Skip to main content

20 July 2015

ज्ञानदेवे रचिला पाया
तुका झालासे कळस
भौतिक विकास आणि विज्ञानाची प्रगती होत असतानाही आज मानव समाज समाधानी व सुरक्षित वाटत नाही. त्याचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी वैश्विक मानवता जागी केली पाहिजे. ज्ञानाचा बोध व विज्ञानाचा शोध ह्याचा वापर सामान्य जनतेच्या हितासाठी झाला पाहिजे. जीवनप्रवाहात किंवा भवसागरात भरकट चाललेली नाव संतांच्या जीवनरूपी दीपस्तंभाकडे पाहून पार करता येईल. कारण त्यांच्या जीवनदर्शनात वैयक्तिक साधना आणि सामाजिक धारणा या दोन्हींचा समन्वय दिसतो.
महाराष्ट्न् ही अशा संतांची भूमी आहे. भागवत धर्माचा प्रसार आणि वारकरी संप्रदाय निर्मिती या संतांमुळे झाली.
जया भक्तीची येतुली प्राप्ती
जे कैवल्याते परौते सर म्हणती,
जयाचिये लीलेमाजी नीति
जियाली दिसे
वारकरी पंथात भक्ती हे मोक्षाचे आणि आत्मसुखाचे साधन मानले आहे. (त्याला पंचम पुरुषार्थही म्हणतात.) वारकरी पंथाने भक्तीतत्वाचे मोठेपण स्वीकारले पण भक्तीच्या कर्मकांडाला महत्त्व दिले नाही. भक्ती ही वैयक्तिक स्वरूपात न राहता सार्वजनिक स्वरूपात अस्वीकृत होते, तेव्हाच वारकरी संकल्पना दृढ होते. नामसंकीर्तन प्रसाराबरोबरच अंत:शुद्धी, कर्तव्यनिष्ठा, भूतदया, क्षमाशीलता, अनासक्ती इत्यादी दैवी गुणांची जोपासना संतांनी केली. कर्मठपणाचे बंड मोडले पण कर्मप्रवृत्तीचा नाश केला नाही. मनुष्याचा मोठेपणा त्याच्या सामाजिक प्रतिष्ठेवर नसून वैयक्तिक चारित्र्यावर आहे, ही गोष्ट पुन्हा पुन्हा सांगून चारित्र्यसंपन्न समाजनिर्मिती केली. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भक्ती आणि नीति यांचा समन्वय म्हणजेच भागवतधर्म. वाचेने देवाचे नाव घ्यावे, देहाने देवाच्या गावा जावे, आणि मनाने सदोदित देवाजवळ राहावे, असा देह, मन, वाणीचा त्रिवेणी संगम म्हणजे वारी.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी भक्तिमंदिराचा पाया घातला आणि नामदेवरायांनी पंजाबपर्यंत विठ्ठलभक्तीचा ध्वज मिरवत त्या मंदिराचा विस्तार केला. ज्ञानदेव हे भक्तीमार्गाचे `प्रवर्तक' तर नामदेव हे त्या पंथाचे `प्रवर्धक'. नामदेवांनी आपल्या पांडुरंग भक्तीला मातृभक्तीचे अधिष्ठान दिले.
`तू माझी माऊली, मी वो तुझा तान्हा
पाजी प्रेमपान्हा पांडुरंगे'
असे म्हणत ते विठाई माऊलीचे लाडके बाळ बनले आणि `योगीया दुर्लभ असलेले, ध्यानालाही न आतुडणारे' अगम्य परतत्व, नामदेवरायांच्या आर्त भावनेने पराजित केले आणि आपला सारा मोठेपणा विसरून आई बनून ते या भक्ताकडे वेगाने झेपावले. इतकी ती सुंदर वत्सल कल्पना आहे. ज्ञानदेव व नामदेवांनी विठ्ठलाला माऊलीपण दिले. ज्ञानभक्तीच्या समचरणावर उभी राहिलेली विठाई माऊली साऱ्या श्रांत जीवांना माऊलीपण देत राहिली.
तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल
देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल ।
असे म्हणत नामदेवरायांचे साधनही विठ्ठल, आणि साध्यही विठ्ठलच झाले. ज्ञानियांचे ज्ञेय, ध्यानियांचे ध्येय, जपकांचे जाप्य तर योगियांचे गौप्य पंढरपुरी नामदेवांनी सगुण आणले आणि विठ्ठल नामातून `नामवेदा'चे प्रवर्तन केले. नामदेवांप्रमाणे ज्ञानेश्वर, एकनाथ यांनीही विठ्ठलाला माऊली स्वरूपात पाहिले आणि पंढरीला माहेर मानले.
जाईन गे माये तया पंढरपुरा,
भेटेन माहेरा जीवीचिया ।
असे ज्ञानदेव म्हणत. अवघाची संसार सुखाचा करण्याचा आत्मविश्वास त्यानी वारकऱ्यांच्या मनात निर्माण केला. एकनाथ यांनीही `माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी' असे म्हटले आहे.
आध्यात्मिक पातळीवर माहेर ही संकल्पना अशी की, ज्याच्यापासून विलग झालो त्याच्याशी पुन्हा एकरूप होण्याची धडपड चालू ठेवणे. म्हणजे आत्मा आणि परमात्मा यांचे एकरूप होण्यासाठी प्रयत्न करणे. चैतन्याच्या सागरात (परमात्म्यात) थेंबुटा (आत्मा) मिसळणे. (थेंबुटा सागरी मिळाला) अशी अवस्था अनुभवणे. (लग्नानंतर स्त्रीने स्वत:चे घर सोडून पतीच्या घरी नवे आयुष्य सुरू करणे. यामुळे ताटातूट झाल्याची भावना माहेर या कल्पनेतच आहे. जे लौकिक जीवनात गमावले ते मनाच्या कोपऱ्यात कल्पेच्या पातळीवर पुनरुज्जीवित करून हळवेपणाने जपण्याची वृत्ती त्यामागे आहे.)
`अमृताची धार तैसे उजू अंतर' या ज्ञानेश्वरांच्या वर्णनाचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे एकनाथ महाराज. नाथांच्या जीवनात वैदिक परंपरेतील तत्त्वदर्शन, वारकरी पंथातील अभेद भक्तीचा जिव्हाळा, आणि दत्तसंप्रदायातील आचारशीलता यांचा त्रिवेणी संगम नाथांचा जीवनक्रम ज्ञानदेवांच्या अद्वैतनिष्ठ कर्मप्रधान भक्तीयोगाचा वस्तुपाठच होता. नाथांचे कीर्तन, निरूपण ऐकताना लोक स्वत:ला विसरतच पण जगालाही विसरून परमात्म्याशी तादात्म्य पावत. नाथांनी भारूड या लोककलेच्या माध्यमातून गहन तत्त्वज्ञान सामान्यांनाही समजेल अशा रंजक स्वरूपात सांगितले.
आत्मोद्धाराच्या वैयक्तिक साधनेला लोककल्याणाची सामाजिक साधना जोडणारे, अनुभूती आणि सहानुभूती यांचा सुरेख संगम साधणारे वर्तन सगळयाच संतांमध्ये दिसून येते. त्यांनी आपल्या साहित्यातून विटेवरच्या सावळया मूर्तीतून चैतन्याचे मळे फुलवले आणि त्या सुगंधाने मराठी मनाचे गाभारे दरवळून गेले.
संतश्रेष्ठ ज्ञानोबारायांनी पाया घातलेल्या भक्तीमंदिरावर संत तुकोबारायांनी आपल्या अभंगवाणीने कळस चढवला. त्यांनी आध्यात्मिक मानवधर्माचे तत्त्वज्ञान अत्यंत साध्या-सोप्या भाषेत सर्वसामान्यांना शिकवले.
भूतांची दया हे भांडवल संता
आणिक ममता नाही देही
यात देहाची आसक्ती नसणे आणि प्राणीमात्रांवर दया, प्रेम करणे या संतांच्या दोन कसोट्या सांगितल्या आहेत. संतांचा अवतारच  `जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह झिजविती उपकारे' यासाठी आहे. `तुका म्हणे तोचि संत, सोशी जगाचे आघात' त्यांच्या जीवनदर्शनाचे सार
विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म ।
भेदाभेद भ्रम अमंगळ ।
कोणाही जीवाचा न घडो मत्सर,
वर्म सर्वेश्वर पूजनाचे ।
सर्व प्राणीमात्रात ईश्वराला पाहणे हीच मोक्षसाधना आहे असा पुरोगामी मानवधर्म तुकाराम महाराजांनी शिकवला. त्यांचा आध्यात्मिक समाजवाद `जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले' यात दिसून येतो. साधा प्रापंचिक मनुष्यही सदाचाराने आणि ईश्वरभक्तीने योगी होऊ शकतो हे `जोडोनिया धन उत्तम वेव्हारे, उदास विचारे वेच करी' या शब्दात त्यांनी सांगितले. भगवंत भेदाभेद करत नाही, अठरापगड जातीचे त्याचे भक्त असून तो सर्वांना सारखेच प्रेमाने कसे वागवतो हे त्यांनी वर्णन केले आहे -
चर्मरंगू लागे रोहिदासा संगे
कबीराचे मागे विणी शेले ।
सजन कसाया विकू लागे मास,
माळया सावत्यास खुरपू लागे ।
नरहरी सोनारा घडू फुंकू लागे,
चोखामेळयासंगे ढोरे ओढी ।
नामयाचि जनी सवे वेची शेणी,
धर्माघरी पाणी वाहे झाडी ।
नाम्यासवे जेवी नव्हे संकोचित,
ज्ञानियाची भिंत अंगे ओढी ।
अर्जुनाचे रथी होय हा सारथी ,
भक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे ।
दासीपुत्र कण्या विदुराच्या भक्षी,
दैत्याघरी रक्षी प्रल्हादासी ।
घडी माती वाहे गोऱ्या कुंभाराची,
हुंडी मेहत्याची अंगे भरी ।
पुंडलिकासाठी अजुनि विठ्ठल,
तुका म्हणे मात धन्य त्याची ।
तुकाराम महाराजांचे जीवनदर्शन म्हणजे आध्यात्मिक आणि सामाजिक प्रपंच व परमार्थ, दिव्यता व मानवता यांची समता आहे. त्यांची अभंगवाणी संपूर्ण मानवसमाजाची बंधुता, समता आणि शांतता टिकवण्यासाठी प्रेरक ठरणारी आहे. `न लगे मुक्ती धन संपदा, संतसंग देई सदा' आणि `तुझा विसर न व्हावा, हेचि दान देगा देवा' असे त्यांनी परमेश्वराला विनवले. हीच प्रार्थना प्रबोधिनी एकादशीला सर्वांनी करावी यापरते औचित्य कोणते?
- सुधा आपटे(आजी)(वय ९४)
`राधाई' किल्ला भाग, मिरज
फोन -(द्वारा : मनीषा ९५६१२६६५४०)


Sampadkiya
माणसाला शांत सौम्य आरामी जीवन मनापासून हवेच असते. तसे ते लाभावे यासाठी त्याची  तळमळ तगमग धावपळ सतत चालू असते. शांत जीवन जेवढे त्यास आकर्षित करीत असते तितके काही त्यात रमून जाणे आवडत नाही. निसर्गसान्निध्यात, वृक्षवेली व वनचरे यांस सोयरे बनवून, मनासी संवाद करत बसणे माणसाला मनापासून सतत आवडत असते, तर ते आजच्या काळातही फार कठीण नाही. पण तसे निर्मनुष्यत्त्वात राहण्यास माणसे तयार होत नाहीत; कारण त्यांना दगदग-धावपळ-संघर्ष यांचीही ओढ असावी.
समाज एकत्र आणू पाहणाऱ्या गणेशोत्सवाला आणि स्त्रीपुरुषांच्या कलात्मक रसिकतेचे पदन्यास अनुभवणाऱ्या नवरात्रीला, सामाजिक विघटनाचे आणि उडाणटप्पू धिंगाण्याचे ग्रहण लागेल असा संभव दिसू लागला आहे. भारताच्या सार्वभौम अशा न्याय व प्रशासन यंत्रणेलाच धाब्यावर बसवू पाहणारी झुंडशाही आक्रमक होत आहे. कायदा-नियम यांचीच ऐशीतैशी करणारे राज्यकर्तेही लोकेच्छेच्या आवरणाखाली गुंड-झुंडीचा अनुनय करू पाहात आहेत. यातून ते काय साध्य करत आहेत?
व्यक्ती पुष्कळदा स्वार्थ अनुसरून तात्कालिक हित पाहते. पण समूहाचे नेतृत्व करणाऱ्यांनी दीर्घ काळाचा विचार करून लोकहित कशात आहे हे ठरवायचे असते. नेते-राज्यकर्ते यांचे तेच तर काम असते. याउलट तात्कालिक स्वार्थासाठी साऱ्या समाजाच्या भविष्यकालीन हिताला जे दूर ढकलतात, त्यांना नेते तरी का आणि कशाला म्हणायचे?
फूटपाथ आणि रस्ते अडवणारे  मंडप, कर्कश कानठळयांचे ढोल.... वगैरेत ज्यांची परंपरा व संस्कृती गुंतली आहे अशांचे प्राबल्य सध्या आहे हे खरे; पण सार्वत्रिक सार्वकालिक सर्वहित कशात आहे हेही वेगळे कुणी सांगा-शिकवायला नको. ते ठरविणारे काही विज्ञान आहे - काही शास्त्र आहे - काही तज्ज्ञ आहेत. त्या सर्वांस झुगारून देणाऱ्यांपुढे किती-कुठवर मान तुकवायची याचा न्याय न्यायासनालाच करावा लागेल असे दिसू लागले आहे. एरवी न्यायालय आणि विधिमंडळ यांतील श्रेष्ठतेवरून अहंगंड आणि वितंडवाद करणे सोपे असते; पण विधिमंडळातील प्रतिनिधी जर उघडउघड समाजहिताच्या विरोधात वागत असतील तर खऱ्या हितैषींना न्यायासनाची दारे ठोठावावी लागणारच. तसे न घडो, पण उद्याची भीती अशी की, न्यायालयांनी ज्या आधारे `न्याय' ठरवायचा ते विधिनियमच हे अरेराव बदलतील. कुणी सांगावे; उद्या मोठमोठे गणपती रस्त्यांतच बसवावेत आणि किमान बारा पेटाऱ्यांचे डॉल्बी हवेत असा कायदाच होऊ शकेल. कारण इथे शांतता अधिकांश लोकांना नकोच आहे हा त्यांचा दावाही अगदीच चुकीचा नाही.
शहरात तरूण पोरीटोरीसुद्धा ढोलपथक बडवत जातात, त्याचे सार्वत्रिक आकर्षण आहेच आहे! ही माणसे सजावट, प्रसाद, पोशाख, झगमगाट यांच्यासह रस्त्यात घुमतात ती कुणी अविचारी - बेदरकार मानावीत अशा वर्गातील नाहीत. एरवी शिस्त-पर्यावरण-संस्कृती-सद्भाव वगैरेबद्दल लांबलचक बाता तोंडपाठ असणारी भल्या घरची माणसेही त्यात सामील असतात. त्यांना चूक-बरोबर काय, हे कळत नसेल? ते कळत असूनही अधिकांश लोक जर चूकच वागण्याचे समर्थन व आग्रह करत असतील तर त्यास लोकशाही म्हणत नाहीत. नाइलाजाने बहुजनांच्या चुकीचा अन्याय अल्प जनांस सोसावा लागत असेल तर असले अ-लोकशाही प्रशासन न्यायासनाने आवरावे अशीच अपेक्षा असणार.
कुणीतरी गणंगाने उठावे आणि `धर्म काय तो आमच्याच हाती सुरक्षित' असा बाष्कळ थयथयाट करावा इतका धार्मिक उत्तानपणा सगळया धर्मातील मार्तंडांनी चालविला आहे. वारीतील गैरप्रकार चालू ठेवण्यास न्यायासनाने ठाम विरोध केला, तेव्हाही वारकरी परंपरेचा बागुलबुवा पुढे येऊ लागला. ज्यांना या असल्या थयथयाटी झुंडपरंपरेचा त्रास होतो, तेही कुणी परग्रहावरून आलेले अधार्मिक पाखंडी नव्हते. धर्माच्या नावाखाली अनाचार करणाऱ्या मंबाजीने तुकारामाला पाखंडी ठरविले होते. `पाप ते परपीडा' हे तर संतांनी सांगितले. पण तसल्या बब्रुवाहन धर्मवीरांनी मंबाजीची परंपरा सांभाळून, प्रशासन व न्यायासन यांना तेच पाखंडी ठरवीत आहेत.
हाच परपीडनाचा धर्म, या भूमीत सांभाळून ठेवून त्यास जर सरकारही नमणार असेल तर हे सरकार दूर करायला हवे. किंवा मग असल्या धर्मनिर्णयात आपल्याला स्थान नाही असा सरळ सभ्य लोकांनी समजून घेऊन `असल्या' धर्मापासून दूर अंतरच ठेवायला हवे.
राजस्थान सरकारने रस्ते व सामुदायिक सोयींसाठी काही अतिक्रमणे दूर करू पाहिली तर विश्वहिंदू परिषदेने त्याविरुद्ध दंगा सुरू केला. याच देशातील कित्येक,- वास्तविक बहुसंख्य - हिंदूंना अतिक्रमण करणारी देवळे नको असून, नेटस देवस्थाने हवी आहेत. माणसामाणसात एकत्त्व साधत असेल तर तिथे स्वाभाविक देवत्त्व नांदत असते. इथल्या गोंगाटाने आणि उध्वस्त समाजव्यवस्थेने इतका संघर्ष उभा राहात असेल तर तिथे देवही नाही आणि धर्मही नाही. इतर धर्मीयांना अशी परवानगी नाईलाजाने किंवा स्वार्थासाठी किंवा मुकाट्याने दिली जाते हे खरे आहे, पण त्यावर बंदी आणण्यासाठी योग्य ते कायदेशीर इलाज केले पाहिजेत. ते करण्याऐवजी असले धर्मभांडूू लोक आपणही त्याच अयोग्य मार्गावर चालत आहेत आणि त्यास धर्ममार्ग असे म्हणू लागले आहेत. असली धार्मिक बरोबरी करणे हाच अधर्म नव्हे काय? परंपरा कोणताही असली आणि कशीही असली तरी ती चालू काळाला सुसंगत नसेल तर मोडली पाहिजे. आपण मानू तो धर्म आणि पाडू ती रूढी असे असेल तरच तो समाज संपन्न मानायचा. शिराळयातील नागपंचमी नागांच्याच जीवावर उठते म्हणून आज ही परंपरा घातक आहे. पण त्या परंपरेतून, त्या भागातील पर्यटनातून अर्थव्यवहार खेळत असतो त्यासाठी सगळी पुढारी माणसेही, परंपरेच्या आणि धर्माच्या आड लपून समाज विस्कळीत करत आहेत हे प्रत्येक धर्मप्रेमी व्यक्तीने समजून घेतले पाहिजे.
एकीकडे धर्मनिरपेक्षता तोंडाने बोलायची आणि दुसरीकडे असल्या अधार्मिक परंपरांचे आणि कालबाह्य पद्धतींचे विकृत स्वरूप माजवून तोच धर्म सर्वांवर गाजवत सुटायचा हे प्रशासनाने आणि न्यायव्यवस्थेने चालू देऊ नये. त्यावर सामंजस्याने पर्याय शोधून या रूढी हळूहळू बदलल्या पाहिजेत, असा निश्चय लोकांनीही केला पाहिजे. एकीकडे अनारोग्याची काळजी व्यक्त करायची आणि दुसरीकडे त्याच अनारोग्यकारक दिंडीत आपण चालत राहायचे हा आजचा धर्म नाही.


विस्तारत गेलेली त्रिज्या - रेडियसचे प्रयोग
ही कथा १९६४ सालातली. महात्मा गांधींनी सत्याचे प्रयोग केले त्याची आठवण करून आम्ही आमच्या प्रयोगास रेडियसचे प्रयोग असे नाव दिले. पश्चिम महाराष्ट्नतल्या घरापासून इकडे दूर बिहारात आल्यानंतर आपल्या भाषेतला शब्द जरी कानावर पडला तरी कानाजवळून मोरपीस फिरवल्यासारखं वाटायचं. मराठी शब्दासाठी कान टवकारलेले असायचे. मराठी शब्द उच्चारणाऱ्यांच्या ओळखी करून घेण्यासाठी धडपड सुरू व्हायची. त्यात किती यश मिळाले हा भाग वेगळा, पण त्या परमुलुखात आम्हा सडेफटिंग लोकांचा मोकळा वेळ चांगला जायचा.
साध्या साध्या ओळखीतून गहिरे संबंध प्रस्थापित करण्यासाठी काहीजण टपून असायचे. अगदी आपल्या गावातला नसला तरी, गावाकडला कुणीतरी भेटला की आनंद होत असे. दोघांचेही नातेवाईक किंवा कुणीतरी ओळखीपाळखीचा त्रयस्थ गप्पांमधून सापडायचा आणि मग धागेदोरे सांधले जायचे. दोघांच्या ओळखीचा कुणीतरी तिसरा माणूस गावाकडे निघाला तर तो एक मोठा पूल मिळायचा. एकंदरीत अशा फटिंगपणाचे क्षेत्र विस्तारत जायचे. तरीही प्रत्येकाच्या विस्तारत्या वर्तुळाला त्रिज्येची मर्यादा होतीच, ती आमची रेडियस. खंुंटीला दोरी गुंडाळलेल्या शेळीसारखी आमची अवस्था होती. ओळखी ओळखीने एकेक वेढा उलगडायचा आणि नवीन नवीन कुरण मोकळे फिरण्यासाठी वाढत जायचे.
मी तसा एक भला माणूस. लहानपणापासून कुणाच्या ना अध्यात ना मध्यात. पण या दूर मुलुखात एकेक गोष्ट शिकावी लागत होती. त्यातून सवय लागते असे म्हणतात. अशी त्रिज्या वाढवण्याची उपयुक्तता मला पटू लागली होती.
बिहारमधील रांची पादाक्रांत झाल्यावर जमशेदपुरात आमचा बिस्तारा पडला. आणि आमचे रेडियसचे प्रयोग कसाला लागले. जमशेदपुरात पाऊल टाकताना कोणाचेही ओळखपत्र घेतले नव्हते. अशी सेकंडहॅन्ड रेडियस मला चालणार नव्हती. जमशेदपुरात पहिल्यांदा महाराष्ट्न् मंडळात एक चक्कर टाकली. पण तिथे सगळे एकाच मराठी माळेचे मणी! एखादा कार्यक्रम तिथे होईल म्हणून वाट पाहिली. महाराष्ट्न् दिन जवळ होता. कोणत्याही अडचणीला न जुमानता मी त्या कार्यक्रमात जिद्दीने उपस्थित राहून शोभा आणली. चेहेरे न्याहाळण्याचे काम सुरू ठेवले. डोळे थकले तरी मराठी मातीत रुळलेले इच्छित सावज मिळेना. कार्यक्रम संपताना महाराष्ट्न् गीताच्या निमित्ताने घसा मोकळा केला आणि क्ष ही व्यक्ती जरा ओळखीची वाटली. जवळ जाऊन थोडेसे `हॅ% हॅ' केल्यावर त्यांनाही ओळख पटली. मी दर्शविलेल्या जिव्हाळयाने ते गार झाले आणि रविवार सकाळचे बोलावणे घेऊनच मी प्रथमभेट संपवली.
चकचकीत उन्हातून वसंत ऋतू हसत असताना रस्ता झपाझप मागे टाकत मी त्यांचे घर जवळ केले. त्यांच्या फाटकातच गाठ पडली. ते बाहेर पडण्याच्याच तयारीत होते. तोंडभर हसून उद्गारले, ``बरं झालं, वेळेवर आलात. अहो मी विसरतच होतो.... बरं कसं काय वाटलं आमचं जमशेदपूर?'' एवढ्या प्रश्नावर मी माझी पावलं त्यांच्या घरात ढकलली. गुलाबांचा हलता ताटवा असावा तशा बऱ्याच छोट्या छोट्या मुली किलबिलत होत्या. त्या अंगणातील खुर्च्या आम्ही बैठक मारून सुशोभित केल्या. विद्यार्थिनी मंडळाचा गायनवर्ग आत चालू होता. जी चिमखडी नात त्यांना येऊन बिलगली तिचे पूर्ण नाव विचारून मी रेडियस वाढवू लागलो. खिशात काहीही खाऊ नसला तरी पुढच्या वेळी तो आणण्याचे आश्वासन मी देऊन टाकले. गावाकडच्या गप्पा काढल्या. इतकी वर्षे इथे राहण्याच्या त्यांच्या धाडसाचे कौतुक केले. इथल्या अडचणींबद्दल सहानुभूती व्यक्त केली. इथल्या गडबडीत चहा न टाकण्याची विनंती करून मी थंड पाण्याचा घोट रिचवत बाहेर पडलो. पुन्हा पुन्हा परत येण्याचा आग्रह करीत ते फाटकापर्यंत आले. त्यांच्याकडून `य' गृहस्थांचा पत्ता घेतला.
त्यांच्या निमंत्रणाप्रमाणे बुधवारी संध्याकाळी त्यांच्या घरी टपकलो. घरी श्रीमान नव्हतेच. श्रीमतीजींनी `थोडा ठहरीये' असे म्हणून थांबविले. श्रीमान क्लबातून लवकर येण्याची चिन्हे नाहीत. अर्धापाऊण तास तग धरला पण यजमान खट भेटला. पुन्हा दोनतीन दिवसांनी तिथे गेलो तेव्हा हास्यविनोदाचे फवारे घरातून कानावर आले. बहुधा त्यांनी बुधवारचा अख्खा क्लब त्यांच्या घरीच आणला होता. त्यातही माझी ओझरती विचारपूस झाली पण हातातल्या पत्त्यांवरून नजर ढळेना. थोड्या वेळाने `मी येतो' असे म्हणून उठलो. त्यांचे लक्ष जरासुद्धा ढळले नाही. बहुधा त्या दिवशीच्या रमीत त्यांचे लकसुद्धा चांगलेच लागले असावे.
- गणेश दिगंबर आपटे,
गुरुवैभव सहनिवास, पौड रोड, पुणे ३८ (मोबा.८८२०१२६८५४)

आठवांचे साठव
तिच्या जाण्यातही सहजता
२० नोव्हेंबर १९९९च्या त्या सकाळी नेहमीप्रमाणं आवराआवर चालवली होती. ग्राहकपंचायतीच्या कामाच्या निमित्तानं मी दुपारी चारच्या रेल्वेनं जळगावला जाणार होतो. तिकीट काढलेलं होतं. सकाळी साडेआठच्या सुमारास आमची आई, म्हणजे सर्वांची ताई अस्वस्थ असल्याचं दिसून आलं. इकडं मुख्य घरात सोप्यावरच्या कॉटवर ती झोपायची. मी पाहिलं तर तिथल्या पश्चिम भिंतीतल्या कपाटाशी ती हात फिरवत उठू पाहात होती. श्वास रोधल्यागत करत होती. प्रकरण जरा गंभीर वाटलं. सुतार डॉक्टरना बोलावलं, ते म्हणाले की `पलूसला मराठे डॉक्टरना दाखवूया. परंतु आज परगावी जाऊ नका.' मराठेही आले आणि त्यानी सांगलीला नेण्याचा सल्ला दिला. एव्हाना ११ वाजत आले.
जरा धावपळ झालीच. पुतण्या देवदत्त घरातच होता. तो, मी, वहिनी अशांनी तयारी केली. रुग्णवाहिका वाडीच्या दवाखान्याची होती, तीतून सांगलीला निघालो. गणपतीच्या देवळाजवळ डॉ.चारुचंद्र भिडे यांचा दवाखाना. ताईचा मावसभाऊ भालचंद्र भिडे यांचा हा डॉक्टर मुलगा, पण अलीकडं या मातुल घराण्याशी तसा फार संबंध टिकलेला नव्हता.
गाडी दवाखान्याच्या दाराशी थांबली. कुणाचा दवाखाना ते ताईनं विचारलं; आणि तिला सांगितल्यावर, ``चला, या निमित्तानं माहेरीच आलो म्हणायचं!!'' असं ती उद्गारली. तिला स्ट्न्ेचरवर न घालता देवदत्तानं दोहो हातांची पालखी करून उचललं, आणि दवाखान्यात आतल्या टेबलावर नेऊन झोपवलं. डॉक्टर आलेच. आम्ही खोलीबाहेर येऊन थांबलो. पाचसात मिनिटं गेली आणि डॉक्टर बाहेर आले. त्यांनी म्हटलं,``हृदयाचे ठोके पेसमेकरमुळं चालू होते. पण त्या शक्तीवर शरीर काम करत नाही. एरवी हृदय बंद झालेलंच होतं.'' ताई गेली. चारू सांगलीत शिकत होता, त्याला कळवलं. तो दोनतीन मित्रांसह आला. ग्राहक पंचायतीमुळं सवंगडी झालेले किशोर लुल्ला, तेलंग, भास्कर मोहिते धावत आले. शरद-सुरेश ही चुलत भावंडं आली. कुणी नगरपालिकेतून मृत्यूपास आणला. तरीही काही काळ `थांबावं' लागलं.
मी डॉक्टरना विनंती करून ताईचा छातीशी बसवलेला `पेसमेकर' काढून घेण्यास सांगितले. संसर्गशक्यता किंवा तत्सम अनेक कारणांनी ते साधन दुसऱ्याला बसवत नाहीत, असं डॉक्टर म्हणाले. तसे संसर्ग होऊ नये इतपत स्वच्छ करून घ्यावं, आणि कोणा रुग्णास पैशाअभावी ते साधन विकत घेताच येणार नाही; व त्या कारणे त्यास केवळ मरणाचाच पर्याय राहिला असेल, त्यास हे मूल्यवान साधन मोफत द्यावं! तो हृदयदुर्बलतेनं मरणार नाही; संसर्गाची शक्यता खूपच कमी! - मग पेसमेकर काढून घेण्याचं ठरलं.
नेत्रदानाचा फॉर्म ताईने भरलेला नव्हता, त्याची तशी आवश्यकता नव्हती. मी शेखर परांजपे डॉक्टरना फोन केला, डोळे घेऊन जा. त्या दिवशी शनिवार-सांगलीचा आठवडी बाजार होता. दवाखान्याभोवती ही% गर्दी. त्यातून वाट काढत येण्यास डॉक्टरना वेळ लागला. पण तेही `दान' झालं.
इतका वेळ या स्थितीत थांबणं सर्वांनाच अवघडल्यासारखं होत असतं. पन्नास एक पावलांवर एक टपरीहॉटेल होतं, तिथून मी सर्वांसाठी कॉफी आणवली. त्या स्थितीत ते वेगळं  - खरं तर गरजेचं होतं. हे सर्व आवरण्यात फार तर दोन तास गेले, आणि २ ।।-३ वाजता आम्ही सांगलीतल्या नदीघाटावर गेलो, ५ ।। वाजता घरी वाडीला पोचलो. सकाळपासून काही तास ताईचं आजारपण, १२ वाजता रुग्णालयात, २ ।। वाजता अंत्यविधी आणि संध्याकाळी आम्ही घरी परत. ताईचा शेवट इतका झटपट; तिच्याच भाषेत सांगायचं तर, `उगीच कुठं गर्गशा न करता' होऊन गेला. शेजाऱ्यापाजाऱ्यांनासुद्धा ताई कधी कशी गेली त्याचा पत्ता नाही. कुंपणापलीकडच्या जोशी डॉक्टरीणबाई `ताई आहेत का?' असं म्हणत रोजच्यासारख्या गप्पा मारायला आल्या; तेव्हा त्यांना ही बातमी कळून धक्काच बसला! कुणी कुणी म्हणालं, ``इथं घरी कसं आणलं नाहीत?'' - कशाला आणावं? आणून पुढं काय करायचं होतं? जे करायचं होतं तेच केलं ना! आमचे व्यवहार घटकेत सुरू झाले.
ही जीवनविज्ञानाची निष्ठा ताईनं जपली होती, नकळत ती मी तरी अनुसरत असेन. ताईला विसरता येणार नाही. व्यक्ती जाते, विचार शाश्वत राहतात! पुढं कधीतरी, केव्हातरी `आई म्हणूनी कोणी सोडी न जीव हेका...' अशी अवस्था, इतकंच! मुक्या मनातून शब्दांचे बुडबुडे!!
- वसंत आपटे, `वाल्मिकी' किर्लोस्करवाडी ४१६३०८

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन