Skip to main content

7 Feb. 2019

जुने, जुनाट, की पोक्त
आपसूक पडलं न् दंडवत घडलं! -अगदी इतक्या सहज ही चाळीशी मागे पडली नाही, आणि `बुद्ध्याचि वाण धरिले करि हे सतीचे' इतके झोकून देणेही जमले नाही. परंतु हा अजब योग साधला हे मात्र खरे! सांगली जिल्ह्यातल्या -तशा एका आडभागातून विचारप्रसारण करीत राहण्यातून हे कार्य घडले. मनाच्या एका कोपऱ्यातलं सांगायचं तर, आमच्या शर्क्तिेंुद्धीच्या मानाने एवढे जीवितकार्य मानून समाधीसुद्धा घ्यायला हरकत नाही! केवळ मोजमापात बोलायचं तर, चाळीस वर्षांतले सरासरी चाळीस प्रमाणे सोळाशे इतके केवळ संपादकीय लेख म्हटले तर, पुस्तकाच्या आकारात चार-पाच हजार पृष्ठे होतील!! हे कसे घडले? घडले खरे!!
-परंतु ही काही भावार्थदीपिका नव्हे. आहे साधी पणती. स्नेहरज्जूंची वात शाबूत आहे, आणि कठोर प्रयत्नांनी वाळूचे कण रगडिता तेलही गळे; अशी उमेद आहे तोवर ती पुढे तेवत ठेवायची आहे.
येत्या काळात विभक्त कुटुंब पद्धतीचे, विकृत समाजमाध्यमांचे, संकुचितपणाचे तोटे आपल्या समाजाला कळू लागतील आणि पुन्हा एकत्र सहजीवनाकडे वळावे लागेल अशी शक्यता आहे. व्यक्तिेनष्ठ व प्रादेशिक अस्मितेच्या राजकीय पक्षांची मोजदादही कठीण झाली, अशा या काळात निवडणुकीच्या लढाईसाठी का होईना राजकीय धु्रवीकरण सुरू झाले. ज्यांना केवळ महत्वाकांक्षाच आहे त्यांची ही परिस्थिती; मग ज्या सुजाण घटकांस समाज कळतो, नाती कळतात, भविष्याचे वेध कळतात, त्यांच्यापुढे काही एका समान धाग्यांनी एकत्र येण्याची गरज वेगळी कथन करण्याचे कारण नाही.
कुलसंघटन असो - अगर स्वयंसेवी सामाजिक संघटना असोत, अशा काही समानशीलांचा पुरोगामी समाज संघटित होण्यासाठी `आपले जग' हे प्रचारपत्र होऊ शकेल. त्यासाठी मंत्र-तंत्रांचे फार मोठे साम्राज्य व्यापण्याची सध्या तरी गरज वाटत नाही. साम्राज्य ही संकल्पनाच मुळी समानतेची-बंधुतेची नाही. जिथे चराचर जीवांस मुक्त श्वास घेता येईल असे छोटे असले तरी स्वराज्य नांदले तर त्यात इतिकर्तव्यता मानावी लागेल. `आपले जग' या सूत्राने चालले, आणि चालेल.
अस्तित्वाची लढाई सजीवाला कधीच संपत नाही. चरितार्थाची काळजीच नसेल तर कदाचित पिलावळ जन्मते, सृजन घडत नाही. उलट चरितार्थाच्या रातंदिन फिकीरीच्या अनुभवातून कर्मण्यवादी संस्कृती तयार होत असते. म्हणूनच यापुढेही `आपले जग'ला रोजचा शिधा जमवीत राहावा लागेल आणि तशीच जाणीव सभोवती पेरत जाण्याची विद्या साध्य करावी लागेल. क्षणश: कणशश्चैव विद्यामर्थंच साधयेत् । (क्षणाक्षणाने विद्या आणि कणाकणाने धन प्राप्त करावे.)
प्रसारमाध्यमांची स्पर्धा किंवा आक्रमणे -जी सतत भयप्रद भासविली जातात -ती तितकी उपद्रवी होण्याचा फार मोठा धोका नाही. आज चटपटीत स्वरूपातील वृत्तपत्रे खूप निघतात. पण लोक ती `पाहतात!' `वाचू' इच्छिणारे त्यावर समाधानी नाहीत हे वास्तव आहे. `वाचणाऱ्यां'ची संख्या कमी नाही. उलट `वाचणाऱ्यां'पर्यंत पोचले पाहिजे, अशी `आपले जग'ला ओढ आहे. तिथे त्याच्यासाठी प्रतीक्षा आहे. हे भास नव्हेत, निरीक्षण आहे. तिथे पोचण्यासाठी `मार्केटिंग'ची निकड नाही पण संपर्क हवा आहे.
नव्या व्यवस्थेच्या काळातील आधुनिक साधने ही विचारांच्या विकासासाठी वापरली जावीत. परंपरा श्रेष्ठ असली तरी विचाराने बुरसट राहू नये अशी काळजी आहे, तथापि आचारांनी उथळ आधुनिक बनण्याची प्रदर्शनीय गरज `आपले जग'ला नाही. `जुने तेच श्रेष्ठ' असा हळवा आचारही हितावह नसतो.
`तातस्य कूपो%यमितिब्रुवाण:
क्षारं जलं कापुरुषा: पिबन्ति ।'
`बापाच्या वेळची विहीर' म्हणून तिचे खारे पाणी पिणाऱ्याला मूर्खच म्हटले आहे. त्याचबरोबर पूर्वसूत्रांचा गुंतावळा करण्याचे किंवा त्याचे तुकडे करण्याचेही कारण नाही. परंपरेने जे हाती आले ते त्याच तत्वासाठी अधिक विकसित करणे हाच चिरंतनाचा मार्ग असतो. तो स्वत:ला नित्यनूतन असावा, पण मागून येणाऱ्यांस परिचित असायला हवा. त्यांना तो शाश्वत वाटायला हवा.
`आपले जग' पुढच्या काळात त्याच मार्गावर चालत राहील. मार्गावर त्याची श्रद्धा आहे.
           ं ं ं

मतभेद हवेत, प्रकट व्हावेत.
बौद्धिक मतभेद हा जिवंत समाजाचा आत्मा असतो. आपल्याकडे विद्वानांच्या वादसभा होत्या, राजसभा होत्या, समाजसभा होत्या, गावातल्या पारावरच्या सभाही होत्या. त्यांत परस्पर विचारांचा विनिमय होण्याची रीत होती. कोणत्याही प्रश्णावर, संकटावर अथवा आनंदावरही परस्परांची मते जाणून घेण्याची, मानवी समंजसतेची अेक वैभवी परंपरा होती, असली पाहिजे; ती जपायलाही पाहिजे.

समाज अेकत्वानं नांदायचा याचा अर्थ तो अेकाच विचाराचा असावा असा मुळीच नाही. पार जुन्या काळी शंकराचार्यांनी अवघा भारतवर्ष पालथा घातला, जागोजागी वादचर्चा केल्या, आपल्या चिंतनांतून आणि अभ्यासातून अद्वैतमताशी ते ठामपणे येअून पोचले तरी, बिहारातल्या मंडणमिश्रांची भेट घेअून त्यांच्या द्वैतमतावरही त्यांनी चर्चा केली. त्यांच्या पत्नीशी संवाद करून आपले मत प्रतिपादन केले, आणि त्यांना पटवूनही दिले. अगदी अलीकडे आगरकर टिळक यांचे वाद आपल्या साऱ्यांच्या अैकण्या-वाचण्यात आहेत. या दोघा तरुण मित्रांनी आपापल्या विचारांच्या पुष्टीसाठी सभासंमेलने केली, वृत्तपत्रे चालविली, अेकमेकांच्या भेटीगाठी घेतल्या, त्या काळातल्या अन्य धुरीणांच्या साक्षी काढल्या, आणि अेकमेकांस शिव्याशापही दिले. त्या काळातल्या शिक्षित समंजस लोकांनी, या दोघांचे वाद मिटवावेत आणि वृथा शक्ती खर्च करू नये अशा तळमळीच्या सूचना केल्या; त्या हितचिंतकांची आपुलकी लक्षात घेअूनही आगरकरांनी त्यांना आपल्या निबंधातूनच प्रश्ण केला होता की, `विचार-कलहाला तुम्ही आितके कशासाठी भिता?'

जिवंत, प्रगत, समंजस, विचारी, अभ्यासू अशा मानवी समाजाच्या हितासाठी, परिपप्तेसाठी आणि  संस्कृतीच्या विकसनासाठी मतभेदांचे प्रकटीकरण होण्याची गरज असते. प्रत्येक मनुष्य त्याच्या त्याच्या मनाच्या समजुतीप्रमाणे काहीअेक मत बनवीत असतो. ते पारखून घेण्याचीही गरज असते. परस्पर विचारांतून योग्य त्या दिशेने माणसांच्या मनांचा आणि संस्कृतीचा प्रवाह वाहात राहायला हवा. मतभेदच असू नयेत हे मृत किंवा ढिम्म समाजाचे लक्षण होआील, आणि असले तरी ते व्यक्तच होऊ नयेत ही शुद्ध अमानवी अरेरावी ठरेल. अेखादी संघटना, अेखादा विचार, पक्ष, धार्मिक संस्था, सामाजिक संस्था, - फार कशाला आपल्या नोकरी धंद्याचे ठिकाणही असले तरी, तिथे त्या आस्थापनेचा घटक म्हणून काम करताना `मला मान्य आहे' असे म्हणावे लागते; त्या त्या आस्थापनेच्या आणि अशा अनेक घटकांनी बनलेल्या समाजाच्या स्थिरतेसाठी, योग्य संचलनासाठी ते आवश्यक असते. त्याचबरोबर  `मला मान्य नाही' असे म्हणता येणे हेही फार महत्वाचे आहे. ते म्हणता येण्याची ताकत असणे, आणि तसा वाव असणे हे लोकशाही व्यवस्थेसाठी आणि मानवी समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक असते.

हल्ली सहिष्णुतेच्या संदर्भात नाकाने कांदे सोलणारे बरेच विद्वान असतात. या देशात आता सहिष्णुताच शिल्लक नाही, असे म्हणता येण्याइतकी अुदार ते अनुभवतच असतात. पण त्यांच्या विरुद्ध कुणी काही बोलले लिहिले की त्यांना ती असहिष्णुता वाटते. हे जितके गैर आहे, तितकेच  -किंबहुना त्यापेक्षा निखालस गैर हे आहे की, समाज सहिष्णू आहे म्हणून वाटेल ते, वाटेल तेव्हा, वाटेल तिथे सर्रास खोटे बोलणे-लिहिणे!! त्यामुळेच मग `हे मला मान्य नाही' असे म्हणण्याचे  समंजस सामर्थ्यच गमावलेले असते. त्यांना असहिष्णुतेलाच तोंड द्यावे लागते. प्रामाणिक मतभेदाच्या अैवजी कुजकट खोटेपणा करणाऱ्यांना मानवी संस्कृतीचे नियम लावणे आणि त्यांच्याकडून तशा अपेक्षा ठेवणे चुकेल.

साऱ्या जगातच अशी  मत मतान्तरे कमी झाल्याचे दिसून येत आहे. वेगळे मत म्हणजे तो शत्रू असे मानले जाअू लागले आहे. -अन्यथा मग चीनप्रमाणे, `हेच तुमचे मत आहे, असलेच पाहिजे' हा प्रकार!! राजकीय पक्षांची धुळवड सध्या आपण अनुभवत आहोत, त्या बाबतीत तर त्या विक्षिप्त शत्रुत्वाचा अनुभव येत आहे. विविध राजकीय पक्षांचे निवडणूक जाहीरनामे पाहिले तर त्यांत वेगळेपण काहीच नाही, म्हणजे यांना जे करावयाचे आहे म्हणतात, तेच त्यांनाही करायचे आहे. मग कोणत्याही दोन राजकीय पक्षांमधून विस्तव जाणार नाही आितके शत्रुत्व कसे? कारण त्यांच्यात मतभिन्नता नव्हे, तर परस्पर  द्वेष  भरलेला आहे. त्यांचे त्यांचे स्वार्थ भरलेले आहेत. अशा स्थितीत कुणी परमत-सहिष्णुतेच्या गप्पा मारत असतील तर त्यावर विश्वास ठेवण्याचेही कारण नाही.

`मला हे मान्य नाही, मला हे पटत नाही, माझे मत वेगळे आहे'  असे म्हणणाऱ्यांकडे वेगळा दृष्टिकोण असला पाहिजे, त्यामागे काही अभ्यास - चिंतन - अनुभव असला पाहिजे. तसे असेल तर मग मतभेद व्यक्त करण्यातून आपल्या बुद्धिमत्तेची पातळी वाढू शकते. समाजातही त्या मतान्तरातून चैतन्य फुलेल. ते फुलण्यासाठी मानवी संबंधांचे शिक्षण हवे. आपल्या शाळा महाविद्यालयांत, किंवा विद्यापीठांतही असे शिक्षण मिळत नाही. ते देण्याची व्यवस्था नाही ही त्यामागची शोकान्तिका आहे. आपल्या शिक्षणात सध्या पुराणमतवाद त्याज्य आहे. परंपरावाद तर अुच्चारताही येत नाही. धर्मावर प्रेम करा असे सांगणेही पाप मानले जाते. आपण देशभक्त व्हायलाच हवे असेही शाळेत कोणी ठासून सांगत नाही. शिक्षक मंडळींना तर आजकाल कशाचाच आग्रह धरता येत नाही. कारण आजच्या वर्षी त्यांना जे सांगण्यात येते, त्याच्या अुलट पुढच्या वर्षी दुसऱ्याकडून सांगण्यात येते. कुणाला दुखवायचे? कुणाला चूक म्हणायचे? `मला हे मान्य नाही' असे कुणाजवळ मांडायचे? आजच्या काळात ज्या राजकीय वा सामाजिक चळवळी चालत असतात, त्यातली कोणती तरी योग्यच आहे, असं म्हणता येत नाही. मार्क्सवाद, भांडवलदारी, चंगळखोरी यांतल्या कशावर तरी प्रेम करा, असं काही कोणी आपल्याला सांगितलेलं नसतं. खऱ्या आणि पारंपरिक अर्थाने ज्याला `शिक्षण देणे' म्हणतात, तसे काही आपल्याला कोणी दिलेलेच नाही. मग आपल्या शाळा कॉलेजांतून आपण शिकलो काय?

जे कोणी वाचन करतात, त्यावर चर्चा करतात, स्वतंत्र विचार करतात, चिकित्सा करतात, ताडून पाहतात, असं का हे विचारतात त्यांच्यावर  समाजाच्या प्रगतीची भिस्त असते. आपल्याला योग्य वाटणाऱ्या अुत्तराच्या शोधात बौद्धिक वणवण करणे हे चांगल्या समाजाचे लक्षण आहे.  त्या प्रश्णाचा पिच्छा सोडायचा नसतो; पण वाटेत कोणी येआील त्याच्याशी झोंबत राहण्याचेही कारण नसते. अशा अुत्तराच्या नवनीतासाठी वैचारिक घुसळण करीत राहणे म्हणजे शिकणे, ते आयुष्यभर चालू राहते. स्वत:ला चौकस ठेवणे म्हणजे शिकणे. कोणताही प्रस्थापित विचार घोकत रटत राहण्याला मानवी बुद्धिमत्ता मानले जात नाही, -तर त्याच्याशी मतभेद करण्याआितकी पात्रता अंगी येण्याला बुद्धिमत्ता कमवावी लागते. आजच्या प्रस्थापित विचारांशी  होणारा मतभेद हा पुढे कधीतरी महान विचारही ठरू शकतो. तो आजच्या विचाराशी विसंगत असला तरी त्याचा कार्यकारणभाव मतभेदांतही मांडता आला  पाहिजे.

सॉक्रेटिस हा जगद्विख्यात तत्वज्ञ, तो त्याचा शिष्य प्लेटो याच्याशी भांडला होता. नीत्से हा तर प्रत्येकाशीच भांडायचा, -म्हणजे वाद घालायचा. काही आत्मचिंतक स्वत:शीच वाद घालतात. वृक्षवल्लींच्या शांत साहचर्यात  `आपुलाचि वाद आपणासी' होतो, हा तुकारामांचा अनुभव ते सांगतात. आपल्याकडे  नेहरू-सुभाष मतभेद होता, नेहरू-गांधीही मतभेद होता, जयप्रकाश-विनोबा मतभेद झाले. मराठी जगात `कलेसाठी कला की जीवनासाठी कला' असा वाद फडके-खांडेकरांनी घातला होता. अत्र्यांचे वाद त्या काळातल्या फडके, भावे यांच्यापासून कित्येकांशी झालेले गेल्या पिढीला आठवत असेल. हे वाद व्यक्तिगत नव्हते. क्षुद्र संकल्पनांतून आलेली ती विचारदरिद्री भांडणे नव्हती. काही वाद तर त्यांच्यातली अेक बाजू काळाआड गेल्यानंतर झालेले आहेत. मराठी संतांची कामगिरी हा विषय कित्येक जाणत्यांच्या आकलनावर खंडित-मंडित केला जात असतो. परंतु हे वाद कधी गैरसमजांवर, स्वार्थावर, व्यक्तिगत हितसंबंधांवर आधारलेले नव्हते; म्हणूनच ते अभ्यासकांच्या बुद्धिमत्तेलाही आवाहन करणारे ठरत आले.

अेखादा विषय पूर्णपणे समजला तरच त्याच्याविषयी मतैक्य किंवा मतभिन्नता निर्माण होते. मतभेद व्यक्त झाले तर असे गृहीत धरायला हवे की, त्या बाबतीत त्याने अभ्यास चिंतन केलेले आहे. ते झाले असेल तरच, तो विचार मांडणाऱ्यांचा सन्मान प्रतिष्ठा राखली जाआील; त्यात आदब व नम्रता असेल. कुतुहल असेल, जिज्ञासा असेल. मनाचा मोकळेपणा व मोठेपणा असेल. म्हणूनच लोकशाहीच्या रक्षणासाठी तशा अुदारमतवादाची आणि समन्वयी न्यायबुद्धीची अपेक्षा असते. वैचारिक मोकळेपणा केवळ अेखाद्या परिसंवादापुरता मर्यादित नाही, -तर तो आपल्या बौद्धिक व्यवहारांचा स्थायीभाव बनला पाहिजे.

जगभरातल्या विद्यापीठांतून शिकणाऱ्या किंवा शिकलेल्या  विद्यार्थ्यांना हे माहीत नाही की, अेखाद्या प्रस्थापित मताच्या विरोधात काही बोलणं हा आपला घटनादत्त अधिकार असतो. -म्हणजे आपण आजच्या प्रचलित समजुतीपेक्षा विरोधी टोकाचा विचार मांडला तरी त्यालाही संरक्षण देणे हे व्यवस्थेचे कामच आहे, व्यवस्थेची ती जबाबदारी आहे. अनेकांना असेही वाटते की, आपल्या विरोधी मत मांडणाऱ्याला दांडगाआी करून गप्प बसविण्यात काहीही गैर नाही. अेका पाहणीत असे आढळून आले की, विद्यापीठांत शिकणाऱ्या २० टक्के विद्यार्थ्यांना वाटते की,  अेखाद्या विरोधी विचार मांडणाऱ्याला गप्प करण्यासाठी हिंसाचारही केला तरी बिघडत नाही.

आपलाच विचार(?) असा ठोकून दृढ करण्याची रीत आता जगभरात फैलावली आहे. कुणाचे काही अैकूनही घेण्याला माणसे तयार नाहीत. `मी सांगतो तेच, आणि तसेच बरोबर,' याचा अतिरेक चालू आहे. कुणी कितीही अभ्यासू, विद्वान, पदस्थ, प्रयोगशील काहीही असो;  आपल्यापेक्षा वेगळे काही मांडतो आहे म्हटले की त्याची हुर्रे अुडवावी, त्याला पळवून लावावे, त्याची बोलती बंद करावी, त्याला शारीरिक त्रासही द्यावा, जिणे नको करावे, किंवा मग त्याने आपले वेगळे मत गुंडाळूनच ठेवावे... अशी पद्धत बळावत आहे. विचारांना विचाराने विरोध हे बोलण्यापुरते, प्रत्यक्ष मतांतराला वावच नाही. विचारस्वातंत्र्य, अुदारमतवाद वगैरे कोण्या झाडाचा पाला!!

याला कारण  पुन्हा आपल्या नागरी शिक्षणाशीच येते. आपल्या घरातही त्याचे योग्य शिक्षण मिळू शकते. परंतु घरातील सदस्यांची संख्या तर आधीच रोडावली आहे. त्यातही पुन्हा तीन चार माणसांची तितकीच वेगळी व्यवधाने असतात. महत्वाच्या काही विषयाचा अूहापोह करायला, नव्या जुन्यांची बाजू अैकून घेण्याला कुणाला सवड नाही. कोणत्याही मताला दुसरी बाजू असते हे मुलांच्या वयापासून लक्षातही घेण्याचा संस्कार नाही. मोठी परस्परांना भेटून माणसे विविध मतांची चर्चा करताना आढळत नाहीत. वाचन-व्याख्यान-संवाद अशांचे दुर्भिक्षच असते. शाळा कॉलेजात वादसंवादाकडे कोणी पाहातही नाही. राजकीय साठमारीचा अुबग आलेलाच असतो. निवडणुकांचा मोसम म्हणजे लोकशिक्षणाची पर्वणी असे कोणी मानतही नाही. कोण काय देतो हे मतदार पाहतील, आणि किती द्यावे लागतील याचे गणित अुमेदवार मांडतील; मग लोकशिक्षण, दुसरी बाजू, आपल्या मताचे मंडन आणि परमताचे खंडन ... कसचे काय!

यातून तयार होतात अस्मिता, आणि वृथा अभिमान. देशाच्या कल्याणाची योजना पुढे आली तरी, ती कुणी आणली यावरती त्या योजनेला विरोध करायचा की साथ द्यायची हे ठरते. वैचारिक प्रगल्भता कुठेही दिसत नाही. परमताला विरोेध करण्यासाठी  अधिकृत पीठासनापुढे चर्चा करण्यापेक्षा झुंडगिरी आणि फेकाफेकी सुरू होते. कोणतीही सांसदीय युक्ती किंवा परिवर्तनशील विचार मांडण्याअैवजी  समाजाचे सारे व्यवहार ठप्प करण्यासाठी ताकद पणाला लावली जाते. पुलवामात आपली चाळीस माणसं गेली, त्याचाा उलट सुलट विचार होऊन कृती सुचविण्याऐवजी निषेध-बंद पुकारून व्यवहार ठप्प केले जातात, आणि प्रधानमंत्र्यासह कोणाही दुसऱ्याचे म्हणणे अनैतिक ठरविण्यापर्यंत मजल जाते.  जे म्हणणे नाकारायचेच आहे त्यावर चर्चाच कशाला, असे अजब तर्कट सुरू होते.

या संदर्भात माध्यमांवर जास्त जबाबदारी असते. अन्य कोणताही व्यवसाय, आणि शिक्षकी वा पत्रकारिता यांत फार फरक आहे. या बाबतीत `आपले जग'च्याच वाट्याला आलेली अेक चर्चा नांेदविण्यासारखी वाटते. शासनाच्या काही सोयी-लाभांसाठी यंत्रणेकडून पडताळणी होत असते. तशी पडताळणी करताना काही गैर मागणीला या नियतकालिकाने ठाम नकार दिला. त्याचा परिणाम होअून विरोधी अहवाल दिला गेला, व सोयी-लाभ नाकारले गेले. त्यावर दाद  मागून तो अहवाल दुरुस्त करण्यासाठी उच्च पातळीवर बरीच खटपट करावी लागली. काही अुच्च शासकीय अधिकारी `भले' भेटले, आणि अन्याय दूर झाला. परंतु त्याच अधिकाऱ्यांकडून विचारणा झाली की, `आितके श्रम, पैसे, वेळ खर्च केलात. त्यापेक्षा खालच्या स्तरावरच जरा जमवून घेतलं असतं, तर बरं झालं असतं असं नाही का वाटत? तेच व्यवहार्य होतं ना?'  -त्यावर `आपले जग'चे म्हणणे असेच मांडले गेले की, `तेच करायचे होते तर या माध्यमी पत्रकारी जगात कशाला आलो? दारूचं दुकान काढणं सोपं होतं ना!'

-मुद्दा असा की, सारं जगच तसं -मग पत्रकारितेनं आणि माध्यमांनीच काय घोडं मारलंय... हे म्हणता येत नाही. अुत्तम पत्रकारिता असेल तर लोकशाही आणि मानवी जीवनमूल्यं जपली जातात. ही मूल्यं विकसित होण्यासाठी विचारांचं मंथन घडत राहिलंच पाहिजे. मतभेद व्यक्त होत राहणं हेच तर त्यासाठी आवश्यक असते. `वादेवादे जायते तत्वबोध:' हे तर आपल्या समाजात सरसकट मानले जाते. परंतु सामाजिक  पीठांवर जे आणि जसे आकांततांडव चालते ते पाहिल्यावर, `वादे वादे जायते कंठशेाष:' असे आता म्हणण्याची पाळी आली आहे. त्यात सुधारणा होअून प्रत्येक अभ्यासू व अनुभवी  मतास सन्मान्य स्थान देत, जे चांगले ते रुजविण्याच्या कामी माध्यमे आणि पत्रकारितेची भूमिका महत्वाची ठरते. अुत्तम पत्रकारिता नाहीच असे तर मुळीच म्हणता येत नाही. सरकार, प्रशासन, न्याययंत्रणा आणि समाज या साऱ्या बाजूंचा विचार केल्यास अगदीच निराश होण्याचं कारण दिसत नाही, कठीण असेल तरीही ते आव्हान तर राहणारच. चांगली पत्रकारिता हा समाजाला अुपयोगी ठरणारा, सत्याकडे जाणारा मार्ग आणि दुवाच असतो. मुक्त, तर्कशुद्ध, तात्विक, समंजस आणि समजूतदार अशा लोकशाहीतून सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगती होत असते. म्हणून तो दुवा जपला पाहिजे.

(ब्रेट स्टीफन्स हे पुलित्झर पुरस्कारप्राप्त अमेरिकन पत्रकार आहेत. अस्ट्न्ेिलॉयातील सिडनी येथे २३ सप्टेंबर '१८ला त्यांनी  `मतभेद स्वीकारण्याची वृत्ती संपली  : द डाआींग आर्ट ऑफ डिस्अॅग्रीमेंट')  या विषयावर भाषण दिले. त्याचा संक्षिप्त वृत्तांत `लोकसत्ता'ने प्रकाशित केला होता. त्यातील काही मुद्द्यांच्या आधारे)


गोविंद विठ्ठल कुंटे : आणि त्यांची वृत्तपत्रे
मराठी वृत्तपत्रांच्या जगात `दर्पण'नंतर `मुंबई अखबार' आणि त्यानंतर `प्रभाकर' या वृत्तपत्रांचा उल्लेख आवश्यक ठरतो. या पत्रांचे संस्थापक आहेत गोविंद विठ्ठल कुंटे तथा भाऊ महाजन -त्यांचा काळ आहे १८१५ ते १८९०. त्यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर म्हणजे २४ ऑक्टोबर १८४१ या दिवशी `प्रभाकर' हे वर्तमानपत्र सुरू केले.
श्रीपती शेषाद्री शुद्धीप्रकरणात भाऊ महाजन यांनी बाळशास्त्री(जांभेकर)ना साहाय्य केले होते. बाळशास्त्री आणि भाऊ यांचा चांगला परिचय होता. १८६२मध्ये भाऊ नागपूरला गेले तोवर, -म्हणजे सुमारे २१-२२ वर्षे ते स्वत: एकटे वृत्तपत्र चालवीत.

भाऊंची गणना त्या काळच्या विद्वानांमध्ये होत असे. अत्यंत नि:स्पृह नि निर्भीड अशी त्यांची वृत्ती होती. सरकारी नोकरीची गुलामगिरी त्यांना मान्य नव्हती. त्याऐवजी बाळशास्त्रींचा वृत्तसंपादनाचा आदर्श त्यांनी स्वीकारला. त्याबरोबर मुद्रण आणि प्रबोधन हेही व्यवसाय त्यांनी स्वीकारले. काही दिवसांनी ते स्वत:च्याच मुद्रणालयात वृत्तपत्र छापू लागले. या वृत्तपत्र उद्योगात ते पूर्णपणे बुडून गेले होते, समरस झाले होते. त्यांनी आपला स्वतंत्र बाणा सदैव जपला. इंग्रजांच्या नवनवीन कल्पना, शोध यांपुढे ते कधी भारावून गेले नाहीत किंवा त्यांचे ते टीकाकारही झाले नाहीत. त्यांचा विवेक सदैव जागा असे. ते स्वत्वाशी पूर्णपणे स्वाभिमानी होते नि त्या बाबतीत त्यांनी कधी तडजोड केली नाही. लोकांना ज्ञानी, सशक्त नि स्वाभिमानी बनविण्यासाठीच त्यांनी हा व्यवसाय केला.
हिंदू करून घेतलेल्या श्रीपती शेषाद्री प्रकरणात त्यांच्यावर प्रायश्चित घेण्याचा प्रसंग आला; पण ते आपल्या मताशी ठाम राहिले; त्यांनी प्रायश्चित घेतले नाही. शालेय पुस्तके निर्माण करणे नि इंग्रजी पुस्तकांची भाषांतरे करणे या बाबतीत इंग्रज शासनाकडून भाऊंना निमंत्रण आलेले होते. पण `मराठी भाषा ही आमची भाषा असल्याने, मी तयार केलेल्या ग्रंथाची तपासणी विद्या खात्याचे भाषांतरकार मेजर क्रॅन्डी यांना करू देणार नाही.' अशी अट त्यांनी घातली. अर्थात ही अट मान्य होणे शक्यच नव्हते.
भाऊंच्या स्वभावात स्वस्थ बसणे ही गोष्टच नव्हती. म्हणून त्यांनी `धुमकेतू' नामक साप्ताहिक १८५३मध्ये व `ज्ञानदर्शन' मासिक १८५४मध्ये चालू केले. मराठीतील पहिले मासिक `दिग्दर्शन' -त्याचेही चालकत्व भाऊंकडे आलेले होते. सरकारी मानाच्या नोकरीची शक्यता असूनही भाऊ महाजन यांनी केवळ समाजसेवेचे व्रत स्वीकारून सतत २५ वर्षे हा उद्योग केला. स्वार्थत्यागपूर्वक वृत्तपत्र व्यवसाय  करण्याची परंपरा नंतरही चालू राहिली. पण चिपळूणकर-टिळक-आगरकरांच्या अगोदर सुमारे ४०-५० वर्षे भाऊ महाजनांनी ही त्यागाची  दीक्षा स्वत: घेतली होती.
`प्रभाकर' हे पत्र ११इंच बाय ९इंच आकाराचे होते. दोन स्तंभांची आठ पाने असत. वार्षिक वर्गणी १२रुपये. शिळाछापावर ते छापले जात असे. पहिल्यांदा गणपत कृष्णाजी यांच्या मुद्रणालयात व नंतर मात्र स्वत:च्या छापखान्यात अंक छापला जाऊ लागला. दर्पण चालू झाल्यानंतर नऊ वर्षांनी `प्रभाकर' निघाले.
पंचवीस वर्षांच्या आपल्या आयुष्यात प्रभाकर पत्राने आपला स्वतंत्र बाणा कधी सोडला नाही, कधी ते लाचार झाले नाही. निर्भयपणा, ताठ बाणा हे प्रभाकरचे वैशिष्ट्य. अज्ञानी, रूढीग्रस्त समाजाला पाश्चात्य नवविचारांचे औषध पाजून ज्ञानी, स्वाभिमानी, सशक्त बनविण्याचे कार्य प्रभाकरने चालू ठेवले.
प्रभाकरमध्ये गुजराती, इंग्रजी भाषांतील व निरनिराळया प्रांतांतील वृत्तपत्रांमधील उतारे, वार्ता देण्यात येत असत. वाचकांची पत्रे नि त्यावरील संपादकांची टिप्पणी, शासकीय अधिकाऱ्यांच्या नेमणुका नि बदल्या, मुंबई बंदरात येणारी जहाजे नि त्यावरील प्रवाशांची नोंद इत्यादी माहिती येत होती. श्री.रा.गो.कानडे म्हणतात, `तत्कालीन राजकारणावर, धर्मकारणावर आणि वाङ्मयकारणावर स्वतंत्र संपादकीय लेख आलेले आहेत. त्यातील काही लेख फारच कडक आहेत. संपादकांनी दाखविलेले मनोधैर्य नि सडेतोड लेखन आजही अभिनंदनीय ठरते खरेच!'
सरदार गोपाळ हरी देशमुख म्हणजेच लोकहितवादी यांची सुप्रसिद्ध `शतपत्रे' प्रथम  प्रभाकर पत्रातच प्रसिद्ध झाली. १९ मार्च १८४८ या दिवशी पहिले पत्र प्रसिद्ध झाले. लोकहिताविषयी त्यांची तीव्र तळमळ यामुळेच त्यांनी `लोकहितवादी' हे नाव घेतले नि सार्थ ठरले. अज्ञान, अंधश्रद्धा, पुराणाभिमान, शब्दप्रामाण्य, कर्मठपणा, धर्माविषयी विपरीत कल्पना या हिंदू समाजाच्या अंतर्गत व्याधींचा विचार करून लोकहितवादींनी खऱ्या धर्माची स्थापना करण्याचा प्रयत्न केला. यात बुद्धिप्रामाण्य, भौतिक विद्यांची उपासना, राष्ट्नभिमान, समता, व्यक्तिस्वातंत्र्य इ. तत्वांचा समावेश होतो. जातीभेद, जन्मनिष्ठ उच्चनीचता आणि स्त्री-पुरुषांतील विषमता या गोष्टी नष्ट झाल्या पाहिजेत, स्त्रीला प्रतिष्ठा प्राप्त झाली पाहिजे, सतीची चाल आणि बालविवाह या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत, विधवाविवाहाला मोकळीक मिळाली पाहिजे, अशा प्रकारचे विचार त्यांनी आपल्या शतपत्रांत निर्भयपणे प्रतिपादन केलेले आहेत.
प्रभाकर पत्राने पाश्चात्य विद्येचा स्वीकार केला, पण त्याचबरोबर आपली संस्कृती, भाषा यांविषयी त्यांनी स्वाभिमान प्रकट करून भ्रष्ट झालेल्यांवर प्रखर टीका केली आहे. प्रभाकर पत्रात भारतीयांच्या अनिष्ट गोष्टींवर टीका केलेली आहे. तद्वतच पाश्चात्यांच्या ढोंगीपणावरही कडक टीका आहे. विष्णुबुवा ब्रह्मचारी यांच्यावर टीका आहे. तशीच मिशनऱ्यांच्या आक्रमणावरही कोरडे ओढले आहेत.
`हिंदुस्थानातून द्रव्य जाते ते बंद झाल्याशिवाय देशाची बरी गत नाही. इंग्रज लोक येथून द्रव्य नेतात यासप्रमाणे फार आहेत. जर हिंदुस्थानातून रोकड जात नाही, तर दोन अडीच कोट रुपयांचा माल दर वर्षास विलायतेहून अधिक येतो त्याचा पैसा कसा फिटतो? हे त्याणेच सांगावे. हिंदुस्थानातून सोने आणि रुपे मागे गेले आणि जात आहे. हिंदुस्थानची गरीब दशा किती आहे ही ज्यास पाहाणे आहे त्याने कोकणात आणि देशावर खेड्यांतून आणि गावागावांतून फिरावे आणि लोकांची सध्याची खरी हकीगत पुसावी म्हणजे समजेल.. इंग्रज  अमलदार हजारो रुपये लाच खातात. नेटिव लोकांस इंग्रज लोक तर केवळ तृणप्राय मानतात.'
प्रख्यात पत्रकार श्री.रा.के.लेले म्हणतात की, `प्रभाकरचा स्वतंत्र बाणा एक प्रकारे टिळक, आगरकरांनी प्रचलित केलेल्या नव्या धड्यांच्या  संप्रदायाचा सूचक होता.' इंग्रजी सत्तेचे खरे स्वरूप प्रकट करावयासही प्रभाकर मागे पुढे पाहात नसे.
त्यावेळी पुण्यात एक प्रकरण घडले. पुण्यातील एक चांद्रसेनीय कायस्थ प्रभू विद्यार्थ्यानेे मेजर क्रॅन्डीकडे संस्कृत शिकण्याची अनुमती मागितली. ५ जुलै १८५२च्या अंकात यावर प्रभाकरने परखड स्फुट लिहिले आहे. `परभु, कासार, सोनार यास संस्कृत शिकविण्यास काही निषेध आहे असे आम्हास वाटत नाही. मुंबईत तर शतावधी शास्त्री आणि वैदिक लोक या लोकांच्या घरी जाऊन त्यास संस्कृत आणि वेदही शिकवीत असतात. हे तर एकीकडेच राहो, परंतु इंग्रज लोकांसही हे शास्त्री लोक वेद, शास्त्रे, पुराणे शिकवीत आहेत. मग जे लोक देश आणि धर्म यासंबंधाने आपणास इतके जवळ आहेत, त्यास संस्कृत भाषा शिकविण्यास त्यांनी कशाकरिता हरकत घ्यावी?'
भाऊ महाजन यांना स्वभाषेविषयी अतिशय अभिमान होता. त्यांनी एल्फिन्स्टनच्या विद्यार्थ्यांवर टीका केलेली आहे. हे विद्यार्थी म्हणाले की, मराठी भाषा म्हणजे केवळ आडू लोकांची भाषा आहे. त्यावर त्यांनी टीका केली. इंग्रजी वर्चस्वामुळे, सत्तेमुळे लोक प्रथम दिपून गेलेले होते. पण सत्तेचे खरे स्वरूप काय आहे, हे सांगणारी काही वाचकपत्रे प्रभाकरात प्रसिद्ध झालेली आहेत. अशी वाचकपत्रे लिहिणाऱ्या लेखकांच्या आणि छापणाऱ्या संपादकांच्या धैर्याची त्या काळी कमालच म्हटली पाहिजे.
`इंग्रज लोकांची दगाबाजी समजावी आणि आपले हिंदू लोकांचे या बाबतीत डोळे उघडावे अशा हेतूने, तुमच्यासारखे जे विद्वान पुरुष आहेत त्यांही आपल्या लेखणीस विसावा न घेता हमेशा या गोऱ्या लोकांचा काळेपणा यत्किंचित उघडकीस आणावा असा तुमचा धर्म होय.. इंग्रेज लोक यांनी हिंदुस्थानवर काय उपकार केले हे पाहू गेलो असता मला एकही आढळत नाही. ते आत्मस्वार्थी लोक परमुलखातून आलेले, मूळचे केवळ बुभुक्षित आणि दरिद्री असे जे लोक हे हिंदुस्थानात पहिल्याने आले, तेव्हा तेथील संपदा व वैभव पाहून सहज चकित जहालेच असतील, तेव्हा प्रथमत: त्यांच्या मनात ती संपदा आपल्या मुलुखात न्यावी याशिवाय दुसरी कल्पनाच आली नसेल!!' (प्रभाकर, १३ मार्च १८४२)
सुमारे दीडशे वर्षांपूर्वीही मराठी भाषेच्या उपेक्षेविषयी ८ मे १८४२च्या अंकात भाऊ महाजन म्हणतात की, `सांप्रत मुंबई येथील हिंदू लोकांची भाषा व स्थिती विलक्षण होत चालली आहेत; ती अशी की ते बोलू लागले असता पंचवीस शब्दांमध्ये वीस शब्द इंग्रजी येऊन मध्ये विभक्ती, अव्यये, सर्वनामे, क्रियापदे इतकी मात्र बहुधा स्वभाषेचे उपयोगात आणतात. तसेच ते नमस्कार करणे, आगत स्वागत विचारणे झाल्यास इंग्रजी शब्दांनी करतात. कोणी स्नेही आला असल्यास इंग्रजांप्रमाणे त्याचा हात धरितात आणि ते देवळात गेले असता टोपीप्रमाणे पागोटे काढितात हा एक दृष्टांत लिहिला.''
१८५३ मध्ये भाऊ महाजन यांनी `धूमकेतू' हे वृत्तपत्र चालू केेले. या वर्तमानपत्राची वर्गणी पाच रुपये नि आगाऊ दिल्यास चार रुपये होती. सर्वसामान्य वाचकाला परवडेल असेच मूल्य यांनी ठेवले होते.
`धूमकेतू'चे धोरण उदार नि समतोल असे. पण समाजातील कुविचार, आचारांवर ते परखड टीकाही करीत असत. पुनर्विवाहाला बंदी असल्यामुळे दोन हिंदू स्त्रिया दुसऱ्या जातीच्या माणसांच्या घरात गेल्या. त्यावर धूमकेतू म्हणतो, `अहो हिंदू लोकहो, आता तरी तुम्ही आपले डोळे उघडून पाहा! नाही तर पुढे काय होईल हे समजत नाही. यासाठी सर्व हिंदू लोकांनी आपल्या धर्मास दोष न लावून घेण्यास पुनर्विवाह चालू करावा. असे केल्याने विधवांवर त्याचे उपकार होतील व त्याचे धर्मातही मोठी सुधारणूक होईल.' (धूमकेतू, जानेवारी १८५४)
                     -सु.ह.जोशी, लक्ष्मी उद्यान, पुणे ३०

ज्ञानप्रकाश
कृष्णाजी त्र्यंबक रानडे यांनी `ज्ञानप्रकाश' वृत्तपत्र सुरू केले, त्याचे पहिले चालक-मालक तेच होेते. या रानड्यांना आणखी एका महान रानड्यांची साथ मिळाली. हे रानडे म्हणजे प्रख्यात न्या.महादेव गोविंद. ज्ञानप्रकाशामुळे न्या.रानडे यांचे उद्योग, उपक्रम सर्वत्र कळत. ज्ञानप्रकाश वृत्तपत्र काढावे अशा मताच्या मंडळींमध्ये कृष्णशास्त्री चिपळूणकरही होते.
१२ फेब्रुवारी १८४९ला `ज्ञानप्रकाश' प्रकाशात आले. (`आपले जग' प्रथम अंक १२ फेब्रुवारी १९७९) १०२ वर्षांचे आयुष्य या वर्तमानपत्राला लाभलेले होते. जेव्हा ते बंद पडले तेव्हा महाराष्ट्नतील जनता आणि इतर वृत्तपत्रेही हळहळली.
१८५३ पासून ते द्विसाप्ताहिक झाले. त्यावर लिहिलेले असे, `वाङ्मय, राजकारण, व्यापार व वार्ता यांना वाहिलेले द्विसाप्ताहिक.' प्रारंभी पूर्ण आकाराची आठ पाने, प्रति सोमवारी प्रसिद्ध. किंमत वर्षाला १० रु. आणि सहा महिन्यास ६रु. सन १८५३पासून इंग्रजी मजकुराच्या पहिल्या अंकातील अग्रलेख न्या.महादेव गोविंद रानडे यांच्या हातचा होता.
१४ ऑगस्ट १९०४ला `ज्ञानप्रकाश'चे रूपांतर दैनिकात झाले. १८९५ मध्ये काँग्रेसचे अधिवेशन पुण्यात भरले. त्यावेळीही एक महिना `राष्ट्न्सभा समाचार' या नावाने तो दैनिक स्वरूपात प्रसिद्ध होत असे. ज्ञानप्रकाशची मोठी उडी म्हणजे त्यांनी काढलेली मुंबई आवृत्ती मोठीच गोष्ट होती ही! १ जून १९२९ या दिवशी ही आवृत्ती चालू झाली. त्यावेळी काकासाहेब लिमये हे पुणे `ज्ञानप्रकाश'चे संपादक होते. त्यांच्यामुळे मुंबईतही ज्ञानप्रकाश लोकप्रिय झाला होता. त्याकाळी सर्वत्र वर्तमानपत्रांचा खप कमी असे. ज्ञानप्रकाशचा खप काही शेकड्यांत असे. त्याकाळी वर्गणी हा शब्द प्रचारात नसे. वर्गणीबद्दल सामान्यत: पैसा शब्द वापरण्यात येई. विशेष म्हणजे मराठी जाणणारे इंग्रज, कर्नाटकातील काही कन्नड अधिकारीसुद्धा ज्ञानप्रकाशचे ग्राहक होते. त्याकाळी संपादकांना आणि लेखकांना मानधन देण्याची शक्ती कोणत्याच वर्तमानपत्राच्या ठिकाणी नसे. श्रीमान रा.के.लेले म्हणतात त्याप्रमाणे, लेख लिहून पैसे मिळवावे अशी आकांक्षा लेखकवर्गातही नव्हती. आपले ज्ञान इतरांना द्यावे या निरपेक्ष वृत्तीनेच लेखक लेखन करीत असत.
तरीही `ज्ञानप्रकाश'ची आर्थिक स्थिती काही फारशी सुधारली नाही. तोटा वाढतच गेला आणि शेवटी ते बंद करावे लागले. ज्ञानप्रकाशचे स्वामीत्व कृष्णाजी त्र्यंबक रानडे, त्यानंतर त्यांचे पुत्र वामनराव..., आणि १९०९ मध्ये नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या `भारत सेवक समाजा'ने (सर्व्हंट्स ऑफ इंडियाने) घेतले; आणि शेवटपर्यंत ते त्यांच्याकडे होते.
वाचकांचा पत्रव्यवहार हा वृत्तपत्रांचा एक प्रमुख भाग होय. पहिल्याच अंकात दोन हितचिंतकांची पत्रे छापलेली आहेत. लोकांनी वाचण्यास शिकावे अशी प्रार्थना नि उपदेश त्यात होता. एक पत्रलेखक लिहितो- `तुम्ही फार मेहनत करून लिहाल ते जर कोणी वाचले नाही तर त्याचा काय उपयोग?' दुसऱ्याला वाटते की `छापखान्यापासून लोकांस सुखही आहे व दुख:ही होऊ शकते. कारण की छापखान्यामुळे जशा चांगल्या गोष्टी प्रसिद्ध होतात तशाच वाईटही होतात... प्रथमत: हिंदू लोकांस वाचण्यावर प्रीती बसेल अशा युक्तीच्या सुरंग गोष्टी लिहून त्यांचे मनोरंजन करा. पण असे करण्याकरिता अयोग्य गोष्टी लिहू नका.' ज्ञानप्रकाशने आपल्या लेखकादी वर्गात खूप मोठी माणसे जोडली होती. कृष्णाजी त्र्यंबक रानडे, कृष्णशास्त्री चिपळूणकर, विष्णूशास्त्री चिपळूणकर, न्या.महादेव गोविंद रानडे, गोपाळ कृष्ण गोखले, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, हरी नारायण आपटे, वा.गो.आपटे, प्रा.भानू, गोपाळ कृष्ण देवधर, कृष्णाजी गणेश तथा काकासाहेब लिमये, सीताराम केशव दामले(केशवसुतांचे बंधू), प्रा.हरिभाऊ लिमये, प्रा.वा.गो.काळे ही त्यातील काही नावे.
१८७८ मध्ये लॉर्ड लिटनने वृत्तपत्रांचा काळा कायदा आणला होता. त्यातून देशी वृत्तपत्रांवर निर्बंध येणार होते. तेव्हा न्या.म.गो.रानडे यांच्या प्रेरणेने ज्ञानप्रकाशचे दोघे साहाय्यक सार्वजनिक काका (गणेश वासुदेव जोशी) आणि रा.ब.गोवंडे यांनी कोलकत्त्याला जाऊन या काळया कायद्याविरुद्ध अखिल भारतीय पातळीवरून मत संघटित करण्याचा प्रयत्न केला.
एका `विद्यावृद्धेच्छू वाचका'ने लिहिलेले पत्र वाचनीय आहे. वृत्तपत्र चालू झाल्यावर दुसऱ्याच महिन्यात हे वाचकपत्र प्रसिद्ध झालेले आहे. वृत्तपत्राचे महत्व हा त्या वाचकपत्राचा विषय आहे. `ज्ञानप्रकाश' वृत्तपत्र सुरू करताना वृत्तपत्राचे महत्व वर्णन केले असले, तरी लोकांत वृत्तपत्रावरून आस्था निर्माण झाली होती असे नव्हे. यामुळे हा `एक विद्यावृद्धेच्छू' वाचक म्हणतो - `विनंती विशेष, तुम्ही पत्र काढता परंतु त्याचा उपयोग बहुतांस अजून कळत नाही. जे मोठे मोठे म्हणवितात व आपले ठिकाणी गर्व करून आहेेत त्यांस देखील असे वाटते हा रिकामा उद्योग आहे. परंतु तुमच्यावाटचे मीच बोलतो. बातमीपत्राचे उपयोग फार आहेत. आपले लोकांमध्ये तर कोणास बातमी मुळीच कळत नाही. त्यास आपल्या घरापुरती असते. पुढे काही कळत नाही. यामुळे हे लोक पुढे सरकत नाहीत. मजूरी करणे हे काही फारसे शहाणपण नाही. शहाणपण म्हणजे कोठे काय आहे हे पाहणे, सर्व देशावर व जगावर नजर ठेवणे, माहितगार करणे याचे नाव शहाणपण. याजकरता आम्ही या लोकांची प्रार्थना करतो की, तुम्ही इतके दिवस सुस्तीने राहिलेत त्याची फळे भोगता. परंतु अजून तरी तुमची नजर दूरवर जाऊद्या. विद्या करा. वर्तमानपत्रादिक वाचीत जा म्हणजे तुम्हास बहुतकरून माहिती होईल, जे न समजेल ते पुसा आणि खात्री करा. वादविवाद करीत जा. म्हणजे तुमची बुद्धी वाढेल. विद्येचे शत्रुत्व कराल व कुबुद्धीचा आश्रय कराल तर फजीत पावाल. तुमच्याजवळ पैसे असले म्हणजे सर्व मुलखात आहेत असे नाही. आपलेसारखा दुसऱ्याचा विचार करा, हे विनंती' (ज्ञानप्रकाश, ५ मार्च १८४९).
नेमस्त धोरण, उदारमतवाद, सौम्य प्रतिपादन आदी ज्ञानप्रकाशची वैशिष्ट्ये होत. न्या.म.गो.रानडे, गो.कृ.गोखले यांच्या विचारप्रणालीची छाप ज्ञानप्रकाशवर राहिली. अर्थात, ज्ञानप्रकाशने नेहमीच प्रगतीची बाजू घेतलेली आहे. मात्र समाज सुधारण्याचा पाठपुरावा करताना आक्रमक धोरणापेक्षा सौम्य वृत्तीनेच जनतेचे मन वळविले पाहिजे, असे ज्ञानप्रकाशचे मत होते. भारत सेवक समाजाने ज्ञानप्रकाश घेतल्यावर प्रागतिक नेमस्तपणा हेच ज्ञानप्रकाशचे धोरण राहिले. १९२३च्या एप्रिलपासून प्रत्येक शनिवारी काव्यशास्त्रविनोद हे सदर चालू करण्यात आले.
ज्ञानप्रकाशचे एक महत्वपूर्ण संपादक काकासाहेब लिमये यांच्यावर स्वतंत्र लेख वा प्रकरण लिहावे एवढी त्यांची योग्यता आहे. त्यांच्या काळात ज्ञानप्रकाशचे संकुचित स्वरूप जाऊन त्याची दारे सर्वांना मोकळी झाली. खाली खाली चाललेले वर्तमानपत्र, त्याचा खप नि लोकप्रियता परत वाढू लागली, हजारपर्यंत आलेला खप पुन्हा दहा हजारपर्यंत जाऊन पोहोचला.
महाराष्ट्नीय वृत्तपत्रांच्या अग्रभागी ज्ञानप्रकाशाचा उल्लेख होतो. श्री.रा.गो.कानडे म्हणतात त्याप्रमाणे, `मजकुराची विशिष्ट मांडणी, बृहन्महाराष्ट्नीय बातमीपत्रांचा, स्त्रियांचे प्रश्न, शेतीसहकार, इतिहास संशोधन, साहित्यचर्चा, पुणे शहरातील राजकीय सामाजिक आणि वाङ्मयीन चळवळींचा इतिहास, आदी सारे काही व्यवस्थित देण्यात ज्ञानप्रकाशने अतुलनीय यश मिळविले आहे.'
कृष्णाजी गणेश तथा काकासाहेब लिमये(१८९२-१९४८) यांचा जन्म पंढरपूरचा. भारत सेवक समाजाचे ते सदस्य झाल्यापासून ज्ञानप्रकाशच्या संपादनातही सहभागी झाले. वयाच्या ३४व्या वर्षी म्हणजे १९२६मध्ये ते ज्ञानप्रकाशचे संपादक झाले. मराठी पत्रकार परिषदेचे पहिले अध्यक्ष तेच. १९२९ मध्ये शंकरराव गोखले हे संपादक झाले. पण त्यांनी खूप प्रयत्न करूनही शेवटी ज्ञानप्रकाश बंद करण्याची पाळी आली. १ जानेवारी १९५१ पासून ज्ञानप्रकाशचे प्रकाशन थांबले. ज्ञानप्रकाश बंद होऊ नये म्हणून म.म.द.वा.पोतदारांपासून आचार्य अत्रे यांच्यापर्यंत अनेकांनी प्रयत्न केला; पण यश आले नाही. आचार्य अत्र्यांनी तर `ज्ञानप्रकाशचा खून झाला' असाच लेख लिहिला. सतत १०३ वर्षे चाललेले वृत्तपत्र बंद पडले म्हणून मराठी जनतेला दु:ख होणे स्वाभाविक होते.
श्री.रा.गो.कानडे म्हणतात, `केवळ मतपत्रे म्हणविल्या जाणाऱ्या प्रमुख साप्ताहिकांनीही दैनिक ज्ञानप्रकाशच्या काही उपक्रमांचे अनुकरण करून एका अर्थाने ज्ञानप्रकाशचे श्रेष्ठत्व मान्य केलेले आहे. महाराष्ट्नतील अत्यंत जुन्या अशा या वृत्तपत्राने १०० वर्षे सेवा केली ती त्याच्या सर्वांगीण, सर्वसंग्राहक आणि सत्प्रवृत्त धोरणामुळे.'
  -(कृष्णाजी त्र्यंबक रानडे यांचे `ज्ञानप्रकाश' आणि गोविंद विठ्ठल कुंटे  यांचे `प्रभाकर' या दोन्ही वृत्तपत्रांविषयीचा मजकूर म.चि.संघाच्या `अमित्रजित्'च्या आधारे)


`हिंदुस्थान समाचार' या बहुभाषी वृत्तसंस्थेचे संस्थापक शिवराम शंकर तथा
 दादासाहेब आपटे
पूर्वायुष्यात संघाबद्दल दुरावा असून किंवा तितकेसे औत्सुक्य नसूनही उत्तरायुष्यातील संपूर्ण जीवन संघमय बनून गेलेली काही श्रेष्ठ मंडळी आहेत; त्यांमध्ये मा.दादासाहेब आपटे यांची गणना अग्रस्थानी करावी लागेल. त्यांचे आधीचे राहणीमान मुंबई हायकोर्टातील वकिलास शोभेल असे ऐटदार होते. नंतर मात्र ते पत्रकारीला शोभेल असे साधे आणि व्रतस्थ बनले.

मा. दादासाहेबांचे जन्मस्थान बडोद्याचे. पूर्वी केंद्रीय कायदामंत्री असलेले हरीभाऊ गोखले यांचे ते मामा. दादासाहेबांचे शिक्षण बडोद्यास झाले. बी.ए.च्या पदवीनंतर कायद्याचा अभ्यास करण्यासाठी ते मुंबई महानगरीत येऊन दाखल झाले. पार्ले हायस्कूलमध्ये त्या कालखंडात  काही दिवस संस्कृत शिक्षक म्हणून त्यांनी अध्यापनाचे काम केले. सर्वश्री पु.ल.देशपांडे, आबाजी थत्ते हे त्यांचे तत्कालीन विद्यार्थी होत.
वकिलीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मुंबईच्या उच्च न्यायालयात त्यांनी विधिज्ञ म्हणून व्यवसायास प्रारंभ केला. त्यांचा हा व्यवसाय  अर्थप्राप्तीच्या दृष्टीने यथातथाच म्हणावा लागेल. ते त्या काळी दादरला राहात असत. तिथल्या प्रसिद्ध नाईक बिल्डींगमध्ये त्यांचे वास्तव्य असे. या नाईकांचा शिळा(लिथो) प्रेस होता. दादासाहेबांना चित्रकला चांगली अवगत होती. त्यामुळे नाईकांच्या परिचयातून त्यांच्या मुद्रणालयात `लिथो आर्टिस्ट' म्हणून त्यांनी कार्यारंभ केला. हळूहळू या व्यवसायातील जाणकारी वाढून तिथेच त्यांनी भागीदार म्हणून दायित्व पत्करले. विधिज्ञ म्हणून त्यांचे स्वतंत्र कार्य जाणवण्याइतके नव्हते तरी तत्कालीन सुप्रसिद्ध मान्यवर पुढारी स्वर्गीय कन्हैयालाल मुन्शी यांचे सहकारी वकील म्हणून ते काम पाहात असत. त्या सुमारास त्यांनी शेअरबाजारातही गुंतवणूक सुरू केली होती. एवंच, दादासाहेबांचा तत्कालीन व्याप त्रिस्थळी स्वरूपाचा, म्हणूनच खूप मोठा होता. या एकाच वेळी ते मुन्शीजींचे ज्युनियर वकील, लिथो प्रेसचे भागीदार आणि शेअर व्यवसायिक अशा तीन आघाड्यांवर काम करीत होते. त्यांचे व्यक्तिमत्व रुबाबदार म्हणता येईल असे होते. राजा विक्रमादित्य हा त्यांच्या खास अभ्यासाचा विषय होता. आणि त्यावर त्यांनी अभ्यासपूर्ण प्रबंधही लिहिला होता. या सुमारास ते संघाच्या निकट येऊ लागले होते पण संघापासून ते अलिप्तच असत. `शाखेत येऊन काय उपयोग होणार आहे?' असे ते प्रारंभकाळी म्हणत असत. हळूहळू तेही संघात रुळले आणि नागपूर येथील एका संघ शिक्षावर्गात आवर्जून उपस्थितही राहिले. या वर्गानंतरच्या बैठकीत देशाच्या विविध भागांत  संघकार्र्यार्थ प्रचारकांची पाठवणी निश्चित करण्यात आली. त्यामध्ये मा.दादासाहेबांना त्रिचनापल्ली येथे जाण्यास सुचविण्यात आले आणि अर्थातच ते गेलेही!
या प्रसंगानंतरचे दादासाहेब पूर्णत: वेगळेच झाले. केरळनंतर काही काळ उत्तर प्रदेश व बंगाल येथेही त्यांनी प्रचारक म्हणून कार्य केले. तथापि या सर्वांपेक्षा त्यांचे खरे कार्य दिल्लीतच प्रत्ययास आले. गांधीहत्येनंतर संघावर बंदी आली त्या काळात ते दिल्लीत होते. सरदार पटेलांपासून दिल्लीस्थित सर्व उच्च वर्तुळांत त्यांनी आपला संपर्क प्रस्थापित केला होता. इतर काही वरिष्ठ कार्यकर्त्यांसमवेत त्यांनी या काळात खूप धावपळ केली.
एव्हाना संघकार्य खूपच विस्तारले होते. संघाचा विशुद्ध पाया आणि अनुपम कार्यशैली यांमुळे कार्यकर्त्यांच्या मनात वेगळाच उठाव निर्माण झाला होता. या विस्ताराबरोबरच विरोधाचे प्रमाणही स्वाभाविकच वाढत गेले होते. म्हणून प्रसार व प्रचाराची आघाडी मजबूत करण्यासाठी स्वतंत्र वृत्तसंस्था सुरू करण्याचे निश्चित झाले आणि ती जबाबदारी मा.दादासाहेबांकडे आली. विभागीय बातम्या, विभागीय भाषेत, विभागीय वृत्तपत्रांना पोचविणे(रिजनल न्यूज इन रिजनल लँग्वेज फॉर रिजनल पेपर्स) असे या वृत्तसंस्थेचे उद्दिष्ट होते. दादासाहेबांचे लेखन-कौशल्य, भाषाप्रभुत्व आणि प्रचंड संपर्क यांमुळे `हिंदुस्थान समाचार' ही वृत्तसंस्था दिल्लीच्या आघाडीवर अल्पावधीतच अग्रेसर बनली.
मुंबईला पवई येथे पूज्य गोळवलकर गुरुजींनी एक महत्वाची बैठक घेतली. या बैठकीत मास्टर तारासिंग, संत तुकडोजी महाराज असे मान्यवर उपस्थित होते. याच बैठकीत सखोल चिंतन आणि विचार विमर्श होऊन विश्व हिंदू परिषदेची स्थापना घोषित करण्यात आली. संघटनेच्या नावापासून प्रत्येक बाबीवर पुरेपूर विचार विनिमय झालेला होता. या नव्या कार्याचे पहिले महामंत्री म्हणून दादासाहेब आपटे यांची नियुक्ती करण्यात आली. या नव्या पदाचे दायित्व स्वीकारल्यानंतर त्यानी केवळ देशातच नव्हे, तर संपूर्ण विश्वात चौफेर संचार केला. बावीस देशांतून त्यांचा प्रवास झाला होता. विश्व हिंदू परिषदेच्या रूपाने, मरगळ झटकलेली अशी विशाल संघटना त्यांनी अल्पावधीतच विकसित केली.
मा.दादासाहेब आपटे हे प्रकांड पंडित होते. संस्कृत व इंग्रजी या भाषांवर तर त्यांचे निर्विवाद प्रभुत्व होते. पूर्वकालीन आयुष्यक्रमातील पत्रकारिता आणि विशाल संपर्क यांमुळे त्यांचा अनुभव अत्यंत समृद्ध होता. त्या बळावरच साऱ्या जगात प्रवास करून त्यांनी आपल्या कार्यात अनेकविध देशांतील लोक जोडून घेतले.
पुण्यातल्या पर्वतीनजिक मित्र मंडळाजवळ त्यानी एक जागा घेतलेली होती. त्यास `कौशिकाश्रम' हे नाव दिले. दादासाहेबांच्या आई तिथे पुष्कळ काळ राहात असत. त्या त्याच स्थानी वारल्या. नंतर त्या सर्व मालमत्तेला न्यासाचे स्वरूप देण्यात आले. त्या प्रांगणातील एका स्तंभावर त्यांनी स्वहस्ते काही चित्रे केलेली आहेत. वृद्धापकाळी मा.दादासाहेब तिथेच राहात असत. आजही संघाचे ज्येष्ठ अधिकारी आणि श्रेष्ठ प्रचारक कौशिकाश्रमात अनेकदा वास्तव्य करतात. त्यामुळे अनेक प्रसंगी कौशिकाश्रमास चिंतनाश्रमाचे महत्व स्वाभाविकच मिळत असते.

माध्यमसाक्षरता हाच खरा उतारा
अलीकडील काळात `फेक न्यूज'नी माध्यमविश्व ढवळून निघते आहे. इंग्रजी शब्दकोशातील नोंदीनुसार `फेक न्यूज' ही शब्दयोजना १९व्या शतकाच्या अखेरीस अस्तित्वात आली. प्रारंभिक काळात राजकीय संदर्भात ती वापरली जात असे. `फेक' या शब्दाचा विशेषनाम म्हणून वापर १९व्या शतकाआधी  नव्हता. `फेक न्यूज'च्या अर्थाबाबत आज संदिग्धता आहे. ब्रिटिश प्रतिनिधीगृहाच्या समितीने `फेक न्यूज'संबंधी सरकारला २०१८ सालातील ऑक्टोबर महिन्यामध्ये अंतरिम अहवाल सादर केला. `फेक न्यूज' या शब्दप्रयोगाऐवजी `मिसइन्फर्मेशन' आणि `डिसइन्फर्मेशन' असे दोन पर्यायी शब्द त्यात सुचविले होते. त्यांपैकी `डिसइन्फर्मेशन' -म्हणजे दिशाभूल करणाऱ्या बातम्या हा पर्याय ब्रिटिश सरकारने `फेक न्यूज' या शब्दसंहितेसाठी पर्याय म्हणून स्वीकारला.
`फेक न्यूज' म्हणजे हेतूपूर्वक दिलेल्या, अयथार्थ, दिशाभूल करणाऱ्या बनावट बातम्या. वाचणाऱ्याची वा ऐकणाऱ्याची फसवणूक करून आपला हेतू साध्य करणे हा बनावट बातम्या देण्यामागील उद्देश असतो. राजकीय उद्दिष्टांसाठी बनावट बातम्यांचा वापर हजारो वर्षांपासून केला जातो. `अश्वत्थामा मृत्यूमुखी पडला हे खरे. अश्वत्थामा नावाचा तो माणूस की हत्ती ते मात्र ठाऊक नाही.' असे धर्मराजाने द्रोणाचार्यांना केलेले कथन ही एक प्रकारे बनावट बातमीच होती. इंटरनेटचा अवतार व प्रसार होण्यापूर्वीच्या काळात माहितीचे वितरण करणे सामान्य माणसाच्या आवाक्यापलीकडचे होते. माध्यमांना नियंत्रित करणे सुलभ होते. इंटरनेटच्या आणि सामाजिक माध्यमांच्या आगमनानंतर माहितीचे वितरण जनसामान्यांना परवडेल अशा खर्चात होऊ लागले. हवा तो मजकूर वा संदेश हव्या त्या ठिकाणी पोहोचवता येणे कोणालाही शक्य झाले. चांगला आणि वाईट, खरा आणि खोटा असा सर्व प्रकारचा मजकूर वेगाने पसरू लागला. फेसबुक आणि टि्वटरमुळे माहितीच्या देवाणघेवाणीची व्याप्तीही वाढली.
यात एक मूलभूत बदल झालेला दिसतो. पूर्वीच्या काळी पत्रकार, तसेच वृत्तसंस्था बातम्या देण्याचे काम करीत असत. कोणी बातम्या द्यायच्या, कोणत्या बातम्या प्रसिद्ध करायच्या आणि कोणत्या करायच्या नाहीत याचे काही ठोकताळे आणि निर्बंध त्या काळी व्यवहारात असत. त्यांचे पालन करतच सर्वसाधारणपणे बातम्या दिल्या जात असत. बातमीवर किमान संपादकीय संस्कार केले जाणे ही अत्यावश्यक बाब समजली जात असे. आता बातमी देणे ही केवळ व्यवसायिक पत्रकारांची मक्तेदारी राहिलेली नाही. इंटरनेटचा वापर करणारी कोणतीही व्यक्ती आता तिला हव्या त्या व हव्या तशा बातम्या देऊ शकते. लिखित बातमीवर  प्रसिद्धीपूर्वी संपादकीय संस्कार केले जाणे ही पूर्वअट जवळपास संपुष्टात आली आहे. इंटरनेटवर अनियंत्रित बातम्यांचा प्रवाह सतत सुरू असतो. गुगल, टि्वटर आणि फेसबुक यासारख्या तंत्रज्ञान कंपन्या या जणू आताशा वृत्तसंस्था म्हणूनच काम करत असल्याचे निरीक्षण कोलंबिया विद्यापीठाच्या `टो सेंटर फॉर डिजिटल जर्नालिझम' या विभागाने २०१८ साली मार्च महिन्यात विभागीय अहवालात नोंदवले आहे.
गेल्या तीन वर्र्षांपासून `फेक न्यूज' ही संज्ञा विशेष चर्चेत आहे. विशेषत: अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्न्म्प यांची निवड झाल्यापासून या संज्ञेची सतत चर्चा होताना दिसते. केवळ बातम्याच नव्हे, तर काही माध्यमेही बनावट असल्याची टीका ट्न्म्प सातत्याने करत असतात. बनावट बातम्यांचा हा घटक ट्न्म्प यांच्या विजयात कितपत कारणीभूत होता अशी चर्चा दिसते. उश्रररी ठशश्रेींर्ळीी या ३३वर्षांच्या पत्रकाराने दिलेल्या बनावट बातम्या आणि लेख, सतत सात वर्षे छापल्याबद्दल आणि त्यांना ऑनलाइन प्रसिद्धी दिल्याबद्दल ऊशी डळिशसशश्र या जर्मनीतील एका साप्ताहिकाने २९ डिसेंबर २०१८ रोजी वाचकांची जाहीर माफी मागितली. दिशाभूल करणाऱ्या बनावट बातम्या दिल्याची कबूली देऊन उश्रररी ठशश्रेींर्ळीी यांनी राजीनामाही दिला. `सीएनएन जर्नलिस्ट ऑफ द इयर' पुरस्काराने २०१४ साली त्यांना सन्मानित करण्यात आले होते हे लक्षात घ्यायचे. नायजेरियात या वर्षी सार्वत्रिक निवडणुका होत असून, या निवडणुकीच्या प्रक्रियेला बनावट बातम्यांचा सर्वात मोठा धोका असल्याचे मत तेथील माहितीमंत्री लाय महंमद यांनी व्यक्त केले आहे. बनावट बातम्यांचा धोका येथील सत्ताधाऱ्यांना आणि विरोधी पक्षांनाही वाटत आहे.
इंटरनेटचा वापर करून जाहिरातींद्वारे पैसे मिळविण्याच्या हेतूने निखालस असत्य, पण सनसनाटी बातम्या दिल्या जातात, अमेरिकेतील २०१६ या वर्षातील अध्यक्षीय निवडणुकीदरम्यान मॅसेडेनियातील मुलांनी दिलेल्या बातम्या हे या संदर्भातील चपखल उदाहरण ठरावे. या निवडणूक काळात बनावट बातम्या देणारी अनेक संकेतस्थळे अस्तित्वात आली. त्यांचे मूळ एके काळच्या युगोस्लाव्हियाचा भाग असलेल्या मॅसेडोनियात असल्याचे स्पष्ट झाले. हा २१ लाख लोकसंख्येचा चिमुकला देश. खोट्या बातम्या देण्याचा उद्योग किशोरवयीन मुले एखाद्या कुटिरोद्योगासारखा, या देशातील तशश्रशी या शहरात चालवीत असल्याचे `बीबीसी'च्या प्रतिनिधीला आढळून आले. या मुलांनी ट्न्म्प यांच्या बाजूने सनसनाटी बातम्या दिल्या. त्या फेसबुकवर प्रसृत केल्या. या बातम्यांना अमेरिकी वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या बातम्या जसजशा `क्लिक' होत गेल्या तसतशी या मुलांना जाहिरातींमधून कमाई होऊ लागली. तशश्रशी मधील सरासरी मासिक उत्पन्न ३५० युरो एवढे आहे. बनावट बातम्यांचा उपद्व्याप करणाऱ्या मुलांना याच्या तिप्पट ते चौपट  कमाई होत होती. यामुळे त्यांचे कुटुंबीयही बेहद्द खूश होते. या धनलाभामुळे हे गाव `ट्न्म्प व्हिलेज' असे काही काळ ओळखले जात होते. बनावट मजकूर तयार करून वा बनावट संकेतस्थळे व्यक्तिगत पातळीवर चालवून उत्पन्न मिळविले जाते. ज्या मजकुराला जास्तीतजास्त वाचक लाभतात त्या मजकुरासाठी माध्यम कंपन्या जाहिराती देतात. हे लक्षात घेऊन आपली `पोस्ट' जास्तीतजास्त `क्लिक' होईल याची खबरदारी घेतली जाते. आकर्षक आणि प्रक्षोभक अशा शीर्षकांचा त्यासाठी वापर केला जातो. बातम्यांबरोबरच बनावट फोटो आणि चित्रफितीदेखील पैसे मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात. ही कमाई भरघोस असल्याने बनावट बातम्यांचे प्रमाण वाढले असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदविले आहे.
सरकारी पातळीवरून दिली जाणारी खोटी माहिती, राजकीय पक्षपातीपणा करणारी माध्यमे, विनोदासाठी खोट्या माहितीचे प्रसारण ही सुद्धा `बनावट बातम्यां'ची उगमस्थाने आहेत. खऱ्या बातम्यांच्या तुलनेत खोट्या बातम्यांचे प्रसारण अत्यंत वेगाने होते. `मॅसॅच्यूसेटस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलाजी'(एमआयटी' या संस्थेने केलेल्या संशोधनानुसार टि्वटरवरील खोट्या बातम्यांच्या तुलनेत खऱ्या बातम्या १५०० जणांपर्यंत पोहोचण्यासाठी सहा पट अधिक वेळ लागतो. खोट्या बातम्या रिटि्वट होण्याची शक्यता ७० टक्के असते. राजकीय स्वरूपाच्या खोट्या बातम्या हमखास रिटि्वट होतात. टि्वटरवर दहा वर्षांत ३०लाख वाापरकर्त्यांनी देवाणघेवाण केलेल्या १लाख २६हजार टि्वट्सचा अभ्यास केला. या बातम्या ४५ लाख वेळा `क्लिक' झाल्या होत्या.
वास्तवाधारित बातम्यांच्या तुलनेत खोट्या बातम्यांच्या प्रसारणाची व्याप्ती, वेग आणि परिणाम अधिक आणि सखोल असतो, असा निष्कर्ष संशोधकांनी अनेक अभ्यासांती काढला आहे. बनावट बातम्या रिटि्वट होण्याचे प्रमाण जास्त आहे, कारण या बातम्यांबाबत मानवी मनाला चटकन कुतूहल वाटते. दहशतवाद, नैसर्गिक आपत्ती, विज्ञान वा आर्थिक घडामोडींच्या बातम्यांच्या तुलनेत राजकीय विश्वातील बनावट बातम्या जास्त लोकांपर्यंत पोहोचतात. राजकारणााव्यतिरिक्त बनावट बातम्या १०हजार जणांपर्यंत ज्या वेगाने पोचतात, त्यापेक्षा तिप्पट वेगाने राजकीय क्षेत्राबाबतच्या बनावट बातम्या २० हजारांपेक्षा जास्त वाचकांपर्यंत पोहोचतात. ज्या बनावट बातम्यांमध्ये नावीन्य आणि अनपेक्षितता या दोन घटकांचा समावेश असतो त्यांना त्वरित आणि व्यापक प्रतिसाद मिळतो.
इंटरनेटच्या वापरकर्त्यांमध्ये माध्यमसाक्षरता निर्माण करणे हा बनावट बातम्यांना आळा घालण्याचा हुकमी उपाय, हे आता माध्यम कंपन्यांना आणि सरकारी यंत्रणांनाही पटलेले आहे. अगदी मराठीतील माध्यमेही `व्हायरल सत्य'(साम टीव्ही), `शहानिशा'(महाराष्ट्न् टाइम्स) असे उपक्रम राबवत प्रेक्षक आणि वाचकांमध्ये बनावट बातम्यांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील बनलेली आहेत. पत्रकार आणि माध्यम कंपन्या यांच्या मदतीने ऑनलाइन गैरव्यवहारांबाबत जागरूकता निर्माण करणारा अभ्यासक्रम इटलीमधील सरकारनेच अलीकडे तयार केला आहे. अमेरिकेतील अनेक राज्यांनी माध्यम साक्षरतेसाठी कायदे केले आहेत. या विषयाचा शिक्षणव्यवस्थेतील अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. व्हॉट्स-अॅप, फेसबुक यांनीही स्थानिक संघटनांच्या मदतीने बनावट बातम्यांबाबत जागरूकता निर्माण करणारे उपक्रम हाती घेतले आहे. बनावट बातम्या ओळखण्यासाठी काही सूचनावजा खुणा फेसबुकने जाहिरातींद्वारे प्रसिद्ध केल्या आहेत. व्हॉट्स-अप चे सर्वाधिक ग्राहक भारतात आहेत. बनावट बातम्यांच्या विरोधात व्हॉट्स-अपने भारतात गेले पाच महिने व्यापक मोहीम चालविली आहे. भारतातही बनावट बातम्यांचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा बनलेला आहे. बनावट बातम्यांमुळे प्राणांना मुकण्याचे अरिष्टही काही जणांवर ओढवलेले आपण पाहिले. भारतीय संदर्भात बनावट बातम्यांचा विचार गांभीर्याने करावा लागेल. या सगळया घुसळणीमधून माध्यसाक्षरतेकडे वाटचाल होणार असेल तर बनावट बातम्यांचा प्रश्न ही इष्टापत्तीच ठरावी!
                            -(`अर्थबोधपत्रिका'च्या आधारे)
***

नान्य पंथ:
(याशिवाय दुसरा मार्गच नाही )
भारतीय राज्यघटनेचा अंतिम मसुदा, मसुदा समितीचे अध्यक्ष या नात्याने 
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना समितीसमोर सादर केला. 
या प्रसंगी बाबासाहेबांनी केलेल्या सविस्तर भाषणाचा हा संक्षेप.
प्रत्येक भारतीयाने त्यांच्या सांगण्याचे मनन  करण्याची आवश्यकता आहे.
उद्याच्या सार्वत्रिक मतदानाच्या पार्श्वभूमीवर घटनाकारांचे हे प्रतिपादन समजून घ्यायला हवे.
घटना कितीही चांगली असली तरी ती राबविणारी मंडळी अयोग्य असली तर परिणामत: ती वाईटच ठरेल. त्याउलट वाईट स्वरूपाची घटनाही योग्य मानसिकतेसह राबविणारी मंडळी चांगली असली तर तीच घटना चांगलीही ठरेल. विधिमंडळ, न्यायपालिका आणि कार्यपालिका हे अवयव राज्यघटना निर्माण करेल. मात्र त्या अवयवांच्या कार्यक्षमतेचा दर्जा सिद्ध करतील ते -`लोक', आणि त्यांनी प्रशासन सांभाळण्यासाठी निवडून दिलेले राजकीय पक्ष यांच्या सहभागाच्या संदर्भाशिवाय घटनेच्या औचित्याबाबत काही निष्कर्ष व्यक्त करणे उचित नाही. दोन प्रमुख घटकांकडून राज्यघटनेविषयी नाराजीची भावना प्रकट झाली आहे. घटनेवर का टीका करतात? घटना खरोखरच टीकेला पात्र आहे काय? मी ठामपणे म्हणू इच्छितो की `नाही'! कम्युनिस्टांना श्रमिकांच्या हुकुमशाहीवर आधारलेली घटना हवी आहे. त्यामुळे संसदेवर आधारलेल्या लोकशाही राज्यघटनेवर ते टीका करतात. समाजवादी मंडळींना दोन गोष्टी हव्या आहेत. कारण जर ते सत्तेवर आले नाहीत तर त्यांना केवळ सरकारला विरोध करण्याचेच नव्हे तर सरकार उलथवून टाकण्याचे अमर्याद स्वातंत्र्य हवे आहे.
राजकीय लोकशाही प्रदान करणारी सांसदीय प्रणाली ही एकमेव आदर्श व्यवस्था आहे असे माझे म्हणणे नाही. खाजगी मालमत्ता कोणत्याही मोबदल्याविना सरकारजमा करण्याची सुतराम संधी देऊ नये असेही माझे मत नाही. मात्र मूलभूत अधिकार सर्वंकष असू नयेत, आणि त्यांच्यावर घातलेल्या मर्यादा कधीही उठवण्यात येऊ नयेत असेही माझे ठाम मत नाही. राज्यघटनेत समाहित असलेली मूळ तत्वे ही आजच्या पिढीचा दृष्टिकोण दर्शवीत आहेत. त्यासाठी घटना समितीच्या सदस्यांना तरी का दोष द्यावा? अमेरिकन राज्यघटना तयार करण्यात महत्वाची भूमिका पार पाडणारे श्रेष्ठ मुत्सद्दी थॉमस जेफरसन यांनी म्हटले होते, `बहुमताच्या आधारे प्राप्त झालेला स्वयंनियंत्रणाचा अधिकार बजावणाऱ्या प्रत्येक पिढीला आपण एक विशिष्ट `नेशन' संबोधू शकतो. मात्र अशा समूहालाही, अन्य देशांत राहणाऱ्या जनसमूहाला नियंत्रित करण्याचा अधिकार नसतो. त्याहीपेक्षा जास्त, आगामी पिढ्यांना बांधून ठेवण्याचा अधिकार तर नसतोच नसतो...' `एखाद्या राष्ट्नतील जनसमूहाला प्रशासित करण्याचे साधन, या नात्याने निर्माण करण्यात आलेल्या संस्थात्मक व्यवस्था सर्वथा अपरिवर्तनीय आहेत ही समजूतच चुकीची आहे. तरीही आपले कायदातज्ज्ञ आणि धर्मप्रमुख ही समजूत ठामपणे मनाशी बाळगतात. आपल्या पूर्वीच्या पिढ्यांना कायदे करण्याचा, ते अपरिवर्तनीय आहेत अशा दृढ समजुतीचा वारसा आपल्यावर लादण्याचा अधिकार होता, असे ते मानतात. आपल्यातही तशाच प्रकारे पुढील पिढ्यांना बांधून ठेवणारे नियम, -कायदे करण्याचा अधिकार आहे असे ते समजतात. थोडक्यात हे जग जिवंत पिढ्यांपेक्षा गतपिढ्यांच्या मालकीचे आहे असे त्यांना वाटते..!' जेफरसन यांचे हे उद्गार केवळ खरे आहेत; एवढेच नाही तर सर्वथा यथार्थ आहेत!
क्रॅनडाच्या घटनेप्रमाणे भारतीय राज्यघटनेवर घटना समितीने सार्वकालिक अचूकतेचे अंतिम कुलूप ठोकलेले नाही. किंवा अमेरिकन घटनेप्रमाणे आपल्या घटना समितीने दुरुस्तीची प्रक्रियाही आत्यंतिक जटिल अटी-शर्तींनी बांधून ठेवलेली नाही. उलट आपल्या राज्यघटनेत दुरुस्तीची प्रक्रिया सर्वात सुलभ आणि सुटसुटीत ठेवण्यात आली आहे. देशाच्या प्राप्त परिस्थितीत इतक्या सुलभ दुरुस्ती-प्रक्रियेची तरतूद राज्यघटनेत असल्याचे दुसरे उदाहरण दाखवून द्यावे, असे माझे येथील टीकाकारांना आव्हान आहे. प्रौढ मतदानाच्या आधारे दोन तृतीयांश बहुमत प्राप्त करण्याची त्यांची क्षमता नसेल तर (तीच त्यांची समस्या आहे), तेवढ्या अटीच्या कारणावरून त्यांना(टीकाकारांना) वाटणारे असमाधान हे सर्वसामान्य लोकभावनेचे द्योतक आहे.
माझ्या मनात देशाच्या भविष्याचा विचार इतका तीव्रतेने येतो की, त्यावरही माझे विचार मला मांडावेसे वाटतात; जानेवारी १९५० मध्ये भारत हे सर्वाथाने एक स्वतंत्र राष्ट्न् बनेल. भविष्यात या त्याच्या स्वातंत्र्याचे काय होईल? हे स्वातंत्र्य दीर्घकाळ टिकवून ठेवले जाईल की पुन्हा धोक्यात येऊ शकेल? हा प्रश्न मला भेडसावतो. असे तर नाही की, भारत पूर्वी कधीच स्वतंत्र देश नव्हता? -परंतु ते स्वातंत्र्य त्याने गमावले ही वस्तुस्थिती आहे. तसेच तो पुन्हा एकदा गमावेल काय ही भयशंका मला अस्वस्थ करते. केवळ स्वातंत्र्य गमावणे एवढ्यापुरतीच ही अस्वस्थता नाही तर विकृती, फितुरी यांच्यामुळे ते आपण गमावले होते हे जळजळीत वास्तव अधिक बेचैन करणारे आहे. आपल्या सरदारांनीच लाच खाऊन मोहंमद बिन  कासीमकडे फितुरी केली. जयचंदाने तर पृथ्वीराज चौहान आणि सोळंकी साम्राज्याच्या पराभवासाठी महंमद घोरीला निमंत्रण दिले. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्यासाठी लढत होते, तेव्हा अन्य मराठा आणि राजपूत सरदार मोगलांना साहाय्य करीत होते. शीख साम्राज्य उध्वस्त करण्याचा प्रयत्न ब्रिटिश करीत होते, तेव्हा गुलाबसिंग स्वस्थ बसला होता. १८५७ मध्ये देशाच्या खूप मोठ्या भागातून ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्ययुद्ध छेडले गेले होते, तेव्हा शिखांनी स्वस्थ बसून प्रेक्षकाची भूमिका अंगिकारली होती... हाच इतिहास पुनरावृत्त होईल काय या शंकेने माझ्या मनात घर केले होते. या जुन्या शत्रूबरोबरच पंथ, जाती, संप्रदाय, तसेच विविध परस्परविरोधी आकांक्षा बाळगणाऱ्या राजकीय पक्षांच्या माध्यमातून समाजातील भेदमूलक विस्कळीतपणा -यांचीही चिंता मला सतावते. भारतीय जनता या भेदांतून उठून `राष्ट्न् सर्वोपरि' मानेल, की देशापेक्षा पंथ-जाती-संप्रदायाच्या संकीर्ण निष्ठा देशहितापेक्षाही मोठ्या मानेल? मला माहीत नाही, पण एवढे मात्र निश्चित की, राजकीय पक्ष आणि पंथ-संप्रदाय-जाती जर देशापेक्षा डोईजड झाल्या तर देशाचे स्वातंत्र्य धोक्यात येईल; कदाचित पुन्हा आपण ते कायमचे गमावू!
या साऱ्या धोक्यांपासून आपले स्वातंत्र्य सुरक्षित आणि अबाधित राखण्याचा गंभीर संकल्प आपण केला पाहिजे. रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत स्वातंत्र्याचे संरक्षण करण्याचा दृढनिश्चय आपण केला पाहिजे. आपल्या देशाला लोकांचे, लोकांसाठी आणि लोकांद्वारे संचालित होणारे सरकार प्राप्त होईल. पण याही बाबतीत मला प्रश्न पडतो की, आपल्या लोकशाही संस्थांचे भविष्यात काय होईल? आपल्या राज्यघटनेचे काय होईल? आपण ती जोपासू की पुन्हा गमावू हाही प्रश्न मला अस्वस्थ करतो. भारत लोकतांत्रिक व्यवस्थेबाबत अजाण निश्चितच नाही. एके काळी भारत हा अनेक लोकराज्यांचा संघच होता. जेथे राजेशाही होती तेथेही राजे सर्वश्रेष्ठ नव्हते. एकतर तेही लोकनियुक्त असत किंवा त्यांच्या हातात मर्यादित सत्ता असे. संसद आणि सांसदीय पद्धतही भारताला नवीन नाही. बौद्ध भिक्खूंचे संघ हे संसदेचेच आद्य रूप होते, त्यांना संसदीय प्रक्रियेचे सर्व नियम-संकेत माहीत होते आणि त्यांचे ते पालनही करीत. सदस्यांच्या आसनांची व्यवस्था, सूचना, प्रस्ताव, गणसंख्या, प्रतोद, मतगणना, मतप्रक्रियेसह मतदान, सुधारणा-दुरुस्ती सूचना, नियमन... इ.सर्व बाबींविषयीचे नियम-संकेत तेही पाळत होते. उघडच आहे, भगवान बुद्धाने ही सर्व आचारसंहिता, त्या काळात देशात प्रचलित असलेल्या राजसभांच्या परंपरेकडूनच स्वीकारली असणार.
ही लोकशाही परंपरा पुढील काळात भारताने गमावली. तशीच ती भविष्यातही पुन्हा आपण गमावू काय? दीर्घकाळपर्यंत(आक्रमणांमुळे) भ्रष्ट होऊन विस्मरणात गेलेल्या आणि त्यामुळे आज अगदी नवीन असल्यासारखी भासणाऱ्या लोकशाहीचा अंगिकार करणाऱ्या आपल्या देशात, हुकुमशाहीचा धोका सतत जाणवत राहतो. नव्या स्वरूपातील लोकशाही वरकरणी टिकेल, तरीही सुप्तपणे एकाधिकारशाही चंचुप्रवेश करेल अशीही शक्यता आहे. अशा स्थितीत केवळ तांत्रिक स्वरूपात नव्हे तर वास्तव स्वरूपात लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी काय करणे आवश्यक आहे याचा विचार करायला हवा.
माझ्या मते सर्वांत पहिली साध्य करण्याची बाब म्हणजे आपली आर्थिक आणि सामाजिक उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी आपण घटनात्मक मार्गाचा कसोशीने अवलंब करायला हवा. याचाच अर्थ असा की रक्तरंजित क्रांतीच्या पद्धतीचा आपण त्याग करायला हवा. त्याचबरोबर असहकार, कायदेभंग, सत्याग्रह याही मार्गांना आपण सोडून द्यायला हवे. जोपर्यंत आर्थिक-सामाजिक उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी सनदशीर मार्ग उपलब्धच नव्हते तोपर्यंत अशा घटनाबाह्य आंदोलनपद्धतीचा अवलंब निश्चित समर्थनीय होता. मात्र घटनादत्त उपाय आणि मार्ग प्राप्त झाल्यानंतर त्या घटनाबाह्य मार्गांचे समर्थन करता येणार नाही. हे सारे मार्ग अंतिमत: अराजकाकडे नेणारे आहेत, त्यामुळे लवकरात लवकर ते सोडून देणे आपल्या हिताचे आहे. जॉन स्टुअर्ट मिल या विचारवंताने या संदर्भात दिलेला सल्ला अतिशय मोलाचा आहे. `लोकशाही टिकवून ठेवण्यामध्ये ज्यांना ज्यांना स्वारस्य आहे त्यांनी आपले स्वातंत्र्य कधीही कोणा एका महापुरुषाच्या (तो वा ती कितीही थोर असली तरीही) चरणी समर्पित करता कामा नये.' देशासाठी आपले सारे जीवन व्यतीत करणाऱ्या महान व्यक्तींविषयी कृतज्ञ असण्यात काहीच गैर नाही, मात्र कोणत्याही महानतेलाही मर्यादा असतातच.
आयरिश देशभक्त डॅनियल ओ कॉनेल याने म्हटल्याप्रमाणे, आपल्या शीलाची किंमत देऊन कोणतीही स्त्री किंवा आपल्या स्वातंत्र्याची किंमत देऊन कोणतीही व्यक्ती कृतज्ञ राहू शकत नाही. हा सावधगिरीचा इशारा अन्य कोणत्याही देशापेक्षा भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. कारण भारतात व्यक्तिपूजा, संप्रदायमाहात्म्य किंवा भक्ती यांची राजकारणातही जितकी भूमिका असते तितकी अन्य कोणत्याही देशाच्या राजकारणात नसते. आत्म्याच्या मुक्तीचा एक मार्ग भक्ती हा असू शकतो, परंतु राजकारणात मात्र भक्ती हा अध:पतनाचा किंवा हुकुमशाहीला निमंत्रण देणारा मार्ग ठरतो. महत्वाची गोष्ट म्हणजे केवळ राजकीय लोकशाहीवर समाधान मानणे योग्य नाही. राजकीय लोकशाहीला सामाजिक लोकशाहीचीच जोड अत्यावश्यक आहे. सामाजिक लोकशाहीचा भक्कम आधार नसेल तर राजकीय लोकशाहीला कोणताही अधिकार उरणार नाही. सामाजिक लोकशाही म्हणजे नेमके काय? स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तीन्ही तत्वांचा जीवननिष्ठा या नात्याने सन्मान आणि अंगिकार केला जातो, तेव्हाच सामाजिक लोकशाही प्रस्थापित होते. या तीन तत्वांचा सुटा सुटा, स्वतंत्रपणे विचार करता येणार नाही. यांपैकी कोणत्याही एका तत्वाला तिलांजली दिली गेली तर लोकशाहीचा मूलभूत हेतूच उखडला जाईल.
आपल्या समाजातील सध्याच्या वातावरणात दोन गोष्टींची कमतरता आहे हे मान्य करायलाच हवे. सामाजिक स्तरावर आपली समाजरचना भेदमूलक असमानतेवर आधारलेली आहे. एका बाजूला अमर्याद वैभवसंपदा असलेले काही लोक आहेत, तर दुसरीकडे फार मोठा वर्ग अत्यंत दयनीय दारिद्य्राशी झुंज देत जगत आहे. आपण एका विसंगतीपूर्ण जीवनात प्रवेश करतो आहोत, तर सामाजिक आणि आर्थिक स्तरावर विषमतापूर्ण जीवन जपत आहोत. राजकीय क्षेत्रात आपण `प्रत्येक व्यक्तीला समान मत आणि प्रत्येक मताची समान पत' या तत्वाचा अंगिकार करीत आहोत. पण सामाजिक, आर्थिक बाबतीत मात्र आपल्या प्रस्थापित समाजरचनेमुळे प्रत्येक व्यक्तीला समान पत(दर्जा) हे तत्व नाकारत राहू. असे विसंगत जीवन आपण किती काळ जगत राहणार आहोत? फार काळ अशीच स्थिती राहिली तर, आपली राजकीय लोकशाही देखील धोक्यात येईल. लवकरात लवकर आपण ही विसंगती दूर करायला हवी. अन्यथा, विषमतेचे बळी ठरणारे लोक एक दिवस उसळून उठतील आणि घटना समितीने अत्यंत कष्टपूर्वक उभे केलेले हे राजकीय लोकशाहीचे मंदिर उध्वस्त करून टाकतील...
आपल्या समाजजीवनाची दुसरी महत्वाची उणीव म्हणजे बंधुभावनेचा अभाव. समस्त भारतीयांच्या मनातील `एकजन भावना, आत्मीयता म्हणजे बंधुभाव' या तत्वामुळे सामाजिक जीवनाला एकता आणि एकनिष्ठा यांचे अधिष्ठान प्राप्त होते. हे साध्य करणे सोपे नाही. एक राष्ट्न् या स्वरूपात आपल्या देशाचा विचार करणे हा एक प्रकारचा संभ्रम आहे. मला आठवते की राजकारणाने प्रेरित झालेल्या काही जणांनी एकदा `द पीपल ऑफ इंडिया' या शब्दांना आक्षेप घेत `इंडियन नेशन' असा शब्दप्रयोग करण्याची सूचना केली होती. हजारो जाती-जमातीत विभागला गेलेला जनसमूह `एक राष्ट्न्' या नात्याने कसा उभा राहू शकेल? मला प्रामाणिकपणे असे वाटते की, सामाजिक आणि मानसिक स्तरावर `एक राष्ट्न्' या स्वरूपात आपल्याला अजून विकसित व्हायचे आहे. याची जाणीव लवकरात लवकर निर्माण व्हायला हवी. ती झाल्यानंतरच आपण `राष्ट्न्' या नात्याने सिद्ध होण्याच्या मार्गांचा आणि उपायांचा गंभीरपणे शोध घ्यायला प्रारंभ करू. भारतात जाती व्यवस्था आहे. जाती समाजात विभेद घडवून आणतात आणि त्यामुळे त्या `अराष्ट्नीय' ठरतात. जाती जातींमध्ये टोकाची मत्सराची, आकसाची आणि परस्पर विद्वेषाची भावना असते. त्यामुळे राष्ट्न्भावनेची जोपासना आणखीनच दुरापास्त होऊन बसते.
आपण या साऱ्या अडचणी निकराने दूर केल्या पाहिजेत, कारण आपल्याला राष्ट्न्भावना जागविण्याचे स्वप्न साकार करायचे आहे. ही भावना जागविली तरच बंधुभावाची प्रस्थापना होईल. बंधुभावनेच्या अभावी स्वातंत्र्य आणि समता या कल्पना म्हणजे केवळ वरवरची रंगाची पुटे (लेरींी ेष रिळपीं) ठरतील. या समाजात राजकीय सत्ता ही काहीजणांची ठेकेदारी बनली आणि अन्य अनेक जनसमूह केवळ ओझ्याची गाढवेच नव्हे तर बळीचे बकरेही ठरत आले आहेत. या ठेकेदारीने सामान्यजनांस आपल्या उद्धाराची धडपड करण्याची संधी नाकारली. एवढेच नव्हे त्यांची सारी जीवनाकांक्षाच जणू शोषून घेतली. हे दडपलेले जनसमूह आता दबून राहण्यास कंटाळले आहेत. (ढळीशव ेष लशळपस र्सेींशीपशव), त्यांना स्वयंशासन हवे आहे (ढहशू रीश ळारिींळशपीं ींे र्सेींशीप). ही त्यांच्या मनातली तीव्र जाणीव आणि भावना वर्गसंघर्षात परिणत होण्यापासून वाचविण्याची पराकाष्ठा केली पाहिजे. अन्यथा ती भावना आपल्या घरातच भेद पाडेल आणि तो दिवस सर्वनाशाचा असेल. अब्राहम लिंकनने म्हटलेच आहे, `अंतर्गत भेदांनी पोखरलेले घर फार काळ उभे राहू शकत नाही...' त्यामुळे जितक्या वेगाने त्या जनसमूहाच्या आकांक्षांना सामावून घेतले जाईल तितके ते सर्वांच्या, देशाच्या हिताचे राहील, तसेच स्वातंत्र्याची जोपासना करणे आणि लोकशाहीचे सातत्य करणेही तितकेच सुलभ होत जाईल. ही गती जीवनाच्या सर्व क्षेत्रांत समता आणि बंधुता निर्माण करण्यातूनच प्राप्त करता येईल. म्हणूनच मी त्या दोन्ही तत्वांवर इतका आग्रही भर देत आहे.'
मला तुम्हा सर्वांना चिंताग्रस्त करायचे नाही. स्वातंत्र्यप्राप्ती ही खरोखरच अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. पण या स्वातंत्र्यानेच आपणावर मोठी जबाबदारी टाकली आहे हे विसरता कामा नये. आता कोणत्याही समस्येचे खापर ब्रिटिशांच्या माथी मारण्याची सोय आपल्यापाशी नाही. यापुढे काही चुकले तर तो आपलाच दोष असेल, आणि चुका होण्याचा धोका आहेच. काळ वेगाने बदलत आहे. लोक (त्याला आपल्या समाजाचाही अपवाद नाही) नव्या नव्या विचारधारांनी प्रेरित केले जात आहेत. त्यांना केवळ `लोकांचे सरकार' म्हणविणारी व्यवस्था नको आहे. त्यांना हवे आहे -`लोकांसाठीचे सरकार.' लोकांचे आणि लोकनियुक्त असे ते आहे की नाही, हेही त्यांच्यासाठी गौण आहे. आपणास खरोखरच `लोकांचे, लोकांनी निर्माण केलेले आणि लोकांसाठीचे' सरकार प्रतिपादित करणारी राज्यघटना संरक्षित ठेवायची असेल तर वाटेतील सर्व अडथळयांना अचूक ओळखून ते दूर सारण्यास तातडीने संकल्पबद्ध व्हायला हवे. देशभक्तीचा आणि देशसेवेचा तोच एकमेव मार्ग आहे.


वृत्तपत्रांची आर्थिक शुद्धता
स्वातंत्र्यपूर्व काळात जवळजवळ प्रत्येक श्रेष्ठ नेत्याचे वृत्तपत्र होते. आपल्याला जे मत मांडायचे आणि लोकमत तयार करायचे त्यासाठी हाताशी वृत्तपत्र आवश्यक होते. गांधीजींनी `यंग इंडिया' आणि `हरिजन' अशी दोन वृत्तपत्रे चालवली होती. त्याचा मजकूर बहुतांशी गांधीजी एकहाती लिहीत असत. या वृत्तपत्रांना त्या काळात जाहिराती किती मिळत असतील याची कल्पनाच केलेली बरी! इंग्रजी काळात भारतातील साक्षरतेचे प्रमाण जेमतेम तीस टक्के असावे; त्यातही वृत्तपत्र वाचू व समजू शकणाऱ्या वाचकांची संख्या मर्यादितच असणार हेही उघड आहे. तरीही आपल्या मताच्या प्रतिपादनासाठी हेच एक प्रभावी माध्यम उपलब्ध होते.
गांधीजी आपल्या वृत्तपत्रामध्ये स्वत:च्या अनुभवांचे आणि वाचकांच्या प्रतिउत्तरांचे संकलन प्रसिद्ध करत असत. वाचकांनी कोणत्याही विषयावर विचारलेल्या प्रश्नांना वृत्तपत्रांतून उत्तरे देत असत. त्यायोगे जनतेशी संवाद करण्याचे साधन, असे स्वरूप त्यांच्या वृत्तपत्रांना आलेले होते. त्या काळच्या मर्यादा लक्षात घेऊनही कित्येक पत्रे गांधीजींना येत असत. व्यक्तिगत असे आयुष्य त्यांना नव्हतेच; कारण त्यांनी व्यक्तिगत जीवनच सर्वांसमोर खुले ठेवले होते.
अशा परिस्थितीत त्याही काळातील वृत्तपत्र चालविण्यासाठी पैसे तर लागत असणारच, गांधीजींचे आश्रमी जीवन आणि दैनंदिन खर्च चालविण्यासाठी जी.डी.बिर्लांसारखे धनिक स्वयंस्फूर्तीने उभे असत! तथापि वृत्तपत्राचा खटाटोप मात्र लोकांच्या सहभागावरच केला जात असे. आपल्या प्रवासांत किंवा सभा संमेलनांत गांधीजी त्यांच्या वृत्तपत्रासाठी जाहीरपणे पैसे मागत असत. आपल्या भाषणाच्या शेवटी गांधीजी वृत्तपत्रासाठी निधी अर्पण करण्याचे लोकांना आवाहन करीत असत.
त्यासंबंधी कधीतरी ऐकली वाचलेली एक गोष्ट अशी की, एका गावातील सभा संपत आल्यावर गांधीजींनी नेहमीप्रमाणे आवाहन केले. चार-दोन कार्यकर्ते सुती वस्त्राची झोळी करून लोकांच्यात फिरत होते. लोक त्यात शक्य ते पैसे टाकत होते. सभा संपली आणि सारेजण मुक्कामावर आले. प्रहर रात्रीच्या वेळेला ते दोन कार्यकर्ते झोळी अंथरून त्यातील पैसे मोजत होते, जमलेल्या पैशांचा हिशोब आणि जमाखर्च मांडला गेलाच पाहिजे ही तर आर्थिक शिस्त होतीच. नाणी-नोटांचा गल्ला मोजताना त्यातील एक पावली अधेलीचे नाणे त्या कार्यकर्त्याच्या हातून खाली पडले आणि घरंगळत त्या बाजेशी कुठेतरी लुप्त झाले. खाली वाकून, इकडे तिकडे पाहून, उजेडासाठी कंदील घेऊन त्या कार्यकर्त्याने नाणे शोधले पण ते कुठे सापडेना. शेवटी त्या कार्यकर्त्याने स्वत:च्या खिशात हात घातला आाणि एक नाणे त्या गल्ल्यात टाकून हिशोब पूर्ण करू म्हणाला. कोपऱ्यात बसलेले गांधीजी तो प्रकार पाहात होते; त्यांनी सांगितले की, `स्वत:च्या खिशातून टाकलेले ते नाणे त्यात असूद्याच, पण ते हरवलेले नाणे शोधलेच पाहिजे. ते सापडेपर्यंत शोधा.' कार्यकर्त्याचे म्हणणे असे की, `ते नंतर जेव्हा सापडेल तेव्हा हिशोबात येईलच ना! त्यासाठी थांबायला नको म्हणून मी भरपाई केली आहे.' गांधीजींचे उत्तर असे की, `भरपाई आणि मिळकत असा विषय त्यात येतच नाही. ज्या कोणी ते पैसे आपल्या कार्यासाठी दिलेले आहेत, त्याच्या भावना त्या नाण्यात आहेत. त्या भावनांच्या आधारे आपले काम चालते; तीच तर आपल्या कार्याची शक्ती आहे. एरवी एवढ्या छोट्या वृत्तपत्राला पैसे देणारे लाखोपती मिळतील, परंतु एकाच व्यक्तीने लाख रुपये देण्यापेक्षा लाखो लोकांनी एक रुपया देणे महत्वाचे असते. त्यामागील स्वयंस्फूर्तीची आणि समर्पणाची भावना कार्याची प्रेरणा देते. म्हणून ते हरवलेले नाणे आपल्याला सापडेपर्यंत शोधावेच लागेल.'
                                   फोन ९९२२४१९२१०

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन