Skip to main content

August 2015 Editions

पालकांनी सर्जनशील व्हावे
मुलांच्या अभ्यासाकरिता प्रयत्न जारी ठेवले,
त्या प्रामाणिक भावनेला सर्वतोपरी सहकार्य मिळाले,
तो माझा अनुभव....
नवनिर्मिती सहज होत नाही, त्यासाठी चिकाटी आणि परिश्रमही लागतात.  ते असतील तर शासकीय यंत्रणेतील भली माणसे पुढे येतात आणि पाठीशी कोणीतरी समर्थ उभा राहतो. त्या अनुभवाची कथा.
१९७८सालची गोष्ट. माझा मुलगा पाचवीत होता. त्याच्या भूगोल विषयाच्या अभ्यासाला भारतातील घटकराज्ये, राजधान्या, लोहमार्ग, राजमार्ग, प्रमुख शहरे इत्यादी अनंत प्रकारची माहिती होती. हे सर्व पाठ करून लक्षात ठेवणे तसे पालकांनाही कठीणच होते. परंतु मुलांच्या वयाचा आणि चौकसपणाचा विचार केल्यास ही सर्व माहिती थोड्या रंजक पद्धतीने सांगावी लागेल असे मला वाटले. त्यावरून एक कल्पनाही सुचली. मोठ्या ड्नॅइंर्ग पेपरवर भारताचा नकाशा काढून मी त्यात ही सर्व माहिती दाखवली. राजधानीच्या ठिकाणी मोठा खजिना ठेवलेला असून तो मिळविण्यासाठी काही माणसे (खेळाडू) आपापली आगगाडी लोहमार्गावरून त्या त्या ठिकाणी नेतात अशी कल्पना केली. आगगाडीसाठी एक रंगीत टिकली वापरून हा खेळ मुलामुलांच्यात खेळता येण्यासारखा होता. गटातील मुलामुलांत चुरस होते आणि भारतभर त्यांचा काल्पनिक प्रवासही होतो. ज्याला जास्त खजिन्याचे शहर गवसेल तो विजयी होईल. मुलाच्या शाळेतील भूगोल विषयाच्या शिक्षकांना घरी बोलावून मी हा खेळ दाखवला आणि त्यांनाही मुलांबरोबर खेळायला लावले. त्यांना हा खेळ आवडला. सर्वच मुलांसाठी हा खेळ उपलब्ध करून द्यावा, असा त्यांनी आग्रहच धरला. अर्थातच हे काम मोठे होते. मोठा नकाशा छापून हा सर्व संच उपलब्ध करून द्यायचा होता.
त्याची सुरुवात तरी करूया, म्हणून कमर्शिअल आर्टिस्ट असलेल्या माझ्या मेव्हण्यांकडून नकाशाचे आर्टवर्क तयार करून घेतले. मुलांची एकूण संख्या आणि एकदोन वर्षाची बेजमी असे काहीतरी गणित मनात मांडून दहा हजार प्रती छापायच्या असे मी ठरवले. प्रश्न खर्चाचा होता म्हणून नकाशाच्या पृष्ठभागी एखादी जाहिरात मिळाली तर उपयोग होईल, म्हणून बँक ऑफ महाराष्ट्न्चे त्यावेळचे अध्यक्ष श्री.वसंतराव पटवर्धन यांना त्यांच्या घरी भेटलो. त्यांच्यासमोर खेळ मांडून सर्व कल्पना सांगितली. त्यांच्या घरी मुलांसमवेत तेही हा खेळ खेळले, त्यांनाही एकदम आवडला. पुढचेच म्हणजे १९८० हे वर्ष आंतरराष्ट्नीय बालकवर्ष असल्यामुळे मुलांना बँकेकडून भेट देण्यासाठी त्यांनीच दहा हजार संच घेण्याची तयारी दाखवली आणि दुसऱ्याच दिवशी तशी ऑर्डर माझ्या हाती ठेवली. पाच हजार रुपयांच्या जाहिरातीसाठी त्यांच्याकडे गेलो होतो, तिथे पन्नास हजाराची ऑर्डर मिळाली आणि खर्चाची चिंता मिटली. पण हे खेळाचे संच दोन महिन्यांत द्यायचे होते.
पुण्याच्या ज्या छापखान्यात हे नकाशे छापून मिळण्यासारखे होते तिथे गेलो. तिथे वेगळाच प्रश्न पुढे आला. देशाचा नकाशा छापण्यापूर्वी डेहराडून येथील सर्व्हे ऑफ इंडिया या कार्यालयाची परवानगी आवश्यक असल्याचे प्रेसवाल्याने सांगितले. त्याचबरोबर हे दूरचे अंतर आणि शासकीय कारभार लक्षात घेता, अशा परवानगीसाठी चारसहा महिने आणि डेहराडूनला एकदोन चकरा, एवढे लागणारच असा उभयतांचा विचार झाला.
त्या निराशेतच मी सांगलीला परतलो आणि भूगोलाच्या प्राध्यापक सौ.गोळे यांना भेटलो. सर्व्हे ऑफ इंडियाचा एक गट सांगलीत काम करत असतो ही माहिती त्यांनी दिली. तिथे एक शीख अधिकारी होते. त्याच्या मतानुसार मुलांच्या साध्या खेळासाठी हा नकाशा असल्याने परवानगीची गरज नाही असे कळले. तरीसुद्धा त्याच्या कार्यालयात दुसऱ्याच दिवशी डेहराडूनचा एक अधिकारी मेजर नायर येणार असल्यामुळे त्यालाच भेटावे, असे या सरदारजींनी सुचविले. दुसऱ्या दिवशी मेजर नायर यांची भेट झाली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पुण्याचे मेजर देवचाके या अधिकाऱ्याशी चर्चा करून निर्णय घ्यावा.  त्यासाठी पुण्याला गेलो. या दोन्ही अधिकाऱ्यांनी सर्व गोष्टी लक्षात घेता परवानगीची आवश्यकता आहे असा निर्णय दिला. तथापि ही परवानगी लवकर मिळावी यासाठी सर्व्हे ऑफ इंडियाच्या दक्षिण विभागाचे हैद्राबाद कार्यालयाचे संचालक के.सत्यनारायण यांचे मार्गदर्शन घेण्यास सुचविले. दुसऱ्याच दिवशी श्री.सत्यनारायण हे मुंबईत येणार होते. त्यांची भेट विमानतळावरच घडवून आणण्याचे आश्वासन श्री.देवचाके व सरदारजी या उभयतांनी दिले. त्याप्रमाणे भेटही झाली. हे सत्यनारायण पुण्यात येणार असल्यामुळे सर्व कागदपत्र टाईप करून नकाशासह पुण्याच्या कार्यालयात  त्यांना भेटण्यासाठी गेलो. पण या महोदयांची पुणे भेट रद्द झाल्याचे समजले. तथापि या सद्गृहस्थांनी `सर्व कागदपत्र कार्यालयात ठेवावीत' असा निरोप ठेवला होता. अर्थातच तिथून हे सर्व कागद मुंबईत त्यांच्या हाती दिले गेले आणि त्यांनी स्वत:च ते पुढे दिल्लीला नेले. दिल्लीत या मंडळींची बैठक होती तिथे डेहराडूनच्या कार्यालयाचे प्रमुख श्री.ज्योती हे त्यांना भेटणारच होते. त्यांच्याकडे हे कागदपत्र देण्यात आले. श्री.ज्योती यांनी डेहराडूनला पोचताच संंबंधित अधिकाऱ्याला बोलावून त्याच्याकडे हे काम सोपविले.
छापील नकाशावरून ट्न्ेिंसग केलेला नकाशा मी मुलांच्या त्या खेळासाठी वापरला होता. तो या मुख्य कार्यालयास चालण्यासारखा नव्हताच. म्हणून तेथील अधिकाऱ्याने आंतरराष्ट्नीय सीमा दाखविलेला भारताचा नकाशा पाठविला, व त्याचा फोटोप्रिंट घेऊन त्यात सर्व माहिती भरून त्याच्या दहा प्रती मंजुरीसाठी पाठवाव्यात, असे त्वरित कळविले.
या अधिकृत नकाशाच्या फोटोप्रिंटवर आमच्या खेळासाठी लागणारी सर्व माहिती भरून दहा प्रती तयार केल्या. हे सर्व होईपर्यंत दहापंधरा दिवस गेलेच होते. बँकेला दोन महिन्याच्या आत खेळाचे संच द्यायचे होते. म्हणून डिसेंबर शेवटच्या आठवड्यातील कडाक्याच्या थंडीत मी सरळ डेहराडून गाठले. सकाळी दहा वाजता त्या कार्यालयात पोचलो आणि सगळी कथा निवेदन करून परवानगी लवकर मिळावी अशी विनंती केली. आनंदाचा भाग म्हणजे दुपारी दोन वाजता मला आवश्यक ती सर्व कागदपत्रे हातात मिळाली. डेहराडूनला तीन दिवस राहण्याच्या तयारीने गेलो होतो, पण तीन तासात काम झाले. अधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देत मी परत फिरलो.
पुण्याला आल्यानंतर दहा हजार ऐवजी पंधरा हजार प्रती छापण्याचे ठरवले. त्यापैकी पाच हजार प्रती शाळेतल्या मुलांना विक्रीसाठी देता येतील असा माझा हिशोब होता. आर्टवर्क, कागद, छपाई वगैरे सर्व बिले बँक परस्पर देत होती. त्यामुळे माझ्या खिशातून थोडाच खर्च करावा लागला. बँकेला दहा हजार संच दिल्यानंतर अध्यक्ष श्री.वसंतराव पटवर्धन आनंदित झाले आणि हा मनोरंजक शैक्षणिक खेळ तयार करून दिल्याबद्दल बक्षिस म्हणून मला पाच हजार रुपयांचा चेक दिला. माझा आनंद गगनात मावेना.
या शैक्षणिक साधननिर्मितीत मला अनेक लोकांनी मनापासून मदत केली. कुठेही न अडवता, आडकाठी उभी न करता प्रेरणाच दिली. त्याशिवाय हे काम अशक्य होते.
करेल रंजन जो मुलांचे
जडेल नाते प्रभूशी तयाचे ।
असे साने गुरुजी म्हणत असत. त्याचा मला प्रत्यय आला आणि अनेकजण देवरूपाने उभे राहिले.
- एच.यू.कुलकर्णी
माजी उपप्राचार्य (पॉलिटेक्निक)
वालचंद कॉलेज, सांगली
फोन  (०२३३)२३०५७७३,  ९८६०७६२३००


महाराष्ट्नचे मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या महिन्यात अमेरिकेला भेट देऊन तेथील उद्योजकांशी चर्चा केली व महाराष्ट्नत उद्योगधंदे सुरू करण्यासाठी आवाहन केले. त्या दौऱ्यातील कार्यक्रमाचा वृत्तांत तेथील एक उद्योजक श्री.उमेश दाशरथी यांनी प्रसिद्ध केला आहे. त्याचा संक्षिप्त आशय....
साधेपणाचा डौल
विमानतळावरून मुक्कामाच्या हॉटेलवर पोचलो त्यावेळी अमेरिकेतील सकाळचे अकरा वाजले होते. यूएस-इंडो बिझनेस कौन्सिलची पहिली बैठक १२ वाजता होती. मुख्यमंत्री व उद्योगमंत्री एकाच हॉटेलमध्ये होते. सलग सोळा तासांचा प्रवास करून पोचल्यानंतर या मीटिंगला दोघांनी वेळेवर येणे जरा अवघडच वाटत होते. परंतु ठीक १२ वाजता दोघेही हजर झाले. या गोष्टीचाही खास उल्लेख प्रथम केला पाहिजे.
कार्यक्रम नेटका झाला. प्रत्येक वक्ता मुद्देसूद बोलत होता, उसना अभिनिवेष कुठेही नव्हता. सर्वांनी उत्तम गृहपाठ केलेला होता. कार्यक्रमाचे प्रास्तविक महाराष्ट्न् उद्योग महामंडळाचे कार्यकारी संचालक भूषण गगराणी यांनी पॉवरपॉइंर्टमधून केले. महाराष्ट्न् शासन किती व्यवसायिक दृष्टीचे झाले आहे याचाच तो नमुना होता. अतिशय सुरेख आणि मुद्देसूद असे सादरीकरण करून त्यांनी सर्वांना जिंकले. त्या सादरीकरणात महाराष्ट्न् शासनाच्या विविध योजना व धोरणांची माहिती समाविष्ट होती. त्या बरोबरीने गतिमान कारभाराची ग्वाही सरकारच्या वतीने त्यांनी दिली.
राज्याचे उद्योगमंत्री श्री.सुभाष देसाई हे सुमारे पंधरा मिनिटे अस्खलित इंग्रजीतून बोलले. त्यांचा उत्साह तेथील तरुणांना प्रेरणा देणारा होता. नवा महाराष्ट्न् घडविण्याची व महाराष्ट्नला उद्योगधंद्यात वेगळया उंचीवर नेण्याची तळमळ त्यांच्या शब्दाशब्दातून जाणवत होती. गुंतवणूक करण्यासाठी म्हणून महाराष्ट्नचे स्थान भारतात किती महत्त्वाचे आणि सोयीचे आहे हे त्यांनी विशद केले. भारतातील न्यायव्यवस्थेचा कारभार इतर विकसनशील देशांपेक्षा कसा वेगळा आणि निष्पक्ष आहे हे त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले. भारतात गुंतवणूक करण्यासाठी यापेक्षा चांगली वेळ असूच शकत नाही असे सांगताना त्यांनी केलेले भावनिक आवाहन सर्वांच्या मनाला स्पर्श करून गेले.
मनाने अमेरिकन पण हृदयाने अजूनही भारतीयच असलेले, मूळचे मुंबईकर पण गेली चाळीस वर्षे अमेरिकेत स्थायिक असलेले श्री.अशोक वासुदेवन् यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांचा अन्नप्रक्रिया उद्योग असून विविध देशांत कारभार चालतो. पुण्यात त्यांनी टेस्टी बाईटचा कारखाना सुरू केला आहे. ते या बिझनेस कौन्सिलचे पदाधिकारी आहेत. त्यांनी मुंबई व न्यूयॉर्क येथील विलक्षण साम्य सहजपणे दाखविले. एकाला वॉल स्ट्नीट तर दुसऱ्याला दलाल स्ट्नीट आहे. दोन्ही शहरे कधी झोपत नाहीत. दोन्ही आपापल्या देशांच्या राजधान्या नव्हेत, पण अर्थकारणाची सर्व सूत्रे हलवतात. दोन्ही शहरात येणाऱ्या प्रत्येकाला ते शहर सामावून घेते आणि दोन्ही ठिकाणी आर्थिक पाया विविध सेक्टरवर सम प्रमाणात विभागला गेला असल्यामुळे तो मजबूत आहे. म्हणूनच त्या दोन शहरांत व पर्यायाने दोन्ही देशांत एक मजबूत बंध सहज निर्माण होऊ शकतो असे ते म्हणाले.
श्री.वाईझनर हे अमेरिकन गृहस्थ बोलले. १९९५मध्ये ते दिल्लीत होते. भारतावर हा गृहस्थ चक्क फिदा आहे. अमेरिकेचे भारतातील राजदूत म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले आहे. भारत व अमेरिकेचे वाढते संबंध नजीकच्या काळात कसे सौहार्दपूर्ण होत आहेत याची प्रचिती त्यांच्या भाषणातून येत होती. गेल्या वर्षीच्या नवरात्रात नरेंद्र मोदींनी अख्ख्या अमेरिकेवर जी मोहिनी घातली ती अद्यापि उतरलेली नाही असे त्यांच्या भाषणावरून वाटले.
मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस शेवटी बोलायला उभे राहिले. गच्च भरलेल्या हॉलमधील सर्वांचे लक्ष या तरुण मुख्यमंत्र्याकडे लागले होते. त्यांचा साधेपणाही सर्वांना स्पर्शून गेला. पहिल्या एकदोन वाक्यातच त्यांनी सभा जिंकली. पंचाहत्तरवरून बत्तीसवर आणलेल्या परवान्यांची संख्या वर्षभरातच वीसवर आणणार आहोत हे त्यांनी स्पष्ट केले. पर्यावरण संदर्भात कोणतीही तडजोड न करता प्रदूषणविषयक परवाने सुलभरित्या कसे मिळतील यावर त्यांनी भर दिला. योग्य त्या गोष्टींसाठी उद्योगांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे आहे याची ग्वाही त्यांनी दिली. कुठेही अडत असेल तर मला थेट भेटा किंवा लिहा, योग्य कामासाठी कुठेही अडचण येणार नाही असे धोरण सरकार ठामपणे राबवेल असे त्यांनी नमूद केले. त्यांचे भाषण संपल्यावर हॉलमध्ये टाळयांचा गजर चालू होता. माझ्या बाजूलाच गोविंद वंजानी या नावाचे  सत्तरीतले गृहस्थ बसले होते. त्यांच्या डोळयात पाणी तरळले होते. `आता आपल्या भारत देशात बदलास सुरुवात झाली आहे. असा बदल आमच्या हयातीतच आम्हाला पाहायला मिळायला हवा' असे म्हणताना ते सद्गदित झाले होते.
या कार्यक्रमाच्या आयोजन समितीपैकी प्रमुख म्हणजे मंगेश करंदीकर. हे मूळचे औरंगाबादचे. त्यांच्या मातुश्री शारदा मंदिरच्या माजी मुख्याध्यापक मालती करंदीकर. मंगेश सध्या तिथे स्थायिक झाला आहे. या सर्व कार्यक्रमावर त्याची छाप होती. संध्याकाळी न्यूयॉर्कच्या मराठी मंडळाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात व जेवणासाठी सर्वच्या सर्व शिष्टमंडळ उपस्थित होते.

हे चित्र
खासदार, आमदार व अन्य लोकप्रतिनिधी यांच्याशी सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सौजन्यपूर्ण वर्तन करावे, त्यांना मानसन्मान द्यावा, कार्यालयातील त्यांच्या आगमनाच्या वेळी व ते परत जातेवेळी उभे राहून त्यांना विनम्र अभिवादन करावे अशा सक्त सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. त्यात कुचराई करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असे यासंबंधीच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. राज्याच्या मुख्य सचिवांच्या वतीने हा आदेश काढण्यात आला आहे.
सरकारी अधिकारी वा कर्मचारी ही मंडळी संसद सदस्य किंवा विधिमंडळ सदस्यांशी आदराने वागत नाहीत अशी आमदारांची तक्रार होती. त्याची दखल घेऊन शासनाने त्यांचा मानसन्मान कसा राखावा यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचना नव्याने जारी केल्या आहेत.
आमदार व अन्य लोकप्रतिनिधी त्यांच्या काही कामानिमित्त शासकीय कार्यालयाला भेट देत असतात. परंतु त्यांची योग्य दखल घेतली जात नाही असा त्यांचा अनुभव होता. यासंबंधीच्या आदेशात म्हटले आहे की, हे लोकप्रतिनिधी शासकीय कार्यालयाला भेट देतील त्यावेळी अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांना आदराची व सौजन्याची वागणूक द्यावी, त्यांचे म्हणणे काळजीपूर्वक ऐकून घ्यावे. शासकीय नियमानुसार शक्य असेल तितकी मदत त्यांच्या कामकाजात द्यावी. दूरध्वनीवरून माहिती विचारली गेल्यास त्यांच्याशी आदराने व सौजन्याने बोलावे. नागरिकांसाठी राखून ठेवलेल्या वेळेत खासदार-आमदार आले तर त्यांना प्राधान्याने भेट द्यावी. शासकीय समारंभ व कार्यक्रम असतो त्यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधींची नावे निमंत्रितांमध्ये समाविष्ट करावीत व स्थानिक लोकप्रतिनिधींना निमंत्रित करण्यात यावे.
या आशयाच्या अनेक सूचना देण्यात आल्या असून त्याचे पालन न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंग कारवाई होऊ शकते.

...आणि ते चित्र
डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या निधनानंतर वॉटस्अप व इतर माध्यमांतून त्यांच्याविषयीच्या आठवणी व आख्यायिका प्रसृत केल्या जात होत्या. त्यापैकी एक अशी की, शिलाँग येथील भाषणासाठी डॉ.कलाम जात होते त्यावेळी त्यांच्या संरक्षणासाठी पुढच्या ताफ्यातील एका जीपमध्ये एक जवान अडीच तास खडा उभा होता. कलामांनी त्याला जवळ जाऊन विचारले,  `तू दमलेला नाहीस का?' त्यावर त्या जवानाने उत्तर दिले, `सर, आपल्यासाठी मी सहा तास सुद्धा उभा राहीन.'

सभाध्यक्षाची जबाबदारी
संसदेच्या कामकाजात व्यत्यय निर्माण करून ते रोखून धरण्यात सर्व खासदार मंडळी गुंतली आहेत. हा गोंधळ थांबविणे सभापतींना अशक्य आहे काय? कोणत्याही सभागृहातील सभापती हा सर्वोच्च अधिकारी असतो व त्यास विशेष अधिकार असतात. सभापतींच्या आसनाजवळ येऊन आरडाओरडा व गोंधळ करून सभासद जर कामकाज बंद पाडत असतील तर सभापतींनी सक्रिय व्हायला हवे. सभापती उभे राहिलेले असूनही सभासद जागेवर गप्प न बसता आज्ञा पाळत नाहीत हे वागणे बेजबाबदार व बेशिस्तीचे ठरते. अशा वेळी सभागृह चालू ठेवण्याची व शिस्तीची जबाबदारी सभापतींवर येते. कलम ३७४(अ) प्रमाणे संबंधित सभासदाचे सदस्यत्व पाच बैठकांपर्यंत स्थगित करण्याचा अधिकार लोकसभेच्या सभापतींना असतो. तो ते का बजावत नसावेत? बहुतेक सभापती गोंधळापुढे अगतिकता व्यक्त करतात. सभासदांना जर जबाबदारी समजत नसेल तर अध्यक्षांचे काम कोणते? लोकशाहीला कोणी वाली आहे असे म्हणून कुणी जागल्या जनहित याचिका घेऊन कोर्टात गेल्याचे वाचनात नाही. कदाचित संसदेतील कामकाजाविरुद्ध तसे करता येत नसावे. पण अधिकारांचा उपयोग करून निर्णयप्रक्रिया सुरू ठेवणे हे सभापतींचेही कर्तव्य नाही काय? लोकशाही पद्धतीने सभागृह चालविणे हा कोणत्याही अध्यक्षाचा व सभापतीचा अधिकारच असला पाहिजे. पण त्यामध्ये कठोर कार्यवाहीचीही तरतूद असतेच.
- प्रसाद भावे, सातारा
(मोबा.९८२२२८४२८७)


तीर्थक्षेत्रे पवित्र हवीतच
पूर्वी आपल्याकडे `काशीस जावे नित्य वदावे' असे म्हणत असत. साधारण शंभर वर्षांपूर्वी सामान्य जनतेचे राहणीमान कष्टप्रद होते. पाण्याचे हालच असत. शिवाय वेगवेगळया साथी आणि उदंड रोगराई यामुळे माणसे जन्मालाही येत आणि मरतही. सत्तरी वगैरे गाठलेली माणसे फार कमी असत. त्यामुळे मिळालेल्या आयुष्यात देवधर्म आणि तीर्थयात्रा यांचे अप्रूप होते. काशीला निघालेला माणूस सुखरूप घरी परत येईल याची शाश्वती नव्हती. गेल्या साठसत्तर वर्षांत फार वेगाने बदल घडत चालले आहेत. त्यामुळे यात्रांना होणारी प्रचंड गर्दी आणि इतर अनेक प्रश्न बघताबघता संकटरूपातच दिसू लागले आहेत. दुर्दैवाने आपली तीर्थक्षेत्रे भावनाशील यात्रेकरूंना समाधान देणारी नव्हेत, `नसतो गेलो तरी चालले असते' अशी प्रतिक्रिया उमटवणारी आहेत.
काशी क्षेत्रातील अरुंद गल्लीबोळकंड्या, त्यात तुंबत जाणारी गर्दी, मुक्त फिरणारी गुरे, त्यांचा शेणकाला, चिकचिक ही सर्व स्थिती गंगाकाठीच्या घाटांवरही आहेच. जागोजागी लोकांचे वाट्टेल तसे विधी चाललेले, भटकी कुत्री आणि प्रेतयात्राही त्यातच. मी गेले त्यावेळी ज्येष्ठातील दशाहार होता. प्रचंड गर्दीला कुठे शिस्त नाही. कुठेतरी एक विहीर आणि मशीद वगैरे आहे, तिथे मात्र कडेकोट पोलीस बंदोबस्त होता. मंदिर परिसरातील एका पोलीस इन्स्पेक्टरला मी म्हटले, `लोकांना रांग लावून दर्शन घ्यायला का लावत नाही?' त्या बिचाऱ्याने अगतिकपणे थेट दुर्लक्षच केले. धक्काबुक्की करत दर्शन घेणे आणि त्यातून बाहेर पडणे हे एक दिव्य होते. आपापल्या यजमानांना पकडून पंडे लोक घुसत होते. लोकांच्या श्रद्धेची आणि आमच्याही असल्या देवदर्शनाची कीवच वाटत होती.
परंतु तेथील उत्पन्नावर जगणाऱ्या अनेक लोकांना यात काही सुधारणा व्हावी असेही वाटत नसेल काय? त्यांच्या सर्व अंगवळणी पडलेेले दिसत होते. आम्हाला तर कोठून आलो आणि कोठून बाहेर पडायचे इतका संभ्रम आणि पंचाईत झाली. कदाचित काशी विश्वेश्वराने आम्हालाच तो प्रश्न विचारून अंतर्मुख केले असावे.
हे काशीतच घडते असे नव्हे. पूर्वीच्या काळी एवढी प्रचंड गर्दी वगैरे नसावी. तिथल्या सेवेकरी मंडळींनी निव्वळ पैसा गोळा न करता, श्रद्धेने येणाऱ्या लोकांना योग्य सेवा पुरविण्याचेही संकेत होते, कर्तव्य होते. देवळात घुसून गर्दी करताना महादेवाच्या पिंडीवर लोक कोसळत नव्हते इतकेच काय ते. दक्षिणेकडे काही मोठ्या मंदिरात कठडे लावून रांगांची व्यवस्था केली आहे. पण तिथल्या मंदिरातील देवसुद्धा इतका दूर आणि अंधारात असतो की तिकडे अंदाजानेच हात जोडावे लागतात. पंढरपूरला जायचा विचार दरवर्षी माझ्या मनात येतो पण तो निकराने मागे सारावा लागतो. साधारण चाळीस वर्षांपूर्वी एकदोनदा गर्दी टाळून पंढरीला गेले होते. त्यावेळी दहा पैशात चहा मिळाला आता दहा रुपये असणार. सगळे बदलले.
नंतर दहा वर्षांपूर्वी एकदा गेले. एव्हाना दर्शनरांगेची नवीन व्यवस्था होती. चढउतार करून देवाच्या पायाशी पोचण्याचे किंचितही समाधान न घेता परत फिरलो. सर्वत्र घाणीचे साम्राज्य तर सर्वजण सांगतच असतात. बडव्यांच्याकडे मंदिराचे व्यवस्थापन होते. ते काडीमात्र दखल घेत नाहीत. अर्थात दोष केवळ बडव्यांचा नाही. महापालिका आणि इतर यंत्रणाही दोषी आहेत आणि तितक्याच त्या अगतिकही असणार.
मी काही तीर्थक्षेत्री जाते. मी पाहिल्यापैकी गोंदावल्याच्या क्षेत्राला प्राधान्य देईन. नृसिंहवाडी व कोल्हापूरची अंबाबाई येथील व्यवस्थापन तुलनेने खूपच चांगले आहे. गोंदावले ते पंढरपूर फार अंतर नाही, पण फरक किती?
लोकांनीही खूप विचार केला पाहिजे. आपण वागू तसे देवाला आवडेल, असे होणार नाही. आपल्याकडून इतरांना किती त्रास होतो याचा विचार हवाच. प्रत्येक गोष्ट सरकारने आणि प्रशासनाने करायची म्हटले तर शक्यच नाही. देवाच्या दारी आपण घाण करून इतरांना होणारा त्रास वाढवत असतो. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी यातून उद्भवणाऱ्या समस्या दूर करण्यास योगदान दिले आहे. त्यांनाच खरे भक्त म्हटले पाहिजे.
कलावती आईच्या मंदिरात स्वच्छता आणि शिस्त कौतुकास्पद आहे. तिथेही गर्दी होते पण लोकांना नीट वागावे लागते. तिथून बाहेर पडले की तेच भक्त, तेच सेवेकरी सारी शिस्त देवळात ठेवून बाहेर रस्त्यावर येतात आणि पहिल्यासारखेच वागू लागतात हे आश्चर्यच आहे.
विश्व हिंदू परिषद किंवा इतर अनेक धार्मिक संघटनांनी व धर्मसंस्थांनी ही पहिली जबाबदारी घ्यायला हवी असे माझे मत आहे. आपल्या तीर्थक्षेत्रांचे पावित्र्य राखले जाईल आणि भक्तांना समाधान मिळेल अशी यंत्रणा उभी केली पाहिजे. लोक सश्रद्ध आहेत. त्यांना देव हवा आहे आणि धर्मही हवा आहे. पण याप्रकारे माणसे विटून गेली तर देवाधर्माकडे पाठ फिरवतील. त्यांना उबग येईल. बिर्ला मंदिरसारख्या खाजगी देवस्थानात गेल्यावर प्रसन्नता वाटते तसे सार्वजनिक देवस्थानात गेल्यावर का होत नाही? तिथे सार्वजनिक संस्थांनीच जबाबदारी घेतली पाहिजे. राम मंदिरासारखे प्रश्न उभे करून जनक्षोभ वाढवण्यापेक्षा सध्या आहे त्या देवस्थानांचे व्यवस्थापन नियोजनपूर्वक का केले जाऊ नये असा प्रश्न आहे. शिस्त आणि स्वच्छता आपल्यापुरती न राखता ती समाजव्यवस्थाच व्हावी ही धारणा घेऊन अनेक संघटनांना काम करता येईल.
िख्र्चाश्न देशांतील धर्मपीठे व चर्चमधून चप्पल घालूनच लोक दर्शनास जातात. पण तेथील वातावरण मात्र शांत आणि पवित्र असते. आपल्याकडील जैन व बौद्ध मंदिरेही खूपच चांगली राखलेली असतात. आपल्या धर्मात मात्र कर्मकांडांवर कमालीचा भर देऊन सामाजिकतेकडे दुर्लक्ष होते. घरापासून देवस्थानापर्यंत सोवळे नेसून अनवाणी जाणारे पुजारी कोणत्या सोवळयातून जातात हे पाहिल्यानंतर काय वाटते? आधीच आपले रस्ते, त्यावर थुंकणे आणि इतर सगळे विधी सर्रास चाललेले असतात. म्हणून पुजाऱ्यांनी प्लास्टीकच्या तरी चप्पल घालून स्वच्छ पायांनी जावे इतपत सारासार विचार का करीत नसावेत? हळूहळू यातही सुधारणा होत गेल्या पाहिजेत. एका कवीने (बहुधा माधव ज्युलियन) म्हटले आहे की -
पोट जाळायास देव्हारे पुजारी माजवी
ईश्वराला लाजवी ।
जे देवाच्या दयेवर आणि पैशावर जगतात त्यांच्या मिळकतीचे माध्यम देव आणि त्यांचे भक्त हेच आहेत. त्यांचेही काही देणे लागतो असा विचार त्यांनी केला पाहिजे. संस्कृत वचन आहे की,
अन्य क्षेत्रे कृते पापं, तीर्थक्षेत्रे विनश्यति
तीर्थक्षेत्रे कृतम् पापंम्, वज्रलेपे भविष्यति ।
(इतरत्र केलेल्या पापांचा लय तीर्थक्षेत्रात होतो, पण तीर्थक्षेत्रात राहून देवादारी जे पाप करतात ते वज्रलेपच होते - ते कोणत्याही प्रायश्चित्ताने फिटणार नाही.)
- विद्या दिवेकर,
वासुदेव मंदिर, वाटेगाव (जि.सांगली)
मोबा. ९९६०४५२८४१

ध्वज हे कशाचे प्रतिक?
आपल्याकडे अनेक ठिकाणी भगवे ध्वज लावलेले असतात. हल्ली काही उत्साही मंडळी चौकात किंवा घरावर, गाडीवर भगवे झेंडे लावतात. हे ध्वज डौलाने फडकले पाहिजेत अशी काळजी मात्र घेतली जात नाही. माळरानावर किंवा कुठेतरी आडबाजूला देऊळ असते. तिथे लावलेले ध्वज जीर्ण आणि फाटके लोंबत असतात. आपले ध्वज हे धर्माचे प्रतिक असेल तर त्यांची अवस्था अशी का? भगव्या ध्वजासाठी लोकांनी प्राण दिले असे म्हटले जाते. युद्धात ध्वज सांभाळणारा जवान तो ध्वज खाली पडू देत नाही, तर दुसऱ्या हाती सोपवितो. इतकी काळजी घेतली जाते. ही निष्ठा असेल तर ध्वज फडकवण्यात मजा आहे, अर्थ आहे. इतक्या ठिकाणी विटके ध्वज लावण्यामुळे लोकांची धार्मिकता दिसत नाही, तर धर्माकडे असलेले दुर्लक्ष सर्वांच्या लक्षात येते. ध्वज बदलण्यासाठी आणि तो योग्य प्रकारे लावण्यासाठी फार खर्च येणार नाही. तीर्थयात्रा किंवा इतर धर्मकार्यासाठी भक्तगण महामूर खर्च करीत असतात. त्या मानाने ध्वज डौलाने फडकण्यासाठी काय लागेल?
धर्मनिष्ठ लोकांनी व सामाजिक विचार करणाऱ्या सश्रद्ध लोकांनी याचा अवश्य विचार केला पाहिजे आणि ती काळजी घेता येत नसेल तर ध्वज फडकवण्याचाही विचार सोडून द्यावा. पण अभिमानाची आणि श्रद्धेची बाब असणारे ध्वज फाटके विटके दिसू नयेत एवढे तरी पाहता येईल.

अनोखा वाढदिवस सोहळा
पारंपरिक वाढदिवस कसे असतात ते सर्वांना ठाऊक आहे. मुलांच्या आनंदासाठी म्हणून पाटर््या, खेळ, चमचमीत जेवण, केक कापणं, परतभेटी वगैरे वगैरे. माझ्या अमेरिकन वारीत वेगळीच एक पद्धत मला पाहायला मिळाली.
ऑस्टींग येथील एका कुटुंबात सहा वर्षाच्या मुलाचा वाढदिवस होता. आठदहा इतर मुले जमली होती. मुलाच्या आईवडिलांनी त्याला आदल्या दिवशी विचारलं होतं, `तुला उद्या काय करायला आवडेल?' या मुलाने थोडासा विचार करून सांगितले होते की, त्याला त्याच्या मित्रांसह काही पशुपक्ष्यांच्या समवेत मजा करायची आहे. त्याला आईवडिलांनी हो म्हटलं.
साधारण सोळा-अठरा वर्षाची एक अमेरिकन मुलगी आपला संग्रह खोक्यात भरून घेऊन आली. तिच्यासमवेत सात-आठ टोपल्या किंवा बांबूचे खोके होते. मागच्या अंगणातील हिरवळीवर तिने ते एका बाजूला ठेवले. कुरणाच्या दुसऱ्या कोपऱ्यात साधारण पाच फूट उंचीचा तारांचा एक सापळा तिने जोडून उभा केला. त्याच्या दोन्ही बाजूना त्या टोपल्या ठेवल्या. टोपल्या बंद असल्यामुळे त्यामध्ये काय ठेवलं आहे ते माहीत नव्हतं. उरलेल्या दोन बाजूंना तिने सहा सहा मुलांची बसण्याची सोय केली. पहिल्या सहा मुलांना त्या पेटाऱ्यावर बसविले आणि प्रत्येकाच्या मांडीवर सतरंजीसारखी जाडसर आसने पसरली. जो उत्सवमूर्ती मुलगा होता तो सर्वांच्या मधोमध बसला. आता त्याला त्या पोरीनं विचारलं, `तुला कोणत्या प्राण्याच्या किंवा पक्षाच्या अंगावरून हात फिरवायला आवडेल?- उदाहरणार्थ कोंबडीचे पिलू की पांढरा शुभ्र ससा की तपकिरी रंगाचा ससा किंवा सरडा, साळींदर, कासवाचं पिलू इत्यादी.' या पोरानं सरड्याची मागणी केली. त्याबरोबर आठदहा इंच लांबीचा एक पाळीव सरडा त्याच्या मांडीवर दिला. बटबटीत डोळे, खरखरीत काटेरी अंग, पिवळसर रंग असा तो सरडा त्या मुलाच्या मांडीवरून हलतही नव्हता. मुलगा त्या सरड्याच्या मानेवरून, शेपटावरून हात फिरवत राहिला. त्याच्या इतर मित्रांकडे आळीपाळीने पाहात, त्याला कसं वाटतं ते तो सांगत होता.
त्यानंतर त्या युवतीने इतर पाच मुलामुलींच्या मांड्यांवर त्या टोपलीतले प्राणी-पक्षी ठेवले. आळीपाळीने ते सहा प्राणी ती मुलांमध्ये बदलत राहिली. प्रत्येक मुलगा किंवा मुलगी आपापले अनुभव इतरांना सांगत असत. अशी पंधरावीस मिनिटे गेल्यावर तो उत्सवमूर्ती सोडून इतर पाच मुलांना त्या कुंपणाच्या बाहेर पाठविण्यात आलं. नवीन बॅच आत येऊन बसली आणि तीच प्रक्रिया पुन्हा सुरू झाली.
प्रत्येक छोट्याजवळ येऊन ती मुलगी कौतुकाने हसत हसत विचारत होती, `कसं काय, तुला मजा वाटते ना?' किंवा `तुला दुसरा प्राणी मांडीवर हवा का? तुला कोणता पक्षी किंवा प्राणी आवडेल?' असे विचारत खेळत ती सगळया मुलांना बोलकं करत होती. कुंपणाच्या बाहेर थांबलेली इतर मंडळी त्या प्राणीमात्रांच्या अंगावरून हात फिरवत होती आणि ती मुलगी कौतुकाने पाहात होती.
मुलांच्या या प्रकारे विक्षिप्त किंवा तऱ्हेवाईक वाटणाऱ्या आवडींना जोपासण्यात तेथील सधन अमेरिकन किंवा तिथे स्थायिक झालेले भारतीय अथवा अन्य देशी लोक तत्पर असल्याचे मला दिसून आले. अशा प्रत्येक शो करिता शेकडाभर डॉलर्स त्या अमेरिकन मुलीने कमावले. याप्रकारे तेथील तरुण मुलेमुली आपला चरितार्थ आणि शिक्षणही चालवतात. शिवाय याप्रकारे निरनिराळे प्राणी-पक्षी पाळून व त्यांची योग्य जोपासना करून अर्थार्जनासाठी त्यांचा उपयोही केला जातो. ही काही त्यांच्यावर अमानुष वागणूक नव्हे तर त्यांना जगण्याचे साधन म्हणून ते वापरले जाते. पुढच्या वर्षी नवे काहीतरी प्राणी-पक्षी आणि बदलती आवडनिवड. पालक तीही अट्टाहासाने पुरवतील. ऐश्वर्याचे जीवन काय आणि कोणते पैलू दाखवते याची मला मौज वाटली.
-कृ. द. गाडगीळ,
विलेपार्ले(पू.), मुंबई ५७
मोबा. ९८३३७२५१४५


कोणता वारसा जपायचा?
८ ऑगस्ट १९४२च्या रात्री मुंबईच्या गोवालिया टँक मैदानावर महात्मा गांधींची सभा झाली आणि त्यामध्ये प्रथमच इंग्रजांसाठी `चलेजाव' अशी घोषणा त्यांनी केली. त्यायोेगे नंतरच्या काळात संपूर्ण देशामध्ये विलक्षण चैतन्य संचारले. तथापि त्याच रात्री गांधींजींच्यासह सर्वच बड्या नेत्यांना तुरुंगात टाकले गेले आणि सर्व कार्यकर्त्यांना देशाच्या स्वातंत्र्यासाठी सुचेल तो मार्ग अनुसरावा लागला. तळापासून सर्वत्र जी अस्वस्थता निर्माण झाली त्यास क्रांतीचे स्वरूप आले. त्या काळात शाळा-कॉलेजे आणि नोकरीउद्योग सोडून घराबाहेर पडलेल्या असंख्य कार्यकर्त्यांना स्वातंत्र्यसैनिकाचा सन्मान आणि दर्जाही मिळाला. पुढच्या काळात वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना महाराष्ट्नतील स्वातंत्र्यसैनिकांना ताम्रपट आणि पेन्शन सुरू झाली. त्यांमध्ये सर्वपक्षीय सर्व विचारांचे लोक होते, त्यातल्या त्यात काँगे्रसचे जास्त होते.

या सगळयात कोणत्याही देशवासियाला गैर काही वाटण्यासारखे नव्हते उलट त्यांनी देशासाठी जे योगदान दिले त्याबद्दल या सन्मानावर त्यांचा हक्कच आहे असे सर्वांना वाटले. अर्थात याही बाबतीत आपल्याकडील अनेक मंडळींनी या शासकीय योजनेचा आणि लोकादराच्या भावनेचा विपर्यास करून पेन्शन लुटली हेही खरे आहे. चांगल्या धान्यात काही गणंग असायचेच तसाच हा प्रकार होता. स्वातंत्र्यसैनिक म्हटल्यानंतर एक प्रकारे आदर वाटायला हवा त्याऐवजी या बनावट सैनिकांमुळे ती संपूर्ण चळवळ काही अंशी कुचेष्टेचाही विषय पिचत होत असे. शिवाय त्या पूज्यभावनेबाबतीतसुद्धा राजकीय जवळीकीचा कोता विचार केला गेला. सावरकरांचे नाव अंदमानशी अतूट असताना तिथला त्यांचा उल्लेख काढून टाकण्याचा पराक्रम काँग्रेसने केला. कित्येक सच्चा स्वातंत्र्यसैनिकांनी पेन्शन आणि सन्मान नाकारल्याचीही उदाहरणे आहेत. त्याचप्रमाणे कित्येक बनावट सैनिकांनी हे सन्मान व पैसे अथवा अन्य सवलती लाटल्याचीही उदाहरणे आहेत, परंतु हे चालायचेच.

स्वातंत्र्यसैनिकांच्या संघटना पुढच्या काळात तयार झाल्या आणि त्यांच्याकडून मागण्याही येऊ लागल्या. त्यांच्यावर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊ नये हे खरे आहे. परंतु संघटनात्मक मागण्या चिरंतन चालू ठेवण्यातही फारसे अभिमानास्पद काही नव्हते. त्याही पुढे जाऊन त्यांच्या वारसांनाही काही हक्क आणि सवलती मिळाव्यात या थरापर्यंत मागण्या वाढू लागल्या. पेन्शनची रक्कम कालमानानुसार आणि पैशाच्या मूल्यानुसार वाढत गेली ते रास्तच होते. १९४२च्या या चळवळीच्या काळात सैनिकाचे वय किमान १६ वर्षे धरले तरी आज ही पिढी नव्वदीच्या घरात असली पाहिजे. जे दीर्घायुषी भाग्यवान सैनिक असतील त्यांचा याहीपेक्षा जास्त सन्मान झाला तर गैर होणार नाही. परंतु अजूनही स्वातंत्र्यसैनिकांची संख्या अधूनमधून वाढतच चाललेली असते असेही चित्र कालरवापर्यंत पुढे येत होते.

स्वातंत्र्यसैनिकांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी जी पेन्शन मिळते ती स्टेट बँकेकडून त्यांच्या खात्यावर जमा होत असते. केंद्रीय गृहराज्य मंत्री किरन रिजीजू यांनी राज्यसभेत अशी माहिती दिली की, स्टेट बँकेने सुमारे ३ हजार स्वातंत्र्यसैनिकांना मृत्यूपश्चात निवृत्तीवेतन चालू ठेवले आहे. ही चूक लक्षात आल्यानंतर बँकेकडून आतापर्यंत सरकारने १६ कोटि रुपये वसूल केल्याचेही त्यांनी सांगितले.

सरकार किंवा बँक अशा आस्थापनांकडून अशा प्रकारचा गोंधळ-घोटाळा होणे यात नवीन काही नाही. बँकेने या प्रकरणी हयगय किंवा चुकारपणा केल्याचे स्पष्टच आहे. हयात असलेल्या लोकांना त्यांच्याच हक्काचे पैसे देण्यासाठी बँक तंगवते असा साधारण समज आहे, तो खोटा नाही. कित्येकवेळा अशी निवृत्त वृद्ध व्यक्ती साक्षात बँकेच्या अधिकाऱ्यासमोर उभी राहिली तरी त्यांच्याकडे `हयात असल्याचा दाखला' मागितला जातो. व्यवस्थेच्या दृष्टीने या अशा कागदपत्रांचे महत्त्व निर्विवाद आहे. म्हणून त्यातला वाह्यातपणा क्षणभर बाजूला ठेवला तरी ती पद्धत चुकीची म्हणता येत नाही. परंतु मृत्यूपश्चात पैसे वाटत राहणे हे शोभादायक नसले तरी बँकेच्या एकूण कारभारात खपून जाण्यासारखे आहे.

मुद्दा असा आहे की, स्वातंत्र्यसैनिकांच्या पश्चात त्यांच्या कोणी वारसाने ही चूकभूल लक्षात आणून देऊन असे वाटप थांबविले नाही हे अजब आहे. देशासाठी म्हणून ज्यांनी काही श्रम घेतले त्यांच्या वारसांकडे `हा' वारसा आला असे मानायचे का? कोणता संस्कार देशभक्तीने त्यांना दिला? ज्यांना अशी रक्कम मिळाली आहे ती एकूण १६ कोटि भरली आहे ती, हे वारस देशाला किंवा त्यांच्या दृष्टीने कोणत्याही चांगल्या देशकार्याला देतील का? हयात असणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे संघटित काम या दृष्टीने होईल का? त्यांची वये आणि क्षमता लक्षात घेतल्यास ती शक्यता नाही. आपण सर्वजण जे क्रांतिकारकांचा आणि अशा स्वातंत्र्यसैनिकांचा वारसा सांगतो त्यांनी तरी अशा चुकीच्या वाटपाचा फायदा परत देऊन हा वारसा सांभाळावा का?
यांपैकी काहीही होणार नाही. शाळांची पडताळणी घेऊन जसा त्यातला फोलपणा शोधावा लागतो तसाच प्रत्येक लाभार्थी देशवासियाची पडताळणी सातत्याने घेणे हेसुद्धा शासनाला एक कामच होऊन बसेल. देशातील प्रत्येक व्यक्ती अशा प्रकारे कोणत्या ना कोणत्या लाभाची वाटेकरी असते. आणि ती जर अशा प्रकारे अलभ्य लाभ घेत असेल तर, देश कसा आणि कधी प्रामाणिक होऊ शकेल? आत्महत्त्या केलेले शेतकरी आणि शहीद झालेले सैनिक या सर्वांची अशा प्रकारे पडताळणी करणे हे अशक्य आहेच, पण ती पडताळणी आपल्यासारख्या देशवासियाना शोभादायकही नाही. देशाच्या अर्थव्यवहाराच्या तुलनेत १६ कोटि रुपये फार नव्हेत, पण त्यातून देशाच्या नीतिमत्तेवर ठसठशीत डाग उमटतो हे वास्तव आहे.

गेले ते दिवस....
१५ ऑगस्ट १९४७ला स्वातंत्र्य मिळाले खरे, तो दिवस आजही आठवतो. रात्री बाराला देशभर टेलिफोन खणखणले, खेडोपाडी वार्ता पोहोचल्या.आमच्या गावातही ही बातमी पोहोचली. सोलापूर जिल्ह्यात सांगोला तालुक्यात माणगंगेकाठी वसलेेले सावे हे आमचे अगदी छोटेसे गाव. नदीमुळे अडथळे होते. नदीवर पूल नव्हता. नाव चालत नव्हती. पाण्याला खूप ओढ होती. त्यामुळे भोपळयाच्या सांगडीवरून नदी पार करावी लागे.
गावातील काही प्रतिष्ठित मंडळी सुधारणा व्हाव्यात म्हणून प्रयत्नशील होती, त्यामध्ये माझा सर्वात मोठा भाऊ गोविंद कृष्णाजी कुलकर्णी पुढाकार घ्यायचा. तो रोज केसरी पेपर सांगोल्याहून आणायचा, चावडीसमोरच्या पारावर बसून वाचून दाखवायचा, देशातल्या घडामोडी सर्वांना समजून सांगायचा. त्या दिवशीही पेपर वाचून दाखवला होता आणि रात्री तालुक्याहून तहसीलदारांचा आदेश आला, `भारताला स्वातंत्र्य मिळाले आहे. गावात प्रभातफेरी काढून चावडीसमोर तिरंगा फडकवा, आनंदोत्सव साजरा करा.' असाच आदेश तालुक्यातील खेडोपाडीही पोहोचला होता.
दादाने गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळींना निरोप दिले. शिक्षक एकच होते. पहिली ते चौथी एकशिक्षकी शाळा होती, त्याना उठवलं. साऱ्या मंडळींनी हातात खराटे घेऊन रस्ते साफ केले. कोळयाच्या पखालीने सडा मारला. मुलींनी रांगोळया काढल्या. शाळेची मुलं अंघोळ करून स्वच्छ कपडे, डोक्यावर गांधी टोपी घालून हजर झाली. दादा नेहमीच स्वत: सूतकताई करून खादीचे कपडे वापरत होता. ही सारी तयारी कंदील व बॅटरीच्या उजेडात झाली होती.
पहाटे पाच-साडेपाचला थोडे झुंझुरके झाले. चावडीच्या पटांगणात प्रभातफेरीची तयारी झाली. आम्हीही सहभागी झालो. सहा वाजता `जयहिंद'ची जोरदार घोषणा झाली. `महात्मा गांधीजी की जय', `पं.जवाहरलाल नेहरूजी की जय', `स्वतंत्र भारताचा विजय असो' अशा घोषणा देत तिरंगा फडकला. प्रभात फेरी वळसा घालून परत शाळेच्या पटांगणातून चावडीसमोर साडेआठला पोचली. कैकाडी वाजंत्री घेऊन, उखळी बार उडवणारे रामोशी, व्हलाराची ढोलची पिपाणी... सारे मोठ्या उत्साहाने हजर होते. चावडीसमोर दादाने भाषण केलं. इतर मान्यवरांनी आपले विचार मांडले. इमडे वस्तीवरील सधन शेतकऱ्याने भुईमुगाच्या शेंगाचं पोतं शाळेच्या पटांगणात आणून ठेवलं होतं. सरगर वस्तीवरून गुळाच्या ढेपी आल्या होत्या. कार्यक्रमाची समाप्ती गूळशेंगाच्या खाऊ वाटपाने झाली.
दिवस जात होते. छोट्या-मोठ्या कुरबुरी होत्या पण आनंद फार काळ टिकत नाही हे खरे. ३० जानेवारी १९४८ला महात्मा गांधींची हत्या झाली. भारत होरपळून निघाला. सोलापूरचे कोर्ट जाळले. ब्राह्मणांची घरे पेटत  होती. धुराचे लोट दिसायचे, आजही डोळयासमोर तसेच दिसतात!
- सौ.शकुंतला पांडुरंग जेरे, मिरज
(मोबा.९४०३५७१२४२)


आंतरलहरींवर लहरणारे स्वातंत्र्य
कुठल्याही व्यक्तिगत किंवा सार्वजनिक उत्सवांत प्रारंभकाळी जी अपूर्वाई, उत्साह, उन्मेश यांचे दर्शन होते त्यात कालक्रमाने एक प्रकारे शिथिलता येत जाते. संदर्भ बदलतात. परिस्थिती बदलते. विचार बदलतो. पिढी बदलते. मग अशा उत्सवांबाबत मतान्तरे व्यक्त होऊ लागतात, त्यांचे रूपान्तर वादांतही होते. ते वाद दुर्लक्षित करून किंवा त्यातील एकच बाजू रेटून, उत्सव जर कुणाच्यातरी मिरवण्यापुरते होऊ लागले तर त्याचेही कर्मकांडच बनते. त्या उत्सवामधील प्रेरक तत्वे जागती राहण्याऐवजी ती तत्वेच निद्रिस्त राहून भ्रामक स्वप्ने पाहण्याची वृथा पद्धत रूढ होते. आपले गणेशोत्सव, वारी-धर्ममेळे, शिवजयंती आणि स्वातंत्र्यदिनसुद्धा अशा स्वप्नविश्वात उगवतात आणि मावळतात. स्वप्नभंगानंतर दिनक्रमाचे व्यवहार आळसावलेले वा चिडचिडे होऊ लागतात. प्रेरक उत्सवांची `तात्पुरती मौज' होते.

गेल्या वर्षीच्या मे महिनाअखेरीस नवे सरकार आल्यावर दोन अडीच महिन्यांनी स्वातंत्र्यदिन झाला. त्यावेळचा अनपेक्षित बदल देशाला चैतन्य देईल असे वाटत होते, पण चालू वर्षीच्या त्या दिवसाला पुन्हा त्या आळसट कर्मकांडाची `मौज' असल्याचा भास होत आहे. गेल्या देशाच्या भावना हर्षभराने उचंबळून याव्यात असे काही वर्षभरात घडले नाही. त्याउलट केंद्रीय आणि राज्यपातळीवर राजकीय-सामाजिक क्षेत्राने ज्या भंपक कामकाजाचे दर्शन घडविले ते अनुभवल्यानंतर, स्वातंत्र्यदिनाचा अर्थ आणि आशय शोधण्यासाठी फार प्रयत्न करावे लागतील.

भारतीय जनता पक्षाचे राज्य आल्यावर प्रधानमंत्र्यानी लाल किल्ल्यावरून उत्तमोत्तम आशाअपेक्षांचे चित्र निर्माण केले, पण संसदेतील कामाचे आठवडेच्या आठवडे निव्वळ गाढवगोंधळाने काँग्रेसकरांनी बरबाद केले. देशाच्या परराष्ट्न्मंत्र्यावर निव्वळ आरोप झाले म्हणून राजीनामाच दिला पाहिजे ही मागणी अजब आहे. सोनियाजी किंवा राहुल गांधी यांना आरोपांचे इतके गांभीर्य कधीपासून कळले? बोफोर्स प्रकरणी क्वात्रोची या इटालियन माणसाकडून थेट दलाली घेतल्याचे आरोप राजीव गांधी व सोनिया यांच्यावर शेकले होते. पण शेवटपर्यंत ते `आरोप' राहिले. ते आरोप, सुषमा स्वराज यांच्यावरील आरोपांहून जास्तच गंभीर होते; त्याबद्दलचे प्रायश्चित्त कोणी घेतले? आरोप असतील तर ते सिद्ध करून त्यांस शिक्षा करविण्यासाठी स्वतंत्र मार्ग आहेत. लोकशाही पद्धतीने असे प्रशासन, असे न्यायालय चालविले जावे यासाठीच तर या सार्वभौम देशाने प्राणपणाने स्वातंत्र्य मिळवले; त्यास प्रजासत्ताक घटना दिली. परंतु यापैकी काहीही न जुमानता एखादे भडक गोविंदाटोळके किंवा आजकालचे उपद्रवी गस्तपथक किंवा राधेमाँपंथी असल्याप्रमाणे बेछूट वर्तन खासदार-आमदारांनी चालविले आहे. ध्वजासमोर हात जोडल्यावर स्वतंत्र सार्वभौम भारताच्या उदयकाळाची कोणती चाहूल त्यातून अनुभवता येईल?

इकडे महाराष्ट्नतल्या `राष्ट्नीय' व `राष्ट्न्वादी' म्हणवून घेणाऱ्या आमदारांनी पिपाण्या वाजविणे, चिक्कीचे उखाणे घेणे, बहुरुप्याचे वेश करणे असले बाष्कळ प्रकार करून प्रसार माध्यमांस मौज पुरविली. त्या कारणांनी त्या माध्यमधंद्याला गिऱ्हाईक मिळाले तरी स्वातंत्र्यगीत गाऊ इच्छिणाऱ्या नागरिकांस वेदना झाल्या आहेत. जलसंधारणासाठी आराखडाच न करता; किंवा केलेला आराखडा डावलून १८९ प्रकल्प घाईने `मार्गी' वळविणारे, किंवा दिल्लीतील महाराष्ट्न् सदनाच्या प्रकल्पातून स्वत:च्या घरावर संशयाचे छापे घेणारे राष्ट्न्वादी मंत्री, काल-परवा मंत्री झालेल्या महिलेवर चिक्की खरेदीवरून राजीनाम्यासाठी दबाव आणत असतील तर स्वतंत्र देशाचा ध्वज वायुलहरींनी लहरेल,-की स्तंभाशी मरगळेल? मुख्यमंत्री म्हणतात त्याप्रमाणे केवळ आरोपावरूनच राजीनामे द्यायचे असतील तर विरोधी निम्मे सदस्य घरी जातील.

गंभीर गुन्ह्याची खात्री कागदोपत्री सज्जड पुराव्यानिशी झाली तरच तसा आरोप करून, त्रागा म्हणून राजीनामा मागावा हा एक तात्कालिक भावनावेग मानता येईल. पण ती पद्धत किंवा उपाय नक्कीच नव्हे. तसा सज्जड पुरावा लोकांपुढे ठेवून क्षुब्ध लोकभावनेचे हत्यार उगारता येते. पण त्या हत्याराने फारतर राजीनामा घडेल; शिक्षा होणार नाही. चौकशी-तपास-आरोपपत्र हे काम प्रशासनाचे व शिक्षा करणे हे न्यायालयाचे काम आहे. अतिरेक्याला फाशी देण्यासाठीसुद्धा न्यायालयाची प्रदीर्घ-किचकट पण अत्यावश्यक प्रक्रिया असते. ती घटनामान्य आहे. तीच अनुसरावी लागते. लोकक्षोभावरच ते काम सोपविले असते तर कदाचित् त्या गुन्हेगारास ठेचून मारले असते. त्याला देशाचे स्वातंत्र्यप्रेम म्हणत नाहीत, अराजक म्हणतात. तसे कदापि होऊ नये. एका उद्वेगापोटी तसा उच्चार करणे व घटनाबद्ध राजशकट चालणे यात फरक असतो. जनतेने भरघोस मतांनी निवडून दिलेल्या मोदी सरकारनेच समजा राजीनामा दिला तरी ४४जणांच्या पाठिंब्यावर राहुल राज्य करू शकणार काय?

तसा उद्वेग वा त्रागा विरोधी पक्षीयांकडून व्यक्त होऊ शकतो, त्यांचा तो हक्कच आहे. पण `संसद किंवा विधिमंडळ चालूच देणार नाही' ही अरेरावी म्हणजे स्वातंत्र्य नव्हे. आजचे सत्ताधारी काही वर्षांपूर्वी विरोधी बाकांवरून असेच वागत होते, तेही नि:संशय निषेधार्हच होते. त्यावेळचे कारण `समर्थनीय' होते असला फसवा दावा करणे मुळीच शोभादायक नाही. जनतेचे प्रतिनिधी म्हणून अभ्यासू चर्चेने धोरण-कायदे ठरविण्यासाठी ते घटनादत्त सभागृह आहे. तिथे सभापतींकडून न्याय मिळत नाही असे वाटत असेल तर त्या सभागृहात जावेच कशाला? बाहेरच्या जगात असंख्य सेवक लोकहिताची कार्ये करीत असतात, त्यांना अशा सभागृहाची गरज वाटत नाही. ती गरज ज्यांना वाटते, त्यांनी त्या व्यवस्थेचे नियम व शिस्त पाळलेच पाहिजेत. त्यांनी तिथे गर्दभगोंधळ करावा आणि इथे ध्वजवंदनात पोराटोरांपुढे स्वतंत्र देशातील समन्वयी एकतेचा उपदेश करावा! तो त्या ध्वजस्तंभाला मुखस्तंभ होऊनच ऐकावा लागतो.

लोकशाही स्वातंत्र्यातून मिळालेली सत्ता, म्हणजे दौलतजादा करणाऱ्या सुलतानाची उद्दामगिरी नव्हे. निविदा मागविणे हा लोकनिधीच्या काटकसरी व्यवहाराचा एक सभ्यसंमत मार्ग असतो. त्यात `निविदा' महत्त्वाची नसून रास्त किंमत महत्त्वाची आहे. चिक्की योग्य-अयोग्य, शुद्ध-अशुद्ध हे पाहणे आवश्यकच आहे. तातडीचे काही व्यवहार नियमांत अपवाद म्हणूनही करावे लागतात. गावाला नदीच्या पुराने वेढल्यावर अन्नपाकिटे किंवा होड्यांसाठी कोणी निविदा मागवत नसतात. परंतु असा अपवाद, अपवादानेच येतो. एरवी एखाद्या प्रकल्पाची योजना, अंदाजपत्र, तरतूद हे अर्थवर्षाच्या प्रारंभी मांडावे लागते. परंतु आजवरची पद्धतच अशी की, आर्थिक वर्ष संपत येईतो काम सुरूच करायचे नाही. शेवटी शेवटी एकदम धुल्ला उसळून दिला की निविदा नाही, मोजमाप नाही, तपासणी नाही, कुणाचा आक्षेप येण्याआधी काम परिपूर्ण! यातली गोम जनतेला कळत नाही असे मंत्र्यांपासून कंत्राटी मजुरापर्यंत सगळे समजून चालतात. तसेच वागायचे हे आजच्या बदललेल्या सत्ताधाऱ्यांनी ठरवले आहे काय? आजच या अंकासह साऱ्या वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेली शासनाची स्वातंत्र्यदिनाची जाहिरात १४ ऑगस्टला हाती आली, हीच गेल्या अनेक वर्षांची रीत आहे. स्वातंत्र्यदिन हा सोहळासुद्धा ज्यांना अपवादात्मक अनपेक्षित घाईचा वाटत असेल, त्यांनी मुलांसाठी शिळी चिक्की ऐनवेळी द्यावी किंवा ३० मार्चला खरेदी करावी,हे ओघाने येते.

एक राज्यकर्ता जाऊन दुसरा आला म्हणून जनतेला स्वातंत्र्याचा लाभ होत नसतो. पिंजऱ्यातील पक्षांप्रमाणे आपसात भांडायचे की मोकळया माळरानावर गिधाडांसारखे भांडायचे, यावरून स्वातंत्र्य ठरत नाही. स्वातंत्र्याचा ध्वज असल्या आकांडतांडवी प्रभंजनात फडफडून फाटण्याची शक्यता जास्त असते. तसा तो फडफडाट करण्याऐवजी शीतल वायूसंगे लहरत राहणे अपेक्षित आहे. त्यासाठी स्वातंत्र्याच्या उसळत्या उर्मींइतकेच विवेकाचे-समन्वयाचे-सन्मानाचे जाणतेपणाचे मधुमंद श्वास देशभरातील नागरिकांना अनुभवता आले पाहिजेत. हा स्वातंत्र्यदिन आपल्या सर्वांसाठी ते मुक्त-स्वस्थ-संपन्न स्वातंत्र्य देवो ही शुभकामना.

....... सहकाराचा दुर्लभ अनुभव .......
पलूसच्या विष्णू दिगंबर पलूसकर शाळेच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने काही योजना घेऊन ज्येष्ठ विधिज्ञ न्या.नरेंद्र चपळगावकर यांची भेट घ्यायची होती. ते औरंगाबादला असतात पण वाईच्या प्राज्ञ पाठशाळेच्या संचालकांची एक बैठक असल्यामुळे ते वाईला येणार होते. तो योग जुळवून आम्ही तिथे भेटण्याचे ठरले. संस्थेचे अध्यक्ष उदय परांजपे, एक संचालक विश्वास रावळ, मी आणि वसंत आपटे असे गेलो होतो. ही त्यांची बैठक वाईजवळ किसनवीर साखर कारखान्यावर होती.  साखर कारखान्याचे अप्रूप आम्हाला नव्हते. आजवर पुष्कळदा त्या आवाराचा अनुभव घेतलेला आहे. गावची जत्रा उलगून गेल्यानंतर असते तसे विस्कळलेेले वातावरण कारखान्याच्या सभोवती असते. ते लक्षात आल्यामुळे सर्वांच्याच मनात येऊन गेले की प्राज्ञ पाठशाळेसारख्या संस्थेची बैठक घेण्याला `अशी जागा' कशी काय निवडली असेल?  तशा वातावरणाचीच अपेक्षा करून आमची गाडी कारखान्याकडे वळली. पावसाची टंचाई असली तरी सरत्या आषाढाची हिरवाई आणि गुळगुळीत रस्ता यांमुळे साखर कारखाना `जाणवत' नव्हता.
कारखान्याच्या प्रवेशद्वारात पोचलो. रंगीबेरंगी फुलांचे ताटवे आणि एकूण चकचकीत वातावरण पाहात असताना कोणीही गुरकावून चौकशी केली नाही. उलट आमच्या चौकशीला नम्र उत्तरे देत गेटवरून गेस्टहाऊसची दिशा काळजीपूर्वक दाखवली. वॉचमनइतकेच नम्र त्यांच्यावरचे कोणी साहेब होते. त्यांच्या चौकशीत विनयशीलता होती. आमचा कोणताही गोंधळ होणार नाही इतक्या खाणाखुणा आणि वळणे सांगून त्यांनी गेस्टहाऊस सांगितले.
तिथे पोचल्यावर स्वच्छतेने खूप प्रभाव टाकला. गणवेशात असलेल्या बाया पालापाचोळा गोळा करीत होत्या. पण तिथे शांतता होती. मीटिंगची लगबग कुठे दिसत नव्हती. एका सफाई महिलेला विचारले. तिने हसतमुख नमस्कार केला हेसुद्धा आश्चर्य होते. गेस्टहाऊसवरचा माणूस लगबगीने पुढे आला, तेच हास्य-तोच आदरभाव. आम्ही जरा चक्रावूनच गेलो. `सर, मीटिंग बहुधा जनरल हॉलमध्ये असावी, थांबा मी चौकशी करतो.' असे म्हणत त्याने फोन फिरवला. व्यवस्थित माहिती घेतली आणि ती आम्हाला देत त्याने `मी दाखवायला येऊ का' असे विचारले. तोवर दुसऱ्या बल्लवाचार्याने `आपण खोलीत बसा, चहा देतो' वगैरे अगत्य करून झाले.
जनरल हॉलशी आम्ही पोचलो. दोन ज्येष्ठ अधिकारी अदबीने उभे होते. आम्ही पुढे होताच अल्पसे झुकून त्या अधिकाऱ्यांनी अभिवादन केले. पुढे येऊन हात हाती घेतले. फारसे उघड बोलले नाही तरी त्यांची देहबोली सांगत होती, `अंत:करणपूर्वक स्वागत.' आम्हाला आतल्या ऐटबाज दालनात बसविण्यात आले. आम्ही एकमेकांना म्हटले, `बहुधा यांचा काहीतरी गैरसमज झाला असावा. आपल्याला ते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तर समजलेले नाहीत ना?' पण तसे नव्हते. त्यांना नेमका निरोप दिला गेला होता. एका अधिकाऱ्याने विनयाने विचारले,`चपळगावकर सरांना भेटायला आला आहात ना?'
समोर टवटवीत फुलदाणी, मंद सुगंध, नितळ काचेच्या पेल्यातून प्यायला पाणी, त्यावर झाकण. `सर, या बाजूला व्यवस्था आहे. फ्रेश व्हायचे असेल तर... चहा की कॉफी? साखर चालेल ना? किती? की वेगळीच देऊ?' किणकिणत्या कपबशीतून चहा आला. उंची बिस्कीटे. सगळेच चकीत होण्याजोगे वाटले. दुसरे एक अधिकारी आले. त्यांनीही अभिवादन करून अदबीने विचारले, `चपळगावकर सर इतक्यातच पोचलेत. त्यांचे आवरून झाले की मी तुम्हाला निरोप देईन.' - म्हणजे कुठे समज-गैरसमज नव्हता. घोटाळाही नव्हता. पण आम्हाला आश्चर्य करण्याजोगे मात्र होते. त्या अधिकाऱ्याने पुस्ती जोडली, `सुदैवाने आज दादा-(म्हणजे कारखान्याचे चेअरमन श्री.मदन भोसले)येथे आहेत. आपण आल्याचे त्यांना माहीत आहे. आपली सदीच्छा भेट घेण्यास त्यांना आवडेल.' वाक्यावाक्यातील शब्दप्रयोगातून आम्हाला गोडगोड वाटत होते.
आम्ही थोडावेळ गप्पाटप्पा करत वाट पाहिली. मघाचे अधिकारी पुन्हा आत आले. आणि त्याच सभ्यतेने म्हणाले, `सर, कारखान्याच्या संदर्भात वेगळी एक मीटिंग आजच आहे. त्याच ठिकाणी प्राज्ञ पाठशाळेची मीटिंगही आहे. त्यामुळे बरीच मंडळी जमलेली आहेत. चेअरमन साहेबांची योजना अशी की आपण सर्वांनी एकत्रितच चहा-न्याहरी घ्यावी. तेव्हा आपण तिकडे याल का?-किंवा आपण म्हणत असाल तर न्याहरी इकडेही पाठवता येईल.' अर्थातच आम्ही तिकडे गेलो.
प्रशस्त मोठे बैठकीचे सभागृह. शंभरभर लोक शांत बसलेले. मघाशी तर इथे शुकशुकाट होता. एवढी मंडळी जमली कधी? गडबड-गोंधळ-गोंगाट कुठेच आपल्या कानावर पडला नाही. एवढे लोक आल्याचे आम्हाला पलीकडच्या बाजूला समजलेही नव्हते.
लंबगोलाकार टेबलाशी मंडळी स्थानापन्न झालेली, काहीजण मागच्या खुर्च्यांवर होती. गणवेशातील कर्मचारी गडबड-गोंधळ न करता शिस्तबद्ध काम करीत होते. भोसलेदादांचे सगळयावर बारीक लक्ष असावे. आपटे यांनी न्याहरीची प्लेट नम्रपणी नाकारली होती. भोसलेदादांच्या नजरेतून ते सुटले नाही. आम्ही तसे दूर बसलो होतो. ते स्वत: जागेवरून उठले, वाट काढत जवळ येऊन आपटेंना ते म्हणाले, `अहो, तुम्ही काहीच घेतले नाही. असं का बरं?' बाजूच्या एका कर्मचाऱ्याच्या ट्न्ेमधून छोटी प्लेट स्वत:च्या हाताने त्यांनी देऊ केली.
अल्पावधीतच वेगळी दालने ओलांडत भोसलेदादांनी मा.चपळगावकरांसह मुलाखतीची व्यवस्था केली. कुणाचा व्यत्यय येणार नाही असे नियोजन होते. तिथेही चहाची एक फेरी झाली. तिथल्या माणसाला आम्ही बिनसाखरेचा चहा सांगितला होता पण त्याने दिलेला चहा साखरेचा होता. त्याचा पहिला घोट घेईपर्यंत तो कर्मचारी धावतच आला आणि `चुकून साखर घातली गेली आहे. तो चहा परत द्या, मी दुसरा आणतो' असे म्हणू लागला. आम्ही अर्थातच ते नाकारले. त्याच्या चेहऱ्यावर या चुकीबद्दल इतका कळवळा दिसला की आम्हालाच अपराधी वाटू लागले.
काय आणि किती वर्णन करावे! आमचे बोलणे परतीच्या गाडीत सुरू झाले. `जिथे नेतृत्त्व सुसंस्कृत आणि विनम्र असते तिथे या अकल्पित गोष्टी शक्य होतात. चेअरमनसाहेबांचे एकवेळ ठीक आहे पण तळातल्या शिपायापर्यंत हे सगळे अगत्य पाझरले कसे? हे संस्कार प्रत्येक माणसावर कसे झाले असतील?' काम संपवून आम्ही या अविस्मरणीय अनुभवाच्या स्मृती जागवत परत फिरलो. न्या.चपळगावकर यांच्याशी वसंत आपटे यांची मुलाखत खूप काही देऊन गेली. पण त्याचबरोबर सहकारी साखर कारखान्याच्या भेटीचा हा आनंदही वेगळाच होता हे मुद्दाम सांगायला हवे.
- मोहन जी. आळतेकर, किर्लोस्करवाडी
मोबा. ९४२११८४९९६

न्याय प्रभावी हवा
२२ वर्षांनंतर का असेना पण १९९३ सालच्या बॉम्बस्फोट खटल्यातील एका तरी गुन्हेगाराला फासावर लटकवण्यात आले! अनेकदा म्हटलं जातं की, `न्यायदानाला विलंब म्हणजे अन्याय.' इतक्या महत्त्वाचा फौजदारी खटला भिजत पडून राहातो. तो खटला घरगुती खुन्यावर नव्हे, जातीय दंगल, अत्याचाराची बाब नव्हे, राज्यांतर्गत तंटा नव्हे. त्यात देशाची प्रतिष्ठा पणाला लागावी, तो सबंध देशाला अस्वस्थ करून टाकणारा बॉम्बस्फोट होता. त्याने संपूर्ण देश हादरून गेला. राष्ट्नची प्रतिष्ठा पणाला लावणाऱ्या बॉम्बस्फोटाचे सूत्रधार अजून मोकाट तर आहेतच, पण ते आजही `परिणाम भारताला भोगावे लागतील' असल्या धमक्या देण्याचे धाडस करू शकतात.
आम्ही सर्वच क्षेत्रात सुधारणा घडवून आणत आहोत. पण न्याय व्यवस्थेचे काय? ती अजून स्वातंत्र्यपूर्व काळातलीच आहे. राष्ट्नची प्रतिष्ठा पणाला लावणाऱ्या खटल्यांचे निर्णय; जलद न्यायव्यवस्थेची निर्मिती करून का दिले जात नाहीत? अशा गुन्हेगारांना पकडण्यासाठी व न्यायदानासाठी काही जलदगती उच्चस्तरीय यंत्रणा ही राष्ट्नची निकड आहे. गुन्हेगारांची खातरजमा लवकरात लवकर आणि नि:पक्षपातीपणाने होईल. त्वरित कार्यवाहीची यंत्रणा उभारावी. जागतिक स्तरावर केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा सांगोपांग अभ्यास व्हावा. अशा यंत्रणा अस्तित्वात असल्याचे आणि कार्यरत असल्याचे दिसत तरी नाही. आसाम-नागालँड बॉर्डरवर काही कारवाई झाल्याचे दिसते. अशी अॅक्शन जम्मूकाश्मिर व पाकिस्तानच्या बॉर्डरवरही अपेक्षित आहे.
तसेच जलद न्यायदान आवश्यक आहे. प्रत्येक खटला किती काळ रेंगाळावा यालाही काही मर्यादा आहेत. कुठलाही खटला दहा वर्षांपेक्षा जास्त काळ चालवता येणार नाही अशा मर्यादा लागू व्हाव्यात. म्हणजे निरपराधांना वर्षानुवर्षे तुरुंगात राहावे लागणार नाही व न्यायदान प्रभावी ठरेल.
- विद्या दिवेकर,मोबा. ९९६०४५२८४१
वासुदेव मंदिर, वाटेगाव (जि.सांगली)


श्रद्धेने भरणारा कुंभमेळा
हिंदुस्थानात चार ठिकाणी कुंभमेळयात लाखो भक्तगण सहभागी होतात. कुंभमेळा सर्वांच्या दृष्टीकोणातून कुतूहल निर्माण करणारा सोहळा आहे. तीर्थक्षेत्र प्रयाग, हरिद्वार, नाशिक त्र्यंबकेश्वर व उज्जैन येथे हे कुंभमेळे होतात.
पौराणिक कथा अशी; देवांनी समुद्रमंथन केले. मंथनातून अमृत बाहेर आले. इंद्राचा पुत्र जयंत याने हा अमृतकुंभ स्वर्गाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला. कुंभ मिळविण्यासाठी देव आणि दानव यांच्यात घनघोर युद्ध झाले.  युद्धात अमृतकुंभाला धक्के लागले. त्यातील चार थेंब पृथ्वीवर पडले. ती क्षेत्रे प्रयाग, उज्जैन, हरिद्वार व त्र्यंबकेश्वर.
गुरु कंुभ राशीत असताना हरिद्वार, वृषभ राशीत असताना प्रयाग, सिंह राशीत गुरू असताना नाशिक त्र्यंबकेश्वर येथे, गुरू सिंह राशीत असताना परंतु सूर्य मेषेचा, तुळेचा चंद्र आणि वैशाखी पौर्णिमा असताना उज्जैन येथे कुंभमेळा भरतो. नाशिक कुंभमेळयाला महत्त्व आहे. दर बारा वर्षांनी हा कुंभमेळा भरतो. सिंहस्थ काळास शुभारंभ पहिला दिवस, दुसरा कार्तिकी पौर्णिमा, तिसरा एकादशी व चौथा महाशिवरात्र.
नाशिक हे पद्मनगर म्हणजेच कमळांचे नगर म्हणून ओळखतात. कृतयुगात ब्रह्मदेवाने पद्मासन घालून येथे तपश्चर्या केली म्हणून पद्मनगर. प्रभू रामचंद्रांच्या काळात या ठिकाणाला `जनस्थान' म्हणूनही संबोधत. लक्ष्मणाने शूर्पणखेची नासिका कापली म्हणून कलियुगात त्याचे नाशिक नाव झाले. नाशिक सभोवताली जुनी गढी, नवी गढी, कोकणी टेकडी, जोगवाडा, म्हसरूळ टेक, महालक्ष्मी टेक, गणपती टेक, डिंगर आळी टेक, चित्रघंटा टेक अशा नऊ टेकड्या आहेत. अरुणा, वरुणा, सरस्वती, श्रद्धा, मेघा, सावित्री व गायत्री या उपनद्या या तीर्थक्षेत्रावर वाहतात. त्यामुळे या नदीत बारा महिने पाणी आढळते. नाशिकमधील पांडवकालीन लेण्यांमध्ये काही कोरीव कामाचे उल्लेख आढळतात. सातवाहन राजा कृष्ण याने नाशिकची काही लेणी खोदल्याचे संदर्भ आहेत. सातवाहन काळातील गौतमीपुत्र सातकर्णी याचा पुत्र पुलुमावी याने इ.स.९६ ते १०० या काळात नाशिक येथील नवगावपर्यंत आपला साम्राज्यविस्तार केला होता. नवव्या शतकापर्यंत येथे राष्ट्न्कुट राजांचा प्रभाव होता. इ.स.९७० ते ११८२ पर्यंत नाशिक कलचुरी राजांंच्या ताब्यात होते. इ.स.१००० ते १२०० पर्यंत पाटणच्या निकुंभ वंशातील राजांची सत्ता नाशिकवर होती. नंतर नाशिकचा परिसर देवगिरीच्या यादवांच्या नियंत्रणाखाली आला. या काळात हेमाडपंती मंदिरे, तीर्थकुंडे, विहिरी बांधल्याचे उल्लेख आढळतात. इ.स.१३०८ मध्ये नाशिकवर यादव वर्चस्व होते. मौर्य काळात बौद्ध धर्म प्रचारावेळी लेणी कोरली होती. इ.स.११व्या , १२व्या शतकात नाशिक येथे जैनधर्माचा प्रभाव होता. १४व्या शतकात जैनमुनी प्रभासुरी यांच्या नोंदीत `नासिक तीर्थक्षेत्र' असा उल्लेख आहे.
यादव राजा रामदेव राय याच्या कारकीर्दीत १३०८मध्ये अल्लाउद्दीन खिल्जी याने मलिक गफूर याला पाठविले. इ.स.१३१३ ते १३४७पर्यंत मलिक गफूर याचे नाशिकवर वर्चस्व होते. १४८७पर्यंत बहामनी राजांचे नाशिकवर वर्चस्व होते. १४८७ ते १६३७ या काळात अहमदनगरच्या निजामाचे नाशिकवर वर्चस्व होते. निजामशाहीचा अस्त झाल्यावर इ.स.१६३७ पर्यंत मोगल साम्राज्यात नाशिकचा समावेश होता. १६८४ ते १७१३ या कालावधीत मोगल व मराठे यांच्यात चकमकी झाल्या. मराठा सरदारांनी विजय मिळविला. पहिल्या बाजीरावाच्या कारकिर्दीत नाशिकमध्ये पेशव्यांचे महत्त्व वाढले.
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे वंशावळी नोंदीच्या पद्धती रूढ आहेत. साधुमध्ये शैव आणि वैष्णव असे दोन प्रकार आढळतात. ब्रह्मगिरी पर्वत शिवस्वरूप असून या पर्वतावर तत्पुरूष, ईशान, वामदेव, अघोरी व सघोजात ही पाच शिखरे आहेत. यंदाचे वर्षी १४-०७-२०१५ रोजी प्रारंभ ध्वजारोहण, १९-०८-२०१५ रोजी साधुग्राम, २९-०८-२०१५ श्रावण शुद्ध पौर्णिमा रोजी मुख्य पहिले शाहीस्नान, १३-०९-२०१५ श्रावण वद्य अमावस्येला दुसरे मुख्य शाहीस्नान, ११-०९-२०१५ रोजी तिसरे मुख्य शाहीस्नान व गुरुवार दि.११-०८-२०१५ श्रावण शुद्ध अष्टमी रोजी ध्वजावतरण असा कार्यक्रम आहे. या कुंभमेळयात दानांचे महत्त्व आहे.
कुंभमेळयात पालखी सोहळा, नगारा, चौघडा, कारभारी, पुजारी, अनुयायी वगैरेचे सहभाग असतो. निर्वाण गोसावी, अटल आखाडा, निरंजन आखाडा, निळपर्वत आखाडा, उदासी आखाडा, उपासी साधू, निर्मळ आखाडा वगैरेजण सहभागी होतात. आखाड्यांची संघटना असते. त्यांचा एक प्रमुख असतो. काही प्रसंगी ही मंडळी निवाडा करतात. विविध आखाड्यांचे विविध रंगांचे ध्वज व शामियाना असतो. प्रत्येकाचे स्वत:चे एक व्रत असते. भस्मलेपन, एका पायावर उभे राहणे, अफूगांजाचे सेवन, चिलीम ओढणे, जटा वाढविणे, धुनी पेटवून बसणे, दूध पिणारे, नक्त उपवास करणारे साधू आढळतात. शासन पातळीवर कोट्यावधी रुपये खर्च करून प्रयत्न केले जातात. १९ तीर्थक्षेत्रे त्र्यंबकेश्वर येथे आहेत. कुंभमेळयाबाबत कितीही श्रद्धा आणि अंधश्रद्धांची चर्चा झाली तरी कुंभमेळयाची गर्दी वाढतच आहे.
- नंदकुमार मराठे, कोल्हापूर
(फोन : ०२३१-२५४१८२३)

नम्र आवाहन
मी दुधोंडी (जि.सांगली) येथील शेतकरी आहे. अपघातामुळे माझ्या खांद्यास इजा होऊन ऑपरेशन करावे लागले. खर्च अंदाजे १.२५ लाख इतका आला आहे. आवश्यक ते कागदपत्र व औषधांची बिले मी देऊ शकेन. मला आर्थिक साहाय्य मिळावे.
- प्रशांत प्रताप जोशी, दुधोंडी (ता.पलूस जि.सांगली) मोबा.९५९५४२८५७९
बँक खाते - बँक ऑफ बडोदा, पलूस (खाते नं.४९९५०१००००१०३२)

अक्षता मोडक लग्नाच्या निमित्ताने
अक्षता मोडक नावाच्या निराधार मुलीचा, कुडाळ ब्राह्मण सभेने विवाह करून दिला. प्रकाश कुंटे यांनी अक्षताला (सहजासहजी किंवा कदाचित कधीही न मिळणारी) वडिलांची मिळकतही मिळवून दिली.
वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे गावातील कै.आण्णा गोगटे यांनीही समाजातील अनेक ज्ञातीतील अनेक निराधारांना आधार दिला आहे. कै.आण्णा गोगटे यांचे चुलते कै.गंगाधर विनायक गोगटे यांची कथा आहे. सुमारे चाळीस वर्षांपूर्वी वेतोरे गावात बहुजन समाजातील एक निराधार व भ्रमिष्ट स्त्री उघड्यावर प्रसूत झाली, तिला मुलगी झाली होती. तिला साहाय्य करण्याचे धाडस कोणासही झाले नाही; कै.गंगाधर गोगटे यांनी त्या प्रसूत महिलेला तिच्या मुलीसह आपल्या घरी आणले. त्यांना देशी औषधपाणी केले. काही दिवसातच ती महिला वारली. गोगटे कुटुंबाने त्या मुलीचा सांभाळ केला, पालनपोेषण केले. १९व्या वर्षी स्वखर्चाने लग्न करून दिले. आता त्या मुलीला दोन मुलगे असून ते मुंबईला नोकरीला आहेत. कै.गंगाधर गोगटे यांचे सुपुत्र बाळकृष्ण व सून स्मिता त्या मुलीचे अजूनही माहेरपण करतात. सणावारी `मुली'ला बोलावले जाते. ती मुलगीही गोगट्यांचे घर हे आपले माहेर समजून नेहमी येत असते.
कुष्ठरोग झालेली एक महिला बाबा आमटे यांच्याकडे उपचार घेत होती. ती निराधार होती. बाबा आमटे आश्रमातून सुटी मिळाली की, आपले `माहेर' म्हणून ती याच गोगट्यांकडे येते. कै.गंगाधर गोगटे यांचा मुलगा व सून अजूनही या दोघींची `माहेरपणे' करतात.   (कुशाग्रसिंधू)

आठवांचे साठव
वंदेमातरम् ।।
`त्यांचे' नि `आपले'
त्या वेळी विट्याचे काँग्रेस आमदार आणि नागेवाडीच्या साखर कारखान्याचे चेअरमन श्री.अनिल बाबर यांचा एके दिवशी अचानक फोन आला. भेटायचं ठरलं. विट्याला त्यांच्या घरी भेटलो. अनिलभाऊंचे गॉडफादर श्री.शरद पवार यांनी त्यांच्याकडे एक कामगिरी सोपवली होती. सांगली जिल्ह्यातले एक ख्यातनाम स्वातंत्र्यसैनिक शाहीर शंकरराव निकम हे वृद्धापकाळात होते. पक्षाघातानं आजारी होते. निकम मूळचे कुंडलचे, विटे तालुक्यातलं वांगी हे गाव त्यांची सासुरवाडी, तिथं ते सध्या राहात. या शाहिरांचं १९४२च्या चळवळीतील योगदान, नंतरच्या काळात यशवंतराव चव्हाणांशी जवळीक, जिल्हा खादी-ग्रामोद्योग मंडळाचं अध्यक्षपद, सत्यविजय बँक व इतर संस्थांतील पदं हे सगळं लक्षात घेऊन त्यांच्या कार्याची कागदावर काहीतरी नोंद करणं आवश्यक होतं. त्यांच्यावर एक गौरवअंक करावा असं आमच्या त्या बैठकीत ठरलं. माझे काका दत्त आपटे हेही जुने काँग्रेवाले. त्यांच्याकडं हे शाहीर सतत असायचे. आमचा गोतावळा त्यांना `शाहीरकाका' म्हणत असे. त्यामुळं मलाही या कामात स्वारस्य वाटलं.
यासंबंधीची योजना, लेखकशोध, भेटीगाठी, मजकूर, फोटो, छपाई या सगळया बाबतीत अनिलभाऊ कसं बघणार? - पण पूर्ण स्वातंत्र्य देऊन त्यांनी तो प्रश्न माझ्यासाठी सोपा केला. या निमित्तानं त्यांच्याकडं वारंवार जाणं व्हायचं. त्यांच्या स्वैपाकघरात टेबलाशी बसून खाणं-दूध हेही घडलं. माझे त्यांच्याशी निकट संबंध इतरांना कुतुहलाचा विषय होता. शाहीरांच्या कामात मी माझ्या परीनं बरेच परिश्रम घेतले. पुणे-सांगली-नगर वगैरे फिरलो. शाहीरांच्याकडे गेलो. त्यांची स्थिती जरा बिकटच होती, असंबद्ध बोलू पाहात होते, डोळयाला पाणी आणत होते. तसे इतर लेखकांचे अनुभवही हृद्य होते. एकूण हे सर्व काम मला वेगळं समाधान देऊन गेलं. अंक तयार झाल्यावर त्याचे प्रकाशन व शाहीरांचा सत्कार असा कार्यक्रम ठरवला. भाई संपतराव पवार आम्हा दोघांस येऊन मिळाले. त्यांनी बलवडीला येरळा नदीकाठी बळीराजा बंधारा आणि क्रांतिस्मृृतिवन उभं केलं होतं; तिथं स्वातंत्र्यसैनिकांचा मेळावा यानिमित्त होईल तेही उचित होतं. माजी शिक्षणमंत्री (नाव लिहीत नाही) आले. मी आखल्याप्रमाणं सगळा कार्यक्रम यथासांग झाला. पण एक मौज घडली ती लक्षात घेण्याजोगी आहे.
समारंभाची सांगता वंदे मातरम् गीतानं करायची. इस्लामपूरमधील मंद्रुपकर या शिक्षकानी साथसंगत केलेले सर्व कडव्यांचे प्रेरक गीत ध्वनिमुद्रित होते. मंद्रुपकर सरांनी ती ध्वनिफीत मला दिली. ते गीत लावले गेले. जमलेल्यांपैकी बऱ्याचशा लोकांना गीताची द्रुत चाल, संगीत व संपूर्ण गीत अपरिचित होते. त्या सर्वांना ते खूप आनंददायी वाटले. पण नामदार मंत्री  मात्र अस्वस्थ झाले. गीत संपल्यावर माईक हाती घेऊन ते म्हणाले, ``आत्ताच वाजवलेलं लांबलचक गीत आपलं नव्हे. आपण सगळेजण हे असलं गीत मान्य करू शकणार नाही. म्हणून नेहमीच्या प्रथेप्रमाणं दीडदोन कडव्यांचं वंदेमातरम् आपल्या चालीवर म्हणूया...'' त्यांनी म्हणायला सुरवात केली, साऱ्यांनी म्हटलं! पुन्हा तर पुन्हा!
या कार्यक्रमाचे सूत्रधार आमदार अनिल बाबर काँग्रेसचे; संपतराव पवार शेकाप(डावे), मी तर कुठेच नाही! या सगळयांनी ते प्रेरक संगीतमय दीर्घ गीत पसंत केले होते. त्यात आक्षेपार्ह काय आहे? पण संपूर्ण वंदे मातरम् हे काँग्रेसचे नव्हे; `त्यांचे'! असली विभागणी हास्यास्पद-छोट्या मनाची नाही काय? हे मंत्री बरेच असे-तसे मोठे म्हणून ओळखले जात. यांच्याबद्दल जी प्रतिमा मनात होती ती एकदम आक्रसली. आम्ही तिघांनी एकमेकांजवळ आश्चर्य व नाराजी व्यक्त केली. दुसरे काय करणार?
- वसंत आपटे, `वाल्मिकी' किर्लोस्करवाडी ४१६३०८

ब्राह्मणत्त्व म्हणजे काय?
- विवेकशास्त्री गोडबोले
चिंतन, मनन, अध्ययन आणि अध्यापन हे ब्राह्मण वर्णाचे खरे गुणवैशिष्ट्य आहे. म्हणून ब्राह्मण संघाने या सर्व गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. आणि समदृष्टीचा व समगौरवाचा विचार आणि आचारही सर्व समाजापर्यंत पोहोचवून रुजविण्याचा आणि आचरण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला पाहिजे.
स्वत:ला ब्राह्मण म्हणवून घेणाऱ्या व्यक्तींना जे `ब्राह्मणत्त्व' मिळालेले आहे ते त्या  व्यक्तीच्या गुणकर्माने मिळालेले नसून `वंशपरंपरेने' त्याला चिकटलेले आहे हे सर्वप्रथम समजून घेणे आवश्यक आहे. जशी बापजाद्यांची स्थावर जंगम संपत्ती त्याच्या वारसाकडे हस्तांतरित होते, तशा तऱ्हेचेच हे ब्राह्मणत्त्वही त्याच्याकडे अनाहूतपणे आलेेले आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. वारसाहक्काने प्राप्त झालेली मालमत्ता जर त्या व्यक्तीची पात्रता असेल, तरच त्याचेजवळ टिकून राहते, पात्रता नसेल तर नाही. हे जसे आहे, तसेच हे जे ब्राह्मणत्त्वही आपणाकडे आलेले आहे. त्याला आवश्यक असणारी पात्रता आपल्यापाशी आहे काय? याची तपासणीही ज्याची त्यानेच एकदा करून घ्यावी. ज्या गुण-कर्माने युक्त असलेल्या चेतनेस `ब्राह्मण चेतना' म्हटले जाते, ते गुण-कर्म आपल्यात किती प्रमाणात आहे, याचे आत्मपरीक्षण प्रत्येकाने स्वत:त डोकावून करून घ्यावे. आणि तसे केले तरच खऱ्या अर्थाने आपल्याला मिळालेल्या ब्राह्मणत्वाचा विकास साधता येईल आणि आपल्याला लाभलेले ब्राह्मणत्वाचे बिरूदही मग सार्थ होईल.
जगात असे फार थोडे लोक आहेत की, ज्यांची जीवन ऊर्जा सदा ज्ञानाच्या शोधात धावत असते. ज्ञानप्राप्तीसाठी तो सदा आतुर आणि वेडा झालेला असतो. तो प्राणही देईल पण जाणणे सोडणार नाही. एक वैज्ञानिक विषाची परीक्षा करीत आहे की, कोणत्या विषाने माणसाचा मृत्यू होतो. आता तो जाणतो आहे की, हे विष जिभेवर ठेवले तर त्याचा मृत्यू होईल. तरीही तो हे जाणू इच्छित आहे, अनुभव घेऊ इच्छित आहे. आपण म्हणाल की, हा वेडेपणा आहे. असे जाणून घेण्याची काय जरूरी आहे? परंतु आपल्या समजण्याच्या पलीकडील ती गोष्ट आहे. हा ब्राह्मण वर्णाचा मनुष्य ज्ञानासाठी ते विषही जिभेवर ठेवील. यातून त्याने काय मिळविले? कुठला फायदा झाला? आपणामध्ये कोणी खरा ब्राह्मण असेल तरच तो समजू शकेल. इतरांना ते कळणार नाही. ज्ञानलालसेप्रमाणेच नि:स्पृहता आणि निर्भयता हेही ब्राह्मण गुणाचे वैशिष्ट्य आहे.
गंगा गंगोत्रीजवळ जेवढी शुद्ध असते, तेवढी ती प्रयाग काशीजवळ राहात नाही. कारण मधल्या प्रवासात तिच्यात अनेक भलेबुरे प्रवाह येऊन मिळालेेले असतात. आपणाला परंपरेने प्राप्त झालेल्या ब्राह्मणत्त्वाची अवस्था अगदी अशीच आहे. म्हणून आपणापर्यंत आलेल्या ब्राह्मणत्त्वात ब्राह्मणत्त्वाचे गुण असले तरी आपले कर्म गुणानुरूप दिसून येत नाही. गुण हे बीजरूप असतात आणि कर्म वृक्षरूप असते. त्या प्राप्त बीजातून जेव्हा कर्मरूप वृक्ष प्रकट होत असतो तेव्हाच कुठल्या वर्णाचे बीज आपण घेऊन आलो आहोत, हे ओळखता येते. `ज्ञानप्राप्तीची उद्दाम वासना असणे' हे ब्राह्मण चेतनेचे प्रमुख लक्षण आहे.
कुठल्याही अन्यायी आततायी शासनाविरुद्ध विद्रोहाचे निशाण हाती घेऊन पुढे होतो तो ब्राह्मणच असतो. म्हणून साम्राज्यवादी शासक अशा या ब्राह्मणत्त्वाच्या सतत विरोधात असतात. खरा ब्राह्मण हा असा ज्ञानसंपन्न, ज्ञानोपासक आणि ज्ञानप्रदायक असल्यामुळे तो अनेकानेक प्रयत्नांनी अशा असुरी शासकाला, सत्तेच्या सिंहासनावरून खाली उतरविण्यासाठी समाजपुरूषाच्या सर्वांगात क्रांतीचा अंगार ओतून त्याला सतत जागवीत असतो. म्हणून अन्यायी अत्याचारी शासन निरंतर त्याचा द्वेष आणि विरोध करीत असते.
कुठल्याही वर्णाचा विकास साधायचा झाल्यास या सर्व गोष्टींचा विचार त्या त्या ज्ञानी संस्थेस वा धर्मसंस्थेस करावा लागेल, आणि मगच खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक आणि सर्वांगिण विकासाची दिशा म्हणजे नेमके काय हे ध्यानी येईल.
(`आपली संस्कृती आपली परंपरा' या ग्रंथातून)
पत्ता - वेदमूर्ति विवेकशास्त्री गोडबोले,
सो%हम्-साहिल अपार्टमेंट, १७४,रामाचा गोट, सातारा ४१५००२
फोन (०२१६२)२८३२७५

सन्मान्य सामान्यांची घुसमट
सत्ताधाऱ्यांनी केलेल्या प्रत्येक नियुक्तीवर राळ आणि राड उडवत, आपल्या दारूण पराभवाचा राग काढण्याची एक नवीनच प्रथा आली आहे. काँग्रेस-समाजवादी-तथाकथित डावे राजकारणी,-कुरकुरे बोरूबहाद्दर-बाष्कळ चमकोपटु चॅनलवीर आणि अर्थातच स्वत:ला भलतेच खोल विचारवंत मानणारे दिशाहीन पुरोगामी वर्गातल्या लोकांस हल्ली फार काही काम उरले नसावे. कधीतरी केव्हातरी सटवाईने यांच्या भाळी प्रसिद्धीच्या पाच रेघोट्या ओढलेल्या असतात. त्या संचितावर या सर्वांना लोकभावनांच्या वाऱ्यावर झुलत उंच चढत जाण्याचा भास होत असावा. त्या पाचोळविचारांवर भरंवसा ठेवून, साऱ्या जगातल्या चळवळींमागे आपलीच विचारधारा असल्याचे भासवत प्रत्येक बाबतीत ही मंडळी चवळढवळ करीत असतात. एक मात्र मान्य करावे लागते की, त्यांना माध्यमांतून स्थान मिळवता येते.-किंवा असेही असेल की, हल्ली काड्याटाकू माध्यमांना धंदा बरा मिळतो म्हणून ती माध्यमेच असल्या `वैचारिक विरोधाच्या' शोधात त्यांच्यामागे जातात.

लोकशाहीत निवडणुका अटळ असतात. त्या सलगपणी जिंकत राहण्याचा पराक्रम हा एकतर अपवाद असतो, किंवा खरोखरीच त्या उमेदवाराचे गणित मतदारांच्या कल्याणाशी जुळलेले असते. एरवी गल्लीतली पतसंस्था असो की केंद्रातली संसद, लोकांनी सत्ता बदल केला तर तो झोंबणे स्वाभाविक असले तरी तो पराभव नम्रपणे, खिलाडूपणे व अधिक कार्यक्षमपणे स्वीकारलाच पाहिजे. नवे सत्ताधारी आल्यावर त्यांच्या विचाराने, मगदुराने कारभार होण्यासाठी त्यांना योग्य वाटतील असे बदल केले जाणारच. केंद्रात नवे सरकार आल्यावर त्यांच्या मंत्रीमंडळाचे सदस्य, सचिव, असंख्य यंत्रणांचे प्रमुख वगैरे सगळया पदांवर बदल होणारच. राज्यस्तरावरची मंडळे, समित्या, सल्लागार नवे येणार. त्याचप्रमाणे गावपातळीवरसुद्धा शाळा-पतपेढी-मंडळ अशा संस्थांतून सत्ताबदलानंतर आपापल्या पसंतीची माणसे नेमली जातात. पूर्वीचीच माणसे तशीच त्या जाग्यावर ठेवली तर नव्यांना पाहिजे आहे तसा कारभार होण्यात अडचणीच येणार! उलट कोणत्याही स्तरावर तसा सत्ताबदल झाल्यावर आधीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वत: होऊन पदत्याग करावा किंवा किमान कोणताही अधिकारबदल, बदली केल्यास त्यास संमती सूचित करावी असा सभ्य संकेत आहे.

स्वातंत्र्य आंदोलनाच्या मोठ्या पुण्याईवर काँग्रेसने बराच काळ देशभर राज्य केले. नेहरूंपासून ते गावच्या नारबा-केरबापर्यंत सगळयांनी खादीचे डगले अडकवून सत्ता शब्दश: भोगली. त्यांच्या वळचणीला किंवा दाराशी राहून, बऱ्याच चळवळींनी जाती निरपेक्षतेचे ढोंग करून जातीय द्वेष वाढवला, स्त्रीमुक्तीची पोपटपंची करत पोरीबाळींना फिरणे कठीण केले, शिक्षणगंगेचा प्रवाह खेळवण्याच्या नावाखाली शिक्षणात पंडेगिरी केली, एकूणात पुरोगामित्त्वाचे ढोल बडवत समाज खूप मागे नेला. हे सगळे जनता सहन करत असली तरी त्या भोगराज्याचे मूल्यमापन ती करतच असते. हळूहळू अशा सत्ताधाऱ्यांना बाजूला करत केंद्रस्थानी भाजपला निर्विवाद बहुमत देऊन, जनतेने मोदींकडे सत्ता दिली, महाराष्ट्नत फडणवीसांकडे दिली. हा पक्ष सत्तेवर आला हे तर नाकारता येत नाही. त्याची पात्रता लोकांनी अपेक्षित केली आहे, त्याहीपेक्षा काँग्रेस व त्यांच्या `दांभिक परिवारा'ची अपात्रता लोकांनी झिडकारली आहे. तरीही हा `परिवार' अजूनी इतका इतका इतका जळफळाट करतो आहे की, त्यांच्या बेतालपणामुळे तो स्वत:चाच विरोध वाढवून घेत आहे, याचे त्यांस भान नाही.

भाजपने सत्तेवर आल्यानंतर केलेल्या पुष्कळ निवडनियुक्त्या त्रयस्थ व सुजाण विचार करणाऱ्या कित्येकांस खटकणाऱ्या असतील; परंतु राज्यकर्त्यांचा तो अधिकार मानायला नको काय? पूर्वकाळची ढोबळ उदाहरणे कुणालाही आठवतील. काँग्रेसचे बाबासाहेब भोसले, जनता दलाचे देवेगौडा, समाजवादी राजनारायण किंवा आजचे लालूप्रसाद; फारच भीषण म्हणजे राबडीदेवी वगैरे वगैरे! असल्या `नियुक्त्यां'वर या पराभूत परिवारा'ने फारसे तोंड टाकले नव्हते, जेवढे ते आज मोदी किंवा सुषमा स्वराजवर बडबड करत आहेत! बाबासाहेब पुरंदरे यांना `महाराष्ट्न् भूषण' द्यायचा निर्णय या तोंडपाटील मंडळींनी अकारण वादग्रस्त केला. आजवर कुणाकुणाला `भारतरत्न' ते `पद्मश्री'वाटल्या गेल्या ती यादी त्यांनी एकदा डोळयापुढे आणली असती तर त्यांना रडण्यासाठी, किंवा पत्रके काढून माध्यमबाजीने सत्यशोधक विरोध करण्यासाठी किती संधी होती ते त्यांच्याही लक्षात येईल. सध्याच्या सत्ताधारी भा.ज.प.चा कारभार, नियुक्त्या, निर्णय हे सर्वकाही छानछान होईल असे कोणी मानत नाही. किंबहुना गेल्या वर्षभराचे मूल्यांकन कुणी हल्लीच्या शालान्त परीक्षेप्रमाणे काठावरच्या मुलांना नव्वद-शंभरीच्या घरात नेऊन ठेवणारे करत नाही. परंतु सत्ता मिळवण्याचा पूर्वार्ध संपल्यावर ती प्रत्यक्ष राबविण्याचा उत्तरार्ध पाहिला, तपासला तरी पाहिजे. सत्ता राबविण्यासाठी कोणतीही नियुक्ती, कोणतेही पद जाहीर झाले की `पराभूत परिवार' छातीच बडवायला सुरुवात करतो हे अजब तंत्र आहे.
ज्यांनी आजवर आपापल्या क्षेत्रात काही कामगिरी खरोखरीच केली आहे, त्यांनासुद्धा या अश्लाघ्य विरोधामुळे असे एखादे लहानमोठे पद, एखादा सन्मान नकोसे वाटू लागल्यास नवल नाही. ते पद किंवा सन्मान नको वाटून या भुंका, हे छाती पिटणे, ती पत्रके, वैचारिक दंभातून आलेले ते रोष आणि पराभूत वास्तवातून आलेली भडकभाषी आंदोलने यांबद्दल भीती वाटणारी कितीतरी मोठी माणसे या समाजात आहेत. त्यांच्याही मनांत या मंडळींनी निराशा दाटून आणली आहे. त्यांचा त्या रडक्या काँग्रेसशी किंवा उन्मादी भाजपशी संबंध नाही; अस्मितावादी शिवसेनेशी किंवा फुटीर बनलेल्या रिपब्लिकनांशी संबंध नाही, स्वत:च बुर्झ्वा बनलेल्या साम्यवाद्यांशी किंवा स्वयंमन्य अल्पसंख्य समाजवाद्यांशी संबंध नाही... पण त्या सर्व विचारधारांच्या मुळाशी असू शकणाऱ्या समन्वय-सहिष्णुता-वैचारिकता-कृतिशा%मण्ॅिद्ग-%ीींर्$ॅणुर्र्डी-िेर्र्ज्ञ्ीद्धींकर्डी-कूर्र्डींिंी यांच्याशी त्यांचा संबंध आहे. माणसाला काही कृती करूच द्यायची नाही इतका विखार, योजून पेरला जात असेल तर कोणती शांत-समंजस-स्वनामधन्य व्यक्ती असली पदे व सन्मान स्वीकारेल? अब्दुल कलामांच्या निर्वाणानंतर कोणी एका पाकिस्तानी पदाधिकाऱ्याने म्हटले की, `कलाम एक सामान्य श्रेणीचे वैज्ञानिक होते; केवळ ते मुसलमान म्हणून त्यांना दिखाऊ राष्ट्न्पती केले'... हे पाकिस्तान्याने म्हटले म्हणून कोणी जगात खरे मानले नाही. कदाचित जगभरात पाकिस्तानच्या बाजूची धर्मनिरपेक्षता कमी पडली असेल. पण या देशातल्या कुणी `थोर विचारवंता'ने त्या आशयाची पत्रकबाजी केली नाही हे नशीब; कलामांचे व आपलेही!

तात्पर्य असे की या पराभूत वाचाळांनी व दिशाहीन नरवीरांनी आपल्या वैचारिकतेला जरा आवर घालावा. परवाच्या स्वातंत्र्यदिनास सार्वजनिक ध्वज वंदनासाठी एका गावातील सच्च्या-शुद्ध-ज्येष्ठ व्यक्तीला प्रमुख पाहुणा म्हणून बोलावल्यावर त्या व्यक्तीने `मला कुणाच्या तरी अयोग्य विरोधाची भीती वाटते' असे म्हणून नकार दिला. हे असले परिणाम खचितच फार वाईट आहेत. प्रत्येकाजवळ मोदी, सुषमा, पुरंदरे किंवा झगडे, परदेशी, टी चंद्रशेखर इत्यादी अधिकारी यांच्याइतके धैर्य व ठामपणा असणार नाही. पण सामान्य समाजातील पात्रतेच्या निवड-नियुक्त्यांना या `पराभूत परिवाराची' दृष्ट लागणार असेल तर इथे चांगले काही घडण्याची आशा नाहीच; पण हे उपद्रवी मुखंड जे काही घडवतील तेच चांगलं, म्हणून असे सन्मान्य त्रयस्थ विचारी लोक चार पावले लांब निघून जातील. रशियातून एके काळी विद्वान-लेखक-शास्त्रज्ञ-विचारवंत यांनी देशत्याग करण्याची रीत होती. तसले काही इथे घडायला नको!!
***

आमचीही `ताई' सहजत: गेली -
जुलैचा अंक वाचला. `तिच्या जाण्यातही सहजता' वाचून आमच्या ताईच्या(आत्या) आठवणी जागृत झाल्या. ५ फेब्रुवारी १९९७. आमची ताई ८८ वर्षे वयाची, पण तीही शरीर-मनाने खंबीर. सकाळचे उद्योग आटपून फुलवाती करत बसली होती. नंतर आंघोळीला गेली. बराच वेळ झाला. हाक मारली तेव्हा हळू हळू बाहेर आली. `आज एवढा उशीर का?' - उत्तर नाही. लुगडं नेसायलाही वेळ लागला. नंतर देवपूजेला बसली. तिथेही वेळ लागला. उठल्यावर जेवायला वाढलं. `अन्नावर वान्साच (इच्छा) नाही' म्हणाली. अंथरुण घालून दिलं. आडवी झाली ती उठलीच नाही. सायंकाळी चारच्या सुमारास गेली. मरण सुखाचं मिळालं, पण तिचं आयुष्य खरं जीवन!!
नवव्या-दहाव्या वर्षी लग्न झालं. न्हाण आल्यावर नवऱ्यादारी पोचवायची अशी पद्धत. नवरा शाळेत शिकत होता, आजारी पडला व गेला. इकडे वडिलांनी केशवपन करून घरात ठेवली. ती आमच्याच घरात राहिली. सुरुवातीला न्हाव्यासमोर बसायची. गावातील वैश्य समाजातील, डोक्यावरच्या पदराची एक बाई होती. तिने तिला, आपली आपण हजामत करायला शिकवलं. माझ्या वडिलांची ही थोरली बहीण. ते तिला ताई म्हणायचे, म्हणून आम्ही सगळे व गावातील लोकही `ताई' म्हणायचो!
तिला काय येत नव्हतं? दोन इयत्ता शिकली होती. लिहिता-वाचता येत होतं. पत्र लिहायची! `काशिताई वझे' अशी सही करायची. रामायण-महाभारत-भागवत असं वाचायची व इतरांना वाचून ऐकवायची. शिवणकला, विणकाम, भरतकाम, नक्षीकाम छान करायची. गोधड्या छान विणायची. स्वयंपाक उत्तम करायची. अजूनही लोक आठवण काढतात. नवीन चुली लिंपणं, जुन्या सारवणं, जमीन सारवणं, घुशींची बिळं लिंपणं, लाकडं रचून ठेवणं, भांड्यांना कल्हई काढणं, आजारपणात सर्वांची सेवा करणं, आल्यागेल्याची देखभाल करणं... सारं-सारं-सारं!
माझ्या वडिलांपेक्षा ही १३ वर्षांनी मोठी. माझ्या वडिलांना तिनं अंगाखांद्यावर खेळवलं. आम्हा भावंडांना खेळवलं व आमच्या मुलांनाही खेळवलं. तीन पिढ्या आमच्या घराण्याची सेवा केली व गेली. `उंच माझा झोका' ही मालिका व `काकस्पर्श' हा सिनेमा पाहताना तिची आठवण यायची.
ते गेली तेव्हा, १०-११-१२`दिवस चालवताना' तिच्या नवऱ्याचं नाव कुणालाही माहीत नाही. घरात तो विषयच कधी काढायचा नाही. शेवटी माझ्या मित्राकडून `वझे घराण्याचा इतिहास' हे पुस्तक आणलं त्यात त्यांचं नाव `लक्ष्मण' हे समजलं. तिचे थोडे पैसे होते. तिचा पुतण्या मुंबईला असतो त्याच्याकडे ते ड्नफ्टनं पाठवले; त्याने तो ड्नफ्ट परत केला. मग ते पैसे गोंदवले इथे अन्नदानासाठी पाठवले. दरवर्षी गोंदवल्याहून तिच्या नावे `प्रसाद' येतो. ती स्वावलंबी होती. कुणाच्या ऋणात नव्हती, आम्हीच तिच्या ऋणात सदैव राहू!
- अशोक विष्णू आपटे, म्हापसा(गोवा) फोन(०८३२)२२५३७१८

गेले ते दिवस
शैक्षणिक गोंधळ होताच
हल्ली दहावी-बारावीचे निकाल लागतात तेव्हा मुलींचं यश ढळढळीत उठून दिसतं. मुलींना आता कोणतंही शिक्षण, व्यवसाय वर्ज्य नाही. मागे वळून पाहिलं तर मुली गुणांनी कमी होत्या असं नव्हे, तर त्यांना संधी कमी मिळत होत्या. मुलींना शिक्षण मिळत होतं पण गरजेपुरतं. निमशहरी भागात, खेड्यांत एकूण कमीच! `मुलींना शाळेत घाला' असा आदेशच द्यावा लागे की काय कोण जाणे! `तुमची मुलगी सात वर्षांची झाली, तिला शाळेत घालावे' अशा आशयाचे पत्र नगरपालिकेकडून माझ्या वडिलांना आलेले मी पाहिले आहे. अर्थात मी त्याआधीच शाळेत जायला लागले होते, तो भाग वेगळा.
पालकांच्या ऐपतीप्रमाणे आणि मनोवृत्तीप्रमाणे मराठीतली फायनल, पुढे पुढे मॅट्नीकपर्यंत मुली शिकायच्या. कॉलेजला जाऊन पदवी घेणाऱ्या मात्र बोटावर मोजण्याइतक्याच. मी त्यातली एक भाग्यवान. माझे वडील वकील. समाजात वावरणारे, समाजासाठी काहीबाही करणारे होते. मुलगा-मुलगी भेद करणारे नव्हते. त्यांनी शिक्षणाला नेहमीच महत्त्व दिले. शिक्षणाचा हेतूही त्यांच्या मनात स्वच्छ होता-सुशिक्षित, सुसंस्कारित आणि स्वावलंबी बनवण्याचा. मला कॉलेजला घातल्यानंतर एक परिचित त्यांना म्हणाले होते, ``कशाला कॉलेजला घालताय मुलीला? डिग्री मिळाली की लग्न आणखी आवघड. करून टाका लग्न आणि व्हा मोकळे!'' त्यावर वडिलांचं उत्तर होतं, ``उद्या प्रसंग आलाच तर हाती पोळपाट-लाटणं घ्यायला लागू नये, एवढं तरी शिक्षण मुलीला द्यायला हवंच. काळ बदललाय आता!''
दैवगतीनं पुढे खरोखरीच त्यांचं आकस्मिक निधन झालं आणि ती वेळ आली! पण तोपर्यंत मी पदवीधर झाले होते. मला नोकरी मिळाली आणि मी घर सावरू शकले. मुलींच्या शिक्षणाबद्दलचा माझ्या वडिलांचा विचार चारचौघांपेक्षा वेगळा होता, म्हणूनच हे घडू शकलं.
त्यावेळी आम्ही काय शिकत होतो? कसं शिकत होतो? अगदी पुस्तकी शिक्षण, झापड लावून! भाषा, शास्त्र, गणित हेच विषय. पहिल्या काही वर्गात चित्रकला, शिवण, संगीत वगैरे. आता विषयांची केवढी विविधता आहे!-आणि शिकण्याच्या पद्धतीपण!
एक मात्र आत्तासारखंच! त्याही वेळी विद्यार्थ्यांचं भवितव्य शासनाच्या धोरणानुसारच ठरायचं. त्यातला एक महान निर्णय खेर मंत्रीमंडळाचा-पाचवीपासूनचं इंग्रजी बंद करण्याचा. मी पाचवीत गेले आणि इंग्रजी बंद! वडील म्हणाले, ``मग कशाला तुला फी भरून हायस्कुलात घालायची?'' जिल्हा लोकल बोर्डाच्या नियमानुसार मराठी सातवीपर्यंत मुलींना शिक्षण मोफत होतं. त्यामुळे मी व्हर्नाक्युलर फायनलला. बरोबर दहा वर्षांनी माझी धाकटी बहीण पाचवीत गेली आणि त्यावेळी पुन्हा पाचवीपासून इंग्रजी सुरू! मग काय, माझ्या बहिणीला कन्या शाळेत जायला मिळालं! त्यामुळे आमचं इंग्रजी एकदम सुमार! आठवीत गेले तरी मला ए पासून झेडपर्यंत अक्षरं किंवा इंग्रजी आकडे येत नव्हते. माझ्या आधी हायस्कूलला काय, शाळेतही जाणारं कुणी नव्हतं! आणि याचा फटका पुढे कॉलेजात मिळाला. कॉलेजमध्ये त्यावेळी मराठी माध्यम नव्हतं. त्यामुळे पदवीपर्यंत आमची गाडी थर्डक्लासपर्यंत घसरली! अर्थात पदवीचा, विषयाचा आणि नोकरीतल्या कामाचा थेट संबंध नसतोच!
शासनाच्या धोरणानुसार प्राथमिक शाळांतून त्यावेळी सूतकताई, विणकाम विषय असायचा. आमच्या शाळेत ते होतं. त्यामुळे वयाला न झेपणारे चरख्यावर सूत काढणे, हातमागावर नवार, कापड विणणे हेही शिकावं लागलं. त्यावेळी ते केवढं अवघड वाटायचं. आठवीला हायस्कूलला गेले. मी ज्या शाळेत होते त्याच शाळेत आमच्या वाड्यात राहणारे काळे गुरुजी होते. त्यांना संगीत, नाट्य यांची खूप आवड. शाळेतले आणि शाळेला जोडून असलेल्या ट्न्ेिंनग कॉलेजातले कार्यक्रम तेच बसवत. वडिलांचाही आग्रह असायचा-सभाधीटपणा हवा. वक्तृत्त्व, निबंध, नाटक सगळयात भाग घ्यायलाच हवा! काळे गुुरुजींमुळे मला संधी मिळत गेली; आणि बालपणाचं हे वळण मला भविष्यातही अत्यंत उपयुक्त ठरलं. आकाशवाणीसारख्या श्राव्य माध्यमात निवेदक, नाट्यकलाकार, लेखक म्हणून मला छान काम करता आलं!
शिक्षणक्षेत्रात आताही धोरणं बदलत असतात. शिक्षण महाग झालंय, स्पर्धा तीव्र झालीय, शैक्षणिक पात्रता-गुणवत्ता यानुसार संधी मिळत नाहीत हेही सत्य आहे. पण आमच्या काळापेक्षा मार्ग खूप झालेत. परिस्थिती बदलत असते. आयुष्य त्यानुसार घडतं-बिघडतं.
- संजीवनी आपटे,
दामोदरी सोसायटी,बिबवेवाडी, पुणे ३७
फोन (०२०)२४४१२३६७, ९३७२७२७२३५

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन