Skip to main content

23 December 2019

अन्न नासाडी
भारतात शेतीच्या बाबतीत मोठेच बदल घडून आले आहेत. लोकसंख्या वाढत चालली आहे, तरीही त्या साऱ्यांना पुरेल इतके अन्नधान्य आपल्याकडे पिकते. उत्पादन चांगले वाढले. परंतु जगातील काही महत्वाच्या अर्थसंस्थांच्या सर्वेक्षणांवरून असे दिसते की, भारतात भुकेल्या माणसांची संख्या फारच जास्त आहे. भुकेलेल्या लोकांचे प्रमाण देशात किती आहे, या बाबतीत जागतिक पातळीवर आढावा घेतला जातो. त्याला `जागतिक भूक निर्देशांक'(ग्लोबल हंगर इंडेक्स) म्हणतात. ११९ इतक्या विकसनशील देशांच्या एकूण क्रमवारीत भारताचा क्रमांक शंभरावा आहे. या यादीत बांगला देश आणि नेपाळ या छोट्या देशांचा क्रमांक आपल्यापेक्षा वरती आहे. `जागतिक अन्न  धोरण-विषयक संशोधन संस्था (इंटरनॅशनल फूड पॉलिसी रीसर्च इन्स्टीट्यूट)' या संस्थेचा अहवाल नुकताच प्रकाशित झाला, त्यात नमूद केलेल्या काही गोष्टी आपल्याला दहादा विचार करायला लावतील अशा आहेत.
विकसनशील देशांत नागरिकांना किती आणि कसे अन्न मिळते, याचा आढावा सर्वेक्षणात घेतला जातो. त्यानुसार दोन वेळेला पुरेसे जेवण न मिळालेली, भुकेली माणसे आणि कुपोषित बालके यांचे प्रमाण भारतात जास्त आहे. या समस्येचे मूळ कारण  नमूद करण्यात आले आहे ते तर आणखीच गंभीर आहे. अहवाल म्हणतो की, भारतात अन्नधान्याचा तुटवडा नाही, -तर अन्नाची नासाडी हे भूक आणि कुपोषण यांचे मोठेच कारण आहे!! भूकबळींची समस्या असूनही अन्नाची नासाडी करणाऱ्या आपल्या देशाला आणि नागरिकांना काय म्हणावे?
बहुतांश ठिकाणी अन्नाची आणि धान्याची नासाडी पाहायला मिळते. आपले घर तरी त्यास अपवाद आहे, असे ठाम सांगता येईल का? संयुक्त राष्ट्नच्या वेगळया एका आकडेवारीप्रमाणे भारतात चाळीस टक्के अन्न वाया जाते. म्हणजे शंभर लोकांचे अन्न पिकले- शिजले, तर त्यात साठच लोक जेवतात. त्या अन्नाची किंमत उत्पादित शेतीच्या दराने रुपयांत केली तर ती ५० हजार कोटि एवढी भरेल.
आकडेवारी बाजूला राहूद्या, कारण अशा शास्त्रीय कागदांवर हजार शंकाकुशंका काढण्यात आपण लोक चतुर आहोत; -पण आपल्या आजूबाजूला नजर टाकली तर काय दिसेल? भारतात अन्नधान्याचे उत्पादन भरपूर होते, पण साठवणुकीसाठी चांगली गोदामे नाहीत. त्यांचे व्यवस्थापन नीट नाही. तिथे उंदीर आणि ओलावा यांचा बंदोबस्त नाही. नासाडी किती? सांड लवंड तर पाहायला नको. धान्य मळणीपासूनच आपल्या घरांत त्याबद्दल  काळजी घेतली जात नाही. पोती, हौद, कणग्या, यांची साफसफाई करायची असते. अस्वच्छतेमुळे किडींचे प्रमाण वाढते.
लग्नसोहळे, हॉटेल, सणसमारंभ, यात्रा यांतून अन्न किती वाया जाते हे  आपण पाहतोच. घरातही हल्ली पानात टाकायचे प्रमाण फार दिसते. पूर्वी ताट स्वच्छ करून उठायची रीत होती. जैन समाजात तर ताटातील अन्न संपले तरी त्या ताटात थोडे पाणी घालून ते विसळून पितात; -म्हणजेच ताटातील अन्नाचा कणही वाया जाऊ  द्यायचा नाही. हे धर्माच्या चौकटीत बसवून समाजाला वळण लावले गेले. घरची गृहिणी स्वैपाकाच्या भांड्यात किती शिल्लक आहे त्याचा अंदाज घेत सर्वांच्या ताटात वाढत असे. अन्न कुणाला कमी पडू नये, परंतु ते शिल्लक राहून वाया जाऊ नये असे ती पाहात असे. हे कौशल्य असते. हल्लीच्या शिक्षणात ते शिकविले गेले पाहिजे. समारंभात वाया जाणारे अन्न वाचवून ते भुकेल्या तोंडी घातले तर आपल्या देशापुरती तरी समस्या सुटेल.
जगातल्या भूकपीडित किंवा कुपोषित व्यक्तींपैकी २५ टक्के लोक भारतात आहेत. भारताच्या लोकसंख्येच्या १६ टक्के हे प्रमाण आहे. यात आणखी एक मुद्दा लक्षात घेण्याजोगा आहे. बऱ्याच लोकांचे पोट भरते, पण त्यात पोषणमूल्य नसते, किंवा असले तरी फार कमी असते. आजकाल तयार खाद्यपदार्थ, आणि कस नसलेले वा प्रदूषित अन्नधान्य, भाजीपाला, फळे यांचे प्रमाण जास्त आहे, हे आपल्यालाही दिसते. बेकरीतून मैद्याचे पदार्थ मिळतात, त्याचा वापर वाढला आहे. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, असेही लोक कुपोषित असल्याचे दिसून येते.
तयार अन्नपदार्थांची नासाडी टाळण्यासाठी प्रत्येकाने जागरूक राहायला हवे. समारंभात उरलेले अन्न चांगल्या स्थितीत कुणालाही देण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे. वाया जाणारे अन्न स्वीकारून ते गरजूंपर्यंत नीट पोचविण्याचे काम करणाऱ्या काही स्वयंसेवी संस्था आहेत. रॉबिन हुड आर्मी ही अशीच एक संस्था. या संस्थेचे संस्थापक आहेत संचित जैन. त्यांचे म्हणणे असे की, दिल्लीतल्या बड्या लग्नसोहळयात उरणाऱ्या अन्नपदार्थांतून कमीतकमी पाचशे आणि काही वेळी तर अडीच हजारापर्यंत लोकांचे जेवण भागते. त्यांच्या अनुभवानुसार साहाय्यकारी काम करणारी यंत्रणा कमी पडते, ती कमकुवत असते म्हणून अन्नाची नासाडी जास्त होते. त्याचप्रमाणे हॉटेलांमधून उरणारे अन्न एकत्र करून जवळपासच्या गरजूंना चांगल्या स्थितीत पुरविणारी काहीतरी व्यवस्था निर्माण करायला हवी. भारताच्या केंद्रीय खाद्यप्रक्रिया विभागाच्या मंत्री हरसिमरत कौर या अमेरिकेत गेल्या होत्या, तिथेही त्यांना भारतातील अन्नाचा  अपव्यय रोखण्याबद्दल ऐकून घ्यावे लागले होते; आणि ही आपल्या विभागाची प्राथमिकता असायला हवी हे त्यांना मान्यच करावं लागलं.
सामान्य लोक या संदर्भात काय करू शकतात? एक तर आपण स्वत: अन्नाची कणभरही नासाडी होऊ न देण्याची काळजी घ्यायची. शेजारीपाजारी विचारून एक गट तयार करता येईल. काही वेळी आपल्याकडे जास्तीचे काही उरले तरी शेजारी देण्याला आपण कचरतो; `त्यांना काय वाटेल, त्यांना तसे चालेल का?' अशा शंका येतातच. `त्यांच्याकडं उरलेलं आम्हाला कशाला दिलं?' अशी प्रतिष्ठाही आड येते. ती नाहीशी करून परस्पर सामंजस्याने हा प्रश्न सोपा करता येईल. हल्ली कुटुंबांतील माणसांची संख्या कमी झाली आहे, त्यामुळे कोणत्याही कारणाने घरांतून अन्न शिल्लक राहण्याचे प्रसंग वारंवार येतात. आपल्यालाही अन्न टाकण्याचे तसे जिवावरच येते. अशा वेळी या प्रकारचा समान गट उपयोगी ठरेल. `अन्न खाऊन माजावे, टाकून माजू नये' -असे म्हणतात.
अन्न ताटात टाकले तर देव शिक्षा करतो हे एैकत, आणि त्यावरती विश्वास ठेवत आधीची पिढी घडली. अन्नाला किंवा त्या भांड्याला चुकून पाय लागला तर हात जोडला जातो; हा अन्नाचा सन्मान आहे. घराघरांत अन्नपूर्णेची पूजा केली जाते. मुलगी सासरी जाताना तिच्यासोबत ही देवता दिली जाते. अन्नसेवन म्हणजे केवळ उदरभरण नव्हे, ते यज्ञकर्म म्हटले आहे. आजच्या काळात पुष्कळदा अन्नपदार्थ पैसे देऊन(फेकून?) विकत घेतलेले असल्याने माणसाच्या भुकेत व्यापार शिरला असावा. सात्विकता जाऊन तिथे उपरेपण आले, तिथे आत्मीयता नाही, भावनिक गुंतवणूक नाही. वृत्ती व्यवहारी असल्यावर एखाद्या पदार्थाची चव आवडली नाही म्हणून तो न खाता पानात टाकतात. कुठेकुठे तर ताटात टाकण्यातच प्रतिष्ठा मानतात. `ताट-पान स्वच्छ पुसून खायला आम्ही काही भिकारी नाही' -असा समज असतो. नीट चाटून पुसून खाल्लं तर लोक काय म्हणतील, कधी याला मिळालं होतं की नाही, असं ऐकून घेण्याची विक्षिप्त भ्रामक कल्पना असते.
हल्ली पुष्कळदा बाहेर जेवणाचा प्रसंग येतच असतो. हॉटेलमध्ये थाळीत चारपाच भाज्या, आमटी-वरण, कोशिंबीर, सलाड, दही, स्नॅक्स असे सतराशे पदार्थ असतात. कोणाही व्यक्तीला एवढ्या पदार्थांची गरज असते काय? या जेवणाचे सगळे पैसे दिलेेत, म्हणून कोणी त्यातले न संपणारे पदार्थ आधी बाजूला काढून ठेवत नाही. अेका ताटात दोघांनी जेवायचं नाही, हा तर हॉटेलचा नियम असतो. अशा ताटात पुष्कळसे अन्न वाया जाते. चांगली गर्दी असणाऱ्या हॉटेलांतून किती अन्न वाया जाते याची सहज कल्पना करता येते. हे अन्न वाचवायचे कसे याचे कितीतरी उपाय सांगता येतील. कुणालाही सुचतील.
लग्नकार्य किंवा तशा समारंभांतून असेच भयानक दृष्य असते. विनाकारण आग्रह होत असतो. गरजेहून जास्त वाढले जाते; तसेच नीट न जेवता टाकले जाते. बुफेची पद्धत चांगली की वाईट हा ज्याचा त्याचा प्रश्ण आहे; परंतु तसे उभ्याने जेवण पुष्कळांना जमत नाही. ते सांडते, पायदळी तुडवले जाते. अन्नाचा अपमान होतो. ते पिकवणाऱ्या, शिजवणाऱ्या, आपल्यापर्यंत पोचविणाऱ्या साऱ्यांचा अपमान होतो. आपल्या बेजबाबदार, बेफिकीर वृत्तीमुळे खूप अन्न वाया जाते, त्यात कित्येक भुकेल्यांचे पोट भरेल.
जर्मनीत जाऊन आलेल्या एकाने किस्सा सांगितला. तो आणि त्याचे दोनतीन मित्र जर्मनीतल्या हॉटेलात गेले. जेवले. पण इकडच्या सवयीप्रमाणे प्रत्येकाच्या ताटलीत शिल्लक राहिले. आवरतं घेऊन ते गप्पात रंगले. तोवर एक पोलीसवाला तिथं आला आणि त्यांना तंबी देऊन म्हणाला, `तुम्हाला अन्नपदार्थ असे टाकता येणार नाहीत, त्याला शिक्षा असते. दंड भरावा लागेल.' -ही भारतीय मंडळी चक्रावून गेली. दादा-बाबा, माहीत नव्हतं.... वगैरे करून झालं. तो पोलीसवाला ऐकेना. शेवटी खास भारतीय विवाद आला, `या पदार्थांचे पैसे आम्ही भरलेले आहेत, आम्ही ताटात टाकले तर तुझं काय गेलं?' त्या पोलीसवाल्यानं सांगितलं, `पैसे तुमचे असले तरी हे अन्न आमच्या राष्ट्नचं आहे, ते तुमच्या मस्तीनं टाकता येणार नाही.' या लोकांनी मुकाट्यानं दंड भरला. परंतु तरीही त्यातल्या एकानं उत्सुकतेनं त्या पोलीसवाल्याला विचारलं, `काय हो, आम्ही इथं ताटात वगळलंय हे तुम्हाला कसं कळलं?' त्यावर तो पोलीसवाला उत्तरला, `आम्हाला इथून तुमच्या आजूबाजूनं तीन फोन आले...' अन्नाबाबतची जागरूकता म्हणजे काय चीज आहे हे आपण शिकायला नको का?
यापेक्षा वेगळी एक चळवळ चेन्नई येथे सुरू झाली, तिचेही अनुकरण करता येईल. चेन्नईतल्या ईसा फातिमा जास्मिन यांनी हे काम सुरू केले. त्यांनी सामुदायिक शीतकपाट(कम्युनिटी फ्रीज) ही संकल्पना राबविली आहे. मध्यवर्ती सोयीस्कर ठिकाणी मोठा फ्रीज ठेवलेला आहे. परिसरातील हॉटेल्स आणि आपल्यासारखे साधे नागरिकही त्यात आपल्याजवळ शिल्लक राहिलेले अन्न ठेवतात. गरजू लोक त्या फ्रीजमधून आपल्याला हवे ते पदार्थ घेऊन जातात. ते पदार्थ ठेवण्यासाठी चांगल्या पॅकिंगची, प्लॅस्टिकच्या भांड्यांची सोय आहे. अर्थात हा प्रयोग आहे, त्यातही काही मर्यादा व त्रुटी आहेत. परंतु ही संकल्पना मोठ्या प्रमाणावर  राबविता येईल.  साठवणुकीची चांगली सोय झाली तर बऱ्याच लोकांची गरज भागेल. आपल्याला पोटभर मिळावे, तसेच कोणी उपाशीपोटी राहू नये एवढे आपल्याकडे सहज मान्य होण्यासारखे आहे, पण....?? हा धर्माचा, देशाचा, देवाचाही विषय आहे. त्याकडे जरा गांभिर्याने पाहिले तर चांगले.
- वसंत आपटे, किर्लोस्करवाडी

 संपादकीय
हेही असेच, तेही तसेच!
कसे का असेना, अुद्धव ठाकरे यांच्या  हाताखालचे सरकार महाराष्ट्नत आले, मनाशी ठरवूनही हे कसे काय ठीक मानावे असा प्रश्णच आहे. त्यांचे मंत्रीमंडळ होणे सोपे ठरेना, ठरले तरी ते टिकण्याचा काहीही भरोसा नाही. अेकेका मंत्र्याकडे दहाबारा खाती देअून तूर्त सरकार चालू झाले, परंतु सरकार कामाला लागले असे काहीही चिन्ह नाही. तोंडाची वाफ आधी फसफसत होती, ती आणखी वाढली अेवढाच बदल आहे. तसेही काही भले काम होण्याची शक्यता कमीच, त्यामुळे सात मंत्र्यांवरतीच भागवून घ्यावे हे चांगले!

हे सरकार आल्यानंतरचा दुुसरा बदल त्याहीपेक्षा क्लेषकारी आहे, तो म्हणजे काल-परवापर्यंत सरकार चालविणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे विधानसभेतील वागणे. नागपूरचे अधिवेशन हे निव्वळ दिखाअू असायचे असाच प्रघात आहे. तिरपागड्या सरकारचे ते पहिलेच अधिवेशन केवळ अेका आठवड्याचेच होणार होते. परंतु प्रारंभीच नाही, तर त्याच्याही आधीच्या संध्याकाळी मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकून, आता विरोधक बनलेल्या भाजपने आपलेही कोतेपण दाखवून दिले. वास्तविक सरकार अेका कोण्या व्यक्तीचे वा पक्षाचेच असते असे सभ्य समाजाने गृहीत धरलेले नाही. प्रशासन चालविण्यासाठी अेका गटाचे काहीतरी धोरण अंमलात येणार असते, परंतु कोणत्याही धोरणाची विरोधी बाजू आणि त्यातल्या चुका व धोके लक्षात आणून देण्यासाठी विरोधी पक्षाने विधायकतेने चर्चा व संभाषण करणेच अपेक्षित -किंबहुना बांधील आहे. गेल्या काही वर्षांत ती अपेक्षाही दूर गेली आहे. विरोधी पक्षाने आरडाओरड गोंधळच करायचा, आणि सत्ताधाऱ्यांनी दामटून रेटून न्यायचे असली मुर्दाड प्रथा पडली आहे. अेखाद्याच्या घरच्या चहापानास बोलावले, तर कितीही भांडण असले तरी निदान सभ्यतेखातर अुभाअुभी जाअून यावे लागते. आिथे तर मुख्यमंत्री हा राज्याचा प्रमुख या नात्याने संभाषणासाठी, संवादासाठी बोलावत असतो. दुसऱ्या दिवशीपासून होणारे `लोक'प्रतिनिधींच्या सभागृहातील कामकाज विधायक व्हावे या सद्भावनेदाखल ती अेक चांगली प्रथा आहे. पण मुख्यमंत्र्याने तसे बोलवावे आणि विरोधी पक्षाने `लोकांच्या' त्या मुख्यमंत्र्यास झुगारावे अशीच असभ्य आणि निषेधार्ह प्रथा पडली आहे. पाच वर्षे मुख्य आणि आितर मंत्रीपदे भोगलेल्या आताच्या विरोधकांनी तितकाच असभ्यपणा दाखवावा हे अनपेक्षित दु:खकारी आहे.

विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यावर सभा तहकूब करण्याआितका गोंधळ होतो, यातून मतदारांनी केवळ हतबलच व्हावे! आधीच्या काळातील शेतकऱ्यांचे प्रश्ण मांडताना छाती पिटून आक्रंदन करणारी ही माणसे, प्रत्यक्ष निर्णयाच्या वेळी नाही ते विषय काढून सभा रोखतात, हे काय दर्शविते? अशा वर्तनात कालचे विरोधक माहीर होते आणि तेच सर्वस्वी दोषी होते, असे कुठेतरी वाटत होते. पण सत्ता बदलली आणि पक्षांची स्थाने बदलली तशी अेकदम तेच ते आणि तेच ते अनुभवाला येअू लागले याला काय म्हणावे? भाजप चे पंतप्रधान तिकडे संसदेत भाषण करताना असंसदीय पद्धतीने गोंधळ करून सभा बंद पाडणाऱ्या विरोधकांना सुनावतात; आणि आिथे त्यांच्याच हाताखालचे अनुयायी तितकेच दुराचारी वागतात, हे अजबच! दिल्लीत दंगल करणाऱ्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर न येता त्यांचे म्हणणे मांडावे, ते अैकून घेतले  जाआील असे पंतप्रधान म्हणतात; मग तेच म्हणणे त्यांच्या आवडत्या शिष्याला का सांगत नाहीत? `मीही सावरकर' लिहिलेल्या गांधी टोप्या घालून बाकीचे विषय रोखण्याबद्दल, विशाल हृदयाच्या समावेशक सभ्य हिंदुत्वाला कोणता आनंद झाला असेल ते त्यानाच ठाअूक.

मुळात कुणाला भारतरत्न देणे न देणे हा वेगळाच विषय आहे. सावरकरांचे क्रांतिकार्य आणि त्यांचा तुरुंगवास कुणाला किती दिव्य वाटावा हा ज्याच्या त्याच्या आकलनाचा, अभ्यासाचा, श्रद्धेचा प्रश्ण आहे. केवळ सावरकरच नव्हेत, तर अशी असंख्य नररत्ने या भूमीत तळपली. त्यांच्यापैकी कुणाला पुरस्कार द्यायचे हाही मोठाच प्रश्ण होआील. आपल्या घराच्या भिंतींवर पूर्वजांचे स्मरण देणाऱ्या तसबिरी असतात, त्यांत किती भर घालायची हे तारतम्य ठेवावेच लागते. आज तो विषय अुफाळून यावा असे काही नाही. आजच्या सरकारला पुरेसे मंत्री सापडत नाहीत, आर्थिक बाजू क्षीण होअू लागली आहे, रस्ते आणि पाणी यांच्या योजना रखडल्या आहेत, जगाच्या पाठीवरून रोंरावत येणारे संगणकीय वादळ गंभीर दिसते आहे.... अशा कितीतरी विषयांना भिडण्याअैवजी हे सभागृह असे वागणार असेल तर `न हि न हि तत्र धनाशा जीविताशापि दुर्लभा भवती।' याचाच प्रत्यय येआील. प्रत्येक पक्षाने आणि त्यांच्या पुढाऱ्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि सवलती यांचा धोशा लावला होता. एखाद्याची नोकरी गेली तर त्याने घरासाठी घेतलेले कर्ज माफ करत नसतात. मग एका वर्षी संकट आले तर गब्बर शेतकरी कर्जमाफीला पात्र कसे ठरतात? शेतकऱ्यांशिवाय या राज्यात कोणी राहातच नाही असा भास व्हावा; आणि त्यांच्या स्वस्थ जगण्यासाठी आकाशातील बाप पैसे ओतणार आहे याची साऱ्यांना खात्रीच असावी. पण त्या बाबतीत बोलाचाचि भात असतो, हे तर आता शेतकऱ्यांनाही कळून चुकले असेल.

सारी परिस्थिती लक्षात घेता, या सरकारचे आणि तितक्याच बेजबाबदार विरोधी पक्षीयांचे काय व्हायचे ते होआील; परंतु जनतेने हा अपेक्षाभंग कसा सहन करावा अशी काळजी आहे. अुत्तम आदर्श विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम करून दाखवू असे साऱ्याच पक्षांनी त्या त्या परिस्थितीत बोलून दाखविले होते, परंतु साऱ्याच पक्षांनी आपले भीषण दात दाखवायला सुरुवात केली. `सत्तातुराणां न भयं न लज्जा' हे खरेच आहे. आजवर सत्तेशी लगटून असलेल्या साऱ्याच गणंगांनी या प्रकारे अयोग्य वागावे, याचा केवळ अुसासा सोडून `हा हंत' म्हणायचे!!

कराड शहरातील कचरा बनला ऊर्जास्रोत,
सामान्य प्रश्नाला उत्तर शोधणारे प्रयत्न
कचऱ्याच्या समस्येत हल्ली सर्वजण गुरफटून गेले असल्याचे भासत असते. प्लॅस्टिकवर बंदी घाला, वनस्पतीजन्य कचरा खतासाठी वापरा, मनुष्याची विष्ठा हे तर सोनखत आहे, जनावरांच्या शेणापासून गोबरगॅस तयार करावा, काचा गोळा करून त्याचा पुनर्वापर करावा.... अशा प्रचारी घोषणा होत असतात. थोडक्यात म्हणजे या जगात निरुपयोगी आणि टाकाअू अशी कोणतीही गोष्ट नाही; परंतु आपल्याला आज घडीला जे अुपयोगाचे नाही, ते कुठेतरी फेकून न देता त्याचा योग्य विनियोग केला तर तीच संपत्ती ठरते. शिवाय आजकाल जो पर्यावरणाचा आणि प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे, त्याच्यावरही तेच अुत्तर आहे. कोणत्याही नव्याचा शेाध लागल्यावर ते जर अुपयुक्त आणि सोयीस्कर असेल तर त्याच्यावर बंदी घालणे शक्य होत नाही. प्लॅस्टिक हे त्याचे खास अुदाहरण आहे. कुणी कितीही कंठशोष केला  तरी आपल्या राहणीमानातून प्लॅस्टिकचा वापर टाळणे  शक्य दिसत नाही. आपण व्यक्तिश: जरी मनातून ठरविले तरीही प्लॅस्टिक घरात आल्यावाचून राहातच नाही.
परंतु सार्वजनिक यंत्रणेने ठरविले तर कोणत्याही समस्येवर अुत्तम अुपाय करता येतो. त्याला प्रतिसाद देण्यासाठी नागरिकांनी आपल्या सवयी बदलल्या तर कचऱ्यासारखा प्रश्णही नाहीसा  होतो, आणि तोच कचरा अेक प्रकारे अुपयोगी साधन बनतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अलिकडच्या काळात कचरा निर्मूलन आणि स्वच्छता हा विषय देशपातळीवर लावून धरला. काही संस्था-यंत्रणांनी मनावर घेतले आणि गेल्या चारसहा वर्षांत काही फरक दिसू लागला आहे. रेल्वेगाड्या, सार्वजनिक बागा, बऱ्याच प्रमाणात रस्ते, आणि प्रसाधन ठिकाणेही बदलू लागली आहेत. काही शहरांत-गावांत या बाबतीत खूप फरक जाणवतो. अगदी शेजारीच असलेल्या दोन शहरांत वा खेड्यांत नागरिकांची आणि नगरपालिकांची जाणीव वेगळी असल्याचे जाणवते. त्यांतून स्पर्धा होते. स्वच्छतेसाठी प्रयत्न करणाऱ्या गावांना मोठी बक्षिसे दिली जातात.
हे जरी सारे खरे असले तरी मुळातच गावाचे काम स्पर्धेपुरतेच राहिले तर हा प्रश्न सुटणार नाही. बऱ्याच गावांना `हगणदारीमुक्त' म्हणून गौरविले जाते; पण काही दिवसांतच तिथे मुक्त हगणदारी दिसू लागते. लहान पोरांना रागे  भरून कपाट-कपडे आवरायला लावावे, आणि दुसऱ्याच दिवशी तिथला पसारा तस्साच व्हावा यातला प्रकार!! त्या पोरांना तशा नेटक्या शिस्तीच्या वर्तनाचे महत्व पटले पाहिजे, तशी सवय लागायला पाहिजे. स्वच्छतेचा आणि कचरा निर्मूलनाचा प्रश्ण आता या टप्प्यावर येअून पोचला आहे.
जगातील अन्य प्रगत देशांत -विशेषत: पश्चिमात्य देशांत, व्यक्तिगत जीवनांत लोक अस्वच्छ असतात; परंतु सामुदायिक जीवनांत ते स्वच्छतेची फार काळजी घेतात.  आपल्याकडे सतरांदा स्वत:चे हातपाय धुतील, पण रस्त्यानं चालणंही कठीण होआील आितकी घाण टाकतात.  परदेशांत दररोज अंघोळ करणे त्यांना जरुरीचे वाटत नाही, पण रस्त्यांत लघवी करताना वा थुंकताना कोणीही दिसणार नाही. याउलट सार्वजनिक राहणीत कमालीची बेफिकीरी हीच आपली जगातली ओळख बनलेली आहे. संत गाडगेबाबांनी हा दुर्गुण लक्षात आणून देण्याचा आटोकाट प्रयत्न गेल्या शतकात केला. गांधीजींनीही स्वच्छतेला राष्ट्नीय कार्यक्रम ठरविले. अशा मोहिमेत लोक आणि सार्वजनिक संस्था यांनी अेकत्रित काम करणे गरजेचे असते. कराड शहरात चालू असलेेले प्रयत्न हे अशा सार्वत्रिक मोहिमेचे चांगले अुदाहरण ठरेल.
महाराष्ट्नत सुमारे दहा वर्षांपूर्वी आर आर पाटील यांनी ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीने गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविले होते. त्याने जरा गती घेतली तोवर सरकार बदलले; आणि ही मोहीम पुन्हा कचऱ्यात अडकून अस्वच्छ झाली. पाच वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदींनी `अेक कदम स्वच्छता की ओर' टाकले, आणि हा विषय सतत चर्चेत राहिला. सुरुवातीच्या काळात तो केवळ देखावा वाटला, पण हळूहळू त्या चळवळीने मूळ धरले. शासकीय पातळीवरून `स्वच्छता सर्वेक्षण' या नावाची योजना सुरू  झाली. नगरपालिकांतून स्पर्धा जाहीर झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांचे विविध गट पाडण्यात आले. लोकसंख्येच्या निकषावर त्यांचे अुपगट झाले. आर आर पाटलांच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ही स्वच्छता चळवळ राज्यभर रुजविण्यासाठी विविध योजना आणल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांना पाठबळ दिले. नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर यांच्या कल्पकतेची आणि पाठपुराव्याची जोड मिळाली. परंतु योजना यशस्वी होण्यासाठी नागरिकांचा सहभाग या सर्वांत फार महत्वाचा असतो; आणि लोकांचा सहभाग मिळविण्यासाठी लोकप्रतिनिधींचे प्रयत्न आवश्यक असतात.
कराडमध्ये यांहूनही चांगले चित्र दिसते. कराड पालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे हे कल्पक, कार्यक्षम आणि कष्टाळू धडाडीचे अधिकारी असल्यामुळे कचरा निर्मूलनाला वेगळाच वेग आला आणि आश्चर्यकारक दिशा मिळाली. गावातल्या लोकांची मानसिकता बदलण्यात श्री.डांगे यांना चांगले यश मिळते आहे. त्याचा परिणाम म्हणजे `स्वच्छ सर्वेक्षण २०१८'मध्ये या पालिकेला देशपातळीवर प्रथम क्रमांक मिळाला. विशेष म्हणजे या बक्षिसावर मोहीम थांबली नाही, तर त्यात सातत्य राहिले आहे. आितकेच नव्हे तर कचरा गोळा करण्यात नागरिकांनी जागरूकता दाखविली असून त्या कचऱ्यातून अूर्जानिर्मिती, बागबगीचा, आणि ऑक्सीजन झोन यांसाठी मोेठा प्रकल्प अुभा राहात आहे.
लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्यातील संघर्षाचे वातावरण सर्वत्र असतेच, तो शाप  बहुतांशी स्थानिक संस्थांना असतो. कराडात तसे काही प्रमाणांत होतेच. पण यशवंत डांगे यांनी कराडला आल्यावर, आपला स्वभाव आणि कार्यशैली यांतून स्वच्छता मोहीम भलतीच मनावर घेतली, आणि सारे वातावरण बदलून गेले.
श्री.डांगे  हे सकाळपासूनच गावात फिरती सुरू करतात. कुठे काही अयोग्य दिसले तर लगेच संबंधित कर्मचाऱ्याला त्या जागेवर बोलावून घेअून दुरुस्ती करवून घेतात. लोकांच्या सहभागातून अडचणी जाणून घेतात, आणि स्वत: हाती झाडू घ्यायलाही कमी करत नाहीत. त्यानंतर कार्यालयांत थांबून कामाचा निपटारा करतात. नगरसेवक, नागरिक आणि कर्मचारी यांचा मेळ त्यांनी घातल्यामुळे हे आपल्या घरचेच काम असे सर्वांना वाटते. नगराध्यक्ष रोहिणी शिंदे, अुपनगराध्यक्ष जयवंत पाटील, विजय वाटेगावकर, स्मिता हुलवान, अभियंता अे.आर.पवार, धन्वंतरी साळुंखे यांचेही सहकार्य या कामात असते.
प्रथम शहरात `कचराकुंडी मुक्त' अशी घोषणा झाली. ज्या जागी  कचराकुंडी असायची तिथे सभोवती कचरा फेकला जात असतो. तिथल्या कोंडाळयाशी सुशेाभीकरण करण्यात आले. तिथे सीसीटीव्ही क्रॅमेरे लावण्यात आले. यामुळे तिथे कचरा टाकण्याचे प्रमाण आपोआपच कमी झाले. पालिकेकडे दोन ट्न्ॅक्टर आणि चौदा घंटागाड्या होत्या, नागरिकांच्या घराघरांतून कचरा गोळा करण्यासाठी त्या वापरल्या जात. शासनाच्या घनकचरा व्यवस्थापन निधीतून अठरा नवीन घंटागाड्या घेण्यात आल्या. त्यात ओला व सुका कचरा वेगवेगळा घेण्यासाठी कप्पे असतातच. ओल्या कचऱ्याच्या कप्प्यातच नॅपकिन-डायपर्स असल्यासाठी अुपकप्पा करून घेण्यात आला. घंटागाडी फिरत असताना पालिकेचा अेक प्रतिनिधी सोबत असतो, त्यामुळे वर्गीकरण झाालेला संपूर्ण कचरा निगुतीने गोळा होतो. ओला कचरा साठविण्यासाठी कचरापेटी(डस्टबिन) पालिकेने प्रत्येक घरी दिलेली आहे. घंटागाडीवर स्पीकर असतो, त्यावर स्वच्छताविषयक घोषणा व गाणी वाजवत येतात; लोकांना तयारीत राहता येते. दारी गाडी आली की लोक कचरा देतात.
लोकांना त्यासंबंधी प्रशिक्षण दिले ही बाबही वेगळी आहे. बऱ्याच शहरांत आता घंटागाड्या आहेत, पण कर्मचारी आणि नागरिक कामात चालढकल वा कुचराआी करतात. आिथे ते प्रमाण खूपच कमी आहे. नागरिकांतून १६९ स्वच्छतादूत नेमलेे आहेत, ते नागरिकांत मिसळून प्रत्यक्ष काम, पथनाट्ये, स्पर्धा, श्रमदान, यांद्वारे जागरूकता वाढवत असतात. त्यांचा त्या त्या भागांत निकट संबंध असल्यामुळे लोकांचा सहभाग चांगला मिळतो. शहराची लोकसंख्या लाखाच्या घरात पोचली आहे. रोज १४ टन ओला, आणि जवळजवळ तितकाच कोरडा कचरा गोळा होतो. शहराला लागून नदीकडे पालिकेची सोळा अेकर अेवढी मोठी, कचरा साठवणीची जागा होतीच. ती पूर्वी जेव्हा पी.डी.पाटील यांनी घेतली त्यावेळी त्या जमीन मालकांना चांगला मोबदला देअून समन्वयाने मिळवली होती; त्या मालकांच्या कुटुंबांतील अेकाला कायमची नोकरीही देण्यात आली होती. त्यांच्या दूरदृष्टीचे ते अुदाहरण ठरले. `बारा डबरी' म्हणून तो भाग ओळखला जातो. तिथे शहरातील सारा कचरा आणला जातो.
ओला कचरा मशीनने बारीक करून कंपोस्ट पिटमध्ये टाकतात. त्यापासून कंपोस्ट खत बनते, त्यापासून पालिकेला चांगले अुत्पन्न मिळते. आता तर काही वसाहतींमध्ये घरोघरीही कंपोस्ट खत बनविले जाते. सुक्या कचऱ्यातील प्लॅस्टिक वेगळे करून ते शहरातील रस्ते तयार करण्यासाठंी वापरले जाते. दुधाच्या पिशव्या व पॅकिंगच्या पिशव्या यांचे प्रमाण फारच जास्त, ते पुनर्वापरासाठी पाठवतात. शासनाने पातळ क्रॅरिबॅग बंद केल्या, त्याआधी केव्हाचाच कराडने तो निर्णय प्रत्यक्षात आणला आहे.
कचरा संकलन केंद्राच्या जागेत ५ अेमअेलडी बायो मिथेनेशन  प्रकल्प अुभारला आहे. त्या ठिकाणी कचऱ्याचा वापर करून ५० किलोवॅट वीज तयार होते.  त्याच प्रकल्पातील यंत्रे आणि शहरातील रस्त्यांवरचे विजेचे दिवे यांसाठी ती वीज वापरतात. रस्त्यांवरचे जुने लाआीट-फिटिंग बदलून अेलआीडी दिवे लावल्यामुळे ५०टक्के वीज वाचते, पालिकेचे वीजबिल वर्षाकाठी ७५लाखांनी कमी झाले. रस्त्यांचे दिवे चालू-बंद करण्यासाठी सीसीअेमसी यंत्रणा आहे. त्यामुळे विजेचा गैरवापर टळला. कचऱ्याचा चांगला वापर सुरू झाला. ४२ वर्षे सलग नगराध्यक्ष राहिलेेल्या पी.डी.पाटील यांच्या कारकिर्दीत १९७० सालीच शहरात भुयारी गटारी योजना झाली, त्यासाठी शहरात चार पंपिंग स्टेशन्स आहेत, आता आणखी दोन अुभारली जात आहेत. ते सारे सांडपाणी बारा डबरी जागेत आणून सेव्हेज् ट्नीटमेंट(अेस.टी.पी) प्लँटमध्ये आणतात. त्यावर  प्रक्रिया केली तरीही ते पाणी शेजारी नदीत सोडले जात नाही, तर ते शेतीला दिले जाते. त्यासाठंी पालिकेचा १२.५ अेम.अेल.डी. क्षमतेचा प्रकल्प आहे.
देवाची पूजा करताना आपण स्वच्छता सांभाळतो, तशीच देशाची पूजा करण्यासाठी सार्वजनिक स्वच्छता केली पाहिजे, असे कराडच्या नागरिकांना सांगण्यात येते. त्या मोहिमेचा अुपयोग कुणाला? नागरिकांनाच तर होणार आहे. आरोग्यासाठी होणाऱ्या खर्चात बचत  होणार. कामाची गती आणि दर्जा यांतही सुधारणा होणार. हे जीवनध्येय(मिशन) मानून काम करण्याची प्रेरणा सातत्याने दिली जायला हवी. कराडच्या प्रशासनाने तो प्रयत्न मार्गी लावून दिला आहे. तो वारसा टिकवून धरण्याची जबाबदारी प्रत्येकावरच आहे.  आितर स्थानिक स्वराज्य संस्थांनी हे अुदाहरण आवर्जून पाहायलाच हवे. `स्वार्थसाधना की आँधी में, वसुधा का कल्याण ना भूलें।' याचा प्रत्यय दिला पाहिजे.
या भागात कचरा आणून फेकला जात होता, म्हणजे तेथील दृश्य कसे होते याची कल्पना  कोणीही करू शकेल. मोठेले कचऱ्याचे ढीग, दुर्गंधी, भटकी कुत्री...वगैरे! आता तिथे स्वच्छता आणि हिरवळ नांदते म्हटले तर अतिशयोक्ती वाटेल. तेथे सुरू असलेले अूर्जा आणि अुद्यान यांचे प्रकल्प पाहिल्यावर लवकरच ते पर्यटनस्थळ बनेल याची खात्री वाटते. अडीच अेकरावर हिरवळ आणि कारंजी होत आहेत. बाकी क्षेत्रात फळझाडे, बागबगीचा लावण्यात येत आहे. २० हजार चौ.फुटांच्या शेडमध्ये `कचरा शुद्धीकरण' यंत्रणा आहे. प्रवेशद्वाराची अुभारणी सुरू असून तिथपासूनच हा परिसर आिथल्या दु:खदायी पूर्वस्मृती विसरायला लावेल. बायोगॅस, प्लॅस्टिक वितळवून त्याचे मोल्ड तयार करण्याची यंत्रणा आहे. विजेची योजना भूमिगत असल्यामुळे कुठे तारांची जंजाळे नाहीत.
कचरा ही समस्या नाही, तर तो अूर्जास्रोत म्हणून अुपयोगी ठरेल या दिशेने हे सारे प्रयत्न आहेत. आपल्याकडे अजूनी ती जाणीव झालेली नाही. लोकांना केवळ शिकवून चालत नाही, नुसत्या गाण्यांच्या-घोषणांच्या तालावर लोक भुलत नाहीत. त्यासाठी प्रशासनाने जीव ओतून काम करावे लागते, मग मात्र लोक साथ देतात; आणि कचऱ्याचे सोने होते. कराडने ती दिशा दाखविली आहे. ती चिरकाल टिकावी आणि आितरांसही प्रेरक ठरावी.
-विवेक ढापरे, कराड      फोन- ७५८८२२११४४

शोधिला पाहिजे विचार । यथातथ्य ।।
शिरवली या गावातील विष्णुपंत गोखले (सन १८२५ ते १८७४) हे विष्णुबुवा ब्रह्मचारी म्हणून नावारूपाला आले. ते लौकिकार्थाने अुच्चशिक्षित नव्हते, पण स्वाध्यायातून त्यांची तेज बुद्धी प्रगटू लागली. िख्र्चाश्न मिशनऱ्यांच्या धर्मप्रसाराला रोखण्याचे प्रयत्न त्यांनी  केले. मिशनऱ्यांशी जाहीर वादविवाद करून ते त्यांना हरवीत असत. त्यांची श्रद्धा वैदिक धर्मावर होती, तरीही ते प्रचलित रूढीपरंपरांत सुधारणांचे कट्टर पुरस्कर्ते होते. त्या सुधारणांसाठी पाश्चात्यांचा आश्रय घेण्याचे काही कारण नाही असे त्यांचे  प्रतिपादन होते. `सुखदायक राज्य' या निबंधात ते म्हणतात -
सर्व प्रजेकडून साऱ्या जमिनींची लागवड करावी. जी वनस्पती ज्या ठिकाणी चांगली पिकते, त्याच ठिकाणी तिची लागवड करावी. अनेक प्रकारची फळे, कंद, भाज्या, अन्न वगैरे अुत्पादन करून गावोगावी कोठारे भरून ठेवावीत, व त्यांतून सर्व गावकऱ्यांनी पोटास लागेल तितके अन्न न्यावे व जनावरांस चारा न्यावा. याप्रमाणे सीतकाळ, अुष्णकाळ व पर्जन्यकाळ या बाराही महिन्यांत अेकसारखे जमिनींतून अुत्पन्न करावे व अेकाचेच ताब्यात राहू देअून त्यातून खावयास विपुल न्यावे. राजाने लोकरीचे,  रेशमाचे, तागाचे व कापसाचे याप्रमाणे अनेक तऱ्हेचे  कापड तयार करावे, गावोगावी खजिन्यात ठेवावे. त्यांतून ज्याला जो कपडा पाहिजे तो त्याने न्यावा. सोन्यारुप्याचे मोती हिरे यांनी जडलेले अलंकार तयार करून गावोगावी तयार ठेवावेत; ते सर्व स्त्री-पुरुषांना वापरण्यास द्यावेत व मोडले म्हणजे पुन्हा राजाच्या खजिन्यात आणून टाकावेत, नवे वापरायला द्यावेत. तशीच शस्त्रे, यंत्रे तयार करून  ती गावोगावी ठेवावीत. आगगाड्या व तारायंत्रे सहज अुपलब्ध असावीत. सर्व प्रकारच्या कारखानदारांनी व शेतकऱ्यांनी व राजाने अेकसारखे अहिंसक खाणे खावे. ते सर्वांनी अेका कोठारातून नेअून खावे. सर्वांची लग्ने, लग्न करण्याच्या खात्याच्या मार्फतीने राजाने करावीत व आवडत नसली तर ज्याला जी स्त्री नको त्याला दुसरी करून द्यावी, वा तिला  दुसरा पती करून द्यावा, -म्हणजे स्वयंवर असावे. सर्वांची पाच वर्षांची पोरे झाली म्हणजे मुलगे व मुली राजाच्या ताब्यात द्यावे. नंतर त्याने त्यांना सर्व विद्या शिकवून ज्याला ज्या कामात ज्यास्ती अुद्योग करण्याची सवय असेल, त्याला त्या कामाकडे लावून द्यावा. स्त्रिया-पुरुष वृद्ध झाली म्हणजे त्यांच्याकडून कामधंदा न करविता त्यांनी स्वस्थ बसून खावे व त्या त्या खात्याचे पार्लमेंट सभेचे सभासद असावे.

आनंदधन
आजतागायत ३२ जणांना राष्ट्न्पती शौर्य पुरस्कार, महाराष्ट्न् गौरव पुरस्कार, अपंग कल्याण पुरस्कारांनी सन्मानित करण्यासाठीचे माध्यम बनून, त्यांच्या जीवनात आनंद आणि आत्मभान फुलवण्याचं काम मी करू शकलो. आता एैंशीच्या उंबरठ्यावर उभा आहे. पण या कामाचं, यज्ञाचं होमकुंड तेवढंच प्रज्वलित आहे. त्यातून मिळणारं समाधान माझं आनंदधन आहे, तीच माझी जगण्याची प्रेरणा आहे.
राष्ट्न्पती भवनाच्या भव्यदिव्य बागेमध्ये राष्ट्न्पती शौर्य पुरस्कारासाठी निवड झालेल्या माया डोंगरेला घेऊन मी पोहोचलो. माया डोंगरेचे नाव पुकारलं गेलं आणि तुतारीच्या ललकारीने आम्ही हरखून गेलो. माझ्या कष्टाचं चीज झालं.
माया ही ठाणे जिल्ह्यातील, शहापूर तालुक्यातील अगदी छोट्या गावातली मुलगी. खेळता खेळता तिचा चुलतभाऊ विहिरीत पडला. क्षणाचाही विलंब न लावता स्वत:चा जीव धोक्यात घालून तिने त्याला वाचवले, ही बातमी वर्तमानपत्रात वाचली. आणि तिची सर्व कागदपत्रं दिल्लीपर्यंत पोहोचवण्याचा माझा खटाटोप सुरू झाला. अर्थात हा प्रवास सोपा नव्हता. १९८२ला महेश पद्माकर खारकर या कल्याणच्या दहा वर्षांच्या मुलालाही हा शौर्य पुरस्कार मिळवून देता आला. त्याने पतंग उडवताना इलेक्टि्न्क तारेला चिकटलेल्या मुलाला प्रसंगावधान राखून वाचवलं होतं. तो माझा पहिलाच प्रयत्न होता. आजतागायत ३२ जणांना राष्ट्न्पती शौर्य पुरस्कार, महाराष्ट्न् गौरव पुरस्कार, अपंग कल्याण पुरस्कारांनी सन्मानित करण्यासाठीचे माध्यम बनून त्यांच्या जीवनात आनंद आणि आत्मभान फुलवण्याचं काम मी करू शकलोय.
वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेली तशी एखादी बातमी वाचली की तेे कात्रण मी ठेवतो आणि त्या संबंधातील सर्व कागदपत्रं मी मिळवतो. जेव्हा  या पुरस्कारासाठी नामांकनं पाठविण्याची सूचना येते तेव्हा म्हणजे अगदी आठ दिवसांत या कागदपत्रांवर अनेक सरकारी विभागांची मोहोर उमटवून ते सर्व दिल्लीला पाठवतो. त्यासाठी धावपळ आणि पाठपुरावा करावा लागतो. पण त्यानंतर त्यांना जेव्हा शासकीय मानाचा पुरस्कार मिळतो तेव्हाचं समाधान म्हणजे माझं आनंदधन आहे.
मी तरुण वयातच जिल्हा पातळीपासून थेट केंद्र सरकारपर्यंतचा, लाभार्थींना मिळणाऱ्या तरतुदींचा अभ्यास करायला सुरुवात केली. शिवाय खेड्यातील रानवाटा ते राष्ट्न्पती भवनापर्यंतचा प्रवास मुखोद्गत केला. खेड्यातील असो व शहरातील, लोकांना शासनाने जाहीर केलेल्या अनुदानाची, बक्षिसांची मोबदल्याची माहिती नसते. त्यासाठी निधींची तरतूद केलेली असते. योग्य व्यक्तीच्या शौर्याचा, कर्तृत्वाचा गौरव झालाच पाहिजे. तसंच वन्य प्राण्यांमुळे जीव गमवावा लागलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळालीच पाहिजे, या सद्हेतूनेच मी ती ही वाट निवडली. हाली रघुनाथ बरफ ही तबेल्यात शेण गोळा करणारी मुलगी, तिच्यावर वाघाने अचानक झडप घातली. हालीने प्राणपणानं प्रतिकार केला आणि स्वत:चं संरक्षण केलं. तिला राष्ट्न्पती पुरस्कार मिळवून देताना खूप धावपळ करावी लागली. वाशीच्या विकास दत्ताराम साटम या मुलाने बैलाच्या झंुजीत सापडलेल्या एका लहान मुलाला स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवलं. त्यालाही शौर्य पुरस्कार मिळवून देऊ शकलो. आणखी काही धाडसी मुलांची माहिती मी पाठवली आहे. त्याचा पाठपुरावा करतो आहेच.
वन खात्याच्या तरतुदींचा, अनुदानांचा, त्यातील शासकीय अध्यादेशांचाही मी अभ्यास केला. वन्य प्राण्यांकडून झालेल्या हल्ल्यात माणूस दगावला तर त्याच्या कुटुंबियांना सध्या १५ लाख रुपयांपर्यंत नुकसान भरपाई मिळू शकते. हे अभ्यासच असतानाच एक आदिवासी स्त्री सर्पदंशाने दगावली असल्याचं कळलं. तिच्या कुटुंबियांना शासकीय अध्यादेशाच्या अंतर्गत अनुदान मिळवून देण्यासाठी खूप खटपट केली, पण तिला अनुदान मिळालं नाही. जेव्हा मी अध्यादेश पुन्हा अभ्यासला तेव्हा त्यात सर्पदंशाने झालेला मृत्यू समाविष्ट केलेला नाही हे लक्षात आलं. त्यासाठी मी वनमंत्र्यांना पत्र लिहिलं.
एखाद्या व्यक्तीचे प्राण जर कोणी वाचवले असतील तर त्या व्यक्तीने केलेले धाडस, समयसूचकता, प्रसंगावधान यानुसार ५०हजार ते दीड लाख रुपयांपर्यंत रक्कम देऊन राज्य सरकारकडूनही गौरव करण्याची तरतूद आहे. विशेष शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग व्यक्तींनाही `अपंग कल्याण पुरस्कार' राष्ट्न्पतींच्या हस्ते दिला जातो. सीमा गोखले या डोंबिवलीच्या मुलीने आपल्या अपंगत्वावर मात करून योग्य शिक्षण घेत शाळेत शिक्षिकेची नोकरी केली. ही गोष्ट मला समजताच दोन दिवसांत तिची सर्व कागदपत्रं तयार करून पाठवली. तिला राष्ट्न्पती पदक मिळालं, तेव्हा मी तिच्याबरोबर दिल्लीला गेलो होतो. समाधानाची गोष्ट म्हणजे तिथे आलेल्या एका समदु:खी तरुणाला तिच्याबरोबर लग्न करण्याचं सुचवलं. त्याने ते मान्य केलं. आज ती दोघंही सुखात आहेत. आेंकार निरगुडकर हा साताऱ्याचा कमरेखाली अपंग असलेला मुलगा. तोही एका कंपनीत सचिव पदापर्यंत पोहोचला. त्यालाही योग्य ते सर्व मार्गदर्शन केलं. तो आज राष्ट्न्पती पदकाचा मानकरी आहे. आता त्याला `हिंदुस्तान पेट्नेलियम'मध्ये नोकरी लागली आहे.
नोकरी करत असताना हे काम स्वेच्छेने सांभाळले. आज मी वयाची ७९ वर्षे पूर्ण केली आहेत. आई-वडिलांनी प्रामाणिकता आणि सचोटी हे गुण मनावर बिंबवलेत. त्यामुळेच नोकरीतलंही माझं लक्ष मी कधी ढळू दिलं नाही. १९६४-६५ला कंपनीने मला `गुणवंत कामगार' पुरस्काराने सन्मानित केलं, पण त्यावेळी आनंदाबरोबर माझी जबाबदारी वाढली. माझ्या कार्याची दखल अनेक संस्थांनी घेतली आहे. प्रोत्साहन मिळालं. माजी राष्ट्न्पती झैलसिंग, राष्ट्न्पती व्यंकटरमण, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबरोबर जे काही सुवर्णक्षण अनुभवले ते खरे पुरस्कार. माजी पंतप्रधान राजीव गांधींनी स्वत:च्या दुर्मीळ फोटोंचं क्रॅलेंडर मला स्वहस्ते भेट दिलं. हा अविस्मरणीय ठेवा.
याशिवाय कविता, पौरोहित्य हे छंदही मी जोपासतो. `अंधारातील फुले' हा माझा ९६ गीतांचा संग्रह शासनाने प्रकाशित केलाय. लहानपणापासून मी ज्ञानेश्वरी वाचत आलोय. त्यामुळे दुसऱ्याच्या भल्यासाठी झटणं, मेहनत घेणं, हीच माझी गुरुमाऊलींची पूजा.
मला नेहमीच वाटतं,
`इन्सान की दुवा सुखी जिंदगी की दवा है ।
अंधेरे में चलते समय वही तो दिया है ।
वे दोनो मिल गये तो खुदा उसको दया देता है ।'
                                    (-शब्दांकन- सुलभा आरोसकर)
              संपर्क- शंकर आत्माराम आपटे, १६ आदर्श कॉलनी, ठाणे(पूर्व)
             फोन- (०२२) २५३२५०४१

प्रफुल्ल शिलेदार यांचे `स्वगत', `जगण्याच्या पसाऱ्यात' हे कवितासंग्रह. स्वत:चा निर्मम निर्मुख अंत:स्वर जपत ते कविता लिहितात. त्यांची ही एक कविता-  
पुस्तकं
मला शोधत येतात
आतून ओढ लागलेली असते त्यांना
मला भेटण्याची

जुन्या मित्राच्या आसुसतेनं
माझा शोध घेतात
एका क्षणी गाठतात
पुढं येऊन
शांतपणे उभी राहतात

त्यांना कधी वाचेन
याची वाट बघतात
वाचलं जाण्याची
त्यांना घाई नसते

अधूनमधून
अस्वस्थ होत
मी पाहातो त्यांच्याकडे
एवढंही पुरतं त्यांना

हाती घेताच
काळीज लकाकतं पुस्तकाचं
डोेळे चमकतात

वाचली जात असताना
श्वास रोखून धरतात
माझी एकाग्रता
भंग होऊ देत नाहीत

अर्ध्यातून ठेवून दिल्यानंतर
न हिरमुसता
वाट पाहतात
पुन्हा उचलून घेण्याची

संपूर्ण वाचल्यानंतर
पुस्तके थकून जातात
आतल्या आत मिटून
माझ्यावर
काय परिणाम झाला असेल
याचा विचार करतात
नवी प्रत घेतल्यानंतरही
तिची आठवण
मनातून जात नाही

पुस्तकं म्हातारी होतात
देठापास्नं त्याची पानं
विलगू लागतात
तेव्हा त्यांना
अलगद उचलून
ठेवावं लागतं
वयोवृद्ध बापासारखं
जपावं लागतं


आठवांचे साठव
एकमेव युद्ध!
साल १९६५. मी विलिंग्डन कॉलेजात जाऊ लागलो. दोन-तीन वर्षांपूर्वी चीनचं युद्ध होअून गेलं होतं. आमच्या या कॉलेजात सीनीयर अेन सी सी होती, त्यामुळं ते प्रशिक्षण बऱ्यापैकी सक्तीचं होतं. अेके दिवशी आम्हा साऱ्या पोरांना मैदानात गोळा करण्यात आलं. फॉर्म भरून घेण्यात येत होते. लष्करातले काही लोक आमची मोजमापं घेत होते. वजन, अुंची, छाती हे पाहून झाल्यावर अेका रांगेत अुभे होतो. आतल्या खोलीत बरेच डॉक्टर लोक होते, तिथं मेडिकल तपासणी होती. आम्हा वयाच्या साऱ्यांना भलतीच अुत्सुकता होती. रांगेतले अेकेकजण त्या तपासणीतून बाहेर आले की, जरा जास्त  करून भलतं सांगायचे. चड्डी काढायला लावून हात लावून तपासतात हे अैकल्यावर रांगेतली सारीजण भयंकर बावचळली. अेकीकडं हसू आणि दुसरीकडं भीती अशा अवस्थेत दहा मिनिटं धीर काढला, आणि मला आत बोेलावून घेतलं. `तसलं' काहीही नव्हतं. डॉक्टरनी नाडी, रक्तदाब वगैरे पाहिलं असावं. मी तसा बुटकुलाच पण गुटगुटीत होतो. रोज येण्याजाण्यातल्या माझ्या मित्रांची निवड झाली नाही, पण मला निवडण्यात आलं.

नंतर गणवेश देण्यात आला. या सगळया अनुभवांत अस्सल लष्करी खाक्या असायचा.  कुणाचे लाड-लडिवाळी नाही, खास हडेलहप्पी. गणवेश देताना पँट-शर्ट-बूट-पट्टा अंगावर भिरकावला. तो आपल्या मापाचा असेल-नसेल! मी तसा आज्ञाधारक आणि चतुरही असल्यामुळं एनसीसीत माझं जरा कौतुक होआी. मोरे म्हणून आमच्या तुकडी(कंपनी)चे आिन्स्ट्न्क्टर होते, ते तर मला `छोटू' म्हणून हाक मारायचे. रविवार सकाळी परेड असायची. हजार बाराशे तरुणांची ती मांडणी(फॉलइन) झाली की, तितक्यांना सहज अैकू जाणाऱ्या आरोळीत `परे%%%ड् , सा%%वद्धान' व्हायचं. अवसान चढायचं. त्यात लेप्रैट आणि बाकीचं शिक्षण १२ वाजेतो चालायचं. मग साऱ्यांची हजेरी, आणि खाअू म्हणून बिस्किटं, चॉकोलेट् मिळायची. क्रॅड्बरीज चॉकोलेटं मला त्याच्या  करपटपणामुळं फारशी आवडायची नाहीत, म्हणून मी ती अलगद घरी आणत असे, त्यावर माझ्यासोेबत शिकत असलेल्या त्या घरच्या मुलांचा हक्क असायचा.

संगीनयुद्ध(बायोनेट् फायटिंग) हा अेक प्रकार होता. समोर वाळके गवत भरलेला अेक भोत टांगलेला, त्यात संगीन खुपसायची आणि बाहेर अुपसून पुन्हा दुसऱ्यांदा खुपसायची. तसे करताना `घो%%%प्,  निक्काल,  धावा क%%%र...' असे त्वेषाने ओरडायचे. हे मी मोठ्या अभिनिवेशात करीत असे. आमचे मोरे मेजर `अरे व्वा छोटू' असं म्हणून सगळयांसाठी पुन्हा मला (डेमॉन्स्ट्न्ेशन) करायला  लावायचे. मला मूठभर मांस चढायचे.

दुसऱ्या वर्षी मी कराडला गेलोे. तिथंही अेनसीसी होतीच. शस्त्रशिक्षण (वेपन ट्न्ेिंनग)चा पुढचा भाग सेकंड आियरला होता. अेकदा मी, प्रकाश पारसनीस आणि अन्य चार जणांस रायफल्स देअून, आितर परेड्ला कळू न देता, तिथून दूर टेकाडावर नेण्यात आलं. काय करायचं ते आम्हालाही कळेना. तिथं आम्हाला योजना सांगण्यात आली. आजवर साऱ्यांचं जे प्रशिक्षण झालं होतं, त्याची चाचणी घ्यायची होती. आम्ही चौघेजण त्या टेकडीच्या माथ्याला पल्याड अुतारावर पालथं(लाआीन पोझिशन) झालो. अेकजण आधीच्याच वाटेवर पण जरा बाजूलासा झाडीत लपला, तिथं त्यानं बैठक घेतली. कॉलेेजच्या बाजूनं पहिली तुकडी, मग दुसरी, मग तिसरी... असं करत `फौज' पुढे सरकत आली. आम्हा चौघांच्या टप्प्यात (रेंज) आल्यावर मेजरनं `फायर' म्हटलं, तशी आम्ही फाड फाड असे वायबार काढले. पुढच्या तुकडीसोबत आलेल्या लष्करी शिक्षकानं साऱ्यांना लाआीन पोझीशन करून रांगत पुढे सरकायला(क्राअूलिंग) सांगितलं. ती पोरं तशी घाबरली होती. पण लष्करवाला चेवानं त्यांना काय करायचं ते सांगत होता. `दुश्मन गोलीआड में है, बाजू से फायरिंग खोलेंगे । डटे रहो ।'  ही झुंड पुढे आली, तशी त्यांच्या मागच्या झाडीत लपलेल्या भिडूनं फाड फाड `गोळया' झाडल्या. त्या `फौजे'तल्या सगळयांची पाचावर धारण. दोन्हीकडून नुसतेच बार अुडत होते. ही आपल्यातलीच पोरं आहेत, हे अेव्हाना त्या `फौजे'तल्या सगळयांच्या लक्षात आलं. हुआी%% करत सगळीजण धावत आमच्या दिशेला आले. अेकत्र झाल्यावर लष्करातले ते आिन्स्ट्न्क्टर्स म्हणाले, `लेकानो, तुमच्या बा%नं अशी लढाआी केलीवती का? पुढनं अेक बार झाल्यावर आिजारी पिवळया केलासा....'
लुटुपुटीच्या का असेना, लढाआीचा माझा हा अनुभव!!


तिर्कंदाजी
गावाचा मान वाढला
                                      -स.वा.तिरशिंगे
कालच्या पेपरात वाचलं, आणि माझा अूर भरून आला. आमच्या गावाला कमी लेखणाऱ्या साऱ्यांची जिरली, आणि आमच्या गावाला हा थोर  सन्मान प्राप्त झाल्याचं वाचलं. आमच्या गावाला `मोक्का न्यायालय' स्थापन करणार आहेत अशी ती बातमी. माझी कॉलर ताठ झाली. आमच्या गावाचा हा सन्मान वाचून कित्येक करंटे लोक जळफळतील. पण शेवटी आीश्वराघरी देर असला तरी अंधेर नाही.
मोक्का न्यायालय स्थापन झालेे म्हणजे आमच्या गावात तशी गरजच निर्माण झाली असणार. गुन्हेगारांची संख्या वाढली असणार, त्यांचे खटले साठले असणार, तुंबले असणार. हल्ली शिक्षा तर कुणाला करायचीच नसते. परंतु गुन्हा शाबीत झालाच तर कोर्टाने जनाची नाही पण निदान मनाची... म्हणून तरी काही शिक्षा द्यावीच लागते. तो प्रसंग येअू नये म्हणून हल्ली खटले पूर्ण करीत नाहीत, हे आपण सारे पाहतोच. गुन्हा घडलेला साऱ्यांना ठाअूक असला तरी तो दाखल करण्यातच खूप वेळ जातो. सरकारही बदलले जावे लागते. त्यानंतर मग आधीच्या सरकारच्या काळातील प्रकरणे शोधायची, त्याचा प्रचार करायचा, वातावरण तयार करायचे. त्यानंतर मग लोकांनी मागण्या मोर्चे काढायचे. एवढ्यावरती तो गुन्हेगार नरम आला तर बरेच. नाहीतर त्याला पक्षांतर करून आपल्यात घ्यायचे. याउप्परही गरज वाटली तर गुन्हा नोंदवायचा.
आता आितका वेळ जाणार नाही, कारण मोक्का न्यायालयच आमच्या आिथे दाखल झाले. `सरकार तुमच्या दारी' या योजनेत ही सोय करण्यात आली आहे. तक्रारदार आणि गुन्हेगार यांची गर्दी वाढली होती. आता ती जरा मार्गी लागेल. आिथे पूर्वीपासून तशी मागणी होतीच, पण मोक्का न्यायालय स्वतंत्रपणेे चालण्याआितके तुमच्या गावात पुरेसे गुन्हेगार नाहीत असे सांगून कटवले  जात असे. कोर्ट जरी झाले तरी, पुरेसे गुन्हेगारच नसतील तर त्याला त्यांचा धंदा परवडायला नको का? शेवटी आमच्या गावातील पुढाऱ्यांनी आकडेवारीच त्यांच्या तोंडावर फेकली. ती अधिकृत गुन्ह्यांची होती, पण ती मान्य करून तेवढ्यावर काम झाले. त्यांखेरीज नोंद नसलेले कितीतरी गुन्हे आमच्या गावात असतातच, परंतु कोर्टाला त्यांचा काय अुपयोग? त्यांचा अुपयोग केवळ व्यवसायांतील सगळया टोळीतील लोकांना. आता पोलीसांच्या अधिकृत नोंदीप्रमाणेच आमच्या गावात ती भरपाई झाली, आणि गावाला ललामभूत  असणारे मोक्का न्यायालय आमच्या गावात मंजूर झाले.
मला त्यातल्या अेकाने सांगितले की, अशी महत्वाची प्रतिष्ठेची सोय आपल्यासाठी करून घ्यायची तर काही कागदही रंगवतात. आमच्या गावात गुन्हे भरपूर असले तरी, स्पेशल कोर्ट देण्याआितकी अधिकृत संख्या भरत नव्हती काय! तर ही घ्या नावं, असं म्हणून बोगस गुन्हेगारांचीही नावे घातली गेली. परंतु सरकारनं तर त्याची शहानिशा केली नाही. आणि केलीच असती तर त्या  यादीविषयी कुणाला संशयही आला नसता. कारण त्यांची कर्तबगारी जगजाहीरच होती. केवळ कोर्ट मंजूर न होण्यासाठी कोणीतरी आडवे लावायचे, म्हणून मग गुन्हेगारांची ही तयार यादी जोडली, आणि तेवढ्यावर काम झाले असावे. यासाठी ज्या ज्या पुढाऱ्यांनी, गुन्हेगारांनी, पोलीसांनीही प्रयत्न केले, कर्तबगारी गाजवली त्या साऱ्यांचे कौतुक करावे तितके थोडेच. त्यांचे अभिनंदन करायला हवे. आमच्या गावात अशा श्रेष्ठ गुन्ह्यांचे खटले लांबवणीसाठी स्वतंत्र न्यायालय देण्यामुळे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला अशी आम्हा गावकऱ्यांची भावना आहे. यापुढे हे मोक्का न्यायालय कायमचे आिथे राहील यासाठी त्याला पुरेसे काम पुरविण्याची जबाबदारी आिथल्या संबंधितांनी शिरावर घ्यावी, याखेरीज काय मागायचे?
-अशोक तेलंग, हरीपूर (सांगली)          फोन : ९८६०६ ७५५७५)

प्रिय वाचक
ग्रामीण-ग्रामीण म्हटला जाणारा आपला परिसर आता तितकासा `ग्राम्य' राहिलेला नाही. कर्नाटक, आंध्र किंवा महाराष्ट्नची पूर्व या भागातील खेडी जर डोळयासमोर आणली तर एक गोष्ट चटकन लक्षात येते. दारिद्य्र आणि अज्ञान त्या भागातून इतके प्रचंड आहे की, साधा स्टोव्ह या लोकांना चमत्कार वाटतो. दारिद्य्राविषयीसुद्धा अतिपरिचयामुळे त्या लोकांना एक प्रकारचे प्रेम वाटू लागलेले असते, आपल्या सुदैवाने आपला परिसर त्या गर्तेतून बाहेर पडतो. तरीही चमत्कारिक अशी अस्वस्थता ग्रामीण भागात जाणवते.
याची कारणे शोधायची ठरविली तर ती सापडणे फारसे अवघड नाही. आपल्या संपन्नतेचे स्वरूप आपण तपासले तर ही संपन्नता सार्वत्रिक अशी नाही. संपत्तीचे वाटप असंतुलित झालेले आहे. काहींच्या हाती जो पैसा आला तो त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्ती आला. त्यातून  साहजिकच एक गुर्मी आणि बेदरकारी जन्म घेऊन बसली. त्यामुळे संपन्नतेबरोबर सुसंस्कृतपणा वाढला नाहीच, उलट समाजाबद्दल तुच्छताच वाढत राहिली. आता सुसंस्कृतपणा म्हणजे काय याचे उत्तर गुंतागुंतीचे आहे. पण त्याचे नाते परस्पर सामंजस्याशी जोडता येईल, आणि सामंजस्याचा विचार केला तर आपल्या भागातील स्थिती आशादायक नाही. समाजाचे एकत्व स्वरूप आता हळूहळू नष्ट होऊ लागले आहे. समाजाशी असलेली व्यक्तीची बांधिलकी क्षीण होत आहे. सामाजिक जबाबदारी झिडकारणे सोपे झाल्यामुळे समाजाची पर्वा करायची मला जरूरीच काय ही अहंगंडाची भाषा आता माणसांच्या तोंडून येत आहे. आपल्यातील संपन्न वर्ग समाजातील आपली जबाबदारी झटकून टाकतो आहे. दुसरा वर्ग हातात पैसा नसल्यामुळे वैफल्यग्रस्त आहे. आणि या वैफल्याला जबाबदार म्हणून समाज त्याच्या लेखी अपराधी आहे. म्हणजे आपण सोडून उरलेला समाज प्रत्येकाला खापर फोडण्यासाठी तेवढा उपयोगी राहिला आहे. संपन्न वर्ग आणि वैफल्यग्रस्त दोन्हीतील ही खदखद म्हणजेच ही अस्वस्थता आहे.
संपत्तीला वाट देण्याचे काम श्रद्धा करते. विज्ञान खेड्यांपर्यंत अर्धवट पोचले आहे. त्यामुळे आपण आजपर्यंत जे करत आलो ते चुकीचे, इथंपर्यंत ज्ञान त्यांना झाले आहे. पण आपल्या अडचणींवर मात करणाऱ्या विज्ञानाशी त्यांची फारशी ओळख नाही. माणसांना संकटात किंवा संतुष्टपणात श्रद्धेचा आधार हा अतिशय महत्वाचा भाग आहे. प्रत्येक चांगल्या गोष्टीवर जागृतीच्या नावाखाली शेणफेक फार झालेली असल्यामुळे माणसांची श्रद्धा अपंग झालेली आहे. माणसांच्या चांगुलपणावर विश्वास नाही. धर्म इतका बदनाम झालेला की अधर्माची वाढच प्रतिष्ठेकडे नेणारी ठरते आहे. विज्ञानावर श्रद्धा ठेवण्याइतके ज्ञानच नाही. करतो ते जमावाचे लांगुलचालन. त्यामुळे नेत्याचा धाक नाही. राजकीय अस्थिरतेमुळे कायदाच संरक्षण मागतो आहे. या परिस्थितीमुळे माणूस आता एकाकी बनतो आहे. चेष्टेचा विषय बनलेल्या समाजकर्त्यांनी या गोष्टींवर उपचार करायचा आहे. शिक्षणाशिवाय प्रगती नाही ही गोष्ट उमजते आहे. पण प्रगती करणारे शिक्षण आज मजबूत पायावर उभे नाही. जे मिळते आहे ते अर्धवट, म्हणूनच जास्त धोकादायक आहे.
या सगळया गोष्टीमुळे आपल्याकडे संपत्तीचा धूर निघतो आहे पण डोळयांना झोंबण्याची पीडाच त्यामुळे निर्माण झाली आहे. समाजाचे सुखच दुखू लागले आहे. ग्रामीण भागात हिंडताना या गोष्टींचा विचार करून खिन्न झालेली बरीच मंडळी भेटतात. काही करण्याची त्यांना  इच्छा आहे पण एकाकी असल्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना अपयशाला सामोरे जावेे लागते आहे. गावोगावी विखुरलेल्या या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी परस्पर संपर्क वाढविण्याची गरज आहे. या कार्यकर्त्यांना आवाहन आहे की, त्या दृष्टीने एकत्र येऊया, `आपले जग' साधन म्हणून उपलब्ध करून देताना आनंदच वाटेल.
-(आपले जग २२-११-१९७९)

घटका गेली पळेे गेली,  तास वाजे झणाणा।।
गेला क्षण परत येत नाही, गेलेली वेळ परत येत नाही. त्यामुळं जे काही करायचं ते आज -आत्ता करावं असं म्हणतात. जो माणूस कोणतीही गोष्ट ताबडतोबीनं करतो, त्याला मोकळा वेळ मिळतो असं नाही. त्याच्यापुढं आणखी आणखी काम वाढत जातं. परंतु नियोजन नीट करून ते जास्तीत जास्त सांभाळलं, तर मिळालेल्या मर्यादित वेळेत तोच माणूस भरपूर काम करू शकतो. सर्वांत व्यस्त माणसाला काहीही करण्यास वेळ  मिळू शकतो (बिझिअेस्ट मॅन हॅज् अ टाआीम फॉर अेव्हरीथिंग) हे तर आपण सर्वत्र पाहतो. आपल्याला अंघोळ करण्यासही वेळ मिळत नाही, मग बागकाम, वाचन, काही सामाजिक कार्य, अथवा सभा-भाषणं यांना कुठून वेळ मिळणार? परंतु त्याच वेळी अेखादा परिचित हे सगळं करत असतो. `त्याला कसा काय बुवा वेळ मिळतो?' -किंवा, `त्याला काय काम असतंय, रिकामाच तर असतो' - या प्रकारचं समर्थन आपल्या सोयीला येतं.
अेक गोष्ट पक्की आहे की, प्रत्येकाला देवानं दिवसाचे २४ तासच दिलेले आहेत. कोणीतरी जास्त काम करतोय, तर त्याला जरा दोन तास जास्तीचे मिळतात... असलं काही होत नाही. मग आपल्यापेक्षा वरचढ काम करणारे वेगळं काय करतात? ते जे करतात ते नियोजनबद्ध असतं, म्हणून ते तितकाच वेळ अधिक चांगला किंवा क्रियाशीलतेने वापरतात. अेका प्रवचनकारानं म्हटलं, `देवाचं नामस्मरण करण्याला वेळ मिळत नाही असं कितीतरी लोक सांगतात; -पण निदान स्वच्छतागृहात निवांत बसता, तिथंसुद्धा नाम घेतलं तरी देवाला चालतं. तुम्ही ठरवा तर खरं!!' कित्येक  सभ्य लोकही असं सांगतात की, त्यांना अुत्तम काही कल्पना `तिथं' सुचतात. काहीजण वृत्तपत्र वाचनाचं काम तिथं करतात. गांधीजींच्या स्वच्छतागृहाशी पुस्तकांचं अेक फडताळ असायचं. तात्पर्य असं की, `तो' वेळसुद्धा वाया जाअू न देण्याशी मतलब! प्रवासात चांगल्या पुस्तकांचंं वाचन करता येतं. पेपर तपासणं, टिपणं काढणं, भाजी निवडणं, मोबाआीलवरचे संदेश काढून टाकणं, नखं कापणं..... असं कितीतरी करता येण्याजोगं आहे. आपल्याकडं गाड्या अुशीरानंच येतात, त्यामुळं खोळंबून राहावं लागतं. तो वेळ वायफळ बडबड, नको ती निरीक्षणं, किंवा व्यवस्थेबद्दल चडफड करणं यांत दवडला जातो. सामाजिक कार्य म्हणून, या व्यवस्थांचा तेवढ्या काळात अभ्यास करून योग्य तक्रारी व सूचना लिहून पाठविणं हे काम तर फार मोठा परिणाम साधतं.
आणखी अेक निरर्थक बाब आपला वेळ अकारण खर्च करते. कोणतीही वस्तू जाग्यावर आणि नीटनेटकी ठेवली तर आपल्या हातून जास्त काम होते. कितीतरी वस्तू आपल्या वेळेत चांगल्या स्थितीत हव्या असतात. त्या शोधण्यात खूप वेळ जातो, त्याबद्दल जीव कातावतो. त्यामुळं मन:शांती ढळते, सरावाचे कामही चुकीचे होते. तेच तेच काम पुन्हा करावे लागते. यांत कितीतरी वेळ खर्च होतो. त्या तेवढ्या वेळेत चौपट काम आपणच करू शकलो असतो, हेही आपल्याला जाणवते. आपण कचरासुद्धा नीट जागेवर टाकला तर केर काढण्याचे काम फार कमी वेळेत संपते. अेकाद्या शाळेत कमालीची स्वच्छता दिसते, तिथे कोण झाडलोट करतं? -शिपाआी? शिक्षक? मुलं? पालक? यातल्या कुणीही प्रयत्न केले तरी आितका परिणाम साधणार नाही. खरं कारण हे असतं की, तिथली मुलं घाण करतच नाहीत. अस्वच्छता पसरूच दिली नाही तर केर काढण्याचा प्रश्णच कमी होतो. आपल्या घरात कधी हातोडी चटकन् मिळाली असं होत नाही. ती मिळाली तर ठोका घालण्याचं काम फार थोडकं असतं. हातोडी जाग्याशी ठेवणं हा जास्त काम करण्याचा मार्ग असतो.
वेळेची किंमत ज्याला कळते, तो त्याच वेळेचा खूप चांगला अुपयोग करू शकतो. वायफळ गप्पा, अनावश्यक कामं, आळस, लोळणं, मनोरथ करीत राहणं यांत बऱ्याच जणांचा वेळ वाया जातो. स्वत:साठी, कुटुंबासाठी, समाजासाठी, देशासाठी काही करायचं असेल तर फुकाच्या चिंता, ताणतणाव, अथवा नसती धावपळ यांतून वाचलं पाहिजे. त्यासाठी काही अुपाय शहाण्या लोकांनी सुचविलेले आहेत-
आपल्या कामांची आखणी नियमितपणे करावी. ती आखणी आपल्याला अनुकूल असावी. आपल्याला ती आखणी अंमलात आणणं शक्य व्हावं, अशी असावी.
आपल्याला नक्की ठाअूक असावं की, आपल्याजवळ नेमका वेळ आहेे किती? जेवणखाणे, झोप, खेळ, रंजन, भेटीगाठी यांसाठीसुद्धा नेमका वेळ ठरवून घेता येतो. आितकेच नव्हे तर आवश्यक त्या विश्रांतीलाही महत्व असते. अेकसारखं सतत तेच ते काम आपण करू शकत नाही. विश्रांतीच्या वेळीही काही वेगळं करता येतं.
तात्पुरती, अल्पकाली, आणि जास्त कालावधीची अशी वेगळी अुद्दिेष्टं ठरवून घ्यावीत. सहा महिन्यांपर्यंतची योजना ठरवून घेता येते, ती अंमलात आणता येते.
आपले प्राधान्यक्रम ठरवावेत. सगळं करावंसं वाटतं, काहीच होत नाही; -अशी वेळ यायला नको!
जागेपणीच्या पूर्ण दिवसाचा नीट विचार करून, आपण जेव्हा जास्त काम करू शकतो तो वेळ नक्की करावा. सकाळी कामाचा अुत्साह चांगला असतो. सूर्योदयानंतर लवकरात लवकर जितके काम अुरकते, तितके संध्याकाळच्या वेळेस होत नाही, हे सत्य आहे.
कामांची घाआी खूपदा असते, पण घाआीत केलेले काम चांगले होत नाही, ते वाढू शकते. शिवाय घाआीमुळे मानसिक ताण वाढतो, त्यामुळे तितक्याच कामाची जास्त थकावट येते. स्वाभाविकच आपल्या हातून चार कामे होण्याअैवजी तीनच होतात. स्वस्थपणी मजेत काम केले तर लवकर थकवा येत नाही. आवश्यक ते काम आधी केले तर ते `तातडीचे' होतच नाही.
आितरांची मदत घेण्याजोगी खूप कामे असतात, अशा कामांची वेगळी यादी करून त्या मदतनिसाच्या वेळेनुसार त्याची वेळ आखणी करावी. त्याची वाट बघत राहण्यात वेळ फुकट जाअू नये. आितरांची मदत नेमकी वापरता यावी. जे काम आपला कोणीही सोबती करू शकतो, तेच काम आपण शक्यतो करू नये. तथापि त्या कामाचा आपल्यापुरता सराव ठेवावा.
आज जे काम करण्याचे ठरविले असते, ते रात्रीपर्यंत पूर्णच करावे. काम साठत गेले की ते ज्यास्त वेळ खाते. ताण वाढवते. वेळेतच काम केले तर ते कमी वेळेत होते.
दीर्घकालीन कामे ठरविलेली असतात, त्यांची वाटणी करून त्यास तुकड्या-तुकड्यांनी वेळ द्यावा. ज्या त्रुटी लक्षात येतात, त्यांचा निपटारा करावा. वेळेत बसत नसतील अशी कामे बाजूला करावीत. काही माणसं अचानक टपकतात, आणि आपला कामाचा वेळ खातात, त्यांना कटविता यायला हवं; त्यांची क्षमा मागावी. आवश्यक तर त्यांच्यासाठी दुसरी वेळ लगेचच ठरवून घ्यावी. फोनवरील संभाषणही हल्ली वेळेच्या दृष्टीनं विचारात घ्यायला हवं. कमी बोलण्यातून जास्त वेळ कामासाठी अुपलब्ध होअू शकतो. फेान सोयीसाठी असतो, गैरसोयीसाठी नाही. आपणही कुणाकडे वेळ ठरवून गेलो तर कमी वेळेत जास्त काम होते.
हे सांगत बसण्यातही बराच वेळ गेला, पण तो कामी यायचा असेल तर आपणच मनावर घ्यावं!!
    ***

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन