Skip to main content

13April2015

एजंट कशासाठी हवेत
महाराष्ट्न् राज्य परिवहन आयुक्तानी राज्यभरातील आरटीओ कार्यालये दलाल-मुक्त करणार असल्याची घोषणा करून, त्यास दणकून प्रसिद्धी दिली. वाहन-परिवहन (आर टी ओ) विभाग भ्रष्टाचारी असून तेथील एजंट हेच त्या भ्रष्टाचाराचे कारण व माध्यम आहेत, असा समज करून देण्यासाठी परिवहन खाते प्रयत्नशील असावे. पण `अंदरकी बात' राज्यातल्या जनतेला ठाऊक आहे. आर टी ओ मधले एजंट बंद करण्यामुळे सरकारी बाबूंची खाबूगिरी कशी काय बंद होणार आहे?

उलट जनतेच्या सोयीसाठी तिथले एजंट उपयोगी असतात. तिथले काम दहा-पाच मिनिटांत होत असते तर बात वेगळी. एरवी कामाच्या माणसांनी स्वत:चा दिवस मोडून अशा कार्यालयातील साधे-किरकोळ काम करण्यात काय शहाणपणा? अशा एकाच कामासाठी समजू शंभर रुपये एजंट घेत असेल तर अशा दहावीस जणांची कामे एकत्रित करून त्याने त्याच्या दिवसाची कमाई करण्यात चूक काय?

एजंट केवळ आरटीओकडेच असतात काय? स्वत:चा खटला चालविण्यासाठी फी देऊन वकील नेमला तर तो एजंट नव्हे का? हल्ली तर काही ठिकाणी वकील लोक शब्दश: `एजंट' म्हणूनच काम करतात असे ऐकण्यात येते, खरे-खोटे ती आंधळी न्यायदेवता जाणे! महसूल, पोलिस अशा ठिकाणी कित्येक एजंट काम करीत असतात. विठ्ठल दरबारात दर्शनलाभासाठी एजंटगिरी करणारे बडवे तूर्त हटले, पण  तिथे नवे कोणीतरी बडवे येणारच. इतर देवस्थानी ते सरसकट आहेत. आपल्याला सवड नाही किंवा मंत्रोच्चारी कर्मकांड जमत नाही म्हणून आपल्याऐवजी अेकादष्णी-अभिषेक करणारा पुरोहित हा पैसे देऊन नेमलेला देवाचा एजंटच की!

स्वत:ऐवजी आपले काम करण्यासाठी पैसे देऊन नेमलेला मध्यस्थ, हे तर एजंट-किंवा दलालांचे सरळ व्यावसायिक स्वरूप आहे. हल्ली तर पोस्टात आवर्ती बचतीचे किंवा राष्ट्नीय सर्टिफिकेटचे पैसेही थेट भरून घेत नाहीत, ते एजंटकडून भरा म्हणतात. एजंटला मिळणारे ५-६ टक्के कमिशन थेट खातेदाराला द्यावे; किंवा फारतर देऊही नये. पण सरकारी बाबूंनी एजंटकडे लोकांना पिटाळण्याचा प्रघात आहे. कित्येक-बहुतांशी सर्वच व्यवहार एजंटमार्फत केले जातात. लग्न जमविण्यापासून अंत्यविधी वा मृत्यूपास काढून देण्यापर्यंत सर्वत्र मध्यस्थ-एजंट-दलाल आवश्यक व मान्यच असतो. एजंटला त्याचे कमीशन मिळत असेल तर ते त्याचे काम अधिकृत म्हणतात. तसे कमीशन नसेल तरी त्याचे काम ते तसेच असते, आणि त्यातून जनतेची सोयही होते; मग त्या एजंटने पैसे कुठून कसे मिळवावेत? ते पैसे जर आपल्या वेळेसाठी व सोयीसाठी लोक देत असतील तर त्यात बंदी घालण्याजोगे काय आहे? शासकीय नोंदणी अधिकाऱ्याच्या (रजिस्ट्नर) पडवीत मुद्रांकविक्रेते किंवा लेखनिक (बॉण्ड रायटर) बसलेले असतात. आपल्याला कोणती-काय शपथ किंवा प्रकटन करायचे ते त्यांनाच तर ठाऊक असते. एरवी कोणी कारखानदार किंवा प्राचार्य जरी तिथे गेला, तरी त्यास त्या सातवी झालेल्या डेस्कमालकाकडून लिहून घ्यावे लागते. त्याशिवाय आतले भाऊसाहेब मसुदा मान्य करत नाहीत. वेळ-कटकट वाचवायचा तो सोपा मार्ग असतो.

तिथे भ्रष्टाचार होतो, हे तर उघड गुपित आहे. पण त्या एजंटांकडून हप्ते घेण्याची पद्धत कशी बंद करायची हा अधिकाऱ्यांचा प्रश्न आहे. त्यांचा वचक खात्याच्या कर्मचाऱ्यांवर नाही, पण हे चालले बाहेरून येणारा भ्रष्टाचार रोखायला! भ्रष्टाचार होऊच शकणार नाही इतकी सक्षम व पारदर्शी कार्यपद्धती एकाही शासकीय कार्यालयात नाही. तिथले छापील फॉर्म वाचता जरी आले तरी तिथल्या कारकुनाच्या ललाटीची भाग्यरेखाही वाचता येईल. प्रत्येक ठिकाणी जाचक नियम, कामाचा लोंढा, सुस्त व बेजबाबदार कर्मचारी, नियमांत पळवाटा... हे सगळे तिथल्या एजंटने केलेले नाही. आपला व साहेबाचा हप्ता काढून का असेना, तिथले एजंट जनतेचा तापत्रय काही प्रमाणात वाचवत असतात.

त्यांना बंदी घालता येणार नाही. घातली तरी टिकणार नाही. जे नियम जनतेच्या हिताचे आहेत त्याचाही अंमल होत नाही, तिथे जनतेला हवीच असणारी व्यवस्था हुसकून लावण्याचा हट्ट कशासाठी? पण हे सरकार आणि ते अधिकारी असे की, रस्त्याचे खड्डे बुजवण्याचे आपले काम टाळून लोकांच्या टाळूवर हेलमेट घालणार! एसटीचे वेळापत्रकसुद्धा अद्ययावत् न ठेवता, खाजगी वाहतुकीवर आपला दोष ढकलणार!

नागरिकांना एजंटची गरज का भासते? देव जर प्रत्यक्ष समोर उभा ठाकला तर कोणता भक्त अभिषेकासाठी पुरोहित शोधेल? मंत्री जर लोकांदारी येऊन कामे सोपी करू लागला तर स्टुलावरच्या शिपायाला चिरीमिरी कोण कशाला देईल? आर टी ओ किंवा पोलिस कचेरीत जर किमान बसायला चांगलीशी जागा व पिण्याचे थंड पाणी असेल तरी लोक तिथे जातील. पण तितकीही तसदी कोणी घेत नसल्यामुळे तिथली कामे करण्यासाठी एजंटला पर्याय नाही. हल्ली तर वाहन चालविण्याचा परवानासुद्धा घरबसल्या एजंटमार्फत मिळतो म्हणतात. तसे असेल तर परिवहन आयुक्त तरी एजंट हटविण्यात किती गंभीर असतील हे लक्षात येते.

अधूनमधून असे कुणावर तरी खेकसणे चालू ठेवले तर शासनाचे अस्तित्व दिसते. मग कधी बडवे, कधी खाजगी सावकार, कधी वडापवाले अशांवर कडकलक्ष्मीचे आसूड फटकारतात. काळजीही अशी घ्यावी लागते की, आसूडाचा आवाज मोठा यावा, पण कुणाच्या देहाला इजा होऊ नये. फार तर त्यांच्याकडे लक्ष वेधण्यासाठी प्रसारमाध्यमांची ढोलकी बडवत ठेवली की काम होते. लोकांत लक्ष्मीचा धाक झाला तर सुपातून येणारे दाणे देवाच्या पेटाऱ्यापर्यंत चालत येतात. `एजंट हटाओ' ही घोषणा अशा नैमित्तिक गारूडखेळाचा एक प्रकार असावा.


आम्ही लटिके ना बोलू .....
- चारुदत्त आपटे
`आपले जग' संबंधी दूरदूरचे वाचक जी प्रतिक्रिया देत असतात त्यात `...किर्लोस्करवाडीसारख्या (आड)गावातून...' असा उल्लेख केला जातो. हे ठिकाण इतर शहरांच्या मानाने `आड' आहेच; पण आज ते कितीतरी मोठे-वर्दळीचे झाले आहे. साधारण साठ-सत्तर वर्षांपूर्वी गोपाळ नारायण आपटे हे किर्लोस्करवाडीला वास्तव्यास आले. किर्लोस्कर कारखान्यात चांगल्या अधिकाराची नोकरी असली तरी, त्यांना शेतीभातीची आवड असल्याने व अंगभूत रगेलपणामुळे आर्थिक ओढाताणीतही त्यांनी भला थोरला मळा विकत घेतला. आज वाढत्या वसतीशी तो भव्य आपटे मळा म्हणूनच ओळखला जातो.
गो.ना.आपटे आणि सौ.इंदिरा हे दांपत्य काका-ताई या घरोब्याच्या नावाने सर्वत्र परिचित झाले. त्या शेतातले त्यांचे झोपडीवजा घर, फळाफुलांनी भरलेला आसमंत, प्रशस्त अंगणाशी दत्ताचे देवघर, पोराबाळांसह कित्येक पांथस्थांचा राबता आणि त्या सर्वांतील परिपूर्ण सामाजिकता यांमुळे हा आपटे मळा नांदता राहिला. पुष्कळ वेळप्रसंग आत्यंतिक परीक्षा पाहणारे येऊन गेले. तिथे कधीतरी काही निमित्ताने राहून गेलेल्या गोतावळयाच्या हृदयस्पर्शी मेळा डिसेंबर १४ महिन्यात याच परिसरात आयोजित करण्यात आला होता. त्यांनी तत्कालीन आठवणींना उजाळा देत त्या प्रसंगांचा `आस्वाद' घेतला.
या ताई-काकांची अपत्ये, त्यांची मुले-सुना-नातवंडे-जावई-भाचरे-पुतणे असे विशाल कुटुंब जमले होते. जन्म-बालपण-शिक्षण-नोकरी, अशा कुठल्याही कारणाने या सर्वांचा ऋणानुबंध या स्थानाशी आहे. त्यामुळे प्रदीर्घ काळ उलटला तरी सर्वांची मने तिथे गुंतली असल्याचा प्रत्यय सर्वांना आला. यानिमित्त प्रकाशित स्मरणिकेतील एका लेखाचा हा संक्षिप्त भाग. बहुतेकांस ते वर्णन `आपल्या कुटुंबाचे' वाटेल.

माझ्या आठवणीत वाडीचा `मळा' नसला तरी तशा छापाचं नांदतं घर होतं. आजी-आजोबांसह दहा माणसांचं एकत्र कुटुंब. कुत्री, म्हशी, गोठा, विहीर, `गुलाब-जाई-जुई-मोगरा फुलवित' जाणारं पाटाचं पाणी. सड्याचं अंगण, सारवणाचं स्वयंपाकघर.... खोल्यांची नावंसुद्धा सोपा-पडवी-माजघर अशी! घराच्या पसाऱ्याव्यतिरिक्त गडीमाणसं, प्रेसचे कामगार, गाण्याचा क्लास, महिलामंडळाचे कार्यक्रम, आजीचं भजनी मंडळ, बाबांचे `भोजनी मंडळ', सुटीच्या दिवसांत भावंडं, पै-पाहुणे.... आणि जेवायला कोणीतरी अतिथी असायचाच! सगळयांच्या बालपणीच्या सगळया आठवणी जिव्हाळयाच्या असतात, पण असं बालपण सगळयांना नाही मिळत.
हे घर तसं साधंच. आर्थिक परिस्थिती काही गडगंज नव्हती, पण तरीही आम्हाला संपन्न बालपण मिळालं होतं. तो काळाचा परिणाम असेल,  सगळयाचा एकत्रित परिणाम असेल. आयुष्य संपन्न करणाऱ्या या सगळया गोष्टींना मिळून एक संस्कार आहे, ती एक वृत्ती आहे. आजच्या भाषेत सांगायचं तर हे एक `स्कूल ऑफ थॉट्स्' आहे.
त्याची लक्षणं तपासायची असतील तर आपल्या आजी-आजोबांना आठवायचं किंवा आपल्याच गोतावळयाकडं थोडं तटस्थपणे पाहायचं. कारखान्याच्या वसाहतीतलं सुखासीन आयुष्य सोडून शेतामळयाची आवड म्हणून आजी-आजोबा खोपटात राहायला आले. पाचसहा छोट्या मुलांना घेऊन. शेतीचा अनुभव नसल्यामुळे किंवा परिस्थितीमुळे कितीतरी धक्के-टक्के टोणपे सहन करावे लागले. पण कधीही हातपाय गाळून बसणे नाही; `होतंय रे', `बघू की', `चालायचेच..' ही वृत्ती. प्रसंगाला हसत सामोरं जायचं, भिडायचं.  कुठून आलं हे अवसान?
दारावर आलेल्याला आपल्यातली कोरभर भाकरी द्यायची हा आणखी एक संस्कार. मालूताई किर्लोस्करांपासून ते ज्ञानूपोलीस, सदाकाकांपर्यंत कितीतरीजण `काकींच्या' हातच्या ताकाची किंवा लोणचं-भाकरीची आठवण काढून हळवे झालेले मी पाहिलंय. आपल्या सगळयाच घरांतून, दुपारचे कोणी आगंतूक न जेवता गेलंय, असं खचितच होत नसेल.
काहीतरी छोटे मोठे प्रसंग, कुरबुरी, वादावादी सगळीकडे असायचीच, पण `मला अस्सं म्हटलं', `मला अस्सं बोलतात...' अशी तक्रार करून हात चोळणारा किंवा आसवं गाळणारी कोणी आपल्यात दिसणार नाही. आणि दुसरं कोणी असं दिसलं तर `हात्तीच्या, एवढंच होय..' म्हणून त्याला गप्प करतील. कोणी काही बोललं तर तिथल्या तिथं उत्तर देऊन, - उडवून लावून आपण मोकळं होतो. ते नाही जमलं तर पाठीमागे,- `काय भंपक आहे...' म्हणून सोडून देतो. `आता कसं वाटतंय गार गार' किंवा `गेलास उडत' ही आपली ब्रीद वाक्यं! समोरच्याला गप्प करण्याची ही परंपरा अव्याहतपणे सुरू आहे. आजी-आजोबांपासून ते आजच्या चिट्ट्यापिट्ट्यांपर्यंत असले कितीतरी किस्से आपल्या सर्वांना माहिती आहेतच.
रसिकदृष्टीची जोपासना हे इथलं आणखी एक वैशिष्ट्य! लेखन-वाचन-संगीत-चित्रकला-फोटो-ख्ेंखर्ण्-िीज्ञ्ण्-%ंगुड-र्ज्ञ्ींडॅर्द्धक्ी-त्र्ैंछैं-ख असा काही एक गुण (किंवा अवगुण म्हणू हवंतर!) बहुतेक आपल्या प्रत्येकाकडं आहे आणि तरीही प्रत्येकजण स्वत:ची पायरी ओळखून आहे. स्वत:बद्दल उगाच गैरसमज नाहीत.
सामाजिक भान हा अजून एक महत्त्वाचा आणि दुर्मीळ गुण आपल्या सर्वांच्यात आवर्जून आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने कुठेतरी हातभार लावतोय. कोणी सामाजिक संस्थेत कामं करतायत, कोणी आर्थिक मदत, कुणी काही, कुणी काही. त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे ह्यातल्या कशाचीही कुठेही वाच्यता नाही. या हातानं दिलेलं त्या हाताला कळू नये म्हणतात तसं! आजूबाजूच्या, बाहेरच्या कुणाकडून तरी समजतं की, `अरेच्चा, ह्याचं/हिचं बाहेर किती मोठं नाव किंवा काम आहे!'
आपण कुणी नास्तिक नाही. पण कोणीही अंधश्रद्ध, धार्मिक किंवा कर्मकांडी गतानुगतिक नाही. जेवढ्या मनोभावे दत्तापुढे डोके टेकतो, तेवढ्याच मनोभावे देवापुढच्या आचरटपणाची टिंगल-टवाळी करतो. दत्तजयंतीचा उत्सव जेवढ्या जोशात करतो, त्याच जोशात दत्ताच्या `पाळण्या'ची किंवा समोरच्या भजनाची टर उडवतो-विडंबन करतो. देव आपल्या मनात, आणि धर्म आपल्या वागण्यात असतो ही आपल्याला मिळालेली शिकवण. आजी आजोबांनी त्यांच्या काळात त्यावेळच्या कितीतरी कालबाह्य किंवा अतार्किक रूढी-कुलाचारांना फाटा दिला होता. रूढी पाळण्याची नव्हे तर रूढींचा नव्याने विचार करण्याची ही परंपरा आजही सुरू आहे. `हाड तुजा मारी लेका...!' म्हणून कित्येक बुवाबाजांना आणि सोंगांना आपण वाटेला लावलंय.
आजी-आजोबांचे कर्तृत्वाचे दिवस मी पाहिले नाहीत, पण वानप्रस्थ मात्र जवळून पाहिला; विशेषत: आजीचा. कर्तृत्ववान माणसं थोड्याफार प्रमाणात का होईना पण आजूबाजूला दिसतात. पण आजीसारखा आदर्श वानप्रस्थ अगदी विरळा, अपवादात्मकच. माझ्या आठवणीत ती पंचाहत्तरीच्या जवळ आली होती. अत्यंत नियमित दिनचर्या, हलका व्यायाम, हलका आहार, वाचन-मनन. संसारातून पूर्णपणे अलिप्त तरी सर्वांना आधार वाटावा अशी राहणी. माझ्या आठवणीत ती कधी चुलीपुढे गेली नाही. केरवारे किंवा तत्सम कामे केली नाहीत. थोडक्यात म्हणजे रोजच्या व्यवहारात कुठेही लुडबुड नाही. पण प्रत्येक प्रसंगात तिचा आधार वाटायचा, माया जाणवायची. झपाट्यानं बदलत गेलेल्या परिस्थितीत आणि काळात तिचं वागणं, विचार कधी कालबाह्य झाले नाहीत. अगदी नाती-नातसुनांनासुद्धा तिचा आधार वाटायचा. ती हवीहवीशी वाटायची. तिचा हा वारसा सर्वांना जरूर मिळायलाच हवा.
इतक्या गुणांमध्ये त्यांच्यात दोष नाहीत असे होईल. पण त्या बाबतीत आपण पुणेकरांसारखे आहोत. गुणांप्रमाणे दोषांचाही आम्हाला अभिमान आहे.
कोणत्याही गोष्टीची किंवा व्यक्तीची यथेच्छ चेष्टा हा इतरांना जाणवणारा महत्त्वाचा दोष. इतरांना जाणवणारा ह्यासाठी की, प्रत्यक्ष इथं राहून गेलेल्यांना त्याचा त्रास होत नाही. कारण ते जशी चेष्ट करतात तशीच ती करून घेण्यातही तेवढेच ताठ आहेत. एकमेकांची खेचायची, टर उडवायची आणि ती `गंमत' म्हणून तिथेच सोडून द्यायची हे इथलं बाळकडू आहे. स्वत:वर केलेली चेेष्टासुद्धा हसून साजरी करता येते. त्यामुळे `सासरी मला बोलतात' अशी तक्रार आपल्या गोतावळयातल्या कोणी मुलीने कधी केली नाही. उलट अशा बोलण्याची सवय नसलेल्या सुनांना सुरुवातीला थोडं जड जातं - अर्थात् फक्त सुरुवातीलाच! एकदा का त्यातली गंमत कळली की त्या आपल्यापेक्षाही एक पाऊल पुढे जातात. माहेरपेक्षाही जास्त मोकळेपणा आणि स्वातंत्र्य या गोतावळयात मिळाल्याचे बऱ्याच सुना मनातून तरी मान्य करतील. शिवाय ही टवाळी म्हणजे नुसतीच आचरट बडबड नसते. त्यात विनोदबुद्धी, भाषिक कोट्या-कोलांट्या. तत्कालीन विषयाला धरून काही टीका-टिप्पणी अशी चमक नक्कीच जाणवते.
आपल्यावर दुसरा आक्षेप आहे तो अन्नाला नावं ठेवण्याच्या सवयीबद्दल. जेवताना, एखाद्या बिघडलेल्या पदार्थावरून आपण काय वाट्टेल ते तारे तोडू शकतो. वांग्याच्या भरताला `भरताचं पार वांगं केलंय'म्हणायचं. पोह्यात खडा लागला तर `पोहे घालून फोडणीचे खडे केलेले दिसतात' अशी टिप्पणी. पोळया चिवट असतील तर `फूटवेअरमधून आणल्यात का' विचारायचं! अन्नाचा किंवा स्वयंपाक रांधणारीचा अपमान समर्थनीय असू शकत नाही. मग ही गोष्ट वाडीच्या संस्कारात कशी बसते? ज्यांना आपली जेवणाची शिस्त माहीत आहे त्यांना, वरकरणी वाटणाऱ्या ह्या विसंगतीचा उलगडा होईल. पहिल्यांदा पानात वाढलेले जिन्नस संपवलेच पाहिजेत. तिथे अपीलच नाही. एखाद्याच्या आवडीचा म्हणून काही खास पदार्थ केला असेल तर तो त्या दिवशी प्रत्येकाने खायचाच. जेवताना बोटांच्या एका पेरांच्या मागे किंवा तळहाताला अन्नकण लागता कामा नये आणि जेवणाचं पान चाटून पुसून स्वच्छ! उष्टी गोळा करताना, पानात जेवलाय की नाही असं वाटावं. इतकी शिस्त पाळणारी माणसं अन्नाचा अपमान कसा करतील? नावं ठेवणं वगैरे केवळ गंमत म्हणून - रंजन म्हणून. कितीही नावं ठेवली तरी तो पदार्थ पानात टाकायची मुभा कधीच नसते.
आपल्या ह्या सर्व गुण-दोषांमध्ये महत्त्वाची; - आणि आजूबाजूची कुटुंबं पाहिल्यावर जास्त प्रकर्षानं जाणवणारी गोष्ट म्हणजे - नातेसंबंध. आपण एकमेकांची टवाळी करतो, पिचत् प्रसंगी पाठीमागून नावं ठेवू. छोटे-मोठे राग-रुसवेही होतात - ते व्हायचेच! पण वेळ आली की कोणाच्या हाकेचीही वाट न पाहता आपण एकमेकांसाठी हजर असतो. शारीरिक, आर्थिक, मानसिक जी काय मदत लागेल ती - मागेपुढे न पाहता-करून मोकळे होतो. हा आपलेपणा-ही एकी-ओढ ही आपली सर्वात मोठी ताकद आहे.
हे फक्त मीच म्हणत नाही. मागच्या भारतभेटीत एक अमेरिकन समाजशास्त्रज्ञ माझ्या शेजारच्या सीटवर होता, तो म्हणत होता! `भारताच्या ग्रामीण भागात भावकीची गावं असतात, गोतावळयाचे घट्ट बंध असतात. ही भविष्याच्या दृष्टीने भारताची फार मोठी ताकद आहे.' खरंच असावं ते. म्हणूनच तर वाडीसारख्या खेड्यातल्या मळयात राहणाऱ्या आपल्या आजी-आजोबांच्या संस्काराची पुंजी घेऊन आपण जगभर फिरतो आहोत.
- चारुदत्त आपटे, क्रॅनडा
***

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन