Skip to main content

17 Feb.2014

अभिरुची घडवावी लागते
पन्नासच्या दशकात मी कुमारवयात होतो. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा परिणाम माझ्या विचारांवर होण्याचे ते वय! समाजातील प्रश्न जरी आताइतके जटिल वाटत नसले तरी प्रत्येक घटनेवर माझ्या कुवतीनुसार `हे असे का व्हावे?' इतपत विचार होत होता. महात्मा गांधी हत्येनंतर झालेल्या दंगलींनी मनात एक भीती व संशय येऊन अस्थिरतेची भावना मूळ धरू लागल्याचे स्मरते. ग्रामीण भागात झाले तितके भयप्रद वातावरण शहरात नव्हते पण सर्व काही सुरक्षित आहे या समजुतीला धक्का बसला. नंतरच्या वर्षात समाजातील दुही, तेढ आणि क्रौर्य आपल्या आसपासच नाही तर, सर्व जगभर वाढत गेले व वाढत आहे. कायद्याच्या कवचाचे संरक्षण किती तकलुपी असते याचे प्रत्यंतर येत गेले व येतच राहिले. संवेदनक्षम मन हळूहळू निगरगट्ट बनत गेले आणि आज अनेक गोष्टींबाबत पूर्वीची संवेदनक्षमता तितकी राहिली नाही.
त्या कुमारवयातील वाचनाची गोडी मात्र अजून टिकून असल्याने, व तीही चांगले संस्कार घडवणाऱ्या वाचण्याने, वर्तमानपत्रे अथवा प्रसारमाध्यमांमधून `ओतल्या' जाणाऱ्या घटना व त्यातील संभाव्य अतिशयोक्ती ओळखायला येऊ लागली आहे.
ज्या दोन पुस्तकांनी माझ्या विचारसरणीवर प्रभाव पाडला, त्यापैकी एक प्रसिद्ध लेखक व अमेरिकेतील धनाढ्य व्यक्ती डेल कार्नेगी यांचे पुस्तक `हाऊ टू विन फ्रेंडस् अॅन्ड इन्फ्ल्यूएन्स पीपल' माझ्या माहितीप्रमाणे १९५० च्या सुमारास प्रसिद्ध झालेल्या या पुस्तकाने विक्रमी विक्री केली. पुस्तक तसे सरळ सरळ उपदेशात्मक. जगात कसे वागावे की ज्यामुळे तुमचा प्रभाव समाजावर पडेल, व समाजाला सुधारण्याची संधी तुम्हाला मिळेल, चांगल्या समाजाची निर्मिती होईल अशा विचारांचे हे पुस्तक वेगळया पद्धतीने लिहिलेले. इंग्रजी चौथी पाचवीत असताना हे पुस्तक मला `वाचता' आले यावरून ते किती सुबोध होते याची कल्पना येईल. आधी साने गुरुजींच्या वाङ्मयाने मनाची मशागत केलेली होती, म्हणून असेल कदाचित, पण समाजातील पीडितांबद्दल कणव निर्माण होई.
दुसरं पुस्तक सांगलीतील विख्यात उद्योजक धनी वेलणकर यांनी लिहिलेले, `जगात वागावे कसे?' या पुस्तकात व्यवहारोपयोगी विचार मनोरंजकपणे मांडलेले असल्याने मी प्रभावित झाल्याचे आठवते. `जगात वागावे कसे?' या पुस्तकाबाबत फारसा बोलबाला झाल्याचे आठवत नाही, पण भारतीय संस्कृतीतील विचार व त्यानुसार आचार कसा असावा याचा ऊहापोह या पुस्तकात वाचल्याचे आठवते. रेल्वेने प्रवास ही किती साधी गोष्ट पण त्यावर वेलणकरांनी सहप्रवाशांबरोबर सलोखा, आगगाडीच्या डब्यात प्रवास करताना कोणत्या वस्तू व त्या कशा खाव्यात इथपर्यंत तपशील दिला होता. चालत्या आगगाडीतून बाहेर वस्तू फेकून देण्याऐवजी स्टेशनमध्ये आगगाडी थांबल्यावर त्या टाकाऊ वस्तू उदा.केळीची साले, शेंगाची फोलपटे इ. टाकल्यास त्या इतस्तत: पसरत नाहीत हा विचार त्यातलाच!
या दोन्ही पुस्तकांमधले विचारधन समाजाला उपयुक्त होते. काळाच्या ओघात समाजात `ओरबाडू' वृत्ती फोफावल्यावर हे विचार कालबाह्य किंवा अव्यवहारी ठरले आहेत. चांगले संस्कार कशाला म्हणायचे? किंबहुना संस्कार होतील तेच चांगले हा संभ्रम होऊन त्याचे पर्यवसान आजच्या स्वकेंद्री समाजात झाले आहे की काय?
चांगल्या संस्कारांबरोबरच चांगल्या सवयी अंगी बाळगणे हे नैसर्गिकच होते. घरातल्या ज्येष्ठांना मान देणे, वस्तू जागच्या जागी व नीट ठेवणे या संस्कारांतून नेटकेपणाने घरे लावलेली असत. त्यात अंतर्गत सजावट भले आताच्या संकल्पनेनुसार नसेल, पण घराच्या प्रवेशद्वारासमोर आज अस्ताव्यस्त पडलेला पादत्राणांचा खच पाहून त्यातील कुरुपतादेखील डोळयांना त्रास देत नसेल? त्या काळी कामातील निगुती व त्यामुळे होणारे सुबुद्ध काम सहजतेने होत असे. सौंदर्य कशात आहे याची जाण डोळयाला आली की वाईट होऊ नये ही सहजकृती बनून जाई. सुतार, गवंडी यांसारख्या कारागिरीतदेखील सुबकता दिसे. समाज या चांगल्या गोष्टी किती झटकन विसरलाय, हे माझ्यासारख्यांना जाणवते. यात `आमच्या काळी कसं चांगलं होतं' असा उगीच उमाळा आणायचा नाही, पण भारत लवकरच महासत्ता होणार अशा वल्गना ऐकताना जे हातातून झपाट्याने निसटून जातंय त्याबद्दल काळजी वाटते.ते सध्याच्या वेगवान युगाशी कसे काय अनुरूप आहे याचे आकलन न झाल्याने मनात हतबलता राहते.
`जे जे उत्तम उदात्त उन्नत' या काव्यपंक्तीतल्या शब्दांचे अर्थच समजले नाहीत तर तशी कामे होणार कशी? अस्ताव्यस्त कचेऱ्या, निकृष्ट बांधकामे व कुठल्याही गोष्टींचे दूरगामी परिणाम काय होणार याचा विचार न करता, आत्ताची वेळ निभावून नेण्याची वृत्ती या साऱ्यामागे आहे. अभिरुची वाढली तर त्याचा परिणाम सर्व गोष्टींवर कसा होऊ शकतो याचं चांगलं उदाहरण आजच्या जपान देशाचं देता येईल, जिथे बगीच्यात चहा घेण्यासारख्या साध्या गोष्टीवर देखील किती विचार केला गेला आहे! जुन्या व नव्याची सांगड किती चपखलपणे तिथे साधली आहे, हे पाहिल्यावर कौतुक वाटते.
- वैकुंठ सरदेसाई, १२०६ अ/२३,
डेक्कन जिमखाना, पुणे ०४
फोन : ०२०-२५५२०९६८

सबब नको, छोटीशी कृती
माणसाची परिस्थिती बिकट असेल तर त्याला संघर्ष करावा लागतो. धडपडीतून बाहेर पडल्यावर चांगले दिवस नक्कीच येतात. तसे चांगले दिवस आल्यानंतर इतरांसाठी तसे दशावतार भोगण्याची वेळ येऊ नये यासाठी योग्य ते कर्तव्य केलेच पाहिजे. त्याउलट आपल्या सुखासीनतेत व्यस्त राहून  इतरांविषयी बेदखल होण्याचा अविचार  आणि आचरण पुष्कळजण करत असतात. भारतामधील निवडणुकांमधून तथाकथित सुशिक्षितांचे किंवा शहरी मतदारांचे अल्प प्रमाण हे अशा बेदखल अविचारी आचरणाचे स्पष्ट उदाहरण आहे. माणूस शिकून `शहाणा' झाला की तो आपले घर, गाव, देश यांच्याकडे चढत्या क्रमाने दुर्लक्ष करतो. भविष्याच्या दृष्टीने ही गोष्ट विसंगत आणि काळजी वाटणारी आहे. येत्या तिमाहीत आपल्या देशात सार्वत्रिक निवडणुका होतील त्या पार्श्वभूमीवर भारतातील साक्षर जनतेचे मतदानाकडे होणारे दुर्लक्ष गंभीर होत आहे. ते वेळीच लक्षात घेतले पाहिजे.

भारतातील राजकीय पक्ष, राजकारणी नेते आणि एकूण राजकारण हे कमालीचे दूषित बनले आहे ही गोष्ट खरीच आहे. त्याचा परिणाम म्हणून समाजकारण, सामुदायिक प्रणाली, अर्थकारण, कृषी, शिक्षण इत्यादी सर्व क्षेत्रांत बजबजपुरी आहे यातही संशय नाही. परंतु म्हणून आपल्या मूलभूत अशा अत्यंत सोप्या कर्तव्याकडे पाठ फिरवल्यामुळे सध्या आहे ती स्थिती आणखीनच बिघडणार हे सांगायला नको. इथली स्थिती फारच वाईट म्हणून दूर कुठेतरी पळ काढण्याने कदाचित स्वत:पुरती अन्न-वस्त्र-निवाऱ्याची उत्तम सोय मिळेल. पण इथे मागे राहणारे आई-बाप, आत्या-मावश्या आणि आप्तस्वकीयांना तेच भोग इथे राहून सोसावे लागतील त्याचे काय?

इथल्या शाळा, रस्ते, नद्या, पोस्ट वगैरे सर्व प्रकरणे आणि त्यास कारणीभूत असलेले पुढारी व `त्यांचे' सरकार असह्य होत चालले आहे हे वास्तव आहे. संसदेत मिरचीपूड उधळणारे खासदार असतील तर असल्यांच्या आधारावर चांगले जीणे नशिबी येण्याची शक्यता नाही. तथापि ही सडकी माणसे दूर करण्याचा एकमेव मार्ग इतकाच आहे की देशातल्या प्रत्येक `शहाण्याने' मतदानच केले पाहिजे. आपल्या एकेका मतामुळेच समाजातील एकेक व्यवस्था योग्य वाटेवर चालू शकते इतकी साधी गोष्ट आपल्या सुशिक्षितांना समजावून सांगायला लागावी हेच विचित्र वाटते.

आजकाल छोटी मुलेही मोबाईल, नेट यांचा वापर करतात. पोस्टाने मत पाठविण्याची तर पूर्वीपासून सोय आहेच. निवडणुक आयोगाच्या वतीने मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्यासाठी जागृती करण्याचे प्रयत्न होत आहेत. प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र निवडणूक अधिकारी आणि त्याच्या हाताखाली उत्तम निवडणूक यंत्रणा देण्यात आली आहे. त्याच्या कार्यक्षेत्रातील विविध सामाजिक संस्थांशी संपर्क साधून चर्चा आणि प्रबोधन सुरू आहे. इतकेही करून जर आपण जनता त्याकडे दुर्लक्ष करीत असू तर येथून पुढच्या काळात टोलनाके, जातवाद, आर्थिक घोटाळे आणि खासदारांचीच तिखटपूड यांचा प्रच्छन्न हैदोस वाढेल. आपले प्रतिनिधित्व कुणाकडे द्यायचे हे आपण मतदार ठरवीत असतो. आणि ते ठरविण्यासाठी निवडणूक आयोग आणि सरकारी यंत्रणा यांना असे मागे लागावे लागते, हे आपल्या या दशावतारांचे मूलभूत कारण आहे.

येत्या महिन्याभरात त्या संदर्भातील काही तातडीची कामे करावी लागतील. मतदार यादीत आपले व आपल्या कुटुंबातील सर्वांचे नाव असल्याची खात्री करणे, ते नसेल तर नोंद करणे आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरिक संघ, तसेच बागेत फिरायला किंवा हास्यक्लबात जाणारी, किंवा कुठल्या बुवा-बाबाकडे आध्यात्म शिकणारी, अशी सगळी माणसे हे काम करू शकतील. देश आणि समाज योग्य चाकोरीवर असेल, तर त्या सगळयाचा उपयोग आहे. म्हणून बाकीचे सामुदायिक उद्योग तूर्तास थांबवून मतदानाचा ध्यास घेतला पाहिजे. परगावी किंवा दूरदेशी असलेल्यांनी इंटरनेट, ई-मेल, ऑनलाईन वगैरे भानगडी समजून घेऊन त्यांच्या वापराने मतदान कसे करतात हे तातडीने समजून घ्यावे. `आम्ही येथे नसल्यामुळे ---' असल्या काही सबबी टाळल्या पाहिजेत. इथे असूनही मतदानाची सुटी अंथरुणात घालविणाऱ्यांची तर कीवसुद्धा करून घेण्याची पात्रता नाही.

खेडोपाडी किंवा डोंगरकपारीतील लोक उत्साहाने मतदान करतात. त्यांना पैसे दिले जातात... वगैरे चर्चा करण्यात आपला दिवस व्यर्थ जातो. शहरातून हल्ली शहाणे लोकसुद्धा आपापल्या घराच्या बोळात फरशा बसवणे किंवा रंगकाम करणे असल्या मार्गाने वसुली करतातच. हे करावे की नको हा ज्याच्या त्याच्या नीतीचा भाग झाला. परंतु मग घोटाळयांचा कोळसा पुढची पाच वर्षे उगाळत बसण्याला पर्याय राहात नाही.

चांगल्या लोकांनी राजकारणापासून बाजूला राहावे हा लाडका सिद्धांत योग्य की अयोग्य हा प्रश्न नसून सर्व सामुदायिक व्यवस्था राजकारणाशीच येऊन थांबतात हे वास्तव आहे. म्हणून आपल्या प्रतिनिधीमार्फत राजकारण चालविणे हेच प्रत्येक नागरिकाचे प्रथम कर्तव्य ठरते. तेही करण्यात जर कुचराई होत असेल तर कुठल्या मापाने अशा लोकांना शहाणे किंवा सुशिक्षित मानावे हाच प्रश्न येतो. त्यांना ही बजबजपुरी असलेला देश सोडूनच जायचे असेल तर दाही दिशा मोकळया आहेत. परंतु इथे राहणाऱ्यांसाठी चांगली व्यवस्था निर्माण व्हायला हवी. आणि ती देणारे चांगले लोक प्रतिनिधी म्हणून सत्तेवर यायला हवेत. हे व्हायचे असेल तर एका मतावरती पुष्कळ गोष्टी अवलंबून आहेत. म्हणूनच मतदान करण्याची बाब प्रत्येकाने मन:पूर्वक मनावर घेतली पाहिजे.

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन