Skip to main content

Nov.2015

राजकारणी विचारवंत
गेल्या दहावीस वर्षांत पुरस्कार वितरणांचे जरा अतीच झाले होते. कुणी कुणाला कशासाठी पुरस्कार द्यायचा हा त्या देणाऱ्या व घेणाऱ्यांचा प्रश्न असतो. इतरांनी त्यात बोलण्याजोगे काही नाही. जे पुरस्कार प्रतिष्ठेचे-सन्मानाचे-सत्कारार्ह असे जनसामान्यांना मनाच्या खोल कप्प्यातून जाणवत राहते, ते फार फार वेगळे असतात. उदाहरणार्थ एपीजे कलाम, आपल्याकडचे जयंत नारळीकर यांना कोणते कसले पुरस्कार दिले गेले आहेत याबद्दल ठोस काही सांगता यायचे नाही. सी व्ही रामन, रवींद्रनाथ यांना नोबेल पुरस्कार मिळाला तरी नोबेल ही भानगड काय, हे सामान्यांस ठाऊक नसेल, पण रवींद्र-रामन-जगदीशचंद्र ही नावे तरी ठाऊक आहेत व ती हृदयांतरी वसली आहेत. कालपरवा ज्यांना सरकारने पद्मश्री वगैरे दिल्या, तेही कुणाला फारसे ठाऊक नव्हते; मग इतर कुठल्या पुरस्कारांची काय कथा!

बाबासाहेब पुरंदरे यांना दिलेला महाराष्ट्न्भूषण पुरस्कार त्यावरून उसळलेल्या जातीय वादांमुळेच जास्त गाजला. पण त्या शासकीय पुरस्काराला व पुरस्कृतांना काही उच्च स्थान आहे. एरवी अशा सरकारी पुरस्कारांना, मानसन्मानांना किंवा पदे-बिरुदांना राजकीय वास येतच नाही असे कोण म्हणेल? गेल्या पन्नास साठ वर्षांतच नव्हे, तर ब्रिटिश काळातही ते तसे घडत होते. रावबहादुर, रावसाहेब असल्या उपाधी टिळक-आगरकरांना कशा मिळाल्या असत्या? त्यासाठी त्या सत्ताधाऱ्यांशी काही लागेबांधे असावे लागत. किमानपक्षी सत्तेला विरोध तरी असून चालण्याजोगे नव्हते. टिळकांना लोकमान्य, भाऊराव पाटलांना कर्मवीर, सावरकराना स्वातंत्र्यवीर किंवा गांधीना महात्मा म्हटले जाते. या विभूतींना आता कुणी मरणोत्तर काहीतरी मोठ्ठी पदवी देण्याची निरर्थक मागणीही करू शकेल, पण त्याची काहीही गरज नाही.

मुद्दा असा की पुरस्कार परत देण्याची सध्या जी टूम निघाली आहे ती, तेच पुरस्कार मिळण्यासाठी जी धडपड आजच्या बाजारात चालते तितकीच स्वस्त अनुनयी आहे. हल्ली आदर्श (शिक्षक वगैरे) ठरविण्यासाठी अर्ज करावा लागतो, दाखले जोडावे लागतात आणि पालकमंत्र्याची चिठी मिळवण्यासाठी हेलपाटेही घालावे लागतात. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळण्यासाठी `साहित्यप्रेमीं'ची मते मॅनेज करावी लागतात. शिवाय मग त्याचे राहण्याचे ठिकाण, लागेबांधे, आणि जातसुद्धा पाहिली जाते हे उघड गुपित आहे. इतके सगळे केल्यानंतर मिळणारा तो सन्मान, आजच्याप्रमाणे राजकारणी हेतूने कुणी परत करण्याचे ठरविले तरी त्याबद्दल सामान्यजनांनी कशाला काय वाटून घ्यावे? तथापि त्या कृतीमागचा त्यांचा विचार, विचारपद्धत आणि मनस्थिती कुणाच्याही सहजी स्पष्ट लक्षात येते हे नमूद केले पाहिजे.

साहित्य अकादमीकडून ज्यांना पुरस्कार मिळाले, त्यांपैकी काहींनी त्या संस्थेवरच मोर्चा काढला. तो ज्यांनी काढला त्यात जनवादी लेखक संघ, प्रगतीशील लेखक संघ, जनसंस्कृती मंच, दलित लेखक संघ, पुरोगामी साहित्य संवाद इत्यादी संस्था होत्या असे वृत्त आहे. त्यांच्या नावांतूनच या विचारवंतांची दांभिक व दुटप्पी जातकुळी लक्षात येऊ शकेल. याच संस्थांच्या सदस्यांना आजवर पुरस्कार दिले गेले असणार, कारण ज्यांना ते मिळालेले होते तेच तर आता असली पुरस्कार परतीची आंदोलने करणार! याचा अर्थ ही विचारवंत मंडळी ज्यांना तथाकथित हिंदुत्ववादी, जातीयवादी, प्रतिगामी वगैरे मानतात त्यातल्या कुणाला आजवरच्या राजवटीत पुरस्कार दिलेच गेले नाहीत! साहित्य अकादमीनेच सध्याच्या असहिष्णू हत्त्यांचा निषेध करावा असा यांचा दबाव आहे. साहित्य अकादमी म्हणजे राजकीय विचार-प्रभावित संस्था यांनीच करून टाकली की. देशातल्या कोणत्याही वाईट घटनेवर साहित्यसंबंधी संस्थेने आवाज उठवावा काय? मग ५४ ऑफ्रीकी देशांचे संमेलन झाले म्हणून साहित्य अकादमीने सरकारच्या अभिनंदनाचा ठराव करावा की काय?

साहित्य अकादमीचे अध्यक्ष विश्वनाथप्रसाद तिवारी यांनी म्हटले की, साहित्यिकांनी अकादमीचे पुरस्कार परत करणे हे अतार्किक कृत्य आहे; पण त्यासंबंधी पुढच्या बैठकीत विचार होईल - की लगेच या मोर्चेकऱ्यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली, तिवारी यांनी साहित्यिकांचा विश्वास गमावला म्हणे! हे यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य! हे करतील-म्हणतील तसे झाले तर सगळे ठीक! - ही यांची वैचारिक अरेरावी म्हणायची का? साहित्यिक म्हणवणारी ही माणसे आता सरकार-पक्षविरोधी आंदोलक म्हणून दंगा करू लागली आहेत. त्यात त्या टीव्हीसिनेमाच्या प्रशिक्षण संस्थेचाही समावेश आहे. हळूहळू ती दंगेखोरी सर्वत्र पसरेल. कॉलेजच्या प्राचार्यांना मुलांची संमती घेण्याचा रिवाज असेल तर बहुतांशी प्राचार्य घरी पाठवावे लागतील.

बांग्लादेशी मुस्लिम लेखिका तस्लीमा नसरीन या तर स्पष्ट म्हणतात की, मला वाट्टेल त्या धमक्या आल्या, देशातून पिटाळून लावले गेले त्यावेळी कितीजणांनी पुरस्कार परत केले? कुणीही तसे न करण्याचे कारणच हे की, यांना ते पुरस्कार देणाऱ्यांचेच तेव्हा राज्य होते! अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे बोलण्याच्या गोष्टी आहेत; खरे हे आहे की, यांना पुरस्कार किंवा अन्य कौतुक बहाल करणाऱ्यांची सद्दी संपत चालली याबद्दलची ती चिडचीड आहे. त्या चिडकेपणास तीच थोर माणसे विचारस्वातंत्र्य असे साळसूदपणे म्हणतात. एरवी लोकशाहीच्या नावाने गळे काढणारे हे विचारवंत, लोकशाही मार्गाने आलेल्या सरकारविरोधी दंगे करतात.

पुरस्कारांची रेलचेल हा विषय यानिमित्ताने सार्वत्रिक रीत्या पुढे येऊ शकतो. कुठल्याही गावात सध्या `भूषणे' विखुरली आहेत. `आदर्श' वाढले आहेत, `श्री'बरेच झाले आहेत, `गौरव' दाटले आहेत. त्यात खरे काय नि किती हे ज्यांचे त्यांना माहीत. पण या प्रकारे ज्यांना प्रोत्साहन द्यायचे-घ्यायचे असेल त्यांचा तो प्रश्न असतो. इतकी भूषणे व आदर्श समाजात असूनही सामाजिकता कुठे हरवली हा प्रश्न पडतो. तो प्रश्न या आदर्शांनी स्वत:शी विचारावा, म्हणजे ते पुरस्कार घेणे वा परत देणे यामागचे इंगित त्यांनाही कळेल. सरकार किंवा सार्वजनिक संस्था एखादा पुरस्कार देते तो ज्यांना सन्मान वाटतो, तो त्यांनी सन्मानाने जपला पाहिजे. तो परत देणे म्हणजे `ज्यांनी' त्यांना तो `दिला' त्यांच्याशीच ती प्रतारणा आहे. तो पुरस्कार मोदींनी दिलेला नाही. मोदींनी दिला तर घेऊ नये. तो परत करणे वगैरे नाटके करू नयेत. घेताना विचार करावा, कुणी नाकारायलाही हरकत नाही. पण आधीच्या कुणी दिलेला सन्मान पुढच्याकडे परत देणे हा विचारवंतांचा अविचार आहे.



(श्री.वसंतराव ओगले यांच्या वडिलांनी कराची(पाकिस्तान) येथील ब्राह्मण मंडळाला दिलेल्या देणगीची अलीकडेच पुनर्देणगी दिली. त्याचा वृत्तांत...)
.... पुनर्देणगीचा आनंद ....
माझे थोरले काका हरी केशव ओगले व्यवसायाच्या निमित्ताने सन १९२७-२८ मध्ये कराची(पाकिस्तान) येथे गेले. तेथे लहानमोठी कामे करता करता त्यांनी तात्यासाहेब गोखले यांच्या मदतीने `ओगले आश्रम' या नावाने भोजनालय सुरू केले. माझे वडील वामन केशव ओगले १९३५ साली काकांच्या मदतीला कराचीला पोहोचले. सन १९४१ मध्ये माझे काका हरी केशव ओगले, आंबोली येथे परत आले. कराची येथील कारभार माझे वडील देशाच्या फाळणीपर्यंत पाहात होते.
मला मिळालेल्या माहितीप्रमाणे कराचीमध्ये ब्राह्मणांची बरीच वस्ती होती. तेथे उद्योगधंद्यासाठी त्यांची उपयुक्तता होती. या मंडळींनी ब्राह्मणसभेची स्थापना केलेली होती व त्यावेळी सभेचे ४६० सभासद होते.
त्या वेळच्या परिस्थितीनुसार पूजा, अभिषेकाची चांदीची नेहमी लागणारी भांडी माझ्या वडिलांनी ब्राह्मण सभेला देणगी म्हणून दिली होती. याबाबत आम्हा कुटुंबियांना कोणतीच माहिती नव्हती. माझे काका १९६८ साली व वडील १९७४ साली स्वर्गवासी झाले. तोपर्यंत वडिलांनी कधीही देणगीचा उच्चार केला नाही. देशाची फाळणी झाल्यावर तेथील बरेच ब्राह्मण, मिळेल त्या मार्गाने कसेबसे भारतात पोहोचले. ब्राह्मण सभेचा तेथील सर्व व्यवहार संपल्यासारखाच झाला.
कराची येथे ज्यांनी काकाना मदत केली होती, त्या गोखले साहेबांकडे पुणे येथे मला काकांनी १९५५ मध्ये पुढील शिक्षणासाठी ठेवले. मी तेथे बी.एस्सी.पूर्ण केले. त्या घराण्याशी आजही माझे संबंध सख्ख्या नात्यापेक्षा जास्त आहेत. माझे पुण्यात जाणे येणे असते. चार वर्षांपूर्वी असाच पुण्यात असताना, कराचीत पूर्वी असलेली जुनी मंडळी पुण्यात भेटू लागली हे समजले. एक दिवस ठरवून दहा-बाराजण आम्ही भेटलो होतो. आता असलेली मंडळी एेंशी ते नव्वद वर्षांची आहेत. त्यातील एक श्रीमती प्रभावळकर ८७ वर्षांच्या आहेत. त्यांना `आपण भेटूया का?' अशी विचारणा केली असता त्यांनी, `सर्वांना तू जमा कर व माझ्या (त्यांच्या) घरी या, मी सर्व व्यवस्था करेन. पण तत्पूर्वी एक काम कर की आपल्या  परिवारातील श्री.बाबा चाफेकर याचे एका पायाचे फ्रॅक्चर झाले आहे व तो आजारी आहे. फोन उचलत नाही. तरी त्याला भेटून तो कसा आहे ते मला येऊन सांग.' असे सांगितले.
त्यांच्याकडून पत्ता घेऊन श्री.बाबा चाफेकर यांना भेटलो. नेहमीच्या गप्पा झाल्या. ते वॉकरवरच चालत होते. तेथून निघतेवेळी `जरा थांब' असे सांगितले. मी थांबलो. बाबा चाफेकर मुलीच्या मदतीने घरात गेले. (त्यांचे वडील कराचीमध्ये सुपरिंटेंडेंट इंजिनियर होते व ब्राह्मण सभेचे अध्यक्ष होते.) अडगळीच्या खोलीतून चांदीच्या भांड्यांचे बोचके ते घेऊन आले व माझ्याजवळ दिले. `ही भांडी तुझ्या वडिलांनी ब्राह्मण सभेला देणगी दिलेली आहेत.' मी ते सामान उघडून पाहिले. `सदर भांडी माझ्या वडिलांनी देणगी म्हणून दिलेली असल्यामुळे मी ती स्वीकारू शकत नाही. ही मालमत्ता ब्राह्मण मंडळाच्या मालकीची आहे.' असे म्हटले. त्यावर श्री.चाफेकर म्हणाले, `आता हे ब्राह्मण मंडळ अस्तित्वात नाही. १९४७ सालापासून आज १२-०२-२०१५पर्यंत मी ही मंडळाची ठेव जशीच्या तशी सुरक्षित ठेवलेली आहे. ही ठेव ज्यांनी दिली त्यांच्या ताब्यात देणे, ही माझी नैतिकता आहे. म्हणून मी ही ठेव तुझ्या ताब्यात देत आहे. तुला जे योग्य वाटेल ते तू कर.'
तीच भांडी मी ९ ऑगस्ट २०१५ रोजी महाराष्ट्न् ब्राह्मण मंडळ, सिंधुदुर्ग शाखा-सावंतवाडी ब्राह्मण मंडळाला सर्वांच्या उपस्थितीत माझ्या सर्व मातृपितृ कुटुंबाच्या संमतीने पुर्नदेणगी दिली आहे. या मालमत्तेचा मंडळाने स्वीकार केला.
माझे मराठी चौथीपर्यंतचे शिक्षण कराचीला झालेले आहे. माझे धाकटे बंधू कमलाकर वामन ओगले वयाच्या सात वर्षेपर्यंत कराचीतच होते. आम्ही दोघे कराचीत त्या काळात असल्यामुळे त्या शहराबद्दल व तेथील भेटणाऱ्या माणसांबद्दल असलेला जिव्हाळा वाढतो. अशा भेटीगाठीमुळेच सदरची ठेव परत मिळण्याचा योग आला. भावनिकदृष्ट्या खूपच महत्त्वाची बाब म्हणजे तशाच प्रकारच्या ब्राह्मण मंडळाकडे सदर ठेव पुनश्च दिल्यामुळे आमच्या कुटुंबियांचा आनंद द्विगुणित होत आहे.
- वसंत वामन ओगले आणि कुटुंबीय,
आंबोली (जि.सिंधुदुर्ग)
संदर्भ - `कुशाग्रसिंधु'

घरगुती वीजनिर्मिती - एक अमेरिकेतील अनुभव
माझ्या अमेरिकन वारीत नवीन गोष्ट मी पाहिली. माझ्या मुलाने त्याच्या नवीन घरावर नवीन यंत्रणा बसविण्याचा प्रयोग केला. ऑस्टीन टेक्साजमध्ये ऑस्टीन एनर्जी ही वीजपुरवठा करणारी एक कंपनी आहे. वैयक्तिक घरांवर सोलर पॅनल बसवून वीजनिर्मिती व्हावी यासाठी ती कंपनी प्रयत्नशील आहे. खाजगी संस्था योग्य सोलर पॉवर पॅनेल्स पुरवतात व बसवतात. शेवटची महत्त्वाची चाचणी वरील कंपनी करते व ते सुरू करते. सोलर पॉवरचे मोजमाप करण्यासाठी वेगळा मीटर लावण्यात येतो.  वीजनिर्मितीसाठी लागणारी सामग्री खरेदी करण्यासाठी सुरुवातीच्या गुंतवणूक खर्चात २०-२५% खास सवलत दिली जाते. घराच्या छपरांवर अशी पॅनल्स बसविली जातात व उपलब्ध होणारी वीज ग्रीडमध्ये सोडली जाते. ती घरे ऑस्टीन एनर्जीने दिलेल्या विजेचाच वापर करतात. परंतु त्याबद्दलच्या मासिक बिलांत उपलब्ध झालेल्या विजेचे क्रेडीट दिले जाते. टेक्सासमध्ये उन्हाळा तीव्र असल्यामुळे संपूर्ण घराला लागणाऱ्या नेहमीच्या विजेपेक्षा उपलब्ध सोलर पॉवर अनेकवेळा जास्त असते. याचा अर्थ वरील घरे विजेसाठी कधीही पैसे देत नाहीत. मिळणाऱ्या क्रेडीटद्वारे व होणाऱ्या बचतीद्वारे मूळ गुंतवणूक साधारणपणे चारपाच वर्षांत पूर्णपणे वसूल करतात. त्यानंतर विजेचा वापर हा पूर्णत: विनामूल्य असतो. शिवाय घरांवर पॅनल्स बसवल्यामुळे घरांचे छप्परही जास्त तापत नाही. त्यामुळे आतील एअरकंडीशन जास्त परिणामकारक होते. वीज जास्त प्रमाणात मिळत असल्याने जर गॅसवर चालणारी यंत्रे विजेवर चालणारी केली तर गॅसचा वापरही त्या प्रमाणात कमी होतोच.
विजेचे तासागणिक मोजमाप घरमालकाला रोजच्या रोज एका अॅपद्वारे घरच्याच संगणकावर समजते. काही काळ घर खाली असते व विजेचा वापर शून्य असतो तेव्हा उपलब्ध होणाऱ्या सर्व विजेचे पूर्णपणे क्रेडीट दिले जाते. वर्षाअखेर हिशोब पूर्ण केला जातो व नवीन वर्षासाठी नवीन मोजमाप सुरू होते.वरील अॅप पर्यावरणाबाबत होणारे फायदे सांगण्यात येतात. उदा.किती घरे उपलब्ध विजेद्वारे त्यांच्या गरजा भागवतात, किती झाडे वाचविली गेली, किंवा किती प्रमाणात क्रूड ऑईल कमी वापरले गेले किंवा किती तास एक दिवा त्या विजेमार्फत जळू शकला वगैरे वगैरे.
घरे मोठी असल्यामुळे व कोणताही अडथळा नसल्यामुळे पॅनेल्सवर अगदी सकाळपासून ऊन पडू लागते. उन्हाच्या दिशेनुसार घराच्या कोणत्या छपरावर पॅनल्स बसवावी हे ठरवले जाते. पॅनल्ससुद्धा अशा तऱ्हेने बसवली जातात की बाहेरून जाणाऱ्या वाहनांना आणि आजूबाजूच्या लोकांना त्याचा कमीत कमी त्रास होईल.
अमेरिकन घरांच्या स्वावलंबी होण्याचा हा प्रयत्न खरोखरच वाखाणण्यासारखा आणि स्तुत्य आहे! आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये आपला खारीचा वाटा उचलण्यात अमेरिकन माणसे नेहमीच सतर्क व कार्यरत असतात.
- कृ.द.गाडगीळ, विलेपारले(पूर्व), फोन-९८३३७२५१४५

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन