पोळणारं वास्तव एका दानशूर गृहस्थानं भलीमोठी रक्कम बाजूला काढून त्याचा ट्न्स्ट केला. हेतू चांगला होता. गुणीजनांसाठी प्रोत्साहन, अडल्या नडल्यांस मदत वगैरे. एकूणात समाजासाठी म्हणून खर्च करायला घसघशीत रक्कम होती. ही रक्कम अर्थातच सत्पात्री पडावी अशी दात्याची आणि त्याच्याशी संबंधित सर्व `कार्यकर्त्यां'ची प्रामाणिक इच्छा होती. त्या दिशेने प्रयत्न सुरू झाले. पहिला शोध सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांचा करायचा होता. हा गुणवत्तेचा शोध लागता लागेना. संपूर्ण जिल्ह्यातून फक्त शंभर कार्ये आपल्या यादीवर आणण्यासाठी सर्वांनी घोषणा केल्या. प्रत्येकाला ही यादी करण्याची जबाबदारी अगदीच किरकोळ वाटली. प्रत्येकजण `कसा'चा होता, त्यामुळं या पात्रतेसाठी निकष केवळ विश्वासाचा होता. निवडलेलं कार्य खऱ्या पात्रतेचं असावं एवढीच माफक अपेक्षा. संस्था नोंदलेली असायला हवी असं नाही, संस्थाच हवी असंही नाही... एकांडी शिलेदारी चालेल, ऑडिट-हिशेब यांबद्दल आग्रह नाही, कार्याचा विषय (अपंग-अनाथ-पर्यावरण-अध्यात्म-रुग्णसेवा वगैरे) कोणताही असेल, दाखले-शिफारसी-अर्ज यांची गरज नाही.... तर आपण खरी तळमळ शोधायची आहे!! शंभर संस्...