Skip to main content

9 June 2014

नव्या पंतप्रधानांचा संदेश
मुलांना हेही शिकवावं...
आपल्या समाजात कधी एखाद्या शिक्षकाचा गौरव होतो, पण शिक्षकांबद्दल त्यांचे विद्यार्थी सदैव आदरानं बोलतात. खरं पाहता हा गौरव कोण्या व्यक्तींचा नसून तो एका परंपरेचा गौरव आहे. शिक्षक असणं ही एक नोकरी किंवा पेशा राहिलेला नसून तो एक धर्म झाला आहे. राष्ट्नच्या भवितव्याच्या ह्या शिल्पकारांना मी नम्र भावाने अभिवादन करतो. मी तुम्हाला काही द्यायला येत नाही. तो अधिकार मला नाही. मी आज तर एक भिक्षुक म्हणून तुमच्या दाराशी आलो आहे. मला माहीत आहे की, जाता येता शिक्षकांना उपदेश करण्याची सध्या फॅशन आहे. जो येतो तो शिक्षकांना उपदेश करतो. मी कोण तुम्हाला उपदेश करणारा? ते पाप मी करणार नाही. मी काही द्यायला आलो नाही. मी भिक्षुक म्हणून आलो आहे, याचक म्हणून आलो आहे.
टॉकीजच्या बाहेर किंवा पंचतारांकित हॉटेलच्या बाहेर एखादा भिकारी कधी तुम्ही पाहिला आहे का? दिसणारच नाही कधी. भिकारी देवळाच्या बाहेर बसतात. कारण त्याला अंदाज असतो की, देवळात येणारी व्यक्ती संवेदनाक्षम असते. तिला माझ्यातही परमात्म्याचा अंश दिसेल, आणि त्यामुळे कदाचित मला काही देण्याची इच्छा तिला होईल. म्हणून टॉकीज किंवा पंचतारांकित वाटेला न जाता, याचक देवळाच्या दाराशी उभा राहतो. त्याच भावनेनं आज मी तुमच्या दाराशी आलो आहे. माझ्या अपेक्षा आणि माझ्या याचना तुम्हीच पूर्ण करू शकाल!
मला आठवतंय, एकदा शासकीय कार्यालयात एक शिक्षक सांगत होते की, आमचा पावलोपावली अपमान होतो, आमची मस्करी होते. `मास्तर' म्हणून आम्हाला हिणवण्यात येतं. `मास्तर' शब्द कसा निर्माण झाला ते मला माहीत नाही. पण सामान्य माणूस तुमच्या वर्तनात `मा   स्तर' म्हणजे मातृत्वाचा स्तर अनुभवत असतो म्हणून तुम्हाला मास्तर म्हटलं जातं. जगातल्या कोणत्याही महापुरुषाचं चरित्र पहा. प्रत्येक चरित्रात प्रत्येक महापुरुषाने त्यांच्या त्यांच्या शिक्षकाचा आदराने उल्लेख केलेला असतो आणि असतोच. ह्यापेक्षा मोठी अशी कृतज्ञता कोणती असू शकते?
शिक्षकांनादेखील प्रपंच असतो. मुलाबाळांच्या जबाबदाऱ्या असतात. महागाईला तोंड द्यायचं असतं. तेव्हा तुमच्या मागण्या करण्याचा तुम्हाला अधिकार आहेच. लोकशाहीत हा हक्क प्रत्येक घटकाला आहे. शिक्षकाला आकांक्षा जरूर असाव्यात पण शिक्षकाजवळ स्वप्नंदेखील असावीत. स्वप्नांशिवाय शिक्षक असूच शकत नाही. तुम्हाला एक गोष्ट ठरवावी लागेल की, तुम्हाला कोण व्हायचं आहे? तुमचा आदर्श कोण आहे? तुम्हाला असं वाटतं का की, आपण सांदिपनी व्हावं आणि कोण्या कृष्णाला घडवावं. कधी असं वाटतं का की, आपण वसिष्ठ किंवा विश्वामित्र व्हावं आणि कोण्या प्रभु  रामचंद्राचं व्यक्तिमत्त्व घडवावं? कधी तुम्हाला असं वाटतं का की, आपण समर्थ रामदास व्हावं आणि कोण्या शिवरायाला घडवावं? कधी चाणक्य होऊन कोणत्या चंद्रगुप्ताला घडवावं? स्वप्नांशिवाय जीवनाला काही अर्थ नसतो. आकांक्षा असाव्यात, त्यांची पूर्तीदेखील अवश्य व्हावी. पण आकांक्षा हीच काही जीवनाची मर्यादा नसते. इतिकर्तव्यता नसते. स्वप्नांचा आणि जीवनाचा संगम होणं फार फार आवश्यक आहे असं मला वाटतं. सॉक्रेटीस नेहमी म्हणायचे, ``माझे वडील शिल्पकार होते. मूर्ती घडवायचे ते. आई सुईण होती. उमलत्या जीवाला प्रकाशात आणण्याचं काम ती करायची. आई वडिलांची कामं एकत्रितपणे करावी असं मी ठरवलं, म्हणून मी शिक्षक झालो. मी मूर्ती घडवतोदेखील आणि तिला प्रकाशातही आणतो. हेच काम असतं शिक्षकाचं.''
आज भारतात गवताच्या उडवीला आग लागली आहे. अनेकजण ती आग विझवण्यासाठी धडपडत आहेत. कोणी पाणी आणतोय, कोणी आगीवर माती घालतोय. परंतु ह्या आगडोंबात सुज्ञ माणूस वेगळया पद्धतीने विचार करील. तो आग विझवण्यासाठी जीव पाखडणार नाही. तो जास्तीत जास्त पेंड्या घेऊन दूर जाईल. जेणेकरून त्या पेंड्या तरी वाचतील. आज सर्वत्र आग लागली असताना मी म्हणेन प्रथम शिक्षकाला वाचवा, तो समाजाला वाचवेल.
एक चिनी म्हण आहे, आम्ही एकाच वर्षाचा विचार करणार असू तर आम्ही धान्यच पेरू. आमच्या डोळयांसमोर जर दहा वर्षांचा विचार असेल तर फळझाडं लावू. पण जर आमच्या  डोळयासमोर पिढ्यांचा विचार असेल तर मात्र आम्ही माणसं घडवू. माणसं घडवण्याचं काम शिक्षक करीत असतात. असे अनेक गुरुवर्य असतील की, ज्यांना पुरस्कार मिळाले नाहीत. एखादा पुरस्कार मिळेल अथवा मिळणार नाही, पण माझ्या हाताखालून अक्षरश: हजारो विद्यार्थी शिकून जात असतात. त्यापैकी एखादा तरी विद्यार्थी मी असा घडवीन की, तो पुरस्कार मिळवून आणील. तो माझा खरा पुरस्कार असेल. वर्गात तर मी शिकवेनच पण त्याही पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहून, त्यांच्यावर डोळस मायेची पाखर घालून मी त्याला घडविण्याचा प्रयत्न करीन. असं चिंतन, असा विचार, असं स्वप्न शिक्षकानं अवश्य बाळगावं. शिक्षकाचं सामर्थ्य परिसापेक्षादेखील मोठं असतं. परिसाचा स्पर्श झाला तर लोखंडाचं सोनं होतं, पण परिसामुळे लोखंडाचा परिस होत नाही. म्हणून आता सगळया आशा शिक्षकावरच एकवटल्या आहेत.
तुम्ही जेव्हा भूगोल शिकवत असाल, अक्षांश-रेखांश समजावून सांगत असाल, ध्रुव कोठे आहे याचा ऊहापोह जेव्हा होत असेल तेव्हा हे गुरुवर्यांनो, तुम्ही एक गोष्ट विद्यार्थ्यांना आवर्जून सांगा की, ही पृथ्वी गोल आहे. आणि ती गोल आहे म्हणूनच समग्र आहे. तिच्यात कुठे सांदी कोपरे नाही. आणि ती अशी आहे म्हणूनच ती सर्वांना सामावून घेऊ शकते. जेव्हा भूगोल शिकवाल तेव्हा भारताची दक्षिणोत्तर विशालता विद्यार्थ्यांना सांगाच, पण आणखी एक गोष्ट न विसरता सांगा की, केरळच्या भूमीवर जन्माला आलेला एक बालक वयाच्या केवळ आठव्या वर्षी आईवडिलांचा आशीर्वाद घेऊन भारतभ्रमणासाठी बाहेर पडला. जुना काळ आहे तो. सोयी नाहीत. जंगलं आहेत. हिंस्र प्राणी आहेत. जीवाला पावलोपावली भय आहे. हा शिशू केरळमधून निघून केदारनाथला पोचला. त्याने चार धामांची रचना करून अखंड हिंदुस्थानासाठी एक सांस्कृतिक बंध निर्माण केला. भूगोल शिकवत असताना बाल शंकराची ही गोष्ट सांगायला विसरू नका.
आचार्य मित्रांनो, तुम्ही जेव्हा खनिजशास्त्र शिकवीत असाल, कोळसा कोठे निर्माण होतो, आणि पेट्नेल कोठे मिळतं, हे जेव्हा सांगत असाल तेव्हा विद्यार्थ्यांना आणखी एक गोष्ट सांगायला विसरू नका, जमिनीतून अगदी खोलातून काढलेल्या दगडावर असंख्य प्रक्रिया करण्यात येतात. त्याला घासण्यात येतं, नानाविध प्रक्रिया करून त्याला पैलू पाडण्यात येतात. तेव्हा भूगर्भातून निघालेला तो दगड हिरा म्हणून मौल्यवान होतो. मुलांना हेदेखील सांगा की, सोनं जेवढं जळतं तेवढं उजळतं. आणि लोखंड जर तापलं तरच त्यातून पोलाद निर्माण होतं. हा जीवनधर्म खनिजशास्त्राच्या माध्यमातून सांगा. तुमच्या नजरेसमोर खेळत असलेल्या मुलांतूनच एखादा लोहपुरूष निर्माण होईल.
तुम्ही तुमच्या विद्यार्थ्याला स्पष्टपणे समजावून सांगा की, बाळा, पाश्चिमात्य मंडळी जेव्हा पर्यावरणाची पोपटपंची करतील तेव्हा तू लक्षात घे, आणि पाश्चिमात्यांच्या नजरेला नजर भिडवून सांग, तुम्ही आम्हाला पर्यावरणशास्त्र शिकवू नका. ते आम्हाला पूर्वजांनी कधीच शिकवलेलं आहे. आम्ही नदीला आई मानतो, वृक्षांना देव मानतो. सूर्य-चंद्र आमच्या घरातीलच माणसं आहेत. चंद्राला मामाच्या रूपात फक्त आम्हीच पाहू शकतो. पर्यावरणाचा हा भाव आणि दृष्टीकोन तुम्ही अवश्य विषद करून सांगा.
तुम्ही जेव्हा रसायनशास्त्र शिकवत असाल तेव्हा सांगा की, एचटूओ ही पाण्याची संरचना आहे हे खरंच आहे, पण ही व्याख्या गंगाजलाची फोड नाही करू शकत. पाण्यापाण्यात फरक असतो. गंगाजल हे गंगाजल असतं. केवळ पाणी नसतं. ही भावना त्याच्या मनात जागृत होईल असा तुम्ही विशेष प्रयत्न करा. हजारो वर्षांची ही संस्कृती कोणत्या रसायनाने टिकून राहिली आहे याचाही विचार करा. कोणाची तरी मुलगी आपल्या कुटुंबात येते, तिचे संस्कार वेगळे असतात, तिचे संगोपन वेगळया वातावरणात झालेलं असतं, अनेक सवयी वेगळया असतात. पण असं असूनही ती आपल्या कुटुंबाचे एक अभिन्न असं अंग होऊन जातं. ही कुटुंबव्यवस्था चालते त्यामागचे रसायनशास्त्र कोणते आहे याचाही अभ्यास होऊदे. त्या रसायनशास्त्राने ह्या संस्कृतीला हजारो वर्षांपासून चैतन्याने मुसमुसत ठेवले आहे. समाजाला समर्थ करायचं असेल तर त्या रसायनशास्त्राला पर्यायच नाही. याचाही अभ्यास होऊदे एवढीच याचना करायला मी आलो आहे.
नागरिकशास्त्र शिकवताना मूलभूत हक्कांप्रमाणे मूलभूत कर्तव्यांची जाणीवदेखील निर्माण करा. `मला काय त्याचं; मला काय मिळेल?' याच आरोळया जगात सर्वत्र उठत असताना एक गोष्ट विद्यार्थ्यांच्या मनावर ठसवा की, मूलभूत कर्तव्य हाच माझा मूलभूत हक्क आहे. आपण आपल्या कर्तव्याचं पालन केलं तर दुसऱ्यांच्या अधिकाराचं पालन आपोआपच होतं. प्रत्येकानं जर आपल्या कर्तव्याचं पालन केलं तर मूलभूत अधिकारांच्या रक्षणासाठी आटापिटा करावाच लागणार नाही. एकविसाव्या शतकातील भारत हा अधिकारांच्या पायावर नाही परंतु कर्तव्यांच्या पायावर उभा राहील, असं नागरिकशास्त्र तुम्ही विद्यार्थ्यांच्या मनात रुजवा.
समाजशास्त्र शिकवताना अनेक प्रश्नांची उकल कराच, पण एक मोठं सत्य मुलांना आवर्जून सांगा. ह्या देशात उच्चनीच भाव सर्वथा त्याज्य आहे. प्रभू रामचंद्र महत्त्वाचे आहेतच, पूजनीय आहेतच पण वानरसेनादेखील तितकीच महत्त्वाची आहे. एका सांस्कृतिक विजययात्रेचा पाया प्रभू रामचंद्रांनी घातला. समाजशास्त्र शिकवत असताना आणखी एक गोष्ट सांगा की, गोवर्धन उचलणं भगवान श्रीकृष्णांना सहजशक्य होतं, पण त्यांनी तो नाही उचलला. असंख्य गोपाळांनी त्यांच्या त्यांच्या काठ्या उभारल्या तेव्हाच तो पर्वत उचलला गेला. प्रत्येक गोपाळाच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला की, माझ्या काठीमुळेच गोवर्धन उचलला गेला. आपण सर्वांनी तो पेलला आहे. हे समाजशास्त्र होतं श्रीकृष्णाचं.
समाजातल्या शेवटच्या स्तरातली अशी होती शबरी. मला असं वाटतं की आता रामाची शबरीभक्ती आपण विद्यार्थ्यांना समजावून सांगायला हवी. राम आपणहून शबरीकडे गेले. त्या भक्तवत्सलाला माहीत होतं की, शबरीची बोरं उष्टी आहेत पण शबरीभक्त रामाने ती स्वत: भक्षण केली आणि ते संतोष पावले. उच्च-नीच, स्पृश्य-अस्पृश्य असा कोणताही विकल्प मनात न आणता प्रभू रामचंद्रांनी एक आगळं समाजशास्त्र निर्माण केलं.
प्रगती आणि विकासाच्या चर्चा होतीलच. त्या झाल्याच पाहिजेत. त्या आवश्यकदेखील आहेत. माझ्या घरात सायकल आहे, शेजारी स्कूटर येते. माझ्या मनात ईर्ष्या निर्माण होते. अँबीशनची ठिणगी पडते. अनेकांचं म्हणणं आहे की अँबीशनशिवाय आयुष्यच नसतं. पण जीवनात अँबीशनपेक्षा मिशन असावं. मिशन असेल तर अँबीशन सहजपणे प्राप्त होतील. जीवनाला विकासाची आस लावा. स्पर्धेची चटक लावू नका. सर्वत्र निराशाच आहे. मनुष्य प्रत्येक वळणावर, प्रत्येक टप्प्यावर निराश होतो आहे. हताश माणसाच्या मनात एकच भय आहे की, सगळं काही वाहून जातं आहे. सगळेच चोर आहेत, सगळेच भ्रष्ट आहेत. राष्ट्न् विनाशाच्या खाईवर येऊन उभं आहे. निराशेच्या ह्या वातावरणातदेखील विद्यार्थ्यांच्या मनात आशेचा दीप प्रज्वलित ठेवण्याची अवघड जबाबदारी तुम्हाला पार पाडायची आहे. मी आपल्याला साकडं घालतो की, भारताच्या या भावी पिढ्यांच्या मनात निराशेचा ध्वनी निर्माण होणारच नाही याची जबाबदारी तुम्ही घ्यायची आहे. मुलांच्या मनावर निराशेचं सावट येणार नाही हे पाहणं, हे तुमचं कर्तव्य आहे.
माहितीक्षेत्राचं युग आहे हे. प्रसारमाध्यमांच्या लाटा सर्वत्र उसळत आहेत. अनेक गोष्टी आपल्या कानावर सतत आदळत असतात. कोणाचंही मन विचलित होणं अगदी सहज शक्य आहे. ह्या प्रचारयुगात तुमचा विद्यार्थी प्रवेश करीत आहे. त्याला सांगा, एक ब्राह्मण वासरू घेऊन जात होता. समोरून चार ठग आले. त्यांनी मानसिक ताण व गोंधळ निर्माण केला आणि त्या ब्राह्मणाला वाटू लागलं की त्याच्याजवळील वासरू हे वासरू नसून कुत्रा आहे. त्याने त्या वासराला टाकून दिलं. प्रचाराच्या ह्या भ्रमजालात सत्याचा सातत्याने विचार करण्याची क्षमता तुम्ही मुलांच्या मनात निर्माण करा.
हे आचार्यांनो, गणित शिकवत असताना गुणांचा गुणाकार करण्याची सवय मुलांना लावा. तोच जीवन प्रशस्त करण्याचा एकमेव मार्ग असतो. एक अधिक एक बरोबर दोन हे तर खरं आहेच, पण एक जर एकाच्या बाजूला येऊन उभा राहिला तर अकरा होतात. दुसऱ्याचं अस्तित्व स्वीकारणं, ते मान्य करणं आणि त्याच्या बरोबरीनं उभं राहणं हाच वैभवाचा मार्ग असतो. एकाने जर दुसऱ्या एकाला गिळून टाकलं तर ती वजाबाकी होईल. हे गणितदेखील विद्यार्थ्यांना शिकवा.
चित्रकला ही रंगांची संगती असते. मुलांना हे पण सांगा की, जीवनातदेखील संगती असली पाहिजे, मॅचिंग असलं पाहिजे. एका बाजूला गगनचुंबी इमारती आहेत, तर दुसऱ्या बाजूला भीषण झोपडपट्टी आहेत. एका बाजूला अपार धन आहे, तर दुसऱ्या बाजूला फक्त अभावच आहे. चित्रकलेप्रमाणे जीवनातदेखील रंगसंगती निर्माण करायची आहे याचं भान मुलांच्या मनात निर्माण करा.
रावणवध, कंसवध ह्या कथा सांगाच पण त्याच बरोबरीने लक्ष्मणरेेषेचं महत्त्वदेखील मुलांना समजावून सांगा. जीवशास्त्राच्या तासाला अमिबाची शरीररचना शिकवाच पण जाळं बांधणाऱ्या, त्या प्रयत्नांत वारंवार पडणाऱ्या पण धीर न सोडणाऱ्या कोळयाचीही गोष्ट न विसरता सांगा. एक फूल देवाला म्हणतं, नववधूच्या शृंगारासाठी माझा उपयोग नाही झाला तरी चालेल. राजा महाराजांच्या गळयात मला स्थान नाही मिळालं तरी चालेल, कोण्या देवाच्या चरणी जरी मी वाहिला नाही गेलो तरी चालेल. देवा तू एकच कर, ज्या मार्गावरून ह्या धरतीच्या शूरवीरांची सेना जात असेल त्या मार्गावर मला भिरकावून दे, त्या सेनेच्या पावलांनी तुडवलं जाण्यातच माझ्या जीवनाची सार्थकता आहे.
एकविसाव्या शतकातील नवी पिढी कशी असेल ते ठरविण्याची निर्णायक भूमिका निश्चित करण्याची अमूल्य संधी आपणास प्राप्त झाली आहे. ह्या राष्ट्न्यज्ञात आहुती अर्पण करण्याची भूमिका आपल्याला वठवायची आहे. दधिचींच्या परंपरेत आपण निर्माण झालो आहोत, आपण विद्यादान करणार आहोत. हे करीत असताना आपण आपली स्वप्नं तर जपणार आहोतच, पण आपल्यावर ज्यांची जबाबदारी आहे अशा विद्यार्थ्यांची स्वप्नंदेखील आपण जपणार आहोत!
(कर्णावती (अमदाबाद) येथे गुणवंत शिक्षकांना पुरस्कार वितरणाचा सोहळा होता. त्याप्रसंगी केलेेले भाषण...)

कलम ३७० : घटनाकारांचे मत
आधुनिक भारतात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी वंचित समाजाच्या बाजूने, सामाजिक व राजकीय क्षेत्रांबाबत प्रभावी जागृती केली आहे. आज भारतात साधारणत: असा एक गैरसमज आहे की, त्यांनी आरक्षणाची सुरुवात केली एवढेच काय ते त्यांचे कार्य! पुष्कळशा अल्पशिक्षित लोकांना फारतर एवढे माहीत असते की बाबासाहेब घटनेच्या मसुदा-समितीचे अध्यक्ष होते, म्हणजे ते घटनाकार होते.

याशिवाय हेही माहिती असायला हवे की, महिला व पुरुषांना त्यांच्या संपत्तीत समान अधिकार बाबासाहेबानी दिला; त्याचबरोबर आजच्या संदर्भात हेही लक्षात ठेवले पाहिजे की, डॉ.आंबेडकर हे घटनेतील कलम ३७० च्या विरोधात होते. १९४७ ला स्वातंत्र्य मिळाल्यावर पहिल्या मंत्रीमंडळात त्यांना कायदेमंत्री म्हणून महत्त्वाचे स्थान होते. कायदामंत्री म्हणून त्यांनी हिंदू कोड विधेयक तयार केले, त्यात हिंदू कुटुंबांतील संपत्तीचा अधिकार स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने देण्यात आला होता. त्या काळी हे पाऊल इतके क्रांतिकारक होते की, पं.नेहरू सरकार त्यास कायद्याचे स्वरूप देऊच शकले नाही. त्या कारणावरून १९५१ मध्ये आंबेडकरांनी कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. हिंदू कोड बिल सर्व हिंदूंसाठी होते, केवळ वंचितांपुरते नव्हते.
आंबेडकरांनी तयार केलेले ते विधेयक नेहरू सरकारने टप्प्याटप्प्याने पारित केले. त्यात
हिंदू विवाह अधिनियम(१९५५),
हिंदू उत्तराधिकारी अधिनियम(१९५६)
हिंदू अल्पवयस्क व त्यांचे संरक्षण अधिनियम(१९५६)
हिंदू दत्तक व भरण-पोषण अधिनियम (१९५६)
इत्यादींचा समावेश आहे. डॉ.बाबासाहेबांची इच्छा होती की सर्व भारतीयांसाठी समान नागरिक कायदा (युनीफॉर्म सिविल कोड) झाला पाहिजे. त्यांनी घटनेच्या अनुच्छेद ४४ मध्ये राज्याच्या नीतिनिर्देशक सिद्धांतांच्या अंतर्गत तशी तरतूद केली. परंतु मतपेटीच्या राजकारणांच्या काल्पनिक प्रभावामुळे आजपर्यंत बाबासाहेबांचे ते स्वप्न पूर्ण झालेले नाही. मुस्लिमांतील काही कट्टरवाद्यांना समग्र मुस्लिम समाजाचे हित कळत नसावे.

इंग्लंडमध्ये समान नागरी कायदा आहेच, तिथे िख्र्चाश्न किंवा अन्य कुणाला धर्माच्या आधारे सवलती नाहीत; तिथले मुस्लिम विरोध करत नाहीत किंवा विशेष मागणी करत नाहीत. युरोपातील सर्वात मोठी मशीद आहे, तेथील इमाम सौदी अरेबियातले होते, कधीतरी भारतात लखनौला राहून गेले होते. त्यांना विचारले की, ``तुम्ही इथे मुस्लिम पर्सनल लॉ मिळावा अशी मागणी का करत नसाल?'' त्यांचे उत्तर मार्मिक आहे. ते म्हणाले, ``आमची लोकसंख्या अजूनी कमी आहे. ती वाढल्यावर तशी मागणी करू.''
सध्या चर्चेत असलेल्या ३७० व्या कलमापुरते सांगायचे तर डॉ.आंबेडकर हे काश्मिरला विशेष दर्जा देण्याच्या मताचे नव्हते. ज्या दिवशी कलम ३७० संदर्भात घटनासमितीच्या बैठकीत चर्चा व्हायची होती, त्या बैठकीत त्यांनी भागही घेतला नाही. परंतु इतर विषयांवरील चर्चेस ते उपस्थित राहिले. नंतर पंडित नेहरूंनी स्पष्ट केले की, हा अनुच्छेद ३७० केवळ एक तात्पुरती तरतूद आहे. अर्थात् मतांच्या गृहितकांमुळे ही तरतूद कायमचीच मुक्कामास बसली. घटनेच्या अनेक दुरुस्त्यांमधून आरक्षण व्यवस्था तशीच कायमची होऊन राहिली आहे. डॉ.आंबेडकर यांनी तयार केलेल्या, भारताच्या मूळ घटनासंहितेनुसार, आरक्षणाची तरतूद सुरुवातीच्या केवळ दहा वर्षांपुरती होती.

आजकाल आंबेडकरांना मानणारे, - आंबेडकर समर्थक, काँग्रेस, भाजपा, कम्युनिस्ट यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांमध्ये आहेत. त्या सर्वांनी मनावर घेऊन, आंबेडकरांच्या इच्छेनुसारच सर्व भारतीय नागरिकांच्या एकत्त्वासाठी, धर्मजातींच्या पलीकडे जाऊन, सर्वसमान नागरिक कायदा आणण्याचे प्रयत्न करावेत. युद्ध-निसर्गकोप अशा प्रसंगी एखाद्या राज्यासाठी विशेष तरतुदी कराव्या लागतात, पण केवळ भेद दर्शवीत राहणारा `विशेष दर्जा' कालबाह्य होत असतो, हे समजून घ्यावे.

या लेखास संदर्भ-डॉ.संतोषकुमार तिवारी
(रांची(झारखंड)केंद्रीय विद्यापीठात जनसंचार केंद्राचे अध्यक्ष)
हिंदुस्थान समाचार वृत्तसेवा - ३००४१४


आपले बालक (पाल्य) यावर्षी प्रथमच त्याच्या शैक्षणिक आयुष्याची सुरुवात करण्यासाठी शाळेत पदार्पण करणार असेल तर बालकाचे भावी आयुष्य संपन्न, समृद्ध आणि सुसंस्कृत व्हावे अशी अपेक्षा असतेच. त्यासाठी दर्जेदार शिक्षण आवश्यक असते. असे शिक्षण देणारी शाळा कशी निवडायची याविषयी 
..... भा व सं वा द .....
कोणत्याही व्यक्तीच्या जीवनाचा विकास होणे हाच शिक्षणाचा मूळ उद्देश असतो. बालकाला मिळणारे शिक्षण हे भावी आयुष्यासाठी उपयुक्त व्हावे, - म्हणजेच ते जीवनशिक्षण असावे. सध्याचे जीवन अतिशय गतिमान आहे असे आपण म्हणतो, पण सध्याची शिक्षणव्यवस्था मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून जैसे थे राहिली आहे. जीवनाच्या गतीनुसार शिक्षणसुद्धा गतिमान होणे आवश्यक असते. म्हणूनच शिक्षणाच्या प्रचलित पद्धतीत आमूलाग्र बदल होणे आणि त्याविषयी आपल्या विचारांमध्ये संक्रमण होणे गरजेचे असते.
प्रचलित शिक्षणव्यवस्थेत वर्तनवादी विचारसरणी आहे असे म्हटले जाते. त्यावर ठराविक पारंपारिक पद्धतींचा पगडा आहे. उदा.पाठांतर, यांत्रिक प्रतिसाद, स्मरणशक्तीवर आधारलेल्या परीक्षा, आणि गुणांची टक्केवारी. मूलभूत शास्त्रीय संशोधन आणि मेंदूची विचारक्षमता यांच्याशी ही शिक्षणपद्धती पूर्णत: विसंगत आहे. त्यामुळे आपली बालके शाळा आणि शिक्षण यांच्या ओझ्याने ताणतणावात वावरत असलेली दिसतात. प्रत्येकाच्या अंगी काही ना काही गुणवत्ता असते. ती सिद्ध करून दाखविण्यासाठी सध्याची शिक्षणपद्धत वाव देत नाही. भावी आयुष्यात उत्तम नागरिकत्त्व आणि संपन्नतेसाठी करण्याचा व्यवसाय, याकरिता ज्या क्षमता आणि कौशल्ये अंगी असायला हवीत त्यांचा विकास, आणि मानसिक जडणघडण बालपणीच मुलांच्यात झाली पाहिजे. बालकांचे वय आणि त्यांच्या मेंदूचा विकास यांचा एकमेकांशी घनिष्ठ संबंध असतो. माणसाच्या मेंदूचा ८०% विकास वयाच्या ९-१० वर्षांपर्यंतच होतो असे शास्त्रीय संशोधन सांगते. म्हणजेच ४ ते ६ या वयोगटातील बालवाडी हेच त्याच्या शास्त्रोक्त शिक्षणाचा पाया घालणारे वय आहे.
म्हणूनच `शास्त्रीय बालशाळे'ची सुरुवात व्हायला हवी. या पद्धतीची शिक्षणव्यवस्था काही इंग्रजी शाळांमध्ये येत आहे, परंतु मराठी माध्यमातून असे शिक्षण देणारी, आपल्या परिसरात संस्था असावी. गुणवत्तापूर्ण आणि आशयसंपन्न शिक्षणप्रणाली बालकांच्या वयोगटानुसार सुरू करण्यात यावी. महाराष्ट्नतील अनेक नामवंत संस्था आणि शिक्षणतज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यायला हवे. शासनही आता शैक्षणिक धोरण बदलत आहे, त्याला समांतर अशी नवी रचनावादी शिक्षणपद्धत आणि त्याचबरोबर सध्याच्या शिक्षणातील काही उपयुक्त गोष्टी, या दोन्हींचा मिलाफ घडवून अभिनव शिक्षणपद्धतीचा अवलंब संस्थेत केला जावा.
शिक्षणाचा दर्जा उत्तम ठेवायचा असेल तर बालकांवर व्यक्तिगत लक्ष देणे महत्त्वाचे असते. त्याकरिता वर्गाची पटसंख्या मर्यादित असावी. या वयोगटातील मुलांचा बौद्धिक विकास, श्रवण व संभाषण (ऐकणे व बोलणे) या माध्यमांतूनच होत असतो. भाषा, गणित, कला इत्यादी सर्व शिक्षण बालकांना कृतीद्वारे द्यायचे असते. त्यासाठी मनोरंजन आणि खेळ या स्वरूपातील शैक्षणिक साधने शाळेत असायला हवीत. या वयातील मुलांकडून वाचन, लेखन या गोष्टी करून घेणे शास्त्रीय दृष्टीने पूर्णत: अयोग्य आहे. या प्रकारच्या बदलत्या शैक्षणिक संकल्पना आणि शैक्षणिक प्रवाह यांच्या बाबतीत पालकवर्ग जाणकार नाही आणि बराचसा संभ्रमित आहे. मुलांची सर्वांगिण  जडणघडण होण्यासाठी पालकांचा सहभाग अत्यंत आवश्यक, - किंबहुना अपरिहार्य असतो. हे लक्षात घेऊन तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पालकांच्या कार्यशाळांचे आयोजन संस्थेत करायला हवे.
मुलांचे शिक्षण मातृभाषेतूनच झाले पाहिजे असे शास्त्रीय संशोधन सांगते. आजकाल पालकांचा ओढा इंग्रजी माध्यमाकडे आहे. अशा शाळांत मुलांचा प्रवेश होतो, पण मुलांची मातृभाषा इंग्रजी नसल्यामुळे इतर विषयांचे आकलन त्याला इंग्रजी भाषेतून होणे फारच कठीण असते. शाळेतील शैक्षणिक व्यवहारांमधील आशय मुलांना इंग्रजीतून समजत नाही. पुष्कळशा सरावानंतर इंग्रजी भाषा थोडीशी सुधारते, परंतु ज्ञान घसरते असा तज्ज्ञांचा अनुभव आहे. तथापि मुलांना इंग्रजी येेणे ही काळाची गरज आहे. मराठी भाषा समृद्ध होण्यासाठी व इंग्रजी प्रगत होण्यासाठी `द्विभाषा समृद्धी प्रकल्प' असा अभिनव उपक्रम इयत्ता १ ली ते ४ थी या वर्गांसाठी केला पाहिजे.
आपल्या पाल्याच्या भवितव्याविषयी आपण सर्वजण जागरूक आहातच. त्या दृष्टीने बालकासाठी शाळेची निवड करताना एक सुजाण पालक म्हणून आपण सर्वांगांनी योग्य तोच विचार कराल अशी खात्री वाटते. आपल्या पाल्याच्या भावी शैक्षणिक वाटचालीस आमच्या हार्दिक शुभेच्छा!
शेवटी एक विशेष बाब आपल्यास सांगायला हवी की, नव्या शास्त्रीय पद्धतीने बालशिक्षण दिले जावे म्हणून सांगली जिल्ह्यातील ८ व कोल्हापूर जिल्ह्यातील १ अशा, ९ शाळांमधून `शिकू आनंदे' या नावाची विशेष प्रणाली व प्रशिक्षण जून २०१४ पासून लुल्ला चॅरिटेबल ट्न्स्ट यांच्या आर्थिक सहकार्याने सुरू होत आहे.
या नऊ शाळांतील शिक्षकांसाठी दि.१ मे रोजी सांगली येथे एक कार्यशाळा घेण्यात आली. शिवाय शिक्षक आणि पालक यांच्यासाठी २५ मे रोजी विशेष कार्यशाळा घेण्यात आली. त्यात सिनेदिग्दर्शक सुनील सुखथनकर, सुमित्रा भावे, आणि ज्ञानमंडळाचे उदय पंचपोर यांनी मार्गदर्शन केले. खूप मोठ्या संख्येने पालकवर्ग उपस्थित होता.
  - प्रशांत देशपांडे (मोबा.९८९००८०७११ )

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन