Skip to main content

mazya anubhavatil brahmin

माझ्या अनुुभवातील ब्राह्मण
 मी रयत शिक्षण संस्थेत शिकत होतो. तो काळ १९५६-६४ चा. या काळात जाती व्यवस्था मजबूत होती. असे असूनही महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे कार्य प्रसार पावत होते. या चळवळीस ब्राह्मण-ब्राह्मणेतर स्वरूप होते. अशा काळात रयत संस्थेचे अनुदान मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी स्थगित केले होते. ते ब्राह्मण असल्याने मोठा गदारोळ झाला. ब्राह्मण समाजाविषयी चीड जन्माला आली. मीसुद्धा ब्राह्मणांचा कमालीचा द्वेष करू लागलो. किंबहुना या विचाराच्या अग्रभागी राहिलो होतो. पण त्या सगळयाचा फेरविचार करावा असे प्रसंग घडले.
 विटे येथील वाडा. माडीवर माझी खोली होती. शेजारच्या खोलीत सुधाकर कोडगुले रहात. एसटीमध्ये क्लार्क होते. पाचपंचवीस जण एकत्र येत होते. गप्पा आणि चर्चा बामणावर, नको त्या शब्दात, चढाओढीने सुरू रहायची. कोडगुले असायचे. रंगाने काळसर, मजबूत देह आणि राकट आवाज. यामुळे `आपल्यापैकीच' अशी समजूत होती. टवाळीच्या शेवटी ते शांतपणे म्हणायचे, `बामणावर तुमचा एवढा राग का?' मी एक दिवशी विचारले, `तुम्ही ब्राह्मण आहात का?' तेव्हा थंडपणे म्हणाले, `होय! मी बामणच आहे.' मी सर्दच झालो. आम्ही वाटेल तसे बोलत असू! त्यांचा संयम, सहनशीलता मला अंतर्मुख करावयास लावणारी घटना ठरली.
 माझे एक मित्र पवार हे रयतमध्ये सिन्नर तालुक्यात शिक्षक होते. त्यांना टायफाईडचा ताप आला होता. आम्हास पोहोचण्यास दोन आठवडे गेले. ते एका ब्राह्मण कुटुंबाच्या घरी रहात होते. ताप कमी झाला होता. या पंधरा दिवसात त्या कुटुंबाने रुग्णाला खाटेवरून उतरू दिले नाही. संडास, लघवी जागेवरच. अशी काळजी घरीदेखील कोणी घेणार नाही. ब्राह्मण कुटुंबाने जी सेवा केली यातून काय बोध घ्यायचा?
 दोघे ब्राह्मण इंजिनियर होते. ते सोडून पर्यावरण आणि स्वस्त घर निर्मितीचा प्रकल्प राबवत होते. येरळा नदीकाठी माझे गाव आहे. धरणामुळे गाळमाती साचली होती. विटा तयार केल्यास एक उद्योग उभा राहील. या इंजिनियरच्या माहितीचे पंढरपूरजवळ मजूर होते. त्यांच्याकडे घेऊन गेले. मातंग समाजातील झोपडीत रहात असलेली माणसे. अंगदा नावाचा कामगार त्यांच्या परिचयाचा होता. परतीच्या वाटेवर जेवण मिळणार नाही. ते म्हणाले, `अंगदा हे पैसे घे आणि भात कर. दूधभात खाऊन जाऊ.' अर्ध्या तासाने कळकटलेल्या, चेपलेल्या जर्मनच्या थाळीत दूधभात. मी म्हणालो, `मला भूक नाही.' ते मात्र सुखनैव मनाने जेवले. चेहऱ्यावर समाधान. मी स्वत:ला पुरोगामी समजतो, जातीयता मानत नाही असे सांगत असतो. पण एक घास खाण्याचे धाडस मला झाले नाही. हा तर एक ब्राह्मण! काय शिकायचं!
 माझी मुलगी आणि तिचे मूल जगले ते केवळ परांजपे आणि त्यांच्या पत्नीमुळे! त्यांच्या सर्व कुटुंबाने पराकाष्ठा केल्यामुळे. ब्राह्मण कुटुंबच! अनेक अनुभूतींमुळे मी ब्राह्मण जातीचा द्वेष करणे सोडून दिले. त्यांच्यापासून बोध घेणे मला योग्य वाटते. मला पुढे ब्राह्मण जातीतील अनेक मित्र भेटले. निर्व्याज सहकार्य करणारे मित्र भेटल्यामुळे माझे आजचे अस्तित्व आहे. परंपरागत समज होते ते गैरसमज होते.
 प्रत्येक जातीमध्ये सर्वच चांगले आणि सर्वच वाईट असे नाही. ज्ञानेश्वर, एकनाथ ते महात्मा फुले, आंबेडकर इत्यादींच्या कार्याचा मागोवा घेतला असता कालानुरूप बदलास अनुकूलता सर्वाधिक ब्राह्मण जातीमधून दिसून येते. महात्मा फुले यांना लोखंडे, परांजपे, वाळवेकर, भिडे यासारख्या मानवतावादी ब्राह्मणांनी मित्रप्रेम दिले होते. त्यांच्या क्रांतिकार्यास आधार दिला. महात्मा फुले  यांना त्यांच्या जातीनेच बहिष्कृत केले. प्रेतापुढे शिंकाळे सावित्रीबाइंर्ना धरावे लागले. मुलगा यशवंत वारल्यानंतर त्याची पत्नी चंद्रभागा आणि मुलगी सोनी उर्फ लक्ष्मी यांचे जीवन हृदयद्रावक आहे. लक्ष्मी ही बेवारस मृत्यू पावली. चटका लावणाऱ्या या घटना आहेत.
 महाड येथे बहिष्कृत परिषद संघटित करण्यात आली. परिषदेचे अध्यक्षपद डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारले. अनंतराव चित्रे, ग.नी.सहस्रबुद्धे, आर.बी.मोरे, सुरेंद्र तथा नानासाहेब टिपणीस यांनी परिषद संघटित केली. रा.ब.बोले हे आंबेडकरांचे जवळचे मित्र होते. त्यांच्या बिलाचा आधार देऊन तत्कालीन महाड नगरपरिषदेचे अध्यक्ष नानासाहेब टिपणीस यांनी १९ मार्च १९२७ रोजी पाणवठे सर्वांसाठी खुले केले. चवदार तळयावर पाणी पिण्याचा ठराव अनंतराव चित्रे यांनी मांडला. मनुस्मृती जाळण्याचा ठराव बापूसाहेब सहस्रबुद्धे यांनी मांडला. या कामासाठी देवराम विष्णू नाईक, गंगाधार नीळकंठ सहस्रबुद्धे यांनी पुढाकार घेतला. स्पृश्य-अस्पृश्य सहकाऱ्यांसह पाणी पिऊन मानवी हक्काची सनद आंबेडकरांनी घोषित केली. त्यास एकाही ब्राह्मणाने विरोध केला नाही. पण दोन-तीन तासांनी काही कर्मठ लोकांनी लोकांना चिथावले. पाचशे सनातन्यांचा मोर्चा सुखा टिपणावर हल्ला करण्यासाठी गेला होता. पण निधड्या छातीच्या सुखांनी बंदुकीचा बार काढून परतविला. डॉ.आंबेडकरांना बुद्धिवादी ब्राह्मणांनी खंबीरपणे साथ केली. या ऐतिहासिक घटनांकडे दुर्लक्ष करून सनातनी वृत्तीच्या लोकांकडे बोट दाखवणे उचित वाटत नाही.
 फुले-आंबेडकरांनी वर्ण श्रेष्ठत्वाच्या अहंकाराचा नेहमीच कडाडून निषेध केला. त्याविरोधी लढा दिला. मात्र ब्राह्मण जातीच्या कोणाचाही समता स्थापन करण्यास पाठिंबा मिळण्यासारखे असेल तर तो दोघेही घेत असत. त्यांच्या विश्वासू निकटच्या सहकाऱ्यांमध्ये ब्राह्मणांचा समावेश ते निस्संकोचपणे करीत असत. फुले आणि आंबेडकर यांचे आपणच वारस आहोत असे समजणारे आजचे त्यांचे बहुतेक अनुयायी ओळखीत नसले तरी महात्मा फुले आणि डॉ.आंबेडकरांनी त्याचे भान नेहमीच राखलेले आहे. चवदार तळयाच्या सत्याग्रहात `ब्राह्मणांना वर्ज्य करावे' असे पत्र केशवराव जेधे व दिनकरराव जवळकर यांनी लिहिले होते. मात्र आंबेडकरांनी `सर्व जातीच्या स्त्री-पुरुषांनी सहभाग घ्यावा' असे आवाहन केले होते.
 सध्या फुले, आंबेडकर चळवळ म्हटले की ब्राह्मणद्वेष आलाच. असा गैरसमज निर्माण करण्यात व पोसण्यात जसा ब्राह्मणी विरोधकांचा हात आहे तसा काही बहुजन मित्रांनीही त्यास हातभार लावला आहे. दोन्ही गटांचा आपापला स्वार्थ आहे. चळवळीला ब्राह्मणद्वेषी ठरवली की जाती अंताचा व समतेचा गाभा दुर्लक्षित होतो. ही गोष्ट ब्राह्मण विरोधकांना हवीच आहे. चळवळीला ब्राह्मणद्वेषाचे टोक दिले की भोळया बहुजनांची सहानुभूती मिळते. बहुजन या शब्दाचा असा हिकमतीने वापर करून सत्तास्थान प्राप्त करण्याचा हेतू ठेवून बहुजन म्हणवणाऱ्या सामंती जातींना हे ब्राह्मणद्वेषाचे राजकारण फारच फायदेशीर ठरले आहे. सर्वच दोष ब्राह्मणांच्या माथी मारले की आपली पापे धुतली जातात. फुले शाहू आंबेडकरी चळवळ ब्राह्मणद्वेषाची नसून जाती अंताची आणि समता स्थापन करण्याची आहे. त्यांना मदत करणाऱ्यांनी मतभेद ठेवून जाती अंताच्या तत्त्वाला धक्का लागू न देता त्यांनी आपले मित्रप्रेम कायम ठेवले. उलट फुले आंबेडकरांनी ब्राह्मणांवर केलेली आक्रमक, प्रखर टीका ही जाती अंताच्या व मानवतावादाच्या प्रेमापोटी असून ती अभ्यासपूर्ण कृतीतून आलेली आहे याची खात्री ब्राह्मण मित्रांना असल्याने त्यांनीही या टीकेला विरोध केला नाही, उलट समर्थन केले. स्वत:ला डिकास्ट केल्याशिवाय कुणीही ब्राह्मण या चळवळीचा खरा मित्र होऊ शकत नाही. अशी मदत करणाऱ्या ब्राह्मण मित्रांच्या संख्येवरच जाती अंताचे यश-अपयश अवलंबून आहे.
 अशा पार्श्वभूमीवर इस्लांपूर येथे बहुभाषिक ब्राह्मण अधिवेशन झाले. सध्या बहुतेक जातीनिहाय संघटना आणि अधिवेशने होत आहेत. त्यातील मागण्या आणि या अधिवेशनाच्या अपेक्षा यामध्ये मूलभूत स्वरूपाचा फरक जाणवतो. जातीचं राजकारण, अस्तित्वासाठी तेही मोजक्या मंडळींसाठी. ही विघटनाची कृती ठरण्याचा धोका वाटतो. समाजाच्या संख्येवर आणि एकजुटीच्या माध्यमाने काहींना संधी जरूर मिळेल पण त्यासाठी जातीचे अस्तित्व कायम राहील. एकूण समाजाच्या स्थितीत बदल घडणार नाही हे लक्षात घेण्याची गरज आहे. अधिवेशनात ब्राह्मण समाजाच्या समस्यांना गौण स्थान दिले असून देश उभारणीसाठी संघटितपणे काही करता येईल का यास प्राधान्य दिले हे शुभसूचक समजावे असेच आहे. समाजशास्त्रज्ञ डॉ.एम.एन.निवासन यांनी १९५० साली `रिलीजन अमंग दि कुर्ग' या नावाचा ग्रंथ लिहून सिद्धांत मांडला आहे. त्यांचा निष्कर्ष बोलका आहे. ``पाश्चिमात्य संस्कृती आणि भारतीय संस्कृती यांमधून सामाजिक सुधारणा करणारा पर्याय भारतात दिला गेला नाही तर भारतात ५० वर्षांनंतर उपेक्षित जाती-जाती अंत करण्याऐवजी जाती उन्नयन करून सत्ता पादाक्रांत करतील आणि हिंदुत्त्वाचे पुनरुज्जीवन ब्राह्मणांऐवजी बहुजन समाजातील सक्षम जातीच करतील!'' सध्या त्यांच्या या सिद्धांताची अनुभूती सर्वत्र दिसू लागली आहे. याची दखल वेळीच घेण्याची अतिशय गरज आहे. भारत विकसित आणि संघटित, शक्तिशाली करण्यासाठी उपक्रमाचा शोध घेतला जात आहे, हे निश्चितच पथदर्शक वाटते.
***
- भाई संपतराव पवार
परिचय-बलवडीच्या क्रांतिस्मृतीवनाचे प्रवर्तक,
बलवडी (भा.) व्हाया कुंडल (जि.सांगली)
(हा लेख ७ व्या ब्राह्मण अधिवेशनाच्या स्मरणिकेसाठी मिळाला होता. त्या स्मरणिकेवरून...)

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन