Skip to main content

31March2014

कवी होता कसा आननी?
- सुपर्णा बापट
किर्लोस्करवाडीतच लहानाचे मोठे झालेले सुधीर मोघे यांची 
प्रकट मुलाखत मार्च २००७ मध्ये तेथील सोशल क्लबमध्ये घेतली, त्याचे रसग्रहण (पूर्वप्रकाशित)
फाल्गुनातील सुरेख संध्याकाळ. हलके उबदार वारे. वडा-पिंपळाच्या, बदाम-सागाच्या झाडांनी समृद्ध परिसर. जुन्या काळच्या वास्तूशैलीचा आभास देणारे  देखणे सभागृह. सूर्याचा केशरी गोळा हळूहळू क्षितिजाआड होत होता अन्...
`होईल केशरी पहाट साक्षात,
साक्षात् तुझ्यात उजाडेल'
असे म्हणणारा कवी आपले कवीत्व उलगडून दाखवत होता.
`कवी तो आहे असा आननी' एवढीच उत्सुकता असलेल्या वयाचा श्रोतृवर्ग; आणि कवीच्या कवीत्वाचीच केवळ नव्हे तर स्वत:च्या भूमिकेची पुरेपूर जाण असणारा मुलाखतकार. कार्यक्रम नुसता रंगला नाही तर भिजला, दरवळला. `कविता होते कशी' अशा प्रकारच्या प्रश्नांना बगल देऊनही कवीच्या अन् चांगल्या कवितांच्या धमन्यांमधून काय वाहतंय अन् ते किती प्रसन्नपणे, प्रवाहीपणे वाहतंय हेही सर्वांना कळलं. कवीच्या स्मृतींची पाने फडफडली अन् सुधीर मोघे नावाच्या ह्या मौल्यवान ग्रंथातले काही वेधक उतारे दृष्टीस पडले. तेवढ्यानंही भारावलेपण यावं अशीच त्या ग्रंथातली प्रकरणे!
उत्तम गुणाची मंडळी, सत्वधीर सत्वागळी,
नित्यसुखाची नव्हाळी। जेथे वसे।।
कवी उत्कटपणे बोलत होता. मोकळया मनाने त्याच्या जडण-घडणीचे श्रेय- इथल्या मातीशी, इथल्या किर्लोस्करी वातावरणाशी, आईवडिलांच्या वाणीशी-जोडून देत होता. असा सारा कौटुंबिक, अनुवांशिक अन् परिसराचा संस्कार. तो रुजवून घेण्याइतकी कवीची माती मऊशार, कसदार होती.
शब्दामागे उभा अर्थ,  अर्थामागे उभे मन
मनाच्याही पैलतीरी,  बोले कुणीसे गहन
शब्दांची नादमयता, त्यांचे आघात, त्यांची चाहूल, त्यांना आकर्षक वाटे. त्यांनी अर्थाशी झटापट न करता - काव्यविषयाला लयकारीच्या अंगाने फुलवत न्यावे, फुलाच्या देठाशी पर्णाधार असावेत तशी गेयता कवितेला लगटून यावी, आणि कविता देठातून न फुटता `दिठीतून' फुटावी, हे सारे अन् ह्याहूनही अधिक या कवीला फार लवकर आकळले.
जगी निरंतर महाकवींच्या, दु:खाश्रूंचे मोती झाले,
ऐरणीवरी आपत्तींच्या, काव्य नित्य उजळून निघाले.
व्यथा बोलते काव्य चिरंतन, सत्य कुणी हे नाकारील का?
मरणी अमरता चेतविणारे, कवन कुणी विसरेल कधी का?
काव्य हे कारुण्यातून जन्मते अन् तेच निरंतर टिकतेही हे जेव्हा त्याला कळलं आणि त्यानं मांडलंही, तेव्हा अर्ध्याकच्च्या वयाची दहलीज ओलांडून त्याची `जाणीव' प्रगल्भतेच्या वाटे पार पुढे गेलेली होती.

`ऐल अंधुक उजेड, पेल काळोखाचा डोह
त्यात तिरीप एखादी, तिचा पडतसे मोह
दाट काळोखाच्या पोटी, मंद चमकती लाटा
काही अज्ञात भोवरे, काही असंभाव्य वाटा'
मनाच्या गाभाऱ्यात वाजणारा तंबोरा, दूरवरून ऐकू येणारे ड्न्मबीटस्... त्या कंपनांची आविष्कारातल्या षड्जाशी सांगड घालतानाच, मळलेली पायवाट न धरण्याचा निश्चय! आतून अव्याहत धडका देत फुटू पाहणारे काही. एकीकडे सावध बहुश्रुततेतून, फकीरी वृत्तीतून, संपादनातून, आत्मचिंतनातून दिग्गज लेखक-कवींच्या कलाकृतीच्या (अन् व्यक्तिमत्त्वाच्याही) अभ्यासातून, आपसूक चालत येणाऱ्या संधींमधून स्वत:च्या काव्यविषयक जाणिवांची मुळं खोल रुजवायची, त्याच वेळी मन मानेल तस्सेच विहरू देणारे आपले असे आकाश व अवकाश शोधायचे अन् `नवख्या' वयात `नवख्या' दुनियेतही भणंग गृहस्थ न होता भद्र-भारदस्त कलाकार व्हायचं...!
तरल मनाचे काळीज विंधून गेले नसते तरच नवल! पण कवीची सकारात्मक वृत्ती इतकी प्रिडॉमिनंट की त्या विंधल्या काळजातून चिरस्मरणीय, लक्षणीय, स्पृहणीय अशी अनेकानेक काव्यफुले उमलली... त्यांचे हार झाले... अन् रसिकांच्या कंठी रुळले! गदिमा, कुसुमाग्रज, मर्ढेकर, बोरकर, अनिल, शांताबाई या नक्षत्र गर्दीत कवी वेगळया सुंदरतेने लखलखू लागला. त्याने चित्रपटगीतांना `भावकवितेचा' दर्जा दिला. एक पोकळी त्याने समर्थपणे भरून काढली.
१९७१-७२ हे कवीचे सुवर्णवर्ष म्हणता येईल. या क्षेत्रातले ज्ञानी व अग्रणी त्याला ओळखू लागले. नाटक, रेडिओ, चित्रपट, सूत्रसंचालन, संपादन, लेखन, संगीतकार, गीतकार असा नानाविध संचार करूनही त्याचे `घरी' असणे  त्या थोरांना प्रभावित करून गेले. जाणकार रसिकांनाही त्याने स्वत:तल्या आवाजाशी, अन् अदृष्टाला भिडलेल्या नजरेशी, सृजनाच्या उर्मीशी मांडलेला घरोबा जाणवू लागला.
कवीच्या अंतरंगात सुखेनैव नांदणाऱ्या नट, संगीतकार, नाटक, रसिक वाचक, तरल मनाचा माणूस, सर्व कलांचा आस्वादक, चित्रकार ह्या व अशा `भूमिका-भाया' त्याला अद्वितीय बनवून गेेल्या.
निसर्गासारखा नाही रे सोयरा..., दिस जातील दिस येतील..., भले बुरे जे घडून गेले..., भन्नाट रानवारा..., आला आला वारा..., दयाघना..., फिटे अंधाराचे जाळे..., एकाच या जन्मी जणू..., दिसलीस तू..., सांज ये गोकुळी..., अरूपास पाहे रूपी..., शंभो-शंकरा..., मन मनास उमगत नाही..., तरीही वसंत फुलतो..., हे प्रेम कालही होते, हे प्रेम असेल उद्याही...
त्याचे कुठलेही चित्रपट गीत, काव्य हे अभिजात गुणवत्तेची मोहर घेऊनच उमटू लागले. कवितेचे ओज, भाषेचा ओघ, मांडणीतला तोल, सादरीकरणातला ताल, गेयतेतली लय, काव्यातील आशय, गीतातील बीज अन् त्याचा आवाका या समग्रतेचं भान ठेवताना कवी उत्तम कवितेचे निकष-कवितेचं `प्राणतत्त्व' कधी विसरला नाही. असं नाही होऊ दिलं त्यानं. रचनेत तपशील भरताना आशयावरून कधी दृष्टी टळली नाही. कवितेचे अंतरे मांडताना प्रचारकी बाज न आणता, रंजकता हे मूल्य न विसरता आपला खास स्वत:चा असा एक चमकदार विचार-हिरा चपखलपणे गीत-कवितेच्या कोंदणात बसवण्याचे त्याचे कसब भल्याभल्यांनाही चकित करून गेले. त्याची चित्रमय शैली चित्रकारांनाही लोभावू लागली. (कानामागून आली अन् तिखट झाली!) त्याच्याकडचा कामाचा ओघ वाढता राहिला!
तरीही जाणिवेचे झाड गदागदा हलवून तो फुलांचे सडे घालत राहिला नाही की चलनी पिकाच्या मागे लागून त्याने स्वत:चा कस घालवला नाही. त्याने `नकाराधिकार' जागृत ठेवला आणि तरीही तो रसिकप्रिय होत गेला. त्याच्या कर्मभूमीत-कार्यक्षेत्रात मानाचे पान पटकावू शकला. त्यामागे त्याचा `स्व'चा अभ्यास तर होताच. त्याला त्याची बलस्थानं माहीत होती. त्यांचा नेमका अन् नेटका वापर करण्याची हातोटीही त्याने आत्मसात केली होती. त्याची सकारात्मक वृत्ती त्याच्या सतत पाठीशी राहिली. त्यामुळं त्याच्या वाटेवरल्या अडथळयांचे मनोहारी साकव बनले. आजूबाजूला घडणाऱ्या बदलांचं, नवीन वाटावळणांचं, बदलत्या प्रवाहाचं भान तर होतंच पण वास्तवातील अधिक चांगलं शोधण्यासाठीची सूक्ष्म रेखा शोधण्याची स्वच्छ जाणीव होती. इतके सारे असूनही अंगभूत नम्रता, सहकार्याची वृत्ती, माणूसपणाचा आदर व सहवासातील व्यक्तींची समज हेही सारे गुण होते. संघभावनेचं, सहअस्तित्वाचं (ढशरा थेीज्ञ) भान होतं, वेळेची योग्य जाण होती... म्हणून तर `कविता-पानोपानी', `मंतरलेल्या चैत्रबनात', `नक्षत्रांचे देणे' असे आवरते घ्यायला, खरोखर अवघड, विस्तृत, भव्य-दिव्य असे कार्यक्रम तो करू शकला.
चित्रपटांतील गाणी - चालींवरून, बंदिशींवरून, दिग्दर्शकाने सांगितलेल्या प्रसंगावरून लिहिताना त्यांचं हे सारं कसब, शब्दसंपुटातून नेमक्या छटेचा शब्द येईपर्यंत करावी लागणारी प्रतीक्षा, स्वत:लाच कधी कधी द्यावा लागणारा तळ शोधत राहण्याचा अवधी, कवितेतली आवश्यक अशी जागा, तसेच आश्वासक देणं देण्याची ही कार्यवृत्ती असणे हे सारं त्याच्या `यूनिक' असण्याला हातभार लावणारं ठरलं.
स्वत:च्या सत्तत्त्वाच्या प्रत्ययासाठी अनावृत होणं  हे प्राणतत्व एकदा ठरवल्यावर त्याने आजवर कधीही `नकोशी' तडजोड केली नाही. सहाव्या ज्ञानेंद्रियाच्या  विरोधात जाऊन काही मिळवले नाही. या जीवघेण्या स्पर्धेच्या युगातही या प्रेरणेने नव्हे तर कवितेतून सत्य-शिव-सुंदराच्या जास्तीत जास्त निकट जाण्याच्या प्रेरणेने त्याने काम केले. हे सूत्र त्याने सतत पाळले आहे.निसर्गाला गुरू मानले आहे. `तापत्या उन्हात तो सावल्यांचे बीज पेरीत' निघाला आहे.
मुळात तो फार आत्ममग्न आहे. वेधक आणि व्यक्तिगत गोष्टींनी रसिकांना भूल टाकणारा तर तो नाहीच - तशी जरूरी त्याला पूर्वीही कधी नव्हती अन् आता तर नाहीच. त्याच्या कवितेचे प्रकटीकरण, त्याची भाषा नेहमीच संयमी, सूचक, स्वच्छ, खानदानी, अन् संगतवार राहिली आहे. जे लाभलं आहे त्याबद्दल तो कृतज्ञ आहे. सारे `सखीपण' निभावणाऱ्या `शुभदायिनी' पत्नीची जोड तो मोकळेपणाने नमूद करतो.
मुलाखती दरम्यान पेीींरश्रसळल अन् भावव्याकूळ न होताही केवळ घरचे श्रोते म्हणून मनातली खंत तो बोलून जातो. आणि सगळे विचारात असतानाच कवी मात्र `सखी मंद झाल्या तारका..' च्या सुरावटींमधे पोचलेला!
हा कवी मनस्वी आहे. पाऱ्यासारखा आहे. हृदयसंवाद करायला सारखा भेटणारा नव्हे, पण आता `दयाघना' सारखा तो ओथंबूून आलेला असताना आपण थोडे भिजू या का? घेऊया का समजून त्याची उपज-निपज, त्याने केलेली स्वत:ची मशागत, त्याच्या कवितेचं सोनपीक, त्याचीे निगराणी? ऐकूया त्याची कविता-गाणी? जाऊ या त्याच्या `क्षेत्री' वारकरी होऊन? लावूया का भाळी कवितेचा टिळा? मन ओलावलं होतंच...
.... थांबेल तो ही पळभरी
पण सांग तू येशील का?....
सूर विरता-विरता कवीच्या पापणीशी थबकलेले पाणी त्याने अलगद परतवले आणि वयाबरोबर बुद्धी अन् भावनेला आलेले जाड्य भेदून साऱ्यांचेच डोळे पाणावले.

सूर्यावरी उद्याच्या विश्वास गाढ ज्यांचा
वेळी अचूक त्यांना आतून जाग येते...

`केसरिया' रंगावर मैफिल संपली. `जागा' असलेला कवी भेटला, थोडा का होईना उलगडला, अविनाशी काळाइतकेच अविनाशी असलेल्या सूर-ताल-लय-ध्वनी-शब्द-अर्थ-स्पंदनांचे मर्म कळूसे झाले. ह्या समाधानाचे चांदणे सर्वभर पसरले होते. ङ्कअ पे-ोेप पळसहीं हरव र्ींीीपशव ळपींे र र्षीश्रश्र-ोेप पळसहीं!ङ्ख
(शब्दांकन : सुपर्णा बापट
छायांकन : डॉ.सी.आर.मराठे)

आता पाहूया गंमत
सरदारजींचे किस्से जगात सगळीकडे, अस्सल विनोदवीर रसिकांची दाद घेऊन जातात. पण काही `शामहृदयी' कनवाळू लोकांस त्याचे फार दु:ख होत असते. शिख जमात देशभक्त, लढवय्या, उद्योगी असून त्यांची सतत टवाळी करणे योग्य नव्हे, असे त्यांच्या हृदयीचेे आक्रंदन असते. वास्तविक भटजी, मारवाडी, लालू, कम्युनिस्ट, पुढारी, डॉक्टर-वकील, स्त्रिया, मास्तर, शाळकरी मुले... सगळयांचे काही गुणदोष असतात आणि ते विनोदविषय होतात. या टवाळ-गंमतीनेच केवळ नाही, तर अतिशयोक्ती, अपेक्षाभंग, वक्रोक्ती, व्याजोक्ती, उपहास, दृष्टांत इत्यादी सुंदर अलंकारांनी भाषा सजते. तो साज नसेल तर सगळे आयुष्य कसले कायदेशीर रुक्ष होईल याची कल्पनाही करवत नाही.

सध्या निवडणुकीचे वारेे वाहात आहेत. या काळात सारी राजकीय धुणी सार्वजनिक घाटावर धुवायला काढली जातात. त्यामुळे पाणवठे गढूळ होतात. या दूषितपणाची दुर्गंधी वाहत्या वाऱ्यांतून चौफेर पसरते आहे. निवडणूक प्रचाराचा भर प्रामुख्याने संवादसभांवर असतो. वृत्तपत्रे आणि टीव्ही या साधनांची त्यात हल्ली भर आहे. पण या संवाद मोहिमेला जो भाषेचा सराव पाहिजे, आस्वाद घेण्याची जाण पाहिजे, आणि आकलनाची अभिरुची पाहिजे ती नाही. त्यामुळे कुणाही संबंधितानी उच्चारलेला शब्द कायद्याच्या तराजूत टाकण्याचे फॅड आले असून त्या आसूडाच्या भीतीने माणसे संवाद करण्याऐवजी फक्त बाष्कळ रुक्ष बडबड करण्यातच अडकून पडू लागली आहेत.

राष्ट्न्वादी पवार हे लोकांशी सहज संवाद साधणारे मिष्किल व्यक्तिमत्त्व आहे. त्यांची सर्वपक्षीय मंडळींत ऊठबस असते, `फड' जमविण्याइतके भाषिक कसब व अंगभूत मिष्किली त्यांच्याकडे आहे. त्या बेरक्या स्वभावातून त्यांनी माथाडी सभेत दोन ठिकाणी मतदान करण्याची गोष्ट केली. वास्तविक ही सूचना गांभीर्याने घेण्यासारखी नाही. सहज गंमत म्हणून हा प्रकार त्यांनी उघड बोलून दाखविला. वास्तवात तसे दोनदा मतदान करणे कसे, काय, किती शक्य आहे? पवार तोंडाने बोलताना त्यांची देहबोली निखळ गंमत करण्याची होती हे जाणवते. निवडणूक कायदा, आचारसंहिता आणि नैतिक जबाबदारी या सर्व वातावरणातही इतपत मौज असायला हरकत नाही.

परंतु पवार यांच्या पक्षाने इतरांबाबत अशी भाषिक अलंकाराची मौज प्रसन्नपणे स्वीकारलेली नाही हे आता त्यांना आठवेल. श्री.गोपीनाथ मुंडे यांनी आपल्याला आठ कोटी प्रचाराचा खर्च आला असे म्हटले तेव्हा ते वाक्य पकडून ज्यांनी गहजब केला, त्यात हे `राष्ट्न्वादी', मुंडे यांच्या बाजूने उभे होते काय? गुजराथमधील दंग्यात मुस्लिमांची हत्या झाली त्याबद्दल श्री.मोदींना विचारले असता, `गाडीखाली कुत्र्याचं पिलू चिरडलं तरी आपल्याला वेदना होतात, इथं तर माणसं मेली...' असे उत्तर आले. यातला दृष्टांत लक्षात न घेता, `मोदींनी मुस्लिमांस कुत्रे म्हटले' अशी आगपाखड झाली. त्यावेळी श्री.पवार यांना परस्पर लाभाची गंमतच वाटली ना! स्वत:च्या पक्षातील राज्याचा उपमुख्यमंत्री व गृहमंत्री मुंबई बॉम्बस्फोटाविषयी एक वाक्य झोंबरे उच्चारल्यावरून हटवावा लागला, त्यास पुन्हा त्या पदावर श्री.पवारांनी बसविले. मग `राज्यातील दंगलींची जबाबदारी मुख्यमंत्र्याला घ्यावीच लागते' असे मोदींविषयी ते म्हणतात तेव्हा ताज हॉटेल हल्ल्याच्या जबाबदारीचे गाठोडे इथल्या गृहमंत्र्याच्या डोक्यावर देऊन त्यास घरी का पाठवत नाहीत?

ही सर्व सोयीसवडीची मुत्सद्देगिरी दाखविणाऱ्या पवारांना आता `गंमत' म्हणून त्यांचे विरोधक का सोडतील? त्यांनी हितेंद्र देसाई, पप्पू कलानी यांना उमेदवारी दिली हे, लोक कसे विसरतील? त्यांची गुन्हेगारी श्री.पवारांनी खपवून घेतली. पण मोदींना एकाही आरोपात न्यायालयाने दोषी ठरविले नाही त्यांस मात्र सावध मुत्सद्दी भाषेत हे टोले मारतात. त्यांच्या भाषेतील अलंकारिक गंमत, आता त्यांची गंमत करणारच!

या राजकीय धुळवडीत मूळ मुद्दा असा की, कायदा आणि प्रसारमाध्यमांतील बाष्कळ काथ्याकूट यांनी आपल्या संवादभाषांतील सौंदर्य नाहीसे केले आहे. `फार शहाणा आहेस!' असे म्हटले तर ती कायदेशीर स्तुती समजण्याचा अडाणीपणा चालू आहे. वाराणसीला किंवा पंढरपूरला गेल्यावर नदीचे स्नान केले तर हिंदू खूश आणि अजमेर दर्ग्यास चादर पांघरली की मुस्लिम खुश हा जसा बाष्कळ निधर्मीपणा वाटतो तसेच राजकीय वक्तव्य केवळ संहिता पाहूनच करावे हेही अभिजात आकलनाचे दुर्दैव म्हणायचे.

प्रसारमाध्यमांनी तर निव्वळ भोचकपणा चालविला आहे. एक कथा पत्रकारी जगात सांगितली जाते. ती अशी की, एक उच्च पीठासीन धर्मगुरू, विदेशी भेटीस निघाले होते. त्यांना त्यांच्या हितचिंतकांनी सावध केले की, विमानतळावरच स्वागतकक्षात पत्रकार भेटणार आहेत. त्यांच्या नादी फारसे लागू नका. धर्मगुरूंनी ते मान्य केले आणि उगीच लंबीचौडी उत्तरे न देता सावधपणे बोलण्याचे ठरविले. विमानातून ते उतरले. स्वागत वगैरे उपचार झाल्यावर एका पत्रकाराने विचारले, ``महोदय, आपण या शहरातील वेश्यावस्तीला भेट देणार आहात का?'' धर्मगुरू चेहऱ्यावर सौम्यमृदूपणा आणत निरागसता पांघरून   उद्गारले, ``या शहरात वेश्या आहेत?'' त्याचा उचित सरळ अर्थ न घेता दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रांत शीर्षक आले, ``विमानातून उतरताच धर्मगुरूंची विचारणा - `या शहरात वेश्या आहेत?'' ही कथा काल्पनिक होती तोवर त्यात अतिशयोक्त मौज होती. आज हे प्रत्यक्ष घडू शकत असेल तर तो पत्रकारितेचा धर्म नव्हे. भाषेवर प्रभुत्त्व असावे, याचा अर्थ भाषांचे सौष्ठव, सौंदर्य आणि घरंदाजपण असावे. चहाटळपणालाही बालिश सौंदर्य असते, पण ते प्रौढ दिवाणखान्यातील तत्वचर्चेत शोभत नाही.

प्रत्येक विधान, प्रत्येक शब्द आचारसंहितेच्या साच्यातून पाडला तर इंडियन पीनल कोडखेरीज काय बोलणार? श्री.पवार यांचे `ते' विधान हे मराठी भाषेतली एक उपरोधिक मिष्किलीच होती. परंतु त्यांनी इतरांबाबत लावलेला आचार आणि संहितेचा न्याय आता त्यांच्यावर उलटला आहे. निवडणूक आयोग काय निर्णय द्यायचा तो देवो, पण या राजकारणाने भाषांना अधोगती दिली आहे. तो धोका अस्वस्थ करतो. संवादाला उखाळयापाखाळयाचे रूप आले तर बोलणेच खुंटले!
***

आठवांचे साठव...!
सर्पाची दोरी
कऱ्हाडच्या सायन्स कॉलेजात मी १९६६ साली होतो. सरकारी पॉलिटेक्निक-इंजिनियरिंग आणि हे सायन्स कॉलेज समोरासमोर होते, आजही आहेत. स.गाडगे महाराज कॉलेजच्या पुढं वसती नव्हती. सायन्स कॉलेजच्या वसतिगृहात राहणाऱ्या मुलांमध्ये ग्रामीण भाग खूपच जास्त होता. देशमुख, कदम, फडतरे, वायदंडे असा आमचा ग्रुप; त्यात अरुण पत्की, शशीकान्त जोशी असे माझे खोलीबहाद्दर होते. विस्थापितांसाठी चळवळ करणारे, विद्रोही विचारांबद्दल अलीकडं प्रसिद्ध झालेले, कासेगावचे भारत पाटणकर हे शेजारच्या खोलीत असत. त्यांच्या घरून जेवणाचा डबा यायचा, त्यात उत्तम दही असायचं. खानावळीत जेवणाऱ्या आम्हां सर्वांना ते अपूर्वाईचं वाटायचं.
टीव्ही, मोबाईल युग नव्हतं, त्यामुळं खेळ किंवा फिरायला जाणं हा विरंगुळा होता.  एके संध्याकाळी पश्चिमेच्या बाजूला खोडशी दिशेनं आम्ही फिरत निघालो. वाटेत एक गुऱ्हाळ चालू होतं. तिथं जरा रेंगाळलो. थोडा गूळ चाखला आणि एकेक अख्खा ऊस घेऊन पुढच्या वाटेला लागलो. आता गप्पांसमवेत चघळायला ऊस होता, ऊस खाण्यात सगळे तरबेज होतो. माझ्या समवेतच्या मित्रांच्या हातचे ऊस संपून गेले, पण कदाचित् माझी बडबड जास्त असल्यामुळं - माझ्या हाती अजूनी कोपरभर कांडं शिल्लक होतं.
एव्हाना सूर्य मावळतीला टेकला होता. संध्यारंगात शिवारं न्हाली होती. कृष्णा नदीवर बांधलेला खोडशीचा बंधारा समोर छान दिसत होता. गप्पांच्या रंगात आम्ही रेंगाळत चाललो होतो.
आणि अचानक माझ्या पायाला काहीतरी चापून धरल्यासारखं वाटलं. माझा जुना पायजमा होता. त्यावरून काही दिसलं नाही. `अरे अरे, हे काय होतंय!' असं काहीतरी ओरडत मी पायजमा पायावरून वरती उचलला तर एका सापानं माझ्या पोटरीशी करकचून विळखा घातला होता. मी पाय झिंजाडल्यावर त्यानं जास्तच आवळलं.
माझ्या हाती उसाचं कांडकं होतं. त्यानं मी माझ्याच पायावर चार पाच झटके दिले. त्यातला एखादा त्यास वर्मी बसला असणार. त्याचा काच सैल झाला आणि साप मोकळा होत असताना मी त्यास पुन्हा सटका देतच, पाय झटकल्यावर तो भुईवर पडला. हे सगळं अर्ध्या पाऊण मिनिटात झालं. साप पुढं पडल्यावर धावपळ करून त्याला दगडानी ठेचणं हे आम्हा मित्रांना मुळीच कठीण नव्हतं. हा रानातला साधा सापच असेल पण पुरा हातभर होता, आणि किती काही म्हटलं तरी सापच की तो!
परत वसतिगृहावर आलो, तेव्हा झुंजूमुंजू झालं होतं. खोलीत पोचेपर्यंत काळोखच झाला. दिवा लावून पाय पाहिला तर दोरी आवळल्यासारखे वळ स्पष्ट उमटले होते. बाजूच्या खोल्यांतून ही वार्ता लगेच पसरली. काळजी, आश्चर्य, चौकशा, समाधान... या सगळयाचा गलबलाट चालला. पण नंतर प्राचार्यांना वगैरे सांगायच्या भानगडीत कुणी पडलं नाही. कारण आमच्या प्राचार्य रावेरकर यांना मुलांची अति काळजी असायची, आणि असल्या `वाह्यातपणा'बद्दल ते रागावलेही असते. माझं ते प्रसंगावधान, धाडस वगैरे कौतुक काही दिवस निकटवर्तीयांत होतं. पण वास्तवात त्यावेळी तरी अंगभर भीतीच थरारली होती. इतक्या भीतीमुळं माणूस धीट बनत असेलही; पण तो धीटपणा म्हणजे बेहोषपणाच असेल तर, असं काही अनाहूतपणी घडत असणार! त्याचं कसलं कौतुक?
- वसंत आपटेे, `वाल्मिकी' किर्लोस्करवाडी ४१६३०८

ऋणानुबंध
आपण लिहिलेल्या अग्रलेख-संग्रहाला माझी प्रस्तावना घ्यावी असं मुळात वसंत आपटे यांच्या मनात यावं, ह्याबद्दलच्या आश्चर्यातून खरं तर मी स्वत:च अजून पुरता बाहेर आलेलो नाही.
मी व्यक्त केलेल्या आश्चर्याविषयी कुणाला आश्चर्य वाटायला नको! त्यांनी माझी निवड एकाच निकषावर केली आहे; ती म्हणजे आमच्या दोघांच्या पायाखालची मूळ जमीन एक आहे. किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचं तर आम्ही दोघे एकाच सांस्कृतिक घरात वाढलो आहोत. त्या घराचं नाव आहे किर्लोस्करवाडी...! आणि  हा घरचा हक्क ध्यानी आल्यावर तो नाकारण्याचा प्रश्नच उभा राहात नाही.
तसे हे वसंत आपटे एरवीही भलतेच चतुर निघाले..... मी हा असा अर्जुन-संभ्रम-अवस्थेत असताना त्यांनी माझ्याही ध्यानीमनी नसलेली एक हळुवार नस नेमकी दाबली. ते म्हणाले, ``काहीही लिहा हो... अगदी बालपणच्या तुमच्या संपादकपणाबद्दल लिहिलंत तरी चालेल'' मी अंमळ मोहोरलोच. (कवी असूनही माझ्या बाबतीत हे असले योग जरा दुर्मिळच!) गोष्ट खरी आहे. बालपणी माझं पहिलं स्वप्न संपादक होण्याचंच होतं. त्या वयात वाचन ह्या बाबतीत मी जरासा सखाराम गटणे होतो. ह्या वाचनयज्ञात एकदा द्वा.भ.कर्णिकांचं `संपादकाचे जीवनस्वप्न' हे नितांत सुंदर पुस्तक हाती आलं. आज इतक्या वर्षांनंतरही माझ्या मनावरचा त्याचा प्रभाव ओसरलेला नाही. संपादक ह्या भूमिकेची मोहिनी माझ्यावर तिथून जी पडली ती आजतागायत तितकीच खोल आहे. मग माझे त्यातले बालप्रयोग सुरू झाले. हस्तलिखित नियतकालिके काढणे, तत्कालीन मौज, विविधवृत्त, नवयुग - त्यातील दत्तू बांदेकरांचा `रविवारचा मोरावळा' - ह्याची बालसुलभ नक्कल करीत ती अल्पकाळ चालवणे, आणि बंदही पाडणे! त्यामुळं त्या सदरांची नावंही बुडबुडा, धुमकेतू अशीच होती. बालपणातून किंचित कुमार वयात प्रवेश करताना ते पोरखेळ थांबले. पण तरीही संपादक होण्याचं स्वप्न धुगधुगत होतंच. मग शाळकरी पोरी जसं त्यांच्या हीरोचं नाव वहीत कोरत राहतात, तसा मी कोरीव अक्षरात लिहीत रहायचो, `संपादक : सु.रा.मोघे' मग कधी स वर अनुस्वार तर कधी प अक्षराला अर्धा म जोडायचा.
किर्लोस्कर मासिकांचा जो पहिला निर्मिती-परिवार होता, त्यामध्ये एका महत्त्वाच्या जागी वसंत आपटेंचे वडील कार्यरत होते. त्यांचं नाव गो.ना.आपटे.
गो.ना.आपटे मला अंधुक अंधुक आठवतात. शुभ्र धोतर-शर्ट आणि अर्धवर्तुळाकार मुठीची लाकडी काठी हातात घेऊन फिरायला निघालेले. तशी त्यांनी किर्लोस्करांची नोकरी कधीच सोडली होती आणि त्यामुळे वाडीही सोडली होती. परंतु तो परिसर सोडला नव्हता. वाडीच्याच कुंपणाबाहेरील तुपेवाडीत (आजचं रामानंदनगर) ते शेती करत होते. त्या शेतातच झोपडीवजा टुमदार घर बांधून रहात होते. अल्पावधीत तो आपट्यांचा मळा म्हणून ओळखला जाऊ लागला आणि वाडीकरांना फिरायला जायला एक ठिकाण तयार झालं. त्यांनी वाडी सोडली होती, तरीही त्यांचे आणि किर्लोस्कर मंडळींचे संबंध अल्पावधीत तसे जिव्हाळयाचे झाले; आणि आपटे कुुटुंबीय हे तसे वाडीकरच राहिले, ते आजतागायत!
पण माझ्या मनात गो.ना.आपट्यांची प्रतिमा राहिली आहे ती वेगळीच, आमच्या घरातील फोटो अल्बममधील एका ग्रुप फोटोतून! किर्लोस्करवाडीतील नाटकांची परंपरा फार जुनी आणि वेधक आहे. अर्थात श्रीकांत मोघे आणि सुधीर मोघेही त्याच नाट्यशाळेतून तयार झालेले गडी आहेत. ती परंपरा सुरू झाली त्यातील अगदी आरंभकाळातील महत्त्वाचं नाटक म्हणजे `तोतयाचे बंड'. ते नाटक केवळ इतिहास विषयावरचं होतं असं नव्हे तर गावाच्या इतिहासातील एक ऐतिहासिक वळण होतं. त्यामध्ये नाना फडणीस ह्या मध्यवर्ती भूमिकेत चक्क शं.वा.किर्लोस्कर होते. त्याशिवाय त्यामध्ये आनंदीबाई विजापुरे, गणपतराव विजापुरे, शांताबाई किर्लोस्कर, रा.ग.मोघे, चित्रकार ग.ना.जाधव (चक्क स्त्रीभूमिकेत) अशी मातबर मंडळी होती आणि त्यामध्ये ज्या भूमिकेचा नाटकाच्या शीर्षकातच समावेश आहे त्या भाऊसाहेब पेशव्यांच्या तोतयाच्या भूमिकेत होते - गो.ना.आपटे.
नंतर एक नवल मनात जागं झालं... आपण फक्त संपादकाची ती बालपणाची हौस केली; पण त्याच भूमीत वाढलेल्या वसंत आपटेंनी मात्र खरोखरच त्या आडवळणी भागात हे `आपले जग' उभं केलं, सातत्यानं  चिकाटीनं निष्ठेनं चालवलं.
- सुधीर मोघे.
(`आपले जग' मधील संपादकीय लेखांचे पुस्तक झाले. त्याच्या प्रस्तावनेमधून संक्षेप)

रामायण व महाभारत ग्रंथ 
महर्षी व्यासांचे महाभारत आणि महर्षी वाल्मीकीचे रामायण या गीर्वाण काव्यांचे इंग्रजी रूपांतर कै.राजगोपालाचारी यांनी केले, त्याचा ओघवत्या सुगम मराठी भाषेतील अनुवाद नुकताच प्रसिद्ध झाला. त्या दोन्ही ग्रंथांत आजच्या संदर्भातील स्थानसूची, प्राचीन भारताचा नकाशा दिला असून गुरुवर्य शंकर अभ्यंकर यांचा प्रदीर्घ विश्लेषणात्मक पुरस्कार समाविष्ट आहे, तर महाभारताची प्रस्तावना डॉ.विजय भटकर यांची आहे.
महाभारत पृष्ठसंख्या ५४४ छापील किंमत रु.५५०  सवलतीत रु.२५०
श्री रामायण पृष्ठसंख्या ३५१ छापील किंमत रु.२००  सवलतीत रु.१५०
संग्रही ठेवण्यास, भेट देण्यासाठी उत्कृष्ट ग्रंथ
खालील ठिकाणी उपलब्ध :
१) श्री गणेश चॅरिटेबल ट्न्स्ट, (फोन : ०२३४६ - २४०५३१)
     `राम-सीता' ८१०, जोगळेकर वाडा,तासगाव,(जि.सांगली) ४१६३१२

२) वाल्मिकी (प्रेस), सा.वसाहत, किर्लोस्करवाडी, जि.सांगली ४१६३०८
    फोन : ०२३४६ - २२२०५८

३) सागर फडके, शाळा नं.२ जवळ, ७९३, गावभाग, सांगली ४१६४१६
      मोबा.९४२३८६९३८५

म.ऑ.पाठवावी किंवा चेक `वि.रा.जोगळेकर' या नावचा लिहावा.


....... निवेदन .......
महाराष्ट्नच्या काही जिल्ह्यांत, विशेषत: मराठवाडा - विदर्भात गारपीट आणि अवेळी पावसामुळे पुष्कळ कुटुंबांवर संकट आले, त्यांना सावरण्यास काही अवधी लागेल. अशा अडचणीतील ५ वी ते १० वी च्या मुलांना सुटी लागली असेल; त्यांची निवास-भोजनादि व्यवस्था सुमारे २ महिने चिपळूणजवळ वसतिगृहात मोफत होऊ शकेल. या मुदतीत त्या मुलांनी `मामाच्या घरी' समजून राहावे, हलके फुलके काम, थोडे वाचन वगैरे करावे. पुढे  दोन-तीन वर्षे शाळेसाठी राहण्यासही हरकत नाही. त्यासाठी शुल्क नाही. मात्र मुलाची वर्तणूक, परिस्थिती, संस्कार इत्यादी खातरजमा करून प्रवेश देण्यात येईल.
संपर्क : प्रसाद काणे, द्वारा-आदर्श उपहारगृह, शिवाजी चौक, चिपळूण (जि.रत्नागिरी)
फोन : (०२३५५) २५२१२८,  ९४२२४३०९००

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन