Skip to main content

26Jan.2014

स्वदेशी आणि स्वराज्य
स्वराज्य हे जवळजवळ पूर्णपणे स्वदेशीच्या मार्गाने हस्तगत करण्यासारखे आहे. जर आपल्याला आपापल्या भाषांविषयी प्रेम नसेल, आपल्याला आपले कपडे आवडत नसतील, आपले अन्न जर आपल्याला बेचव वाटत असेल, आपल्या इथली हवा फारशी चांगली वाटत नसेल, आपले लोक बेढब आणि आपल्या संगतीला नालायक वाटत असतील; म्हणजेच जे काही देशी असेल ते सर्व वाईट आणि परदेशी ते सर्व चांगले वाटत असेल तर आपण आपल्या राज्याची काय किंमत करतो? आपल्याला बराच काळपर्यंत परकियांच्या पालकत्वाखाली राहणे अशक्य होईल. परकीय संस्कृती सर्वसामान्य जनसमुदायात अजून भिनलेली नाही. मला असे दिसते की, स्वराज्याची कदर करण्यापूर्वी आपल्याला स्वत:च्या देशाविषयी नुसते प्रेमच नव्हे तर अक्षरश: वेड असले पाहिजे. आमच्या प्रत्येक कृतीवर स्वदेशीचा ठसा उमटला पाहिजे. जे जे म्हणून या देशाचे आहे, त्यातील बहुतेक गोष्टी एकंदरीत पाहता निकोप आहेत अशा समजुतीच्या आधारावर स्वराज्याची बांधणी करणे शक्य असते. ज्या देशाने स्वराज्याची चळवळ चालविली त्यांनी स्वत:च्या देशाचा, स्वदेशी भावनेचा पूर्णपणे पुरस्कार केला पाहिजे. दोष जतन करून ठेवावेत, असा त्याचा अर्थ नाही. तर जे जे म्हणून या राष्ट्नचे आहे ते जरी तुलनात्मकदृष्ट्या कमी आवडणारे असले ती त्यालाच चिकटून राहिले पाहिजे आणि जे परकीय असेल ते आपल्यापेक्षा किती जरी सुखकारक वाटले तरी ते दूर सारले पाहिजे. आपल्या संस्कृतीत ज्याची उणीव असेल ते आपल्या प्रयत्नांनी भरून काढता येईल, किंबहुना आपल्याला आवडणारे असे जे काही आहे ते निर्माण करण्याचा प्रयत्न करायला हवा.
- महात्मा गांधी

परमवीरचक्राच्या शिल्पकार
सावित्रीबाई खानोलकर
भारतीय लष्करात शौर्यासाठीचा सर्वोच्च पुरस्कार म्हणजे परमवीरचक्र. या पुरस्कारासाठी जे पदक देण्यात येते त्याची रचना सावित्रीबाई खानोलकर यांनी केली आहे. सावित्रीबाई यांचे मूळ नाव ईव्ह सोव्हान मदाय द मारोस. त्यांचा जन्म २० जुलै १९१३ रोजी स्वित्झर्लंडमध्ये झाला. त्यांचे पिता हंगेरीचे तर माता रशियन होती. १९२९ साली भारतीय लष्करातील अधिकारी विक्रम खानोलकर यांच्याशी त्यांचा परिचय झाला, परिचयाचे रूपांतर प्रेमात झाले आणि १९३२ साली या दोघांचा विवाह मुंबई येथे झाला. विवाहानंतर इव्ह - सावित्री खानोलकर झाल्या.
सावित्रीबाइंर्ना या संस्कृतीचे अनिवार आकर्षण होते. लवकरच त्यांनी मराठी, हिंदी आणि संस्कृत या भाषांवर प्रभुत्व मिळविले. शिवाय भारतीय संगीत, नृत्य आणि चित्रकलेतही त्यांनी प्राविण्य मिळविले. प्राचीन भारतीय परंपरा व संस्कृतीचा त्यांचा गाढा व्यासंग होता.
१९४७ साली स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतीय लष्करात विविध सन्मान देण्याची योजना झाली, तेव्हा परमवीरचक्र या सर्वोच्च सन्मानाच्या पदकाची रचना करण्याची जबाबदारी मेजर जनरल हिरालाल अटल या अधिकाऱ्यावर सोपविण्यात आली. त्यांनी या कामासाठी सावित्रीबाइंर्ची निवड केली. सावित्रीबाइंर्नी या पदकाची रचना करताना दधीचीच्या वज्राचा आकार घेतला आणि त्यानुसार त्याची रचना केली. दधीची ऋषींनी देवांच्या रक्षणासाठी आपल्या अस्थींपासून वज्र तयार केले होते, ही पौराणिक कथा आहे. या पदकात वज्राभोवती शिवाजी महाराजांच्या भवानी तलवारीचेही चित्र आहे. १९५२ साली सावित्रीबाइंर्चे पती विक्रम खानोलकर यांचे निधन झाले. त्यानंतर सावित्रीबाइंर्नी आध्यात्मिक साधनेला वाहून घेतले. त्या रामकृष्ण मठात राहू लागल्या. त्यांनी `महाराष्ट्नतील संत' या विषयावर एक पुस्तक लिहिले.
या साध्वीचा मृत्यू १९९० साली झाला. देशाच्या रक्षणासाठी झुंज देणाऱ्या जवानांचा गौरव करणाऱ्या परमवीर चक्राच्या रूपात त्यांची स्मृती राहिली.
(इंटरनेट)

चिरायु प्रजासत्ताक
जगातील सर्वात मोठी लोकशाही असे भारतीय राज्यपद्धतीला म्हटले जाते. विस्तार विचारात घेतला तर भारतापेक्षा मोठे देश जगात आहेत. परंतु लोकसंख्येचा विचार केला तर, लोकशाहीसारखी शासनव्यवस्था रेटणे पुष्कळ देशांना शक्य झालेले नाही. आपल्याकडे ते वैशिष्ट्य मानले पाहिजे. लोकशाहीमुळे काही प्रशासकीय निर्णय वेळेवर होत नाहीत हे खरे आहे. परंतु झटपट निर्णयांमुळे सर्व गोष्टी सुरळीतच होतात असे नव्हे. दुसरे असे की, राज्य करणारी व्यक्ती एकापाठोपाठ एक क्रमाने लोकहितकारकच असेल असे सांगता येत नाही. रामानंतर किंवा शिवाजीनंतर लोकानुवर्ती राज्य टिकू शकले नाही हा पुरातन इतिहास आहे. त्या मानाने आजच्या भारताची गेली ६५ वर्षे लोकशाहीचा प्रयोग अधिकाधिक प्रगल्भ होत चालला आहे हे कोणताही राज्यशास्त्राचा अभ्यासक मान्य करतो. `स्वातंत्र्य मिळून पासष्ठ वर्षे झाली तरी....!' असा एक नाराजीचा सूर पुष्कळदा ऐकवला जातो. राज्यकर्ते अधिक प्रगल्भ असते तर या कालावधीत अधिक काही साध्य झाले असते ही गोष्ट खरी. परंतु लोकशाहीला मूलत: लोक शहाणे आणि जबाबदार हवेत हे पथ्य असते, ते आपल्याकडे दुर्लक्षित झाल्यामुळे ती प्रगल्भता राज्यकर्त्यांमध्येही येऊ शकलेली नाही. परंतु एकंदरीने राज्यकर्ते आणि जनता यांचा समसमा संयोग झालेला आहे, एवढे तरी भारताच्या लोकशाहीबाबत म्हणता येईल.

ऑगस्ट १५, १९४७ रोजी इंग्रजांपासून राजकीय स्वातंत्र्य मिळाले. परंतु काही देशभक्तांनी, त्यापूर्वीच सतरा वर्षे आपला स्वातंत्र्यदिन साजरा करावा असा निर्णय घेतलेला होता. तो दिवस १९३० सालचा २६ जानेवारीचा होता. विविध प्रतीकांनी तो देशभक्तांनी, पुढाऱ्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी देशभर साजराही केला होता. त्याची थोडीशी पार्श्वभूमी अशी की, अखिल भारतीय राष्ट्नीय काँग्रेसचे अधिवेशन १९२९ च्या डिसेंबर महिन्यात भरले होते. त्या अधिवेशनात जवाहरलाल नेहरू यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली  (३१ डिसेंबर १९२९) आणि भारताच्या मांडलिक किंवा वसाहती राज्यातील प्रजेच्या अधिकारांऐवजी `संपूर्ण स्वराज्य' ची मागणी प्रथमच करण्यात आली. त्या अधिवेशनात असा ठराव मंजूर झाला की, पुढच्या (जानेवारी १९३०) महिन्याचा शेवटचा रविवार हा भारताचा संपूर्ण स्वातंत्र्याचा प्रथम दिवस म्हणून देशभर साजरा केला जावा. जानेवारीतील हा शेवटचा रविवार म्हणजे २६ जानेवारीचा दिवस होता. काँग्रेस नेत्यांच्या आदेशाप्रमाणे देशभरातील कार्यकर्त्यांनी आपापल्या सोयीशक्तीप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी त्या काळातील भारताचा राष्ट्न्ध्वज - ज्यावर लाल, पांढरा, हिरवा असे तीन रंगाचे पट्टे व मध्यभागी चरखा होता - तो ध्वज फडकविला आणि नेत्यांच्या आदेशाप्रमाणेच तो संपूर्र्ण दिवस सूतकताई, अस्पृश्य सेवा, सामाजिक एकता इ. विधायक कार्यांनी व्यतीत केला.गांधीजींच्या मुखीचे अधिकृत वक्तव्य म्हणून असे प्रसृत करण्यात आले होते की, "The British government in India has not only deprived the Indian people of their freedom but has based itself on the exploitation of the masses and has ruined India economically, politically, culturally and spiritually.... Therefore, India must sever the British connection and attain 'purna swaraj' or 'complete independence."

देशाला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर यापुढचा राज्यकारभार कसा चालावा यासंबंधीची राज्यघटना सिद्ध करणे हे सर्वाधिक प्राधान्याचे काम होते. त्यासाठी कायदेतज्ज्ञ मान्यवरांची घटना समिती तयार झाली. त्यामध्ये डॉ.राजेंद्रप्रसाद, नेहरू, राजगोपालाचारी, वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, श्यामाप्रसाद मुखर्जी, नलिनीरंजन घोष यांचा समावेश होता. त्याव्यतिरिक्त डॉ.आंबेडकर, अलादी कृष्णास्वामी  अय्यर आणि कनुभाई मुन्शी यांची निर्णय समिती होती. घटनेचे लेखन करणाऱ्या विशेष समितीचे अध्यक्ष डॉ.आंबेडकर होते. दोन वर्षातील १६६ दिवस म्हणजे ११ महिने १८ दिवस या समितीने प्रत्यक्ष काम केले. (आजच्या संसदेने हे लक्षात घेण्यासारखे आहे.) घटनेचा अंतिम मसुदा ३४५ कलमे आणि ८ परिशिष्टे यांचा आहे.

२६ जानेवारी १९३० हा दिवस ज्या प्रकारे साजरा व्हावा असे संकल्पित करण्यात आले होते त्याचेच प्रतिबिंब राज्यघटनेत स्पष्ट उमटले आहे. १५ ऑगस्ट १९४७ नंतरच्या सुमारे दोन वर्षांत आपली राज्यघटना तयार झाली. त्यावर पुष्कळसा इंग्लंडच्या राज्यघटनेचा प्रभाव आहे हे मान्य केले तरीसुद्धा त्यावर प्राचीन भारतीय परंपरा आणि विचारदर्शन यांचाही तितकाच तात्विक प्रभाव आहे हे लक्षात घेणे जरूर आहे.

घटना तयार झाल्यानंतर ती संसदेपुढे  २६ नोव्हेंबर १९५० रोजी ठेवण्यात आली. तिला मान्यता देण्यात आली आणि स्वतंत्र सार्वभौम राज्य म्हणून भारताची प्रस्थापना झाली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेहरूंचे अस्थायी सरकार अस्तित्वात होते, ते ८९४ दिवसांनी जाऊन तिथे भारतीय अधिनायकाची प्रतिष्ठापना झाली. त्यासाठी १९५० सालचा २६ जानेवारी हाच दिवस निवडण्यात आला. कारण त्याला १९३० सालची `ती ' पार्श्वभूमी होती. त्या दिवशी डॉ.राजेंद्रप्रसाद यांची भारताचे पहिले राष्ट्न्पती म्हणून नियुक्ती झाली आणि ब्रिटिश राजाची सत्ता अधिकृतपणे संपली.

हा सर्व संदर्भ लक्षात घेऊन `हे प्रजासत्ताक चिरायु होवो' अशी प्रार्थना केली जाते. `प्रजासत्ताक दिन' चिरायु होत नसतो कारण सूर्यास्तानंतर दिन मावळेलच, पण पुन्हा उगवणाऱ्या सूर्याला हे बलशाली प्रजासत्ताक सामोरे जाईल, म्हणूनच ते चिरायु असेल.


राष्ट्न्ध्वजाचा इतिहास
- शरद प्रजापति
ध्वजाचं महत्त्व पुराणकालीन आहे. ऋग्वेदात `केतु' नावाचा एक शब्द आहे.केतु म्हणजे `केतन', त्याचा अर्थ ध्वज असा होतो. महाभारताच्या द्रोण पर्वात ध्वजांचा अनेक ठिकाणी उल्लेख आढळतो. अर्जुनाच्या रथावर `कपिध्वज' विराजमान होता. भीमाच्या रथाच्या ध्वजावर सिंहमुद्रा, अंकित केलेला, कर्णाच्या ध्वजावर हत्तीचं, जयद्रथाच्या ध्वजेवर गेंड्याचं, घटत्कोचाच्या ध्वजावर चक्राचं, युधिष्ठिराच्या ध्वजावर चंद्राचं चित्र अंकित केल्याचा उल्लेख आहे.
पुढे चालुक्य राजवंशाचा ध्वज दंतशूल असणाऱ्या वराहाचं चित्र, आणि विष्णूभक्त असलेल्या गुप्तवंशाचा ध्वज देवाचं वाहन असणाऱ्या गरुडाचं चित्र अंकित केलेला होता. महाराजा शिवाजी आणि महाराणा प्रताप हिंदू धर्मरक्षक महायोद्धा होते. त्यांचा ध्वज निमुळता त्रिकोणी आणि भगव्या रंगाचा होता. भारतातील नव्हे तर भारताबाहेरच्या हिंदू मंदिरांवर भगव्या रंगाचा ध्वज लहरत असतो.
आपल्या देशाचा जो राष्ट्न्ध्वज आपण पाहतो त्यामागे मोठा इतिहास आहे. मार्गारेट एलिझाबेथ नोबल नावाची एक महिला १८९८ साली आपला देश आर्यलँड सोडून भारतात आली. येथे आल्यावर तिनं सिस्टर निवेदिता हे नाव धारण केलं. पहिला राष्ट्न्ध्वज सादर करण्याचा मान तिच्याकडे जातो. एकदा ती रविंद्रनाथ टागोर आणि जगदीशचंद्र बोस यांच्याबरोबर बोधिगयाला गेली असता, तिथं तिनं `वज्र' हे आयुध पाहिलं. वज्र हे इंद्राचं आयुध असल्याची माहिती तिला टागोरांनी दिली. भारतासारख्या शक्तिशाली देशासाठी `वज्रांकित' ध्वज का नसावा असा तिला प्रश्न पडला. तिनं ध्वज बनविण्याचं काम सुरू केलं. तिनं तयार केलेला ध्वज समचौरस आणि रक्तवर्णीय होता. राष्ट्न्ध्वजावर वज्राचं चित्र होतं. याशिवाय तिनं बंगाली लिपीत `वन्दे मातरम्' अशी अक्षरंही अंकित केली. ध्वजाच्या चारही किनाऱ्यांवर १०८ पणत्या दाखवल्या. हिंदू प्रजेत १०८ आकड्याचं फार महत्त्व असल्याचं तिला कळून चुकलं होतं.
१९०६ साली काँग्रेसच्या अधिवेशनात हा ध्वज ठेवण्यात आला. सिस्टर निवेदिता इतकंच करून थांबली नाही तर तिनं मॉडर्न रिव्ह्यू नावाच्या इंग्रजी मासिकात `द वज्रा अॅज नॅशनल फ्लॅग' नावाचा एक लेख प्रसिद्ध करून इंग्रजी लोकांचं लक्ष वेधलं.
१९०५ साली सचिन्द्रनाथ बसु व सुकुमार मित्र नावाच्या दोन क्रांतिकारी मित्रांनी एक राष्ट्न्ध्वज तयार केला. लंबचौरस आकाराच्या या राष्ट्न्ध्वजावर वरचा भाग हिरवा, मधला पिवळा आणि खालचा भाग लाल होता. वरच्या हिरव्या पट्ट्यावर अखंड बंगालसहित आठ प्रांतांची प्रतीकं म्हणून आठ कमलाकृती दर्शविल्या होत्या. पण त्या स्पष्ट नव्हत्या. पिवळया पट्ट्यावर `वंदे मातरम्' ही अक्षरं देवनागरी लिपीत होती. खालच्या लाल पट्ट्यावर सूर्याचं प्रतीक आणि चांदतारा होतं.
७ ऑगस्ट १९०५ रोजी बंगालच्या तेव्हाच्या लॉर्ड कर्झन नावाच्या गर्व्हनरानं बंगालचे दोन भाग पाडले, ही योजना इतिहासात `बंग-भंग' नावानं प्रसिद्ध झाली. हिंदू-मुसलमानात तेढ निर्माण करण्याचा कर्झनचा हेतू होता. त्याला विरोध दर्शविण्यासाठी काँग्रेसनं हा दिवस `बहिष्कार दिन' म्हणून जाहीर केला. कलकत्त्याला एक अधिवेशनही भरवलं, जे इतिहासात अमर झालं, याचं कारण याच अधिवेशनात काँग्रेसचे प्रमुख दादाभाई नौरोजींनी वरील राष्ट्न्ध्वजाला मानवंदना दिली, जी `कलकत्ता फ्लॅग' नावानं प्रसिद्ध झाली.
जवळजवळ या डिझाईनसारखाच एक राष्ट्न्ध्वज मॅडम भिकाईजी रस्तुमजी कामा यांनी २२/८/१९०७ रोजी जर्मनीच्या स्टुटगार्ड शहरात भरलेल्या `इंटरनॅशनल काँग्रेस' मध्ये भारतातर्फे ठेवला होता. मॅडम कामा यांनी लंबचौरस आकाराच्या या ध्वजावरच्या वरील हिरव्या पट्ट्यावर आठ कमलपुष्पे स्पष्टपणे दाखवली होती. मधल्या पिवळया पट्ट्यावर `वन्देमातरं' अशी चुकीची देवनागरी अक्षरं दाखवली होती. याखेरीज खालील पिवळया पट्ट्यावर हिंदूंचं सूर्याचं प्रतीक आणि मुसलमानाचं फक्त चांदचं प्रतीक दाखवलं होतं. यात तारा नव्हता.
या अधिवेशनात रशियाचा साम्यवादी नेता लेनिनही आला होता. त्यानं मॅडम कामाच्या राष्ट्न्ध्वजाला सलामी दिली होती. तिकडे ब्रिटिश सरकार हादरलं. भारत साम्यवादाकडे वळेल अशी या सरकारला भीती वाटू लागली. सरकारनं हा भारतीय राष्ट्न्ध्वज जप्त करण्याचं फर्मान काढलं. अनेक भारतीय नेत्यांनी हा राष्ट्न्ध्वज लपवून ठेवला, ज्यात गुजरातच्या इंदुलाल याज्ञिकांचाही समावेश होता.
ब्रिटिशांना सहकार देऊन स्वराज्य मिळविण्याचा प्रयत्न करण्यासाठी १९१६ साली `होम रुल' नावाची एक चळवळ लोकमान्य टिळक, अॅनी बेझंट, महम्मद अली झिना इ. नेत्यांनी सुरू केली. ब्रिटिशांना सहकार म्हणून राष्ट्न्ध्वजातही मोठा फरक केला. राष्ट्न्ध्वजावर ५ पट्ट्या हिंदूच्या व ४ पट्ट्या मुसलमानांच्या. त्याशिवाय हिंदूंचे सप्तर्षि तारे आणि मुसलमानांचे चांदतारा प्रतीकरूपे ठेवले. मुख्य गोष्ट अशी की ब्रिटिश सरकारला सहकार देण्यासाठी त्यांचा युनियन जॅकही ध्वजाच्या एका कोपऱ्यात ठेवला. पण भारतीय जनतेनं अशा विचित्र ध्वजाला विरोध केला. परिणामी हा ध्वज रद्दबातल झाला.
काँग्रेसचा एक सेनानी व्यंकैया उत्तम चित्रकार होता. त्याची जन्मभूमी आंध्रमधील मछलीपट्टणम. त्यानं गांधीजींना आवडेल असा राष्ट्न्ध्वज देण्याचं ठरवलं. त्यानं २४ प्रकारच्या राष्ट्न्ध्वजांचा एक अल्बम गांधीजींना अर्पण केला. पण गांधीजींचं समाधान झालं नव्हतं.
त्यानंतर व्यंकैयानं तीन तासात डिझाईन तयार करून एक नवा राष्ट्न्ध्वज गांधीजींना दाखवला. यात हिंदू लोकांच्या लाल रंगाचा एक पट्टा वर, मधला पट्टा श्वेतरंगाचा आणि खाली मुस्लिमांचा हिरवा रंग आणि श्वेत पट्ट्यावर चरख्याचं प्रतीक होतं. परंतु गांधीजींनी हाही राष्ट्न्ध्वज नाकारला. त्यांच्या मते मुस्लिमांचा हिरवा पट्टा वरच्या बाजूस आणि हिंदूचा लाल पट्टा खाली ठेवणं उचित राहावं.
परंतु असा राष्ट्न्ध्वज पाहताच काँग्रेसमधील हिंदू कार्यकर्ते नाराज झाले. त्यांना हिंदूंचा लाल पट्टा वर ठेवायचा होता. हे कार्यकर्ते महात्मा गांधींना म्हणाले, `हा अन्याय आहे. हिंदूंची संख्या जास्त असूनही असा अन्याय का?' गांधीजींना हा राष्ट्न्ध्वज जरी आवडला होता तरी काँग्रेस कमिटीनं तो अमान्य केला. कमिटी मेंबर्सचं म्हणणं असं होतं की, राष्ट्न्ध्वजावरील चरखा बाद केला तर तो बल्गेरिया, इटली, मेक्सिको आणि पर्शियाच्या राष्ट्न्ध्वजाशी मिळताजुळता राहील. तो भारताचा राष्ट्न्ध्वज ठरणार नाही.'
भारतातील सर्वधर्मीय आणि जातींचं अनुमोदन मिळेल असा राष्ट्न्ध्वज पसंत करण्यासाठी काँग्रेसनं २/४/१९३१ रोजी `राष्ट्न्ध्वज कमिटी' नेमली. या कमिटीत पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, अब्दुल कलाम आझाद, काका कालेलकर यांचा समावेश होता.
मदन मोहन मालवीय यांनी पूर्ण ध्वज लाल रंगाचा ठेवावा असं मत मांडलं. त्यांचं हे मत स्वीकारून लाल रंगाच्या या ध्वजावर एका कोपऱ्यात ब्रिटिशांचं युनियन जॅकचं प्रतीक ठेवण्यात आलं. पण काँग्रेसच्या बहुसंख्य कार्यकर्त्यांनी ब्रिटिशांची गुलामगिरी दर्शविणारा असा ध्वज सपशेल नाकारला.
शेवटी आजच्या राष्ट्न्ध्वजाचा पूर्वज, असा लंबचौरस ध्वज पसंत करण्यात आला. यात हिंदूंच्या लाल रंगाऐवजी भगवा रंग वर, मध्ये पांढरा रंग आणि त्यावर चरख्याचं प्रतीक आणि खालचा पट्टा हिरव्या रंगाचा असा राष्ट्न्ध्वज सर्वमान्य ठरला. काँग्रस पक्षानं अशा राष्ट्न्ध्वजाला एकमतानं संमती दिली. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात या ध्वजाचा उपयोग करण्यात आला. जनतेलाही हा राष्ट्न्ध्वज खूप आवडला.
पण गांधीजी नाराज होते. ते म्हणाले, ``भारत जर ब्रिटिश राष्ट्न्समूहात राहणार असेल तर या ध्वजावर युनियन जॅकचाही समावेश करायला हवा.' सी. राजगोपालाचारी, बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या प्रमुख नेत्यांनी गांधीजींच्या या सल्ल्याची अवगणना केली. त्यानंतर राष्ट्न्ध्वज समितीनं राष्ट्न्ध्वजावरील चरख्याच्या ठिकाणी सम्राट अशोकाच्या धर्मचक्राची स्थापना केली. १५ ऑगस्ट १९४७ रोजी सकाळी १०.३० वाजता दिल्लीतील व्हाईसराय हाऊस (आताचं राष्ट्न्पती भवन)वर हा राष्ट्नीय ध्वज फडकविण्यात आला. तेव्हापासून आजतागायत या ध्वजामध्ये काहीही फरक करण्यात आला नाही. आता तो कोणीही बदलू शकणार नाही.
(`मराठी माणसं')

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन