Skip to main content

23 may 2016

पैशात बुडालेली पत्रकारिता
-भाऊ तोरसेकर 

समाज प्रबोधनाच्या शतकपूर्तीकडे वाटचाल करणाऱ्यामिरज विद्यार्थी संघाच्या वसंत व्याख्यानमालेत मांडलेले विचार 

        पत्रकारिता म्हणजे नेमके काय हे आज विस्ताराने सांगण्याची गरज भासत आहे. मोठमोेठया शहरांंपासून ते गाव पातळीपर्यंत   सुरू झालेल्या महाविद्यालयमधून पत्रकारिता हा विषय शिकविला जातो. तेथे वास्तव आणि व्यवहारज्ञानाचा गंध नसलेली मंडळी विद्यार्थ्यांना पत्रकारितेचे सैद्धांतिक ज्ञान देण्याचे काम करतात. म्हणजे एखाद्या गल्लीतून छू म्हटले की कुत्रे पळत सुटते; ते काही अंतरावरती थांबल्यानंतर दुसऱ्या कुत्र्याला छू म्हणतेे, मग ते पुढे पळत राहते, ते पुन्हा तिसऱ्या कुत्र्याला छू म्हणते. अशी अवस्था सध्याच्या पत्रकारितेची झाली आहे. भारतीय पत्रकारितेला फार मोठी परंपरा आहे. लोकमान्य टिळक, आचार्य अत्रे, अनंत भालेराव, ना.भि. परुळेकर अशा अनेक नामवंत संपादकांनी आपल्या विचारांवर श्रद्धा ठेवून, सामान्य जनतेला शिक्षित करून, अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ दिले आहे.
पत्रकार म्हणजे तरी कोण? कान आणि डोळे उघडे ठेवून जो समाजात वावरतो, जिथे जिथे काही वेगळे वा अनुचित घडत असते त्याचा अभ्यास करतो, कानोसा घेऊन त्या घटनेतील सामाजिक पदर उलगडून दाखवत वाचकांना तो समजून सांगण्याचा प्रयत्न करीत असतो. म्हणजे सामान्यंाना जाता-जाता जे दिसत नाही, ते पत्रकाराला दिसते, व जे दिसते ते समाजाला उलगडून समजावून सांगण्याचे कर्तव्य पत्रकाराला जबाबदारीने पार पाडावे लागते.
या तुलनेत आजच्या काळात पत्रकारितेची अवस्था काय दिसते? टी.व्ही. चॅनेलवरून एखाद्या विषयावर निरर्थक चर्चा घडवून आणणारा अँकर, हा पत्रकार म्हणविला जातो, तो इतर कुणाला बोलूच देत नाही. बोलणारी मंडळीही नुसतीच भाग घेतल्यासारखी बोलत असतात; स्वत:चे समाजातील मूल्य वाढविणे एवढाच त्यांचा उद्देश असतो. मुळात त्या अँकरलाही विषयाचे सखोल ज्ञान नसते. या प्रकारामुळे मी तर आता टी.व्ही. चर्चेत जाणे बंद केले आहे. टी.व्ही. वर प्रसारित होणाऱ्या जाहिरातींतून आपल्याला नको असलेल्या उत्पादनांचा मारा होत आहे.  ऑनलाईन शॉपिंगद्वारे आपली दुकानात जाण्याची सवय मोडून काढण्याचे फार मोठे षड्यंत्र आहे. एकदा इथली स्थानिक व्यवसायिकांची स्पर्धा कमी झाली की त्यांचे उत्पादन जास्त किंमतीमध्ये आपल्या गळी उतरविण्याचे हे कारस्थान आहे. हे फार भयानक आहे; पण याविरुद्ध काही लिहावे असे पत्रकारंाना वाटू नये हे त्यापेक्षाही भयानक आहे
सध्या वृत्तपत्रांच्या संख्येत वाढ होत आहे.१६ पानी वृत्तपत्रांचे उत्पादनमूल्य दर प्रतीस साधारण  २०रु आहे. हे वृत्तपत्र आपल्याला ४ ते ५ रुपयांत मिळते. पण  तेही खपत नाही म्हणून काहीजण २०० रुपयांत वर्षभर वृत्तपत्र देण्याची योजना आखतात.कारण जाहिरातीतून भरमसाठ पैसे मिळतात.एवढे जाहिरातमूल्य मिळत असूनही काही नामांकित संपादक अग्रलेख लिहिताना शब्दांचे नको ते खेळ करत असतात. विचारांच्या लढाईमध्ये धातूचे शस्त्र  नसते, मुळात शस्त्र हे विचारांतून  निर्माण  व्हावे व ते विचारांच्या लढाईसाठी  वापरले जावे. पण सध्या विचार मागे पडून केवळ शस्त्र शिरजोर होते. संपादकांचा स्वत:च्या लिहिण्यावर विश्वास पाहिजे, त्या विचारापासून त्याने कधीही मागे ढळता कामा नये.  स्वत: लिहिलेले संपादकीय मागे घेण्याची नामुष्की एका नामांकित वृत्तपत्राच्या संपादकावर नुकतीच आली, अनेकांना संपादकीय स्वातंत्र्यावरचे आक्रमण वाढलेले आहे, हे जाणवते. मुक्त पत्रकारिता वा आविष्कार-स्वातंत्र्य नावाची एक अंधश्रद्धा असावी तशी दीर्घकाळ लोकांच्या मनात दृढ करण्यात आलेली आहे. आविष्कार-स्वातंत्र्य किंवा लेखन-स्वातंत्र्य घटनेने दिले आहे, यात शंकाच नाही. पण ते स्वातंत्र्य उपभोगण्यासाठी आपण आपल्या कुवतीवर उभे राहणे आवश्यक आहे. म्हणजे वर्तमानपत्र किंवा एखादे माध्यम उभे करण्यासाठी जे भांडवल वा पैशाची गुंतवणूक आवश्यक आहे, ते करण्याइतकी आपली क्षमता असायला हवी. ती कुवत ज्याच्यापाशी नाही त्याने दुसऱ्या कोणाच्या पैशावर आपले स्वातंत्र्य उपभोगण्याच्या गमजा करणे म्हणजे निव्वळ दांभिकपणा असतो.
कुठलाही पैसेवाला भांडवलदार आपले पैसे नफा कमाविण्यासाठी गुंतवत असतो म्हणूनच आपण ज्याला वर्तमानपत्र किंवा माध्यम म्हणतो, तो गुंतवणूकदारांसाठी `व्यापार' असतो, त्यातून कमाई नाही झाली तरी निदान भांडवल बुडता कामा नये, इतकी काळजी मालकाला घ्यावी लागते! साहजिकच संपादकीय वा पत्रकारिता हा प्रसारमाध्यमासाठी  एक व्यापार असतो. त्यात नफा तोटा बघावाच लागतो. ते सत्य कोणी  कधी लोकांसमोर मांडत नाही, उलट ते सातत्याने झाकले जात असते.
बाहेर कुणा सामान्य व्यक्ती कार्यकर्त्याने पत्रकारंाना हात लावला तर हल्ला झाल्याचा गलका केला जातो, पण आतून होणाऱ्या त्यांच्या गळचेपीबद्दल कोणी कधी अवाक्षर बोलत नसते. मग अशी गळचेपी मालकांकडून, जाहिरातदाराकडून  दबाव आणल्यानेही होत असते. तिला आजचा  संपादक, पत्रकार निमूट शरण जात असतो. कारण तो त्याच्या लाखो हजारो रुपये पगारासाठी लाचार असतो, शिवाय अशा पगाराची शाश्वती त्याला स्वातंत्र्यापेक्षा अतिशय जिवापाड मोलाची वाटत असते.
नीरा राडीया नावाच्या विदुषीने प्रभू चावला किंवा वीर संघवी अशा नामवंत पत्रकारंाना जुंपले होते; त्याबद्दल संघवीने जाहीर माफी मागणारा लेख नंतर लिहिला. बरखा दत्त निर्ढावलेली असल्याने आजही उजळ माथ्याने पतिव्रतेचा आव आणत असते. प्रभू चावला यांना `खपवळर ढेवरू' माध्यम गटाने बाजूला केले, तर बाकी कुणी त्याविषयी नाराजी व्यक्त केली होती काय? माध्यमे चालवणारेे जे उद्योगसमूह किंवा कंपन्या आजकाल उभ्या राहिल्या आहेत, त्या कुणाही नामवंत वाटणाऱ्या संपादकाला मोहऱ्याप्रमाणे खेळवत आहेत. त्यांकडे बघितल्यावर पत्रकारिता हा निव्वळ दांभिकपणा झाला असल्याचे सहज लक्षात येऊ शकते. हे सत्य दिसत असले तरी त्याविषयी न बोलण्याला पॉलिटिकल करेक्टनेस् म्हणतात. त्याकडे `डोळसपणे कानाडोळा' केला जात असतो.
इतर कोणत्याही उद्योगात जसा निलाजरेपणा किंवा भ्रष्टाचार पोसला गेला आहे, तितकाच तो पत्रकारितेमध्ये बळावला आहे. अशा व्यवहारात पत्रकाराने आपले लाभ उठविण्यासाठी काही केल्यास मालक तिकडे दुर्लक्ष करीत असतो आणि त्या बदल्यात पत्रकाराने कंपनीसाठी कुणाशी तरी शय्यासोबत करावी अशी मालकाची अपेक्षा असते. तिथे पातिव्रत्याचा आव आणून भागत नाही. सरकारपासून लब्धप्रतिष्ठित घटकांमध्ये वावर असलेल्या व्यक्ती संपादक म्हणून नेमल्या जातात. बिझनेस आणणे व मार्केटींग हे त्यांच्यासाठी कौशल्य झाले आहे. त्याचा बुद्धिमत्तेशी संबंध उरलेला नाही. कधी निरा राडीया तर कधी इंद्राणी मुखर्जी या अशा संपादकांना पटावरचे मोहरे असल्याप्रमाणे खेळवत असतात. ते संपादक पैशाच्या तालावर नाचणारे नसते तर या महिला त्यांना खेळवू शकल्या असत्या का? मग असल्या  `संपादकांचे स्वातंत्र्य' म्हणजे तरी काय? त्यांची `गळचेपी'  म्हणजे तरी काय? उदाहरण म्हणून मराठीतील तथाकथित मोठ्या वृत्तपत्रांचे अलीकडच्या पाचदहा वर्षांतील अग्रलेख पाहावेत. त्यातले विचार किंवा मांडणी बदलत गेलेली दिसते.
केवळ प्रचंड खपाचे आकडे वाढविण्याने वृत्तपत्र मोठे ठरत नाही. काही वृत्तपत्रांची छपाई करून गठ्ठे मालमोटारीत भरतात, पण दुपारनंतर ती मालमोटार तशीच रद्दीवाल्याकडे नेऊन उतरवितात, अशी उदाहरणे माझ्या पाहण्यात आहेत. यांतून केवळ भ्रामक प्रतींचे आकडे फुगवून साऱ्यांना फसविणारे हे विश्व, नैतिकतेवर फार जोराने कसे बोलू शकेल?
पत्रकारी वा संपादकीय स्वातंत्र्य हा निव्वळ एक भ्रम आहे. अनेक संपादक आजकाल असे आहेत, ज्यांना आपल्या नावावर उद्या काय छापून  येणार हे ठाऊक नसते!  अनेकांना काहीही लिहिता येत नाही,  किंवा वैचारिक लेखनाचा त्यांस गंधही नसतो. जाहिरातींच्या वा अन्य मार्गाने भांडवली कारभार भरभराटीला आणण्यासाठी त्यांचा उपयोग करून घेतला जातो. किंबहुना अन्य व्यवसायातील काळा पैसा माध्यम उद्योगात गुंतविला जातो. एका मराठी वर्तमानपत्र व वाहिनीचा मालक सध्या अफरातफरीच्या आरोपाखाली तुरुंगात जाऊन पडला आहे. त्यामुळे चार महिने तिथल्या संपादक पत्रकारांना पगारही मिळू शकला नाही. छापायचे काय आणि प्रक्षेपित काय करायचे याची भ्रांत आहे. परंतु त्याच वाहिनीच्या संपादकाच्या काही महिन्यांपूर्वीच्या गमजा आठवून पाहाव्यात! लंडनमधील डॉ. बाबासाहेब अंाबेडकरांचे वास्तव्य असलेली इमारत राज्य सरकारने विकत घेतली नाही तर,  विकत घेण्याची घोषणा या वाहिनीच्या मालकाने  केली होती! त्यांचा गौरव करण्यात त्यांचे संपादक गर्क होते, तेव्हा त्यांना `आपल्या मालकाकडे इतका पैसा कुठून आला' असा साधा प्रश्नही पडला नाही? आता हा मालक गजाआड जाऊन पडला आहे, त्याबद्दल एक अवाक्षरही संपादक बोलणार नाही. ही आजकालच्या संपादक पत्रकारांची पात्रता झाली आहे.
    पैशाला पासरी पत्रकार व संपादक  विकत मिळतात, याचे अनेकांना दु:ख आहे. कारण आता वृत्तवाहिन्या, वर्तमानपत्र हे समाज-प्रबोधनाचे  साधन रांहिले नाही. आपापले अजेंडे घेवून लोकांच्या गळी मारणारी यंत्रणा म्हणून माध्यमे वापरली जातात. त्यासाठी येणारा अवाढव्य खर्च जो भागविणार, त्याचाच शब्द अखेरचा असतो.
हॉटेल वा प्रवासी बस चालविणाऱ्या मालकाच्या नोकराला जसे निर्णयाचे अधिकार नसतात, तसेच वर्तमानपत्रात नोकरी करणाऱ्या पत्रकारांचे आहे. अन्य व्यवसायात नोकराला असते तितकेच स्वातंत्र्य त्यालाही  आहे. मालकाचा पट्टा गळयात बांधलेल्यांनी उगाच स्वातंत्र्याच्या गप्पा मारण्यात अर्थ नसतो. सुरक्षित वा सुखवस्तू जीवनाची स्वप्ने बघत क्रांतिकारी आव आणण्याचे ढोंग फार काळ चालत नाही. मग ते पत्रकार म्हणून चालविलेले असो, किंवा हुशार विद्यार्थी म्हणून नेहरू विद्यापीठात आणलेले सोंग असो! हा दांभिकपणा काही काळ चालला, हे सत्य आपण नाकारू शकत नाही. लोकांना शंका येवू नये व पाखंड उघडे पडू नये म्हणून काही काळ नाटक छान चालून जाते. पण त्यात सहभागी झालेले कलावंत नाटकाला `वास्तविक जग' समजू लागले तर मग त्यांना वठणीवर आणायचे उपाय समाजाला परस्पर हाती घ्यावे लागतात. मग तो पत्रकार असो,  वा बाबा-बुवा असो, किंवा राजकारणी, समाजसेवक असो!  पत्रकारिता म्हणून जो कल्लोळ चालतो त्यातला पक्षपात, भेदभाव लपू शकलेला नाही. कष्टकरी नोकरी करतो तेव्हा आपले श्रम विकत असतो, आणि बुद्धिमान नोकरी करतो तेव्हा आपली बुद्धी विकत असतो. मग बुद्धी विकणाऱ्याने,  बुद्धीच्या स्वातंत्र्याच्या गप्पा मारण्यात कुठला अर्थ राहतो? `आपण सांगू त्यावर जग डोळे झाकून विश्वास ठेवते'. या भ्रमातून पत्रकार, संपादकाने लवकर बाहेर पडलेले बरे! सोशल माध्यमांनी अशी प्रस्थापित माध्यमे व त्यातल्या मुखंडांची महत्ता कधीच संपविली आहे. यांच्या शहाणपणाची मक्तेदारी आता उरली नाही.
काळाच्या ओघात पत्रकारितेचे स्वरूप बदलत आहे. भविष्यात वृत्तपत्रे कमी होऊन त्यांचा वाचकही कमी होऊ शकतो;  कारण हा वाचक आता सोशल मिडीयाकडे  वळतोय. सोशल मिडीया हा सध्याचा परवलीचा शब्द झाला आहे.त्याचे सामर्थ्य वादातीत आहे. यामुळे लोकांपर्यंत बातम्या लगेच येऊन पोहचत आहेत. त्यावर चर्चा व विचारांचे आदान प्रदान वेगाने होत आहे. थोडक्यात सांगायचे तर सोशल मिडीयामुळे आज पत्रकारितेला व माध्यमांना चांगले दिवस आले आहेत.
मी तसा बहिष्कृत पत्रकार आहे. पत्रकारितेतील अनैतिकतेबद्दल मी विचार मांडतो. तथापि परखड लिहिण्या-बोलण्याबद्दल कुठल्याही राजकारण्याकडून अजून तरी मला कधी त्रास झाला नाही, उलट पत्रकार-मित्रांनी त्रास दिला. पत्रकारितेचा बाणा जपून लोकांना सत्याकरिता दिशा दाखविणे हे आज आव्हान आहे. ते कोण कसे पेलणार हे काळच ठरवेल.
-शब्दांकन: विवेक ढापरे, कऱ्हाड
मो. नं. ७५८८२२११४४

हिंदू नावाचा धर्म
`हिंदू या नावाचा धर्म आहे का? त्याची व्याख्या काय?' असे प्रश्न विचारले जातात. त्याला माझे उत्तर असे की, `हिंदू हे राष्ट्नचे नाव आहे. त्याचा धर्मग्रंथ  गीता आहे.'  हिंदू या शब्दाला `इस्लामविराधी' असा गंध येतो; त्यावर मला एक पर्याय सुचतो की, हिंदू ऐवजी भागवतधर्म अशी अधिकृत नोंद शंकराचार्य आणि घटना यांंच्या ठिकाणी करावी. म्हणजे मग `गर्व से कहो - हम हिंदू है' असे म्हणण्याची वेळच येणार नाही. देशातील वातावरण वारंवार गढूळ होणार नाही. यावर चर्चा घडावी असे वाटते, म्हणून त्यावर लिहावे.
                                              -सतीश पटवर्धन,बसव रोड, कागवाड, फोन :९२४३२१२६५७    
संवाद
 कोणत्याही धर्माच्या तत्वज्ञानावर काही भाष्य करावे एवढा `आपले जग'चा अधिकार नाही. परंतु  सुजाण वाचकाची धर्माज्ञा मानून काही लिहावे, असा हा प्रयत्न. वाचकाने म्हटल्याप्रमाणे चर्चा घडायला काहीच हरकत नाही. किंबहुना धर्माविषयी अशी चर्चा सतत होत राहण्यानेच धर्म प्रवाही राहू शकेल, त्यास साचलेपण येणार नाही. हिंदू धर्म हा सनातन -म्हणजे नित्यनूतन आहे असे मानतात. तो लवचिक आहे, तो मानवतेचा, विशालतेचा, उदारतेचा धर्म आहे. त्यात कर्मठपणा, एकारलेपणा नसावाच.        .
          धर्माची व्याख्या अनेक विचारवंतांनी व तत्त्वज्ञांनी त्यांच्या त्यांच्या प्रतिपादनांतून केलेली आहे. `धर्म म्हणजे कर्तव्य', `धर्म म्हणजे आचारपध्दती', `धर्म म्हणजे मनोव्यापारांवर होणारे संस्कार', `स्टेटस् ऑफ माइंड', या किंवा या प्रकारच्या अनेकानेक विचारांतून आपल्याला हवा तो आशय निवडून आपण त्या धर्माचे अनुयायी म्हणवून घ्यायचे, तर कोणत्याच धर्मात वेगळेपण दिसणार नाही. सगळे धर्म सारखेच दिसू लागतील. विनोबा म्हणायचे की, `दुसऱ्याने आपल्याशी जसे वागावे असे आपल्याला वाटते, तसे आपण दुसऱ्याशी वागणे म्हणजे धर्म.' या व्याख्येप्रमाणे पाहू गेल्यास विनोबांच्या `जय जगत्' या उद्घोषणेचा मथितार्थ लक्षात येतो. त्यामुळेच आपण शेजारधर्म, मातृधर्म, विद्यार्थीधर्म असे शब्दप्रयोग करतो. -म्हणजे शेजारी म्हणून वागण्याची रीत, आई म्हणून वागण्याची रीत, विद्यार्थी म्हणून वागण्याची रीत असा  सोपा आशय मिळतो. त्यात हिंदू  - मुसलमान - िख्र्तासी असा फरक करण्याचे कारण पडत नाही.
          आता हिंदू या नावाचा स्वतंत्र काही तरी धर्म असण्याला श्रध्देचा आधार घ्यावा लागतो. भारतवर्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, समुद्र वलयांकित भूप्रदेशांत साधारण पाच सात हजार वर्षांपूर्वी जी काही संस्कृती नांदत होती, ती मानव्यशास्त्राच्या दृष्टीने खूपच विकसित झालेली होती यात मतभेद नाहीत. त्या काळात विज्ञान आणि वैज्ञानिक विचार अनुसरले जात असणारच. कोणत्याही मानव समूहाच्या विकासाला विज्ञानाचाच आधार असतो, तसा तो याही समूहाला होता. वेद-उपनिषदांची रचना असो, किंवा कला-उद्यमांचा विकास असो त्या काळात नेमकी कशी स्थिती होती, हा कायम संशोधनाचाच विषय असतो. पण जी काही प्रगती झाली होती असे मानण्यात येते, त्या प्रगतीतूनच एक परंपरा रूढ होत असते. पिढ्यान्पिढ्यांच्या अनुसरणांतून तिला दृढ स्वरूप येते. एका पिढीकडे आलेले हे ज्ञान अधिक विकसित करून पुढच्या पिढीकडे देण्यामुळे  संस्कृती संपन्न होत जाते.
          भारताच्या वायव्य प्रांतांत सिंधू नदीच्या काठी जी संस्कृती विकसित झाली होती, तिचा शोध ब्रिटिश काळात मोहंजो दडो व हरप्पा येथील उत्खननातून लागला. तिचा उल्लेख आजही सरसकट `सिंधू संस्कृती' असाच केला जातो. खैबरच्या खिंडीतून नंतरच्या काळात जे लोक कोणत्याही कारणाने भारतात आले, त्यांनी त्या जीवनपद्धतीला सिंधू संस्कृती असेच म्हटले. मात्र त्या त्या लोकांच्या भाषांत `स' चा उच्चार `ह' होतो, म्हणून ती `हिंदू संस्कृती' झाली. ज्या काळात ती संस्कृती नांदत होती, त्या काळात लोक धर्म मानत होते, धर्माचरण करत होते, त्यांस कुठेही हिंदूधर्म म्हटलेले नाही. महाभारतात अनेक ठिकाणी `धर्म' असा शब्द आहे. `धर्माने वाग', `हा धर्म नव्हे', `तेव्हा तुझा धर्म कुठे गेला?' ....यांंत कुठेही `हिंदू धर्माप्रमाणं वाग...' असे म्हटलेले नाही. कारण त्या काळी वेगळा काही धर्म इथे नव्हता. राजा, गुरू, योध्दा,... इतकेच नव्हे तर गणिका वा दासी यांनीही त्यांच्या (कर्तव्य)धर्माने वागावे असा संकेत होता, कारण ती आचरणपध्दती होती. समाजधारणेसाठी तिचे पालन करणे आवश्यक होते.  यांत हिंदू या धर्मनामाला तसा काही संदर्भ नाही. इतरांनी इथल्या जीवनपध्दतीला `हिंदू' म्हटले.
          मानवी संस्कृती जसजशी विकसित होत गेली तसतसे त्या त्या संदर्भातील आचरण बदलत गेले. स्थलकालानुसार त्यांत वैज्ञानिक बदल झाले, त्यास धर्माचे बंधन घातले तर सामान्य माणसाला ते आचरणास सोपे होते. चतुर्मासात वादळी व ढगाळ हवा  असते, त्या कालात कांदा खाणे वातकारक होते, म्हणून तो न खाणे हा `धर्म' म्हटले. लेह-लडाखमध्ये कडाक्याच्या थंडीत सैनिक जागरूक व तत्पर राहण्यासाठी रम् चा एक पेग घेत असेल तर तो हिंदू धर्माचा भंग होतो, असे कोणी कुठे म्हटलेले नाही. पण भर उन्हाळयात आपल्याकडच्या ढाब्यावर बसून दारू पिणे हा सामान्यत: धर्म नव्हे. हिंदू धर्मात `असे करावे', `तसे करू नये'.... असे कोणीही कुठल्या ग्रंथात लिहून ठेवलेले नाही; कारण तो सनातन धर्म आहे, स्थल कालानुरूप बदलणारा मानवी धर्म आहे. तो विशाल हृदयी आहे. तो उत्क्रांत झालेला आहे. त्याचा कोणी संस्थापक नाही. त्याचा कोणी संचालक नाही. कोणी धर्माज्ञा देत नाही.
          `गीता' हा हिंदूंचा धर्मग्रंथ नव्हे, तो तत्वग्रंथ आहे. तो केवळ हिंदूंना नव्हे तर संपूर्ण मानवाला उद्बोधन करणारा ग्रंथ आहे. ईश्वर नावाच्या एका अगम्य शक्तीकडे मानवाचे वर्तन वळवावे या हेतूने केलेला तो  वास्तवदर्शक विचार आहे. त्यात भक्ती, ज्ञान आणि कर्म या तीन मार्गांचे पर्याय मानवाच्या जीवनसाधनेसाठी सुचविले आहेत. संपूर्ण महाभारत नावाच्या इतिहासग्रंथातील `गीता' हा एक भाग किंवा अंश आहे. तो स्वतंत्र, वेगळा ग्रंथ नाही. महर्षी व्यासांना जे तत्वज्ञान मांडायचे होते, ते त्यांनी कृष्णाच्या मु्खी घातले आहे. त्याच प्रकारे त्यांनी उद्धवाला जे तत्वज्ञान सांगितले ते `उध्दवगीता' म्हणून ओळखले जाते. त्यांनी त्यांच्या चिंतनातून मांडलेले  ते शब्दरूप आहे. रूढ अर्थाने आपण `कुराण', `बायबल' हे धर्मग्रंथ म्हणतो, तशी गीता नाही. हिंदूंचा तसा कोणताच अधिकृत(?) धर्मग्रंथ नाही. त्यामुळे कोणतेही आचरण हे `हिंदू धर्माने सांगितलेे आहे' असे म्हणता येत नाही. `कसे वागावे?' असे हिंदू धर्माला विचारले तर `मानवतेला शेाभेल असे वागावे', हे उत्तर असेल. तोच धर्म आहे, असे खरा हिंदू मानत असावा.
          राष्ट्न् ही संकल्पना धर्माचरणात समाविष्ट मानावी लागते. नेपाळ हे कालपर्यंत हिंदू राष्ट्न् होते, तरीही ते भारताहून वेगळेच होते. इस्लामी किंवा िख्र्चाश्न राष्ट्न्े संख्येने खूप आहेत, तरीही ती परस्परांची शत्रू आहेत. राष्ट्नचे नाव कोणतेही असले तरी त्याचा आचार धर्म दुसराच कुठला तरी असू शकेल. एखाद्या माणसाचे नाव आपल्याकडे `हिंदूराव' असते, म्हणून तो  `धर्मा'ने वागतो, असे थोडेच आहे? तसे आपले `हिंदूराष्ट्न्' झाले तरी त्यात मानवतावादी आचरण घडेल असे काही नाही.
          भगवन्पासून आलेला भागवत (वारकरी) संप्रदाय आहे. नाथ,दत्त, समथ, महानुभाव असे आणखी चार संप्रदाय आपल्याकडे आहेत. भागवत संप्रदाय हा महाराष्ट्नत ज्ञानेश्वरांपासून उदयाला आला. त्यामुळे ते नाव प्राचीन आचार विचार पध्दतीला रूढ होणार नाही, पण नाव कोणतेही देण्याने फरक काय पडेल? आपले सरकार यूपीए  की  एनडीए यावर नवा वाद कशाला? त्यांच्या आचरणपध्दतीशी काही संबंध असावा की नाही?
          आपल्याकडे हिंदुत्ववादी म्हणजे संकुचित जातीय विचारांचे लोक, असा एक चुकीचा अर्थ चिकटला आहे.आचरणाला मानवतेचे,  स्थळकाळाचे, श्रेयस् आणि प्रेयसाचे भान देणारे विशाल मनाचे तत्वज्ञान हे संकुचित कसे असेल? कुठल्या तरी चुकीच्या किंवा अर्धवट कर्मकांडाला धर्म समजण्यामुळे  इतर धर्मीयांशी वाद होतात, किंवा ते वाद राजकारणी स्वार्थासाठी मुद्दाम खेळविले जातात. त्याचा धर्माशी संबंध असतोच असे नाही. `खऱ्या धर्माचे जो रक्षण करतो, त्याचे धर्म रक्षण करतो' असे म्हटलेे आहे ते त्याच अर्थाने असावे. म्हणूनच माणूस म्हणून आपल्या धारणेसाठी धर्माचे पालन आवश्यक ठरते.


शेाधिला पाहिजे विचार । यथातथ्य ।।
मूल्यवान वस्तू
     ही गोष्ट आहे ब्राझीलमधील एक उद्यागपती मि. स्कार्पा  यांची. त्यांनी सप्टेंबर २०१३मध्ये फेसबुक आणि वृत्तपत्रांतून घोषणा केली की, ते त्यांची तीन कोटि  किंमतीची `बेंटले'  कार त्यांच्या स्मशानभूमीत पुरणार आहेत. त्यांंच्या मृत्यूनंतर तीच गाडी त्यांना `तिकडे वरही' चालवायला मिळावी असे त्यांचे म्हणणे होते. ईजिप्तच्या पिरॅमिडमध्ये व्यक्तीच्या शवाबरोबरच त्याच्या वस्तू दागिने पदार्थ हे ठेवून त्याच्यासह पुरत, मृत्यूनंतर ते त्यांस मिळावे अशी त्यामागे धारणा होती. (आपल्याकडे पुष्कळजण मृताच्या अंत्यविधी वेळी अशा वस्तू ठेवतात.)
     त्याही देशाच्या अनेक लोकांना हा मूर्खपणा आहे असेच वाटले. अनेकांनी त्याचा निषेध केला  गाडी पुरल्यानंतर काय होणार? ती गंजून कुजूनच जाणार! त्यापेक्षा  ती संपत्ती गोरगरीबांना वाटून दिली तर तिचा केवढा उपयोग होईर्ल! मृत्यूनंतर कसले आयुष्य असते, या विषयावर वादविवाद रंगले. मि.स्कार्पा यांचे मन वळविण्याचे प्रयत्न झालेे. पण हा गृहस्थ आपल्या विचाराशी ठाम होता. मोटारीसाठी खड्डा खणायसाठी कुदळ फावडे घेऊन स्कार्पा स्वत: देखरेख करीत होते, मदत करत होते.
     गाही पुरण्याचा दिवस आला. शेकडो लोक हा `सोहळा' पाहायला स्मशानभूमीत जमले. पेपरवाले टीव्ही वाले यांनीही गर्दी केली. क्रेन उभी केली होती, तिच्या साह्याने ती आलीशान कार उचलून खड्ड्यात  उतरविली जात होती. लोक हळहळत होते. एवढी मोठी संपत्ती अशी पुरणारा हा वेडा माणूस...  आणि ती क्रेन मध्येच थांबली.  लोक पाहू ऐकू लागले. त्यांना उद्देशून स्कार्पा म्हणाले,        ``तुम्ही सगळे लोक मला मूर्ख ठरवत आहात! पण खरी गोष्ट अशी की, सगळे लोक याहून मौल्यवान अशा कितीतरी गोष्टी आपल्या शरीराबरोबर पुरत असतात. डोळे, मूत्रपिंड, हृदय... असे एकाहून एक मूल्यवान अवयव तुम्ही पुरून टाकता. देशातील हजारो लाखो रुग्ण  मूत्रपिंड किंवा डोळे मिळविण्यासाठी नंबर लावून महिनोन्महिने उभे आहेत. अनेकजण हे अवयव वेळेत मिळाले नाहीत म्हणून मरत आहेत. तुम्ही तुमच्या मृत्यूनंतरही तुमचे अवयव दान न करता ते पुरून टाकता, किंवा नष्ट करता आहात. मृत्यूनंतर या  बेंटले कारचा  मला उपयोग नाही, त्याचप्रमाणे त्याा अवयवांचा तुम्हाला काहीही उपयोग नाही. दुसऱ्यांना नवं आयुष्य देणाऱ्या या अवयवांची किंमत  माझ्या या गाडीपेक्षा कितीतरी अधिक आहे; त्यांच्या आयुष्यापेक्षा मूल्यवान या जगात काय आहे?... मी आज इथं जाहीर करतो की, माझ्या मृत्यूनंतर माझे जे अवयव उपयोगी असतील ते दान केले जावेत. तुम्हालाही मी विनंती करतो की, तुम्हीही आपल्या अवयवांचे दानपत्र लिहून ठेवा.''
      स्कार्पा यांनी अर्थातच आपली ती गाडी पुरली नाही, पण जनतेच्या मनांत अवयवदाना बद्दल खूप जागृती केली. ब्राझीलमध्ये अवयव रोपणाच्या शल्यक्रियांत ३१% वाढ झाली, अनेकांना जीवदान मिळू शकले. या अनोख्या कार्याबद्दल स्कार्पा यांचे मनापासून अभिनंदन!      
-डॉ.घनश्याम वैद्य, कर्नाटक हेल्थ इन्स्टिट्यूट, 
घटप्रभा (जि. बेळगाव)     
फोन : ०८३३२- २८७१०२,  २८६२६६. 

विनायकराव वैशंपायन यांचे निधन
मुळचे मुंबईकर व अलीकडे तळेगांव (पुणे) येथे वास्तव्य असलेले विनायक चिंतामण वैशंपायन  यांचे २० मार्च २०१६ ला निधन झाले ते ८४ वर्षांचे होते. मुंबई महापालिकेत ते स्वत: काम करीत व त्यांच्या पत्नी मुंबईलाच शिक्षिका होत्या. हे दंापत्य त्यांच्या दानशूरतेबद्दल प्रसिद्ध होते. आपल्या मिळकतीचा  जवळ जवळ सर्वच भाग ते दानासाठी वापरत असत. निवृत्तीनंतर राहणीमानाचा खर्च कमी व्हावा म्हणून हे उभयता तळेगावला छोट्या घरात राहू लागले. दोंघांपैकी एकाची पेन्शन ते दरमहा दान करीत असत. ग्रंथालये, होतकरू विद्यार्थी, संघटन अशा सत्कार्यांसाठी ते सढळ हाताने उत्स्फूर्त मदत करीत असत.निधनापूर्वी काही काळ ते आजारी होते.
    संपर्क- सुधा वैशंपायन, यशवंतनगर,तळेगाव दाभाडे, (०२११४) २२४२१३ 
 

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन