Skip to main content

24 February 2020

शिवाजी महाराजांची पूर्वपीठिका
कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजचे भूतपूर्व प्राचार्य डॉ.बालकृष्ण हे हिंदू संस्कृतीचे अभ्यासक, आर्य समाजाचे विचारवंत होते. `शिवाजी - द ग्रेट' हे त्यांनी लिहिलेले चार खंडात्मक इंग्रजी चरित्र, शिवाजी विद्यापीठाने १९३९ साली प्रथम प्रकाशित केले. 
 शाहू संशोधन केंद्राचे संचालक डॉ.जयसिंगराव पवार यांच्या सौजन्याने,
त्या ग्रंथातील काही पृष्ठांचे हे मराठी रूपांतर; शिवजयंतीच्या निमित्ताने...
उपलब्ध वंशावळीतील त्रुटी
शिवाजीराजांच्या जीवन चरित्रासंबंधी लिहिताना, मराठी इतिहासकार वा बखरकार हे शिवाजीच्या आधीच्या मोजक्या पिढ्यांचा इतिहास आणि आजवर परंपरेने माहीत झालेल्या आख्यायिका एवढ्यांवरच विसंबून, तितक्यावरच खूश असतात. त्या घराण्याचे मूळ कुठवर मागे आहे, याविषयी त्यांना काही माहिती नसते. या महाप्रतापी शिवनृपतीचे वंशज असणारे साताऱ्याचे छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी, त्यांच्या वाडवडिलांसह समस्त वंशवृक्ष नीट मांडणी करण्याचा १८२८ साली कसोशीने प्रयत्न केला. त्यांच्या आज्ञेप्रमाणे मुन्शी माधवराव यांनी तशी वंशावळ तयार केली; ती वंशावळ मूळ स्वरूपात साताऱ्याच्या इतिहासप्रसिद्ध संग्रहालयात आजही उपलब्ध आहे. त्यांनी बरेच दस्तावेज आणि ग्रंथ यांतून ती सर्व माहिती संकलित केली असल्याचे समजून येते.
प्रचंड खटपट आणि मेहनत करून शोधलेली ही वंशावळ काल-परवापर्यंत स्वीकारली गेली होतीच; परंतु नव्याने जे दस्तावेज आणि कागदोपत्री पुरावे उपलब्ध झाले त्यावरून दिसते की, आधीच्या मांडणीत बऱ्याच चुका व घोटाळे आहेत. शिवाय शिवाजीचे पूर्वज स्थलांतरित कसे झाले, त्याविषयी काही तपशील त्यातून मिळत नाही. ही त्रुटी व वंशशाखांतील फट-फरक काही गृहितांच्या आधारे आता सांधता येतो. मुधोळ(कर्नाटक) राज्यकर्त्यांच्या घराण्यासंबंधी काही हस्तलिखित बखरी मिळाल्या, त्या अद्यापि अप्रकाशित असल्या तरी मान्य झालेल्या आहेत; त्यांचा त्या सांधेजोडीसाठी आधार मिळतो.
भोसले घराण्याचे मूळ उदेपूरच्या सूर्यवंशी राजघराण्याशी सरळ थेट जाऊन मिळते. भारतीय महाकाव्यातून श्रद्धेय ठरलेला महाविक्रमी राम याच्यापासून या सूर्य वंशाचा वारसा आपल्यापर्यंत आल्याचे उदेपूर घराणे मानते. हे सूर्य वंशी राजघराणे १२व्या शतकात चितोड आणि सिसोद येथील गादीवर नांदत होते. करणसिंह हा चितोडचा `रावळ', त्याला तीन पुत्र होते. या रावळाच्या मृत्यूनंतर त्याचा थोरला मुलगा क्षेमसिंह याचे चितोडच्या गादीवर राज्यारोहण होऊन त्याने राजमुकुट धारण केला. दुसरा पुत्र माहम याने सिसोदचे राज्य घेतले; त्याच्यानंतर धाकटा राहप हा सिसोदच्या गादीवर आला. हे सिसोदिया राज्यकर्ते `राणा' म्हणून ओळखले जात. क्षेमसिंहापासून आठव्या पिढीतला रत्नसिंह किंवा रतनसी चितोडला होता, आणि राहपपासून दहाव्या पिढीतला लक्ष्मणसिंह हा सिसोदला होता. हाच तो रतनसी, पूर्वापार प्रसिद्ध झालेल्या राणी पद्मिनीचा पती; -तो भीमसिंह अथवा लक्ष्मणसिंह(लखमसी) नव्हे!
अल्लाउद्दीन खिल्जी याच्या पाशवी कामनेतून ती रूपवती बळजबरीने मिळविण्याचा मनसुबा सांगणारी ती प्रसिद्ध कथा पुन्हा इथे सांगण्याची आवश्यकता नाही, चितोडच्या उमराव घराण्यातील ती मानी स्त्री. आपल्या देहाची विटंबना टाळण्यासाठी पंधरा हजार राजपूत स्त्रियांसह जळत्या चितेत उडी घेऊन मृत्यूला कवटाळणारे विलक्षण धाडस करते.
या घटनेपाठोपाठ क्रूर नरसंहार आणि भीषण रक्तपात यांचे थैमान चालू झाले. सुलतानी फौजांशी लढाया भडकल्या, आणि त्यात शूर राजपुतांचे शिरकाण होऊ लागले. चितोडच्या रक्षणासाठी मरू किंवा मारू अशा त्वेषाने अल्लाउद्दिनशी भिडलेल्या एका लढाईत रतनसी याची आहुती पडली. युवराज लक्ष्मणसिंह (लखमसी) याची त्याच्या सात पोरांसह तीच गत झाली. त्यानंतर २६ ऑगस्ट सन १३०३ या दिवशी चितोड खिल्जीच्या हाती पडले. तथापि तिकडे सिसोदच्या सिंहासनावर मात्र राजा लक्ष्मणसिंहाचा एकमेव बचावलेला पुत्र अजयसिंह याचा अंमल चालू राहिला होता.
सिसोदिया राणांशी आता भांडणतंटा वा आक्रमण संपवावे या उद्देशाने दिल्लीश्वराने चितोडचे राज्य १३१४ साली मालदेवाच्या ताब्यात दिले. हा मालदेव सोनिग्रा घराण्यातील जालोरचा सेनापती. अल्लाउद्दिनाची कारकिर्द संपत आली, तसे चितोडच्या राजपुतांनी बळ केले. तिथल्या मुस्लीम अधिकाऱ्यांना तटबंदीवरून हाकलून लावले, बादशाही मुलखाचा विध्वंस सुरू केला, आणि आपल्या स्वातंत्र्याचा ठाम निर्धार पुकारला. बादशहाच्या मुलखात उच्छाद मांडणारा महापराक्रमी सेनापती म्हणजे हमीर. तो अजयसिंहाचा सर्वात लहान भाऊ अरिसिंह याचा मुलगा. हमीरचे पालन-पोषण त्याच्या या चुलत्याने केले होते. बालपणापासूनच या पोराने असामान्य धाडस आणि तडफ यांचा प्रत्यय दिला होता. दरोडेखोर टोळीवाल्याचा उठाव मोडून काढण्यात अजयसिंहाची दोन मुले अपयशी ठरली होती; पण पोरसवदा हमीरने या टोळीनायकाची गर्दन मारून, त्याच्या चुलत्यास नजराणा म्हणून ते शिर अर्पण केले.
आपल्या पुतण्याच्या या मर्दुमकीमुळे अजयसिंह इतका संतुष्ट झाला की, आपल्या गादीचा वारस म्हणून त्यालाच ठरवून टाकले. सूर्य वंशीय राजघराण्याच्या या दिलदार सिंहाने, -सिसोदच्या राजाने चितोडमधून मालदेव चौहान याची हकालपट्टी केली. अशा रितीने सिसोद आणि चितोड या दोन्हींचा मुलुख आपल्या आधिपत्याखाली आणला. तेव्हापासून पुढे चितोडच्या शासकांना `सिसोदिया राणा' असे म्हटले जाऊ लागले. दुसऱ्या बाजूला सज्जनसिंह आणि क्षेमसिंह हे अजयसिंहाचे दोघे मुलगे -त्यांच्या पित्याने वारसा नाकारल्याने, नशिबावर हवाला ठेवून दख्खन दिशेला निघाले. त्यातील थोरला भाऊ सज्जनसिंह याच्या वंशवेलीवर शिवाजी नावाचे फूल उमलले. मराठी साम्राज्याचा पाया घालणारा युगपुरुष शिवाजी हा सिसोदिया राणा यांच्या या राजपूत घराण्यातील वंशज.

सूर्य वंशी राणा सज्जनसिंह -
असे दिसते की, इसवी सन १३२०च्या सुमारास सज्जनसिंह हा, त्याच्याशी इमान वाहिलेल्या एकनिष्ठ अनुयायांसह आपले नशीब अजमाविण्यासाठी दख्खनेत उतरला. नंतर काही वर्षांनी तो हसनगंगू याच्या सेवेत आला. पुढच्या काळात बहामनी राज्याची स्थापना करणारा हा तो हसनगंगू. हसनगंगूचा दख्खनेतील उठाव मोडून काढण्यासाठी दिल्लीचा सुलतान महम्मद शाह तुघलक याने दक्षिणेकडे कूच केले. दिल्लीच्या शाही फौजा आणि बंड करणारे सरदार यांच्यात लढाया जुंपल्या. त्यातील एका लढाईत सज्जनसिंह आणि त्याचा मुलगा दिलीपसिंह यांनी नव्या धन्याच्या सेवेसाठी मोठी बहादुरी दाखवून दिली.
या बंडखोरांनी दौलताबाद घेतले. अर्थातच महापराक्रमी हसनगंगू याच्याकडे तेथील राजपद आले. आपल्या (बहामनी) राज्याची स्थापना करण्यात १३४७ साली यश मिळाल्यावर अल्ला-उद-दिन हसन गंगू बहामनी हा त्याचा पहिला सत्ताधीश झाला. त्याने या राणामंडळींस देवगिरी प्रांताच्या मीरत जिल्ह्यातील कित्येक गावे जहागीर म्हणून दिली. देेवगिरी ही यादव राजांची प्राचीन राजधानी, शाह महम्मद याने तिचे नाव बदलून ते दौलताबाद केले. सज्जनसिंहाचे वंशज ती जहागीर आजही उपभोगत आहेत.

राणा दिलीपसिंह- बहामनी राज्याचा सेनापती
गुलबर्गा आणि विजयनगर या दोघा नरेशांमधील लढाईत आणखी एक संधी दिलीपसिंहाला मिळाली. रणांगणावरील पराक्रम आणि रजपूत लढवय्यांच्या रिवाजातील आदब त्याने दाखवून दिली. या धामधुमीत शूर आणि अजिंक्य ठरलेल्या अल्ला-उद-दिन हसन गंगू याने, इसवी सन १३५२च्या नोव्हेंबरात फर्मान दिले आहे. या दिलीपसिंहाचे थेट वंशज असलेल्या मुधोळकर राजांकडे आजही ते फर्मान उपलब्ध आहे. नंतरच्या काळात हे राजपूत जहागीरदार दख्खनेतही `राणा' आणि `सरदार-ई-खासखेल' म्हणून ओळखले जाऊ लागले. हे राणा पद, दिलीपसिंह हा सिसोदिया राजपुतांचा वारसा असल्याचे स्पष्ट करणारे आहे. फर्मानामध्ये त्यास `अजयसिंहाचा नातू' असे म्हटले आहे. पुढे मान्यता पावलेल्या वंशावळीतून मात्र हे नाव गायब झाले. अशा प्रकारे आता आपल्याला आख्यायिका आणि दंतकथा यांच्यावरती अवलंबून राहावे लागत नाही; तर भोसले राजकुळाविषयी ठाम आणि स्पष्ट असे ऐतिहासिक सत्य हाती आले आहे.
त्या मूळ फर्मानाचा मराठी तर्जुमा असा - ``सरदार-ई-खासखेल राणा दिलीपसिंह, सज्जनसिंहाचा पुत्र आणि अजयसिंहाचा नातू, -याने रणभूमीवर दाखविलेल्या पराक्रमावर संतुष्ट होऊन त्यास तर्फ देवगड (देवगिरी)मधील वीस गावे त्याच्या कौटुंबिक भोगवट्यासाठी इनाम देण्यात येत आहेत. त्याच्या इच्छेखातर ती मुखत्यारिस देण्यात यावीत. तारीख २५ रमजान, सन ७५३ हिजरी''
मुधोळ बखरीने वरील फर्मानात अशी भर घातली आहे की, प्रथमत: ही सन्मानाची जहागीर सज्जनसिंह याच्या नावावर प्रदान करण्यात आली होती, नंतर ती दिलीपसिंहाच्या नावावर कायम करून पुढे चालू ठेवण्यात आली. दिलीपसिंहाने तिथे पंधरा वर्षे अंमल केला. हिजरी सन ७६८, इसवी १३६७ या साली तो वारला.
बृहन्महाराष्ट्नतील राज्यांचे संस्थापक महाराज शहाजी भोसले यांचे मूळ, राजस्थानातील सूर्यवंशीय सिसोद घराण्याशी थेट जाऊन मिळते, याचा आता तपास लागलाच आहे. राजपुतान्यातील चितोड आणि उदयपूर, त्याचप्रमाणे दख्खनेतील कोल्हापूर आणि मुधोळ येथील गादीवर आलेल्या, -आजही तिथे टिकून असलेल्या राजवटींनी हा थेट वंशसंबंध मान्य केलेलाच आहे. मुधोळकर राजांनी बहामनी व आदिलशाहीकडून मिळविलेल्या पर्शियन भाषेतील  सनदा पाहिल्यास भोसले घराण्याचे राजपूत मूळ स्पष्टपणे  प्रतीत होते. सुरुवातीपैकी सात पिढ्यांपर्यंत  हे लोक `राणा' म्हणून ओळखले जात. सन १४७१ मधल्या भीमसिंह याच्यापासून त्यात बदल होऊन ते `राजा' झाले. त्या वर्षापासून मुधोळकर हे आपल्यासाठी `राजा घोरपडे बहादुर' असे नाव लावू लागले. देवगिरीची मालकी ज्या धाकट्या पातीकडे होती, ते मात्र भोसले आडनावानेच ओळखले जात राहिले.

संपादकीय
हे जीवनशिक्षण म्हणावे काय?
मुलांच्या शिक्षणासाठी बरेच कार्यकर्ते लोक हल्ली हळवेपणी काम करीत असल्याचे अैकू येते. मुलांना सकस आहार देण्यापासून ते त्यांना पाणीसुद्धा पिण्यासाठी सुटी देण्यापर्यंत त्यांची काळजी वाहण्याचा कार्यक्रम राबविण्याची जाहिरात सरकार व शिक्षणखाते करीत असते. पण त्यांचे सारे बाल्य हरवून टाकणारा अेक अमानुष प्रकार पूर्वापार सर्रास चालू आहे, त्याकडे जरा कठोरपणी पाहायला हवे. वयाने मोठ्या झालेल्या माणसांच्या फालतू प्रतिष्ठेपायी लहान मुलाबाळांना तंगविण्याचा सोस वाढत चालला आहे. कधी कुणाचे सत्कार तर कधी शाळेतलाच कार्यक्रम असला तर हक्काचे श्रोते आणि प्रेक्षक म्हणजे शाळकरी मुलं. शाळेतले सामने हा खरे तर शाळेच्या अंतर्गत अुपक्रम असायला हवा. परंतु त्याच्या अुद्घाटनाला म्हणून नव्यानं जिल्हा परिषद किंवा पंचायतीत निवडून आलेले कुणीतरी मेषपात्र बोलावले जाते. त्याचाही सत्कार त्याच निमित्ताने अुरकून घ्यायचा असतो.  -घेआीनात का! -पण त्यात मुलांची शब्दश: ससेहोलपट होते, ती मात्र कुणाही पालकाला किंवा सहृदयी माणसाला कळवळा आणणारी असते.

नुकत्याच मिरज येथे मल्लखांब स्पर्धा झाल्या, ते अेक अुदाहरण म्हणून देता येआील. त्या स्पर्धांचे महत्व कुणी नाकारत नाही, त्यांची भव्यताही नाकारण्याचे कारण नाही. पण त्याच्याशी ज्यांचा दूरान्वयानेही संबंध नाही, असेही लोक -आणि प्रामुख्याने मुले -किती तंगून गेली त्याबद्दल त्यांनी किंवा पालकांनी कुठे तक्रार करायची? या राष्ट्नीय स्तराच्या स्पर्धांचे अुद्घाटन संध्याकाळी जाहीर केले होते. अेका शाळेच्या बँड पथकाची सुमारे ३५मुले त्या सोहळयात चित्ताकर्षी बँड वाजविण्यासाठी दुपारी चार वाजल्यापासून तिथे आलेली होती. शाळेने त्यांच्या पालकांना अैन वेळी निरोप देअून त्यांच्या दुपारच्या डबाभोजनाची व्यवस्था करायला सांगितले. तीन वाजता ती मुलं बँडसाहित्य घेअून कार्यक्रमस्थळी रवाना झाली. अुद्घाटनाचा सोहळा झाल्यावर काही स्पर्धकांच्या मल्लखांबवरची प्रात्यक्षिके त्यांना पाहता येतील, आणि साधारण सहा-साडेसहापर्यंत सारा कार्यक्रम संपेल असा त्या शिक्षकांचा अंदाज होता. म्हणून त्यांनी त्या बँडपथकातील मुलांना घरी नेण्यासाठी पालकांना सातला त्या मैदानावर येण्यास सांगितले होते. नंतर त्या त्या पालकांना संदेश पाठविण्यात आला की, त्यांनी सातअैवजी साडेसातला यावे. प्रत्यक्षात सारी अुद्घाटक पाहुणे मंडळी सातच्या पुढे पोचली. मग त्यांना व्यासपीठावर सन्मानाने आणले. नंतर सभोवारच्या प्रचंड गलग्यात संयोजकांचे लांबलेले प्रास्तविक दोन शब्द कोणीही अैकून न घेता संपले. त्यानंतर आमदार, जिल्हाधिकारी, अध्यक्ष, अधिकारी.... कोण कोण मंडळी, त्यांच्या सत्कारांची जी लांबड सुरू झाली; -ती अर्धा तास चालू राहिली. या काळात मुलांच्या भुकेचे काय? कंटाळयाचे काय? अभ्यासाचे काय? पालकांच्या काळजीचे आणि त्यांच्या वेळेचे काय? जमलेल्या प्रेक्षकांचे आणि विविध राज्यांतून आलेल्या मल्लखांब खेळाडू मुलामुलींचे काय?... कशाचीही फिकीर न करता मुलांना तंगविण्याचे आणि पालकांना संताप देण्याचे समर्थन कसे होअू शकते?

शंका अशी येते की, हा सोहळा मल्लखांब खेळाच्या विकासासाठी होता, की कुणाच्या राजकीय प्रतिष्ठेसाठी? खेळाडू आितके ताटकळून गेल्यावर कसे काय कौशल्य दाखविणार? आंतरराष्ट्नीय खेळाडू तयार करण्यासाठी ही प्रोत्साहन-पद्धत म्हणावी काय? या प्रकारच्या स्पर्धा भर गावातल्या वस्तीत घेण्यामुळे नागरी जीवनावर रहदारी, गोंगाट, धूळ, गर्दी या साऱ्यांचाही परिणाम होतो, त्याचाही विचार करायला हवा. परंतु मुख्यत: मुलांची जी कीव करावी, त्याची भरपाआी होअू शकत नाही.

कोल्हापूर जिल्ह्यातल्या अेका गावी तोच प्रकार नुकताच घडला. शाळेच्या स्नेहसंमेलनात अुद्घाटनासाठी, नुकतेच निवडून आलेल्या मान्यवराला बोलावण्यात आलेे होते. त्याच्याच हस्ते शाळेतील गुणवंतांचा सत्कार करायचा होता. त्या प्रसंगाने काही नाट्यप्रवेश -कलागुणांना वाव... -पोरं रंगरंगोटी करून थांबलेली. पोरांना वाट पाहायला लावून लावून लावून महान पाहुण्यांचे अेकदाचे आगमन झाले. मग त्यांचे मार्गदर्शन सुरू झाले.... पुढचे काही सांगण्याची गरज नाही!!

ही दोन केवळ अुदाहरणे आहेत. कुठे यापेक्षा वेगळे घडत असेल तर तोच अपवाद म्हणावा, आितकी परिस्थिती बिकट आहे. या संदर्भात शालेय शिक्षण विभागाचे कडक परिपत्रक निघाले आहे, असेही समजते. पण तिकडे कोणीच लक्ष देत नाही. अेरवी कोणताही कार्यक्रम वेळेला सुरू न करण्याची आपली ख्याती आहेच, पण मुलांना त्यात जो त्रास होतो तो दुर्लक्ष करण्याजोगा नाही. अेरवी मुलांना चटकाणी-चिमटाही चालणार नाही असे शिक्षकांवर बंधन आहे, ते  चुकीचे नाही. परंतु या प्रकारची शिक्षा फारच कठोर होते असे का वाटत नाही? ही दयनीय पाळी मुलांवर आणली तर पालकांनी तक्रारी करायला हव्यात, आणि जो कोणी कार्यक्रमाचा संयोजक असेल त्यालाच शिक्षा होणे आवश्यक आहे. ती शिक्षासुद्धा त्याच प्रकारची -म्हणजे मुलांनी जे जितका वेळ भोगले त्याच प्रकारची व्हावी.

कदाचित त्या संयोजक मंडळींस या शिक्षेचेही काही वाटणार नाही; कारण बाहेरच्या राजकारणी जगात त्यांना याचा अनुभव येतच असणार. त्या हलगर्जीपणातून येणाऱ्या कोडगेपणाचा सराव मुलांना व्हावा आणि भावी काळात त्याचा अुपयोग व्यवहारात व्हावा यासाठी हा कार्यानुभव देण्याचा तर अुद्देश नसेल ना?


युवकांनी परिस्थितीला दोष न देता आव्हाने स्वीकारावीत 
                                                -डॉ.विजय भटकर
कुंडल येथे क्रांतिअग्रणी जी डी बापू लाड  यांच्या नावचा पुरस्कार डॉ.विजय भटकर यांना देण्यात आला. तो स्वीकारल्यानंतर उपस्थितांसमोर डॉ.भटकर यांनी व्यक्त केलेले विचार-
        भारताचा इतिहास अत्यंत प्राचीन आहे. जगामध्ये अनेक मानवी संस्कृती तयार झाल्या. या प्रदीर्घ इतिहासामध्ये भारतीय संस्कृती विशिष्ट प्राचीन संस्कृती आहे. या संस्कृतीने संपूर्ण जगाला जी दिशा दिली त्याचा अभ्यास व्हायला हवा, तो तरुणांनी करायला हवा. जगामध्ये सुमेरिअन, मेसापोटीयन, इजिप्सीयन आणि ज्या अलेक्झांडरनं आपल्यावर आक्रमण केलं ती ग्रीक संस्कृती, रोमन संस्कृती, अमेरिकन संस्कृती, अशा अनेक संस्कृती या विश्वामध्ये आहेत. या देशामध्ये अनेक संस्कृती आल्या आणि त्यांचा लयसुद्धा झाला. त्या उदयास आल्या, टोकावर पोचल्या, काळाच्या ओघात मात्र सर्व संस्कृतींचा लय झाला.
आपली संस्कृती आजपर्यंत का टिकून राहिली? का ती चिरंतन राहिली? आणि पुढेही ती का चिरंतन राहणार आहे? भारत विश्वगुरू कसा? भारत पुढे कसा जाणार आहे? पुढे कसा व्हायला हवा? याचाही अभ्यास आपल्याला करायचा आहे. भारतीय संस्कृती ज्ञानाधिष्ठित संस्कृती आहे. आपल्या संस्कृतीमध्ये सर्वात श्रेष्ठ मानलं गेलं ते ज्ञान, -उच्चकोटीचं ज्ञान! इथे अनेक प्रश्न विचारले गेले. सर्वांत महत्वाचा प्रश्न विचारला गेला तो म्हणजे, `मी कोण आहे?' -हा प्रश्न कोणत्याही संस्कृतीमध्ये विचारला गेला नाही. माझ्या जीवनाचं प्रयोजन काय? आपण अनेक युनिव्हर्सिटीमध्ये शिकतो आहोत; पण कोणीही विचार करत नाही. आपल्या ऋषीमुनींनी जे प्रश्न विचारले, त्यांमध्ये सर्वांत महत्वाचा प्रश्न आहे की, मी कोण आहे? जीवनाचं प्रयोजन काय आहे? आपल्या संस्कृतीत सांगितलं गेलं की, अनेक जन्मांनंतर मानवी जीवन प्राप्त होतं. याचा अभ्यास सध्या चालू आहे, पुनर्जन्म आहे की नाही?
आपल्या संस्कृतीमध्ये अनेक जन्मानंतर आपल्याला मानव जन्म मिळतो, असं सांगितलं गेलं. जिज्ञासू ते आज शोधत आहेत. सर्वात महत्वाचं हे शिक्षण असायला पाहिजे. ही संस्कृती ज्ञानाधिष्ठित असल्यामुळे आणि त्यामध्ये मूळ प्रश्न विचारल्यामुळे आईनस्टाईन म्हणायचे, `आय एम नॉट इंटरेस्टेड इन धिस अँड दॅट.' हे काय आहे, ते काय आहे यामध्ये मला रस नाही. मूळ मानवी जीवनाचं प्रयोजन काय आहे? मी कशासाठी जन्माला आलो आहे? या संसाराचं, या ब्रह्मांडाचं रूप काय आहे? ते मला समजायचं आहे. पंडित नेहरू म्हणायचे, `अवर युनिव्हर्सिटीज आर फॉर युनिव्हर्सलायझेशन ऑफ माइंर्ड!' ते होतं का युनिव्हर्सिटीजमध्ये?
इंग्रजांच्याजवळ चांगली शस्त्रास्त्रे होती. त्यांच्याकडे काही प्रशासनाच्या चांगल्या कला होत्या, त्यांच्याकडे युद्धकला होती. शिवाजी महाराजांनी युद्धकलेच्याद्वारे प्रचंड मोठ्या अशा मुघल सेनेला तोंड दिलं. म्हणून ते ज्ञान महत्वाचं आहे, विज्ञान महत्वाचं आहे, प्रशासन महत्वाचं आहे. त्यातून भारताची पुढची चाल किंवा पुढची पायवाट असेल. पुढचं ज्ञान काय असायला पाहिजे याचा विचार करायला पाहिजे. १९४७ साली स्वातंत्र्य मिळालं त्या दरम्यान ट्नन्झीस्टरचा शोध लागला. एक आविष्कार किती महत्वाचा ठरतो. एक शोध संपूर्ण जगाला कसं बदलून टाकतो. १९४७ साली ट्नन्झीस्टरचा शोध अमेरिकेच्या प्रसिद्ध बेल लॅबोरेटरीमध्ये लागला. जो छोटासा बुर्जा असो, उपकरणे असो -त्याला ट्नन्झीस्टर म्हटलं गेलं, त्याचा शोध लागतो आणि जग बदलायला लागतं. त्या शोधामध्येच, जिला आपण विज्ञानाची क्रांती म्हणतो, ती क्रांती झाली. एका क्रांतीतून विज्ञान इतक्या वेगानं बदलायला लागलं की आपलं जीवन पूर्णपणे बदललं. आज एलईडी, मायक्रोफोन, रेडिओ, टेलिव्हीजन, संगणक, इंटरनेट, वेब हे सारं त्या एका गोष्टीमुळे शक्य झालं.
या विज्ञानाच्या युगामध्ये आपल्याला प्रचंड नवीन नवीन शोध लावावे लागतील. आपल्या युनिव्हिर्सिटीच्या इंजिनिअरिंग गणित शिक्षणामध्ये सातत्याने नवीन शोध लागतील.  जे देश नवीन शोध लावणार नाहीत, मुलं नवीन आविष्कार करू शकणार नाहीत किंवा ज्या कंपन्या नवीन आविष्कार करू शकणार नाहीत त्या पूर्णपणे नेस्तनाबूत होतील. त्या राहणारच नाहीत. संगणकातील ऑपरेटिंग सिस्टम मायक्रोसॉफ्टने पहिल्यांदा तयार केली. त्या एका शोधातून एका आविष्कारातून मायक्रोसॉफ्टसारखी कंपनी तयार केली, त्या कंपनीचा रेव्हेन्यू हा जगातील त्रेसष्ठ देशांच्या राष्ट्नीय उत्पन्नापेक्षा जास्त आहे.
भारताला पूर्णपणे बदलून टाकायचं असेल, अर्थव्यवस्थेला बदलून टाकायचं असेल, भारताला पुढं जायचं असेल, जगातील अग्रणी देश बनवायचा असेल तर नव्या आविष्कारांचं फार महत्व आहे. स्टार्टअप कंपन्या तयार व्हायला पाहिजेत, मुलांना नवीन प्रयोग करता आले पाहिजेत, शोध लावता आले पाहिजेत आणि त्याची सुरुवात शाळेपासून झाली पाहिजे. सतत नवीन शोध लावणार नाही, तर आपण जगामध्ये टिकू शकणार नाही. मग दुसरे देश येऊन आपली टेक्नॉलॉजी देऊन आपल्यावर पुन्हा राज्य करायला लागतील. या टेक्नॉलॉजीमुळे पारतंत्र्यात जाऊ शकतो.
संगणकाचा पहिला आर्किटेक्चर अॅलन टुरी, या ब्रिटीश सायन्टीस्टने वर्ल्ड वॉर दोनमध्ये संगणक तयार केलं. मग मी त्या आर्किटेक्चरचा अभ्यास करायला लागलो. असं वाटायला लागलं की जोपर्यंत संगणकाचं तंत्रज्ञान हाताळणार नाही, जोपर्यंत त्यावर नवीन आविष्कार करू शकणार नाही, ते पुढे नेऊ शकणार नाही, नवीन शोध लावू शकणार नाही तोपर्यंत भारत देश पारतंत्र्यातच राहील. ज्यावेळी भारताला नवीन उपकरणं लागायची, कंपोनन्ट्स लागायचे, संगणक लागणार होते, ते आपल्याला इंपोर्ट करावं लागायचं. आपल्याकडे फॉरेन एक्सचेंज नव्हती. मी हाच ध्यास घेतला. जोपर्यंत आपण हे करणार नाही तोपर्यंत एका दृष्टीने आपण पारतंत्र्यात आहोत. आपल्याला महासंगणक लागणार होता. राजीव गांधींनी महासंगणक अमेरिकेकडून मागितला पण अमेरिकेने साफ नाकारलं की `आमचे हे तंत्रज्ञान स्ट्न्ॅटेजीक आहे, ते आम्ही युरोपलासुद्धा देणार नाही, भारताला तर देणारच नाही. आपण त्याचा ध्यास घेतला तेव्हा या सर्व टेक्नॉलॉजीज विकसित करायला लागलो. युवकांनी अशी आव्हाने घेतली पाहिजेत! `सरकारनं हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, सरकार हे करत नाही.' -त्यापेक्षा `मी काय करतो' हे खूप महत्वाचं आहे.
`सरकार हे करत नाही,' `असं होत नाही', `असं व्हायला पाहिजे' असं न म्हणता युवकांनी `मी हे करून दाखवेन' अशी आव्हाने घेतली पाहिजेत. ऑटोमिक एनर्जीच्या संदर्भात डॉ.भाभांनी पंडित नेहरूंच्यापुढे प्रस्ताव मांडला होता की, आपल्याला ऑटोमिक एनर्जी तयार करावी लागेल, रिअॅक्टर तयार करावे लागतील, भारताकडे हे तंत्रज्ञान नाही. पण डॉ.भाभांनी हे आव्हान घेतलं आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चला अनेक वैज्ञानिक तयार केले. त्यातून भारत रिअॅक्टर तयार करू शकला.  ज्यावेळी  आपल्याकडे शाळा नव्हत्या, कॉलेजेस नव्हती, पैसा नव्हता, फॉरेन एक्सचेंज नव्हती त्यावेळी विक्रम साराभाइंर्नी स्पेस प्रोग्रामचे आव्हान घेतलं. आज स्पेस प्रोग्रॅममध्ये आपण पुढे गेलो. आज आपण `चंद्रयान'ची गोष्ट करतो किंवा मंगळयानची गोष्ट केली. हे करताना अनेक फेल्युअर्स येतात. कोणत्याही देशात एकदम काही झालं नाही, ही अपयशं पचवण्याची हिंमत असली पाहिजे. पुन्हा त्याच जोमाने काम करू शकलो पाहिजे.
कोणत्याही अपयशाने निराश न होता, मागे न पडता आपण पुनश्च प्रयत्न केले पाहिजेत. `अवर ग्रेटनेस लाईज नॉट इन फॉलिंग बट् राईसिंग अगेन अँड अगेन एव्हरी टाईम यू फॉल'. भारताची जगामध्ये तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था तयार झाली आहे. असं कधीही कुणालाही वाटलं नव्हतं. एके काळी अत्यंत गरीब देश, ज्या देशाला अनेकवेळा लुटलं गेलं. एवढी मोठी लोकसंख्या वाढ होती. आपण अन्नान्न झालो होतो. त्यातून आपण वर आलो आहोत. अर्थव्यवस्थेच्या बाबतीत पहिला चीन; कारण एका दृष्टीने चीनने अमेरिकेला मागे टाकले आहे, त्यानंतर अमेरिका आणि त्यानंतर आपला भारत देश आहे. परचेसिंग पॉवर पॅरिटीच्या दृष्टीने! पंतप्रधान म्हणतात, `आपल्याला पाच टि्न्लीयन डॉलर इकॉनॉमी तयार करायची आहे.' ती होईल की नाही हा प्रश्न नाही. त्याच्या पुढे आपल्याला जायचं आहे.
भारत एक समृद्ध देश; ज्ञानाला, शोधाला, आविष्काराला, नवीन शोधांना महत्व द्यायचं आहे. येणाऱ्या जगामध्ये युवा पिढी कोणकोणते नवीन शोध लावू शकेल? कृषी क्षेत्रामध्ये इस्त्राईलने करून दाखविलं, मग भारतीय युवक ते का करून दाखवू शकणार नाही? विज्ञानामध्ये काय काय शोध लागतील, कशा तऱ्हेने जग बदलायला लागेल, त्याची कल्पनासुद्धा आपण करू शकत नाही. येणारे संगणक, येणारी कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, व्हर्च्युअल रिअॅलीटी, टेलिविजन, अनेक संप्रेषण शक्ती या आपल्याला थक्क करतील. यासाठी नवीन शिक्षण तयार करायचं आहे. कधी कधी प्रश्न येतो की, माझ्या शाळेमध्ये हे नाही, लॅबोरेटरीज नाहीत, साधने नाहीत, बजेट नाही; -तर आपण हे करू शकणार नाही. माझा अनुभव आहे की, जेव्हा आपल्याला एखादं तंत्रज्ञान नाकारलं गेलं त्याचवेळी आपण उभे राहिलो आहोत. माझ्या क्षेत्रामध्ये `मी काय करू शकतो?' हे आव्हान घेऊन मला पुढे जायचं आहे. तरुणांचा हा विचारच असायला नको की, मला हे नाही, ते नाही... त्यामुळे मी हे करू शकणार नाही, ते करू शकणार नाही. याच्यावर दोष द्यायचा, त्याच्यावर दोष द्यायचा. ही भाषाच वापरायला नको. हे नाही, तरी मीच ते करून दाखवेन. या परिस्थितीमध्ये मी काय करू शकतो, हे महत्वाचं आहे. असे नवयुवक, नवे इंजिनिअर्स वैज्ञानिक तयार करणं महत्वाचं आहे. हे करत असताना आपण लक्षात ठेवलं पाहिजे की, हे तंत्रज्ञान गरिबातील गरिबापर्यंत खेडेगावामध्ये मी कसं नेऊ शकतो? माझी मातृभूमी बहुभाषी आहे. इथे बावीस राजमान्य भाषा; त्या भाषेमध्ये मी हे तंत्रज्ञान कसं उपलब्ध करेन, मराठीच्यामागे संगणक नसेल तर माझी भाषा मागे राहील.
माझा पहिला प्रयत्न असा होता की, सर्व भारतीय भाषा संगणकावर आल्या पाहिजेत. संगणकाचं एज्युकेशन गावागावापर्यंत पोहोचलं पाहिजे. लोकांना संगणक वापरता आला पाहिजे. आज सर्वात जास्त संगणक-साक्षरता भारत देशामध्ये आहे. आपण ते करू शकलो. जगामध्ये सर्वात जास्त सॉफ्टवेअर इंजिनिअर भारताचे आहेत. आपला देश वैदिक काळापासून समृद्ध देश होता. त्यानंतर आक्रमणे झाली. आपला देश अनेकवेळा लुटला गेला. आता काळ आलेला आहे की हे एकविसावे शतक भारताचं असेल. ज्ञानामध्ये, विज्ञानामध्ये, तंत्रज्ञानामध्ये, आध्यात्मिक ज्ञानामध्येसुद्धा जी समृद्धी आपण तयार केली होती ती पुनश्च एकदा निर्माण करून आजच्या संपूर्ण जगाला द्यायची आहे. भारताला विश्वगुरू करून दाखवायचं आहे. मी जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत मला असा `भारत देश' पाहायला मिळेल. मला हा प्रश्न नेहमी विचारला जातो की, `तुम्ही विज्ञानावरही बोलता आहात आणि अध्यात्मावरही बोलता आहात? हे कसं काय? तुम्ही ज्ञानेश्वरीवरही बोलताय आणि महासंगणकावरही बोलता आहात! हे भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये सातव्या अध्यायात ज्ञान-विज्ञान योगामध्ये सांगितलं आहे.  ज्ञान आणि विज्ञान जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत आपलं ज्ञान अर्धवट राहील. नुसतं सायन्टिफीक नॉलेज किंवा विज्ञान, तसंच अध्यात्माचं अर्धवट ज्ञान धोकादायक आहे. `हाफ नॉलेज इज डेंजरस'.
जे प्रश्न जगासमोर आहेत -क्लायमॅट चेंज असेल, क्रॅन्सरचा प्रश्न असेल, ते आपण एकत्र पाहिले आहेत का? ऋषीमुनींनी, आपल्या शास्त्रामध्ये दोन्हींचा अभ्यास एकाच वेळी झाला पाहिजे असं पाहिलं. या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपल्या पारंपरिक ज्ञानाची गरज जगाला आहे. त्याचबरोबर आधुनिक ज्ञानाची. जगाचे अनेक सॅटेलाईट आपण सोडतो. तेही ज्ञान आपल्याकडं आहे. संगणकाचं ज्ञान आपल्याकडं आहे. आपल्या देशाला जी परंपरा लाभली आहे ती पुनश्च मिळेल. `इंडिया विल रिगेन दॅट ग्रेट ग्लोरी अँड शेअर विथ द वर्ल्ड, नॉट क्रॅप्च्युअर्ड द वर्ल्ड!' असा देश, असे गुरुत्व आपल्याला प्राप्त होवो, हीच भारतासमोर प्रार्थना.

आठवांचे साठव
व्यवसायनीती
किर्लोस्करवाडीच्या कारखान्याचं छपाआीकाम करणारे आधीपासूनचे चार प्रेस होते, ते सारे ताकतीचे, अनुभवी वगैरे. मी त्यात लिंबूटिंबूच म्हणायचा. पण माझे लागेबांधे आणि स्थानिक अंतर यांमुळे माझ्या प्रेसला खूप काम मिळत होतं. वर्षा-दोन वर्षांतून कारखान्याकडून त्यांचे दर ठरविले जात. त्यासाठी अेकदा साऱ्यांची बैठक बोलावली होती. बाकीच्या साऱ्यांचा सूर असा होता की, `मायबाप कुंपणी सरकारनं आमच्यावर कृपावंत होअून पोटाकडं पाहून काही दरवाढ करावी; आम्ही आपले काम तर आिमाने आितबारे करणारच आहोत, आम्ही कोण आमच्या कामाचे दर सांगणार....?'  -हे लक्षात घेअून तिथला वरिष्ठ अधिकारी आम्हा साऱ्यांना समजावून सांगतो अशा सुरात म्हणाला, `हे पहा, आम्हाला तुमचं नुकसान तर करायचंच नाही. दर ठरवताना कागदाची किंमत, तुमच्या कामगाराचा पगार, वीज, शाआी वगैरे सगळं धरलं तर शंभर रुपये खर्च होत असतील तर पंधरा रुपये तुमचा नफा घ्या; आणि अेकशे पंधरा रुपये दर तुमचा करूया? चालेल?' सारेजण अेकमेकांकडं पाहात पुटपुटले, `हो; -म्हणजे चालेल म्हणूया...पण तुम्हीच बघा, थोडं वाढविता आलं तर.., हल्ली खर्च वाढलेत; हॅ हॅ हॅ...' या लीन शब्दांत बाजू मांडत होते. मग कंपनीच्या त्या अधिकाऱ्यानं अुदार मनानं पंधराअैवजी सोळा रुपये नफा धरून अेकशे सोळा केले.
मी नवखा असलो तरी हे पटेना. मी माझं वय, पात्रता काही विचारात न घेता त्या अधिकाऱ्याला म्हणालो, `साहेब, हेच गणित तुमच्या अुत्पादनाला लावूया का? बिडाचं कास्टिंग, मशीनिंग, तुमचा पगार हा खर्च काढून त्यावर सोळा टक्के नफा धरा आणि तुमचा पाण्याचा पंप तीनचारशे रुपयांत द्या ना! त्याची किंमत तीन हजार कशी?' साहेब हसून म्हणाले, `छे छे, तसं कसं होणार? आम्हाला बाकीचे बरेच खर्च असतात. कँटीन, संरक्षण, बागबगीचा हे सारं जपावं लागतं. ते पैसे कुठून येणार?' बाकीचे सोबती चूप अैकत होते, मी दणकून म्हणालो, `-मग आम्ही छोटे  कारखानदार आहोत. आम्हालाही दारी बाग असावी असं वाटतं. आम्ही कायम मळकी विजार आणि फाटका गंजीफ्रॅाक घालूनच वावरू काय?' पुष्कळांना आठवत असेल की, त्या काळी प्रेसवाल्यांचा हाच अवतार असायचा.
तात्पर्य असं की, बाकीच्या मंडळींत सामील न होता, मी कारखान्याचं काम नाकारलं आणि आितरांनी त्यांचं मान्य केल्यानं त्यांतून मी बाजूला राहिलो. बैठक संपली. संध्याकाळी हे अधिकारी मला बाजारात भेटले. त्यावेळी ते म्हणाले, `तुमचं म्हणणं अचूक होतं. त्या बैठकीत आितरांनी ते मान्य केल्यानं कारखान्याचा अधिकारी म्हणून मला निर्णय घ्यावाच लागला. पण तुम्ही नवीन असून योग्य ते बोललात. अेक लक्षात घ्या, कारखान्याचं काम तुम्हाला देता आलं नाही तरी तुम्हाला आिथं काम कमी पडणार नाही.'
वाडीची संस्कृती मी म्हणतो ती ही!! मला खरंच काम कमी पडलं नाही. सगळया वरच्या लोकांशी संबंध सलोख्याचेच राहिले. कदाचित त्यांच्या मनांत, -हा माणूस जरा अस्थानी चढेल आहे, असंही वाटत राहिलं असेल. पण सारासार विचार करता बरोबरीच्या नात्यानंच मी तिथं कुणाशीही वागत वावरत होतो
-वसंत आपटे, (किर्लोस्करवाडी-सांगली)
फोन- ९५६१३९०८९०

माझं बुद्धिप्रामाण्य
ज्येष्ठ कलाकार डॉ.श्रीराम लागू यांचे गेल्या महिन्यात वृद्धापकाळाने निधन झाले. 
समाजाप्रति त्यांचा कृतज्ञतेचा भाव होता. बुद्धिप्रामाण्यवादी विचारांशी त्यांनी तडजोड केली नाही. 
परमेश्वर आणि विज्ञानवाद यांबाबत त्यांचे विचार-
मीसुद्धा भारतीय आहे. भारतीय संस्कृतीत वाढलो आहे. एका कर्मठ कुटुंबात वाढलेला आहे. तरीसुद्धा लहानपणापासून नास्तिक झालो आहे. माझ्या नास्तिक होण्याचं स्वरूप सांगतो. परमेश्वर म्हणजे, मनाला समाधान लाभावं म्हणून एक आधार घेतलेली संकल्पना, अशा संकल्पनेचा आधार घेतल्यामुळे माझ्या मनाला एक स्ट्न्ेंग्थ मिळते, असा परमेश्वर माझ्या मनामध्ये नाही. परमेश्वर म्हणजे एक अतिमानवी अशी शक्ती आहे, तिनं विश्वाची निर्मिती केलेली नाही, तरी विश्वाचं नियंत्रण करणारी ती शक्ती आहे. त्या शक्तीला मी शरण गेलं पाहिजे, त्या शक्तीचा जर कोप झाला तर माझ्यावर दुर्दैवाचा प्रसंंग कोसळेल आणि ती शक्ती जर प्रसन्न झाली तर माझ्या आयुष्याचं कल्याण होईल, ही परमेश्वराविषयी जी संकल्पना आहे, अशा परमेश्वराशी माझं भांडण आहे.
ही संकल्पना सामान्य माणसाची असते. एखाद्या ज्ञानेश्वराची संकल्पना आध्यात्मिक स्वरूपाची असते. स्वत:च्या आत्म्याला मोक्ष आणि मुक्ती मिळावी म्हणून त्या शक्तीचं ध्यान करावं, नामस्मरण करावं आणि त्यामुळं मनाला शांती मिळावी हा त्यामागं हेतू असतो. अशा संकल्पनेशी माझं भांडण नाही. भांडण नाही एवढ्याचकरिता की, ती त्या त्या माणसापुरती असते, समाजाला त्याचा काही त्रास नाही. अगोदर सांगितलेली संकल्पना मात्र अतिशय उपद्रवी आहे. ही संकल्पना निर्माण कशी झाली याचा विचार करताना असं लक्षात येतं की, परमेश्वर नावाच्या शक्तीचा कसलाही पुरावा गेल्या पाच हजार वर्षांत माणसाला देता आलेला नाही. त्या संकल्पनेवर माणसाचा दृढ विश्वास कसा बसला? परमेश्वर या संकल्पनेचा उगम कसा झाला असेल?
अगदी पुरातन काळ -म्हणजे मी पाच हजार वर्षे म्हणतोय ते अगदी मोजून घ्यायचं नाही, आपला वैदिक काळ साधारण पाच हजार वर्षांपूर्वीचा म्हणतात त्या अर्थानं घ्यायचं. तर पाच हजार वर्षांपूर्वी माणूस बौद्धिक दृष्ट्या एका सामान्य पातळीवर होता. त्याला साध्या-साध्या नैसर्गिक घटनांचा अर्थ कळत नव्हता. म्हणजे पाऊस कसा पडतो, भूकंप कसा होतो, ज्वालामुखीचा उद्रेक कसा होतो हे त्याला कळत नव्हतं आणि त्याच वेळेला, वेळच्या वेळी पाऊस पडला तर शेती कशी चांगली होते हे त्याला दिसत होतं. आकाशात वीज कडाडताना पाहून सौंदर्याचा अनुभव मिळत होता, त्याच वेळेला तीच वीज खाली जमिनीवर पडली की हाहाकार माजतो, त्यानं तो गांगरूनही जात होता. तो या सगळया गोष्टींचा असा अर्थ लावत होता की, या सगळया शक्तीचं नियंत्रण करणारी एक अतिमानवी शक्ती आहे, ही एक जबरदस्त ताकद आहे, आणि ही आभाळात कुठंतरी आहे.
त्या माणसानं अशी धारणा करून घेणं हे त्याच्या अल्पबुद्धीचं लक्षण होतं यात काही वाद नाही. परंतु त्या शक्तीच्या अस्तित्वाचा पुरावा आपण शोधून काढावा हे त्या माणूस नावाच्या प्राण्याला गेल्या पाच हजार वर्षांत सुचलं नसेल का? त्याला नक्कीच सुचलं असेल, ही व्यक्ती शोधून काढायचा त्यानं नक्की प्रयत्न केला असेल. काही व्यक्तींना साक्षात्कार झालेले आहेत. काहींनी असं म्हटलं की, ज्ञानेश्वरांना साक्षात्कार झाला, साक्षात देव दिसला. तुकाराम महाराजांना साक्षात विठोबा दिसला. ही साक्षात्कार झालेली माणसं भोंदू नाहीत. प्रामाणिक आहेत. काहीतरी तळमळीनं सामाजिक काम करणारी आहेत. त्यांना साक्षात्कार झाले असतीलही, पण मला साक्षात्कार होत नाही. याचा अर्थ मी पापी माणूस आहे, तुकाराम-ज्ञानेश्वर यांच्या लेव्हलवर जात नाही अशी समजूत त्यांनी करून घेतली. याला पहिला धक्का बसला विज्ञानाच्या उदयानं.
प्रतिकात्मक विध्वंस विज्ञानाची सुरुवात झाली चारशे वर्षांपूर्वी. कोपर्निकस या शास्त्रज्ञानं पहिला धक्का दिला. त्यानं सांगितलं की, सूर्य हा पृथ्वीभोवती फिरत नाही, तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते. बायबलमध्ये सांगितलं होतं की, पृथ्वी ही विश्वाचा केंद्रबिंदू आहे आणि सगळे तारे-ग्रह तिच्याभोवती फिरतात. धर्मगुरूंनी जाहीर केलं की, हा माणूस पाखंडी आहे. कोपर्निकस काही परमेश्वराच्या वा धर्माच्या विरुद्ध निघालेला नव्हता. तो सत्याच्या शोधात निघालेला होता. त्याला अनुभव व प्रयत्नांनी सत्य दिसलं ते असं की, सूर्य हा पृथ्वीभोवती फिरत नसून पृथ्वीच सूर्याभोवती फिरत आहे. हे सत्य मांडण्याचं धैर्य त्यानं दाखवलं, आणि त्या विज्ञाननिष्ठ माणसाला प्राण गमवावे लागले. कारण धर्मविरोधी मत मांडलं होतं, इतकं ते माणसाच्या डोक्यात तीन हजार वर्षे घट्ट बसलं होतं.
गॅलिलिओला त्याच्या दुर्बिणीच्या शोधामुळं जवळपास हेच भोगावं लागलं. त्यानं माफी मागितल्यामुळे तो सुटला. पण त्याच्या दुर्बिणीतून त्यानं सिद्ध करून दाखवलं की, पृथ्वी सूर्याभोवतीच कशी फिरत आहे ते. मात्र माणसाच्या मनात परमेश्वराची संकल्पना एवढी घट्ट बसली होती की, तिचा त्याग करण्यास तो सहजासहजी तयार होत नव्हता. तो त्याग केल्याशिवाय माणसाला घरेलू वृत्तीच्या आयुष्यात सुख नांदेल असं दिसलं नाही, कारण माणसानं परमेश्वर या संकल्पनेचा पाच हजार वर्षांत तेवढा उदो उदो केला आहे. `तो विश्वाचा पालनकर्ता आहे, अत्यंत दयाळू अशी ती शक्ती आहे, भक्तानं बोलावल्याबरोबर तो धावून जातो' वगैरे वगैरे विधानं त्यानं केली आहेत. याच्यावर विश्वास ठेवणं आलं.
एकापाठोपाठ एक धर्म स्थापन झाले. प्रथम फक्त हिंदू धर्म होता.  नंतर िख्र्चाश्ॅनिटी आली आणि बाराशे वर्षांपूर्वी इस्लाम धर्म स्थापन झाला. या सर्व धर्मांमध्ये परमेश्वराचं अधिष्ठान ही एकच कॉमन गोष्ट आहे. अशी एक शक्ती आहे, आणि त्या शक्तीच्या अस्तित्वाचा कुठलाही पुरावा आतापर्यंत माणसाला मिळालेला नाही. हे सर्व धर्म विज्ञानाच्या उदयाच्या अगोदरचे आहेत. त्या नैसर्गिक प्रश्नांची उत्तरं माणसाला सापडत नव्हती. म्हणून एका परमेश्वर या संकल्पनेची कल्पना केली गेली. आज या बहुतेक प्रश्नांचा उलगडा विज्ञानानं केला. सगळयाच प्रश्नांची उत्तरं विज्ञानाला सापडली असा विज्ञानाचा दावा नाही. विज्ञानाचा दावा प्रामाणिकपणाचा आहे. नम्रतेचा आहे. विज्ञानानं काही शोध लावलेले आहेत, काही शोध लागताहेत, आणि पुढेही लागतील. विज्ञान उद्धटपणे असं सांगत नाही की, माझ्याकडं सगळया प्रश्नांची उत्तरं आहेत. गीता वा कुराण वा बायबल या धर्मग्रंथांमध्ये सगळया प्रश्नांची उत्तरं आहेत असं सांगितलं जातं; असं उद्धटपण विज्ञानाकडं नाही. हे विश्व कुणी निर्माण केलं हे आता नाही सांगू शकत; पण आणखी काही वर्षांनी त्याचा शोध लागेल अशी चिन्हं दिसत आहेत.
या चारशे वर्षांत धडाधडा इतक्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत, आणखी चारशे वर्षे गेली की, याही प्रश्नांची उत्तरं ते देईल असं दिसतं! आज अस्तित्वात असलेले सर्व धर्म विज्ञानाच्या उदयापूर्वीचे असल्यामुळं ते सर्व कालबाह्य झालेले आहेत, ते सर्व रद्दबातल केले पाहिजेत. या सर्व धर्मांची सर्वधर्मसमभाव ही भोंगळ संकल्पना आहे. म्हणजे सर्व धर्म सारखे आहेत. परंतु हे खरं नाही हे मला उघड दिसत आहे. सर्व धर्म एकमेकांहून वेगळे आहेत म्हणूनच ते एकमेकांशी भांडताहेत. हे धर्म स्थापन झाल्यापासून धर्माधर्मात कलह चालू आहेत त्यांनी पृथ्वीवर एवढा रक्तपात केलाय. रक्तपात होण्याचे जे दुसरे अनेक मार्ग आहेत, -म्हणजे रोगराई, दैवी-प्रकोप -यांच्यामुळे जेवढी माणसं मारली जातात, त्याहून कितीतरी अधिक माणसं धर्माधर्मात जे कलह झाले, जी युद्धे झाली त्यांमध्ये मारली गेली आहेत. धर्म शांतिप्रेमाचा संदेश देतात असं म्हणतात, त्याचा अर्थ मला कळत नाही.
परमेश्वराला रिटायर करण्याचा अर्थ हा की, ही संकल्पना तुमच्या डोक्यातून काढून टाकल्याशिवाय निधर्मीपणाची संकल्पना तुमच्या डोक्यात घुसणार नाही. सर्व मानवाचा एक धर्म पाहिजे. त्यात परमेश्वराचं अधिष्ठान नाही. त्यात केवळ नीतिमत्तेचं अधिष्ठान असेल. त्यात केवळ शास्त्रीय-वैज्ञानिक दृष्टिकोण असेल. यात सौंदर्यदृष्टीचं अधिष्ठान असेल. सबंध मानवजातीला कवेत घेऊ शकेल असा एक धर्म (धर्म हा शब्द वापरायचा असेल तर) असेल. समाजाची धारणा करतो तो धर्म या अर्थानं हा शब्द मी वापरतो आहे. मात्र समाजाचे काही नितीनियम पाळलेच पाहिजेत!
जर सर्व धर्म बाद करायचे असतील, तर आपल्या डोक्यातील परमेश्वर ही संकल्पना नाहीशी केली पाहिजे, तर मानवतेच्या एका प्लॅटफॉर्मवर आपण जगाला काही देऊ शकू. विश्वधर्माची कल्पना अनेक लोकांनी मांडली आहे. विवेकानंदांनी मांडली आहे. त्यांनी एके ठिकाणी म्हटलं आहे की, `बुद्ध हा सर्वश्रेष्ठ कर्मयोगी आहे.' त्यानं आपला हिंदू धर्म सोडून स्वत:चा बौद्ध धर्म स्थापन केला. तो सर्वश्रेष्ठ कर्मयोगी आहे, म्हणजे सर्वश्रेष्ठ हिंदू आहे,' इतकं भोंगळ विधान विवेकानंद करूच शकत नाहीत. त्याचा अर्थ असा असावा की, जो लोककल्याणाकरिता सातत्यानं कर्मयोग आचरणात आणतो तो खरा हिंदू. मग त्याचा धर्म कुठलाही असेल. हिंदू धर्माची व्याख्या त्यांनी इतकी व्यापक केली आहे. बुद्धाला त्यांनी खरा कर्मयोगी अशाकरिता म्हटलं की, तो सातत्यानं लोककल्याणाकरता झटला. तो कुठल्या धर्माचा हे विचारत राहिला नाही.
                                                              -(`रूपवेध' या पुस्तकातून)

सेंद्रिय आधारित केंद्रिय राज्य: सिक्कीम
                                                  -श्रीनिवास पाटील
गेल्या चाळीस वर्षांत सिक्कीमने उत्तम प्रगती केली असून सर्वांचा सक्रिय सहभाग असलेले लोकशाहीप्रधान राज्यव्यवस्थेचे  प्रारूप त्याने चांगल्या प्रकारे यशस्वी करून दाखविले आहे. तीन आंतरराष्ट्नीय सीमांनी वेढलेल्या सिक्कीमची भौगोलिक रचना अनेक दृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण आहे, त्यास समृद्ध इतिहास, वैविध्यपूर्ण संस्कृती, जैव विविधता आणि निसर्गाचे अमाप वरदान यांचा फार मोठा वारसा लाभला आहे. देशातील सर्वांत शांततापूर्ण राज्य, असाही या राज्याचा लौकिक असून या शांततेचा त्या  राज्याच्या  सर्वांगीण प्रगतीस फार मोठा हातभार लागलेला आहे.
गेल्या चाळीस वर्षांच्या वाटचालीत सिक्कीमने जी प्रगती केली, त्याची काही आकडेवारी मी येथे आवूर्जन मांडू इच्छितो. राज्यात साक्षरतेचे प्रमाण ८२:२० टक्के असून आता जेमतेम ८ टक्के नागरिक दारिद्य्ररेषेखाली आहेत. सिक्कीममधील नागरिकांचे दरडोई वार्षिक उत्पन्न सरासरी २ लाख २७ हजार ९०८ रुपये आहे. एकूण प्रगती व विकासाच्या बाबतीत हे राज्य संपूर्ण देशात सातत्याने अव्वल स्थानी राहिले आहे. दरडोई उत्पन्न, साक्षरतेचे प्रमाण, बालमृत्यूचे प्रमाण, सर्वसाधारण आयुर्मान आणि अन्य बहुतेक सर्व सामाजिक व आर्थिक निकषांचा विचार केला तर हे राज्य देशात सर्वोत्तम आहे अशाच निष्कर्षाप्रत यावे लागते. आजघडीस देशातील प्रागतिक राज्यांच्या रांगेत सिक्कीमला जे स्थान मिळाले आहे, ते काही उगाच नाही, हे मी येथे आवर्जून नमूद करतो.
सन १९९५-९६मध्ये सिक्कीम शासनाने आपल्या योजना-खर्चातील ७० टक्के रक्कम ग्रामीण विकासाकडे वळविण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला, त्यातच येथील ग्रामीण भागाच्या सर्वंकष विकासाची मुळे दडलेली आहेत. पिण्याचे शुद्ध पाणी, वीज, शिक्षण, आरोग्यसेवा आणि रस्ते बांधणी या सर्व बाबींचे लाभ ग्रामीण भागातील जनतेपर्यंत प्राधान्याने पोचवून या राज्याने शहरी व ग्रामीण भागातील दरी सांधण्याचे काम आजवर केले आहे, त्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच ठरेल.
जिल्हा, तालुका व पंचायत स्तरावर काम करणाऱ्या अधिकारी व कार्यकर्त्यांना आवश्यक ते सर्व अधिकार देण्यावर आणि सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यावर सरकारच्या मुख्य धोरणांचा सर्व भर आहे. त्यामुळे राज्यातील पंचायत राज व्यवस्था बळकट झाली आहे. राज्याची नियोजन प्रक्रियाही विकेंद्रित आहे. जिल्हा पंचायतीमध्ये जिल्हास्तरीय विकास योजनांची आखणी करण्यासाठी स्वतंत्र विकास मंडळे स्थापण्यात आली असून ३१ तालुका प्रशासकीय केंद्रेही सुरू करण्यात आली आहेत. सध्या ती संपूर्ण राज्यभरात आहेत. त्यांच्या माध्यमातून सारी प्रशासन यंत्रणा ग्रामस्थांच्या दरवाजापर्यंत पोचली असून, त्याचा त्यांना मोठा लाभ मिळाला आहे.
सरकारने विकासाची २१ उद्दिष्टे निश्चित केली असून २०२० सालापर्यंत ती पूर्ण करण्याचे ठरविले आहे. त्यात साक्षरता अभियान, हरित अभियान आणि मोफत कच्चे घर योजना यांचा विशेषत्वाने अंतर्भाव आहे. हे सर्व कार्यक्रम राज्यास स्वयंपूर्णता देण्यासाठी व विकासाचे सातत्य राखण्यासाठी आहेत. सिक्कीम वेगाने प्रगती करीत असून ग्रामीण विकास म्हणजे शिक्षण, आरोग्य, पर्यटन, पर्यावरण व्यवस्थापन, न्याय व सुरक्षितता आदी क्षेत्रांतील उत्तम कामगिरीबद्दल त्यास अनेक पारितोषिके मिळालेली आहेत. नुकतेच स्वच्छता व पंचायती राज्य प्रणालीचे उत्तम काम याबद्दलही त्यास राष्ट्नीय स्तरावर गौरविण्यात आले आहे. या पुरस्कारांमुळे सर्वांना अधिक काम करण्यासाठी चांगले प्रोत्साहन लाभले आहे.
गेली सलग चार दशके राज्यात शांतता, सुरक्षितता, धार्मिक सामंजस्य व राजकीय स्पर्धेचे वातावरण राहिल्यामुळे सिक्कीमने जीवनाच्या सर्व क्षेत्रांत मोठी प्रगती केली आहे. या राज्यातील गुन्हेगारीचे प्रमाण नगण्य असून कामगार क्षेत्रातही शांततेचे वातावरण आहे. त्यामुळे सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या तत्वावर येथील उद्योग क्षेत्रात मोठी गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी सिक्कीम ही अगदी योग्य व आदर्श भूमी आहे.
पर्यावरणाचे संरक्षण आणि विकास या दोन गोष्टींना कायमच सर्वोच्च प्राधान्य आहे. सिक्कीमला `सेंद्रिय राज्य' (ऑरगॅनिक स्टेट) बनविण्यासाठी जाणीवपूर्वक कृषी आधारित व पर्यावरणपूरक उद्योगांना प्रोत्साहन आहे. सेंद्रिय शेतीमुळे सिक्कीमचा नावलौकिक जगभर पसरतो आहे. पर्यावरणाच्या संरक्षणास असलेली बांधिलकी या धोरणांतून स्पष्ट होते. शिक्षण व आरोग्य या अन्य दोन महत्वाच्या बाबींनाही सरकारचे प्राधान्य आहे. महाविद्यालयीन पातळीपर्यंतचे सर्व शिक्षण मोफत दिले जाईल.
भूपृष्ठ, हवाई आणि ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी हा सरकारच्या सर्व विकास कार्यक्रमांच्या मार्गातील मोठा अडथळा आहे. तो दूर करण्यासाठी केंद्र सरकार व अन्य संबंधित संस्थांच्या सहकार्याने झटत असून राष्ट्नीय व राज्य महामार्गांचा दर्जा उंचावण्यात चांगले यश मिळाले आहे. पाक्योंग येेथे विमानतळ उभारण्याचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे.
    (-मा.श्रीनिवास पाटील हे सिक्कीमचे माजी राज्यपाल , विद्यमान सांसद (खासदार) आहेत. )

सायकलवाले सांगलीभूषण : गोविंदकाका परांजपे 
विश्वजागृती मंडळाच्या वतीने दिला जाणारा `सांगलीभूषण' पुरस्कार नुकताच गोविंद भास्कर परांजपे (माधवनगर) यांना देण्यात आला. २५हजार रुपये रोख आणि सन्मान असे पुरस्काराचे स्वरूप आहे. साताऱ्यात `भूषणावह' असलेले अरुण गोडबोले यांच्या हस्ते आणि विवेक घळसासी यांच्या अुपस्थितीत तो सोहळा झाला.
गोविंदराव परांजपे हे आजरा व आिचलकरंजीतून माधवनगरला स्थायिक झाले. नोकरी करत त्यांनी शक्य तितके शिक्षणही घेतले. त्यांच्या सामाजिक कामाचे बरेच पैलू आहेत परंतु सायकलवरून भ्रमण हे त्यांचे खास वैशिष्ट्य. त्यांनी कन्याकुमारी ३वेळा, नेपाळ-काठमांडू-पोखरा २वेळा, याशिवाय गंगोत्री, हैदराबाद, लखनौ, सोमनाथ असे भ्रमण सायकलवरून केले आहे. १२५ दिवसांत १०हजार किमी अंतर त्यांनी पूर्ण केले होते. नुकतेच ८२व्या वर्षी ते ज्येष्ठ नागरिकांच्या अधिवेशनासाठी आिंदूर व नांदेडला सायकलवरून जाअून आले. मॅरेथॉन, क्रॉसकंट्नी अशा स्पर्धांत ते आघाडीवर राहिले.
सांगलीच्या पोलीस-अधीक्षकांनी `पोलीसांसोबत चाला' अशी मोहीम काढली होती. त्यात त्यांच्या पत्नीनेही(माहेरच्या आपटे) भाग घेतला. विशेष म्हणजे अनुराधाकाकूंचा त्यात पहिला क्रमांक आला आणि गोविंदराव तिसरे! या दांपत्याचे प्रकृतीमान आणि अुत्साह-अुमेद यांचा आदर्श आजच्या पिढीसमोर ठेवावा म्हणून त्यांना या श्रेष्ठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, असे मंडळाचे अध्यक्ष अरुण दांडेकर यांनी सांगितले.
परांजपे यांचा संपर्क : -गोविंद परांजपे, २५८ मंगळवार पेठ, माधवनगर (सांगली)
फोन- ९०११८१७८९०

सहज सुचलं
                   -झकासराव
परवा एका ऑफिसची गोष्ट ऐकली. काम करणारी सगळी मंडळी जवळपास एकाच दर्जाची. नेहमीच्या ओळखीतले सगळेच असल्यामुळं वागणूक `ऑफीस'ची राहिली नाही. कारभार सगळा गबाळा बनून गेलेला. टेबलं अस्ताव्यस्त; कपडे, दाढ्या सारंच `ऑफिस'ला न शोभणारं. एक दोनदा प्रमुख अधिकाऱ्यानं सांगून पाहिलं. तेवढ्यापुरतं ऐकलं जायचं, पुन्हा आपलं ये रे माझ्या मागल्या. बरं, फाडफाड टाकून बोलावं तर घसटीतली माणसं, त्यात पुन्हा अधिकारी!! काम चालू होते पण रया अशी नव्हती; रुबाब नव्हता. प्रमुखानं एके दिवशी आपल्या मित्राजवळ हे बोलून दाखविलं.  मित्रानं विचारलं, ``ऑफिसात एखादी तरी पोरगी आहे?''
``नाही! पण इथं पोरीचा काय संबंध?''
``बराच! एकदोन साळकाया ऑफिसात नेमून घे.'' तसंच  झालं, एके दिवशी एक तरुणी ऑफिसात आली. थोड्या दिवसांत दुसरी आली. सुरुवातीला सारं ऑफीस अवाक् झालं. पण पुन्हा हळूहळू रूप पालटायला लागलं. रोज दाढ्या करून मंडळी ऑफिसात येत. कपड्यांची घडी विस्कटलेली नसे. टेबलं हळूहळू लख्ख होऊ लागली आणि सारं ऑफिसच `साहेब' झालं. प्रमुख अधिकारी चमत्कारामुळं खुश झाला.
जिवाभावाचे असलेले चार दोस्त नोकरीसाठी रोज रेल्वेने ऑफिसला जायचे. चेष्टा मस्करीला ऊत यायचा. वेळ कसा मजेत जायचा. एके दिवशी एक मुलगी या गु्रपमध्ये दाखल झाली. चेष्टा मस्करी दूरच, एखाद्याने दुसऱ्याची  मजेने  विकेट घेतली तर दुसऱ्याचा लगेच `इन्सल्ट' व्हायचा. यातून डूख धरायला सुरुवात झाली. चर्चेतली मस्करी गेली. `सत्य' म्हणजे काय वगैरे  भक्तिमार्गावर वर्दळ वाढली. वातावरणात एक विचित्र ताण यायला लागला. काही दिवसांनी चौघेजण चार डब्यातून प्रवास करू लागले.
प्रत्येकजण त्या मुलीवर मरत होता अशातला भाग नाही. तसा प्रत्येकजण सालस होता. पण मुलीसमोर-स्त्रीसमोर आपण कमी पडू नये ही सूक्ष्म भावना प्रत्येक पुरुषात असते. कोणीतरी म्हटलंच आहे, बायकांच्या सहवासात पुरुषांची नीती एखादेवेळी बिघडते पण चालरीत  सुधारते.
 - आपले जग (२८ फेब्रुवारी १९८०)

सहवेदना
सामान्यांचे काका
भिलवडीच्या चितळे उद्योगात अखेरपर्यंत कार्यरत असणारे  उत्साहमूर्ती काकासाहेब चितळे यांचं आकस्मिक निधन, परिसरातील शेतकरी व सामान्य माणसालाही चटका लावून गेलं.
भिलवडीसारख्या खेडेगावात चितळे उद्योग समूहाने केलेली उद्योगक्रांती सर्वांना परिचित आहे. `ज्या दिवशी दुधात पाणी घालायची इच्छा होईल, त्या दिवशी धंदा बंद करा.' हा मूळ पुरुषाने म्हणजे कै.भास्कर गणेश चितळे यांनी १९४० साली दिलेला संस्कार या घराण्याने जपला आहे.
नव्याचा स्वीकार करण्याची वृत्ती काकासाहेबांना आपल्या वडिलांकडून मिळाली. मेक्रॅनिकल इंजिनियर असलेल्या काकासाहेबांनी आधुनिक तंत्रज्ञानाची जोडही दिली. स्वच्छ, चकचकीत व संगणक नियंत्रित गोठे पाहताना सुसज्ज प्रयोगशाळाच पाहतोय असं वाटतं. नव्या आकांक्षांना बळ देण्याकरिता जुनी पिढी त्यांच्यासोबत उभी राहिली तर असे चमत्कार घडू शकतात. काकासाहेबांचं वैशिष्ट्य हे की त्यांनी कधीही वयाचा परिणाम वृत्तीवर होऊ दिला नाही. काकासाहेबांचं व्यक्तिमत्व छाप पाडणारं, काकासाहेबांनी कधीही मोठेपणा मिरवला नाही. मध्यमवर्गीय म्हणावी अशी जीवनशैली कधी बदलली नाही. शिस्तबद्ध कार्यक्रमात कधी खंड पडला नाही. सकाळी सहाचा चहा स्वहस्ते करून घेणं, वयाच्या सत्तरीपर्यंत बॅडमिंटन खेळायला जाणं चुकलं नाही. काकासाहेब आजारी असल्यानं ऑफिसला न आल्याचं कुणाला आठवतच नाही. उद्योगात मग्न असले तरी घरच्या आघाडीवरही काकासाहेबांचं बारीक लक्ष असे.
बोलणं स्पष्ट व रोखठोक असलं तरी वागण्यात कोरडेपणा नव्हता. भिलवडीतल्या मराठी शाळेत शिकलेल्या काकासाहेबांना अॅपलमध्ये नोकरी करणाऱ्या नातीचा फार अभिमान! एकदा शिक्षक परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांना बोलावलं असता त्यांनी `शिक्षक व शिक्षणपद्धती' या विषयावर खेळीमेळीत भाषण केलं, ते भाषण ऐकणाऱ्याला तर हे शिक्षणक्षेत्रातील कुणी अनुभवी तज्ज्ञ आहेत असं वाटलं असेल.
कर्मचारी, शेतकरी यांच्याशी त्यांचं घट्ट नातं होतं. अनेक सामाजिक संस्थांशी ते जोडलेले होते. सामान्य जनतेशीही जिव्हाळयाचं नातं जुळलं होतं. महापुराच्या काळात या परस्पर साहचर्याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळालं. काकासाहेबांनी आपल्या वागण्यातून परिसरातील तरुणांकरिता एक धवल आदर्श उभा केला. अकलंकित लक्ष्मी घरी आणली. तिचा व्यय समाजाकरिता किती मार्गांनी करता येतो हेही दाखवून दिलं. शिस्त, काटेकोरपणा, प्रामाणिकपणा या गुणांना पर्याय नसतो. काकासाहेबांनी आपल्या वागण्यातून हे आदर्श दाखवून दिले.
-विनीता तेलंग, सांगली    (फोन- ९८९०९२८४११)यांनी `विवेक'ला लिहिलेल्या लेखाचा संक्षेप

तपस्वी कर्मयोगी यदुकाका सप्रे 
कोल्हापूरातील वे. शा. सं.सिताराम शंकर तथा यदुकाका सप्रे गुरुजी यांचे  वयाच्या ९४व्या वर्षी निधन  झाले.
यदुकाकांचा जन्म १९२५चा. (ससाळे ता.राजापूर, जि.रत्नागिरी) खारेपाटण येथे मंत्रसंहितेचे अध्ययन झाल्यावर गुरुजींनी इचलकरंजी येथे वे.मू. लक्ष्मणशास्त्री जोशी, व त्यानंतर श्रीपादशास्त्री जेरे यांच्याकडे वेदाभ्यास, कौमुदी, व्याकरण व चिकित्सा यांचा सखोल अभ्यास केला. पुढे करवीर पीठ जगद्गुरू शंकराचार्य यांच्या मठात डॉ.कुर्तकोटी व आळतेकर स्वामी यांच्याकडे वेदाध्ययन केले. देवळे गावातील आठल्ये शास्त्रींच्या सुकन्या अंबाबाई यांच्याशी ते विवाहबद्ध झाले. त्यांच्या जीवनामध्ये पत्नीचा अनमोल वाटा आहे.
प्रापंचिक जबाबदारीसाठी छ.राजाराम हायस्कूल (क ।। बावडा) येथे संस्कृत शिक्षक म्हणून २८ वर्षे काम केले. आंध्रप्रदेशातील संस्कृत विद्यापीठ, तिरुपती येथे काव्यतीर्थ पदवीने त्यांना सन्मानित करण्यात आले. या कालखंडात संस्कृतचे हजारो विद्यार्थी व वेदपाठशाळेच्या माध्यमातून अनेक शिष्य तयार केले. संस्कृतमध्ये १०० पैकी १०० गुण मिळवणारे त्यांचे अनेक विद्यार्थी आहेत. वैदिकी व पौरोहित्य करताना प्रत्येक शब्द, श्लोक यांचा अर्थ सांगून ते कार्य जाणतेपणाने केले. पंचगंगेच्या तीरावर अंत्योदकाचे कार्य ५० वर्षांहून अधिक काळ जनसेवेचे व्रत म्हणून केले.
महाराष्ट्न् शासनातर्फे `महाकवी कालिदास पुरस्कारा'ने त्यांना सन्मानित करण्यात आले. श्रीमद् जगद्गुरू शंकराचार्य पीठ करवीर यांच्यातर्फे गौरवण्यात आले. कोल्हापूर पुरोहित संघ, सिद्धीविनायक सांस्कृतिक सेवा मंडळ यांचेही सन्मान त्यांना मिळाले. `वैदिक जीवन गौरव पुरस्कार' मिळाला. आपल्या कर्तृत्वाने त्यांनी वैदिक समाजाची प्रतिष्ठा उंचावली. दुर्मिळ अशा हजारो पुस्तकांची त्यांची ग्रंथसंपदा अलौकिक आहे.
संपर्क - नंदकुमार मराठे, कोल्हापूर    फोन- (०२३१) २५४१८२३

 संपादकीय
दिल्लीचा सुज्ञ मतदार
नुकत्याच झालेल्या दिल्लीच्या निवडणुकीत केजरीवाल यांना घसघशीत बहुमत मिळाले. त्यांनी आपल्या विजयाची आणि भाजप किंवा काँग्रेसवाल्यंानी आपल्या पराभवाची मीमांसा केली असेलच, पण आपण लोकांनी त्यातील अन्वयार्थ  लक्षात घेतला पाहिजे. निवडणूक म्हणजे अर्वाच्य बडबड सहन करण्याचा काळ, असे आपण समजून चालत होतो. आपल्या मुद्द्यांच्या ठोसपणाअैवजी दुसऱ्यावर चिखलफेक करण्याला लोकशिक्षण म्हणतात, अशी समजूत राजकारण्यांनी करून घेतली होती. त्यातूनही मतदारांनी तसल्या आचरटपणास नापसंती दाखवून त्यांचा पराभव केला तर त्याचे खापर फोडण्यासाठी आीव्हीअेम यंत्रे अथवा प्रतिस्पर्ध्यांनी केलेले पैशाचे वाटप यांचा आधार घेतला जायचा. जनमत शहाणे असते हे राजकारणी लोक आणि यडपट प्रसारमाध्यमे मान्यच करत नाहीत. अलिकडे संसदेची वा राज्यांची जी निवडणूक झाली, त्यामधून जनमताला काय हवे असते, याची काही कल्पना मांडता येअू शकते.

आपल्याकडे संघराज्य-रचनेला महत्वाचे स्थान आहे. हिंदुत्व, राममंदिर, ३२०कलम, अेनआरसी कायदा, अेक भाषा, बेरोजगारी, सीमावाद, अतिरेकी, अशा कित्येक मुद्द्यांवर निवडणूक होते, असे मानले जाते. किरकोळ काही परिणाम त्या संदर्भांचा होतही असेल, परंतु प्रामुख्याने हे राज्य कसे चालले, किंवा कसे चालेल यांचा अंदाज मतदार फार काळजीने बांधत असतो. कोणत्या स्तराचा प्रश्ण कोण कसा हाताळू शकेल हे मतदारांस नीट समजते. `पांचामुखी परमेश्वर' हे तर त्याही अर्थाने खरे ठरत असते. राष्ट्नीय प्रश्णांची आणि रोजच्या व्यवहारांतील अडचणींची विभागणी नीट केली जाते. ग्रामपंचायत वा जिल्हा परिषदेच्या प्रचारांत ३२० कलम आले; किंवा कॉलेजांच्या निवडणुकीच्या फलकावर मोदीं-शरद पवार-राहुलजी यांचे चित्र फडकले तेव्हा त्या ठिकाणच्या अुमेदवारांच्या पायात किती पाणी आहे हे त्या त्या मतदाराला नेमके जाणवते. केजरीवालांनी आंतरराष्ट्नीय प्रश्ण  दिल्लीत आणलेच नाहीत हे त्यांच्या यशाचे अेक कारण देता येआील.

निवडणुकीच्या प्रचारात चिथावणीची भाषा चालत नाही. हिंदुत्व अथवा शिवाजी महाराजांविषयी वाद वाढविण्यास मतदारांचा विरोधच असतो. आधीच्या सरकारचा नाकर्तेपणा लोक विसरत नाहीत, पण त्यापेक्षा चांगला पर्याय आहे याची त्यांना खात्री पटत नाही तोंवर `आहे हे ठीक' असे त्यांना वाटते. रेल्वेच्या प्रवासातही दुसऱ्या डब्यात पर्यायी प्रशस्त जागा असल्याची खात्री असेल तरच कोणीही प्रवासी आधीची जागा सोडून अुठू पाहतो; अन्यथा आहे ती अडचण सोसण्याची तयारी ठेवतो. केजरीवालांनी शाळा, पाणी, स्वच्छता या स्थानिक अडचणींवर काम करण्याचे प्रयत्न मनापासून केले हे मतदारांना मान्य झाले. महाराष्ट्नचे अुदाहरण त्या तुलनेत लक्षात घ्यावे. भाजप च्या नेत्यांनी केवळ तोंडपाटीलकी करण्यावर भर दिला. जनसामान्यांशी जवळीक ठेवली नाही. त्यांच्या आधीच्या आघाडी सरकारने प्रशासनाचा चोथा केला होता. युतीच्या सरकारनेही तेच केले, प्रशासनात काहीही सुधारणा दिसत नव्हती. पाच दिवसांचा आठवडा केल्यावर समाज-माध्यमी संदेश आला की, `आपल्या कामासाठी आठवड्यात सहा हेलपाटे मारावे लागत होते, आता पाचच हेलपाटे होतील!!' असल्या कारभाराला वैतागलेली जनता योग्य निवड तरी कशी करणार? केवळ अनाठायी आत्मविश्वास बाळगून मतदारांना गृहीत धरण्याचा फटका भाजपवाल्यांनी अनुभवला. नंतर शिवसेनेवर तोंडसुख घेण्याचा काय अुपयोग? त्यांचा तर विश्वासच कसा आणि का बाळगला हा प्रश्ण आहे. अुदयनराजेंना सामील करून घेणाऱ्यांनी शिवसेनेला कशाला नावे ठेवावीत? हे सारे मतदार विचारात घेत नसेल का?

याचा अर्थ मोदींची जादू संपली, असे म्हणून साऱ्या बंभोले आक्रस्ताळया अहंमन्य पुढाऱ्यांची अेकत्र मोट बांधण्याचा प्रयोग करण्याची गाजरे खाण्यात अर्थ नाही याची जाण राजालाही असणारच. ती केजरीवालांच्या दिल्लीकरांनी दाखविली; म्हणून तर राहुलजींच्या पक्षाच्या हाती दोनदा भोपळा दिला गेला. मोदींची आंतरराष्ट्नीय स्तराची कामगिरी आणि राष्ट्नीय महत्वाचे प्रश्ण हाताळण्याची क्षमता अन्य कुणातही नाही, हे त्यंानी -आणि आितर पुढाऱ्यांनीही सिद्ध केले आहे. परंतु त्यांची छायाचित्रे कॉलेज स्तरावर नाचविणे अथवा राज्याचे प्रशासन सामान्य माणसापासून दूर पडणे हे संघराज्यीय स्वरूप मतदारांस कळले आहे, ते कोणत्याच राजकीय पक्षाला कळले नसावे. केजरीवालांना ते कळले, म्हणून ते विजयी झाले.

भीषण बाष्कळ बडबडीला शांत प्रतिवादाने, मौनाने किंवा दुर्लक्षित करूनही अुत्तर देता  येते. या बाबतीतही  केजरीवालांनी मात केली.  हनुमान, राम, पाकिस्तान अशा मुद्द्यांवर चिडविले गेलेे तरी केजरीवालांनी आपला तोल ढळू दिला नाही ही अलिकडच्या राजकारणी वक्तव्यांत मोठीच आशेची गोष्ट झाली. लोकशाही मूल्ये आणि सांसदीय पद्धती यांवर नितांत विश्वास ठेवण्याला मतदारांसाठीही फार महत्व आहे. फडणविसांनी `... नाहीतर विधानसभेचे कामकाज चालू देणार नाही' असे म्हटल्यावर त्यांनी त्यांच्याच कित्येक मतदारांना दुखावले आहे. केजरीवालांनी धरणे-अुपोषणे अशी जी काही नाटकेही केली ती चुकीचीच होती, पण ती फडणविसांच्या आीर्ष्येपेक्षा सौम्य  वाटतात.

विचारपूस
दीर्घकाळ अंथरुणावर खितपत पडलेला विकलांग भरमूतात्या गेला. दु:खापेक्षा `सुटला बिचारा' हीच भावना तरळली. सुरुवातीला आम्ही अधून-मधून भेटायला जात असू. पुढे चिवट दुखणे लांबले. पुढची निस्तरणूक बिचाऱ्या यशोदा काकीवर पडली. घरी हे दोघेच. परिस्थिती बेताची. हातावरचे पोट. मुलगा आहे पण तो दूरदेशी. आई बापावरील माया पातळ झालेली. कधीतरी तुटपुंजी रक्कम तो पाठवायचा.
हॉस्पीटलचे बील दिवसागणीक वाढू लागले. सुरुवातीला नातलग-पाहुणे येत, मदत करीत. पण वर्षानुवर्षे कुणाला वेळ आहे? किडूकमिडूक विकून यशोदा काकीने हॉस्पीटलचे बील कसेबसे भागविले आणि लोळागोळा झालेल्या नवऱ्याला घेऊन घरी आली. नवऱ्याच्या सगळया गोष्टी अंथरुणावर. नवऱ्याला एकट्याला घरी टाकून यशोदा काकी जड घागर काखेत घेऊन कष्टाने पाणी आणे. शेगडी पेटवताना पुढे काय ही भीती.
जनरीत पाळायला हवी. भरमूतात्याचा गोतावळा मोठा! बिस्किटपुडा किंवा एक-दोन मोसंबी घेऊन नातलग आप्तेष्ट भेटायला येत. डॉक्टर सांगून गेलेले असत, `शांत झोप घ्या.' पण तासातासाला कोणी तरी टपकत. काकी नवऱ्याला बसते करायची. त्याच्या ओठातून ओघळणारी लाळ पुसायची. अंगातील बंडी ठाकठीक करायची, टेकायला मागे उशी ठेवायची. एवढ्याने काकीची दमछाक व्हायची. विचारपूस करायला येणारा चार जुजबी प्रश्न विचारून निघून जाई. अवघडलेले तात्या कष्टाने आडवे होत. तोवर दुसरा पाहुणा!
तात्याला घरी आणले तरी पण येणाऱ्या जाणाऱ्यांचा ओघ काही आटेना. वेळी-अवेळी दुपारी विश्रांतीच्या वेळी कधीही! दवाखान्यात असताना एक बरे होते, चहा-पाणी तरी विचारावे लागत नसे. घरी येणाऱ्यांना शिष्टाचार म्हणून चहापाणी विचारावे लागे. पाहुणे चहाची वाट पहात थांबत. यशोदा काकूूचा जीव व्याकूळ होई. घर छोटेखानी दुसरी खोली नाही. पाहुण्यादेखत तात्यांचे देहधर्म त्यांची स्वच्छता वारंवार कपडे बदलणे. भेटीला येणाऱ्यांना या अडचणी कशा सांगाव्यात? चहा साखरेचे डबे रिकामे होत. दूध किती आणि कसे घ्यावे? लांब अंतरावरील पाहुणे मंडळी जेवायला थांबत. गावात हॉटेल नाही म्हणून घरीच मुक्कामाला थांबत. वाटले होते ही व्याकूळ करणारी परिस्थिती तात्या गेल्यानंतर संपेल, काकींचेही नष्टचर्य संपेल.
तात्या गेल्यानंतर सांत्वनासाठी रीघ लागली. जनलाजेस्तव धार्मिक विधी दिवस घालायला हवे. गोडाचे जेवण करायला हवे. वडिलांच्या मृत्यूनंतर मुलगा एक दिवस थांबला आणि परत निघून गेला. एकट्या काकीने कसे निभावले असेल? काही महिन्यानंतर उडत उडत कळाले की काकूने राहते घर विकले. गळयातला एकुलता एक दागिना मोडला. घराचा ताबा आज ना उद्या द्यावा लागेल. यापुढे यशोदा काकी कशी जगेल? कुठे राहील?
-मोहन आळतेकर, किर्लोस्करवाडी फोन-९४२११८४९९६ 

गेले ते दिवस; चांगले का होते?
स्मरणरंजन(नोस्टॅल्जिया) हा माणसाचा आवडता छंद असतो. `पूर्वी किती छान होतं' हे यच्चयावत् सगळयांचं मत असतं, त्याच मताला अनुसरून आजच्या जमान्यात काही छान छान कार्यक्रम होत असतात. पूूर्वीचं जे काही होतं, ते त्या त्या काळात तितकं काही चांगलं वाटत नव्हतं. त्या काळात आपल्या अंगावर फाटके-झिजके कपडे होते, तरी आज त्यांची आठवण मात्र रम्यच बनते.  आपलं सोडा, परंतु श्रीरामही जेव्हा वनवासात लक्ष्मणाशी गप्पा मारत बसलेला होता, तेव्हा त्याला लहानपण आठवत राहिले, आणि `अहा ते सुंदर दिन हरपले -(तेहि नो दिवसा गता:)' या आशयाचा कातर सुस्कारा त्याने सोडला. शाळा सोडून गेल्यानंतर केवळ वर्षभरातच फिरून शाळेत चक्कर टाकणारी मुलं, `आपल्या वेळी शाळेत काय मजा होती...' असं म्हणतात. तात्पर्य असं की पूर्वीच्या  काळचं जीवनमान आजच्यापेक्षा खूप छान सुंदर होतं हे सर्वांचं पक्कं मत असतं.
ते तितकं चांगलं होतं की नव्हतं, यावरती मतभेद असू शकतो; परंतु आज जे आणि जसं काही चाललं आहे, त्याचा परिणाम माणसांच्या आरोग्यावरती, स्वास्थ्यावरती, मनावरती होत आहे, हे मात्र विचारात घ्यायला हवे. त्यातून मार्ग निघायला हवा, अन्यथा माणसांचं जीवन शुष्क, निरर्थक, केविलवाणं, भकास होआील. त्यात माणूसपण शिल्लकच राहणार नाही. सहज आठवून पाहिलं तर गेल्या पिढीत जे जे घडलं, अनुभवलं, त्याचा स्मरणीय आनंद आजही मिळत राहतो. आजच्या पळत्या रांगत्या जीवनांत त्या आठवांचाही गारवा जाणवतो.
त्यावेळचं मागं नको जायला, पण आज जी पिढी `झुकलेली' आहे तिच्या लहानपणी घराला किचन नव्हतं, स्वैपाकघर होतं. तिथं ताक करण्याची रवी होती, पाटा वरवंटा रोजच्या वापरात होता, शेंगदाण्याचे कूट चटण्या करायला खलबत्ता होता. लोणची पापड मसाले ही अुन्हाळी कामं होती. त्यांची वाळवणं पडायची. त्यांचे नमुने आसपासच्या घरांत दिलेे जायचे. घराघरांतल्या बायकांत त्यांची चर्चा होअून त्यांत दुरुस्त्या सुचवल्या जायच्या. तुलना व्हायच्या. काही कामे अेकत्रित व्हायची. शेवया सांडगे यांसाठी बायका अेकत्र यायच्या. देवळात कुणी प्रौढा वाती वळायला किंवा शेंगा सोलायला घेअून आली तरी तिला बाकीच्या बायका मदत करून ते काम पूर्ण करायच्या. प्रत्येकीला शारीरिक कष्ट असत. हॉटेलात जाअून खाण्याचा प्रश्णच नव्हता. कधी अडीअडचणीला परिचिताच्या घरी जेवायला सहजी जायचं. अूठसूट बाहेर खाणं-जेवणं हे अुडाणटप्पूपणाचं मानलं जाआी. त्यामुळं खाण्यापिण्याची तंत्रं, स्वच्छता, पोषणमूल्य हे  सांभाळलं जायचं.
सामान्य घरांतून तांब्या-पितळेची भांडी होती. आमटीकरिता फोडणी लोखंडी पळीची असे. मांडी घालून जेवावं लागे. घरांत जी पाच-सात माणसं असतील, ती शक्यतो अेकाच पंगतीला बसत. अेकमेकांसाठी थांबून श्लोकबीक म्हणून अेकदम जेवायला लागत. ताकभातापर्यंतचे पदार्थ अेकाच वेळी साऱ्यांना वाढले किंवा विचारले जात. जेवण संपवून अेकदम अुठायची रीत होती. दूधदुभतं पुरेसं होतं, ताक अटळच होतं, ते रोज विरजल्या जाणाऱ्या दह्याचं असे. घरचं लोणकढं तूप वारंवार दिसायचं, मिळायचं. ते कढवलं तर त्याच वेळी मअू भात मेतकूट लिंबू असा बेत शिजायचा. दोन दिवसांचं शिळं अन्न टिकत नव्हतं, आणि पुढं येतही नव्हतं. बेकरीचे पदार्थ दुर्लभच, तेही कमीपणाचे मानले जायचे.
मेतकूट-तिखट लावलेल्या लाह्या, पोहे यांवर मधली वेळ भागत असे. त्यासोबत मूठभर शेंगा असल्या तर त्यावर अेकदोन सवंगडीही भागायचे. फुटाणे-वाटाणे सहज हाती येत. हरभऱ्याचा ढाळा, मक्याचं कणीस, भाजलेलं रताळं यांसाठी पैसा  मोजावाच लागत नव्हता. गुळांबा-साखरांबा-गोडं लोणचं-पपआीचे सांडगे-कुटाच्या मिरच्या हे सारं काळाआड लुप्तच झालं. कैरी बोरं करवंदं चिंचा असलं खाअून कुणाला बाधत नव्हतं, खोकला येत नव्हता. काकवी, अुडदाच्या पापडलाट्या, यांत कोणती व्हिटॅमिन असतात याची चर्चा नव्हती. तूप कढवल्यावर त्याच पातेल्यात शिजलेला भात आता कुठून आणायचा? गुरुवारी शनीवारी नारळ फोडायचा, त्यातून वड्या निघत. त्या अभ्यागतासाठी राखीव, पण कुणाच्या तरी घरी गेल्यावर त्याही हाती येतच. अळीवाचे, तंबिटाचे, चुरमुऱ्याचे लाडू गायब झालेत. मुंजीत पौष्टिक लाडू पोरांसाठी व्हायचे; आता भिक्षावळीतल्या लाडवांपेक्षा साड्यांची चर्चा जास्त अैकू येते.
कपडे हातांनी धुवायचे. अुंचसे दगड बाहेरच्या मोरीत असत. बहुधा मुलांचे कपडे  कधी ना कधी तरी मुलांना धुवावे लागत. सासूसासरे असतील तर त्यांचे कपडे कर्त्या बाआीकडं! माणसं पायी चालत, फारतर सायकल. शाळेत जायला काय होतं? चप्पल असली तरी खूप! मुलामुलींना दूध प्यावं लागे. संध्या करण्याची टाळाटाळ, परंतु निदान शुभंकरोती-रामरक्षा-भीमरूपी असं काहीतरी होतं. सुती स्वच्छ  सैल कपडे असत. चित्रविचित्र दाटके कपडे चेेष्टेचा विषय ठरायचा. मैदानावर किंवा निदान गल्लीत खेळणं अगदी सहजच होतं. हादगा, लपाछपी, कवड्या, गजगे, डबाडोम, गोट्या असे बिनपैशाचे खेळ खूप चालायचे. मध्यम गावातही सूरपारंब्या-काठीकोलणी-सूरपाट यांची चलती असायची. त्यातून सामुदायिक वर्तन आणि भरपूर दमछाक व्हायची. अुन्हाळयात अंगणांत किंवा गच्चीवर बरेचजण अेकत्र झोपत, अंथरुणं घालण्यापासून नीरव होआीतो हशा, भेंड्या, अुखाणे, टवाळया, नकला यांची करमणूक असे. जागरणास परवानगी नव्हती.

आजच्या तुलनेत या साऱ्या आयुष्यक्रमात वेगळेपण असेलही, परंतु  चांगलं असं तरी काय होतं? त्या आयुष्यात आराम नव्हता, पण आनंद जास्त होता असं आजच्या मानसतज्ज्ञांचं म्हणणं आहे. अेकमेकांना देण्यासाठी माणसाकडं पैसा नव्हता, पण वेळ होता. आजचं आयुष्य गतिमान नव्हे तर धावतं बनलं, ते त्या काळी संथ स्वस्थ होतं. आता आितरांसाठी राहोच, पण स्वत:साठीही वेळ नाही. अती महत्वाकांक्षा दूर होत्या. शिका, कामाला लागा, प्रपंच करा हे आितकंच सामान्यपणी प्राप्य होतं. आजची आयुष्यं निव्वळ धावपळीत संपतात, लक्ष्य मोठं गाठलं जातं का?
या जीवनशैलीचा परिणाम म्हणून मानसतज्ज्ञ असा सांगतात की माणसांना लवकर थकवा येतो. अेकटेपणानं माणूस लवकर थकतो. पूर्वी अधिकांश वेळ आितरांसोबत जायचा, रुसवे फुगवे होते पण घराची दारं बंद नव्हती. घराला सहजी कुलुप लावण्याची पद्धत नव्हती. आजच्यासारखं आपल्या घराचं दार सदैव बंद राहात नव्हतं. लपवाछपवी करण्याचं फारसं कारण नव्हतं; कारण या घरी जे होतं तेच त्याही घरी होतं. त्याचं अेकत्रीकरण सहज शक्य होतं. राहणीमानातला साधेपणा माणसाला थकव्यापासून दूर ठेवतो म्हणतात. कडक आिस्त्रीचे कपडे घालून वावरताना स्वत:लाच फार जपावं लागतं, त्या शिस्तशीर कपड्यांना फार जपावं लागतं. त्या कपड्यांत कुणाच्या खांद्यावर हात टाकून चालता येत नाही, कुणाच्या कुशीत शिरता येत नाही, कुणाला घास भरवता येत नाही. माणूस माणसांतून दूर राहू पाहतो, परंतु आितरांनी आपला तोरा जाणून घ्यायला हवा अशी अेक प्रकारची प्रौढी त्या तालेवारीमुळे आपोआप येते. आज तसा काळ!
माणसं आणि माणूसपण सांभाळलं जात होतं, त्यांत माणसांतले अुपजत स्वभावदोषही असतील परंतु प्रेम निर्माण करण्यास ती जीवनशैली अुपयुक्त होती, असे आता मानसशास्त्रज्ञ सांगत आहेत. सर्वसामान्यांच्या आयुष्यक्रमांत टार्गेट्सचा ससेमिरा नव्हता, मानसिक शांतता व स्वास्थ्य तुलनेने जास्त होती. चिंतेचे भुंगे नव्हते. रात्रीची शांत झोप मिळत होती. मित्रमंडळी सखेसोबती शेजारपाजारी यांच्या सहवासातून, कठीण परिस्थिती पचविण्याचं बळ अंगी येण्यास मदत होत होती. धीर मिळत होता. आता प्रायव्हसीच्या नादात हे सगळं आपण मागं टाकलं, अेकट्यानं चालायचं ठरवलं. सगळया आघाड्यांवर अेकटेच लढू लागलो, अेकटेच पडू लागलो. त्यामुळं स्वाभाविकच जास्त थकायला होतं. शीण येतो. शरीर थकतं, आणि मनही थकतं. आनंद हरवू लागतो.
अुपाय?.... अुपाय शोधला तर सापडेल, तो तर आपल्याच हाती आहे!!

हौसला नही झुकेगा
तारीख १५-१२-२०१९ वेळ दुपारी १२-३०. मी ड्नयव्हर सीटवर, शेजारी भावजय, माझ्या मागे आई, भाऊ, बाबा. सहल आटोपून आमची कार वेशीपर्यंत येऊन पोचते. गाणी सुरू आहेत, कुणी डोळे मिटून बसलेत, कुणी असेच खिडकीतून बाहेर बघत... आता एक वळण घेतलं की आलंच शहर. आणि धडाम धाड धाड असा मोठ्ठा आवाज! किंकाळया, गाडीत धूर भरलेला. दोनच क्षण डोळे मिटले जातात आणि मग दिसतं अपघाताचं दृश्य...
मी स्वत:च सीट आणि स्टिअरिंगमध्ये अडकले आहे. माझ्या मागे आईच्या नाका-तोंडातून रक्ताचा सडा. ती ओरडतेय, बाबा बेशुद्ध झालेत. भाऊ कसाबसा बाहेर निघालाय आणि भावजयीला बाहेर काढून बसवलंय कडेला. गाडी खूप गरम झालेली, काच फुटलेली, इंजिनमधून धूर निघतो, गाडीचा समोरचा भाग चक्काचूर. आम्ही पाचही जण जखमी आहोत. सगळं लक्षात येऊन भानावर यायला काही सेकंद लागले. स्वत:ला कसंबसं सोडवून गाडीबाहेर आले. क्षणभरच गाडीकडे पाहिलं. मग भरभर हालचाली सुरू केल्या. लोक जमा झालेच होते, कुणी पाणी आणून दिलं, कुणी ऑटोरिक्षा थांबवून जवळच्या हॉस्पिटलमध्ये रवाना केलं... काहीतरी भयंकर घडलंय आणि मलाच ते निस्तरायचं आहे हे मनाशी पक्कं केलं. आणि कामाला लागले. २-३ जणांना कॉल केले आणि मदत पाठवायला सांगितली. पोलीस पंचनामा त्यांच्या `लायनी'प्रमाणे जाणं वगैरे झालं. क्रेनने गाडी रस्त्याकडेला ठेवली. इथे तिथे पडलेले फोन्स, चष्मे, गॉगल्स, पैसे गोळा केले. महत्वाचं सामान सोबत घेऊन हॉस्पिटलकडे धाव घेतली. ती रात्र तिथेच काढावी लागणार हे स्पष्ट झालं. पुन्हा एकदा पोलीस, जबान्या, पोलीस स्टेशन वगैरे सोपस्कार पार पाडले. रात्रीपर्यंत नातेवाईक, मित्रपरिवार, हितचिंतकांनी मदत पोचवली होती.
दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज मिळाला. ताफा पुण्याला रवाना झाला. पुण्यात हॉस्पिटलला पोचल्यावर जवळचे नातलग, मित्र-मैत्रिणी तिथे हजर होते. पुढच्या २-३ दिवसांत निदान झालं. आता घरी जाईन ती आई-बाबांसह सर्वांना घेऊनच, हे मनाशी पक्कं केलं. मग सुरू झाला रिकव्हर होण्याचा कठीण काळ. त्या आधीचा, मधला आणि नंतरचा काळ परीक्षा पाहणाराच होता. माझ्याच २ बरगड्या फ्रॅक्चर असल्याचं निदान झालं. त्या दुखण्यासकट सगळयांची काळजी घेणं असं एक आव्हान समोर आलं. सध्या विश्रांती, पथ्ये, औषधे, फॉलोअप चालू आहेत.
या महिन्याभरातल्या घटनांनी मला काय शिकवलं? खंबीर होतेच मी, ती अजून खंबीर झाले. प्रसंगावधान राखून न डगमगता, न घाबरता समोरच्या अडचणींना कसं सामोरं जायचं हे शिकले. स्वत:चं दुखणं विसरून ज्यांना जास्त वेदना आहेत त्यांना सांभाळून घ्यायला शिकले. कठीण प्रसंगात चेहरा प्रसन्न ठेवायला शिकले. दु:खात हसरा चेहरा ठेवायला शिकले. माझ्याकडे बघून सर्वांना उभारी मिळावी, वेदना विसरावी म्हणून हसत खेळत राहायला शिकले. गाडीत बसलेल्या प्रत्येकाने सीट बेल्ट लावणे आवश्यक आहे हे शिकले. एक लहानशी कृती किती त्रास वाचवून गेली असती हे शिकले. हेल्मेट, सीटबेल्ट, वाहतुकीचे नियम यावरचा विश्वास पक्का झाला.
आता मागे वळून बघताना काय दिसतं? मदतीला पुढे झालेले असंख्य हात, ओळखीचे बिन ओळखीचे अनेक चेहरे, काळजीपोटी संपर्कात राहिलेले हितचिंतक, हॉस्पिटलचा स्टाफ, अॅम्ब्युलन्स आणि टॅक्सी ड्नयव्हर्स, अनेक डॉक्टर्स नर्सेस. तितकीच महत्वाची गोष्ट म्हणजे सगळयांचा कशालाही सामोरं जाण्याचा स्वभाव. आमच्या जिवावरचं संकट गाडीने स्वत:वर घेतलं, ज्यात ती मात्र बळी गेली. इतकं सगळं होऊनही आम्ही तसे हसत खेळत मजेत, खंबीरपणे उभे आहोत. लहान लहान गोष्टीत आनंद शोधतो आहोत. दु:ख आठवणी विरून जातील. पुन्हा ते चैतन्याचे दिवस येतील. अप्रिय प्रसंगाचा मागमूसही राहणार नाही.
आमचा हौसला झुकला नाही, कधी झुकणारही नाही.
                         -कल्याणी विश्वास टिळक, माणिक बाग, पुणे    फोन- ९४४८९३७७१२
                      (वैशाली आगरकर यांच्या सौजन्याने)

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन