Skip to main content

23Dec.2013

माझी साहित्यविचार-यात्रा...
काय झालं, माझ्या जरा उत्साही आणि शहाण्या मैत्रिणींनी, अचानक काहीतरी ललित लेखनाचं खूळ डोक्यात घेतलं. आता प्रत्येकीनं काहीतरी मदत करणं आलंच! कुणी लेख लिहितंय, कुणी चित्रं काढतंय, कविता करतंय! मला या मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये सर्वांसाठी चहा करणे किंवा त्यांना स्कूटरवर मागे लादून हेलपाटे मारणे एवढी `ढोबळ' कामे फक्त जमू शकतात. (असतं एखादं माणूस जाड! त्याला फस्कन हसायचं काय एवढं!) माझं बाई डोकं चालतं, पण जरा तिरकं!
तर या सगळयाजणी कथाकाव्यनिबंध अशा रुणझुणत होत्या. काय काय चाललेलं! मी आपली म्हणतेय,`नवे प्रवाह, नव्या कल्पना, नवी आव्हाने' तर `तू चहा टाक जा परत एकदा' असं म्हणून मला पिटाळलं मेल्यांनी आत. इकडे चहाबरोबर माझे विचार उकळायलाच लागले.
दररोज मी मुलीला सोडणे-आणणे, शाळा-क्लासेस अशा घिरट्या घालत असतेच. आता या सगळयात व्यायामाला कुठून वेळ आणू? पण खर्र सांगते, माझी दिव्य स्कूटर + आपले रस्ते हे मला रोजच्या स्कूटरिंगमध्ये व्हायब्रेशन मसाज, शॉक, अॅक्युप्रेशर असे फायदे सहज मिळवून देतात! शिवाय चाकाने जर या सगळयात `अॅक्युपंक्चर'केलं, तर तो जास्तीचा एक्सरसाईज! मग ती गाडी ढकलण्यात घामाचे लोट वाहतात. जिमला जाण्यानं दहा हजारातही एवढा घाम निघाला नसेल! पावसाळयात आपले चिरपरिचित खड्डे एकदम पोटभर पाणी पिऊन बसतात. खड्ड्यांच्या लोकेशन, खोली, लांबी, रुंदी लक्षात ठेवणं सोपं नाही बायांनो! हे रोज करावं लागतं!!
उन्हाळयात लोडशेडिंगची सोय झाल्यापास्नं मीच काय अख्खा महाराष्ट्न् कसा शिस्तशीर झाला. संस्कार परंपरा या गोष्टी रुजवल्या. रोजचे आठ-नऊ तास वीज नाही (मी खोटं सांगत नाही. माझ्या निमशहरी की निमग्रामीण भागात येऊन पहा - शहरी व ग्रामीण दोन्ही कपातींचा फायदा आम्हाला मिळतो!) इन्व्हर्टर ऑक्सिजनसारखं जपून वापरावं लागतं. त्यामुळं संध्याकाळी मुलं गल्लीत हुंदडतात. रात्री टीव्ही नसल्यामुळे घरातले सदस्य एकमेकांशी बोलताहेत... वगैरे कालबाह्य दृष्यं घराघरात दिसायला लागली. ही योजना सकाळच्या वेळी असली तर आणखी मज्जा! अपार्टमेंटमध्ये तमाम नवरे (हो, आमच्या गावात आता अपार्टमेंटसुद्धा झालंय आणि तरीही पाणी पूर्वीप्रमाणेच येतं - म्हणजे येत नाही!) पाणी वर चढत नसल्यानं खाली खड्ड्यात पडणाऱ्या नळाच्या बोटभर धारेच्या आधाराने पाणी भरून वर नेतायत; असं नयनरम्य करुण दृश्य दिसायला लागलं. रोजच्या या पाणी अभियानानं सर्व जिनेही रोज धुतले जायला लागले. बायकांनी परंपरेचे पाटे-वरवंटे-खलबत्ते बाहेर काढले. मिक्सर, वॉशिंग मशीन वगैरे गोष्टींना खंडेनवमीऐवजी रोजच हळदीकुंकू घालून ठेवण्याची वेळ आली. रात्रीच्या वेळी मुलगा-मुलगी एकुलत्या सी.एफ.एल.च्या उजेडात अभ्यास करत बसले की मला भरून यायचं... निदान या एका गोष्टीमुळे तरी ते नक्की कुणीतरी `मोठ्ठे' होणार!
पण हाय रे दैवा! आमचं गाव कसल्याशा योजनेत सापडलं आणि अक्षय वीज पुरवठा योजनेमुळे पुन्हा घरात अक्षय मालिका वाहू लागल्या. खरंच आपली काळजी सरकारला आहे, यात शंका नाही. नित्य वर्धिष्णु पेट्नेल दरामुळे माणसं जात-येता एकमेकांची कामे करू लागली. कुणीही प्रबोधन न करता सिग्नलला गाड्या बंद करायला लागली. शेअर स्कुटर्स सुरू झाल्या. `जीवनावश्यक वस्तू' या जीवरक्षक औषधांप्रमाणे अत्यंत जपून वापरायच्या असतात हा मोठा धडा भाववाढीने शिकवला. कोथिंबिरीचा निदान वास यावा म्हणून बायका टेबलवर फुलदाण्यांऐवजी कोथिंबीरदाण्या ठेवू लागल्या.
गांधीजी सांगून गेले, `साधे रहा, गरजा कमी करा...' वगैरे. पण सरकारने या सवयी किती चटकन जनतेला लावल्या! तुकोबापण `उदास विचारे वेच करी' असे का म्हणतात ते आता कळलं. एक एक नोट खर्चताना, शंभर रुपयाला, रुमालात मावेल एवढी भाजी घेताना किंवा जेमतेम दीड दिवस पुरेल एवढे पेट्नेल भरताना `उदास'च काय निराश, हताश वगैरे वाटतं.
पाठ्यपुस्तके व अभ्यासक्रम सरकारने सतत बदलता ठेवल्यामुळे तमाम `गुर्जी' मंडळी धडे नजरेखालून घालू लागली. दरवर्षी विचित्रपणे बदलणाऱ्या व अचानक जाहीर होणाऱ्या शैक्षणिक परीक्षा धोरणांमुळे `कोचिंक क्लास'ची पर्यायी शिक्षणव्यवस्था उभी राहिली. त्याला पूरक असे `नोटा'छापणे (नोटस्!), जाहिरातीची होर्डिंग्ज लावणे, क्लासेससाठी पार्किंग, हॉटेल्स, नेटक्रॅफे इ.सुविधा पुरवणे असे उद्योगांचे प्रचंड जाळे उभे राहिले! कॉलेजवरचा ताण एकदम कमी झाला. त्यामुळे कॉलेजच्या प्राध्यापकांना अपूर्व मन:शांतीचा अनुभव येतो. कॉलेजचे सभागृह, वर्गखोल्या हे कार्यक्रमांसाठी, निदानपक्षी मालिकांच्या शुटिंगसाठी देता यावेत म्हणून त्यांच्या घटना दुरुस्त्या सुरू आहेत म्हणे!
टू-जी, थ्री-जी.... काही कळत नाही, पण मोबाईल क्रांती ही आजन्म ऋणी रहावं अशी गोष्ट आहे. माझा स्वभाव जरा अ-गंभीर आहे. म्हणजे सारखं काहीतरी कारण काढून मला आपलं हसायला लागतं. एकटं असताना जरा पंचाईत व्हायची. आता एकटं चालत असलं तरी करमणूक होते. कुणीतरी स्वत:शी बोलत असतं, कुणी हातवारे करत असतं, कुणी शिव्या घालतं, कुणी हसत असतं. या सगळयांच्या कानातले इवले यंत्र दिसले नाही तर आपण वेड्यांच्या शहरात आहोत असं या फोनमग्न लोकांना पाहून वाटतं! गावातल्या भाजी मंडईत बायकोसोबत पालेभाजीसाठी घासाघीस करत असताना फोनवर `मी जरा बेंगलोरमध्ये आहे. पोचलो की लगेच काम करतो' वगैरे बेधडक सांगताना ऐकलं की मला फस्सकन हसू येतं. हल्ली मी खुशाल मोठ्यांदा हसते, स्कूटरवरून जाताना गाणी म्हणते, मनात विचार मावत नसले तर रस्त्यातून बडबडत चालते. माझ्याकडे कुणीही चमत्कारिक नजरेनं पाहात नाही. त्यांना नवल वाटतं. हिच्याकडे कुठले अल्ट्नमॉडर्न डिव्हाईस आहे? कुठं इअरफोन-ब्लू टूथ दिसत कसं नाही?
एसेमेस सुविधा आल्यामुळे तर जनतेची फारच सोय झाली. मुलं आता क्लासमध्ये गोंधळ करत नाहीत. सर शांतपणे शिकवत असतात, मुलं शांतपणे एसेमेस, एसेमेसच काय पिक्चरही अगदी `शांतपणे' पाहात असतात. बऱ्याच गोष्टी न बोलता एसेमेसद्वारे सांगायची फॅ.आ. (फॅशन आहे. एसेमेसमुळे भाषा आटोपशीर होते. मु.सू.-मुद्देसूद बोलायची सवय लावते!) तोंडाची वाफ न दवडल्यामुळे साठून राहणार. तिच्यावर किमानपक्षी मोबाईल चार्जिंग तरी करता येईल, यावर मी सं.क.आ.(संशोधन करत आहे!)
उत्तराखंडाच्या दुर्दैवी (हे मी खरंच गांभीर्याने म्हणतेय) घटनेनंतर देशभरात प्रतिक्रियांचा, मदतीचा पूर वाहिला. वाहिन्या तर धन्य धन्य झाल्या. त्यांना केदारनाथाने इतका भरभरून टीआरपी दिला की बहुधा तेच केदारनाथाचे पुनर्वसन करून देतील! `झी धाम', `स्टार निवास', `आयबीएन लोकसहवास' अशी यात्रीगृहे उभी राहतील. भारतीय जनतेत `वाचलेल्यांच्या' व `गेलेल्यांच्या' पक्षाचे असे दोन मतप्रवाह (मन प्रवाह) बनलेत. जे वाचले ते प्रचंड कॉन्फीडंट झालेत. `आता आम्ही कुठल्याही साहसाला घाबरत नाही' असे ते म्हणतात. वाचलेले पुणेकर मात्र, `त्यात काय! पुण्यातले रस्ते आणि ट्न्ॅिफक याची सवय होतीच. त्यामुळं फार काही वेगळं वाटलं नाही' असं म्हणून श्रेय नेहमीप्रमाणे पुण्याला देत आहेत. (पाप-पुण्य मधल्या `पुण्याला' नाही!) `देव तारी त्याला कोण मारी' व `देव मारी त्याला कोण तारी' अशा दोन टीम करून लवकरच देशव्यापी टॉक शो एका वाहिनीवर येत आहे.
चहा अजून झाला नाही का हे बघायला कुणीतरी आत आलं. तर मी `मुंगेरीलाल के हसीन सपने'सारखी डोळे बंद करून पुटपुटते आहे. गॅसवर भांडं करपून चहाऐवजी क्रॅरेमल बनलं आहे, हे पाहून माझ्या साहित्यिक उकळया कमी झाल्या. तुम्हाला म्हणून हे सांगितलं, त्याला साहित्य कोण म्हणेल?
- विनिता तेलंग (९८९०९२८४११)
***


एका सैनिकाची जीवनगाथा
वीरचक्र सन्मानित कै.गजानन वेलणकर
सांगलीच्या गावभागातील भावे इंजि. गल्लीमधील वेलणकर औषधी कारखान्याच्या परिसरात वैद्य बाळकृष्णपंत वेलणकर व राधाबाई हे दांपत्य राहायचे. त्यांचा मुलगा गजानन माझा ज्येष्ठ बंधू. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पार पडले आणि शरीरसामर्थ्य प्राप्त झाले आदिबलभीम व्यायाम शाळेमधून! नियमित व्यायाम, सायकलिंग, कृष्णा नदीत पोहणे इत्यादींमध्ये भरीव प्रगती केलेल्या गजाननने एन.सी.सी. जॉईन केली. अनेक गौरवपदके मिळविली आणि आवडीनुसार सैन्यात सामील झाला. सेकंड लेफ्टनंट हे पद प्राप्त झाले.
सन १९६२ चे चीनचे युद्ध, त्यानंतर १९६५ चे पाकिस्ताने युद्ध आणि १९७१ बांगला मुक्तिसंग्राममध्ये शौर्य गाजविले. बांगला देश लढाईमध्ये बॉम्बचे ४० तुकडे शरीरात घुसले, पण गजाननाने ध्वज खाली न टेकवता अपेक्षित ठिकाणी आपला तिरंगा फडकविला आणि तो बेशुद्ध होऊन पडला. १८ तासांनी त्याला वैद्यकीय मदत मिळाली. पुढे ऑपरेशन होऊन बॉम्बचे तुकडे बाहेर काढले. या पराक्रमाची नोंद दरबारी झाली. राष्ट्न्पतींच्या हस्ते गजानन वेलणकर यांना वीरचक्र मिळाले आणि वेलणकर कुटुंबियांचीच नव्हे तर सांगलीकरांची मान ताठ झाली.
यानंतर गजाननाचे निवृत्ती जीवन सुरू झाले. मुंबईजवळ मीरा रोड येथे फ्लॅट मिळाला. बोईसर ता.दहिसरपासून १० किमी. अंतरावर ५ एकर शेतजमीन मिळाली. सिक्युरिटी ऑफीसर म्हणून नोकरीही करता आली. या गजाननाने शेतीमध्ये आयुर्वेदीय वनस्पतींची लागवड करून यशस्वी केली.
सैनिकी निवृत्तीनंतर त्याचे शुभकार्य झाले. पत्नी, मुलगा, सून, नातवंडे अशा परिवारामध्ये आनंदी जीवन व्यतीत करणाऱ्या गजाननाला १९/११/२०१३ रोजी स्वर्गाचे मंदिर उभारण्याचा निरोप आला. शासकीय इतमानाने निरोप देण्यात आला, अहो भाग्यम!
- जगन्नाथ बाळकृष्ण वेलणकर,
५, श्री अपार्ट.,१२०३२, शिवाजीनगर
झुलेलाल चौक, सांगली
मोबा.९८२२८७२४०८,  फोन:०२३३-२५६११६७२

गणिताला हे उत्तर !
शिक्षण क्षेत्रातील काही विद्वान एका प्राथमिक शाळेत गेले व त्यांनी मुलांना एक गणित घातले. `दुधाचा दर लिटरला १० रुपये. एका शेतकऱ्याची एक म्हैस दिवसाला ७ लिटर दूध देई. तो दूध विकून चरितार्थ चालवी. दुसऱ्या एका शेतकऱ्याकडे तेवढेच व तसलेच दूध देणारी म्हैस होती. हे दूध दाट आहे, तेव्हा जास्त फायदा मिळविण्यासाठी तो दुधात २ लिटर पाणी मिसळत असे. तर मग दुसऱ्या शेतकऱ्याला किती जास्त फायदा होत होता?'
वर्गातील मुले गणित सोडवू लागली. वर्गशिक्षकांना मुलांच्या क्षमतेबाबत विश्वास होता. बऱ्याचशा मुलांनी गणित बरोबर सोडविले. विद्वानांना समाधान वाटले. काही दिवसानंतर तेच विद्वान जपानला गेले होते. तेथे एका शाळेत गेले असता, एका वर्गातील मुलांना हेच गणित घातले. आपल्या देशातील मुलांची व जपानी मुलांची बुद्धिमत्ता याची तुलना करावी हा विद्वानांचा हेतू. त्यांची कल्पना की, गणित सोडवायला मुलांना चार-पाच मिनिटे तरी लागतील, परंतु सर्व ४० मुलांनी केवळ पाच-दहा सेकंदात वह्या खाली ठेवल्या. विद्वानांना जरा आश्चर्य वाटले, त्यांनी त्या सर्व वह्या तपासल्या. सर्व विद्यार्थ्यांनी स्वतंत्रपणे एकच उत्तर लिहिले होते, ते म्हणजे `फाशी'. आपल्या शाळेतील मुलांच्या, शिक्षकांच्या किंवा तुमच्या मनात हे उत्तर आले होते का? मला तरी हे उत्तर सुचले नाही. एकाची कमाई ७० व दुसऱ्याची त्याच दुधावर ९० म्हणजे किती टक्के फायदा; हाच विचार माझ्या मनात आला! एकमुखाने `फाशी' हे उत्तर लहान मुलांनी द्यावे हे कल्पनेतच येऊ शकत नाही.
- दिलीप वा.आपटेे
लोकमान्य सोसा., पंढरपूर रोड,मिरज
फोन : ९८६००३२०८२

नव्या पिढीची जाण
सांगली येथे `सेवा २०१३' च्या निमित्ताने राष्ट्नीय आणि सामाजिक कार्याचे सजग भान ठेवून लुल्ला चॅरिटेबल ट्न्स्टचे श्री.किशोर लुल्ला आणि त्यांचे सहकारी प्रमोद चौगुले, वसंत आपटे, अशोक तेलंग यांनी सर्व सामाजिक संस्थांना एकत्र आणून, खऱ्या कार्याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला.
दि.७, ८, ९ डिसेंबर २०१३ रोजी हे प्रदर्शन राज्य पातळीवर भरले होते. दासबोध अभ्यास मंडळ, मिरज गेली तीन वर्षे यात भाग घेत असून समर्थ संप्रदायाची पुस्तके, अन्य साहित्य, अनेक झाडांची रोपे स्टॉलवर ठेवली होती.गेल्या वर्षी म्हणजे २०१२ मध्ये जवळजवळ साठसत्तर रोपे आणली होती. त्यातील फक्त एकदोन रोपे (मोफत देत असूनही) एकदोघांनी नेली. तो अनुभव जमेला घेऊन यंदा फक्त पंधरा रोपे प्लॅस्टीक पिशवीतून न आणता लहान लहान मडक्यांतून व कुंडीतून आणली होती. मोफत रोपे दिली जातील असे सांगितले होते, लिहूनही ठेवले होते.
दि.७ ला अनेक लोक येऊन गेले. एकानेही रोपासंदर्भात विचारले नाही किंवा त्याकडे पाहिलेही नाही. दि.८ ला ग्रीन फौंडेशन, नाशिक यांच्या स्टॉलवर आलो. श्री.सागर जोशी (मो.९८२२२०७००३) यांची गाठ पडली. `माझ्याकडील रोपे कुणी नेत नाही, आपल्याकडे ती जातील का?' अशी चर्चा केली. त्यांनी लगेच होकार दिला. माझ्या स्टॉलवरील सर्व रोपे ते घेऊन गेले. दि.९ ला आमची गाठ पडल्यावर त्यांनी सांगितलं की, सर्व रोपं आम्ही योग्य लोकांना वाटप केली. मला आनंद झाला.नजरचुकीने माझ्या टेबलाखाली दोन रोपे औदुंबराचे आणि दुसरे रामफळाचे राहिले होते. थोडे पाणी घालून मी त्यांना टवटवीत केले.
दि.९ ला सायंकाळी समारोपाचा कार्यक्रम झाला. सर्व स्टॉलची आवराआवर होऊ लागली. आम्हीही निघण्याच्या तयारीत होतो. सामानाशेजारी ती दोन रोपे होती. रोपे पाहून सात-आठ वर्षाच्या दोन मुली धावत धावत आल्या. एकीने विचारले, ``काका, रोपं केवढ्याला?'' मी म्हटलं, ``मोफत!'' त्यांचा विश्वासच बसेना. त्या एकमेकींकडे पाहू लागल्या. मी त्यांना म्हणालो, ``मी रोपे फुकट देणार आहे. रोपे घेऊन जा. रोज पाणी घाला आणि त्यांना जगवा.'' दोघींनी रोपे घेतली. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडत होता. तेवढ्यात त्यांचे आईवडील आले. मुलींनी आईबाबांना सांगितले, ``काकांनी आम्हाला रोपे तशीच दिली आहेत!'' मुली रोपात हरवल्या होत्या.
``अगं, काकांना थँक्स म्हण, नमस्कार कर.'' दोघींनी नमस्कार केला. मी त्या लहान मुलींत हरवून गेलो. त्या केव्हा गेल्या कळलेच नाही. त्यांचं नाव, गाव, फोन मला मिळाले नाही पण त्यांनी दिलेला आनंद माझ्या हृदयात भरून राहिला. तीन चार वर्षांत बरेच मिळाले, पण या प्रदर्शनात `केले पावलो' अशी अनुभूती मिळाली.
- शाम रघुनाथ साखरे, मिरज
मोबा. ९८५०३८०५३८  

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन