Skip to main content

2 Octo 2017

माझे बालपण
२ ऑक्टोबरला साऱ्या जगभर गांधीजयंतीच्या निमित्ताने 
त्यांचे स्मरण केले जाते. त्यांच्या बालपणीचे काही प्रसंग 
त्यांच्याच आत्मवृत्तामधून-
गांधी-कुटुंब प्रथम तरी किराणा मालाचा व्यापार करणारे असावे असे समजते, परंतु माझ्या आजोबांपासून गेल्या तीन पिढ्या ते राज्यकारभार करीत आले आहे. उत्तमचंद गांधी उर्फ ओता गांधी दृढनिश्चयी असावेत. राज्यप्रकरणी लटपटीमुळे त्यांना पोरबंदर सोडावे लागले व त्यांनी जुनागढच्या राजाचा आश्रय घेतला.
वडील कुटुंबप्रेमी, सत्यप्रिय, धीट, उदार पण रागीट असे होते. काही अंशी विषयासक्तही असावेत. त्यांचा शेवटचा विवाह चाळीसाव्या वर्षानंतर झाला होता. ते लाचेपासून दूर पळत, त्यामुळे शुद्ध न्याय देत अशी आमच्या कुटुंबात व बाहेरही बोलवा होती. संस्थान सरकारशी ते अत्यंत राजनिष्ठ असत. वडिलांनी द्रव्यसंचय करण्याचा लोभ कधीच धरला नव्हता; त्यामुळे आम्हा भावांसाठी ते थोडकीच मिळकत ठेवून गेले. वडिलांचे शिक्षण केवळ अनुभवजन्य होते. ज्याला आपण आज गुजराथी पाचव्या इयत्तेचे शिक्षण म्हणूू, तेवढे त्यांचे शिक्षण झाले असेल. इतिहास-भूगोलाचे ज्ञान तर विचारायलाच नको. असे असूनही व्यवहारज्ञान इतक्या उच्च दर्जाचे होते, की सूक्ष्म प्रश्नाचा उलगडा करण्यात किंवा हजार माणसांपासून काम करून घेण्यास त्यांना अडचण पडत नसे.
आई व्यवहारकुशल होती. दरबारच्या सर्व गोष्टी तिला समजत. राजस्त्रियांमध्ये तिच्या बुद्धीबद्दल बहुमान असे. मी लहान म्हणून कधी कधी आई मला राजवाड्यात आपल्याबरोबर घेऊन जाई. या आईबापांच्या घरी मी संवत् १९२५ च्या भाद्रपद वद्य द्वादशीच्या दिवशी म्हणजे सन १८६९च्या ऑक्टोबर २ तारखेला पोरबंदर अथवा सुदामापुरी येथे जन्म पावलो.

बालपण पोरबंदरातच गेले. कोठल्याशा शाळेत मला घातले होते असे आठवते. कसेबसे काही पाढे शिकलो होतो, एवढी आठवण आहे. हायस्कूलातील पहिल्याच वर्षी परीक्षेच्या प्रसंगी घडलेली एक गोष्ट सांगण्यासारखी आहे. शाळाखात्याचे इन्स्पेक्टर जाइल्स हे शाळा तपासण्यास आले होते. त्यांनी पहिल्या इयत्तेच्या मुलांना पाच शब्द लिहायला घातले. त्यात एक शब्द केटल् (घशींींश्रश)होता. त्याची वर्णरचना (स्पेलिंग) मी चुकीची लिहिली. मास्तरांनी मला आपल्या बुटाचे टोक मारून इशारा दिला. परंतु माझ्या ते कोठून लक्षात येणार? मास्तर मला समोरच्या विद्यार्थ्यांच्या पाटीकडे पाहून माझे शुद्धलेखन सुधारण्यास सांगत असतील, अशी माझी कल्पनाही होऊ शकली नाही. माझी समजूत की आम्ही एकमेकांचे चोरून पाहू नये, एवढ्यासाठीच मास्तर नजर ठेवीत आहेत. सर्व विद्यार्थ्यांचे पाचही शब्द बरोबर आले आणि मीच काय तो ढ ठरलो! माझा `मूर्खपणा' मास्तरांनी मागाहून मला दाखवून दिला. परंतु माझ्या मनावर त्या सांगण्याचा काही परिणाम झाला नाही. मला दुसऱ्या विद्यार्थ्याची कॉपी कधीच करता आली नाही.

बालविवाह- प्रकरण मला लिहावे लागू नये अशी माझी इच्छा आहे. परंतु या कथेमध्ये मला अशा तऱ्हेचे कितीतरी कडू घोट प्यावे लागणार आहेत. स्वत:ला `सत्याचा पुजारी' म्हणवून घेणाऱ्या मला दुसरा मार्गच नाही. तेरा वर्षांचा असताना माझा विवाह झाला, ही गोष्ट लिहिताना मला दु:ख होते. आज माझ्यासमोर बारा-तेरा वर्षांची मुले आहेत. त्यांच्याकडे पाहतो आणि माझ्या विवाहाचे स्मरण करतो, तेव्हा मला स्वत:बद्दल कीव वाटू लागते; आणि माझ्यावर ओढवलेल्या प्रसंगातून बचावल्याबद्दल या मुलांना धन्यवाद समर्थनपर असा एकही नैतिक युक्तिवाद मला सुचू शकत नाही.
मी `सगाई' विषयी लिहितो अशी वाचकाने समजूत करून घेऊ नये. काठेवाडात विवाह म्हणजे लग्न, `सगाई' नव्हे. `सगाई' म्हणजे मुलामुलींचे लग्न लावण्यासंबंधी वर-वधूच्या आई-बापामध्ये झालेला करार. `सगाई' मोडू शकते. सगाई झाली आणि वर मयत झाला, तर कन्या विधवा होत नाही. सगाईमध्ये वर व कन्या यांचा काही संबंध येत नाही. दोघांना त्याची गंधवार्ताही नसते. माझी एकामागून एक तीनदा सगाई झाली. ती केव्हा व कशी झाली, याची मला गंधवार्ताही नाही. दोन कन्या एकामागून एक मृत्यूू पावल्या, असे मला कोणी सांगितले.त्यावरून मला माहीत, की माझ्या तीन सगाया झाल्या होत्या. तिसरी सगाई सातएक वर्षांच्या वयाला झालेली असावी असे काहीसे स्मरते. परंतु सगाई झाली त्यावेळी मला काही सांगितले असल्याचे माहीत नाही. विवाहामध्ये वर व कन्या दोहोंची जरूर पडते. विवाहामध्ये विधी करायचा असतो. मी लिहीत आहे ते या विवाहासंबंधी. विवाहाचे मला पूर्ण स्मरण आहे.
आम्ही तीन भाऊ होतो, त्यांपैकी वडील भावाचे लग्न होऊन चुकले होते. मधले बंधू माझ्यापेक्षा दोन-तीन वर्षांनी मोठे होते; त्यांचा, माझा चुलत भाऊ कदाचित माझ्याहून वर्षाभराने मोठा असेल त्याचा, व माझा- असे तीन विवाह एकत्र करण्याचा वडील मंडळींनी बेत केला. यात आमच्या कल्याणाचा प्रश्न नव्हता. इच्छेबद्दलचा तर त्याहूनही नव्हता. यात फक्त वडिलांच्या सोयीचा आणि खर्चाचा प्रश्न होता.
हिंदूसमाजामध्ये विवाह अशी तशी गोेष्ट नाही. वर-वधूचे आई-बाप लग्नापायी सर्वस्व घालवून बसतात, पैसे उधळतात आणि काळाचा अपव्यय करतात. आगाऊ कित्येक महिन्यांपासून तयारी सुरू होते. कपडे तयार होतात, दागिने घडवायचे असतात, गावभोजनाचे अंदाज चालतात, भोजनासाठी निरनिराळी पपन्ने करण्याच्या शर्यती सुरू होतात. गळा असो किंवा नसो, बायका घसे बसेतो गाणी गातात, आजारी पण पडतात! शेजाऱ्यांच्या शांततेचा भंग करतात. प्रसंग येईल तेव्हा त्यांना स्वत:लाही असेच सर्व करायचे असते, म्हणून बिचारे शेजारीही गोंगाट, खरकटे आणि इतर घाण मुकाट्याने सहन करतात!
आम्हा भावांना तयारी चाललेली पाहूनच समजले, की लग्ने व्हायची आहेत. त्यावेळी माझ्या मनात चांगले कपडे वापरायला मिळतील, वाजंत्री वाजतील, वरात निघेल, सुग्रास भोजने मिळतील, एका नव्या मुलीबरोबर खेळ करायला मिळतील वगैरे हौसेपलीकडे दुसरे काही असल्याचे स्मरत नाही.

संस्कृताने मला भूमितीपेक्षाही अधिक त्रास दिला. भूमितीमध्ये घोकायचे काहीच नसते, तर संस्कृतात पाहतो तो सर्व काही घोकायचेच! हा विषयही चौथ्या इयत्तेपासून सुरू झाला. सहाव्या इयत्तेत मी हरलो. फारसी व संस्कृत-शिक्षक फार कडक होते. विद्यार्थ्यांना खूप शिकविण्याचा त्यांना लोभ असे. संस्कृत-वर्ग यांमध्ये एक प्रकारची स्पर्धा असे. फारसी शिकविणारे मौलवी गरीब असत, समजूत अशी की फारसी फार सोपे आहे, आणि फारसी-शिक्षक फार सज्जन मनुष्य आहेत; विद्यार्थी करतील तेवढ्यावर ते चालवून घेतात. मी पण सोपे आहे, असे ऐकून लोभात पडलो आणि एक दिवस फारसीच्या वर्गात जाऊन बसलो! जितके संस्कृत मी त्यावेळी शिकलो, तेवढेही जर शिकलो नसतो तर आज संस्कृत शास्त्रामध्ये मला जी गोडी वाटते, ती वाटली नसती. मला तर याचाच पश्चाताप होत आहे, की मी संस्कृत जास्त शिकलेा नाही. कारण की कोण्याही हिंदू बालकाने संस्कृतचा सरस अभ्यास केल्याशिवाय राहता कामा नये.
अलीकडे तर मला असे वाटते की भारतवर्षाच्या उच्च शिक्षणक्रमामध्ये मातृभाषेखेरीज राष्ट्न्भाषा हिंदी, संस्कृत, फारसी, अरबी व इंग्रजी एवढ्यांना स्थान मिळाले पाहिजे. इतक्या भाषांच्या संख्येकडे पाहून कोणाला भिऊन जाण्याचे कारण नाही. भाषा पद्धतशीर रीतीने शिकविण्यात येईल आणि सर्व विषय इंग्रजीतूनच शिकविण्याचा व त्यावर विचारही इंग्रजीतूनच करण्याचा बोजा आपल्यावर नसेल, तर वरील भाषा शिकण्यात जड असे काहीच नाही; एवढेच नव्हे, तर त्यामध्ये फार गोडी वाटेल. शिवाय जो शास्त्रीय पद्धतीने एक भाषा शिकला, त्याला मागून दुसरी भाषा शिकणेही सोपे जाते. खरे म्हटले असता हिंदी, गुजराथी, संस्कृत ही एकच भाषा म्हणता येईल. त्याचप्रमाणे फारसी व अरबी, फारसी संस्कृताशी मिळती असली तरी आणि अरबी हिब्रुशी मिळती असली तरी दोहींचा विकास इस्लामच्या उदयानंतरच झाला असल्यामुळे दोहींमध्ये निकट संबंध आहे. उर्दू व्याकरणाचा समावेश हिंदीमध्ये होतोच. तिचे शब्द फारसी आणि अरबीच आहेत. उच्च दर्जाचे उर्दू जाणणाऱ्याला अरबी व फारसी शिकावे लागेल; ज्याप्रमाणे उच्च दर्जाचे गुजराथी, हिंदी, बंगाली, मराठी जाणणाऱ्याला संस्कृत जाणणे आवश्यक आहे.

 संपादकीय
राया भलतेचि वदसि पथ्य हित स्व-गुरु-वचन आइकसी अन्य असोत,
वदेल स्व-सुताप्रति अहित वचन आइ कसी ।
भयकारी राजकारणी मागणी
गेल्या शतकभराच्या काळात ज्यांना आपल्या समाजातल्या जातीभेदांचे दुखणे समजून आले, त्यांनी त्या दुखण्याच्या निर्मूलनासाठी आयुष्ये आिरेला घालून काम केले. अलीकडच्या काळात त्या सत्पुरुषांचेच नाव घेअून बरीच माणसे समाजात तोंडाला येआील तसे भकत मोठमोठ्या मागण्या करीत असतात.  त्यायोगे त्या जातींसाठी फारच मोठे कार्य आपण अुभे करीत असल्याचा आव आणि आब ते मिरवत असतात. आपापल्या जातीसाठी आरक्षणाची मागणी करणे हा त्यातला अेक स्वस्त प्रकार होअू पाहात आहे.. त्या मागणीचे पुढे काय होआील; ज्या राज्यघटनेचा नेहमी यांच्याच तोंडून अुदोअुदो चालतो त्या घटनेचाच त्या मागणीने भंग तर होत नाही ना; ती मागणी अंमलात येण्याचे परिणाम काय होतील; ते परिणाम केवळ आपल्या जातीच्या हितापुरतेच असतील - की त्यातून आितरांच्या अस्मिता जाग्या होअून सामाजिक अस्वस्थता माजेल.... वगैरे काही विचार विवेकाने होत असेल असे नाही. तद्दन राजकारणी नेतेगिरी करण्यासाठी मात्र या व अशा मागण्यांचा अुपयोग होआील, असा त्यात होरा असावा.

त्यात कुणाचा काय हेतू असेल तो असो बापडा; परंतु सरकारात कोणीही असले तरी लोकांच्या  मोठ्या संख्येने अशा कोणत्याही मागण्या केल्या तर, त्यात आिष्टअनिष्ट न पाहाता, त्या मागण्या आम्ही मान्य करू असेच ते म्हणत असतात. या जातीय स्वरूपाच्या राजकारणी आंदोलनांची लागण रोज कुठे ना कुठे होत असते. शिवाय नामान्तर, कर्जमाफी, मुलींवरचे अत्याचार ही सत्कारणेही जातींच्या आधारे खळबळीची होअू लागली आहेत. हे सारे पाहिल्यावर गेल्या शतकातील त्या थोर समाजधुरीणांनी पाहिलेले जातीअंताचे ध्येय हे स्वप्नच राहणार अशी भीती वाटू लागते. या व्यतिरिक्त आणखी अेक भीती सतत वाटत होती की, आपली संरक्षणदळे, संशोधन क्षेत्रे आणि रक्तपेढ्या यांच्यापर्यंत आरक्षणांच्या मागण्यांचे लोण जाअून पोचते की काय! ही  भीती होती तोपर्यंत तसे होअू नये यासाठी धीर गोळा करता येत होता, पण नुकतीच ती मागणी आपले केंद्रिय मंत्री आदरणीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांनी जाहीरपणेच केली आहे. त्यामुळे तो सांभाळून ठेवलेला धीर सुटणारसे वाटू लागले आहे. आठवलेसाहेबांनी सैन्यदलात दलितांच्या आरक्षणासाठी पाठपुरावा करण्याचा आिरादा सांगितला आहे.

मराठ्यांच्या साम्राज्याचा कणा ढिला करणाऱ्या पानिपतच्या लढाआीसंबंधी अेक आख्यायिका सांगतात की, युध्दापूर्वी दोन्ही सैन्ये आमोरासमोर जमली व त्यांनी छावण्या केल्या होत्या. शत्रूचा सेनापती अहमदशहा अब्दाली याने संध्याकाळच्या वेळी निरीक्षणाच्या अुद्देशाने फेरी मारली. त्याला दिसले की मराठ्यांच्या गोटातून अनेक ठिकाणहून धुराच्या लकेरी अुठत आहेत. कित्येक जागी चुली पेटविल्याचे त्याने पाहिले. या प्रकाराची चौकशी केली तेव्हा त्याला कळले की मराठ्यांच्या छावणीत रात्रीच्या  जेवणासाठी स्वैपाक चालला असून प्रत्येक जातीच्या सैन्यासाठी वेगवेगळया चुली पेटविल्या गेल्या आहेत. सैन्य अेकमेकांच्या हातचे जेवत नाही, म्हणून ती व्यवस्था आहे. अब्दालीला मोठे आश्चर्य वाटले आणि तो सवंगड्यांना म्हणाला, `हे युध्द आपण जिंकणार! ज्या सैन्यात अेवढी फाटाफूट असेल त्यांस जिंकणे  कठीण जाणार नाही.' ही कथा खरी खोटी असेल, माहीत नाही. त्याची जुबान बेमुर्वत बोलली असेल तर तीही खरी ठरली नाही, कारण त्याला ते युध्द तितके सोपे गेले नाही. मराठ्यांचा त्या युध्दाने मोठाच दबदबा साऱ्या जगात वाढला हे खरेही असले तरी त्यांचा प्रत्यक्ष पराभवच झाला. त्या कथेतला सारांश आजच्या संदर्भात विचारात घेण्याशी मतलब!

नामदार आठवले असेही म्हणाल्याचे प्रसिध्द झाले आहे की, `मागासांच्या हितासाठी आजवर अनेकदा मोर्चे अंादोलने झाली. आता मराठा आणि आितर सारे समाज आरक्षणासाठी मोर्चे काढत आहेत. तथापि आपल्याला समाजातील जातीभेद मान्य नसून आर्थिक दृष्ट्या मागासांनाही आरक्षण मिळायला हवे.' यातली विधाने अेकमेकांशी जुळणारी नाहीत. परंतु  त्यांच्या अुच्चारणातील मतितार्थ असा की आता सैन्यातही आरक्षण हवे. ते तर त्यापुढे असे म्हणाले म्हणे की, `देशात रस्ते अपघातात मरण येणाऱ्यांची संख्या अेक दीड लाख असते, तसे व्यर्थ मरण येण्यापेक्षा सैन्यामध्ये जाअून देशासाठी बलिदान देणे हे चांगले आहे'.... अजब आहे!  रस्ते अपघातात केवळ तरुण पोरेच मरतात असे नाही, आणि तितके स्वस्त मरण सैन्यात असते काय? साऱ्या देशाची अशी खात्रीच आहे की, सैनिक आपल्या प्राणांचे मोल न ठेवता लढतो. देशाच्या दुर्दैवाने तो रणांगणावर कामी आला तर त्याचे शैार्य कमी ठरत नसते, त्याच्या बलीदानाशी, रस्त्यांत फटफटी खड्ड्यात पडून मरणाऱ्याची तुलना अेखाद्या मंत्र्याने कशी काय करावी? मंत्री म्हणतात त्याप्रमाणे आजवरच्या युध्दांत आपल्या सैन्याने पराक्रम केलेले आहेत! परंतु पुढचे सत्य असे की, त्यात कुणी त्यांची जात पाहिली नाही. महार रेजिमेंट नावाचे जे कडवे दळ आहे, त्यात केवळ महार  नाहीत तर  साऱ्या जातींचे -कुणाला खुपू नये, पण ब्राह्मणसुध्दा असतात. त्या रेजिमेंटचा त्याच्या नावासकट त्यातल्या साऱ्या सैनिकांना आणि सेनापतींना अभिमान असतो. ब्रिटिश काळापासून गोरखा, जाट, गढवाल, कुमाअँू, मराठा, शिख अशी लष्करातल्या दळांची नावे आहेत. त्या काळच्या पध्दतीनुसार ते घडले आहे. त्यात नावांशी त्या जातींचा आणि त्यांच्या पराक्रमांचा काहीही संबंध नसतो; तो चूकूनही कधी कुणी घालू नये. त्यांतील आरक्षणे हा तर कमालीच्या दुखण्याचा  वेदनेचा विषय आहे.

सैन्य पोटावर चालतात हे खरे असले तरी ते काही अेका मर्यादित अर्थाने असते. लढाआीच्या रणकंदनात कुणी भूक लागली म्हणून बंदूक थांबवून छावणीत जेवायला परत येत नसतो. अुलट कोणतेही सैन्य आपल्या पोटापाण्याचीच नव्हे तर घरच्यांच्या पोटाचीही फिकीर न करता लढाआीची आघाडी सांभाळत असते.  आपल्या काही सीमा आणि रणक्षेत्रे अशी आहेत की तिथे वेळेला खाण्याची फिकीर असते. कुठेतरी सरकारी हापिसात खुर्चीला कोट अडकवून बाहेर फिरत राहाण्याची  ती नोकरी असते की काय?  तिथे जर अुद्या आरक्षणाची तरतूद अुपजली तर , किंवा तिथेही सेनापतीपदावर बढती देताना त्यांच्या जातीचा कोटा भरायचा ठरविले तर काय काय हेाअू शकेल याची कल्पनाही विचित्र वाटते.

पण अेक केंद्रीय मंत्रीच तसे म्हणू लागलेत, त्यामुळे न जाणो कधीतरी ती मागणी मान्यही होआील. आपल्या देशात लोकानुनयासाठी काय आणि कायकाय घडेल हे सांगवत नाही. सैन्याची भरती आणि बढती जातीवर आधारित झाली तर कुणी सांगावे,  -कुणाच्या अजब डोक्यात येआील की त्या सैनिकाला  त्याच्याच जातीचे रक्त देण्यात यावे...विलक्षण झोंबरे आणि साऱ्या देशवासीयांच्या विचारक्षमतेचाच मगदूर कळावा, असे काहीतरी पुढे येत आहे. त्याचा कसोशीने प्रतिरोध करावा; की तुका म्हणतो तसे अुगी राहून जे जे होआील ते ते पाहावे, हेही कळत नाहीसे होअून जाते!

सोज्वळ सुनेचा छळवाद- जीएसटी
मुलगा वयात आला. सर्वांना त्याच्या लग्नाची चिंता लागली. स्थळं पाहिली, पत्रिका जमली. घराणे, रंग रूप, स्वभाव, शिक्षण सर्व काही पाहून एक छान सोज्वळ सून घरात आणली. सर्वांचा हेतू मुलाचा संसार सुखी व्हावा असा होता. परंतु नियतीने अशा काही लोकांना मधे घातलेले असते की, त्यांना दुसऱ्याचे चांगले बघवत नाही. छळ करणे, खोडा घालणे, कुरापती काढणे त्यांच्या अंगी रुजलेेले असते. सुनेचा तर छळ होतोच, परंतु संपूर्ण घराची वाट लागते. असाच काहीसा प्रकार `जीएसटी' च्या बाबतीत घडला आहे. काही कंसांनी पटापट वसुदेव-देवकीची मुले मारून टाकली. आता कृष्णाचा जन्म होईल तेव्हा होईल! परंतु त्या आधीच्या मृत अर्भकांचे काय?
आधीची कमीत कमी दहा वर्षे किमान शंभर तज्ज्ञ महाभाग जीएसटी चा अभ्यास करीत असणार. अत्युच्च पातळीचे शिक्षण घेतलेल्यांचा त्यात समावेश असेल. चारच नाही, आठही बाजूने साकल्याने विचार करून `वुई आर रेडी, आर यू रेडी?' अशी घोषणा करून वाजत गाजत रात्री १२ वाजता माननीय राष्ट्न्पतींच्या हस्ते घंटा वाजवून १ जुलैपासून `गुड अँड सिंपल टॅक्स कायदा' आणला. परंतु गुड अँड सिंपल हे दोन शब्द कौंन्सीलला सहन झाले नाहीत. सगळेच जर सोपे केले, तर त्यांना कोण विचारणार? म्हणून पहिल्या दिवसापासूनच समस्त व्यापारी, उद्योजक, कर सल्लागार यांचा छळ सुरू झाला.
कोणताही महिना संपल्यावर १० दिवसांत विक्री, त्यानंतर ५ दिवसांत खरेदी, त्यांनतर ५ दिवसांत विवरणपत्र भरणेे अशा अवघड (अशक्यच) तरतुदी केल्या गेल्या. ते यशस्वी होत नाही असे लक्षात आल्यावर तीन वेळा मुदती वाढवल्या. नोंदणी दाखले देण्यासाठी अनेक कागदपत्रे मागितली. ते देखील होत नाही असे लक्षात आल्यावर, राहिलेल्यांना कागदपत्र न घेता नोंदणी दाखले दिले गेले. हजारो नोंदणी दाखले चुकीचे दिले; त्यासाठी पर मुदती दिल्या. जुन्या कायद्याअंतर्गत घाईगडबडीने अनेकांचे नोंदणी दाखले एकतर्फी रद्द केले. ही चूक लक्षात आल्यावर परत त्यांना नोंदणी दाखले दिले. त्यासाठी अपील करायला लावली. ७५ लाख विक्री असलेल्या व्यापाऱ्यांना तर अक्षरश: झोपवलेच! कायद्यात या ना त्या मार्गाने १०० दिवसांत १०० बदल केले; १०००हून अधिक प्रश्नांना कायद्याचा आधार नसलेली उत्तरे दिली. हजारो कोटि रुपये देऊन नामांकित कंपनीला सॉफ्टवेअरचे काम दिले; ते सपशेल `फेल' गेले.
सोज्वळ सुनेच्या छळवादाची अशी यादी आणखी देता येईल. परंतु आपलेच दात आपलेच ओठ. दु:ख इतकेच की, इतक्या हाल अपेेष्टा करूनही हे मानायलाच तयार नाहीत की जीभ आम्हीच चावली.
याला मार्ग एकच. कर भरणाऱ्यांनी उठून उभे राहिले पाहिजे. हा छळवाद थांबण्यासाठी आंदोलन पुकारले पाहिजे. सरकारने देखील हा संसार अपेक्षेइतका सुखी होईतोपर्यंत एकही रुपया व्याज अगर दंडाची आकारणी करू नये. अन्यथा सुनेला या सासरबद्दल चीड येऊन संसार तुटेल. सहन तरी किती करणार?
-किशोर लुल्ला, सांगली (कर सल्लागार) 
फोन-९४२२४०७९७९

आठवांचे साठव
म्हशीपाठचे शिक्षण
कॉलेज अर्ध्यावर सोडल्यानंतर हाती आला तेा अुद्योग  मी आरंभला. पण शिक्षणाचा धागा दूर टाकून चालणार नव्हते. शिवाय घरच्या दारच्या साऱ्यांनी `याला काय अर्थ आहे'... या आशयाची टिप्पणी सुरू केली होती. आिंटर सायन्सची दुसरी टर्म वाया जाअू दिली तरी बाहेरून आर्ट्स् करायला काही हरकत नव्हती. त्यामुळे मला फार काही मोठे शिकायला मिळणार होते, असेही वाटेना. पण आितरांच्या म्हणण्यातला अेक मुद्दा नक्कीच विचार करण्याजोगा होता की, अुद्या काही दिवसांनी लग्नाच्या बाजारात मुलगी कोण देणार?... त्यासाठी निदान कशी तरी पदवी तरी हवी ना! हे पटल्यामुळे, आणि तशी पदवी मिळविणे मला मुळीच कठीण नव्हते त्यामुळे, मी विद्यापीठाकडे नाव नोंदवून अेकदम आिंटर आर्ट्स् ला बहि:स्थ म्हणून नाव नोंदविले.
सांगली केंद्र घ्यावे लागत होते. आिथे किर्लोस्करवाडीत कॉलेज होते, त्याच्या ग्रंथालयातून मी अेरवीही `कॉशन मनी' भरून पुस्तके आणत असे. प्राचार्य बी अे चोपडे होते, ते तशी परवानगी मला देत असत. अर्थात मीही त्या ग्रंथालयातील पुस्तके नीट फडताळांत लावणे... वगैरे काम ग्रंथपालास मदत म्हणून करीत असे, त्यानिमित्ताने मला ग्रंथालयात वावरता येई. अभ्यासक्रम पाहून पद्धतशीर वाचन, टिपणे वगैरे बाबतीत मला काही कळत नव्हते. तरीही वाचन आणि श्रवण चांगले असल्यामुळे पेपरचा ताणतणाव मला कधीच नव्हता. सांगलीत आमचे चुलते वगैरे असल्यामुळे परीक्षेच्या काळात तिथे राहायचाही प्रश्न नव्हता. सलगपणी वर्षे `अुडवत' मी पदवीधर झालो.
त्या तीन-चार वर्षंात मी मोठ्या कष्टाने माझा व्यवसाय अुभा करण्याची खटपट करीत होतो. भांडवलाचा तर आनंदच होता. ६८-६९ साली मला महाराष्ट्न् बँकेने २हजाराचे क्रॅशक्रेडिट दिले होते. पण मी बाहेर पत मिळवीत चाललो होतो. नंतरच्या काळात कित्येकदा लाखात कर्जे काढली, आणि अर्थातच वेळेत फेडली. पण त्या दरम्यान धंदा तसा अगदीच बेताचा होता.
मग जोड म्हणून आमच्या घरच्या म्हशींची अुस्तवारी करत असे. साधारण चार किमी अंतरावर कृष्णा नदी आहे. पूर येअून गेला की मळीची कुरणे माजत. नदीच्या काठी गवताचे कुरण विकत मिळायचे. सव्वा रुपयाला अेक हात रुंदीचा नदीपात्रापर्यंतचा लांब पट्टा, असे कंबर अुंचीचे मअूशार कसदार गवत मिळायचे. ते कापून आणावे लागे. सकाळी सहाला निघून कुरण गाठायचे. दहिवर पडलेले गार वातावरण. कोयत्याने सरसर गवत कापून अेक हलकासा भारा सायकलला बांधून मी आणायचा. कधीकधी सोबतीला थोरले बंधू किंवा नांद्रेकरांचा बापू नावाचा तरुण असायचा. तो तर फार गंमत्या स्वभावाचा होता. रानातली कुत्री भुंकत आली तर वेगवेगळया युक्त्या काढायचा. अेकदा कोयते चालवताना माझ्या करंगळीला लागले, आणि रक्त ठिबकू लागले. तिथं औषध कुठले कसले करणार? बापू म्हणाला, ``आता त्याच्यावर........'' कापल्या करंगळीवर खडूस माणसे `ते'सुध्दा करत नाहीत ना?
घरी आल्यावर न्याहरी वगैरे अुरकून  मी साडेआठच्या ठोक्याला माझे `ऑफीस'चे फळकूट अुघडत असे. गडी होता, पण थोडी सवड बघून म्हशी चरायला मी न्याव्या लागत.दिवाळीच्या नंतर पिके निघाली की रानात कडब्याचा पाला, चुकार वेल,अेखादा ओला मेाड असे जनावरांस खायला `घावत' असे. त्या दरम्यान मी त्यांना चरायला सोडून, त्या सुमारास वाङ्मय विषयासंबंधी ना सी फडक्यांचे `प्रतिभासाधन' पुस्तक दोनदा वाचले. त्यातला `अक्षर वाङ्मयाचा गुणविशेष', `अश्लिल आणि अनैतिक' वगैरे विषय त्या म्हशींच्या सान्निध्यात मी चघळले.
अेका जागी बसून किंवा अुभ्याने मी रंेगाळत असलो तर अेखादी म्हैस हिंडत हिंडत दूर जाअू लागायची, मग जाग्यावरून बोलावले तरी मागे फिरायची नाही. त्यावर अेक सोपा अुपाय सापडला. मी तोंडाने `वँ%%य्' असा रेडकाचा आवाज काढला की म्हैस मागे यायची. आडरानी ओघळीला शेतामळयातली माणसे प्रातर्विधी करून गेलेली असत. तापल्या अुन्हात वाळून गेलेले ते `पपन्न' म्हशींना आवडते. त्यास गावरान भाषेत `अेरड करणे' म्हणतात. आमच्या परिसरात अेक काँग्रेस क्रांतिकारी चळवळीतले वृद्धसे पुढारी होते. त्यांनाही तसे ओघळीला जावे लागत असे. ते त्यांच्या म्हशींना फिरायला सेाडून आपण जरा आडोशाला जाअून `अुरकत' असत. नंतर मोठ्या लाडाने म्हशीला बोलावीत `छबे%%, ये!' ती लाडाची म्हैस `वाँ%य्' करीत त्यांच्याकडे जायची.
सांगायला हरकत नाही की, आमची वसती शेतातलीच असल्यामुळे प्रसाधनगृह वगैरेंचा प्रश्नच नव्हता.   सभोवार वस्ती वाढत चालली मग ती गरज झाली, आणि घरापासून साधारण हजार हात दूरवर आमचा पायखाना झाला. आमच्या गावी जे पहिले डॉक्टर जोशी म्हणून आले, त्यांच्या मातुश्रीही त्यांच्या घरापासून आितके चालत येअून  आमच्याकडची ती सोय बरेच दिवस वापरत होत्या, कारण त्यांची सोय आितरत्र नव्हती.

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन