Skip to main content

15 & 22 April 2019

उदारमतवादी  हिंदू  विचार
भारतातले बहुसंख्य लोक हिंदू आहेत. हिंदू हा रिलिजन या इंग्रजी शब्दाच्या अर्थाने `धर्म' नाही. सुप्रीम कोर्टाने हिंदू हा धर्म नसून जीवनपद्धती आहे, असा निर्णय दिला. धर्म या संस्कृत शब्दाचा अर्थही रिलिजन या शब्दापेक्षा वेगळा आहे. आपण सहजपणे म्हणतो, `सुगंध देणे हा फुलाचा धर्म आहे!' याचा अर्थ धर्म म्हणजे सहजपणे आणि नैसर्गिकरित्या वागणे असा आहे. आपल्याकडे देवांची अनेक रूपे आहेत, अनेक तीर्थक्षेत्रे आहेत आणि अनेक धार्मिक ग्रंथ आहेत. याचाच अर्थ असा की, आपल्या धर्मात कशा प्रकारे देवाची पूजा करावी, अध्यात्माचे पालन कसे करावे, याचे संपूर्ण स्वातंत्र्य आहे. तसेच या धर्मामध्ये सहिष्णू आणि उदार विचारांची परंपरा आहे. त्यामुळे एकपत्नी व्रताचे पालन करणारा रामही आापला देव आहे, आणि युद्धानंतर एका विशिष्ट परिस्थितीत हजारो स्त्रियांचा पती होणारा कृष्णही आपला देव आहे. आपण आपल्या देवाला वेगवेगळया प्राण्यांच्या आणि झाडांच्या रूपातही पाहतो, त्यांचीही पूजा करतो. तसेच आपण दुसऱ्या धर्माचा आणि पूजा पद्धतींचा आदरही करतो. कारण आपल्याला आपल्या धर्मानेच तसे शिकवले आहे.
िख्र्चाश्ॅनिटीसारख्या `बिलिव्हर आणि नॉनबिलिव्हर' आणि इस्लामसारख्या `मुस्लिम आणि काफर' यांसारख्या भेद करणाऱ्या संकल्पना आपल्या धर्मात नाहीत. उलट आपण `सर्वेपि सुखिन: सन्तु' म्हणजे `प्रत्येकजण सुखी होऊदे' अशी प्रार्थना करतो. सहिष्णू, उदारमतवादी म्हणून हिंदू विचारधारा ओळखली जाते.
पण सध्या एक असा विचारप्रवाह समाजात निर्माण झाला आहे, तो असे सांगतो की, `आपली सहिष्णुता आणि आपला उदारमतवाद हा आपली कमजोरी होऊन बसले आहेत. आपल्या सहिष्णुतेचा दुसऱ्या धर्माचे लोक, देव न मानणारे नास्तिक आणि पाखंडी लोक गैरफायदा घेत आहेत. ते आपल्या धर्मात ढवळाढवळच नव्हे तर काही वेळा अतिक्रमणही करत आहेत. उदाहरणार्थ दर गणेश चतुर्थीला कुणीतरी कोर्टात जातो आणि गणेश विसजर्नामुळे प्रदूषण होते अथवा विसर्जनाच्या मिरवणुकीतला आवाज जास्त झाल्याचा लोकांना त्रास होतो अशी याचिका दाखल करतो. मग कोर्ट आपल्या सणांवर बंधने घालते. तसेच उदाहरण शनीशिंगणापूरचे किंवा शबरीमालाचे दिले जाते. या बाबतीतही लोक कोर्टात गेले आणि कोर्टाने महिलांना या देवळात प्रवेश द्यावा असा निकाल दिला. तसेच आपल्या देवादिकांवर आणि संतमहात्म्यांवर अनेक तऱ्हेची चांगली -वाईट पुस्तके लिहिली जातात. त्यामुळे आपणही आता कडक आणि कठोर झाले पाहिजे. जो कुणी आपल्या धर्माबद्दल बोलेल, त्यात ढवळाढवळ करेल, किंवा त्यातल्या गोष्टींना विरोध करेल त्याचा आपण कडाडून विरोध केला पाहिजे. मोर्चे काढून, आंदोलने करून आणि गरज पडल्यास हिंसा करूनही अशा लोकांना विरोध केला पाहिजे; आपण रूढी परंपरांचे पालन केले पाहिजे.'
हा विचार नुसताच चुकीचा नाही तर तो घातकही आहे. सध्या जे तथाकथित हल्ले आणि आक्रमणे हिंदू धर्मावर चालली आहेत असे काही लोकांना वाटते, त्यांना ही आठवण करून देण्याची गरज आहे की, आपल्यावर तीनशे वर्षे मोगलांनी आणि नंतर अडीचशे वर्षे ब्रिटिशांनी राज्य केले आणि त्यांनी हिंदू धर्माचा प्रभाव कमी करण्याचा खूप प्रयत्न केला. त्या काळात देवळे तोडली गेली, हिंदूंवर अत्याचार झाले; पण इतका मोठा काळ परकीयांकडून आक्रमण झेलल्यानंतरही हिंदू धर्म संपला नाही. इतकी वर्षे परकीय सत्ता असतानाही या देशातली बहुसंख्य जनता हिंदूच राहिली. आपले सगळे सण, देवीदेवता आणि आपल्या चांगल्या परंपरा वर्षानुवर्षे कायम राहिल्या. त्या मानाने सध्या जे लोक हिंदू धर्माला विरोध करताहेत ते फारच कमी शक्ती असणारे आणि कमी  संख्येत आहेत. त्यांच्या बाबतीत इतका विचार करण्याचीही गरज नाही. उलट, काळाप्रमाणे जर धार्मिक रूढी आणि परंपरेमध्ये बदल करण्याची गरज असेल तर ते आपण स्वत:च केले पाहिजेत. हिंदू धर्म हा लवचिक आणि कालानुरूप बदलणारा असल्याने आणि आपल्याकडे सुधारकांची एक मोठी परंपरा असल्याने आपल्यातील वाईट प्रथा, परंपरा आणि रूढी या नष्ट होत राहिल्या आहेत, ही तर अतिशय चांगली गोष्ट आहे. त्यामुळे आपला धर्म जास्त लोकाभिमुख होतो. हीच तर आपल्या धर्माची शक्ती आहे. विविधता, कालानुरूप बदलण्याची तयारी आणि सहिष्णुता यांमुळेच तर हिंदू धर्म कायम टिकला आहे. आपण आपली सुधारकी आणि उदार विचारांची परंपरा कायम ठेवली पाहिजे. आपल्याला या बाबतीत इतर धर्मातील कट्टरपणाचे किंवा हिंसेचे अनुकरण करण्याची गरज नाही. आपण आपल्या धर्माचे कालानुरूप श्रद्धेने पालन करूया आणि इतर धर्मांबद्दल सहिष्णुता बाळगूया. हाच आपल्या दीर्घकालीन हिताचा मार्ग आहे.
-संपादक-भाव अनुबंध, गुलबर्गा

 संपादकीय
आपण कुठेही कमी नाही
लोकसभेच्या निवडणुकीचे वारे जोरात वाहात होते, ते आता थंडावतील आणि नवे  सरकार भारताच्या केंद्रस्थानी  अधिकारावर  येआील. गेल्या साधारण दीडदोन महिन्यांत या राजकीय सामन्यामुळे आपले सामाजिक जीवन ढवळून निघाले हे तर खरेच आहे. सजीवांच्या  सामुदायिक जीवनासाठी काही अेक व्यवस्था असावीच लागते, कुणाला तरी  नेता करावे लागते. साऱ्यांनी कसे राहायचे, कसे वागायचे, कसे नांदायचे याचे काही नियम तयार होत असतात; आणि सारेजण ते  पाळतात की नाही यावर नजर ठेवावी लागते. ही राजकीय सत्ताव्यवस्था प्राणी जगातही असते. त्या जगातही सत्तांतर होत असते, अेखादा समर्थ नेता दीर्घकाळ आपल्या कळपाला किंवा थव्याला सुखी ठेवू शकतो. काहीजण शत्रूपक्षापुढे शरण जाअून पळही काढतात, काही मृत्युमुखी पडतात. माणसांतही हा सत्तासंघर्ष अटळ असतो.

माणसाच्या बाबतीत मनाने अेकत्व मानणाऱ्या समाजगटाचे अेक राष्ट्न् बनते, आणि साऱ्यांनी मान्यता दिलेल्या संविधानाप्रमाणे तिथे राज्य चालते. भारतात लोकशाही शासनप्रणाली लागू झाल्यास ६९ वर्षे झाली, आणि काही कानेकोपरे आणि ठसठसते अपवाद वगळल्यास ती प्रणाली निदान राजकीय बाबतीत तरी पूर्णत: रुजलेली आहे. आपल्या खंडप्राय देशाच्या सवाशे कोटि जनतेत अशी कोणतीही अेकसमान प्रणाली रुजणे हेही विशेष आहे, आणि त्याचे समाधानही व्यक्त होेणे आवश्यक आहे. पुष्कळांना आपल्या निवडणुकांचे गेले दोन महिने केवळ तिटकारा, वैताग आणि धुसफुस यांचा चिकुनगुनिया झालेला पाहायला मिळतो. प्रारंभी  किरकोळ वाटणारी  अंगदुखी आणि कणकण,  अंग सुजवून सांधे आखडून धरते आणि पुढे ती  सांधेआखड काही  महिने तशीच राहते. तेच डास या असंतुष्ट वैतागी जनांस चावल्यामुळे आपल्याकडच्या साऱ्या सामाजिक वातावरणास शिव्याशाप देण्यात त्यांचा बराच काळ वाया जातो. त्यांना होणाऱ्या त्या दुखण्याला आणि वेदनेला बाहेरचे जग कारणीभूत नसते, तर त्यांना तो चिडचिडा आजार झालेला असतो हे कारण असते.

पुष्कळांची समजूत असते की, आपल्याकडच्यापेक्षा पश्चिमेच्या देशांत लोकशाही फारच परिपप् आहे. ते लोक आपल्यापेक्षा खूप सुसंस्कृत सभ्य प्रतिष्ठित वगैरे आहेत. आपण त्या मानाने फार मागास, रानटी आहोत; सत्तर वर्षे झाली तरी आपल्यात काही फरक नाही. आपल्या निवडणुकांचा गोंधळ, वाहता पैसा, माध्यमांचा बुजबुजाट, प्रचाराची नीचांकी पातळी, तत्वनिष्ठांचा अभाव, मतांची खरेदीविक्री करणारी पद्धत.... अेकूणातच सारेच्या सारे गैरप्रकार! त्या मानाने परदेशांत -विशेषत: आिंग्लंड अमेरिकेत शंंात-सभ्य-निर्मोही वातावरण असते; सत्ताबदल झाला तरी,  -आपल्याकडे कोणी पोस्टमास्तर बदलून दुसरा रुजू व्हावा तितक्या सहज- निसर्गत: तो होत असतो!

असे काहीही नाही. दोन शतकांपूर्वी भारतात आिंग्रज शिरले आणि त्यांनी त्यांच्या राज्यविस्ताराच्या सोयीसाठी म्हणून ज्या गोष्टी राबविल्या, त्यांनाच आपल्या तत्कालीन शहाण्यांनी सुधारणांचा चमत्कार म्हणून स्वीकारले. आपण अेतद्देशीय लोक महामूर्ख, मागास, अपात्र वगैरे असल्याचे साक्षात्कार त्या काळच्या विद्वानांना पदोपदी होत असत.

अेक गोष्ट खरी आहे की, आिंग्लंडात वैज्ञानिक शोध लागले, -किंवा त्यांनी आितर जगातून ते चोरले, कसेही असो, -त्याआधारे जी औद्योगिक लाट आली त्यायोगे त्यांचे वर्चस्व जगभर प्रस्थापित झाले; आणि आपल्याकडे पात्रता व संपन्नता असूनही आपण आपल्या विस्कळीतपणामुळे मागे पडलो, गुलाम झालो. परंतु त्याचा अर्थ असा नाही की, येथे सारा जंगलीपणाच होता  आणि कायद्याचे शिस्तीचे सभ्यतेचे राज्य त्यांनी आपल्यास आणून प्रदान केले! अेखाद्या संपन्न नांदत्या भाऊबंदकीच्या वाड्यावर ठगांच्या टोळीने अतिक्रमण करून वरचष्मा गाजवावा तसा तो प्रकार होता. ती ठगगिरी आितकी साधली की, आपण आजही त्यांच्या व्यवस्थांचे गुणगान करीतच राहिलो आहोत. त्यांच्याकडे जे चांगलेच आहे, त्याचे गुण गाण्याला आक्षेप नाही; परंतु आपल्या घरांतून सारी घाण दलदलच माजलेली आहे हे मात्र अजिबात खरे नाही.

आपल्याकडच्या निवडणुकंाचे गेले दोन महिने डोळयासमोर आणलेे तर, त्यास अुत्सव म्हटले गेले ते योग्य आहे. अटीतटीने खेळला गेलेला तो सामना होता. विनोबांनी `निवडणुका खेळाव्यात' असे म्हटले होते. अशा कोणत्याही खेळाच्या सामन्यात आीर्षा असणारच. तिथे जल्लोष असणारच. क्रिकेटचे राहूद्या, परंतु हल्ली  हुतुतू चे सामने होतात त्यातही केवढा जल्लोष असतो. चिथावणी असते, चिडणे असते, डिवचणे असते, दुसऱ्याकडे पाहून मांड्या ठोकणे असते, खालच्या पातळीवर अुतरून बाचाबाची असते, आणि पंचांच्या पक्षपातीपणाबद्ल करवादणेही असते. तिथे दुसऱ्याला हरवून आपण अव्वल स्थान मिळविण्याची आिरेसरी असते, जास्तीतजास्त गुणांच्या फरकाने सामना जिंकण्यासाठी सर्वतोपरी शेवटपर्यंत तुटून पडावे लागते. शामच्या आआीप्रमाणे तिथे `दुसऱ्याच्या शरीराला किंवा मनाला  कुठे खरचटू नये हं शाम...' असे म्हणून कसे चालेल? तसे वाटत असेल तरीसुद्धा या धबडग्यापासून पूर्ण अलिप्त राहता येणार नाही, देशाचा नागरिक म्हणून आपल्याकडे पंचाची भूमिका दिली आहे. ती पार पाडण्यासाठी मतदान तरी केलेच पाहिजे. ते करण्यासाठी निवडणुकांच्या पाठच्या अुभय भूमिकांचा अभ्यास करावा लागेल. हा पूर्ण सामना त्यातली अटीतटी बाजूला ठेवून निरखावा लागेल. परदेशात वेगळे चित्र नाही, आपल्यापेक्षा कणभरही सरस नाही, याची खात्री बाळगली पाहिजे.

अमेरिकेच्या राष्ट्नध्यक्षपदासाठी ट्न्ंप आणि हिलरी क्लिंटन यांचा सामना झाला, त्याच्या प्रचारात अेकमेकांचे स्त्री-पुरुषपण विसरून आपल्यापेक्षा हीन पातळीचे आरोप होत राहिले. आापल्याकडे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही  हल्ली महिला असतात; परंतु कुठे असली पातळी गाठल्याचे दिसणार नाही. सोनियाजी, स्मृतीजी, अथवा योगी- कुणीही असतील, त्यांचा भारतीय सन्मान ठेवला जातो हे आपले श्रेष्ठत्व आहे. अमेरिकेतही मतदान प्रमाण आपल्याआितकेच आहे. कालच्या फेरीत मणीपुरात ८२ टक्के मतदान झाले हे कमी नाही.  पैसे भरण्याचे प्रकार तिकडेही चालतात. मतदान `मॅनेज' करण्याची कामगिरी ट्न्ंपनी रशियातल्या काहीजणांस दिली होती हा आरोप चालू नाही काय? इथे पैसे वाटले जातात हे खरे असेल तर ते स्वीकारणारे कोण आहेत?  -जे लोक `आमच्याकडे रस्ते झालेले नाहीत, गटारे अस्वच्छ आहेत' असली भाकड रडगाणी गातात ते कधी या पैसे वाटपाची चौकशी करतील काय?

आिंग्लंडमधल्या लोकशाही पद्धतीचा फार गवगवा केला जातो. युरोपीय समूहातून बाहेर पडावे का, असा प्रश्ण घेअून तिथे सार्वत्रिक मतदान घेतले तेव्हा तिथले जाणकार वर्ग अलिप्त नव्हे तर अुदासीन राहिले आणि समुदायातून बाहेर पडण्याला (अल्पमताचा) कौल मिळाला. हा लोकशाही प्रक्रियेचा निर्णय अंमलात आणताआणता आता आिंग्लंडला आर्थिक कोंडी होऊन नाकी दम येणार आहे. अेके काळची महासत्ता आपल्यापेक्षा सभ्य, प्रतिष्ठित, अुच्च, वैज्ञानिक, बुद्धिमान, शूर वगैरे होती; तर ब्रेक्झिटच्या निमित्ताने ती आणखी  कंगाल होण्याला अपरिपप्  लोकशाही कारणीभूत नाही काय? -मग तिथल्या प्रणालींचे सतत गेाडवे गाण्याचे डोहाळे  आपल्याला कशासाठी ?  आिंग्लंडने जगावर राज्य करताना दमनशाहीचाच अवलंब केलेला होता, त्यांच्या लोकशाहीप्रेमाचे अुमाळे कुणी आणावेत?

आपले ते सारे चांगलेच, असे म्हणणे जसे चूक असते; त्याआितकेच आपले सारे  वाआीट म्हणणे चुकीचे आहे. आपण जगाबरोबर आहोत. जग माणसाप्रमाणेच स्वार्थी आहे, त्यात काही अमानवी नाही. आपली संस्कृती आणि आचारपद्धती आपली आहे. निवडणुका हा त्या सामाजिक आचारांचा भाग आहे. त्या अुत्सवाला अुगा नाके मुरडून `आपल्याकडे लोकशाही अजून तितकीशी रुजलेली नाही...' अशा सुतकी चेहऱ्याची विचारवंती  कळा चेहऱ्यावर आणण्याचे कारण नाही. या क्रीडामहोत्सवाचा आनंद खिलाडूपणानेच घ्यावा, जमत असेल तर खेळावेसुद्धा; पण त्यानिमित्ताने ओरडाआरडाही जमत नसेल तर पाहण्याचा आनंद घ्यावा. ज्याच्याकडे परस्पर जय-पराजयाची  जिगर नसेल त्याने स्वत:ला सर्वोदयी समजून स्थितप्रज्ञ राहावे; दुसऱ्यांना तेवढे चांगले म्हणून घरच्या म्हातारीला नावे ठेवण्याचे कारण नाही!!


परशुरामांची प्रतिमा सुधारूया
भगवान परशुराम हे श्रीहरी विष्णूचे सहावे अवतार, सप्तचिरंजिवांपैकी एक मानले आहेत. म्हणजे त्यांचे अवतारकार्य संपवून देखील ते अजरामर आहेत. मार्गदर्शन आणि विद्यादानाचे कार्य तपस्व्याप्रमाणे करीत आहेत. सहस्त्रार्जुनाचा संहार केल्यानंतर त्यांनी त्या युगातील सर्व आतताई राजांना दंड देऊन पृथ्वीवर परशुरामराज्य स्थापित केले होते. श्री परशुरामाने कामधेनूला आराध्य मानले.
परशुरामाने सहस्त्रार्जुनाचा संहार कामधेनूच्या अपहरणासाठी केला. राक्षसी वृत्तीचा नायनाट करून पृथ्वीला भयमुक्त केले होते. नंतर श्रीपरशुरामाने महर्षी कश्यप यांना गुरुदक्षिणा म्हणून संपूर्ण पृथ्वी (राज्य) दान करून टाकली होती. गुरुवर्यांच्या सांगण्यावरूनच त्यांनी पश्चिमेकडील समुद्र मागे हटवून कोकणक्षेत्र निर्मित केले. समुद्रातून ही भूमी वर आली त्या भूमीला सुपीक केले, नटविले. धान्य, फळे, फुले, वनस्पती निर्माण केली. सर्व जाती जमातींच्या लोकांना बोलावून तिथे वसविले. त्यांच्या सुख-सोयींसाठी  नद्या, तलाव निर्माण केले, मंदिरे निर्माण करून सर्व देवी-देवतांना सदैव वास्तव्य करण्याची विनंती केली.
हे सर्व विष्णूच्या सहाव्या अवताराने म्हणजे श्रीपरशुरामाने केले. अन्य कोणत्याही अवताराने असे आणि इतके लोककल्याणाचे विधायक कार्य केलेले नाही. या अजर-अमर कार्यामुळेच ते चिरंजीव आहेत. या अवताराबद्दल सामान्य जनतेला फारशी माहिती नाही. त्यांची जी प्रतिमा लोकांपुढे आहे, ती फक्त क्रोधाने उगारलेल्या परशुधारीची असून सदैव युद्धाच्या पावित्र्यात वाटते. बहुतांश लोकांत  त्यांच्याबद्दल गैरसमज आहेत असे आढळून येते.
ते एक महान ऋषीपुत्र होते. त्यांची मुद्रा सदैव प्रसन्न आणि तेजस्वी असायला हवी. त्यांनी अवतारकार्य संपवून एका ऋषीला साजेल असे रूप धारण करून विद्यादानाचे कार्य हाती घेतले. त्यांनी आपला परशु कैलास मानसरोवरात नेहमीसाठी बुडवून टाकला.
त्यांची जी प्रतिमा लोकांपुढे आहे, ती एका योद्ध्याची असून ही मुद्रा फक्त सहस्त्रार्जुनाचा संहार करण्याप्रसंगीची असेल. तेव्हा त्यांचे डोळे क्रोधाने लाल झाले असतील. परंतु ते लहानपणापासून अशीच मुद्रा ठेवून  वावरत असत का? ते धनुर्विद्या शिकण्यासाठी कश्यप ऋषींच्या आश्रमात होते. विद्या ग्रहण करताना ते काय रागीट असत का? मग त्यांची एकच प्रतिमा का मांडण्यात येते?
स्वघरी परतल्यावर ते आपले वडील आणि प्रथम गुरू महर्षी जमदग्नी यांच्यासोबत वेदपाठ व इतर शिक्षण कार्यात मदत करायचे. यज्ञ कार्यात सहभागी व्हायचे. ध्यानात बसायचे. त्यांचे असे विभिन्न रूप आपण लोकांपुढे मांडू शकतो. श्रीकृष्ण, हनुमान, आदींना वेगवेगळया स्वरूपात चित्रित करतो. अशी एखादी प्रतिमा, चित्र -ज्यामध्ये ते सर्वांना आशीर्वाद देत आहेत, का नाही मांडत? दुसरे, त्यांच्या लोककल्याणकार्याचा जास्तीत जास्त प्रचार-प्रसार करायला हवा. महत्वपूर्ण बाब म्हणजे विष्णूंनी एका ब्राह्मण कुळात जन्म घेऊन आततायी अशा एका बलाढ्य क्षत्रिय राजाचा संहार केल्यामुळे याच कारणाला धरून त्यांची प्रतिमा लोकांपुढे ठेवली. परशुराम फक्त ब्राह्मणांना पूजनीय वंदनीय आहे, हेच लोकांमध्ये बिंबवले. असे करून त्यांना फक्त गाभाऱ्यात  बंदिस्त करून टाकले. त्यांचे वडील ब्राह्मण होते पण त्यांची माता रेणुका ही क्षत्रिय वंशाची होती. त्यांनी कोकणक्षेत्र निर्मित करून सर्व जाती जमाती यांच्यासाठी सुखसोयी निर्माण केल्या. त्यांना फक्त ब्राह्मणदेवता दर्शविणे म्हणजे भगवान विष्णूंचा अपमान करणे आहे असे मला वाटते. ब्राह्मणाव्यतिरिक्त अन्य समाजातील लोकांना त्यांचे काही सोयरसुतक नाही? याच कारणामुळे, कोणाही तरुण युवकास परशुराम कोण होते असा प्रश्न केला तर तो अनभिज्ञता दर्शवितो. शालेय पुस्तकांमध्ये राम-कृष्ण, विष्णू, हनुमान यांच्या गोष्टी असतात; मात्र परशुरामाबद्दल ओझरता उल्लेखसुद्धा नसतो. रामायण, महाभारत, बायबल, कुराण यांवर अनेक ग्रंथ, पुस्तके, लेख उपलब्ध आहेत. मात्र भगवान परशुरामाबद्दल जुजबी माहितीसुद्धा कुणाला नसते. कोणाच्याच घरात त्यांचा फोटो किंवा क्रॅलेंडर नाही. देवघरात त्यांना स्थान प्राप्त होणे हे दुरापास्तच! हे बहुतेक त्यांच्या क्रोधमय चेहऱ्यामुळे  असेल, किंवा त्यांच्याबद्दल नकारात्मक प्रचारामुळे असेल. महाराष्ट्नत तर ठराविक मंडळींनी त्यांच्यावर जणू आपला मालकी हक्क गाजवून त्यांना सर्व हिंदू समाजापासून दूर केले आहे.
हे चित्र बदलावे असे वाटते. देशस्थ, कोकणस्थ, कऱ्हाडे, सी.के.पी. यांच्या पलीकडे जाऊन सर्व जाती जमातींना एकत्र घेऊन परशुरामांचा जन्मोत्सव करायला पाहिजे. याकरिता खूप मेहनत करावी लागेल. मनातील दुजाभाव, गैरसमज दूर करणे आवश्यक आहे. आपसात चर्चा आणि सामंजस्य करण्याची गरज आहे. परशुरामाबद्दल चुकीचे दाखले, चुकीचे शब्द, दंतकथा यांवर सखोल चर्चा करून ते कसे खोटे आहेत हे पटवून देण्याची गरज आहे. श्रीराम-कृष्णाबद्दलसुद्धा आक्षेपार्ह कथा आहेत, प्रसंग आहेत. त्याकडे दुर्लक्ष करून त्यांच्या उदात्त आणि  लोकभावनेसाठी केलेल्या त्यागाला महत्व दिलेच पाहिजे. परशुरामावर मातृहत्येचे लांच्छन लावण्यात येते. ते काही कपटी लोकांनी मुद्दाम रंगवून त्यांच्या लोककल्याणकारी कार्याला तिलांजली देण्यासाठी रचले असेल.  परशुराम हे कसे युगश्रेष्ठ अवतार आहेत हे पटवून देण्यासाठी प्रयत्न करायला हवा, असे मनापासून वाटते.
 -शरद गं.जोशी, 
    २३१४ लुनियापुरा, महू(इंदोर)४५३४४१
फोन-९३०३४८१५५८

ऋणानुबंध
`आपले जग' (एप्रिल २०१८)ने मामा फडके यांचे कौतुक केले. त्याचे लेखक श्री.भास्कर हरि फडके यांचा फोन नंबरही दिला होता. फोन केला. त्यांचे चिरंजीव श्री.शरद यांनी घेतला वडील ८४ वर्षांचे असून श्री.शरद यांनीच लेखाचे संपादन केले होते.
फोनवर श्री.शरद यांनी मामा फडके यांची माहिती दिली कुठे भेट शक्य होईल असे विचारल्यावर दहा मिनिटात ते माझ्या स्थानी (श्री कबीर मंदिर, संत कबीर रोड (बडोदा) येथे हजर) दोघांनाही आश्चर्याचा धक्का.
ते तरसालीत राहतात. माझ्याकडे तरसाली येथील संस्था `सेवातीर्थ'साठी २०० साबण आले असल्याने ते पोहोचते कराल का? असे विचारले. त्यांनी त्या संस्थेत तत्परतेने साबण पोहोचविले. काय योगायोगाने! शेवटी ते होतेच मामा फडके यांचे कुटुंबीय. सेवा कार्यासाठी वाहून  घेणारे!
श्री.शरद फडके यांचे आजोबा श्री.हरि फडके स्वत:च्या गावी (कुर्धे) विशेष अर्थार्जन होऊ शकत नसल्याने मूक-बधीर यांस शिकविण्याचे कौशल्य प्राप्त करून राजकोट (गुजरात) येथे सन १९४५ साली मूक-बधीर शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. स्वत:च्या तीन मुलांसह श्री.हरि फडके राजकोटलाच होते. श्री.शरद हरि फडके, वडील श्री.भास्कर फडके यांनी गुजरातमध्येच नोकरी केली. श्री.शरद फडके आता पक्के गुजराथी झाले आहेत. मामा फडके यांचा लोक(जन)सेवाचा वसा चालू ठेवला आहे.
श्री.मामा यांची आत्मकथा पू.बापुजी यांनी स्थापन केलेल्या `नवजीवन' प्रकाशनाने १९७४ साली छापली होती, ती अप्राप्य होती. तिचे पुनर्मुद्रण २००९ मध्ये झाले. त्याची एक प्रत श्री.शरद यांनी मला वाचावयास दिली आहे.
-सीताराम भास्कर डोंगरे, बडोदा     फोन-९२२७४१८१२६


भले बुद्धिचे सागर नाना असे नाही होणार ।
मर्दांनो हो, राज्य राखिले मनसुबीची तलवार ।।
नाना फडणीस 
नाना हे इतिहासातील प्रसिद्ध व्यक्ती. पेशवाईमधील साडेतीन शहाणे प्रसिद्ध होते. त्यांची कारकिर्द उत्तर पेशवाईत गाजली. निजामशाहीतील विठ्ठल सुंदर, पेशवाईमधील सखारामबापू बोकील आणि नागपूरकर भोसले यांचे देवाजीपंत हे लढवय्ये व राजकारणधुरंधर मुत्सद्दी होते. नाना फडणीस मात्र लढाईस उतरत नसत म्हणून त्यांना अर्धे मोजले जाई.
श्री.नाना फडणीस यांचे नाव बाळाजी जनार्दन भानू. यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांचे शिक्षण पेशवे कुटुंबातील मुलांबरोबर झाले. त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला; घराची  जबाबदारी अल्प वयात आली. वयाच्या १४व्या वर्षी पेशववाईचे कारभारीपद त्यांना प्राप्त झाले. थोरल्या माधवरावानंतर २५ वर्षे केवळ यांच्या बुद्धीच्या जोरावर मराठेशाही टिकून राहिली. लढायांचे नियोजन आणि अनेक सेनापतींस मार्गदर्शन करून त्यांनी लढाया जिंकून दाखवल्या. नानांचे खरे कौशल्य बारभाई कारकिर्दीत दिसून आले.
तत्कालीन भारतात मराठेशाहीच्या राजकार्यामुळे नानांचा परकीय लोकांशी म्हणजे इंग्रज, पोर्तुगीज, फे्रंच तसेच मुघलांशी राजकीय संपर्क होता. त्या लोकांच्या भाषा, वैज्ञानिक शिक्षण आणि इतर गुण आपल्या देशातील लोकांनाही उपयोगी व्हावे याकरता त्यांनी स्वत: शिकून पेशवे सरकारांसाठी खास प्रशिक्षकांची नेमणूक केली. हजरजबाबीपणा, चातुर्य, माणसांची उत्तम पारख यांकरता नाना ख्यातनाम होते. त्यांच्या चातुर्यकथा प्रसिद्ध आहेत. त्यांचा देवावर विश्वास होता, पण अंधश्रद्धांवर अजिबात विश्वास नव्हता.
त्यांचे राजकीय क्षेत्रातील नैपुण्य अलौकिक होते, त्याकरिता त्यांचे हेरखाते अतिशय दक्ष व चतुर होते. त्यांना नजरबाज, अखबारबाज म्हणत. दिल्ली बादशहाच्या दरबारातील सर्व घटना, अंत:पुरासह दोन-तीन दिवसांत पुण्यात कळत असत. जलद गतीने बातमी पोहोचविणाऱ्या हेरास बक्षीस दिले जाईर्. इंग्लंड, पॅरिस येथील घटनांची माहितीही आठ दिवसांत पुणे दरबारात येत असे.
नाना फडणीसांनी राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बांधकामे केली. स्वत:करताही मोठा वाडा बांधला, ज्याला `नाना वाडा'च म्हणत. तो शनीवारवाड्याच्या मागील बाजूस आहे. १७७४मध्ये हा वाडा बांधला. त्याआधी १७६९ साली खाजगी मालमत्तेतून श्री विष्णूचे मंदिर बांधले, त्याचे नाव बेलबाग मंदिर, ते पुण्यात बुधवार पेठेत आहे. शुक्रवार पेठेत एक लाखेचा वाडा म्हणून बांधला होता; काशी येथे दुर्गा घाटावर एक वाडा बांधला. पुण्यात `नाना पेठ' वसविली; तिची रचना उत्कृष्ट केली आहे. १७९० मध्ये `घोडे पीर' हा दर्गा बांधला. सदाशिव पेठ हौदावर श्री शंकराचे देऊळ बांधले. पुण्यात येणाऱ्या लोकांच्या राहण्याच्या सोयीकरता बुधवार पेठेत अनेक वाडे बांधले. पाण्याच्या सोयीकरता अनेक हौद बांधले. या सर्व बांधकामांचा उपयोग सामान्य जनतेला झाला.
कायगाव, टोंक, नेवासे, पंढरपूर, काशी अशा धार्मिक क्षेत्री वाडे, आणि नद्यांवर घाट बांधले. खोपवली येथे मंदिर व तलाव  बांधला. लोहगड येथे तळे खोदले. स्वत:च्या मूळ गावी वेळास येेथे श्री शंकराचे मंदिर बांधले आणि श्री दुर्गादेवी मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्याचप्रमाणे वेरूळ, कोपरगाव येथे वाडे बांधले. काशीजवळ कर्मनाशी नदीवर, फ्रेंच लोकांची मदत घेऊन पूल बांधला. पुण्यात शनिवारवाड्याची दुरुस्ती आणि सुशोभीकरणाचे काम करवून घेतले. गणेश पेठ वसविली.
१७६८-६९ मध्ये मेणवली येथे स्वत:करता वाडा बांधला. या वाड्याजवळच श्री विष्णू मंदिर आणि श्री शिव मंदिर बांधले. राजकारणातून निवृत्त झाल्यानंतर येथे वास्तव्य करण्याचे त्यांनी ठरवले होेते, पण तसे झाले नाही. नाना कलासक्त होते. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात चित्रसंग्रह होता, पोथीसंग्रह होता. निरनिराळया ठिकाणाचे नकाशे, भूगोलाच्या शिक्षणाकरता पृथ्वीचा गोल त्यांच्या संग्रहात होता. आकाश निरीक्षणासाठी त्यांनी ब्रिटिश लोकांकडून दुर्बिणी विकत घेतल्या होत्या. सवाई माधवरावांच्या काळात नाना फडणीसांनी चित्रशाळा आणि शिल्पशाळा स्थापन केल्या होत्या. सर चार्ल्स मॅलेट यांची मदत घेऊन व आपल्या देशातील तांबटांना प्रशिक्षण देऊन चित्रशाळा सुरू केली. तसेच श्री भगवत् गीता छापण्याचे कामही सुरू केले होते, पुढे राजकारणाच्या व्यापात ते बंद पडले.
नानांचे राजकीय महत्व जास्त होते. त्यांनी स्वत:चे शिक्के तयार करून घेतले होते व मोर्तब तयार केला होता. काहीवेळी पेशवे सरकारचा, तर काहीवेळी त्यांचा स्वत:चा शिक्का वापरला जाई. नाना फडणीस या व्यक्तीवर दिल्लीचा बादशहा अतिशय खुश होता, त्यांनी नाना फडणीसांना  दिल्लीत वजिराची नेमणूक करण्याविषयी आमंत्रण दिले होेते, पण स्वामीभक्त नानांनी ती विनंती नाकारली. बादशहाने त्यांना प्रेमाने चांदीचे कलमदान बक्षीस दिले, आणि त्यांना `कलम बहाद्दर' असे गौरविले. त्यावेळी बादशहा म्हणाला, `ऐसा वजीर अगर हमारे दरबार में होता, तो कितना अच्छा होता!'
मेणवली येथे नाना फडणीसांनी बांधलेला वाडा आजही सुस्थितीत आहे, तो लोकांना दाखविला जातो. वारस म्हणून आमचे तिथे अधूनमधून वास्तव्य असते. तिथे कृष्णा नदीवर अर्ध चंद्राकृती घाट बांधला. तसा घाट हिंदुस्थानात नाही. नानांची कीर्ती हिंदुस्थानात तसेच युरोप लंडनपर्यंत पसरली.
-वैशाली मोहन फडणीस,
बेलबाग,  बुधवार चौक, पुणे-०२
 फोन-९८८१६९५५६२

मिरजेतील लोणी बाजार
मी महाराष्ट्न्भर फिरलो आहे, पण मिरजेत पूर्वी भरणारा लोणीबाजार कुठे पाहिला नाही. कर्नाटकात जमखंडीस लोणी बाजार भरत असे, तिथेलोणी लगेच कढवून देत व मग दर ठरवून तुपाचे पैसे देत. मिरजेत दोन दिवस बाजार, मंगळवारी व बुधवारी. मंगळवारच्या बाजारात लोणी घेऊन येणाऱ्या दीड-दोनशे बायका लोणी घेऊन येत असत. १९४०-५० सालची मला आठवण आहे. यापूर्वीसुद्धा लोण्याचा बाजार भरत होता. शेतकऱ्यांच्या किंवा गवळयांच्या बायका अॅल्युमिनियमच्या किंवा पितळेच्या डब्यातून शेर दोनशेर लोणी आणत. आठवडाभर साठवलेल्या सायीचे ताक करून, लोणी एरंडाच्या पानांनी झाकून मटक्यातून किंवा डब्यातून विक्रीस आणत.
साधारण भरल्या घरी पुरण पोळी, गव्हाची खीरसुद्धा तूप घालून खात असत. सत्यनारायणाची पूजा, बोडण किंवा इतर सणाला पंगतीत तुपासाठी स्वतंत्र द्रोण दिला जायचा. हे तूप जेवता-जेवता गोठत असे. मिरजेत दास नवमीचा मोठा उत्सव संत वेणाबाई मठात होत असे. त्यावेळी गव्हाची खीर प्रसाद म्हणून, हजारभर माणसे जेवत असत. त्या सर्वांना द्रोणात तूप वाढले जात असे. आधी ४-५ मंगळवारच्या बाजारांतून खरेदी केलेल्या लोण्याचे हे तूप दासनवमीच्या प्रसादात वाढत. लग्न, मुंजी व इतर सणावारी तूप असे. मोदक, संक्रातीस गुळाची पोळी तुपाबरोबरच खाल्ली जायची.
तुळशीदास बुवाच्या मठाचे अधिपती छाटी नेसून, हातात कुबडी घेऊन, मठातील सेवकास बरोबर घेऊन लोण्याच्या बाजारात येत असत. तर्जनी लोण्यात घुसवून जेवढे लोणी येईल तेवढे आपल्या भांड्यात जमा करावयाचे, जमा केलेल्या लोण्याचे तूप करून मठात येणाऱ्या गोसाव्यांना जेवताना वाढत. मिरज संस्थानिकांनी तुळशीदास बुवाच्या मठाधिकाऱ्यांना असे लोणी घेण्याचे अधिकार दिले होते.
मिरजेच्या आजूबाजूची शेती मळेवाल्यांची होती. म्हशी-गायी पाळल्या जायच्या. मिरजेत ब्राह्मणपुरीत बरेच वाडे होते. त्या सर्वांची घरची शेती असायची; वाड्यामध्ये गोठा असायचा;  एक दोन गायी-म्हशी असणारच. त्यावेळी पशुधन बरेच असे. प्रत्येकाच्या घरी कडब्याच्या गंज्या असायच्या, दूध भरपूर प्रमाणात प्रत्येकाच्या घरी असे, शेती पिकायची. घरची गुरे चराईसाठी गुराखी घेऊन जात व संध्याकाळी गुरे घरी परत येत. सर्व गुरे सकाळी ११ वाजता भानूच्या वाड्याजवळील मोकळया जागेत जमवायची व तेथून चरण्यासाठी मारुती गुराखी व त्याची मुकी बायको माळरानावर घेऊन जात असे. एकदा पं.नेहरूंचे नातेवाईक आजारी असल्याने मिरजेच्या मिशन हॉस्पिटलमध्ये होते. पं.नेहरू डॉ.भडकमकरांच्या वाड्यात उतरले होते. ते चालत मिशन हॉस्पिटलमध्ये जात असताना, त्यांच्यामागून मिरजेतील ही पाळीव जनावरे गावाबाहेर चरण्यासाठी माळावर जात असताना, नेहरूंना पाच-दहा मिनिटे बाजूच्या दुकानात थांबावे लागले, असे तेथील वयस्कर नागरिक सांगतात.
लोणी खरेदी करताना पावट्याएवढे लोणी एका मनगटावर घ्यायचे व ते दुसऱ्या मनगटाने घासून वास घेत. वास खमंग आला की ते लोणी चांगले. नेहमी बाजारात लोणी आणणाऱ्या बायका नागरिकांना ठाऊक असत. गिऱ्हाईक ठरलेले असायचे. सहसा मिरजेतील स्त्रियाच लोणी घेण्यासाठी बाजारात जात असत. घरी लोणी आणल्यानंतर कढवण्यासाठी चुलीवर ठेवले जायचे. ब्राह्मणपुरीतील रस्त्यावर साजूक तुपाचा वास दरवळत असे. लोणी ९ ते १२ आणे पावशेर या भावाने मिळत असे. दर मंगळवारी लोण्याच्या दराची चर्चा बायका-बायकांमध्ये होत असे.
मंगळवारच्या बाजारात देशी  कोंबडीची अंडीसुद्धा शेतकरी आणत असत. अशी हजार-दीड हजार अंडी खरेदी करून व्यापारी मोठ्या शहरात पाठवत. बुधवारच्या बाजारात भाजीपाला, धान्य-कडधान्य येत असे. हंगामामध्ये पाती कांद्याच्या गाड्या येत असत. सध्या जसा वाळलेला कांदा सर्रास बाजारात मिळतो, तसा पूर्वी मिळत नसे. बुधवारच्या बाजारात विड्याची पाने व इतर भाजीपाला, कृष्णाकाठची वांगी भरपूर येत.
बुधवारच्या बाजारात उसाच्या बैलगाड्या येत. शेंड्यापासून बुडख्यापर्यंत अख्खा ऊस उभा करून विक्रीस ठेवत असत. अख्खा ऊस १ रुपयापर्यंत मिळे. ९ ते १० कांडी हा ऊस  पिवळा, व तोंडाने सोलून सहज खाता येत असे. आता हा मऊ ऊस मिळत नाही. रसाचे घाणे दिवाळीनंतर चालू व्हायचे. लाकडी चरक बैल किंवा रेडा फिरवीत असे. १ आणा २ आणे ग्लास असा दर  असायचा. होळी व हनुमान जयंतीस रसपानाचा कार्यक्रम असे. बरोबर आंबेडाळ असे. चैत्रातील गौरीच्या हळदीकुंकवाच्या कार्यक्रमात उसाचा रस भगिनींना दिला जायचा. मातीच्या घागरीतून हा रस घाण्यातून घरी पाठवला जात असे.
रोजंदारी कामगारांना बुधवारी त्यांची मजुरी मिळत असे. त्यामुळे बाजारात गिऱ्हाईक बरेच असे. परकर पोलक्यातील मुली व नऊवारी नेसणाऱ्या महिला आता दिसत नाहीत; तर जिन्सच्या पॅन्ट व पंजाबी ड्न्ेस घालून हिंडणाऱ्या महिला दिसतात. वाडे नष्ट झाले. चिंच, कडुलिंब, कवठ, जांभळाची झाडे तोडली आहेत.
आता ब्राह्मणपुरीच्या भागात वृक्ष नाहीत. उन्हाळयात श्वसनाचा त्रास होतो. वृक्ष लागवणीचा वनखात्याचा संकल्प ब्राह्मणपुरीत झाडे लावून पूर्ण करा, असे पत्र पाठवून मी विनंती केली होती. वनमंत्र्यांनी कार्यवाही करून आदेश दिले असता, महानगरपालिकेच्या कृषी अधिकाऱ्यांनी मला मुंबईत फोन करून, `ब्राह्मणपुरीतील नागरिक झाडे लावू देत नाहीत, आम्ही काय करू सांगा' असे म्हटले. मी कपाळावर हात ठेवले, आणि गतकाळाला नमस्कार केला.
डॉ.राम नेने, गोरेगाव(प), मुंबई
फोन- ९७६९६३२६३०

एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व
सतीश पटवर्धन यांचं मे २०१७ला निधन झाले. वर्ष झालं काळ धावतो, कुणासाठी थांबत नाही. पटवर्धनांचं व्यक्तिमत्व खूप वेगळं होतं. इंग्रजी विषय घेऊन १९६५ साली एम.ए झाल्यानंतर, आपल्याच गावात कॉलेज सुरू झाल्यामुळे ते कागवाड येथे इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, मराठीचे तितकेच प्रेम. साहित्य अगदी शेवटच्या क्षणापर्यंत वाचलं. निवृत्त झाल्यावरसुद्धा, वाचताना एखादा शब्द नवीन वाटला तर डिक्शनरी काढून पाहायचे. मुलगा, सून, नातवंडं यांनी कुठल्याही विषयातली शंका विचारली तरी, निरसन करायचे. माझी नातवंडं म्हणायची, `आजोबा तुम्हाला सायन्समधलं कसं काय कळतं हो?' त्यांनी संगीतही आयुष्यभर खूप ऐकलं.
कागवाड कॉलेजचे चेअरमन श्री सिद्धेश्वर स्वामीजी कॉलेजला भेट द्यायचे. एकदा म्हणाले की, `शिक्षकांची राहाणी साधी असावी.' तेव्हापासून पटवर्धन यांनी पँट-मॅनिला हा पेहराव बदलून, पांढरी विजार-शर्ट घालायला सुरुवात केली. सर्व केस काढून टाकले, गांधी टोपी धारण केली. या सर्व बदलाला विद्यार्थी कधीच हसले नाहीत.
परमार्थ अंगी बाणवलेले, सर्वांना समजून घेणारे, आई-वडिलांना कधीच न दुखवणारे, पत्नीलाही योग्य आदर देणारे, तिच्या सार्वजनिक कामात तिला पूर्ण सहकार्य देणारे माझे हे पती. आमचे सहजीवन ५० वर्षे सुखा-समाधानाचे होते. त्यांची उणीव सतत जाणवते; त्यांचं प्रेम, माणुसकीची शिकवण या बळावरच मी पुढचं आयुष्य जगते आहे. त्यांनी ज्ञान दिलंच पण मृत्यूनंतरही देहदान करून ते मेडिकलच्या विद्यार्थ्यांना उपयोगी पडले!

-जयश्री पटवर्धन विनायक बंगला, कागवाड(अथणी)
  फोन- ७४०६९८३२७३


अहमदनगरचा आगळा गुढीपाडवा
अहमदनगरच्या कै .जानकीबाई  आपटे ह्या सक्रिय कार्यकर्त्या व स्वातंत्र्यसैनिक होत्या. दोन वेळा त्या कारावासातही होत्या.
१९३८ मध्ये त्यांची नगर शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. त्यांनी २६ मार्च १९३८ रोजी स्वत:च्या सहीने एक पत्रक प्रसिद्ध करून नगरकरांना जाहीर आवाहन केले, `` येत्या गुढीपाडव्याच्या दिवशी लोकांनी आपापल्या घरी गुढी उभारताना सोबत तिरंगी झेंडाही उभारावा. आपल्याला स्वातंत्र्याची गुढी उभारायची आहे ह्याचे स्मरण ठेवावे.'' विशेष म्हणजे ह्या नावीन्यपूर्ण व देशभक्तीच्या आवाहनास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरात गुढीबरोबर राष्ट्नीय ध्वज उभारण्यात आले. अर्थात काही विशिष्ट भागात भगवे ध्वजही उभारण्यात आले.
विशेष महत्त्वाचे म्हणजे स्वत: जानकीबाई आपल्या घरी (पटवर्धन वाडा) स्वातंत्र्य मिळेपर्यंत वर्षानुवर्षे हीच प्रथा निष्ठेने अंमलात आणीत व वाड्यातील स्त्री-पुरुष, मुलं बोलावून झेंडावंदन करीत.
- भालचंद्र आपटे, अहमदनगर, (फोन-०२४२-२४२६६२६७)



श्यामलाबाई भागवत
१३ फेब्रुवारी १९१९ रोजी पुण्यात श्यामलाबाइंर्चा जन्म झाला. त्यांचे वडील इचलकरंजी येथे संस्कृत शिक्षक, साने गुरुजींचे जिवलग मित्र होते. पुणे येथील बी.जे.मेडिकल कॉलेजमधून श्यामलाबाइंर्नी एल.सी.पी.एस. डिग्री सुवर्ण पदकासह मिळवली.
आचार्य भागवतांचे बंधू श्री.आत्मारामपंत यांचेशी त्यांचा विवाह झाला व हुबळी येथील `वुमेन्स हॉस्पिटल' मधे स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून त्यांनी काही वर्षे काम केले. त्यानंतर त्या घटप्रभा येथे कर्नाटक आरोग्यधामात आल्या. अखरेच्या श्वासापर्यंत तिथेच त्या कार्यरत राहिल्या.
`डॉक्टरला बारा बलुतेदार व्हावं लागतं' हे त्यांचं आवडतं  वाक्य. त्या स्त्रीरोगतज्ज्ञ होत्या. विशेषत: अवघड फोरसेप्स् डिलीव्हरी करण्यात त्यांचा हातखंडा होता. वेळप्रसंगी ऑपरेशन व सिझेरियनही करत. नर्सेसना हा विषय त्या शिकवत आणि त्या विषयाचे पुस्तकही त्यांनी लिहिले. १९७० च्या सुमारास त्यांनी दंतचिकित्सा शिकून घेतली व मुंबईला जाऊन त्यात प्रावीण्य मिळवले. काही प्रसंगी भूलतज्ज्ञ म्हणूनही त्या काम करत.
हीच कामाची उमेद खाजगी आयुष्यातही होती. त्या एकट्या राहात. गाणी लावून ऐकत ऐकत रोजचा स्वयंपाक, साफसफाई, बागकाम करीत. आयुष्यभर त्यांनी सायकल वापरली. संस्थेने ल्यूना देऊ केली, तरी त्यांनी ती परत केली.
त्यांच्यावर विनोबाजी आणि गांधीजींचे  संस्कार होते. अफाट वाचन, संस्कृतचे गाढ ज्ञान, श्लोक व म्हणींचा चपखल वापर त्या करीत. तेवढ्याच विनोदबुद्धीच्या होत्या. त्यांची नुसती विचारांची बैठक नव्हती तर आचारही तसाच होता.  मोजून चार साड्या. एक नवीन साडी घेतली अथवा कोणी दिली, तर आधीची एक कुणालातरी देऊन टाकायच्या - पण घरात साड्या चारच!.  संस्थेने दिलेली वेतनवाढही त्यांनी स्वीकारली नाही. त्यांनी ती स्वीकारून परत देणगी म्हणून संस्थेला द्यावी, असे त्यांना सुचवण्यात आले. यावर त्यांनी `मी दानापेक्षा त्याग श्रेष्ठ समजते.' असे म्हटले.
१३ फेब्रुवारी २०१९ रोजी त्यांची जन्मशताब्दी झाली.  कर्नाटक आरोग्यधाम या संस्थेच्या वाटचालीत, तसेच विचारधारेत त्यांनी एक महत्वाची भूमिका साकारली. नवीन पिढीला त्यांच्या कर्तृत्वाची ओळख व्हावी. या निमित्ताने हे स्मरण

भारतातील पहिली आगगाडी...
१६ एप्रिल १८५३ रोजी मुंबई ते ठाणे या ३४ किमी मार्गावर १४ डब्यांची पहिली रेल्वे गाडी चालवली गेली. ही गाडी ओढण्यासाठी साहिब, सिंध आणि सुलतान या नावाची तीन वाफेची इंजिने जोडली होती. या गाडीच्या पहिल्या वहिल्या प्रवासासाठी अख्ख्या भारतातून चारशे मान्यवर मुंबईला आले होेते. या गाडीला मानवंदना देण्यासाठी २१ तोफांची सलामी देण्यात आली होती.
आगगाडीची कल्पना प्रगतीपथावर नेणाऱ्या ध्यासापायी ग्रेट इस्टर्न कंपनीची स्थापना नाना शंकरशेठ यांनी १८४३ साली केली. कंपनीचे कार्यालय गिरगावातील नानांच्या वाड्यात होते. नानांच्या दहा वर्षाच्या अथक प्रयत्नांमुळेच १६ एप्रिल १८५३ दिवशी आशिया खंडातील पहिली रेल्वेगाडी धावली. उद्घाटन सोहळयाला प्रमुख पाहुण्यांचा व त्यामधून प्रवास करण्याचा मान हा इंग्रजांनी नानांना दिलाच, त्याशिवाय प्रथम वर्गाचा सोन्याचा पास देऊन त्यांचा सन्मानदेखील केला. तेव्हापासूनच नाना शंकरशेठ यांना `भारतीय रेल्वेचे जनक' म्हणून ओळखले जाऊ लागले. मध्य रेल्वेच्या मुख्य कार्यालयाच्या (सीएसटी) प्रवेशद्वाराच्या भिंतीवरील नाना शंकरशेठांचा पुतळा त्याची साक्ष देतो.
१६ एप्रिल १८५३ रोजी मुंबईकरांचा गोंधळ उडाला होता. आज ते एक चमत्कार पाहणार होते. आपापल्या दर्जानुसार लोक गाडीत बसले होते. नामदार यार्डली, जज्ज चार्ल्स जॅकसन तसेच नाना शंकरशेठ ही मंडळी उपस्थित होती. दुपारी ३.३०वाजता तोफांची सलामी देण्यात आली. गार्डने शिट्टी वाजवून हिरवा बावटा दाखविल्याबरोबर त्या तीन इंजिनांनी कर्णभेदी भोंगे वाजवले. इंजिनांच्या धुरांचे लोळ दिसत होते. काळे पोशाख घातलेले खलाशी इंजिनाच्या पोटात, फावड्याने कोळसा आगीत लोटत होते. ती गाडी चक्क चालू लागली. लोक बोलू लागले की, इंग्रजांचा राजा देवाचा अवतार, ते अद्भुत दृश्य पाहून लोकांनी हात जोडून लोटांगण घातले. गाडीचा वेग, शिट्ट्यांचा आवाज याने लोक भयचकित तर झाले. एकीकडे लष्करी बँडही वाजत होता. हे अजब यंत्र लोकांना चमत्कार वाटत होता.
बोरीबंदर ठाणे हे २१ मैलांचे (३४ किमी) अंतर कापायला गाडीने १ तास १८मिनिटे घेतली. गावागावात लोक स्वागताला तयार होते. भायखळयाजवळ मोठी गर्दी जमली होती. लोक दाटीवाटीने गच्चीवर, डोंगरावर उभे राहून या चमत्काराला नमस्कार करत होते. ४.५८ वाजता गाडी ठाणे स्टेशनवर पोहोचली. ठाण्यात शामियाना उभारण्यात आला होता. ठाणे रेल्वे स्थानकावरही लोकांनी गर्दी केली होती. पाहुण्यांना शाही मेजवानी देण्यात आली. तेथे प्रतिष्ठितांची भाषणे होऊन ६.३० वाजता ठाणे सोडून आगीची गाडी बोरीबंदर स्टेशनावर पोहोचली. कोणत्याही चमत्काराला देवत्व बहाल करणाऱ्या भारतीयांनी या गाडीचे नामकरण केले, `चाक्या म्हसोबा.'  पहिल्या रेल्वे गाडीला चौदा डबे होते. तिसऱ्या वर्गाचे डबे फारच गैरसोयीचे, त्यात बसण्यासाठी बाकेच नव्हती. प्रवाशांना उभे राहूनच प्रवास करावा लागत होता. खिडक्याही इतक्या उंचीवर होत्या की, प्रवाशांना उभे राहिल्यानंतरही खिडकीतून बाहेरचे दिसत नसे. त्यामुळे या गाडीला `बकरा गाडी' असे संबोधले जात असे.
संकलित -प्रसाद जोग, सांगली  फोन-९४२२०४११५०

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन