Skip to main content

Lekh on IPL Matches

फसवणूकीची साखळी
- विवेक ढापरे, कराड  (मोबा. ७५८८२२११४४)
पूर्वी  आपल्याकडे राजे-महाराजे स्वत:च्या करमणुकीसाठी बैलांना, कोंबड्यांना विकत घेऊन त्यांच्या झुंजी लावून, पैसे उधळून, आपली करमणूक करून घ्यायचे. आय पी एल हा त्याचाच नवा  सुधारित अवतार वाटतो. इथे चित्रपट, व उद्योग क्षेत्रातील बडी धेंडे खेळाडूंचा लिलाव पुकारतात. खेळाडूंवर कोट्यावधींच्या बोली लावून त्यांना विकत घ्यायचे व मालकांच्या संघांनी एकमेकात सामने खेळायचे. लोकांना खुळे करून टाकतात, क्रिकेटवेडा भारतीय माणूस या तमाशाचा उत्सव करू पाहतो. दुनिया झुकतेच, हे झुकानेवाले आहेत!
मला क्रिकेट पाहण्याची फारशी आवड कधीच नव्हती. पोटापुरती भाजीभाकरी मिळवून प्रपंच करणारी आपण सामान्य माणसं, हल्ली त्या बड्या दुनियेत रमू लागलो. दोष आपलाच की! माझ्या पगारदार नवश्रीमंत भाच्याने तिकीटे काढली होती, त्यामुळे अनवधानाने म्हणा किंवा योगायोगाने म्हणा, मला आयपीएल चा सामना प्रत्यक्ष पाहण्याची संधी(?) मिळाली.
१५ मे रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रात्रौ ८ वाजता मुंबई इंडियन्स व राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये सामना होता. आम्ही संध्याकाळी साधारण साडेसहाच्या सुमारास वानखेडे स्टेडियमच्या बाहेरील बाजूस पोहोचलो. प्रवेश मिळविण्यासाठी चटक मटक तारुण्याची झुंबड उडाली होती. मुंबई इंडियन्सचे टी-शर्ट स्वत:च्या पैशाने बाजारातून खरेदी करून, सर्वजण मुंबई इंडियन्सला प्रोत्साहन देण्यासाठीच निघाले होते. तोंडावर चित्रविचित्र रंगवून घेण्यासाठी जवळच्या रस्त्यावर ५० रुपये घेतले जात होते, तिथेही गर्दी झाली होती.
जिन्यावरून स्टेडियममध्ये प्रवेश करण्यासाठी रीघ लागली होती. धातूशोधक यंत्राजवळ सर्वांची तपासणी होती. खिशातली चिल्लरसुद्धा काढून घेतली, मॅच संपल्यावर ती परत देण्यात येईल, असे सांगण्यात येत होते. खाद्यपदार्थ, पाणी, स्त्रियांना तर पर्ससुद्धा आत न्यायला मनाई होती. सर्वांनी मोकळया अंगाने, मोकळेपणाने सामन्याचा आनंद लुटावा, अशी आयोजकांची मनापासून इच्छा असावी. आणि `बर' म्हणण्याशिवाय इलाज नव्हता. एवढे सगळे सव्यापसव्य करून सात वाजण्याच्या सुमारास आम्ही स्टेडियममध्ये पोहोचलो.
सुनील गावसकर स्टॅन्डमध्ये आमची बसायची जागा होती. प्रत्येक सीटवर मुंबई इंडियन्सचे निळे झेंडे ठेवले होते. म्हणजे तुमच्या मनात असो-नसो, तुम्ही मुंबई इंडियन्सलाच प्रोत्साहन द्यायचे, असा सारा मामला. स्टेडियममधील झगमगाट आणि उत्सवी वातावरण पाहून, आपण नक्की अटीतटीचा सामना बघायला आलोय की जत्रा बघायला आलोय, याविषयीच संभ्रम निर्माण झाला. कर्णकर्कश संगीत लावलेले होते, कदाचित ध्वनी प्रदूषणाचा नियम इथे लागू नसावा. त्यावर उभय संघांच्या चिअरगर्ल्स आणि उत्साही प्रेक्षक (यामध्ये स्त्रियांचा भरणा अधिक होता) नाच करत होते. असे नाचणाऱ्यांत `महिला' होत्या असे आपले आपण म्हणायचे, कारण आपण सभ्य असावे. अन्यथा त्या फटाकड्या पोरी, बाया किंवा तत्सम नारीविश्व आपल्यासारख्यांच्या घरातले नसावे. परंतु हाही माझा भाबडा समज. हल्ली साधारण घरांतूनही ते विश्व संचारू लागले म्हणतात.
एका बाजूला मुंबई इंडियन्सचे खेळाडू बॅटने चेंडू उंच उडवून झेल पकडण्याचा `सराव' करीत होते. मैदानातील एकूण वातावरणानुसार या सरावामध्येही गांभीर्याचा अभावच होता. शाळेतल्या पोरांचे पाहून हा सराव करतात म्हणे. अशा सर्व गदारोळातच रोहित शर्मा व राहुल द्रविड हे उभय संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात आले. रवि शास्त्रीबरोबर त्यांचा झालेला संवाद मैदानातील स्क्रीनवर पाहायला मिळाला. मैदानातील जत्रा हळूहळू पांगायला लागली. बरोबर आठ वाजता सामन्यास सुरुवात झाली. आम्ही बसलेल्या स्टॅन्डच्या बाजूलाच एक मंच होता. तेथे माईक हातात घेऊन एक व्यक्ती जोरजोराने ओरडून `थ्री चिअर्स फॉर मुंबई इंडियन्स' असे म्हणत प्रेक्षकांना उठवून त्यांना झेंडे हातात घेऊन नाचायला लावत होती. आणि खुळावलेले प्रेक्षक प्रतिसाद देत होते. सामन्यापेक्षा आमचे लक्ष तिकडेच वळत होते. या मंचावर अधूनमधून भुसनळेही फुटत होते. खेळाडूंच्या प्रत्येक चौकार-षटकारावर उभय संघाच्या तोकड्या कपड्यातील चिअर गर्ल्स नाच करून खेळाडूंचा हुरूप आणि आमची अस्वस्थता वाढवत होत्या.
सामन्यासाठी आत येताना बरोबर काही नेऊ का दिले नाही याचा उलगडा थोड्याच वेळात झाला. स्टॅन्डमध्ये फिरणाऱ्या फेरीवाल्यांकडील पदार्थांचे दर पाहून एरवी मला धक्काच बसला असता. पाण्याची बाटली ५०/-रुपये, सामोसे ५०/- रुपये, वेफर्स ३०/- रुपये, पिझ्झा १७०/-रुपये, कोक ६०/-रुपये, साधे पॉपकॉर्न ५०/-रुपये इतके भयानक दर असूनही पदार्थांना प्रचंड मागणी होती व फेरीवाल्यांकडील पदार्थ लगोलग संपत होते. छापील किंमत वगैरे बंधन नव्हते. त्यांना कोण हटकणार? स्टेडियमवर चारही बाजूंनी सोडलेले प्रखर विद्युत झोत, सामन्यापूर्वी भरपूर पाणी मारून हिरवेगार केलेले मैदान आणि इतक्या अवाजवी दरातील खाद्यपदार्थांना असलेली मागणी पाहता, रोज पाहात असलेल्या दुष्काळाच्या बातम्या खोट्या तर नाहीत ना; असे वाटायला लागले.
अशा सगळया वातावरणात रात्रौ ११.३० च्या सुमारास, अपेक्षेप्रमाणे किंवा ठरल्याप्रमाणे मुंबई इंडियन्सनेच सामना जिंकला. मग मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी सचिन तेंडुलकरसह मैदानाभोवती फेरी मारली आणि उपस्थित क्रिकेटप्रेमी धन्य झाले. आम्हीही धन्यधन्य झालो. त्यांनी फेकलेल्या टोप्या उचलायला क्रिकेटप्रेमींची झुंबड उडाली होती. आपल्याला सगळयांनी टोप्या घातल्याचे विसरून सर्वजण त्या टोप्या मिळवण्यासाठी आतुर झाले होते. सामना संपवून बाहेर आलो तर चिल्लर परत देतो म्हणणारे चिल्लरसह गायब होते. ७५० रुपयांचे तिकीट काढून पाहिलेल्या या सामन्यामध्ये सुरुवातीला खुर्चीवर ठेवलेले झेंडे, हीच काय ती फुकट मिळालेली एकमेव गोष्ट!
दुसऱ्या दिवशीचा पेपर बघतो तो आयपीएल मधील फिक्सिंगच्या बातम्या! एवढे पैसे खर्च करून, स्वत:चा वेळ घालवून बहुधा आधीच फिक्स केलेला सामना आपण बघितला याचा पश्चात्ताप वाटू लागला. लहानपणी शाळेत असताना आम्ही मुले एका जत्रेला गेलो होतो. तिथं असले बरेच खेळ - गंडवागंडवीचे - होते. नको नको म्हणत असताना आमच्यातला एक मोरू तिथं गेला, आणि त्यावेळी वडिलांनी दिलेले पाच रुपये घालवून आला. त्याचा केविलवाणा चेहरा आज मला आठवतो आहे.
हद्दीबाहेर गेलेल्या क्रिकेटवेडाचा फायदा घेत करोडो रुपयांचा मलिदा मिळवायचा हे सगळे थांबवायला हवे असेल तर कोण थांबवेल? आता प्रेक्षकांनीच नशेतून स्वत:ला बाहेर काढून, सारासार विचार करायला हवा की, कुठंपर्यत आपण या व्यसनापायी स्वत:ची फसवणूक करून घ्यायची आणि आपल्याला मूर्ख बनवणाऱ्या लोकांची धन करून द्यायची? या प्रश्नाच्या उत्तरातच सारे काही दडलेले आहे.
आम्ही आमच्या (भाच्याच्या) खिशातले प्रत्येकी हजारभर रुपये तिथं दौलतजादा करून आलो, आता हे सांगावं तरी कसं? पण त्या वाटेला जाणाऱ्यांना सावध करावं इतकंच!
***

Comments