Skip to main content

23 Sept.2013 edition

ज्याचा त्याचा देव
गणपती त्याच्या गावाला गेले आणि सरळ सभ्य प्रांजळ माणसाला जरा चैन पडेल अशी स्थिती आली. प्रदूषण विषयक नियम, सुव्यवस्थेसाठी आवश्यक शिस्त आणि नवउन्मेषाला पूरक अशी कलात्मक बुद्धी या सर्वांचा ऱ्हास करणारा श्रींचा उत्सव यावर्षीच्या पावसाने पुष्कळ अंशी रोखला. पावसाने दुहेरी फायदा केला. एक म्हणजे, त्याआधीच्या दीड महिन्यांची ओढ नाहीशी करून पीकपाण्यास जीवदान दिले आणि दुसरे म्हणजे गणपतीच्या बेछूट भक्तांचा `आविष्कार'कमी केला.

भारतीय समाजात उत्सवप्रियता आहे हे तर त्याचे वैशिष्ट्यच आहे आणि त्यात काही चूक मानण्याचे कारण नाही. साधारणत: निसर्गप्रकृती व ऋतुमान पाहिले तर ते माणसाच्या उत्सवप्रेमाला अनुकूल आहे, ही भारतभूमीची देणगी आहे. त्यामुळे पंचमहाभूते आणि मानवी सहजवृत्ती यांचा सहजस्वीकार करून इथल्या चराचर सृष्टीला देवत्त्व देणारे धर्म, विधी, आचार, परंपरा यांची रेलचेल भारतात पूर्वकालापासून आहे. समाजाला उचित वळण देऊ पाहणाऱ्या बुद्धिमंत धूरिणांनी त्यांचा उपयोग करून घेतला, आणि नव्या प्रथा व कालानुरूप नवे विचार त्याच माध्यमांतून मांडले. कोणे एके काळी त्यामागील उद्देश त्याच काळाला अनुरूप असला तरी, बदलत्या आवश्यकतांनुसार उत्सवसणांचे स्वरूप बदलत ठेवायला हवे. तसे परिवर्तन करण्यासाठी समाजाला दिशा देणारे नेतृत्त्व नसल्यामुळे बदलांची ती प्रक्रियाच थांबली. आपोआपच नसत्या नेतृत्त्वाने, उत्तम हेतू व सर्वमंगल उत्सवांवर कब्जा केला आणि अल्प काळातच तिथे विद्रुप वहिवाट प्रस्थापित केली. दहीहंडी, गणपती, दुर्गा, दिवाळी... इतकेच नव्हे तर निवडणुका, रथयात्रा, इफ्तार पाटर््या, वारी, वह्या वाटप, वृक्षारोपण.... वाट्टेल त्या गोष्टीचा इव्हेंट करण्याला सध्या उधाण आले आहे. त्या सगळयांतून साधते काय; याचा विचार करण्याला कुणाला सवडच नसावी.

पर्यावरण आणि प्रदूषण यांसाठी रस्त्यावर येणारे तेच ते कार्यकर्र्ते गणपतीच्या वेळी वेगळया उन्मादात रस्त्यावर येतात. शुभ्र पोशाखात फेटेधारी बायकांचे एकत्र ढोलवादन हा प्रकार कोणत्या रागदारीचा अभिजात मंगलध्वनी असतो ते त्यांना माहीत! खेडोपाड्यातील ढमढमाटी संगीत रोखण्यास पोलीस-न्याय-कायदा हे सगळे पूर्णत: असमर्थ आहेत. पुण्यासारख्या शहराला जर पुरोगामी, आधुनिक, वैज्ञानिक, बुध्दीसंपदेचा टेंभा असेल, तर त्याच शहरात अजूनही राक्षसवध किंवा कालियामर्दनाचे देखावे सारे रस्ते अडवतात; हे बुद्धि आणि कर्मदारिद्र्य कोणते? शहरांचे आधुनिक उद्योगीकरण आणि विस्तार हा प्रामुख्याने दळणवळणाच्या सुविधा व शिस्त यांवर निर्भर आहे. त्या उद्योगशीलतेस; कामावर, शाळा-कॉलेजांस जाणाऱ्या नागरिकांना किती अडथळे होतात; हे कुणाच्या लक्षात येत नसेल असे नाही! पण त्या उत्सवी भक्तीच्या गोंगाटमय गोंधळाची वहिवाट इतकी प्रभावी बनली आहे की तिथे स्वस्थपणी योग्यायोग्यतेचा कोणी विचारही करू शकत नाही.

ज्या काळात, ज्या कारणासाठी, ज्या पद्धतीने गणपतीला घरातून - सार्वजनिक नव्हे, सामुदायिक जागेत आणले गेले ते कारण, ते उद्देश आणि तो काळही कालबाह्य झाल्यामुळे सार्वजनिक गणपती पुन्हा मूळ जागी नेण्याचा काही  प्रयोग करायला हवा. गणेशोत्सवासारख्या उत्सवातून जे काही फायदे म्हणून सांगितले जातात त्यात; कलागुणांना वाव, नेतृत्त्वास संधी, एकत्र येण्यासाठी निमित्त इत्यादींचे उल्लेख होतात. एकतर त्यांसाठी आता खूप स्थळे-प्रसंग आहेत; आणि इतपत हेतू साध्य करताना सार्वजनिक स्वास्थ्याला मोजावी लागणारी किंमत फार जास्त आहे. त्यामुळे वेगळया समाजहिताच्याच व्यवहार्यतेतून त्याचे मोल लक्षात घेतले पाहिजे.

अर्थात एक गोष्ट स्पष्ट आहे की, तशा उत्सवांत-रमण्यात-अनिष्टतेतही आनंद मानणारा मोठा वर्ग आहे, त्यास त्याच्या विश्वात रमत राहण्याचा हक्क आहे. रंगपंचमीला कुणा सखीच्या शुभ्र वस्त्रांवर गुलाबपाणी शिंपण्यात कुणाला मधुरानंद वाटेलही; पण रासायनिक काजळीत गलिच्छ गोंगाट करत रस्त्याने उंडारण्यातही काहींचा आनंद असतो. लावणी व ब्रेकडान्सचे `खास महिलांसाठी' होणारे हाऊसफुल्ल खेळ, हे तर सामान्यभान आणणारे आजचे समाजलक्षण आहे. त्यास बंदी किंवा नियंत्रण आणण्याची कल्पनाही चूकच आहे. ज्याला त्याला स्वत:च्याच विश्वात रमण्यात आनंद असतो. रात्रभर कुठेतरी वारुणीचे पेले रिचवून दुपारपर्यंत अंथरुणात लोळणारे असतात, त्याचप्रमाणे सूर्योदयास सूर्यनमस्कार घालून अभ्यासाला बसणारे प्रौढ असतात. आपण कोणत्या सत्संगात राहायचे ते आपापले ठरवायचे, इतकेच म्हणता येईल,खऱ्या बुद्धिदात्याचे दर्शन होण्यासाठी वेगळे स्थान शोधावे लागेल.

कोण्या देवापुढे रक्तमांसाचा चिखल करण्यातही त्या भक्ताला आनंदच असतो. सभ्य घरच्या प्रतिष्ठित विद्यासंपन्न मानल्या गेलेल्या घरांतील स्त्री-पुरुषांनी ताळ सोडल्याचे जसे पाहायला मिळते, तसेच त्यांचे देवही ढळले असतील तर काळाचाच तो महिमा म्हणायचा! `देव दानवां नरे निर्मिले' हे खरे आहे, त्यामुळे आजच्या मनुष्यसमाजातील `सार्वजनिक' बुद्धिदेवतेस डॉल्बी-ढोल प्रिय व्हावेत हे ओघानेच येते. उद्याच्या `नरकासुरा'ला `नरकेश्वर' हा पुरस्कार देण्याची वेळ फार दूर नसावी! ज्यांना दीपांची ओढ असेल त्यांनी अंधाराचे भय  मानायचे नाही.
***

यं त्रा ची (प्र) ग ती
- ग. दि. आपटे (मोबा.९९८७९९८५४९)
`यंत्र : शाप की वरदान' असा एक निबंध आमच्या शालीय काळात यायचा, तसा एक निबंध स्वा.सावरकरांनी लिहिलेला आमच्या पुस्तकात होता. त्यावर संवाद, चर्चा होत असे. तयारी करून त्या विषयाच्या बाजूने व विरुद्ध बाजूने बोलणाऱ्यांनी सर्वांसमोर आपली चर्चा मांडावी व आपल्या बुद्धीला धार द्यावी, असा तो अभ्यासाचा व बुद्धीचा खेळ असे. अखेर निर्णय असा घ्यायचा की, यंत्र काय वा शस्त्र काय, त्याला मन, बुद्धी अशा गोष्टी नसतात, ते निर्जिव, निर्बुद्ध साधन असते. वापरणाऱ्यांवर त्याची उपयुक्तता अवलंबून असते. त्याचा उपयोग चांगल्या बुद्धीचा माणूस विधायक करेल, तर वाईट बुद्धीचा विघातक करेल. तेव्हा माणसाची बुद्धी हीच महत्त्वाची आहे.
यासाठी सर्व वाद बाजूला ठेवून, माणसाची बुद्धी शुद्ध स्वच्छ कशी होईल, याचेच शिक्षण लहान वयात द्यायला हवे. परंतु त्याबाबत मात्र सगळी शिक्षणशास्त्रे पोटापाण्याच्या उद्योगात, पैसे कमवायला उपयोगी ठरलेल्या शिक्षणात रममाण झाली. बोलणे आणि कृती यामध्ये दोन ध्रुवासारखे अंतर पडायला सुरुवात झाली आणि शब्दांचे अर्थ उलटे व्हायला लागले. त्या वयात म्हणजे ब्रह्मचर्याश्रमात शिक्षण, शरीर, मन व बुद्धी यांचे बळ वाढवायचे, कमवायचे. मोठेपणी जगात राहायला, देशाला मोठे करायला हातभार लावायचा; नुसता उदरनिर्वाह करण्याकडे न पाहता सर्व ऋणे फेडून (ऋषी, देव, पितृ) समाजात आदर्श व्हायचे, यश, कीर्ती संपादन करायची हे कर्तव्य! आताचे शिक्षण या सर्व बाबतीत दुबळे व अशक्त बनताना दिसते. कष्टाबद्दल त्यांच्या मनात पूर्ण अप्रीती, दुरावा, शाळेतून निर्माण होत असतो. शहरी राहणी व त्यामुळे पालकांचा पहिला दृष्टिकोण `मुलाला कोणतेही कष्ट पडता कामा नयेत' हा दिसतो. तो कोणतेही कष्टाचे काम करू शकत नाही, इच्छित नाही. आता पहिलीतले विद्यार्थी शाळेत जाताना पाहिले की गलबलून येते. दप्तर डिझाईन-स्टाईल विकसित असल्याने, व मोठ्या इंजिनियरींगमधून संशोधनपूर्ण निघाल्याने, जड, चिलखत घालावे तसे दोन्ही हातातून पाठीवर खांद्यातून बसवावे. घोडदौडीकरिता सज्ज होणारा शिलेदारच जणू. मिलीटरीत ही हॅवरसॅक नावाची पिशवी असायची, मुक्कामाला उपयोगी सर्व गोष्टी मावतील अशी पोतीच! इतके केविलवाणे चित्र आता परिचयाचे झाले आहे. हस्तस्पर्शातून `अशुद्ध' न करता पॅक झालेली बाटली हवी, आणि आता टीव्हीवर सांगतात म्हणून दुसरी, डेटॉलयुक्त औषधी पाण्याची बाटली हात धुण्यासाठी!
आम्हाला आमच्या बुद्धिवंत पुढाऱ्यांनी सांगितले की, आमची कृषि-अर्थव्यवस्था आहे व ८० टक्के लोक शेतीवर उपजीविका करतात. त्यांनी आमच्या मनात प्रगत अमेरिकेशी तुलना करून, देशाचे मागासलेपण भरले व हे प्रमाण लज्जास्पद आहे असे ठरविले. ते आता ६०% वर आल्यामुळे आमची प्रगती चाललीय असे आम्ही म्हणतो! `शेती हे प्रगतीमधले सर्वात मोठे विघ्न आहे,' असे आमचे पुढारी म्हणाले तर आश्चर्य वाटणार नाही!
शंभर वर्षामागे आमच्या एका द्रष्ट्या माणसाने, गांधीजींनी या यंत्रयुगाच्या विरोधी आवाज उठविला होता. पण असे लोक प्रतिगामी म्हटले गेले. सर्वांना नव्या गोष्टी (प्रागतिक) आवडल्या, सोयीच्या वाटल्या, मानवोपयोगी, समाजोपयोगी वाटल्या. त्यावर देशाची प्रगतीची मोजमापे ठरली जाऊ लागली.
यंत्रयुगातून शरीराला, मनाला वाटलेल्या या भौतिक सुखसोयींनी जे भ्रमपटल आमच्या बुद्धीवर घातलेले आहे. त्यामुळे यातून माणूस जागा होत नाही. कितीही ओरडून, शुद्ध बुद्धीच्या शास्त्रज्ञांनी, शहाण्या माणसांनी सांगितले तरी कोणीही ते मनावर घेत नाही. कारण महत्त्वाचे म्हणजे आम्ही आमची वेसण या यांत्रिकतेकडे दिली आहे. आम्ही सो कॉल्ड सुखसोयींचे गुलाम झालो आहोत. आमचा शारीरिक व मानसिक ऱ्हास गेल्या ५० वर्षांत इतका झाला आहे की, आम्हाला या गुलामीची सवय नव्हे चटक लागली आहे. किंबहुना तेच स्वातंत्र्य आहे, हे आम्हाला `समजावून' देत आले आहेत. `मला संडास कमोडचाच लागतो. मला खाली बसलेले चालत नाही, खुर्चीच हवी.' हे आम्ही मोठ्या आढ्यतेने सांगू लागलो आहोत. कारण ही आमची प्रगती आहे. आम्ही किती पुढारलेलो आहोत, याचे हे गमक झाले आहे.
महिलांची `रांधा, वाढा, उष्टी काढा' व  `चूल व मूल' या गुलामगिरीतून मुक्तता करणे हे तर पहिले कर्तव्य होते. त्यांचे स्वत्व जागृत केले, यातून ती स्वातंत्र्य उपभोगते आहे, अशी तिची कल्पना आहे. शिवाय तिला  अजून खूप पुढे जायचे आहे, प्रगती करायची आहे. अशी तिची भावना आहे. महर्षी कर्वे यांच्या संस्थेने फॅशन डिझायनिंग या नावाखाली मोठा अभ्यासक्रम चालू करावा व त्यांच्या अभ्यासक्रमातील `मॉडेलचा' मुलींनी पोझ दिलेला फोटो पेपरात यावा हे कशाचे लक्षण आहे? महर्षींनी या प्रगतीची निश्चितच कल्पना केली नव्हती.
ही आपली प्रगती आहे? उठल्यापासून झोपेपर्यंत यंत्रे आमची चाकरी करताहेत. मी उठल्यानंतर नळ हे यंत्र खोलले की मला ते अविरत पाणी देते. त्यातील ९०% पाणी मी वाया घालवतो. त्यामुळे कधीकधी मला अपराधीपणाही वाटून जातो. पण मी काय करणार? आता तंत्रज्ञांनी अॅटोमॅटिक तंत्रात प्रगती साधून मी खाली हात धरल्यावाचून नळ चालू होणार नाही. अथवा टायमर बसवून दिलेले नळ तयार करतील, तेव्हा मी त्याचा उपयोग करीन व पाणी वाचवीन. मग त्यासाठी नळ दसपट महाग झाला तरी मला त्याच्यासाठी पैसे मिळवायला नकोत का? एवढी चांगली सुधारणा. तिची मोठी किंमत असणारच. पुढे ही सर्व तंत्रज्ञाने एवढी धारदार होत चालली आहेत की, एखादी क्षुल्लक गोष्ट वा चूक ती गोष्ट बंद पाडते आणि मला ते रिपेअर करता येत नाही. अधिकृत तांत्रिकच आणावा लागतो व तो सर्वसाधारणत: `हे फेकून नवे बसवा' असे सांगणार अथवा बिघडलेला पार्ट काढून महाग पार्ट त्याजागी बसवणार, परंतु ती फॅशन झालीय. त्यामुळे कदाचित जुन्या मॉडेलचे पार्ट मिळणार नाहीत, म्हणून नवा नळ बसवणे एवढेच आपल्या हातात असते.
तोंड धुताना आता दाताच्या, त्याच्या आकाराप्रमाणे फिरणारा फ्लेक्झीबल ब्रश मला यंत्रयुगाने दिला आहे. जेटयुगातील लहान मुलांसाठी तर आता यांत्रिक ब्रश घ्यायला हवा. त्याचे गुण मला रोज जाहिरातीतून, टीव्हीवर, डॉक्टर, त्याचे विशेष ज्ञान घेतलेले छातीठोकपणे सांगत असतात. मी त्याच्यावरचा खर्च वाचवायचा म्हणजे स्वत:चे व माझ्या आवडत्या कुटुंबाचे नुकसान! मी कोणत्या नरकात जाणार! आता ती टूथपेस्टही इतक्या वर्षाच्या संशोधनातून, इतक्या नवनव्या मशीनमधून शुद्धपणाच्या, गुणांच्या परीक्षा देऊन खास माझ्या दातांच्या, जबड्याच्या प्रकारासाठी काढलेली असते. ती पण या यंत्रयुगाची, नवविकसित शास्त्रज्ञांची देणगी नव्हे काय? जाहिरातवाले डॉक्टर आणि आता शाळेतल्या विदुषीसुद्धा टीव्हीवर किती प्रेमळपणे हसून सांगत असतात!
माझा चहा काय अथवा खाद्यपदार्थ काय, मोठ्या आधुनिक यांत्रिक कारखान्यातून माझ्या आरोग्याची पूर्ण काळजी घेण्यासाठी सुसज्ज होऊन तयार केलेेले आहेत. ते मला समाधान व आरोग्य दोन्हीही देतात. शिवाय मी स्वयंपाकघरातील सर्व यंत्रे वापरून माझ्या पोटासाठी ते काम आणखी सुकर करतात. पचनसंस्थेला मदत करतात. मग कोणी काही म्हणो! प्रचंड पोलादी जात्यातून दळलेला आटा, नव्हे-नव्हे मैदा त्यातले सर्व पौष्टिक घटक गेलेले असतात व तो पचायला फारच जड असतो! तरीही आम्हाला हा मोह सोडावासा वाटत नाही. स्वयंपाकघरातील देशी यंत्रे -खलबत्ता, पाटा-वरंवटा, घुसळखांब किंवा रवी आम्ही टाकून दिली, नष्ट केली. विजेवर चालणारी यांत्रिक साधने आली. महिलांचे कष्ट कमी झाले, सुविधा पुरवल्या. परंतु या सर्व साधनांतून (जात्यावर, उखळातून) जो ध्वनी उत्पन्न होत असे, त्यात आईच्या तोंडच्या ओव्याही असतील, ती जी हार्मनी होती ती जीवनात एक संगीत निर्माण करीत असे. माझ्या दिनचर्येला मदत होई आणि आता या कर्कश आवाजाच्या कटकट करणाऱ्या यंत्राने मनाचा क्षोभ होतो, शांती हरवते, पण अपरिहार्यता म्हणून मी स्वीकारतो.
मॉडर्न लाईफस्टाईलमधील ही दुखणी सोसायलाच हवीत. असेच जगायचे व या संशोधनाचे कौतुक करीत काळ घालवायचा असे ठरवले. आता एसी, पंखे ही यंत्रे मला वातावरण अनुकूल राखून सुख देऊ लागतात. मग दुपारी मी विश्रांती घेऊ शकतो. कामावार असेन तर तेथे मला काम करायला अनुकूल वातावरण मिळते. पुढे शरीराला त्याची सवय होते. त्याशिवाय माझ्या जीवाची उलाघाल होते, चैन पडत नाही. हेल्थी वाटत नाही. मग गाड्याबंद, घरे हवाबंद अशी परिस्थिती मला अनुकूल वाटते व नैसर्गिक हवामानाचा, तापमान, वारा यांचा त्रास होतो. जितकी अनैसर्गिक वागणूक असेल तिचे मला कौतुक वाटू लागते. तीच प्रगती वाटते. माझी सहनशक्ती वाढते आहे असे वाटते.
***

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन