Skip to main content

30March2015

एजंट कशासाठी हवेत
महाराष्ट्न् राज्य परिवहन आयुक्तानी राज्यभरातील आरटीओ कार्यालये दलाल-मुक्त करणार असल्याची घोषणा करून, त्यास दणकून प्रसिद्धी दिली. वाहन-परिवहन (आर टी ओ) विभाग भ्रष्टाचारी असून तेथील एजंट हेच त्या भ्रष्टाचाराचे कारण व माध्यम आहेत, असा समज करून देण्यासाठी परिवहन खाते प्रयत्नशील असावे. पण `अंदरकी बात' राज्यातल्या जनतेला ठाऊक आहे. आर टी ओ मधले एजंट बंद करण्यामुळे सरकारी बाबूंची खाबूगिरी कशी काय बंद होणार आहे?

उलट जनतेच्या सोयीसाठी तिथले एजंट उपयोगी असतात. तिथले काम दहा-पाच मिनिटांत होत असते तर बात वेगळी. एरवी कामाच्या माणसांनी स्वत:चा दिवस मोडून अशा कार्यालयातील साधे-किरकोळ काम करण्यात काय शहाणपणा? अशा एकाच कामासाठी समजू शंभर रुपये एजंट घेत असेल तर अशा दहावीस जणांची कामे एकत्रित करून त्याने त्याच्या दिवसाची कमाई करण्यात चूक काय?

एजंट केवळ आरटीओकडेच असतात काय? स्वत:चा खटला चालविण्यासाठी फी देऊन वकील नेमला तर तो एजंट नव्हे का? हल्ली तर काही ठिकाणी वकील लोक शब्दश: `एजंट' म्हणूनच काम करतात असे ऐकण्यात येते, खरे-खोटे ती आंधळी न्यायदेवता जाणे! महसूल, पोलिस अशा ठिकाणी कित्येक एजंट काम करीत असतात. विठ्ठल दरबारात दर्शनलाभासाठी एजंटगिरी करणारे बडवे तूर्त हटले, पण  तिथे नवे कोणीतरी बडवे येणारच. इतर देवस्थानी ते सरसकट आहेत. आपल्याला सवड नाही किंवा मंत्रोच्चारी कर्मकांड जमत नाही म्हणून आपल्याऐवजी अेकादष्णी-अभिषेक करणारा पुरोहित हा पैसे देऊन नेमलेला देवाचा एजंटच की!

स्वत:ऐवजी आपले काम करण्यासाठी पैसे देऊन नेमलेला मध्यस्थ, हे तर एजंट-किंवा दलालांचे सरळ व्यावसायिक स्वरूप आहे. हल्ली तर पोस्टात आवर्ती बचतीचे किंवा राष्ट्नीय सर्टिफिकेटचे पैसेही थेट भरून घेत नाहीत, ते एजंटकडून भरा म्हणतात. एजंटला मिळणारे ५-६ टक्के कमिशन थेट खातेदाराला द्यावे; किंवा फारतर देऊही नये. पण सरकारी बाबूंनी एजंटकडे लोकांना पिटाळण्याचा प्रघात आहे. कित्येक-बहुतांशी सर्वच व्यवहार एजंटमार्फत केले जातात. लग्न जमविण्यापासून अंत्यविधी वा मृत्यूपास काढून देण्यापर्यंत सर्वत्र मध्यस्थ-एजंट-दलाल आवश्यक व मान्यच असतो. एजंटला त्याचे कमीशन मिळत असेल तर ते त्याचे काम अधिकृत म्हणतात. तसे कमीशन नसेल तरी त्याचे काम ते तसेच असते, आणि त्यातून जनतेची सोयही होते; मग त्या एजंटने पैसे कुठून कसे मिळवावेत? ते पैसे जर आपल्या वेळेसाठी व सोयीसाठी लोक देत असतील तर त्यात बंदी घालण्याजोगे काय आहे? शासकीय नोंदणी अधिकाऱ्याच्या (रजिस्ट्नर) पडवीत मुद्रांकविक्रेते किंवा लेखनिक (बॉण्ड रायटर) बसलेले असतात. आपल्याला कोणती-काय शपथ किंवा प्रकटन करायचे ते त्यांनाच तर ठाऊक असते. एरवी कोणी कारखानदार किंवा प्राचार्य जरी तिथे गेला, तरी त्यास त्या सातवी झालेल्या डेस्कमालकाकडून लिहून घ्यावे लागते. त्याशिवाय आतले भाऊसाहेब मसुदा मान्य करत नाहीत. वेळ-कटकट वाचवायचा तो सोपा मार्ग असतो.

तिथे भ्रष्टाचार होतो, हे तर उघड गुपित आहे. पण त्या एजंटांकडून हप्ते घेण्याची पद्धत कशी बंद करायची हा अधिकाऱ्यांचा प्रश्न आहे. त्यांचा वचक खात्याच्या कर्मचाऱ्यांवर नाही, पण हे चालले बाहेरून येणारा भ्रष्टाचार रोखायला! भ्रष्टाचार होऊच शकणार नाही इतकी सक्षम व पारदर्शी कार्यपद्धती एकाही शासकीय कार्यालयात नाही. तिथले छापील फॉर्म वाचता जरी आले तरी तिथल्या कारकुनाच्या ललाटीची भाग्यरेखाही वाचता येईल. प्रत्येक ठिकाणी जाचक नियम, कामाचा लोंढा, सुस्त व बेजबाबदार कर्मचारी, नियमांत पळवाटा... हे सगळे तिथल्या एजंटने केलेले नाही. आपला व साहेबाचा हप्ता काढून का असेना, तिथले एजंट जनतेचा तापत्रय काही प्रमाणात वाचवत असतात.

त्यांना बंदी घालता येणार नाही. घातली तरी टिकणार नाही. जे नियम जनतेच्या हिताचे आहेत त्याचाही अंमल होत नाही, तिथे जनतेला हवीच असणारी व्यवस्था हुसकून लावण्याचा हट्ट कशासाठी? पण हे सरकार आणि ते अधिकारी असे की, रस्त्याचे खड्डे बुजवण्याचे आपले काम टाळून लोकांच्या टाळूवर हेलमेट घालणार! एसटीचे वेळापत्रकसुद्धा अद्ययावत् न ठेवता, खाजगी वाहतुकीवर आपला दोष ढकलणार!

नागरिकांना एजंटची गरज का भासते? देव जर प्रत्यक्ष समोर उभा ठाकला तर कोणता भक्त अभिषेकासाठी पुरोहित शोधेल? मंत्री जर लोकांदारी येऊन कामे सोपी करू लागला तर स्टुलावरच्या शिपायाला चिरीमिरी कोण कशाला देईल? आर टी ओ किंवा पोलिस कचेरीत जर किमान बसायला चांगलीशी जागा व पिण्याचे थंड पाणी असेल तरी लोक तिथे जातील. पण तितकीही तसदी कोणी घेत नसल्यामुळे तिथली कामे करण्यासाठी एजंटला पर्याय नाही. हल्ली तर वाहन चालविण्याचा परवानासुद्धा घरबसल्या एजंटमार्फत मिळतो म्हणतात. तसे असेल तर परिवहन आयुक्त तरी एजंट हटविण्यात किती गंभीर असतील हे लक्षात येते.

अधूनमधून असे कुणावर तरी खेकसणे चालू ठेवले तर शासनाचे अस्तित्व दिसते. मग कधी बडवे, कधी खाजगी सावकार, कधी वडापवाले अशांवर कडकलक्ष्मीचे आसूड फटकारतात. काळजीही अशी घ्यावी लागते की, आसूडाचा आवाज मोठा यावा, पण कुणाच्या देहाला इजा होऊ नये. फार तर त्यांच्याकडे लक्ष वेधण्यासाठी प्रसारमाध्यमांची ढोलकी बडवत ठेवली की काम होते. लोकांत लक्ष्मीचा धाक झाला तर सुपातून येणारे दाणे देवाच्या पेटाऱ्यापर्यंत चालत येतात. `एजंट हटाओ' ही घोषणा अशा नैमित्तिक गारूडखेळाचा एक प्रकार असावा.


कर्ता करविता तो!
`यज्ञ हे पाऊस पडण्याचे कारण आहे.' `मित्रांनी दिलेल्या भेटवस्तूमुळे भाऊंचा नातू शाळेच्या मैदानावर खेळताना पडून त्याला दुखापत झाली.' `पिवळे फूल दत्ताला वाहिले तर बदली झाली'...अशा प्रकारचे कार्यकारण संबंध मानणे सर्वथैव योग्य नाही. विज्ञानाच्या साहाय्याने त्यांचा कार्यकारण संबंध समजावून घेता आला पाहिजे.' असे प्रतिपादन प्रा.य.ना. वालावलकर यांनी एका वृत्तपत्रीय लेखात केले होते. बहुतेकजण त्याच्याशी सहमत होतील. पण ते वाचल्यावर `दैवं चैवात्रपंचमम् ।' आठवले. गीताप्रणित तत्त्वज्ञानात्मक कार्यकारण संबंधामध्ये दैव याचाही समावेश केला आहे. तेही लक्षात घ्यायला हवे. तत्त्वज्ञानात्मक कार्यकारण संबंध हा, वैज्ञानिक किंवा शास्त्रीय कार्यकारण संकल्पनेपेक्षा भिन्न आहे, कारण त्यामध्ये कर्ता-करविता व्यक्ती असते. दैव नावाचे कारण भगवद्गीता सांगते -
अधिष्ठान, अहंकार, तशी विविध साधने
वेगळाल्या क्रिया नाना   दैवे तेथ पाचवे
गीताई आवृत्ती २४७.२००६
दैव म्हणजे काय, ते गीतरहस्यामध्ये लोकमान्य सांंगतात; आपल्या प्रयत्नांस अनुकूल किंवा प्रतिकूल असणारे दुसरे असेही घटक असतात की त्यांची आपणास माहिती नसते. यालाच दैव म्हणतात व कार्य घडून येण्याचे हे पाचवे कारण आहे. मनुष्याचे प्रयत्न सफल होण्यास इतक्या सर्व गोष्टींची आवश्यकता असून त्यांपैकी पुष्कळ आपल्या ताब्यातल्या नसतात; अगर आपल्यास माहितीही जर नसतात तर `मी अमूक करीन' म्हणून अभिमान धरणे किंवा `माझ्या कर्माचे फल अमुकच व्हावे' अशी फलाशा ठेवणे मूर्खपणाचे लक्षण होय.
(गीतारहस्य पृ.५३२ आवृत्ती २०वी)
विज्ञानाने जो कार्यकारणसंंबंध निश्चित केला आहे, तिथे ईश्वराला कारण मानणे नि:संशय अयोग्य आहे. तसे मानणे ही अंधश्रद्धा आहे. परंतु सर्वच निसर्गव्यवहार शास्त्रांनी उलगडले नसून, जीवनात पुढे काय घडणार आहे हे आपणास माहीत नसल्याने, आपण लोकमान्यप्रणित दैव मानतो. संपूर्ण विश्वाचे रहस्य उलगडेल तेव्हा उलगडेल, तोपर्यंत काही बाबतीत कर्ता करवित्यावर श्रद्धा अपरिहार्य आहे. विज्ञानाने कार्यकारणसंबंध निश्चित केला असतो, तिथे लोकमान्यप्रणित; किंवा लौकिक भाषेतील दैव मानण्याचा प्रश्न उद्भवत नाही; यादृष्टीने प्रा. वालावलकरांचे ते प्रतिपादन योग्यच आहे.
- र.ग.दांडेकर,

आग विझवण्यासाठी पाणी कशाला?
इंधन, उष्णता आणि ऑक्सिजन या गोष्टी आगीच्या ठिकाणी एकत्रित असतात. आग विझवायची असेल तर या तीनपैकी एक बाब नाहीशी करावी लागते. कार्यालयांत आग विझवण्यासाठी तांबडी नळकांडी (फायर एक्स्टिंग्विशर) ठेवलेला असतो. त्यात कार्बन डायऑक्साइड किंवा कोरडी रसायनं (नायट्नेजन, सोडियम बायकार्बोनेट) असतात. त्यांचं मुख्य काम म्हणजे आगीला ऑक्सिजनचा पुरवठा होण्यास अडथळा निर्माण करणं. कार्बन डायऑक्साइड ऑक्सिजनपेक्षा जड असतो. कार्बन डायऑक्साइड ज्वलनास मदत करीत नाही. ऑक्सिजनची जागा कार्बन डायऑक्साइडनं घेतल्यानं आग विझते.
आग जर मोठी असेल, तर अग्निशामक बंबातून आगीवर पाण्याचा वर्षाव केला जातो. पाणी म्हणजे हायड्नेजन आणि ऑक्सिजनचं संयुग. हायड्नेजन हा ज्वालाग्राही आहे, तर ऑक्सिजन ज्वलनास मदत करतो. असं असताना एकत्र आल्यावर हे संयुग आग विझवण्याचं काम करतं. कसं?
पाण्याचा उत्कलनबिंदू समुद्रसपाटीजवळ १०० अंश सेल्सियस असतो. पेटत्या पदार्थाचं तापमान १००० ते १५०० अंश सेल्सियसपेक्षा जास्त असू शकतं. जेव्हा पाणी या पेटत्या पदार्थांवर पडतं, तेव्हा त्याची वाफ होते. पाण्याची पुरेशी वाफ होण्यासाठी त्यापेक्षा बरंच अधिक तापमान असावं लागतं. पाणी ज्या वेळी या पेटत्या पदार्थावर पडतं, त्यावेळी त्या पदार्थाची उष्णता, पाण्याची वाफ होण्यासाठी पाण्यात संक्रेमत होते. पाण्याची वाफ झाल्यावर ही वाफ पेटत्या पदार्थाच्या सभोवतालचा बराच मोठा प्रदेश व्यापून टाकते. पेटत्या पदार्थावर वाफेचं आवरण तयार होतं आणि ज्वलनास आवश्यक असलेल्या बाहेरील हवेतील ऑक्सिजनचा पुरवठा बंद होतो. ऑक्सिजन न मिळाल्यानं पाणी टाकल्यावर आग आटोक्यात येते.
(मराठी विज्ञान परिषद-पत्रिका)


`तो' आणि मी 
साधारण १९५४ ते १९५८ चा काळ! कुरुंदवाड येथे लेले वकीलांच्या वाड्यात आमचे बिऱ्हाड होते. मोठं स्वयंपाकघर आणि माडीवरची प्रशस्त खोली आमच्याकडे आणि बाकी पाच खोल्यांचा वाडा लेले कुटुंबासाठी, अशा विभागण्या होत्या. दोन्ही कुटुंबे दूरच्या नात्यातली. त्यामुळे एकाच घरातलं हे वेगळं वास्तव्य सोय आणि सोबत म्हणून दोघांनीही स्वीकारलेलं होतं.
माझ्या पाठच्या भावाचा जन्म ऑगस्ट १९५६ मधला. त्याचीच ही गोष्ट. धुवाँधार पावसामुळे शेजारच्या आनेवाडीला (पंचगंगेचा हा एक फाटा) पूर आलेला. पुराचं पाणी गावभर पसरत वाड्याच्या मुख्य उंबऱ्याला लागलेलं. आईचे दिवस भरत आले होते. अशा अवस्थेमुळे मुलांना माडीवर झोपवून दोन्ही कुटुंबातली मोठी माणसं रात्रभर जागीच होती. त्या काळी बाळंतपणाला सुईणच घरी यायची. पण या पुरात ती येणार कशी?
``दादा आता काय करायचं?'' लेले वकील बाबांना म्हणाले. बाबांनी आईकडे पाहिलं. निदान वरकरणी ती शांतच होती.
``आपण काय करणार? होईल ते पाहात राहायचं.'' ती म्हणाली. लेलेकाकू तिच्या जवळच बसल्या होत्या.
``पण अचानक गंभीर परिस्थिती निर्माण झाली तर?'' त्या म्हणाल्या.
``त्याचा भार दत्तमहाराजांवर. संकट नाही यायचं आणि आलं तरी शेवटी त्याचं निवारणही तेच करतील.'' आईच्या शब्दांमुळे इतरांच्या मनावरचं ओझं थोडंतरी हलकं झालं, आश्चर्य म्हणजे मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर ओसरत गेला. फटफटीत उजाडेपर्यंत पाण्यानं अंगण रिकामं केलं होतं. आईच्या अवघडलेपणाचं ओझं सुईणीच्या मनावरही होतंच. सकाळीच ती कमरेपर्यंतच्या पाण्यातून चिंब भिजल्या अवस्थेत आमच्या घरी येऊन पोचली. दुसऱ्या दिवशी दुपारी बाळाचा सुखरूप जन्म झाला.
हे असं सगळं पार पडलं खरं, पण पुढचे दोन-तीन दिवस रात्र सर्वांची झोप उडविणारे ठरले. बाळ रडू लागलं की इतकं कर्कश्श रडायचं की, बघताबघता त्याचा वरचा श्वास वर आणि खालचा श्वास खाली अशी गत व्हायची. त्या अवस्थेत त्याने डोळे पांढरे केले, तेव्हा सुईण अंगाला लावायला आलेलीच होती. प्रसंगावधान राखून तिने गार पाण्याचा तांब्या बाळाच्या डोक्यावर ओतला, तेव्हा कुठे त्याचा श्वास मोकळा झाला. असंच पुढे चार-सहा महिन्यांच्या अवधीत एकदोनदा झालं.
बाबा एके दिवशी नरसोबावाडीला जाऊन परत आले. आम्हा मुलांची जेवणं आवरत आली होती. बाळ पाळण्यात झोपलेलं आणि आई चुलीसमोर भाकरी करत बसलेली. तेवढ्यात जागं झालेलं बाळ पाळण्यात रडू लागलं. त्याला खूप वेळ रडू द्यायचं नाही हे आता सवयीनं आईच्या अंगवळणी पडलं  होतं. पुढे ओढलेल्या लाकडांवर पाणी शिंपडेपर्यंत जो वेळ गेला असेल तोच. खरकट्या हातानं तशीच ती पाळण्याकडे झेपावली. पण? बाळाला उचलून घेण्यापूर्वीच त्याला श्वास लागला होता. जेवण तसंच टाकून वडीलही समोरचा पाण्याचा तांब्या घेऊन पुढे झेपावले. दोन तांबे डोक्यावर ओतूनही श्वास मोकळा झालाच नाही. पांढरे केलेले डोळे अलगद मिटत बाळ शांत झालं होतं. आईला तर ब्रह्मांड आठवलं. लेलेकाकूंना बोलवायला पाठवलं. काका-काकू येईपर्यंत `मी डॉक्टरला घेऊन येतोच' म्हणत अंगात शर्ट अडकवून बाबा बाहेर धावले.
डॉक्टर आले. त्यांनी नाडी पाहिली. छातीला हलक्या हाताने मसाज केला. डोळयाचं कातडं नाजूक हाताने वर उचलून पाहिलं आणि एकाएकी गंभीर झाले. ``तुम्ही शांत रहा. जेवणं आवरून घ्या. मी इंजेक्शन देतो. त्यापलीकडं आता काही करणं शक्य नाही. मी वकीलसाहेबांशी बोलतो. डोण्ट वरी.'' इंजेक्शन देऊन ते गेले. पाठोपाठ लेले काकाही गेले. बऱ्याच वेळाने काका तीन पुड्या घेऊन आले. त्यांचाही स्वर कातर झाला होता. ``आम्ही जागेच आहोत. काही मदत लागली तर लगेच हाक मारा.'' ते निघाले. पाठोपाठ आईला धीर देऊन काकूही उठल्या. जड पावलांनी दोघेही निघून गेले. आई बाळाला मांडीवर घेऊन तशीच बसून राहिली आणि बाबा डोळे मिटून देवासमोर! दोघेही उपाशीपोटी  रात्रभर तसेच बसून राहिले. पहाटे पहाटे आईचा नकळत डोळा लागला क्षणभर आणि बाळाच्या आवाजाने ती जागी झाली. पाहिलं तर तिच्या मांडीवर हातपाय हलवत बाळ मजेत खेळत होतं.
आईची हाक ऐकून बाबाही बाळाकडे धावले. दोघांच्याही मनावरचं मणामणाचं ओझं अलगद उतरलं. रात्रभराच्या जागरणाचा शीण कुठल्याकुठे विरून गेला. पण या आनंदात लपून राहिलेलं, थक्क करणारं आश्चर्य त्यांना जाणवलं, ते सकाळी लेलेकाका-काकूंकडून रात्रीची हकीकत समजली तेव्हा!
ते दोघे सकाळीच आमच्याकडे आले आणि बाळाला खेळताना पाहून थक्कच झाले. काकूंचे डोळे भरूनच आले एकदम.
``नशीबवान आहात तुम्ही.'' त्या म्हणाल्या.
``अहो नशीबवान कसलं? नेमक्या वेळी तुम्ही दोघे मदतीला धावलात. क्षणाचाही विलंब न लावता डॉक्टरही आले. म्हणून तर बाळ वाचला.'' आईचं बोलणं ऐकून सगळं कसं सांगावं काकूंना समजेना.
``नाही वहिनी.'' मग लेले काका बोलू लागले.
``आम्ही सारे फक्त निमित्त होतो. बाळ नुसतं वाचलं नाहीए, ते जाऊन परत आलंय.''
``म्हणजे?'' बाबांनी न समजून विचारलं.
``बाळ बेशुद्ध पडलंय असं आपल्याला वाटलं होतं. पण ते तसं नव्हतं. त्याची नाडी लागत नव्हती, श्वासही थांबला होता. डॉक्टरांनी त्याला तपासलं तेव्हाच हे ओळखलं होतं. पण तुमची जेवणं व्हायची होती म्हणून ते तेव्हा काही बोलले नाहीत. इंजेक्शन द्यायचा देखावासुद्धा तुम्हाला बरं वाटावं म्हणून होता. मला बाहेर नेऊन डॉक्टरांनी या सगळयाची कल्पना दिली आणि तुमची जेवणं आवरताच तुम्हाला सगळं सांगायची जबाबदारी माझ्यावर टाकून ते गेले.''
``कसं शक्य आहे? मग त्यांनी दिलेल्या औषधाच्या पुड्या?'' बाबांनी विचारले.
लेलेकाका सावरले होते. पण जे घडलं ते सांगताना मात्र त्यांचा आवाज नकळत भरून येत होता. ``ते औषध नव्हतं. दत्ताचा अंगारा होता. डॉक्टरांचा निरोप जसाच्या तसा तुम्हाला सांगण्याचं धाडस माझ्याजवळ नव्हतं, म्हणून मी केलेला तो वेळकाढूपणा होता. त्या पुड्या डॉक्टरांनी दिलेल्या नव्हत्या. काल इथून गेलो त्या क्षणापासून तुमची केव्हाही हाक येईल म्हणून रात्रभर टक्क जागेच होतो आम्ही. आत्ता सकाळी आलो ते पुढचं सगळं अभद्र निस्तरायच्या तयारीने! जीव मुठीत धरूनच आलो होतो! दादा तुम्हा दोघांच्या अतूट श्रद्धेमुळेच हा चमत्कार घडलाय.''
तो चमत्कार होता की नाही माहीत नाही, पण घडलं ते सगळं अनाकलनीय होतं एवढं मात्र खरं!
- अरविंद लिमये, `त्रिदल' विनायकनगर, हरीपूर रोड, सांगली (मोबा.९८२३७३८२८८)

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन