Skip to main content

16Dec.2013

स्वदेशीच्या चळवळीनं प्रेरित होऊन महाराष्ट्नतील अनेक तरुणांनी कारखानदारी चालू केली. त्यात ओगलेवाडीसारख्या छोट्या गावात `स्टील विंडोज' उद्योग `डी.एन.म्हैसकर आणि कंपनी'नं सर्वप्रथम चालू केला.या कारखान्याचे प्रवर्तक दामोदर नृसिंह म्हैसकर यांचा जन्म जोतिबाचे डोंगरावर २५ डिसेंबर १९०५ रोजी झाला.
एक होता उद्योजक
दामोदर नृसिंह म्हैसकर
त्यांचे वडील नृसिंह रामचंद्र (नरसोपंत) कीर्तनकार होते. नरसोपंतांचे सासरे प्रभाकरपंत ओगले. दामोदरचं आजोळ कोल्हापुरातच असल्यानं मामा लोकांकडे ओढा होता. त्यांना आठ मामा होते. व्यंकटराव व अवधूतराव यांचं नातं मित्रासारखं होतं. थोरले मामा गुरुनाथपंत व धाकटे आत्मारामपंत ओगले यांनी २५/१/१९१६ रोजी आैंध संस्थानातील विरवड्याच्या माळावर (कऱ्हाडजवळ) काच कारखाना चालू केला. दामोदरपंत १९२४ साली ओगलेवाडीत काच कारखान्यात रुजू झाले. इंजिनियरिंग कामाची आवड निर्माण झाली. गुरुनाथपंत जर्मनीस गेले होते. प्रभाकर कंदिल बनवण्याची यंत्रसामग्री तयार होईल तशी ते इकडे पाठवत होते. यंत्र उभारणीचा अनुभव दामोनर म्हैसकरांना श्री.आर.एन.लेले या तज्ज्ञ इंजिनियरच्या हाताखाली मिळाला. हे लेले पुढे `टाटा'कडं जमशेदपूरला एस्टीमेटींग इंजिनियर म्हणून गेले.
सिंधू नदीवर धरण बांधण्याचं काम `सक्कर' येथे चालू होतं. आर.एन.लेले यांचेबरोबर १९२७ साली कराचीला गेले.  घण मारण्यापासून कामाला सुरुवात झाली. भरपूर अनुभव घेत त्यांनी वेल्डिंग टेक्नॉलॉजीवर विशेष प्रभुत्व मिळवलं. सक्करचं धरण पूर्ण झाल्यावर १९३३ साली ते ओगलेवाडीला आले. त्यांनी `डी.एन.म्हैसकर आणि कंपनी' या नावाचा उद्योग चालू केला. त्यावेळी स्टील विंडोज, डोअर्स भारतात तयार होत नव्हते. रोज रु.१००/१५० चा माल तयार होत होता.  पुणे येथील कॉमनवेल्थ बिल्डिंग, बिशप चर्च, होळकर पंपिंग स्टेशन यांसाठी त्यांनी केलेलं काम आजही पाहता येतं.
ओगले काच कारखान्याच्या शेडस् त्यांनी स्वत: डिझाईन करून बनवून दिल्या होत्या. त्यातील पोर्टल ट्न्स ४२ फूट स्पॅन पर्यंतच्या होत्या. कारखान्यासाठी लागणारी ग्लास ब्लोइंर्ग, स्मेल्टर, क्रशर, १०० फूट उंचीच्या चिमण्या सर्व तऱ्हेची मशिनरी तयार करण्याचं काम त्यांनी केलं होतं.
आैंध येथील टेकडीवरील इमारतीसाठी कैच्या, दरवाजे इत्यादीचं काम १९३६ साली केलं. सामानाची वाहतूक बैलगाडीतून करून ते टेकडीवर चढवून इरेक्शन पूर्ण करून दिलं होतं. १९३७ मध्ये वेल्डिंगचं तंत्रज्ञान वापरून किर्लोस्करवाडी फौंड्नीची इमारत सर्वप्रथम त्यांनी उभी करून दिली. म्हैसूर ग्लास, त्रावणकोर, सिलोन येथे काच कारखान्याला लागणारी मशिनरी पुरविली होती.
१९३९ साली कोल गॅस प्लँट त्यांनी तयार केला. मिलिटरी बरॅक्स उभारणीसाठी अर्धवर्तुळाकार पन्हाळी पत्र्यांची मोठी ऑर्डर मिळाली. यासाठी बेंडीग मशिन स्वत: अण्णांनी बनवलं होतं. १९४४-४५ च्या सुमारास त्यांनी स्वत:ची फौंड्नी चालू केली. स्वत:चं उत्पादन असावं म्हणून लाँड्नीसेट, बॉयलरची निर्मिती चालू केली.
क्युपोलामधून एक टनाचा जॉब काढून दाखवून ते कौतुकास पात्र ठरले. १९४८ मध्येच गोबर गॅस प्लँट तयार केला होता. फिरते संडास तयार केले. त्यांनी `कार्बाईड टिप्स' तयार करण्याचा आराखडा केला, पण प्रकल्पास अर्थसाहाय्य करणाऱ्या व्यक्तीचं विमान अपघातात निधन झालं आणि ती योजना कागदावरच राहिली.
१९५४ पासून कोयना धरणाच्या कामास सुरुवात झाली. गेजिंग स्टेशन उभारण्याचं काम त्यांच्याकडं सोपविण्यात आलं. नदीच्या दोन्ही तीरावर एक एक पिलर दोन बाजूस विंच, वायर रोपवरील पाळणा इत्यादी सर्व काम त्यांनी पूर्ण केलं. सक्करच्या धरणावरील कामाचा अनुभव त्यांच्या गाठी होता. कोयना धरणाचे सुपरिंटेंडींग इंजिनियर सल्ला घेण्यासाठी अण्णांना घेऊन जात असत. कऱ्हाडमधील `सप्तर्षी'मध्ये डी. एन. म्हैसकर यांचा समावेश होता.
१९५६ मध्ये कऱ्हाडला जी.ए.सर्कस आली होती. मालकाला २० फूट डायमीटरचा मृत्युगोल करून हवा होता. तो त्यांनी चोवीस भागात (पाकळयात) तयार केला. मृत्यूगोलात सायकल चालवणारे मासूमखान यांनी चाचणी घेतली. त्यानंतर मासूमखान इतके आनंदित झाले की `असा मृत्यूगोल मुंबई, कलकत्ता येथील कारखानदार करू शकणार नाहीत' असा अभिप्राय दिला.
२० जानेवारी १९६२ रोजी त्यांचं अकस्मात निधन झालं. ही व्यक्ती पन्नास वर्षे आधी जन्मास आली होती असं वाटतं. आर्थिक किंवा सरकारी पाठबळ नसताना त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर करून दाखवलेली कामगिरी अचंबित करणारी आहे.
- आनंद म्हैसकर, गजानन सोसा.(प.)
स्टेशन रस्ता, कराड ४१५११०
दूरध्वनी - ०२१६४/२७१०३१


आचरणस्वैरांना कायदा कसला!
कायदेमंडळ - कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ यांचे मिळून शासन किंवा सरकार होते. याच व्यवस्थेचा एक चौथा भाग नसतो, पण मानला जातो, तो म्हणजे प्रसारमाध्यमेे; त्यांनी जागरण आणि लोकशिक्षण यांवर भर द्यावा ही अपेक्षा असते. या सर्वांच्या धोरणांतून व कृतींतून समाजात स्वस्थता, आश्वस्तता राहायला हवी. त्यासाठी उत्तमाचेे संवर्धन, अनिष्टाचे हरण व्हायला हवे. एरवी सभ्यप्रतिष्ठित समाजाने अनिष्ट म्हणून जे काही ठरविलेले असते, त्याचीसुद्धा गरज समाजातल्या कोण्या ना कोण्या वर्गाला असतेच. ज्या काही बाबी अनिष्ट म्हणून निषेधाच्या मानल्या जातात, त्याही पूर्णत: नष्ट होत नाहीत, करण्याचे कारणही नसते. दारू पिणे चांगले की वाईट, याचे उत्तर निश्चित आहे. पण दारुबंदी टिकू शकत नाही हे वास्तव आहे. तथापि `ज्याला प्यायची तो पिऊदे' इतकेच म्हणून सोडून दिले तर ठीक. जेव्हा दारू न पिणारा उगीच थयथयाट करू लागतो, अथवा दारू पिणारा झिंगूनही स्वत:चे उच्चस्थान इतरांवर रोवू पाहतो, तेव्हा दोन्ही बाजू दारूसारख्याच तापून फसफसून येतात. तत्वचिंतनात्मक विचारांची चर्चा गरम झाली तर ती दुधासारखी खरपूस भाजून दाट साय येते. `दुग्धं दग्धं पुनरपिपुन:कांचनंकान्तवर्र्णम्' असे म्हणतात. समाज म्हणून एकत्त्वधारणेसाठी जी गृहीतके असतात, त्यांच्या व्यतिरिक्त एका सामाजिक दिशेला जे विपरित घडतच असते ते किती, कसे चघळावे?

समलिंगी मौजमजेबद्दल गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर जी घमासान चालली, त्यात `महान' नेत्यांपासून `आघाडी'च्या वृत्तपत्रांपर्यंत सर्वांनी भाग घेतला. `न्याया'लयाने हा प्रकार अपराध मानला, तर थोरथोर पुरोगाम्यांनी ते व्यक्तिस्वातंत्र्यावर अतिक्रमण म्हटले. प्रसारमाध्यमांना त्यात `सनातन्यांचे व तथाकथित संस्कृतिरक्षकांचे फावेल' असा फारच गंभीर धोका दिसला. देशासमोरचे बाकी सर्वच प्रश्न आता केजरीवाल सोडविणार असल्यामुळे सरकार व समाजाच्या सर्व अंगांनी हा प्रश्न ऐरणीवर घेतल्याचे दिसते.

दारू, मावा-गुटखा, परस्त्रीगमन, किंवा यापुढच्या पायऱ्यांची बेभानता ही काहींना सभ्यता वाटत असेल, तर काहींना नीतिभ्रष्ट वाटत असेल. परंतु त्या दोन्हींची मर्यादा असते. मुख्यत: या गोष्टी कायद्याने किंवा सरकारने नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करून समाजातील स्वस्थता व स्वास्थ्य सांभाळायचे असते. सरकार तर एका बाजूला दारू उत्पादनास चालना देते तर दुसऱ्या बाजूस दारू पिण्यास कागदी अटकाव करते. न्यायालयाच्या निर्णयाचा परिणाम समलिंगी संबंधात सरसकट कसा काय होऊ शकणार? ती गोष्ट उघडपणे थोडीच होते? शिक्षेच्या कैदेत राहूनही ती घडू शकेल. विदेशातील समाजात या गोष्टी उघड चालतात म्हणून त्या पुरोगामी नव्हेत, आणि इथे कायद्याने त्या रोखल्या म्हणून त्या बंदच होतील असे नाही. माणसे बेकायदा पैसे खातात, तिथे `यात' शेण खाणे फार अवघड ते काय? त्याच्या समर्थनार्थ कुणी देवादिकांची वा महाभारतापासूनची साक्ष देण्याचे कारण नाही. स्वैर भंपकपणा हासुद्धा मनुष्याची सहजात प्रवृत्ती असतेच. तथापि ती रोखून, विवेकनिष्ठेने सन्मार्गी राहावे, याला मनुष्यत्व मानले जाते; पशुतुल्य स्वैरता करण्याला नव्हे! नीतिमूल्ये सर्वकालीन असतात, ती सार्वत्रिक असतात. परंतु सर्वाचरणी असतीलच असे नव्हे. समलिंगींना मुक्त विहरता यावे इतके स्वातंत्र्य द्यायचे धाडस पुरोगाम्यांना होणार नाही. ती जरी काही माणसांची अमानुष गरज असली तरी त्यांस ही मान्यता देता येत नाही. भाद्रपदातील सारमेयांप्रमाणे उद्या हे स्वातंत्र्यवादी गल्लीत गोंधळ घालू लागले तर त्याला मुक्त मानवांचा स्वातंत्र्यआविष्कार म्हणायचा काय?

एकूणातच हे विषय चघळले जाण्याचे वैषम्य वाटते. त्या वैषम्यापोटीच इथे मांडून चघळायचे नशिबी येते. न्यायालयाने अशा नरपुंगवांच्या सोयीसाठी आपल्या निर्णयात बदल करेपर्यंत ते थांबणारच असतील तर, त्यांची कणव न्यायालयाने मानवतेच्या करुणेतून करायला हरकत नाही. पण उद्या कायदा बदलला तर त्या स्वातंत्र्याचा उपभोग आपल्यातील कोणी घेऊ शकतील ही शक्यता वाटत नाही. मुद्दा इतकाच की, न्यायालयाच्या असल्या निर्णयावर आपल्या प्रतिगामित्त्वाचे वा पुरोगामित्त्वाचे वर्तन अवलंबून असत नाही. कायद्याने थुंकायला बंदी केली तरी फरक पडला नाही. पश्चिमेकडे जाणारे तांबूलभक्षक सोयीचे आडोसे बघून गलिच्छ पिंक टाकतात, आणि इथे येऊन त्याबद्दल फुशारकी मारतात. त्यांच्या पुरोगामी स्वातंत्र्यप्रेमास वंदन करून हा विषय संपवावा हे ठीक. थुंकणे हे कमी अनैतिक आणि समलिंगी हे जास्त अनैतिक असे काही मानण्याचे कारण नाही. उलट समलिंगी-भिन्नलिंगी अथवा अन्य काही तपश्चरणे त्या त्या व्यक्तीपुरती असली तरी, गलिच्छ पिंका इतरांच्या आरोग्याला बाधक असतात, म्हणून तेच जास्त अनैतिक होय. मग कायदा काय सांगतो याचा विचार न करता रस्ते-भिंती रंगविणाऱ्यांनी व्यक्तिस्वातंत्र्याचा बाऊ केला नाही! ते लाळ घोटत मुकाट राहिले किंवा बंदीकायद्यावर थुंकून मोकळे झाले.

सरकारने कायदे करावेत, त्याचा अंमल करवा, हे एका निर्बंधापुरते सभ्य समाजाला युक्त असते. पण ती सामाजिक वर्तणूक किती अनिर्बंध करायची हे सामाजिक प्रौढता, सभ्यता, संस्कृती यांवर अवलंबून असते. ते सरकारचे काम नव्हे, समाजाचे - म्हणून आपल्या सर्वांचे व्यक्तिश:, कौटुंबिक, व सामुदायिक काम आहे.

ज्यांना काही कर्तबगारीची परंपरा आहे, शुचिष्मंत वर्तमान आहे आणि भविष्याबद्दल काही उत्तरदायित्त्व आहे अशांना न्यायालयाच्या अशा निर्णयामुळे दिलासा मिळण्याचा प्रश्न नाही किंवा तसल्या व्यक्तिस्वातंत्र्यासाठी छाती बडवून घेण्याचेही कारण नाही. कारण हा विषय इतका सर्वगामी सामाजिक होऊ नये यातच त्यांच्या संस्कारांचा शहाणपणा आहे. त्याचे भान नसेल तर आपला कायदा फारसा लागू होत नाही, बेभान वागणाऱ्यांनी वृथा चिंता करू नये.
***

गणिताला हे उत्तर !
शिक्षण क्षेत्रातील काही विद्वान एका प्राथमिक शाळेत गेले व त्यांनी मुलांना एक गणित घातले. `दुधाचा दर लिटरला १० रुपये. एका शेतकऱ्याची एक म्हैस दिवसाला ७ लिटर दूध देई. तो दूध विकून चरितार्थ चालवी. दुसऱ्या एका शेतकऱ्याकडे तेवढेच व तसलेच दूध देणारी म्हैस होती. हे दूध दाट आहे, तेव्हा जास्त फायदा मिळविण्यासाठी तो दुधात २ लिटर पाणी मिसळत असे. तर मग दुसऱ्या शेतकऱ्याला किती जास्त फायदा होत होता?'
वर्गातील मुले गणित सोडवू लागली. वर्गशिक्षकांना मुलांच्या क्षमतेबाबत विश्वास होता. बऱ्याचशा मुलांनी गणित बरोबर सोडविले. विद्वानांना समाधान वाटले. काही दिवसानंतर तेच विद्वान जपानला गेले होते. तेथे एका शाळेत गेले असता, एका वर्गातील मुलांना हेच गणित घातले. आपल्या देशातील मुलांची व जपानी मुलांची बुद्धिमत्ता याची तुलना करावी हा विद्वानांचा हेतू. त्यांची कल्पना की, गणित सोडवायला मुलांना चार-पाच मिनिटे तरी लागतील, परंतु सर्व ४० मुलांनी केवळ पाच-दहा सेकंदात वह्या खाली ठेवल्या. विद्वानांना जरा आश्चर्य वाटले, त्यांनी त्या सर्व वह्या तपासल्या. सर्व विद्यार्थ्यांनी स्वतंत्रपणे एकच उत्तर लिहिले होते, ते म्हणजे `फाशी'. आपल्या शाळेतील मुलांच्या, शिक्षकांच्या किंवा तुमच्या मनात हे उत्तर आले होते का? मला तरी हे उत्तर सुचले नाही. एकाची कमाई ७० व दुसऱ्याची त्याच दुधावर ९० म्हणजे किती टक्के फायदा; हाच विचार माझ्या मनात आला! एकमुखाने `फाशी' हे उत्तर लहान मुलांनी द्यावे हे कल्पनेतच येऊ शकत नाही.
- दिलीप वा.आपटेे
लोकमान्य सोसा., पंढरपूर रोड,मिरज
फोन : ९८६००३२०८२

जमखंडी संस्थानचे पटवर्धन
पश्चिम घाटातील पर्जन्यछायेच्या कुशीत वनराईने आवृत्त असे जमखंडी. महाराष्ट्नच्या सीमेजवळ मिरज व सांगली शहरे. हा भूभाग कृष्णेच्या खोऱ्यात येतो. चालुक्यांच्या राजवटीत येथील वनराईत जंबुकेश्वर मंदिराची स्थापना झाली. जम्मु अर्थात जांभूळ यावरून `जमखंडी' हे नाव शहरास प्राप्त झाले. चालुक्यांच्या पतनानंतर आदिलशाही, मराठेशाही व पेशवाई अस्तित्वात आल्या. पुणे ही पेशव्यांची राजधानी झाली. चित्पावनांनी आपल्या पराक्रमाने दक्षिण भारतावर मराठेशाहीचा पगडा बसविला.
पटवर्धनांचे मूळपुरुष हरभट हे सत्पुरुष इचलकरंजीचे राजपुरोहित झाले. नंतर संन्यास घेऊन त्यांनी खूप तीर्थयात्रा केल्या. या थोर पुरुषाची समाधी महानगरपालिकेसमोर आेंकारेश्वर मंदिराजवळ असून आजही बऱ्याच लोकांचे ते श्रद्धा केंद्र आहे. त्यांच्या तीन मुलांनी आपल्या पराक्रम व कौशल्याने पेशवाईकडून अनुक्रमे मिरज, सांगली व कुरुंदवाड ही जहागीर मिळविली. सरतेशेवटी जमखंडी हे ब्रिटिश अमदानीतील वैभवशाली व दक्षिणेतील संपन्न राज्य ठरले.
१७९९ ते १८४० या कालखंडात गोपाळराव पटवर्धन यांनी राज्य केले. त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र रामचंद्र यांनी (१८४१ ते १८९७) वडिलांची गादी कौशल्याने सांभाळून राजकीय अनुकूलतेच्या दृष्टीने आपली राजधानी जमखंडीजवळ रामतीर्थ येथे स्थलांतरित केली. त्यांनी सुंदर राजवाडा, शाळा व अश्वरोहींसाठी पोलोग्राऊंड तयार केले. त्यांनी परशुराम उर्फ भाऊसाहेब यास दत्तक घेतले, त्यांनी १९०३ मध्ये सूत्रे हाती घेऊन जमखंडी संस्थानचे तिसरे पटवर्धन राजे म्हणविले. ब्रिटिश राजवटीतील कोल्हापूर येथे त्यांनी शिक्षण घेऊन महाराणीसमवेत देशविदेशाचा दौरा केला व त्या अनुभवावर जनहिताची बरीच कामे केली.
भाऊसाहेबांचे कौशल्य, पराक्रम व मुत्सद्देगिरी लक्षात घेऊन ७ व्या एडवर्डने त्यांना `नाईट (ज्ञपळसहीं) कमांडर' ही पदवी बहाल केली. दुसऱ्या महायुद्धात ते फ्रान्स व मेसोपोटिमियास गेले. त्यांना रेडक्रॉसच्या देखरेखीसाठी पाठविण्यात आले. नंतर ते मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड विलिंग्डनचे सहायक अधिकारी (अऊउ) बनले. त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव शंकरराव उर्फ अप्पासाहेब वारसदार झाले. मदांध झालेल्या हत्तीमुळे त्यांचे निधन झाले. परशुराम रामचंद्र हे पाचवे व शेवटचे पटवर्धन राजे झाले. त्यांनी काळाची पावले ओळखून, आपले संस्थान भारतीय संघराज्यात विलीन होण्याचा पहिला मान मिळविला.
राजे परशुरामराव यांची बहीण डॉ.इंदुमती पटवर्धन या अत्यंत मेधावी व असाधारण व्यक्तित्त्व असलेल्या राजकन्या होत्या. (कार्यकाल १९२६ - १९९९) त्यांनी कोल्हापूर येथे वैद्यकीय शिक्षण घेऊन प्राविण्य मिळविले. राजवाड्यातील सुखोपभोगाचा त्याग करून त्यांनी १९४२ मध्ये साबरमती येथे स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. नंतर इटालियन शिक्षणतज्ज्ञ मॅडम मारिया माँटेसरी यांच्याकडून ट्न्ेिंनग घेऊन मुंबई कोलंबिया हायस्कूलमध्ये सेवा केली. त्यानंतर त्यांनी इंडियन रेडक्रॉसमध्ये दुसऱ्या महायुद्धात बर्मा फ्रंटवर घायाळांची निर्भयपणे सेवा केली. आग्नेय एशियात काम करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या.
भारताची फाळणी झाल्यावर त्यांनी निर्वासितांच्या पुनर्वसनासाठी, महिलांसाठी फिरोजपूर येथे लेडी मार्टिनसमेवत खूप परिश्रम केले. त्यांना महाराष्ट्नने दलितमित्र व कर्नाटकाने ताम्रपत्र प्रशस्ती देऊन गौरवान्वित केले. त्यांनी पुणे शहरापासून थोड्या अंतरावर कुष्ठरोग्यांसाठी आनंदग्रामची स्थापना केली.
संत, तत्त्वज्ञानी, समाजसुधारक गुरुदेव रानडे यांचा जन्म जमखंडीमध्ये १९८८ मध्ये झाला. त्यांचा आदर करणारे खूप लोक आहेत. त्यांनी मुंबई विश्वविद्यालयाच्या मॅटि्न्क परीक्षेत दुसरे स्थान मिळविले. जमखंडीच्या महाराजांनी संपूर्ण शहरात मिठाई वाटली. गुुरुदेव रानडेंनी पौर्वात्य व पाश्चात्य तत्वज्ञानाचा अभ्यास करून उपनिषदावर एक ग्रंथ प्रकाशित केला. काही काळ त्यांनी अलाहाबाद विश्वविद्यालयात अध्यापन केले. १९२४ मध्ये त्यांनी संन्यास घेतला, निंबाळ येथे आश्रमाची स्थापना केली. सन १९५७ मध्ये इह यात्रा संपविली.
डॉ.बसप्पा दानप्पा जत्ती हे जमखंडीचे. ते पटवर्धनांच्या राज्यात मंत्री होते. नंतर मुंबई सरकारच्या मुरारजी मंत्रीमंडळात रुजू झाले. १९५८ ते १९६२ म्हैसूर राज्याचे मुख्यमंत्री झाले. ते भारताचे उपराष्ट्न्पती आणि पाच महिने तात्पुरते (अॅक्टींग) राष्ट्न्पती पदापर्यंत पोचले. (१९७७)
आता जमखंडी हे गूळ व साखर उत्पादनाचे केंद्र बनले आहे. पटवर्धनांच्या राजवाड्याचे आता विद्यालयात रूपांतर झाले असून, पटवर्धन कुटुंबीय पुणे शहरात वास्तव्य करीत आहे.
(आधार आणि आभार - डे हेराल्ड/२२-१०-२०१३)
- प्रा.एस.के.पटवर्धन, गुलबर्गा
फोन : ०८४७२-२७५४५२ मो.०९८४५४९३२८३


एका सैनिकाची जीवनगाथा
वीरचक्र सन्मानित कै.गजानन वेलणकर
सांगलीच्या गावभागातील भावे इंजि. गल्लीमधील वेलणकर औषधी कारखान्याच्या परिसरात वैद्य बाळकृष्णपंत वेलणकर व राधाबाई हे दांपत्य राहायचे. त्यांचा मुलगा गजानन माझा ज्येष्ठ बंधू. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पार पडले आणि शरीरसामर्थ्य प्राप्त झाले आदिबलभीम व्यायाम शाळेमधून! नियमित व्यायाम, सायकलिंग, कृष्णा नदीत पोहणे इत्यादींमध्ये भरीव प्रगती केलेल्या गजाननने एन.सी.सी. जॉईन केली. अनेक गौरवपदके मिळविली आणि आवडीनुसार सैन्यात सामील झाला. सेकंड लेफ्टनंट हे पद प्राप्त झाले.
सन १९६२ चे चीनचे युद्ध, त्यानंतर १९६५ चे पाकिस्ताने युद्ध आणि १९७१ बांगला मुक्तिसंग्राममध्ये शौर्य गाजविले. बांगला देश लढाईमध्ये बॉम्बचे ४० तुकडे शरीरात घुसले, पण गजाननाने ध्वज खाली न टेकवता अपेक्षित ठिकाणी आपला तिरंगा फडकविला आणि तो बेशुद्ध होऊन पडला. १८ तासांनी त्याला वैद्यकीय मदत मिळाली. पुढे ऑपरेशन होऊन बॉम्बचे तुकडे बाहेर काढले. या पराक्रमाची नोंद दरबारी झाली. राष्ट्न्पतींच्या हस्ते गजानन वेलणकर यांना वीरचक्र मिळाले आणि वेलणकर कुटुंबियांचीच नव्हे तर सांगलीकरांची मान ताठ झाली.
यानंतर गजाननाचे निवृत्ती जीवन सुरू झाले. मुंबईजवळ मीरा रोड येथे फ्लॅट मिळाला. बोईसर ता.दहिसरपासून १० किमी. अंतरावर ५ एकर शेतजमीन मिळाली. सिक्युरिटी ऑफीसर म्हणून नोकरीही करता आली. या गजाननाने शेतीमध्ये आयुर्वेदीय वनस्पतींची लागवड करून यशस्वी केली.
सैनिकी निवृत्तीनंतर त्याचे शुभकार्य झाले. पत्नी, मुलगा, सून, नातवंडे अशा परिवारामध्ये आनंदी जीवन व्यतीत करणाऱ्या गजाननाला १९/११/२०१३ रोजी स्वर्गाचे मंदिर उभारण्याचा निरोप आला. शासकीय इतमानाने निरोप देण्यात आला, अहो भाग्यम!
- जगन्नाथ बाळकृष्ण वेलणकर,
५, श्री अपार्ट.,१२०३२, शिवाजीनगर
झुलेलाल चौक, सांगली
मोबा.९८२२८७२४०८,
फोन:०२३३-२५६११६७२

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन