Skip to main content

Vishesh Ank

आपल्या कर्तृत्वाने आणि वेगळया वैचारिक भूमिकेने आपले सामान्यपण असामान्य करणारी व्यक्तिमत्वे असतात.त्यांचे मोठेपण आज कुणी सांगण्यापेक्षा त्यांनीच आपली वाटचाल थोडक्यात सांगावी;
त्यातून स्वत:चे मूल्यमापन करावे की ज्यातून त्यांची जीवनदृष्टी जाणवेल!
अशा काही मान्यवर व्यक्तींना केलेल्या विनंतीवरून, त्यांनी स्वत:विषयी केलेले कथन
`असा मी....!'

अखंड काम करावेसे वाटते
मी विजय मुकुंद आठवले. जन्म पुणे येथे १ जानेवारी १९४६चा, नुकतीच सत्तरी ओलांडली आहे. मी एक वर्षाचा असताना माझी आई वारली. आमच्या घरात बाईमाणूस कोणीही नव्हते, त्यामुळे माझे वडील व धाकटे अविवाहित काका रोज आलटून पालटून स्वयंपाक करीत. आमचे पुण्याच्या सदाशिव पेठेत टेलरिंगचे दुकान होते. वडिलांनी व मोठ्या काकांनी मला वाढविले आणि संस्कार, शिस्त, वक्तशीरपणा व गरिबीत व्यवस्थित राहणे शिकविले.
१९६२मध्ये मी मॅट्नीक झालो. मेक्रॅनिकल ड्नफ्टस्मनचा दोन वर्षांचा कोर्स केला. कासारवाडी-पुणे येथे नोकरीला लागलो. दोन वर्षांनी मला ठाणे येथे व्होल्टाजमध्ये नोकरी लागली. ठाण्याला मी व माझा एक मावसभाऊ दोघे बरोबर नोकरीला जात येत असू.
२१व्या वर्षीच माझे लग्न झाले. दोन मुली झाल्यानंतर १९७३च्या शेवटी म्हणजेच वयाच्या २७व्या वर्षी स्वभावाचा दुष्परिणाम म्हणा किंवा आयुष्यात लिहिलेलीच एक घटना म्हणा, वाटेत दुर्दैव आडवे आले. मी व माझा मावसभाऊ आमचा दोघांचा स्वभाव असा होता की, आमच्या वाट्याला कोणी गेला, किंवा मला अथवा भावाला मारले तर ते आम्हाला सहन होत नसे. आम्ही लगेच त्याचा प्रतिकार करत असू. किरकोळ बाचाबाची व भांडणाचे पर्यवसान गंभीर त्या दिवशी झाले. माझ्यामुळे माझ्या कुटुंबावर अत्यंत वाईट प्रसंग आला. त्याचे वर्णन मी करू शकत नाही. पुढे एक दीड वर्ष कुटुंबाची अवस्था दयनीय झाली. ते दिवस कसेबसे मागे गेले.
त्याच सुमारास पत्नीला नोकरी लागली. ती तिने जबाबदारीने केली. माझी पत्नी आणि वडील यांनी दिलेली साथ यांची तुलना इतर कुठे करताच येणार नाही. वडिलांना घरचेही बघावे लागले. माझ्या दृष्टीने तर तो एक कसोटीचा काळ व जीवनातील नीचांकच होता. पत्नी, वडील व दोन्ही काका यांच्या प्रयत्नामुळे व पुण्याईमुळे या सर्व खडतर पर्वातून बाहेर पडावयास मला १९७६ साल उजाडले. मला व माझ्या भावाला जणू पुनर्जन्मच मिळाला.

नंतर मात्र माझ्या जीवनाला जबरदस्त कलाटणी मिळाली. मी पूर्णपणे `काम एके काम' हे व्रत अंगिकारले. मला डिझायनिंगचे काम मिळू लागले. पुण्याला नव्या पेठेत भाड्याने राहात होतो. एक खोली दहा बाय दहा, वर आणखी एक खोली दहा बाय सहाची, तीवर पत्रा, मोरी उघडी. येईल तसे दिवस काढायचे ठरवले होते. रात्रंदिवस काम करून दोन वर्षे काढली. २५-३० हजार रुपये जमविले. दुसरी जागा भाडोत्री घेतली. वाड्याच्या कोपऱ्यात पंधरा बाय वीस फूट जागा रिकामी होती, त्या मालकांनी त्यांच्या तिथे मला शेड ठोकायला परवानगी दिली, तेथेच मी धंद्याला सुरुवात केली. पुढे अखंड यश मिळाले ते आजपर्यंत. १९७९ साली `शोगिनी' नावाने एक कंपनी सुरू केली. `प्रिन्टेड  सर्किट बोर्ड' नावाचा एक घटक जो सर्वच इलेक्ट्नीकल्स, इलेक्ट्नॅनिक्स तसेच ऑटोमोबाईल (चार चाकी, दोन चाकी) उत्पादनात लागतो. तो बनवायला सुरुवात केली.
खेड शिवापूरमध्ये १९८२मध्ये जागा घेऊन, पत्र्याची शेड बांधून कंपनीचा विस्तार सुरू केला तो आजही सुरूच आहे. सध्या कंपनीचा एक्झि.चेअरमन म्हणून मी कार्यरत आहे. सिंगल लेअर, डबल लेअर, अॅल्युमिनियम क्लॅड तसेच मल्टीलेअर प्रिंटेड सर्कीट बोर्ड याचे उत्पादन रोज १०००स्प्े.मी.होते व वार्षिक उलाढाल सुमारे १५०कोटि रुपये आहे. फॅक्टरी खेड शिवापूर (ता.हवेली जि.पुणे) येथे हायवेला लागून २७ एकर जमिनीवर वसलेली आहे. तिचे मुख्य कार्यालय आंबेगाव(बुद्रुक), कात्रज देहूरोड बायपास, पुणे येथे आहे. एकूण मनुष्यबळ(कर्मचारी) १०५० आहेत. भारतातील सर्वदूर ठिकाणी आमची गिऱ्हाईके असून त्यांची एकूण संख्या ८००. याशिवाय शिरवळ येथे हायवेला लागून स्वत:च्या मालकीची ४० एकर जमीन असून, कंपनी क्रॅन्टीनला लागणारा भाजीपाला व दूध तेथून पुरविण्यात येते.
कारखानदारी करत असतानाच सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून काही उपक्रमांत यथाशक्ती हातभार लावताना मला नेहमीच आनंद असतो. बनेश्वर येथील भागवत महाराज समाधी मंदिर, वेल्हे व भोर येथील वनवासी कल्याण आश्रमास केलेली मदत, ममता बालसदन, सासवड येथील श्रीमती सिंधूताई सपकाळ यांना कायमची मदत, जोगेश्वरी येथील पुणे वेदाश्रम शाळेच्या वास्तूच्या नूतनीकरणाच्या कामात सहभाग, सी.आय.डी.ऑफीस पुणे येथील क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके स्मारकाला देणगी, माळेगाव(ता.भोर) येथे दहावीपर्यंतची शाळा बांधून(एकूण १० वर्ग व दोन एकर जागा) संस्थेला हस्तांतर केली.... अशी काही उदाहरणे सांगता येतील.

मी खेड शिवापुरातच फॅक्टरीला लागून बांधलेल्या बंगल्यात पत्नीसह राहतो. माझा रोजचा दिवस सकाळी ४ वाजता सुरू होतो. व्यायाम, चालणे व नित्यकर्म आटोपून सकाळी ६-३०वाजता फॅक्टरी राऊंडला बाहेर पडतो तो दुपारी पाच वाजेपर्यंत. कंपनीची नियमित कामे माझ्याकडे असतात. त्याशिवाय नवीन सुधारणांबाबत चर्चा, येणाऱ्या पाहुणे मंडळींशी चर्चा, विचारविनिमय असे १२.१५ वाजेपर्यंत चालते. घरचा अत्यंत साधा आहार व विश्रांती घेऊन दुपारी १-३०च्या दरम्यान परत ऑफीसला येतो. ५ वाजेपर्यंत घरी जातो. त्यानंतर काही वाचन, पारमार्थिक श्रवण, भोजन करून रात्री ८-३० वा. झोपतो.
मला तीन विवाहित मुली आहेत. मोठी मुलगी सौ.निता ती बी.कॉम.होऊन पंडित श्री.विजय कोपरकर यांनी पत्नी आहे. श्री.विजय कोपरकर संगीतातील नावाजलेले व अवघ्या महाराष्ट्नला माहिती असलेले व्यक्तिमत्त्व आहे. मधली मुलगी सौ.गीता बी.ई. होऊन आमच्याच बिझनेसमध्ये टेक्निकल डायरेक्टर आहे. तिचे पती श्री.अभिजित ताम्हनकर हे पण बी.ई. होऊन आमच्याच  कंपनीत टेक्निकल डायरेक्टर आहेत. कॉम्प्यूटर सॉफ्टवेअर व टेक्निकल लाईन यामधील त्यांची कामगिरी वाखाणण्यासारखी आहे. कारखान्याचे युनिट २ ते पूर्णपणे बघतात. धाकटी मुलगी सौ.सीमा अकौंट्स् विभाग सांभाळते. तिचे पती हृषीकेश मोडक टेक्निकल डायरेक्टर (प्रॉडक्शन) आहेत. ते युनिट १ पूर्णपणे बघतात. शिवाय माझा चुलतभाऊ श्री.विनायक तथा सतीश आठवले बी.एस्सी. होऊन गेली तीस वर्षे माझ्याबरोबर कंपनीत काम करीत आहे. सध्या तो मॅनेजिंग डायरेक्टर असून सेल्स आणि मार्केटिंग सांभाळतो. त्याचा मुलगा श्री.सचिन आठवले हा बी.सी.एस. होऊन कंपनीत डायरेक्टर म्हणून काम करतो.
`शोगिनी'शी मी माझी नाळ बांधून घेतलेली असल्यामुळे कंपनीच्या प्रगतीच्या कामाच्या आड काहीही आले तर त्याचा मी लगेच अव्हेर करतो. कंपनी ही माझी सर्वात महत्त्वाची, नंबर एकची प्राथमिकता (प्रायॉरिटी) आहे.

ब्राह्मण समाजाने आपली उन्नती करावी, त्यासाठी अपार कष्ट उचलण्याची तयारी ठेवावी असे मला वाटते. या उद्देशाने गरजू व्यक्तींना शोधून, मी यथाशक्ती मदत करतो. समाजाच्या कुठल्याही प्रकारच्या, उदा.जागोजागीचे भक्तेनवास, संमेलने यांना योग्य ती मदत करीत असतो. माझे म्हणणे मुद्देसूद व थोडक्यात सांगतो. खूप संवाद, चर्चा, भेटीगाठी, विचारविनिमय, कुठल्याही पाटर््यांना विनाकारण जाणे हा कालापव्यय आहे असे मी मानतो व ते करत नाही. मला पटणारी, रुचणारी कृतीच मी करतो. भावनांना थारा देत नाही. `मला असे वाटले', `माझा असा समज झाला', `मी करणार होतो' असे वाक्प्रचार मी बोलताना वापरत नाही. प्रचलित राजकीय घडामोडींबद्दल चर्चा वक्तव्य  करून, नको असलेले अडसर मी निर्माण करीत नाही. इतिहासात जमा असलेल्या व्यक्तींविषयी आज वादविवाद करणे मला जमत नाही. ऑफीस व धंद्याच्या कामात वक्तशीरपणा, तसेच वैयक्तिक जीवनात, सार्वजनिक कार्यक्रमात- पिचतच गेलो तर वेळेसाठी आग्रही असतो. शारीरिक व मानसिक दृष्ट्या तंदुरुस्त राहून शरीरसंपदा जोपासणे, टिकविणे मला आवडते.
संध्याकाळी ६-३०नंतर घराबाहेर पडणे, मित्रमंडळी जमवणे, पाटर््या अथवा हॉटेलात जाणे, कुठलीही पेये, जंक फूड - थोडक्यात बाहेरचे खाणे हे मी आवर्जून टाळतो. घरची पोळी भाकरी-भात, भाजी, आमटी  हेच माझे जीवन व जेवण. कुठल्याही स्टेजवरून आपल्याला न जमणारी खोटी आश्वासने देणारी संभाषणे करत नाही, ते मुळातच टाळतो. नको तिथे नको इतकी काटकसर करणे मला जमत नाही. शक्यतो अडलेल्या गोष्टींना मदत करतो. पण वाटेल ती मदत देत राहणे मला आवडत नाही.

माणसाची श्रद्धा हा मुद्दा अत्यंत हळवा आहे, जर कर्ता करविता कोणीतरी आहे असा आपल्याला विश्वास असेल तर, माणसांनी श्रद्धापूर्वक काम केलेच पाहिजे. त्यामुळे मला अखंड काम करावेसे वाटत गेले. त्यातून काय होईल ह्याचा विचार अथवा तशी स्वप्ने मी कधीच पाहिली नाहीत. माझा हिंदू धर्मावर जबरदस्त विश्वास आहे. सर्वांशी मिळून मिसळून वागण्याची कला माणसाला हिंदू जीवनपद्धतीत इतिहासकाळापासून मिळेल. स्वत: जगावे व दुसऱ्यालाही जगवावे. सर्वांना जमेल तेवढे ज्ञान द्यावे. प्रत्येकाला एक वेगळे व्यक्तिमत्त्व असते. सर्वांजवळ गुण-दोष असतातच, त्यातील दोषांचा विचार न करता त्यांच्या गुणांचा विचार करून ते वाढवावे तरच सर्वांशी जमते. मी शेकडो लोकांचे स्वभाव गेली ३५ वर्षे हाताळतो आहेच.
पुनर्जन्माविषयी अभ्यासाविना लिहिणे फारच अवघड आहे. तो असेलच तर मला तो नको, मुक्ती मिळावी हीच ईश्वराजवळ माझी प्रार्थना. भविष्य कधीही विचारायला जाऊ नये कारण विधिलिखित कोणी सांगणे फार अवघड आहे. प्रत्येक मासिकात भविष्य छापलेले असते. त्याकडे फक्त कुतुहल म्हणून पाहावे. काही काळजीच्या गोष्टी असतील तर जपावे, पण विचार करत बसू नये. घडणारे घडणारच, त्यामुळे येणाऱ्या प्रसंगातून आनंदाने बाहेर पडायला शिकावे. जीवनभर एक चांगले तत्त्व ठेवून वागायला शिकावे. शक्यतो ते ओलांडू नये. परिस्थितीनीच  जर बदलवले तर सांगता येत नाही. लेखन मला आयुष्यात शक्य झाले नाही. माझे जीवन हाच एक मोठा ग्रंथ होऊ शकेल. सामान्य जीवन - अत्यंत वाईट जीवन - आणि अत्यंत पराकोटीला गेलेले चांगले जीवन हे फक्त ईश्वराच्या भक्कम आधारानेच मिळते, याचा मूर्तिमंत अनुभव म्हणजेच मी! काही ग्रंथ आवडीने वाचतो. अनेकांची प्रवचने श्रवण करतो ते, एक चांगले आयुष्य जगावे म्हणून.
पैसा नसला की माणूस सर्वसामान्य जीवन जगत असतो. तो भरपूर मिळाला तरी त्याने आपले सामान्यपण न विसरता मिळालेल्या पैशाचा वापर व्यवस्थित करावा. सर्वसामान्यांसाठी काही करावे, आपल्या गरीब आप्तेष्टांसाठी काही करावे, कोणाचे वाईट करू नये तरच त्या पैशाचा उपयोग! आपण समाजाचे कोणीतरी लागतो हे विसरू नये. सर्वात प्रथम म्हणजे आपली (म्हणजेच पत्नी व आपण स्वत:) वृद्धपणाची सोय करावी. कारण या काळात यापुढे आपल्याला कदाचित कोणीही विचारणार नाही याची जाण ठेवावी.
मला जीवनात खूपच बरे-वाईट प्रचंड अनुभव आले. चांगली-वाईट माणसे भेटली, फक्त एकच गोष्ट सांगतो, अखंड कष्ट करणे, त्यापासून न ढळणे व स्वप्ने न बघणे, वाईट परिस्थितीत ज्यांनी मला विचारले त्यांना आता मी विचारणे एवढे महत्त्वाचे. वडील, पत्नी व तीन काका यांना मी विसरणे कधीच शक्य नाही. ईश्वराचे सर्वात जास्ती प्रेम माझ्यावर असावे असे मला नक्की वाटते.
संपर्क : गट नं.७८८, खेड-शिवापूर, ता.हवेली जि.पुणे
फोन : (०२०)६६४७१८००, मोबा.९८५०९८२५२४(लेले)

पुन्हा सैनिकच व्हावे
आमचा निकम परिवार म्हणजे `बेस्ट हिस्टॉरिकल फिक्शन' असे म्हणता येईल. आमचे घराणे पिढ्यान्पिढ्या सैनिकी सेवेशी एकरूप झालेले आहे. माझे मोठे बंधू ब्रिगेडियर, व धाकटे बंधू कर्नल अशा हुद्द्यांपर्यंत पोचले. मी सैनिकी सेवेत दाखल झालो तरी क्रॅप्टनच्या पदापर्यंत गेलो; पण आमच्या वडिलांनी त्यांच्या निवृत्तीनंतर उभारलेल्या संस्थेकरिता आणि सहकार क्षेत्रातील कामगिरीकरिता मला त्या पदावरून नोकरीला रामराम करावा लागला. त्यानंतर माझ्या आयुष्याची पुढची वर्षे मी वडिलांचा वारसा म्हणून सैनिकी सेवाभाव ठेवूनच वेगळया क्षेत्रांमध्ये काम करीत आहे.
माझे वडील कर्नल रामराव निकम यांनी त्यांच्या लष्करातील निवृत्तीनंतर सैनिकांच्या संघटनेचे वेड घेतले, आणि कामाच्या पूर्ततेसाठी ते झगडले. त्यांच्या स्वप्नाला आकार देण्यासाठी माझी आईसुद्धा त्यांची सावली होऊन काम करीत असे. निवृत्त सैनिकांसाठी, त्यांच्या भागभांडवलावरती त्यांनी सहकारी बँक उभी केली. त्याचप्रमाणे राज्य पातळीवरील माजी सैनिक संघटना व सीएसडी क्रॅन्टीन अशा संस्था साताऱ्यात निर्माण केल्या. त्या सर्व कामांचा वारसा माझ्याकडे येणे हा नियतीचाच काही संकेत असावा.

७ मे १९५४ हा माझा जन्मदिवस. घराण्याच्या परंपरेनुसार, माझ्या शिक्षणानंतर मी सैन्यात दाखल झालो. परंतु याच दरम्यान निवृत्त झालेल्या वडिलांचा संघटनक्षेत्रातील व्याप खूप वाढत होता. त्यांना त्यांच्या पत्नीची साथ होतीच, तरीसुद्धा घरातील विश्वसनीय आणि कार्यप्रवृत्त असा कार्यकर्ता हवा होता. मी एका वेळी रजेवर घरी आलेलो असताना मी त्यांची ही गरज ओळखली. त्यांनी माझ्यापुढे प्रस्ताव ठेवण्यापूर्वीच मी माझ्या पत्नीचा सल्ला घेतला व त्या रजेच्या काळातच त्यांच्या कामकाजात लक्ष घालण्यास सुरुवात केली. त्यांच्या हाताखाली मी अक्षरश: उमेदवारी केली. माझे पिताजी म्हणून मी काही स्तुतीपर बोलतो असे नव्हे; तर त्यांच्या कामाचे निरीक्षण करतच मी घडत गेलो ही वस्तुस्थिती आहे. प्रत्येक निवृत्त सैनिकाला समजून घेणे ही त्यांची खासीयत होती, आणि माझ्या दृष्टीने ती अतिशय अवघड साधना होती. वडिलांच्या सेवेला सर्वोत्तम महत्त्व मिळाले.  त्यांना आमदारकीही मिळाली. त्या सहा वर्षांच्या कालखंडामध्ये माझे अनुभव, आणि मुख्य म्हणजे माझी मनोधारणा सहकार क्षेत्राला अनुकूल अशी बनली. माझे वेगळे क्रॅरॅक्टर तयार झाले आणि वडिलांच्या पश्चात आपोआपच त्यांची जागा माझ्या वाट्याला आली.
माझ्या सैनिकी आयुष्याच्या ऐन मध्यावरच ती सेवा खंडित करून मी या वेगळयाच क्षेत्रात उतरलो. एका अर्थी ऐन उमेदीच्या काळात करिअरच्या दृष्टीने मी अंधारातच उडी घेतली होती. पण या अंधारातील चाचपडण्यातून पुढच्या काळात माझे सारे जीवन उजळून निघाले. राज्यव्यापी सैनिक संघटनेचा प्रमुख म्हणून मी आता देशाच्या संरक्षण मंत्र्यांसमवेत चर्चा करू शकतो, इतक्या टप्प्यावर पोचलो आहे.

सध्या माझ्याकडे कर्नल आरडी निकम सैनिक सहकारी बँकेचे अध्यक्षपद, महाराष्ट्न् माजी सैनिक व पेन्शनर्स संघटनेचे अध्यक्षपद, ऑल इंडिया एक्स सर्व्हिसेस वेलफेअर असोसिएशन(नवी दिल्ली)चे उपाध्यक्षपद अशा जबाबदाऱ्या आहेत. निवृत्त सैनिकांच्या संपर्कासाठी आणि प्रबोधनासाठी `फौजी वार्ता' हे नियतकालिक चालविले जाते. त्याचे संपादन माझ्याकडे आहे.  आमच्या सैनिक बँकेचे कार्यक्षेत्र संपूर्ण भारतात आहे. पण विशेष करून महाराष्ट्नत त्या बँकेच्या अनेक शाखा आहेत. हा व्यवसाय म्हणून असला तरी सेवाव्रत म्हणून बँकेच्या कामाला अधिक प्राधान्य आहे.
साताऱ्यात सैनिकनगरमध्ये आमचा बंगला आहे. तसेच वडिलार्जित शेतीही आहे. जन्मजात सातारकरच असल्यामुळे आणि आता कामाचे ठिकाणही हेच असल्यामुळे मला सर्वात जास्त सातारा हेच ठिकाण आवडते. कामाचा खूप व्याप आजही माझ्यामागे असला तरी माझ्या दैनंदिनीत पहाटे पत्नीसमवेत फिरायला जाणे, स्नान-पूजाअर्चा यालाही महत्त्वाचे स्थान असते. ते आटोपल्यानंतर दिवसभराच्या कामाची आखणी आम्ही दोघेही करून घेतो. बँकेचे अध्यक्षपद हे केवळ नामधारी आहे असे मी समजत नाही; तर ठीक अकरा वाजता मी बँकेच्या कार्यालयात पोचतो आणि पूर्ण सहभागी होतो. बँकेच्या व संघटनेच्या कामकाजात माझा पूर्ण दिवस जातो. फोन आणि मोबाईल या माध्यमांतून माझा सतत संपर्क, आणि प्रत्यक्ष गाठीभेटी सुरू असतात.
सैनिकी पेशातच आमची पाळेमुळे असल्यामुळे माझ्या सर्व कामांवर सैनिकी शिस्तीची छाप असते असे माझे परिचित म्हणतात. पण मला सैन्यातील कडवेपणाइतकाच सहकारातील सेवाभाव आवडतो, आणि मी तो मनापासून जपतो. विशेषत: सैनिक, आणि समोर आलेल्या कुणाचेही काम व्हावे अशी माझी दृष्टी असते. परंतु भ्रष्ट राजकारणी मंडळी मी आवर्जून टाळतो.
वडीलधाऱ्या मंडळींच्या संपर्कात राहणे मला खूप आवडते. त्यांच्याबरोबर काही महत्त्वाच्या विषयांची, ज्ञानाची देवाणघेवाण करण्यात मला आनंद वाटतो. मी स्वत: धार्मिक वृत्तीचा आहे पण धार्मिक कर्मकांडांचे अवडंबर माझ्याकडे नाही. भविष्य आणि ज्योतिष यावर माझा विश्वास नाही. जो भविष्य घडवतो तो माणूस, अशी माझी व्याख्या आहे. वाचन आणि इंटरनेट यांतून मी खूपसा संपर्क ठेवतो. इंग्रजी वृत्तपत्रे आणि नियतकालिकांचे वाचन हा माझ्या दिनक्रमाचा एक भागच आहे. विशेषत: बँकींग विश्वातील साऱ्या घडामोडी आणि नवी माहिती समजून घेण्याचा माझा प्रयत्न असतो. संगीत ऐकणे हाही माझा एक वीकपॉइंर्ट आहे.
खाजगी किंवा सार्वजनिक जीवनात, तसेच माझ्या सहकारी बँकींग क्षेत्रातही अवैध मार्गाचा अवलंब आतापर्यंत मी कधीच केला नाही. आदर्शाची सैनिकी परंपरा मी काळजीने जपत असतो. सध्या प्रापंचिक दृष्टीने मी सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. माझा मुलगा आणि मुलगी दोघेही आपापल्या संसारात आहेत. आम्ही दोघेच पतीपत्नी घरी असल्यामुळे सैनिककल्याण या एकाच कामकाजात आम्ही दोघेही रममाण असतो. सैनिकांच्या पत्नींचे गावोगावी बचतगट तयार करून त्यांच्या कामात माझी पत्नीही रमते. असे असल्यामुळे आम्ही, म्हटले तर निवृत्त आहोत, आणि तसे दिवसभर सतत कामात गुंतलेलेही आहोत. माझ्या वडिलांचे संस्कार मला सतत प्रेरणा देतातच, पण माझ्या पत्नीची साथही मिळते हे महत्त्वाचे. हे सारे मुद्दाम घडविले असे नव्हे तर घडतच गेले असे म्हणता येईल.
सहकार क्षेत्राबद्दल आज सर्वत्र तक्रारी ऐकू येतात. मला स्वत:ला खूप चांगले अनुभव आले. कार्पोरेट विश्वाला खूप काही करता येते, यावर माझी पूर्ण श्रद्धा असल्यामुळे बरेच काही साध्यही करता आले. माझी सैनिकी सेवा खंडित झाली खरी, पण मी योजून स्वीकारलेला मार्ग बराचसा यशस्वी झाला. याचे मला मनापासून समाधान आहे. देवदयेने, आणि म्हटले तर माझ्या प्रयत्नानेसुद्धा माझे प्रकृतीस्वास्थ्य उत्तम आहे. साठी उलटून गेली तरी मला अजूनही कर्तव्याच्या दृष्टीने, `ज्येष्ठ' झाल्याची भावना आलेली नाही. सैनिकांबद्दलच्या काळजीने मी मनापासून काम करतो. देशासाठी आयुष्य देणाऱ्या सैनिकांच्या निवृत्त जीवनात आनंद यावा यासाठी झटून काम करणारा मीही एक आनंदयात्रीच आहे.  या देशात अच्छे दिन येणार आणि भारत सर्व अर्थांनी महासत्ता होणार यावर माझा विश्वास आहे. तथापि एवढ्या विश्वासाने काम भागणार नाही; झटून प्रयत्न तर केलेच पाहिजेत.
प्रत्यक्ष सैनिकी दळात शेवटपर्यंत काम करता आले नाही तरी, सैनिकी परंपरेतच माझी जडणघडण झालेली असल्यामुळे, मिळालेल्या क्षेत्रात शिस्तबद्ध चौकटीतच मी जगलो. तथापि देशरक्षणासाठी आघाडीवर लढण्याची खुमखुमी मला कधीतरी आयुष्याचे अपुरेपण दर्शविते. ते काम राहून गेले असे मला कधीतरी वाटते. त्यामुळे पुढचा जन्म असेलच तर तो सैनिकाचाच मिळावा!
संपर्क : U. R. Nikam, द्वारा-आरडी निकम सैनिक सहकारी बँक,
छ.शिवाजी महाराज सर्कल, पोवई नाका, सातारा ४१५००१
फोन :(०२१६२)२३११५६,२३३९१३, ९८२२०४४१५५

मी खूप बदललो..
१९४८ सालच्या फाळणीच्या वेळी निर्वासित म्हणून सिंध प्रांतातून भारतात आलेल्या माझ्या वडिलांनी, पोटामागे मुंबई-कोल्हापूर अशी भ्रमंती करत सांगलीत पाऊल टाकले आणि तिथे आयकर विक्रीकर सल्लागार म्हणून व्यवसाय सुरू केला, साधारण त्याच सुमारास म्हणजे १४ डिसेंबर १९६०ला माझा जन्म झाला. आज मी साठीच्या उंबरठ्यावर आहे पण व्यवसायातून मात्र निवृत्ती पत्करून, आजपर्यंत `जोडोनिया धन' यापुढे `उदास विचारे वेच' करण्यासाठी पूर्ण दिवसभर व्यस्त राहतो.
१९८० पासून वडिलांच्या व्यवसायात मी रुजू झालो. त्यांच्याप्रमाणेच सचोटीने आणि प्रामाणिकपणे करसल्लागारीचा व्यवसाय केला आणि खूप वाढविला. माझा मित्र अरुण शहा याच्यासोबत जमीन विकसित करण्याचा(लॅन्ड डेव्हलपमेंट) व्यवसाय केला. त्यात भरपूर यश, पैसा आणि प्रसिद्धी मिळाली. पूर्ण विकसित अशा वसाहतींचा प्रयोग सांगली भागात आमच्या फर्मने प्रथमच केला.
माझ्या जन्माच्या वेळी आमच्या कुटुंबाची परिस्थिती सामान्य म्हणता येईल अशी होती. तरीही आईवडिलांच्या छत्राखाली माझे बालपण मजेत होते. उत्तम शाळा, भरपूर खेळ, पै-पाहुण्यांची रेलचेल, कुठलेही बंधन नसलेले कोडकौतुक असा सर्व आनंदीआनंद होता. शाळेचे आणि कॉलेजचे शिक्षण पार पडल्यानंतर वडिलांच्या धंद्यातच शिरायचे म्हणून मी वकिलीला प्रवेश घेतला. आणि त्यानंतर व्यवसायात उतरलो. माझ्या सर्व चंगीभंगी वर्तनामुळे सुरुवातीला परदेशाची ओढ खूप होती. इंग्लंडला जाऊन स्थायिक व्हायचे अशीही महत्त्वाकांक्षा मी बाळगली होती. पण शेवटी इथले सुख इथेच मोठे आहे याची जाणीव मला झाली. पुढच्या आयुष्यात मी जवळजवळ सगळे जग फिरलो आणि ते पाहिल्यानंतर, माझा उमेदीच्या वयातील इथेच राहण्याचा निर्णय किती बरोबर होता हे मला पटले.
वडिलांचा व्यवसाय उत्तम जम बसलेला होता. त्यामुळे मी त्यांच्या सोबतीला येताच नवे ऑफीस, नवे फेर्नचर असा माझा थाट सुरू झाला. हातात बऱ्यापैकी पैसाही खेळू लागला. माझे वडील घरापासून ऑफीसकडे किंवा गावात सर्वत्र पायी हिंडत असत. खिशात चार शेंगा असल्या की त्यांना समाधान वाटत असे. त्यांच्या आणि आईच्या बरोबर सिनेमाला जाणे हे मला लहानपणापासून आकर्षण होते. मी धंद्यात आल्यानंतर दुचाकी आली, चारचाकी आली, बंगला झाला. लक्ष्मीचा वावर सर्वत्र सुरू झाला. पुढे जमिनीच्या प्लॉटचा व्यवसाय केल्यामुळे आर्थिक स्थिती वेगाने सुधारत गेली.
निसर्गनियमानुसार वेळच्या वेळी लग्नकार्य, मुलेबाळे झाली. बरीचशी गुंतवणूकही झाली. माझी मुले तर तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्मली असे म्हणायला हरकत नाही. लहानपणी जसे मला परदेशीचे वेड होते तसेच विदेशी वस्तूंचेही आकर्षण होते. `बडे बाप का बेटा' म्हणून मी त्या प्रकारचे जीवन मजेत जगू शकलो असतो, आणि कुठे कुणास ठाऊक पण- कदाचित वहावतही गेलो असतो. एकदा मी आमच्या काही मित्रांसमवेत चारचाकी गाडी घेऊन भटकंती करण्यासाठी गोव्याला चाललो होतो. सुसाट निघालेली गाडी अचानक चार पलट्या खाऊन शेतात जाऊन पडली. आम्हा मित्रांना किरकोळ खरचटण्यावर भागले, पण गाडीचा चेंदामेंदा झाला. इतके होऊनही घरी न कळवता मी पोलीसवाल्यांचीसुद्धा `भागवाभागवी' करून घरी आलो. खिसा गरम असल्यामुळे असले पराक्रम करण्यात एक प्रकारे मस्तीची मौज मी अनुभवत असे.
पण त्याचबरोबर मनात कुठेतरी वेगळी खदखद असे. चांगल्या आणि योग्य गोष्टी फार उशीराच का कळतात हा एक प्रश्न मला नेहमी पडतो. म्हणजे असे की; पोट सुटल्यानंतरच उपवास करावा असे वाटू लागते, वजन शंभरीकडे झुकल्यावरच व्यायामाचे महत्त्व कळते, रक्तदाब वाढल्यावरच चिडचिड करू नये असे मनात येते, एका घराचे दोन तुकडे झाल्यावरच टाकून बोलायला नको होते हे लक्षात येते! हे असे का होते? पट्टीचा मांसाहार करणारा आणि रोज एकदोन पेग मारणारा माणूस त्याला एखादा सौम्यसा अॅटॅक आल्यावरच त्या गोष्टी आटोपत्या घेतो. वास्तविक बालपणापासून सर्वांचे शिक्षण होते, संस्कार चांगले होतात पण ते सर्वार्थाने उपयोगी पडतातच, असे का होत नाही? `आधीच समजले पाहिजे' अशी काहीतरी रचना नियतीने मेंदूत करायला हवी होती; म्हणजे सर्वांचेच सर्व भले झाले असते! पण तसे होत नाही.

धंदा आणि पैसा यांचे गणित बरोबर मार्गस्थ झाले असताना माझी काही स्नेही मंडळी आणि हितचिंतक खूपच निकट आले. त्यांच्या नादाने मी काही मोठ्या लोकांच्या सहवासात आलो. लोकांच्यासाठी काहीतरी उसळून करावे अशी खुमखुमी असताना, मी ग्राहक पंचायतीसारख्या भांडखोर संघटनेकडे ओढला गेलो. या तक्रारखोरीतून फार मोठे सामाजिक कार्य उभे राहू शकते हे कालांतराने माझ्या लक्षात आले. बिंदुमाधव जोशी यांचे एक अप्रतिम भाषण मी ऐकले आणि माझी सारी मनोभूमिका बदलली. हिंडणे-फिरणे-टापटीपीत राहणे-चैन करणे या वातावरणात मला समाधान वाटेनासे झाले. गोरगरीब दीनदुबळयांची काळजी घेणे अतिशय आवश्यकच आहे हेही मला जाणवू लागले. तसा हळवेपणा आणि सहानुभूती मला प्रथमपासून होती हे खरे. राजेश खन्नाचा `सच्चा झूठा' असा एक सिनेमा होता. एकीकडे त्याला सत्कार्याची ओढ असे, तर दुसरीकडे चैनबाजीत तो रममाण होत असे. या द्विधा मन:स्थितीत माझीही ओढाओढ होत असे. अलीकडे तर चैनबाजीचा रस्ता पूर्ण बंद केला गेला आहे.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे काम हा माझ्या सामाजिक कार्याचा प्रारंभ होता. त्यानिमित्ताने सुरुवातीला जिल्ह्यात प्रवास सुरू झाला. लोकांच्या गाठीभेटी आणि स्वभावाचे पैलू मला वाचता आले. माझ्या कामाची तडफ आणि झपाटा असल्यामुळे मी सांगली-कोल्हापूर विभागाचा संघटनमंत्री आणि लवकरच प्रांत कार्यकारिणीवर काम करू लागलो. प्रवासाचे, अनुभवाचे आणि अभ्यासाचे क्षेत्र पूर्ण महाराष्ट्नत व्यापले. देशातही प्रवास झाला. राज्यस्तरीय परिषदेवर काम केले. विविध समित्यांवरही गेलो. त्याचबरोबर माझे अशाच सेवाभावी वृत्तीचे ज्येष्ठ मित्र माझ्यासमवेत असत. त्यांच्यासोबत असंख्य विषयांवर चर्चा आणि टवाळखोर चिंतनही होत असत. मोठ्या लोकांच्या भेटीगाठी घडत गेल्या. मी स्वत: अभ्यास करून सभा गाजवू लागलो.
एकीकडे लोकांना ब्रह्मज्ञान सांगत असताना आपण कोरडे पाषाण राहू नये असा हेतूपुरस्सर प्रयत्न सुरू झाला. त्यातून समाजाचे काम किती झाले हे माहीत नाही पण माझ्यात मात्र खूप बदल झाले. माणसाचा स्वभाव बदलत नाही असे म्हणतात पण माझ्या बाबतीत ते खरे नाही. कदाचित मूळ स्वभाव आणि प्रवृत्ती तशीच असेल, पण वर्तन आणि विचार यात मात्र निश्चितच बदल झालेला दिसेल. माझा प्रारंभकाळ ज्या कोणी बुजुर्ग व्यक्तीने पाहिला असेल त्याला `तोच का हा किशोर' असे आज वाटू शकेल.

पूजा-देवधर्म अशा बाबतीत मी पूर्णत: नास्तिक आहे. आमच्या घरी प्रशस्त देवघर आहे. वेळप्रसंगी धार्मिक कार्यक्रम असेल तो साग्रसंगीत करतो. आमची मुंज हरिद्वारला झाली. पत्नी-आई यांच्यामुळे मी त्यात रमतो, पण श्रद्धा कमीच! पण काही घटना अशा घडल्या की मलाच फेरविचार करण्याची पाळी आली. एका रॉकेल व्यापाऱ्याच्या दुकानाची विक्रीकर विभागाने तपासणी केली. गडबडगोंधळाचा बराच व्यवहार सापडला. त्याला वाचविण्याचा बराच प्रयत्न, मी त्याचा वकील या नात्याने केला. शेवटी त्यानेच स्वत: मोठ्या साहेबाला भेटण्याविषयी माझ्याकडे विनंती केली. मोठ्या साहेबाकडे जात असताना वाटेत गजानन महाराजांचे एक मंदिर होते तिथे तो मला घेऊन गेला. दर्शन करून एक श्रीफळ आणि शाल त्याने मला देऊन नमस्कार केला आणि तसाच एक संच साहेबांकरिता म्हणून घेतला. साहेबाच्या केबिनमध्ये गेल्यानंतर एक शब्दही न बोलता त्याने साहेबांच्या हाती श्रीफळ दिले आणि शाल पांघरली. नमस्कार करून तो बाहेर आला. यापूर्वी चार वेळा चर्चा करून देखील त्याला, कोणतीही सवलत मिळणार नाही या निर्णयाशी साहेब आले होते, त्याच साहेबांनी सहीसाठी कागद पुढे ठेवले आणि `त्याचे काम झाले असे समज' असे मला सांगितले. याला काय म्हणायचे याचे उत्तर माझ्याकडे नाही.
दुसरी अशीच घटना म्हणजे माझे वडील मृत्यूपूर्वी दोन वर्षे अंथरुणावरच होते. एका ज्योतिष्याने शनीशिंगणापूरचे दर्शन घेऊन यावे असे पत्नीस सांगितले होते. तिची साईबाबांवर श्रद्धा होती म्हणून आम्ही या दोन्ही देवस्थानी गेलो. मी तिकडे साईबाबांचे दर्शन घेत होतो त्याचवेळी इकडे वडिलांनी शेवटचा श्वास सोडला. या घटनेला केवळ योगायोग असे मानताना मी फार कठोर होऊ शकत नाही.
या सर्व अनुभवांच्या गाठोड्यातून माझे कुटुंबही सावरता आले. तिथेही अनेक चढउतार झालेच. सासू-सुनांचा चिरंतन झगडा आमच्या घरात जास्तच टोकाला गेला. एकाच बंगल्यात आमची दोन कुटुंबे वेगळी राहू लागली. तरीसुद्धा या शापातून सुटण्यासाठी तटस्थ आणि शांत वृत्ती जोपासण्यातच हित आहे हे मला समजू लागले. सृष्टी बदलण्याचा प्रयत्न अपुरा ठरला तर दृष्टी बदलावी, हे इष्टमित्रांचे मत मला कळू लागले आणि जमूही लागले. तरीसुद्धा बरीचशी नाती आणि मैत्री हे स्वार्थासाठीच असतात असे माझ्या सिंधी स्वभावाला वाटते. दुसऱ्याकडून माझा स्वीकार किंवा मी दुसऱ्याला टाळणे, हे सगळे व्यक्तीच्या उपयोगितेवर ठरते. तत्त्व आणि व्यवहार यांची व्याख्या प्रत्येकजण परिस्थितीनुसार बदलत असतो.
सुदैवाने मला व्यवसाय, व्यापार आणि सामाजिक क्षेत्रातील सर्व सहकारी फार चांगले मिळाले. मी पत्नीबरोबर संसार केला तितकाच उत्तम संसार मी या सर्वांशीही केला. पुष्कळशी कामे स्वत: करण्याऐवजी इतरांकडून करवून घेण्याचे कौशल्य माझ्याकडे आहे याचा मला रास्त अभिमान वाटतो.
आपल्या बोलण्याचा व्यक्तिगत संबंधावर खूप परिणाम होतो असा अनुभव आला. जे सांगायचे किंवा विचारायचे असते त्याकरिता वापरण्याचे शब्द आणि त्याचा उच्चार यांवर प्रतिक्रिया अवलंबून असते. नातीसंबंधात त्यामुळे फरक पडतो. आपली चूक लगेच मान्य करून माफी मागण्याने बरेचसे प्रश्न सुटतात. मला पत्नी `टॉण्टबहाद्दर' म्हणते. पण माझ्या मनात केवळ चेष्टामस्करी आणि सहजवृत्ती एवढेच असते. परिस्थितीला भिडणे मला आव्हानात्मक वाटते आणि मी तिथे कोणावरही टीका न करता ते आव्हान पेलतो.

माझ्या लग्नाला पंचवीस वर्षे झाली, तेव्हापासून एका वेगळयाच विश्वात मी रमलो आहे. त्यावेळी नुकतेच माझ्या वडिलांचे निधन झाले होते. हे दोन्ही योग साधून समाजासाठी काही समर्पण करण्याचे मी ठरविले, आणि माझ्या भाग्यामुळे माझ्या पत्नीची आणि मुलांचीही साथ मिळाली. आजपर्यंत माझ्याशी व कुटुंबाशी एकरूप झालेले माझे काही मित्रही त्यात सल्लामसलत करतात. त्यामुळे व्यवसायातून हलके हलके बाहेर पडत, मी माझ्या या स्वतंत्र सामाजिक कार्यात समरस झालो आहे. मी समाजाकडून जमवलेली संपत्ती `अर्घ्यदान' म्हणून समाजालाच अर्पण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामधून वेगवेगळी कामे सुरू असतात, आणि त्याच्यासाठी दरवर्षी लाखो रुपये खर्चही होतात.
या सर्व संपन्नतेला साजेल असे `सोबती' आम्हा पतीपत्नीकडे आले आहेत. मला रक्तदाबाचा विकार आणि पत्नीला भरपूर साखर आहे. पैसा सुखासुखी मिळत नाही म्हणतात. पूर्वीची आमची भाड्याची घरे आम्ही विसरत नाही. दोन रुपयांची तीन तिकिटे काढून आईवडिलांसोबत `आनंद' सिनेमा पाहिला होता, आणि आज मल्टीप्लेक्समध्ये दीडशे रुपयाप्रमाणे तिकीटे काढून `बाजीराव मस्तानी' मुलाबाळांसह पाहतो. पण `आनंद'चा आनंद मिळू शकत नाही.

लहानपणापासून पहाटे उठण्याची मला सवय आहे. सकाळी वृत्तपत्रांचे व्यसनच आहे. बऱ्यापैकी व्यायाम घेतो. संपूर्ण दिवसाचे नियोजन दिवस उगवतानाच करतो. छोटीशी डायरी सतत खिशात असते. कामाच्या नोंदी मी विसरत नाही. पत्नीने बाजारातून लिंबू आणायला सांगितले, किंवा एखाद्याला लाख रुपये द्यायचे असले तरी दोन्हींच्याही नोंदी मी टिपून घेतो. त्यामुळे कामाचा उरक पाडूनही मला इतर `उचापतींना' सवड मिळते. `बिझिएस्ट मॅन हॅज टाईम फॉर एव्हरीथिंग'-असे म्हणतात. कामकाजाच्या वेळा, जेवण, भेटीगाठी, हौसमौज आणि गप्पासुद्धा मी तंतोतंत वेळेवर करतो. विसरले, राहिले या शब्दांना माझ्या कोशात जागा नाही. होय किंवा नाही एवढ्याच शब्दात मी सर्व कामे स्वीकारतो. `पाहू, करू, बघू' असे मला चालत नाही. या सगळयामुळे संध्याकाळी आठ वाजता मात्र बॅटरी डाऊन होते आणि त्यानंतर लवकर झोपतो. माझे लाडके वाक्य म्हणजे, `तुम्ही ज्यावेळी चर्चा करत असता, त्यावेळी मी काम करत असतो.'

माझ्या सामाजिक समर्पण निधीपैकी कोणतीही देणगी बांधकाम, मंदिर, कळस यासाठी देत नाही. माझ्या मते तो निरर्थक खर्च आहे किंवा ज्याचा त्याने तो श्रद्धेने करावा. आमच्या ट्न्स्टची मोठी इमारत, एखादी संस्था, किंवा पतसंस्था असल्या भानगडीत मी पडत नाही. याउलट ज्या संस्था-संघटना सेवाक्षेत्रात काम करतच आहेत त्यांना, त्यांच्या कार्याला उठाव मिळेल अशी मदत दिली जाते. शालेय शिक्षणाचा स्तर उंचावण्यासाठी जे शक्य आहे ते करत राहण्याचे मी यापुढे ठरविले आहे. त्यासाठी काही सहकारी, काही मार्गदर्शक आणि काही स्वयंसेवक असा एक संघ माझ्या सभोवती आहे. एकदा पैसा कमावून सगळे स्थिरस्थावर झाल्यानंतर पुढे येणारा पैसा उपयोगाचा नाही, हे समजून घ्यायला धाडस लागते असे इतर लोक म्हणतात. मला ते सहज जमले. मिळविण्याच्या आनंदाइतकाच देण्याचाही आनंद असतो हे मी अनुभवतो आहे. माझी आर्थिक गणिते अगदी स्पष्ट असतात. सध्या बहुतांश वेळ या कार्यातच जातो.
गृहस्थाश्रमातून पूर्णत: बाहेर पडणे सध्याच्या काळात व्यवहार्य वाटत नाही. तरीही शक्य तितका अलिप्त राहण्याचा प्रयत्न करतो. विवाहित मुलगा माझ्या व्यवसायात आला आहे. मुलीचे लग्न होऊन तीही सुखाने नांदते आहे. मध्यमवर्गी ब्राह्मण कुटुंबातील इंजिनियर असलेला माझा जावई लेकीला साजेल असा आहे आणि माझी मुलगीही खूश आहे.
वानप्रस्थाश्रम हे मी फक्त ऐकले आहे. तो स्वीकारण्याचा टप्पा कोणता हे माहीत नाही. पण माझ्या पन्नाशीनंतरच मी त्या प्रकारचे जीवन स्वीकारले आहे. माझी आई एेंशी वर्षांची आहे. तिचे प्रकृतीमान ठीक आहे. लवकरच घरचे नातवंडही आमच्या घरी येईल. एकूण सारा कृतार्थ संसार करून मी आनंदाने समाजासाठी काही करता येईल अशा उमेदीत आहे. आणि त्यात मला पूर्ण समाधान आहे. आजपर्यंतच्या आयुष्यात पैसा तर कमावलाच पण त्यापेक्षा फार मोठी माणसे मला भेटली, हा माझा अमोल ठेवा आहे असे मला वाटते.
संपर्क : Kishor Lulla, अभ्यंकर कॉम्प्लेक्स, आमराई रोड, सांगली ४१६४१६
फोन : (०२३३)२६२५०४३ मोबा.९४२२४०७९७९


शाश्वत ऊर्जेचा शोध
श्रेष्ठ उद्योगपती जेआरडी टाटा हे अंत्यसमयी जिनीव्हा स्टेट हॉस्पीटलमध्ये दाखल होते. नवल टाटा यांची पत्नी सिमोनी ही त्यावेळी त्यांच्या सोबतीला होती. जेआरडींना वरचेवर ग्लानी येत होती. सावधपणा आणि गंुगी अशा मध्यरेषेवर त्यांची आवर्तने सुरू होती. मध्येच एकदा त्यांनी टक्क डोळे उघडले. त्यांच्या डोळयात चमक होती. सिमोनीला ते म्हणाले, ``एका नव्या विश्वाच्या उंबरठ्यावर मी उभा आहे. समोरचं सगळं विश्व मला अतिशय चित्तवेधक दिसतं आहे.'' जेआरडींचे हे अखेरचे शब्द. यापुढच्या जन्मात त्यांना लाभणाऱ्या विश्वाचे दर्शन कदाचित त्यांना या जन्माच्या अंतकाळी घडले असावे की काय माहीत नाही. भारतीय संस्कृतीचा पुनर्जन्मावर विश्वास आहे. टाटांच्याइतका भाग्यवान मी नसलो तरी, पुनर्जन्म असलाच तर काय काय पाहावं याची चित्रे मी मनोमनी आजही रंगवत असतो.
त्या नव्या विश्वात माझ्याकडे देण्यात येणाऱ्या कर्तव्यांची पूर्ती केलीच पाहिजे. पण त्याव्यतिरिक्त; निसर्गाचे महारौद्र स्वरूप मनात साठवीत कैलासमानस यात्रा पायी करावी, जगन्मान्यता असलेल्या लिओ टॉलस्टॉय या रशियन साहित्यिकाच्या कर्मभूमीत फिरून त्यांच्या समाधीचं दर्शन घ्यावं, अभिजात प्रतिभेने जगाला भुरळ घालणारे सिद्धहस्त नाट्याचार्य शेक्सपिअर यांच्या `स्ट्न्ॅटफोर्ड अपॉन इव्हा' येथील घराला भेट द्यावी, कर्नाटक-केरळच्या सीमेवर मदुमलाईच्या जंगलात हत्तींचा संचार पाहावा, नरभक्षक वाघांची शिकार करण्यासाठी जिम कार्बेट फिरलेल्या पाऊलवाटांवर हिमालयातील कुमाऊ टेकड्यांत हिंडावे, अनेक श्वापदांची वसती असलेल्या आसामच्या जंगलांमधून पायपीट करावी, वृक्षराजीने नटलेल्या ब्रह्मपुत्रेच्या दऱ्यांमधील नितांत सुंदर निसर्गाचे आकंठ पान करावे.... अशी कितीतरी मनोचित्रे माझ्या डोळयासमोर तरळत आहेत. याच जन्मामध्ये कोयना आणि गगनबावड्याच्या घनदाट अरण्यातून मी भरपूर हिंडलो. त्यानेही मन अतृप्त राहिले आणि त्याचाच पुढचा टप्पा म्हणून अशा निसर्गभ्रमणाची ओढ मला पुढच्या जन्मासाठी लागली असावी.

भारताच्या ग्रामीण शेतीप्रधान खेड्यांपैकी एक असलेले सांगली जिल्ह्यातील तासगाव हे माझे गाव. १९३४साली तिथे एका शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला. माझे वडील व्यायामाचे भोक्ते, खरेखुरे विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. बालपणी शालेय शिक्षण सुरू असताना स्वातंत्र्यचळवळीचे मंतरलेले दिवस मला पाहता आले. १९४२ ते ४७ या कालात राष्ट्न्सेवा दलाच्या बालक चळवळीत मी भाग घेतला. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा मी तेरा वर्षांचा होतो. आईवडिलांची, गुरुजनांची आणि स्वातंत्र्यलढ्यातील ज्येष्ठ मंडळींच्या संस्कारांची शिदोरी माझ्या तारुण्यास लाभली होती. त्यामुळे बलशाली भारत निर्माण करण्याची स्वप्ने पाहात माझी वाटचाल सुरू झाली.
सांगलीच्या न्यू इंजिनिअरिंग(आताचे वालचंद) कॉलेजमधून १९५५ साली स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी घेऊन मी मोठ्या जगात प्रवेश केला. कॉलेजमध्ये शिकत असताना माझ्या पिढीचे वाचन खूप होते. भारतात दरडोई विजेच्या वापराचे जे प्रमाण आहे, त्याच्या कित्येक पटीने जास्त वीज अमेरिकन माणूस वापरतो असे आम्हाला समजत असे. त्यामुळेच अत्यंत श्रीमंत असलेले अमेरिकन राष्ट्न् जगात बलाढ्य आहे असा गवगवा सर्वत्र होता. भारत बलशाली व्हायचा असेल तर आपल्याकडेही विजेचे उत्पादन प्रचंड प्रमाणात वाढले पाहिजे, असे आम्ही मनाशी योजत असू. त्याच सुमारास कोयनेचा जलविद्युत प्रकल्प उभारणीचे काम सुरू झाले होते. आमच्या गावापासून तसे जवळ अंतर होते आणि शिवाय कृष्णा-कोयनेच्या पाण्याचीही एक प्रकारे ओढ होती, त्यामुळे देशाच्या उभारणीचा प्रकल्प म्हणून मी कोयना धरण प्रकल्पावर दाखल झालो. एका नव्या उमेदीच्या आपल्या विचारांना बळकटी मिळावी, म्हणून इथे काम करण्याचे मी मनापासून स्वीकारले होते. या प्रकल्पापैकी पोफळी विभागात मी दाखल झालो.
पंचवीस किलोमीटरच्या परिसरात पृथ्वीच्या पोटात पसरलेल्या त्या अवाढव्य प्रकल्पात काम करताना, मी कितीतरी प्रकारचे प्रचंड अनुभव गाठीशी बांधले. संशोधन आणि विकास या दिशेने विस्ताराचे काम कसे करावे हे मी तिथे शिकलो. माझ्या वरिष्ठ आणि सहकारी इंजिनियर्स आणि तंत्रज्ञांच्या सहवासात काम करताना, अशक्य हा शब्द माझ्या शब्दकोशातून नाहीसा झाला. परंतु बारा वर्षे तिथे काम केल्यानंतर, माझा नव्या युगातील या ऊर्जास्रोताबद्दल भ्रमनिरास होऊ लागला. वीज माणसाला संकटातच टाकणारी आहे असे मला वाटू लागले. एवढ्या मोठ्या प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी बऱ्याच गोष्टींचे नुकसान होते, निसर्गाचे बळी द्यावे लागतात, माणसाचा हपापा वाढतो आणि एकूण मनुष्यत्वाला बाधा येते असे जाणवू लागले. बराच विचार करून मी कोयना प्रकल्पावरची नोकरी सोडून सांगलीला आलो.
शिवसदन सहकारी संस्था आणि शिवसदन रिन्युएबल एनर्जी रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थांचा प्रमुख म्हणून मी ४१ वर्षे काम केले. या एकूण  ५४ वर्षांच्या इंजिनियरिंग कारकीर्दीत भारताच्या कृषिप्रधान ग्रामीण व्यवस्थेतील शेतकरी आणि शेतीविकास हे विषय माझ्या विचारांच्या व कामाच्या केंद्रस्थानी होते. शेतमजूरांसाठी तयार पद्धतीची स्वस्त घरे, जनावरांचे गोठे, बायोगॅस प्लान्ट, शौचालये, पाईप्स अशा कित्येक प्रकारच्या मालाचा पुरवठा आमच्या कारखान्यातून होत असे. त्याचवेळी जलप्रदूषण आणि पृथ्वीची तापमानवाढ या विषयांकडे माझे लक्ष वेधले.
दगडी कोळसा, खनिजतेल, जलशक्ती आणि अणुशक्ती या विनाशकारी ऊर्जास्रोतांच्या अनिर्बंध वापरामुळे व त्यांपासून तयार होणाऱ्या विजेमुळे जगावर भयकारी संकट ओढवते आहे असे मला जाणवू लागले. पर्यावरणाचा समतोल ढळू न देता शाश्वत स्वरूपाची ऊर्जा कशी निर्माण करता येईल, याविषयी संशोधन मी चालू केले. त्याचा समग्र वृत्तांत मी `शाश्वत ऊर्जेची शोधयात्रा' या पुस्तकात अलीकडे ग्रथित केला आहे. या शोधयात्रेत मी अनेक देशांत फिरलो. महत्त्वाच्या परिषदांत भाग घेतला.
एकंदरी चोपन्न वर्षांची प्रत्यक्ष कार्य-कारकीर्द थांबवून २००९ साली मी पत्नीसह वानप्रस्थी म्हणून तासगावजवळच वडिलोपार्जित शेतमळयावर येऊन स्थिरावलो आहे. १९३७ सालचा माझ्या पत्नीचा- माधुरीचा जन्म. आमचे वैवाहिक जीवन संयमाने व सहभावनेने व्यतीत झाले आणि आजही विवाहाला साठ वर्षेे होत आली असताना ते तसेच रमणीय व आनंदाचे होत आहे. माझा गृहस्थीधर्म चोखपणे सांभाळण्यास ती कारणीभूत आहे. तिची तीव्र स्मरणशक्ती, नित्यकर्मे, सणवार, मुलांसंबंधीची कर्तव्ये हे सर्व समाधानकारक आहेच, पण कुटुंबाविषयी कर्तव्ये आणि लोकसंग्रह ही तिची खास वैशिष्ट्ये आहेत. स्वयंपाक, विणकाम, वाचन यांतही ती तरबेज आहे. आमची मुलेबाळे सर्व आपापल्या संसारात रमलेली असून ती उत्तम बुद्धिमान व कर्तबगार आहेत.

ईश्वर ही संकल्पना सुंदरच आहे. ब्रह्मा-विष्णू-महेश, इंद्र आणि इतर देवदेवता हे सर्व माणसाच्या कल्पनेतून साकार झालेले आहे. त्यांना विज्ञानाचा किंवा वास्तवाचा आधार नाही. तरीही इहलोकी माणसाने वाममार्गाने जाऊ नये तर सद्मार्गानेच जावे यासाठी त्याच्यावर एक प्रकारे दबाव आणि बंधन असलेच पाहिजे, यासाठी ईश्वराची कल्पना दृढ झाली असावी. व्रते किंवा अन्य कर्मे करण्यातून माणूस संस्कारित होतो ही गोष्ट खरी आहे. त्याचा देवाशी संबंध नसला तरी माणसातल्या देवत्वाशी संबंध असतोच. म्हणून या गोष्टी अनुसरणाऱ्या माणसांबद्दलही आपुलकी असली पाहिजे. त्यांना कर्तव्याकडे वळविणे हेही शहाण्या म्हणविणाऱ्या लोकांचे एक कर्तव्य असते. पाप-पुण्य, स्वर्ग-पाताळ ही सर्व माणसाच्या देवासंबंधीच्या विचारांची फेलते आहेत. प्रत्यक्षात त्यांपैकी कोणताच देव किंवा त्रैलोक्यांपैकी कोणताच लोक, निदान या मनुष्यजन्मात तरी दृष्यरूपात आपल्यासमोर अवतरत नाही. नित्य दर्शन देणारा सूर्यदेव किंवा पाणी, वायू इत्यादी महाभूते यांच्या रूपात आपण देवत्त्वाचा साक्षात्कार अनुभवू शकतो. देवासंबंधी माझी संकल्पना अशी मर्यादित आहे.
वाचन हा माझा ध्यास आहे. माझ्यासमवेत माझी मुलेही उत्तम वाचतात. मराठीप्रमाणेच इंग्रजी ग्रंथांचे वाचनही आमच्या कुटुंबात आहे. आमच्या पिढीतील मी सर्वात मोठा. माझ्या पाठीवर असणाऱ्या भावा-बहिणींची मुले आता कर्तबगारीच्या प्रौढ टप्प्यावर आहेत. या सगळयांचा मिळून साधारण पंचवीस लोकांचा आमचा कौटुंबिक गोतावळा आहे. तोही सर्व आपापल्या कामात व्यस्त असतो.  त्याचबरोबर प्रयोगशीलता आणि साध्या राहणीचा प्रभाव आमच्या साऱ्या कुटुंबावर आहे. नव्या पिढीतील बहुतेकजण चहासुद्धा घेत नाहीत. या सर्वांवर आमच्या अगोदरच्या पिढीचा प्रभाव निश्चितच आहे. व्यायाम आणि सार्वजनिक काम यांमध्येही कुटुंबातील सगळी मंडळी रमून गेलेली असतात.
भारतीय संस्कृतीचा व परंपरेचा मी एक अंश आहे. रामायण व महाभारत या काव्यग्रंथांवर भारतीय संस्कृतीची जोपासना झाली आहे. त्या ग्रंथांचे खूप आकर्षण असल्यामुळे मी त्याचा अभ्यास वानप्रस्थाच्या काळात सुरू केला आणि त्याही पुढचा टप्पा म्हणजे चक्रवर्ती राजगोपालाचारी यांच्या त्या दोन्ही इंग्रजी ग्रंथांचे रूपांतर मराठीत करून ते प्रसिद्धही केले. ८२च्या वयोमानानुसार माझी व पत्नीची प्रकृती ठीक आहे. डोळे, पाय इत्यादी अवयव आता `बोलू' लागले आहेत.
माझ्या क्षमतेप्रमाणे मी माझ्या आयुष्यात चांगले काम केले आहे, हे समाधान मला आहे. पुष्कळदा असे जाणवते की, नवे जग वेगळया वाटेने चालले आहे. त्याला परत वळवण्याची ताकद आपल्या ठायी नाही. परंतु त्याबद्दल वाईट वाटून घेऊनही काही उपयोग नसतो. स्थितप्रज्ञता अंगी येणे तितके सोपे नाही. मी गांधीजींचा आणि विनोबांचा वैचारिक अनुयायी आहे. कृतीनेही शक्य तितके ते जमवतो. नोकरीत असतानाही पुष्कळ दिवस मी चरख्यावर स्वत: सूत कातत असे. भारतीय   जीवनपद्धतीचे मला खूप आकर्षण आहे. ती जीवनपद्धती विज्ञानवादीच आहे अशी माझी श्रद्धा आहे. त्यामुळेच धर्म आणि विज्ञान या दोन्हींचे कधीही द्वंद्व माझ्या मनात नसते. आपल्या परीने हे जग, करता येईल तेवढे चांगले करावे असे म्हणतात, ते मी केले.
संपर्क : V. R Joglekar,  `रामसीता' ८१० पोस्टाजवळ, तासगाव (जि.सांगली)
मोबा.९५०३४११५२०

`आपले जग'च्या ३७ वर्षपूर्ती निमित्ताने वेगळे पुस्तक प्रकाशित होत आहे. गेल्या काही वर्षांतील संपादकीय लेखांचे संकलन  या पुस्तकात केले असून, बेळगावच्या `तरुण भारत' समूहाचे प्रमुख श्री.किरण ठाकूर यांची त्यास प्रस्तावना आहे. 
प्रस्तावना
वृत्तपत्रात अग्रलेखाला अनन्यसाधारण महत्त्व असते. अग्रलेख म्हणजे वृत्तपत्राचा कणा, संपादकाचा आवाज, अन्यायाविरोधात उंचावलेली मशाल, आणि वाचकांना दाखविलेली दिशा; असे स्वरूप असले पाहिजे. वृत्तपत्रांना प्रासंगिक, माहितीपूर्ण लेख, अग्रलेख लिहावे लागतात. `शहाणे करून सोडावे सकळ जन' अशी निष्ठा ठेवून ३७ वर्षे व्रतस्थ वाटचाल करणाऱ्या, किर्लोस्करवाडीच्या साप्ताहिक`आपले जग'ने हीच निष्ठा जागवत जी कामगिरी केली आहे ती गौरवपूर्ण तर आहेच पण सहजसोपी नाही. यासाठी `आपले जग'चे  संपादक, चालक, प्रकाशक श्री.वसंत आपटे व त्यांचे सर्व सहकारी यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे.
किर्लोस्करवाडीसारख्या छोट्या गावात, फारसा कुणाचा आधार नसताना साप्ताहिक वृत्तपत्र प्रारंभ करणे, ते ध्येयवादाने चालविणे, `जग आपलेसे करणे' हे ब्रीद बाळगून व्रतस्थ वृत्तीने चालवणे, सर्व अडचणींवर मात करणे, आणि किंमतयुद्धाच्या स्पर्धेत त्याचे अस्तित्व टिकवणे हे, चमत्कार वाटावा असे वास्तव आहे. बळकट लेखणी, पक्का निर्धार आणि सकस विचार यामुळेच ते शक्य झाले आहे. ही वाटचाल सोपी नाही, तरीही संपादक वसंत आपटे यांना `वाटले फुलाफुलांत चाललो', यातच त्याबद्दल सारे सामावलेले आहे.
भाषिक वृत्तपत्रांना, -विशेष करून मराठी भाषिक वृत्तपत्रांना, संपादकांची आणि उत्तम अग्रलेखांची मोठी परंपरा आहे. माझे वडील `तरुण भारत'चे संस्थापक संपादक स्व.बाबूराव ठाकूर यांनी, महात्मा गांधींच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन तरुणांना एकत्र केले; अन्यायविरोध व लोकशिक्षण हे ध्येय ठेवून `तरुण भारत'ला आकार दिला. तो काळच मंतरलेला होता. स्वातंत्र्यप्राप्ती हे ध्येय होते. देशाचे स्वातंत्र्य, संयुक्त महाराष्ट्नचा लढा, गोवामुक्तीचा लढा, सीमा-लढा यांमध्ये `तरुण भारत' अग्रभागी होता. अवघी मराठी पत्रकारसृष्टी यासाठी पडेल ती किंमत मोजून काम करत होती. लोकमान्य टिळक,  गोपाळ गणेश आगरकर, तात्यासाहेब केळकर, शि.म.परांजपे, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, आचार्य जावडेकर, आचार्य अत्रे, नानासाहेब परूळेकर, रंगाअण्णा वैद्य, माधव गडकरी अशा संपादकांची मोठी परंपरा मराठी वृत्तपत्रांना आहे. हे संपादक देशाचे नेते लोकनेते होते. संपादक काय म्हणतात हे वाचकांना आणि जनतेला अग्रलेखातून ओघानेच कळत असे. आज काळ बदलला असला, वृत्तपत्राचे स्वरूप बदलले असले तरी अग्रलेखाचे महत्त्व कायम आहे. वृत्तपत्रे आहेत तोवर अग्रलेख आणि त्यांचे महत्त्व टिकून राहणार आहे. अग्रलेखासाठी संपादकांना कोणत्याही विषयाचे वावडे नसते. अग्रलेख माहितीपूर्ण मतप्रदर्शन करणारे, अन्वयार्थ स्पष्ट करणारे जसे असतात; तसे घणाघाती टीका-टिप्पणी करणारे, अन्यायावर प्रहार करणारे असतात. कधी सहज, कोमल असतात तर मृत्यूलेख म्हणून लिहिलेले अग्रलेख डोळयात पाणी उभे करतात, अग्रलेखाला कोणताही रस वर्ज्य नाही. वसंत आपटे यांनी अग्रलेखाची हीच परंपरा `आपले जग'मधून जपताना, चौफेर विषयांवर मूलगामी, चिंतनपर लेखन केले आहे.
वृत्तपत्राला `एक दिवसाचा इतिहास' असे म्हणतात. त्यामध्ये प्रकाशित होणारे लेख, माहिती, वैचारिक साहित्य यांची नंतर पुस्तके प्रकाशित होत असतात. `आपले जग'ने वृत्तपत्र आणि व्रतपत्र ही आपली भूमिका नेटकी निभावत चांगली वाटचाल सुरू ठेवली आहे. भांडवलदारी वृत्तपत्रांच्या स्पर्धेत आणि बड्या साखळी वृत्तपत्रांच्या किंमतयुद्धात लहान स्वतंत्र वृत्तपत्राची दमछाक स्वाभाविक आहे. पण त्या वृत्तपत्राने स्वातंत्र्य जपण्यासाठी, सद्विचारांची पाठराखण करण्यासाठी, वाचकांनीच अशी वृत्तपत्रे जपली पाहिजेत.
वसंत आपटे यांनी `तरुण भारत' परिवारातही काही काळ काम केले आहे. संपादनात त्यांनी दीर्घ आणि नेटकी वाटचाल केली आहे. यापूर्वी १९९७ आणि २०१२ साली `आपले जग'च्या संपादकीय लेखांचे संग्रह प्रकाशित झाले, त्यांसही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. प्रस्तुत संग्रहात ज्या निवडक अग्रलेखांचा समावेश केला आहे, तो विविधतापूर्ण आहे, चिंतनशील आहे, अनेक प्रश्न-समस्या यांवर नेमकेपणाने बोट ठेवणारा आहे. फार मोठा अभिनिवेश न बाळगता अथवा मोठी तलवारबाजी व आकांततांडव न करताही अनेक विषयांना वाचा फोडता येते, न्याय देता येतो आणि मूलभूत विचार अधोरेखित करता येतो, वाचकांना दिशादर्शन करता येते याची प्रचिती देणारे हे सारे अग्रलेख आहेत. समतोल पण ठाम लेखन हे या अग्रलेखांचे वैशिष्ट्य आहे. भाषा सरळ, सोपी, सुबोध आणि प्रासादिक आहे. सामाजिक दुर्गुणांवर बोट ठेवतानाही त्यांनी हळूवार पण नेमके लिखाण केले आहे.
श्री.आपटे व त्यांच्या लेखन-संपादनाला, तसेच `आपले जग'लाही हार्दिक शुभेच्छा!

नार्वेकर गल्ली,          किरण ठाकुर
बेळगाव ५९०००१    समूह प्रमुख, `तरुण भारत'


`आपले जग'मधील संपादकीय लेखांचा छोटेखानी संग्रह १९९७ मध्ये प्रकाशित झाला. त्यातील मनोगत.....
प्रिय वाचक,
वृत्तपत्र साप्ताहिक असो की दैनिक असो, छपाईची यंत्रणा जुनीपुराणी-कामचलाऊ असो अगर अत्याधुनिक असो आणि विषय आंतरराष्ट्नीय असो किंवा गावच्या गटारीचा असो; संपादकीय मजकूर लिहिण्याच्या वेदना सारख्याच असतात असे वाटते. प्रत्येक संपादकीय लिहिण्यासाठी मुद्रणव्यवस्थेतील कर्मचाऱ्यांनी तगादा लावावा लागतो, असा अनुभव काही समदु:खींनी सांगितला आहे. सहजगत्या तलवारीचे चार पट्टे फिरवावेत आणि लीलया कुणालातरी घायाळ करावे इतके सोपे संपादकीयाचे काम नाही. ताजा विषय घेऊन वाचकांशी संवाद साधीत त्यावर भाष्य करण्याची उर्मी हीच संपादकीय लिहिण्यामागची प्रेरणा असावी. मोजका पूर्वकाळ अशी काही चाहूल लागत असली तरी ऐनवेळच्या प्रसववेदना अटळ असतात. संपादकीय लिहून झाल्यावर काही सृजनाचा आनंद आणि पूर्ततेचा सुस्काराही दरवेळी बाहेर पडत असतो.
इतकी वर्षे छोटे असलेल्या `आपले जग' या साप्ताहिकातील संपादकीय लेखांचा हा संग्रह आज प्रकाशित होत आहे. हे वृत्तपत्र सुरू होताना त्यातील लेखांना ग्रंथरूप येईल यावर विश्वास बसला नसता. कारण त्याची वृत्ती, ताकद, आकार, आवाका सारेच मर्यादित होते. पंचक्रोशीतील समाजाशी संवाद व्हावा एवढाच हेतू होता. पण अस्सल वृत्तपत्रीय वृत्तींशी बांधिल राहण्याचे धोरण मनामध्ये दृढ असल्यामुळे या पंचक्रोशीत तशी वैचारिक उपासमार होऊ लागली. कुणाची तरी दशक्रिया आणि अभिनंदने करणारी अर्वाचीन पत्रकारिता मानवली नाही. वेगळा काही विचार मांडत-पेरत जाण्याला सर्वदूरच्या अनुभवी, ज्येष्ठ अशा ज्ञानवंतांनी प्रोत्साहनाचे बळ दिले. त्यामुळे `आपले जग'ला क्षितिज विस्तारल्याचे जाणवू लागले.
साहजिकच प्रत्येकवेळी लेखणी उचलताना त्याचे भान ठेवावेच लागतले. रतीब म्हणून लिहिण्यापेक्षा भावनेतून लिहिणे सत्त्वपरीक्षा पाहिली जावी इतके कठीण असते. पण त्याचे भरभरून फायदे मिळाले, हेही कबूल करायला हवे. मराठी मुलखातल्या अध्वर्यूंच्या भेटी, चर्चा, पत्रोपत्री यातील जिव्हाळयाने समृद्ध म्हणता येईल एवढे संपन्न करून टाकले. वाचक `किती' यापेक्षा `कसा' हा प्रश्न येई, तेव्हा त्याच्या उत्तरादाखल मूकपणे छाती फुलावी एवढी कमाई घडली.
आपल्या भोवती समस्यांचे गुंतावळे गंुफले गेले असले तरी त्यांची सोडवणूक करण्यासाठी स्वत:पासून सुरुवात होणे गरजेचे आहे. ही भावनाच या लेखांमधले एक समान सूत्र आहे. खरे तर हे लेखन वेगळया निमित्ताने, वेगवेगळया वेळी साधारण गेल्या काही वर्षांत झालेले आहे. त्या त्या वेळी हे सूत्र मध्यवर्ती ठेवून कोणते विणकाम केले गेले असे नाही. तरीही हे लेख सलगपणे कधी वाचत-चाळत गेल्यास ते सूत्र जाणवू लागे. या संग्रहासाठी लेख निवडताना जेव्हा विस्तृत कालावधीतील लेखन पुढे घेतले तेव्हा ते वैशिष्ट्य स्वत:च्या मनात भरले. नकळत येत गेलेली सुसूत्रता सुखावून गेली आणि एकाच पुस्तकात हे विविध लेख संकलित होण्यामुळे योग्य तो परिणाम साधेल असे वाटू लागले.

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन