Skip to main content

20April2015

अमेरिकेतील अश्रद्ध
- डॉ.शरद अभ्यंकर
बराक ओबामा यांनी एकदा अमेरिकेचे वर्णन `िख्र्तासी, ज्यू, मुस्लिम, हिंदू आणि.... अश्रद्धांचा देश' असे केले. या विधानाला ऐतिहासिक महत्त्व आहे, कारण आतापर्यंत कोणाही अध्यक्षाने अमेरिकेतील अश्रद्ध लोकांची अधिकृत दखल घेतली नव्हती. याचा अर्थ असा नव्हे की, अमेरिकेत फार कोणी अश्रद्ध नाहीतच! कदाचित सर्व मुस्लिम, हिंदू आणि ज्यू यांच्या एकत्र संख्येपेक्षा त्यांची संख्या जास्त असेल. निरनिराळया पाहण्यांनुसार ही संख्या ५ ते १० टक्के आहे.
अमेरिकेत नास्तिक नागरिकांना बऱ्याच बाबतीत दुय्यम दर्जाची वागणूक मिळते. इतकी की नास्तिक असणे हा तिथे जवळपास गुन्हाच मानला जातो. उघडपणे आपण नास्तिक आहोत हे सांगणाऱ्या कोणालाही अमेरिकेत उच्च अधिकारपद मिळू शकत नाही. निवडणुकीला उभा असणारा उमेदवार अश्रद्ध आहे अशी थोडी शंका जरी आली तरी, तो निवडून तर येऊ शकतच नाही; उलट तो उजव्या विचारसरणीच्या िख्र्तासी गटांच्या धारदार टीकेचे लक्ष्य ठरतो. अमेरिकी संसदेतील फक्त एक सदस्य(क्रॅलिफोर्नियाचे रिपब्लिकन प्रतिनिधी पीट स्टार्क) हे, आपण कोणी देवबिव मानत नसल्याचे जाहीरपणे मान्य करतात. नास्तिक मंडळींना नुसतेच अधिकारपदापासून दूर ठेवले जात नाही, तर त्यांच्याविरुद्ध जहरी टीकाही त्यांना सहन करावी लागते. इलिनॉय विधानसभेत एका चर्चला १० लाख डॉलर अनुदान देण्याविरुद्ध एका नास्तिक सभासदाने मत मांडले, त्याला उत्तर देताना रिपब्लिकन सदस्य डेव्हिस गरजले, ``हा अब्राहम लिंकन यांचा देश आहे. इथे लोक परमेश्वरावर विश्वास ठेवतात...नास्तिक असे काही मत असते हे आपल्या मुलांना सांगणे हेसुद्धा धोकादायक आहे. तुम्हाला इथे बसण्याचाही अधिकार नाही. आम्ही कशावर तरी श्रद्धा ठेवतो, तुम्ही फक्त विध्वंसावर श्रद्धा ठेवता.''
आपल्याला आश्चर्य वाटेल पण अमेरिकेतील बालवीर, अमेरिकन लीजन, अशा महत्त्वाच्या संस्थांमध्ये नास्तिकांना प्रवेश देण्यालाच बंदी आहे, तर या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी यू.एस.टुडे या वृत्तपत्राने केलेल्या पाहणीनुसार ५३% लोकांनी आम्हाला नास्तिक अध्यक्ष नको असे सांगितले. लिंकनबद्दल म्हणाल तर, खुद्द त्याच्या मतांनाही अनेक धर्मगुरूंचाच विरोध होता. त्याच्या स्प्रिंगफिल गावातील २३ प्रॉटेस्टंट पंथीय धर्मगुरूंपैकी २०जण त्याच्या विरोधी होते. तो कुठल्याच चर्चचा सभासद नाही, दोन दोन देव मानतो, असे आक्षेप घेऊन `त्याला मते देऊ नका'असे हे धर्माधिकारी मतदारांना बजावत असत.
अर्थात, नवीन अध्यक्षांनी साद घातली म्हणजे या अश्रद्ध नास्तिकांबाबत सर्व गोष्टी बदलतील असे नाही; कारण अमेरिका भारताप्रमाणेच बहुतांशी सश्रद्ध लोकांचा देश आहे. एखाद्या नास्तिक माणसाला निवडून देण्यात लोकशाहीविरोधी काही नाही, पण त्याला दमदाटी वा मारहाण करून उभेच राहू न देणे हे नक्कीच लोकशाहीला मारक आहे. पण अशा गोष्टी तिथे घडतात, आणि नास्तिक मंडळींनी या धर्मगटांच्या विरुद्ध मोहीम उघडल्याखेरीज त्या थांबणार नाहीत, असे सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि नास्तिक विचारवंत रिचर्ड डॉकिन्स म्हणतात. अनेकांना वाटते की, तर्कशुद्ध विचार करा, विज्ञानावर निष्ठा ठेवा, बुद्धीला पटेल तेच स्वीकारा या सरळ-सोप्या-स्वयंसिद्ध गोष्टी पटवण्याकरता मोहीम काढा, चळवळ उभारा, मेळावे घ्या यांची जरूरच काय? मग धर्मवाले लोक आणि आपण यात फरक काय राहिला?
आतापर्यंत बहुतांश वेळा आस्तिक विरुद्ध नास्तिक लढाईत एकमेकांविरुद्ध कडक टीका करणे, खिल्ली उडवणे असे नकारात्मक मार्ग अवलंबले जात. त्यामुळे तसल्या वादांतून तत्वबोध वगैरे न होता कडवटपणा आणि शत्रुत्व भावना वाढीस लागे. दुसऱ्याची मते पटल्यामुळे हृदयपरिवर्तन झाले असे कधीही होत नसे. पण आता मार्गारेट डाऊने या महिलेने नास्तिकवादाचा सकारात्मक प्रचार करायला सुरुवात केली आहे. त्यातला पहिला भाग म्हणजे धर्म न मानणारे लोक कोणी राक्षस व गैर नसून देव-धर्माचा भाग वगळल्यास तेही अन्य सामाजिक मूल्ये मानणारे, देशप्रेमी, लोकशाहीवादी, इतरांना मदत करणारे जबाबदार नागरिक असतात हे स्वीकारणे. नास्तिक असणारा माणूस अनैतिक असणारच असे समजण्याचे कारण नाही. `धर्मपालन म्हणजेच नैतिकता' असे समजणाऱ्यांना ते पटवून देणे आवश्यक आहे. दुसरा भाग म्हणजे दोन्ही पक्षांनी चर्चासत्रे, सामाजिक कामे या निमित्ताने एकत्र येणे. पाहूया, यामुळे तरी अमेरिकेतील नास्तिकांना बरे दिवस येतात का?
जगात राजकारणामध्ये अश्रद्ध माणसाला वाव मिळणे अवघडच असते. अधिकृतपणे देशाचा विशिष्ट धर्म मानणाऱ्यांबद्दल बोलायलाच नको, पण भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशातही वरवर तरी बहुसंख्याकांच्या धर्मात रस दाखवावा लागतो. त्यामुळेच मूर्तिपूजा न मानणाऱ्या इस्लाम धर्माचे अनुयायी बॅ.अंतुले हरिहरेश्वराचे दर्शन घेऊन निवडणुकीचा फॉर्म भरायचे, तर रॉय पंथाचे यशवंतराव चव्हाण साताऱ्याच्या खिंडीतल्या गणपतीला नारळ फोडून! त्यामुळेच आपल्या देशात अद्यापि `नास्तिक' या गटाला कोणतीही कायदेशीर अथवा समाजशास्त्रीय मान्यता नाही. प्रत्येक शिरगणतीच्या वेळी मी स्वत: `धर्म' या सदरात माझ्या नावापुढे `कोणताही नाही' असे लिहिण्याचा आग्रह धरतो. पण माहिती घेणाऱ्याचाही इलाज चालत नाही. कारण त्याच्याकडील यादीत हा पर्यायच नसतो. मग नाईलाजाने `हिंदू (जन्माने)' अशी नोंद केली जाते.
नास्तिक नागरिकांचे असे खच्चीकरण होण्याचे प्रमुख कारण म्हणजे धर्माच्या बाबतीत कोठलीही चिकित्सा अथवा विचारमंथन होण्यावर लादलेले प्रतिबंध. `कोणाच्याही धर्मभावना दुखवायच्या नाहीत' असा यामागचा सद्हेतू सांगितला जातो. यामुळे धर्माधर्मातील सहिष्णुता वाढते म्हणता काय?-बिल्कुल नाही. उलट आपल्या धर्माविषयी प्रत्येकजण अतिशय हळवा आणि अन्य धर्माविषयी असहिष्णू बनतो. कोणी मुस्लिम धर्माभिमानी, प्रेषिताचे व्यंग्यचित्र काढणाऱ्याची हत्या करणाऱ्याला मोठे बक्षीस जाहीर करतात; कोणी हिंदू मूलतत्त्ववादी धार्मिक भावना दुखावल्या म्हणून कलाप्रदर्शने उधळून लावतात; तर िख्र्तासी धर्माभिमानी गर्भपात केंद्रावर बॉम्बफेक करतात.
दुर्दैवाचा भाग म्हणजे एरवी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिक्षेप स्वप्नातही मान्य न करणारे मान्यवर, धर्माचा विषय आला तर मात्र शेपूटघालूपणा करतात. धर्म म्हणजे सर्व काही वाईटच असते असे नव्हे, पण सर्व काही चांगले असते असेही नव्हे. हे भूतकालाचा-आणि वर्तमानाचाही-पूर्वग्रहविरहित अभ्यास केला तर सहज समजेल.
धर्मचिकित्सा झाली पाहिजे. अश्रद्ध नागरिकांचे मूलभूत हक्क जपण्यासाठी नव्हे, तर जगाच्या प्रगतीची चक्रे अव्याहत चालू राहण्यासाठी!
- डॉ.शरद अभ्यंकर,
५९२, गणपती आळी, वाई (मोबा.९४२२४००६४३)

श्रद्धेवर अंधश्रद्धा
श्री.मुकुंद गोरे हे रा.स्व.संघप्रणित भारतीय मजदूर संघातील एक मान्यवर पदाधिकारी होते. त्यांनी एक किस्सा ऐकवला की, अखिल भारतीय स्तराच्या विविध कामगार फेडरेशनच्या समन्वयाचे काम ते करीत असत. आणीबाणीच्या सुमारास सरकारच्या विरोधात सर्व युनियन्स व फेडरेशन्स एकत्र येत असत. अशाच एका बैठकीत साम्यवादी, मार्क्सवादी, समाजवादी वगैरे डावे पदाधिकारी आणि संघाचे लोक होते. पाच वाजण्याच्या सुमारास बैठक सुरू झाली. थोड्या वेळाने त्या दालनातील दिवे लागले. गोरे वगळून इतर सर्वांनी नकळत हात जोडले. कोण धार्मिक आणि कोण धर्मनिरपेक्ष!!

टोलची टोलवाटोलव
पथकर उर्फ टोलटॅक्स हा नव्या आर्थिक पद्धतींस धरून आहे, तो अटळ आहे आणि कायमचा राहणार आहे हे एकदाचे मान्य करायला हवे. त्याविरोधात आंदोलने वगैरे करणाऱ्यांच्या करामती काही काळ चालू राहतील. कोणत्याही नव्या संकल्पनेला वा योजनेला विरोध होत असतो. संगणकीकरण व इलेक्ट्नॅनिक मतदान यांसही प्रारंभकाळी विरोध होत राहिला. बेळगाव-कर्नाटकात राहणे अन्याय्य असले तरी काहीशा धाडसाचे विधान करायचे तर ती स्थिती अटळच दिसते. हा भोग ज्यांना भोगावा लागतो, त्यांच्याबद्दल कणव असतेच; तरीही त्याबद्दल किती शोक करायचा यालाही मर्यादा असतात. कितीही आदळआपट केली तरी त्याचा सुतराम उपयोग होण्याची शक्यता नसेल तर दोन पर्याय उरतात. एक म्हणजे हा अनुभव जमेला ठेवून पुन्हा तशी वेळ येऊ नये याबद्दल दक्षता घेणे, आणि दुसरा म्हणजे वाट्याला जे येत राहते ते मुकाट सोसत राहणे. पहिला पर्याय हा व्यवहारकुशलतेचा भाग आहे, तो अधिक श्रेयस्कर आहे. ज्यांना तो साधत नाही ते आयुष्यभर सोसत राहतात. तथापि तिसरा पर्याय म्हणून सतत आदळआपटीची आंदोलने करण्याने प्रश्न सुटल्याचा तत्कालित भास होतो, पण ते भोग सुटत नाहीत.
योजना करणे, त्यासाठी काही प्रणाली तयार करणे आणि अंमल करणे या तीन पायऱ्या कोणत्याही कार्यात असतात. त्यांवर यश अवलंबून असते. आजवरती आपल्याकडे इतक्या योजना झाल्या; पण देशाची दुर्दशा वाढत आहे कारण बहुतांश वेळी तिसऱ्या,-अंमलबजावणीच्या टप्प्यावर सपशेल पराभव होतो. प्रौढ साक्षरतासुद्धा जमत नाही, मग चीन-पाकिस्तानने हडपलेला प्रदेश परत घेण्याची गोष्ट फारच दूरची! याचे कारणच हे की, नुसत्या घोषणा, योजना, कायदे किंवा वटहुकूम यांचा उपयोग नसतो.

प्राथमिक व मूलभूत सुखसुविधा उत्तम करून देण्याची जबाबदारी वास्तविक सरकारची आहे. परंतु शिक्षणासाठी सुविधा तयार करून देणे म्हणजे मास्तरणींच्या बदल्या करणे किंवा शिक्षकांस आदर्श पुरस्कार देणे; एवढ्यावर आनंदीआनंद! तसेच सर्व मूलभूत सुविधांचे होते. इंग्रज सरकारच्या काळातील राजपत्रे (गॅझेट) असे दर्शवितात की, चांगला रस्ता तयार करण्याच्या खर्चातच, त्या नियोजित रस्त्याच्या दुतर्फेस देशी मोठी झाडे लावून त्यास पुढची पाच वर्षेपर्यंत पाणी घालण्याचा खर्च नमूद करून तो अंतर्भूत केला जात असे. आजही कदाचित तसे करत असतील; फरक असा की, इंग्रजकालीन रस्त्यांशी आजही मोठमोठे जुने वृक्ष दिसतील, पण रस्त्यांच्या कडेला वृक्षांसाठी अपेक्षित असणारे खड्डे आजच्या रस्त्यांच्या मध्यावर आलेले दिसतील; आणि कडेला वृक्षराजीऐवजी बार-बाजार दिसतील.

गेल्या काही वर्षांत सरकारच्याच नाकर्तेपणामुळे जनतेच्या खिशात अनधिकृत पैसा खुळखुळू लागला पण सरकार भिकारी झाले. गाड्यांची संख्या महामूर वाढली, पण रस्ते करायला सरकारकडे पैसा नाही. जनतेच्या वाढीव उत्पन्नाच्या प्रमाणात सरकार महसूल वाढवत नाही. साध्या कामगाराचा पगार पाचशेवरून दहा हजार म्हणजे वीसपट वाढला, त्यामुळे तो गाडी घेऊन रस्त्यांवर फिरू लागला. पण रस्ते करण्यासाठी गाडीवरचा कर दहावीस टक्के वाढवला तर आंदोलन सुरू होते. यामुळे सरकारने आपले ओझे खाजगी कंत्राटदारांच्या गळयात टाकण्याच्या उद्देशाने बांधा-वापरा-हस्तांतर करा(बीओटी) तत्वावर रस्ते विकले. आता अटळ टोल बोकांडी बसल्यावर तो सासुरवास कसा टाळणार?

कोणताही पक्ष निवडणूक प्रचारात आश्वासने देतो, ती पेलता येणे शक्यच नसते. कुणी फुकट वीज म्हणतो, तर कुणी टोलमुक्ती म्हणतो. प्रत्यक्षात ते कसे होणार? ही केवळ प्रचारकी फसवणूक म्हणावे, तर सत्तेत आलेले सरकारही जनतेला सपशेल फसवते. मूल्यवर्धित कर (व्हॅल्यू अॅडेड टॅक्स-व्हॅट) लागू करताना, जकातीसह बाकीचे सर्व कर काढून टाकण्याचे खुद्द अर्थमंत्र्यांनी जाहीर केले, अद्यापि एकही कर न हटविता व्हॅट मात्र कायमचा डोक्यावर बसला. जकात रद्द करण्यासाठी एलबीटीचा खोडा घातला जात आहे. कोणत्याही पक्षाचा शासकीय कारभार हा या प्रकारे धादान्त खोटेगिरीचा असल्यामुळे त्यांच्या कुठल्याही योजनेवर जनतेचा काडीमात्र विश्वास न बसता विरोध पेटत राहतो.

याचा अर्थ विरोधक विश्वासार्ह आहेत, असा तर मुळीच नाही. ते तर भंकस विरोधाचा आक्रस्ताळी विरोध करतात. अणुभट्टी असो, सरदार सरोवर असो, किंवा घरवापसी असो, मेधा पाटकर-तिस्ता सेटलवाड - वृंदा करात या बायका आणि तशाच भांडकुदळ स्वभावाचे भारत पाटणकरादि पुरुष उठून-उठवून फणकारू लागतात. त्यामुळे ज्या काही अभ्यासू मान्यवरांनी आखणी केली असते, तीही फिसकटते. मग अंमल होण्याचा प्रश्नच नाही. टोल बसविल्याशिवाय रस्ते होणार नाहीत आणि टोल सुरू झाला की नाकी जाळून फोडून खल्लास! या वातावरणातून परस्पर अविश्वास व्यक्त होतो तीच बाब सार्वजनिक चिंतेची आहे.

टोल देण्यात आजपर्यंतची दहा वर्षे नाराजी असली तरी कधी संताप उफाळला नव्हता. पण त्याचा मूळ उद्देश चांगले रस्ते मिळावेत हा होता, तो दूर गेला. उलट, गचाळ रस्ते - अरेरावी-खोळंबा-अनधिकृत फसवणूक हे सगळे वाट्याला आले. किती पैसे किती काळ ओरबडावेत याला धरबंध नाही, पारदर्शकता नाही. त्यातून हरामीच्या पैशाला माज येतो, त्याचा पडताळा हरघडी येतच असतो.

प्रस्तावित भूमी-अधिग्रहण कायद्यात तोच वाद आहे. मोठमोठ्या विकासयोजनांसाठी जमीन घेतली पाहिजे, यात दुमत नाही. पण आजपर्यंत ज्यांच्या जमिनी अल्पमोलाने काढून घेतल्या त्यांचे पुनर्वसन समाधानकारक नाही. उलट त्यांच्या जमिनींची भरमसाठ किंमत तिसराच कोणी विकासक घेऊन पसार होतो. ही सुलतानी येण्याचे भय सरकार कमी करू शकलेले नाही. कूळ कायद्यात ज्यांनी जमिनी मिळविल्या त्यांनी त्या जमिनींतून सोने न मिळविता कर्जबाजारी क्षारपडीची शेती केली आहे; शेती परवडत नसल्याचा आकांत करीत सरकारी मदत मिळवली आहे. एकूणातच हे सगळया योजनांचे अपयशी व्यवहार, अविश्वासाच्या-फसवणुकीच्या-मक्तेदारीच्र्र्र्इिींिंॅिी%ीर्ज्ञ्ॅद्गी-र्त्र्%िणुकुज्ञ्ॅद्गी-मकॅडेंर्ध्ीद्धुज्ञ्ॅ पायावर उभे राहात असल्यामुळे विकासाच्या ऐवजी केवळ बुजबुजाट-टर्रेबाजी व गोंधळ माजतो आहे. टोल ला मान्यता देणारे सरकार, टोल घेणारे कंत्राटदार, टोलनाके फोडणारे आंदोलक आणि टोल भरणारी जनता यांत अधिक दोषी कोण?

सरकारने योजना करताना एक नवे पथ्य जाहीर करावे. धरण किंवा रेल्वे बांधण्यापूर्वी पुनर्वसनासाठी उत्कृष्ठ वसाहती तयार ठेवाव्यात. त्याचे पसंतीनुरूप आधी वाटप करावे म्हणजे लोक स्वखुशीने तिथे जातील, त्यांच्या जमिनी आनंदाने देतील. नव्या कंपनीचा पगार घरटी एका व्यक्तीला चालू करावा, कंपनीचा लाभ देण्यास आधी सुरुवात करावी नंतर जमीन काढून घ्यावी. रस्ता बांधून झाल्यावर गाडीवरच्या विक्रीकरांतून रक्कम घ्यावी, किंवा टोलवसूली सामाजिक संस्थांकडे द्यावी. रस्ता धड असेल तरच टोल मिळेल. असे काही केले तर सरकारवर विश्वास राहील व जनता सहकार्य करेल. अन्यथा सर्वत्र संघर्ष वाढत राहतील, अराजक येईल.

चारित्र्य तडकलं तर नष्टच !
चारित्र्य व पैसा यांच्या तुलनेत, पैशाचं महत्त्व चारित्र्याच्या दृष्टीनं किती क्षुल्लक आहे हे आपल्याला जाणकारांनी स्पष्ट केलं आहे.
वृत्तं यत्नेन संरक्ष्येत्, वित्तं आयाति गच्छति ।
अक्षीण: वित्तत: क्षीण: वृत्ततस्तु हतो हत: ।।
(चारित्र्य प्रयत्नपूर्वक सांभाळावं, द्रव्य येतं आणि जातं. द्रव्य गेल्यानं फारसं काही बिघडत नाही, पण चारित्र्य जाणं हे सर्वस्व जाण्यासारखं आहे.)
त्यावरचा उपाय एका शब्दात सांगायचा झाला तर `मनाचा संयम'. बसमधून प्रवास करीत होतो. गाडीत ड्नयव्हरसाठी एक पाटी लावली होती, `मनाचा ब्रेक हा खरा ब्रेक!' आधी मनाचा ब्रेक लागतो व मग गाडीचा! कोणतीही कृती आधी मनात होते व मग शरीर ती कृती करतं. मनात विपरित विचार येणारच नाहीत अशी व्यवस्था आपण केली की झालं! त्यासाठी वातावरण चांगलं ठेवलं पाहिजे. अशा कृतीला स्त्री-पुरुष एकांताचं वातावरण चारित्र्याच्या संदर्भात फार धोक्याचं असतं. ते टाळणं आवश्यक आहे.
चारित्र्य म्हणजे वर्तन. चारित्र्याला एकवेळ तडा गेला की तो परत सांधता येत नाही. चारित्र्य हे नाजूक काचेसारखं आहे. काचेला एकदा तडा गेला की तो परत सांधता येत नाही. आपलं चारित्र्य जन्मभर जिवापाड जपणारे अनेक लोक आहेत. तरीही उत्तम मटार शेंगेत जशी केव्हातरी अचानक अळी आढळते, तशी चारित्र्यभंग झालेली व्यक्ती आढळते. कितीही उच्च पदावर असो, एकवेळ चारित्र्यभंग झाला की तो परत दुरुस्त होत नाही. सर्वात मोठा चारित्र्यभंग पैसा खाणं व स्त्रियांशी दुर्वर्तन यांनी होतो असं दिसतं.
गेल्या पन्नास वर्षांत सार्वजनिक क्षेत्रात स्त्रियांचा वावर सर्वत्र वाढला आहे. स्त्रियांची बुद्धिमत्ता, सोपविलेल्या कामातील कौशल्य, काम प्रामाणिकपणे करण्याची वृत्ती ही त्यांचा वावर वाढण्याची अगदी सहज दिसणारी कारणं आहेत. काही ठिकाणी तर त्यांचं कर्तृत्त्व अधिकच उठून दिसतं. आपलं कर्तृत्व कारणी लागावं म्हणून भिन्न भिन्न क्षेत्रांत त्या काम करीत आहेत.
स्त्रिया व पुरुष एकत्र काम करू लागले, तर नकळत त्यांच्यात आकर्षण निर्माण होतं. तो निसर्ग आहे. पण मर्यादेचं उल्लंघन होऊ लागलं तर त्यातून दुर्वर्तन होऊन चारित्र्यभंगात त्याची परिणती होते. उच्च पदावरची व्यक्ती जशी वागेल तसे सामान्य लोकही वागतात. गीतेत म्हटलं आहे की, `यद्यदाचरति श्रेष्ठ:, तत्तदेव इतरो जन: ।' श्रेष्ठ व्यक्ती जशी वागते तसंच लोकही वागतात.
मन दूषित असलं की एकांत फार घातक असतो. लोक आपल्याकडं आकर्षित होतील असे कपडे स्त्रियांनीही घालू नयेत व उथळ साजशृंगार करू नये! `बलवान् इन्द्रियग्राम: विद्वांसमपि कर्षति ।' (इंद्रियं आणि मन फार बलवान आहेत. ती आपल्याला हवं तसं काम केव्हा करून घेतील हे कळणारही नाही.) म्हणून पूर्वीच्या अनुभवी धुरिणांनी असं लिहून ठेवलं आहे की, `मात्रा, स्वस्त्रा, दुहित्रा वा न विविवत्तासनो भवेत्' (आई, बहीण व मुलगी यांचेबरोबरसुद्धा एकांतात एका आसनावर बसू नये. बलवान इंद्रियं विद्वान माणसालाही सहज फशी पाडतात.) आई, बहीण व मुलगी ही तीनही नाती मोहाच्या पलीकडं आहेत. पण त्यांच्याही बाबत मनुष्य फशी पडू शकतो. असं विधान केलं आहे. आई, बहीण व मुलगी यांंच्याही बरोबर एकांतात एका आसनावर बसू नये, तर इतर स्त्रियांसह एकांत व एकासन टाळावं हे काय वेगळं सांगायला हवं?
पण हे सारं कुणासाठी? तर आपल्या हातून दुर्वर्तन होऊ नये अशी ज्याची प्रामाणिक इच्छा आहे अशा व्यक्तींसाठी. दुर्वर्तनच करण्याची ज्याची इच्छा असेल अशा व्यक्तीविषयी न बोललेलंच बरं!
- रा.श्री.अर्जुनवाडकर,
(फोन : (०२०) २४५३११६७)
३५,श्यामसुंदर सोसा. म्हात्रे पुलाशेजारी, पुणे ३०

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन