Skip to main content

6April2015

स्मृतींची चाळता पाने
स्त्री चे आजीपण
- वा. मो. बर्वे
माझे वडील सन १९४६ मध्ये वारले. तेव्हा ते ४९ वर्षांचे होते. आम्ही भावंडे लहान होतो. माझे वडील एक वर्षाचे असताना, त्यांचे वडील (माझे आजोबा) कॉलऱ्याने वारले. नंतर सख्ख्या आजीने म्हणजे वडिलांच्या आईने विहीरीत उडी घेऊन आपले जीवन संपवले, कारण त्याकाळी विधवांचे केशवपन होत असे, आणि त्यांना फार हालात दिवस काढावे लागत. त्यावेळी म्हणजे १८९६-९७ साली आमच्या घरात पाच बालविधवा केशवपन केलेल्या होत्या. वडिलांच्या नातेवाईक म्हणजे कोणी मावशी, काकू, आते, मामी अशा होत्या. त्यांना एकतर `आप घर' किंवा `बाप घर'! त्या वयोवृद्ध महिलांनी आमच्या घरी वडिलांचा सांभाळ व पालनपोषण केले. पुढे वडील कर्ते-सवरते झाल्यावर त्यांनी त्यांचा सन्मानाने सांभाळ केला. माझ्या आठवणीत, त्यांपैकी काहीजणी भ्रमिष्ट झाल्या होत्या; त्याचा सर्व घराला ताप होत असे. पण वडिलांनी त्यांचा चुकूनही कधी अपमान केला नाही, किंवा रागे भरले नाहीत.
त्यापैकी एका आजीची मला आठवण आहे. या आजीचा दिवस पहाटे तीन वाजता सुरू होत असे. तिच्याजवळ आमच्या भावंडांपैकी एक मूल निजायला असे. त्याला अंथरुणावर सारखे करून, आपले पांघरूण त्या मुलावर घालून, जमिनीला(भूमीला) वंदन करून ती उठे. प्रातर्विधी आटपून देवाशी निरांजन लावून नमस्कार करी आणि एक पणती लावून घेई, कारण त्यावेळी गावात वीज आलेली नव्हती. ती पणती घेऊन स्वयंपाकघरात चूल पेटवून, एक पितळेचे मोठे भांडे भरून चहा करून घेई, मग दिवसभर चहा घेत नसे.
देवघरचे केर पोतेरे, चूल सारवणे ही कामे होत. एकीकडे मंजूळ आवाजात `उठा उठा हो सकळीक, वाचे स्मरावा गजमुख' इ. चालू असे. ताक करून लोणी काढेपर्यंत बाहेर साधारण दिसायला लागे. मग अंगण झाडणे, फुले-तुळशी काढणे. एकदा असे झाले की, लवकर उठल्यावर मोरीत चहाचे भांडे धुवून पाणी टाकल्यावर घुर्र फुस असा आवाज झाला. तिला संशय आला, म्हणून तिने वडिलांना हाक मारली. वडील कंदील घेऊन आले तर मोरीत मोठा नाग उंदीर खाऊन आहारला होता. वडिलांनी त्याला मारले, तो आठ फूट लांबीचा होता.
सकाळी आठ-नऊ वाजेपर्यंत आजीचे स्नान, तुळशीची पूजा, त्यानंतर ती सोवळे नेसून स्वयंपाकाला लागे. आजी आमटी-भात तेवढे करी. बाकीचा स्वयंपाक आई करीत असे. मुले व वडील जेवायला बसत असू. नंतर वडील कचेरीत व आम्ही मुले शाळेत. आजी जेवून घेत असे, आणि आईला म्हणे, `गंगा, आता माझ्याच्याने काही होणार नाही गो. मी माजघरात आढे (वामकुक्षी) घेते.' दुपारी ३ वाजता पोथी वाचून नंतर देवळात. तिच्या बरोबरीची मैत्रिण बयोताई हिच्याकडे थांबून मग घरी येत असे. सायंकाळी हलकासा आहार घेऊन, मुलांची जेवणे झाल्यावर त्यांना घेऊन झोपाळयावर बसे. रामायण, महाभारत, पुराणातील गोष्टी सांगून निजायला जात असे. झोप आली नाही तर अंथरुणावर माळ घेऊन बसे.
मुंबईहून चाकरमानी गावी आला की आजीला आवर्जून भेटायला येत असे. आजीला खजूर, चहा पावडर व आम्हा मुलांना खाऊ आणीत असे. गावातल्या लोकांसाठी आजीनेही तसेच केलेले असे. आजी उत्तम सुईण होती. बाळंतीण अडली तर आजी हातातलं काम टाकून कोणताही विचार न करता त्या ठिकाणी जाऊन बाळ व बाळंतिणीला सोडवीत असे. कधीही `तिची बाळंतीण' अडली-अवघडली नाही. आजी बटव्यातील औषधे देऊन इलाज करीत असे. औषधे विनामूल्य असत. बारीक ताप, कावीळ, नागीण, आमांश, नाळगुंदे असल्या दुखण्यांवर तिच्याकडे खात्रीची औषधे होती. त्यासाठी पाऊस संपता संपता म्हणजे सराईच्या कार्तिक महिन्यात ती गड्यांबरोबर जाऊन कुड्याचे पाळ, भारंगमूळ, बाकेरीचे भात इ. झाडपाल्याची औषधे आणून संग्रही ठेवीत असे. तसेच एखाद्या घरी चूल पेटली नाही तर पेजेसाठी तांदूळ-कण्या-ताक इत्यादी देत असे. कुणी आजारी असेल तर मऊभात, लिंबाचे लोणचे इ.नेऊन देत असे. एखादी हरीजन बाई बाळंतपणात अडली तरी त्या ठिकाणी कोणताही शिवाशिवीचा विचार न करता बाळंतिणीची सोडवणूक करीत असे. एरव्ही घरी जेवण किंवा पूजेच्या ठिकाणी आम्हा मुलांनाही फिरकू देत नसे, पण अशा वेळी सर्व सोवळे गुंडाळून ठेवी. असा मानवधर्म पाळला. तसाच तो अनेक घरांत असे.
आजी देहयष्टीने खारकेसारखी होती. घारी गोरी, नाकेली, तरतरीत होती. व्यवहारज्ञानी व बुद्धिमान होती. व्यवहाराचा एखादा गुंता सुटला नाही व वडील चिंताग्रस्त दिसले तर त्यांना ती युक्ती सांगून चुटकीसरशी गुंता सोडवी. तिचा दराराही तसाच होता. आमच्या आळीत एक नाठाळ वाह्यात मुलगा होता, तो कुणाला जुमानत नसे. वडीलधाऱ्यांना दुरुत्तरे करीत असे. असाच आजीसमोर वाह्यातपणा करू लागल्यावर आजी त्याला म्हणाली, ``तुला बांधून निगडीच्या फोकाने झोडून काढीन, आणि तुझ्या बापालाही कान धरून उभा करीन. माझ्यासमोर वाह्यातपणा चालणार नाही हे लक्षात ठेव!!'' पुन्हा तो मुलगा आजीसमोर उभा राहिला नाही.
आजीचे लग्न नवव्या वर्षी झाले आणि त्याच वर्षी तिचे यजमान प्लेगने वारले. तेव्हापासून ती बालविधवा, केशवपन करून आमचे घरी राहिली. झोपाळयावर एकटीच बसली म्हणजे गाणे म्हणत असे, `कसा मज सोडून गेला राम' तिचे दु:ख असे व्यक्त होत असे; त्या वयात लक्षात येत नसे; आता ते लक्षात येते.
नवविवाहित दांपत्य आजीच्या पाया पडायला आले की, माझ्या आईकडून वधूला खणकापड आणि नवऱ्या मुलाला १ रुपया देई आणि म्हणे, `टोपीला रुपया घे हो बाळा' आजीचे दात शाबूत होते. दातांना मीठ आणि राखुंडी (गाईच्या शेणाची) लावीत असे म्हणून किंवा काय, तिला दाताचे दुखणे माहीत नव्हते, पण अलीकडे गुडघेदुखीचा त्रास होत असे.
अशा माझ्या त्या आजीला मरण फार छान आले. पहाटे उठून देवघरात देवाजवळ डोके टेकले, तिथेच प्राण गेला. सोमवार होता. वडिलांनी पंचांगात वेळ पाहिली तो होता ब्राह्ममुहूर्त, आणि अमृतसिद्धी योग!! आजी चटका लावून गेली.
- वा.मो.बर्वे
सुर्वे बिल्डिंग, पोस्ट गल्ली, दापोली
(मोबा.९९७५०९६४१६)

नजर समोरच राहू दे
आपण स्कूटर चालवत असतो.
लक्ष समोर
रस्त्याकडे असतं,
तसंच अधून मधून
बाजूच्या आरशात
मागची रहदारी आपण पाहात असतो.
त्यात मागे पडलेल्या गाड्या, घरं, माणसं
लहान लहान होत जातात, दिसेनाशी होतात.
पण आपली नजर मात्र
सतत समोर असावी लागते.
समोरचा रस्ता, त्याची वळणं, खड्डे,
समोरून येणाऱ्या गाड्या
या सर्वांवर नजर ठेवणं फार महत्त्वाचं असतं.
नाहीतर कुठंतरी गाडी आपटेल, घसरेल, अपघात होईल.

जीवनाची वाटचाल अशीच असावी.
आपल्या पुढील वाटचालीकडं
सतत लक्ष पाहिजे.
समोरचे अडथळे, आव्हानं
कशी पार पाडायची
याकडं संपूर्ण लक्ष पाहिजे.
कारण जीवन सतत पुढं वाहात असतं.
मागं पडलेल्या गोष्टी
घडून गेलेल्या असतात,
त्या बदलत नाहीत.
गेल्या वर्षामधल्या घटना
चांगल्या वा वाईट, ह्या स्वीकारून
आपल्याला नव्या संवत्सराचं
स्वागत करायचंय.
आपली नजर आता
नव्या वर्षावर स्थिर करूया. नवीन वर्षाचं स्वागत नवीन निश्चय करून,
नवी स्वप्नं पाहून करूया.

नवीन वर्ष कोरी पाटी घेऊन येते.
त्यावर काय लिहायचं,
हे आपल्या हातात असतं.
प्रत्येकानं आपलं स्वप्न त्यावर लिहावं.
आपल्या यथाशक्ती प्रयत्नांचा
व उज्वल यशाचा निश्चय करावा.
नवीन काहीतरी शिकण्याचा
संकल्प करावा.
मग ते कॉम्प्यूटर शिकणं असो,
करत असलेल्या कामातील
सुधारणा असो, नवीन भाषा शिकणं असो!
स्कूटरवर बसून आपण काही
गोल गोल फिरत बसत नाही.
स्कूटर सुरू करण्यापूर्वी
आपल्या मनात ठरलेलं असतं की,
अमुक ठिकाणी जायचंय.

नवीन वर्षाचं स्वागत आनंदानं करा.
मागे पडलेल्यास निरोप द्या.
जुने दु:खद विचार, मान-अपमान,
निराशा अथवा पराभव सगळं मागे राहू देत.
बाजूच्या आरशात
फार वेळ बघत बसायचं नसतं.
नजर समोरच राहू दे.
- डॉ.घन:श्याम वैद्य
कर्नाटक हेल्थ इन्स्टि.,घटप्रभा (जि.बेळगाव)
फोन (०८३३२) २८७१०२, २८६२३२

नोंदला जातो तो इतिहास
एखाद्या कार्याबद्दलची स्वत:ची कर्तबगारी कालपटलावर  स्वत: नोंद करावी की नको असा एक चिरंतन प्रश्न निर्माण होत असतो.
प्राप्त काल हा विशाल भूधर, सुंदर लेणी तयात खोदा
निजनामे त्यावरती नोंदा
असे कृष्णाजी केशव दामले (केशवसुत) यांनी म्हणून ठेवले, त्यावरून अशी नामे स्वत:ची स्वत: खोदून ठेवायची असतात की काय अशी शंका येते. अलीकडे पुरस्कारांचा बाजार इतका मातला आहे की कोणीतरी कसलातरी पुरस्कार देत-घेत राहतो आणि तो मिळाल्याबद्दल पुन्हा सत्कारांच्या फैरी झडत राहतात. मिळालेली प्रशस्ती आणि स्मृतिचिन्हे दिवाणखान्यात मिरवत राहतात. काही कालानंतर पुढच्या पिढ्यांना असे वाटेल की, हा कोणी आपला पूर्वज भलताच कर्तबगार होता; कारण त्याने अशा पद्धतीने आपली नामे त्या काळातील पर्वतशिळांवर कोरून ठेवलेली आहेत. ती खरी की खोटी हे कालांतराने पुढच्यांना लक्षात येण्यासारखे नसते.

अजंठ्याची लेणी खोदणारे कलाकार कोण होते ते इतिहासाला माहीत नाही. डोंगर खोदताना शिखराकडून खाली पायाकडे तो कोरत-फोडत गेलेले हे कलावंत एकदोघेच नव्हते. ते काम काही पिढ्या पुरून उरलेले आहे. त्याचा आराखडा कोणी, कसा तयार केला आणि काही पिढ्या काम करीत राहणाऱ्या कलाकारांपैकी एकालाही आपले नाव कुठेतरी कोपऱ्यात नोंदवून ठेवावे असे का वाटले नसेल? लेणी पाहायला जाणाऱ्या शाळा-कॉलेजातल्या पोराटोरांनी तिथे खडूने आपले नाव गरगटून यावे हा पराक्रम नेहमीच दिसतो. पण ती जगप्रसिद्ध लेणी कोरणाऱ्या कलावंतांचे नाव इतिहासाला माहीत नाही. इतिहास शोधणाऱ्यांसमोर हे एक आव्हानच असते. काही वर्षांपूर्वी इंदिरा गांधींनी कालकुपी या नावाचे एक प्रकरण जमिनीत पुरून ठेवण्याची इलम काढली होती. ती पुरल्यानंतर बाइंर्चा पराभव झाला आणि पुढच्या सरकारने ती कालकुपी पुन्हा उकरून काढली. आपले नाव प्राप्तकालीच्या भूधरावर कोरून ठेवणाऱ्यांची विश्वासार्हता किती, हा प्रश्न त्यानिमित्ताने पुढे आला.

आजपर्यंत जो इतिहास शोधला गेला, प्रकाशित झाला किंवा समजावून घेतला गेला त्या प्रत्येकाविषयी आपली समज किती असते याचाही अंदाज येत नाही. आपल्याला पटेल तोच इतिहास खरा असे एकदा मनाने घेतले की मग `खरा इतिहास' पुन्हा लिहून काढण्याची चळवळ सुरू होते. काही घराणी व ज्ञाती-संस्थांनी आपले कुलवृत्तांत किंवा घराण्यांचे इतिहास किंवा चरित्रकोश प्रकाशित करण्याची प्रथा आहे. जे कागद किंवा तशा स्वरूपाचे पुरावे ज्यांच्या हाती येतील त्यांनी त्याचा मतितार्थ शोधून तो इतिहास म्हणून मांडावा ही प्रचलित प्रथा आहे. पण जो इतिहास म्हणून हाती येतो तो तरी खरा कशावरून ठरवायचा? आजकाल पुरस्कार मिळविणारी मंडळी आपली कर्तबगारी कागदोपत्री कोरून ठेवतात; ते कार्य खरोखरीच खरे आहे का, हे शे-दोनशे वर्षांनी कसे समजावे? त्याउलट खरोखरीच काही कर्तृत्व गाजवणारे लोक असेही असतात की आपले नाव सहसा कुठे येऊ देत नाहीत. अजंठा कलाकारांच्या जातकुळीतील या लोकांची नोंद पुढच्या काळात कुणाला करणेच शक्य नाही. मग जी नावे कोरली गेली आहेत ती खरी,- की जी नावे कोरली गेलेली नाहीत ती खरी? शेवटी खरा इतिहास हा इतिहासाच्या दोन ओळींच्या मधून वाचावा लागतो असे म्हणतात ते खरे.

असे असले तरी दोन ओळींच्या मधून वाचण्यासाठी त्या स्वरूपाच्या काहीतरी दोन ओळी समोर असल्या तरी पाहिजेत. म्हणून अशा प्रकारचे लिखित किंवा नोंदित पुरावे यांची  गरज कमी होत नाही. ती पूर्ण होण्यासाठी अनेक प्रकारांनी अनेक घटना आणि चरित्रे नोंद झाली असली पाहिजेत, म्हणजे त्यातून सत्य-असत्याचे तारतम्य भावी काळातील इतिहासकाराला पाहता येईल. म्हणजे असे की, आज जे पुरस्कार किंवा पदव्या साक्षात् भंकस वाटतात त्याबद्दलचे मतप्रदर्शनसुद्धा स्पष्टपणे कुठेतरी कोरून ठेवण्याची आवश्यकता आहे. तोही पुरावा म्हणून काही काळानंतर कुणाच्या हाती लागला तर ज्याला हा वावदूक पुरस्कार किंवा पदवी मिळाल्याची दखल घेतली जाईल त्याचे फोलपण दुसऱ्या कोणत्यातरी कागदपत्रावरून समजून येऊ शकेल. पुष्कळदा असे म्हटले जाते की जे चांगले आहे त्याची दखल घ्यावी, जे चुकीचे आहे ते सोडून द्यावे. पण ही गोष्ट प्रत्येकानेच सांभाळली तर ठीक आहे. अन्यथा जे चुकीचे आहे तेच चांगले म्हणून मांडणारे खरे ठरतील आणि इतरांना, असल्या चुकीच्या कर्मालाच चांगले म्हटले गेले होते असे वाटू लागेल. इतका कर्मदरिद्रीपणा आजच्या काळाने भावी काळासाठी मांडून ठेवावा का?

एक काळ असा होता की इतिहास खरे बोलत असे. पुष्कळदा तो मूक असला तरी निदान असत्य नव्हता. आजकालच्या जगात तशी शाश्वती देता येत नाही. कोण खरा आणि कोण खोटा हे समाजमन पक्के जाणून असते. पण वर्तमानकाळ हा जेव्हा भूतकाळ होईल त्या भविष्यकाळात या खऱ्याखोट्याची शहानिशा करण्याला आजचा समाज त्यावेळी असणार नाही. त्यामुळे केवळ अशी कोरून ठेवलेली कर्तबगारी खरा इतिहास म्हणून मांडली जाईल हा धोका आहे. तथापि कसा का असेना चुकीचा किंवा बरोबर, इतिहासाच्या ठिकाणी इतिहास म्हणून वाचला गेला तर काय बिघडणार आहे? ज्यांच्या कर्तबगारीची दखलच घेतली जाणार नाही असे महात्मे त्याबद्दल तक्रार करणार आहेत थोडीच?


फुले-कर्वे भेट झाली?
मी फुले व अण्णा कर्वे यांची चरित्रे वाचली आहेत पण दोघांची भेट झाली होती का? फुलेंचे कार्यच अण्णांनी पुढे चालविले. रमाबाई रानडे व पंडिता रमाबाइंर्नीही तेच कार्य केले. त्याचा सुपरिणाम आज समाजावर दिसतो आहे. दोघांची कधीतरी पुण्यातच भेट झाली असणार. कृपया माहिती द्यावी.
कै.राजा परांजपे यांनी उत्तमोत्तम चित्रपट केले. त्यांचे चरित्र, आठवणी लिहिल्या आहेत का? त्यांच्या स्मृतिदिनी टीव्हीवर एक लघुपट पाहिला होता. पण कोणीही त्यांचे चरित्र लिहिले नाही. असे का?
- सतीश पटवर्धन, कागवाड
फोन (०८३३९) २६४७०५

कन्या `दान' हा भाव नसतो
गेल्या (फेब्रु) अंकात `कन्यादान' हा चुकीचा शब्दप्रयोग असल्याचे म.वि.कोल्हटकर यांनी म्हटले आहे. आजच्या सामान्य व्यवहारातही `मुलगी कोणाला दिली?', `कुठे दिली?' असे आपण सहज म्हणतो व स्वीकारतो. त्याऐवजी दुसरा शब्द उपयोगिता येऊ शकतो. पण पुरुषी वर्चस्व, लिंगभेद, अहंभाव हे सर्वकाही मानण्यावर आहे. अजूनतरी विवाहानंतर कन्या वराच्या घरी जाते. त्यामुळे `पुत्रदान' विधी होणार नाही. पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनीने संस्कार-पोथ्या प्रकाशित केल्या, त्यात कालानुरूप आशय आहे. त्यापैकी विवाह-पोथीत कन्यादानाचा मंत्र आहे.
$ क इदं, कस्मै अदात् ।
काम: कामाय अदात्
कामो दाता, काम: प्रतिग्रहीता ।
कामं समुद्रं आविश
कामेन त्वा प्रतिगृह्णमि ।
काम एतत् ते वृष्टि: असि,
द्यौस्त्वा ददातु ।
पृथिवी प्रतिगृह्यातु ।
(आश्वलायन श्रौतसूत्र : ५.१३)
या मंत्रात वर म्हणतो की, ``आपण मला आपली कन्या देत आहात. तथापि हे कन्यादान कोणी कोणाला केले?- तर प्रीतीने प्रीतीलाच हे दान दिले. दान देणारी प्रीती, आणि दान घेणारीही प्रीतीच. हे वधू, तू प्रीतिसागरात प्रवेश कर. मी प्रेमाने तुझा स्वीकार करतो. हे कामदेवा, हे सर्व तुझेच आहे. हे वधू, तू प्रीतीची मूर्तिमंत कृपावृष्टी आहेस. आकाश तुझे दान करो; पृथ्वी तुझा स्वीकार करो.''
या सगळयात, वधू म्हणजे दान देण्याची वस्तू असा अवमानक सूर किंवा उल्लेख कुठेही नाही. `कन्यादान' असा प्रचलित भावार्थ पूर्णत: टाळायचा असेल तर स्वयंवर पद्धतीने विवाह होऊ शकतो. तेव्हाही वरील मंत्र म्हणता येईल!
- शैलेन्द्र केशव म्हसकर,
२३७, नारायण पेठ, पुणे-३०
(फोन : ०२०-२४४५१३१९)
---------

सुरेशराव साठे यांना एज्युकेशन एक्सलन्स पुरस्कार
महाराष्ट्न् चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्नीज अॅन्ड अॅग्रीकल्चरच्या कोकण विभागीय समितीचे माजी अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा उद्योजक संघटनेचे संस्थापक सदस्य व अनेक वर्षे कार्यवाह राहिलेले चिपळूणचे उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते सुरेश दत्तात्रय साठे यांना दिल्लीत एका समारंभात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते `ग्लोरी ऑफ एज्युकेशन एक्सलन्स' हा पुरस्कार देण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये श्री.साठे आजही सक्रीय आहेत. विशेषत: प्राथमिक, माध्यमिक शिक्षणासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबविले आहेत. कोकण विकास प्रतिष्ठान संघटनेमार्फत शिक्षकांसाठी प्रबोधनाचे कार्यक्रम, शिबीरे ते घेत असतात. मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल व्याख्यान योजनेत त्यांनी सहा वर्षे व्याख्याने दिली आणि काही महाविद्यालयांतून आयोजक म्हणूनही काम केले. श्री.सुरेशराव हे विद्यार्थी परिषदेच्या मुंबई शाखेचे कार्यवाह व पुढे महाराष्ट्न् प्रदेश सहमंत्री होते. विविध विषयांवर ते लेखन करत असतात. त्यांनी पाच पुस्तके लिहिली असून त्यांना रा.स्व. संघाचे कै.माधवराव मुळये यांच्या चरित्र लेखनासाठी पंजाब सरकारच्या सांस्कृतिक विभागातर्फे पुरस्कारही प्राप्त झाला. या चरित्रग्रंथाचे हिंदी, पंजाबी, डोगरीमध्ये भाषांतर झाले. मध्यप्रदेश शिक्षण संचालनालयातर्फे `फाळणीचा इतिहास व विस्थापितांचे पुनर्वसन' या प्रकरणाचा एम.ए.हिस्ट्नी अभ्यासासाठी अंतर्भाव केला आहे. संघाचे काही वर्षे प्रचारक राहिलेले, मूळचे कल्याणचे सुरेशराव यांचेकडे सध्या उत्तरपूर्व सीमांत राज्यांतील शैक्षणिक व व्यावसायिक उपक्रमांच्या प्रसारणाचे व समन्वयाचे काम असून त्यांचा या भागात नित्याचा संपर्क आहे. त्यांचे परममित्र व नागालँड, त्रिपुरा व आसामचे राज्यपाल मा.पद्मनाभजी आचार्य यांनी सुनियोजित केलेल्या विकास आराखड्यांचे प्रारूप तयार करण्यासाठी नेमलेल्या समितीत श्री.साठे काम करीत आहेत.
संपर्क : श्री.सुरेश साठे-९८२२८२३६५३

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन