Skip to main content

9March2015

१२ मार्च (१९१४) हा यशवंतराव चव्हाण यांचा जन्मदिवस. त्यांच्या १०१ व्या जयंतीच्या निमित्ताने, त्यांच्या खुल्या संवादपटुत्त्वाचा परिचय देणारी आठवण. 
देशमुख आणि कं. (पुणे ३०) प्रकाशित, `माणसं माणसांसारखीच वागतात' या पुस्तकातून संक्षेप ...
यशवंतराव चव्हाण
काही कामासाठी दिल्लीला गेलो होतो. चहा घेताना सहज म्हणून टेलिफोन डिरेक्टरी चाळायची, तर नेमके पान आले `सदस्य लोकसभा' आणि समोर नाव, पत्ता व अर्थातच फोन नंबर : यशवंतराव चव्हाण. अनेक वर्षांची सुप्त इच्छा जागी झाली. बघू या प्रयत्न करून, म्हणत नंबर फिरवला.
  माझे मामा म्हणजे महाराष्ट्नतला गाजलेला प्रकाशक ग.पां.परचुरे. केव्हातरी नवीन प्रकाशने यशवंतरावांना भेट द्यायला तो जात असे. एकदा त्याने मलाही सोबत नेले होते. फार तर दहा-पंधरा मिनिटे आम्ही तिथे असू. (ती आठवण दिली.)
``अरे, गजाननराव तुझे मामा? सख्खे? मग तर तू घरचाच. उतरलास कुठे? नीट सोय नसली तर बॅग उचल आणि इथे ये. मी एकटाच आहे. आज वेणूबाई कऱ्हाडला गेली आहे.''
***
मला एक प्रश्न होता. सहकारक्षेत्रात आयुष्य वेचलेल्या कुणा व्यक्तीचा सत्कार झाला होता. दुर्दैवाने त्यांचे नाव आज स्मरणात नाही. त्या सत्कार सोहळयात यशवंतराव बहुधा अध्यक्ष होते. एक वक्ते होते प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ व विचारवंत वि.म.दांडेकर. मात्र तो समारंभ गाजला होता निराळयाच कारणाने. आपल्या भाषणात वि.मं.नी सहकारी साखर क्षेत्रावर सडकून टीका केली. खूप बोचरे असे ते भाषण असावे. त्याच सभेत यशवंतरावांनी कडक भाषेत वि.मं.ना फटकारले. तो प्रसंग त्यावेळी वृत्तपत्रांतून खूप गाजला होता. त्यातल्या तात्विक भागापेक्षा व्यासपीठावरच्या `तू-तू, मैं-मैं'चा ऊहापोह जरा जास्तच झाला, संपादकीयातदेखील.
१९७७ ची आणीबाणी संपवणारी निवडणूक. जाहीर सभा, आव्हाने-प्रति आव्हाने, टोलेबाजी हे सर्व रसायन त्या गदारोळात असतेच. मात्र १९७७ ला पु.ल.देशपांडे जनता पक्षाच्या प्रचाराला हिरीरीने उतरले होते. बहुधा कोल्हापूरच्या सभेत पुलंनी यशवंतरावांना काँग्रेस सोडून जनता पक्षात येण्याचे जाहीर आवाहन केले. सातारच्या सभेत बोलताना यशवंतरावांनी `मला विदूषकाच्या सल्ल्याची गरज नाही' असा उलटा फटकारा मारला.
मला कुतूहल होते ते निराळेच. हे दोन्ही प्रसंग पूर्वी घडून गेलेले, मधे काळही लोटलेला. ``या व्यक्तींचे आपसात संबंध अशा घटनांनंतर कसे राहिले? पूर्वीसारखेच, कमी पातळीवर, का तुटले?''
यशवंतराव हसले, ``अरे, ही टोलवाटोलवी त्या क्षेत्रात चालतेच. त्याचा संबंधांवर परिणाम तसा होत नाही. आता वि.म.दांडेकर त्यांच्या क्षेत्रातला मोठा तज्ज्ञ, अभ्यासू, कळकळीने काम करणारा, काही मूल्ये-निष्ठा जपणारा. जे पटले नाही ते परखडपणे सांगणारा. मात्र त्या दिवशी प्रसंग होता एका कार्यकर्त्याच्या गुणगौरवाचा. वि.म.जे बोलले, ते बोलायचा त्यांना अधिकार होता. मत पटणे, न पटणे निराळे; मात्र तो प्रसंग, ते व्यासपीठ ही त्यासाठीची जागा नव्हती. त्यामुळे औचित्यभंग झाला, असे मला वाटले. दांडेकरांनंतर आणखी कुणी वक्ता असता तर कदाचित फरक पडला असता, पण लगेच माझेच नाव जाहीर झाले. त्या तिरमिरीत मी जास्त कडवटपणे बोललो. ते भाषण गंभीरपणे घेऊ नको. माझे व विमदांचे संबंध उत्तम राहिले आहेत. आजही भेटीगाठी, हास्यविनोद, विचारांची देवाणघेवाण.... सर्व पूर्वीप्रमाणे, काहीच फरक नाही.''
यशवंतराव थांबले, मात्र मंदपणे हसत राहिले. आणखी काही बोलतील याची मी वाट पाहात होतो; मात्र ते गप्पच. मी म्हटले, `साहेब, उत्तर पूर्ण झाले नाही. पु.ल.?'
``तिथे मात्र पूर्वीसारखे नाही राहिले. म्हणजे संबंध पूर्ण तुटले, असे नाही; पण कुठे भेट झालीच तर नमस्कार, कसं काय - यापलीकडे पु.ल.जात नाहीत.''
``साहेब, असं का झालं असावं?''
``कुणास ठाऊक? पण माझा अंदाज सांगतो. राजकारणाच्या खडाखडींचा पुलंना अनुभव नाही, नव्हता. त्यांना ७७च्या निवडणूक प्रचारात भाग घ्यावासा वाटला; तो त्यांचा हक्कच होता. विनोदाचे शस्त्र त्यांच्या हाती होते. त्याचा त्यांनी मुक्त हस्ते वापर केला. हे सर्व करण्याचा त्यांना मूलभूत अधिकार होता. काँग्रेस जर निवडणूक हरली, जनता पक्षाला सत्तेवर आणता आले; तरच आणीबाणी संपेल, नाही तर हुकूमशाहीला लोकशाही पद्धतीने `सँक्शन' मिळेल हे प्रचाराचे सूत्र होते. ते मांडताना मला तिकडे चुकीच्या पक्षात आहात, इकडे या - असे जाहीर आवाहन माझे नाव घेऊन करण्याचे काही कारण नव्हते. ठीक आहे, केले. मारला एक टोला; मग एक टोला पचवायची तयारीही हवी. ती मानसिकता त्यांची नाही. त्यांनी ते मनात वागवले असे मला वाटते. असो.''
``पण साहेब, ते उत्तम नट, नाटककार, विनोदसम्राट, व्यासंगी तर आहेतच. विडंबन हातखंडा, मराठीच्या बोलीभाषांवर पकड, मूल्यांवर श्रद्धा ही यादी मोठी. मग झाले - गेले, जो रात गई वो बात गई - असे का झाले नाही?''
``मला वाटते, त्यांना स्वत:वर झालेली टीका ऐकायची-वाचायची सवय नाही. कारण त्यांच्या लिखाणावर फार खोलात जाऊन समीक्षा झालीच नाही.''
- विश्वास दांडेकर,
`मालवती' कांगा कॉलनी, सातारा
फोन (०२१६२) २३५२५४


संपादकीय
परंपरा कालानुरूप बदलावी
मुंबई उच्च न्यायालयाने चंद्रभागेच्या वाळवंटात भजन-कीर्तन करण्याला मज्जाव केला आहे. त्याबाबतीत वारकऱ्यांच्या सातशे वर्षांच्या परंपरेचा दावा न्यायालयाने फेटाळून लावला आहे. ही एक क्रांतिकारी घटना म्हणावी लागेल. न्यायालयाने हेही स्पष्ट केले आहे की, या देशातील व्यवहार शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार चालत नसतात तर सत्तर वर्षांपूर्वीच्या राज्यघटनेप्रमाणे चालले पाहिजेत. इतका सुस्पष्ट निर्णय दिल्यानंतर आपल्याकडील धर्माचे आणि कर्मकांडांचे अवडंबर निर्विवादपणाने कमी होणे आवश्यक ठरते. ज्यावेळी एखादी उच्च तात्विक कृती समाजामध्ये घडते, तिचे परिणाम चांगले घडले तर तिचे सातत्याने अनुकरण होते आणि ती रूढी बनते. त्यामागचे उद्देश आणि त्या काळातील परिस्थिती पूर्णत: वेगळी असते. त्यामुळे केव्हातरी रुजलेली परंपरा बदलत्या काळात सांभाळत बसण्यात कोणताही शहाणपणा नसतो. श्रमाने थकलेली गावगाड्यातील मने थोडी प्रफुल्लित व्हावीत, पर्यटनाचा आनंद मिळावा, गावोगावीचे लोकजीवन समजावे, आणि एकत्रितपणाने काही दिवस भगवंताच्या ओढीने व्यतीत व्हावेत अशा हेतूंनी काही संतसज्जनांनी वारीची प्रथा सुरू केली आणि श्रद्धेनेच ती सांभाळली गेली. ज्या घराण्यात वारीची परंपरा असते ती माणसे चालू काळानुसार व्यस्त असतात, म्हणून एका रात्रीत बस-गाडी ने प्रवास करून तातडीने परत कामावर हजर होतात. याप्रकारे परंपरेचा विपर्यास करून वाहनांनी तयार होणारे प्रश्न वाढविण्यात काहीही हशील नाही. पांडुरंगाच्या नित्यनियमाने होणाऱ्या पूजाअर्चेसाठी बडवे-पुजाऱ्यांची नियुक्ती झाली असेल. आज त्यांचे लाडकोड वाढवत त्यांच्या घरची धन करीत राहून त्यांचीच तालेवारी वाढवत जाण्याचे काहीही कारण नव्हते. काळानुसार ती प्रथाही मोडीत निघाली. चंद्रभागेच्या वाळवंटावरून आजही आडवारी जाताना नाक मुठीत धरून जावे लागते. मोठ्या वारीला तर ज्या गावांतून दिंडी जाते त्या सगळयाच गावांची तशी अवस्था होऊ लागली आहे. पंढरपूरसारख्या छोट्या तालुक्याच्या गावाला आठ-नऊ लाख लोकांचा बोजा पेलणे सर्वस्वी अशक्य आहे. या सर्वांचा विचार करून वारकऱ्यांनी नस्त्या परंपरांचा आधार घेऊन आधुनिक समस्या वाढविण्याचे कारण नव्हते. पण तितकी समाजाभिमुखता शे-पाचशे वर्षांपूर्वीच्या संतांकडे होती, आजच्या वारकरी फडांकडून ती अपेक्षा जरा जास्तच होईल.

याच प्रकाराने आपल्या समाजातील धार्मिकतेच्या नावाखाली बोकाळलेल्या प्रथा कालानुरूप थांबवण्यासाठी किंवा त्यात बदल करण्यासाठी त्या त्या समूहातील धुरिणांनी पुढाकार घेतला पाहिजे. त्यात गणेशोत्सव, दहीहंडी, दिवाळी, होळी अशा कितीतरी धार्मिक म्हणविल्या जाणाऱ्या परंपरांचा समावेश करता येईल. लग्नासारखे उत्सवही अनेक आचरट परंपरांतून मुक्त केले पाहिजेत. दोन मनांच्या मीलनासाठी मंगलवाद्ये पार्श्वभूमीला असावीत अशी परंपरा असेल तर आता बारा खोक्यांच्या डॉल्बीने ती कशी काय सांभाळली जाते याचा विचार केला पाहिजे. पण त्यालाही परंपरेचे कारण देऊन कुणी कोर्टात प्रश्न नेलाच तर कोर्टानेही इतक्याच तडफदारीने त्यावर कठोर निर्णय घेऊन प्रत्येक सामाजिक रूढी कालानुरूप ठेवण्यासाठी निवाडा केला पाहिजे.

`आपले जग'चा त्रितपपूर्ती समारंभ
तीन तप:पूर्तीच्या निमित्ताने प्रकाशित केलेला अंक सर्वत्र मिळाला असेलच. त्याबद्दलचा अभिप्राय जाणून घेण्याची उत्सुकता आहे. अनेक वाचक व हितचिंतकांनी शुभेच्छा व आशीर्वाद दिले, त्याचबरोबर बहुतकांनी त्रितपपूर्तीचा समारंभ कुठे-कधी-कसा झाला याचा वृत्तांत विचारला आहे -
या महत्त्वपूर्ण आणि जिव्हाळयाच्या निमित्ताने अत्यंत घरगुती असा कार्यक्रम आयोजित केला होता. `आपले जग'शी निकट संबंधी, किंवा पूर्वी कधी या अंकासाठी काम केलेल्या पत्रकार-मित्रांची स्नेहभेट योजिली होती. त्यात जिल्हा माहिती अधिकारी एस.आर.माने, दै.`पुढारी'च्या सांगली आवृत्तीचे संपादक चिंतामणी सहस्रबुद्धे, `तरुण भारत'चे सांगली आवृत्तीचे संपादक मंगेश मंत्री, `सकाळ'च्या सांगली आवृत्तीचे संपादक अशोक घोरपडे, `केसरी'च्या सांगली आवृत्तीचे संपादक मनोहर पेशवे आणि माधवी पेशवे, तसेच उदय वेलणकर, विवेक ढापरे, विनिता तेलंग, मोहन आळतेकर इत्यादि पारिवारिक-स्नेहीजन सहभागी होते. `पुढारी'चे विजय गुरव, चित्रकार सुरेश पंडित हे ऐनवेळी येऊ शकले नाहीत. सकाळी ९वा. `आपले जग'च्या प्रकाशनस्थळी (`वाल्मिकी'च्या अंगणात) गप्पा आणि न्याहरीने प्रारंभ झाला.
तिथून विटे येथे जयंतराव बर्वे यांच्या शेतावर भेट दिली. सेंद्रिय शेतीचे प्रयोग, अग्निहोत्राचा पिकांवर परिणाम, बायोगॅस, गोपालन, ठिबकसिंचन, बायोमास इत्यादी प्रयोगांची पाहणी व चर्चा घडली. नेचरकेअर फेर्टलायझर या सेंद्रिय खत कारखान्यास भेट, निर्यातक्षम उत्पादनांची माहिती व वार्षिक १० हजार टन उत्पादन करणारा प्रकल्प आणि शेतकऱ्यांना रासायनिककडून सेंद्रिय कडे वळण्याने होणारे फायदे पटवून देणारे प्रशिक्षण प्रयोग अशीही पाहणी झाली. जयदेव बर्वे आणि डॉ.सांडू (सुप्रसिद्ध सांडू ब्रदर्स मुलंुंडचे) यांनी शेतजमीन व फळबागांसाठी देशी उपचार व पोषण देणाऱ्या अनेक पद्धतींची माहिती दिली. `नेचर केअर'चा आणखी एक कारखाना लातूर येथे सुरू झाला असून आफ्रिका व युरोपीय देशांतून चांगली मागणी येत असल्याचे सांगण्यात आले.
`आपले जग'चे प्रारंभकाळातील लेखक (विटे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी) कै.बलवंत प्रभावळकर यांचे नातू अमृत कुलकर्णी व पूर्वी `सकाळ'च्या सांगली कार्यालयात काम करणारे श्री.बिदनूर हे आता त्या सेंद्रिय उत्पादन प्रकल्पात असतात. त्यांनी या जुन्या सहकारी `मित्रमंडळा'चे अगत्य करून माहिती दिली. श्री.जयदेव यांनी आपल्याकडील सेंद्रीय उसाचा रस सर्वांना दिला.
पुढचा टप्पा बलवडीच्या क्रांतिस्मृतिवनात होता. काही ना काही नात्याने भाई संपतराव पवार निर्मित, या अनोख्या प्रेरणास्थळाशी ही सर्व पत्रकार मंडळी परिचित होती, पण अलीकडच्या काळात या प्रकल्पाने घेतलेले सुरम्य रूप सर्वांना अनोखे होते. त्यामुळे इथली भेट, पाहणी, भावी योजना, (आणि समस्याही) पत्रकार नजरेत येणे विशेष जिव्हाळयाचे होते. या ठिकाणी संपतराव पवार यांनी साऱ्यांचे स्वागत केले, व हुतात्म्यांच्या नावाने केलेले वृक्षसंगोपन प्रत्यक्ष दाखविले. जिल्हा माहिती अधिकारी श्री.माने यांना राज्यशासनाचा उत्कृष्ठ वार्तांकनाचा मोठा पुरस्कार नुकताच मिळाला, त्याबद्दल त्यांचा सत्कार जयंतराव बर्वे यांच्या हस्ते करण्यात आला. `आपले जग'च्या विशेषांकाचे प्रकाशन भाई संपतराव पवार यांच्या हस्ते झाले. त्यानंतर `आपले जग' परिवारातील विनायक साठे, संदीप देशमाने, मनीषा, आनंद, पद्मा, सईदा यांनी आयोजित केलेल्या बासुंदीचा आस्वाद या स्थळी वनभोजनात सर्वांनी घेतला.
या अनोख्या, वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासदौऱ्यातून साऱ्या परिवाराचा हृद्य मेळा जमविणारी ही सर्वांची स्नेहभेट `आपले जग'च्या त्रितपांच्या पुण्याईला साजेशी ठरली.



हिंदू धर्माची अगतिकता
आज आपणासमोर जर सर्वात मोठा कोणता प्रश्न असेल तर समाज एकत्र कसा राखायचा? यासाठी देशात बहुसंख्य असणारा हिंदूधर्मी काय प्रयत्न करतो? इस्लामी अतिरेक्यांच्या जागतिक राजकारणाची झळ आपल्या देशाला लागू नये. देश अखंड ठेवायचा तर मुस्लीमांचा प्रश्न दूरदृष्टीने हाताळणे गरजेचे आहेे. अल् कायदा व इसिस या संघटनांनी जगातील सर्वांनाच आव्हान दिलेले आहे. गंमत अशी की हा धोका प्रथम इस्लामी देशांनाच जाणवत आहे. अमेरिकेने त्या देशात स्थैर्य देणाऱ्या हुकुमशाही उलथून अस्थैर्य निर्माण केले व त्या परिस्थितीचा फायदा उठवत या कर्मठ व धर्मनिष्ठ संघटना राजकीय महत्त्वाकांक्षेने खिलाफत स्थापू पाहात आहेत. अमेरिकेनेच जोपासलेली ही अतिरेकी विषवल्ली त्रासदायक असल्याने तिच्या काटणीचे कामही अमेरिकेला करावे लागत आहे. या सगळयात कोण भरडला जात असेल तर सामान्य इस्लामी जनता. तिच्या हालाला खरोखरच पारावर राहिलेला नाही.
आपल्या देशाला हा धोक्याचा इशारा आहे. मुस्लिमांमध्ये बरेच तरुण निरुद्योगी आहेत. अशा लोकांच्या धार्मिक भावनांना आवाहन करून दंगली घडवून आणणे इस्लामी आंतरराष्ट्नीय संघटनांना अवघड नाही. इस्लामचा नारा दिला की सर्व एक होऊन हिंदूविरोधी कारवाया करायला पेटून उठतील.
आपल्या देशाची सर्व अर्थव्यवस्था, आयात खनिज तेलावर अवलंबून आहे. तेल पुरवठादार आहेत इस्लामी देश. त्यामुळे इस्लामविरोधी कोणतेही पाऊल आपल्या देशात उचलले गेले तर ते आपले नाक दाबू शकतात. मोदी सत्तेवर आले असले तरी तेही कडक उपाययोजना करू शकत नाहीत. सर्व गावांतील मशिदींचे दर्जेदार नूतनीकरण झालेले आहे. हा पैसा तेल-देशांतून आला हे उघड गुपित आहे. बनारसमध्ये मशिदींच्या विळख्यात अडकून पडलेल्या काशी विश्वेश्वराची सुटका नरेंद्र मोदींना स्पष्ट बहुमत मिळूनही व्यवहार्य होत नाही. मोदी सरकार स्वत:च्या पायावर उभे असूनही आपला देश तेलाबाबतीत स्वावलंबी नसल्यामुळे चतुर व धोरणी मोदींनी `सबका विकास' असा मुद्दा निवडणुकीत वापरला. हिंदुत्वाच्या मुद्द्यापेक्षा विकासाचा मुद्दाच सर्वांना भावणारा आहे व तोच सत्तेकडेही नेणारा आहे. यातून हिंदू संघटनांनी काही बोध घेऊन प्रथम देशहिताचा विचार करणे गरजेचे आहे.
पाकिस्तान निर्मितीमुळे भारतातील मुस्लिमांची बाजू स्वातंत्र्यपूर्व काळापेक्षा दुर्बल झाली, त्यांच्यावर अपराधित्व लादले गेले. खरं म्हणजे सर्व मुस्लिम समाजाचा पाकिस्तान निर्मितीला पाठिंबा नव्हता. पाकिस्तानपेक्षा भारतात मुस्लिम समाज जास्त आहेच, पण जगातसुद्धा इंडोनेशियानंतर भारतातच मुस्लिम समाज जास्त आहे. म्हणूनच धार्मिक अल्पसंख्य म्हणजे मुस्लिम नसून ते देशात दुसऱ्या क्रमांकाचे आहेत.
खरा मुद्दा स्वतंत्र भारतातील मुस्लिमांच्या भूमिकेचा. हे लोक दोन-तीन पिढ्यांमागे हिंदू होते. त्यांच्यावर मुस्लिम धर्म लादला गेला. पाकिस्तानचे निर्माते श्री.मोहमद अली जिन्हा यांचे आजोबा पुंजाभाई वालजी ठक्कर हे गुजराथमधील लोहाणा ठक्कर जमातीचे. त्यांना मुस्लिम धर्म स्वीकारावा लागला. मुस्लिम धर्माबद्दल काहीही प्रेम नसताना त्यांनी राजकीय महत्वाकांक्षेपोटी मुस्लिम लीगचे नेतृत्व पत्करले व त्याचा परिणाम पाकिस्तान निर्मितीत झाला. पाकिस्तानी घटनासमितीच्या पुढे याच जिन्हांनी `पाकिस्तान हे धर्मप्रधान राष्ट्न् न होता, सर्वांना धर्माचा विचार न करता समान अधिकार हवे. तसेच अल्पसंख्यांक ही संज्ञा पाकिस्तानी घटनेत असता कामा नये' असे ठाम म्हटले.
जे मुस्लिम पाकिस्तानात गेले नाहीत त्यांनी आपल्या जन्मभूमीलाच प्रथम स्थान दिले. मुस्लिमद्वेष करणाऱ्या हिंदुवाद्याने ही वस्तुस्थिती जाणली पाहिजे. त्यांच्याशी प्रेमाचे संबंध राखणे इतकाच मार्ग आहे ही गोष्ट हिंदू संघटकांपैकी फक्त श्री.मोदी यांनी समजून `मुसलमान हे भारताचे नागरिक असून ते भारतासाठी सर्वकाही करतील' असा विश्वास जाहीररित्या व्यक्त केला आहे. अशा परिस्थितीत आपली पुढील वाटचाल काय असावी याचा प्रत्येक देशप्रेमी व्यक्तीने देशाचे हित लक्षात घेऊन विचार करणे कर्तव्याचे आहे.
आपल्या देशाला तसेच हिंदू धर्माला दुहीचा शापच आहे असे वाटते. अफगाणिस्तानातून आलेल्या इस्लामी आक्रमकांना एकजुटीने विरोध करण्यापेक्षा एकमेकांवर सूड उगवण्यासाठी या आक्रमकांना साथ दिली. त्याचा फायदा बाबराने उचलून मुघल साम्राज्याचा पाया घातला. हे परिणाम कोणाच्या चुकांचे? आजचे भारतीय मुस्लिम हे भूमिपुत्र असून त्यांना सामावून घेणे गरजेचे आहे. आपण पूर्वीच्याच दुहीच्या चुका केल्या तर लोकशाही मार्गाने इस्लामचे राज्य हिंदुस्तानात येणे अशक्य नाही. अतिरेकी मार्गानेही खिलाफत अंमल सुरू होऊ शकतो. आजही फुटीचा वारसा हिंदू धर्मवाद्यांकडून क्षुल्लक भांडणाद्वारे जपला जात आहे. समोर सरळ दिसत असलेला सत्तेचा मार्ग खाचखळग्याचा करून हातात सहज आलेली सत्ता घालवणार काय?
`हिंदू है हम' असे म्हणण्यापेक्षा `हिंदी है हम' म्हणणे सर्व समाजाच्या एकसंधतेसाठी सर्वसमावेशक आहे.
- प्रसाद भावे, सातारा (मोबा.९८२२२८४२८७)

पुण्यातील वेदाचार्य घैसास गुरुजी वेदपाठशाळा (वेदभवन) रौप्यमहोत्सवी सांगता समारोहाच्या निमित्ताने श्रीमती माधवी जोशी यांची उपनिषदांवर सात दिवसांची व्याख्यानमाला झाली. या मालेत त्यांनी मांडलेल्या विषयांचा हा गोषवारा...
उपनिषदातील तत्त्वज्ञान
चार वेद हे संस्कृतीचे आधारस्तंभ आहेत. वेदांचे चार भाग पडतात. मूळ संहिता, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद! उपनिषद हा सर्वात शेवटचा भाग म्हणून त्याला वेदान्त म्हणतात. प्रत्येक वेदाची अनेक उपनिषदे आहेत. त्यातील दहा उपनिषदे प्रमुख मानली आहेत. उपनिषद हा केवळ एक ग्रंथ नाही. ती जड विद्या नाही. उपनिषद म्हणजे नुसते शब्द नाहीत आणि असलेच तर ते श्रुतींचे शब्द आहेत, ते विरून जात नाहीत. शब्द संपले तरी त्यातून प्रतिपादन केलेले ज्ञान लोप पावत नाही. हे चेतनशील असे शब्द आहेत. आत्मचैतन्य हा त्यांचा केंद्रबिंदू आहे. ऋषीमुनींना स्फुरलेले मंत्र व ज्ञान त्यांनी आपल्या शिष्य-प्रशिष्यांना दिले. त्यातील काहीही न गाळता किंवा त्यात भर न घालता हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचले. ही अलौकिक व अद्भुत अशी गुरुपरंपरा हा आपल्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. प्रत्येक उपनिषदाचा एक शांतिमंत्र असतो. या मंत्रामुळे तो विषय आत्मसात करण्यासाठी साधकाची मानसिक तयारी होते, आणि प्रयत्न, काल आणि दैव हे तिन्ही घटक अनुकूल होतात. हे शांतिमंत्र गुरु व शिष्य या दोघांनी म्हणायचे आहेत.
$ पूर्णमद: पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते ।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ।
$ शांति: शांति: शांति: ।।
या शांतिमंत्रात काही मागणे नाही, तर आम्ही मंगल तेच ग्रहण करू अशी प्रतिज्ञा आहे. ते परब्रह्म पूर्ण आहे, केवल आहे. त्यातून कितीही काढून घेतले तरी ते पूर्णच असते आणि परब्रह्माच्या पूर्णतेला कुठेही बाधा येत नाही. ईशावास्योपनिषदाच्या विषयाकडे संकेत करणारा हा शांतिमंत्र आहे. केवळ १८ मंत्र असलेले व अत्यंत महत्त्वाचे असे ईशावास्य उपनिषद आहे.
हे सर्व जगत् ईशाने व्यापलेले आहे. या सृष्टीतील प्रत्येक वस्तूमध्ये तोच भरलेला आहे. इतकेच नव्हे तर जिथे पोकळी आहे तिथे देखील तोच आहे. या जगात जर सुखाने, आनंदाने राहायचे असेल तर जे भोग आपण घेणार आहोत ते घ्यायचे, पण त्यागपूर्वक त्यांचा स्वीकार करायचा. कुणाचेही, कुठल्याही प्रकारचे धन लुबाडायचे नाही. या विश्वावर माझ्याइतकाच इतर सर्वांचा हक्क आहे. हा अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत या उपनिषदाच्या पहिल्याच मंत्रात मांडला आहे. कर्मे करीतच जीवन व्यतीत करायचे हा उत्तम जीवनाचा एकमेव मार्ग आहे असे सांगितले आहे. त्यागपूर्वक भोगाने त्यातील आनंद वाढतो किंवा कृतज्ञता हा परमार्थाचा प्राण आहे, असे हे उपनिषद सांगते.
केनोपनिषद या उपनिषदाच्या शांतिमंत्रामध्ये गुरु व शिष्यांनी आपल्या रक्षणासाठी प्रार्थना केली आहे. `$ सहनाववतु' हा सर्वपरिचित असा शांतिमंत्र आहे. या उपनिषदाचा आणखी एक शांतिमंत्र आहे, त्यात माझी ज्ञानेंद्रिये व कर्मेद्रिये सक्षम राहू देत व आत्मज्ञानाच्या मार्गात येणारे अडथळे दूर व्हावेत अशी प्रार्थना आहे. या उपनिषदाची सुरुवात `केन' या शब्दाने आहे. शिष्य प्रश्न विचारतो - कोणाच्या इच्छेने किंवा प्रेरणेने मन (विषयात) पडते? प्राणांना या शरीरात कोणी नियुक्त केले? बोलणाऱ्या वाणीला कोणी प्रेरित केले? हे डोळे, कान यांना शक्ती देणारा कोणता देव आहे? कोणती शक्ती आहे? अशी जिज्ञासा व्यक्त होते. या प्रश्नांतून शिष्याची जिज्ञासा, त्याच्या ज्ञानाची उंची यामुळे गुरुजी प्रसन्न होऊन त्याच्या सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरे देतात; ते केनोपनिषद! यालाच जैमिनीय किंवा ब्राह्मणोपनिषद असेही म्हणतात.
सर्वच उपनिषदे महत्त्वाची असली तरी कठोपनिषद किंवा काठकोपनिषद हे विद्वानांच्या आवडीचे आहे. यात आत्मा म्हणजे काय, परमात्मप्राप्तीसाठी काय करायला हवे याविषयी साद्यंत ज्ञान अत्यंत रंजकतेने व प्रभावशाली पद्धतीने सांगितले आहे. यात यम आणि नचिकेता यांचा संवाद आहे. कृष्ण-यजुर्वेदाच्या कठ शाखेचे हे उपनिषद आहे. यात दोन अध्याय व प्रत्येक अध्यायाच्या तीन तीन वल्ली आहेत. यात यज्ञविद्या, ब्रह्मविद्या सांगितली आहे. अतिशय काव्यमय, प्रसन्न तरीही गंभीर असा यम-नचिकेताचा संवाद आहे.
उपनिषदे प्रामुख्याने जीवनाचा समग्र विचार करतात. जीवनाचे प्रयोजन स्पष्ट करतात. त्यानुसार मार्गक्रमणा करता येते. आपली उन्नती कशी करून घ्यावी याविषयी मार्गदर्शन मिळते. उपनिषदांच्या प्रार्थना म्हणजे, `मी पणाचे' अर्पण आहे. सुंदर पवित्र अंत:करण हा प्रार्थनेचा गाभा आहे. `प्रसन्न हाक द्या, देव गाभाऱ्यातून बाहेर येईल' असे सामर्थ्य उपनिषदातील प्रार्थनेत आहे. त्याच्या कृपाशीर्वादाने आपल्या सर्वांना तेजोनिधी व्हायचे आहे.
***
अखिल भारतीय चित्पावन महासंघ
निवेदन
अखिल भारतीय चित्पावन महासंघाच्या वतीने चरित्र व माहिती कोश तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. प्रारंभापासून १८२० सालापर्यंतचा पहिला खंड यापूर्वी प्रकाशित झाला असून, त्यापुढील कालखंडाच्या माहितीचे अकारविल्हे (अल्फाबेटीकल)असे होतील तितके खंड प्रकाशित होणार आहेत. आपापल्या घराण्यातील पूर्वज व वर्तमानकालातील कर्तबगार व्यक्तींची नोंद या कोशामध्ये होणे आवश्यक आहे, हा प्रसिद्धीचा प्रकार नाही. त्यामुळे आपली किंवा आपल्याच वाडवडिलांची माहिती कशाला कळवायची, असा विचार कदापि होऊ नये. कोशातील माहिती पुढच्या कित्येक वर्षांत उपयुक्त ठरणारी असते. त्यात योग्य ती नोंद होणे महत्त्वाचे असते शिवाय त्या त्या काळातील सामाजिकतेचा अभ्यासही भावी काळात होण्यासाठी या नोंदींची (डॉक्युमेंटेशन) नितांत आवश्यकता असते. म्हणून सर्वांना विनंती की अशा स्त्री-पुरुष व्यक्तींची तपशीलवार माहिती-विशेषत: जन्म-मृत्यू-शिक्षण-उल्लेखनीय कार्य असा तपशील कृपया पाठवावा.
संपर्क - चित्पावन ब्राह्मण संघ, १०२ वरदान सोसायटी, न.चिं.केळकर पथ,
रामनगर, डोंबिवली (जि.ठाणे) (माधव घुले-९५९४९९६६४६)   किंवा
आपले जग, वाल्मिकी, किर्लोस्करवाडी (जि.सांगली) (०२३४६-२२२०५८)

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन