Skip to main content

30Sept.2013

वृद्ध नको, ज्येष्ठ व्हावे!
१ ऑक्टोबर हा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन असतो. मनुष्यमात्राच्या प्रत्येक अवस्थेत त्याला सन्मान व मानसिक स्थैर्य मिळावे, अशी मानवतेची कल्याणस्थिती निर्माण व्हावी आणि ती चिरंतन टिकावी यात दुमत होण्याचे कारण नाही. गर्भस्थितीपासून मृत्यूपर्यंत सर्व टप्प्यांवरील मनुष्यांची काळजी वाहिलीच पाहिजे; त्यामुळे बालक दिन - युवक दिन - ज्येष्ठ दिन - पाळून त्या त्या विषयांकडे लक्ष वेधावे आणि क्षमता व त्रुटींचा आढावा घेता यावा, इतपत उद्दिष्ट ठीकच आहे. त्याशिवाय महिला दिन, अपंग दिन, अंध दिन असतात. त्याचप्रमाणे ग्राहकदिन, शिक्षकदिन, अभियंतादिन यांचीही भर असते. या सर्वांव्यतिरिक्त मानवी हक्क दिन  पुन्हा वेगळाच असतो. वास्तविक केवळ मानवतादिन म्हटला तरी त्यात यच्चयावत् चराचर सृष्टीचे संवर्धन आणि कल्याण, समाविष्ट होऊन जायला हरकत नाही. म्हणजे इतर दिन पाळायला नकोत. परंतु या सगळया वेगवेगळया गटातील सजीवांचा शारीर आणि भावनिक दृष्ट्या विचार एकेका दिवशी करून, त्याच्या कल्याणाचे काही नियोजन करायला हरकत नाही. प्रत्यक्षात तसे काही घडत नाही; केवळ त्या विशिष्ट गटाचा एक वार्षिक उत्सव घडतो. त्यात  मिरवणुका, सत्कार, पुरस्कार,  आणि पोकळ शुभेच्छा याव्यतिरिक्त काही घडत नाही. नेहरूंच्या काळापासून बालकदिन अवतरला पण आजही बालमजूरी  आणि कुपोषण कमी नाही; तसेच मार्क्सच्या काळापासून कामगारदिन आला म्हणून खाण किंवा शेतमजुरांचे प्रश्न सुटत नाहीत. त्या अर्थाने ज्येष्ठ नागरिकांना हा `वृद्ध दिन' असल्याचे जाणवत असेल.

मनुष्यजन्मात जरा-मरण यांतून कुणी सुटत तर नाही. उमेदीचा कार्यकाल संपल्यानंतर ऐहिक जगातील व्यवहारांतून बाजूला होणारी समाधानी मन:स्थिती तयार करण्यासाठी वानप्रस्थाची योजना आहे. तथापि हे  वयोमान कालानुसार बदलत गेल्याचे दिसते. प्राचीन महाभारतीय युद्धात भीम-अर्जुन-दुर्योधन-कृष्ण या सर्व प्रमुख योध्द्यांची वये साधारण एेंशीच्या घरांत होती असे अनुमान काढले जाते. त्यानंतरही पंधरा-वीस वर्षे राज्य केल्यानंतर त्यांच्या घरातील धृतराष्ट्न्-कुंती-गांधारी ही वडीलमाणसे वनांत गेली. त्याउलट अर्वाचीन काळातील ज्ञानेश्वर - शिवाजी - शंकराचार्य - बाजीराव - बालकवी - माधवराव - आगरकर - विवेकानंद - झाशीवाली - अशी कित्येक नररत्ने विशी ते पन्नाशीत गेली. म्हणजे आजच्या अर्थाने ती `ज्येष्ठ' नव्हती! पण त्यांचे कार्य ज्येष्ठ होते. आजच्या परिभाषेत ते `ज्येष्ठ नागरिक' नव्हेत!!

आपण श्रेष्ठत्त्वाचे निकष फार स्वस्त केले आहेत असे त्यावरून दिसते. ते केवळ तोंडदेखले निर्माण करू पाहण्याने स्थिती बदलत नाही. आजच्या तिसरीच्या घटक चाचणी परीक्षेत एेंशी टक्के गुण मिळाले तर त्या पोराला `हुशार' समजण्यात जो गैरसमज असतो, तोच खरा धरून त्याचा उत्सव साजरा करण्याने मूळ प्रश्न सुटत नसतो. सदूला सदाशिवरावभाऊसाहेब म्हटले तर त्याला तेवढ्यापुरते बरे वाटेल इतकेच! टग्या पोरांच्या टोळक्याला हल्ली युवा आघाडी म्हणतात तशातला तो प्रकार! हे वास्तव समजून घेण्याचे भान वयोपरत्वे अनुभव पचवलेल्या वयोगटास यायला हवे. वृद्धांना `ज्येष्ठत्त्व' येण्यासाठी त्यांनी समाजातील स्वत:चे स्थान उंचावत न्यायला हवे. त्यासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या संघटनांनी स्वत:चे स्वत: प्रयत्न केले पाहिजेत. सरकारकडे मागण्या करत राहण्यापुरती मर्यादा असू नये.

आर्थिक खुलीकरणाच्या रेट्यामुळे भारतीय एकत्र कुटुंबव्यवस्था विस्कळीत होत आहे. नव्या राहणीमानामुळे शेती आणि ग्रामीण जनजीवनासही शहरीकरणाची लागण झाली आहे. त्याचे परिणाम आरोग्य व मनस्वास्थ्य यांवर स्पष्ट दिसू लागले आहेत. वृद्धांना एकाकीपणा येत आहे. त्याउलट सरासरी आयुर्मर्यादा वाढल्यामुळे साठीच्या पुढचे लोक आर्थिक व प्रकृतीच्या दृष्टीने धडधाकट झाले आहेत. यामुळे त्या शक्तीचा, आणि वेळेचा उपयोग समाजासाठी करून देण्याची जबाबदारी या नववृद्धांची आहे. परिस्थितीमुळे खचलेपण येणे हे कदापि योग्य नाही. ते न यावे यासाठी, कुठलीतरी सरकारी योजना किंवा एसटीची सवलत या गोष्टी पुरेशा नाहीत; तर त्यासाठी दीर्घोद्योग, स्थितीचे आकलन आणि नव्याचे स्वागत करण्याची उमेद बाळगणे हे महत्त्वाचे आहे. `ज्येष्ठत्त्व' तिथे दिसले पाहिजे; ते अंत:करणातून प्रकटले पाहिजे, चेहऱ्याच्या सुरकुत्यांतून नव्हे! `वयोवृद्ध: मनोयुवा' या बोधशब्दांना खरा अर्थ दिला पाहिजे.

दोन पिढ्यांतील अंतर हे कायमच असते. साठी-बासष्टी ओलांडली की ते अंतर जास्त भासू लागते आणि, `आमच्यावेळी असं नव्हतं....' या प्रकारचे स्वप्नरंजन सुरू होते. उगवणारा प्रत्येक दिवस म्हणजे `आमचीच वेळ' मानली तर ते अंतर कमी होऊ शकेल. कारण ते अंतर केवळ वयातील नसते तर ते अंत:करणातील असते. लग्न होऊन सासरी जाणारी मुलगी `आपल्या घरी' जाते, की `परक्या घरी' जाते; यातल्या भावनेवरती तिची सासरची भूमिका ठरते. त्याचप्रमाणे `हा आमचा काळ' म्हणावे; की `आमचा काळ संपला' म्हणावे यावरती वयाची वाढ ठरते. कारण वय बदलले तरी कर्तृत्त्व संपत नाही, त्याचे स्वरूप बदलते, भूमिका बदलते. नेणतेपण, कर्तेपण असताना जे करायचे ते मागे पडले, तरी या वयात अडाणी नाकर्तेपण न येता जाणते ज्येष्ठपण आले पाहिजे. त्या वयातही वेगळी जबाबदारी असतेच, निवृत्ती नाही!!

वाढत्या वयाला शोभेल अशी जबाबदारी पेलली तर समाजाला ते प्रेरक ठरेल. निव्वळ लग्न केले म्हणून प्रत्येकजण चांगला पती किंवा चांगली पत्नी होत नाही. यथाकाल ते बाप-आई होतात पण माता-पिता किंवा `पालक' होणे कठीण असते. त्याचप्रमाणे आपला वयोगट समाजाला ज्येष्ठशक्ती वाटेल की म्हातारपणाचा भार वाटेल हे वृद्धवयाच्या प्रवृत्तीवर अवलंबून आहे. भारतात येत्या काळातील लोकसंख्येत तरुणांचे प्रमाण जगाच्या तुलनेत जास्त असणार आहे. बाकी जगाला `म्हाताऱ्यांची सोय' करावी लागेल. भारतात तरुणांना `हाताळावे' लागेल. हे तरुणपण योग्य दिशेनेच चालेल याची पायवाट मळून तयार ठेवण्याचे प्रयत्न आजच्या वृद्धांनी केले, तरच ते ज्येष्ठ ठरतील. त्या वाटांना फाटे शोधण्यास तरुणांना वाव मिळेल. त्यासाठी निवृत्त होऊन चालणार नाही, झटून कामाला लागले पाहिजे!
***

बायपासला बायपास
बायपास सर्जरी फार महाग असते. हा रोग अगर विकार नवीन आहे काय? बायपासखेरीज दुसरा उपचार आहे का? डॉ.एल्मर एम.क्रॅटर यांचे `बायपास सर्जरी कशी टाळावी?'(इूरिीीळपस इूरिीी र्डीीसशीू)  हे पुस्तक वाचण्यात आले आणि बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला.
ईश्वराने आपले शरीरयंत्र बनवले आहे ते स्वतंत्र आणि सक्षम आहे. शेतात उगवते ते खाऊन आणि निसर्गनियमांनुसार आचरण करून निरामय आणि सुखी जीवन व्यतीत करण्यास अडचण दिसत नाही.
इथंच स्वार्थी माणसाने डोके चालवले. एकाने, सर्वांचे पीठच दळून जेवढे जास्त पीठ तितके जास्त पैसे या जाणिवेने, दगडाच्या जात्याऐवजी लोखंडी रिळांची आधुनिक गिरणी काढली. ते चाळून, स्वच्छ करून लोकांना पांढरे शुभ्र पीठ दिले. दोन पैसे जास्त देऊन लोकांनी त्या पिठाच्या रोट्या, पाव, केक खाणे पसंत केले. कवचातील अन्नसत्वे खाण्यात न आल्यामुळे शरीरात विकार उत्पन्न झाले. गिरणीवाल्याने काही जीवनसत्त्वे पिठात घातली आणि आणखी जास्त पैसे घेऊन दिली. लोकांना मधुमेहासारखे विकार होऊ लागले. हा रोग जीवनपद्धतीमुळे होतो असे सांगून औषध योजना करून पैसे कमावले. पौष्टिके कमी पडली तर पेशी नष्ट होत राहिल्या तर अशक्तपणा वाटू लागतो. त्यातून आणखी आक्रमक पेशी निर्माण होतात आणि शरीरभर उच्छाद मांडला जातो. त्याचाच परिणाम म्हणून सांधेदुखी, लकवा अथवा पक्षघात, विस्मरण, कर्करोग होतात. त्यांना सामान्यपणे म्हातारपणामुळे होणारे विकारच समजतात. रक्तवाहिनीच्या आतील स्तरावर क्रॅल्शियम धातू आणि इतर मिनरल यांचे किटण जमू लागते. रक्तवाहिनीचा आकार कमी होतो आणि अवयवांना रक्तपुरवठा कमी होऊ लागतो.
हृदयापासून निघालेल्या रोहिणीला एक शाखा फुटते आणि काही शुद्ध रक्त हृदयाच्या स्नायूंना पुरवले जाते. ह्या रक्तवाहिन्या क्रॅल्शियम आदि मिनरलचे किटण जमा होऊन आतून खडबडीत होत असेल तर हृदयाचे कामही मंदगतीने होईल यालाच हृदयविकार म्हणतात. याला उपाय म्हणून बायपास शस्त्रक्रिया केली जाते. या शस्त्रक्रियेसाठी दीड लाख रुपये पडतात. याशिवाय अनेक प्रकारचे उपचार कमी-जास्त खर्चाचे किंवा त्रासाचे आहेत. या उपचारपद्धती तात्पुरत्याच आहेत. पक्का उपचार म्हणजे हृदयच संपूर्णपणे बदलणे. ही शस्त्रक्रिया सामान्यपणे विरळाच असते. इतरही अनेक उपाययोजना व औषधे परिणामकारक आहेत. पण या साऱ्या औषधयोजना रोग झाल्यानंतर करावयाच्या आहेत. जोपर्यंत आहारविहाराची पद्धती योग्य करीत नाही, तोपर्यंत हे उपचार करीत राहावे लागतात. त्यासाठी प्रथम योग्य आहार घेण्याकडे लक्ष दिले पाहिजे. मैद्याचे पदार्थ, टिकवलेले खाद्यपदार्थ, फळांचा रस नसणारी पेये, वारंवार खाण्यासाठी गरम करावे लागणारे पदार्थ इत्यादी जेवढे कमी तितके चांगले. स्थानिक फळे व पालेभाज्या फारच छान. यामुळे विकार होण्याची शक्यता फारच कमी होते.
आणखी एक उपचार - तो प्रतिबंधक स्वरूपाचा आहे. म्हणजे काही एक न करण्याचा आहे. न्यू जर्सी संस्थानातील जनवस्तीत असे दिसून आले की, सरासरीच्या मानाने येथील जनतेत हृदयविकाराचे प्रमाण नगण्य होते. असे आढळून आले की येथील लोक वडीलधाऱ्यांना मान देतात, ते म्हणतील तसे वागतात. खाणेपिणे व आचारही ते मोठ्यांच्या संमतीनेच करत असतात. त्यांचा संवाद, शाब्दिक देवाणघेवाण सतत असते. सारे एकोप्याने राहात असतात. यामुळे ते कधी मानसिक ताणतणावाखाली नसतात. नंतर मात्र तेथील जनतेच्या खाणेपिणे व आचारविचार यात फरक पडत गेला आणि १९६० नंतर या विकाराचे बाबतीतही ते पक्के `आधुनिक' बनले. आता तिथेही हृदय`विकार' खूप वाढला आहे.
भारतातील आहारविहारपद्धतीतच या रोगाविरुद्ध प्रतिबंधक व्यवस्था आहे. पण पाश्चात्यांच्या अनुकरणामुळे येथेही (नको असलेले) पाश्चात्य आचारविचार व आहार वाढत असल्यामुळे हृदयविकार व आनुषंगिक रोग वाढू लागलेले दिसतात. त्वरेने आपण आपल्या भारतीय जीवनपद्धतीकडे वळावे हे उत्तम. या जीवनपद्धतीकडे वळण्यास नव्या पिढीला काही समय लागणारच. निदान प्रौढांनी तरी मुद्दाम तसे उदाहरण घालून द्यावे.
- प्रा. मु. दि. आपटे, पुणे
(फोन : ०२०-२७२७०३३२)

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन