Skip to main content

Maza Column of 13 June

सुख वाढण्याची कला ऊस तोड करण्यासाठी उत्तर कर्नाटक किंवा बीड-लातूर कडून कित्येक शेतमजूर पश्चिम महाराष्ट्नत येत असतात. त्यांनी दरवाढीसाठी आखडून धरले. संप-संघटना वगैरे नेतेगिरी झाली, साखर कारखाने खोळंबले. अशा वेळी काही गावातले शेतकरी सरसावले, त्यांनी आपापसात एकी केली. ऊसतोड करण्यासाठी टोळया तयार केल्या, एकमेकांच्या रानातला ऊस तोडायला सुरुवात केली. शेतकरीच होते, सवय मोडली होती पण फार अवघड गेले नाही. काम मार्गी लागले. ही कथा असेल आठ-दहा वर्षांपूर्वीची.
 अशा कितीतरी अडचणींचे पाढे वाचण्याची सवय लावून घेण्यापेक्षा शेतकऱ्यांची ती कथा आठवून पाहण्याजोगी असते. नुकत्याच झालेल्या एका लग्नसमारंभातील पंगत चर्चेत होती. पंगतीचं वाढप अगदीच (बे)सुमार दर्जाचं असतं हा सगळीकडे अनुभव असतो. कुणीतरी आेंगळ किंवा अत्याधुनिक नटरंगी पोरं लग्ना-मुंजीसारख्या भारदस्त प्रसंगात पंगत वाढायला हल्ली येतात. त्या पोरांचे एकूण अवतार पाहिल्यावर पपन्नाची प्रसन्नता जाऊन मळमळ वाढते. वाढपशास्त्राशी तर त्यांचा काही मेळ नसतो. त्यामुळं तुपाच्या पाचसहा थेंबांचीच धार निम्मी आमटीच्या वाटीत आणि बाकीची मिठात जाते. भाताची शितं टेबलावर विस्कटतात. `नको' म्हणायच्या आधीच वाटीभर मटकीउसळ ताटातल्या कोशिंबिरीवर पडते. जेवणारी बालकं, तरणी पोरं, बोळक्याच्या आज्ज्या यांचा मगदूर पाहून वाढायचं असतं. पात्री पानाचा दर सगळयांना सारखाच असला तरी आवड, भूक आणि जोश प्रत्येकाचा भिन्न असतो. एखादा तरूण आग्रहाची वाट पाहात असतो त्याचवेळी शेजारच्या भाताला ताक हवं असतं, पण दोघांच्याही समोर `पंचामृत' येतं. यावर नियंत्रण ठेवून एकाच सुरात `वदनी कवळ घेता' आणि एकाच तालात आपोष्णी व्हावी हे कौशल्य वाढप्याकडं असावं लागतं. कोणाला, कशाचा, किती आग्रह खपेल ते जाणून माणसं आकंठ तृप्त करावीत परंतु कोणाच्या ताटात कणभर वाया जाऊ नये हे तर `बेसिक' आहे.... हे सगळं शास्त्र कंत्राटी पोरं सांभाळू शकत नाहीत. अशा जेवणांतून ढेकर येण्याऐवजी कढ येतो.
 अशा कार्यक्रमात लफ्फेदार बाया अन् झब्बेधारी पुरुष वावरतात. त्यांना ही जाणीव झाली तरी `हो ना; पण करणार काय!' अशीच आळवणी चालते. त्यांनी दोन तीन पंगती वाढायला घेण्यास काय हरकत आहे? `सवय नाही, वेळ नाही...' वगैरे कौतुकं खरी नव्हेत. आख्ख्या मंडपगर्दीत चारजणी आणि चारजण सहज तयार होतील. `पुढच्यां'ना सराव मिळेल. पैसे वाचविण्याचे राहू दे, पण पंगत अधिक चांगली होईल ना!
 गल्ली किंवा सोसायटीची स्वच्छता अशीच एकत्रित करता येईल. बालवाडी वा अंगणवाडीसाठी `योग्य' मावशा आज उपलब्ध नाहीत. आयांनी किंवा आजी-आजोबांनी हे काम एकत्रित करता येईल; बऱ्याच मुलांना एकत्रित शाळेत नेता-आणता येईल. मनासारखं गणपती-अभिषेक-पूजा करता येईल. `कमी तिथं आम्ही' म्हणत पुढं येण्यानं सहजीवन सुखद होईल.
 त्यासाठी परस्परांना विचारावं लागेल, एकत्रित वावरावं लागेल, अधिक चांगलं व्हावं - आणि ते आपण करावं - अशी ऊर्मी असावी लागेल. पुढचं सगळं सोपं होईल. परंतु हेच जमणं शक्य नाही असं मानलं तर मग जो जे ताटी वाढेल तसं मुकाट्यानं गिळावं लागेल. आपल्या अडचणींवर तर पुष्कळांची पोटं वाढत असतात!

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन