Skip to main content

Dec.2015

शांत जगावर ताबा हवा असतो
दुसऱ्या महायुद्धात जर्मनी आणि जपान या अघोरी देशांचा पाडाव झाला हे खरेच, पण ज्या दोस्तराष्ट्नंचा विजय झाला ते रशिया, इंग्लंड हे देश कमी अघोरी नव्हते. आधीची शेदीडशे वर्षे भारतावर अमानुष गुलामी लादून त्याचे अखंड शोषण व अनेक अत्याचारही करणाऱ्या इंग्लंडने युद्धानंतर साळसूदपणा करत धार्मिक तेढ वाढवून भारताची फाळणी करण्यातही पुढाकार घेतला. रशियन राजवट तर क्रूरतेबद्दल प्रसिद्ध झाली, तिथे सरकार किंवा साम्यवादी पक्षाबद्दल ब्र काढता येत नव्हता म्हणून अनेक विचारवंत लेखक तो देश सोडून गेले. जगात जपान-जर्मनीने थैमान घातले, म्हणून सामर्थ्यसंपन्न अमेरिका त्यावेळच्या युद्धात उतरली असे नव्हे; तर त्यांच्यावरच हल्ले सुरू झाले तेव्हा प्रेसिडेंट रूझवेल्ट हे जमिनीवर आले.  तरीही त्यांची सोदेगिरी अशी की, दोस्तसैन्याचे नेतृत्त्व आयसेनहॉवर या अमेरिकन सेनापतीकडेच देण्यात आले. युद्धानंतर `शांतता-शांतता' असा जप करत, संयुक्त राष्ट्न्संघ(यूनो)संस्था स्थापन करण्यात आली तरी त्या संस्थेचे कार्यालय न्यूयॉर्कमध्ये राहिले, आणि गेल्या सत्तर वर्षांत अमेरिकेचा स्पष्ट वरचष्मा त्या संस्थेवर राहिला.

नंतरच्या जगात अमेरिका-रशिया यांच्यात स्पर्धा व शीतयुद्ध सुरू राहिले. आधी दोस्तराष्ट्न्े म्हणवणारे हे दोन देश, तसे कधीच दोस्त झाले नाहीत. चीन-भारत, भारत-पाकिस्तान, कोरिया, व्हिएटनाम, अफगाणिस्तान, इराण, इराक, पॅलेस्टाईन, अरब-इस्त्रायल वगैरे कित्येक युद्धे झाली; त्यातली बहुतांश अमेरिकेने लावून दिली आहेत. त्या प्रत्येक युद्धात अमेरिकेने आजही शस्त्रास्त्रे खपवली, मदतीचा आव आणून मिंधेपण लादले, जागतिक शांततेचा जप करत मध्यस्थी करून युनो संस्थेचे महत्त्व कमी केले, आणि विकसनाच्या नावाखाली केवळ स्वत:चा विकास साधला. जगात अलीकडे एवढी युद्धे झाली, त्यापैकी अमेरिकेच्या भूमीवरच नव्हे तर सीमेवरही झालेले युद्ध जवळजवळ एकही नाही. पर्ल हार्बरचा बॉम्बहल्ला किंवा टि्वन टॉवरची विमानधडक म्हणजे लढाई नव्हती; घातपात होता. अशा परिस्थितीत आपल्या `परिवारा'तील काही देशांना युनो संस्थेत महत्त्व देऊन ती संस्था आपल्याच अखत्यारीत ठेवायची आणि त्या संस्थेला जगातल्या सर्व देशांची वजनदार एकजिनसी संस्था भासवायची हा अमानुषी मानवी व्यवहार अमेरिकेने आचरला आहे.

जगभर चालणाऱ्या संघर्षात  युनो ने कधी कुठे ठोस भूमिका घेतलेली नाही. युनोची शांतिसेना कधी शांततेसाठी आक्रमक झालेली नाही. अमेरिकेने इराकवर प्रच्छन्न बॉम्बहल्ले केले, अशा प्रसंगी `यूनो म्हणजे अमेरिका' एवढाच अर्थ काढण्याजोगी धोरणे दिसली. भारत-पाकिस्तान संबंधात चूक कुणाची, हे गेल्या सत्तर वर्षांत यूनोच्या लक्षात येत नाही; कारण विविध अतिरेकी संघटनांना आतून अमेरिका मदत देत असते, तसेच पाकिस्तानात लष्करी तळ ठेवण्यासाठी अमेरिका त्यास सांभाळून घेते. त्याविरुद्ध `राष्ट्न्संघ' नावाची दोनशे देशांची संघटना व त्या अंतर्गतची `सुरक्षा परिषद' आवाज काढत नाही.

इतकी वर्षे या शुद्ध आपमतलबी `संस्थाव्यवहारा'बद्दल भारताने जोरदार शब्दांत काही बोलावे अशी स्थिती नव्हती. आर्थिक बडी राष्ट्न्े, किंवा त्यांच्या पदराखाली चोंबडेपणा करून आपले महत्त्व राखणारी छोटी राष्ट्न्े म्हणजेच राष्ट्न्संघ असा आभास तयार होत आला. सोदेगिरीत चतुर असणारी अमेरिका आर्थिक महासत्ता असल्यामुळे ती म्हणेल तोच जगाचा आवाज ठरतो आहे. ऑफ्रीकेतला एखादा देश, किंवा माली-बाली-नेपाळ-ब्रह्मदेश असल्या छोट्यांना विचारणार कोण? सहकारी साखर कारखान्यांत प्रत्येक सभासदास समान एकच मत असते हे खरे; पण तो कारखाना एकाच `महर्षी'च्या ताब्यात असतो, शेवटी त्या महर्षीचे नाव कारखान्याला देण्याचा ठराव `आमसभे'त संमत होतो; तोच प्रकार यूनोत आहे.

यात चुकीचे काही नाही, हे असेच चालत असते. म्हणूनच अलीकडच्या दहापंधरा वर्षांत जगातल्या उलथापालथीतून भारताची परिस्थिती सुधारल्यावर त्याला आवाज फुटला आहे. सत्तर वर्षांत राष्ट्न्संघात काही सुधारणाच नसल्याचे भारत आता परखडपणे सांगू लागला आहे. सुधारणा कशी होणार? अमेरिकेचे स्थान अविचल आहे, तोवर बदल कोण कशाला करेल? भारताच्या म्हणण्याला किंमत येण्यासाठी त्याचे सामर्थ्य वाढणे,- किंवा अमेरिकेचे भारतापायी कुठेतरी घोडे अडणे,- एवढाच मार्ग आहे. भारताला हा जोर आल्याचे आता दिसून येत आहे. संयुक्त राष्ट्न्संघातील भारताचे प्रतिनिधी श्री.अशोक मुखर्जी यांनी यूनोच्या आमसभेत या संघटनेच्या कारभारावर सडकून टीका केली आहे. त्यांच्या भाषणाच्या प्रकाशित वृत्ताचा सारांश असा की, `सुरक्षा मंडळाचा वार्षिक अहवाल सत्य दडवून ठेवणारा आहे, बेजबाबदार आहे. राष्ट्न्संघाची स्थापना मुख्यत: जगात शांतता नांदावी यासाठी असताना, हिंसाचार रोखण्यात अपयश येत आहे. शरणार्थी, संघर्ष, हत्त्या अशा मानवी पेचप्रसंगांत असंख्य लोक पीडित असूनही राष्ट्न्संघ अकार्यक्षम आहे. आमसभेत यांची कारणे मिळायला हवीत. विकसनशील देशांपुढे सामाजिक व आर्थिक आव्हाने आहेत; ती आव्हाने अशांतता व असुरक्षितता यांमुळे आहेत. तरीही राष्ट्न्संघ म्हणून ही संघटना काहीही करत नाही. वर्चस्ववादी देशांच्या तालावर चालणाऱ्या कारभारात सुधारणा व्हायला हव्यात.'

ही सर्व पार्श्वभूमी, परिस्थिती व प्रतिपादन लक्षात घेता ते आपल्याकडच्या कोणत्याही संस्था-संघटनेला लागू होईल. क्रिकेट संघटना, कामगार जगत्, साखर कारखाना, राजकीय पक्ष वगैरे कुणाचाही विचार केला तरी या मनुष्यप्रवृत्तीचा प्रत्यय येईल. अगदी मर्यादित असणारे ज्ञातिसंघही त्यास अपवाद नाहीत. `साऱ्या विश्वातील ज्ञातिबांधवांत एकोपा वाढावा, परस्पर साहाय्य व्हावे, सर्वांना ऊर्जित करावे...' इत्यादी ध्येयांची सतत तोंडी उजळणी करणारी ज्ञाति मंडळे प्रत्यक्षात आपापले सुभे भक्कम करून राहतात. `अमेरिका म्हणजेच जग' हेच सूत्र त्या ज्ञातिसंघटनेत असते. एखाद्या तालुक्यात वा शहरात त्याच निकषांवर कुणी समर्थ बनले तर त्यांंनी त्या ज्ञातिसंघात आवाज उठवून स्थायी सदस्यत्वाचा आग्रह धरावा, आणि सर्वच स्तरांवर आपापले `फिल्डिंग' वाढवत वरचष्मा राखू पाहावा!!

ही संकल्पना अमानवीच आहे. स्वत:नंतर हळूहळू सामर्र्थ्य प्रसारित होत जावे आणि आपणच जग पादाक्रांत करावे हाच नियम प्रचलित असतो. `विश्वचि माझे घर' याऐवजी `विश्व माझेचि घर' या दिशेने माणसे चालतात. त्यास अपवाद दुर्मीळ असतो, असलाच तर तो अमानवी म्हणायचा!!


भौतिक विज्ञानातील नोबेल पारितोषिक मिळाल्यानंतर विश्ववैज्ञानिक अल्बर्ट आईन्स्टाईन ईश्वरासंबंधी म्हणाला होता की, ``निसर्गात मी ईश्वर बघतो. उद्या मी जिवंत असेन वा नसेनही, पण कोणत्या ना कोणत्या स्वरूपात या चैतन्यमय चराचराचा, विराट विश्वाचाच मी एक अंश असणार आहे, याचादेखील मला आनंद आहे!'' हा वैज्ञानिक आपल्या प्रतिभावान विचारांनी विश्वातील चैतन्याशी एकरूप होऊन गेलेला होता!
`ईश्वराने एखादे मूलद्रव्यच नव्हे तर सर्व विश्व कसे निर्माण केलेे आहे ते मला जाणून घ्यायचे आहे' असे तो म्हणत असे. `ईश्वर कधी जुगार खेळत नाही'(गॉड डज नॉट प्ले डाईस) हे अल्बर्ट आईन्स्टाईनचे विधान जगप्रसिद्ध आहे. `विज्ञान धर्माशिवाय पांगळे आहे तर धर्म विज्ञानाविना आंधळा आहे' असे त्याचे प्रतिपादन असे. जिथे समाज अप्रगत असेल तेथे वैज्ञानिक विचार रुजत नाहीत. विज्ञानात वापरली जाणारी अवघड भाषा व सांकेतिक चिन्हे यांमुळे विज्ञान व अशिक्षित व्यक्ती यांच्यात एक भिंत उभी दिसते. अशा ठिकाणी धर्माने सामान्य माणसाला विज्ञान समजावण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.
पाश्चात्य जगातही विज्ञानात नवे शोध जेव्हा लागत होते तेव्हा वैज्ञानिकांना त्यांच्या संकल्पना जनमानसात रूढ करताना प्रस्थापितांचा विरोध सहन करावा लागला. विश्व सूर्यकेंद्रित असण्याच्या कोपर्निकसच्या संकल्पनेचा इ.स.१६३३ मध्ये गॅलिलिओने पुरस्कार केला म्हणून, चर्चने वृद्ध गॅलिलिओला स्थानबद्ध केले होते. चर्चच्या त्यावेळच्या मतानुसार विश्वाच्या केंद्रस्थानी पृथ्वीच असायला हवी होती! पुढे परिस्थिती बदलली. गॅलिलिओला इ.स.१६३३ मध्ये दिलेल्या वाईट वागणुकीसंबंधात चर्चची चूक झाल्याचे रोमन क्रॅथॉलिक चर्चने पोप जॉन पॉल(द्वितीय) यांच्या कारकीर्दीत इ.स.१९९२ मध्ये कबूल केले. डार्विनचे उत्क्रांतीचे तत्वदेखील मान्य केले. खगोलशास्त्रात प्रगती झाल्यानंतर सूर्यदेखील आपल्या आकाशगंगेच्या केंद्रस्थानी नाही हे सर्वांच्या लक्षात आले.
मुक्त आचार-विचार-प्रचार हे वैशिष्ट्य असणाऱ्या पाश्चात्य जगात आता मात्र वैज्ञानिक चळवळ रुजलेली आहे. तेथे धर्माद्वारे समाज एकत्र येतो. तेथे कुणी धर्मग्रंथांना अवैज्ञानिक किंवा चूक ठरवीत नाही. कोणी वैज्ञानिक हे धर्मग्रंथांवर संशोधन करीत नाहीत. ग्रह तारे अवकाश यांवर लोकांची धार्मिक श्रद्धा असते, तरीही नव्या ग्रहावर कसे जायचे याचे संशोधन करण्यात खगोलतज्ज्ञ मग्न असतात. धर्म धर्माच्या ठिकाणी तर विज्ञान व तंत्रज्ञान आपल्या ठिकाणी, असा दृष्टिकोण समाजाला प्रगतीपथावर नेतो.
जगातील सर्वच देशांतल्या प्राचीन संस्कृतींत पुराणकथा, प्रादेशिक लोककथा, लोकगीते, कविता प्रचलित आहेत. त्यांच्याद्वारे मानवता, नीतिमत्ता, कार्यसंस्कृती यांची शिकवण दिली जाते. चांगल्या शक्तींचा(देवांचा) विजय तर अमानवी दुष्ट(असुरी) शक्तींचा पराभव होतो, असे पुराणकथांत दर्शवलेले असते. अशा कथांत काही गोष्टी अतार्किक असतात; पण म्हणून काही त्यांचे महत्त्व कमी होत नसते. धार्मिक पुराणकथांना विज्ञानाचे निकष लावत बसण्याची गरज नसते. अशा कथा कविता या प्राचीन संस्कृतीच्या निदर्शक असतात. संस्कृती ही समाजाची प्रादेशिक अस्मिता असते. समाजाभिमान, राष्ट्नभिमान यांच्याशी ही सांस्कृतिक मूल्ये निगडीत असतात. समाजाच्या मानसिक, नैतिक स्थैर्यासाठी धार्मिक साहित्याचीदेखील गरज असते.
विराट ब्रह्मांडापुढे इवलासा धुलीकण वाटावा इतकी आपली पृथ्वी सापेक्षत: लहान आहे, तर मानव हा अतिसूक्ष्म प्राणी आहे. पण मग विश्वाच्या सापेक्ष स्वत: अतितुच्छ असण्याची कल्पना करून मानवाने निराश व्हायचे का? कविवर्य कुसुमाग्रज त्यांच्या `मातीतील एक कहाणी' या कवितेत म्हणतात -
तो प्रवास सुंदर होता
आधार गतीला धरती
तेजोमय नक्षत्रांचे
आश्वासन माथ्यावरती ।।
`रात्रीच्या अंधारावर सूर्याची पदचिन्हे उमटतात, पहाट होते, तेव्हा मला विश्वव्यापी ईश्वराच्या अस्तित्वाची प्रचिती येते' अशी कुसुमाग्रजांनी कल्पना केली. त्यांनी ईश्वराला `तो गगनाचा मुक्त प्रवासी' असे म्हटले आहे. प्राचीन वेदांतदेखील `ईश्वर हा उंच आकाशात राहतो' अशी कल्पना केली आहे. अशी कल्पना विज्ञानउपासक मानवालाही आश्वासक वाटते.
- विवेक भालेराव,
`सुधांशु', भाभानगर, नाशिक ४२२०११

ईश्वर आणि विज्ञान यांच्यात नेहमी विरोधच असतो असे मानले जाते. वैज्ञानिकांचा विश्वास ईश्वरावर असल्याची अनेक उदाहरणे आहेत आणि ईश्वरावर नितांत श्रद्धा ठेवून वागणारी संत मंडळी निखळ वैज्ञानिक विचारांची असतात हेही पाहायला मिळते. वस्तुत: मानवी व्यवहारात या दोन्हींचा मेळ ठेवणे हेच मानवी विकासाचे लक्षण आहे. निव्वळ विज्ञानावर विकास होऊच शकत नाही. त्याचप्रमाणे केवळ ईश्वरावर श्रद्धा ठेवून `ठेविले अनंते तैसेची' राहता येत नाही.
याबाबतीत श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांचेही सततचे संघर्ष चालू ठेवण्यात काही `विचारवंतां'ना रस असतो. तो रस आणि स्वारस्य समाज विकसित व्हावा यापेक्षाही समाजात संघर्ष चालू राहावा यातच असावा. माणूस श्रद्धेशिवाय जगूच शकत नाही आणि कोणतीही श्रद्धा ही अंधच असते. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातील रेघ कुठेही स्पष्ट उमटत नसते. फारतर आपली ती श्रद्धा आणि इतरांची ती अंधश्रद्धा एवढ्यावर काम भागवावे लागते.
शनी शिंगणापूर गावात शनीच्या चौथऱ्यावर महिलांना येऊ देत नाहीत हे जितके वैज्ञानिकांना चुकीचे वाटते तितकेच त्या गावात चोरी होत नसल्यामुळे घरांना कुलूप लावत नाहीत हेही अवैज्ञानिक वाटते. परंतु या श्रद्धेचा उपयोग करून लोकांचा अनैतिक चोरीवर वैज्ञानिक विश्वास वाढू न देता त्या श्रद्धेला जपण्यात मानवाचे हित आहे. धर्माला नीतीची जोड दिली गेली तर तो धर्मसुद्धा वैज्ञानिक होऊ शकतो. म्हणून मनुष्याला विज्ञान हाच धर्म वाटला पाहिजे आणि धर्माचे विज्ञान समजून घेता आले पाहिजे. आपल्याकडे धर्म आणि विज्ञान किंवा श्रद्धा आणि विज्ञान किंवा विज्ञान आणि माणूस या दोन्हींमध्ये सतत संघर्ष आणि वाद सुरू ठेवणे मनुष्याच्या विकासालाच घातक आहे. कारण या संघर्षामुळे मानवाने केलेली वैज्ञानिक प्रगती आणि संशोधन अधर्मासाठी वापरले जाते. विज्ञानाने तयार केलेला बाँब हत्येसाठी वापरणे हे त्याचे सहज सोपे उदाहरण आहे. म्हणून धर्माचे उत्सव वैज्ञानिक श्रद्धेच्या विकासासाठी वापरले जावेत हे अधिक मानवतेचे आहे. गणेशोत्सव हा धार्मिक मानायचा की वैज्ञानिक मानायचा हा प्रश्न महत्त्वाचा असतो. गणपती या देवतेला `त्वम् ज्ञानमयो विज्ञानमयोसि' असे म्हटले आहे. त्या देवतेवर धार्मिक श्रद्धा ठेवणाऱ्यांनी अवैज्ञानिक असणारे ध्वनीप्रदूषण करणे यात धर्मही नाही आणि विज्ञानही नाही. त्याचप्रमाणे `असले उत्सव बंद करून टाकावेत' असे वैज्ञानिक विधान करणाऱ्यांनी सामाजिक अस्वस्थता निर्माण होते हेही लक्षात घेतले पाहिजे. या सामाजिक अस्वस्थ भावनेतून समाज विस्कळीत होतो आणि मग विज्ञानही उधळून लावले जाते हे लक्षात घेऊन तरी वैज्ञानिकांनी धार्मिक समजूतींवर तात्पुरता विश्वास ठेवून त्याचा व्यावहारिक उपयोग करून घेतला पाहिजे. मोटारगाडी निखळ वैज्ञानिक संशोधन असले तरी ती डाव्या बाजूने चालविली तर सर्वांचे व्यावहारिक हित असते, त्यामुळे डाव्या बाजूने वाहन चालविणे हाच चालकाचा धर्म आहे असे म्हटले तर बिघडणार नाही. त्याचे चित्त शांत रहावे म्हणून त्याने अमावास्येला वाहनासमोर नारळ फोडायलाही हरकत नाही. कारण त्याचे चालकत्त्व हे वैज्ञानिकदृष्ट्या अचूक असायला हवे. त्यासाठी त्याची धार्मिक भावना जपली पाहिजे.
वैचारिक भावनेने समाजातील ज्येष्ठ मंडळींनी या दोन्हींचे संतुलन राखण्याचा प्रयत्न जारी ठेवला पाहिजे. त्यामधून संघर्ष वाढू न देता समाज विकसित होण्याची दृष्टी निर्माण केली पाहिजे. विज्ञान आणि धर्म हे हातात हात घालूनच चालत राहिले तर मनुष्यत्त्वाचा विकास होत जाईल.
(`आपले जग')

अन्वयार्थ
गेल्या महिन्यात एका वाचकाने विचारलेल्या श्लोकाचा अर्थ देत आहे -
गजालिश्रेष्ठा या निबिडतर कांतारजठरी
मादांधाक्षा मित्रा क्षणभरीहि वास्तव्य न करी
नखाग्रांनी येथे गुरुतर शिला भेदूनिकरी
भ्रमाने आहे रे गिरिकुहरी हा निद्रित हरी ।
अर्थ -(हे)मदांध हत्तींच्या रांगेतील श्रेष्ठ गजा! अतिशय दाट अशा या अरण्याच्या पोटात तू क्षणभरही राहू नको. आपल्या हातांच्या तीक्ष्ण नखांनी मोठमोठ्या शिळा भेदून (आपण हत्तीच मारला अशा)भ्रमाने हा सिंह पर्वताच्या गुहेत (दमून) झोपला आहे.
हे एक रूपक आहे. यातला हत्ती ब्रिटिश शासन असून ते मदांध आहे. निद्रित सिंह भारत आहे. हा सिंह दगडांना हत्तींची गंडस्थळे समजून तीक्ष्ण नखांनी फोडून दमून गुहेत झोपला आहे. कवि म्हणतो, `तुझ्या गडबडीनं सिंह जागा झाला तर तुझी धडगत नाही, तेव्हा तू इथून जा कसा.' (एकदा का भारत जागा झाला की तुझं काही खरं नाही, असा अर्थ)
- रा.श्री.अर्जुनवाडकर,
३५,श्यामसुंदर सोसा, म्हात्रे पुलाशोजारी
पुणे ४११०३०

`सार्थ' आयुष्य
कन्नूर ग्राम,जि.विजयपूर(विजापूर) येथे एक आश्रम आहे. दररोज सत्संग होतो. तेथील सत्पुरुष गणपतराव महाराज यांनी एक कथा प्रवचनात सांगितली, ``वय वर्षे २० झालेल्या मुलीचे लग्न सधन कुटुंबात झाले. घरातले सासू-सासरे  व नवरा नास्तिक होते. पूजा देखील करत नव्हते. मुलगी मात्र सत्संग करायची. भजन, प्रार्थना, अभंग म्हणायची. घरातल्या तिघांनीही जोरदार विरोध केला. पण तिने सत्संग सोडला नाही. हळूहळू चांगला परिणाम झाला. सासू ध्यानधारणेत भाग घेऊ लागली. सहा महिन्यात सासरेदेखील मार्गाला लागले. पुढल्या तीन महिन्यात नवरादेखील रस घेऊ लागला. कुटुंब भक्तीमार्गाला लागले.
एकदा एक स्वामीजी आले. त्यांनी मुलीला विचारले, `बाळ, काय तुझे वय बरं!' ती उत्तरली, `माझं वय २१ वर्षे, सासूचे १ वर्ष, सासरे ६ महिन्यांचे आणि नवऱ्याचे वय ४ महिन्याचे!'
महाराज म्हणाले, `कोड्यात बोलू नको. नीट सांग.'
`महाराज, सासूबाई या सत्संगाच्या मार्गात आल्या त्यास एक वर्ष झाले. सासरे सहा महिन्यात आले, नवरा चार महिन्यांपूर्वी आमच्यात आला.'
सुज्ञांस अधिक काय सांगावे?
संकलक - वामन कृ. कुलकर्णी,
 मिरज  मोबा.९४२०३६०९९४

अनुभवातल्या गंमतगोष्टी
आजींचा अपघात
लग्नसराईत निमंत्रणावरून आम्हाला लग्नासाठी भोपाळला जाणे आले. आम्ही भोपाळला पोचलो. शहराची काहीच माहिती नव्हती. आमचा जानोसा मध्य रेल्वे कामगार संघाच्या विश्रामगृहात झाला. लग्नसमारंभ त्यांच्या सभागृहात झाला. सभागृहाची रचना नाटकासाठीसुद्धा उपयोगी पडेल अशी आहे. समोर वाद्यवृंदासाठी काही भाग सखल खोलगट करण्यात आला आहे. मंचाच्या मध्यभागी पायऱ्या आहेत. लग्नविधी सुरू असताना काही निमित्ताने सभागृहातील व्यक्ती मंचावर जाताना अचानक अडखळत, धडपडत असे. काहीजण पडलेसुद्धा. ज्येष्ठांची अवस्था बघून हसू दाबत धावाधाव करीत. आमच्या बरोबरीच्या एक आजी अशाच अचानक पडल्या. उठता येत नव्हते. हाताचे फ्रॅक्चर असावे. उपस्थित पाहुण्या डॉक्टरांनी कल्पना दिली. `मी यांचा हात गळयाशी बांधून देतो. तुम्ही पुण्याला हाडाच्या डॉक्टरना दाखवा. वेदनाशामक गोळया देतो.'
आमची गाडी भोपाळहून रात्री ९चे सुमारास होती. फार कंटाळवाणे झाले. गाडी येण्यास विलंब होऊ लागला तसतसे अस्वस्थ वाटू लागले. गाडी आली. खूपच उशीर झाला होता. स्टेशनवर सामान उतरवत असताना हमाल म्हणाला, `आपकी गाडी आयी है । जल्दी चलिये ।' मी पुढे, जखमी आजीना घेऊन सौभाग्यवती व मुलगी मागे निघालो. आरक्षित डब्यात आमच्या आसनावर प्रवासी दिसले. लक्षात आले आम्ही भलत्याच गाडीत चढलो होतो. कसेतरी उतरलो. वीस मिनिटांनी आमची गाडी आली. आजी फारच अस्वस्थ होत्या. आम्हालाही रात्र तळमळत काढावी लागली. पुण्याला पोचलो. डॉक्टरना सर्व हकिगत सांगितली. आजींचा हात गळयाशी बांधला कारण खांद्याच्या सांध्यात फ्रॅक्चर होते. तिथे प्लॅस्टर बांधता येत नाही.
- दि. वि. केळकर, कोथरुड, पुणे ३८
फोन (०२०)२५४४६५५२

आर्या वृत्ताचे स्मरण
उत्तर पेशवाईत विशेषत: मोरोपंत पराडकर यानी आर्या हा काव्यप्रकार खूपच लोकप्रिय केला. बहुतेकांना पुढील आर्या माहीत असते -
सुश्लोक वामनाचा, किंवा आर्या मयूरपंतांची
ओवी ज्ञानेशाची, अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची
ही आर्या कुणाची आहे ते ठाऊक नाही. इतर अनेकांनीही आर्या वृत्तात रचना केली. त्या रोचक आहेत. अशाच काही रचना पूर्वी पुष्कळांच्या तोंडी असत, पण कर्ता कोण ते ठाऊक नाही.
गणपतीबाप्पा मी बाळ तान्हे । तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोट्यानुकोटी, मोरेश्वरा बा तू घाल पोटी ।

रोज तुम्ही प्रभुपाशी पेढे बर्फी, नवा खवा खावा
परि म्या एके दिवशी रेवडीचा स्वाद का न चाखावा?

गंगे, गोदे, यमुने, माझा नोहे तुझाचि हा बाळ ।
जतन करी गे याते अर्पण केला न कापिता नाळ ।

कृष्ण म्हणे मातेला, आम्ही जातो आताचि यमुनेला
काही तरी दे खायाला, लाडू अथवा हातात कान्हवला ।

भीम म्हणे कुंतीला, ब्राह्मण समुदाय रडती का पूस ।
त्यांचे दु:ख हराया, अग्नीला भार काय कापूस?

अतिपरिचयादवज्ञा संततगमनादनादरो भवति
मलये भिल्लपुरन्ध्री चन्दनतरुकाष्ठमिन्धनं कुरुते ।
या सुभाषिताचा अनुवाद -
अति परिचयात अवज्ञा, संतत गमनामुळे अनादर हो ।
भिल्लांगना मलयीच्या योजिती इंधनास चंदन हो ।

दिधले दु:ख पराने, उसने फेडू नयेची सोसावे ।
शिक्षा देव तयाला करील म्हणूनी उगाच बैसावे ।

तू सागर करुणेचा, देवा तुजलाचि दु:ख सांगावे ।
तुजवाचूनी इतरांते, दीनमुख पसरोनी काय मागावे?

स्तुती करावी परमेश्वराची, करू नये कधीही व्यर्थ नराची ।
ही आर्या अर्धवट आठवते. त्याचा पूर्वार्ध(की उत्तरार्ध) काय?

का न सदन बांधावे, उंदीर करतील तयामधे बीळ ।
ही देखील अशीच अर्धवट आठवणारी ओळ!
संकलक श्री.धुं.जोशी, पुणे ५१
(मोबा : ९४२१९१७९९६)

अनैसर्गिक खा खा...
पृथ्वीतलावर सर्व प्राणिमात्र-वनस्पती यांना नैसर्गिक गरजा असतात. मुख्यत्त्वे म्हणजे आहार - अन्न. मानवप्राणी सोडून इतर सर्व प्राणिजात-वनस्पती यांच्या आहारात काहीच फरक पडलेला नाही. वनस्पतींना पाणी-सूर्यप्रकाश तेच आहे. वाघ-सिंह प्राण्यांचे मांसाहारी अन्न, हत्ती-घोडा-गाय यांचे शाकाहारी अन्न शतकानुशतके तेच आहे. मानवप्राण्याच्या आहारात फरक पडला. आदिमानव शिकारीच्या अन्नावर, फळे खाऊन जगत होता. आज अन्नाचे हजारो प्रकार समोर आहेत. पृथ्वीच्या कोणत्याही भागात असलेली पाककृती काही सेकंदात सर्वांना उपलब्ध होते. रूढी-परंपरा, आचार-विचार, आरोग्य ह्या बाबी बाजूस ठेवल्या. नवनवीन पदार्थांचा आस्वाद घेताना विचार केला नाही. प्राणी मात्र जागृत असतात. कृत्रिम फळ तयार करून ठेवा, पोपट त्याला टोच्या न मारता निघून जाईल.
पृथ्वीवर प्रत्येक ठिकाणी हवामान-पाऊसपाणी निरनिराळे आहे. आपल्या जीवनशैली वेगळया आहेत. भारतात उत्तरेकडे गहू, दक्षिणेकडे भात, समुद्रकाठी मासळी आणि मध्यभागात जोंधळा-नाचणी वगैरे! प्रत्येक व्यक्तीची तब्येतपाणी निरनिराळी. असे असूनही नवनवीन मोहमायेला आपण बळी पडलो. परिणाम आता स्पष्ट दिसू लागले आहेत. औषधे असूनसुद्धा व्याधी वाढत आहेत. मग मात्र वैद्यकीय सल्ल्याप्रमाणे नियंत्रित आहार!!
आपल्याकडे भोजन घेण्यापूर्वी श्लोक म्हटला जातो - वदनी कवळ घेता.... जाणिजे यज्ञकर्म । यज्ञ प्रत्यक्ष पाहिला नव्हता. गेल्या वर्षी अगदी जवळून पाहण्याचा योग आला. मग `जाणिजे यज्ञकर्म'चा अर्थ समजला. आपला आहार-जेवण अगदी यज्ञासारखे असावे. जागा स्वच्छ-मोकळी. यज्ञातील `आहुती' अत्यंत सावकाश, ठराविक मंत्राबरोबर, ठरविल्याएवढीच! शांत चित्ताने जेवण घ्यावे. आजकाल उभ्या उभ्या जेवण कसेही काहीही! उदरभरण नोहे!
आठवण झाली ती होळी पौर्णिमेची. त्यावेळी अग्नी प्रज्वलित केला जातो पण त्यात आहुती? काय वाटेल ते! झुडपे, जुने फेर्नचर, कागद वगैरे! आजकालचा आहार ह्याच प्रकारात मोडतो. दिवसभर उदरभरण. भूक असो-नसो, योग्य की अयोग्य, अपायकारक की उपायकारक? हुताशनीला कशाचीही आहुती! मग व्हायचा तोच परिणाम- बोंबाबोंब!
- मुरलीधर का. छत्रे, डोंबिवली (प.)
फोन (०२५१)२४८५८८२

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन