Skip to main content

12 - 19 Jan 2015

संगीतोपचार (म्युझिक थेरपी)
नाहं वसामि वैकुंठे, योगीनां हृदये, रवौ,
मद्भक्ता: यत्र गायन्ती, तत्र तिष्ठामि नारद ।।
भगवंतांनी नारदांना सांगितले, ``माझे भक्त जिथे संगीत भजन करत असतील तिथे मी असतो. (मी वैकुंठात, योग्यांच्या हृदयात, सूर्यबिंबात असत नाही; तरी माझे भक्त जिथे गायन करत असतात तिथे मात्र मी निश्चित सापडेन.)
मानवाच्या गळयाला गाण्याचा लळा मुळापासूनच होता, म्हणून त्याने ऋग्वेदाला सामवेदाचे माधुर्य प्राप्त करून दिले. महाराष्ट्नत जात्याच्या घरघरीसंगे गाणे उमटायचे, तेव्हा कुठे पहाट फुटायची. निरक्षरांच्या अंत:करणातूनही समयस्फूर्त अक्षरांच्या लडी उलगडायच्या. त्यांतून ओवी हा काव्याचा पहिला प्रकार उमटला.छंदोबद्ध काव्यरचना म्हणजे गीत. ओवी हे पहिले गीत, नंतर अभंग. ज्ञानेश्वरांच्या गीतप्रभेने उजळलेल्या कित्येक रचना, हरिपाठाचे अभंग, गौळणी, विराण्या इत्यादी प्रतिभासंपन्न संगीतकारांच्या नजरेस पडल्या. त्यातील आशयाचे मर्म त्यांना उलगडले. त्यावर अतिशय सहृदयतेने अनुरूप असा स्वरांचा साज त्यांना चढवता आला. परिणामी ही गीते कानाकानांतून मनामनांत जाऊन पोचली.
संगीत हे दैवी पोषण आहे. त्यायोगे मानसिक शक्ती तर वाढतेच, परंतु शारीरिक व्याधीही दूर पळतात. संगीताच्या साहचर्याने मनुष्य आरोग्यपूर्ण आणि आनंदी जीवन जगू शकतो. हिस्टेरिया, अॅनिमिया, अॅसिडिटी, डोकेदुखी इत्यादी अनेक व्याधींवर; दरबारी कानडा, अहिरभैरव, तोडी, पूरिया, जयजयवंती वगैरे रागदारी संगीताचे प्रयोग करून डॉ.टी.साईराम यांनी संशोधनातून हे सिद्ध केले. विविध राग आणि तालांच्या योग्य मिलाफातून विकलांग मुलांवर उत्तम परिणाम साधता येतो, हे संशोधनातून सिद्ध झाले आहे. श्री.बालाजी तांबे `हीलींग म्युझिकल कॉन्फरन्स' घेतात. आपल्याला शारीरिक, मानसिक आंतर्बाह्य असे उत्तम संतुलन व आरोग्य मिळावे म्हणून संगीताच्या साहाय्याने श्लोकपठण केले जाते. संगीतरूपाने मनात गेलेले शब्द आणि विचार आपल्या मनावर, शरीरावर, जीवनावर तीव्र परिणाम साधतात. त्या त्या प्रकारच्या घटना व अनुभव आपल्याकडे आकर्षित होतात. माणूस हा चालताबोलता चुंबक असून ज्या ज्या विचारांचे संस्कार त्याच्यावर होतात, त्या त्या प्रकारच्या गोष्टी त्याच्याकडे आकर्षित होतात. आपल्या मनामध्ये कॉम्प्यूटरप्रमाणे जे जे प्रोग्रॅमिंग केलेले असते, त्याप्रमाणे आपल्या जीवनरूपी मॉनिटरवर आऊटपुट दिसत असते.पेरावे तसे उगवते. टेपरेकॉर्डमध्ये भरलेल्या क्रॅसेटमध्ये जर आपण मनाचे श्लोक रेकॉर्ड केले, तर त्यातून `कहो ना प्यार है' असे ऐकायला मिळणार नाही. आपले मन प्रसन्न व उत्साही राहायला हवे असेल तर आपण सकारात्मक, आशादायी गाण्यांची निवड करून ती नियमित ऐकली तर त्याचा खूपच लाभ जाणवेल. चांगल्या गोष्टी तुमच्याकडे आकर्षिल्या जातील. दिवसभर ताजेतवाने, आनंदी, उत्साही राहता येईल. संगीताच्या आधाराने वैशिष्ट्यपूर्ण बांधणी केेलेल्या गाण्यांमधून, त्यातील शब्दांतून वातावरणनिर्मिती होत असते आणि त्या त्या मन:स्थितीत (मूडमध्ये) ऐकणारा जातो. आपल्या दिनचर्येत सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रार्थता, स्तोत्रे, भूपाळी, आरती, शेजारती इत्यादींतून परमेश्वराची संगीत आराधना करण्याचे संस्कार मनावर करण्याची धर्मशास्त्रीय परंपरा आहे. एकतारी, टाळ, मृदंगाच्या साथीने भजनाचा कार्यक्रम आपल्या ग्रामसंस्कृतीचाही एक घटक आहे. रसाळ, सात्विक, मधुर, तालबद्ध आणि अर्थपूर्ण अशी संतांची वचने भजनांतून गाणे हा, रोजचे कष्टप्रद जीवन सुसह्य करण्यासाठी फार मोठा विरंगुळा आहे.
जे संगीत हृदयाच्या तारा छेडते ते अक्षय संगीत. ज्या गीतांचे शब्द कोणत्याही कालखंडातील, कोणत्याही परिस्थितीतील, माणसाच्या भावनेला साद घालतात, ते अक्षय शब्द आणि त्या उभय संस्कारातून आलेली गीते अक्षय असतात. कित्येक वर्षांपूर्वीचे `मोगरा फुलला' हे गीत आजही अक्षय आहे. एक एका गाण्याचे स्वत:चे तेज व सामर्थ्य असते, जे आपल्या मनावर विशेष रूपाने संस्कार करीत असते. उदाहरणार्थ ही काही सकारात्मक गाणी - `वंदे मातरम्', `होंगे कामयाब एक दिन', `जिंदगी एक सफर है सुहाना', `आसमां को धरती पे लानेवाला चाहिए', `जीवनमें तू डरना नहीं', `हस तू हरदम, खुशी हो या गम'- त्याचप्रमाणे ही काही आशावादी गाणी - `आनंदी आनंद गडे', `आनंदाचे डोही आनंद तरंग', `या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे', `माझे गाणे हे तर माझे नित्याचे गाणे', `फिटे अंधाराचे जाळे', `आकाशी झेप घे रे पाखरा', `झटकून टाक जीवा', `जीवनात ही घडी अशीच राहू दे' इत्यादी.
वाचकहो, संगीताची महती कितीही वर्णन केली तरी अपुरीच! आरंभी एक संस्कृत वचन उद्धृत केले आहे, एका संस्कृत वचनानेच समाप्ती करते.
साहित्यसंगीतकलाविहीन:
साक्षात् पशु: पुच्छविषाणहीन:
तृणन् न खादन् अपि जीवमान:,
एतेही भाग्यं परमं पशूनाम ।।
साहित्य-संगीत इत्यादी कलांमध्ये रस नसलेला माणूस म्हणजे शेपूट आणि वशिंड नसलेला पशूच होय. नशीब त्या पशूंचे की, (त्यांच्या वाटणीचे) गवत तरी न खाता तो जगतो.
संगीताच्या संगतीने आपण आपले अनमोल आयुष्य आनंदमय करूया.
- सुधा आपटे,(वय ९३)
`राधाई' नृसिंह मंदिराजवळ, कोर्टामागे, किल्लाभाग, मिरज (जि.सांगली)


दि.२५ डिसेंबर २०१४ रोजी बलवडी (भाळवणी) ता.खानापूर येथे स्थानिक साहित्य संमेलन झाले. याप्रसंगी अध्यक्षपदावरून डॉ.आ.ह.साळुंखे यांनी प्रगट केलेल्या मनोगताचे संकलन.....
अनुभव घ्या, चिकित्सा करा
येरळा नदीकाठच्या या संमेलनाविषयी माझ्या मनांत वेगळेच ममत्व आहे; कारण माझी वडिलोपार्जित शेती याच येरळेच्या काठी थोड्या अंतरावर आहे आणि या नदीचे पाणी पिऊनच माझे बालपण गेले आहे. जगाच्या पाठीवर अन्यत्र कोठेही काही सन्मान प्राप्त झाला तरी, स्वत:च्या घरातील कौतुकाचा सोहळा म्हणून मला आजच्या सन्मानाचा विशेष आनंद होत आहे.
प्राचीन वाङ्मय सोडल्यास मधल्या प्रदीर्घ काळात ग्रामीण भागात अशिक्षितपणामुळे लिखित स्वरूपात साहित्यनिर्मिती झाली नसेल. शेकडो वर्षे ग्रामीण भागातील बहुजन समाज शाळेच्या शिक्षणापासून वंचित राहिला. पण त्याच्या अंत:करणातील ऊर्मी दडपून राहिली नाही. ती वेगळया माध्यमांतून प्रगट झालीच! कधी ती जात्यावरील ओव्यांच्या रूपाने प्रासादिक स्वरूपात प्रगटली, कधी मोटेवरच्या किंवा औतावरील गाण्याच्या रूपाने प्रगट झाली. ते खरेखुरे आणि अस्सल साहित्यच होते. लिखित स्वरूपात नसल्याने पाठांतरातून ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे प्रवाहित झाले; नाही असे नाही! पण त्यास मर्यादा होत्या. बरेचसे अस्सल प्रतिभासंपन्न साहित्य लुप्त होऊन गेले, हे आपले दुर्दैव आहे.
ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांच्या उदयानंतर ग्रामीण भागातील उपेक्षित जनतेला,- विशेषत: स्त्रियांना-शिक्षणाची दारे किलकिली झाली आणि मग ग्रामीण प्रतिभा फुलू लागली. नव्या पिढीतील मुलामुलींच्या शिक्षणामुळे त्यांचे क्षेत्र विस्तारित झाले. शब्दसामर्थ्याची जाणीव झाली आणि बालपणापासून भोगलेल्या सुखदु:खाला धुमारे फुटू लागले. पूर्वी शहरात बंद खोलीमध्ये बसून, पांढरपेशा वर्गाकडून ग्रामीण साहित्याची निर्मिती होत होती. ती कृत्रिम वाटे. आजही टीव्हीवरच्या मालिकांतून काही ग्रामीण पात्रे जी भाषा बोलतात, ती अस्सल ग्रामीण नसते. ती शहरी लेखकाने, शहरी कलाकाराने तोडमोड करून उच्चारलेली नाटकी भाषा असते. आणि म्हणून ते तकलुपी ग्रामीण साहित्य जनमानसावर ठसा उमटवू शकत नाही.
नव्या ग्रामीण पिढीला त्यांच्या हृदयाचा हुंकार व्यक्त करण्यास प्रोत्साहन द्यायला हवे. खरं तर अशा साहित्य-मेळयाचे अध्यक्षपद आम्हा थकल्या-भागल्या मंडळींना देण्यापेक्षा एखाद्या नवोदित, तरुण साहित्यिकाला द्यायला हवे. अशा नव्या साहित्यिकांची व त्यांच्या साहित्याची चर्चा व्हायला हवी. आमच्यासारख्यांना कुठेतरी चार सन्मान-बहुमान मिळालेलेे असतात, त्यांनाच पुन्हा इथे प्रमुख पद देण्याऐवजी ते नव्या उमेदीच्या व्यक्तीकडे देऊन त्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. पिकल्या पानांना गळू द्या मग त्या जागी नवी पालवी फुटू शकेल. त्याच साहित्यामधून कृतज्ञता आणि काळजाचा सुगंध दरवळेल. आपले दु:खमय लाचारीचे जीवन क्षणभर विसरून आपल्या भावभावना ते व्यक्त करू लागतील. या कामी अशी छोटी संमेलने, परिसंवाद, चर्चासत्रे ही उर्जास्थळे ठरतील; नेमकी दिशा दाखविणारे दीपस्तंभ ठरतील.
मागे एकदा मी स्पेनमधील एका हॉटेलच्या दारात उभा होतो. गगनचुंबी हॉटेलच्या खूपच उंचावर आमची खोली होती. आमची लिफ्ट नेमकी वरच अडकली होती. लिफ्टची वाट पाहून आम्ही कंटाळलो. एवढ्यात एक अपंग तरुण व्हीलचेअरवरून आमच्या लिफ्टजवळ आला. त्याने क्षणभर या लिफ्टची वाट पाहिली आणि झर्रकन् व्हीलचेअरची दिशा बदलून पलीकडे गेला. नवल म्हणजे त्या एकाच खांबाच्या भोवती एकूण चार लिफ्ट्स् होत्या. आमच्या ते लक्षात आले नाही. तो अपंग युवक मात्र आमच्या कितीतरी आधी वरच्या मजल्यावर पोचला. संधीची वाट पाहात आपण बंद लिफ्टच्या दारात ताटकळत थांबून गतिशून्य होण्यापेक्षा, वेगळया वाटा शोधून उंच जायला हवे, भरारी घ्यायला हवी.
नवोदित साहित्यिकांना आणखी एक आवाहन करू इच्छितो की, तुम्ही परीटघडीच्या, शहरी साहित्यिकांचे, किंबहुना माझ्यासह कुणाचेही अनुकरण  अजिबात करू नका. ते उष्ट्या पत्रावळीवर बसल्यासारखे होईल. असा उष्टेपणा नको. तुमचे खरेखुरे स्वत्व प्रगट करा. आज जगात ७०० कोटि लोक आहेत, शतकानुशतकांत असंख्य अगणित लोक होऊन गेले. यापुढच्या काळातही अब्जावधी लोक जन्म घेणार आहेत. पण आश्चर्य म्हणजे यापैकी एकाचेही अंगठ्याचे ठसे एकासारखे दुसरे नसतात. निसर्गाची ही अद्भूत किमया चकित करते. मग आपले लेखन दुसऱ्यासारखे असावे हा अट्टाहास कशाला? तुमची स्वत:ची स्वतंत्र शैली, तुमची उस्फूर्त प्रतिभा आहे, तशीच प्रगट करा म्हणजे त्या निर्मितीला अस्सलपणाचा सुगंध येईल. आपल्या अवतीभवती असंख्य घटना घडत असतात. अगणित अनुभव उमलत असतात. ते वस्तुनिष्ठ पद्धतीने समजून घ्या. जिज्ञासा सदैव तेवती ठेवा. एक नवा शब्द म्हणजे एक नवा मित्र समजा. जोपर्यंत आपल्या मनी जिज्ञासा जागृत असेल तोवरच तुमची निर्मितीची ऊर्मी जिवंत राहणार आहे.
मी प्रदीर्घ काळ कवि कालिदासाचे मेघदूत शिकविले. त्याने अतिशय वेधकपणे लिहिलेला निसर्ग विद्यार्थ्यांना शिकवायचा प्रयत्न केला. उगवतीचे आकाश, तिथला पूर्वरंग, मावळतीच्या रंगछटा, खळाळत्या नद्या, हिमाच्छादित बर्फशिखरे, झाडावर फुलणारी कोवळी पालवी, असंख्य फुलांचे रंगरूप, आकार, सुगंध.... मित्रहो, जग फार सुंदर आहे. आपली सुखदु:खे, यातना, व्यथा बाजूला ठेवा. निसर्गाला साद द्या. मग बघा तुमचे जीवन कसे आल्हाददायक बनते!
मी सातारा शहरात राहतो. अगदी शहराजवळ नसली तरी, थोड्या अंतरावरून कृष्णा नदी वाहते. एकवेळ माझ्या वर्गात विचारले, `तुमच्यापैकी कितीजणांनी महापूर पाहिला आहे?' मला वाटले होते की सगळया वर्गाची बोटे वर होतील, पण नवल म्हणजे बव्हंशी मुला-मुलींनी महापूरच पाहिला नव्हता. निसर्गाकडे अशी पाठ फिरविणे म्हणजे करंटेपणा ठरेल, हे आपणास कधी कळणार आहे? समोरचा माणूस असा का वागतो याचासुद्धा अभ्यास करता आला पाहिजे. मानवी मन, भावभावना हा एक अत्यंत क्लिष्ट आणि अनाकलनीय विषय आहे. मी एका उच्चाधिकार समितीवर होतो. धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी एक बैठक चालू होती. याप्रसंगी एक ज्येष्ठ प्राध्यापक अचानक खूपच उद्धट भाषेत अद्वातद्वा बडबडू लागले. मला खूप राग आला. त्यांची कानउघाडणी करून त्यांना बैठकीतून बाहेर पाठवावे असे क्षणभर वाटले, पण मी संयम पाळला. नंतर मला समजले की त्यांच्या मेंदूमध्ये ट्यूमर झाला असून पुढच्याच आठवड्यात शल्यक्रिया आहे. त्यामुळे त्यांचे सध्या मानसिक संतुलन ढळले आहे. मग मात्र मला मनापासून वाटले की, आपण संयम पाळला हे किती बरे झाले! माणसाला माणसाने समजून घ्यावे. तो असा का वागतो, याची चिकित्सा करायला शिका; म्हणजे असंख्य माणिकमोती तुमच्यासमोर उघडी होतील. त्याला शब्दरूप देता येईल.
समुद्र न पाहता समुद्राचे वर्णन करू नये. स्वत: गड-किल्ले-डंोंगर-नद्या-समुद्र पहा. निसर्गाचे रौद्र रूप, सौम्य रूप, नाना रंग, रसिकतेने पहा आणि कागदावर ती शब्दशिल्पे उमटवा. बधीरपणे जगाकडे बघाल तर तुम्हाला काहीच सुचणार नाही.
पेरणीची घात कधी येईल हे शेतकऱ्याला नेमके कळते. गृहिणीला नेमके समजते की चुलीवरील पदार्थ अजून शिजला नाही. तो कच्चा राहता उपयोगी नाही, आणि तो करपून जाताही उपयोगी नाही. लेखनाच्या बाबतीतही अशी जागरूकता हवी. नवोदित साहित्यिकांना मी एक कानमंत्र देऊ इच्छितो, रात्री स्फुरलेली कविता उद्याच्या अंकात छापली गेली पाहिजे असा उतावीळपणा नको. एखादा चित्रकार चित्र काढतो, आणि त्याची रंगसंगती व समतोल काही दूर अंतरावर जाऊन ते निरखतो. त्याचे मर्म समजून घ्या. आपले लेखन असेच जरा `दुरून' वाचा. मित्रांना दाखवा, त्यावर चर्चा करा. साहित्यनिर्मिती व तिचे प्रकाशन ही एक प्रक्रिया असते. त्याकरिता पुरेसा वेळ दिला पाहिजे. तोंडावाटे पोटात घेतलेल्या अन्नाच्या घासावर अनेक पाचकरसांची नीट प्रक्रिया झाली तरच ते अन्न पचते, त्याचे रक्त बनते, त्यातून उर्जा मिळते. त्याचप्रमाणे प्रत्येक स्वतंत्र साहित्याचे असते. त्यासाठी कुणाचे अनुकरण करू नये. स्वत:चे अनुभव, आणि मेंदू यांचा तर्कनिष्ठ वापर करावा.
एक मजेशीर प्रसंग  सांगावासा वाटतो. उंच डोंगरावर एक देऊळ होते. एक भक्त दर्शनासाठी आला. पायथ्याशीच त्याला चपला काढून ठेवायला सुचविण्यात आले. भक्ताच्या मनात आले की, डोंगर चढून दर्शन घेऊन परत येईपर्यंत चपला जागेवर सुरक्षित राहतील का? मग त्याने काय केले की, बाजूच्या झुडपावरील काही पाने-फुले तोडून ती चपलावर ठेवून, चपला लपवून ठेवल्या. तो भक्त डोंगरावर चढून गेल्यावर, दुसरे काही भक्त पायथ्याशी आले. त्यांनी पाहिले की इथे आणखी एक देवस्थान असावे. त्यांनी पण त्या ढिगावर आणखी फुले वाहिली. उदबत्ती लावली. असे करता करता तिथे पानाफुलांचा ढीग झाला. पहिला भक्त परत आला. त्याला दिसले की, चपला सुरक्षित आहेत पण अंधपणातून नको ते निर्माण झाले आहे. असे आंधळेपणाने तुम्ही वागू नका. चिकित्सक वृत्तीने सर्व कार्यकारण भाव तपासून बघा म्हणजेच तुमचे लेखन निर्दोष होईल.
गृहिणी कोथिंबिरीची जुडी घरी आणते. भाजी शिजविताना त्या काड्या जशाच्या तशा भाजीत टाकत नाही. मुळाची माती धुवून घेते, किडलेली पाने काढून टाकते, चांगली धुवून घेते, मगच शेलकी एकदोन काडी आणि चार पाने भाजीत टाकते. तेवढ्याने तुमच्या प्रत्येक घासाला रुची येते. साहित्यनिर्मिती करताना डोक्यात घुसणारा कचरा बाजूला करता आला पाहिजे. मिळेल तेथून माहिती घ्या. पण ती तपासून, गाळून, घासून पुसून घ्या आणि मगच ती वापरा.
तरुण नवसाहित्यिकांना एवढेच सांगायचे आहे की, मोठी झेप घेण्यासाठी व्यासंग जपा, डोळस रहा, स्वत:ची स्वतंत्र शैली जपा, प्रतिभा जपा, भरभरून समाजाला द्या, स्वत: समृद्ध व्हा, समाजाला समृध्द करा, खोट्या प्रतिष्ठेच्या मागे लागू नका, शांतपणे काम करीत रहा. म्हणजे तुमचे काम हिणकस नसेल; ते निखळ अस्सल असेल. मग प्रसिद्धी-प्रतिष्ठा आपोआपच तुमच्याकडे चालत येईल.


औदुंबर (ता.पलूस) येथे सदानंद साहित्य मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या ७२व्या साहित्य संमेलनप्रसंगी माजी न्यायाधीश श्री.नरेंद्र चपळगावकर यांनी केलेल्या अध्यक्षीय भाषणाचा गोषवारा....
सच्च्या अनुभवांचे साहित्य हवे
` शहरी साहित्य संमेलनांमध्ये अलीकडच्या काळात एक प्रकारची औपचारिकता आणि काहीसा उत्सवी उन्माद येत चालला आहे. त्यामुळे संमेलन भरविण्यामागचा मूळ हेतू बाजूला पडून, नको त्या गोष्टींचा ऊहापोह तिथे होत राहतो. त्यामुळे साहित्यप्रेमींचा त्यामधील आनंद नष्ट होत चालला आहे, असे चित्र दिसते. त्यामानाने ग्रामीण परिसरात भरणारी अशी संमेलने रसिकांना खऱ्या अर्थाने विचारांची मेजवानी देतात, असे माझे निरीक्षण आहे.
गेल्या काही वर्षांत महाराष्ट्नमध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय परिवर्तन झपाट्याने घडत आहे. त्यामुळे अवघी समाजरचनाच ढवळून निघत आहे. जुने विचार-रूढी-परंपरा अस्तंगत होत असून, नवीन जीवनप्रणाली मूळ धरत आहे. आमच्या लहानपणी पहाट उगवायची ती जात्यावरील प्रासादिक गाण्यांनी. आज जातीच अस्तित्वात राहिली नाहीत. कधीतरी चुकूनमाकून राजगिऱ्याचे पीठ करण्यापुरते अपवादात्मक जाते यंत्राने फिरत असेल. एरव्ही ते इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे स्वाभाविकच जात्यावरील ओव्या अस्तंगत होऊ घातल्या आहेत. मोट तर आता कुठेच आढळत नाही. उत्स्फूर्तपणे स्फुरणारे अस्सल काव्य हरवत चालले आहे. पारंपरिक गीते आळवून कृषीप्रधान संस्कृतीमधील कष्टकरी आपले कष्ट त्याद्वारे सुखकर करीत होता. तो निखळ आनंद आता हरवत चालला आहे. पूर्वीच्या काळात खूप शारीरिक कष्ट असले तरी काही निवांत क्षणही लाभत. सध्याची जीवनशैली सकाळपासून रात्रीपर्यंत घड्याळाच्या तालावर धावणारी आहे त्यामुळे साहित्य, संगीत, सुखसंवाद अशा आनंदक्षणांपासून ती दूर चालली आहे. भावनांना वाट करून देणारे साहित्य आज येत नाही.
प्रेमाची अभिव्यक्ती हळुवारपणे व्हायला हवी, तरच त्यामधील पावित्र्य व उत्कटता टिकून राहते. पूर्वी प्रेमभावना व्यक्त करताना `रानात सांग कानात आपुले नाते, मी भल्या पहाटे येते' अशी हळुवार सुकोमल भावना एकांतात व्यक्त होत असे. आज बघावे तर वीस-पंचवीस तरुण, आडवा-तिडवा नाच करीत प्रेमगीते गातात आणि `लव हो गया' असे सांगतात. प्रेमातील तरल कोमल भावनाच चुरगाळून जाते.
सध्या वाचनसंस्कृती खूपच रोडावली आहे. आमच्या महाविद्यालयीन शिक्षणाचा काळ हा माझ्या मते मराठी साहित्यातील सुवर्णकाळ होता. अरविंद गोखले, व्यंकटेश माडगूळकर, श्री.ज.जोशी, पु.भा.भावे, गंगाधर गाडगीळ असे एकाहून एक कथाकार सुंदर लघुकथा लिहीत. खांडेकर-फडके यांच्यासारख्यांच्या कादंबऱ्यांनी सगळे साहित्यक्षेत्र व्यापून टाकले होते. कवी कुंजविहारी, यशवंत, बोरकर, अनिल असे कितीतरी प्रतिभासंपन्न कवी आशयघन कविता लिहीत होते. त्यावेळची पिढी या साहित्यावर अक्षरश: तुटून पडत होती. त्यावेळच्या कविता एकदा-दोनदा-तीनदा कितीही वेळा वाचल्या तरी त्यांची गोडी कमी होत नसे, आणि त्या कविता सहजच पाठ होऊन जात. आज पन्नास-साठ वर्षांनंतरही त्या कविता मला मुखोद्गत आहेत. हे त्या साहित्यामधील प्रतिभेने व जिवंतपणामुळे झाले. तसे साहित्य, तशा कविता या काळात का लिहिल्या जात नाहीत? लोकांची वाचनाची आवड दिवसेंदिवस कमी होत आहे. साहित्यामधील तो आनंद शहरीकरणामुळे हरवत चालला आहे. म्हणून मला असे वाटते की, नव्या उमेदीच्या साहित्यिकांनी काल्पनिक शहरी वातावरण कृत्रीमरित्या आपल्या साहित्यामधून रेखाटण्यापेक्षा, वास्तव खरेखुरे जीवन अनुभवावे व ते अनुभव शब्दांकित करावेत.
मी त्या काळात व्यंकटेश माडगूळकरांचे `माणदेशी माणसे' किंवा `बनगरवाडी' वाचली. आमच्या परिसराशी किंवा निजामाच्या सत्तेखालील आमच्या मराठवाडी वातावरणाशी सर्वस्वी भिन्न अशा माणसांचा त्यातून परिचय झाला. `माणदेशी माणसे'मधील `झेल्या' असो, `तांबोळयाची खाला' असो - त्यांची ओळख लेखनातून झाली. अशीही गावे असतात, अशीही माणसे असतात ही दृष्टी आली. असा ठसा उठवून जाणाऱ्या साहित्याची निर्मिती व्हावी असे मला वाटते.
तुम्ही पश्चिम महाराष्ट्नतली मंडळी ब्रिटिशांच्या काळात केवळ एकच गुलामगिरी सोसत होता; आम्ही दुहेरी गुलामगिरीत होतो. एका बाजूला इंग्रजांचे राजकीय पारतंत्र्य होते, तर दुसरीकडे सांस्कृतिक पारतंत्र्य होते. मराठी माध्यमातून शिकता येत नव्हते. उर्दूचा सासुरवास होता. निजामाची जुलमी राजवट, रझाकारांचे अत्याचार, त्याविरुद्ध झालेला उठाव-आंदोलने या परिस्थितीत आमचे बालपण आणि विद्यार्थीदशा गेली. निजामाच्या अन्यायाविरुद्ध आंदोलन पुकारले, म्हणून माझ्या सज्जन वडिलांना हातकड्या घालून तुरुंगात टाकण्यात आले. माझ्या वडिलांप्रमाणे हजारो ज्ञात-अज्ञात क्रांतिकारकांनी आंदोलन केले, देहदंड सोसले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ही मंडळी प्रकाशात यायला हवी होती, त्यांचा सन्मान व्हायला हवा होता; पण तसे झाले नाही. ती मंडळी अंधारातच राहिली. म्हणून मला वाटले यांना प्रकाशात आणायला हवे - नव्या पिढीला त्यांच्या त्यागाची महती सांगायला हवी; म्हणून मग मी व्यक्तीचित्रणे लिहू लागलो. एका पाठोपाठ अशा उपेक्षितांची व्यक्तिेचत्रणे प्रकाशित केली. मला कवितेचे वेड होते. मला बोरकरांच्या, कुसुमाग्रजांच्या कविता खूप आवडायच्या. आपणही कविता लिहाव्यात असे वाटले. तसा प्रयत्नही केला, मग लक्षात आले की तो काही आपला प्रांत नव्हे. मग मी थांबलो.
न्यायाधीश होण्यापूर्वी मी वकिली केली. त्यावेळच्या काही भेदक आठवणी आहेत. मी ते शब्दांकित केले. एके दिवशी एक अत्यंत दरिद्री बाई आमच्या घरी आली. लुगड्याला सतरा ठिकाणी गाठी-डोळयांत असाहाय्य व्याकूळता. मी घरी नव्हतो. ती बाई बायकोला म्हणाली, ``ताई मला झाडू द्या. सगळं आवार झाडून काढते.'' तिने प्यायला पाणी मागितले आणि घटाघटा तांब्या रिकामा केला. बायकोच्या लक्षात आले की ती दुर्दैवी बाई दोनतीन दिवस जेवलेली नसावी. मग तिला पोटभर जेवायला घातले. थोड्याच वेळात मी घरी आलो. अत्यंत दीनपणे तिने आपली कैफीयत मांडली आणि जीर्ण वस्त्राची एक गाठ सोडून तीनशे रुपये माझ्यापुढे ठेवले. म्हणाली,`माझ्याजवळ सध्या एवढेच आहेत, पण माझी केस नाकारू नका. मी जमेल तशी तुमची फी देईन.' मला कळवळून आले. तिला म्हटले, ``बाई, काळजी करू नका. आणखी पैसे देऊ नका. मी केसचा अभ्यास केलाय. नक्की तुमच्यासारखा निकाल होईल. तुम्ही खुशाल घरी जा. पुढच्या तारखेला यायची पण गरज नाही.'' बाईचा विश्वास बसेना. ती घरी गेली. कुणीतरी तिचे कान फुंकले, `बाई गं, ज्याअर्थी हा वकील पैसे घेत नाही, तारखेला येऊ नको म्हणतो, त्याअर्थी वकील फुटला आहे. शहाणी असशील तर दुसरा चांगला वकील दे.' आता या कर्माला काय म्हणावे? गाय कसायाला धार्जिणी म्हणतात तो प्रकार. मला वाटले अशा प्रसंगावर आपण लेखन करावे. वास्तवाचा संदर्भ असल्याने हे लेखन अस्सल उतरले.
निजामाच्या संस्थानकाळात मेहंदी मिर्झा नावाचे एक बडे अधिकारी होते. त्यांना भेटायला एक गरीब विद्यार्थी गेला. आपली कर्मकहाणी सांगितली. शिकण्याची इच्छा सांगितली. वस्तुत: हा मुलगा आंदोलनाची पार्श्वभूमी असणाऱ्या घरातला होता. त्याला साहाय्य करणे म्हणजे कदाचित निजामी राज्यद्रोह ठरला असता. पण मेहंदी मियानी त्या मुलाला आश्रय दिला. आपल्या आऊटहाऊसमध्ये राहण्याची सोय केली. कारभाऱ्याला सूचना केली की, त्याला आपल्या हवेलीतून सकाळ-संध्याकाळचे जेवण द्या. तो मुलगा जेवला आहे अशी खात्री झाल्यानंतरच मिर्झासाहेब स्वत: जेवत. पुढे तो मुलगा आंध्र प्रदेशचा सचिव झाला. मला वाटून गेले की, मेहंदी मिर्झासाहेब नव्या पिढीला माहीत व्हायला हवेत, म्हणून मी त्यांचे व्यक्तिेचत्र रेखाटले.
मी न्यायाधीश झाल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान कै.नरसिंहराव यांच्याशी संपर्क आला. तेही जुन्या हैदराबाद राज्यातले. हैद्राबाद संस्थानच्या चळवळीत देहदंड व यातना सोसलेले एक गरीब देशभक्त माझ्या माहितीत होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर हे गृहस्थ बाजूला पडले. एकाकी जीवन जगू लागले. आर्थिक विपन्नावस्था आली. मला वाटले की, अशा या व्यक्तीचा स्वतंत्र भारतात सन्मान व्हायला हवा. म्हणून मी मा.नरसिंहरावांना त्याची कहाणी सांगितली. त्यांनी मला निरोप दिला की, अमूक तारखेला मी हैदराबादला जात आहे, त्या गृहस्थांना मला भेटायला निरोप द्या. आश्चर्य म्हणजे ते गृहस्थ पंतप्रधानांना भेटलेच नाहीत. `माझ्यासारख्या कफल्लक माणसाला या देशाचे पंतप्रधान कशाला बोलावतील? निरोपात काहीतरी गफलत असावी.' असे म्हणून स्वस्थ राहिले. कलेक्टरने बोलावलं तर माणसं धावतपळत जातात, त्या जगातयाला काय म्हणावे?  हे साहित्यरूपात यायला हवं. माझ्या प्रदीर्घ जीवनात अशा कितीतरी आठवणी आहेत. प्रसंग आहेत ते सर्वांना कळायला हवेत म्हणून त्यांना शब्दरूप द्यायला हवे, अशी माझी धारणा आहे आणि माझ्या मते तेच खरेखुरे साहित्य ठरेल.
आपण मंडळी ग्रामीण भागात राहतो. कृषीप्रधान संपन्न असा नदीकाठ कूस बदलत आहे. नवे संशोधन, नवीन प्रयोग, नवीन उत्पादन यामुळे येथे संपन्नता येत आहे, मुलेबाळे उच्चशिक्षित होत आहेत. तरीही एक वर्ग उपेक्षित राहात आहे. ही अवस्था तुम्ही शब्दात पकडा, साहित्यांत आणा; माझ्या मते ती काळाची गरज आहे.
(वृत्तांकन-मोहन जी. आळतेकर,
किर्लोस्करवाडी
(मोबा.९४२११८४९९६)

संकल्पाकडून सिद्धीची अपेक्षा
नव्या सरकारच्या नव्या अर्थसंपल्पाचे वेध आता लागले आहेत. गेले सात-आठ महिने मोदींचे नवे सरकार केवळ नवेपणाच्या वातावरणात वावरले आहे. जनतेलाही तशी घाई नव्हती, पण ज्या प्रकारे आधीच्या वल्गना केल्या गेल्या त्या ऐकल्यानंतर, सर्व बदल फारच झपाट्याने होतील अशी चुकीची आशाही होती. त्याचबरोबर एका बाजूला हे सर्व बदल इतक्या झटपट होतील असे वाटतही नव्हते, तसे ते बदल घडलेलेही नाहीत. परंतु आठ महिन्यांच्या कारभारानंतर अजूनही ज्या आवेशाने नियोजनाची दिशा मांडली जात आहे ती ऐकल्यानंतर, आणखी वेळ द्यायला जनतेची हरकत नसावी. देशाची बिघडलेली परिस्थिती साऱ्यांनाच माहिती आहे आणि जाणत्या मंडळींना हेही ठाऊक आहे की, कोणतीही गोष्ट बिघडण्यास साठ वर्षे लागली असतील तर ती सुधारण्यास शंभर वर्षे लागतील, पण निदान ती दिशा पकडण्यास किमान चार वर्षे तरी द्यायला हरकत नाही. त्या दृष्टीने येता अर्थसंकल्प महत्त्वाचा ठरू शकेल.

अलीकडच्या तीन-चार महिन्यांत महागाई आटोक्यात असल्याचे जाणवते. परंतु त्याला मुख्य कारण खनिजतेलाचे ढासळते भाव हेही आहे. हे भाव उतरण्याला भारत सरकार नव्हे तर अमेरिका आणि अन्य देश कारणीभूत आहेत. अरब आखातातील खनिजतेलांना मुख्य ग्राहक अमेरिका, चीन आणि इतर संपन्न देश असत. अमेरिकेने स्वत:च्या आणि क्रॅनडाच्या किनाऱ्यावर संशोधनाची जोरदार मोहीम उघडून खनिजतेलाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याचा चंग बांधला आहे, त्याला बऱ्यापैकी यश येत आहे. त्यामुळे अरब देशातील तेलविहीरींवर अमेरिका आता खूपच कमी अवलंबून आहे. चीनने त्याच्या दक्षिण समुद्रात तेलाचे साठे खोदण्यास सुरू केले आहे. शिवाय तेल बचतीसाठी वाहनांवर नियंत्रण ठेवण्याचे कसब तेथील राजवट दाखवू शकते. या दोन्ही कारणांनी चीनने अरबस्तानातून तेलखरेदी खूपच कमी केली आहे. या जागतिक परिस्थितीमुळे अरब देशातील तेलाला पुरेसा ग्राहक नाही, मागणी कमी झाल्यामुळे तेलाचे भाव कोसळत चालले आहेत. रशियात तेल उत्पादन होते त्यालाही या मंदीचा फटका बसत आहे. या सर्व कारणांनी तेलाच्या किंमती उतरत चालल्यामुळे भारतात फील गुड वातावरण येऊ लागले आहे. पण त्यात सरकारचे किंवा कोणत्याही प्रशासनाचे कर्तृत्व नाही.
त्याउलट रशियासारख्या देशात मंदीचे वातावरण असल्यामुळे तिथे होणारी भारताची निर्यात कमी झाली आहे. याही कारणाने भारताच्या अर्थव्यवस्थेला अडचण येऊ शकते. गेले वर्ष दुष्काळ येईल असा प्राथमिक अंदाज होता पण पावसाने खैर केली आहे. अर्थात यातही सरकारची काही कामगिरी नाही. एकंदरीत देशातल्या नव्हे तर देशाबाहेरच्या कारणांनी महागाई रोखली गेली असून अद्यापि अर्थव्यवस्था सुरळीत झाली असे म्हणता येणार नाही. उलट तेलाचे दर चढत होते, त्यावेळेला त्या गतीने आपल्या देशातील तेलाचे दर वाढविता येत नसत. कारण त्यास त्यावेळच्या भाजपासह सर्व पक्षांचा जोरदार विरोध होत असे. आता मात्र ज्या गतीने खरेदी तेलाचे भाव उतरत आहेत त्या गतीने ते आपल्या देशात उतरवता येत नाहीत. १२३ डॉलर्स प्रति पिंप असा खरेदी दर होता त्यावेळी आपल्या देशात पेट्नेल साधारण ८० रुपये होते. आज खरेदी दर एक तृतीयांश झाला आहे. त्या हिशोबाने देशातला पेट्नेल दर २७ रुपये व्हायला हवा होता, तो ६५ रुपयाच्या घरात आहे. तरीही देशातले लोक पेट्नेलचा भाव उतरला म्हणून खुशीने गाड्या पळवीत असतात. अर्थातच या कारणांनी या सरकारला जनतेचा दुवा मिळत असेल तर त्याबद्दल हळहळण्याचे काहीच कारण नाही, उलट सरकार खरेच काही बदल करू इच्छित असेल तर त्यास ही अनुकूलता लाभल्याबद्दल त्याचे अभिनंदनही करावयास हरकत नाही.

मुद्दा असा की, ह्या अनुकूलतेचे परावर्तन येत्या अर्थसंकल्पात जनतेला दिसले पाहिजे. संरक्षण-शिक्षण-आरोग्य यासारख्या गरजा आपल्या देशात अद्यापि मूलभूत अशा मानल्या जात नाहीत. उद्योगीकरण ग्रामीण पातळीपर्यंत पोचले पाहिजे. त्याचबरोबर शेतीला खूप प्रोत्साहन मिळाले पाहिजे. उद्योगीकरण म्हणजे अनुदानांचे वाटप आणि शेतीला प्रोत्साहन म्हणजे ऊस आणि द्राक्षांवरच्या सवलती वाढविणे असा चमत्कारिक अर्थ करून मूळ दुखणे दुर्लक्षित होते. पोटात क्रॅन्सर बाळगून चेहऱ्याला रंगरंगोटी करावी तशातला हा प्रकार होतो. मूळ दुखण्याचे निदान एव्हाना मोदी सरकारला झाले असेल अशी पुरेपूर आशा आहेे. आता अपेक्षा आहे ती या निदानाबरहुकूम उपचार सुरू होण्याची.

पंतप्रधान मोदी आपल्या प्रत्येक भाषणात जनतेकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त करीत असतात. लोकशाहीप्रधान देशात लोकांचा सहभाग अत्यावश्यक आहेच आहे, पण सरकार लोकांना काही चांगले काम करूच देत नाही हा अनुभव अजूनी लुप्त झालेला नाही. लोकांनी सहभाग द्यावा असे नव्हे तर लोकांनीच लोकांचे काम स्वत: केले पाहिजे. मात्र प्रश्न येतो तो स्थानिक पातळीपासून दिल्लीपर्यंत सर्व प्रशासकीय यंत्रणा त्याला साथ देते काय, इथे! आपल्याकडे कोणत्याही कामाला नकार देणे किंवा आडवे पडणे किंवा दुर्लक्ष करणे या तीनच घटकांवर प्रशासन काम करीत असते. त्यांची प्रवृत्ती बदलणे हे पंतप्रधानांपासून सर्व पदाधिकाऱ्यांचे काम आहे. तिथे जनतेचा सहभाग कदापि असू शकत नाही. ते पदाधिकारी तेवढे जरी त्यांचे कार्य करत राहिले तर जनता आपापल्या भल्यासाठी पुढे येण्यास तयार आहे. कोणतीही सामाजिक चळवळ सरकारने सुरू करण्याचे कारणच नसते. सामाजिक चळवळ समाजाकडून सुरू व्हावी आणि सरकारने तिच्या पाठीशी राहावे ही लोकशाही आहे. इथे जे काही लोक चांगले करू पाहतात त्यांना विरोध करण्याचे काम प्रशासन करते आणि मोदी तर जनतेचा सहभाग मागतात. हे कसे होणार?

येत्या अर्थसंकल्पात कोणते कर कमी झाले आणि कोणते कर वाढविले याला करभरणा करणाऱ्या मर्यादित लोकांचा प्रतिसाद मिळू शकेल. आपल्या देशात अधिकांश जनता करधारणेच्या क्षेत्राबाहेर आहे. त्यांच्या दृष्टीने गावच्या वाटा चांगल्या असाव्यात, अन्न आणि बियाणे वेळेत आणि चांगले मिळावे आणि पोराची शाळा उत्तम असावी अशा सामान्य गरजा असतात. त्या भागविण्यासाठी केंद्रीय स्तरावर कोट्यवधी रुपयांचा संकल्प मांडण्यात येतो. प्रत्यक्षात गावातला माणूस आजारी पडला तर शासकीय रुग्णालयात जाण्याला स्मशानापेक्षा जास्त घाबरतो. याला अर्थसंकल्प मांडण्याची गरज नाही. अर्थसंकल्पात फार तर औषध मोफत मिळण्याची तरतूद केली जाईल. प्रत्यक्ष ही औषधे रुग्णाच्या तोंडात पडेपर्यंत प्रशासनाने काम केले पाहिजे. ही जबाबदारी अर्थसंकल्पाची नव्हे तर सामान्य प्रशासनाची आहे. औषधे मोफतच मिळावीत असे नव्हे पण ती वेळेवर आणि विश्वासार्ह मिळावीत यासाठी राबणाऱ्या कठोर प्रशासनाची तरतूद संकल्पाने करावी, तेवढ्यावर सामान्य जनता खूश होईल. संरक्षणाच्या तोफा किंवा उपग्रहावरचा खर्च यांची गरज आहेच, पण जनतेच्या दृष्टीने या अर्थसंकल्पाला वेगळा अर्थ असतो तो प्राप्त करून देण्याची जबाबदारी नव्या सरकारची आहे. तो अर्थसंकल्प केवळ मांडण्यातून काही घडेल असे नव्हे तर त्यापुढील काळात जे प्रशासन प्रत्यक्ष वाट्याला येते त्यावरच संकल्पाच्या दिशेने वाटचाल किती होते ते दिसेल. आजपर्यंतच्या कोणत्याही सरकारपेक्षा त्याबाबतच्या अपेक्षा मोदी सरकारने वाढविलेल्या आहेत इतकेच. त्या वाढलेल्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात याशिवाय नव्या वर्षाकडून काय मागणार?

गेल्या पिढीतील साहित्यिक आणि चित्रपट व्यवसायिक विश्राम बेडेकर आणि कै.ना.रा.धनागरे यांच्या हृद्य भेटीचा प्रसंग....
.......मित्रवर्य शिरोमणि.......
माझे (व डॉ.द.ना.धनागरे यांचे) वडील, वाशीमचे वकील ना.रा.धनागरे यांचा आणि विश्राम बेडेकरांचा जन्म एकाच वर्षातला १९०५चा. आमच्या बाबांचे जीवलग मित्र, प्रभातच्या `शेजारी' चित्रपटाने ज्यांचे नाव महाराष्ट्नच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले ते श्री.विश्राम बेडेकर. बेडेकर आणि बाबांची मैत्री महाविद्यालयातील जीवनापासून, म्हणजे अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयात (किंग एडवर्ड कॉलेज) शिकत असतानापासूनची होती. दोघांनीही कॉलेज गाजविले. तो काळ पारतंत्र्याचा होता. त्याचे पडसाद बेडेकरांच्या लेखणीतून आणि बाबांच्या वक्तृत्वातून उमटत होते. बेडेकरांच्या साहित्यिक चळवळी आणि बाबांच्या राजकीय व सामाजिक चळवळी, तसेच आंदोलने सुरू असायची. अमरावती शहर या मित्रद्वयींनी दणाणून सोडले होते.
अमरावतीतील शिक्षण संपल्यानंतर बाबा कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी नागपूरला गेले. वकिली व्यवसायासाठी जन्मभूमी वाशिम हीच कर्मभूमी निवडली आणि बेडेकरांनी पुण्या-मुंबईकडे धाव घेतली. त्यांना साहित्यात व कलाक्षेत्रात रस होता. दोघांच्या वाटा भिन्न झाल्या. `शेजारी'चे चित्रीकरण सुरू असताना आमचे बाबा-माई पुण्याला गेले होते. बेडेकरांच्या आग्रहावरून ते चित्रीकरण पाहायला गेले.
पुण्या-मुंबईला आले की बाबा बेडेकरांची भेट घेत. `भेटून येणं' या गोेष्टीला माई-बाबांच्या जीवनात फार महत्त्व होतं. चहापाण्याचं महत्त्व नसे. किंबहुना ते बाहेर काही खातही नसत. पण `भेट घेणं' याला फार महत्त्व देत. मुंबईला ते माझ्याकडे १९८४-८५मध्ये एकटेच आले होते. माईची सोबत १९८०मधेच सुटली होती. बेडेकर इथे असल्याची खात्री करून घेतली. नियोजित वेळी बेडेकरांच्या घरी पोहोचलो. दारात उंच, धिप्पाड, देखणे आणि साहेबी थाटातील  व्यक्तिमत्त्व उभे ठाकले. वरळीच्या त्यांच्या या फ्लॅटचा कॉरिडोर प्रचंड मोठा, लांबलचक असा होता. दिवाणखान्यापासून मुख्य दरवाजाशी यायला खूप वेळ लागत असे. त्यासाठी बेडेकरांनी `सॉरी' म्हटले.
दिवाणखान्यात गेल्यावर बेडेकरांनी बाबांना अक्षरश: मिठी मारली. बेडेकरांनी बाबांचे खांदे धरले व म्हणाले, `थांब धनागरे, मला एकदा.. एकदा तुला डोळे भरून पाहून घेऊ दे.' असे म्हणून त्यांनी बाबांना नखशिखान्त न्याहाळले आणि म्हणाले, `धनागरे, जसा होतास तसाच आहेस. तुझ्यात काहीच फरक झालेला नाही.' कितीतरी वेळ उभ्यानंच एकमेकांशी बोलणं सुरू होतं. त्यांच्या महाविद्यालयीन आठवणी, इतर अनेक मित्रांचा आवर्जून उल्लेख, एकमेकांची खुशाली सगळं भरभरून वाहात होतं. मालतीबाईही कौतुकानं त्या मित्रद्वयाकडे बघत होत्या. बेडेकर म्हणाले, `तुमच्या ह्या मुलाविषयी (म्हणजे आमचा भाऊ प्रा.डॉ.द.ना.धनागरे) वर्तमानपत्रात बरेचदा वाचत असतो. तोही तुमच्यासारखाच चळवळी करणारा दिसतोय.' असं म्हणून मोठ्यानं हसले.
बाबा आणि विश्राम बेडेकर अगदी भिन्न वातावरणात राहिले. दोघांची राहणीही भिन्न. अर्थात मैत्री ही राहणीवर नसतेच. बाबांचा वेष अगदी साधा याउलट बेडेकरांचा साहेबी थाट. सगळेच अगदी स्टायलिश! पण तरीही दोघांमधील मैत्री गाढ. स्वत:च्या प्रपंचाविषयी बोलताना ते थोडे उदास वाटले. `आम्ही दोघेच राहतो. मुले तिकडे दूर अमेरिकेत आहेत. घर मात्र एवढं मोठ्ठं! गॅलरीत बसलं की सगळया आठवणी कशा मनात गोळा होतात.' बेडेकर बोलत होते. बाबांना बेडेकर म्हणाले, ``नशीबवान आहेस तू, मुलं तुझ्याजवळ आहेत, गोकुळात आहेस. कितीही प्रसिद्धी, पैसा मिळाला म्हणून माणसाला सगळं मिळत नाही.'' एक-दीड तास गेला कळलंच नाही. दोघा मित्रांनी पुन्हा परस्परांना आलिंगन दिलं. एकमेकांचा हात हातातून त्यांना सोडवेना. भावनावेगाने ते एकमेकांकडे पाहात होते, जणू काही पुन्हा भेटू की नाही या विचाराने त्यांचे मन साशंक झाले होते. आणि तसंच झालं. १९९१ मध्ये आमचे बाबा गेले. बेडेकरांची पुन्हा भेट झाली नाही. आता बेडेकरही गेले. त्या मैत्रीतील दृढता, प्रेम, सच्चेपणा पाहणारे तसेच अनुभवणारे आम्ही साक्षीदार होतो. `मित्रवर्य शिरोमणी जैसे गंगेचे झुळझुळ पाणी' म्हणतात ते खरेच.
- सौ.मंदाकिनी शां.वरखेडकर
५,सनी साईट, माटुंगा, मुंबई १९
मोबा.९८२४२९९३१७

गरीब देशाची गोष्ट
देश स्वतंत्र झाला, जनता सुबत्तेची स्वप्ने बघू लागली. मंत्रीमंडळ जाहीर झालं. खादीधारी बगळे पाहणीसाठी दौरे काढू लागले. पाहणीचे गाडीभर गठ्ठे जमू लागले. परिस्थिती लक्षात आली नि फटाफट योजना सुरू झाल्या. मोफत विहीर, वृक्षारोपण, राष्ट्नीयीकरण, नवशिक्षण, फुकट शिक्षण, फुकट अन्न, जातीनिर्मूलन, आरक्षण, सरकारी नोकरांसाठी स्वस्त घरं... अक्षरश: हजारो योजनांचा नुसता पाऊस पडू लागला, पडत राहिला. परंतु जनतेची परिस्थिती पाण्यात बसलेल्या म्हशीसारखी जागच्या जागी ठप्प. जो तो एकमेकाला विचारायला लागला...`असं का?' कुणालाच उत्तर सापडेना. विरोधी पक्षाचे लोक म्हणाले, `परदेशी माणसं हुशार असतात. त्यातला एखादा बोलवू. त्याला सगळं तपासायला सांगू.' होकार मिळाला. एका विश्वथोर पंडिताला पाचारण करण्यात आलं.
अर्नी बुशमिलर भलताच हुशार नि बिनधास्त! त्यानं सगळं सापाच्या कानानं ऐकलं. मांजराच्या नजरेनं पाहिलं आणि वाघाच्या बुद्धीनं सगळयाचा अंदाज घेतला. गंभीर स्वरात म्हणाला, ``तपासतो, सगळया योजना तपासतो.'' ``चालेल आम्ही मदत करू.''
``नको. तुमची कुणाचीच मदत नको मी एकटा तपासेन.'' सगळे गप्प.
बुशमिलरचं काम सुरू झालं. एकेका खात्यांचे गलथान कारभार उजेडात येऊ लागले. फसवाफसवीचे-घोटाळयांचे अनंत प्रकार! बांधकाम खात्याच्या फायलीनुसार एके ठिकाणी कर्मचाऱ्यांसाठी शंभर मजली टॉवर बांधला होता. पाणी, वीज, वॉचमन, बाग, माळी यांचा मासिक खर्च लाखात होता. बुशमिलरचं कुतुहल जागं झालं. म्हणाला, ``हा टॉवर मला बघायचाय.''
सगळयांची टरकली. इतक्यात कोटीबुद्धे निश्चयानं पुढं येऊन रेटून म्हणाला, ``टू बी फ्रँक सर, देअर ईज नो सच कन्स्ट्न्क्शन सर.''.
``व्हॉट? फार भयंकर गुन्हा केला आहे तुम्ही! प्रकरण जुनं आहे. यात सगळयांचे हात गुंतले आहेत. हा करोडोंचा घोटाळा आहे. निस्तरणं कठीण आहे.''
``सोप्पं आहे सर, शिवाय यात सगळयांचा फायदा आहे सर. मी हा टॉवर पाडण्याचा हुकूम मिळवतो सर, डिमॉलिशिंग चार्जेससह. म्हणाल तेवढे डिमॉलिशिंग चार्जेस! पण..''
``पण काय?''
``फिफ्टी - फिफ्टी.''
बुशमिलरनं डोळे मिटले. मिटल्या डोळयापुढं उदंड अंधार कोसळत राहिला. आणि दुसऱ्याच दिवशी तो विश्वथोर पंडित पराभवाच्या भावनेनं खाली मान घालून मायदेशी उडता झाला.
- गोविंद मुसळे.
(टपाल खात्याच्या २०१३ सालच्या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक विजेती पोस्टकार्ड कथा)

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन