Skip to main content

13 July 2015

सामुदायिकतेचा कायदा करावा
महंमद युनूस या बांगलादेशी अर्थतज्ज्ञाने सूक्ष्म आर्थिक व्यवहारांच्या तत्वावर प्रचंड मोठ्या बँकेची उभारणी केली. मायक्रो फायनान्सिंग या नावाने ती अभिनव कल्पना प्रत्यक्षात आली. भारताने त्याचा अंगिकार केला. खेड्यांपर्यंत काम करू लागलेले बचतगट हे त्याचेच एक रूप आहे. पंतप्रधान मोदींची जनधन योजना यशस्वी होईल, कारण अशा छोट्या छोट्या थेंबांनी तळे साचू शकते. अर्थातच त्या तळयातील साठ्याचा लाभही छोट्या थेंबकऱ्यांना तितका मिळायला हवा अशी काळजी घेण्याची जबाबदारी असतेच. भाजीवाल्या-भांडीवाल्या बायांपासून सगळीकडे भिशी चालू असते. क्वचित कुठे एखादी लफंगेगिरी घडते, पण सहसा ही सर्व जबाबदारी नीट पार पाडली जाते असे चित्र दिसते.
बचतगटाची कार्यपद्धती अशी की १०-१५-२० जणांचा, किंवा जणींचा एक गट कोणत्याही कारणासाठी एकत्र येतो; त्यांना बँक कर्जरूपाने पैसे देते; त्याची परतफेड ही सामुदायिक जबाबदारी असते.  हा गट समजा काही खाद्यपदार्थ किंवा कपडे वगैरे तयार करत असेल तर ते उत्पादन करणे-विकणे-त्यातून होणारा फायदा.... हे सर्व त्या गटाचे एकत्रितपणे होते. त्यातील एका सदस्याने चुकारपणा केला तर ते कर्ज किंवा इतर कोणतीही जबाबदारी अन्य सदस्यांच्या बोकांडी बसते. एक हजाराचे कर्ज समजा असेल तर दहा जणींच्या `गटा'ला असते. एक कोणी चुकार भेटली तरी बाकीच्या नऊजणींस एक हजारच फेडावे लागतात. त्या चुकार सदस्याकडून वसूली करणे हे, कर्ज देणाऱ्यापेक्षा बाकी नऊजणांचेच काम ठरते. यामुळे ते नऊजण त्या चुकार व्यक्तीला ढिले सोडत नाहीत.
भारताला नव्या बदलांची चाहूल लागत आहे. आपल्या देशात निसर्गसंपत्ती, मनुष्यबळ, बुद्धिमत्ता, संधी सगळे काही असूनही आपण जगातल्या प्रगत देशांपैकी नाही. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे आपली सामुदायिकतेची अनास्था. सामुदायिक सहजीवनाचा अभाव. एकत्र वर्तणुकीतील थिल्लर बेजबाबदारी. अगदी प्राथमिक, साधी उदाहरणे अशी की आपण व्यक्तिगत स्वच्छ असतो पण एकत्रित गलिच्छ असतो. स्वत:च्या घरातला केर दिवसांत तीन वेळा काढून रस्त्यात फेकण्यास आपण माहीर आहोत. आंघोळ करून त्याचे सांडपाणी रस्त्यात सोडण्याला काही वाटत नाही. बिनतिकीट प्रवास करणार नाही पण रांग लावून गाडीत चढता येत नाही. व्यक्तिश: शांतीची ध्यानमुद्रा दाखवू पण सामुदायिक कानठळया उठवू.
दुसऱ्यांसमवेत सुखाने एकत्र नांदता येण्यासाठी स्वत: काही जबाबदारी घ्यावी लागते. समुदाय जर चुकला तर त्याचे प्रत्यक्ष नुकसान व्यक्तीला भोगावे लागते. हे व्यक्तिगत नुकसान होईल असे दिसले तर माणसे सामुदायिक शिस्त पाळतात, पण व्यक्तिगत स्वार्थ साधत असेल तर समुदायाचे हित झुगारून देतात. त्यामुळे भारताची प्रगती होण्याची काळजी असेल तर बचतगटाप्रमाणे त्या त्या समुदायावर नुकसानीची स्पष्ट जबाबदारी टाकणे हा एक प्रभावी पर्याय ठरेल.
प्रत्यक्ष कित्येकांनी अनुभवलेली एक घटना या संदर्भात नमूद करण्याजोगी आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी पश्चिम महाराष्ट्नतील नद्यांना महापूर आले होते. अचानक पाणी वाढू लागले आणि काठच्या गावांतून शिरले. नदीपात्रापासून दूर सुरक्षित जाण्यासाठी साऱ्यांची झुंबड उठली. होड्या-तराफे-काहिली... मिळेल त्याचा वापर सुरू झाला. त्यावेळी म्हातारी माणसे, गावातल्या मावशा-आज्या, शेळया-वासरे अशा कोणाही अनोळखी गरजूंना हात देत सगळी तरूण-कर्ती माणसं मदत करत होती. त्यात शाळा-कॉलेजला जाणाऱ्या तरुण मुलीही धीराने काम करत होत्या. एवढ्या मोठ्या संकटात सरकारी यंत्रणा पोचणेही शक्य नव्हते; तेव्हा प्रत्येकजण इतक्या जबाबदारीने वागला की एकाही जीवाला अपाय झाला नाही. कारण `गावाला' धोका होता, `व्यक्ती' शहाण्या होत्या. पूर ओसरल्यानंतर शासनाकडून त्या गावांत भरपाई वाटप सुरू झाले; ते घेण्यासाठी जी झुंबड उडाली त्यात चेंगराचेंगरी होऊन कित्येक जखमी झाले. कारण तिथे फायदा `व्यक्ती'चा होता, नुकसान `साऱ्यां'चे झाले.
आपल्याकडे अस्वच्छता, बेशिस्त वाहतूक, वीज-पाण्याचे भोंगळ वाटप, प्रदूषण इत्यादी समस्यांमुळे देश मागे पडतो. त्यावर उपाय म्हणून बचतगटांची ती धोरणात्मक पद्धत वापरण्याजोगी वाटते. जी गल्ली अस्वच्छ दिसते त्या गल्लीस सामुदायिक दंड बसवावा. निर्मलग्राम ठरवून ज्या `गावां'ना पूर्वी बक्षिसे दिली गेली, त्या गावांत आज कचऱ्याचे ढीग असतील तर त्याच गावातल्या प्रत्येक नागरिकाने दंड भरायला हवा. तशी पाळी येताच, निर्मलग्राम बक्षिस रकमेचे काय झाले, याचा जाबही नेत्यांना विचारला जाईल. वीज थकबाकी ज्या गावात आहे त्या `गावा'ची वीज तोडली गेली तर ज्यांनी पैसे थकवले, त्यांना जाब विचारला जाईल. तसेही आज करदात्यांच्या पैशातून दिवाळखोर गणंगाना सवलती-माफी देण्यात येतातच. पण त्याचा नफा-तोटा किंवा श्रेय-अपश्रेय `सरकार' नावाच्या सामुदायिक व्यवस्थेचे असते. त्याऐवजी तो तोटा व्यक्तीला प्रत्यक्ष सोसावा लागावा. गावातील एकूण बिल वसूल करावे. कुणा एकाच्या शंभर रुपयांसाठी गाव अंधारात ठेवावे. तसे केल्यास ते थकित पैसे बाकीचे गावकरी भरणार नाहीत, तर वसूल करतील. जिथे मोठे ध्वनिवर्धक असतात, त्या गल्लीस दंड करावा.
वास्तविक त्या एका दोषी व्यक्तीला रोखणे अधिक सोपे आहे. पण ते काम कुणा एकदोन पोलिसांकडून होत नाही. कारण तिथे गाव उदासीन असतो. त्यासाठी सगळयांची मदत व्हायला हवी असेल तर त्यातल्या प्रत्येकास नुकसानीचे भय वाटले पाहिजे. सध्या दोषी माणसे समुदायाच्या वरचढ ठरतात. त्याऐवजी दोषी व्यक्तीवर निर्दोष समुदायाचा वचक वाढेल. उदासीन नागरिकांना जागृत करून कृतिशील केले तर अफाट लोकसंख्या ही समस्या न राहता ते `मनुष्यबळ' होईल. कित्येक विधायक विचारांच्या देशप्रेमी संघटनासुद्धा उगीच मिरवणुका-मोर्चे-आरत्या-उत्सव अशा हुंबगिरीत अडकल्या आहेत. त्यांना या प्रकारे, सामुदायिक आचरण,-शिक्षेच्या किंवा नुकसानभयाने का असेना-सुधारता येईल. बालकसंघांपासून ज्येष्ठ-पेन्शनरांपर्यंत सर्वांना त्यात कुठे ना कुठे सहभाग घेता येईल. ज्या कार्यालयातील आवारात थुंकीच्या गलिच्छ पिचकाऱ्या दिसतील तेथील सर्व कर्मचाऱ्यांस त्या प्रत्येक वेळी किमान ५ रु. दंड केला तर थंुंकणाऱ्याला निश्चितच आळा बसेल.
या धोरणातून काही अडचणी, काही वाद निर्माण होतीलच. पण किमान शक्य तिथे हा प्रयोग करायला हवा. व्यक्तिगत स्वार्थासाठी सामुदायिक फाटाफूट हा आपल्याला शाप आहे. त्यातून बाहेर पडण्याचा अन्य काही मार्ग असेल तर उत्तमच. पण त्या शापामुळे आपण जगाशी स्पर्धा करू शकत नाही, हे तर खरे. आर्थिक लाभासाठी सामुदायिकीकरण करता येईलच, पण व्यक्तिगत आर्थिक नुकसानीसाठी सामुदायिकीकरण, हे बचतगटाचे सूत्र शक्य तिथे वापरता येईल का?



हे करून पहा....
सध्या दगडांच्या खाणी संपल्यामुळे डोंगरात खूप खबदाडी किडलेल्या दाढेप्रमाणे दिसतात. या खबदाडींमध्ये ओला कचरा, मलमूत्र यांचे विसर्जन, कुजण्याची प्रक्रिया होण्यासाठी रसायन इ. वापरून उत्तम सेंद्रिय खताची खाण इथे निर्माण करता येऊ शकेल. पाऊस या कुजण्याला मदत करेल.
मूल जन्माला आल्यावर त्याच्या मांडीवर शाईने आई-वडील-नाव इ.टॅटू करून घ्यावा. मुले पळवणे, अदलाबदल होणे या गोष्टींना पायबंद बसेल.
घरात बेकिंग मशीन असेल तर त्यामध्ये विविध धान्ये, कडधान्ये यांची बिस्किटे, केक्स बनवणे, गव्हाचे फुलके बनवणे यासाठी वापर करता येईल.
छोटे ग्रीन हाऊस तंबू गच्चीवर किंवा घराजवळ उभे करून घरापुरता भाजीपाला काढता येऊ शकेल.
बचत होणे, क्षमता वाढवणे यासाठी प्रत्येक मंत्रालयाने नवनव्या कल्पनांसाठी जिल्हा कार्यालयात एक पेटी ठेवावी. कित्येकदा सामान्य माणूससुद्धा उत्तम कल्पना देऊ शकतो.
- म. वि. कोल्हटकर, सातारा (फोन ०२१६२-२३६५०४)


वाढदिवस की घटदिवस
पूर्वीच्या काळी वडिलधाऱ्यांपुरताच मर्यादित, तोसुद्धा ६०, ७५, ८१, १०० अशा वयात वाढदिवस केला जात असे. हे टप्पे झुकत्या माणसाला तृप्तीदर्शक वाटत असतात, तसेच पुढील पिढीत वडीलधाऱ्यांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्याची ती संधी असते. विशेष म्हणजे ज्यांनी खरं मोठं कर्तृत्व गाजवलं, त्या थोर पुरुषांनी हे वयाचे टप्पे गाठलेच नाहीत. ज्ञानेश्वर (२१), शंकराचार्य(३३), विवेकानंद(३९), शिवाजी महाराज(५०), आगरकर(३२) ही उदाहरणे आहेत.
हल्ली पहिल्या वर्षापासूनच वाढदिवस साजरा होतो. त्याला उत्सवी स्वरूप आले आहे. निमंत्रणे, भेटकार्डे, गुच्छ, गायन-वादन, जाहिराती फलक, पार्टी इत्यादी. खरं म्हणजे -
आला आला प्राणी जन्मासी आला ।
गेला गेला बापडा व्यर्थ गेला ।।
अशीच स्थिती असते. वास्तविक हा घटदिवस मानायला हवा, कारण क्षणाक्षणाने आयुष्य घटत असते. माणूस जन्माला येतो तेव्हा पहिला श्वास घेतो व मरते समयी शेवटचा श्वास सोडतो. प्रत्येक श्वासाश्वासाने आयुष्य घटत असते. आपल्या ग्रंथांतून व थोर पुरुषांनी याविषयी काय विचार व्यक्त केले आहेत?
श्रीमद् भागवत: (११/२२/४२) : जरी प्रत्येक क्षणाला शरीराची उत्पत्ती आणि विनाश होत आहे, तरी काळाची गती अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे प्रत्येक क्षणाला शरीराचे उत्पन्न वा नष्ट होणे आपल्याला दिसून येत नाही.
ज्ञानेश्वरी : मूल जो जो मोठे होत जाते तो तो पालक आनंदाने नाचतात, पण एक एक दिवस त्याचे आयुष्य कमी कमी होत आहे, याची खंत वाटत नाही. (९.५११)
जन्मल्यापासून जसजसे दिवस येतात, तसतसा प्राणी काळाच्या अधिकाधिक आधीन होत जातो, पण गुढ्या वगैरे उभारून त्याचा वाढदिवस साजरा करतात. (९.५१२)
कोणी मर म्हटले तर ते सहन होत नाही, आणि मेल्यावर तर रडतातच. प्राप्त असलेले आयुष्य निघून जात आहे, हे जाणत नाहीत. (९.५१३)
गोळवलकर गुरुजी (श्रीगुरुजी समग्र-खण्ड ३,पृ.१६३) : परमेश्वराने दिलेल्या आयुष्यातील एक वर्ष आज कमी झालं.
कै.मुकुंदराव किर्लोस्कर : वाढदिवस ही खासगी व व्यक्तिगत बाब आहे, त्याला कसलेही सार्वजनिक स्वरूप देणे योग्य नाही.

पुष्कळजण लोकेषणेपायी आपणच आपले वाढदिवस सत्कार करून घेतात. याविषयी संत म्हणतात -
रामदास स्वामी :   आपुली आपण करी स्तुती । तो एक मूर्ख ।।
ज्ञानेश्वरी : पूज्यता डोळां न देखावी । स्वकीर्ती कानीं नायकावी ।
हा अमुका ऐसी नोहावी । सेचि लोकां ।।१३.१८८ ।।
तेथ सत्काराची कै गोठी । कै आदरा देईल भेटी ।
मरणेसी साटी । नमस्कारितां ।।१३.१८९ ।।
महाभारत : एका प्रसंगी भगवंत अर्जुनाला म्हणतात की, तू आपल्या स्वत:च्याच गुणांची प्रौढी मिरव, म्हणजे तू आत्महत्त्या केल्याप्रमाणेच होईल.
भारतीय तत्वज्ञानात पुनर्जन्मावर विश्वास आहे म्हणून प्राणत्यागानंतर `ईश्वर मृतात्म्यास सद्गती देवो' असे म्हटले जाते. यासाठी गीतेचाच आधार घेता येईल.
जीवात्मा जीर्ण शरीर सोडून दुसरे नवीन शरीर धारण करतो. (२.२२)
जो जन्मतो त्याला मृत्यू आहे आणि जो मरतो त्याला जन्म आहे (२.५७)
तुझे नी माझे पुष्कळ जन्म झालेले आहेत. (४.५)
तोच बुद्धिसंयोग तुला पुढच्या जन्मी मिळेल. (६.४३)
हल्ली आपण भारतीय सर्रास `ईश्वर मृतात्म्यास शांती देवो' असेच म्हणतो.
तो परमेश्वरच आम्हाला सद्बुद्धी देवो.
- केशवदास (कुशाग्रसिंधू)

मंत्रशास्त्र
- भारवि खरे
`शास्यते अनेन इति शास्त्रम्' अथवा `शास्ति शास्यते इति शास्त्रम्' कोणत्याही विषयांचे विशिष्ट ज्ञान संपादन करण्यासाठी वाक्यरचनेच्या योगाने प्रयत्न केलेले असतात. क्रियासंभार आणि अनुभवजन्य ज्ञानप्राप्तीसाठी केलेले प्रयत्न एकत्रित करून, विवक्षित विषयाबद्दल सुसंबद्ध रीतीने जी व्यवस्थित वाक्यरचना एकत्र केलेली असते, त्या वाक्यसमूहाला शास्त्र म्हणतात. मंत्रशास्त्र हा सिद्धीप्राप्तीचा एक मार्ग आहे.
मंत्रशास्त्रात शब्द व ध्वनि यांना महत्त्व आहे. वेदमंत्रांचा उच्चार म्हणजे ध्वनी होय. ध्वनीपासून गती व गतीपासून ध्वनी ही परस्परावलंबी उपपत्ती आहे. रंग, प्रकाश, उष्णता, आकर्षणशक्ती व विद्युत् अशी गतीची रूपांतरे होतात. योगशास्त्रीय सिद्धांतानुसार ध्वनीला रंग व आकार आहे. मानवी शरीरातील षट्चक्रांपैकी अनाहत, विशुद्धी व आज्ञा या चक्रात उत्पन्न होणारे ध्वनी योगशास्त्रात सांगितल्याप्रमाणे बरोबर आहेत. मंत्रद्रष्ट्या ऋषींनी मंत्रातील ऱ्हस्व, दीर्घ, प्लुत, उदात्त, अनुदात्त, स्वरित असे स्वर कायम केले. शब्द आणि अर्थ यांचा सृष्टीतील परस्परसंबंध स्वयंभू आहे. परंतु मानवी वाचारूपी यंत्रांतून हे ध्वनी बाहेर पडताना, त्या व्यक्तीच्या क्षमतेप्रमाणे बाहेर पडतात व त्यांच्यापासून वेगवेगळया प्रमाणात कार्ये होतात.
शब्द दोन प्रकारचे असतात. मानवी व्यवहार संपादण्यासाठी योजलेले जे शब्दसमूह, त्यांच्या योगाने बनलेल्या भाषेला `सांकेतिक भाषा' म्हणतात. पशुपक्ष्यांच्या शब्दाला `ध्वनी' असे म्हणतात. या उभयतांमधील भेद अतिशय सूक्ष्म आहे. इष्ट परिणामकारक गोष्ट करावयाची असल्यास सयुक्तिक शब्दरचना केली पाहिजे. अशा शब्दयोजनेस `सिद्ध भाषा' म्हणतात. जसे पर्जन्य सूक्ताचा अनुभव घेण्यासाठी त्या सूक्ताची भाषा सर्वत्र सारखी असल्यास परिणाम सर्वत्र सारखा होतो.
अशा मंत्रोच्चारात तीन प्रकारचे जप असतात-व्यक्त, उपांशु व मानस. जिव्हेने स्पष्ट उच्चारलेल्या जपास `व्यक्त' जप म्हणतात. असा जप दुसऱ्याला ऐकू येतो. जिव्हेने अस्पष्ट म्हणजेच दुसऱ्यास ऐकू न जाता आपल्याला ऐकू येईल त्याला `उपांशु' म्हणतात. `मानसिक जप' म्हणजे मनातच परंतु मोठ्या आवाजात पठन करणे, हा प्राणायम शरीरातील वाचेने होतो. जप म्हणजे केवळ अक्षरोच्चार नव्हे तर त्या अक्षरांच्या अर्थाचेही चिंतन अभिप्रेत आहे.
जपाला सुरुवात करण्यापूर्वी तो एखाद्या गायत्रीसिद्ध सत्पुरुषाकडून घेण्याचा प्रयत्न करावा. तशी व्यक्ती न आढळल्यास एखाद्या सदाचारसंपन्न व ज्याला स्वरांसह मंत्र म्हणता येतो अशाकडून मंत्र शिकून जप करावा. मुंजीत मिळालेली पौरोहित्यमंत्रदीक्षा यथाविधी नसते, तो एक उपचारपद्धतीचा भाग असतो. तेथे हल्ली संस्काराचे पावित्र्य आणि गांभीर्य यांपेक्षा अन्य गोष्टी महत्त्वाच्या वाटत असतात. त्यामुळे आजच्या उपनयन अथवा मौजीबंधन संस्कारात मंत्र मिळालाच आहे या भ्रमात राहू नये. साधनेला प्रारंभ करण्यापूर्वी तो शिकून घेणे महत्त्वाचे आहे. जपाच्या वेळी यज्ञोपवीत असावे, यज्ञासाठी ते आवश्यक आहे. ते यावत्शक्य शुद्ध आणि मंत्रसंस्काराने अभिमंत्रित असणे आवश्यक आहे. गायत्रीचा मंत्र एका लयीत व सुरात व्हावा. अशा क्रियेने आपले संपूर्ण शरीर आंदोलित होऊन शरीरातील प्रसुप्त शक्तिकेंद्रे हळूहळू जागृत होऊ लागल्याची ती खूण आहे. यासाठी आपली मनाची, विचारांची व शरीराची आंदोलने प्रथम थांबविली पाहिजेत. गायत्री मंत्रातील अद्भुत रचना व विलक्षण गुंफणीमुळे विशिष्ट शक्तिकेंद्र जागृत होते. याच तत्वावर जपसंख्या निर्धारित केली आहे.
असा हा गायत्री मंत्र $ कारपूर्वक, `भूर्भुव: स्व:' या तीन व्याहृतींसह सुस्वरात म्हणणे आवश्यक आहे. साधना ही मुद्दाम करण्याची गोष्ट नसून ती सहजपणे व्हावी. त्यात आनंद व प्रेम निर्माण झाले पाहिजे. आज मंत्रविद्या म्हणजे `सारे काही खोटे, सारे अगदी व्यर्थ आहे, दांभिक आहे' असे मानणारे अधिक आहेत. संस्काराचा लोप व आचारभ्रष्टता यांमुळे मंत्रसिद्धी होत नाही. वाल्याचा वाल्मिकी होतो, हे गोष्टीरूपाने आम्ही अगदी रंगवून सांगतो. परंतु हल्लीच्या पिढीत वेदमंत्र, पुराणमंत्र, आगममंत्र, शाबरमंत्र तसेच वेद, पुराणे, आगम यांवरील श्रद्धा नाहीशी झालेली दिसते. संशोधक अथवा विद्वान मंडळी प्रबंधाच्या मर्यादित दृष्टीनेच त्याचे अध्ययन करतात, परंतु कृतीत मात्र अपवादानेच कार्य करताना आढळतात, हे अनुचित.
(वेदभवन पत्रिकेतून संक्षेप)

दैव वेगळेच ठरवते
माझा जन्म १९३१ मध्ये गिरगाव (मुंबई) येथे जगजीवन मॅन्शन बिल्डिंगमध्ये झाला. पहिल्या मजल्यावर कै.र.धों.कर्वे राहात होते. कधी कधी आण्णासाहेब कर्वे राहावयास येत असत. लहानपणी अशा थोर माणसाचं दर्शन होणं हे भाग्यच!१९४२ मध्ये आम्ही सर्व बडोद्यास राहावयास गेलो. मला क्रिकेट, ड्नॅइंर्ग व पेंटींगची खूपच आवड होती. पण संधी मिळत नव्हती. मॅट्नीकला असताना ही संधी मिळाली. मोनू लिमये बडोदा हायस्कूलचा क्रॅप्टन होता. महाराजा प्रतापसिंह यांनी आपली मुले फत्तेसिंगराव, रणजितसिंह व संग्रामसिंह यांच्यासाठी प्रिन्स टीम सुरू केली होती. सी.एस.नायडू हे त्या टीमचे कोच होते. इंटर स्कूल स्पर्धेत बडोदे हायस्कूल फायनलला आली. मी १३० धावा काढून नाबाद राहिलो. सात विकेटस् घेतल्या. बडोदे क्रिकेट असोसिएशनचा `ऑल राऊंडर कप' मला मिळाला. विजय हजारेंकडून `नेट प्रॅक्टीसला ये' असा निरोप आला. रणजी टीमबरोबर माझी प्रॅक्टीस सुरू झाली. मला खूप क्रिकेट शिकता आले.
१९४९-५० च्या हंगामात मुंबईला हिंदू जिमखान्याच्या विरुद्ध ५० धावा केल्या. दत्ताजीराव गायकवाड यांच्याबरोबर मी ओपनिंगला जात असे. क्रिकेट क्लब ऑफ इंडियाबरोबर पहिल्या डावात १२९ धावा व दुसऱ्या डावात ५० नाबाद राहिलो. हिंदुस्थान टीमचे रामचंद व सुंदरम्, उम्रीगर, पालवणकर, ताम्हणे होते. या मॅचमध्ये मी शतक झळकावले. १९५०-५१ला मी पहिली रणजी ट्नॅफी मॅच खेळलो. १९४८ ते १९५३ या काळात `क्रिकेट' हेच माझ्या पुढील आयुष्याचं ध्येय मी ठरवलं.
१९५६ सालची उन्हाळयाची सुट्टी होती. आम्ही मित्रमंडळी गप्पा मारायला जमलो होतो. एकजण वर्तमानपत्र चाळत होता. इटालियन सरकारची पदव्युत्तर शिष्यवृत्तीसाठी जाहिरात होती. दोघांनाच शिष्यवृत्ती मिळणार होती. इंटरव्ह्यू शिक्षण मंत्रालयामध्ये होणार होता. सर्व सव्यापसव्य करून अर्ज भरून झाला. शेवटचाच दिवस होता. स्टेशनवर गेलो आणि दिल्लीला जाणाऱ्या गाडीच्या डाकेच्या डब्यात पत्र टाकलं. इंटरव्ह्यूसाठी बोलावणे आले. या अगोदर मी दिल्लीला गेलो नव्हतो. दिल्लीच्या गाडीत चढलो. रतलाम स्टेशन आलं. गाडी पाऊण तास थांबणार असल्याचे कळले. पाय मोकळे करायला प्लॅटफॉर्मवर उतरलो. `जोशी' अशी हाक ऐकू आली. पाहतो तो क्रिकेटपटू भाऊसाहेब निंबाळकर! एक वर्षापूर्वी होळकरांच्या टीमबरोबर रणजी खेळताना ओळख झाली होती. ते दिल्लीलाच चालले होते. ते राजसिंह डुंगरपूर यांच्या भावाला म्हणजे महिपालसिंगना भेटणार होते.  ते म्हणाले की, `इंटरव्ह्यू झाला की हॉटेलात मुक्कामावर मला भेटायला ये' इंटरव्ह्यूनंतर निंबाळकरांना भेटायला गेलो. महिपालसिंगांशीही ओळख झाली. `सुट्टीच असेल तर आमच्याबरोबर राजस्थानात चल.' मी त्यांच्याबरोबर निघालो.
महिपतसिंगांच्या मोटारीतून प्रवास करत किशनगडला आलो. उदयपूरला गेलो. महाराणा भगवंतसिंहजी त्यावेळी उदयपूरचे महाराणा होते. त्यांच्याशी ओळख झाली. माझ्या ठिकाणी क्रिकेट व शिल्पकलेचा संगम पाहून त्यांना आश्चर्य वाटले. मेयो कॉलेजचे हेडमास्तर दानमल माथूरजी महाराणासाहेबांकडे आले होते. मी त्यांच्याबरोबर अजमेरला गेलो. येथील मेयो कॉलेज लॉर्ड मेयोने स्थापन केले. संस्थानिकांच्या राजपुत्रांना सर्वांगिण शिक्षण मिळावे म्हणून हे निवासी कॉलेज होते. श्री.दानमल माथूरांकडे पंधरा दिवस मी राहिलो होतो. त्यांनी प्रिन्सिपल जॅक गिब्सन यांच्याशी ओळख करून दिली. त्यांना पाहून त्यांचे शिल्प बनवावे अशी प्रबळ इच्छा झाली. दानमलांनी गिब्सनना विचारले. त्यांनी होकार दिला. प्रशस्त दालनात प्रिन्सिपॉल आपल्या स्टेनोला घेऊन बसायचे. एकीकडे मला सीटिंग देत होते आणि एकीकडे स्टेनोला लेटर्स डिक्टेट करायचे. मी हळूहळू शिल्प साकारत होतो. विद्यार्थी येऊन बघत असायचे. अखेर पोर्टेट (डोक्यापासून खांद्यापर्यंत)पूर्ण झाले. माझी अन्य प्रात्यक्षिके चालू असतानाच मला इटालियन सरकारची शिष्यवृत्ती मिळाल्याची तार मिळाली. तयारीसाठी बडोद्याला निघणे आवश्यक होते. प्रिन्सीपॉलनी मला ऑफीसमध्ये बोलावून घेतले. एक वर्षानंतर हिंदुस्थानात परत आल्यावर मेयो कॉलेजमध्ये येण्याची ऑफर माझ्या हाती पत्र देऊनच केली.
बडोद्याहून निघालो तेव्हा असं काही घडेल, रोमला जायला मिळेल, परत आल्यावर नोकरी पण तयारच आहे, असं स्वप्नातसुद्धा वाटणं शक्य नव्हतं. दैव तुम्हाला त्या त्या ठिकाणी सहजपणे नेत असतं हेच खरं!
- चंद्रशेखर गणेश जोशी
 द नेस्ट जे१/२, एचडीएफसी कॉलनी, चिंचवड, पुणे १९
(फोन ०२०-२७३७३६१८, मोबा. ९७६३७२५५९०)

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन