Skip to main content

24Feb.2014

देवाचिये द्वारी, क्रांतीचे सोहाळे
पंढरपूर, कोल्हापूर अशा तीर्थक्षेत्रांत पूर्वकाळी कधी जातीय अनाचार होत असतील, ते रोखण्यासाठी व भेदाभेद नाहीसे करून समानता रुजविण्यासाठी कित्येकांनी प्रयत्न केल्याचे इतिहास सांगतो. देव देऊळी कोंडून त्याचा बाजार मांडण्याचे पाप काहींनी केले, पण त्याच्या भक्त रयतेचा कैवार घेऊन त्यास मुक्त करण्यासाठी तळमळून प्रयत्न करणारेही सर्व जातीपातींचे श्रेष्ठ विचारवंत होते.परंतु ज्यांना क्षुद्र अमंगळ भेद फुलवत ठेवायचा असतो अशांना सध्याच्या काळात अस्थानी स्थान मिळते आहे. ही तीर्थक्षेत्रे शासकीय देवस्थान समितीकडे व्यवस्थापनासाठी आहेत. आणि शासकीय म्हणून जो बरा-वाईट किंवा पक्षपाती कारभार चालायचा, तो तिथे चालणे हेही ओघानेच येते. पण त्याबद्दल रोष मानावा असे काही नाही. आपला शासकीय व्यवहार राज्यघटनेप्रमाणे धर्मनिरपेक्षतेने चालणे अपेक्षित आहे. पण राजकारणी पुढारी देवलोकांतून आलेले नाहीत, ते राजकीय लंपटगिरीमुळे तितकी धर्मनिरपेक्षता प्रत्यक्षात आणू शकत नाहीत. त्यांना झुंडशाहीचा विचार बोटचेपेपणाने करावा लागतो आणि त्यालाच `प्रागतिक पुरोगामी विचार' म्हणून मिरवत ठेवावे लागते.

या प्रकारच्या लोकशाहीमुळे वाह्यात उपटसुंभ मागण्या जोरदार आक्रस्ताळीपणे मांडल्या जातात आणि त्या बुळचटपणे मान्यही होऊन जातात. पण त्या मागण्या व मान्यता यातही जेव्हा स्पष्ट जातीय अनाचार असतो, त्याला रोखता येऊ नये असे अराजक, सध्या परिस्थितीने निर्माण केले आहे. पंढरपूरच्या देवळातील पूर्वापार बडवेगिरी किंवा अस्पृश्यता कधीच नष्ट व्हायला हवी होती. मंदिरप्रवेशबंदी उठली त्यास अर्धशतक झाले, बडवे लोकांची वहिवाटही संपली. आता मंदिरसमिती विठ्ठलमंदिराची व्यवस्था आणि `देवाचे सोपस्कार' भक्तांच्या श्रद्धेनुसार करेल. त्यातून वेगळी बडवेगिरी निर्माण होईल, हेही संभवनीय आहेच.

बडवे हटले म्हणून `श्रमिक मुक्ती संघटन' अशा काही नावाने स्वघोषित क्रांतिविचारवंत विजयोत्सव साजरा करणार असल्याचे वृत्त आहे. त्याचबरोबर विठ्ठलाच्या पूजेप्रसंगी रेशमी वस्त्र लेवून पुरुषसूक्त पठण करण्याची बेकायदेशीर(?) प्रथा बंद करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. विठ्ठल हा गोरगरीबांचा देव असल्यामुळे त्यास रेशमी वस्त्राऐवजी घोंगडी-काठीचा पोशाख करावा अशी त्यांची सूचना आहे. ही सूचना मान्य झाली किंवा न झाली तरी, नवी एक हाणामारी सुरू करून विद्वेष वाढविण्याचा त्यांचा उद्देश साध्य होऊ शकेल. विठ्ठल जर गोरगरीबांचाच देव असेल तर त्याच्याकडे रेशमी वस्त्रे-दागदागिने-पंचामृती स्नान वगैरे सरंजाम आले कसे हा एक प्रश्न! आणि त्याच्याकडे स्थावर जंगम मालमत्ता व रोज वाहणारा पैशाचा ओघ असल्याशिवाय शासकीय देवस्थान समिती स्थापन झाली का, हा दुसरा प्रश्न!

पण असल्या तर्कांशी देणेघेणे असेल तर आजच्या उचकंडी चळवळी उभ्या राहू शकत नाहीत. मध्यंतरी पुण्याच्या दगडूशेठ गणपतीपुढे महिलांचे अथर्वशीर्ष होण्याला बंदी घालण्याची मागणी होती. तीही पुढेमागे कधीतरी मान्य होऊ शकेल. देव आणि देवमाणसे वाटून घेण्याचा भेद भडकविणाऱ्या जळत्या काड्या मुद्दाम फेकत राहण्यात काहींना पुरोगामीपणा वाटतो. गोरगरीबांचा आणि श्रीमंतांचा देव वेगळा असतो हे त्यांच्या देवालाही ठाऊक नसेल. आज कोणताही सामान्य गरीब,घोंगडी काठी वापरत नाही, पॅन्टशर्टच वापरतो. ते लेऊनही विठ्ठल हा विठ्ठलच राहील. `कासे पितांबर-कस्तुरी लल्लाटी' वगैरे स्तुती-आरत्याही बदलण्याला खरे भक्त अडवणार नाहीत. आरती कोणती गावी, नैवेद्य कोणता दाखवावा, सूक्ते कोणती म्हणावी हे कायद्याने कधी ठरत असते काय? पुरुषसूक्त कायदेशीर आहे, असा दावा कोण करतो? ते बेकायदेशीर होण्याचा प्रश्न कुठाय? कोणाला ते म्हणायचे नसेल किंवा म्हणता येत नसेल, कळत नसेल तरी ते म्हणायचा कायदा होत नसतो. काही काळापूर्वी खेडोपाडी घरोघरी गणपती बसत नव्हते, हल्ली ते बसतात. त्याच त्या आरत्या होतात. मोदक होतात. गोरगरीब कोणी चटणी-भाकरीचा नैवेद्य दाखवत असतील तर कल्पना नाही. वास्तविक तो दाखविला तरी `बेकायदेशीर' नाही. धर्मबाह्यही नाही.

या `श्रमिक मुक्ती'च्या नेत्यांसह जे कोणी गोरगरीब, ज्यांना कोणाला देव मानत असतील त्यांच्याही मूर्ती-पुतळयांचे पोशाख बदलून त्यांस घोंगडी पांघरतील की काय, अशी भीती आहे. त्या गोरगरीबांचा जो काही आहार असतो त्याचाच नैवेद्य दाखविला तरी ते देव रागावणार नाहीत पण भक्तांत संघर्ष पेटेल. विठ्ठल गोरगरीबांचा देव म्हणून-उद्या कोणी सांगावे, त्याला उंच शिखरांच्या देवळात न ठेवता गावाबाहेर झोपडीत ठेवण्याची मागणी होईल.

परंतु एक गोष्ट निश्चित आहे की, या भडकपणामुळे देव नावाची वस्तू जिथे जशी वसेल-असेल, तिथे पुन्हा श्रद्धेची गर्दी होईल. तिथेही त्या देवाकडे सोनेनाणे-रेशमी वस्त्रे साठत राहील. आणि तिथेही काही मनमानी स्वार्थी बडवेगिरी तयार होईल. कारण देव गोरगरीबांचा असला तरी तो देव गरीब राहात नाही. `श्रमिक मुक्ती' किंवा तत्सम क्रांतीकारी विद्रोहींचे देव वेगळे नसतात, तर ती माणसे स्वत:ला वेगळे समजतात. इतरांनीही त्यांना वेगळे मोठेपण द्यावे, याचसाठी हा अट्टहास असतो; अन्यथा हेही तसेच असतात.
सुरेश भटानी म्हटल्याप्रमाणे -
केले न बंड त्यांनी, त्या घोषणाच होत्या
ज्यांनी उठाव केला, तेही तसेच होते ।

झाला न स्पर्श कधी, त्यांनाही चंदनाचा ।
सारे उगाळलेले, ते कोळसेच होते ।
***

आपले हृदय आणि फुफ्फुसे
जन्माला आल्यानंतर पहिला श्वास घेतल्यापासून ते शेवटच्या नि:श्वासापर्यंत मनुष्याच्या शरीरातील हृदय आणि फुफ्फुसे सतत काम करीत असतात. चोवीस तास, दिवसामागून दिवस, अविरत, अव्याहत कार्यरत राहणे हे विलक्षण कठीण काम आहे. आपल्या दिनक्रमाशी तुलना केली तर असे कार्यसातत्य किती महत्त्वाचे आहे याची कल्पना येईल. रविवारची सुटी नाही, आजारपणाची हक्काची रजा नाही, आठ तासांपैकीसुद्धा चुकार कामाची सोय नाही, अतिश्रमाने `दमले बाबा आता, जरा पाच मिनिटं थांबू' असं म्हणायची सोय नाही; अखंड काम-काम आणि काम. हृदय आणि फुफ्फुस या दोन्हीचे काम थांबले की मनुष्यजन्मच संपला.
इतक्या महत्त्वाचे हे अवयव असल्यामुळे त्यांच्यासंबंधी आजारपण आणि त्याहीपेक्षा गैरसमजावर आधारित अकारण काळजी, सध्याच्या काळात सर्वत्र दिसून येते. हृदयविकार, हृदयावरील शस्त्रक्रिया, हृदय बदलणे, बायपास असे अनेक शब्द सध्या सामान्य माणूससुद्धा वापरू लागला आहे. अत्याधुनिक यंत्रसामग्री वापरणारी रुग्णालये वाढत आहेत. एका बाजूला हे महागडे आणि धोकादायक उपचार आवश्यक नाहीत कारण त्यांची खात्री देता येत नाही, त्याविषयातले व्यवहार संशयास्पद असतात वगैरे छातीठोकपणे सांगणारे लोक आहेत. तर दुसऱ्या बाजूस आधुनिक विज्ञान आणि यंत्रसामग्री यामुळे वैद्यकीय क्षेत्रात कौशल्य वाढले असल्यामुळे या महत्त्वाच्या अवयवांवरती वेळेवर उपचार करून आयुष्यरेषा वाढविणे योग्य आहे, असे प्रतिपादन केले जाते. सर्वसामान्य लोकांमध्ये मात्र या दोन्ही बाजूंपैकी कुणाचे ऐकायचे असा संभ्रम तयार होतो. म्हणून या अवयवांची थोडीशी माहिती असणे, आणि नसेल तर ती करून घेणे अधिक आवश्यक आहे. त्यांची रचना आणि कार्य समजून घेतले तर आपल्याला योग्य तो निर्णय घेता येतो. 


श्वसनेंद्रिये म्हणजे नाक, तोंड, श्वासनलिका, त्या नलिकेच्या शाखा-उपशाखा आणि त्यांच्या टोकांचे वायुकोष. नाकातून किंवा तोंडातून आत  घेतलेली हवा या श्वासमार्गाने फुफ्फुसात जाते आणि फुफ्फुसातील हवा त्याच मार्गाने परत बाहेर फेकली जाते, यालाच आपण श्वासोच्छ्वास असे म्हणतो. साधारणत: शुद्ध हवाच आत घ्यावी आणि अशुद्ध हवा बाहेर फेकावी हेच अपेक्षित आहे. प्रदूषणयुक्त अशुद्ध हवा सध्या पुष्कळदा आत घेतली जाते. पण तो अपवाद म्हणून सोडून देऊ.
आपल्या छातीतील बरगड्यांच्या पिंजऱ्यात दोन्ही बाजूला दोन फुफ्फुसे असतात आणि त्या दोन्हींच्या मध्ये, स्वत:च्या मुठीएवढ्या हृदयाची जागा असते. श्वासनलिकेला ट्न्ॅिकया असे नाव आहे. उजवी आणि डावी अशा त्याच्या दोन शाखा (फांद्या) असतात. त्यांना ब्राँकस असे म्हणतात. या मुख्य ब्राँकसपासून उजव्या बाजूकडे तीन आणि डाव्या बाजूकडे दोन फांद्या फुटतात. पुढे त्यांना अनेक उपशाखा फुटत फुटत सरतेशेवटी त्या सूक्ष्मनलिका वायुकोषांना जोडलेल्या असतात. या वायुकोषांमध्ये प्राणवायूने युक्त असलेली शुद्ध हवा घेतली जाते आणि परत त्याच मार्गाने अशुद्ध हवा बाहेर ढकलली जाते. उजव्या फुफ्फुसाचे, वरचा-मधला आणि खालचा असे तीन भाग असतात. त्यांना अनुक्रमे अपर लोब, मिडल लोब आणि लोअर लोब असे म्हणतात. डाव्या बाजूस मात्र वरचा (अपर) आणि खालचा (लोअर) लोब असे दोनच भाग असतात. प्रत्येक फुफ्फुसाला शुद्ध आणि अशुद्ध रक्तवाहिन्या व त्यांच्या शाखा-उपशाखांनी रक्तपुरवठा व निस्सारण करण्याची व्यवस्था असते. फुफ्फुसांमध्ये आत येणारी शुद्ध हवा प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन घेऊन येते. वायूकोषांमध्ये असलेल्या रक्ताच्या केशवाहिन्यांत तो ऑक्सिजन ओढला जातो आणि त्याच्या बदली रक्तातील कार्बन डायऑक्साईड वायू (अशुद्ध हवा) वायूकोषात ढकलला जातो. याला गॅस एक्चेंज असे म्हणतात.
दोन्ही बाजूच्या फुफ्फुसांभोवती पातळ पापुद्र्याचे एक आवरण असते. त्याला प्लुरल सॅक म्हणजे प्लुराची पिशवी म्हणतात. फुफ्फुसे रबरी चेंडूप्रमाणे मऊ - अधिक वास्तव सांगायचे तर स्पंजप्रमाणे सछिद्र आणि भुसभुशीत असतात. श्वास आत घेतला जात असताना ती फुगतात आणि बाहेर सोडताना ती आकुंचन पावतात. बरगड्यातील स्नायू आणि विशेषत: छातीचा पिंजरा आणि पोट यामधील विभाजक पडदा (डायफ्रॅम), यांचा उपयोग हवेच्या आतबाहेर सोडण्यासाठी होतो. दर मिनिटाला पंधरा ते वीसवेळा श्वसनक्रिया होते. आणि प्रत्येक श्वासोच्छ्वासाला ३५०-४०० मिली एवढी हवा आतबाहेर फेकली जाते. एका मिनिटाच्या अवधीमध्ये साधारण साडेचार ते पाच लिटर रक्ताची शुद्धी होत असते.
हृदय मध्यम आकाराच्या रामफळाएवढे, रंगाने काळपट तांबूस मांसल पिशवी असते. दोन्ही फुफ्फुसांच्या मध्यभागी पण किंचित डाव्या बाजूला झुकलेले असते. त्याचा निमुळता भाग खाली आणि रुंद भाग वरती अशी रचना असते. हृदयाभोवती सुद्धा पातळ पापुद्र्याचे आवरण, त्यास पेरीकार्डियल सॅक असे म्हणतात. हृदय हा रक्त खेचणारा आणि पुढे फेकणारा असा पंप आहे. हृदयाचे दोन उजवीकडे व दोन डावीकडे असे चार कप्पे असतात. त्या कप्प्यांच्या मध्ये पडदे असतात त्यांना अॅटि्न्यल सेप्टम आणि व्हेनट्नीक्युलर सेप्टम असे म्हणतात. डाव्या बाजूकडील वरच्या कप्प्यास डावी कर्णिका व उजव्या बाजूकडील वरच्या कप्प्यास उजवी कर्णिका म्हणतात. त्याप्रमाणेच खालच्या कप्प्यांस उजवी व डावी जवनिका असे नाव आहे. डाव्या कर्णिकेकडून डाव्या जवनिकेकडे रक्त जाण्यासाठी दोन पाकळया असलेली एकमार्गी झडप असते तिला बाय्कस्पिड व्हाल्व्ह म्हणतात. उजव्या कर्णिकेकडून उजव्या जवनिकेकडे रक्त जाण्यासाठी तीन पाकळया असलेल्या झडपेला ट्नय्कस्पिड व्हाल्व्ह म्हणतात. डाव्या जवनिकेच्या वरील बाजूकडून शरीरभर शुद्ध रक्तपुरवठा करणारी महारोहिणी निघते, तिला अेओर्टा म्हणतात. त्या महारोहिणीच्या सुरुवातीस आतल्या बाजूस (एकदिशी किंवा एकमार्गी) तीन झडपा असतात त्यास एऑर्टिक व्हाल्व म्हणतात. उजव्या जवनिकेच्या वरील बाजूकडून फुफ्फुसाकडे अशुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिनीस महारोहिणीच म्हणतात. तिच्याही सुरुवातीला आतील भागात एकमार्गी किंवा एकदिशी तीन झडपांचा पल्मोनरी व्हॉल्व्ह असतो.
हृदयाचे काम सातत्याने चालण्यासाठी लागणारी ऊर्जा (एनर्जी) महारोहिणीच्या सुरुवातीच्या भागातून शुद्ध रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांतून मिळते. त्यांना कॉरोनरी आर्टरीज म्हणतात. डावी कॉरोनरी आर्टरी उजव्यापेक्षा थोडी मोठी असते व त्यातून डाव्या कर्णिका-जवनिका यांस रक्तपुरवठा केला जातो. त्याचप्रमाणे उजव्या बाजूची व्यवस्था असते. उजव्या व डाव्या प्रमुख आर्टरींच्या शाखा-उपशाखा एकमेकींना जोडून रक्तपुरवठा सुरळीत राखला जातो.
उजवी कर्णिका शरीरातील अशुद्ध रक्त गोळा करते व उजव्या जवनिकेत ढकलते. तिथून ते रक्त फुफ्फुसाकडे शुद्धीकरणासाठी पाठविले जाते आणि शुद्ध झालेले रक्त पल्मोनरी व्हेन्समधून डाव्या जवनिकेत येते. तेथून हे शुद्ध रक्त सर्व शरीरास पुरविले जाते. रक्ताभिसरणाचे काम नियमित गतीने होण्यासाठी हृदयाच्या स्नायूंना प्रेरित करण्याचे काम मेंदूच्या आधिपत्याखाली मज्जातंतू करीत असतात.
सर्वसाधारणत: विश्रांतीच्या वेळी आपल्या नाडीचे ठोके (हृदयाची स्पंदने) दर मिनिटास ७०-७२ इतके होत असतात. व प्रत्येक स्पंदनाला ७०-७५ सीसी रक्त आतबाहेर केले जाते. म्हणजेच दर मिनिटाला सुमारे साडेचार-पाच लिटर रक्त खेळवले जाते. शरीरश्रम किंवा भरपूर व्यायामाच्या दरम्यान हे प्रमाण ५-१०-१५ लिटर इतके होऊ शकते आणि श्वासोच्छ्वासाचे प्रमाणदेखील दर मिनिटास १६-१८ वरून ३०-३५-४० पर्यंत जाऊ शकते.
वास्तविक यातील पुष्कळशी माहिती शाळेच्या अभ्यासात असते, पण ती पार विसरून जाते. म्हणून पुन्हा समजून दिली आहे. हृदय आणि फुफ्फुसाची ही रचना आणि कार्यपद्धती नीट लक्षात आली तर त्यामधील बिघाड आणि त्यांचे संभाव्य दुष्परिणाम यांची कल्पना आपल्यास सहजपणे येऊ शकेल. आणि त्या आधारे हृदयाचे विकार आणि हृदयरोग यांची कारणे माहिती होणे सोपे जाईल. मग त्यासंबंधी केला जाणारा बाऊ पुष्कळ अंशाने कमी होईल. त्याची निगा राखणे हेही मग आपले आपण ठरवू शकतो.
- डॉ. पी. जी. आपटे,
सावरकर प्रतिष्ठानजवळ, विश्रामबाग
(सांगली) (फोन : ०२३३-२३३१३३१)
मोबा. ७३५०३३६०७७


आपटे संघ आणि संमेलन
पहिल्या चार आपटे संमेलनांची माहिती १९३९ च्या `आपटे कुटुंबियांची जंत्री' ह्या कुलवृत्तांतातील पान १६५ वर `आपटे संमेलन वृत्तांत' मधून मिळते. पण त्यानंतर आपटे संमेलने झाली की नाही, याची नोंद मिळत नाही. स्वातंत्र्य मिळाले त्यावर्षी - १९४७ मध्ये - ह्याच ग्रंथाची पुरवणी प्रसिद्ध करण्यात आली. त्यात काही संमेलनांचा उल्लेख असावा, पण त्यासंबंधी आज तरी काही माहिती मिळालेली नाही.
त्यानंतर तब्बल ३७ वर्षांनी आपटे मंडळींनी एकत्र येऊन १९९४ मध्ये `आपटे कुलवृत्तांत समिती' स्थापन केली. सतत पाच वर्षे परिश्रम करून १९९९ मध्ये `आप्त आपटे' नावाचा कुलवृत्तांत पुणे येथे समारंभपूर्वक प्रसिद्ध केला. ह्या समितीचे अध्यक्ष होते सुप्रसिद्ध क्रिकेटपटू आणि उद्योगपती माधव लक्ष्मण आपटे. कार्यवाह होते शंकर रामचंद्र आपटे. ह्या समितीमध्ये पुणे आणि सांगलीकडील आपटे मंडळीही मदतीला होती. ह्या कुलवृत्तांताचे निमित्ताने पुन्हा `आपटे संमेलने' भरण्याची प्रथा सुरू झाली.
सोयीसाठी १९९४-९५ मधील दादर, मुंबई येथील आपटे संमेलन पहिले असे धरूया. त्यानंतर गुहागर येथे दुसरे, नंतर पुणे येथे दोन, पुन्हा गुहागरला एक (म्हणजे पाचवे), शिवाय ठाणे, कोल्हापूर, इंदोर, आजगाव, सांगली, मिरज, अंबेजोगाई दोन (म्हणजे १३ वे) पाली-चौदावे, सातारा-पंधरावे, म्हणून १९ जानेवारी २०१४ चे पुणे संमेलन हे सोळावे असा हिशोब सध्याच्या माहितीप्रमाणे मांडता येतो. (या यादीत योग्य त्या दुरुस्त्या माहितगारांनी सुचवाव्यात) १९ जानेवारी २०१४ चे पुणे संमेलन, आनंदाश्रम संस्था ह्या आपटे कुटुंबियांच्या वास्तूत डॉ.चारुदत्त अच्युत आपटे यांचे प्रमुख उपस्थितीत यशस्वीरित्या साजरे झाले.
एकूण असे दिसते की, आपटे मंडळी अधून मधून जागी होतात, जोमाने एकत्र येतात, थोडे काम करतात आणि मग पुन्हा थंड होतात! पुन्हा काही वर्षांनी नवीन आपटे पुन्हा सरसावतात, आणि पुन्हा आपटे संघ स्थापन करतात, कुलवृत्तांत प्रसिद्ध करतात... की पुन्हा वारं संपलं...! मला वाटते तात्कालिक उत्साह, त्यामुळे थोडे काम करणे, आणि नंतर एकदम अलिप्त होणे.... हे `आपटे' स्वभावाचे वैशिष्ट्य आहे काय?
- डॉ.मधू आपटे,
(मोबा. : ९४२२६१५४७५)
१५८८, गणेशनगर, पोहण्याच्या तलावाजवळ, सांगली ४१६४१६

कोकणातील सामान्य परिस्थिती  
(सन १९३४ मधील)
शिक्षण - मुलांस सर्वसामान्य शिक्षण देतात. मुलीचे शिक्षण गावातील शाळेत होईल तितकेच. यापलीकडे स्त्रीशिक्षणाची मर्यादा अद्यापि गेली नाही. अगदी लहान गावातही देवळात शाळा भरविली जाते.
भाषा - ब्राह्मण वर्गात सामान्यत: नाकात बोलण्याची पद्धत अधिक आहे. जुनी कोकणी भाषाही काही ठिकाणी बोलतात. परंतु ती तितकी आता रूढ नाही, नामशेष होत चालली आहे. लहान मुले आपापसात बोलू लागली म्हणजे देशावरील माणसांना मौज वाटते.
पोषाख - कपड्यांची छानछुकी अद्यापि कोकणात गेली नाही. जाडे भरडे कपडेच सर्वत्र दिसून येतात.
राहणी - अगदी काटकसरीची असते. श्रम भरपूर व अन्न हलके म्हणजे भातच काय तो. तांदुळाचे विविध प्रकार असतात. शेतांतील किंवा घरगुती कामे स्वत: करतात. त्यात कमीपणा वाटत नाही.
अन्न - भात हे मुख्य पीक असून तांदुळाचे विविध प्रकार जेवणात करतात. तांबडा भात पूर्वी दिसे. घरगुती पालेभाजी पावसाळयात होते, पण ती विकण्याइतपत नसते. नाचणी, वरी वापरतात. पण हेही पीक अत्यल्प आहे. फळांमध्ये पिवळया सालीची सोनकेळी होतात. आंबा भरपूर असतो. त्याचा व्यापारही करतात. साधारणपणे प्रत्येक घरात एक-दोन गुरे असतातच. गायीचे दूध घराला पुरते. थोडे विकतातही. पावटा व कुळीथ याचा आहारात उपयोग करतात.
वयोमान - देशावरच्यापेक्षा इकडील वयोमान जास्त दिसते. ८० च्या पुढे वय असून कष्ट करणारी माणसे बरीच, त्यांचा उत्साह आश्चर्यकारक.
वाद किंवा भांडणे - भांडणांची प्रवृत्ती कोकणात जाज्वल्य आहे. वादांस क्षुल्लक कारणही पुरेसे होते. लोक एकदा इरेला पेटले की, वाटेल तितका खर्च करण्यास मागे पुढे पाहात नाहीत. मानापमान, हक्क, भाषा इ. गोष्टीवरून तो थेट कथा-कीर्तनातील बुक्का लावण्याच्या मानापर्यंत भांडणे होऊ शकतात.
आदरातिथ्य- आदरातिथ्य करण्याकडे लोकांची प्रवृत्ति विशेष, परंतु परिचित व्यक्तींचे आदरातिथ्य जास्त.
सोवळे ओवळे - याचे मान बरेच कमी आहे. खेडेगावात स्वच्छता व सोवळे ओवळे अजून आहे. परंतु बाहेरून आलेल्यास जाचक नाही. रत्नागिरीसारख्या रहदारीच्या ठिकाणी मात्र सोवळे ओवळे कोणाच्या लक्षात येत नाही. अर्थातच जुन्या पिढीचे लोकांत अद्यापि ते आहे. मंदिराची चांगली देखभाल ठेवतात. वयात आलेल्या मुलींपासून पाळी येणाऱ्या बायका ३ दिवस बाहेर बसतात.
एकी - प्रसंगविशेषी गावातील ब्राह्मण मंडळी आपसातील भांडणे बाजूस ठेवून एक होतात असे दिसले. नवीन शेतकी ठरावामुळे ब्राह्मण वर्ग एकजुटीने शेतात काम करताना दिसतो.
व्यायाम- व्यायामाचा प्रचार कोकणात बिलकूल नाही. तालमी, आखाडे किंवा व्यायामाच्या इतर गोष्टी ऐकावयासही मिळत नाहीत. अलीकडे रत्नागिरी, चिपळूण वगैरे ठिकाणी काही तालमी निघाल्या आहेत.
देवघेव - रोख पैसा कमी व त्यामुळे हातचा पैसा कमी सुटेल अशी प्रवृत्ती असते. खेडेगावांतून किरकोळ श्रमाबद्दल व कामाबद्दल पैशाऐवजी नारळ, सुपारी अजूनही देतात. पेय म्हणून ताक, कोकम सरबत, गूळ-पाण्याची पद्धत आहे.
बाजार - पंचक्रोशीचे ठिकाणी दोन-चार दुकाने आढळतात. वाणी, कापड, भाजीपाला, पुस्तके-वह्या विक्रेते असे दिसतात. गॅसबत्ती, स्टोव्ह, कल्हई करणारे, लोहारकाम, चांभार, गाद्या करणारे पिंजारीही आढळतात. तालुक्याचे ठिकाणी पुष्प बाजार, घरगुती खानावळी, उपहारगृहे आढळली.
वाहने - बैलगाडी सोडली तर वाहने नाहीत. डोंगराळ भाग असल्याने सायकली तुरळक पाहायला मिळतात. खाजगी बसेस कोल्हापूर, कराडवाल्यांच्या दिसल्या. हातगाडी सखल भागात गावात दिसते. मुंबईहून गावाकडे येणारे फोर्ड गाडी आणतात. थोडे दिवस या भागात फिरवताना दिसतात. घोडे-गाढवे यांच्यावरून सामानाची ने-आण होते. वर्तमानपत्र नाही, नियतकालिके नाहीत. केसरी मात्र पोस्टाने काहींना येतो. बलवंत, किरात, दर्पण, चंद्रोदय, कुलाबा समाचार अशी पाक्षिके निघतात. मुंबईवाल्यांनी मर्फी-फिेलप्स कंपनीचे रेडिओ दिलेले आहेत. पारावर सामूहिक ऐकण्याची पद्धत काही ठिकाणी दिसली. वीज नसल्याने सूर्य मावळल्यावर कोकण पूर्ण अंधारात जाते. कंदील, लाफे, पलीते, काकडे, चिमण्या-दिवे आणि काही विशेष असल्यास गॅस बत्ती आढळते.
***

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन