Skip to main content

5 Jan.2015

दि.२५ डिसेंबर २०१४ रोजी बलवडी (भाळवणी) ता.खानापूर येथे स्थानिक साहित्य संमेलन झाले. याप्रसंगी अध्यक्षपदावरून डॉ.आ.ह.साळुंखे यांनी प्रगट केलेल्या मनोगताचे संकलन.....
अनुभव घ्या, चिकित्सा करा
येरळा नदीकाठच्या या संमेलनाविषयी माझ्या मनांत वेगळेच ममत्व आहे; कारण माझी वडिलोपार्जित शेती याच येरळेच्या काठी थोड्या अंतरावर आहे आणि या नदीचे पाणी पिऊनच माझे बालपण गेले आहे. जगाच्या पाठीवर अन्यत्र कोठेही काही सन्मान प्राप्त झाला तरी, स्वत:च्या घरातील कौतुकाचा सोहळा म्हणून मला आजच्या सन्मानाचा विशेष आनंद होत आहे.
प्राचीन वाङ्मय सोडल्यास मधल्या प्रदीर्घ काळात ग्रामीण भागात अशिक्षितपणामुळे लिखित स्वरूपात साहित्यनिर्मिती झाली नसेल. शेकडो वर्षे ग्रामीण भागातील बहुजन समाज शाळेच्या शिक्षणापासून वंचित राहिला. पण त्याच्या अंत:करणातील ऊर्मी दडपून राहिली नाही. ती वेगळया माध्यमांतून प्रगट झालीच! कधी ती जात्यावरील ओव्यांच्या रूपाने प्रासादिक स्वरूपात प्रगटली, कधी मोटेवरच्या किंवा औतावरील गाण्याच्या रूपाने प्रगट झाली. ते खरेखुरे आणि अस्सल साहित्यच होते. लिखित स्वरूपात नसल्याने पाठांतरातून ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे प्रवाहित झाले; नाही असे नाही! पण त्यास मर्यादा होत्या. बरेचसे अस्सल प्रतिभासंपन्न साहित्य लुप्त होऊन गेले, हे आपले दुर्दैव आहे.
ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांच्या उदयानंतर ग्रामीण भागातील उपेक्षित जनतेला,- विशेषत: स्त्रियांना-शिक्षणाची दारे किलकिली झाली आणि मग ग्रामीण प्रतिभा फुलू लागली. नव्या पिढीतील मुलामुलींच्या शिक्षणामुळे त्यांचे क्षेत्र विस्तारित झाले. शब्दसामर्थ्याची जाणीव झाली आणि बालपणापासून भोगलेल्या सुखदु:खाला धुमारे फुटू लागले. पूर्वी शहरात बंद खोलीमध्ये बसून, पांढरपेशा वर्गाकडून ग्रामीण साहित्याची निर्मिती होत होती. ती कृत्रिम वाटे. आजही टीव्हीवरच्या मालिकांतून काही ग्रामीण पात्रे जी भाषा बोलतात, ती अस्सल ग्रामीण नसते. ती शहरी लेखकाने, शहरी कलाकाराने तोडमोड करून उच्चारलेली नाटकी भाषा असते. आणि म्हणून ते तकलुपी ग्रामीण साहित्य जनमानसावर ठसा उमटवू शकत नाही.
नव्या ग्रामीण पिढीला त्यांच्या हृदयाचा हुंकार व्यक्त करण्यास प्रोत्साहन द्यायला हवे. खरं तर अशा साहित्य-मेळयाचे अध्यक्षपद आम्हा थकल्या-भागल्या मंडळींना देण्यापेक्षा एखाद्या नवोदित, तरुण साहित्यिकाला द्यायला हवे. अशा नव्या साहित्यिकांची व त्यांच्या साहित्याची चर्चा व्हायला हवी. आमच्यासारख्यांना कुठेतरी चार सन्मान-बहुमान मिळालेलेे असतात, त्यांनाच पुन्हा इथे प्रमुख पद देण्याऐवजी ते नव्या उमेदीच्या व्यक्तीकडे देऊन त्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. पिकल्या पानांना गळू द्या मग त्या जागी नवी पालवी फुटू शकेल. त्याच साहित्यामधून कृतज्ञता आणि काळजाचा सुगंध दरवळेल. आपले दु:खमय लाचारीचे जीवन क्षणभर विसरून आपल्या भावभावना ते व्यक्त करू लागतील. या कामी अशी छोटी संमेलने, परिसंवाद, चर्चासत्रे ही उर्जास्थळे ठरतील; नेमकी दिशा दाखविणारे दीपस्तंभ ठरतील.
मागे एकदा मी स्पेनमधील एका हॉटेलच्या दारात उभा होतो. गगनचुंबी हॉटेलच्या खूपच उंचावर आमची खोली होती. आमची लिफ्ट नेमकी वरच अडकली होती. लिफ्टची वाट पाहून आम्ही कंटाळलो. एवढ्यात एक अपंग तरुण व्हीलचेअरवरून आमच्या लिफ्टजवळ आला. त्याने क्षणभर या लिफ्टची वाट पाहिली आणि झर्रकन् व्हीलचेअरची दिशा बदलून पलीकडे गेला. नवल म्हणजे त्या एकाच खांबाच्या भोवती एकूण चार लिफ्ट्स् होत्या. आमच्या ते लक्षात आले नाही. तो अपंग युवक मात्र आमच्या कितीतरी आधी वरच्या मजल्यावर पोचला. संधीची वाट पाहात आपण बंद लिफ्टच्या दारात ताटकळत थांबून गतिशून्य होण्यापेक्षा, वेगळया वाटा शोधून उंच जायला हवे, भरारी घ्यायला हवी.
नवोदित साहित्यिकांना आणखी एक आवाहन करू इच्छितो की, तुम्ही परीटघडीच्या, शहरी साहित्यिकांचे, किंबहुना माझ्यासह कुणाचेही अनुकरण  अजिबात करू नका. ते उष्ट्या पत्रावळीवर बसल्यासारखे होईल. असा उष्टेपणा नको. तुमचे खरेखुरे स्वत्व प्रगट करा. आज जगात ७०० कोटि लोक आहेत, शतकानुशतकांत असंख्य अगणित लोक होऊन गेले. यापुढच्या काळातही अब्जावधी लोक जन्म घेणार आहेत. पण आश्चर्य म्हणजे यापैकी एकाचेही अंगठ्याचे ठसे एकासारखे दुसरे नसतात. निसर्गाची ही अद्भूत किमया चकित करते. मग आपले लेखन दुसऱ्यासारखे असावे हा अट्टाहास कशाला? तुमची स्वत:ची स्वतंत्र शैली, तुमची उस्फूर्त प्रतिभा आहे, तशीच प्रगट करा म्हणजे त्या निर्मितीला अस्सलपणाचा सुगंध येईल. आपल्या अवतीभवती असंख्य घटना घडत असतात. अगणित अनुभव उमलत असतात. ते वस्तुनिष्ठ पद्धतीने समजून घ्या. जिज्ञासा सदैव तेवती ठेवा. एक नवा शब्द म्हणजे एक नवा मित्र समजा. जोपर्यंत आपल्या मनी जिज्ञासा जागृत असेल तोवरच तुमची निर्मितीची ऊर्मी जिवंत राहणार आहे.
मी प्रदीर्घ काळ कवि कालिदासाचे मेघदूत शिकविले. त्याने अतिशय वेधकपणे लिहिलेला निसर्ग विद्यार्थ्यांना शिकवायचा प्रयत्न केला. उगवतीचे आकाश, तिथला पूर्वरंग, मावळतीच्या रंगछटा, खळाळत्या नद्या, हिमाच्छादित बर्फशिखरे, झाडावर फुलणारी कोवळी पालवी, असंख्य फुलांचे रंगरूप, आकार, सुगंध.... मित्रहो, जग फार सुंदर आहे. आपली सुखदु:खे, यातना, व्यथा बाजूला ठेवा. निसर्गाला साद द्या. मग बघा तुमचे जीवन कसे आल्हाददायक बनते!
मी सातारा शहरात राहतो. अगदी शहराजवळ नसली तरी, थोड्या अंतरावरून कृष्णा नदी वाहते. एकवेळ माझ्या वर्गात विचारले, `तुमच्यापैकी कितीजणांनी महापूर पाहिला आहे?' मला वाटले होते की सगळया वर्गाची बोटे वर होतील, पण नवल म्हणजे बव्हंशी मुला-मुलींनी महापूरच पाहिला नव्हता. निसर्गाकडे अशी पाठ फिरविणे म्हणजे करंटेपणा ठरेल, हे आपणास कधी कळणार आहे? समोरचा माणूस असा का वागतो याचासुद्धा अभ्यास करता आला पाहिजे. मानवी मन, भावभावना हा एक अत्यंत क्लिष्ट आणि अनाकलनीय विषय आहे. मी एका उच्चाधिकार समितीवर होतो. धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी एक बैठक चालू होती. याप्रसंगी एक ज्येष्ठ प्राध्यापक अचानक खूपच उद्धट भाषेत अद्वातद्वा बडबडू लागले. मला खूप राग आला. त्यांची कानउघाडणी करून त्यांना बैठकीतून बाहेर पाठवावे असे क्षणभर वाटले, पण मी संयम पाळला. नंतर मला समजले की त्यांच्या मेंदूमध्ये ट्यूमर झाला असून पुढच्याच आठवड्यात शल्यक्रिया आहे. त्यामुळे त्यांचे सध्या मानसिक संतुलन ढळले आहे. मग मात्र मला मनापासून वाटले की, आपण संयम पाळला हे किती बरे झाले! माणसाला माणसाने समजून घ्यावे. तो असा का वागतो, याची चिकित्सा करायला शिका; म्हणजे असंख्य माणिकमोती तुमच्यासमोर उघडी होतील. त्याला शब्दरूप देता येईल.
समुद्र न पाहता समुद्राचे वर्णन करू नये. स्वत: गड-किल्ले-डंोंगर-नद्या-समुद्र पहा. निसर्गाचे रौद्र रूप, सौम्य रूप, नाना रंग, रसिकतेने पहा आणि कागदावर ती शब्दशिल्पे उमटवा. बधीरपणे जगाकडे बघाल तर तुम्हाला काहीच सुचणार नाही.
पेरणीची घात कधी येईल हे शेतकऱ्याला नेमके कळते. गृहिणीला नेमके समजते की चुलीवरील पदार्थ अजून शिजला नाही. तो कच्चा राहता उपयोगी नाही, आणि तो करपून जाताही उपयोगी नाही. लेखनाच्या बाबतीतही अशी जागरूकता हवी. नवोदित साहित्यिकांना मी एक कानमंत्र देऊ इच्छितो, रात्री स्फुरलेली कविता उद्याच्या अंकात छापली गेली पाहिजे असा उतावीळपणा नको. एखादा चित्रकार चित्र काढतो, आणि त्याची रंगसंगती व समतोल काही दूर अंतरावर जाऊन ते निरखतो. त्याचे मर्म समजून घ्या. आपले लेखन असेच जरा `दुरून' वाचा. मित्रांना दाखवा, त्यावर चर्चा करा. साहित्यनिर्मिती व तिचे प्रकाशन ही एक प्रक्रिया असते. त्याकरिता पुरेसा वेळ दिला पाहिजे. तोंडावाटे पोटात घेतलेल्या अन्नाच्या घासावर अनेक पाचकरसांची नीट प्रक्रिया झाली तरच ते अन्न पचते, त्याचे रक्त बनते, त्यातून उर्जा मिळते. त्याचप्रमाणे प्रत्येक स्वतंत्र साहित्याचे असते. त्यासाठी कुणाचे अनुकरण करू नये. स्वत:चे अनुभव, आणि मेंदू यांचा तर्कनिष्ठ वापर करावा.
एक मजेशीर प्रसंग  सांगावासा वाटतो. उंच डोंगरावर एक देऊळ होते. एक भक्त दर्शनासाठी आला. पायथ्याशीच त्याला चपला काढून ठेवायला सुचविण्यात आले. भक्ताच्या मनात आले की, डोंगर चढून दर्शन घेऊन परत येईपर्यंत चपला जागेवर सुरक्षित राहतील का? मग त्याने काय केले की, बाजूच्या झुडपावरील काही पाने-फुले तोडून ती चपलावर ठेवून, चपला लपवून ठेवल्या. तो भक्त डोंगरावर चढून गेल्यावर, दुसरे काही भक्त पायथ्याशी आले. त्यांनी पाहिले की इथे आणखी एक देवस्थान असावे. त्यांनी पण त्या ढिगावर आणखी फुले वाहिली. उदबत्ती लावली. असे करता करता तिथे पानाफुलांचा ढीग झाला. पहिला भक्त परत आला. त्याला दिसले की, चपला सुरक्षित आहेत पण अंधपणातून नको ते निर्माण झाले आहे. असे आंधळेपणाने तुम्ही वागू नका. चिकित्सक वृत्तीने सर्व कार्यकारण भाव तपासून बघा म्हणजेच तुमचे लेखन निर्दोष होईल.
गृहिणी कोथिंबिरीची जुडी घरी आणते. भाजी शिजविताना त्या काड्या जशाच्या तशा भाजीत टाकत नाही. मुळाची माती धुवून घेते, किडलेली पाने काढून टाकते, चांगली धुवून घेते, मगच शेलकी एकदोन काडी आणि चार पाने भाजीत टाकते. तेवढ्याने तुमच्या प्रत्येक घासाला रुची येते. साहित्यनिर्मिती करताना डोक्यात घुसणारा कचरा बाजूला करता आला पाहिजे. मिळेल तेथून माहिती घ्या. पण ती तपासून, गाळून, घासून पुसून घ्या आणि मगच ती वापरा.
तरुण नवसाहित्यिकांना एवढेच सांगायचे आहे की, मोठी झेप घेण्यासाठी व्यासंग जपा, डोळस रहा, स्वत:ची स्वतंत्र शैली जपा, प्रतिभा जपा, भरभरून समाजाला द्या, स्वत: समृद्ध व्हा, समाजाला समृध्द करा, खोट्या प्रतिष्ठेच्या मागे लागू नका, शांतपणे काम करीत रहा. म्हणजे तुमचे काम हिणकस नसेल; ते निखळ अस्सल असेल. मग प्रसिद्धी-प्रतिष्ठा आपोआपच तुमच्याकडे चालत येईल.
संकलक - मोहन जी. आळतेकर, (मोबा.९४२११८४९९६)


जे वांछिल ते लाभो, वाचकास!
मराठीतील आद्य पत्रकार व संपादक कै.बाळशास्त्री जांभेकर यांचा स्मृतिदिन ६ जानेवारीला असतो. पत्रकारितेच्या क्षेत्रात यानिमित्ताने काही कार्यक्रम साजरे केले जातात. त्यात बाळशास्त्रींच्या `दर्पण' या वृत्तपत्राच्या नावाने पुरस्कारही असतो. या सर्व घटनेला काही एक अर्थ असतो हे खरे आहे, परंतु कितीशा गांभीर्याने सर्व पत्रसृष्टी त्याकडे पाहते हा प्रश्नच आहे.

पूर्वी एका जिल्ह्याच्या स्तरावर एका पक्षाचा अध्यक्ष निवडण्यासाठी बैठक चालू होती. साहजिकच हा गट, तो गट, यांची ताकद, त्यांची शक्ती, जातीय समीकरणे, आरक्षण अशा अनेक पैलूंवर विचार सुरू होते. त्यामुळे नेते मंडळींतच खरी स्पर्धा होती आणि प्रत्येकजण आपले घोडे पुढे दामटण्याचा समरसून प्रयत्न करीत होता. त्यातून बैठकीचे स्वरूप किती आणि कसे वादग्रस्त झाले असेल याची कल्पना येते. कोपऱ्यातल्या एका खुर्चीवर बसून हे सर्व युद्ध पाहात राहिलेल्या एका बुजुर्ग कार्यकर्त्यास त्याचे मत विचारले गेले. हा अनुभवी कार्यकर्ता म्हणाला, ``ज्याने या जिल्ह्याच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत किमान एकदा उभाआडवा प्रवास केला आहे; आणि ज्याने या पक्षाचा इतिहास एकदा तरी वाचला आहे त्याला अध्यक्ष करावे.'' अर्थातच ही त्याची सूचना अंमलात आणणे शक्यच नव्हते. असाच प्रकार सर्व क्षेत्रांमध्ये सध्या सुरू आहे. पत्रकार होण्यासाठी कोणताही निकष नसतो आणि नसावा. परंतु इतर काहीही जमत नाही म्हणून पत्रकारिता करणारे काहीजण आहेत, तसेच त्या उद्योगातून उपद्रवमूल्य वाढविता येऊन चांगली कमाई होते असाही एक प्रवाह या क्षेत्रात येऊ लागला आहे त्याचे भान बाळगले पाहिजे.

मराठीत उत्तमोत्तम नियतकालिके आजही प्रकाशित होत असतात. `कोणतेही वृत्तपत्र उघडले तर त्यात केवळ उघड्या बायांच्या जाहिराती आणि दरोडे-बलात्काराच्या बातम्या एवढेच असते' अशी एक साधारण समजूत सामान्य वाचकांनी करून घेतली आहे. अशा प्रकारची नियतकालिके सध्या मोठ्या संख्येने निघतात आणि खपतात. परंतु ज्याला चांगले हवे आहे त्याच्यासाठी चांगली नियतकालिकेही आहेत. थोडासा शोध घेतला तर तुलनेने कमी किंमतीत ती उपलब्ध होतात. आपल्या आवडीच्या क्षेत्रात सखोल अभ्यास करता यावा, आणि त्या क्षेत्रातील जगभरच्या घडामोडी समजून घ्याव्यात यासाठी या नियतकालिकांना पर्याय नसतो. पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पदरच्या पैशाने उठवळ वृत्तपत्रे विकत घेणाऱ्यांचे प्रमाण फार जास्त आहे. गमतीचा भाग असा की, ही वृत्तपत्रे घरी आलीच पाहिजेत असा एक समज अकारण करून घेतला जातो. त्यात बातम्यांचा ताजेपणा तर राहोच पण खरेपणासुद्धा विश्वासार्ह नसतो हेही समजून घ्यायला हवे.

चांगल्या नियतकालिकांना चांगला वाचक आहे, पण चांगले लेखक मिळत नाहीत ही बहुतेक सर्व संपादक व प्रकाशकांची योग्य तक्रार आहे. बऱ्याचशा लेखकांना काय आणि कसे लिहायचे हेही समजत नाही. वृत्तपत्रातील बातम्या किंवा टीव्हीवरील कार्यक्रम यांच्यासंबंधी प्रतिक्रिया अशा दर्जेदार नियतकालिकांना आवश्यक नसतात. प्रचलित विषयावर अभ्यासपूर्ण मत व्यक्त करणे पुष्कळांना शक्य असते, असे लोक लेखणी हाती घेत नाहीत. आणि जे लोक लेखणी हाती घेतात त्यांना `लिहिता' येत नाही. यातून संपादकांची अवस्था बिकट होते. पुष्कळसे लेख आणि लेखन दुरुस्त करून घ्यावे लागते. त्यात मुद्द्यांचा फेरफार असा विषय नाहीच, तर केवळ वाक्यांश आणि मांडणी  यांच्यामध्ये सुबोधता येण्यासाठी संपादकीय पट्टा फिरवावा लागतो. तात्पर्य असे की, चांगल्या मजकुराला वाचक असूनही चांगला मजकूर लिहिला जात नाही. पण तक्रार मात्र सार्वत्रिक असते की, सध्या वाचनसंस्कृती कमी झाली आहे. याउलट विधान असे हवे की, सध्या लेखनसंस्कृती ढिसाळ झाली आहे.

वृत्तपत्रीय मजकुराचे एकवेळ राहो, पण साधे पत्रलेखनही  सुयोग्य असत नाही. याचा अनुभव घ्यायचा असेल तर कुठल्याही सासुरवाशिणीने स्वत:च्या आईला एक आंतरदेशीय पत्र लिहून पाहावे आणि ते त्या सुजाण माऊलीलाच वाचायला द्यावे. याला सबब म्हणून `हल्ली पत्र कोणी लिहीत नाहीत, फोनवरच बोलले जाते 'अशी दिली जाते. स्वत:चे मत आणि खुशाली कळविण्यासाठी फोन हेच साधन असेल तर निदान श्रवणसंस्कृती तरी अभिजात व्हायला हवी. तिथेही `तू कशी आहेस?' आणि `सीरियल पाहतेस का?' यापुढे काही बोलले जात नाही. साक्षरतेचे प्रमाण वाढत चालल्याचे सांगितले जाते पण लेखन आणि वाचन जमत नसेल तर ही साक्षरता काय कामाची?

ग्रामीण भागातसुद्धा हल्ली प्रसारमाध्यमे पोचली आहेत त्याचप्रमाणे पत्रकारिताही उसळया मारते आहे. पुष्कळ लेखकांना आपला मजकूर छापला जात नाही याचेही वैषम्य वाटते. त्याउलट नियतकालिके चालविणाऱ्यांना मात्र योग्य असे लेखन मिळत नाही याचे वैषम्य वाटते. योग्य माणसे कामाला मिळत नाहीत आणि माणसांना काम नाही ही जशी अवस्था आहे, तशीच नियतकालिकांच्या क्षेत्रातही मजकुराच्या बाबतीत आहे. लोकांना जे हवे आहे ते देणारी वृत्तपत्रे आहेतच, पण त्यापेक्षा लोकांना जे देण्याची जबाबदारी आपल्यावर मानतात त्यांच्यासाठी लेखनदुर्भिक्ष्य ही मोठीच समस्या आहे.

कोणत्याही समस्येला आणि विषयाला अनेक अंगे आणि उपांगे असतात. मत आणि मतभेद असतात. ते सर्व वाचकांपुढे मांडून प्रगती, सुशासन, स्वातंत्र्य इत्यादी मूल्यांसाठी समाजमन तयार करणे ही नियतकालिकांची जबाबदारी असते. ती मान्य करून तसा प्रयत्न करणाऱ्यांच्या हाती अशी मतमतांतरे येत नाहीत. एकच एक असे कुठले तरी मत धोपटून काढण्यात अशा लेखक मंडळींची शाई खर्ची पडते. हे मतसुद्धा त्यांचे स्वत:चे नसते. परंतु जे छापले जाईल असे त्यांना वाटते तेवढ्याच मताला ते प्राधान्य देत राहतात. उदाहरणार्थ मुलगी वाचवा किंवा फुले-आंबेेडकर किंवा प्लॅस्टीकचा दुरुपयोग किंवा जागतिक तापमान किंवा ज्येष्ठांनी कसे वागावे हे विषय! या सर्व विषयांचे महत्त्व कमी आहे असे नव्हे, पण त्या त्या विषयाच्या तज्ज्ञ लेखकाने ते लोकांपुढे मांडणे आवश्यक आहे. त्याऐवजी पाट्या टाकणाऱ्या कोणाही लेखकाने हे विषय गोलमाल पद्धतीने त्याच्या समजुतीने `आगळया आणि वेगळया' भाषेत लिहून पाठविले तर त्या बिचाऱ्या प्रकाशकांनी काय करावे? या प्रश्नांना दुसरीही काही अंगे असतात. ती अशा लेखकांच्या गावीही नसतात. पाट्याच टाकायच्या, त्या निदान काही भरलेल्या तरी असाव्यात!

वाचकांची गरज आणि लेखकांची कर्तव्ये यांचा मेळ घालणारे लेखन कसे वाढेल असा काही विचार बाळशास्त्रींच्या स्मृतीच्या निमित्ताने चर्चेला यावा अशी अपेक्षा आहे. 

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन