श्री अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सव, मिरज - श्रीकांत येडूरकर मिरजेचे ग्रामदैवत असलेली अंबाबाई. या मंदिराचा इतिहास सुमारे ४०० वर्षांपूर्वीचा आहे. मिरजेतील चंदूरकर-देशपांडे घराण्यातील पूर्वजांना तुळजापूरची भवानी दर्शन देण्यासाठी मिरजेत आली अशी आख्यायिका आहे. देवीची मूर्ती तुळजापूरच्या भवानीमातेची प्रतिकृती आहे. चैत्र प्रतिपदा ते शुद्ध नवमी या काळात देवीच्या मूर्तीवर सूर्यकिरण पडतात. नित्य पूजेसाठी गुरवाची नियुक्ती आहे. ती मंडळी अत्यंत भक्तीभावाने देवीची सेवा करतात. आश्विन शुद्ध १ ते १० नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात होतो. नऊ दिवस महापूजा, अभिषेक असतो. शिवाय दरमहा दुर्गाष्टमीस स्थानिक कलाकार देवीची संगीतसेवा करतात. प्राचीन काळात नायकिणी व कलावंतिणी गान/नृत्यातून मिरजेतील अंबाबाईची सेवा करीत असत. यातून नवरात्रात संगीत सेवेची कल्पना पुढे आली असावी. मिरज नगरीच्या उत्तर दिशेस जुन्या मालगाव वेशीत अंबाबाईचे मंदिर आहे. मंदिराचे बांधकाम इ.स.१६०० मध्ये केले. जीर्णोद्धार १९८२ मध्ये झाला. सन २००८ मध्ये शिखर बांधकाम झाले. मंदिरासमोर दगडी दीपमाळ आहे. मिरजेत पूर्वी सरस्वतीबाई सानी (कागवाडकर), ...