Skip to main content

35th Anniversary Edition of Apale Jag

प्रांजळ प्रामाणिक रस्त्यावरची वाटचाल खूप फायद्याची, सोयीची असते. 
कारण तिथे गर्दी नसते, ट्न्ॅिफक जाम वगैरे नाही, सिग्नल-अडथळाही नसतो.

अवकाश अथांग आहे; आपण पायाशी पाहावे!
दैनिकेतर नियतकालिकांच्या जगात ३५ वर्षांची कारकीर्द तशी खूप मोठी समजली जाते. शहरी वलयांकित व्यक्तींचे कार्य कोणत्या मोजपट्टीने मोजले जाते हा प्रश्नच असतो. पण साहित्यिक असो, कलावंत असो, पुढारी असो, की सामाजिक संस्थेचा कार्यकर्ता असो; त्याच्या या वलयाची प्रभा मूळ ज्योतितत्वापेक्षा अंमळ जास्तच पसरवण्याची सोय एखाद्या क्षेत्रस्थानी होत असेल. पंढरपुरातले कित्येकजण भाळी टिळा लेवून `रामकृष्णहरी' म्हणत असतात, त्यांना संतत्व दिले जाते. त्यायोगे आलेले किंवा येणारे मोठेपण जपण्याची साधने अन् व्यासपीठे उपलब्ध असणे किंवा त्यांवर चढून बसणेही तिथे सहजी साधत असेल. त्यातून ते वलय टिकवून ठेवण्याचेच कार्य पुढच्या काळासाठी तशा लब्धप्रतिष्ठितांस शिल्लक उरते. इतरत्र कुठे कुणी नेटाचे काम करीत असेल तर त्याबद्दल बेदखल राहणे, दखलच घेतली तर बाष्कळ सूचना करून स्वत:चे दुढ्ढाचार्यत्व जपणे इतकेच तिथून संभवनीय असते.

अशा अनेक परींचा अनुभव घेत या नियतकालिकाने ३५ वर्षे गाठली. एक गोष्ट पटण्याजोगी आहे की, आपले काम बिनबोभाट करीत राहण्याने निदान दीर्घायुष्याचे पुण्य तरी लाभते! कुणी कुठेतरी `आपले जग ने मला लिहिते केले' असे म्हणतो, कुणी आपल्या संग्रहातील आपल्या लेखणीची कलाकारी म्हणून जपून ठेवलेले कात्रण दाखवतो, किंवा या कार्यालयात नसेल, एवढ्या काळजीने हे अंक फाईलला ठेवल्याचे दाखवतो, अशा वेळी `आपण काय करून ठेवलेय' याचाच स्वत:शी अचंबा वाटतो! एका ग्रंथपालाने स्वत: निवृत्त होताना `आपले जग' मधील निवडक मजकुराचे बाड पुढच्यांसाठी त्या ख्यातनाम प्रतिष्ठित ग्रंथालयात जपून ठेवले, हे  ऐकल्यावर `हृदयाचे पाणी होणे' म्हणजे काय, ते कळून आले. आपण समजतो त्यापेक्षा आपण मोठे आहोत अशी शंका आली, की मन अधिकच संकोचते. या नियतकालिकास असा अनुभव बऱ्याचदा येत असतो.

अर्थात केवळ ३५ वर्षे वाढलेल्या वयाचा परिणाम, इतकाच तो मोठेपणा आहे. दीर्घायुषी व्यक्तीला घरच्या सण-समारंभात प्रणाम करताना, ती व्यक्ती सामान्य कारकून होती तरीही `तुम्ही त्या काळात कितीजणांची कामं केलीत...!' असे म्हणत मोठेपणा चिकटवायचा असतो; तसाही हा प्रकार असू शकतो.

नव्या युगाच्या अपेक्षा काय असतील याचा अंदाज येत नाही, पण माणसाच्या मनाची बैठक फारशी बदलत नाही. नव्या पिढीला रुचेल असे अंतर्बाह्यरंग असावे असे हितचिंतक सुचवितात. कीर्तिमंत `किर्लोस्कर' परिवारातील `मनोहर'चा अंक तरुणाईसाठी म्हणून पुण्यातून आला, पण त्याचीही दमछाक झाली आणि मुंबईची बहुचर्चित `सत्यकथा' आता दंतकथा किंवा आख्यायिका बनून राहिली. ही उदाहरणे लक्षात घेतली तर एखादे मैदान आपल्या परीने किती गाजते राहील याबद्दल फार वल्गना करणे इष्ट नव्हे.

आपणासी ठावे ते दुसऱ्याला सांगावे, इथपर्यंत ठीक आहे. शहाणे करून सोडण्याचे श्रेय घेण्यात अर्थ नाही, आणि सकळजन तर आटोक्यातच येणार नाहीत. त्यामुळे `आपल्या परीने जमेल तेवढे करू' इतकाच संकल्प पुरेसा आहे. आपण एक दगड भिरकवावा आणि `अवकाश भेदले' म्हणावे, हा येडेपणाच नव्हे काय? हे गाठोडे पुढच्या प्रवासात उलगडून पाहात बसण्याऐवजी, ते पाठीवर टाकून तूर्त पुढचे पाऊल उचलावे इतकेच ठीक वाटते.

- वसंत आपटे
(कार्यकारी संपादक)




पेरणीइतकीच निगराणी महत्त्वाची

विनिता तेलंग
`आपल्या संस्कृतीच्या बहुमोली मूल्यांचा वारसा विसरला गेला तर त्या परंपरेपासून तुटलेली शैक्षणिक पातळी, स्वत:च्या पायावर धोंडाच पाडून घेईल; म्हणून बदलत्या काळाबरोबरच त्या बहुमोल वारशाला योग्य आकार देत राहिले पाहिजे....' 
- गुरुदेव रवींद्रनाथ टागोर (शिक्षणाची स्थित्यंतरे या निबंधातून)

सांगली शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी साकारलेला विश्वविक्रमी लेझीमचा `घुमवा' अनुभवताना वरील विचार आठवण्यासारखे आहेत. कोणाही सभ्य माणसाच्या तोंडी शोभणार नाहीत अशा चित्रपट गीतांवर लहान मुलांपासून सर्वजण नाचताना पाहिल्यावर शैशवातील निरागसता हरवून बसली की काय अशा काळजीने जिवाची काहिली होते. त्या काहिलीवरचा सुखद शिडकावा म्हणजे उमलत्या मुलांनी साकारलेले ते अद्भुत नाट्य. गेले तीन-चार महिने लेझीम, डिमडी, हलगीच्या ताला-ठेक्यामुळे नादावलेल्या या पोरांनी स्वत:च्या सात-आठ हजार घरांत आणि हजारो प्रेक्षकांच्या मनांत हा समाधानाचा शिडकावा केला आहे. `एखाद्या देशाच्या उगवत्या पिढीच्या तोंडी कोणती गाणी असतात त्यावर त्या देशाचं भवितव्य ठरतं' असे मानले गेले आहे. लेझीम खेळणाऱ्या उगवत्या पिढीने त्यांच्या भवितव्याविषयी असाच एक आश्वासक आधार पुरविला आहे.

एखादे कार्य किंवा कार्यप्रवृत्त संस्था आपल्या वर्धापनदिनाचा किंवा महोत्सवाचा उल्हास कोणत्या पद्धतीने व्यक्त करते यावरून त्या संस्थेचे अधिष्ठान, आचरण आणि भावी वाटचाल याविषयी तर्क केला जातो. शिक्षणसंस्थांचा सुळसुळाट असलेल्या महाराष्ट्नत कोणत्याही उत्सवाच्या नावाखाली विविध क्षेत्रांतील सम्राटांच्या नावाचाच उदोउदो होतो; भव्य खर्चिक सोहळे आणि प्रसिद्धी फलक यांमधून त्या संस्थेची गुणवत्ता, तत्त्वे, संस्कृती यांचे दर्शन होत असते. आपल्या सवयीची झालेली ती दृश्ये अनुभवल्यावर व्यक्ती, संस्था आणि तिचे व्यक्तिमत्त्व कोणत्या प्रकारचे आहे हे ठरत असते. त्यामागील बौद्धिक, वैचारिक आणि भावनिक क्षमता किती आहे याचीही कल्पना येते. तथापि प्रथमदर्शनी कोणतेही व्यक्तिमत्त्व प्रगट होते ते त्या व्यक्तीचा पेहराव, संवाद आणि आचरण यावरून. थोडेसे अधिक तपशीलाने निरीक्षण केल्यास त्या व्यक्तिमत्त्वातील प्रगल्भता जाणवू लागते. अशा विचारांची परिपप्ता केवळ व्यक्ती किंवा संस्थेच्या वयावर ठरत नाही. संस्थेची मूल्ये, तिथे जोपासलेल्या निष्ठा, अंगिकारलेल्या विचारधारा आणि जपलेली बांधिलकी या सगळयांवर त्या कार्याचे किंवा संस्थेचे व्यक्तिमत्त्व अवलंबून असते. अशा उत्सवांच्या निमित्ताने केलेल्या उपक्रमांतून ते समाजासमोर येते. त्या कार्यक्रमांतून संस्थेचीच संस्कृती, व्यक्तिमत्व आणि पुढची दिशा दिसते. पंचविशी, पन्नाशी किंवा शंभरी गाठणे ही घटना व्यक्तीच्या बाबतीत जितकी शक्य आहे, त्या तुलनेत संस्थेच्या बाबतीत सहज संभाव्य असू शकते. तथापि ती सहजसाध्य मात्र नक्कीच नसते. वयाला साजेल असा लौकिक, स्थिरता आणि परिपप्ता समाजाला दिसत असेल तर तो काही निसर्गक्रम किंवा योगायोग नव्हे. ती कठोर तपश्चर्या असते. कुणा महत्त्वाकांक्षी मंडळींनी धडपड करून संस्था `वाढविणे' किंवा `ताब्यात घेणे' ही गोष्ट फार वेगळी; आणि एखाद्या छोट्या किंवा मोठ्या परिवाराचे व्रत समजून पुढच्या पिढ्यांतून तितक्याच निष्ठेने तशी संस्था किंवा कार्य चालते ठेवणे हे वेगळे असते. कोणत्याही आयुष्यात चढउतार येतातच. परंतु एखाद्या मोठ्या क्रॅन्व्हासवर संस्थेची किंवा त्या कार्याची समग्र वाटचाल पाहू गेलो तर, त्यात जोडल्या गेलेल्या अनेक व्यक्ती, त्यांचे कार्यकाल, त्यांच्या काही प्रतिष्ठा किंवा त्यांचे बरेवाईट वागणे हे एकूण आयुष्यक्रमात तात्कालिक किंवा क्षुल्लक भासू लागते. सद्विचार आणि सद्हेतूंचा अंमल त्या कार्यावर दीर्घकाळ असेल तर त्या शुचितेचे तेज व्यक्तिमत्त्वातून प्रगट झाल्याशिवाय राहात नाही, निदान ते सहजी लोप पावत नाही.

मुळात एखादे कार्य सुरू करणाऱ्यांनी बीज कशाचे टोकले यालाही महत्त्व असते. त्या बीजाची काही अंगभूत ताकद आणि मर्यादाही असते. आपण वटवृक्ष लावला तर तो सावकाश, शांतपणे वाढेलच परंतु शाखाशाखांनी इतका बळकट होईल की, मूळ खोडाचे आयुर्मान निसर्गक्रमाने संपले तरी, त्याचा सगळा डोलारा समर्थपणे सांभाळणाऱ्या पारंब्या सभोवताली खोलवर रुजलेल्या असतील. आजच्या शिक्षणक्षेत्राकडे किंवा प्रबोधन क्षेत्राकडेही `मोठे उत्पन्न देणारा व्यवसाय' म्हणून जे पाहात असतील त्यांची वाढ शोभादायी झाडांसारखी असते. ती झाडे भराभर वाढतात, आकर्षक दिसतात, रंगीबेरंगी फुले मिरवतात, अल्पकाळ सावलीही देत असतील पण त्याच्या फांद्या आतून इतक्या पोकळ, ठिसूळ असतात की पोराटोरांना झोपाळा बांधायलाही त्यांचा उपयोग होत नाही. मोठेसे वादळ त्यांना फिरवून टाकू शकते.

बदलत्या काळानुसार काही अपरिहार्य बदल दिसू लागतात. आणि `काळानुसार ध्येयवाद पातळ होत गेला' असा गैरसमज पसरू लागतो. पुढच्या पिढीवर कुणाचा विश्वास नसेल तर `कलियुगात सगळीकडे फक्त अध:पतनच होत राहणार' असाही सूर उमटू लागतो. या समजाला छेद देणारी, नवी आव्हाने पेलायला उत्सुक असलेली, तरुणांच्या ध्येयवादावर दृढ विश्वास ठेवणारी पिढी सर्वच काळात अस्तित्वात असते. आशावादी ध्येयनिष्ठ मंडळी वेळोवेळी उभी राहिल्यानेच चांगली कार्ये सुरू राहतात. अशा चांगल्यांकडूनच चांगलं काही घडण्याची अपेक्षा समाजाला असते, आणि तेच स्वाभाविक आहे. परंतु ती अपेक्षा बहुधा एकतर्फी असते. फळे चांगली हवी असतील तर आवश्यक त्या सर्वच घटकांनी आपापला वाटा उचलावा लागतो. कार्याचे किंवा संस्थेचे जे वैचारिक, नैतिक अधिष्ठान असते त्याची बीजे पुढच्यांच्या मनात पेरणे हे त्या संस्थेचे अंगभूत काम आहे. अशा रुजलेल्या बीजांना खतपाणी घालून ते अंकुरत ठेवणे हे शिक्षकांचे आणि समाजशिक्षकांचेही काम असते. आणि त्यासाठी योग्य अशी मनोभूमिका आणि त्या कार्यांविषयी आदर निर्माण करणे हे समाजपालकांचे कार्य असते. छोट्या अंकुरांना आणि रुजलेल्या रोपट्यांना बाहेरच्या धोक्यांपासून सुरक्षित ठेवणे हेही जाणकार समाजाचे काम असले पाहिजे. शिक्षणसंस्थेतून बाहेर पडणारा विद्यार्थी संस्कारित असावा, संस्थेचा जो उद्दिष्टगट असेल तो प्रगल्भ असावा ही काळजी सर्वच घटकांनी घ्यायला हवी.

एका संस्कारित मानल्या गेलेल्या महाविद्यालयाच्या संमेलनावेळी एका विद्यार्थिनीने हीन अभिरुचीचा एक `डान्स' सादर केला. आधी गीत निवडतानाचा पुरेशी काळजी घ्यायला हवी होती. त्या बाबतीत कदाचित दुर्लक्ष झाले होते असे मानू. पण तो नाच - व्यंग्यार्थी नाच - पाहणाऱ्यांपैकी शिक्षक, संस्थाचालक, त्याच वयाच्या विद्यार्थिनी आणि अर्थातच पालक या सर्वांना इतका असह्य झाला की , तो `परफॉर्मन्स' ताबडतोब बंद करायला लावला. वेगळेपणा दिसतो ते इथे. सभोवतीचे वातावरण बिघडलेले आहे हे खरेच आहे. नदीच गढुळली असेल तर नळाला पाणी स्वच्छ कुठून येणार? परंतु फिल्टर लावणे हे तर आपल्या हातात असते! असा फिल्टर जेव्हा एखादी संस्था लावू पाहते त्यावेळी समाजातून उठणारी प्रतिक्रियाही महत्त्वाची असते. कोणीतरी संस्था युनिफॉर्मची सक्ती करते, मोबाईल वापराला बंदी करते, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी कठोर निकष लावते, शाळा असेल तर तेथील शिक्षकांना खाजगी शिकवण्यांना बंदी घालते त्यावेळी संबंधित सर्व घटकांची प्रतिक्रिया ही सहभागाची असते, विरोधाची असते की संघर्षाची असते यावरती पुष्कळ गोष्टी अवलंबून आहेत. आपल्याला चांगले राजकारण हवे असते, शाळा-शिक्षक चांगले हवेत, चित्रपट चांगले हवेत, लेखक-कलावंत दर्जेदार हवेत, नियतकालिके चांगली हवीत, पण माझी पुढची पिढी मात्र यापैकी कोणत्याही क्षेत्रात जाणार नाही, ही मानसिकता अद्यापि बदललेली नाही.

शिक्षणाविषयीच्या रवींद्रनाथांच्या, रजनीशांच्या, विवेकानंदांच्या किंवा तत्सम अनेक विचारवंतांच्या चिंतनात शिक्षक आणि शिक्षणपद्धती याला खूप महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे. निष्ठावंतांशी जिव्हाळयाचा संबंध राखून राष्ट्नीय परंपरा कशी जोपासावी आणि आनंद उत्साहाच्या विमुक्त वातावरणात व्यक्तिमत्त्वाची सर्व अंगे कशी फुलवावीत याचे सविस्तर चिंतन, वर्णन आणि त्याचे प्रमाणही त्यांनी दाखविले आहे. समाजातल्या सुशिक्षित म्हणविल्या जाणाऱ्या घटकाची गंमत अशी की, सतत बदलत्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक परिस्थितीतही हे सर्व घटक ऋषीमुनींच्या काळाइतकेच शुद्ध, नैतिक, सेवाभावी असावेत अशी अपेक्षा ठेवली जाते. सध्याच्या काळात वावरणारे सर्व लोक बदलत्या व्यवस्थेचेच प्रॉडक्ट आहेत. त्यामुळे त्यांच्याकडूनही अवास्तव अपेक्षा करता येत नाहीत. संधी दिली गेली, प्रशिक्षण-प्रोत्साहन दिले गेले तर असा सर्वच वर्ग प्रामाणिक आणि निखळ आनंद निर्माण करणे शिकेल. परिस्थितीचा रेटा जर प्रत्येक गोष्टीत काहीतरी `मिळवण्या'शी जोडलेला असेल तर अपेक्षा कोणी आणि कोणाकडून करायची? मूल्यांची पडझड होत असल्याचे लक्षात येत असेल तर ती रोखण्यासाठी सर्वांनाच एका समान भूमिकेतून काहीतरी करावे लागेल. जुन्या पिढीतील तळमळीचे काही शिक्षक आजही प्रत्येकाला आपापल्या लहानपणातून आठवतील. त्या शिक्षकांचे योगदान आपल्या मनात उमळत असते. तसे शिक्षक आज हवेत असे वाटत असेल तर आपल्या चांगल्या मुलांना तसे शिक्षक बनविण्यासाठी आपण काहीतरी करायला हवे.

पंचवीस-पन्नास किंवा शंभर वर्षांच्या वाटचालीतील कोणत्याही टप्प्यावर आत्मपरीक्षण निखालस गरजेचे असते. तसेच ते लाभार्थी घटकांनीही करायला हवे. भौतिक समृद्धी आणि आर्थिक उपलब्धी पूर्वीपेक्षा आज कितीतरी जास्त आहे, सुलभ आहे. परंतु आव्हाने पूर्वीच्या गरीब काळापेक्षा वेगळी आणि कठीण बनली आहेत. पाच-पंचवीस वर्षांपूर्वी ज्ञानाचा दिवा लावल्यानंतर तेलाअभावी तो विझतो की काय अशा कित्येक वेळा आलेल्या असतात. आजच्या काळात तेलाचा तुटवडा नाही पण वातावरणातील प्रदूषण आणि वादळवारे ज्यास्त आहेत. दिव्याचे संरक्षण करण्यासाठी समाजातील प्रगल्भ घटकाने आपले हात ज्योतीभोवती धरायला हवेत. नुसतेच अर्थसाहाय्य नव्हे तर विचारांचे, कृतीचे, मूल्यांच्या जपणुकीचे साहाय्य गरजेचे आहे. वरवरच्या, फसव्या आधुनिकीकरणाच्या मागे न लागता, कालबाह्य वाटली तरी मूल्यनिष्ठा जपावीच लागेल. प्रत्येक चांगली गोष्ट त्याच रितीने जपली जाईल. अन्यथा आपला दोष प्रसारमाध्यमांवर ढकलून आपण नामानिराळे राहावे, हे तर चालूच आहे.

शंभर वर्षांपूर्वी राष्ट्नीय शिक्षण देणारीसुध्दा इंग्रजी शाळा अनेकांनी काढली. त्यास माध्यम मराठी होते, परंतु त्यात नाविन्य होते. आता तितक्याच तळमळीने मराठी शाळा काढावी लागेल. मुलांच्या भाषाज्ञानाचा पाया बळकट करून त्यांना विज्ञानाशी आणि पुरोगामित्वाशी जोडणे यासाठी कसोटीच लागेल. पण तरीही हा प्रयोग नेटाने स्वीकारावा लागेल. `त्या' काळी राष्ट्नीय शिक्षणाचा हेतू लपवावा लागत होता. आजच्या काळातही सरकारच्या नियम-कायद्यांच्या विरोधात जाऊन मूल्यशिक्षण देण्याची गोष्ट फार उघडपणे बोलता येत नाही. इतिहासाची मोडतोड करणारी `नवी' पुस्तके, कोणतीही अस्मिता निर्माणच होऊ नये असे वातावरण, आणि जे काही संस्कार शिल्लक उरले असतील तेही नष्ट करणारी माध्यमे. यातून वाट काढत योग्य ते रुजवावे लागेल. भारतातील शिक्षणपद्धती, जीवनपद्धती आणि प्रबोधनपद्धती हे केवळ `जगायला उपयुक्त' एवढेच कौशल्य पुरवत नाही, तर समग्र जीवनाचे पोषण करणारी मूल्ये रुजविते. राष्ट्न्प्रेम, स्वावलंबन, परस्परपूरकता, प्रामाणिकता अशी अनेक मूल्ये शिकविण्याचे केंद्र शाळा हे असू शकते आणि ही मूल्ये वृद्धिंगत करत ठेवण्याचे काम प्रसारमाध्यमे करू शकतात, त्यांनी करायला हवे. प्रचलित शिक्षणाच्या उतरंडीत भाषांना फारसे स्थान नाही तसेच प्रसारमाध्यमांतून प्रगल्भ संवादाला फारसे स्थान नाही.

शाळांमधून हल्ली मराठी-संस्कृत या भाषा कदाचित नाईलाजाने किंवा स्कोअरिंगसाठी घेतल्या जातात. पहिलीपासून संस्कृत हा नवा प्रयोग काही लोक करू पाहात आहेत. त्याला निव्वळ ज्ञानभाषेचा प्रसार इतकेच कारण नाही, तर त्याचा वापर करून पुरातन ज्ञान आधुनिक भारताच्या प्रगतीसाठी वापरावे हा हेतू आहे. विख्यात भाषातज्ज्ञ डॉ.गणेश देवी यांनी असे प्रतिपादन केले आहे की, `भाषिक विविधतेला अडसर किंवा मागासलेपणा न समजता ती आपली ताकद आहे, आर्थिक भांडवलही आहे. पुढील तंत्रज्ञानाचा आधार भाषा असणार आहे. म्हणून भाषांची आणि त्यातल्या संकल्पनांची विपुलता आपण नीट वापरली आणि त्या आधारे तंत्रज्ञान विकसित केले तर प्रचंड अशी आर्थिक ताकदसुद्धा आपण निर्माण करू शकतो.'

जी बाब शाळांना आणि भाषांना लागू होते तीच बाब चांगल्या विचाराने चांगले काम करणाऱ्या कोणत्याही संस्थेस किंवा नियतकालिकास लागू होते. सुरुवातीला काही ध्येयवादातून कार्य चालू होते, मग टिकून राहण्यासाठी थोडी मुरड घालावी लागते. संस्था स्थिरावू लागते तोवरच मतभेद सुरू होतात. सुस्थिरता आली की राजकारण सुरू होते आणि नंतर उरतो तो निव्वळ धंदा. `कालानुरूप, कालसुसंगत बदल' असे म्हणता म्हणता व्यवहारसुसंगत आणि शेवटी फक्त नफासुसंगत इतकेच धोरण उरते. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभापैकी अनेक बड्या भल्यांची अशी दुकाने निर्माण झाली. वृत्तक्षेत्राला दावणीला बांधायला धनसत्ता आणि राजसत्ता टपलेलीच असते. कित्येक माध्यमांनी राजकीय पक्षाचे किंवा औद्योगिक घराण्याचे मांडलिकत्व किंवा बांधिलकी स्वीकारलेली दिसते. वृत्तपत्राचे व्यक्तिमत्त्व दर्शविणारे मुखपृष्ठ जेव्हा बंगले, गाड्या, मोबाईल आणि चित्रपट यांच्या जाहिरातींनी भरगच्च होते, तसेच त्यातील संपादकीय वाचतानाही सामान्य माणसाला वस्तुनिष्ठतेचा अभाव जाणवतो तेव्हा हा स्तंभ डळमळल्याचे स्पष्ट होते. वाचकांची अभिरुची जपण्यास, वाढविण्यास मदत करण्याऐवजी भाषेची वैशिष्ट्ये आणि विविधता जपण्याऐवजी; आणि मुख्य म्हणजे काही विचार देण्याऐवजी आजकालची वृत्तपत्रे अगतिकपणे किंवा आधुनिकपणे व्यवसाय बनली आहेत. कोणतेही विचारपत्र चालविताना आर्थिक लाभाकडे लक्ष द्यावे तर तत्त्वनिष्ठा वगळावी लागते आणि तसे लक्ष न द्यावे तर उत्कर्षाची संधी सोडावी लागते किंवा कदाचित अस्तित्वालाच धोका निर्माण होतो. हा दुहेरी पेच कोणत्याही क्षेत्रामध्ये चिरंतन आहे.
अशा वेळी तत्वाशी बांधिलकी न सोडता संस्थेची किंवा कार्याची प्रगती करणे आणि ते नावारूपाला आणणे हे `बुद्ध्याच करी धरिले' नसले तरी `सतीचे वाण'च असते. अशी कार्ये मोजकीच असली तरी त्यांचे असणे, समाजासाठी फार गरजेचे असते, कारण त्यातूनच समाजप्रवाहाला योग्य ते वळण मिळू शकते.

`आपले जग'चा ३५ वर्षांचा प्रवास अशा काही द्विधा मन:स्थितीतील चांगल्याच्या ध्यासाने चालला आहे. `शोधिला पाहिजे विचार । यथातथ्य ।।' असे म्हणून समाजातील सकारात्मक, रचनात्मक, प्रयोगशील विचार सुजाण वाचकांपर्यंत पोचविणे हे काम तसे सोपे असेल पण ते सातत्याने रुजविणे कठीण आहे. सद्विचारी विचारक्षम वाचकांचा पाठिंबा हेच त्याचे खरे भांडवल असते. तथापि हा वैचारिक पाठिंबा पुरेसा नसतो. या अंकांमधून डोकावणारे छोटे छोटे आशेचे किरण बाहेरच्या निराशाजनक परिस्थितीत सामान्य माणसाच्या असामान्य प्रेरणेस तगविण्याचे बळ देत राहिले पाहिजेत. मनातल्या संकल्पनांना, मूल्यांना अभिव्यक्ती आणि बळकटी देणारे ठरले पाहिजेत. अर्थातच हे छोटे विचारपत्र मोठे करण्याचे दायित्त्व प्रत्येक घटकावर येते. अल्पसंतुष्ट अशा आजच्या मनोवृत्तीवरही त्याचा थोडासा भार येतोच.

पुष्कळदा जे काही करतो त्यातील गौणता आपल्या पायाखाली घेण्याची एक पद्धत असते. `महिला असूनही एवढं करते म्हणजे खूपच' किंवा `छोट्या शहरात राहून असा विक्रम करणे म्हणजे चेष्टा नाही' किंवा `छोट्याशा गावात राहून इतकी वर्षे सातत्याने हे काम करणे हेच विशेष' अशा प्रतिक्रिया सहजपणे आपण फेकत असतो. बाजूच्या परिस्थितीच्या तुलनेत कदाचित हे यश म्हणता येईल पण ते पुरेसे नक्कीच नाही. अशा छोट्या बीजांची क्षमताही अफाट असू शकते परंतु गरजही मोठी असते. एका विशिष्ट टप्प्यापर्यंत टिकून राहणे एवढेही समाधान मानावे लागते. पण चांगल्या कार्याकडून, संस्थेकडून आणखी भरपूर काम व्हायला हवे असेल तर त्यांनी प्रशस्त केलेल्या मार्गावर त्यांना चालते ठेवणे हेही महत्त्वाचे असते. प्रसंगानुसार आणि कारणपरत्वे नव्या वाटांचाही धांडोळा घ्यावा लागतो. अन्यथा चांगल्या कार्यातही साचलेपणा येऊन ते शेवाळण्याची भीती असते. समस्या जुनी असली तरी उपाय नवे शोधावे लागतात हेही निर्विवाद आहे.

मुंबईच्या एका महाविद्यालयाने `कॉपी' या विषयावर एक अधिकृत शिबीर घेतले. ते फक्त विद्यार्थ्यांसाठी होते. `कॉपी करण्याची कारणे आणि त्यावर उपाय' अशा छापील विचारवंतांचे ते शिबीर नव्हते. त्यात सहभागी मुले स्वाभाविकच सुरुवातीला अवघडली, संकोचली. पण एकदा तोंड फुटल्यावर कॉपी या विषयाची मानसिकता, अगतिकता, सुलभता, कारणे, मार्ग, उपाय या सर्वांबद्दलच मुलांनी स्पष्टपणे चर्चा केली. त्या प्रयोगशील महाविद्यालयाने त्या अप्रिय विषयाला मनापासून भिडायचे ठरविले आणि मिळालेल्या माहितीवरून उपायांच्या दिशेने काही पावले टाकली गेली असावीत. त्या पृष्ठभूमीवर, आपल्याच बोधवाक्याशी प्रामाणिक असणाऱ्या संस्था आजच्या जगात तपासाव्या लागतील आणि त्यांचा अन्वयार्थही पुन्हा नव्याने लावावा लागेल.

`जे जे आपणासी ठावे...' असे म्हणत लोकांत घडणाऱ्या बऱ्यावाईट गोष्टींचे प्रतिबिंब `आपले जग'ने उमटविले. त्यानू येऊ शकणारे शहाणपण म्हणजे `मी म्हणतो ते' असा अभिनिवेष कधीच नव्हता. कोणताही विशिष्ट वाद न स्वीकारता जे चांगले ते लोकांपर्यंत पोचविले. कोणताही विचार अस्पर्श मानला नाही तरी, जे उघड विघातक किंवा द्वेषमूलक असेल ते उमटू दिले नाही हेही खरे. वेगवेगळे विषय आणि विचार लोकांपर्यंत पोचविणे हेच विचारपत्राचे काम असले पाहिजे. शहाणपण ही न संपणारी प्रक्रिया आहे. ती आपापल्या क्षमतेनुसार प्रत्येकाजवळ उमटत राहणार. आपल्या मनातला आदर्श समाज घडविण्यात मूल्यांशी प्रामाणिक राहून, पाय रोवून उभ्या असणाऱ्या अशा कार्यांचे योगदान `आपले जग' जाणून आहे. त्यामुळे त्याचीही वाटचाल त्याच श्रद्धेने चालू आहे. ती सुकर होण्यासाठी सर्वांना आपुलकीचे आणि जिव्हाळयाचे आवाहन आहे.

- विनिता तेलंग
(मोबा. : ९८९०९२८४११)





हातून काहीतरी सांडतंय......
माझ्या पिल्लाच्या बाबास,

अरे आज एक गंमतच झाली.
मी आणि मनू बाहेर गेलो होतो.
आता तू म्हणशील, `तुम्ही दोघी एकत्र
म्हणजे गंमत होणारच.' ते असो.

काय झालं, मनू म्हणाली ``मम्मा घे ना..''
``थांब जरा...''
``मम्मा घे ना....''
असं अनेक वेळा झाल्यावर
शेवटी एक ब्रेक घेतला
आईस्क्रीम खाण्यासाठी.
कुठलं घ्यायचं यावर
परत एक मोठं रामायण
``चोकोबार नको मनू...सांडतं.
तुला नीट खाता येत नाही.
 घरी देते. आत्ता कपमध्ये घेऊया.''
माझी विनवणी, दटावणी, सुनवणी
याला कशालाही भीक न घालता तिचं उत्तर,
``नाही तेच पाहिजे. आत्ताच्या आत्ता.''

शेवटी घेतलं एकदाचं.
तमाम आईजात ही
मुलांचे हट्ट पुरवण्यासाठीच असते.
ऑफीसमध्ये दादागिरी करणारी आई....
`आणि नवऱ्यावरदेखील'
- असं तू लगेच म्हणून घेच!

त्या एवढ्याशा चिमुरड्यांपुढे
पार हतबल होऊन जाते.
तर काय सांगत होते ....
घेतलं एकदाचं चोकोबार.
बसायला दोन स्टुलं शोधली.

``अगं, नीट धर. सरळ पकड.''
`` हं ''
``हे बघ इकडून ओघळ आलाय.
हे बघ चॉकलेट सांडतंय.''
`` हं ''
``बघ परत सांडतंय. चिकट होतं मनू.
पाणी नाहीये इथे. एकदा इकडे आणि
एकदा इकडून असं खा....''
`` हं ''
``अगं हा हात धर ना खाली
म्हणजे अंगावर सांडणार नाही.''
``हात चिकट होईल.''
``मग होऊ दे ना. नाहीतरी काय राहिलंय...'
``नाही ''
त्या पिल्लाचं सगळं मस्त चालू होतं.
इकडून तिकडून ओघळ गळत होते.
सगळी नुसती तारांबळ.
हे आधी खाऊ का ते खाऊ.
चॉकलेट खाल्लं तर व्हॅनिला गळतंय.
देवा! कोपरापर्यंत सगळं पसरलं होतं.
आणि माझी नुसती आरडाओरड.
तिथून पुढे कुठे जायचं आता,
हे कसं आवरायचं,
असल्या भारंभार चिंता

शेवटी एका क्षणाला मला जाणवलं.
कशाला हा सारा अट्टाहास?
एवढे मोठे आपण झालोय,
तरी आपलंदेखील होतंच की असं.
आणि मी शांत झाले.
तिची सगळी धांदल बघत हसायला लागले.
जणू युद्ध चालू होतं,
शेवटी संपली एकदाची लढाई
आणि जिंकले आमचे वीर!
अनेक खाणाखुणा आणि ओघळ घेऊन.
वाटलं, आपणही शिकलं पाहिजेच ना
जगण्याची लढाई
अशी तल्लीन होऊन मजेत जगायला.
सर्व बाजूने सर्व गोष्टी
हाताबाहेर जात असताना
हातात आहे तेवढ्यातच
आनंदाचा उत्सव साजरा करत
जगता यायला हवं ना!
एखादी गोष्ट बिनसली तर
लगेच जगण्यातला अर्थ हरवल्यासारखी वागणारी माणसं.
छोट्या मोठ्या कारणांवरून
भांडणारी माणसं
ही सगळी मला छोटी वाटायला लागली

ह्या सगळयात
कशाचीही पर्वा न करता
एवढ्या सगळया गोंधळात
आपलं स्वत्व जपत
जगता येईल ना आपल्याला?
सगळीकडे धावताना
सुख बोट सोडून तर देत नाही ना आपलं?

``मम्मा, सांडतंय ना बघ तुझ्या हातून.''
मी भानावर आले.
``खरंच मनू, कुठेतरी काहीतरी सांडतंय खरंच...''

थोडं सावरूयात का रे?

   - तुझ्या पिल्लांची आई


सुटी
माझ्या पिल्लाच्या बाबास,

हुर्रर्ररे सुट्टी सुट्टी सुट्टी सुट्टी
आजपासून उन्हाळयाची सुटी सुरू
त्यामुळे मनू अत्यंत आनंदात आहे
अत्यंत कष्टप्रद असं शाळेचं एक वर्ष
झाल्यावर लागलेली सुट्टी
मनूसाठी आनंदाची पर्वणी आहे.
मी तिला सांगितलं होतं,
`तुला सुट्टीत काय काय करायचं आहे
त्याची एक लिस्ट कर आणि मला दे.
ती यादी करताना नीट विचार कर.
आपल्याला खरंच काय आवडतं,
इतर वेळी शाळा सुरू असताना
आपण काय करू शकत नाही,
असं सगळं'
तर ती यादी मला मिळाली
आणि काय सांगू
मला खूप गंमत वाटली, आनंदही झाला
आणि आश्चर्यही!
मुलांचं भावविश्व आपल्याला
किती अनभिज्ञ असतं ते नव्याने कळालं.

थांब तुला ती यादी दाखवतेच.
मी तिला काही प्रश्न विचारले
(मग कधी कधी मलाही संधी मिळते प्रश्न विचारायची!)
त्याची उत्तरे तुझ्यासाठी
कंसात दिलेली आहेत.

मला ट्न्ंपोलीनवर उड्या मारत बबल्स उडवायचे आहेत
(ट्न्ंपोलीनवर का? तर तिथून ते जास्त वर जातील नेहमीपेक्षा,
आणि त्यातला एखादा तरी न फुटता ढगापर्यंत   पोचेल.. पणजीजवळ)

अळया त्यांच्या बिळात जाऊन
काय करतात?
(`का?' - तर उत्तर - `असंच!')

ऑक्टोपस त्याच्या आठ हातांपैकी कुठल्या हाताने जेवतो, ते बघायचंय.
(तिला म्हटलं, `आता ऑक्टोपस कुठून आणायचा?' तर उत्तर -
`तो तुझा प्रश्न आहे.
यादी करायचं काम माझं होतं!' ऑक्टोपस कुठून आला माहीत नाही, पण हाताचा प्रश्न कुठून आला
मला माहीत आहे.
सध्या मी तिला सारखं सांगते ना, उजव्या हाताने पोळीचा तुकडा करून जेवायचं, डावा हात लावायचा नाही,
तू मोठी झालीस आता!)

चिमणीचं पिल्लू पाळायचंय.
(कुत्रं मांजर का नाही?
तर त्याचं उत्तर-
`चिमणीची आई फार केअरलेस असते. तिचं पिल्लू सारखं घरट्यातून खाली पडतं
आणि तिला हात नसल्यामुळे
ते तिला उचलता येत नाही.
त्याला उडता येईपर्यंत मी सांभाळेन,
मग ते उडून जाऊ शकतं. कुत्र्या मांजरांना उडता येत नाही,
त्यामुळं ती कायमची सांभाळावी लागतात!'
मी पोट धरून हसले या उत्तरावर. उडणारी कुत्री मांजरी पण दिसली स्वप्नात!)

स्विमींग पुलमध्ये रडल्यावर
ते खारट होतं का,
असा प्रयोग करायचा आहे.
`समुद्र खारट का असतो याचा शोध लावा' असं शाळेत सांगितलंय.)

फूल नक्की ज्या क्षणाला उमलतं
त्या क्षणाला, तिथे उभं राहून
मला बघायचंय
(दरवेळी कळी किंवा फूल दिसतं. अगदी उमलताना काय होतं,
ते प्रत्यक्ष बघायचंय.)

तुझ्या आणि बाबाबरोबर एक दिवस
नुसतं काही न करता
घालवायचा आहे.
(`काही न करता' या शब्दांखाली
रेघ आहे.)

ही यादी पाहून मी चाट पडले.
एकतर इतक्या विविध दिशांना
हिचे विचार चालू असतात.
दुसरं म्हणजे कुठेही, `मला हा गेम हवा,
तो क्लास लावायचा आहे'
असं मागणं नाही.
मी उगाच त्या समर क्रॅम्पची
चौकशी करत बसले होते.
हिला जे करायचं आहे,
ते कुठंच शिकवणार नाहीये.

तिला फक्त मोकळा वेळ हवाय रे,
बघायला, समजून घ्यायला,
तिच्या अवतीभवतीचं जग
नुसतं अनुभवायला!
आपण त्यांचे हे निवांत क्षणदेखील
बांधून टाकतो
कुठल्यातरी जाहिरातीच्या मागे लागून
ही आणि पुढच्या सगळया सुट्ट्या
देऊया तिला..... जगायला?

एक दिवस नुसता घालवायचाय,
सुट्टी टाक, नाहीतर
तिची विशलिस्ट अपूर्ण राहील.
एवढं नक्कीच करू शकतो ना?

आपलं फूल
नेमकं कुठल्या क्षणाला उमलतंय
हे बघण्यासाठी

- तुझ्या पिल्लांची समाधानी आई

(दीपा मिट्टीमनी, टोरंटो)
ई-मेल :mittimanideepa@gmail.com



व्यासमहर्षींच्या महाभारत काव्याचे भाषांतर सी.राजगोपालाचारी 
यांनी केले होते. त्यावरून मराठी अनुवाद श्री.वि.रा.जोगळेकर यांनी केला. सुलभ, सहजसोप्या भाषेतील हा ग्रंथ २७ फेब्रुवारी २०१४ (महाशिवरात्र) रोजी प्रकाशित होत आहे. 
प्रकाशन क्षेत्रातील मोठमोठ्या नावांचे वलय नसले तरीही 
हा प्रयत्न वाचकांना सुगम वाटणारा असल्यामुळे त्याचे स्वागत होईलच.
या ग्रंथासाठी डॉ.विजय भटकरयांची प्रस्तावना असून 
गुरुदेव शंकर अभ्यंकर यांनी प्रदीर्घ विवेचन करून त्यास पुरस्कारिले आहे.
 ।। अथ श्री महाभारत कथा....।।
सर्वकालीन अक्षर ग्रंथ 
डॉ.विजय भटकर
जगाच्या पाठीवर मानवी अस्तित्व लक्षावधी वर्षांपासून असल्याच्या खुणा पुरातत्व संशोधकांना सापडल्या. ज्यांस मानवी व्यवहार व भावभावनांचा विकास म्हणता येईल, अशा संस्कृतीही गेल्या पाच-सात हजार वर्षांपूर्वीच्या असाव्यात. सुमेरियन, बॉबिलॉन, ग्रीक, मिश्र इत्यादी संस्कृती काळाच्या ओघात विलय पावल्या किंवा पार बदलून गेल्या. सिंधू नदीकाठी उत्क्रान्त झालेली आणि भारतवर्ष व्यापून राहिलेली संस्कृती आजही पुष्कळ अंशाने टिकून आहे. या भूमीवरही परस्थांची आक्रमणे-अतिक्रमणे झाली. पण तरीही येथील विचारदर्शनाचा मूळ पाया, आणि त्यावरती वृद्धिंगत झालेल्या चालीरीती, कलाक्रीडादि क्षेत्रे, परस्पर-पूरकत्व, प्रकृतीशी ऋणानुबंध, अथवा `धर्म' या संज्ञेखाली चालणारे मानव्यसंवर्धन यांना फारसा धक्का लागलेला नाही. पूर्वी पांथस्थाला आपल्यातील घास देत असतील, आज `चहा घे' म्हणतात; किंवा पूर्वी श्रेष्ठ सामर्थ्यासाठी ब्रह्मास्त्र प्राप्त करत असतील, तर आज ब्राह्मोस नावाचे क्षेपणास्त्र युद्धसिद्ध ठेवावे लागते.
गेल्या दोन सहस्रकांतील सुलतानी आक्रमकांच्या अत्याचारांना इथल्या संस्कृतीने तितकीशी दाद दिली नाही. परंतु युरोपीय मिशनरींच्या लाघवीपणाने संस्कृतीवर काहीसा परिणाम केला. संस्कृतीचे अस्तित्व चिरडून चूर्ण करता येत नाही, ते विरघळत विलय पावत जात असते! तथापि तसेही भारतात सर्वांशी झालेले नाही, याचे कारण हे असावे की वेदोपनिषदे, श्रुति-स्मृती, पुराणे, आरण्यके, ब्राह्मणे इत्यादि वाङ्मय इथे निर्माण झाले. त्याचबरोबर रामायण-महाभारतादि महाकाव्यांतून इथला इतिहास ग्रंथबद्ध झाला. त्यायोगे देव-दानवादि संकल्पना, प्रेषितावतारांचे उदयास्त, पंचमहाभूतांशी संबंध आणि एकंदर चराचर सृष्टीतील जीवशिवाचे नाते समजावून देण्याचे प्रयत्न झाले. त्या वाङ्मयकृतींमुळे ते प्रयत्न चिरंतन तत्वाचे, सनातन विचाराचे, पण परिवर्तनशील व्यवहारांचेच राहिले. त्यामुळेच भारतीय संस्कृतीची असंख्य धाग्यांची मनोवेधक वीण आजवर घट्ट होत आली आहे. विज्ञानयुगातील बुद्धिवादी वातावरणातही महाकुंभमेळा, रथयात्रा, दहीहंडी, गणेशोत्सव, दुर्गापूजा अशा अनेक सांस्कृतिक संकल्पनांचा प्रभाव समाजमनावर स्पष्ट दिसतो. श्रीकृष्ण - श्रीराम - पांडव यांच्या यशोविजयाचे उत्सव हा या संस्कृतीचा एक मनोवेधक आविष्कार असतो.
भारतीय जनमानसाचा सांस्कृतिक परिपोष करणाऱ्या प्राचीन वाङ्मयात रामायण-महाभारताचे स्थान अढळ आहे. महाभारताची बृहत्कथा सदासर्वकालीन व्यवहारांतून संदर्भासाठी वापरली जाते. त्यांतील तत्वचिंतन, विश्वस्वरूपदर्शन इत्यादी विषय प्रकांड पांडित्याचे ठरतात; तर कृष्णाच्या बाळलीलांतून जरेला मरणाचा विसर पडतो. ज्या अर्वाचीन ललितकलांनी भारतीयच नव्हे तर जगातील रसिकांना मोहित केले, त्या नाट्य - संगीत - काव्य - नृत्य - शिल्प या सर्व सांस्कृतिक प्रकारांचे महाभारताने पोषण केले आहे. जर्मन कवी गटे हा शाकुंतल नाटक मस्तकी धरून नाचला अशी आख्यायिका सांगतात. आजकालच्या जमान्यातही विद्याहरण, स्वयंवर, सौभद्र, त्रिदंडी संन्यास, सुवर्णतुला या भारतकथांवर लोक लुब्ध होतात. कीचकवध या नाट्यरूपकाने कर्झनशाहीविरोधी जनमत तयार केले होते. दूरदर्शनवर महाभारत प्रसारित होत असताना यच्चयावत् भारतीय लोक श्वास रोखून त्या कथेशी एकरूप झाल्याचा अलीकडचाच अनुभव आहे.
सणवार असोत, तीर्थक्षेत्रे असोत, ऋतुचक्र असो, किंवा सत्यासत्य, धर्माधर्म, कर्तव्याकर्तव्य, योग्यायोग्य इत्यादीविषयी कोणताही निर्णय करण्यासाठी महाभारतीय दाखलेदृष्टांत दिले जातात. या कथेने भारतीय संस्कृतीशी इतके एकरूपत्व साधले आहे, म्हणूनच महाभारताची कथा चिरंतन उपयोगाची अक्षर साहित्यकृती ठरली आहे. त्याची पारायणे होत असतात, भाषांतरे होत असतात, आवृत्त्यांवर आवृत्त्या निघत असतात. अनेक वर्षे हा क्रम चालत राहिला आहे, चालतच राहील.
रामायण-महाभारतासह सर्व ग्रंथ गीर्वाण भाषेत आहेत. ती एक संस्कृत, संपन्न, आशयघन भाषा आहे. मधल्या आक्रमणी काळात ती खूप मागे पडली. त्यामुळे त्या भाषेतील भांडार लुप्त होऊ लागले. गेल्या शतकात सुविद्य समाजावर इंग्रजीचा प्रभाव वाढल्यामुळे आपल्या त्या भांडाराची ओळख इंग्रजीतून जगाला करून देणे आवश्यक बनले. संस्कृत साहित्याचा आस्वाद घेऊन त्याचा रसोत्कर्ष करण्याइतका व्यासंग गेल्या शतकातील अनेक विद्वज्जनांत होता, तितकेच त्यांचे इंग्रजी भाषेवरही प्रभुत्व होते. अशा महामार्तण्ड पण्डितांच्या मांदियाळीचे चक्रवर्ती म्हणून कै.राजगोपालाचारींचे नाव घ्यावे लागेल. रामायण-महाभारतादि ऐतिहासिक महाकाव्ये त्यांनी गीर्वाणीतून आंग्ल भाषेत रूपांतरित केली, हे त्यांचे कार्य अजोड आहे. त्यांच्या राजकीय कारकीर्दीतून आणि पारतंत्र्याच्या संधिकालीन धामधुमीतून त्यांनी हे काम कधी, कसे केले हे अचंबित करणारे आहे. एक लक्ष श्लोकांच्या त्या महाग्रंथांचा संक्षेप करून त्या कथा साररूपाने सुमारे साडेचारशे-पाचशे पृष्ठांच्या इंग्रजी पुस्तकात त्यांनी मांडल्या आहेत. शिवाय मूळ ग्रंथातील रसात्मकता सांभाळली आहे. जगभरात ज्यांना इंग्रजी वाचन जमते, आणि `वाचन जमते' अशांच्या संग्रही राजाजींचे इंग्रजीतील रामायण-महाभारत असतेच. भारतीय विद्याभवन या संस्थेने त्या भाषांतरित ग्रंथांच्या अनेक आवृत्ती आणि लाखो प्रती वितरित केलेल्या आहेत, ही एकच बाब साक्षीला पुरेशी आहे.
आपल्याकडे या ऐतिहासिक कथांना पुष्कळदा एक प्रकारे श्रद्धेचे अंध स्वरूप येऊ पाहते. कारण आजच्या विज्ञानकल्पनांशी विसंगत वाटतील अशा त्यातील चमत्कृतींवर जास्त भर दिला जातो. अज्ञानी अशिक्षित वर्गाला त्या चमत्कृतींमधून पाप-पुण्याच्या आधारे चांगले जगण्याची दिशा व सामर्थ्य मिळत असेल; परंतु सुशिक्षित व सर्वसाधारण तर्कबुद्धीचा फार मोठा वर्ग अशा घटनांस अविश्वासार्ह ठरवितो व त्यांस भोळसटपणा मानतो. त्याचे खरे कारण असे की, त्याच्या जाणीवेत काही तुटक कथा, उपदेशांची संदर्भहीन मात्रा, अथवा अकर्मण्यवादी दैवाधीनता असते; तथापि मूळ साहित्यकृती त्याच्यापुढे नेटसपणी येतच नाही. संस्कृतबाबत अनभिज्ञता आहे, आणि अन्य देशी भाषांत तशी साधने उपलब्ध नाहीत. यामुळे मग कीर्तन-पुराणांवर भिस्त राहते. असा जिज्ञासू वाचक संख्येने फार मोठा असतो, आणि तो समाजमन तयार करण्यात (ेळिपळेप ारज्ञळपस) महत्त्वाचा असतो. अशा वर्गासाठी त्याच्या भाषेत मूळ कथा-काव्य समग्रतेने सांगणारे या प्रकारचे रूपांतरित ग्रंथ आवश्यक ठरतात. श्री.वि.रा.जोगळेकर यांचा हा प्रयत्न मला त्या  दृष्टीने फार मोलाचा वाटतो.
मराठी भाषा हल्ली निर्भेळ मिळत नाही. हे पुस्तक केवळ मराठीत केले म्हणून ते चांगले असे नाही; ते वाचनीय भाषेत लिहिले आहे, याचा मला आनंद वाटतो. मूळ गीर्वाण भाषेचे उत्तम ज्ञान श्री.जोगळेकर यांना नाही, कारण ते साठ वर्षांपूर्वीचे इंजिनियर आहेत. आमच्या पिढीला आमच्या संस्कृतपेक्षा इंग्रजी जवळची वाटते. कालमहिमा म्हणून हे मान्य करणे प्राप्त आहे. परंतु राजाजींचे बोट धरून का होईना, त्या मूळ ग्रंथाची ओघवती रसयात्रा श्री.जोगळेकर यांनी आपल्यास घडविली आहे याबद्दल आनंद वाटतो. मूळच्या संपूर्ण ग्रंथापैकी काही भाग राजाजींनी बहुधा विस्तारभयास्तव वगळला. त्यापैकी मराठी वाचकाच्या दृष्टीने आकर्षक अशा प्रकरणांचा, विशेषत: गीतामृताचा परामर्ष जोगळेकरांनी त्यांच्या रूपांतरणात समाविष्ट केला आहे, तो सुसंबध्द वाटेल अशी `कलमगिरी' साधली आहे. आजच्या वाचकांस स्वारस्य वाटेल अशी स्थलसूची, काही अद्य छायाचित्रे, महाभारतीय वंशवृक्ष व नकाशा हे सर्व फार उपयुक्त वाटते. समाजमनावर या पुराणकथेचा जो ठसा आहे, त्या अनुरोधाने कथेचे ऐतिहासिकत्व ठसविण्यास या गोष्टी महत्त्वाच्या ठरतील.
जगात आजपर्यंत या ग्रंथाच्या इतक्या भाषांतून, इतक्या आवृत्ती, इतक्या प्रती, इतक्या वाचकांनी वाचल्या हे खरे असले तरी महाभारताने सांगितले काय, हा प्रश्न उरतोच. भारतीय विचारदर्शनात आदेशात्मक आज्ञार्थी सांगणे नसते, तर ते हितगूजात्मक विध्यर्थी सांगणे असते. धर्म आणि अधर्म, इष्ट व अनिष्ट यांचे सम्यक् दर्शन घडविणे इतकाच त्यात हेतू असतो; आणि त्याचे चिंतन करून ज्याचा त्याने निर्णय घ्यावा असे अध्याहृत असते. साऱ्या जगात हा धर्म किंवा ही संस्कृती मोठी, असे म्हणण्यात ही भूमिका फार महत्त्वाची ठरते. `असे करा, असे वागा, हे करू नका...' असे कुणी कुठे म्हणत नाही. महाभारताची तीच भूमिका आहे. सारा घटनाक्रम, त्याची पूर्वपीठिका, मनोव्यापार, स्थितीपरीक्षण, युद्धवर्णन, पश्चात्बुद्धी अशी सर्व मांडणी अनेकानेक पात्रप्रसंगांतून केली आहे. गीतेच्या रूपाने व्यासानी आपले चिंतन कृष्णमुखातून प्रकट केले आहे. भूत-वर्तमान-भविष्याची नीट संगती लावून युगायुगांची कालक्रमणा ध्यानात आणून दिली आहे. साऱ्या विश्वात जे व्यक्त-अव्यक्त असेल ते या महाभारतात समाविष्ट केले आहे. तरीही त्यात प्रारंभापासून अंतापर्यंतच्या एक लाख श्लोकांत कुठेही ``असेच कर, नाहीतर...?....!!'' अशी वैचारिक दहशत नाही. संपूर्ण ग्रंथाचे तत्वसार म्हणून कृष्ण गीता सांगतो आहे. अर्जुनापुढे ज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग मांडला. विश्वरूप दाखवले, कर्तव्य सांगितले, स्थितप्रज्ञ लक्षणे, फलाच्या आशेविना कर्मज्ञान... सगळे झाले! यावरती आता शेवटी अठराव्या अध्यायात अर्जुनाला तो म्हणतो,
``इति ते ज्ञानमाख्यातं गुह्याद्गुह्यतरं मया
विस्मृश्य एतद् अशेषेण यथेच्छसि तथा कुरू''
`अत्यंत गुह्य असे ज्ञान मी तुला दिले, त्याचे सांगोपांग मनन कर; आणि?..... आणि तुझ्या इच्छेला येईल तसे कर!'
भारतीय समाजधारणेतील अभिव्यक्तीचा व विचारस्वातंत्र्याचा हा पाया महाभारताने घालून दिला आहे. त्याचा दाखला आजही देता येईल. आजच्या काळात लोकशाही निवडणूक पद्धती आहे. दोन वा अधिक राजकीय पक्षांची बाजू ऐकून घेतल्यावर योध्द्या समाजपुरुषाला आवाहन केले जाते, ``सगळयांचे ऐकून घेतलेस, आता योग्य-अयोग्याचा निर्णय स्थिर बुद्धीने तू कर.'' महाभारत सर्वकालीन आहे असे म्हटले जाते ते या अर्थाने! `महाभारताने काय सांगितले?' या प्रश्नाला उत्तरार्थी प्रश्न असा की, `महाभारताने काय नाही सांगितले?' इतके सर्व सांगूनही जे करायला हवे, ते जर माणूस करत नसेल तर ते दुर्दैव - व्यासांचे, आणि तुमचे-आमचे!
श्री.वि.रा.जोगळेकर हे माझ्या पिढीचे इंजिनियर, व्यासंगी संशोधक आहेत. शाश्वत ऊर्जा आणि ग्रामीण विकास या क्षेत्रात त्यांनी आयुष्यभर काम केले आहे. त्यांचा माझा परिचय या ग्रंथाच्या निमित्ताने झाला पण आमची भेट यापूर्वीच व्हायला हवी होती. त्यांच्या वानप्रस्थाच्या काळात असाच व्यासंग चालू राहावा आणि त्याचा आस्वाद आपल्या सर्वांना मिळत राहावा असे वाटते. ग्रंथ प्रकाशन हा स्वतंत्र विषय आहे. त्यास तासगावच्या श्री गणेश चॅरिटेबल ट्न्स्ट या संस्थेने मोठाच अर्थ दिला, आणि ग्रंथवितरणाची जबाबदारी घेतली, त्याबद्दल ती संस्था अभिनंदनास पात्र आहे. एरवी प्रकाशन क्षेत्रातील व्यावसायिकतेपेक्षा, अशा उपक्रमांत त्याच उद्देशाची संस्था सहभागी होणे हे विशेष आहे.
मी श्री.जोगळेकर आणि या उपक्रमात सहभागी झालेल्या त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो, आणि वाचकही माझ्याशी सहमत होतील अशी अपेक्षा करतो. 
(विजय भटकर)



`कालगती'ची गती...
पोस्टातील तार आता बंद झाली. तारेला चिरनिद्रा दिली याची बातमी कळली. त्यावर पुष्कळशा प्रतिक्रिया वृत्तपत्रांतून व्यक्त झाल्या. माझेही मन नकळत अस्वस्थ झाले. आणि ही शतकाची सुविधा काळाच्या पडद्याआड गेली या कल्पनेने मनात तशाच अनेक सुविधांनी गर्दी केली. काही सुविधांना इतके दीर्घायुष्यही मिळालेले नाही. काहींचा तर बालमृत्यूच झाला. भावनेच्या गुंतावळयात गुंतून पडण्याचा जमाना आता गेला आणि `परफॉर्म ऑर पेरिश' म्हणजे काही कामगिरी दाखवा नाहीतर नष्ट व्हा, असा क्षणभंगुरतेचा जमाना आला आहे. त्यामुळे तुमच्या फीलींगला कवटाळून बसण्यात अर्थ नाही. हे समजत असले तरी अशा इतिहासजमा झालेल्या गोष्टींचा शोध, माझे मन घेऊ लागले.
भारतातील संशोधन संस्थांमध्ये साधारणत: १९८० च्या दशकात कॉम्प्यूटर आला, तरीही सामान्य विद्यार्थी आणि नागरिकांना कॉम्प्यूटर हाताळण्याची संधी मिळाली ती ९० च्या दशकात. सुरुवातीच्या त्या काळात कॉम्प्यूटर सुरू करणे म्हणजे केवढा सोहळा असे महाराजा! फ्लॉपी नावाचा नैवेद्य दाखवायचा. ती फ्लॉपी आत सरकवतानासुद्धा छातीत धडधडायचे. डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम बूट करायची आणि मग ते मशीन सुरू होणार. पाचदहा वर्षातच फ्लॉपीची जागा सीडीने घेतली. मग काय डिव्हीडी आली, आता तर पीडी (पेनड्नईव्ह) इकडून तिकडे दिला की बात फत्ते.
परवा परवाच्या काळातच श्रीमंतीचा एक निकष म्हणजे कलर टीव्ही आणि व्हीसीआर. त्याचेच छोटे भावंड म्हणजे व्हीसीपी. हा क्रॅसेट प्लेअर भलत्याच फॉर्मात धावत असे. शंभर रुपयांना चोवीस तास अशा दराने कलर टीव्ही किंवा व्हीसीआर भाड्याने मिळत असे. २० ते ५० रुपयांना भाडोत्री क्रॅसेट आणून मनपसंत पिक्चर, फुटबॉल किंवा क्रिकेटची मॅच, रॉकस्टारच्या कन्सर्ट आणि तसल्या अनेक गमती सामुदायिकपणे पाहण्याची मजा ८०-९० च्या दशकात तरुणाईने लुटली आहे. आज त्या पिढीने पन्नाशी ओलांडली आणि `गेले ते दिवस' असे हळहळायला सुरुवातही केली आहे.
त्याच्या जोडीला इंडिपॉप गाण्यांमधील फेवरेट गॅझेट होते. ते म्हणजे वॉकमन. घरात ठेवलेल्या भल्या  मोठ्या टेपरेकॉर्डरला घराबाहेर काढणारे हे गॅझेट, तरुणांमध्ये लोकप्रिय होते. लग्न-मुंज किंवा भाऊबीजेला एकत्रित भेट देण्यासाठी तो लोकप्रिय आहेर होता. टेपरेकॉर्डरच्या जमान्यात ऑडिओ क्रॅसेटने राज्य गाजवले. १० रुपयापासून १०० रुपयांपर्यंत मिळणाऱ्या क्रॅसेटस्चे कलेक्शन हा एकेकाच्या अभिमानाचा विषय असे. सीडी आल्या आणि क्रॅसेट प्लेअर धूळ खात माळयावर निपचित पडले हा काळाचा महिमा. स्टोअरेज कपॅसिटी आणि साऊंडच्या पलिटीमध्ये झपाट्याने झालेली वाढ क्रॅसेटच्या मुळावर उठली. या क्रॅसेटस्च्या चिठीवर गाण्यांच्या ओळी लिहून मेन्टेन करण्याची मजा आजच्या पिढीला काय ठाऊक!
पेन्सिल आणि क्रॅसेटचे ते नाते! ती अडकून बसली की गुंता सोडविताना भावनिक गुंता जास्त व्हायचा. टेपचे ते लुटूपुटीचे ऑपरेशन करताना माणसे हळुवार बनत. हल्ली डिव्हीडी मधोमध ब्रेक करायची आणि चिल मार म्हणायचे. या क्रॅसेटपूर्वीची कित्येक दशके संगीतप्रेमींनी रेकॉर्ड प्लेअरवर रुंजी घातली. पण त्याच्या थोडेसेच आधी ग्रामोफोनवरील फिलाडेल्फीया ऑर्केस्ट्नपासून `धुंद येथ मी स्वैर झोकतो', `धार दे ग कपिला माई', `पंचमीचा सण आज' असल्या गीतांची आवर्तने कित्येकांनी ऐकली. किल्ली फिरवून हव्या त्या स्पीडने धावणारी रेकॉर्ड, तिच्यावर टोकदार पिन ठेवताक्षणी जादूई स्वरनिर्मिती होत असे. अतिशय जपून वापरावी लागणारी ती पिन, गोल्डन पॉलिशने झळकणारा त्याचा कर्णा ही एकेका घराच्या प्रतिष्ठित संपन्नतेची शान असायची. रेकॉर्ड प्लेअरने तुफान लोकप्रियता कमावली. ७८ च्या दगडी रेकॉर्डऐवजी छोट्याच्या ईपी आणि मोठ्याशा एलपी रेकॉर्डचे दर्दी लोकांकडील कलेक्शन त्या त्या गावातल्या एका प्रेक्षणीय स्थळापेक्षा किंचितही कमी नव्हते. पुण्याच्या रिगलसारख्या हॉटेलमध्ये २५ पैसे देऊन हवी ती रेकॉर्ड ऐकण्याची नजाकत कित्येकांनी आम्लेट-कॉफीसमवेत आस्वादली आहे. गावोगावी तसे रसिक असत. वॉकमन आता इतिहासकालीनच झाला. मोबाईल फोनमधील झपाट्यामुळे गाणी ऐकण्याचे आयपॉडही चारदोन वर्षातच अडगळीत गेले बिचारे!
फार पूर्वी नव्हे पण तीस-चाळीस वर्षांपूर्वी दिसणारे रॉकेलचे कंदिल आजच्या युपीएस जमान्यात गावातल्या संग्रहालयाला किंवा दिवाळीच्या आकाशकंदिलासाठी द्यावे लागतील. स्टो पिन हे कुणाला चीनहून आयात केलेले नाव वाटेल. भरभरणारा स्टोव्ह नीट पेटला नाही तर पत्र्याच्या पट्टीची पिन खुपसून काजळी दूर करण्यास वापरली जात असे. ती खुपसली तर स्टोव्हचा आवाज गप्पदिशी बंद होई आणि पिन काढली की फरफराट सुरू. स्वयंपाकघरात ही पिन म्हणजे गृहिणीच्या स्वयंपाकाची किंगपिन होती. सटासट शेव्हिंगच्या प्रगतीमुळे ब्लेडस् आता घरात मिळतच नाहीत. मायक्रोवेव्ह, इंडक्शन प्लेटचा जमाना आला. काही दिवसांनी गॅसच्या शेगड्या भूमिगत होतील एवढ्या झपाट्याने इंटिरियर बदलते आहे.
घरातल्या टेलिफोनसाठी नंबर लावून कित्येक महिन्यांची वाट पाहायला लावलेले दिवस फार जुने झालेले नाहीत. चाळीत किंवा वाड्यात किंवा गल्लीतसुद्धा एखाद्याकडे टेलिफोन असे. पाच-पन्नास मैलांवरून कुणाचा तरी फोन येणार म्हणून त्या फोनवाल्या घरी जाऊन बसणे अटळ व्हायचे. मग त्या घराला फारसा त्रास होऊ नये अशी काळजी घेत त्यांनी दिलेल्या स्टुलावर आटोपशीर बसावे लागे आणि कधीतरी आपल्याही घरी फोन यावा असे अनाहूतपणे पुटपुटत बसावे लागे. त्याकरिता टेलिफोनसंबंधी एखाद्या कमिटीवर वर्णी लावून घेण्यासाठी कितीतरी माननीयांनी रस्सीखेच केलेली पुष्कळांना आठवत असेल. त्या कमिटीवरील मेंबरला किती भाव असे. टेलिफोनची डायल फिरवावे लागणारे युनिट आता कोणत्याही घरी कुर्र कुर्र करत नाही. त्या युनिटला एथनिक म्हणून आता शोभेच्या टेबलवर ठेवले जाते. दूरदेशीच्या राजकुमाराला चोरून कॉल करण्याचीसुद्धा चोरी! कारण त्यासाठी ट्न्ंककॉल बुक करावा लागत असे. त्याची घाई असेल तर जास्तीचे पैसे देऊन लायटनिंग कॉल लावायचा. हे सगळे सोपस्कार फोन ऑफीसमध्ये किंवा पोस्टात जाऊन जाहीरपणे करावे लागत. कारण घरी फोन नसायचा. तिथे बुक केलेला कॉल लागला की मग त्या लाकडी खोक्यात जाऊन संभाषण करायचे. तिथे हळू बोलून उपयोग नसायचा. कित्येकदा इतके किंचाळावे लागत असे की, फोन खाली ठेवला तरी त्या दूरदेशीच्या राजकुमाराला ऐकू जाईल. असा तो जमाना कुठे आणि आजचा हा फ्री रोमींगचा कुजबुजाट कुठे! सॅम पित्रोदा यांच्या कृपेने सुरू झालेली एसटीडी, पीसीओ यलो बॉक्सची चळवळ काळाच्या महिम्यात कॉलऑफ झाली. इतकेच नव्हे तर आता हातोहाती इंटरनेट आल्यामुळे सायबर क्रॅफेवाल्यांचीदेखील तशीच गत होण्याची चिन्हे आहेत.
माझ्याच मोबाईलचा सुस्वर आवाज किणकिणला आणि माझ्या स्मरणरंजनाची ही तारही तुटली. प्रत्येक काळ हा तसा साधा सोपा आणि सरळमार्गी नसतो. पण तो मागे पडला की काळाबरोबरच पुढे गेलेल्या पिढीला आधीचा तो काळ साधा आणि सोपा वाटू लागतो. टेन्शन, स्पर्धा, परफॉर्म करण्याची प्रेशर त्याही काळात असेलच. पण त्यात फारशी गुंतागुंत नव्हती असे नंतर वाटू लागते. नात्यांच्या बंधांपासून स्वत:च्या करिअरपर्यंत सारे कसे निरलस, नितळ होते असे वाटत राहते. तुमच्याही कधीच्या तरी आयुष्यात अनुभवलेल्या आणि आता मिस झालेल्या असंख्य गोष्टींची आठवण होत असेल. बोरीबंदरच्या ट्नमपासून मिरज-पंढरपूरच्या टांग्यांपर्यंत.
तंत्रज्ञानासाठी माणूस नाही, तर माणसासाठी तंत्रज्ञान आहे हे सत्य एकदा लक्षात आले तर तंत्रज्ञानाच्या झपाट्यात स्वत: गिळंकृत होण्यापासून निदान आपण तरी बचावले जाऊ.
- विवेक ढापरे (मोबा.७५८८२२११४४) 
२८६, शुक्रवार पेठ, कराड



करुण नव्हे, प्रेरक..!
हातीपायी सगळं धड असूनही, धडपणी काम करत असण्याचा अनुभव आपल्याला कमीच असतो. `तुला दिलं रे देवानं । दोन हात दहा बोटं' असं बहिणाबाई बजावते पण त्यातली एक करंगळी उचलायची तरी आपल्या कोण जिवावर येतं. अशी कित्येक माणसं देवानं निर्माण केली, किंवा आधी सगळं धडधाकट करून काहीतरी धडाक्यानं तशी झाली, त्यांच्यावर आयुष्यभर पंगुत्त्व लादलं गेलं.

आपल्या सर्वांच्या पाहण्यात अशी कुणी जिद्दी व्यक्ती असेलही, जी एका पायावर किंवा पायच नसले तरी चाकाच्या खुर्चीवर उभी राहून आपल्यापेक्षा उंच गेली आहे. अशा व्यक्तींना तर कुणी अपंग म्हटलेलं चालतच नाही, पण हातपाय आणि हृदय असणारा कुणीही त्यास `अपंग' म्हणण्यास धजावणार नाही. उलट त्यांचं कार्यकौशल्य पाहिल्यावर स्वत:च्या अकार्यक्षम धडधाकटपणाचं वैषम्य वाटेल.

कोल्हापूरच्या `हेल्पर्स ऑफ हॅण्डिक्रॅप्ड'च्या नसीमा हुरजूक यांचं काम हे `चालतं' उदाहरण; आणि त्यांच्याच परिवारातून मोठी झालेली सोनाली नवांगुळ हे `बोलतं' उदाहरण. नसीमाताईनं शेकडोंना उभारी देणारे हातपाय दिले. सोनाली स्वत: विनापायाची मुलगी मधुर वाग्यज्ञातून पुष्कळांची सूत्रं हालवते आणि अंधांसाठी ब्रेल नियतकालिकाचं संपादन करते. सतीश नवले हा अंध युवक स्वत: रेडिओ केंद्र चालवून साऱ्या खेडूतांच्या कर्णोपकर्णी जाऊन बसतो... असे कितीतरी! विलक्षण, सक्षम, कर्तबगार लोक....

दिवाळीच्या सणाला आणि दिवाळीच्या पाठोपाठ एकदोन महिन्यांनी येणाऱ्या  नवीन वर्षाच्या मोसमात कितीतरी शुभेच्छापत्रे आपल्याकडे येत असतात. त्यावरील चित्रांनी मनाला निर्मळ आनंद होतो. उत्कृष्ठ रंगसंगती साधलेली विलोभनीय निसर्गचित्रे, त्यांच्यासोबत आलेल्या काव्यात्मक शब्दांनी आपल्या मनाला त्यांच्या भावना भिडवितात. त्यातल्या चित्रांनी डोळे आणि मन प्रसन्न होते. सकाळची कोवळी उन्हे डोक्यावर झेलणारी कोवळयाच पालवीची नयनरम्य संपदा, मावळतीच्या रंगछटा आणि सावल्या टिपणारी रंगांची उधळण, आकाशातून तरंगत जाणारी बगळयांची माळ, उमललेल्या आणि अस्फुट निशिगंधांचे तजेलदार ताटवे, त्या उन्मीलित शुभ्र पाकळयांवर मोत्यासारखे चमकणारे दवबिंदू, फुलदाणीत ठेवलेली रंगीबेरंगी मोहक फुले आणि शेजारी पहुडलेली हिरवी पाने, संथ जलाशयावर हेलकावणारी नौका किंवा हळुवार लहरणाऱ्या लाटा, बाळसेदार टपोऱ्या डोळयांची मांजराची गोजिरवाणी पिले, रखरखीत उन्हात लालचुटूक रंगांनी पेटलेला पर्णहीन पांगिरा किंवा पलाश, गर्द झाडीच्या पाणंदीतून अरुंद वाटेला धूळ उडवत पळणारी बैलगाडी.... जीवनातील अशा अनंत छटा रंगवणारी शुभेच्छापत्रे किंवा भिंतीवरची क्रॅलेंडरे हा कित्येक दिवसांसाठी आपल्याला एक आनंदसोहळा असतो. कामाच्या टेबलावर काचेखाली अशी शुभेच्छापत्रे हारीने मांडून ठेवली की दिवसाचा प्रारंभसुद्धा टवटवीत होतो असा माझा तरी अनुभव आहे. नव्या वर्षी नवीन चित्रे आली की, आधीच्या परिचित झालेल्या या कार्डांची जागा ती नवी चित्रे घेतात. कामाला सुरुवात करण्यापूर्वी किंवा मध्येच आळोखापिळोखा देताना कधीही हे चित्रांकित वैभव मनाला भुरळ पाडते आणि ती रेखाटणाऱ्या प्रतिभासंपन्न कलाकाराचे अपार कौतुक वाटते. कोण असतील ही कलाकार मंडळी? कधीतरी शोध घ्यायला हवा. त्यांचा ठावठिकाणा शोधून आपला हा दैनंदिन आनंद त्यांच्यापर्यंत पोचवायला हवा असे नेहमी वाटत राहते. पण ते वाटणे तेवढ्यावरच संपते.
अगदी लहानपणी मकरसंक्रांतीचा तिळगूळ आम्ही मुले पोस्टानेसुद्धा आत्या-मावशीला पाठवत असू. छोटीशी बोटभर कापडी पिशवी, त्यात तिळगूळ घालून पत्ता आणि पोस्टाचे तिकीट असणारे दोन बोटाचे कार्ड (टॅग)! त्यातल्या तिळगुळाच्या भावना हळूहळू शुभेच्छा पत्रांतून व्यक्त होऊ लागल्या. शुभेच्छापत्रे बाजारात आली. त्यांचा प्रसार इतक्या वेगाने झाला की, अशा चित्रांना कोणताही प्रसंग चालू लागला. संक्रांत, दिवाळी, नवे वर्ष हे ठळक प्रसंग झाले. पण नंतर वाढदिवस, व्हॅलंटाईन डे, मदर्स डे, फादर्स डे... नाना तऱ्हा! प्रसंगानुरूप सुरेख चित्र आणि त्यावरचा काव्यात्म मजकूर यांनी बाजारातील काचेची कपाटे बहरू लागली. नितांत सुंदर अशा चित्रांचा सुखद वर्षाव सुरू झाला. ही शुभेच्छापत्रे पाहताना कुठे डावे उजवे करता येऊ नये अशी आपल्या मनाची अवस्था.
ही चित्रे अनेक प्रतिभासंपन्न चित्रकार रेखाटत असतातच, पण मला असे कळले की, कित्येक अपंग कलाकार अशी चित्रे काढतात. विशेषत: दोन्ही हात नसलेली कित्येक कलावंत मंडळी तोंडात दाताने ब्रश पकडून किंवा पायांच्या बोटात कुंचला पकडून अशी चित्रे तयार करतात हे जेव्हा कळले तेव्हा माझे मन कमालीचे अपंग बनून गेले. प्रथमत: या गोष्टीवर विश्वासच बसला नाही. कसे शक्य आहे हे? आपण हातीपायी धडधाकट असलेली माणसं; वेड्यावाकड्यासुद्धा चार रेघोट्या ओढता येत नाहीत, तर विविध रंगछटा कागदावर कसल्या उतरवणार! आणि ही अपंग मंडळी? यांना अपंग कशासाठी म्हणावे? त्यांनी काढलेल्या या चित्रांचे जग समजून आले तेव्हा, आधीपासूनच आवडलेल्या शुभेच्छापत्रांना आणखी एक भावनात्मक वलय आपोआपच प्राप्त झाले. अशा कलाकारांना मनोभावे वंदन केले पाहिजे. ही चित्रे पाहिल्यानंतर आणि त्यांची पार्श्वभूमी समजल्यानंतर डोळे मिटून घेतले तरी कडा ओलावल्याशिवाय राहात नाहीत.
कधीतरी आपली मान अवघडते. इकडेतिकडे मान वळवून बघणे अवघड होते. कधीतरी उजव्या हाताला दुखापत झाली की, बांधून ठेवलेल्या हातामुळे नैमित्तिक कामे काही काळ डाव्या हाताने करावी लागतात. डोळयाला काहीतरी इजा होते त्यावेळी, डोळयावर पट्टी बांधून ठेवावी लागते. पायाचे हाड मोडते तेव्हा प्लास्टर घालावे लागते. अशा कधीतरीच्या प्रसंगात त्या त्या अवयवाचे महत्त्व कधी नव्हे तितके आपल्याला पटते. त्यांच्या वापराविना नेहमीचे वागणेसुद्धा किती अवघड आहे, वेदनामय आहे याचे प्रत्यंतर येते. त्या अर्थाने अल्पकाळासाठीच आलेले आपले अपंगत्व किती कष्टप्रद वाटते. अक्षरश: जीव नकोसा वाटतो. स्वत:शी चिडचिड होते. त्याउलट ज्या व्यक्तींवर जन्मापासूनच किंवा नंतरच्या आयुष्यात एखाद्या आघाताने हात-पाय-डोळा गमवावा लागला असेल तर त्यांचे दैनंदिन जीवन इतक्या आनंदाचे कसे काय असू शकते? त्यांना काही कष्ट वाटतच नसतील काय? वस्तुत: आपल्याशी तुलना केली तर `आपले जिणे निरर्थक' अशा वैफल्यग्रस्त भावनेतून हे अभागी जीव मोडून पडायला हवेत.
दीनवाणे जिणे, परावलंबित्त्व, आधारहीन लाचारी, कोणाचीतरी सहानुभूती, कुणीतरी दिलेल्या मदतीवर आशाळभूत जगणे, कोणीतरी कीव करावी... अरेरे म्हणून करुणा व्यक्त करावी...... असे काहीतरी घडत राहिले तर ते स्वाभाविक होते. परंतु वस्तुस्थिती अगदीच वेगळी आहे. धडधाकट आरोग्यदायी सुखासीन जगणाऱ्यांनी हेवा करावा इतक्या स्वाभिमानाने, जिद्दीने ही विकलांग मंडळी जगताना पाहून आपला खचलेला ऊर, उरापासून भरून येतो. प्राप्त परिस्थितीला धीराने, निश्चयाने आणि कसल्या तडफेने ही मंडळी भिडलेली असतात. नियतीने जे दान पदरात टाकले ते तर अटळच असते. ते ना तुम्ही बदलू शकता, ना कोणीच! पण यांची जीवननिष्ठा अढळ आहे. जिद्द, चिकाटी, महत्त्वाकांक्षा जागृत आहे. शरीराची साथ असेल नसेल पण यांचे मन कणखर आहे. `आम्ही जगू - आणि मानानेच जगू - ताठ मानेनेच जगू' असा संदेश ही मंडळी आपल्या वागण्या-बोलण्यातून आणि कामातून देत असतात. `स्वावलंबन, दया नको (डशश्रष हशश्रि, पे लहरीळींू)' हे तर त्यांचे बोधवाक्य आहे.
आयएमएफपीए - इंडियन माऊथ अॅन्ड फूट पेन्टींग आर्टिस्टस् ही संस्था अशा अपंगांच्या कलागुणांची कदर करणारी, त्यांना प्रोत्साहन देणारी असून, गेली २५ वर्षे कार्यरत आहे. भारतासह जगभर या संस्थेच्या शाखा असून जगातल्या अनेकानेक अपंग बांधवांचे कल्याण ही संस्था करते - मुख्यत: त्यांचा स्वाभिमान आणि आत्मसन्मान हळुवारपणे जपत!
एमएफपीए या संस्थेची सुरुवात सन १९५६ च्या दरम्यान झाली. इरिच स्टेगमन यांचे हातपाय पोलिओमुळे विकल झाले होते. तरीही या जिद्दी बहाद्दराने तोंडात ब्रश पकडून सुरेख चित्रे चितारण्याचा उपक्रम सुरू केला. आपल्यासारख्याच अपंग व्यक्तींचा त्याने युरोपातील आठ देशांमधून शोध घेतला आणि त्यांना एकत्रित केले. स्वत:चे जीवनध्येय असेच ठरविले की, जरी नियतीने आपल्यावर अन्याय केला असला तरी खचून न जाता जसे जमेल तसे आपले कलाविश्व जागृत ठेवायचे आणि ते वृद्धिंगत करत राहायचे. आपल्या सहवासातील अशा कलावंतांचे गुण स्टेगमनने हेरले आणि त्यांची एक सहकारी संस्था स्थापन केली. प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यापूर्वी नेमके काय करता येईल याचे त्याने मनोमन चिंतन केले आणि शुभेच्छापत्रे, क्रॅलेंडर्स, पुस्तकातील चित्रे अशांची जगभरातील बाजारपेठ यांचे उद्दिष्ट त्याने निश्चित केले. चित्रे काढू शकणारी आपल्यासारखीच कलाकार मंडळी त्याच्या नजरेसमोर होती. तोंडात किंवा पायाच्या बोटांमध्ये ब्रश पकडून सुदृढ चित्रकारांच्या तोडीची चित्रे काढू शकणाऱ्या कलाकार मंडळींची संख्या हळूहळू वाढत चालली. आज जवळजवळ ७०० च्या घरात ती पोचली आहे आणि ही मोहीम जगातील ७४ देशांतून प्रसृत झाली आहे.
स्टेगमनचा प्रारंभापासून दृढसंकल्प होता की, या संस्थेतील सदस्य अपंग आहेत म्हणून त्यांना कोणी दया किंवा मेहेरबानी दाखवू नये. धर्मादाय म्हणून, कीव करून आपल्या कलेचे मूल्यांकन होता कामा नये. केवळ गुणवत्तेच्या निकषावर आपल्या चित्रकलेचे मूल्यमापन आणि परिशीलन व्हावे ही स्टेगमनची आग्रही भूमिका होती. म्हणूनच या संस्थेने परवलीचे ब्रीदवाक्य ठरवले  -स्वावलंबन हवे, मेहेरबानी नको.
या संस्थेचे भारतातील कार्य १९८० च्या दरम्यान सुरू झाले.  मुंबईमध्ये संस्थेचे विभागीय कार्यालय आहे. सध्या साधारण १६ कलाकार अधिकृतपणे या संस्थेच्या माध्यमातून काम करतात. ही कलाकार मंडळी आपली कलाकृती घरीच बसून तयार करू शकतात. अशी सुंदर सुंदर चित्रे संस्थेच्या कार्यकारी मंडळाकडे अवलोकनासाठी आणि मूल्यमापनासाठी सादर केली जातात. त्यामधून मग कलाकृतीची निवड होते. अशी मान्यता मिळाल्यावर शुभेच्छापत्रे, क्रॅलेंडर किंवा तत्सम शोभिवंत उत्पादनांमध्ये वापरण्यासाठी ही चित्रे स्वीकारली जातात. अलिकडे क्रोकरी, टीशर्टस् अशाही वस्तूंसाठी हे कलावंत काम करतात. बरेच चित्रकार विविध व्याख्यानांद्वारा आणि प्रात्यक्षिकांतून शाळा-महाविद्यालये व संस्थांमधून आपल्या उपक्रमाचा परिचय करून देतात. त्यायोगे उपक्रमाचा उदात्त हेतू आणि कार्य समाजापुढे येते. शिवाय या कलाकारांच्या कामाला आणखी कोणत्या क्षेत्रात वाव आहे याचा ऊहापोह आपोआपच होत जातो. अतिशय शिस्तबद्ध अशा आर्थिक नियोजनातून ही संघटना कार्य करते. संस्थेकडे सेवाभावी वृत्तीचे काही कर्मचारी आहेत, ते सर्व हातापायी धड व कार्यकुशल आहेत. आलेल्या कलाकृतीचे परीक्षण, उत्पादन, विक्री यांची व्यवस्था ही संस्था समर्थपणे पाहते. अपंग व्यक्तींना सुयोग्य मार्गदर्शन मिळावे व त्याद्वारे अंगभूत कला अधिकाधिक निर्दोष, कलापूर्ण व आकर्षक व्हावी यासाठी संस्थेच्या वतीने भरीव प्रयत्न होत असतात. कित्येकदा अपंग व्यक्ती उत्तमोत्तम चित्रकृती तयार करतात, परंतु विक्री वितरण व्यवस्था आणि त्यासाठीची धावपळ त्यांना जमत नाही. म्हणून ती जबाबदारी संस्था घेते. त्यांची चित्रे आणि उत्पादने जगभर सन्मानाने वितरित होतात. अशा हस्तविरहित कलाकारांच्या शोधात संस्था राहते. त्यांना धीर देत योग्य ते प्रशिक्षण देणे, त्यांच्या कलेसाठी नेमके क्षेत्र शोधणे, त्यांना प्रोत्साहन देत त्यांची उत्साही मानसिकता घडविणे अशी कार्ये संस्थेकडून केली जात असल्यामुळे परावलंबी लांच्छनास्पद जिणे कोसो दूर राहते. त्याउलट आत्मसन्मान, सकारात्मक जीवनपद्धती आणि स्वकष्टाची आर्थिक प्राप्ती व सुरक्षितता ही संस्था प्रदान करते. देशभरातील शिस्तबद्ध विक्री व्यवस्था आणि वाटपाची प्रणाली आवश्यक असते. त्यायोगे जगाला अशा अनोख्या कलावंतांची ओळख होते.
धर्म-जात-वय-देश असा कोणताही घटक विचारात न घेता या संघटनेत सहभागी होता येते. त्याविषयीची मुख्य पात्रता म्हणजे ज्याने आपले दोन्ही हात दुर्दैवाने गमावले आहेत आणि तरीही तो स्वाभिमानाने स्वयंनिर्भर जगू इच्छितो, आपल्या कलागुणांच्या बळावर स्वत:चा संसार चालवू इच्छितो असा कोणीही, या संस्थेचा सदस्य होऊ शकतो. सदस्यता तीन पातळयांवर असते - प्रशिक्षणार्थी, सहयोगी आणि पूर्ण सदस्य. बहुतांशी सदस्य प्रशिक्षणार्थी म्हणून दाखल करून घेतले जातात. प्रशिक्षण शुल्क, चित्रकला साहित्य हे संस्थेकडून मोफत पुरविले जाते. कलाकृतीचा दर्जा सांभाळला जावा म्हणून संस्थेचे परीक्षण मंडळ चित्रकृतीचे समग्र परीक्षण करते आणि संस्थेला अपेक्षित असा दर्जा त्या सदस्याने प्राप्त केल्यानंतर त्याला पूर्ण सदस्यत्त्व बहाल केले जाते. अपंग क्षेत्रातून अशा जन्मजात कलाकारांचा शोध सातत्याने घेतला जातो. संस्थेचा संपूर्ण कारभार लोकशाहीप्रधान सहकारी तत्त्वावर चालतो. अर्थातच सर्व सदस्यांना आपले मत मुक्तपणी मांडण्याचा अधिकार असतो. संस्थेचा अध्यक्ष हाही स्वत:, तोंडात ब्रश धरून चित्रे काढणारा कलावंतच असावा लागतो. तसाच नियम आहे. त्याला आंतरराष्ट्नीय पातळीवर चित्रकार म्हणून मान्यताही मिळायला हवी असते.
संस्थेविषयी काही मान्यवर म्हणतात -
``मी या संस्थेशी अनेक वर्षे निगडित असून संस्थेचे एकंदरीत कार्य आणि दर्जा पाहून भारावून गेलो आहे.''
      - एअर कमोडोर एम वानिया, कोईमतूर

``दुर्दैवाने आपले दोन्ही हात गमावलेल्या कलाकारांनी तोंडात ब्रश धरून काढलेली चित्रे पाहून मी चकित झालो. संस्थेचे योगदान प्रशंसनीय आहे.''
- मगनभाई आनंद

अशा काही कार्याचा परिचय झाल्यावर आपल्याही पाहण्यातील कितीतरी विलक्षण सक्षम, कर्तबगार मंडळी आठवणीत येऊ लागतात. या प्रेरक लोकांच्या मांदियाळीत भावरंगांचे इंद्रधनुष्य रंगविणारी एमएफपीए ही संस्था. त्या संस्थेचे हे अजोड कार्य प्रेरक आणि अचंबित करणारे आहे, अंतर्मुख करणारे आहेे. परस्परांवर दया दाखविण्यापेक्षा प्रत्येकाने स्वावलंबीच बनावे एवढे जरी आपण धडधाकट लोकांनी लक्षात घेतले तरी, अशा संस्थेला हात दिल्याचेच पुण्य मिळेल.
***
संस्थेचा पत्ता - माऊथ अॅन्ड फूट पेन्टींग आर्टीस्टस्
ए-४०१, दीप्ती क्लासिक, सुरेन रोड, अंधेरी (प.), मुंबई ४०००९३  फोन : (०२२) ४००९८८७७
ई-मेल : contact@imfpa.co.in
वेबसाईट  www.imfpa.co.in

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन