Skip to main content

3March2014

स्वयंसेवी संस्था प्रभावी हव्यात
संस्था चांगली चालण्यासाठी तीन घटक महत्त्वाचे मानले आहेत.
१) निधी (संकलन आणि व्यवस्थापन)
२) कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे शिक्षण
३) संस्थेच्या कार्याचे व कार्यपद्धतीचे मूल्यांकन
अशा स्वयंसेवी सामाजिक संस्थांचे संघटन होण्यासाठी तीन घटक महत्त्वाचे मानले आहेत
१) वैचारिक देवाणघेवाण
२) परस्पर स्नेहसंबंध आणि सहकार्य
३) चांगल्यासाठी दबावगट व सकारात्मक वातावरणाचे प्रयत्न
या दोन्ही दृष्टींनी जे प्रयोग करण्यात येतील त्याचा एक भाग म्हणजे ही कार्यशाळा होय.
पहिल्या सत्रात संस्थेची घटना, त्यातील कलमे व पोटनियमांत होणारे बदल, पदाधिकारी व त्यांची निवड याविषयी माहिती देण्यात आली. आयकर नोंदणी (१२अ), कायमचा नोंद क्रमांक (पॅन), ८० जी करिता तरतूद, आयकर ३५ एसी साठी निकष, तसेच विशिष्ट उद्देशाने मोठे आर्थिक व्यवहार करताना घेण्याची काळजी इत्यादींविषयी ऊहापोह करण्यात आला. `धर्मादाय आयुक्त वा उपायुक्तांचे कार्यालय हे कोर्ट स्वरूप असते. तिथे आपले म्हणणे मांडायचे असते. त्या व्यवस्थेच्या संदर्भात कागदपत्र व नियम यांबद्दल काळजी घेऊन शक्यतो त्यातील अनियमिततेमध्ये अडकू नये.' असेही स्पष्ट करण्यात आले.
संस्थेचा उद्दिष्टगट किंवा कार्य समोर ठेवले तरी त्या स्वरूपाचे `कार्य' शोधावेच लागते. ज्यांच्यासाठी हे कार्य करायचे, त्यांना ते नकोच असते. त्यांच्यात जागृती करणे - किंबहुना आपली मदत `घेण्या'साठी त्यांना तयार करणेही आवश्यक होऊन बसते. याच प्रकारे काम करू पाहणाऱ्या इतरही खूप संस्था असतात, पण सामाजिक प्रश्न आणि समाजकार्य संपत नाही. प्रश्न बदलतात, साधने बदलतात, पद्धती बदलतात, संस्थाही जुन्या जाऊन नव्या येतात. एडस्चा प्रश्न, स्त्रीभ्रूण हत्त्या, प्रदूषण हे अलीकडे पुढे आलेले प्रश्न आहेत. अपंगांचे साहित्यसंमेलन, त्यांच्यासाठी योग्य सुविधा, वृद्धाश्रमांतील कार्यक्रम या नव्या पद्धती आल्या. या बदलांचा मागोवा घेत आपल्या कार्यासाठी `मार्केट' शोधण्याचीही गरज पडते. एक संस्था स्थापन करावी आणि `ज्यांना गरज असेल त्यांनी आपल्याकडं यावं' असे म्हणून कार्य योग्य होत नाही. स्वयंसेवी कार्यसुद्धा परिणामकारक होण्यासाठी योग्य ते, योग्य त्यांस, योग्य तेव्हाच पोचविणे आवश्यक ठरते.
संस्थेच्या वाटचालीत वेगवेगळे कार्यक्रम (इव्हेंट) आयोजित केले जातात. हे कार्यक्रम म्हणजे संस्थेविषयी सामाजिक मत तयार करण्याची वेळ किंवा संधी असते. कार्यक्रम वेळेत सुरू होणे, आपल्या कार्याला शोभणारे वातावरण व व्यासपीठ, त्यावरचे पाहुणे व तेथून व्यक्त होणारे विचार हे सर्व समाजात परावर्तित होत असते. म्हणून त्याची काळजी घ्यायला हवी. सामाजिक संस्थांतील प्रत्येकी दोन कार्यकर्ते जरी, दुसऱ्या संस्थेच्या कार्यक्रमास उपस्थित राहिले तर उपस्थिती वाढते व त्याचा प्रभाव पडतो. पण कार्यक्रमाचा एकूण कालावधी सांभाळायला हवा. राजकीय वावर, वातावरण, ध्वनिवर्धक या साध्या वाटणाऱ्या गोष्टींतून समाज योग्य तो संदेश टिपत असतो. म्हणून कार्यक्रमाचे `नियोजन' करणे आणि `पार पाडणे' यातला फरक ध्यानी घ्यावा लागतो.
`सामाजिक कार्याला प्रसिद्धी मिळत नाही' ही आजच्या माध्यमांबद्दल सामान्य तक्रार असते. पण वास्तव समजून घेतले तर योग्य सुधारणा करता येईल. आपल्या नेहमीच्या परिचयातील किंवा पाहण्यातील दैनिकात आपल्याबद्दलची बातमी वाचायला मिळणे, ही प्रसिद्धीची बाळबोध समजूत आहे. आजच्या काळात पाचपंचवीस मैलांपुरती वृत्तपत्राची `वितरण पुरवणी' असते. त्यातही कुणी आभार मानले, कुणी गीत म्हटले, कोण उपस्थित होते एवढी नावे देतात. त्यातून संस्थागत कार्य कळत नाही. म्हणून एवढ्या प्रसिद्धीवर समाधान मानू नये. आपापल्या विषयातील अनेकानेक नियतकालिके महाराष्ट्न्भरात आहेत. त्यांना त्यांच्याविषयीचा मजकूर हवा असतो. आपल्या संस्थेचे कार्य, अनुभव, अडचणी, नवे विचार, सामान्य माहिती, वृत्तांत यांचे सर्वत्र वितरण प्रसिद्धीसाठी करावे. त्याचेही एक तंत्र असते. ते आत्मसात करावे. अशा प्रसिद्धीच्या उद्देशानेच जे प्रयत्न होत असतात, त्यांना प्रतिसाद द्यावा. (`आपले जग' तर ते कर्तव्य मानते.)
आपल्या संस्थेचे कामकाज अधिक गतीने होण्यासाठी कार्यालयीन व्यवस्था व साधने आधुनिक हवीत. संगणक, फोन, इंटरनेट ही आता गरज बनली आहे. तथापि निव्वळ अद्ययावत् इमारत - फेर्नचर - साधने असण्याचा उपयोग होत नाही. याबाबतीत गांधीजींच्या `कार्यालया'चे उदाहरण लक्षात घ्यावे. लाभार्थी, देणगीदार, कार्यकर्ते, परस्थ जिज्ञासू वगैरे कुणालाही या संस्थेबद्दल विश्वास वाटावा, `येथे आपले काम होईलच' असे वाटावे तरच ते कार्यालय चांगले. ज्यांच्याकडे अगदी साधे घरगुती कार्यालय असेल किंवा पैशाअभावी साधनांची त्रुटी असेल; त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे `पॉश' कार्यालय असेल अशा सर्वच संस्थांनी आपली क्षमता व उपलब्धता एक पायरी अधिक उंच करावी, ज्यायोगे कार्याचा परिणाम व प्रभाव वाढेल. आपल्या संस्थेची वेबसाईट असावी असे म्हणतात, काही संस्थांची असतेही! पण ती अद्ययावत् ठेवली जात नाही. फार कशाला; कित्येक ठिकाणच्या फलकांवर `नवीन वर्षाच्या शुभेच्छा..' पुढचे चार-सहा महिने लोंबकळत असतात. वर्षापूर्वीच्या सूचना भिंतीवर चिकटून असतात. अशांनी संपर्कासाठी नव्या जलद माध्यमांचा हट्ट करण्याचे कारण नाही.
प्रत्येक कार्यकर्त्याची सामाजिक कार्याविषयीची तळमळ खरी असते, पण त्या तळमळीतून उमलणारे कार्य अधिक मोठे होण्यासाठी प्रशिक्षण व मूल्यांकन सातत्याने आवश्यक असते. सामाजिक कार्ये सातत्याने होत राहणारच आहेत. त्यांबद्दल लोकभावना अनुकूल व सकारात्मक होण्याची गरज आहे. त्याकरिता सामाजिक स्वयंसेवी संस्था अधिक सक्षम व्हाव्यात.
- डॉ.राम लाडे (मोबा.९४२२४०६९०१)
(संयोजक : फेडरेशन ऑफ सोशल वेलफेअर ऑर्गनायझेशन ऑफ महाराष्ट्न्)


आचारसंहिता मतदारांची
निवडणुकांचे पडघम वाजू लागलेत. हल्ली चॅनल्सवरच्या चर्चा ऐकताना रोज गरमागरम मसालेदार आरोप एन्जॉय करता येतो. लवकरच मतदानाच्या तारखा जाहीर होतील, आचारसंहिता लागू होईल. मग गोड गोड सरकारी जाहिरातींचा रतीब थांबेल. आणि `होते म्हणू स्वप्न एक...' अशा जाहिरातींच्या जागी वास्तवाचे कडू गोड आकडे येऊ लागतील. जाहीर सभांमधून, वर्तमानपत्रांतून आश्वासनांची अतिवृष्टी थांबेल. रस्ते फ्लेक्समुक्त होऊन मोकळा श्वास घेतील. मतदानापूर्वीच्या ४८ तासांत साक्षात उमेदवार आपल्या दारात - गल्लीत प्रकटतील आणि मग तो दिवस उजाडेल - मतदानाचा!

मग कुठे काय घडलं याच्या रसभरित कहाण्या वाहायला लागतील. कुठे मतदारांच्या रांगा, कुठे ओसाड बूथ. कुठे धाकदपटशा, कुठे लालूच, कुठे आणखी काही. कुठे जेवणावळी, वस्तू वाटप, दारू. बटण दाबायला आणलेली मेंढरं, कुठं क्रॅमेऱ्यांच्या क्लिकक्लिकाटात झालेलं तारांकित मतदान...

ही चित्रं पाहाताना मनात येतं की, उमेदवारांसारखी मतदारांना आचारसंहिता हवी. जनता नावाचा हा अजब घटक लोकशाहीचा मुख्य आधार, तो मात्र करून सवरून  नामानिराळा राहतो. तो तावातावाने चर्चा करतो. मनातून टीका करतो. पण स्वत:ची जबाबदारी आली की हळूच एक पाऊल मागे सरकतो. अतिशय दरिद्री, अशिक्षित वर्ग मतदानाला पैसे कमवायची सुसंधी मानतो; ज्याला विचार-मत वगैरे नाही! दुसरा वर्ग मध्यमवर्ग. त्याच्याकडून अपेक्षा फार. याला धोपटणारे, वापरणारेही खूप, ते स्वस्थ बसू देत नाहीत. तो कुठेतरी पळ काढतो. काहीतरी निमित्त काढतो किंवा `उगीच आपल्यावर ठपका नको' या भीतीपोटी, किंवा निखळ बांधिलकीपोटी, मतदान एकदाचा करून टाकतो. उत्साहाने, कर्तव्याने, निष्ठेने मतदान करणाऱ्यांचाही एक वर्ग आहे. पण तो फार थोडा. राहिला `उच्च वर्ग' `क्रीम' वा ज्यांना नाइलाजाने भारतात राहावे लागते अशा चेहऱ्याचे लोक. त्यातल्या त्यात सेलिब्रिटी लोक आपली प्रतिमा जपण्यासाठी, व ती अनायासे छापून येते म्हणून, मतदान करतात. हे सगळे एकत्र मिळून नागरी मतदानाचे प्रमाणही काही फार चांगले नसते.

`एकूण लोकशाही प्रगल्भ झाली पाहिजे' असे म्हणत असताना आम्ही मतदार म्हणून किती प्रगल्भ झालोत याचा विचार स्वत:शी करायला हवा. मतदारांनीदेखील (निदान निवडणुकीपुरती) काही आचारसंहिता पाळायला हवी. सरकारला, राजकीय पक्षांना, उमेदवारांना नावे ठेवत ठेवत आपण रोज कितीतरी सोयी-सुविधा-व्यवस्थांचा वापर करतो. त्या ढेपाळतात, त्यात हलगर्जीपणा होतो, भ्रष्टाचार होतो. आपण त्यावेळी भरपूर त्रागा करतो. पण बरेचदा त्या नीट सुरू असतात आणि आपलं जगणं सुरळीतपणे पुढे नेत असतात. `सरकारचे हे कर्तव्यच आहे' असे आपण म्हणू. ते ११०% खरेही आहे. सरकारी जाहिरातीतून `आम्ही यंव केलं आणि त्यंव केलं' असे ढोल बडवले जात असतात. हे म्हणजे रोज संध्याकाळी मुलांना समोर बसवून आईबाबांनी `आज मी तुझ्यासाठी स्वैपाक केला, तुला शाळेत नेऊन सोडलं, तुझी फी भरली, तुला कपडे आणले, तुला जवळ घेतले...' असा स्वत:च्या कर्तव्यांचा पाढा वाचण्यासारखं आहे. सरकारनं देश नीट चालवणं हे त्यांचं कामच आहे. ते केलं तरीही त्यात काही अद्वितीय कार्य मानण्याचं कारण नाही.

पण इकडे मतदार नागरिक म्हणून आपली भूमिका आपण नीट पार पाडतो का? टॅक्स भरणं, अन्य कायदे पाळणं, देशहिताला बाधा येईल असे व्यवहार न करणं, देशातील - निदान आपल्या आजूबाजूच्या समस्यांविषयी जागरूक व क्रियाशील असणं, या सगळया आपल्या कर्तव्यांमधली एक सोपी, बिनखर्चाची, कुठल्याही फायद्यातोट्याच्या आड न येणारी, तोशीस न पडणारी गोष्ट म्हणजे मतदान! हे अगदी मूलभूत, आद्य आणि किमान कर्तव्य प्रत्येकानं पार पाडायलाच हवं. आपल्या एका मताचं महत्त्व आपल्याला नीट समजायला हवं. ते इतरांना समजावून देता यायला हवं. मत न देणे, हा लोकशाहीचा द्रोह आहे, इतकं गंभीरपणे याकडे पाहायला हवं. तितकंही न करण्याला `कपाळ करंटे' असं म्हणायचं का?

मतदानाचा दिवस शनिवार रविवार वा इतर सुट्यांना जोडून आला तर पाहायलाच नको! निर्लज्ज उत्साहाने सहली-पाटर््या-गेट टुगेदरचे बेत ठरतात. यावर्षी असं होणार नाही, इकडे लक्ष पुरवावं. मतदान करणं म्हणजे देशाचं भवितव्य ठरवण्यातली माझी भूमिका पार पाडणं. देश कुणी चालवायचा, हे ठरवण्यातला वाटा प्रत्येकानं उचललाच पाहिजे. कुठलंही कारण, सबब, निमित्त आडवं येणार नाही, हे ठामपणे पाहिलं पाहिजे. म्हणूनच मतदारांची आचारसंहिता हवी. मतदान न होण्यामागची कारणे दूर करण्यासाठी निर्धार करू.
* मतदानाच्या दिवशीच नव्हे, त्याच्या आधी, नंतर एकदोन दिवस कुठलाही समारंभ, बैठका इ. ठरवू नये.
* बाहेरगावची निमंत्रणे, प्रवास टाळावेत, नातेवाईकांनाही मतदान सोडून यायला बंदी करावी.
* घरातल्या वृद्धांना ज्या कळकळीनं पणतीचं लग्न पाहायला, देवदर्शनाला नेतो, त्याच धडपडीनं त्यांना मतदानाला न्यावे.
* नवीन मतदाराला त्याच्या जबाबदारीची जाणीव करून द्यावी. तो उत्साही असतोच, त्याच्या ऊर्जेचा योग्य वापर करण्याची संधी दाखवून द्यावी.
* आपल्या घरातलं, शेजारचं, गल्लीचं मतदान १००% होईल यासाठी प्रयत्न करावेत.
* मतदानाच्या दिवशी जागरूक रहावे. गैरप्रकार आढळले तर विरोध करावा, शक्य त्या ठिकाणी तक्रार करावी.
हा देश आता जसा आहे तसा, आपला आहे. त्याला आपल्याला हवा तसा आदर्श बनवायची जबाबदारी आपलीच. त्यासाठी हे अगदी मूलभूत आणि सोपं योगदान - मतदान! आपल्या मनाचं, आकांक्षांचं, अपेक्षांचं खरंखुरं प्रतिबिंब उमटावं अशी इच्छा असेल तर हे योगदान मनापासून आणि सर्वशक्तीनिशी देण्यासाठी तयार होऊ.
- विनिता तेलंग (मोबा.९८९०९२८४११)

आम्ही आलो..!
मागे एकदा आलो होतो, आज पुन्हा आलो आहोत,तुमची सेवा करण्याची संधी पुन्हा मागत आहोत ।।
पाच वर्षे मजेत गेली, काही कमी पडलं नाही, कोण मेले, कोण जगले, आमचं काही अडलं नाही ।।
राजकारणातील शत्रू , खाजगीत मात्र मित्र आहोत,आपसात लढून फायदा काय, एकमेकांना पटवीत आहोत ।
जात-धर्म नाणी आमची, गुळगुळीत कधी होत नाहीत,नोटा थोड्या फेकल्यावर माणसं कमी पडत नाहीत ।
पडतात मुडदे थोडेफार, त्यांच्यासाठी रडते कोण?पोळया मात्र भाजून घेतो, नाहीतरी त्यांना पुसते कोण?
भूक-दारिद्र्य नेहमीचेच पाचवीस त्यांच्या पुजले आहे,त्याचे एवढे कौतुक काय आमचे कुठे अडले आहे?
आपलीच आपण स्तुती करणे आम्हा फार आवडत नाही,
ओळख ठेवून बटण दाबा, आणखी काही सांगत नाही ।
- विलास वि.फडके, पेण (रायगड) मोबा.९४२२०९६२०८ 

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन