Skip to main content

30 june 2014

सर्वात जास्त लोकप्रियता लाभलेले राष्ट्न्पती ए.पी.जे.अब्दुल कलाम. अबूल पाकिर, जैनलुब्दिन कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ रोजी तामीळनाडू येथील रामेश्वरम् येथे झाला. कलाम जेव्हा जेव्हा कुठे जात, त्यावेळी जिव्हाळयाच्या वाटणाऱ्या असंख्य विषयांवर लोक त्यांना प्रश्न विचारीत. या प्रश्नांना कलाम समर्पक उत्तरे देत. अशी निवडक प्रश्नोत्तरे `स्पिरीट ऑफ इंडिया' मधून...
शिक्षण हेच सर्वस्व

शिक्षणामुळे माणसात आमूलाग्र परिवर्तन होते, सर्वगुणसंपन्नतेचा आविष्कार त्याच्यात होऊ शकतो आणि अशा माणसाला जगात मानाचे स्थान असते. खरे शिक्षण हे माणसाची प्रतिष्ठा आणि आत्मिक सन्मान वाढवते आणि विश्वबंधुत्वाची भावना त्याच्या मनात निर्माण करते. शिक्षणाचा खरा अर्थ सत्याचा शोध. आपल्या शिष्यांना त्यासाठी माहिती आणि ज्ञानाचा अखंड पुरवठा करत राहणारे शिक्षक हे केंद्रस्थानी असतात. शिष्याच्या दृष्टीने गुरू हा एखाद्या विश्वकोशाप्रमाणे असतो आणि त्याच्या सहवासात असलेल्या शिष्याला प्रेम आणि माणुसकीचे भरभक्कम पाठबळही सातत्याने लाभते.
शिक्षणाचा खरा अर्थ जर प्रत्येकाला त्याच्या शिक्षकांकडून नीट समजावून घेता आला, आणि जीवनाच्या आणि व्यवहाराच्या प्रत्येक क्षेत्रात त्याचा अंगीकार करता आला, तर हे जग कितीतरी सुसह्य होईल. नावीन्याचा आणि सर्जकतेचा शोध घेणाऱ्या त्यांच्या मनाला सातत्याने खाद्य पुरवू शकेल अशी शैक्षणिक पद्धत आजच्या पिढीतील तरूण विद्यार्थ्यांना हवीशी वाटते. या तरुणांना एक उज्ज्वल भविष्य घडवायचे आहे. कधी न शमणाऱ्या ज्ञानाच्या भुकेचे समाधान फक्त उत्कृष्ट दर्जाची शिक्षणपद्धतीच करू शकेल.
शैक्षणिक संस्थांनी असा अभ्यासक्रम बनवण्याची तयारी सुरू करायला हवी, जो समाजाप्रती संवेदनशील असेल, आणि विकासाच्या मार्गावरून वेगात जाणाऱ्या भारताची तांत्रिक गरज भागवण्यास समर्थ असेल. विकासकार्यासाठी मदत करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे कार्य त्यांच्या अभ्यासक्रमाशीच संलग्न ठेवून साधता यायला हवे, त्यामुळे आपल्या समाजाचे भावी आधारस्तंभ बनू पाहणारे हे तरूण विद्यार्थी सामाजिक परिवर्तनाच्या सर्व प्रक्रियेशी फार जवळून जोडलेले राहू शकतील.
- ए.पी.जे.अब्दुल कलाम
जर सर्वच जण सुशिक्षित झाले, तर तथाकथित खालच्या दर्जाचे आणि शारीरिक मेहनतीचे काम, उदा.झाडणे, कपडे धुणे इ. कोण करणार? सर्वांसाठी शिक्षण उपलब्ध केल्यामुळे आपल्या सर्व समस्यांवर उत्तर मिळू शकते असे तुम्हाला वाटते का?  
कल्याणी दास, विश्वभारती युनिव्हर्सिटी, कोलकाता
- कोणतेही काम खालच्या दर्जाचे नसते. शिक्षणामुळे लोकांच्या मनात श्रमप्रतिष्ठा निर्माण होईल, हातातले काम अधिक चांगल्या पद्धतीने करण्याची ईर्ष्या त्यांच्या मनात उत्पन्न होईल.

तुम्हाला असे नाही का वाटत, की आजची पिढी खूप मोठ्या ओझ्याखाली दडपली गेली आहे; पालकांच्या अपेक्षांचे ओझे आणि शाळेत चांगली प्रगती दाखवण्याकरता शिक्षकांकडून टाकले जाणारे ओझे. मुलांना या परिस्थितीला तोंड देणे शक्य व्हावे म्हणून तुम्ही काही मदत करू शकाल का?
मास्टर देवांग पांडे, सांदीपनी, नागपूर
- हो, जेव्हा माझी भेट पालकांशी आणि शिक्षकांशी होते, तेव्हा मी त्यांना समजावतो की मुलांनी १०+२ हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर त्यांना त्यांच्या आवडीच्या विषयामध्ये पुढील शिक्षण घेण्याचे स्वातंत्र्य मिळू द्या. मुलांच्या निकोप वाढीकरता पालकांनी हे करणे अत्यावश्यक आहे. मात्र आपला कल खरेच कोणत्या विषयाकडे आहे हे आपल्या अंतर्मनाची हाक ऐकून नीट ओळखणे आणि मित्र किंवा सहकाऱ्यांच्या मतांचा प्रभाव आपल्या निर्णयावर पडू न देणे ही अर्थातच मुलांची जबाबदारी आहे.

मोहात पाडणारी, मन वेधून घेणारी अनेक आकर्षणे आजच्या काळात आहेत. त्यांच्यावर मात करून एक जबाबदार विद्यार्थी बनणे कसे शक्य होईल?
एस.लक्ष्मी, संत श्री शंकरा स्कूल, थिरुवन्मियूर, चेन्नईर्
- मोह, आकर्षण हे जीवनाचे भाग आहेत. एक जबाबदार विद्यार्थी म्हणून तुम्हाला तुमचे सामर्थ्य आणि ध्येय नीट माहिती असणे आवश्यक आहे. ध्येय निश्चित करा, परिश्रम करा आणि यशस्वी व्हा. ध्येयप्राप्तीसाठी परिश्रम करत असताना तुम्हाला समस्यांचा सामना निश्चितच करावा लागणार; पण तुम्ही त्यामुळे पराभूत होता कामा नये. पराभूत मनोवृत्तीचा पराभव तुम्ही करायला हवा, आणि पुढे जायला हवे. जीवनात यशस्वी होण्याकरता हे करणे आवश्यक आहे.

आजकाल एखादी लहान कंपनीसुद्धा नोकरी देताना कमीत कमी शैक्षणिक अर्हतेचा आणि नैपुण्याचा आग्रह धरते. परंतु संसदेमध्ये मात्र आपण नीट शिक्षण न घेतलेल्या लोकांनाही निवडून देतो. हे योग्य आहे असे तुम्हाला वाटते का? निवडणुकीला उभ्या राहणाऱ्या उमेदवारांकरता आपण काही शैक्षणिक अर्हता निश्चित करू शकत नाही का? र्
   लक्ष्मी पी., बी व्ही बी इंजिनियरिंग कॉलेज
- देश चालवण्याकरता योग्य उमेदवाराची निवड करण्याची जबाबदारी मतदारांची आहे. फक्त शैक्षणिक अर्हता ही चांगल्या कामाची हमी देऊ शकत नाही. अशी काही उदाहरणे आहेत, जिथे अल्पशिक्षित लोकांनीही लोककल्याणाची उत्कृष्ट कामे पार पाडलेली आहेत.

एक शास्त्रज्ञ, राजकारणी आणि आध्यात्मिक मनोवृत्तीचे अधिष्ठान असणारी व्यक्ती या नात्याने, तुमच्या दृष्टिकोनातून आदर्श विद्यार्थी कसा असावा?
प्रणव पी. के., आर्य सेंट्न्ल स्कूल
- माझ्या दृष्टिकोनातून एक आदर्श विद्यार्थी असा असतो : प्रामाणिक, गुणवान, `माझे फुलायचे दिवस मी फुकट घालवणार नाही' हे तत्त्व मनात बाळगणारा आणि त्यानुसार आचरण करणारा; तो अभ्यासात अव्वल असतो; आपल्या कुटुंबाचा, समाजाचा चांगला सदस्य असतो; आपले ध्येय साध्य करेपर्यंत काम करण्याची चिकाटी त्याच्या अंगात असते; आपले पालक, ज्येष्ठ नागरिक आणि शिक्षक यांच्याशी तो आदरपूर्वक वागतो.

काहींच्या मते आजच्या आपल्या आयुष्याला जीवघेण्या स्पर्धेचे स्वरूप आले आहे. असे असताना उच्च नैतिक मूल्यांची शिकवण देणारे तत्त्वज्ञान, यशप्राप्तीसाठी आध्यात्मिक नीतिनियम इत्यादींचा समावेश भाषेच्या शिक्षणासोबतच आपल्या शालेय अभ्यासक्रमामध्ये अगदी प्राथमिक वर्गांपासूनच आपण का करत नाही?
एस.बालसुब्रमण्यम, इंडियन इन्स्टि.ऑफ सायन्स, बेंगलोर
- मुलांचे चारित्र्य घडवण्याच्या दृष्टिकोनातून वयाची पाच ते सतरा ही वर्षे शैक्षणिकदृष्ट्या फार महत्त्वाची आणि पायाभूत वर्षे मानली जातात. पालक आणि शिक्षक दोघेही हा पाया घडवत असतात. त्रिची येथील सेंट जोसेफ कॉलेजातले माझे शैक्षणिक दिवस यासंदर्भात मला आठवतात. रेव्हरंड फादर रेक्टर आम्हाला नीतिशास्त्र हा विषय शिकवायचे. जेशुईट अधिकारी वर्गात त्यांचा सर्वोच्च मान होता. ते दर आठवड्याला एक तास आम्हाला उच्च आध्यात्मिक ज्ञान असलेल्या व्यक्तिमत्त्वांबद्दल, धार्मिक नेत्यांबद्दल, कर्तृत्ववान शास्त्रज्ञांबद्दल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुणवान व्यक्तींबद्दल सांगत असत. मला खात्री आहे की मी त्या नीतिशास्त्राच्या वर्गात जे काही शिकलो, ते आजही माझ्यासोबत आहे. जिथे अशा प्रकारचे शिक्षण दिले जाते, त्यांना `संस्कार वर्ग' असे म्हणतात. कोवळया मनांवर संस्कार करून त्यांचा विकास घडवण्याचे काम यातून होते. शाळा-कॉलेजांमध्ये आठवड्यातून निदान एक तास हे शिक्षण - ज्यात हिंदू, इस्लाम, िख्र्चाश्न आणि इतर धर्मांमधील थोर व्यक्तिमत्त्वांची ओळख होईल असे - दिल्यामुळे कोवळया मनांवर खूप सकारात्मक प्रभाव पडेल. या व्यतिरिक्त अशा वर्गांमध्ये जागतिक कीर्तीच्या थोर व्यक्तींच्या गुणांची, कार्याची चर्चा - उदा.कन्फ्यूशियस, बुद्ध, सेंट ऑगस्टीन, खलिफा ओमर, महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, आइन्स्टाईन, अब्राहम लिंकन - होऊ शकते. नीतिकथांना सांस्कृतिक वारशासोबत जोडून घ्यायला हवे.
***

कायदेभंगाला सहानुभूती नको
मुंबईतली क्रॅम्पा कोला नावाची भव्य वसाहत बेकायदेशीर उभी राहिल्याचे सर्वोच्च न्यायालयाने निश्चित केल्यानंतर ती पाडण्याशिवाय पर्याय राहात नाही. त्या कायदेमोडीला कोण कोण जबाबदार, त्यांना शिक्षा होणार की नाही, पुढे कोणती काळजी घ्यायची इत्यादी प्रश्न नंतर चघळत बसावेत. पण तिथल्या रहिवाशांनी अडेलपणा करावा, आणि त्यांच्यापुढे अतिक्रमण विरोधकांनी लांगूलचालन करावे, हा अनुनयाचा निखालस चूक मार्ग आहे. त्याशिवाय या रहिवाशांनी अश्रू ढाळावेत आणि टीव्हीवाल्यांनी आपल्या हातातील खुंट्या पुढे करत इतरांना अन्याय असल्याचे भासवावे, हे चालता कामा नये. त्या रहिवाशांची ज्यांना कणव येत असेल त्यांनी त्यांची जी काय सोय लावायची ती लावावी, पण सर्वोच्च न्यायालयापुढे सर्वांनी त्त्वरित झुकले पाहिजे, हीच या देशातील सर्वमान्य सामुदायिक प्रशासनाची रीत असायला हवी.

क्रॅम्पा कोलातील रहिवाशांना आपले घर फुकापासरी सोडून जाताना ज्या वेदना होतील त्यात कोणीही सहभागी व्हावे अशा आहेत. पण एखाद्या अतिक्रमणावर असेच बुलडोझर चालविताना तेथील व्यवसायिक, रहिवासी किंवा झोपडीवाले यांच्या वेदना कमी करूण असत नाहीत. आजपर्यंत ज्यांचे प्रपंच असे उघड्यावर आले त्यांच्याबद्दल क्रॅम्पा कोला स्तराच्या लोकांनी कधी अश्रू ढाळले, असे ऐकिवात नाही. झोपड्या किंवा छोट्या व्यवसायिकांस फारशी ताकतच नसते, पण हे क्रॅम्पा कोले सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढू तरी शकले.

आपण काही बेकायदेशीर केले असे त्यांना वाटत नसेल तर त्यांच्या नागरी सजगतेची कीव करावी लागेल. आपली बाजूच योग्य आहे असे वादामधील दोन पक्ष घट्ट समजून असतात. त्यांच्यातील एकच योग्य असतो यात तरी वाद होऊ नये. हा योग्य पक्ष कोणता हे ठरविण्यास पोलिस, प्रशासन, राज्यकर्ते जेव्हा अक्षम ठरतात तेव्हाच न्यायालय हा पर्याय असतो. न्यायदानाच्याही पायऱ्या आहेत, त्या ओलांडत जाऊन अंतिम निवाडा झाल्यावर वाद संपलाच पाहिजे. हा निवाडा आपल्याच बाजूचा असावा याकरिता सर्व प्रयत्न होतातच. पण निवाडा विरोधी गेला की आततायी चडफडाट करणे, इथल्या व्यवस्थेलाच दूषणे देणे, निवाड्याचा अंमल करणाऱ्यांस आव्हान देणे हे सर्वस्वी चूक आहे, ते चालू देता कामा नये.

यात क्रॅम्पा कोले यांची फसवणूक झाली असून, खरे दोषी बिल्डर आणि मंडळी मोकळी आहेत असा एक आडरस्ता शोधला जातो. बिल्डर, माफिया आणि अन्य थोर लोकांच्या शृंखला हा वेगळा विषय आहे. पण त्यांच्या आश्रयाला जाणाऱ्यांना कधीतरी हे भोग सोसावे लागणार. रेल्वे-बसगाडीत लिलाववाले येतात, प्रथम कंगवा शिसपेन अशा वस्तू `बक्षिस' देतात; आणि ऐनवेळी वीस रुपयाचे बनावट कापड दीडशे रुपयांस कुणाच्या तरी गळयात मारून निघून जातात. या फसव्या लोकांचा धंदा राजरोस कसा चालतो? त्यांना गाडीत चढू कसे देतात?... हे प्रश्न विचारत राहणे गैर नाही परंतु अशा लोकांशी लिलाव बोलून जे अडकतात त्यांना `निष्पाप' म्हणावे काय? फसवणुकीचा, अतिक्रमणाचा धंदा अनादिकाळापासून चालू आहे. चोर-शिपाई शर्यत सदैव असतेच. कधी चोरांचे व्यवहार छुपे चालतात कधी उघड बिनदिक्कत चालतात. उच्चभ्रू सुशिक्षित मानले गेलेले क्रॅम्पाकोले जेव्हा स्वत: फसतात आणि आपल्या फसवणुकीचे समर्थन करून बाकी साऱ्या सामुदायिक व्यवस्थेला दोष देतात त्यांच्याबद्दल सहानुभूती असावी पण कौतुक-लाड नकोत. क्रॅम्पा कोले वाचविले तर उद्या आदर्श सोसायटीतील `गरीब बिचारे' राजरोस वाचतील.

सध्या सर्वांचीच अशी समजूत आहे की, आपल्यावरती घनघोर अन्याय सुरू आहे; त्याचे कारण आणि खापर दुसऱ्यावर फोडून त्याला न्यायालयात खेचले की त्या अन्यायाला चाप लागेल. दुसऱ्याला असे अकारण कैचीत धरताना कधीतरी आपल्या बोटांस चिमटा बसण्याची शक्यता असतेच. कित्येक तथाकथित एनजीआेंनी स्थानिक अन्यायांची बाजू ताणून धरून विकास योजना रखडवल्या. सरदार सरोवराची उंची वाढू नये म्हणून मेधा पाटकरांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत संघर्ष नेला. पण तिथेही त्यांच्या विरोधी निर्णय झाल्यावर त्यांनी व त्यांच्याच स्वभावाच्या कोण अरुंधती रॉय यांनी न्यायालयाला दोष दिला. अर्थात न्यायालयाने जरब देऊन त्यांना गप्प बसविले हा भाग वेगळा; पण न्यायालयावर विश्वास नव्हता तर या तिथे गेल्या कशाला? नंतर गुजरात सरकार व मोदींवर तडफडण्यास गोध्रा प्रकरण तर होतेच. या प्रकारच्या सामाजिक संघटना आता वादात अडकल्या आहेत. विदेशातून पैसे घेऊन इथल्या भूमिपुत्रांचा, पर्यावरणाचा कैवारी आव आणून विकासाचा वेग रोखण्याचा उद्योग या सामाजिक संघटना करतात असे आरोप आहेत. अशा वेळी, आजवर ज्यांच्यासाठी या `समाजसेवकांनी' रक्त खरेच आटवले असेल त्यांच्यातील कितीजण बाजूने उभे राहतात हे दिसेल. एरवी कोर्टाचा निर्णय विरोधात गेला तर, ``आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ'' असे, नाक वर करून सांगणारे हे कार्यकर्ते, जनतेने ढुंकुन पाहिले नाही तर तिला कृतघ्न म्हणणारच आहेत.

तात्पर्य असे की, या प्रकारची सामाजिक व सामुदायिक नीती अनुसरण्यातून कोणाला सहानुभूती किंवा कायद्याचा पाठिंबा मिळता कामा नये. कायदेभंग करणे सोपे, कायदेपालन फार अवघड असते. आपल्या सध्याच्या प्रशासकीय व्यवहारांतून ही बाब अधोरेखित होतेच. पण तरीही कायदेपालनाचा सर्व अंशी, सर्वांगी आग्रह असेल तरच त्यास जबाबदार नागरिक म्हणता येईल. आपल्या फायद्यासाठी कसेही वागावे, ते कोणी नियमानुसार ठरविले तर कायदेपालन आणि तेच कोणी गैरनियम ठरविले तर तो मात्र नाइलाजाचा, अगतिक, स्थितिवश, अजाणता व्यवहार असे स्वत:पुरते वाटून घ्यायला हरकत नाही. पण फार काळ तसे चालत नाही, चालू नये. आजकाल फार कायदेशीर व नियमांवर बोट ठेवून वागता येत नाही हे तर खरेच, पण त्यापोटी कधीतरी काहीतरी भोगावे लागते त्यालाही तयारीच ठेवावी लागते. बाजारात काही वस्तूंची रीतसर पावती मिळत नाही, ती वस्तू खराब लागली तर कोणी दाद घेत नाही. हा धोका पत्करूनही वस्तू घ्यावी लागतेच; पण त्यात फसवणूक झाली म्हणून ओरडाआरडा करता येत नाही, करू नये. वस्तूची पावती घेेण्याला बगल देऊन आपण आधीच कायदेपालनाचे व्रत मोडले आहे याची समज ठेवावी.

क्रॅम्पाकोलाच्या, `आदर्श'च्या रहिवाशांनी आपापली बाजू लढविली आहे. समाजाला त्यांच्याबद्दल काय वाटते ते वाटणारच. पण न्यायालयाने निर्णय करूनही जर ते ऐकत नसतील तर तो निर्णय कठोरपणी राबविलाच पाहिजे. व्यवस्थेलाच धक्के मारणारी कणव पुढे महागात पडेल. नाइलाजाने केला तरी तो कायदेभंगच!
***

मुलांचा कल महत्त्वाचा
शालांत परीक्षा झाल्या की पालकांना वेध लागतो तो मुलांच्या महाविद्यालयीन शिक्षणाचा. पालक हट्टाने मुलांना इंजिनियरिंग किंवा मेडिकलला घालतात. भरमसाठ फी भरतात. पाल्याची आवड कोणत्या क्षेत्रात आहे याचा विचार ते करत नाहीत. आवड नसताना त्याला त्या क्षेत्रात घातले तर ती मुले मनापासून अभ्यास करत नाहीत. आवडीचे क्षेत्र मिळाले तर मध्यम विद्यार्थीसुद्धा चमकतात.
असेच एक उदाहरण. १९५६ साली सांगलीच्या वालचंद महाविद्यालयातून मी बी.ई. झालो. हिंदुस्थान कन्स्ट्न्क्शन कंपनीत नोकरी मिळाली. मुंबईला राहायचे कोठे हा मोठा प्रश्न होता. मूळ कोल्हापूरचे, प्रसिद्ध आर्ट व फिल्म डायरेक्टर बाळासाहेब गजबर यांचा परिचय होता, दादरला शिवाजी पार्क येथे ते राहात होते. आठ-पंधरा दिवस गजबरांचे घरी राहून नंतर कोठेतरी खोली घेऊन राहावे असे ठरवले. जवळच्या खानावळीत जेवत होतो. त्यांचा मुलगा विजय त्यावेळी चार वर्षांचा होता. त्याची व माझी दोस्ती जमली. बाळासाहेब व माई यांना वाटू लागले की मी त्यांच्याचकडे राहावे. त्यांनी आग्रह धरला. विजयला चांगले वळण लागेल व त्याचा अभ्यासही चांगला होईल. त्यांच्या इच्छेप्रमाणे मी त्यांचेच घरी दोन वर्षे राहिलो. त्या मुदतीत मी विजयचा बालवाडीचा व पहिलीचा अभ्यास करून घेतला.विजयनेही मोठेपणी इंजिनियर व्हावे अशी इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली. पुढे मी ती नोकरी सोडून सांगलीला वालचंद कॉलेजमध्ये नोकरी स्वीकारली.
त्यानंतर १९७१ ला विजय शालांत परीक्षा उत्तीर्ण झाला. इंजिनियरिंगच्या पदवीचा अभ्यास झेपणार नाही, त्याला प्रवेशही मिळणार नाही म्हणून त्याला शासकीय तंत्रनिकेतनमध्ये घातले. तंत्रनिकेतनचा पहिल्या वर्षाचा निकाल लागला आणि विजय नापास झाला. बाळासाहेब व माई यांना दु:ख तर झालेच, पण काय करावे ते कळेना. त्यांनी विजयला माझ्याकडे सांगलीला पाठविले. माई व बाळासाहेब यांची इच्छा की, विजयने सांगलीत राहून माझ्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करावा व शिक्षण पूर्ण करावे.
कोणतीही चर्चा न करता आमच्या घरात माझ्या मुलांबरोबर खेळीमेळीच्या वातावरणात त्याला रमू दिले. एके दिवशी कोणताही आडपडदा न ठेवता त्याने मोकळेपणाने बोलावे म्हणून प्रयत्न केला. तो म्हणाला, ``सर, मला गणित व गणितावर अवलंबून असलेले विषय अजिबात कळत नाहीत. त्यामुळे लक्ष लागत नाही. कसून अभ्यास केला तरी काही गोष्टी डोक्यात शिरत नाहीत.''
विजयचे आजोबा कै.बाबा गजबर हे प्रसिद्ध आर्टिस्ट होते, वडील बाळासाहेब हे उत्तम आर्ट डायरेक्टर सौंदर्यदृष्टी नसानसात भिनलेली. असा मुलगा इंजिनियरिंग क्षेत्रात चमकणार नाही, तो आर्किटेक्ट किंवा कमर्शियल आर्टिस्ट या कोर्सला गेला तर? त्याला विचारले, ``इंजिनियरिंग सोडून तुला आर्किटेक्चर कोर्सला घातले तर?'' त्याचा चेहरा एकदम आनंदित झाला.
त्यानंतर त्याला घेऊन मी मुंबईला त्याच्या घरी गेलो. सर्व गोष्टी समजावून सांगितल्या. माई व बाळासाहेब मला म्हणाले, ``सर, विजयला तुमच्या ताब्यात दिले आहे. आता तुम्हीच त्याचे भवितव्य ठरवा.'' दुपारी त्याला घेऊन मी बांद्र्याच्या आर्किटेक्चर कॉलेजमध्ये गेलो. प्राचार्यांची भेट घेतली. त्याला प्रवेश मिळाला.
पहिल्या दोन वर्षात गणित व गणितावर आधारित अभ्यासक्रम होता, पण तो फार कठीण नव्हता. तिसऱ्या वर्षापासून ड्नॅइंर्ग सुरू झाले, तशी त्याची गुणवत्ता दिसू लागली. प्राध्यापक त्याचे कौतुक करू लागले. उपजत असलेली सौंदर्यदृष्टी कागदावर उमटू लागली. शेवटच्या वर्षी तर जे आर्किटेक्ट त्याला शिकवायला येत, ते त्यांची व्यवसायिक ड्नॅइंर्ग्ज त्याला करायला सांगत व तोही आवडीने करत असे.
आर्किटेक्चर परीक्षा तो उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झाला. आईवडीलांच्या हट्टामुळे विजयचे एक वर्ष फुकट गेले होते. त्याने थोडा अनुभव घेऊन मुंबईला व कोल्हापूरला प्रॅक्टीस सुरू केली. पुढे त्याने हॉस्पिटल प्लॅनिंगचा विशेष अभ्यास करून प्रावीण्य मिळवले. कोल्हापूर, सांगली व कर्नाटकात त्याला भरपूर कामे मिळाली. मॉरिशसमधील बरीच कामे मिळाली. दोन वर्षांपूर्वी राष्ट्न्पतींनी बेळगाव येथील विधानभवनाचे उद्घाटन केले, त्या भव्य इमारतीच्या आर्किटेक्चरचे संपूर्ण काम करण्याचे भाग्यही त्याला लाभले. असा हा विजय गजबर.
पालकांना माझी विनंती की, त्यांनी मुलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात शिक्षण घेण्याची संधी द्यावी.
- प्रा.एच.यू.कुलकर्णी,
निवृत्त प्राचार्य,(तंत्रशिक्षण विभाग)
वालचंद कॉलेज, सांगली
मोबा.९८६०७६२३००

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन