Skip to main content

13 Feb 2017

माझी बहादूरवाडी : `आतून' आलेला उपक्रम
विश्रामबाग शिक्षण संस्थेचे अध्वर्यु श्री.टी.डी.लाड(वय८३) यांनी अनेकविध शैक्षणिक व पूरक कार्यांत प्रत्यक्ष सहभाग घेतलेला आहे.
 प्रारंभकाळात या हाडाच्या शिक्षकाने केलेला प्रयोग, आजच्या खऱ्या शिक्षकाला दिशा दाखवून देईल.
बहादूरवाडी येथे नवीन हायस्कूल निघणार असल्याचे समजले. शाळेची संपूर्ण जबाबदारी मी स्वीकारावी म्हणून पत्र आले होते. गावची चौकशी करता अनेक बाबतीत ते प्रतिकूल असल्याचे समजले. स्वातंत्र्यानंतरचे नवीन विचार या गावात आणण्यास पुष्कळ वाव आहे, याची खात्री झाली. जीवनातील एक धाडसी प्रयोग करण्याच्या हिंमतीने व आत्मविश्वासाने मी बहादूरवाडीला जाण्याचा निर्णय घेतला.
जून १९६०. कुंडल-सांगली-पडवळवाडी असा प्रवास करीत पडवळवाडीहून चालत ४ कि.मी. गोटखिंडी या गावी मुक्काम केला. पुढे ५कि.मी. चालत बहादूरवाडी गाठली. डोक्यावर ट्न्ंक, किरकोळ भांडी, चटई, छत्री, केरसुणी, दुसऱ्या हातात कंदील घेऊन धोतर-शर्ट-टोपी अशा पेहरावात मी थेट शाळेत प्रवेश केला. गावात इंग्रजी शाळा निघण्याचे कौतुक, त्यात नवीन आलेल्या शिक्षकाला बघण्यासाठी गर्दी झाली होती.
काही दिवस ऑफिसमध्येच मुक्काम होता. नंतर खोली मिळाली. शाळेमध्ये मी पूर्ण वेळ द्यायला लागलो. शाळेतील जमीन शेणाने सारवावी लागत असे. माझी कामाची पद्धत होती की, कोणतेही काम प्रथम आपण करायचे. माझे पाहून काही मुलेही जमीन सारवू लागली.
मी प्रशिक्षित (एस.एस.सी. एस.टी.सी.) असल्याने शाळेचा पहिला मुख्याध्यापक म्हणून नेमणूक झालेली होती. जुलै महिना. एका रात्री खूप पाऊस पडू लागला. मला चट्कन शाळेच्या ऑफीसमधील एक वासा मोडल्याचे आठवले. मी लगेच शाळेत आलो. कंदील घेऊन शाळेच्या ऑफीसमध्ये आलो. फेर्नचर, कागदपत्रे भिजणार नाहीत अशा ठिकाणी ठेवत होतो. सोसायटीची मिटींग संपवून गावचे सरकार श्री.हिरोजीराव घोरपडे व त्यांचे साथीदार पावसातून घरी चालले होते. ऑफीसमधील कंदीलाचा उजेड बघून ते आत आले. माझी धावपळ पाहून माझ्याविषयी आदरयुक्त विश्वास निर्माण झाला.
गाव त्या काळात इतरांसारखे तसे व्यसनी होते. चोऱ्यामाऱ्या करणारे होते. त्यांचा त्रास होत असे. सुपारी घेणे हा प्रकार सर्रास चालत असे. फ्रान्सच्या सरंजामशाहीतील एक खेडेगाव म्हणजे बहादूरवाडी आहे असे वाटे. यामुळे शाळेतील मुलांचे भविष्य काय? मुलांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करायचे मी ठरवले. पहाटे लवकर उठून मुलांबरोबर फिरायला, पळायला जाऊ लागलो. कच्च्या मुलांसाठी सकाळी मार्गदर्शन करू लागलो. ११ वाजता शाळा सुरू. कवायतीचे तास माझ्याकडेच असायचे. लाठीपरेड शिकवण्याचा निर्णय घेतला. प्रतिनिधी हायस्कूल कुंडलमध्ये माझे लाठी, जंबिया, भाला, ढाल-तलवार याचे शिक्षण झालेले होते. शाळा सुटल्यावर जवळच्या किल्ल्यातील मैदानात हॉलीबॉल, लाठी चालू झाली. ग्राऊंडवरून लाठी घेतलेली मुले परेड करत शाळेत येत होती व त्याचा एक सुंदर परिणाम शिस्तीमध्ये, गावावर, विद्यार्थ्यांवर पालकांवर झाला.
गावात ७वी पेक्षा अधिक  शिक्षण घेतलेले कोणी नव्हते. दररोज संध्याकाळी शामराव पाटलांच्या पडवीत मी प्रौढ साक्षरतेचा वर्ग चालू केला. अक्षर ओळखीबरोबर शेती, पिके, खते यांच्या सुधारणेविषयी माहिती देत होतो. स्वातंत्र्यलढ्याची चर्चा होत असे. शेतावर जाऊन आखणी करून देण्याचे काम केले. भजनी मंडळात जाऊन बसत असे. अनेक लोकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न केला. शाळा ही मुलांच्या बरोबर सर्वांनाच मार्गदर्शक केंद्र आहे असे  गावकऱ्यांना वाटू लागले.
महात्मा गांधींच्या विचाराचा पगडा माझ्यावर होता, तसेच गाडगे महाराजांचा ग्राम स्वच्छतेचा प्रयोगही करण्याची जबरदस्त इच्छा होती. कृष्णदास शहा यांच्या शिबीराचा प्रभाव माझ्यावर उमटलेला होता. त्याचाच परिणाम म्हणून ग्रामसफाईचा कार्यक्रम राबवावा असे मनात आले. गाव वसल्यापासून कधी ग्रामस्वच्छता झालेली नव्हती. आपल्या अंगणापासून कामाला लागलो. घरापुढचे अंगण-रस्ता स्वच्छ करत पुढच्या बाजूला २५-३० फूट झाडत गेलो. गल्लीतील २००-३०० फुटापर्यंतचा रस्ता हळूहळू स्वच्छ होऊ लागला. अनेकजणांची साथ मिळू लागली.
एक दिवस साक्षरतेच्या वर्गात एक जण म्हणाला, ``आमच्या गल्लीत लाड सर राहायला आले असते तर आमची गल्ली देखील स्वच्छ झाली असती.''  मी म्हणालो, ``मग तुम्हालाही भाग घ्यावा लागला असता.'' ते म्हणाले, ``हो आमची तयारी आहे.'' लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता त्यांच्या घरापुढचा रस्ता लोटायला सुरुवात केली. ते गृहस्थ घराबाहेर आले व माझ्या हातातील खराटा घेऊ लागले. मी त्यांना `तुम्हीपण एक खराटा आणून लोटू लागा. आज आपण तुमची गल्ली स्वच्छ करू'असे म्हटले. इतर काही मंडळीही जमली व ती गल्ली स्वच्छ झाली.
१५ ऑगस्ट जवळ आलेला होता. स्वच्छता मोहीम पूर्ण करून ७ वाजता झेंडावंदनासाठी जमायचे होते. झपाटल्यासारखे प्रेरित होऊन सर्व विद्यार्थ्यांसह कामाला लागलो. सर्व गाव स्वच्छ झाला. कोणताही उत्साह हळूहळू कमी होतो. तो उपक्रम टिकविण्यासाठी महिन्यातून एकदा ग्रामसफाई करायची असे ठरविले व तो दिवस ठरला अमावस्येचा. कारण त्या दिवशी औत-काडी बंद असायची. यातून सव्वाशे व्यक्तींचे श्रमदान मंडळ सुरू झाले.
-टी.डी.लाड ,विश्रामबाग, 
सांगली-४१६४१६ 
  मो.नं.९८९०२४४३६९  

प्रयोगशील संशोधक
डॉ.बाळकृष्ण नारायण आपटे- M.Sc.,Ph.D., Doctor of science 
 डॉ. बाळ आपटे हे मानवी जनुक शास्त्रातील अग्रगण्य संशोधक होते. त्यांनी १९६३ ते १९७५ मध्ये `स्टाफ इनव्हेस्टीगेटर, फर्स्ट  Cold-Spring Harber ग्रेड सायन्टीस्ट म्हणून USA मध्ये मोलेक्यूलर बायोलॉजी, मेडिकल जेनेटीक्स, बायो टेक्नोलॉजी ह्या विषयावर प्रदीर्घ संशोधन केले. आपल्या संशोधनाचा मायदेशातील रुग्णांस फायदा व्हावा, व त्यांचे जीवन सुकर व आनंदी व्हावे म्हणून ते भारतात परतले.
त्यांनी २००५ साली `एनझिमोपॅटीस्' या रोगावर एक अभिनव व अचूक रोग निदान पद्धती शोधून काढली; जिला `आपटे पद्धती' म्हणूनच ओळखले जाते. या शाखेतील नामवंत `डॉ.हान्स गालियार्ड' हे त्या नवीन व अचूक निदान पद्धतीने भारावून गेले होते. डॉ.बाळ आपटे यांस 'India International Friendship'  संस्थेतर्फे 'glory of India Award' हॅबीटॅट सेंटर दिल्ली येथे त्यांच्या जेनेटिक्समधील विशेष संशोधनाबद्दल देण्यात आले 'Tata Institute of Fundamental Research' मुंबई येथील समारंभात त्यांना 'Molecuar' मधील विशेष संशोधनाबद्दल `टाटा अॅल्युमनी एक्सलन्स अॅवार्ड' देऊन गौरविण्यात आले. जेनेटिक मेटॅबोलिक `डिरेंजमेंटने' मेंटल रिटारडेशन' ज्याला 'M.R' असे म्हणतात. त्यासाठी  शाळांतून अनेक शिबीरे या रोगाच्या जागृती व उपचारासाठी आयोजित केली होती. त्यांनी या विषयावर अनेक लेख भारतातील व विदेशी मासिकांतून जन जागृतीसाठी लिहिले. त्यांनी ' My Contribution to the Diagnosis and Management of Patients with genetic Diseases'  हा प्रबंध मुंबई युनिव्हर्सिटीस २००९ साली Doctor of Science (D.Sc.)या डिग्रीसाठी सादर केला. त्यास वरील डिग्री मिळाल्याचे पत्र युनिव्हर्सिटीकडून मिळाले.
डॉ.आपटे यांच्या `पद्धती'ने जीवन सुकर व आनंदी झालेल्या अनेक  माता-पित्यांना कृतार्थ वाटते. अशांचे आनंदाने फुललेले चेहरे पाहाण्यात डॉक्टरांना आपल्या जीवनाचे सार्थक झाल्याचा आनंद मिळत असे; श्रीमंत देशांत राहून गडगंज संपत्ती मिळवता आली असती! या डॉक्टरांचे वयाच्या ७७व्या वर्षी अल्पशा आजाराने दि.१३-१२-१६ रोजी सौदी अरेबियात निधन झाले. परमेश्वर शांती व सद्गती देवो.
-आत्माराम नारायण आपटे, ४७ ब्राम्हणवाडी,
के.एस.एस.रोड, माटुंगा, मुंबई-४०००१९

शेतीवाटांतील वळणे
तसं आमचं गाव आडवळणी. घरचे वातावरण शेतकरी कुटुंबाचे. खूप शिकावे अशी स्वप्नेसुद्धा पडत नसत. कसेबसे शिक्षण पुरे झाले की नोकरीला चिकटायचा प्रयत्न करायचा. जमले तर ठीक, नाही तर घरची शेती. वावरात विहीर आणि तळाला गेलेले पाणी.
माझे बालपण अशा बेभरवशाच्या वातावरणात गेलं. आमचे शेतीचे क्षेत्र; भरपूर पाणी असते तर सोने पिकले असते.  मला जाणवले की केवळ शेतीवर तरणोपाय नाही. काही उद्योगाची जोड द्यायला हवी. जिद्दीने अभ्यासाला लागलो आणि पदवीधर झालो. एका सहकारी बँकेत नोकरी लागली. ताजा पैसा शेतीच्या लागवडीला खर्च करावा लागला.
आमचा परिसर धडपड्या युवकांचा. धडपडी पिढी मी रोज बँकेत पाहात असे. छोट्याशा व्यवसायासाठी कर्ज प्रकरणे करून ही पिढी अल्पावधीत नावारूपाला येते. खोपटात उभे राहिलेले वर्कशॉप अल्पावधीत डौलदार कारखान्यात रूपांतरित होते, हे मी डोळयाने पाहात होतो. आपणही धाडस करावे असे वाटे.
शहरात फिरताना पाहिले की, केमिकल विरहित गूळ, काकवी असे पदार्थ दीडपट किंमतीने विकले जातात. प्रचंड मागणी आहे. मनात विचार आला की अशा पदार्थांची निर्मिती आपण करू शकतो. आमच्या परिसरात गुऱ्हाळघरे चालत. गूळनिर्मिती हेसुद्धा एक शास्त्र आहे, कसबी काम आहे. आम्ही काही मित्रांनी या पद्धतीचा अभ्यास केला. आम्ही सहकारी तत्वावर यामध्ये उडी घेतली. चोख वजन करून ऊस घ्यायचा. केमिकल विरहित विश्वासार्ह गूळ, काकवी असे पदार्थ दर्जेदार करायचे. स्वत:च्या शेतीतच हे गूऱ्हाळघर उभे केले. नंतर लक्षात आले की केवळ एवढेच काम नाही. त्याचे शास्त्रशुद्ध पॅकिंग, वजन, प्रसिद्धी व मुख्य म्हणजे वितरण, शासकीय खात्याची मंजुरी अशा कटकटीच्या गोष्टी चिकाटीने पूर्ण केल्या. तीन-चार जिल्ह्यांतील डिपार्टमेंटल स्टोअर्स पालथी घातली. चार-सहा महिन्यांच्या धडपडीत वर्षाची घसघशीत कमाई होऊ लागली. मग हुरूप आला. कृषी उद्योगाशी संबंधित चांगले मार्केट असणारे क्षेत्र म्हणजे केळीची बाग, ते धाडस केले. जळगांव-पुणे भागांत फिरून अभ्यास केला. दूर अंतरावरून बियाणे आणले आणि केळीच्या बागा लावल्या. हा प्रयोगपण भलताच यशस्वी झाला. पण दुर्दैवाने ओळीने दोन-तीन वर्षे पाऊस पडला नाही. सर्वतोपरी पाण्यावर अवलंबून असणारा हा प्रयोग सोडून द्यावा लागला.

शोधक दृष्टीने मी फिरत असता आढळले की सगळया हमरस्त्यावर पावलापावलावर धाबे उभे राहिलेत. या धाब्यांवर काजूची प्रचंड मागणी आहे. प्रामुख्याने कोकण क्षेत्रांत काजूचे पीक येते. हंगामात दर खाली असतात. त्या काळी मोठी खरेदी करून काजूच्या बिया साठवण करून ठेवल्या तर त्याला कीड वगैरे बहुधा लागत नाही. शेतीमधील माल नाशवंत; काजू त्याला अपवाद! अनेक काजू प्रक्रिया केंद्रांची पाहाणी केली. प्रक्रिया किचकट, खर्चीक. काजूबिया प्राप्त करणे, शिजविणे, विशिष्ट उष्णतेला बाहेर काढणे, त्याची टरफले फोडणे-सुकविणे, वर्गवारी करणे-चुरा, तुकडे, पाकळ्या, अखंड काजू-खारावलेले काजू.... सगळे शास्त्र समजून घेतले. खूप खर्चीक मशिनरी, मोठी जागा, विजेची उपलब्धता - सगळे मला सहजसाध्य होते.
बँकेत नोकरी करत होतो, त्यांच्या पदाधिकाऱ्यांशी, माझ्या कुटुंबातील वडीलधाऱ्यांशी चर्चा केली. तारण क्षमता पडताळली आणि नोकरीचा राजीनामा देऊन मी काजू कारखाना उभारण्याच्या मागे लागलो. चार-पाच वर्षांपूर्वी पलूस औद्योगिक वसाहतीजवळची प्रशस्त जागा खरेदी केली. आता माझा व्यवसाय नावारूपाला आला आहे. २०-२५ महिलांना रोजगार, वर्षाला साधारणपणे २५० टन चांगल्या मालाचे उत्पादन होते. मालाची प्रसिध्दी झाली असून ऑर्डर्स चालत येतात. टरफले, वगैरे बाय प्रॉडक्टस मिळतात. स्टाफ प्रशिक्षित झाला आहे. असे म्हटले जाते की जिथे काजू पिकतो, त्याच परिसरात असे प्रक्रिया उद्योग उभे राहू शकतात. पण मी आमच्या पलूस(सांगली) भागात हा काजूप्रक्रियेचा उद्योग उभा करू शकलो.

याच प्रकारातील, पण थोडे वेगळे अुदाहरण मुकुंद काळे यांचे आहे. मुकुंद काळे यांचे आआी वडील दोघे सांगली शहरात शिक्षक होते, मुकुंदाने नोकरी  करावी असे त्यांनाही वाटायचे, पण स्वत: मुकुंद मात्र राजी  नव्हता. पदवी घेतल्यावर त्याने घराच्या अंगणात अेका टपरीत किराणा दुकान सुरू केले. ते वाढवत विस्तारत नेले. कालान्तराने त्याच्या राहत्या घराचे अपार्टमेंट झाले आणि त्याने दुकान बंद केले. साठलेल्या पैशात बँकेची थोडी भर घालून त्याने कोकणातल्या कुडाळजवळ काजू कारखाना चालू केला, त्यास आता तीन चार वर्षे झाली. त्याचा आवाका अजून लहान आहे, पण अुत्पादन वाढवून वार्षिक दीडशे टनांपर्यंत नेण्याच्या योजना तिथे चालू आहेत.


   या दोघांच्या अनुभवांची माहिती घेतल्यावर असे लक्षात येते की, कोणताही धंदा म्हटले तर सोपा, पण हुशारीच्या प्रयत्नांचा, परिश्रमांचा असतो. काही वर्षांपूर्वी काजू पाहायला मिळायचे वांधे होते, आज त्याची बाजारपेठ टनावारी आहे. साध्याशा लग्नांतील स्वैपाकात आज सुमारे ३किलो काजू वापरतात. तीच गोष्ट साऱ्या वस्तूंची आहे. कोणत्याही मालाला खूप मार्केट आहे. मात्र त्या मागणीत बदल होत असतो. पूर्वी साखर महाग व त्या मानाने गूळ फार स्वस्त होता; गूळ वापरणे अप्रतिष्ठेचे मानत. आता रासायनिक खत, औषध यांचा खर्च न केलेला साधा गूळ, साखरेच्या दुप्पट दराने विकला जातो. हे बदल अुद्योजकाने टिपले पाहिजेत.
अेकेका व्यवसायासाठी विशिष्ट मुलुख किंवा प्रदेश सोयीस्कर असतो. काजूचा विचार केला तर कोकणात तो व्यवसाय करणे पलूस(सांगली)पेक्षा सोपे ठरते. कोकणात माहितगार व प्रशिक्षित बायका कामाला मिळतात. त्या दोनपाच किमी अंतरावरून चालत येतात. त्यांना पिढीजात माहिती असते. अेखाद्या अुद्योगात अुत्पादन थांबले तर त्याच प्रकारच्या दुसऱ्या कारखान्यात त्यांना कामाला जाता येते; रोजगार बुडत नाही. पलूस भागात पवारांच्या कारखान्यात महिलांना नेण्या-आणण्यासाठी गाडीची व्यवस्था आहे. त्यांना दुपारचे जेवण दिले जाते, कारण लवकर कामावर यायचे तर त्यांना घरचा स्वैपाक करून येणे कठीण पडते.
मशीनरी व त्यांची दुरुस्ती हा प्रश्न कोकणात सोपा; कारण तिथे त्या प्रकारचे अनेक अुद्योग आहेत. ती मशीन दुरुस्त करणारे लोक सहजी मिळतात. त्यातूनही अेखादे मशीन जास्त काळ बंद राहणार असेल तर दुसऱ्या अुद्योजकाकडे त्याची मदत मागता येते, त्याच्याकडून तात्पुरते काम करून घेता येते. पलूसला तसे होत नाही. मशीन बंद पडलेे तर ते दुरुस्तीला दूरगावी - बहुधा कोकणातच - न्यावे लागते. बाजारपेठ स्थानिक मिळते पण त्यास मर्यादा आहेत. मुंबआी, किंवा तिथून विदेशी मार्केट गाठले तर खूप फरक पडतो, पण त्यास पॅकिंग, वाहतूक, अुत्पादनातील सातत्य व खात्री.... ही सारी तंत्रे आत्मसात करून ती सांभाळावी लागतात.
काजूचा कच्चा माल अुपलब्ध होण्यासाठी कोकण बरे पडते, स्थानिक आठवडी बाजारात लोक घरचा काजू विकायला येतात. पण अलीकडे विदेशांतूनही कच्चा माल येतो. इथे शेतीप्रयोग करून ते अुत्पादन वाढले तर तो व्यवसाय खूप वाढेल. द्राक्ष-बेदाणा तासगावला किती वाढला. मुख्यत: काजू पिकाचा कोणताही अंश वाया जात नाही. अखंड शुभ्र काजूचा दर खूप जास्त असतो, (सध्या सुमारे ८००रु. किलो) पण थोडा डावा माल, त्याची पाकळी, तुकडा, चुरा, आितकेच नव्हे तर त्याची टरफले, तेल, भुस्कट या सगळयांंस मागणी असते. काजू सोलताना त्याचे तेल हाताला लागते, ते बाधते. त्याची सवय असायला हवी. काळजी घ्यावी लागते. प्रशिक्षित साधारण महिलांना दररोज साधारण २००रु. रोजगार मिळतो. चांगले काम केले तर जास्त मिळतात. माहितगार व्यवस्थापक असेल तर सांगली भागात २०-२२हजार रुपयांची नोकरी मिळू शकते. कोकणात तसे  व्यवस्थापक ८-१० हजारात काम करतात; तिथे राहणीमान स्वस्त आहे.
पंढरपूरला अुदबत्तीचा, आणि कोल्हापूरला चमड्याचा धंदा करणे त्या मानाने सोपे असते, पण आता वाहतूक, दळणवळण, प्रवास, मार्केट, संपर्क या साऱ्यांत खूप बदल झाले आहेत. त्यामुळे थोड्या जास्त प्रयत्नांनी कोणताही धंदा कुठेही सोयीचा करणे शक्य होते.
-M.G. Altekar


Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन