Skip to main content

11 april2016

संपादकीय
।।तुका म्हणे एका देहाचे अवयव ।
सुख-दु:ख जीव भोग पावे।।
आम्ही ' व `ते'   थांबवूया
डॉ. आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीची चाहूल असतानाच हीन जातीय राजकारणाचे प्रसंग वारंवार येतात. बाबासाहेबांनी सोसलेली अवहेलना, अपमान व अनेक प्रतिकूलतेतूनही सतत प्रज्वलित ठेवलेला ज्ञानाग्नी पाहून आश्चर्य वाटते.एखाद्या सामान्याचे व्यक्तिगत उन्नयन पिचत दिसतेही पण व्वक्तिगत आकांक्षा, पैसा, पत, प्रतिष्ठा किंवा राजकीय महत्वाकांक्षा न ठेवता समाजालाही आपल्यासारखेच बनवायचे ही जीवनधारणा असणे हे बाबासाहेबांच्या कार्याचे वैशिष्ट्य. ज्या समाजाने आपल्याला हीन लेखले त्याही समाजाचा द्वेष नाही. म्हणून त्यांना ``महामानव'' हे सार्थ बिरूद लाभले. आज कु णी त्यांच्या मार्गावरून चाालण्याची इच्छा करत असेल तर त्याला प्रथम जातीय अभिनिवेश, विद्वेश, राजकारण, वैयक्तिक स्वार्थ याला तिलांजली द्यावी लागेल.

आज दुर्देवाने त्यांचा वैचारिक वारसादेखील मूठभर विचारवंताना आंदण दिल्यासारखे वर्तन चालू आहे. बाबासाहेबांना ``दलितांचे कैवारी'' म्हणून संबोधणारे त्यांचे अनुयायी त्यांची वैचारिक  उंची शतांशानेही गाठू शकले नाहीत. स्वत:च्या सोयीसाठी सोयीपुरते त्यांना वापरले. घटनेतील सेक्युलर व सोशालिस्ट या शब्दांना स्वत: बाबासाहेबांनी केलेला विरोध, राष्ट्न्भाषा हिंदी का असावी याचे त्यांनी केलेले स्पष्टीकरण, छोटी राज्ये असावीत यासाठी दिलेली कारणमीमांसा व सुचवलेली रचना, त्याचवेळी फुटीर प्रवृत्तींनी मागितलेल्या धर्माधारित प्रांतरचनेला केलेला विरोध, या त्यांच्या सर्व भूमिका पुन्हा पुन्हा त्यांना या देशाविषयी, त्याच्या अखंडतेविषयी किती चिंता होती हेच दर्शवितात. त्यांचा वैचारिक वारसा सांगताना बरोबर उलट काम चाललेले दिसते.बाबासाहेब निव्वळ विद्रोही, आक्रोशी, सतत `व्यवस्थे'ला विरोध करणारे काहीतरी अतर्क्य स्वप्नाळू  उपाययोजनांचा आग्रह धरणारे कधीच दिसत नाहीत. भारत सांस्कृतिक दृष्ट्या एक आहे हे त्यांनी स्वीकारले होते. तो राजकीय, सामाजिक व भावनिक दृष्ट्याही एक राहावा यासाठी ते प्रयत्नशील होते. केवळ व्यवस्था परिवर्तन नाही तर मानसिक परिवर्तन झाले तरच उदार, निरोगी समाजरचना शक्य आहे यावर त्यांचा ठाम विश्वास होता. त्यामुळेच केवळ उच्चवर्णीयांविषयी विद्वेष, तिरस्कार, सूडाची भावना या हत्यांरांवर ही समतेची लढाई जिंकता येणार नाही, याचे भान हवे.

प्रा. शेषराव मोरे म्हणाले त्याप्रमाणे आज सुरू असलेल्या समतेच्या प्रामाणिक प्रयत्नांना दाद दिली पाहिजे. जुन्या अन्यायांचे दाखले देऊन तिरस्काराची परंपरा चालू ठेवल्याने परिवर्तनाच्या प्रक्रियेला चालना देणाऱ्यांची उमेद आपण संपवितो हे लक्षात घेतले पाहिजे, समन्वयवादी विचार मांडणाऱ्यांना वैचारिक दृष्ट्या `जातीबहिष्कृत' होण्याची वेळ येते. समाजवर्तन-मानसिक, परिवर्तन घडविणे म्हणजे एखाद्या चढावर हाताने गाडा ढकलण्यासारखे आहे. परिवर्तनाचा चढ खडा आहे. या वाटेवर अजून आपण अर्धेही पोचलेलो नाही.हा गाडा ढकलायला अनेक हात लागत आहेत.तो हळूहळू पुढे जात आहे. अशावेळी काही विघ्नसंतोषी मंडळी बाजूला उभे राहून, तो गाडा ढकलणाऱ्यांविरुद्ध ढोल बडवत सुटले आहेत. सततच्या विखारी टीकेमुळे निराश होऊन या मंडळींनी  दम टाकला वा हात सोडले तर समाजपरिवर्तनाचा गाडा गडगडत पुन्हा तळाशी  जाईल! अशा परीक्षेच्या काळात ढकलणारे हात तर वाढायला हवेतच; शिवाय त्या विषारी ढोल वादनाच्याही वर, उच्चरवाने बंधूतेचे समन्वयाचे, विश्वासाचे, सकारात्मक  नारे ऐकू यायला हवेत! कुणी समन्वयाचा मार्ग काढण्यासाठी  प्रसंगी एक पाऊल मागे सरकायची स्वत:च्या आग्रहांना मुरड घालायची तयारी दाखवली तरी त्याला लगेच तो त्याचा पराभव असल्याचे ठासून सांगण्यात येते. व उलट उन्माद शिरजोर बनताना दिसतात. त्यामुळे समन्वय साधू पाहणाराही नाइलाजाने कडवी, एकांगी भूमिका धरून बसतो.

पूर्वीच्या जातीप्रथेला मूठमाती देण्याचा आक्रोशी जागर करतानाच नव्याने पुरोगामी, प्रतिगामी असा भेद, त्यातही डावे उजवे असे उपभेद व त्यातही उजवे-उजवे, डावे-डावे असे पोटशाखा भेदही मूळ धरू लागले आहेत. धर्माचा व्यापक उदार अर्थ कोणालाही नको आहे कारण त्यात या साऱ्याच भूमिका विलय पावतील व स्वतंत्र राजकीय अस्तित्व राहणार नाही ही भीती असते. कोणतीही विचारसरणी व धर्म परिपूर्ण वा अपरिवर्तनीय असू शकत नाही. जी बदलते, व्यापक व समावेशक विचार करते तीच विचारसरणी टिकून राहते.

बाबासाहेबांनी दाखवून दिलेले फुटीरतेचे धोके आज विक्राळ रूप धारण करून नवनवीन भेद निर्माण करताना दिसत आहेत. देशहितापुढे प्रांत, भाषा, धर्म, जाती या सर्व अस्मिता विलय पावल्या पाहिजेत हे बाबासाहेबांनी त्यांच्या वागण्यातून दाखवून दिले. जे बाबासाहेबांचा वारसा सांगतात त्यांनी तर या वैचारिक वारशाचे संवर्धन केलेच पाहिजे,  जे स्वत:ला अजूनही त्या वैचारिक परंपरेच्या बाहेरचे समजतात त्यांनी देखील बाबासाहेबांनी दाखविलेल्या मार्गावर चालायला हवे आहे. प्रतिकात्मक, विखारी प्रतिशोधाची भाषा बोलली जात असली तरीही आपला वैचारिक समतोल ढळू न देता, हे समरसतेचे दायित्व स्वीकारले पाहिजे.बाबासाहेबांना हिंदू धर्माने आपले म्हणावे या प्रयत्नांना प्रतिसाद न देणे, व त्यामुळे त्यांना धर्मांतर करावे लागणे, बॅरिस्टर झाल्यानंतरही त्यांना अहवेलना सोसावी लागणे या अपराधांचे दायित्व घ्यावेच लागेल. गंड वा प्रतिशोध या भावना समाजाच्या प्रगतीला मारक आहेत. ज्या संस्था व विद्यापीठे स्वातंत्र्याचा, बदलाचा उद्घोष करत आहेत त्यांनी आक्रस्ताळया प्रदर्शनाऐवजी काही भरीव उपयोजित संशोधन होण्यासाठी बुद्धिसंपदा वापरली पाहिजे. तात्पुरती प्रसिद्धी, श्रेयवाद यापायी प्रतिभादेखील वाया जाते आहे. आपण ज्यांचे नाव घेतो त्यांचा चरित्र व चारित्र्याचा डोळस अभ्यास बुद्धिवादी, तर्कवादी नव्या पिढीने, स्वत:च्या बुद्धीने करायला हवा. बाबासाहेब कुण्या एका जातीचे, प्रांताचे असू शकत नाहीत. ते आमचे आहेत व त्यांच्या स्वप्नातला एकजीव एकरस समाज निर्माण करायचा आहे. यासाठी प्रथम `आम्ही' व `ते' ही भावना हद्दपार करायला हवी. `आपण' सारे मिळून समाजातला बंधुभाव वाढविण्यासाठी कामाला लागूया. मनात व व्यवहारात भेदभाव बाळगणार नाही, कोषातून बाहेर पडून वंचितांचे आर्त समजून बाबासाहेबांची प्रतिमा, त्यांची ग्रंथसंपदा याला विचारातही आदराचे स्थान असेल. त्यासाठी मनाची कवाडे प्रथम उघडून खरा प्रकाश आत भरून घ्यायला हवा.
द्वेष वाढतो आहे.  
आपल्या वर्धापन दिन अंकातील मधु आपट्यांचे आत्मकथन तसेच जोगळेकर, आठवले, कोंडविलकर या सर्वांचे अनुभव वाचनीय व वैचारिक खाद्य पुरविणारे आहेत.
     मी लडाख, काश्मीर, ईशान्य भारत स्वतंत्र फिरलो आहे. सामान्यजनांत मिसळून मुक्त गप्पागोष्टी करता आल्या. त्या करतांना त्यांची वेषभूषा-रंगरूप-सणवार इत्यादींविषयी बोलणे टाळावे असे मला वाटले. त्यामुळे त्यांना एक प्रकारे परकेपणा जाणवतो, हे लक्षात आले. त्यांना आपल्यातलेच मानावे अशी त्यांची अपेक्षा आहे. `ते स्वत:ला भारतीय मानत नाहीत' असा प्रचार करणाऱ्यांनी त्यंाना कधी आपले मानले? आपल्या सैनिकांकडून काही गैर प्रकार घडत असत, दुसऱ्या बाजूला दहशतवादी त्रास!  एकदा आम्ही इंफाळला असताना तेथील स्त्रियांनी आपल्या सैनिकांविरुध्द नग्न मोर्चा काढला होता. कुठली स्त्री आपली अब्रू  अशी सुखासुखी चव्हाट्यावर मांडेल?
  पुढच्या अंकात स्वा. सावरकरांवरील लेख वाचला. सावरकर हे कुणालाही न पेलवणारे व्यक्तिमत्व होते. प्रत्ेयकाने आपल्या सोयीचे सावरकर उचलले. `मला सावरकरांंचे विचार शंभर टक्के पटतात' असे म्हणणारा शंंभर टक्के खोटे बोलत असतो. सावरकरांची `माफी मागून सुटका' हा क्षुद्र राजकारणाचा विषय आहे. प्रकृतीच्या कारणावरून काही योजना डोळयापुढे ठेवून सावरकरांनी सुटका करून घेतली. विशेष म्हणजे त्यांनी इंग्रजांना दिलेला शब्द पाळला, आणि सक्रिय राजकारणात भाग न घेता अस्पृष्योद्धार, एकता, भाषासुधारणा  इत्यादि कार्यांना वाहून घेतले. गांधी आणि सावरकर यांंनी एकमेकांचा द्वेष कधीच केला नाही, इतका तो आज त्यांचे भक्त वा विरोधक करीत आहेत.
संरक्षणातून सुटका
    `हे कशाचे संरक्षण' हा संपादकीय लेख चांगला आहे. मा.बाळासाहेबांच्या आग्रहाने व आडवाणींच्या प्रोत्साहनाने बदलापूरला `हिदुस्तानी कमांडो' स्प् ॅडचे प्रशिक्षण माझ्या फार्महाऊसवर सुरू झालेे होते. १५-११-२००२ रोजी बीबीसी व सीएनएन या वाहिन्यांवर ती एकच  ब्रेकिंग न्यूज होती. आपल्या चॅनल्सनी त्यांस `आत्मघातकी कमांडो स्प्ॅड' असले नामांतर केले होते. त्यावर खूप रणधुमाळी उडाली. १७नोव्हेंबरला आमच्या बंगल्यात दोन तगडे सहा फुटांचे पोलीस माझ्या संरक्षणासाठी म्हणून हजर झाले. जणू  मुशर्रफ किंवा पाक मला टिपणार होते ! त्यांचे सकाळचे जेवण व सायंकाळी चहा घेऊन ते माझ्या मागोमाग दहा पावलांवर चालत फर्ग्युसनच्या टेनिसकोर्टवर आले. पोलिस संरक्षणाचा मला थोडा आनंद मिळाला असेल, पण सोबतीच्या टेनिसपटूंचे अस्सल डेक्कन जिमखानी किंवा सदाशिव पेठी शेेरे ऐकावे लागले. - `एहे रे, एकदोन लढाया लढलेल्या कर्नलला असले संरक्षण लागते काय!' ...
    रात्री ते दोघे माझ्याकडे दाबून  जेवले. सकाळी चहा न्याहरी चापली. `अरे, तुम्हाला जेवणाचा भत्ता मिळत असेल ना?' असे त्यांना विचारण्याचे दहा वेळा मनात आले. पण माझी सभ्यता आड आली. त्यास आमच्या स्वैपाकीणबाइंर्नी वाचा फोडली. `मला यांंच्या १२-१२ पोळया करणे जमणार नाही' असे तिने स्पष्ट सांगितले. पत्नीनेही ती संधी घेतली. मी पोलीस कमीशनरना फोन करून सांगितले की, मला या दोन तगड्या जवानांचे रोज रोज जेवण परवडणार नाही. कमीशनर म्हणाले, `कर्नलसाहेब, दिल्लीच्या गृह मंत्रालयाकडून तुमच्या संरक्षणाची ऑर्डर निघालेली आहे.संरक्षण काढता येणार नाही. शेवटी मुंबईला बाळासाहेबांना फोन करून अडचण सांगितली. चक्रे फिरली. `मला काही झाले तर पोलीस किंवा सरकार जबाबदार नाही' असा दाखला माझ्याकडून घेतला. संरक्षण मिळण्याचा राजकीय पुढाऱ्यांना जितका आनंद मिळत असेल, त्याहून निश्चितच जास्त आनंद मला ते संरक्षण काढून घेतल्याचा झाला!
     अर्थात, आपापल्या परीने सगळेजण बरोबर असतात हे तात्पर्यही नमूद केले पाहिजे.
             -कर्नल जयंतराव चितळे,
                             पुणे ४

राम-रावण युध्दाचा अन्वयार्थ
-दीपक पाटणकर
वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही. इतिहासाचे वेड लागावे लागते, आणि नवा इतिहास निर्माण करण्याचेही वेड लागावे लागते. गुलाबपाणी व अत्तराचे थेंब यांतून इतिहास निर्माण होत नाही; -तर तो घामाच्या आणि रक्ताच्या थेंबांतून निर्माण होतो.

    वाल्मिकींच्या रामायणाचे समग्र अध्ययन केल्यावर रामराजाचेे मोठेपण लक्षात येतेच, पण  इतर कोणत्याही कांडापेक्षा राम रावणाचे युध्द हा भाग विलक्षण स्फूर्तिदायक असल्याचे युध्दशास्त्रज्ञही मानतात. रामानी हे युध्द जिंकले, इतकाच त्याचा मर्यादित अर्थ नाही, तर त्याची पार्श्वभूमी, हेतू, पध्दती आणि परिणाम या सर्र्व अंगांनी ते युध्द फार महत्वाचे ठरले.
     सीताहरणापूर्वी रामानी चित्रकूटापासून पंचवटीपर्यंत प्रवास केला, त्यावेळी त्यांना अनेक ऋषी भेटले होते व त्यांनी आपल्याला राक्षसांच्या त्रासांतून सोडविण्याची विनंती केली होती. रामानी त्याचवेळी जाणले होते की या संकटाशी कधी ना कधी आपल्याला थेट भिडावेच लागेल. त्यानंतर शूर्पणखेचा प्रसंग घडला, तिचे कान नाक कापून तिला अद्दल घडवली. पुढे खर दूषण आणि त्रिशिरस यांच्यासह १४हजार राक्षस सैन्याचा त्यानी फडशा पाडला. त्यातून वाचलेला अकंपन हा हेर होता, त्याने रावणाकडे जाऊन रामाच्या अफाट सामर्थ्याची कल्पना दिली. रामानी हे छोटे मोठे विजय मिळवले, आणि सेनेचा पराभव केला  तरीही या घुसखोर कारवायांमागे कोण आहे याची त्यांनाही कल्पना आलेेली होतीच. अकंपनाने रावणाला सांगितल्यानुसार इतर कोणत्याही मार्गाने रामाचा पराभव करणे शक्य नाही, पण त्याची मानहानी करून अस्मितेवर हल्ला करण्यामुळे राम खचून जाईल; मग त्याचा पराभव करणे शक्य होईल. रामाचे पत्नीवर निरतिशय प्रेम आहे. तू तिचे हरण केलेस तर तो तुझ्यापर्यंत आपसूकच येईल. हा उपाय रावणाने पडताळून पाहिला आणि पुढची सारी योजना केली, त्याप्रमाणे घडवून आणले. सीतेला रावणाने पळवून आणले, तिला सोडविण्यासाठी रामानी युध्द केले हा समज खरा नाही.. रामानी राक्षसांच्या नाशाची प्रतिज्ञा त्यांच्या वनवासाच्या प्रारंभीच केली होती, त्यास आता चालना मिळाली. अन्यथा रामानी रावणाच्या तीन पटाईत सेनापतींचा त्यांच्या सैन्यासह पराभव यापूर्वीच केलेला होता, म्हणून रावणाने कुटील राजकारण केले.
    अलीकडच्या कालात संगणकशास्त्र विकसित झाले, त्या आधारे रामायण-महाभारतादि ग्रंथांचे कालखंड निश्चित करण्यासाठी शास्त्रज्ञांनी मागोवा घेतला. भारतीय महसूल सेवेतील (इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेेस) आयकर आयुक्त श्रीमती सरोज बाला आणि त्यांचे सहकारी श्री. पुष्कर भटनागर यांनी खगोलशास्त्र, इंटरनेट यांचा वापर करून आणि रामायणातील प्रसंगांतून उल्लेखिलेल्या नक्षत्रस्थितीचा संदर्भ घेऊन  `प्लॅनेटेरियम' (नक्षत्रदर्शन) या नावाचे सॉफ्टवेअर तयार केले. त्यावरून असा निष्कर्ष काढला की, श्रीरामाचा जन्म दि.१०जानेवारी िख्र्तास्पूर्व ५११४ या दिवशी झाला. या प्रकारचे नवे संशोधन व त्या ग्रंथांतील उल्लेख यावरून राम-रावण युध्दातील दिवसमान निश्चित करण्यात आले आहे. त्यातील दिवसागणिक लढायांचे वर्णन तसेच त्यात वापरलेली शस्त्रे व साधने, आणि विजयी वीरांचे तपाशील रामायणात आहेतच.
     वानर सेनेने आपल्या रक्ताचे पाट वाहवले, जीव ओवाळून टाकले, जखमा- हालअपेष्टा- प्रतिकूल निसर्ग यांची पर्वा न करता वानरसेना रामाच्या आधिपत्त्याखाली लढली. इंद्राला अजिंक्य वाटणारे रावणाचे साम्राज्य त्यांनी उध्वस्त केले. अंती रावणाचाही वध झाला. हा सारा पराक्रम सामान्य नव्हे ! अठ्ठ्याएेंशी दिवस चाललेल्या या युध्दात वानरांच्या अंगात इतकी वीरश्री संचारली होती की, रावणाचे कसलेले सैन्य आणि त्याच्याकडच्या सेनापतींजवळची शस्त्रेे अस्त्रे यांचा टिकाव लागला नाही. हे युध्द कोणत्या तत्वासाठी लढले गेले व त्याचे परिणाम काय झाले ? महत्वाची नोंद घ्यायची म्हणजे अठ्ठ्याएेंशी दिवसांपैकी पंधरा दिवस अवहाराचे म्हणजे युध्दबंदीचे होते, तोपर्यंत कितीतरी वानर व राक्षस सैन्य मारले गेले होते.  रावणाकडील दहा मोठे सेनापती युध्दात मारले गेले, पण राम पक्षातील एकही वानर सेनापती कामी आलेला नाही. हनुमान, नील, अंगद, सुग्रीव, द्विविद, मैंद, आणि राम लक्ष्मण हेसुध्दा जखमी झाले आहेत त्यांच्यावर प्राणांतिक संकटे आली आहेत पण पराक्रम, सामर्थ्य आणि ऋषींचे आशीर्वाद तसेच परस्पर समन्वय यांमुळे अंती रामाचा विजय झाला आहे.
     या विजयी युध्दामुळे रामाच्या सत्शक्तीचा धाक सर्वदूर पसरला. दुष्ट राक्षसी शक्तीला व प्रवृत्तींना त्यांच्या देशात घुसून हरविता येते हा विश्वास निर्माण झाला. स्त्री च्या सर्वोच्च सन्मानासाठी शत्रूच्या गोटात शिरून युध्दाकरता येते व ते जिंकताही येते हे सिध्द झाले. उत्तरेपर्यंत पोचलेला  राक्षसांचा उपद्रव नित्याचा बंद झाला. सर्वांत महत्वाचे म्हणजे, पुढची हजारो वर्षे भारतावर दक्षिणेतून कोणतेही आक्रमण झाले नाही.
     राम - रावण युध्दाचा आजच्या संदर्भात विचार केला तर त्यापासून आजच्या नेतृत्वास आणि जनतेसही पुष्कळ काही शिकता येईल. तो दृष्टिकोण मात्र हवा! रामनवमीच्या पर्वकाळात कथापुराणांच्या श्रवणाइतकेच त्या इतिहासाचे चिंतन करणे हिताचे ठरेल.






Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन