Skip to main content

4 December 2017

`आम्ही कुलीनांच्या कन्या....चाफेकळया पानाआड'...
``तुझं माहेरचं आडनाव काय गं?'' मला या वयातही हा प्रश्न कुणी विचारला की झर्रकन डोळयासमोर कितीतरी शब्दचित्रं येतात. आम्ही बायका खरं म्हणजे कितीतरी विषयात सतत गुंतलेल्या असतो. अनंत व्यवधाने सांभाळत स्वत:ला व घरातल्या इतरांना पुढे नेत असतो. जोडीला सारे सांगाती असतातच. अशातच वरचा प्रश्न कुणी विचारला की मागे मागे जायला होते.
`आपटे' कुटुंबामध्ये येणाऱ्या सासुरवाशणी, आपट्यांच्या माहेरवाशणी... स्त्रीमन इथूनतिथून सारखंच, माहेर सासर या बाबतीत हं! २४-२५ वर्षांचा आपला बाडबिस्तरा गुंडाळून नवीन घरी स्थिरावायला जायचं, यात सगळया बाजूने केवढीतरी `स्थित्यंतरे' येतात. पण शेवटी तिचं `माझे घर' असतं. बरोबर आणलेलं काही `स्थावर' सोडून... काही स्वत:चं पण त्यापेक्षा जास्त आई-वडील, आजी-आजोबा, काका-काकू... यांच्याकडून झालेल्या संस्काराचं असतं. आमच्या जमान्यात तरी कुटुंब एकत्र होती. ती सोबत घेऊन आम्ही येत होतो. आता मुली लग्नाबरोबर `इंटरनेट'चे संस्कारही घेऊन येत असतील.
सासर-माहेर या दोन घराण्यांमध्ये फरक असणारच. माणसं, चालीरीती, जागा, परिसर यातला बारीकसारीक फरकसुद्धा लक्षात येण्यासारखा. स्त्रिया सजगपणे हे सारं आत्मसात करतात. काही सोडून देतात, काही वाढवितात. कोकण आणि देशावरच्या, विदर्भ-बडोद्याच्या चालीरीतीत फरक असतो. माझ्या माहेरी तुपाच्या निरांजनाने औक्षण व्हायचे; इकडं  सासूबाई कधी पुरणाच्या आरतीने औक्षण करायच्या. गणपतीत नारळाच्या मोदकांबरोबरच, दुसऱ्या दिवशी सिधुलाडू करायच्या. स्थलमाहात्म्य वेगळं असतं. बरीच वर्षे आम्हाला कोल्हापूरची महालक्ष्मी कुलदैवत वाटायची. नंतर आंबेजोगाई व श्री व्याडेश्वर ही आपट्यांची कुलदैवते आहेत असं समजलं. देव सारे एकच असले, तरी `आपलं' कुलदैवत म्हणून वेगळा महिमा  आहेच. आता माझा मुलगा दरवर्षी कोकणात व्याडेश्वरला व देशावर आंबेजोगाई दर्शनाला जातो.
दोन घराण्यांचा संगम होत असताना कशाचं पारडं वर जाईल, कशाचं खाली येईल, हे सांगता येत नाही. काहीजणी `माझ्या माहेरी असं करायचे' म्हणून सासूची पायमल्ली करत असतील. काहीजणी `हे छान आहे की' म्हणून स्वीकारत असतील. आताचा काळ `अहं'चा आहे. `हम करे सो कायदा' मानणाऱ्या नव्या -जमान्यातल्या सुना कोणाचं बघून... म्हणजे मैत्रिणींचं वा बहिणींच्या सासरचं बघून, नवीन काही आणतात. सासू-सून नात्याची पूर्वापार धारणाच वेगळी असल्याने नव्या मुलींचे योग्य-अयोग्य विचार पटवून घ्यायला लागतातच. धावत्या जीवनशैलीमध्ये नव्या मुलींना वेळही नसतो. त्यामुळे बहुधा `तुमचं चाललंय ते चालूद्या', अशी भावना असते. पण शेवटी त्याही  `आपटे' होतातच!!
बाळ जन्माला आलं की ते कुणाकुणासारखं दिसतंय याची चर्चा लगेच सुरू! आई किंवा बाबा सोडाच, पण अगदी तिकडची आजी-आजोबा, मामा, मावशी... कुणासारखेही ते दिसू शकते किंवा इकडच्या समस्त नातेवाईकांपैकी कुणासारखे तरी दिसते. मोठेपणी ते बदलतं. तरी ती कुणासारखी आहेत हे जाणवतंच. माझा मोठा मुलगा माझ्या माहेरच्या वळणावर, तर धाकटा सासरच्या वळणावर आहे. हा घराण्यातला संकर दृष्यही असतो. याचप्रमाणे अनुवंाशिकतेच्या सिद्धांतानुसार शरीराबरोबर मानसिक जडण-घडण होत असते. अगदी आजारसुद्धा बरोबर येतात. नव्याने प्रगती होत असलेल्या जनुकशास्त्राप्रमाणे अनुवांशिकतेतील `नको' यात थोडाफार बदल घडवून आणता येतो! पण हे पुढचं झालं.
माझं माहेर अलिबाग-नागावचं! वडील, दोन काका हे जुन्या जमान्यातल्या राजकारणातले. (जेव्हा `राजकारण' हा शब्द अपशब्द नव्हता). त्यामुळे घरी सतत समाजमान्य व्यक्तींचा राबता असायचा. एकत्र कुटुंब, उदारमतवादी वातावरणात मोकळेपणाने बालपण गेले. इथे आपट्यांकडे सासरे गांधीवादी, लेखक, प्राध्यापक व उदारमतवादी होते, अत्यंत प्रेमळ व गुणग्राही होते. सासूबाई इंदूताई देखण्या, प्रेमळ होत्या. दोघंही शिक्षणासाठी काम करणारे. कल्याणला `बालकमंदिर' शाळा हे त्या दोघांच्या शिक्षणप्रेमाचं दृश्यरूप. सासरी बालक आणि माहेरी राजकारण. या दोन्हींचा समन्वय साधून मी स्वत: `बाल-कारण' स्वीकारले. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, याचं प्रत्यंतर मला मुलांमुळे मिळालं. मोठा लहानपणी खेळायला पेन कागद घ्यायचा. पुस्तक नेहमी सुलटं धरून चित्रे वाचायचा. तो आज भारतातल्या मोठ्या कंपन्यांमध्ये मॅनेजमेंट ट्न्ेनर म्हणून काम करतो. धाकटा लहानपणी ``क्लू डायवल''(स्क्रू ड्नयव्हर) घेऊन सगळं दुरुस्त करायचा. तो आता एल अँड टी मध्ये इंजिनियर आहे. बारकाईने पाहिलं तर या गोष्टी घराण्यातूनच येतात असं लक्षात येतं. मुलांचा कल ओळखणं महत्वाचं.
`आपटे' कुलामध्ये आम्ही `बाहेरून आलेल्या स्त्रिया'. पण शेवटी कुलविस्तार, कुलसमृद्धी हे स्त्रियांमुळेच होतं ना. शोधायला गेलं तर आपटे मंडळींमध्ये पुरुषांप्रमाणेच स्त्रियाही मोठी कामगिरी करीत आहेत. एकमेव स्त्री कॉरोनर डॉ.वसुधा आपटे  किंवा अभिनेत्री राधिका आपटे, गायिका विभावरी आपटे, गायक अभिनेत्री नयना आपटे ही सहज सुचलेली नावे. काहींना घरचा भक्कम पाठिंबा मिळतो. काहींना झगडावंही लागत असेल. पण स्वत:ला सिद्ध करण्यासाठी आम्ही स्त्रिया अखंड परिश्रम घेत असतो. काही उजेडात येतात. काही मागे राहून कार्यरत असतात. समस्त `आप्त आपटे' परिवाराला याचा रास्त अभिमान व कौतुक असायला हवेच.
आम्हा सासुरवाशिणींप्रमाणेच आपटे कुटुंबात जन्म घेऊन दुसऱ्या घराण्यात लग्न करून गेलेल्या आमच्या `माहेरवाशीणी'...! त्या तर दोन्ही घरांचे नाव उज्ज्वल करीत असतात, अशा अनेक आहेत. त्यांनाही दोन्हीकडचे सहकार्य, कौतुक, अभिमान असायलाच हवा. नव्या-जुन्या रूढी, प्रथा, चालीरीती, विचार याचे संक्रमण, मंथन होऊन चांगलं तेच बाहेर येऊन टिकायला हवं. बदल व्हायला हवाच. पण तो सकारात्मक. `आप्त आपटे' व्यासपीठावर आम्हा स्त्रियांना योग्य तो सहभाग मिळून, अशा बुद्धिवंत कलावंत स्त्रियांमध्ये उत्तरोत्तर वाढ व्हावी ही अपेक्षा आहेच.

-वासंती पुरुषोत्तम आपटे, 
बी-५०२, बाळकृष्ण अपार्ट; टिळक चौक, कल्याण फोन- ९८३३९३९७८२

आरक्षणाचे  रक्षण
गुजरातच्या निवडणुकीच्या निमित्ताने केवळ तिथलेच नव्हे तर साऱ्या देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. भारतीय जनता पक्षाची सत्ता तिथे अनेक वर्षे आहे, आणि त्यांचे काम तुलनेने चांगले आहे, त्यामुळे तिथे पुन्हा तोच पक्ष येआील असा साऱ्यांचा अंदाज आहे. काही तरुणांनी काँग्रेस पक्षाला हाताशी धरून अुघड अुघड जातीय आरक्षणाच्या मुद्यावर आकांड तांडव आरंभले आहे. आिकडे महाराष्ट्नत मराठ्यांनी तर तिकडे अुत्तरेत जाटांनी अनेक भल्याबुऱ्या तऱ्हांनी त्याच कारणासाठी सरकार आणि शक्य तर सारा सामाजिक व्यवहार वेठीला धरलेला असतो. त्या प्रमुख लेाकसमूहांखेरीज धनगर, लिंगायत वगैरे जातीधर्मपंथ अशांनी त्याच मागण्या सुरू केलेल्या आहेत. विधायक कार्य म्हणजे वधूवर सूचक मंडळ चालविणे, आणि आक्रमक तडफेचे कार्य म्हणजे आरक्षणाची मागणी रेटत राहणे. कोणत्याही ज्ञातीधर्माला प्रमुख संघटनकार्य  म्हणायचे झाले तर ते तेवढ्याच स्वरूपाचे अुरले आहे की काय!

भा ज पक्षाची गेल्या दोन तीन वर्षांतील घोडदौड विस्मयकारी आहे, हे तर खरेच. ती होण्याला त्या पक्षाची धोरणे किती कारणीभूत आहेत ठाअूक नाही; परंतु पुरातन काँग्रेस पक्षाचे ढेपाळलेपण हेच जास्त कारण आहे, हे तर अुघड आहे. मोदींसारख्या कर्तबगार तडफेच्या नेत्यासमोर राहुल गांधींसारखा स्पर्धक टिकणे अशक्यच आहे. परंतु काँग्रेस पक्ष पुन्हा अुभा करण्यासाठी त्या पक्षाची मूलभूत विचारसरणी लोकांना  नव्याने जाणवेल अशा आवेशाने लढण्याअैवजी काँग्रेसने गुजरातेतील कालपरवाच्या तरुण मुलांचा आश्रय शोधला हे अधिक क्लेशदायी आहे. त्यातही त्या तरुणांचे कार्य आणि विचार काही रट्निंचाष्तनात्मक आहे असे नव्हे; तर आपल्या समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा अेकमेव कार्यक्रम त्यांच्या राज्याच्या विधिमंडळासाठी त्यंानी पुकारलेला आहे. आणि आश्चर्य म्हणजे कपिल सिब्बल, चिदंबरम, ज्योतिरादित्य शिंदे, अशा धुरीणांना राज्यघटनेतील तरतुदी ठाअूक असूनही त्यांच्या हो ला हो करावे लागत आहे. पन्नास टक्के आरक्षणाचा टप्पा पार केलेला असता, नवी आरक्षणे कशी द्यायची याचे उत्तर दोन्ही बाजूंकडे नाही.

आपल्या स्वातंत्र्यानंतर देशअुभारणीच्या कार्यास सर्वांनी लागावे अशी अपेक्षा साऱ्याच नेत्यांची होती. समाजात विषमता होती, ती लक्षात घेता काही जातीजमातींना आरक्षणाचा आधार देण्याची निश्चितच गरज होती. पण असा आधार कुणालाही देताना तो समाज किंवा व्यक्ती सबळ होण्यास सक्षम होण्यापुरता असला पाहिजे. जसा वंशपरंपरा टिकणारा मानमरातब किंवा सरंजामदारी अयोग्य आहे, तसेच सवलतीही त्याच त्या घटकाला चिरंतन चालू ठेवणे चुकीचे आहे. याचा अर्थ आरक्षणे रद्द करावीत असा नाही, तर ती दुसऱ्याला -ज्याला खरी गरज निर्माण झाली असेल त्याला,- दिली पाहिजेत. सामाजिक अभिसरणामध्ये सतत परिस्थिती खाली वर होत असते. खालचा थर कधी वर येत असतो. कधी संपन्न थर तळाशी जात असतो. त्यानुसार राजकीय धोरणे बदलावी लागतात. निसर्गाची रीतच अशी असते की, त्यात असमानता असते आणि तरीही त्यात समतोल असतो - समन्वय असतो. माणूस त्याच्या स्वार्थासाठी त्याचा तो समतोल बिघडवतो, म्हणून माणसानेच नैसर्गिक तोल सावरण्यासाठी आपली सामाजिक अुत्थानाची योजना करावी लागते. जे घटक समाजाच्या तळाशी गेले असतील त्यांना हात देअून वरती आणण्यासाठी प्रयत्न चालू राहावे लागतात. समुत्कर्ष हे सातत्याने चालणारे काम आहे. म्हणूनच आरक्षण किंवा सामाजिक सवलती सदैव देत राहावे लागते. पण ज्यांना त्या द्यायच्या ते आितरांपेक्षा दुर्बळ असले पाहिजेत. हल्ली त्याविषयीचा निकष असा की जो समाजघटक  संघटित आहे, ताकतीचा आहे, राज्यकर्त्यांना नमवू शकतो त्यानेच आरक्षणासारख्या मागण्या रेटत राहायचे अशी रीत झाली आहे. संघटितपणे शक्ती लावून आंदोलने होतात ती बँकांतील पगारवाढीची होतात, त्यांसही ते सूत्र लागू होते.

हल्ली पुष्कळ ज्ञातींची सभासंमेलने होत असतात. आरक्षणांच्या आंदोलनांतील अेक समज असा करून देण्यात येतो की त्या ज्ञातीवर आितरांनी केलेल्या अन्यायामुळे तो विशिष्ट समाज मागास राहिला. हेच सूत्र लागू करून ब्राह्मण ज्ञातींच्या संमेलनांतूनही हळूच कुठे तरी आरक्षणाची कुजबुजती मागणी अैकू येते. आितर समाजघटकांकडून अन्याय्य दबाव वाढत आहे हे तर साऱ्यांना जाणवतच असते, पण तो दबाव दूर सारून आपल्या सामर्थ्यानिशी दुर्बलांना सबल होण्यास  मदतीसाठी संघटन करणे आिष्ट आहे. तो आदर्श आितरांपुढे ठेवण्याचा प्रयत्न हवा. सारेच आरक्षण मागतात, मग आपण मागे पडू, असले भय बाळगून त्या मागण्यांत आपला सूर मिसळणे कसे बरोबर ठरेल?

प्रत्येक समाजात कुणी हार्दिक पटेल तयार होत राहिला तर काँग्रेससारखा ज्येष्ठ पक्षही त्यास कदाचित मदत करेल  किंवा काही जागा निवडूनही आणेल, पण त्यात कोणतीही तर्कसंगती नाही. अतअेव ती मोहीम टिकणार नाही. धडधडीत अन्याय्य लाभ कुणाला होत राहिला तर आितरांच्या तो डोळयांवर येतो हे आजवरच्या सामाजिक संघर्षांतूनही दिसेल. म्हणूनच आजवर ज्यांना भरपूर लाभ झालेला आहे, त्यांनाच फिरून आरक्षणे किंवा तत्सम फायदे देत राहणे नैसर्गिक न्यायाला धरून होत नाही. ज्यांच्यावर अनंत काळ अन्याय झालेला आहे अशा जाती किंवा धर्माना आरक्षणे देणे योग्य असते; पण त्यांना अशा मदतीचीच सवय लागून अरेरावी येणे समर्थनीय ठरत नाही. सवलती न्याय्य असतात, त्यांचा हक्क  तयार होअू नये.

आपल्या देशात सामाजिक अुतरंडी आहेत हे नाकारण्यात अर्थ नाही. तशा त्या केवळ आपल्याच देशात आहेत असे मुळीच नाही. पश्चिमात्य देश पुढारलेले आहेत हा गैरसमज आहे. तिथे काळे गोरे भेद भरपूर आहेत. मुस्लिम जगात शिया सुन्नींची भांडणे आहेत. प्रत्येक जातीत पोटजातींची भेदभांडणे आहेत. वर्णव्यवस्था कुणी मांडणी करून ती प्रस्थापित केलेली नसते, तर ती अुत्क्रांत होत आलेली असते. ती व्यवसायानुसार असते, अर्थार्जनानुसार असते, प्रदेशानुसार असते, ज्ञानानुसार असते, दिसण्यानुसारही असते.... त्यांचा वंश तयार झाला की मग तो आितरांशी भांडायला सिध्द होतो. मुंबआीत मराठी भाषा टिकण्यासाठीसुध्दा मग अघोषित आरक्षण मागणी सुरू होते.

आरक्षणाने अवास्तव भौतिक फायदे साधत असतील तर ते आरक्षण चूक आहे हा साधा संकेत ठरतो. म्हणूनच केवळ दुर्बलांना मिळणाऱ्या फायद्यावर आपली नजर रोखत आपल्याला तसे लाभ मिळावेत असा हपापा ठेवून केलेल्या आरक्षणासारख्या मागण्या सामाजिक दृष्ट्या कदापि समर्थनीय ठरत नसतात. राजकीय सत्तेच्या सारीपाटावर त्यांना कुणी कसेही समर्थन दिले तरी लोकभावनेस ते मुळीच पटत नाही. कोणाही ज्ञातीने आपले वेगळेपण जपले तरी अंतीमत: ती ज्ञाती विशाल समाजाचा अेक अविभाज्य घटक म्हणूनच नांदली पाहिजे, समाजाशी समरस अेकरूप झाली पाहिजे. संपूर्ण निरपवाद सामाजिक हित हेच त्या ज्ञातीच्या संघटनांचे अुद्दिष्ट असले पाहिजे.

भूगर्भात डोकावणे
आपल्या या पत्रासाठी नरहर गंगाधर यांच्यासंबंधी याच पानावरचा मजकूर वाचत होतो, आणि मला माझ्या वडिलांची तीच वैशिष्ट्ये दिसू लागली. त्यांच्यासोबतच्या आठवणी जाग्या होत गेल्या.
माझ्या वडिलांचा जन्मही १९०० सालचा. १९३४साली ते किर्लोस्करवाडीच्या कारखान्यात नोकरीच्या निमित्ताने आले. शेतीची हौस म्हणून त्यांनी तिथे लवकरच शेती विकत घेतली. आणि वाडीतले सुखवस्तू घर सोडून ते मळयातच राहायला आले. ग्रामीण जीवनाशी समरस झाले. त्यांना भूगर्भातील जलसाठ्यांचा अभ्यास होता. त्या काळात धरणे आणि कालवे, जलसिंचन योजना वगैरे काही नव्हते. विहिरींवर मोजकी बागायती पिके होत असत. सभोवारच्या गावांतून शेतकरी स्वत:च्या पैशातून किंवा सरकारी तगाआी काढून विहीर पाडत असत. त्यांना पाणी दाखविण्याचे काम असायचे.
काही पाणाडे असत, त्यांच्यावर लोकांची श्रध्दा असायची, पण त्यात शास्त्रशुध्दता कमीच. त्यांचा अनुभव आणि ठोकताळयांवर भर असायचा. माणूस पायाळू असेल तर त्याला जमिनीतील पाणी दिसते, असाही समज होता. पायाळू म्हणजे पायाकडून जन्मलेला. कुणाच्या पाठीत कंबरेत लचक भरली तर अशा पायाळू माणसाच्या पायाने त्या जागी तुडवून घेण्याचा अेक अुपाय सांगत. अर्थातच त्याला काही अर्थ नव्हता. माझे वडील तसे पायाळू नव्हते, पण ते विहिरींसाठी पाणी दाखविण्याचे काम करीत, त्यावरून काही लोकांचा तसा समज होता. शिवाय विहीर किंवा पाणसाठा हा ग्रामीण जीवनातील अत्यंत पावित्र्याचा श्रध्देचा भाग होता. त्यामुळे अशा पाणी दाखविण्याच्या वेळी भूपूजन वगैरे व्हायचे.
माझ्या वडिलांना आम्ही सारे काका म्हणायचो. शेतकरी जमीनमालक आमच्या घरी येअून काकांना निमंत्रण देत असे. त्यांच्या सोयीच्या दिवसाची, सकाळी लवकरची वेळ ठरविली जायची. शेतकऱ्यांना शुभ दिवस हवा असायचा. मग नक्षत्र, वार अेखादा योग वगैरे साधून  चारदोन  दिवस पुढचा  ठरायचा. पाच-सात मैलाच्या परिसरात कुठेही जायचे, कदाचित त्याहीपेक्षा जास्त अंतर असे. पण त्यासाठी अट अशी की, सूर्य अुगवायच्या आधी घटिकाभर त्या रानात पोचायचेे. त्या मानाने घरातून निघायची वेळ ठरायची. पहाटे तीन-चार वाजताही ते लोक बैलगाडी घेअून काकाना न्यायला येत. मी काहीवेळी त्यांच्या बरोबर जात असे.
बैलगाडीत जाडसे जाजम, तक्क्या अशी बैठक असे. नेमकी  वेळ  गाठण्याच्या दृष्टीने चपळ बैल जुंपलेले असत. वाटेत गप्पाटप्पा चालायच्या. त्या भागातील माहिती काका त्या गाडीवानाकडून नीट विचारून घ्यायचे. पिके कुठली आहेत, गेल्या पाच चार साली त्याचे प्रमाण कसे होते हे त्या माणसाच्या न कळत गप्पांच्या ओघात काढून घेत. त्या शेतावर पोचले की तिथे तो मालक शेतकरी, त्याच्या घरची दोन तीन पुरुष आणि अेकदोन बाया माणसे हजर असायची. सूर्य अजून अुगवायचा असे. थंड आल्हादक हवा असायची. कुणीही स्वेटर मफलर असले पोशाख करीत नसे. काकांचा नेहमीचाच पेहेराव -धोतर, सदरा, अेकपट्टी चपला. त्या थंड वातावरणात त्यांची पाहाणी सुरू व्हायची. सूर्य अुगवायला फारच वेळ असेल तर च्यापानी होआी. पूर्वेला अरुणिमा आली की काका त्या रानभर फिरायला लागायचे. सूर्य अुगवत असताना पूर्वेकडे तोंड करून डोळयावर आडवा पंजा धरून भूमी निरखत चालत यायचे. मग तशाच शोधक नजरेने सभोवार पाहात निरीक्षणाच्या दोन तीन फेऱ्या व्हायच्या. अेव्हाना तास दीड तास अुलटलेला असायचा. मग अेका जागी थांबून ते खूण करून देत.
नुसते तेवढ्यावर भागत नसे, तर भूगर्भात खणायला सुरुवात झाल्यानंतर कसकसे थर लागतील ते अेका कागदावर आकृती काढून समजावून देत. अमूक फुटावर शाडवट, मग चार हात मुरूम, नंतर अमूक तमूक असे नीट सांगत. पाणी किती हातावर लागेल तो तपशील असायचा. जमिनींचे प्रकार माझ्या कानावर पडायचे. मुरमाड, काळा खडक, बेडक्या दगड, तांबडमाती, पांढरट, फुफाटा, तंड, वाळवट, रेताड, चिबड, ओलावा, पाझर, अुमाळा, मुसंडा, असे भूमीचे अंतरंग समजू लागायचे. पाणी लागण्याची शक्यता नसेल तर तसे सांगत. त्या शेतकऱ्याची परिस्थिती, पिकाअू जमीन, पाणी पाजण्याचे क्षेत्र, त्याची पातळी या साऱ्याचा विचार करून ते सल्ला देत. आणि पुढे तो अचूक ठरायचा. शेतकरी तसे सांगायला आणि `पहिेले पाणी' कासंडीतून दाखवायला आणत असे.
मी काकाना विचारले, हे ज्ञान तुम्हाला कसे? सूर्य अुगवताना तुम्हाला पाणी `दिसते' हे खरे का? त्याचे तंत्र काय असते? ते सारे मला नीट सांगायचे. यात अनुभव, अभ्यास आणि निरीक्षण महत्वाचे. सूर्य अुगवताना हवा स्वच्छ असते, सूर्यप्रकाश भूमीलगत येतो, त्यामुळे जमिनीचा अुंचसखलपणा पातळी नीट कळते. कुठे बारीक ओहोळ, नैसर्गिक लवणाचा भाग, अंतर्भागातून पाणी वाहून नेणारा प्रवाह यांचा अंदाज येतो. सभोवारच्या जमिनीनुसार खणित करताना कसले थर मिळतील तेही अंदाजता येते. शिवाय रानात अुगवणारी तरवड, अेरंडमोगली, रुआी, काटेसावर अशा वनस्पतींचे अस्तित्व कुठे कसे आहे तेही पाहायचे, त्याचे काही ठोकताळे आहेत. त्या साऱ्यांचा मेळ करून आपले निष्कर्ष काढायचे. लोकांच्या काही श्रध्दा असतात, त्यात काहीही अर्थ नाही; पण त्या कधी दुखवायच्या नाहीत. विज्ञानाने ज्यास अेचटूओ म्हटले, त्यास हे लोक जलदेवता म्हणतात. लोकांचा व्यवहार चालला पाहिजे. हे तत्वज्ञान म्हणजे केवढा संस्कार असतो, हे आता समजते.
शेतातला तो कार्यक्रम झाला की तोपर्यंत साडेआठ नअू वाजलेले असत. मग गावात किंवा मळयात त्यांच्या घरी पाहुणचार होत असे. ताजी न्याहरी किंवा शेंगा-कणसे-भोपळा असा मेवा आम्हाला भेट मिळायचा.त्या गाडीतून साऱ्या सरंजामाने आम्ही परत येत असू. अशा कित्येक विहिरी काकांनी दाखविल्या. या सगळयासाठी कोणतेही पैसे देणे घेणे नाही. मी विचारायचा, आपल्या बुध्दीचे पैसे घेण्यास काय हरकत आहे? ते म्हणायचे, बुध्दी `आपली' नाही, ती दैवदत्त आहे. परिश्रमाचे पैसे किंवा दुवा घ्यायला काही हरकत नाही.
-वसंत आपटे, किर्लोस्करवाडी फो.नं. ९५६१३९०८९०

 अुद्योगशील नरहर गंगाधर 
`आपटे कुटुंबियांची जंत्री' ही आपटे कुलवृत्तांताची दुसरी आवृत्ती  १९३९मध्ये प्रकाशित झाली. त्याकरिता प्रथमच `आपटे संघ' स्थापन करण्यात आला होता. त्यात या नरहरपंतांचा मोठा सहभाग होता. नरहर गंगाधर (संगणक क्रमांक १३३७) हे हरहुन्नरी आणि प्रयत्नशील व्यक्तिमत्व होते. त्यांचा जन्म १९०० सालचा. पंचविसाव्या वर्षी त्यांनी त्या काळातली  बी अे जी  ही शेतीशास्त्रातली पदवी घेतली.  भूगर्भातील पाणी शोधण्याची कला त्यांनी आत्मसात केली होती. जलसंशोधक म्हणून पारंगत पदवी मिळाल्यावर त्यांनी ग्रामीण विकास, पाणीपुरवठा, अन्न सुरक्षा, फलसंवर्धन अशा चळवळींत भाग घेतला. त्या विषयांवर त्यांनी माहितीपर पुस्तकेही लिहिली. सार्वजनिक कामांतही ते अग्रेसर होते. १९३८ साली त्यांनी स्वदेशी समितीची स्थापना केली. मराठा चंेबरमध्ये ते सक्रीय होते. १९३४ पासून ते आपटे संघात सक्रीय झाले. संघाची नियमावली त्यांनी तयार केली. आपटे कुटुंबाचे संमेलन भरविण्याची सुरुवात त्यांनी केली.

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन