आद्य शंकराचार्य आणि लोकमान्य टिळक यांचे गीतातात्पर्य आद्य शंकराचार्यांच्या संदर्भामध्ये लोकमान्य टिळकांच्या गीतारहस्यावर सांप्रदायिक टीकाकारांनी जी टीका केली आहे त्यामध्ये एका परिमाणाचा विचार केलेला नाही. ते परिमाण म्हणजे आद्य शंकराचार्यांचा गीतातात्पर्य निर्णय आठव्या शतकातील असून लोकमान्यांचा १९ व्या शतकातला आहे. जवळजवळ ११ शे वर्षांचे अंतर आहे. परिस्थितीत बदल नक्कीच झालेला आहे. आद्य शंकराचार्यांच्या वेळेला बौद्ध जीवनपद्धतीचा परिणाम होता तर टिळकांच्या काळामध्ये ब्रिटीश सत्ता होती. म्हणून आद्य शंकराचार्यांच्या समोरचा प्रश्न हा बौद्ध प्रभावाचे निर्मूलन करून वैदिक धर्म व संस्कृतीची पुनर्स्थापना करणे हा होता तर लोकमान्यांची समस्या परकीय सत्ता परास्त करून स्वराज्य संस्थापनेचा होता. म्हणून कर्मसंन्यास हे गीतेचे तात्पर्य म्हणून आद्य शंकराचार्यांनी प्रतिपादन केले तर लोकमान्यांनी कर्मयोग हे तात्पर्यसुद्धा काळाची आवश्यकता म्हणून प्रतिपादन केले. बौद्ध भिक्षूंच्या संन्यस्त जीवनाचा प्रभाव वैदिक धर्मियांवर पडून मिमांसकांच्या वैदिक कर्मकांडाचा प्रभाव निष्प्रभ झाला होता. वैदिक धर्म आणि संस...