खात्री नाही. व्यवसाय साधेल असा विश्वास नाही. शहरात जागा मिळत नाही, खेड्यात चित्त रमत नाही. घरात प्रेम मिळत नाही, समाजात सुख लाभत नाही. काय करावे ते कळत नाही. पण काहीतरी केल्याशिवाय राहवत नाही.  उभ्या राष्ट्नला एकच एक ब्रीद नसल्यामुळे आणि समाजाल...