Skip to main content

23March2015

गदिमा रचित गीतरामायण १९५५ सालच्या रामनवमीला 
आकाशवाणीवरून प्रसारित होऊ लागले, त्यास ६० वर्षांचा अवधी उलटला. 
येत्या रामनवमीच्या निमित्ताने अजरामर गीतमालेविषयी....
वाल्मिकीच्या भास्कराचे, होई चांदणे मराठी
एखाद्या गीतसमूहाचे गारूड लक्षावधी जनतेच्या मनावर वर्षानुवर्षे टिकावे हा दैवी चमत्कार. १९५५-५६ सालातील ते गारूड आज हीरक महोत्सव साजरा करीत आहे. केवळ ५६ अप्रतिम सुंदर व अर्थवाही गीतांत गदिमांनी ही किमया केली.
१९५२-५३पर्यंत गदिमा चित्रपट क्षेत्रात लेखक आणि गीतकार म्हणून सुप्रतिष्ठित झाले होते. पुरेसे पैसे, प्रसिद्धी मिळूनही त्यांच्यातील अभिजात कवीला एक खंत होती की, आपल्या हातून अमर अशी कलाकृती निर्माण झाली नाही. १९५४ साली इंदूरला झालेल्या विभागीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तेथील महाकालीच्या मंदिरात गेले असताना त्यांनी देवीजवळ मनोमन प्रार्थना केली. आकाशवाणी पुणे केंद्र १९५३ साली पुण्यात सुरू झाले होते. त्याचे अधिकारी म्हणून आलेले रसिकाग्रणी सीताकांत लाड गदिमांचे स्नेही होते. या भेटीतील गप्पांमधून अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळे. गदिमांच्या आईचा रामायणाचा व्यासंग होता. त्यांचे एक मामा रामदासी होऊन रामसेवेत होते. या साऱ्यांचे संस्कार लहानपणापासून त्यांचेवर होते. त्या संस्कारांच्या उजळणीत भारलेल्या गदिमांनी काही ओळी लिहून सीताकांतांपुढे टाकल्या.
अजाणतेपणी केव्हां, माता घाली बाळगुटी
बीजधर्माच्या द्रुमाचे, कणकण गेले पोटी
छंद अजाणतेपणीचा, तीर्थे काव्याची धुंडिली
कोणा एका भाग्यवेळी, पूजा रामाची मांडिली
देववाणीतले ओज, शीतळले माझ्या ओठी
वाल्मिकीच्या भास्कराचे, होई चांदणे मराठी
झंकारती कंठवीणा, येती चांदण्याला सूर
भाव माधुर्याला येई, महाराष्ट्नी महापूर
या ओळी वाचून लाड मोहरून गेले आणि म्हणाले, ``आण्णा, आता तुम्ही संपूर्ण रामकथा गीतरूपात लिहायची आणि ती आकाशवाणीवरून सादर करायची.'' त्याच क्षणी जणू नियतीने हुंकार भरला. ही कल्पना त्यांनी उचलून धरली आणि पुढेही लाड यांनी सातत्याने प्रोत्साहन दिले.
गदिमांनी गीते लिहून बाबूजींनी ती संगीतबद्ध करायची, १९५५च्या रामनवमीला प्रारंभ आणि १९५६च्या रामनवमीला सांगता करायची हेही ठरले. म्हणजे एकूण ५६ (अधिक महिन्यामुळे ५२ ऐवजी ५६) गीतात संपूर्ण रामायण पूर्ण करायचे होते आणि प्रारंभ करायला हाताशी वेळ होता, जेमतेम पंधरा दिवसांचा! तरी लाड, गदिमा आणि बाबूजी या तिघांनाही आपण हे उत्तम करू असा ठाम विश्वास होता. कारण देव, दैव आणि स्वप्रतिभा यावर त्यांची श्रद्धा होती, असेच म्हटले पाहिजे.
पहिल्या गीताच्या प्रसारणापासूनच याचा प्रत्यय आला. गीत प्रसारणापूर्वी वीस मिनिटे गदिमांनी `कुश-लव रामायण गाती' लिहून दिले. बाबूजींनी ते लगेच संगीतबद्ध करून गायलेदेखील आणि श्रोत्यांनी डोक्यावरही घेतले. या तिघांच्याही असीम श्रद्धेचाच तो प्रत्यय होता. अनेकदा गीत दोन दिवसच आधी तयार होई व बाबूजींना संगीताला एखादाच दिवस मिळे.
गदिमांसमोर गीते लिहिताना दोन गोष्टी निश्चित होत्या, मूळ वाल्मिकी रामायण आणि ५६ गीतांची मर्यादा! रामायणातील ठळक प्रसंग घ्यायचा विचार त्यांनी मनात केला, आणि जसजसे पुढे जाऊ तसे पाहू असेच ठरविले असावे. प्रारंभीची काही गीते पाहिली तर ती रामायणाचे मराठी रूपांतर आहे हे जाणवते. मूळ श्लोकांना मराठी शब्दकळा चढविताना ती सुभग, प्रवाही आणि गेय असेल हे त्यांनी पाहिले. सिनेगीतांचा उदंड अनुभव असल्याने त्यांचे शब्द सहजपणे लयबद्ध (ज्याला गाण्याच्या भाषेत `मीटर'मध्ये म्हणतात) येत गेले. ते होताना त्यांनी काहीवेळा खास मराठमोळे सुंदर शब्द त्यामध्ये गुंफले. दुसऱ्या गीतात तीन्ही राण्या सवती असूनही सवतीमत्सर नव्हता यासाठी त्यांनी `प्रीतीसंगमी' या एकाच शब्दात तो भाव आणला, तर सहाव्या गीतात `कर्ण्यांचे कंठ तापले' असे म्हटले. `उगा कां काळीज माझे उले' या गीतातील `उले' हा शब्द असाच अप्रतिम आहे. गीतांचा हा प्रवास जसजसा पुढे सरकू लागला तसतसे गदिमांना प्रभुत्व येत गेले आणि त्यांनी वाल्मिकींच्या श्लोकांचा नाममात्र आधार घेऊन जवळजवळ स्वतंत्रच गीते रचली. `आनंद सांगू किती'(१३), नको रे जाऊ रामराया(१५), थांब सुमंता(१८), दाटला चहुकडे अंधार(२२) ही गीते त्या निष्कर्षाला पुष्टी देतात.
महत्त्वाचे सर्व प्रसंग गीत रामायणात आले आहेत. पिचत आधीच्या गीतात एखादा संदर्भ राहिला आहे. त्या त्या वेळी धावपळीत ती रचलेली असल्याने, आणि संपूर्ण आकृतीबंध प्रारंभापूर्वी तयार नसल्याने असे होणे स्वाभाविक होते. पण गदिमांचे मोठेपण असे की, त्यांनी तो राहिलेला संदर्भ नंतर लक्षात आल्यावर अचूकपणे नंतर एखाद्या गीतात आणला आहे. श्रावणबाळाचा वध दशरथाच्या हातून चुकून होतो व तो श्रावणबाळाच्या पित्याच्या `तूही पुत्राशोकाने विव्हळ होशील' या शापाने दंडित होतो. हा उल्लेख दुसऱ्या तिसऱ्या गीतातच हवा होता. तो राहून गेल्याचे पुढे जाणवल्यावर गदिमांनी चक्क २२वे गीत रचून तो सर्व भाग यथायोग्य समाविष्ट केला.
प्रत्येक गीतापूर्वी प्रसारित करावयाचे निवेदनही गदिमाच लिहून देत असत. पुरुषोत्तम जोशी आपल्या भारदार आणि भावानुकूल आवाजात ते प्रसारित करीत. मागील प्रसंगाच्या गीतापासून पुढच्या गीतापर्यंतचा मधला कथाभाग गदिमांनी त्या निवेदनात अचूकपणे आणलेला आहे. त्याशिवाय ५६ गीतांत संपूर्ण रामायण आणणे शक्य नाही याची पक्की जाणीव त्यांना पहिल्यापासून होती याचेच ते प्रत्यंतर आहे. याशिवाय रामायणातील मूळ श्लोकांची संख्या ज्या प्रसंगात खूप आहे तेथे त्यावरील गीत लिहिताना त्यांनी, `मोडू नका वचनास(१४)' किंवा `बोलले इतुके मज श्रीराम(२१)' अशा गीतात संक्षेपही केला आहे आणि तोही मूळ आशय आणि भावनांना धक्का न देता! त्राटिका रावणाकडे जाऊन `सूड घे त्याचा लंकापति(२८)' म्हणून सांगते. याच्या मूळ रामायणातील श्लोकात सीतेच्या सौंदर्याचे वर्णन खूपच सविस्तर, किंचित शृंगारिक वाटेल असे आहे. गदिमांनी अतिशय कुशाग्रपणे ते टाळून `जनककन्यका रतिहुन सुंदर' अशा मोजक्या शब्दांत संयत रीतीने केले आहे.
ही गीते लिहिताना गदिमांनी रामायणात नसलेल्या पण जनमानसात रूढ असलेल्या काही संकल्पनांचा समावेश केला आहेे. अहिल्या मुक्तीचे `आज मी शापमुक्त जाहले(११)' आणि `धन्य मी शबरी श्रीरामा(३४)' या दोन्ही प्रसंगात मूळ रामायणात अहिल्या शिळा असल्याचा किंवा शबरीने उष्टी बोरे दिल्याचा उल्लेख नाही. पण त्या लोकप्रिय आख्यायिकांना गदिमांनी मनोज्ञ रीतीने स्थान दिले आहे. तसेच रामायणात नसलेला लोकशाहीचा आधुनिक संदेश त्यांनी `लोकसाक्ष शुद्धी झाली सती जानकीची(५१)' या गीतात लोकपाल, लोकशक्ती, लोकमान्यता आणि लोकनायक हे शब्द गुंफून केला आहे. रामायणाशी इमान राखतानाच वर्तमानाकडेही सहज निर्देश करण्यात त्यांचे द्रष्टे कवित्व जाणवते. चित्रपटकथा लिहिण्यात आलेल्या प्रावीण्यामुळे समूहगीतांची योजना (स्पेसिंग)सुद्धा सहजपणे अचूक अंतराने
गीत रामायणातील सर्वात लोकप्रिय, अर्थपूर्ण, भावनांना हात घालून वैश्विक सत्य सांगणारे गीत म्हणजे `पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा' हे होय. गदिमांनी ते इतक्या उंचीवर नेले आहे की ऐकताना अनेकांचे डोळे पाणावतात. मात्र त्याचा आधार मूळ रामायणातील श्लोकांचाच आहे. गदिमांनी आपली प्रतिभा व शब्दसामर्थ्याने जणू पूर्णपणे स्वतंत्र वाटावे असे रूप त्याला दिले आहे.
ही सर्व गीते सहज सुखासुखी होत नव्हती. त्यामागे गदिमांची प्रचंड तपश्चर्या व उदंड प्रतिभा होती. तरीही कधीतरी एखाद्या गीताला गाडी अडे. मग सीताकांत लाडांना त्यांचा पिच्छा पुरवावा लागे. कारण गीत आल्याशिवाय बाबूजी संगीतबद्ध केव्हा आणि कसे करणार? कधी त्यावरून गदिमा आणि बाबूजी यांच्यात वाद होई. सीताकांतांना दोघांचीही समजूत घालावी लागे. पण मुळात गदिमा व बाबूजी या दोघांची मैत्री अनेक वर्षांची होती. एकमेकांचे स्वभाव, गुण-दोष माहीत होते. पण एकमेकांच्या प्रतिभेबद्दल तेवढाच आदर आणि विश्वास होता. त्यामुळे हे रुसवे-फुगवे तत्कालिक असत. शिवाय  हे श्रीरामप्रभूचे काम त्याच्याच कृपेने आपण करीत आहोत अशी दोघांचीही दृढ श्रद्धा होती. त्या दोघांनीही गीत रामायणाचे श्रेय त्या श्रीरामाबरोबरच त्यांचा पाठपुरावा करणाऱ्या सीताकांत (म्हणजेच श्रीराम) लाड यांनाही पुढे अनेकदा जाहीररित्या दिले आहे.
देव आणि दैव यांच्या कृपाप्रसादाने हे अजरामर `गीत रामायण' आपल्या हातून साकारले अशीच त्या तिघांचीही विनम्र भावना होती. आज त्या अपूर्व महाकाव्याचा हीरक महोत्सवी सोहळा साजरा होताना ते तिघेही आपणात नसले तरी त्यांची स्मृती मराठी मनांत अजरामरच आहे.
- अरुण गोडबोले,
६९, शनिवार पेठ, सातारा ४१५००२
मोबा. ९८२२०१६२९९

विरोध की अडेलपणा
नव्या सरकारचा कोणताही धोरणात्मक निर्णय साफ चुकीचा आणि जनताविरोधी असल्याचा कांगावा काँग्रेस पक्षाने केंद्रस्थानी चालविला आहे. वास्तविक भारतीय जनता पक्षाचे २८२, आणि अजून तरी त्यांच्या आघाडीत असणारे इतर मित्रपक्ष लोकसभेत संख्येने ३३३ आहेत; त्या तुलनेत काँग्रेस आपल्या ४४ संख्येमुळे `बिचारी' ठरली आहे. त्यातही सोनियांची उपस्थिती यथातथा, तर थोर नेते राहुलजींचे चिंतन अद्यापि संपलेले नाही. थोडक्यात म्हणजे काँग्रेसची दुर्दशा असताना, देशभरच्या जनतेचे जे काही हित करायला हवे, त्याची चिंता केवळ त्याच एका पक्षाला असल्याप्रमाणे प्रत्येक निर्णयाला आडवे पडायचा प्रयत्न त्या पक्षाने चालविला आहे, तो निषेधार्ह आहे. अर्थात् तो पक्ष सत्तेवर असताना भारतीय जनता पक्षाने याच प्रकारे लोकसभा धिंगाण्याने रोखून धरण्याचा पराक्रम केला होता; आणि संसदीय लोकशाही किंवा कामकाजाचा मोलाचा वेळ, याबद्दलचे डोस तेव्हाचे विरोधक आज सत्तेवरून पाजत आहेत, ही मौज आहे.

भूमी अधिग्रहण विधेयकाला मंजुरी मिळून त्याचे रूपांतर कायद्यात झाल्याशिवाय, आजच्या व्याख्येतील विकास होऊ शकत नाही हे तर सरळ तार्किक आहे. कारखाने, विमानतळ, धरणे, अणुभट्ट्या, रुंद रस्ते किंवा घरांच्या वसाहती हे सगळे वेगावेगाने व्हायचे असेल तर त्यासाठी जमीन हवी. परदेशी कंपन्यांना इथे येऊन गुंतवणूक करण्यास आवतण द्यायचे तर त्यांना इथली जमीन मिळवून द्यायला हवी. ती देताना प्रत्येक भूमीधारकाला काही आंतरिक वेदना होणार हे स्वाभाविक आहे.

आपल्याच बापजाद्यांचे मोडकळीला आलेले घर पाहून, तिथे नवा इमला उठवायचा असला तरी, जुन्या घरावर पहार चालवताना डोळे पाणावतात हा मनुष्यस्वभाव आहे. पण तरीही त्या जीर्ण छप्परभिंतीशी कुणी कायमचे राहू शकत नाही. त्या भिंती जाड होत्या, उन्हाळयात थंड राहात असत, तिथे आजीची माया नांदत होती... अशा आनंदनिधानाच्या जागी आता चकचकीत काँक्रीटची ३बीएचके होणार, या परिवर्तनास आपण एकदा `विकास' असे म्हटले आहे.

देशाच्या प्रगतीची तुलना त्या आधुनिक मोजपट्टीने होणार हे आता ठरून गेले आहे. आता रसायने-धूर-गजबजाट यांचा सराव करणे भाग आहे. तो कमी व्हायचा असेल तर त्या `विकासा'ला काहीतरी नियोजन, काही शिस्त, संयम हवा. आणि ते होण्यासाठी प्रशस्त जमीन हवी. ती त्या विकासाकरिता मिळवून द्यायला हवी, यात गैर नाही.

इथे भूमीपुत्रांच्या भावनांवर राजकारणी आंदोलने सुरू आहेत. हातात काही अधिकार नाही व डोक्यावरती काही जबाबदारी नाही; असे झाल्यामुळे सगळया विरोधकांच्या आंदोलनांची भाषा आक्रस्ताळी वा भलतीच करुणाघन बनते. भूमीपुत्रांची भूमातेविषयीची भावना, वेदना अवश्य समजली पाहिजे. त्यांचे काडीमात्र नुकसान होऊ नये, तसेच त्यांचे पुनर्वसन सन्मानाने-जिव्हाळयाने-कर्तव्याने व्हायला हवे यात कुणाचा वाद नाही. पण त्यांचा कळवळा करणाऱ्यांनी आजपर्यंतचे प्रकल्प कसे राबविले हे निदान ते विस्थापित तरी विसरलेले नाहीत. त्यांचे प्रश्न सुटलेच पाहिजेत. इतके सर्व करूनही जे भूमीधारक किंवा त्यांचे कोणी तारणहार मोठ्या प्रकल्पांतून येणाऱ्या विकासाआड येत असतील तर कोणत्याही पक्षाचे सरकार ते ऐकणार नाही; ऐकून चालणार नाही. `रारंगढांग' या कादंबरीतील वाक्य असे की, `पोलो चा सामना जिंकायचा असेल तर घोड्याची कणव करून चालत नाही.'

या अल्पसंख्य व अल्पहेतूच्या आंदोलकांमागे फार मोठी लोकशक्ती अर्थातच नसते. कितीही दुर्बळ वा मागास माणूस असला तरी त्यास स्वार्थ कळतोच. जमिनींच्या किंमती अस्मानाला भिडल्याच आहेत. त्या मिळाल्या तर त्या पैशाचा विनियोग करण्याचे शिक्षण भूमीपुत्रांना द्यायला हवे. काही वर्षांपूर्वीचा गरीब बिचारा शेतकरी आता श्रीमंत होईल, त्याला चांगली गुंतवणूक करता यायला हवी. दुष्काळी ओसाड मुलखात माणसांना जगणे कठीण होते; तिथल्या माळावर कंपन्यांच्या पवनचक्क्या येऊ लागल्या. ज्यांच्या जमिनींचा शेतसारा भरणे शक्य नव्हते, त्यांना एकदोन गुंठ्यास लाखात किंमत येऊ लागली. त्या गावांतून दारूची दुकाने आणि मटका-जुगाराचे अड्डे फोफावले आहेत. प्यायला पाणी नाही, पण पितळी मुठीच्या फेर्नचरने तिथले दिवाणखाने सजले आहेत. इथे वास्तविक त्या आंदोलकांनी पोचले पाहिजे. भूमी देण्याला विरोध करण्याऐवजी भविष्याची संपन्न विधायक तरतूद शिकवली पाहिजे.

भूमी अधिग्रहण (अॅपयर) करण्याला नव्या जगात पर्याय नाही. जे मोठे प्रकल्प येऊ घातले आहेत, ते व्हावेत की नकोत हा वाद असल्या गळेकाढू समाजचिंतकांना पेलणार नाही. इथल्या भाला-बरच्याधारी आणि आपट्याची पाने सोने म्हणून लुटणाऱ्या देशी राजेरजवाड्यांच्या पायाशी रयतेचे इमान व निष्ठा होत्या; पण बंदुका व आधुनिक कवायती फौजेने त्यांच्यासह सगळा देश जिंकून घेतला हा इतिहास फार जुना नाही. नव्या आर्थिक युगात कवायती फौजेच्या जागी चोख रोख व्यवहारवादी बाजारव्यवस्था चालून येत आहे. इथल्या समाजवादाची जीर्ण वस्त्रे आणि टाकदौत-नांगर यांचा व्यवसाय पार संपून जाईल. इथे आता श्रीमंतीची स्पर्धा लागणार.

गरीब भूमिपुत्र किंवा देशी व्यवसाय संपून जाणे योग्य की चूक हा निर्णय भावनांच्या आधारे घेतला जाऊ शकत नाही. सबळांचा हा दुर्बळांवर अत्याचार वगैरे नव्हे. कंपन्या लुटारू असतील तर त्यांना लुबाडून आपली पिढ्यांची धन करावी, ती संवर्धन करावी. दुर्बळ जर या आंदोलकांच्या नादी लागून `विकासा'ला आडवेच पडू लागले तर चिरडून जातील अशी भीती आहे. त्यापेक्षा त्यांना पुरेपूर मोबदल्याने सबळ करून बाजूला करावे आणि त्यांनाही उत्तम जगायला शिकवावे. तोच भविष्यातील समाजवाद ठरेल.
***

स्वच्छता अभियान
स्वच्छता...! साफसफाई
चांंगलं हाय.... पण....
आडगळीतनं काढलंं न्
गावागावांत धाडलंं
अशी गत झाल्या त्येची
दावायच्या दातावाणी...
आन् गरज बी हाय,
देशाच्या तब्बेतीसाठी...
तसं नव्हं... आत्ता देशाची हालत कशी हाय?
बघितला तर छान दिसतोय,
अन् अनुभवला तर घान भासतोय.
सत्यानास केलाय कर्म धर्म राजकारणानं
तवा राबवायच लागणार अभियान..
सम्दा भारत किलीन करायचाय, राबवाया नको?
स्वच्छतेनं म्हणं मन प्रसन्न राहतं,
सुद्रूढ शरीरात सशक्त मन राहतं
ऐकत आल्या जलमल्यापास्नं,
पण केलाय कधी इचार मनाचा....
त्यावर व्हणाऱ्या घावाचा न् पिडणाऱ्या घालमेलीचा...
यळ कुणाला हाय इचार कराया,
नुसतं म्होरं जायाचं हाय... कायबी करून...
यळ पडल्याव यकाद्याच्या नरडीव पाय दिवून.
नुसता झाडू घिवून फुटू काढायचा,
झायरात, परचार, अन् राजकारण करायचं,
आन् पाठ थोपटून घ्यायची... सवताचीच.
पण त्येच्यापुढं काय?
मनाच्या स्वच्छतेचं काय?
कसा काढणार फुटू न्
कशी मिळवणार पाठीव थाप?
आवं...मनावर जमल्याली भ्रष्टाचाराची जळमाटं
मास्तरानी नावाला फासलेला काळीमा
सख्या बापाच्या अंगातला हैवान
धर्माच्या आडनं बुवा-बाबांचं पाप
कसं किलीन व्हणार हे?
सरकारी हापीस म्हंजी तर
अडवणूक न् पिळवणूकीचा आड्डा
संस्कृतीचं, गुरूपरंपरेचं, बंधुभाव प्रेम समभावाचं
हाय कुणाला भान?
कुठं निघालुया आपूण.....?
लाज वाटाया पायजे.
दिल्याला सबुत बी पाळायचा नाय
नुस्ता स्वार्थ आन् मतलब..! ब्बास..!
बरबाटल्यात सारी मनं
खरं म्हणजी स्वच्छता पायजे ती ह्याची
पण हुतय का आसं?
कारण मनाचा फुटू काढाया यत न्हाय,
मिरवाया यत न्हाय.
यासाठनं मनानंच घ्याया व्हवं,
हे सम्द स्वच्छ व्हाया व्हवं
पण त्येचं कुणाला पडलंय?
त्यासाठी गरज हाय थोडासा स्वार्थ
न् थोडासा त्याग करायची
आचार-इचारानं आतभायरनं बदलायची.
आन् मग बगा.... कसा व्हतुया आपला भारत.
तवाच आधिकार हाय म्हणाया,
`माझा भारत, स्वच्छ भारत, महान भारत.'
- बी.एस.पवार, विंग (ता.कराड, जि.सातारा)
मोबा.९४२१३९७७७५


देवदासींच्या १५८ मुली बारावीच्या परीक्षेला
वंचित देवदासी आणि त्यांच्या मुलींच्या उत्थानासाठी योजना राबवल्या जात असल्या तरी साऱ्या देवदासींपर्यंत पोचत नाहीत. अलीकडे देवदासींच्या मुलींच्या जीवनात नवा आशेचा किरण दिसू लागला आहे. त्याचे कारण म्हणजे त्यांनी चोखाळलेली शिक्षणाची वाट. शाळेतच न जाणाऱ्या मुलींना शाळेकडे वळवण्याच्या प्रयत्नांना यश येऊ लागले असून यंदा बेळगाव भागातील देवदासींच्या १५८ मुलींनी बारावीची परीक्षा दिली आहे.
देवदासींच्या मुली शिक्षणासाठी पुढे येत आहे, हा एक सकारात्मक बदल आहे. बारावी उत्तीर्ण होणाऱ्या देवदासींच्या मुलींच्या संख्येत वाढ होत आहे. शिक्षणामुळेच प्रगती होऊ शकते हे त्यांना पटले आहे. असे समाजसेवक डॉ.भीमराव गस्ती यांनी सांगितले.
देवदासींच्या घरातील मोठी माणसे निरक्षर होती, मार्गदर्शक कोणी नाही. त्यामुळे शाळेची पायरी कोणी चढलीच नाही. प्राथमिक शाळेपासून मोफत पुस्तके, गणवेश, माध्यान्ह आहार, शिष्यवृत्ती तसेच निवासी शाळेत राहण्याची व्यवस्था. त्यामुळे बदल दिसतो आहे. सुवर्णा मादार या देवदासी कन्येने नुकतीच पीएचडी पूर्ण केली.
देवदासींच्या पुनर्वसनासाठी `उत्थान' संस्थेच्या माध्यमातून श्री.गस्ती प्रयत्न करत आहेत. देवदासींना स्वयंरोजगार मिळावा यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.
- संपर्क : डॉ.भीमराव गस्ती,
१७९, मारुती गल्ली, यमनापूर (बेळगाव)  मोबा. नं.९७४०६३८९३०
******

इटली आणि जर्मनीतील या दोन्ही फॅसिस्ट राजवटींनी सर्व प्रकारच्या विरोधकांचे निर्दयपणे शिरकाण केले - मग ते कम्युनिस्ट असोत की समाजवादी, ज्यू धर्मीय असोत की लोकशाहीवादी. त्या काळात पॅस्टर मार्टिन नीमोलर यांनी हिटलर जर्मनीतील नाझी गुंडांविषयी लिहिलेली एक छोटीशी कविता, दाभोलकर-पानसरेंवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची -
आधी ते कम्युनिस्टांसाठी आले,
पण मी गप्प राहिलो,
कारण मी कम्युनिस्ट नव्हतो.
नंतर ते समाजवाद्यांसाठी आले,
पण मी गप्प राहिलो,
कारण मी समाजवादी नव्हतो.
नंतर ते कामगार नेत्यांसाठी आले,
पण मी गप्प राहिलो,
कारण मी कामगार नेता नव्हतो,
नंतर ते ज्यू लोकांसाठी आले,
पण मी गप्प राहिलो,
कारण मी ज्यू नव्हतो
शेवटी ते माझ्यासाठी आले,
पण मला वाचवण्यासाठी
तेव्हा कोणीच उरले नव्हते...
(`जीवनमार्ग'वरून..)

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन