Skip to main content

16 Sept.2013 - Apale Jag

अजून ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद कशाला?
- अरुण गोडबोले
एके काळी ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादामुळे महाराष्ट्न् - विशेषत: पश्चिम महाराष्ट्न् आणि मराठवाडा - खूपच विघटित झाला होता. महाराष्ट्नच्या प्रगतीला आणि एकात्मतेला बाधा आणणाऱ्या त्या काळापासून आता आपण खूप पुढे आलो आहोत. वादाचे जुने कंगोरे काळाच्या ऐरणीवर घासून ठोकून खूपसे झिजलेले आहेत. धार्मिकतेचा पाया, आता पुरेसा ठिसूळ झालेला आहे. तरीही राजकीय स्वार्थाकरिता तो वाद पुन्हा धुमसत राहावा असे प्रयत्न राजकीय वा तथाकथित नेते अधूनमधून का होईना, पण जाणीवपूर्वक करताना दिसतात, त्याचा खेद वाटतो.
वि.द.घाटे यांचे `दिवस असे होते' हे आत्मचरित्र वाचनात आले. शिक्षण क्षेत्रातील विचारवंत, प्रतिभावंत साहित्यिक म्हणून ते गणमान्य होते. त्यांनी त्यांच्या तरुणपणी मराठा समाज संघटित होण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. त्यांनी या वादांवर आपल्या आत्मचरित्रांत दोन स्वतंत्र प्रकरणे लिहिली आहेत.
महात्मा फुले यांना मानाचा मुजरा करून घाटे यांनी त्यांच्या कामगिरीचे `अलौकिक' असे वर्णन केले आहे, `फुल्यांची चळवळ ब्राह्मणांच्या विरोधात नव्हती, तर जातीसंस्थेच्या विरोधात होती' हा निष्कर्ष मांडून घाटे यांनी लिहिले आहे, ``ब्राह्मणवर्गातसुद्धा फुल्यांचे विचार समजणारे व त्यांची कदर करणारे पुण्यास थोडेच होते, पण होते. जे होते ते मात्र शंभर नंबरी सोने होते, त्या वेळच्या सुजाण हिंदू समाजाचे सर्वमान्य पुढारी होते. फुल्यांनी १८५१ साली मुलींची शाळा काढली. िख्र्तासी नसलेल्या माणसाने काढलेली ही पहिलीच शाळा. तिच्या आठ जणांच्या कारभारी मंडळात सहा ब्राह्मण होते. त्यात कृष्णशास्त्री चिपळोणकर प्रमुख होते. छोट्या शास्त्रीबुवांना फुले समजले नाहीत, पण मोठ्यांना समजले. बेटेसे बाप सवाई निघाला; होतो असा उलटा प्रकार कधीकधी! फुल्यांनी महारमांगांसाठी शाळा काढल्या, त्यांच्या समितीवर बहुसंख्य ब्राह्मणच. अस्पृश्यांच्या एका शाळेस जागा मिळेना तेव्हा फुल्यांचे जिवलग ब्राह्मण मित्र व सहकारी, रावबहादूर गोवंडे यांनी आपले घर दिले. धन्य त्या ब्राह्मणवीराची. एकंदरीत फुल्यांना त्यांच्या सर्व उपक्रमांत समंजस ब्राह्मणांचे पाठबळ मिळाले. न्यायमूर्ति रानड्यांचे तर पदोपदी प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळत गेले.
``फुले ब्राह्मण्याचे वैरी होते, ब्राह्मणांचे नव्हते, हे सत्य आजच्या ब्राह्मणांनी आणि ब्राह्मणेतरांनी लक्षात ठेवले पाहिजे. फुल्यांचे अनेक मित्र, सल्लागार आणि सहकारी ब्राह्मण होते. न्यायमूर्ति रानडे, रावबहादूर विष्णू मोरेश्वर भिडे, रावबहादूर गोवंडे, प्रसिद्ध समाजसुधारक विष्णूशास्त्री पंडित (पुनर्विवाहोत्तेजक मंडळाचे संस्थापक. यांनी उतारवयात केवळ तत्त्वासाठी पुनर्विवाह केला. इतरांचे पुनर्विवाह लावले आणि शंकराचार्यांनी पुकारलेल्या बहिष्काराचा सामना केला.) कृष्णशास्त्री चिपळूणकर वगैरे ब्राह्मण पुढाऱ्यांचा फुल्यांना नेहमी पाठिंबा असे. फुल्यांनी काढलेल्या शिक्षणसंस्थांचे सखाराम यशवंत परांजपे हे ब्राह्मण गृहस्थ खजिनदार होते. फुल्यांनी मुलींची शाळा काढली ती बुधवारातल्या ब्राह्मण वस्तीत. विश्रामबागेशेजारच्या एका ब्राह्मणाच्या वाड्यात. या शाळेत मुली आल्या त्या बाह्मणांच्याच. कोल्हापूर प्रकरणात फुल्यांनीच टिळकांना दहा हजारांचा जामीन मिळवून दिला. टिळक-आगरकर सुटून आले तेव्हा फुल्यांनी त्यांचे मुंबईत आणि पुण्यात सत्कार केले. फुल्यांचे वैर होते ब्राह्मण्यावर आणि त्याचा आधार घेणाऱ्या  जातिसंस्थेवर!''
इ.स.१९६२ च्या सुमारास लिहिलेले हे पुस्तक आहे. महात्मा फुले यांच्यानंतर तीस वर्षांनी बदललेल्या परिस्थितीवर भाष्य करताना घाटे यांनी जे निरीक्षण नोंदविले आहे ते असे - ``गेल्या तीस वर्षांत ब्राह्मणही फार बदलले. पुष्कळच समंजस झाले. आता कोणी ब्राह्मण वेदोक्तासाठी अडून बसेल तर ब्राह्मणच त्याला विरोध करतील, त्याला हसतील. काही थोडे अपवाद सोडले तर बहुसंख्य ब्राह्मणवर्ग ब्राह्मणेतरांशी सहकार्य करीत आहे असे मला दिसते आणि मी समाधान पावतो. राजकीय क्षेत्रात ब्राह्मणेतरांना मिळालेेले विशिष्ट स्थान आजच्या ब्राह्मणांना मंजूर आहे. ते रुसून बसले नाहीत.
``ब्राह्मणांनी गेल्या काही वर्षांत नव्या नव्या वाटा शोधून काढल्या आहेत. पूर्वी ब्राह्मणेतरांचे असे समजले जाणारे व्यवसाय आजचे ब्राह्मण बिनबोभाट करीत आहेत. व्यापारांत शिरले आहेत. भारतीय सैन्य, विमानदल आणि नौकादल यात शिरले आहेत. साधने उपलब्ध होताच इंजिनियर आणि तंत्रज्ञ झाले आहेत. सरकारी नोकऱ्यांत पूर्वीपेक्षा मोठ्या प्रमाणात शिरत आहेत.
``मोठ्या संख्येने ब्राह्मण मांसाहार करू लागले आहेत. आनंद आहे. आता सहभोजन सुलभ झाले आहे. माझ्या पिढीची ती मोठी अडचण होती. जे सागुती खात नाहीत, ते आता तिजविषयी घृणा बाळगीत नाहीत आणि खाणारांचा तिरस्कार करीत नाहीत. आमच्या वाट्याला जुन्या काळी पुष्कळच तिरस्कार आला. ब्राह्मण ब्राह्मणेेतरांत कमी प्रमाणात का होईना, परंतु मिश्रविवाह होऊ लागले आहेत आणि वर्तमानपत्रांनी दखल न घेण्याइतके ते आहेत. रोज मरे त्याला कोण रडे, तसे रोज लग्न करी त्याची नोंद कोण करी?
``मिश्रविवाहांना फारसा विरोध राहिला नाही. आधी आईबाप रुसतात, रागावतात, कधी कधी नाव टाकतात; परंतु लवकरच समझौता होतो. सगळे कसे शांत शांत होते.हे जे चालले आहे तो ध्येयवाद नाही, हे मी जाणतो. पूर्वीचा जुना पीळ आता राहिला नाही. ताठरपणा नाहीसा झाला याची मला खंत वाटत नसली तरी हरवल्यासारखे मात्र खास वाटते. तो तीस हजारांच्या वतनावर पाणी सोडणारा कोल्हापूरचा राजोपाध्या प्रतिगामी असेल, पण ताठ होता. १८९५ साली `राष्ट्नीय सभेच्या मंडपात तुमची सामाजिक परिषद भरवाल तर बच्चमजी, हा श्रीधर दात्या मंडप जाळून टाकील' असा रोखठोक इशारा माधवराव रानड्यांना देणारा श्रीधर दात्ये वांड असेल पण मस्त होता. बडोद्यास भर सभेत राजारामशास्त्र्यांवर सोटा घेऊन धावणारे प्रोफेसर जिनसीवाले सनातनी असतील, पण कणखर होते, प्रांजळ होते. ती जुनी ताठ माणसे आता उरली नाहीत. विरोधाला धार नाही. आखाड्यांत खणखणीत असे आव्हान नाही. नुसती कोपऱ्यात कुरकुर ऐकू येते, बोटे मोडली जातात. कधी कधी छद्मी भाषणे ऐकू येतात. हे खरे असले तरी जुने गेल्याचा मला खेद नाही आणि खंत नाही. जे चालले आहे ते ठीक चालले आहे असेच वाटते. समाजाच्या जीवनाचा प्रवाह ज्या दिशेने जायला पाहिजे त्याच दिशेस तो लागला आहे हे मला दिसते. ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर त्या इष्ट दिशेलाच, कोणी पोहत तर कोणी वाहात चालले आहेत. पण चालले आहेत, थांबले नाहीत. वाहत्या प्रवाहात थांबता येत नाही हेही मला दिसते आणि मी समाधान पावतो.
``प्रवाहात कुणी सापडतात, कुणी धिटाईने उडी घालतात. सारीच माणसे बिनकण्याची नसतात. पुष्कळांना नव्या सामाजिक जाणीवा जाणवू लागल्या आहेत. नव्या जबाबदाऱ्या कळू लागल्या आहेत. आणि त्यांची संख्या वाढत आहे. पूर्वीसारखा सामाजिक क्षेत्रांत कसून विरोध होत नसेल तर त्याला खरे कारण म्हणजे आताच्या पिढीच्या मनांतच तसला विरोध उपजत नाही, जोर धरत नाही.
``आता महाराष्ट्नचे राज्य झाले आहे. या राज्यात ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर विलीन होणार आहेत अशी माझी खात्री आहे. पशूंचा पुढारी पशू किंवा पक्ष्यांचा पुढारी पक्षी हे जीवशास्त्र आता टाकाऊ झाले आहे. एके काळी त्याने काम केले, आता त्याची गरज नाही. यापुढे `मराठ्यांच्या गरजा मराठ्यांनी भागविल्या पाहिजेत, ब्राह्मणेतरांची दुखणी ब्राह्मणेतरांनीच सांभाळली पाहिजेत आणि स्पष्टच सांगतो, ब्राह्मणांची पापे ब्राह्मणांनीच निस्तरली पाहिजेत' अशी कृपण भाषा कोणी शहाण्यांनी यापुढे बोलू नये.''

आज, म्हणजे ५० वर्षांनी - सामाजिक जीवनात आणखी खूपसा बदल झालेला आहे. पण तरीही स्वार्थासाठी काही मंडळी आजही तो वाद पुन्हा उकरून काढायचा प्रयत्न करतात; या दुर्दैवाला काय म्हणावे? एकीकडे जग जवळ येत चालले आहे आणि आपण मात्र जवळचे दूर करून समाज दुभंगण्याचा प्रयत्न करीत आहोत. वेगाने बदलणाऱ्या आर्थिक व सामाजिक परिस्थितीचे भान येऊन तथाकथित नेते मंडळी असा विघातक खेळ  खेळण्याचे आणि समाजाला स्वार्थासाठी झुंजवीत ठेवण्याचे थांबवतील; आणि जातीभेद गाडून `स्वत:ला महाराष्ट्नचा मानणारा तो सर्व एकजात मराठा', या भावनेने एक होतील आणि समर्थ रामदासांचा -
मराठा तितुका मेळवावा
महाराष्ट्न् धर्म वाढवावा ।
हा उपदेश धरून महाराष्ट्न् भूमीचा उत्कर्ष साधतील, तो सुदिन म्हणावा लागेल!
- आनंदी निवास, ६९, शनिवार पेठ,
सातारा (फोन ०२१६२-२३०११४)
मोबा. ९८२२०१६२९९


सामाजिक  बुवाबाजी
`सरकारचे काम सरकारने केले नाही तर ते जबाबदार नागरिकांनी स्वत: केले पाहिजे' असे लक्षण चांगल्या लोकशाहीचे सांगितले जाते. आजच्या काळात त्याचा विडंबनार्थ स्वीकारून भलतीच जबाबदारी बेजबाबदार लोकांनी मनावर घेतली असावी. आसाराम बापूंवर हीन आरोप झाले, त्यांची शहानिशा करायला सरकारचे पोलिसदल आहे, पण ते असमर्थ आहे असे लोकांनी ठरविले आहे. ते असमर्थ आहे, तर मग `आसारामना अटक करा' असा धोशा पोलिसांकडे लावण्याचे कारणही नव्हते; परस्पर `न्याय' करून टाकायचा होता. त्यांना अटक झाली तरी खटला, जामीन, अपराधनिश्चिती, न्याय वगैरे प्रक्रिया कशी, कधी पूर्ण होणार हे ईश्वराला माहीत. त्याआधीच या कोण्या महंताचे पुतळे जाळण्याची आंदोलने करून धर्मनिरपेक्षता सिद्ध होते की काय?

दहीहंडी किंवा गणपती उत्सवात डॉल्बी व ध्वनिप्रदूषण याबद्दल लोकांनी  तक्रार करावी असे काय असते? पोलिसांना हा दणदणाट ऐकू येत नसतो? कोणी नागरिक त्यासाठी तक्रार करू गेला तर त्यालाच मुस्कटात देण्याचा पराक्रम ठाण्याच्या पोलिसांनी करावा; हे जर कायदापालन असेल तर त्या यंत्रणेकडून काय आशा करावी? भक्तीची ती तऱ्हा, आणि उत्सवातील संस्कृतीची ही तऱ्हा! परंतु सरकार मात्र नवा रट्निनाष्ष्ठेचा संस्कार करण्यासाठी ग्रामपंचायतींपासून सगळीकडे दररोज राष्ट्न्ध्वज फडकविण्याचा आदेश देत आहे. राष्ट्न्, देश, समाज या वस्तू कशाशी खातात ही समज अभावानेच असणारी माणसे या नव्या आदेशाचे पालन कसे करतील, याचीही भीती आहे.

आसारामांसारखे बुवा जगाच्या प्रारंभापासून वावरत असतात. तसे काही राजकीय संत आणि बुवाही राजकारणी लोकांनी ठेवलेले असतात. अंधश्रद्धेचा विषय डॉ.दाभोलकरांबरोबरच संपू शकला, तर मग तो कायदाच नाचवत या दांभिक मंडळींना फिरता येईल. शिवाय `असा कायदा करणारे पुरोगामी राज्य' म्हणून मिरवता येईल. तथापि असली बुवाबाजी हीसुद्धा समाजातील कित्येक लोकांची गरज असते. ती बुवाबाजी काहीजण आध्यात्मिक, काही आर्थिक, काही साहित्यिक क्षेत्रातही करत असतात. राजकीय बुवाबाजी तर सदासर्वकाळ असते. विविध क्षेत्रांतील हे बुवा हुशार, अभ्यासू असतात, त्यांचे व्यक्तिमत्त्व व्यवसायाशी अनुरूप असते. या सगळयांतून आपापल्या कच्छपि लागणाऱ्या अनुयायांची गर्दी त्यांना जमविता येते. कधीतरी कोणत्याही बुवाचे दिवस भरले की, त्याचे हितशत्रू सरसावतात. मग माध्यमवाले, निवडणूकवाले, पुतळेजाळू आंदोलनवाले वगैरे सर्वपंथी बुवा, समाजाचा कैवार घेऊन त्या आपल्या `स्पर्धकाला' संपवू पाहतात.

आसारामांना न्याय्य शिक्षा, किंवा निर्दोषित्व या दोन्हींची शक्यता फार धूसर आहे. तथापि एक आसाराम गजाआड जाण्याने दुसरे कुणी तसाराम तयार होणारच. कारण ती या भयग्रस्त, भ्रमिष्ट समाजाची गरज आहे. मीडियाला जसे या प्रकारचे इव्हेंट लागतात, त्याचप्रमाणे त्यांना कुणीतरी दिग्विजयसिंह, जावडेकर वगैरेही लागतात. त्यांच्या दुर्बोध प्रवचनांतून समाज शहाणा होत नाही; जास्त अगतिक बनतो. तशी अगतिक, संभ्रमित सामाजिक अवस्था हेच तर बुवाबाजीचे मूळ कारण आहे. माणूस स्थिरचित्त, स्वस्थ आणि जिज्ञासूबुद्धीचा झाला तर सगळयाच क्षेत्रातील बुवाबाजांना आपली दुकाने गुंडाळावी लागतील.

तसा समाज, ही केवळ आदर्शवादी अशक्य कल्पना आहे.  मात्र संभ्रम, भीती, अस्थैर्य कमी कमी करणे आदर्श शासनव्यवस्थेमुळे शक्य होते. हे आजच्या शासनाकडून शक्य वाटत नाही. एक बुवा दुसऱ्या बुवाचा व्यवसायिक स्पर्धकच असतो. त्यामुळे आसारामांच्या किंवा दुसऱ्या कुणा अम्मा-बापू-काकांच्या मागे जाणारी प्रजा, शहाणी-समंजस-आत्मविश्वासू-स्वस्थप्रज्ञ व्हावी असे न पाहता, स्पर्धक आसाराम संपले तर त्याचे श्रेय घेऊन ती भयभीत प्रजा आपल्या मागे लागावी, असा हेतू इतर क्षेत्रातील बुवांचा असतो.

अनेक खऱ्या संत-सज्जनांनी पुरातन काळापासून बुवाबाजी आणि दांभिक भक्तीविरुद्ध जागृती करू पाहिली पण फार मर्यादित यश मिळाले. मूर्तिपूजा करू नका म्हणणाऱ्या विभूतींचीच जिथे मूर्तिपूजा होत राहते, त्या समाजातील बुवाबाजीला हटविणे महाकर्म कठीण. आसारामांवर तोंडसुख घेणारे दिग्विजयसिंह, गांधी घराण्यावरच्या अंधश्रद्धेतून काही लाभार्थानेच त्यांचे भक्त बनतात, त्यांनी या सामाजिक आजाराचे `तज्ज्ञ विश्लेषण' ते काय करावे!
एकंदरीत अशा व्यवहारांना प्रशासनातून जी प्रगल्भ विचार-विवेकाची दिशा मिळायला हवी, तिचा पूर्णत: अभाव असल्यामुळे, सरकार कोणत्याही गैर गोष्टीबद्दल काहीही करत नाही. मग ती जबाबदारी गणंग `आंदोलकां'कडे जाणार, तसेच आता घडते आहे. एखादा पाकीटमार रंगेहात सापडला तर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यातून काहीच साधत नाही, हे कळल्यामुळे त्याला बदडून काढण्याची शिक्षा लोक आपल्या हाती घेतात. यामुळे पाकीटमारी कमी होत नाही, परंतु एखाद्या सभ्य गृहस्थालाही कधीतरी अकारण चोप मिळू शकतो. कारण विवेकी चौकशी व शहानिशा, हा स्वस्थचित्त पर्याय उपलब्धच नाही. डॉ.दाभोलकरांचा मारेकरी सापडत नाही हे सरकारचे नाकर्तेपण स्पष्ट झाल्यावर, काही `तत्पर न्यायाधीशांनी'  त्यांच्या त्यांच्या बुद्धीप्रमाणे न्यायदान सुरूही केले. दाभोलकरांना श्रद्धांजली वाहणाऱ्या सभेत रा.स्व.संघाच्या प्रतिनिधीला बोलू न देण्याइतके कठोरपण या मंडळींनी आपल्या हाती घेतले; ही गोष्ट स्वत: डॉक्टर दाभोलकरांनाही रुचली नसती! तेवढे उदारमतवादी तर ते होतेच! त्यांचा या लोकशाही मूल्यांवर दृढ विश्वास होता, म्हणून तर ते बुवाबाजीविरोधी कायदा करण्यासाठी सरकारच्या मागे लागले होते; त्यांनी कोणा बुवा-मांत्रिकाला मारझोड किंवा लाथाळी करण्याचे कधी मनातही आणले नाही. कायदा राबविणारे सरकार दुबळे आहे हे तर त्यांनाही दिसत होते.

सरकार दुर्बळ झाले, पोलिस उपद्रवी किंवा निष्क्रीय झाले तर ती जबाबदारी घेणाऱ्यांनी, जबाबदारीनेच घेतली पाहिजे. त्यासाठी हडेलहप्पी मनमानी करू नये. तीच वाट्याला येणार असेल तर मग आहे हेच प्रशासन काय वाईट! गुंडाने अपहरण करण्यापेक्षा वर्दीतल्या शिपायाने तुरुंगात टाकणे परवडले!! म्हणून सरकार दुबळे झाले तर ते सबळ करणे, प्रशासनाला वळण देणेे ही जबाबदारी नागरिकांची असते, ती पार पाडता येत नसेल तर त्या नागरिकांना सामाजिक भान असलेला समाज म्हणून टिकता येणार नाही. मग सामाजिक भ्रांत-भय वाढले तर पुन्हा बुवांशिवाय पर्याय नाही. आसाराम गजाआड गेलेच तर दुसऱ्या तसारामांचा शोध लागेल; आसाराम सुटले तर `सत्याचा जय' झाल्याचे तेच आपल्याला सांगतील. बुवाबाजी नष्ट झाली पाहिजे, बुवा वाचले पाहिजेत. त्यांची ती दुकाने बंद पडण्याइतका समाज शहाणा व्हायचा, तर सरकार शहाणे हवे, दृढ हवे!! इथल्या शासनाविरुद्ध नाकाने कांदे सोलणारे तथाकथित उच्चभ्रू नागरीक दूर किंवा अलिप्त राहण्याने ते शासन शहाणे होणार नाही. दांभिक नागरिकांना बुवाबाज व्यवस्था लाभणार!


हे प्रयत्न प्रेरक व्हावेत ...
जुलैच्या अंकात, माझा मुलगा प्रथमेश याच्याविषयी विजापूरच्या दीपक पटवर्धनांनी लिहिलेला मजकूर प्रसिद्ध झाला, त्यामुळे सुमारे ४२ ठिकाणांहून फोन आले. `आपले जग' घराघरांत पोचत असल्याचे जाणवले. काही पालकांना मार्गदर्शन पाहिजे होते. मुंबई-पुणे-विरार-नाशिकहून अनेक मंडळींनी प्रथमेशचे कौतुक केले व शुभकामना दिल्या. समस्याग्रस्त पालकांना आपल्या मुलासाठी काही करावे असे वाटू लागले.
मतिमंद मूल जन्माला येणे म्हणजे शाप आहे, ते आयुष्यात काही करू शकणार नाही, जन्मभर पोसावे लागेल अशा विवंचनेत पालक गलितगात्र झालेले असतात. शिवाय, आपल्या पश्चात् या अपत्याचे काय होणार, या चिंतेने दररोज मरत असतात; प्रयत्न करत नाहीत. या साऱ्या गोष्टींना छेद देण्यासाठी पालकांना-मुलांना प्रेरणा मिळावी, त्यांनी काहीतरी प्रयत्न करावेत या हेतूने आम्ही, १७ भाषांतून निरनिराळया लेखकांचे दर्जेदार लेख प्रसिद्ध करू इच्छितो. आपल्या माहितीतील अन्य काही मंडळींचे सहकार्य मिळाले तर पाहावे. अशी आर्टिकल्स प्रसिद्ध करण्यामागे अर्थातच कोणत्याही आर्थिक लाभाची अपेक्षा नाही, प्रसिद्धीची इच्छा नाही, त्यातून काही मिळवायचे नाही. सुमारे पंचवीस वर्षे सातत्याने जे काम केले ते उदाहरण लोकांना कळावे; तसेच सामान्यत: जगण्याविषयीच्या भावभावनांना मूठमाती देऊन, आशा-आकांक्षांचा चुराडा करून त्या अश्राप जीवाला उभे करण्यासाठी जे प्रयत्न केले, त्यामुळे तो आज `इंटरनॅशनल सेलिब्रेटी' झाला हे समजून यावे इतकेच! इतर काही समस्याग्रस्तांना प्रेरणा मिळावी असे काम घडावे म्हणून हा प्रयत्न.
- प्रकाश दाते,
दाते वाडा, झेंडा चौक, पो.बा.नं.२००,
 इचलकरंजी (जि.कोल्हापूर)
फोन (०२३०)२४२५३०९, ९८९०१८७८८३

ऑगस्ट (१२-१९) अंकातील बॅ.जिन्हांविषयी लेखाबद्दल खूप प्रतिक्रिया आल्या. अनेकांस तो विषय स्वत:च्या मनातलाच प्रगट झाल्यासारखे वाटले तर तो विचाराला चालना देणारा असल्याचे काहींनी कळविले. त्या लेखकासही पुष्कळ फोन-पत्रे आल्याचे त्यांनी नमूद केले. लेखाच्या पसंतीव्यतिरिक्त प्रातिनिधिक पत्रे -
आश्चर्य आणि आदर
`आपले जग' ऑगस्टमधील अंकात माझा बॅ.जिन्हांविषयीचा लेख आहे. पाकिस्तान निर्मितीला जबाबदार कोण? याचे उत्तर सापडते का, हे पाहण्यासाठी मी ते पुस्तक वाचून पाहिले. त्यातून लेखाची कल्पना सुचली. लेख लोकांना भावला हे लिखित व फोनवरील प्रतिक्रियांवरून जाणवले. त्याहीपेक्षा `आपले जग'ने मोठ्या परिश्रमपूर्वक दूरवरच्या कोणकोणत्या भागात आपला वाचकवर्ग निर्माण केला आहे, हे पाहून त्याबद्दलचा आदर द्विगुणित झाला. बऱ्याच चोखंदळ वाचकांनी सदर पुस्तकाबद्दल विचारणा केली म्हणून मुद्दाम त्याविषयी माहिती देत आहे.
`प्रतिनायक-मोहम्मद अलि झीना' हे ५८६ पानी रु.५०० किंमतीचे पुस्तक. भावनगर जिल्ह्यातील गुजराथी लेखक श्री.दिनकरभाई जोशी हे त्या पुस्तकाचे लेखक आहेत. हे त्यांचे १०७ वे पुस्तक आहे. सदर पुस्तकातील प्रकरण ४ व ५ चा माझ्या लेखात संदर्भ आहे.
पुस्तक लिहिताना त्यांनी अच्युतराव पटवर्धन, एम.सी.छागलांपासून अनेक विदेशी लेखकांच्या ४३ पुस्तकांचा संदर्भासाठी वापर केला आहे. सदर पुस्तकाचा मराठी अनुवाद टोरांटो येथे स्थायिक झालेल्या श्रीमती स्मिता भागवत यांनी केलेला आहे. ते मराठीतील पुस्तक मातृभूमी सेवा ट्न्स्ट, मुंबई यांच्यासाठी प्रकाशित केले आहे. पुस्तकाचे वितरण इंडियन एज्युकेशन सोसायटी, महात्मा फुले कन्या शाळा, बाबरेकर मार्ग, दादर, मुंबई-२८ यांचेकडे आहे.
श्री.दिनकर जोशी यांचा पत्ता :
१०२, पार्क अॅव्हेन्यू, महात्मा गांधी रोड, कांदिवली, मुंबई - ६७
(फोन : ०२२-२८६४३२८९)
- प्रसाद भावे (भावे सुपारीवाले) सातारा, फोन : (०२१६२) २३७९२६

जातिद्वेष देशघातक
....``आजवर बॅ.जिन्हांच्या संबंधी वैचारिक समज-अपसमज-गैरसमज होते. आजवर आमच्या मनाची अवस्था समर्थ वर्णितात तशी,
`धातुवरी वरी आला मळ
तेणे लोपले निर्मळ
शेतीं न जाता आऊत
तेणे आच्छादिले शेत'
अशी होती. आडवाणी-जसवंतसिंह यांच्या विधानांनी एके काळी केवढा गदारोळ माजला होता. संघप्रमुखांनी `प्रत्येक संघ स्वयंसेवकाने एका तरी भारतीय मुस्लिमाशी देशबांधव या नात्याने संपर्क ठेवावा' असे सांगितले होते, त्यास वृत्तपत्रांनी `विक्षिप्त' म्हणून झिडकारले. भारतातील सद्यस्थिती पाहता, कोणताही समाज जातिद्वेषावर दूर ठेवणे हा राष्ट्न्घात ठरेल. श्री.प्रसाद भावे यांचे लेख- स्वरूपातील अंजन अपरिचित, पण विवेकवर्धक आहे. विशेषत: हिंदू व अन्य सर्व धर्मपंथीयांनी देशहितासाठी सर्व भारतीयांना बरोबर घेऊनच पुढे जायला हवे.
चारही पीठाचार्यांनी व संतमहंतांनी पाद्यसेवा, तीर्थ, सुवर्णासन एवढीच धर्मनिष्क्रीयता सांभाळली आहे. तळागाळापर्यंत रुतलेली हिंदूमने स्वच्छ केली पाहिजेत. कुणाचीच अलिप्तता यापुढे क्षम्य ठरणार नाही.
श्री.भावे यांच्या लेखातून एक सुंदर विचारप्रवाह लाभला. लेख आणखी विस्तृत हवा होता. `आपले जग'चे विशेष आभार.
- महादेव साने,
`अमित' शास्त्रीनगर,
महामार्ग, मलकापूर (ता.कऱ्हाड)

परिणाम उलटा होतो
विचारप्रवर्तक व मुद्देसूद लेख वाटला, आवडला. श्री.भावे यांनी मांडलेल्या विचाराप्रमाणे हिंदू समाज आणि व्यक्तिश:देखील आतापर्यंत वागत आलो आहोत. पण त्याचा परिणाम उलटाच होत आहे. न्या.छागलांसारखा अपवाद वगळता इतर सर्व कडवे धर्मवेडेच झाले. अपवादाने नियम सिद्ध होतो.
महात्मा गांधी जिन्हांबद्दल म्हणाले, ``मुसलमान असूनही, सार्वजनिक जीवनात व देशकार्यात ते अत्यंत हिरिरीने भाग घेतात...'' हे म्हणणे म्हणजे गांधीजींनी जिन्हांची पाठ थोपटली, असा सरळ अर्थ न घेता, तो उलट अर्थ घेऊन अकारण द्वेष करणे हे योग्य नव्हतेच! मुस्लिम समाजाला आमची भाषा समजून घ्यायचीच नाही, म्हणून त्यांना समजेल त्या भाषेत समजावणे जरूर आहे. हे सर्व हिंदू समाजाने जेवढे शक्य तेवढे  लवकर समजून घेऊन कृती केली तर त्यात परिवर्तन होईल.
-डॉ.एस.बी.कुलकर्णी
`मल्हार' गणपती मंदिरजवळ,
विश्रामबाग (सांगली)

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन