Skip to main content

Mr.' I '

मिस्टर `आय'
एका शहरात चार मित्र गप्पा मारत चालले होते. त्यांंची नावे होती मिस्टर नोबडी, समबडी, एनीबडी आणि एव्हरीबडी! या चौघांच्या पुढे एक व्यक्ती जात होती तिचे नाव होते मिस्टर निग्लिजंट! हे साहेब रस्त्याने चालताना केळी खाऊन त्याची साल रस्त्यातच फेकत होते. मागे चालणाऱ्या चौघांना हे मुळीच आवडलं नाही. रस्त्यात साली टाकणंं योग्य नाही याबद्दल चौघाचं एकमत होतं. पण चौघांपैकी एकहीजण मि.निग्लिजंटना तसे सांगण्यास तयार नव्हता वा केळीची साले स्वत: उचलणे त्यांना मान्य नव्हते. साली उचलणेबाबत त्यांची चर्चा चालली होती.
१) समबडी, एव्हरीबडी, नोबडी म्हणाले `हे काम क्षुल्लक आहे. एनीबडी क्रॅन डू इट!'
२) एनीबडी, एव्हरीबडी, नोबडी म्हणाले, `समबडी हॅज टू डू धीस जॉब!'
३) नोबडी, एनीबडी, समबडी यांचं म्हणणं होतं, `एव्हरीबडी हॅज टू डू धीस वर्क!'
४) नोबडी पुटपुटला, `हू अॅम आय? आय एम नोबडी!'
सारांश - केळयांची साले रस्त्यात पडली होती. हे चारजण फक्त चर्चा करीत होते. या चौघांचे  मागून जी व्यक्ती येत होती तिचे नाव `मि.आय' होते. मि.आय या चौघांची चर्चा ऐकत होते. ते चौघांना म्हणाले, ``वेल, जंटलमेन, मी तुमची चर्चा ऐकतोय. तुमची कृतीपेक्षा चर्चेवर जास्त भक्ती दिसतेय. मला कृती करणे आवडतं आणि मुख्य म्हणजे ही केळयाची सालं उचलणं मला सहज शक्य आहे.'' असं म्हणून मि.आय यांनी केळयाची सालं उचलून रस्त्यालगत कचराकुंडीत टाकली.
ही गोष्ट माझ्या वाचनात आल्यावर मी अनेकवेळा `मि.आय' झालो आहे. सुरुवातीला संकोच वाटत असे पण आता अंगवळणी पडलंय! माझ्यासमोर रस्त्यात कोणी थुंकलं, कचरा टाकला तर व्यक्तीची `अवस्था' बघून मी मि.आयच्या भूमिकेत शिरतो. किमान जाणीव तरी देतो. प्रत्येक वेळी सर्वांना आवडतेच असे नाही पण माझे वास्तव्य असलेले पर्यटनशहर स्वच्छ राखणे माझे कर्तव्य आहे. या कर्तव्यपूर्तीचा आनंद मिळतो.
- म. त्र्यं. घारपुरे, सावंतवाडी
(भ्रमणध्वनी - ९४२२३८१७८०)

Comments