Skip to main content

sandriya sheti

सेंद्रीय शेती
शेतातील विविध पिकांवर तरतरी आणि त्यांचे सकस उत्पादन असे दृश्य पिचतच दिसते. शिवाय त्या ठिकाणी गायींचे खिल्लार, फळबागांवर धूर पसरविणारे अग्निहोत्र, दूध-दुभत्यांचे असंख्य प्रकार आणि वनस्पतींचा औषधी वापर हे सर्व पाहिल्यानंतर कुठल्यातरी ऋषी काळातील कृषीची कल्पना करता येते. श्री. जयंत वामन बर्वे यांच्या विटे (जि.सांगली) यांच्या शेतावर तसे प्रयोग प्रत्यक्ष पाहता येतात. हा सर्व शेती व्यवहार आता प्रयोग अवस्थेतून कायमच्या यशस्वी व्यवसायामध्ये स्थिर झाला आहे. पाण्याची कमतरता असूनही एकरी एेंशी टन ऊस नदीकाठच्या बागायतीलाही दुर्मिळ झाला आहे. लगडलेले आंबे किंवा फुलारलेली डाळींबाची झुडपे कोणत्याही किडीची माशी अंगावर बसू देत नाहीत. या सर्वांच्या मुळाशी निसर्गाने दिलेली विविधता आपल्या सामर्थ्याचा ओलावा टिकवून ठेवते आहे. श्री.बर्वे यांचे हे सेंद्रिय शेतीचे तंत्र आता सर्वदूर शेतकऱ्यांच्या सहजपणी आटोक्यात येत आहे. अर्थातच विदेशी रासायनिक खते आणि नाकारलेली कीडनाशके यांच्या वेढ्यात सरकारी यंत्रणा गुंतलेली असल्यामुळे त्यांचाच प्रचार अधिक होत असतो. मात्र खरा शेतकरी तशा फसव्या हरितक्रांतीपासून आता मूळच्या सेंद्रिय शेतीकडे वळू लागला आहे.
 श्री.जयंतराव (बाबा) बर्वे हे उच्च विद्याविभूषित. त्यांचे वडील वकीली करत होते. रा.स्व.संघाचे घर असल्यामुळे कर्तव्यनिष्ठा उपजत होती. बाबांनी सहा वर्षे पुणे येथे प्राध्यापकी केली. आणीबाणीच्या काळात केव्हाही सरकारी पाहुणचाराला जाण्याची शक्यता असल्यामुळे त्यांच्या सांगण्यावरून जयंतराव गावाकडे परत आले आणि आजवर दुर्लक्षित असलेल्या बामणाच्या शेतीमध्ये लक्ष घालू लागले. स्वातंत्र्यानंतर ज्यांच्याकडे शेती कसायला आली त्यांनी रासायनिक वर्षाव आणि अघोरी पाणीपुरवठा यांच्या नादी लागून आपल्या मातीचे मातेरे केले हे त्यांच्या लक्षात आले. तिथंपासूनच त्यांच्या विचारांना वेगळी दिशा मिळाली होती. म्हणून स्वत:च्या शेतीकरिता त्यांनी मूलभूत नैसर्गिक साधन वापराचे प्रयोग सुरू केले.
 आज त्यांच्या शेतीत केवळ गायीचे शेण, मूत्र, दूध आणि काही वनस्पतीजन्य पदार्थ यांचा वापर होत असतो. उदा.डाळींबाच्या मुळाशी गायीचे पाटीभर शेण थापटून ठेवल्यामुळे त्याखालचा ओलावा टिकून राहतो. त्यामुळे बराच काळ पाणी द्यावे लागतच नाही. पंचगव्य फवारणीमुळे झाडाची पाने खूप तजेलदार दिसतात, ती आकाराने मोठी असतात. आंब्याच्या बागेत अग्निहोत्राचा आणि स्तोत्रमंत्राचा चांगला उपयोग होतो आणि ते सर्व काम शेतावरील गडीमाणसेही करतात. हवाबंद केलेल्या लोखंडी पिपाच्या सभोवती गायीचे शेण आणि किरकोळ चगाळा तुंबून ठेवला तर आंघोळीला उपयोगी पडेल असे पाणी गरम होते. त्यासाठी शेतावर राहणाऱ्या कुटुंबाला वेगळी चूल लागत नाही. तिथल्या घरांना सौर ऊर्जा, गोबर गॅस पुरविला आहे. या सर्व प्रयोगांतून मिळालेले उत्पन्न, व इतर परिणाम अचंबित करणारे आहेत.
 बाबांची पुढची पिढी हाती आल्यानंतर त्या मुलांनी खताचा महाप्रचंड कारखाना उभा केला आहे. त्यात सुमारे पाच हजार टन खत दरवर्षी तयार होते. कोकण मराठवाड्यापासून त्यास मोठी मागणी आहे. अनेक परदेशांमध्ये निर्यात केली जाते. देशी पेंड, हळद, कंपोस्टचे खत काही कडधान्यांचा भुसा आणि राख यांचा वापर त्यासाठी केला जातो. शिवाय शेण, गांडूळ खत, कोंबड्यांची विष्ठा हा सर्व कच्चा माल वाहनातून येत असतो. परदेशी शेतकऱ्यांना खताची भुकटी चालत नाही. त्याच्या धुरळयाची आरोग्याला भीती म्हणून त्यांना खताच्या गोळया बनवून द्याव्या लागतात. तशी यंत्रे या कारखान्यात फिरत असतात. पुणे, मुंबई आणि इतर बाजारपेठांच्या सोयीसाठी मध्यवर्ती सातारा येथे कार्यालय आहे. अरब देशातील बडी प्रस्थे या मुलांच्या प्रयोगांनी प्रभावित झाली आहेत आणि त्यांच्याकडे मोठ्या व्यवसायासाठी संधान ठेवून आहेत.
 बाबांच्या जुन्या वाड्याने आता आधुनिक स्वरूप घेतले आहे. चौसोपी बैठकीच्या जागी गोमयाने सारवलेला दिवाणखाना माणसांची वर्दळ पेलतो आहे. स्वयंपाकघरात घरच्या रव्यावर गायीचे तूप आणि देशी गूळ पडत असल्यामुळे दिवाणखान्यावर असणाऱ्या कोणालाही अस्सल शिऱ्याची सुखद संवेदना झाल्याशिवाय रहात नाही. येथील गायीच्या तुपाला अनेक आयुर्वेदाचार्यांकडून मागणी असते. आणि शेजारपाजारी गायीचे ताक न्यायला येताना मोगा लपविण्याचे त्यांना कारणही पडत नाही.
 एकंदरीत हा सर्व व्यवहार भारतीय शेतीतील एक नवी दिशा देणारा ठरणार आहे. कारण केवळ संगणकाच्या आधारावर देश महासत्ता होऊ शकणार नाही हे उघड आहे. त्यास अशा शेतकऱ्यांची जोड मिळाली तर जगातले अनेक प्रश्न खूप सोपे होतील यात शंका नाही.
पत्ता : श्री. जयंत वामन बर्वे
शाश्वत शेती संशोधन संस्था, विटा - ४१५३११
जि. सांगली (फोन : ९४२२६१५८७८)

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्...

Thoughts of Shivajirao Bhosale

२९ जून : २ रा स्मृतिदिन शिक्षण हे जीवनाचे संस्करण       पुणे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी व्यक्त केलेले विचार. या चिंतनाचे, त्यावेळचे दै.तरुण भारतचे मुख्य उपसंपादक विद्याधर ताठे यांनी केलेले संकलन - (संक्षिप्त) आजचा बुद्धिमान विद्यार्थी पूर्वीच्या बुद्धिमान विद्यार्थ्यापेक्षा अधिक जाणता झाला आहे. त्याला जाता-जाता आणि पाहता-पाहता बरेच काही कळू शकते एवढी अनुकूलता निर्माण झाली आहे.  हा सगळा या पिढीच्या भाग्याचा भाग आहे. पण एक भयावह गोष्ट या पिढीच्या वाट्याला आली आहे - भविष्याची अनिश्चिती. ही नको त्या वयात विद्यार्थ्यांच्या वाट्याला आली आहे. एक प्रकारची अस्वस्थता मनात घर करून राहिली आहे. कितीही शिकले तरी पुढे काय या प्रश्नाला नेमके उत्तर नाही. नोकरी मिळेल याची खात्री नाही. व्यवसाय साधेल असा विश्वास नाही. शहरात जागा मिळत नाही, खेड्यात चित्त रमत नाही. घरात प्रेम मिळत नाही, समाजात सुख लाभत नाही. काय करावे ते कळत नाही. पण काहीतरी केल्याशिवाय राहवत नाही.  उभ्या राष्ट्नला एकच एक ब्रीद नसल्यामुळे आणि समाजाल...